मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात कठीण वा परीक्षा बघणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वाट बघणं,प्रतिक्षा. कुठलीही आनंदाची गोष्ट अगदी अचानक मिळाली तर आपण ह्या “वाट बघणं”वा “प्रतिक्षा”फेजला सरळसरळ मुकतो. पण एखाद्या आनंदाच्या गोष्टीची मिळण्याची खात्री असेल तर ह्या फेजमधून आपल्या प्रत्येकाला हे जावंच लागतं. ह्या फेजला आपल्याआपल्या गमतीच्या भाषेत “धाकधूक वा पाकपुक होणं” असं म्हंटतो. पण खर सांगायच़ तर ह्या फेजमधून जाणं तसं अवघड असतं बघा. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे असं वाटतं ही फेज मेली संपता संपत नाही लवकर. असं वाटतं हा कालावधी खूप प्रदीर्घ आहे. असो

ही फेज आत्ता आठवायचं कारण म्हणजे आता नुकताच पावसाळा सुरू होतोय. तमाम शेतकरी वर्ग चांगल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असतो.पावसाळा सुरू झाला म्हणजे पाऊस हा येणारच नक्की. त्यामुळे तमाम शेतकरी वर्ग घरातील,स्वतः जवळील असेल नसेल ते पणाला लावून पेरणी,मशागत करायला लागतो. त्याचे डोळे मात्र आभाळाकडे लागलेले असतात आणि मन चित्त सगळं वाट बघण्यात,पावसाच्या प्रतिक्षेत,अगदी चातक पक्षासारखं.

हल्लीची पिढी सुदैवी म्हणावी की नाही ह्या बाबतीत संभ्रमच आहे. कारण नशीबाने ह्या पिढीवर कुठल्याही बाबतीत वाट बघण्याची वेळ फार कमी येते,नशीबाने त्यांनी तोंडातून काढताक्षणी हवे ते मिळण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी असतं. पण त्यामुळेच का होईना त्यांना वाट बघणं माहित नसल्याने कदाचित त्या मिळणाऱ्या गोष्टीची खरी किंमत ही कळतच नाही हे खरं. आणि ती गोष्ट मिळवितांना देणा-याला आणि घेणाऱ्या ला काय काय कष्ट पडतात हे त्यांचं त्यांनाच माहित.

प्रतिक्षा,सहनशक्ती,धीर संयम ही सगळी सख्खी भावंडच.कुठलिही गोष्ट मिळवितांना जरा प्रतिक्षा करावी लागली तर तिची किंमतही कळते आणि गोडीही जाणवते.ती गोष्ट मिळेपर्यंत धीर धरला,संयम बाळगला,तर आपल्याला पुढील वाटचालीत खूप लाभ हा होतोच.गोष्ट सहजासहजी मिळाली नाही तरी नाउमेद न होण्यासाठी सहनशक्ती कामी येते.

आताही पेरणी झालेल्या शिवारात आभाळाकडे डोळे लावून बसणा-या बळीराजाला बघितले की खरंच पोटात कालवाकालव होते.म्हणूनच त्याला एकाअर्थी बळीराजा हे नाव सार्थ ही वाटतं. असं वाटतं त्याची ही प्रतिक्षा लौकर संपावी व सगळी भुमी सुजलाम सुफलाम व्हावी.

आताही विदर्भात खास करून अमरावती जिल्ह्यात कडक उन्हाचा सामना करतांना अक्षरशः नाकी नऊ येणं म्हणजे नेमके काय हे समजले. परंतू आता कालपासून असं वाटतंय आता एक दोन दिवसांत प्रतीक्षा संपून पावसाच्या जलधारा नक्कीच बरसणार. त्याप्रमाणेच गुरुवारी पहाटे पहाटे थोडा का होईना पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळाला.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

नाव वाचून कुणाला तर वाटेल की हा भेंडीच्या भाजीचा गोड प्रकार असावा पण ग्रामीण भागातील लोक चटकन ओळखतील की हे झाड आहे. होय! पिंपळासारखी पण तळहाता एवढी रुंद, साधारण हृदयाच्या आकाराची पाने असणारे, रंगीबेरंगी फुलांचे आणि पिंपळासारखी घनदाट सावली देणारे गुळभेंडीचे झाड. लहानपणीचा आमचा सवंगडी.

उत्तर दक्षिण दरवाजे असणाऱ्या आमच्या कौलारू घराच्या प्रवेशद्वाराजवळ आत येताना उजवीकडे गुळभेंडीचे झाड आणि डावीकडे विलायती चिंचेचे झाड होते. घरात प्रवेश करण्या अगोदर भल्या मोठ्या अंगणातून  पायवाट होती अगदी अंगणाच्या मधोमध. अंगण या पायवाटेने दुभागले होते. दोन्ही बाजूला हिरवाई आणि मध्ये पाऊल वाट जी कट्टयाशी येऊन थांबायची. घराच्या समोर जवळ जवळ बारा बाय बाराचा दगड, माती मुरूम टाकून ठोकून ठाकून गुळगुळीत केलेला, सडा सारवण केलेला सुरेख कट्टा अन मग घर अशी रचना होती. अंगणातून घराकडे येताना दगडी पायऱ्या, नंतर कट्टा आणि मग घरासमोर एक पायरी व मग प्रवेश असे स्वरूप होते. हिरवाईत लपलेल्या एखाद्या चित्रातल्या कौलारू घरासारखेच आमचे घर होते त्यामुळं रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याऱ्या लोकांना ते आकर्षित करायचे. भलं मोठं अंगण, त्याला काट्यांचे कुंपण, भली मोठी वेगवेगळी झाडं, फुले, वेली, भाज्या, गवत आणि भिरभिरणारी विविध रंगी फुलपाखरे!पावसाच्या पाण्यावर आमचं अंगण असं हिरवंगार दिसायचं. तर असंच एकदा आईने कुठूनतरी, मला वाटते मामाच्या गल्लीतून गुळभेंडीचे एक मजबूत दोन हात लांबीचे खोड आणले. एक छोटासा खड्डा खणून त्यात ते खोड लावलं आणि वर शेणाचा गोळा ठेवला. दररोज थोडं थोडं पाणी घालत राहिलो आणि एक दिवस इवलासा एक अंकुर बाहेर दिसला. लवकरच त्याचे रूपांतर पोपटी छोट्या पानात झाले. मग दुसरा तिसरा असे करत पाठोपाठ अंकूर फुटत राहिले. पावसाळ्यात मग छोट्या छोट्या फांद्या फुटत गेल्या आणि बघता बघता त्याचे उंच रोप झाले. त्या रोपाचं पुढं डेरेदार झाड झालं, बुंधा भक्कम झाला आणि भक्कम दाट सावली पडू लागली. शेतातून लांबून येणारे जाणारे वाटसरू बरेचदा झाडाखाली क्षणभर बसून पुढं जात. पावसात झाडाचा आडोसा घेत. उन्हातान्हाचे भारे घेऊन येणाऱ्या बायका चवळी, उडीद, मुगाच्या वेलींचे, गवताचे भारे झाडाखाली टाकून विश्रांती घेत. चेहऱ्यावर साचलेला घाम पदराने पुसत. तांब्याभर पाणी पीत, थकवा गेल्यावर मग भारा उचलून वाटेला लागत. अशी आईची न रस्त्यावरून येणाजाणाऱ्या बायकांची ओळख झाली. मग त्यातल्याच एकजणीला युक्ती सुचली. आमच्या शेळ्या बघून गावातील परटीन मावशी म्हणाल्या, “ही वज इतक्या लांब डोक्यावरन नेस्तोवर हितच झाडाखाली बसून आम्ही शेंगा तोडून घरी नेतो आणि वेल खातील तुमच्या शेळ्या. ” आईने पण होकार दिला. मग दरवर्षी त्या मावशी अशीच युक्ती करून डोक्यावरील भारा झाडाखाली टाकत. सावलीला बसून शेंगा तोडून भार हलका करून जात. अशा प्रकारे गुळभेंडीने अनोळखी माणसे जवळ आणली. भिकारी आकारी आला तर तिथंच सावलीत बसून आणलेलं सगळं शिळं पाकं मन लावून खायचा, त्याचे जेवून होईतोवर आम्ही त्याचे निरीक्षण करत असू. जेवल्यावर आम्हाला तो पाणी मागायचा पाणी पिऊन वाटेला लागायचा.

गुळभेंडीचा  हिरवा आणि पिकला पाला, फुले जनावरे खात. पावसाळ्यात दावणीला चिकचिक झाली की ती जागा वारसांडेपर्यंत म्हस गुळभेंडीला बांधत असू. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढला की थंडगार सावली म्हणून सावलीत म्हस बांधायची. म्हस बोडून घ्यायची असल्यावर पण तिथेच बांधत असू कारण दावणी जवळ म्हस बोडली की थोडे तरी केस तिथंच राहणार आणि परत जनावरांच्या पोटात जाणार.

कावळ्या- चिमण्यांचे तर हक्काचे झाड होते गुळभेंडीचे. पर्णसंभार जास्त असल्याने पानात लपणे त्यांना सोपे असायचे. बरेचदा कावळे तिथं घरटे बांधायचे. बरेचदा इकडून तिकडून चोचीत काहीतरी घेऊन तिथं फांदीवर बसून निवांत खात राहायचे. त्यावेळी हमखास कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवायची. गुळभेंडीचे किती प्रकार आहेत?मला माहित नाही पण  दोन प्रकारची गुळभेंडी मी पाहिली आहे. एक रुंद पानांची आणि एक लांबट हृदयाच्या आकाराच्या पानांची. याचे खोड खरबरीत असते. लाकूड टणक आणि टिकाऊ असते त्यामुळं छपराला मेडकी करायला एकदम उपयोगी.

गुळभेंडीची फुले एकदम पिवळीजर्द आकर्षक असतात. सुकली की ती तांबूस होतात. गुळभेंडीच्या लंबगोल कळ्या आम्ही खेळायला घेत असू. कळीचा लांब देठ तोडून छोट्याश्या देठाला गर्रकन फिरवून गोल गोल भोवऱ्यासारखे फिरवायचो. दुसरी एक मज्जा करायचो. भोवऱ्याचा पाठीमागील देठ हळूच काढून मधला दांडा अलगद उपसायचो, तो ओलसर पिवळा असायचा, त्या रंगांच्या टिकल्या कपाळावर लावायचो. गंधाची बाटली म्हणून त्या भोवऱ्याचा  उपयोग करायचो. फुलं गळून गेली की त्यातून फळे येत त्याला टेंभर म्हणतात. ती टेंभरं सुकली की वाऱ्याने खाली पडायची. जनावरानी तुडवून किंवा गाडीखाली येऊन ती चिरडायची आणि त्यातून अंगावर मलमल असलेले चॉकलेटी बी बाहेर निघायचे. ते आकर्षक बी उगीचच वेचत बसायचो. बरेचदा त्या पानांची पिपाणी करून वाजवायचो. असं हे गुळभेंडीचे सर्वांगाने उपयुक्त आणि बहुगुणी झाड आमच्या सवंगड्यासारखंच होतं. त्याच्या घनदाट सावलीत तासनतास मातीत खेळत बसायचो.

परवा वाचनात आलं की गुळभेंडीची पानं, फळं औषधी आहेत. तसेच ते पंचप्लक्ष पैकी एक आहे. (१. वड, २. पिंपळ, ३. पिंपरी, ४. औदुंबर५. पारोसा पिंपळ अर्थात गुळभेंडी. )आणि मला गुळभेंडीने थेट आमच्या अंगणात सोडले. तिथून थेट मामांच्या परड्यात सोडलं. मामांच्या परड्यात तरी गुळभेंडीचा केवढा मोठा विस्तार होता!मामांच्या परड्यात चिंचेची न गुळभेंडीची सावली दिवसभर हटायची नाही त्यामुळं सगळ्यांची जनावरं रात्रंदिवस तिथंच बांधलेली असायची. आजीसुद्धा कायम त्या सावलीत बसलेली असायची. अजूनपर्यंत ते डेरेदार झाड परड्यात होतं. आता मात्र  प्रत्येकाचे वेगवेगळे संसार आणि गुराढोरासाठी अडचण वाटायला लागल्याने ते तोडले.

आमच्याही अंगणातले कधीच तोडले, हेच की आकर्षक घर बांधायला!

आमच्या आई-वडिलांना शेतीची हौस होती म्हणून त्यांनी रोजगार करत आपलं अंगण शेतासारखं जपलं. अंगणात उगवलेल्या प्रत्येक झाडाला आपलंसं केलं, त्याला हवं तसं मुक्त वाढू दिलं, ते बाभळीचे असो की लिंबाचे, भेदभाव नाही केला की त्यांचा द्वेष सुद्धा. म्हणूनच की काय झाडांचे ते प्रेम माझ्या मनाच्या तळात झिरपत झिरपत गेलं. प्रत्येक झाडाचं ऋण आज मोठं झाल्यावर कळत आहे. ती झाडं तिथं नाहीत पण आठवणी जिथं तिथं सांडलेल्या, त्या मात्र कितीही गोळा केल्या तरी ओंजळ भरत नाही.

रस्त्यावर एखादे गुळभेंडीचे झाड दिसले की  म्हणूनच मला किती आनंद होतो म्हणून सांगू!(तुम्ही म्हणणार त्यात काय आनंद होण्यासारख?)पण तुम्हाला कळणार नाहीच माझ्यातलं आणि झाडातलं ते गूढ हळवं नातं!!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग –  लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग –  लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा पेपरमध्ये ( संदर्भ – महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ‘ पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ‘ आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ‘ फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ‘ ऑरेंज’  विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ‘ लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ‘ ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. )

आता मला सांगा लॉरेन्स बाईंचे हे चुकले नाही का ? कंपनीने काम नाही दिले म्हणून काय झाले ? पूर्ण पगार तर दिला ना ! त्यातही या बाई दिव्यांग ! तरी त्यांनी असे म्हणावे ? आपल्याकडे तर काही मंडळी काम नको म्हणून दिव्यांग असल्याचा दाखला मिळवतात असेही ऐकिवात आहे. खरं म्हणजे ‘ असा दिव्यांग दाखला ‘ मिळवताना त्यांना केवढा त्रास होत असेल, संबंधितांना कदाचित काही पैसेही द्यावेही लागत असतील.  पण त्या बिचाऱ्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही.

आपल्याकडील नोकरी करणाऱ्या महिलांना जर लॉरेन्सबाई भेटल्या तर काही महिला त्यांचा हेवा करतील. त्यांना म्हणतील, ‘ तुमचे मागील जन्मातील काहीतरी मोठे पुण्य असावे हो. नाहीतरी अशी नोकरी ( काम न करता पूर्ण पगार देणारी ) कोणाला मिळते का ?

योगायोगाने याच मी महिन्यात युरोप ट्रीपसाठी गेलो होतो. त्या दौऱ्यात फ्रान्सचा समावेश होता. पण मला या लॉरेन्सबाईंची ही बातमी आताच इथे आल्यावर कळली. तिथे कळली असती तर या बाईंचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला गेलो असतो. त्यांना तुम्ही चुकता आहात अशी जाणीव करून दिली असती आणि त्या कंपनीविरुद्धचा खटला मागे घ्यायला लावला असता. पण एवढे महान कार्य आमच्या हातून होणे नव्हते. मला तर या काम न देता पगार देणाऱ्या कंपनीचा जाहीर सत्कार करावा असे वाटते. अशा कंपन्या भारतात येतील तर आमची केवढी सोय होईल ! बेकारी दूर व्हायला मदत तर होईलच पण आमच्याकडील सज्जन आणि प्रामाणिक माणसे अशा कंपनीला कोर्टात अजिबात खेचणार नाहीत. उलट आमच्याकडील माणसांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल.

अरे कंपनीत काम नसले म्हणून काय झाले ? त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मनाने पुष्कळ काही करता येईल. पूर्वी महिला देवळात कीर्तन प्रवचन वगैरे ऐकायला जायच्या. त्यावेळी त्या ते प्रवचन ऐकता ऐकता वाती वळत असत असे ऐकले आहे. आता आजच्या जमान्यात वाती वगैरे वळण्याचे काम राहिलेले नाही. पण ऑफिसमध्ये बसून विणकाम करणे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शिकणे, मैत्रिणींशी फोनवर गप्पा किंवा चॅट करणे आम्ही सहज करू शकतो. त्या काळात आम्ही नवीन काही शिकू शकतो. अर्थात नवीन काही शिकलंच पाहिजे असं काही कंपनीचं बंधन असणार नाही. फक्त वेळेत येणं आणि वेळेत जाणं एवढंच आम्हाला करावं लागेल. ते आम्ही आनंदानं करू. अर्थात या सगळ्यांना गोष्टींना काही मोजके अपवाद असतीलही. त्यांना असं काम न करता पगार घेतलेला आवडणार नाही. पण आपण त्यांचा विचार कशाला करायचा ! लोकशाहीत बहुमत फार महत्वाचे !

तेव्हा तुम्हाला म्हणून सांगतोकी ही लॉरेंसबाई जर यदाकदाचित भारतात आलीच तर ते आम्हाला मुळीच आवडणार नाही. अरे, पूर्ण पगार देऊनही तक्रार करते म्हणजे काय ? शिवाय कोणतेही काम न करता. स्वातंत्र्यपूर्व काळात वसाहतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. त्यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी ‘ सायमन गो बॅक ‘ अशा घोषणा दिल्या. तसेच काहीसे या लॉरेन्सबाई भारतात आल्या तर होऊ शकेल. ‘ लॉरेन्स गो बॅक ‘ असे फलक चौकाचौकात लागतील.

मागे अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. जपानचा राजा वृद्ध झाल्याने  त्याने निवृत्तीची घोषणा केली. जपानमध्ये आता राजेशाही नसली तरी राजघराण्यातील व्यक्तींना मान दिला जातो. अगदी इंग्लंडप्रमाणेच. तर त्या जपानच्या राजाने निवृत्तीची घोषणा केली. आता मला सांगा वय झाले तरी हाती असलेली सत्ता सहजासहजी सोडून कोणी असे निवृत्त होतो का ? आपल्याकडे तर निवृत्तीच्या वयात जरा जास्तच उत्साहाने कार्यरत राहणारी मंडळी पाहिली की मन कसे अभिमानाने भरून येते. त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारांना ते वेड्यात काढतात. संगीत शारदा नाटकातल्या प्रमाणे ‘ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..’ त्या काळात पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर वर्षे वय असले तरी ती व्यक्ती नवरदेव म्हणून लग्नासाठी तयार असायची. आता लग्नाचं जाऊ द्या हो पण राजकारणात तरी वयाचं ऐशीवं दशक ओलांडलं तरी सत्ता सोडण्याची आमची इच्छा नसते. तेव्हा त्या जपानच्या राजाला काय म्हणावं ? बरं, खरी गंमत पुढेच आहे. त्या राजाचा मुलगा त्याचा वारस म्हणून त्याच्या गादीवर बसला. या आनंदाप्रीत्यर्थ जपान सरकारने लोकांना चक्क दहा दिवसांची सुटी जाहीर केली होती.

आपल्याकडे तर अशा निर्णयाचं मधुकर तोरडमलांच्या भाषेत सांगायचं तर मोठं हे केलं असतं, मोठा हा केला असती आणि मोठी ही केली असती. मोठं स्वागत केलं असतं, मोठा आनंद साजरा केला असता, मोठी मजा केली असती. फटाके फोडून स्वागत झाले असते. पर्यटनस्थळे फुल्ल झाली असती. त्याला जोडून लोकांनी अजून एकदोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेतल्या असत्या. पण हे जपानी लोक सुद्धा त्या फ्रान्समधल्या लॉरेन्सबाईसारखे. त्यांना जपान सरकारचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. या दहा दिवसात करायचे काय असा वेडगळ प्रश्न त्यांना पडला. या काळात उद्योग ठप्प होतील, उत्पादन बंद पडेल, देशाचे आर्थिक नुकसान होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्या सुटीऐवजी त्यांना ज्यादा काम करून तो आनंद साजरा करायला आवडले असते असेही काही जण म्हणाले. आपल्याकडे अशा लोकांना आपण मुर्खांच्या गणतीत काढू. चांगली दहा दिवस सुटी मिळाली. मस्त फिरायला जायचे किंवा आराम करायचा. मनसोक्त खायचे प्यायचे आणि एन्जॉय करायचे. काम तर नेहमी असतेच ना !काही लोकांना असे वाटते की फ्रान्स, जपान यासारख्या देशांची प्रगती लोकांच्या अशा दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच झाली आहे. पण केवळ सुधारणा, प्रगती, देशहित यांचा सततच विचार किती करीत राहायचा ? आम्हाला आमचे काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही ? आम्ही हौसमौज तरी केव्हा आणि कशी करायची ? छे ! छे ! लॉरेन्सबाई तुमचे आणि जपानी नागरिकांचे  हे चुकलेच !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं. म्हणजे साधारण आठवडा उलटून गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता.कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजेच  शनिवारची होती आणि वेळ दुपारी ११ची. अर्थातच रिटन-टेस्टची तारीख उलटून गेली होती.हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!

मग कोंदट अंधाराने भरून गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित केली..!)

युनियन बँकेकडून आलेलं ते रिटन टेस्टचं काॅल-लेटर  टेस्टची तारीख उलटून गेल्यामुळे आता मुदत उलटून गेलेल्या चेकसारखं माझ्यासाठी कांहीही उपयोग नसलेला कागदाचा एक तुकडाच होतं फक्त.तेच काॅल लेटर वाचून विचारात पडलेले मेहुणे एखाद्या गूढ विचारात गढल्यासारखे स्वतःतच हरवलेले होते. दुसऱ्याच क्षणी काहीतरी गवसल्याच्या उत्साहात ते झपकन् पुढे आले. ते कॉल लेटर माझ्या हातात देऊन घाईघाईने त्यांनी चप्पल पायात सरकवल्या आणि तडक बाहेर पडले. मी कांहीशा गोंधळल्या अवस्थेत दाराकडे धाव घेतली.

“क..काय झालं? कुठे निघालात?” न रहावून मी विचारलं.

“येतो लगेच.आलोच.

तू थांब..” मागे वळूनही न बघता ते दिसेनासे झाले.

ते परत येईपर्यंतची पंधरा मिनिटं मला तिथंच गोठून गेल्यासारखी वाटत राहिली. सरता न सरणारी!

मला अपराध्यासारखं वाटू लागलं. खरंतर आम्ही घरी येताना वाटेतच ठरवल्यानुसार घरी सामान ठेवून,फ्रेश होऊन लगेच जेवायला बाहेर पडणार होतो. एक तर ते एवढ्या लांबच्या प्रवासातून दमून आलेले होते. त्यांना कडकडून भूकही लागलेली होती. असं असताना हे असं अचानक सगळं विचित्रच घडू लागलंय.कुठे गेलेयत हे?

पंधरा एक मिनिटांनी ते घाईघाईने परत आले.

“हे बघ आता जेवण राहू दे. जेवत बसलो तर फार उशीर होईल. मी प्रवासातच थोडी केळी घेतलेली आहेत.तुझ्या आईनं थोडे लाडूही दिलेत. दोघंही तेच घासभर खाऊन घेऊ न् लगेच बाहेर पडू. आपल्याला आत्ताच्या आत्ता ठाण्याला जायचंय?”

हे सगळं त्या क्षणी माझ्यासाठी अनपेक्षित आणि अनाकलनीयच होतं.

“आत्ता..?इतक्या रात्री..?”

“हो‌..”

“कशासाठी..?”

“जे करायचं ते फार वेळ न दवडता आजच्या आजच करायला हवं म्हणून.हे बघ,मी वरच्या मजल्यावरच्या गोगटे आजोबांच्या घरुन माझ्या ठाण्याच्या मावसबहिणीला फोन करायला गेलो होतो.मी बोललोय तिच्याशी. तिचा इंजिनीयर झालेला धाकटा दीर नुकताच टेक्निकल ऑफिसर म्हणून युनियन बँकेत लागल्याचं मी ऐकून होतो. ते सर्वजण एकत्रच रहातायत.मी ‘त्यांना मला तातडीनं भेटायचंय.महत्त्वाचं काम आहे.लगेच येऊ का?’असं फोनवर बहिणीला विचारलंय. ती ‘ये’ म्हणालीय. आपण आत्ता त्यांना भेटायला जातोय. त्यांच्या ओळखीनं काहीतरी मार्ग निघेल.”

त्यांचा आशावाद जबरदस्त होता. सगळं माझ्यासाठीच तर सुरू होतं. मी ‘नाही-नको’ म्हणायचा प्रश्नच नव्हता.पण तरीही….?

“तुम्ही प्रवासातून दमून आला आहात ना? उद्या सकाळी लवकर गेलो तर नाही का चालणार?”

“कदाचित उशीर होईल. ती ‘ये’ म्हणालीय तर आत्ताच जाऊ. चल. आवर लौकर..”

ठाण्याला जाऊन आम्ही त्यांच्या बहिणीच्या घराची बेल वाजवली तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते.मन आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत होतं. अनिश्चिततेच्या भावनेनं ते कातर झालेलं होतं.

दारावरची बेल वाजवताच आमचीच वाट पहात असल्यासारखं दार तत्परतेनं उघडलं गेलं.हे साठे कुटुंबीय. मिसेस साठेंनी आमचं हसतमुखाने स्वागत केलं.

“बराच उशीर झालाय पण अगदी नाईलाज म्हणून तुला त्रास द्यावा लागतोय बघ.”

मेहुणे त्यांच्या मावस बहिणीला.. म्हणजेच मिसेस साठेना म्हणाले.

“त्रास कसलाअरे? मी निरंजन भाऊजींना कल्पना देऊन ठेवलीय.त्यांना बोलावते. तू सांग त्यांना सगळं. तुमच्या गप्पा होईपर्यंत मी गरम काॅफी करते पटकन्.आलेच.”

इथे येताना माझ्या मनात असणारा संकोच या मनमोकळ्या स्वागतानं विरून गेला.

“नमस्कार..”

हसतमुखाने नमस्कार करीत निरंजन साठे आमच्यासमोर उभे होते. त्यांना पाहिलं आणि मन निश्चिंतच झालं एकदम. तो त्यांच्या प्रसन्न,देखण्या,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे निगर्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता की माझ्या मनाला मिळालेला अकल्पित संकेत होता कुणास ठाऊक पण मन निश्चिंत झालं होतं एवढं खरं.

मेहुण्यांनी नेमकी अडचण थोडक्यात सांगितली. मी सोबत आणलेलं कॉल-लेटर संदर्भासाठी त्यांच्या पुढे केलं. त्यांनी ते वाचलं. त्याची अलगद घडी घालून ते मला परत दिलं.

“एक काम करूया. उद्या सकाळी बरोबर दहा वाजता तू चर्नीरोडवरील युनियन बँकेच्या ‘मेहता-महाल’ मधल्या ऑफिसमधे ये. हे माझं कार्ड. लिफ्टने आठव्या मजल्यावर येऊन माझ्या केबिनमधे यायचं.आपण शेजारच्या ‘मेहता चेंबर्स’ बिल्डिंगमधे ग्राउंड फ्लोअरलाच बॅंकेचं रिक्रुटमेंट सेल आहे तिथे जाऊ.तिथेच ही सगळी रिक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे. डाॅ.विष्णू कर्डक तिथले सुपरिंटेंडंट आहेत. दोन महिन्यांपूर्वीच माझा इंटरव्यूही त्यांनीच घेतला होता. त्यामुळे ते बहुधा मला ओळखतील. आपण त्यांना भेटून सांगू सगळं.बघू काय होतं ते.एन.आय.बी.एम.च्या सहकार्याने बँकेतर्फे आठएक  दिवसांचे रेक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे हे मी ऐकून होतो. तुझी रिटन टेस्ट हा त्याचाच एक भाग असणार आहे. टेस्ट-प्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल.एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल”

निरंजन साठे यांनी सर्व परिस्थिती नेमक्या शब्दात समजून सांगितली.आशेचा एक अंधूक किरण दिसू लागला. आम्हाला इथे यायची बुद्धी झाली, प्रयत्नांची दिशा का होईना पण नेमकी सापडली हा दिलासा असला तरी अनिश्चितताही होतीच.

कॉफी घेऊन त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असाही एक वड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

असाही एक वड ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(आणि त्या निमित्ताने वटपौर्णिमे संबंधित विचार..)

वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना स्त्रिया नवऱ्यासाठी आयुष्याचे आणि स्वतःच्या सौभाग्याचे दान मागत असतात.मी जिथे रहात असे तिथे जवळपास वडाचे झाड नव्हते.म्हणून प्रथम आम्ही वडाची फांदी आणून पूजा करत असू, पण ती गोष्ट मनाला अजिबातच पटत नव्हती!  ज्या झाडाची पूजा करायची त्याचीच फांदी तोडून आणायची! म्हणून ते करणं बंद केलं.. त्यानंतर समोरच्या देवळात एक भटजी  कुंडीमध्ये फांदी घेऊन बसत असे तिथे जाऊन आम्ही पूजा करू लागलो.कुणाकडे तरी बोन्साय वड ही होता.त्या घरची बाई त्याची पूजा कौतुकाने करत असे.आणि आपण कसं घराबाहेर सुध्दा पडत नाही याचंच तिला भारी वाटत असे.ते लोकांना सांगण्यात तिला आनंद मिळे!

नंतर काही दिवसांनी कोपऱ्यावरच्या पानपट्टी जवळ एक वडाचे रोप उगवले होते .पानपट्टी वाल्याने त्याची जोपासना करून ते रोप वाढवले.कारण त्याच्या टपरीवर सावली यावी म्हणून!ते बऱ्यापैकी मोठे झाल्यावर बायका वडाच्या पूजेसाठी तिथे येऊ लागल्या.कारण ते ठिकाण सोयीचे होतं! पानपट्टी वाल्याने स्वतःच्या दुकानात वडाच्या पूजेला लागणारे साहित्य पण ठेवले. त्यात त्याचाही फायदा होता. पहिला जो भटजी होता तो आता तिथे येऊन बसू लागला आणि बायका जे काही वडाजवळ ठेवत ते सगळं तो स्वतःला घेत असे.ते उत्पन्न बऱ्यापैकी वाढल्यावर पानपट्टी वाल्याला थोडा लोभ सुटला. त्यालाही वाटले, हे झाड मी लावले, सावलीसाठी वाढवले आणि आता या झाडाच्या वटपौर्णिमेच्या उत्पन्नात  मला ही  वाटा पाहिजे. दोघांमध्ये छोटंसं भांडण ही झालं! शेवटी काही मोठ्या लोकांनी त्या दोघात कॉम्प्रमाईज केलं आणि त्या दिवशी येणारं सगळं उत्पन्न दोघांनी वाटून घ्यावे असे ठरले. दुसऱ्या वर्षी भटजी आणि पानपट्टी वाला दोघेही त्या वडाजवळ तासन् तास थांबत असत .येणाऱ्या बायका भटजीचे पायावर डोकं ठेवत आणि त्याला फळे,दक्षिणा देत. आणि झाडाजवळ ठेवलेले विडे आणि फळं ,पैसे हे सगळं पानपट्टी वाला घेत असे. दोघांचं भांडण तर मिटलं! पण पुढील विचार मनात आले!

वटपौर्णिमेचा हेतू काय? त्यामुळे मिळणाऱे उत्पन्न असे कितीसे असणार? सत्यवान -सावित्री ची कथा किती जणी वाचतात.त्यातील मूलभूत अर्थ काय! आम्हाला इंग्रजी विषयात SAVITRI हे epic अभ्यासाला होते.तेव्हा योगी अरविंद ह्यांना त्यांत अभिप्रेत असलेला जीवनासाठी चा अर्थ  समजून घेण्याचा प्रयत्न केला.पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडायला मिळत नसे, त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी स्त्रिया निसर्गात जात असत. बरेच वेळा वड- पिंपळासारखे वृक्ष गावाबाहेर, रानामध्ये असत. तिथे जाऊन पूजा करून येण्यात मोठा आनंद मिळे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी या धार्मिकतेशी  जोडल्या असल्यामुळे त्या सातत्याने केल्या जात असत. त्यामध्ये धार्मिक, सामाजिक असा सर्व प्रकारचा आनंद घेता येत असे.  आत्ताच्या काळात त्याकडे एक इव्हेंट म्हणून पाहिले जाते. काही का होईना, त्यानिमित्ताने तरुण पिढीला आनंदही मिळतो आणि परंपरा राखण्याचे समाधानही मिळते! स्त्रियांना नटून थटून वडाला जाण्यात तसेच डाएट म्हणून उपवास करण्यातही  वेगळा feel घेता येतो!

शेवटी काय, जीवन आनंदात जगणे हेच सगळ्याचे मूलभूत तत्व आहे. ते सांभाळून आपण आपले सांसारिक जीवन, समाजामधील स्थान या सगळ्या गोष्टी टिकवू शकतो. अलीकडे स्त्रियांना नोकरी, व्यवसाय यामुळे स्वतःच्या आनंदाला बरेच वेळा मुरड घालावी लागते, पण अशा काही परंपरा जोपासताना नकळत हा आनंद त्यांना घेता येतो. मग उगीचच आपल्याला उपास आणि वडपोर्णिमा या अंधश्रद्धा वाटतात असं म्हणण्यात काय बरं अर्थ आहे!

आणि तसेही हे व्रत आपल्या आवडत्या माणसासाठी, नवऱ्यासाठी असेल तर स्त्रियांनी ते जरूर  करावे.

म्हणजे नवराही -सत्यवान ही वडाजवळ चपला सांभाळायला आणि नटलेल्या, सजलेल्या बायकोला पूजा करताना बघायला कौतुकाने येतोच ना!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाऊसाहेबांची शायरी… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ भाऊसाहेबांची शायरी… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

प्रत्येक गावाची कलाक्षेत्राशी निगडीत एक विशीष्ट ओळखं असते. किंबहुना काही बहुआयामी प्रसिद्ध व्यक्तीमत्वाच्या व्यक्तींमुळे त्या गावाला एक वलय प्राप्त होतं. ते गाव जणू त्या कलाकारांमुळं प्रसिध्दीस येत. गावाचं नाव डोळ्यासमोर येताच आधी त्या कलाबाज व्यक्ती डोळ्यापुढं येऊन उभ्या ठाकतात.

माझे माहेर यवतमाळचे.यवतमाळच्या सुप्रसिद्ध व्यक्तींमधील एक मोती म्हणजे शायरीकार भाऊसाहेब पाटणकर. खरतरं “पिकतं तिथं विकत नाही”ही म्हण एकदम आठवली कारण यवतमाळात राहून सुध्दा भाऊसाहेब इतके कमालीचे शायरीकार होते हे उमगायलाच मुळी खूप कालावधी लागला. काही वेळेस आपल्याला त्यांच्या साहित्याची पूर्ण माहिती होईपर्यंत खरच खूप कालावधी निघून जातो.

श्री. वासुदेव वामन पाटणकर उर्फ भाऊसाहेब पाटणकर हे व्यवसायाने वकील, छंद शिकारीचा आणि अफलातून निर्मिती मराठी गझल व शायरींची. खरचं असा गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात एकवटला होता. भाऊसाहेबांचा जन्म 29 डिसेंबर 1908 चा व मृत्यू  20 जून 1997. वीस जून हा  त्यांचा स्मृतीदिन. त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या गझल,शायरी बद्दल कितीही लिहीलं तरी कमीच. प्रामुख्याने त्यांची शायरी शुंगार,इष्क,जीवन,विनोद, मृत्यू ह्या संकल्पनांवर आधारित असायची.

सगळ्यात पहिले तर त्यांची शायरी समजून घ्यायची म्हणजे वाचक हा जिंदादिल हवाच ही त्यांची आंतरिक ईच्छा. त्यासाठी ते लिहीतात,

“उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी,

प्यायले जे खूप ज्यांना वाटे परी झाली कमी,

निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शायरी,

सांगतो इतरास “बाबा” वाचा सुखे “ज्ञानेश्वरी”.।।

प्रेम अनुभवतांना मान्य आहे एक वाट ही सौंदर्याचा विचार करते पण फक्त सौंदर्य म्हणजेच प्रेम नव्हे हे ही खरेच. प्रेम दुतर्फा असले,दोन्हीबाजुंनी जर ती तळमळ असली तरच तीच्यात खरा आनंद असतो हे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“हसतील ना कुसूमे जरी,ना जरी म्हणतील ये,

पाऊल ना टाकू तिथे,बाग ती आमुची नव्हे,

भ्रमरा परी सौंदर्य वेडे,आहो जरी ऐसे अम्ही,

इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही.।।।

प्रेमात नेहमीच सदानकदा हिरवं असतं असं नव्हे, प्रेमात उन्हाळे पावसाळे हे असणारच. त्याबद्दल भाऊसाहेब म्हणतात,

“आसूविना इष्कात आम्ही काय दुसरे मिळविले,  

दोस्तहो माझे असो तेही तुम्ही ना मिळविले,

आता कुठे नयनात माझ्या चमकली ही आसवे,  

आजवरी यांच्याचसाठी गाळीत होतो आसवे.।।।

प्रेमात,जिव्हाळ्यात एक  महत्वपूर्ण अंक हा लज्जेचा पण असतो हे विसरून चालणार नाही.ह्या गोडबंधनाच्या सुरवातीला हा अंक असतो. ते हासून लाजणे अन् लाजून हासणे हे भाऊसाहेबांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे

“लाजायचे नव्हतेस आम्ही नुसतेच तुजला बघितले,  

वाटते की व्यर्थ आम्ही नुसतेच तुजला बघितले,

उपमा तुझ्या वदनास त्याची मीही दिली असती सखे, 

थोडे जरी चंद्रास येते लाजता तुजसारखे.।।।

आंतरिक मानसिक प्रेम हे आपल्या जवळच्या व्यक्तीला सुखं देण्यातच असतं ना की तिला काही त्रास,तोशिस पोहोचवण्यात. आपल्या व्यक्तीला सर्वार्थानं जपणं हेच खर प्रेम. ते भाऊसाहेबांच्या शब्दांत पुढीलप्रमाणे,

“पाऊलही दारी तुझ्या जाणून मी नाही दिले,

जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुज होऊ दिले,

स्वप्नातही माझ्या जरी का येतीस तू आधी मधी,

स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.।।।

भाऊसाहेब म्हणतात प्रेम हे फक्त प्रणयातच असतं असं कुणी सांगितलं ,ते तर एकमेकांना जपण्यात,सांभाळण्यात,सावरण्यात पण असतं हे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे,

आमुच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे,

लावण्या हे ही कपाळी नसतो तसा नाराज मी,  

आहे परि नशिबात हे ही अपुल्याच हाती लावणे.।।।

तरीही शेवटी मृत्यू हेच अंतीम सत्य असतं हे ही नाकारुन चालणार नाही हे ही भाऊसाहेबांनी जिवंतपणीच ओळखलं. मृत्यू नंतर ची सर्वसामान्य अवस्था त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले, 

मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला झाकले,

आला असा संताप मजला काहीच पण करता न ये,

होती अम्हा जाणीव की मेलो आता बोलू नये.”।।।

सगळ्याचं विषयावरील भाऊसाहेबांची शायरी अप्रतिम असली तरी लिखाणात त्यांचा हातखंडा होता तो “इष्क,प्रणय आणि शुंगार ह्या प्रकारात. इष्क म्हणजेच प्रेम करणे ह्याला नजर हवी, हिंमत हवी हे भाऊसाहेबांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“केव्हातरी बघुन जराशी हास बस इतुके पुरे,  

वाळलेल्या हिरवळीला चार शिंतोडे पुरे ।।  

“दोस्तहो हा इष्क काही ऐसा करावा लागतो,

ऐसे नव्हे नुसताच येथे जीव द्यावा लागतो,

वाटते नागीण ज्याला खेळण्या साक्षात हवी,

त्याने करावा इष्क येथे छाती हवी,मस्ती हवी.

प्रेमाची ओळख,त्याची जाण होणं हे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“अपुल्यांच दाती ओठ अपुला चावणे नाही बरे,

हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे, ।।। 

आणि ते ओळखायची खूण म्हणजे,

“धस्स ना जर होतसे काळीज तू येता क्षणी ,

अपुल्या मधे,कोणात काही नक्की जरा आहे कमी.।।

ह्या अशा शायरीत गुंतता गुंतता वार्धक्य कधी उंब-यावर येतं ते कळतचं नाही. अर्थात जिंदादिलीवर ह्याचा काहीच परीणाम होत नाही. ह्याच्याच विचाराने त्यांना जीवनाविषयी सुचलेली शायरी पुढीलप्रमाणे,

“दोस्तहो,वार्धक्य हे सह्य होऊ लागते,

थोडी जरा निर्लज्जतेची साथ घ्यावी लागते,

मूल्य ह्या निर्लज्जते ला नक्कीच आहे जीवनी,

आज ह्या वृध्दापकाळी ही खरी संजीवनी”।।

अर्थात भाऊसाहेबांच्या मते हा प्रेमाचा,ईष्काचा अनुभव हा स्वतःच्या मनाने घेतल्याने एक होतं आपल्याला ह्मात कुठल्याही प्रकारचा पश्चाताप मनात साचत नाही. ही जबाबदारी स्वतः घ्यायलाही खूप हिम्मत लागते ती पुढीलप्रमाणे,

“बर्बादीचा या आज आम्हा, ना खेद ना खंतही,

झाले उगा बर्बाद येथे सत्शील तैसे संतही,

इतुका तरी संतोष आहे,आज हा आमच्या मनी,

झालो स्वये बर्बाद आम्हा बर्बाद ना केले कुणी.।।।

कुठलही प्रेम हे प्रेमच असतं. ते अलवार प्रेम अनेक ठिकाणी वसू शकतं हे खरोखर इतक्या सहज वृत्तीने स्विकारलेल्या भाऊसाहेबांच्या शब्दांत पुढीलप्रमाणे  

“ऐसे नव्हे इष्कात अम्हां काही कमी होते घरी,

हाय मी गेलो तरीही दीनापरी दुस-या घरी,

अर्थ का ह्याचा कुणा पाहिले सांगितला,

आम्ही अरे गमतीत थोडा जोगवा मागितला.।।।

प्रेम हे प्रेमच असत ते शेवटास गेले तरी वा मध्येच अधांतरी राहिले जरी. त्याच्या गोड स्मृती ह्या शेवटच्या श्वासापर्यंत तशाच ताज्या राहतात जसे,  

दोस्तहो, ते पत्र आम्ही आजही सांभाळतो,

रुक्मिणीचे पत्र जैसा,श्रीहरी सांभाळतो,

येतो भरुनी ऊर आणि कंठही दाटतो,

एकही ना शब्द तिथला,आज खोटा वाटतो.।।।

अगदी शेवटी भाऊसाहेब म्हणतात, हा जिन्दादिल रसीक असेल तरच आमच्या शब्दांना अर्थ आहे.पोस्ट ची सांगता त्यांच्याच शब्दात त्यांच्या खास रसिकांसाठी पुढीलप्रमाणे,

“वाहवा ऐकून सारी आहात जी तुम्ही दिली,

मानू अम्ही आहे पुरेशी तुमच्यातही जिन्दादिली,

समजू नका वाटेल त्याला आहे दिली जिन्दादिली,

आहे प्रभूने फक्त काही भाग्यवंतांना दिली.।।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भिती…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “भिती…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नुसता विचार आला की मनात येणारी, वाटणारी, आणि आपल्याच अवतीभोवती पिंगा घालणारी. आणि विचार थांबवला की हळूहळू कमी होणारी एक अदृश्य गोष्ट म्हणजे भिती.

लहानपणी गंमत म्हणून कोणीतरी दाखवलेली भिती नंतर पाठ सोडत नाही. खरंतर पाठ काय, ती आपल्यालाच सोडत नाही. सतत वाटत नसली आपल्याला वाटते तेव्हा ती अवतीभवतीच फिरत असते. बटन दाबल्यावर चटकन दिवा लागावा, तशीच ती विचार केला की तात्काळ येते. पण बटन बंद केल्यावर दिवा लगेच बंद होतो, तशी मात्र ती लगेच जात नाही.

फटाका फुटल्यानंतर त्याचा वास काहीकाळ तसाच राहतो. तसाच विचार बंद केल्यावरही भिती काहीकाळ मनात रेंगाळते.

भितीची कारणं, वेळ, प्रसंग हे वेगवेगळे असतात. वयानुसार हि कारणं बदलतात सुध्दा. पण संबंध असतो तो विचारांशी.

धडपडणं, लागणं ही जी भिती मोठेपणी असते, ती कदाचित लहानपणी जवळपास सुध्दा फिरकत नाही. कारण तशा भितीचा विचारच नसतो. पण अंधार, अभ्यास, परिक्षा, रिझल्ट, मिळणारे मार्क हि लहानपणची साधीसाधी कारणं असतात. कारण हा विचार मनात आला नाही तरी याचा विचार कर…… असं कोणीतरी सांगत असतं.

नौकरी, नुकसान, फसवणूक, चोरी, अपयश, हि कारणं वाढत्या वयात येतात.

प्रवास, कार्यक्रम या गोष्टी व्यवस्थित पार पडतील नां… वेळेवर काही गोंधळ होणार नाही नां… अशी भिती त्या त्या वेळी असतेच.

मन लाऊन आणि व्यवस्थित केलेला पदार्थ सुध्दा… काही वेळा चवीसाठी दिला जातो. आणि कसा झाला आहे?… हे विचारतांना तो चांगला झाला असेल याची खात्री असली तरी पण… मनात एक भिती असते.

उतारवयात तर म्हातारपण हिच भिती त्यांच्या बोलण्यात जाणवते. यात अतिवेग, मोठ्ठा आवाज यांचीपण भिती वाटते.

राजकारण, व्यवसाय, पेशा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतांना सुध्दा एक प्रकारची भिती वाटत असते.

एकच भिती कायम असते असंही नसतं. ती बदलते सुध्दा. आणि हा भितीचा बदल विचारांबरोबर बदलत असतो.

राजकीय भिती, सुरक्षेची भिती, सामाजिक घडामोडींची भिती, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भिती वाटतेच. पण पाल, विंचू , झुरळ, साप असे काही प्राणी. कोसळणाऱ्या पावसात कडाडणारी वीज. दहीहंडीसाठी केलेला उंच मानवी मनोरा. यांची सुध्दा भिती वाटते. जेवढे विषय तेवढी भिती.

आपल्या मनातली भिती दुसऱ्याला सागितल्यावर कधी कधी तो आपल्याला सावरतो. पण कधी त्याच्याही मनात तीच भिती निर्माण होते ज्याचा त्याने अगोदर विचारच केलेला नसतो.

थोडक्यात, भिती हि हाॅटेल मधल्या मेनू कार्ड सारखी असते. म्हणजे मेनू कार्डवर बरेच पदार्थ असतात, तशीच भितीची अनेक कारणं असतात. मेनू कार्ड वाचून हे पदार्थ आहेत हे समजतं . पण ते चविला कसे, आणि प्लेटमध्ये म्हणजे quantity किती असेल ते काहीवेळा माहीत नसतं. तसंच भितीच काहीवेळा असतं. नक्की कशी, का, आणि किती वाटते हे समजत नाही. पण ती वाटते.  हाॅटेल मधले पदार्थ आपण मागवले तरच मिळतात. तसंच भितीचं आहे, विचार केला तरच ती वाटते…….. केलाच नाहीतर…

आनंदी आनंद गडे…

“भय इथले संपत नाही.” किंवा “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती.” या सारख्या गाण्यांवरुन कवींना सुध्दा भिती या शब्दाची भुरळ पडल्याचं लक्षात येत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांची ओळख बागेत झाली. किती जग पुढे गेले आहे ना  (?)

त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. कारण आम्ही म्हणजे घरातली भाजी आवडली नाही म्हणून हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आपल्या घरात काय चालले आहे याची माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचे आवरणे (मेकअप) शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते.आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते. हे सर्व वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते. अगदी वाटीभर  साखर,चार लसूण पाकळ्या,दोन मिरच्या,दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे,भाजी आपुलकीने घरात यायची. सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्या प्रमाणे वावरत होते. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.

सामान आणायला गेल्यावर दुकानदार हक्काने कोणताही पाढा किंवा कविता म्हणायला लावायचा. आणि काही चुकले तर घरी रिपोर्ट जायचा. आमच्या घरा जवळचे एक दुकानदार दुकानात येणाऱ्या मुलांना पाढे म्हणायला लावायचे आणि पाढा आला नाही तर वस्तू द्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे तो पाढा पाठ करून जावे लागत होते. अशी समाजाकडून प्रगती होत होती.

त्यामुळे बाहेर वावरताना एक धाक होता. आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे  मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हंटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे,कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.

अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी समाजातील किराणा दुकानदार, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. अशा खूप आठवणी आहेत. 

पण माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. घरे फ्लॅट झाली. शेजारचे काका अंकल झाले. ज्यांची ओळख आपोआप होत होती त्यांची ओळख बागेत होऊ लागली. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारु लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा  आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक  स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या  घटना बघितल्या की वाईट वाटते. आणि कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे असे वाटते. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.

माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या ( सध्या याला मागासलेले म्हणतील ) व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही.पण मला लुप्त होत असलेले  शेजारी आठवतात. आणि आवश्यक वाटतात.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे  ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

आत्ताच्या पिढीला “गुराखी” हा शब्दही माहीत नसेल.  पण श्रीकृष्ण कथा ऐकली असेल तर श्रीकृष्ण गुरं हाकायला रानात जात असे आणि त्याच्या बासरी वादनाने गाई गुरं मंत्रमुग्ध होऊन आवाजाच्या मागे मागे जात वगैरे आपण वाचलेलं आहे.

पण आता ना इतकी गुरं ढोरं राहिली, ना कृष्ण अन् त्याची बासरी.

पण इथे ऑस्ट्रेलियात मात्र विस्तीर्ण पसरलेली कुरणं, हजारोनी गुरं ढोरं.

पण ती हाकायला माणसंच नाहीत. इतकी वर्ष मोटार सायकल वर बसून तीन चार माणसांकडून 3000 हेक्टर वर हे काम करून घ्यायचे. .पण शांतपणे चरणा-या गुरांना ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. सोबत एखाद दोन कुत्रीही सोबतीला द्यायला लागायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं. एका कळपातून हाकून मूळ जागी परत आणणे, परत दुसरा कळप असे करता करता दूर दूर जावं लागणा-या दुचाकीस्वार गुराख्यालाच घरी जेवायला येता यायचं नाही. ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं.

मग आणले हेलीकाॅप्टर… पण ते प्रकरण तसं खर्चिक.  श्रीमंत मालकांनाच ते परवडायचं.

आपल्या भारतात आत्ता आत्ता कुठं तुरळक ड्रोनचा वापर शेतीत औषधं फवारणीसाठी होऊ लागला आहे.  बाकी सगळे ड्रोन हे एकतर भारतीय सैन्याचे नाहीतर लग्नाच्या रिसेप्शनच्या शूटींगचे.

पण इथे जगात प्रथमच एकाने ड्रोननी गुरं हाकायची ठरवली, त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करवून घेतली आधी ती उडवून प्राणी दिलेल्या कमांड ऐकतात का ते तपासलं आणि हळूहळू त्याचा वापर वाढवत वाढवत हजारोंचा कळपच्या कळप हॅक् हॅक् न करता, पाठीवर दंडुका न मारता , हवा तसा, हव्या त्या दिशेला, थांबा म्हणलं  की थांबणारा, घराकडं चला म्हणल्यावर मुकाट माघारी फिरणारा असा Drone चा भन्नाट वापर सुरू केला आहे.  शेतक-यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देत आहे.  हातासरशी गेलाच आहे ड्रोन 35 मीटर ऊंच तर कुठे पीक किती वाढलं आहे, पाणी आहे शेतात की घालायला हवंय हे सगळं एका जागेवरून ठिम्म न हालता ड्रोनवरील हातसफाईने करत आहे.  गुरांची संख्या पण मोजता येते, आसपास एखादा कोल्हा आला तर त्याला हा  ड्रोन हुसकावतो सुध्दा.  हेलीकाॅप्टरच्या आवाजापेक्षा गाईंना ड्रोनचा आवाज सुसह्यही वाटतोय. त्यांना ड्रोनचा आवाज ऐकला की वाटतं कुठला तरी किडा गुणगुणतोय.

आता पुढचा प्रयोग हे सगळे आख्या जगातून  जिथे कुठे इंटरनेट, GPS आहे अशा कुठूनही करता यायला पाहिजे याची चाचपणी सुरू आहे.

या प्रयोगशील शेतक-याची एकच व्यथा आहे ती म्हणजे त्यांचे संरक्षण खाते, सरकार पटापटा परमिशन देत नाही.  खरेतर सरकारही अजून ह्या बद्दल तितके जागरूक नाही शिवाय अशा वापरास ऊठसूट परवानगी दिली तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा गैरवापर तर होणार नाही ना हे अजमावून पाहात आहे. 

पण एकंदरीत उपयोगिता बघता, हळूहळू का होईना पिझ्झा डिलीव्हरी साठी ड्रोनच्या वापरापेक्षा ह्या अशा उपयुक्त कांमासाठी, जिथे आधीच मनुष्यबळ खूप कमी आहे आणि चराऊ कुरणं नजर ठरत नाही इतकी दूर आहेत, तिथे परवानगी द्यायच्या विचारात सरकार आहे. हेक्टरी फक्त एक डाॅलर खर्च येत असेल तर शेतकरी आग्रह धरणारच ह्या सुविधेचा.  पैसा, वेळ, श्रम वाचणा-या या सुविधेचा लाभ हळूहळू वाढणार आणि  ” Technology –  शाप की वरदान ” अशा निबंध लिहीणा-यांना

 ” वरदान ” मुद्दा पटवायला हा एक किस्सा लिहीता येणार .

गाईंच्या गळ्यातील घंटांचा मंजूsssळ नाद,

सांज ये गोकुळी,

धूळ उडवीत गाई निघाल्या

 

असं काही नसलेल्या देशात

ड्रोन हाच गुराखी!

— समाप्त —

लेखिका – सुवर्णा कुलकर्णी

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

।श्रीराम। आपण हिंदू लोकं उत्सवप्रिय आहोत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण विज्ञानाधिष्ठीत आहेत. सर्व सण कौटुंबिक वातावरण उबदार करणारे आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. हिंदूंचा कोणताही सण घेतला तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक आशयच प्रगट होत असतो हे आपल्या लगेच लक्षात येईल. आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव शिकवतात. ‘ज्याला कृष्णाचा ‘काला’ समजला त्याला वेगळी ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकविण्याची बिलकुल गरज नाही’ असे एक वचन प्रसिद्ध आहे.

चुकून कुणाला पाय लागला तर नुसते ‘क्षमस्व’ किंवा आजच्या नवीन पिढीच्या आंग्लमिश्रित भाषेत तोंडदेखलं ‘सॉरी’ म्हणणारी आपली संस्कृती नाही तर अतीव नम्रतेने ‘नमस्कार’ करणारी आपली संस्कृती आहे. अशा प्रकारचा व्यवहार अथवा परंपरा आपल्याला इतरत धर्मात अथवा उपासना पद्धतीत बघायला मिळत नाही. इतक्या सूक्ष्म स्तरावर समोरील मनुष्याच्या भावभावनांचा विचार करणारी दुसरी संस्कृती ह्या भूतलावर नक्कीच नसेल. असे असूनही परकियांपेक्षा आपले लोकच आपल्या धर्मावर जास्त टीका करतात, याचे नवल वाटते. टीका करणे आपण एक वेळ समजू शकतो, पण आज कोणताही हिंदू सण आला की त्याला विरोध करणारे एकवटतात आणि हिंदू धर्म कसा विज्ञानविरोधी आहे, अंधश्रद्धाळू आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे असे सांगण्याची तथाकथित बुद्धिजीवी लोकांची अहमहिका सुरु होते.जेष्ठ पौर्णिमेला जिवंत वडाची पूजा करणे ही अंधश्रद्धा मानणारी तथाकथित पुढारलेली ( ‘अतिप्रागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी’ ) मंडळी २५ डिसेंबरला मात्र कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ बनविताना आणि आकाशातून ‘सांताक्लाज’ नावाचा कोणी ‘देवदूत’ येईल या आशेने त्याच्या येण्याची वाट पाहतांना मात्र आपल्या दृष्टीस पडतात. अशा वेळी त्यांच्या (अ)वैज्ञानिक दृष्टिकोनाची कीव येते.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. याला वटपौर्णिमा असेही म्हणतात. सुवासिनींनी वडाची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा आणि एकूणच त्या दिवशी ‘व्रत’ धरावे अशी अपेक्षा असते. चातुर्मासाच्या पुस्तकात सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील आहे. कहाणीत सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू होतो. सावित्रीला हे समजल्यावर ती यमाकडे जाते आणि आपल्या पतीला जीवनदान मिळवून परत स्वगृही घेऊन येते अशा अर्थाची ही कथा आहे. ज्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो ते झाड वडाचे होते, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. भाविकांनी ती कहाणी अवश्य वाचावी.

“सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||”

वरील प्रार्थना वटपोर्णिमे संदर्भात आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त ( साधारण हजार वर्षे) असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

आजच्या काळात आपल्याला या व्रताचा आणि त्या कहाणीचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. त्याआधी वड या झाडाचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत. वडाचे बीज अतिसूक्ष्म असते, पण त्यातून निर्माण होणारा वृक्ष हा अतिविशाल असतो. वड ही अधिकाधिक प्राणवायु देणार वृक्ष आहे, त्याचे आयुष्य साधारणपणे हजार ते अकराशे वर्ष असते. वैशाख वणव्यातून बाहेर पडून धरती पावसासाठी आसुसलेली असते. दोन ऋतूंमधील संधिकाल असल्यामुळे  वातावरण प्रकृतिला त्रासदायक असते. काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस सुद्धा झालेला असतो. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मनुष्याला अधिक प्राणवायुची (शुद्ध वातावरणाची) गरज असते आणि ती पुरवण्याची क्षमता फक्त वडात आहे. मनुष्याने या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात जावे, प्राणवायू अव्याहतपणे पुरविणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात यावे हा ह्या व्रताचा मूळ उद्देश!. वडाला पारंब्या असतात त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड होतो. विस्तार जरी प्रचंड झाला तरी तो कधी पडत नाही कारण तो वृक्ष आपल्या पारंब्यांच्या आधारावर जमिनीवर दिमाखात उभा राहतो. वड, पिंपळ या सारख्या मोठ्या वृक्षांची लागवड मुद्दाम गावाबाहेर केली जाते. वडाच्या मुळाबाजूच्या मातीत देखील प्राणवायू आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. नायट्रोजनयुक्त माती खत म्हणून उपयुक्त असते. वडाच्या प्रारंब्यांपासून बनविलेले तेल केसांसाठी उपयुक्त आहे. ‘पुसंवन’ विधीमध्ये देखील वडाच्या कोवळ्या अंकुराचा उपयोग केला जातो. वडाच्या पारंब्यांचा कितीही विस्तार झाला तरी मूळ खोड कायम सतेज आणि मुख्य आधारस्तंभाच्या स्वरुपात तसेच राहते. वडाची मूळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कायम राखली जाते. वडाचे आणिक बरेच उपयुक्त गुणधर्म आहेत जे खास स्त्रियांसाठी गुणकारक आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते अभ्यासू मंडळींकडून जाणून घ्यावेत.

श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक वचन आहे. ‘आजपर्यंत हिंदू धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच’. पण आज मात्र हिंदूधर्माच्या सण आणि परंपरांवर घाला घातला जात आहे आणि आपल्या सुशिक्षित माता भगिनी त्यास बळी पडत आहेत. आपल्याला पुन्हा हिंदू धर्माला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आपल्या सर्व सणांचा आजच्या काळानुरूप अर्थ लावावा लागेल आणि  त्याचा प्रचार आणि प्रसार करुन येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत ते योग्य मार्गाने पोहचवावे लागेल. नवीन पिढी कुशाग्र आहे त्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांची सयुक्तिक उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत अन्यथा येणारी पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.

खरंतर ‘वटपौर्णिमा’ हाच *वैश्विक पर्यावरण दिन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.* सध्या आपण ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. वटपूजनाचा मूळ उद्देश हा आहे की सर्वांना वृक्षांचे महत्व कळावे, वन (वृक्ष) साक्षरता वाढावी. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची काळजी आपण ज्या आत्मीयतेने काळजी घेतो तितक्याच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने आपण वृक्षांचे, वनांचे, वन्यजीवांचे पर्यायाने एकूणच वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असे हा सण आपल्याला सांगतो. आजची एकूणच पर्यावरणाची स्थिती बघितली, तर वृक्षसंवर्धन अमूल्य आहे याची आपणा सर्वांना निश्चितच जाणीव आहे. ही जाणीव मात्र आपल्याला जागतिक तापमान वाढायला लागल्यानंतर झालेली आहे. हे सर्व *’तहान लागल्यावर विहिरी खणण्यासारखे’ आपण करीत आहोत. आपल्या पूर्वसूरींना मात्र खूप आधीपासून याची जाणीव होती. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही ही ‘जाणीव’ त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली आणि श्रद्धेने तिचे पालन केले जाईल असे बघितले, नव्हे ती जाणीव समाजमनात उजवली,रुजवली. आज एखादी नवीन प्रणाली आत्मसात करुन ती आपल्या घरात रुजविणे किती जिकरीचे आहे, याची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे दर १५ किमी. वर बोली भाषा बदलते, अशा ठिकाणी वृक्षसंवर्धन करण्यासाठी एखाद्या ‘कहाणी’चा पूर्वसूरींनी आधार घेतला असेल तर ते सयुक्तिकच मानले पाहिजे. त्यांनी ही संकल्पना तत्कालीन समाजात रुजवली, संवर्धित  केली आणि आज सुद्धा हे व्रत केले जात आहे याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी असले पाहिजे.

ज्याप्रमाणे घरातील जेष्ठांना सर्वात आधी नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे जंगलातील जेष्ठ अशा वडाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणे अपेक्षितच आहे. म्हणून ‘वडाचेच पूजन का?’ हा प्रश्नच गैर आहे असे वाटते. पूर्वी व्रतवैकल्ये प्रामुख्याने महिला करीत असत त्यामुळे हे व्रत महिलांकडे आले असावे. उपवास हा यातील गौण मुद्दा आहे. स्त्रीला धरित्रीची उपमा दिली जाते. स्त्री हीच जन्मदात्री आहे. निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे मातृत्व अर्थात नवनिर्मिती करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता!!!

स्त्री नैसर्गिक गुणानेच सहनशील आणि संयमित आहे. आपल्याकडे कोणतेही देवकार्य, देव पूजन स्त्रीला सोबत घेतल्याशिवाय केले जात नाही. दुर्दैवाने पत्नी हयात नसेल तर सुपारी सोबत घेऊन विधी केले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत ‘स्त्री’ला लक्ष्मी मानली जाते. स्त्री जशी ‘कोमल’ ह्रदयी आहे तशी ती वेळप्रसंगी ‘दुर्गा’ही होऊ शकते. जन्म देणे आणि संगोपन करणे ही कला स्त्रीला (मादी) निसर्गानेच बहाल केली आहे. चार मुलं एकत्र येऊन आईला सांभाळू शकत नाहीत पण एक आई मात्र चार मुलांना आज सुद्धा सांभाळते. स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केले तर सर्व कुटुंब ते सहज स्वीकारेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन होईल असाही सुप्त उद्देश त्यामागे असावा असे वाटते. कोणत्याही गोष्टीचे ‘मर्म’ न घेता नुसतेच कर्म केले गेले तर योग्य तो लाभ होऊ शकत नाही.

हिंदुधर्म पुनर्जन्म मानणारा आहे. वडाची वाढणारी प्रत्येक पारंबी ही मनुष्याचा नवीन जन्म सूचित करणारी आहे असे मानले तर सात जन्माचे रहस्य आणि वटपूजा आणिक स्पष्ट होईल. गीतेत भगवंतांनी सांगितले आहे की आत्मा मरत नाही तर तो वस्त्र बदलावे, त्याप्रमाणे फक्त शरीर (योनी) बदलत असतो. नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. पारंब्या कितीही वाढल्या तरी वड आपले मूळ खोड विसरत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही वेळा जन्म घेतला आणि तरीही तो आपल्या मूळ स्वरूप असलेल्या ‘आत्मारामा’स विसरला नाही तर त्याला ‘स्व’रूपाची नक्कीच ओळख होईल. आत्मारामाची ओळख करून घेण्यातच  मानवी जीवनाचे सार्थक आहे. मनुष्य योनीत जन्मास येऊनच रामाने देवत्व प्राप्त केले. त्यामुळे आजच्या शुभदिनी प्रत्येक जोडप्याने असा दृढनिश्चय करावा की आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आमचे ध्येय एकच असेल ते म्हणजे ‘आत्मारामाची भेट’ !!!

ज्या काळातील ही कथा आहे. त्या काळातील  मनुष्याचे आयुर्मान विचारात घेतले तर ते सरासरी १४० वर्षाचे होईल आणि वडाच्या झाडाचे एकूण आयुर्मान आपण १००० वर्षे पकडले तर  सात जन्म पुरेल इतके होईल. वटवृक्षाप्रमाणे आपला वंश किमान ७ जन्म अर्थात हजार वर्षे  तरी टिकावा किंवा त्याचा वडाच्या पारंब्यांप्रमाणे वंशविस्तार व्हावा म्हणून हे व्रत !! कोणत्याही सजीवास आपला वंश वाढावा असे वाटणे नैसर्गिकच आहे, नाही का ?

पूर्वी लग्न ही ‘संस्कार’ म्हणून केली जात असतं. वंशविस्तार आणि समाजधारणा हा लग्नसंस्काराचा प्रधान हेतू होता. तसेच तत्कालीन व्यवस्थेत मुलीला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या काळी पतीलाच देव अथवा गुरू मानले जाई. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मूलभूत अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील होता. पतिसेवा हाच स्त्रीयांचा धर्म मानला जाई. भगवान दत्तात्रेयांच्या आईची अर्थात माता अनुसयेची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहे. देवत्व प्राप्त करणे हे गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून असा गुरू (आवडीचा पती) मला पुढील सात जन्म तरी मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असणे गैरलागू कसे होऊ शकते? आपण कोठे प्रवासास निघालो तर सोबतीला आपण आपल्या विश्वासाचा मनुष्य बरोबर घेतो. कारण आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी आपली त्यामागील भावना असते. इथे आपल्याला ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा प्रवास करायचा आहे अर्थात ‘आनंताचा’ प्रवास करायचा असेल तर आपण निवडलेला आपल्या आवडीचा सोबती प्रवास संपेपर्यंत अर्थात जिवाशिवाचे मिलन होईपर्यंत सोबत रहावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वडाभोवती सूत गुंडाळण्यामागे पुर्वजांची संकल्पना अशी होती की वटवृक्षाला शिवाचे प्रतिक मानले जाते, वडाचे खोड सछिद्र असते त्यामुळे त्यास सूताने गुंडाळत फेरी मारणे हे जिवाशिवाचे मिलन झाल्याचे प्रतीक मानले जाई. भगवान शंकराचे मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक क्षमता आपणांस प्राप्त व्हाव्यात ही भावना सुद्धा त्यामागे आहे. म्हणूनच पुर्वी पतीपत्नी दोघेही वडाला सूत गुंडाळत आणि प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणे हे मोटर फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या वडाची सर्व ऊर्जा प्रदक्षिणा घालणाऱ्यास अनायासे मिळत असते.

आज विवाहामागील  ‘संस्कार’ लुप्त होत चालला असून ती आज एक प्रकारची व्यवस्था किंवा सर्वमान्य तडजोड ठरते आहे की काय याची भीती वाटू लागली आहे. सध्याचे कुटुंबातील वातावरण, एकूण सहजीवन आणि वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण बघितले तर ही भीती खरी आहे असे वाटू लागते. आज विभक्त कुटुंब पद्धती रुजू पहात आहे. बदलत्या काळानुसार काही प्रमाणात ते अपरिहार्यही झाले आहे. म्हणून आज वटपौर्णिमा साजरी करीत असताना फक्त महिलांनीच याचा विचार न करता संपूर्ण कुटुंबानी आणि एकूण समाजाने याचा विचार करावा असे वाटते. व्यावहारिक अडचण असल्यामुळे दूर गेलेली कुटुंब या निमित्ताने एकत्र यावीत आणि वडाच्या पारंब्याप्रमाणे एकमेकांना आधार देत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करून आपले कुटुंब भक्कम आणि उबदार करण्याचा प्रयत्न केला जावा असे या सुचवावेसे वाटते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने विश्वमान्य असलेली आपली ‘कुटुंब व्यवस्था’ अधिक सक्षम आणि सुसंस्कारित करण्याचा संकल्प आजच्या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा अशी मनीषा व्यक्त करतो. आपल्या ‘कुटुंबरुपी’ वडाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आपल्या कुटुंबाचा समाजातील प्रत्येक घटकाला आधार वाटावा असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, यातूनच हिंदू धर्माचा वटवृक्ष बहरेल यात तीळमात्र शंका नाही.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्रीराम। 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print