सौ.अंजली दिलिप गोखले
संक्षिप्त परिचय
शिक्षा – MSc B.Ed.
अभिरुचि – वाचन, रेडिओ ऐकणे यातून लिखाणाचा छंद.
प्रकाशित साहित्य--चार कथासंग्रह दोन अनुवादित,(इंग्रजी to मराठी), एक विज्ञान कथासंग्रह, विज्ञानलेख.
प्रसारण – सांगली आकाशवाणीवर अनेक कथा व लेख प्रसारित.
पुरस्कार – ऑटोबायोग्राफी ऑफ योगी-परमहंस योगानंद. या पुस्तकाला कवितासागर साहित्य अँक्याडमी पुरस्कार, प्रतीक्रुती या विज्ञानकथेला आखिल भारतीय मराठी विज्ञान कथास्पर्धेमध्ये दुसरे बक्षीस.
☆ विविधा : मी मीना हरिणी – सौ.अंजली दिलिप गोखले ☆
हाय फ्रेंड्स, परवा ट्रीप ला आलेल्या सगळ्या फ्रेंडशि मी बोलतेय. आला होतात ना परवा सागरेश्वर ला? खूप दमलात ना? उन्हामध्ये नुसती पायपीट झाली म्हणून खूप वैतागला ना?
बरोबरच आहे तुमचं. फिरून फिरून, उंच उंच डोंगर चढून लालेलाल झाला होता सगळ्या. काय म्हणता? मला कसं माहिती? मी कोण? हो, सॉरी सॉरी. सांगते ह. तुम्ही सागरेश्वर च्या अभयारण्यात ज्यांना उत्सुकतेनं पहायला आला होतात, पण तुमची घोर निराशा झाली, त्या अनेक हरणे पैकी मी एक. माझं नाव मीना हरणी. तुम्ही म्हणाल, तुम्हाला मी दिसले नाही, मग मग मी कसं पाहिलं तुम्हाला? बरोबर? सांगते सांगते.
तुम्ही पहाटे-पहाटे रेल्वेनं प्रवास सुरु केलात, त्याच वेळी तुमची स्पंदनं आम्हाला इथे जाणवली. आपल्यालाही आता छान छान मुली भेटणार, पाहायला मिळणार म्हणून आम्ही पण आनंदात होतो. पण तुम्ही आलात आणि आम्हाला न भेटताच डोंगर चढायला सुरुवात केलीत. तुम्ही आमची निराशा केली. आमच्या डोंगर चढायचा म्हणजे सोपे काम नाही. आम्हाला रोजची सवय आहे. पण तुमच्यासाठी मोठं दिव्य होते. किती दमलात, घामेघूम झालात, लालेलाल झालात. कधीतरी आलं की असं होतं.
तुम्ही आमच्या अभयारण्यात आलात तेच मुळी भर दुपारी, सूर्य अगदी भर डोक्यावर आला होता. आम्ही ही उन्हामध्ये कधीच बाहेर पडत नाही. आमची चमचमती कातडी काळवंडते ना! शिवाय आम्हाला तहानही खूप लागते. अलीकडे पाण्याचेही शोर्टेज आहे. पावसाचा प्रमाण कमी झालंय, त्यामुळे आहे ते पाणी आम्हाला पुरवून पुरवून वापरावे लागते. शिवाय तुम्ही मुली किती बडबडत होतात, आवाज करत होतात. आम्हाला ते अजिबात आवडत नाही. आम्हाला शांतताप्रिय आहे. शिवाय तुमच्याकडे मोबाईल म्हणतात ते खेळणे. घरी जे ऐकता, तेच घेऊन इथे आलात. मग बदलतो काय? ती कर्कश्य गाणी आम्हाला मुळीच आवडत नाहीत. शिवाय मोबाईल मधून बाहेर पडणारे ते रेज आम्हाला खपत नाहीत. म्हणूनच आम्ही सगळ्या जणी झुडपात बसून राहिलो होतो. तुमच्या नजरेला ही पडायचं नाही असा चंगच आम्ही बांधला होता. तुमचा दंगा आणि ती गाणी यामुळेच खरं आम्ही चिडलो होतो.
आम्ही कोणीच दिसलो नाही, त्यात रण रण त ऊन, म्हणून सगळ्याजणी खूप वैतागला. पुन्हा म्हणून सागरेश्वर ला यायचं नाही असं ठरवून टाकलं. पण फ्रेंड्स, तुम्हाला सांगू का?
आयुष्यात असे चढ-उतार येणारच. किती दमछाक झाली ना तुमची? पण पाठवा बरं, कष्टानं डोंगर चढून वर आल्यावर खालचं दृश्य किती छान दिसते की नाही तुम्हाला? चौकोनी चौकोनी शेत, टुमदार छोटी-छोटी घर, आणि वळणावळणाची कृष्णा माई! कष्टाशिवाय फळ मिळत नाही असं उगाच म्हणत नाहीत.
थंडगार पाण्याच्या गुहेमध्ये आल्यावर सगळा शिणवटा निघून गेला ना? रोज संध्याकाळी आम्ही तिथेच पाणी प्यायला जातो. व्यायामही होतो आणि पाणी मिळते. तुम्हाला कष्ट करूनच माहिती नाही. आपले शरीर किती काम करू शकते तेच तुम्हाला माहिती नाही. दमत दमत का होईना, एका दिवसात दोन डोंगर पार केले तुम्ही. तुमच्या स्नायूंमध्ये हे किती प्रचंड ताकद आहे बघा. त्यात ताकतीचा वापर करा म्हणजे यशाचे शिखर तुम्ही गाठू शकता. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा खूप खूप अभ्यास करा, छान पेपर सोडवा. भरपूर मार्क्स मिळवा आणि रिझल्ट सांगायला पुन्हा आमच्याकडे या. होय याच सागरेश्वर च्या डोंगरावर. आम्ही सगळ्या जणी तुमच्या स्वागताला येऊ. तर फ्रेंड्स लक्षात ठेवा येताना ते मोबाईल खेळणं मुळीच आणू नका.
फ्रेंड्स या अनुभवावरून दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थही तुम्हाला चांगला समजला असेल. बाय, भेटू पुन्हा.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मिरज
फोन नंबर ८४८२९३९०११