सुश्री सुनीता दामले
☆ विविधा – ललित : श्रावणमासी ☆ सुश्री सुनीता दामले
आषाढातल्या पावसाच्या मुसळधारेनंतर लगेचच येतो ‘हासरा नाचरा, सुंदर साजिरा’ श्रावण महिना.. पेरणी-लावणी ची लगबग-धांदल आटोपून बळीराजा म्हणजे शेतकरी राजा आता जरा निवांत झालेला असतो. रोपांची छान उगवण होऊन ती माना वर उंचावून उभी असतात शेतात, आणखी काहीच दिवसांनी येणाऱ्या सुगीची-सुखसमृद्धीची चाहूल देत..
हिरवागार शेला पांघरलेली धरती, डोंगरांच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत खाली येत आनंद-तुषार पसरवणारे निर्झर, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी नटलेले आकाश.. आहाहा, काय सुंदर रूप श्रावणातील या निसर्गाचे.. हा निसर्गोत्सव हलकेच माणसांच्या मनामनातही झिरपतो आणि मग तो साजरा करण्यासाठी येतात श्रावणातले विविध सणवार..
हा पाऊस, सृजनाचा म्हणजेच नवीन काहीतरी निर्माण होण्याचा एक उत्सवच घेऊन येतो नाही? म्हणजे बघा ना, मातीच्या कुशीत रुजलेले एक चांगले बी रोप बनून शेकडो-हजारो दाण्यांना जन्म देते, अनेकांच्या तोंडचा घास बनण्यासाठी.. विचारांचंही तसंच आहे. मनात रुजलेला एक चांगला विचार शेकडो चांगली कामे हातून घडवतो आणि जीवन सुंदर बनवतो.
श्रावणातले सणवारही मला वाटतं असंच मनामध्ये चांगल्या विचारांचं शिंपण आणि रोपण करत असतात. नारळी पौर्णिमेला केली जाणारी समुद्राची पूजा किंवा बैलपोळ्याला केले जाणारे बैलांचे पूजन, यामागे कृतज्ञतेचा सुंदर विचार असतो. एरवी भीतीदायक वाटणाऱ्या नाग-सापांची उपयुक्तता व त्यांचा गौरव नागपंचमीच्या पूजेतून व्यक्त होते.. मंगळागौर, गोकुळाष्टमी यासारखे सण उत्सव स्त्री-पुरुष-बालांना सर्व काळज्या-विवंचना विसरायला लावून आनंदात न्हाऊ घालतात.
या महिन्यातली आणखी एक विशेष गोष्ट मला आठवते.. श्रावण महिना म्हटला की आमच्या घरातल्या देवांमध्ये अजून एक भर पडायची; जिवतीचा कागद आणला जायचा, पुठ्ठ्यावर चिकटवून देवांच्या फोटो शेजारी टांगला जायचा. नागोबा, श्रीकृष्ण, नरसिंह, बुध-बृहस्पति आणि जिवत्या म्हणजे दोन लेकुरवाळ्या स्त्रिया अशी चित्रं असायची त्यावर. त्यापैकी प्रत्येकाची वेगवेगळ्या वारी पूजा व्हायचीआणि मग त्या त्या देवाची कहाणी आई वाचायची.कहाणी म्हणजे गोष्ट.. ‘ऐका परमेश्वरा तुमची कहाणी’ असं म्हणत कहाणीला सुरुवात व्हायची आणि ‘ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ म्हणून सांगता व्हायची.
या श्रावणातल्या शुक्रवारची एक हळवी आठवण माझ्या मनात आहे. शुक्रवारी माझी आई जिवतीची पूजा करायची. जिवतीची पूजा आईने आपल्या लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी आणि सुखरूपते साठी करायची असते. माझी आई पूजा आणि कहाणी वाचून झाली की मला पाटावर बसून ओवाळायची आणि मग एकाग्रतेने नमस्कार करून म्हणायची “जिवतीबाई, सगळ्यांच्या लेकरांना सुखी ठेव”.. मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी, तिला लग्नानंतर सोळा वर्षांनी झालेली! थोडी मोठी झाल्यावर एकदा मी आईला विचारलं,” आई, तू ही पूजा माझ्यासाठी करतेस ना? मग ‘माझ्या मुलीला सुखी ठेव’ असं का नाही म्हणत?” त्यावर आई म्हणाली,” अगं, आपण देवाकडे मागतोय. केवढा मोठा दाता तो! मग त्याच्याकडे कंजुषपणानं फक्त आपल्यासाठीच मागायचं? सगळ्यांसाठी मागितलं तर कुठं बिघडलं ? मन मोठं ठेवावं माणसानं, आपल्या पुरतंच नै बघू… आणखी एक गोष्ट लक्षात ठेव,’जे चिंती परा ते येई घरा’ दुसर्याचं वाईट चिंतलं तर आपल्या पदरी तेच येणार हे नक्की, आणि दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलंही चांगलंच होणार.” आज जेव्हा मी ‘सगळ्यांच्या लेकरांना सुखी ठेव’ अशी प्रार्थना श्रावण शुक्रवारी जिवतीकडे करते तेव्हा मला हा प्रसंग आणि आईचे हे शब्द आठवतात. वाटते, अरे हा तर उपनिषदातील ‘सर्वेपि सुखिन: संतु, सर्वे संतु निरामया:, सर्वे भद्राणि पश्यन्तु,मा कश्चिद दु:खमाप्नुयात्’ या ऋषिविचारांचाच आईच्या तोंडून झालेला उद्घोष!!!
आज माझी आई या जगात नाही पण या संस्कारांच्या रुपाने ती माझ्या मनात कायम जिवंत आहे.
© सुश्री सुनीता दामले