सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
विविधा
☆ “आरोग्यम् धनसंपदा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
लवकर निजे, लवकर उठे
त्यासी आरोग्य संपदा लाभे
सूर्योदयापूर्वी का उठावे? असा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडतो. याचे उत्तर रात्री झोपल्याने शरीराचे चलनवलन थांबते व शरीरात आमवात निर्माण होतो. आमवातामुळे शरीरात जडत्व (सुस्ती) येऊन उष्णता वाढते. सूर्योदयापूर्वी आपल्या भोवतालचे वातावरण संतुलीत असते. सूर्योदयापूर्वी आपण जर उठलो तर शरीराच्या चलनवलनाने शरीरात निर्माण झालेला आमवात व त्यामुळे आलेले जडत्व, उष्णता नाहीशी होऊन आपण दिवसभर आनंदी व उत्साही राहून कमी वेळात जास्त काम करून प्रगती करू शकतो. परंतु जर आपण सूर्योदयानंतर जागे झालो तर सूर्यकिरणामुळे वातावरणात निर्माण झालेली उष्णता यांच्या संयोगामुळे आपल्या शरीरातील तापमान वाढत जाऊन आपल्या शरीरात दिवसभर आळस व अस्वस्थता राहिल्याने काम करण्यात उत्साह राहत नाही. त्यामुळे होणारे सर्व परिणाम भोगावे लागतात. म्हणून सूर्योदयापूर्वी उठावे तेव्हा आरोग्य संपदा लाभते.
समाधानी जीवनासाठी स्वस्थ शरीर ही प्राथमिक गरज आहे.
शरीर व मन हे दोन्हीही निरोगी असणे जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर आरोग्य संपन्न राहण्यासाठी व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार यांची अत्यंत गरज आहे. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन राहते. बल हे दोघांचेही गमक आहे. म्हणूनच बलसंवर्धन हे सुखाचे आगर आहे. बलाची उपासना हे जीवनाचे सूत्र आयुष्याचा मंत्र आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा त्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी बलभीमाच्या उपासनेची गोडी समाजाला लावली.
लुळ्या, पांगळ्या श्रीमंतीपेक्षा
धट्टी – कट्टी गरिबी चांगली.
उत्तम प्रकृती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. लुळ्या – पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी-कट्टी गरिबी चांगली. कांदा, भाकर खाऊन सुखाने जमिनीवर झोपणारा माणूस गाद्या-गिरद्यांवर लोळणाऱ्या, शारिरीक वेदनेने तडफडणाऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ असतो. प्रकृती स्वास्थ्यासाठी व्यायाम, संयम, योग्य सवयी, व्यसनांपासून अलिप्तता, उत्तम पचनशक्ती त्याचप्रमाणे शांत चित्तवृत्ती, हास्य, विनोद प्रवृत्ती अशी शरीर व मन दोन्ही सुखी करणाऱ्या गोष्टी माणसाने जोपासल्या पाहिजेत.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।
स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शरीर प्रकृती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. आपले शरीर हे एक अनमोल स्वयंचलित यंत्र आहे. त्याची निगा राखणे, ते सुस्थितीत ठेवणे जमले की जीवन प्रवास सुखाचा होतो. सुंदर शरीराची योग्य ती काळजी घेतली नाही तर रोगरुपी शत्रू त्याच्यावर हल्ला करतात. शरीर निरोगी असेल तरच जगण्यातला आनंद लुटता येतो. युक्त आहार, विहार, व्यायाम यांच्या द्वारा आरोग्य राखले पाहिजे कारण चांगले आरोग्य हा सुखी व समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे.
मर्यादित संतती, पुरेशी संपत्ती, उत्तम संगती, चांगली शरीर प्रकृती व देवाची भक्ती हे सुखी जीवनाचे ‘पंचशील’ आहेत.
आरोग्य हीच संपत्ती होय. रोज फक्त पंधरा मिनिट व्यायाम केला तरी तो आपल्या आयुरारोग्यासाठी पुरेसा ठरतो आणि संजीवक ठरतो. व्यायाम म्हणजे शरीरांतर्गत शक्तींचे जागरण व प्रकटीकरण होय.
आरोग्यासाठी व्यायामाची वाट वहिवाटलीच पाहिजे. व्यायाम हे एक आन्हिक आहे. तो एक आचारधर्म आहे. शरीराच्या रक्षणासाठी ती एक साधनप्रणाली आहे. अंगातील चैतन्य व प्रतिकारशक्ती व्यायामाच्या अभावी लोक पावते. व्यायाम म्हणजे शरीरांतर्गत शक्तीचे जागरण व प्रकटीकरण होय. शरीर हे जीवनाचे, परमार्थाचे व सर्व इंद्रियाचे जणू ते एक सुरेल संगीत आहे. व्यायामात शरीर कष्टवायाचे नसते तर ते कार्यप्रवण करावयाचे असते. अनेक दु:खे केवळ व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात.
योग्य आहार
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकांचे।
जीवन करी जीवित व अन्न हे पूर्णब्रह्म।
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।
असेल आहार योग्य तरच लाभेल आरोग्य जसे खावे अन्न तसे बनते मन आहार चौरस किंवा समतोल असावा. त्यात प्रथिने, जीवनसत्वे, कर्बोदके, क्षार, खनिजे, शर्करा, स्निग्ध व पिष्टमय पदार्थ, कोंडा किंवा चोथा असणारे पदार्थ यांचा समावेश हवा. सात्विक आचार व विचार यासाठी हवा सात्विक मिताहार. वेगाने अनारोग्याकडे नेते ते म्हणजे फास्टफूड. आपण नको त्या गोष्टी, नको त्यावेळी, नको तितक्या प्रमाणात खात असतो. आहार, मनःशांती व आनंद हे तीन सर्वोत्कृष्ट धन्वंतरी आहेत जे जिभेला रूचते ते पोटाला पचेलच असे नाही. निरोगी राहण्यासाठी पोट नरम, पाय गरम व मस्तक थंड असावे. सर्व रोगांचे मूळ चुकिच्या आहारात व त्यामुळे उद्भवणाऱ्या अपचनात असते. शाकाहार, फलाहार, रसाहार, दुग्धाहार वाढवावा. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ याचे स्मरण ठेवावे.
शरीर एक वरदान
या जगात जिचे सर्वात कौतुक वाटावयास हवे अशी एकमेव गोष्ट म्हणजे आपले शरीर. जीवनातून शरीर वगळले तर मागे उरेल ते शून्य. आपल्या अवघ्या अस्तित्वाचे सार म्हणजे आपले शरीर. देहाला नऊ द्वारे आहेत द्वारे म्हणजे इंद्रिय चार कर्मेंद्रिये, चार ज्ञानेन्द्रिये, वाक् व रसना उरली त्यांचे इंद्रिय एकच म्हणून इंद्रिये नऊ. मानवी शरीर हे माणसाला मिळालेले एक उत्कृष्ट वरदान आहे. पंचमहाभूते, पंचप्राण. पंचज्ञानेन्द्रिये,पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिये,स्मरणशक्ती, विचारशक्ती या देणग्यांनी युक्त असे हे शरीर म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. ह्या देणग्यांचा योग्य तो उपयोग केल्यास ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था होते.
सर्व काही अलबेल असलेल्या शरीराला व जीवनाला वाढत्या वयाची घसरगुंडी थांबविता येत नाही. जीवनाच्या अस्ताकडे घेऊन जाणारा हा प्रवास साठी, सत्तरीनंतर अनेकांना एकाकीपणाने करावा लागतो. व्याधी विकार सतावू लागतात. सुहृदांचा वियोग होतो. मुख्य म्हणजे आपण ‘कालबाह्य’ तर होत नाही ना ही भीती मनात घर करू लागते. वृद्धापकाळातही मनुष्याने समतोल आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी प्राशन यांच्या मदतीने आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहार, विहार, व्यवहार, आचार, विचार यात बदल करून निरोगी तन मनाची साथ ठेवल्यास समाधान प्राप्ती झालीच म्हणून समजा.
Physical Well-being is an essential part of human Well – being.
जवळ जवळ ७०% आजार मानसिक तणावामुळे येतात. म्हणजे ते मनोकायिक (Psy-chosomatic) असतात. त्यांचे निर्माते आपणच असतो.
अनेक शारीरिक विकारांच्या उदा: रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, दमा, पोटातील अल्सर इत्यादींच्या मुळाशी मनाची असमाधानी प्रवृत्ती असते. ती जितकी मनावर अवलंबून असते तितकीच शरीरावर अवलंबून असते. स्वस्त शरीरातच स्वस्त मन राहते.
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, “आधी फुटबॉल खेळा मगच भगवद्गीता वाचायला घ्या!खेळाने शरीर स्वस्थ राहते व स्वस्थ शरीरामध्येच मनाची एकाग्रता लाभते.”
ज्याला व्यायामाकरिता
वेळ मिळत नाही,
त्याला आजारपणाकरिता
मोठी सवड काढावी लागते.
शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणतेही कार्य करण्याची क्षमता आणि शारीरिक सक्षमता व्यायामाने, आहाराने, योगासनाने, प्राणायामाने, दीर्घश्वसनाने वाढत असते. विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी बुद्धिबळाचा बादशहा बॉबी फिशर शारीरिक क्षमतेसाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी धावण्याचा व पोहण्याचा सराव करीत असे. एक जुनी म्हण आहे की ज्याला व्यायामाकरिता वेळ मिळत नाही त्याला आजारपणाकरिता मोठी सवड काढावी लागते.आपले शरीर हे सर्व दृष्टीने कार्यक्षम बनले पाहिजे आणि मगच आपण म्हणू शकू आरोग्यम् धनसंपदा!!
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈