मराठी साहित्य – विविधा ☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर

आपल्या मेंदूमधे 1000 कोटी न्यूराॅन्स असतात.

आणि हे न्यूरल नेटवर्क खूप प्रभावी असते.

जर आपण या नेटवर्कला चांगला इनपुट दिला

तर नक्कीच चांगले आउटपुट मिळेल.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधे सुद्धा कृत्रिम न्यूराॅन नेटवर्क बनविले ते.

आणि मग पाहिजे ते इनपुट देऊन नेटवर्क ऑपरेट करतात.

 

धीरूभाई अंबानीजी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, माझ्यापुढे खूप आव्हाने उभी होती. अडचणींचे डोंगर मार्गात आडवे होते.अपयशाचे अनेक फटके बसले. पण मी अडचणींकडे  शिकण्याची संधी म्हणून बघितले. मनाला असे प्रोग्राम केले की प्रत्येक अडथळा मला नवीन दिशा दाखवत गेला.

जेव्हा आपण मोठी स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लहान गोष्टींमधे घुटमळू नये. संत ज्ञानेश्वर एक दाखला देतात.

सांगे कुमुद दळाचिने ताटेl

जो जेविला चंद्रकिरणे चोखटेl

तो चकोरू काय वाळुवंटी l

चुंबितु असे।

जो चकोर चन्द्रकिरण चाखतो तो कशाला वाळूचे कण चाखेल?

मनाला असे प्रोग्राम करायचे की क्षुल्लक गोष्टींकडे लेट गो करता आले पाहिजे.

कुठलीही कृती करताना आपली सत् सद विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. कारण कधी कधी भावनेच्या भरात किंवा मोहात पडून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात पण मग अपराधीपणाची भावना सतत टोचत राहते.

उदा. महान सायन्टीस्ट ओपनहायमर यांनी अमेरिकेसाठी  ऑटमब्माॅम्ब बनवला.जेव्हा मेक्सिकोच्या डेझर्टमधे त्याचे टेस्टिंग झाले तेव्हा ते इतके आनंदात होते. “गाॅड इज अब्सेंट” असे ते म्हणाले. परंतु नंतर मरेपर्यंत त्यांना गिल्ट फिलींग राहिले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मात्र ऑटमबाॅम्ब बनवायला नकार दिला.

मनात कुठल्या गोष्टी साठवायच्या व कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या याचेही प्रोग्रामिंग करता आले पाहिजे. आपले मन वाईड लेन्स कॅमेरा सारखे असते. प्रत्येक पिक्चर क्लिक करत जाते. शिवाय मनाची स्टोरेज कपॅसिटीही प्रचंड असते. परंतु मनाला त्रास देणा-या गोष्टी, मत्सर, असुया, राग, द्वेष ताबडतोब डिलीट करता आल्या पाहिजेत.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हितगूज एकटीशी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

हितगूज एकटीशी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

निवांत क्षण मला खूप आवडतात.स्वतःशी स्वतःचे हितगुज करायला.

कुठलीच साथसोबत न घेता कधी एकट्यानं कुठं भटकायला गेला आहात ? नाही ना.. तर मग रोजच्या या धावपळीत कधीच न जमलेलं स्वतःकडं पाहणं इथं सहज जमून जाईल..

स्वतःचीच सोबत करत एकटं…!

एकटीनं भटकणं मला नेहमीच आवडतं. मुळात ही स्वतः स्वतःला दिलेली वेळ असते. तिथं तुम्हाला फक्त तुमच्या विचारांसाठी वेळ देता येतो.. स्वतःच परीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं ते अशावेळी आवडून जातं.

आपण कुठलाही मुखवटा न चढवता मुक्त असतो. मला यात वेगळंच समाधान मिळतं…

मनसोक्त उनाड दिवस..!

मगाशी म्हटल्याप्रमाणेच मला एकटीला भटकायला जाणं जाम आवडतं. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, त्याच-त्याच माणसांमधून निवांतपणा हवा असतो ना तेव्हा मी हमखास बाहेर पडते.. मी मित्र- मैत्रीणी बरोबरही खूप भटकते तेव्हा मजा येतेच पण एकट्यानं भटकण्याचीही मजा काही औरच आहे…!

निसर्गाशी संवाद साधण्यासाठी एकटीनच बाहेर पडावंस वाटतं.. निसर्ग हा हक्काचा दोस्त कारण तो बोलत काहीच नाही फक्त ऐकत राहतो.. एकटं भटकण्यातलं सुख हा उपदव्याप केल्यावरच कळतं. एकट्या रानवाटांवर स्वतःची सोबत अनुभवणं, स्वतःला वेळ देणं अवचित जमून जातं…निसर्गाशी हितगुज करण्यासाठी…

एकांतामध्ये निसर्गाशी हितगुज करायला मिळतं.. निसर्ग माझ्याशी बोलतोय असंच वाटतं. शांतपणे विचार करायला मिळतो. एक प्रकारची प्रसन्नता मिळते… मी स्वतःला आजमावते…यातून स्वतःला चांगल्या-वाईट अनुभवातून ही आजमावता येतं बरं…

निर्णय घेता येतात..

     मनाशीच मी बोलते

   साठवणीचे बोल माझे

  गुज माझे स्वतःशी खोलते

माझी सगळं काही एकटीनं करायची इच्छा असते…

मला एकटीनं भटकण्याची कधी भीती वाटत नाही आणि वाटलीही नाही पण मला असं भटकणं खास करुन याच्यासाठी आवडतं की त्यामुळं स्वतःशी संवाद साधणं जमून जातं. अनेकदा स्वतःला वेळ देणं जमतच नाही. अशावेळी एकटं भटकायला जाणं मन शांत करणारं ठरतं. मनाच्या शांततेसह मला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते.. निसर्ग तर तुमची प्रत्येक पावलापावलावर सोबत करत असतो. असे अनेक अनमोल क्षण निसर्गानं या भटकंतीत मला दिले आणि नंतर आलेल्या अनुभवातून समृद्ध झाल्याचं समाधान ही मिळालं…

अचिव्हमेंटनं मन भरून आले.. येतं… आयुष्यात आणखी काय हवं नाही ?

      माझ्यात मी गुंतले

   ध्येय माझे माझ्या परीचे

    अंतरीच मी जागविले

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो!

आजच्या लेखाचा विषय भूतकाळातील मंतरलेल्या मोरपिशी दिवसांच्या रम्य आठवणींत गुंतवून टाकणारा! आठवतेय, उन्हाळी सुट्टीच्या एक एक क्षणाचा आनंद लुटून झाला. कधी मित्रमैत्रिणींबरोबर खेळ, गप्पा टप्पा, तर कधी मामाच्या गावाला जाणाऱ्या आगगाडीत सफर, झालंच तर एखाद्या रम्य ठिकाणी घालवलेले आनंददायी दिवस, अगदीच कांही नसेल तर भावंडांबरोबर घरीच राहून केलेली मजा अन लुटीपुटीची भांडणे! एक ना दोन! एक मात्र खरे, यांत ‘अभ्यास’ नामक गनिमाला अजिबात एन्ट्री नव्हती. हेच तर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुखसागरात मनसोक्त पोहण्याचे गमक आणि ‘गमभन’ होते.

बदलत्या काळानुसार या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांचे तंत्र थोडे वेगळे झाले. अभ्यासक्रमानुसार (स्टेट, सी बी एस इ अथवा आय सी एस इ इत्यादी) सुट्यांचे वेळापत्रक अन शाळा सुरु होण्याची तारीख थोडीफार वेगळी झाली. मात्र त्यातला आत्मा अबाधितच राहिला आहे हे महत्वाचे! इयत्तेनुसार या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याचे मुलांचे अन पालकांचे वेगळे गणित असते. नर्सरी अन के जी वगैरेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांचे बहुदा रडणे जास्त कॉमन, शाळेत जातांना गोड हसत आईला निरोप देणारे गोजिरवाणे बाळ फक्त टी व्ही वर असते असे मला वाटते. आईच्या पदराला (किंवा ओढणीला) गच्च पकडत ‘मी नाही जात’ असा घोष करीत मूल शाळेच्या ‘मावशीबरोबर’ एकदाचे आत जाते. अशा वेळेस आत्तापर्यंत मुश्किलीने रोखलेले अश्रू माऊलीच्या डोळ्यातून घळ घळ वाहायला लागतात.

कांही शाळांत (फक्त) ‘पहिल्या दिवशी’ गेट पासून तर वर्गापर्यंत मुख्याध्यापिकेपासून तर शिक्षक अन शिक्षिका दुतर्फा गुलाबाची फुले घेऊन मुलांचे स्वागत करायला अटेन्शन मध्ये उभे असतात. त्यांचे चित्रीकरण बऱ्याचदा आपण बघतो. मला हे बघून पोलिसांच्या ‘सौजन्य सप्ताहाची’ आठवण येते. यातला छुपा अजेंडा जाणती अन हुशार मुले लगेच ओळखतात. गुलाबाचे काटे उद्यापासून कसे अन केव्हां बोचकारणार याचा ते अंदाज घेत असतात. (शारीरिक इजा नाही बरे का, आता नियमावली नुसार ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे सर्व कालातीत विचार समजावेत!)

 मुले शाळेत पहिल्या दिवशी जायला बहुदा इतकी उदासीन का असतात? घरी मुक्तपणे खेळणे, बागडणे, खाणे पिणे अन झोपेच्या वेळा इच्छेनुसार ठरवणे, झालेच तर मोबाईल, टीव्ही, मॉल, चित्रपट बघणे असे विस्कळीत अन बहुदा अनियोजित टाइमटेबल, या सर्वांची सवय मुलांना जर सुट्टीत सवय लागली तर शाळेकरता अचानक घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागणारच. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून आईचा उठ रे बाळा/ उठ ग राणी असा (सुरुवातीला) मधाळ तगादा सुरु होतो. अन मग त्यापुढे सर्व रुटीन! ‘काय कटकट आहे!’ हा ऍटिट्यूड घेऊन शाळेच्या प्रथम दिवसाचे स्वागत कां होते मुलांकडून? हा विचार मला नेहमी व्यथित करतो. या उलट शाळेच्या प्रथम दिनाची मोजकी मुले वाट पाहत असतात. वरच्या इयत्तेत गेल्याचा अपरिमित आनंद असतो, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले असल्यास हा आनंद अभिमानाने उजळून निघालेला असतो. सक्काळी सक्काळी लवकर शाळेचा नवा कोरा युनिफॉर्म (वयाबरोबर उंची वाढल्याने नवा युनिफॉर्म अत्यावश्यक असतोच), वर्षभर वापरून झालेले जोडे, दप्तर, कंपास, वॉटर बॅग इत्यादी नव्या दिवसाचे स्वागत करायला कसे चालतील? तेही नवे कोरेच हवेत! मंडळी या नव्या आयटम्सच्या गर्दीत कव्हर घातलेली नवथर सुगंधाने रसरसलेली नवीन वर्षाची पुस्तके यांच्याहून अधिक रोमांचक काय असू शकते बरे?

जर इयत्ता बदलली तर यासोबत अनोळखी वर्गमित्र, वर्गशिक्षिका, नवीन वर्ग आणि नवीन बसायची जागा! मुले हे सगळे हळू हळू अनुभवायला लागतात अन मग त्यातील ‘गंमत जंमत’ मजेने स्वीकारायला लागतात. सर्वात मुख्य म्हणजे शाळेचा पहिला दिवस सगळीकडे ‘ओरिएंटेशन’ (अभिमुखता) चा असतो. त्या दिवशी फक्त सर्व नवीन गोष्टींची पहिली ओळख करून देणे हे शिक्षकांचे महत्वाचे कार्य असते.

शाळेतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘मधल्या सुट्टीतील डब्बा’! प्रत्येक मुलाच्या डब्यात कांहीतरी वेगळे असते, मला वाटते मुलांच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार केला तर ‘भाजी पोळी’ ला पर्याय नाही. रोज वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या दिल्या तर मुलांना त्या खाण्याची सवय लागते. या बाबतीत एक आठवले, आमच्या लहानपणी डब्यात रोज सुक्की बटाटा भाजी असायची. इतर भाज्यांच्या आवडीबद्दल आम्हा भावंडांचे कधीच एकमत व्हायचे नाही. कधी काचऱ्या, कधी खूप कांदे घालून, तर कधी फक्त मिरचीची फोडणी देऊन उकडलेल्या बटाट्यांची भाजी इतकीच व्हेरायटी असायची. मात्र आई याची भरपाई रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या खायला घालून करीत असे. गंमत अशी की बहुदा सर्वांच्या डब्ब्यात बटाटा असूनही प्रत्येक बट्टूची चव मात्र निराळी असे. आजकाल आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या मुलांच्या डब्यात काय काय व्हरायटी असते हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. मात्र मुलांची शारीरिक आणि मानसिकरित्या जोमाने जोपासना करायची असेल तर आईने ‘मधल्या सुट्टीचा जेवणाचा डब्बा’ याविषयी आहारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन ‘इष्ट भोजन’ रांधण्याची गरज नक्कीच आहे.

एक बदल निश्चितच जाणवतो, तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते! आमच्या लहानपणी प्रायमरी शाळेत एकच शिक्षक किंवा शिक्षिका वर्षभर सर्व विषय शिकवत असत. त्यांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची समग्र माहिती असायची, एक सुंदर भावनिक नाते गुंफले जायचे. पुढील वर्षीच्या पहिल्या दिवशीच जर ते शिक्षक वर्गावर नसतील तर विद्यार्थ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. आता मात्र विषयानुसार तेच शिक्षक पुढील वर्षी भेटत राहतात. इमोशनल बॉण्डिंगचे प्रमाण कमी झालेले वाटत असले तरी, मायेचा ओलावा अजूनही निश्चितच टिकून आहे असे मला वाटते. एक सुचवावेसे वाटते. पालकांनी आपल्या मुलाचा/ मुलीचा मागील वर्षीचा धडधाकट असलेला गणवेश, पुस्तके आणि शाळेला लागणाऱ्या इतर वस्तू नुसत्याच फेकून न देता गरजू मुलांना द्याव्यात. यासाठी डोळस नजरेने बघितले तर, ही गरजवंत मुले आपल्या आसपासच आढळतील, अथवा अशा कामात हातभार लावणाऱ्या समाजसेवी संस्था देखील उपलब्ध आहेत. हे समाधान आगळे वेगळे असते.

मंडळी, हा शाळेचा पहिला दिवस अगदी नवसंजीवनी दिल्यासारखा पालकांनाच नव्हे तर, प्रत्येकाला सुखदायी वाटतो. जून महिना असला तरी वसंत ऋतू असल्याचा भास होतो. वेगवेगळ्या वयाच्या अन विविध रंगांच्या नव्या कोऱ्या गणवेशात, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा कंपास, नवी वॉटरबॅग अन डबे यांच्या जामानिम्याने नवथर उत्साहाने सळसळत बागडणारी गोड गोजिरी मुले शाळेच्या बस मध्ये, रिक्षात किंवा पायी जात असतात. मित्र मैत्रिणींसोबत त्यांची ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अवस्था होत असते. कधी तर जिवलग मैत्रिणीसोबत ‘गमाडि गंमत जमाडि जंमत ये ग ये सांगते कानांत’ असे प्रायव्हेट संभाषण सुरु असते. मग त्यांचे आल्हाददायी बोलणं अन किंचाळत केलेला कल्ला देखील पक्षांच्या कलरवासारखंच मधुर वाटत असतं. जणू कालपावेतो उन्हाने कोमेजून गेलेल्या बागेत आज अवचित नवचैतन्य आलंय, वृक्षवेलींना नवीन पालवी फुटलीय अन रंगीबेरंगी फुलांचे उमलले आहेत, त्यांच्या सुगंधाने अख्खी बाग मोहरून गेलीय असे जाणवते. मैत्रांनो, चला तर मग बिगी बिगी! आपण देखील ‘मातीला सुगंध फुलांचा’ या परिपाठाप्रमाणे या नवोन्मेषात ‘शाळेचा पहिला दिवस’ साजरा करीत आपल्या बालपणात हरवून जाऊ या!

धन्यवाद!

डॉ. मीना श्रीवास्तव

मोबाईल- ९९२०१६७२११

टीप- एका समूहगीताची लिंक जोडत आहे.

 

‘आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा’ (स्वाध्याय)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ११ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ११ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा होतो.ते सर्वांना दिलासा देणारं असं एक अनोखं वळण होतं. आता अनिश्चिततेचा लवलेशही माझ्या मनात नव्हता. मला सोमवारी स्टेट बँकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन व्हायचं होतं. त्या क्षणी यापेक्षा जास्त आनंददायी दुसरं कांही असूच शकत नव्हतं. त्या आनंदासोबत मनात होती एक प्रकारची आतूर उत्सुकता! पण..? ते सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार होतं याची मला कल्पना कुठं होती?)

रविवारी मी अंथरुणाला पाठ टेकली पण रात्रभर झोप लागलीच नाही. मनातला अंधार विरून गेला होता. मन हलकं होऊन स्वप्नरंजनात तरंगत होतं. त्यामुळे पुरेशी झोप झाली नसूनही रात्र क्षणार्धात सरुन गेल्यासारखं वाटलं.पहाट होताच मी उत्साहाने उठलो.लगबगीने सगळं आवरलं. बहिणीने दिलेला पोळी-भाजीचा डबा घेऊन मी बँकेत जाण्यासाठी तयार झालो. देवाला आणि घरी सर्वांना नमस्कार करून बाहेर पडलो.

बसमधून उतरताच चटके देणाऱ्या उन्हात झपाझप चालत स्टेट बँकेच्या वरळी ब्रॅंचसमोर येऊन क्षणभर थबकलो. वरळी ब्रॅंचची समोरची ही प्रशस्त इमारत हेच आता मला उत्कर्षाकडे नेणारं माझं भविष्य होतं जे माझ्या स्वागतासाठी जणू सज्ज होतं! स्वप्नवत वाटाव्या अशा त्या क्षणी मी भारावून गेलो होतो.त्याच मनोवस्थेत ब्रॅंचचं काचेचं जाड प्रवेशद्वार अलगद ढकलून मी आत पहिलं पाऊल टाकलं. रणरणत्या उन्हातून आत आलेल्या माझं ए.सी.च्या गारव्याने प्रसन्न स्वागत केलं होतं! जणूकांही त्याक्षणी मला जे हवं ते हवं त्यावेळी प्रथमच मिळत होतं!

मी रिसेप्शन काऊंटरकडे गेलो.

“येस प्लीज..?” रिसेप्शनिस्टने माझं हसतमुखाने स्वागत केलं. तिला विश करून मी माझं ‘जॉईनिंग लेटर’ तिच्याकडे सुपूर्द केलं. तिने त्या पत्रावरून नजर फिरवली.माझं नाव वाचताच ती थोडी गंभीर झालीय असा मला भास झाला. मी तो विचार क्षणार्धात झटकून टाकला. ती काही बोलेल म्हणून वाट पहात उभा राहिलो. क्षणभर विचार करून तिने मला बसायला सांगितलं आणि ती इंटरकाॅम वरून कुणाशीतरी बोलू लागली.

‘असू दे. इट इज अ पार्ट ऑफ हर जॉब ‘.. माझ्या मनानं तिच्या शब्दात माझी समजूत घातली. मी तिचं बोलणं संपायची वाट पहात राहिलो.

एक एक क्षण मला आता युगायुगासारखा वाटू लागला.

रिसिव्हर खाली ठेवून लगेचच तिनं मला बोलावलं.ती काहीशी गंभीर झाली होती.

“मि.लिमये…आय अॅम साॅरी.. पण… तुम्हाला जॉईन करून घेता येणार नाहीये…”

“कां..?”

“युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट…”

ऐकून मला धक्काच बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा मला भास झाला. खुर्चीचा आधार घेत मी स्वतःला सावरलं. माझ्या हातातून खूप मौल्यवान असं कांहीतरी निसटून जात होतं आणि ते प्राणपणाने घट्ट धरून ठेवण्यासाठी मीच धडपड करायला हवी होती.

“क..काय?कसं शक्य आहे हे? मी..मी..ब्रॅंच मॅनेजरना भेटू..? प्लीज…?”

“ही इज आॅल्सो हेल्पलेस.जस्ट नाऊ आय टाॅक्ड वीथ हिम ओन्ली.यू मे कॉल ऑन अवर मेडिकल आॅफिसर, डाॅ.आनंद लिमये.ही इज द राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन…”

मी नाईलाजाने मनाविरुद्ध जड पावलांनी पाठ फिरवली. सोबतचा बहिणीने निघताना दिलेला पोळीभाजीचा डबा मला आता खूप जड वाटू लागला. नि:शक्त झाल्यासारखी हातापायातली शक्तीच निघून गेली जशीकांही.

मी मघाच्या त्याच काचेच्या जाड दारापाशी येऊन थबकलो. काही वेळापूर्वी अतिशय उत्साहाने हेच दार ढकलून मी आत आलो होतो तेव्हा ए.सी.च्या थंडाव्याने केलेलं माझं स्वागत ही एक हूलच होती तर. आता तेच दार ढकलून मी पुन्हा बाहेरच्या रणरणत्या उन्हात पाऊल टाकलं तेव्हा बाहेरच्या उन्हाचे चटके अधिकच तीव्र झालेले होते!

‘कां?’आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्या क्षणी तरी उत्तर नव्हतंच.’आता पुढं काय?’

हा प्रश्न अनुत्तरीत होऊन मनातच लटकत राहिला. त्याही परिस्थितीत मी स्वतःला कसंबसं सावरलं.आता ‘डॉ.आनंद लिमये’ हाच एकमेव आशेचा किरण होता. त्यांचं सौम्य,हसतमुख, तरुण व्यक्तिमत्त्व नजरेसमोर आलं आणि त्यांचा खूप आधार वाटू लागला….!

माझी पावलं नकळत त्यांच्या क्लिनिकच्या दिशेने चालू लागली. मी अंधाराच्या खोल गर्तेत ढकलला गेलो होतो आणि आता काडीच्या आधारासाठी धडपडत होतो! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा खिसा चाचपला.पण….?पण.. तो फोटो नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता. सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्याही नकळत मी तो घरीच विसरलो होतो! त्या अस्वस्थतेतही माझी पावलं मात्र न चुकता ‘डॉ.आनंद लिमये’ यांच्या क्लिनिक समोर येऊन थांबली होती…!

माझं भवितव्य आता सर्वस्वी फक्त त्यांच्याच हातात होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बो टं ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ 👆बो टं !👆✌️😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काही म्हणा, तुमच्या बोटांत खरंच जादू आहे !”

अशी दाद, आपण एखादे शिल्पकला, चित्रकला किंवा रांगोळी प्रदर्शन पाहून झाल्यावर, जर त्या कलाकाराची कर्म-धर्म संयोगाने प्रत्यक्ष गाठ पडली, तर त्याच्या कलेच कौतुक करतांना आपल्या तोंडातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडते !

आपल्या हातांची व्याख्या करायची झाल्यास, दंडापासून सुरु होऊन दहा बोटांपर्यंत संपणारा आपल्या शरीराचा एक अवयव, अशी ठोकळ मानाने करायला कोणाची हरकत नसावी.  आणि ज्यांची हरकत असेल त्यांनी स्वतःचे बोटं (कुठले ते त्यांचे त्यांनीच ठरवावे !) आश्चर्याने स्वतःच्या तोंडात घातले तरी चालेल !

काही काही (नशीबवान ?) लोकांना कधी कधी दोन्ही हातांना मिळून अकरा बोटं असल्याचे आपण बघतो. अर्थात त्या अकराव्या बोटाचा ते काय आणि कसा उपयोग करतात, का त्याची त्यांना अडचणच होते, हे त्यांचे त्यांनाच माहित. यावर असे अकरा बोटंवालेच जास्त प्रकाश टाकू शकतील.  त्यामुळे मी उगाच मला असलेल्या दहा बोटांपैकी माझं एखादं बोटं त्यांच्या अकराव्या बोटाकडे दाखवून, त्यांना माझ्याकडे बघून, माझ्या नावाने बोटं मोडायला कशाला लाऊ?

बायकोला जशी नवऱ्याशिवाय आणि नवऱ्याला जशी बायकोशिवाय परिपूर्णता नाही असं म्हणतात (कोण ते माहित नाही !) तदवतच, हातांना कमीत कमी दहा बोटांशिवाय पूर्णता नाही, हे मात्र मी म्हणतो बरं कां मंडळी ! अर्थात काही काही बायकांना आपल्या नवरोबांना नाचवायला (नवऱ्याला नाचवायला नाही) आपल्या हाताची हीच दहा बोटं कमी पडतात, ही गोष्ट अलाहिदा !  तर थोडक्यात काय, आपल्या दोन हातांना असलेल्या या दहा बोटांना, आपल्या रोजच्या जीवनात अनन्य साधारण असं महत्व आहे, हे कोणीही मान्य करेल. बरं या आपल्या बोटांचे हे महत्व आपल्याला आत्ताच कळलय, असं आहे का ? तर तसं अजिबातच नाही ! अगदी पौराणिक काळापासून, आपल्याला या बोटांचे महत्व निरनिराळ्या कथांमधून कळत आलेलं आहे. जसं, श्री कृष्णाने आपल्या एका हाताच्या करंगळीवर अखंड गोवर्धन पर्वत उचलला होता, तसंच द्रोणाचार्यांनी एकलव्य धनुरविद्येत अर्जुनापेक्षा पुढे जावून वरचढ ठरेल, हे ओळखून त्याला आपला अंगठा गुरुदक्षिणा म्हणून देण्यास भाग पाडले होते, इत्यादी इत्यादी !

माझ्या लहानपणी म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी बाळाला थोडं उभ राहता यायला लागलं, की आई-बाबा, काका-मामा-आत्या, त्यांच्या बोटाचा आधार देवून चालायला शिकवत असतं.  तेंव्हा आताच्या सारखं वॉकरच खूळ नव्हतं. होता तो वडीलधाऱ्यांच्या बोटांचा आश्वासक पर्सनल टच ! त्यामुळेच की काय आमची पिढी अगदी लहान वयातच स्वतःच्या बोटांवर, सॉरी सॉरी, स्वतःच्या पायावर लवकर उभं रहायला शिकली. असो !

छोटया छोटया बाळांना सुद्धा आपल्या कुठल्या बोटांचा कसा उपयोग करायचा, हे कुणीही न सांगता चांगलेच कळतं. काही काही बाळांना आपला अंगठा किंवा करंगळी शेजारील दोन बोटं तोंडात घालून झोपायची सवय असते.  त्यातून त्यांना मिळणारा अवर्णनीय आनंद आपण त्यांच्या झोपेतल्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला लगेच जाणवतो ! बरं ते बोटं किंवा अंगठा त्याच्या तोंडातून काढून बघा, नाही त्यानं त्याच्या रडण्याच्या आवाजाने तुम्हांला तुमच्या कानात बोटं घालायला लावली तर !

पुढे तरुणपणी बोटां संदर्भात जेवढे म्हणून काही वाक्प्रचार प्रचलित होते आणि कानावर पडत होते त्यात प्रामुख्याने “अमुक तमुक माणसावर अजिबात विश्वास ठेवू नकोस, तो या बोटाची थुंकी त्या बोटावर कधी करेल हे तुला कळणार नाही !” असं ऐकण्याचा योग वडीलधाऱ्यांकडून नेहमी येत असे ! आणि हो, आपल्या पैकी काही जणांना तरुणपणी तोंडात बोटं घालून शिट्टी मारण्याची कला (कोणाकडे बघून ते तुमच तुम्हीच आठवा !) अवगत होती, हे आपण मान्य कराल ! आता त्या शिट्ट्यांचा पुढे काही चांगला परिणाम झाला का दुष्परिणाम झाला, हे ते शिट्टी मारणारे बहाद्दरच जाणोत ! शिट्टी या विषयावर सुद्धा एक लेख लिहायचे डोक्यात आहे, बघूया माझी बोटं तो लिहायला कधी शिवशीवतात ते !

जगातील सात आश्चर्यांपैकी, (सध्या त्यांची संख्या वाढून नक्की किती झाली आहे ते मला माहित नाही, हे पण एक आश्चर्यच आहे, असं आपल्याला वाटल्यास आपण तसं तोंडात बोटं न घालता देखील म्हणू शकता !) एखादे प्रत्यक्ष बघतांना लोकांची बोटे तोंडात जातात, असं आपण प्रवासवर्णनाच्या पुस्तकात वाचतो ! पण हे खरचं घडत नाही, कारण मोठ्यांनी असं तोंडात बोटं घालणं कस दिसेल, या नुसत्या कल्पनेने आपली बोटं (आपल्याच) तोंडात जायची !

“ती आपल्या भावी नवऱ्याच्या,  घनदाट केसातून आपली लांब सडक नाजूक बोटं (त्या काळच्या सर्वच कथा कादंबऱ्यातील नायिकांसाठी अशी बोटं असणं हे जणू एक सक्तीचं क्वालिफिकेशनच होतं जणू !) फिरवत, आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्न पहात होती !” अशी वर्णनं आपण पूर्वीच्या कथा कादंबऱ्यातून वाचली असतील. पण पुढे त्याच कादंबरीत, ठराविक वर्ष संसार झाल्यावर, तीच बायको आपली बोटं, (आता खरखरीत आणि जाडजूड झालेली)  त्याच नवऱ्याच्या पूर्वीच्या घनदाट केसांच्या जागी सध्या (तिच्यामुळे?) पडलेल्या टकलावर, मिरं वाटण्यासाठी त्यांचा उपयोग करते, असं कधीच माझ्या वाचनात आलं नाही ! आपल्या वाचनात आलं असेल तर मला त्या कादंबरीच आणि लेखकाच नांव नक्की कळवा, म्हणजे मी माझ्या हातांची दहा बोटं जोडून त्याला कोपरापासून नमस्कार करायला मोकळा !

आपल्यापैकी बऱ्याच जणांना दहा बोटांसह दोन हात असतात, पण जी लोकं या बाबतीत काही कारणाने कमनशिबी असतात, अशी लोकं पण या जगात आनंदाने वावरतांना आपण बघतो.  त्यातील काही जण तर आपल्या या व्यंगावर मात करून, आपल्या पायाच्या बोटांच्या मदतीने पेन पकडून, परीक्षा देतांना किंवा त्यात ब्रश धरून उत्तम चित्र साकारतांना आपण पहिले असेलच. त्या सगळ्यांच्या या अनोख्या अशा कर्तृत्वाला माझा मनापसून साष्टांग दंडवत !

पूर्वी लग्न जुळवतांना मध्यस्थ अगदी छातीठोकपणे सांगत, “मुलीच्या/मुलाच्या वागणुकीत बोटं ठेवायला जागा नाही, अगदी निर्धास्तपणे पुढे जा !” पण थोडे अपवाद वगळता, काही लग्ना नंतर, मुलीच्या/मुलाच्या आई बापाला आपले दोन्ही हात जोडायची पाळी येते, हे ही तितकेच खरं !

काही स्त्रिया किंवा पुरुष आपल्या दहा बोटांत, निरनिराळ्या आकाराच्या, रंगीत खड्यांच्या अंगठ्या घालून लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. असा एखादा तो किंवा ती मला दिसली, की मी लगेच मनातल्या मनांत समजून जातो, एकतर असं करून ते आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करताहेत किंवा त्यांच्या बोटांत कुठलीच कला नसावी ! अर्थात आपल्या बोटांचा कोणी कसा उपयोग करायचा हे ज्याने त्याने ठरवायचे असले तरी, दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा हे असं अंगठ्या घालून मिरवलेल बरं, या माझ्या मताशी तुम्ही पण सहमत व्हाल !

शेवटी, दुसऱ्या कुणीतरी आपल्या स्वभावावर, वागणुकीवर बोटं ठेवून, त्यात खोटं काढू नये, असंच प्रत्येकाला वाटत असतं.  पण त्या दुसऱ्याच्या बोटावर आपले नियंत्रण नसल्याने, त्याने ते कोठे ठेवावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न झाला. आपण ते फारसे मनावर न घेणंच इष्ट. नाहीतर सगळ्यांनीच आपल्या एकेका वागणुकीवर बोटं ठेवले आणि ती सगळीच बोटं आपण सुधारायला गेलात, तर आपण आपला मूळचा स्वभावच हरवून बसाल ! अशा वेळी, ऐकावे जनाचे करावे मनाचे, हाच धोपटमार्ग आपण निवडणे हे उत्तम ! बघा पटलं तर आणि नाहीच पटलं तर, आपलीच बोटं आपण आपल्याच तोंडात घालायला कोणाच्या बाची भीती आहे ?

ताजा कलम – वरील लेखात कोणा वाचकाला कोठे बोटं ठेवावं असं वाटलं तर ते तसे ठेवण्यासाठी तो मोकळा आहे, कारण शेवटी बोटं त्याच आहे !😅

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चहा – जपानी समारंभ ‘चाडो’ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

चहा – जपानी समारंभ ‘चाडो’ ☕ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

चहाची तल्लफ ? होय ना ? मग ऑफिस मध्ये. मीटिंग मध्ये ,कुणाच्याही भेटी दरम्यान ,प्रवासात आणि वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा या चहाची तल्लफ आपल्याला येतेच. काही वेळा तर चहा ची वेळ हे सासूबाई किंवा आज्जेसासूबाई यांचे घड्याळ असते. पण ही तल्लफ मोठी वाईट. ठरलेल्या वेळेला चहा नाही मिळाला तर काहींचे डोके चढते …म्हणजे दुखायला लागते. चिडचिड होते. काही कामाच्या ठिकाणी दिवसभरचा कामाचा ताण बाजूला ठेऊन जरा निवांत वेळ मिळण्यासाठी चहासाठी ब्रेक घेतात. टी-टाईम. (कुठल्याही ऑफिस मधले लोक १० मिनिटांच्या चहाला तास भराचा फेर फटका मारतात ही गोष्ट वेगळी.)

चहा सुद्धा ठराविक ब्रॅंड चा प्यायचा अशी सवय जडली असते. कोणाला भेटायला बोलवायचे तेंव्हा आपण म्हणतोच “चहाला या” यात लपलेला अर्थ म्हणजे ‘गप्पा मारायला या’.(चित्रपट गीतात “शायद मेरे शादी का खयाल दिल मे आया है, इसिलीये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है” हेच ते बोलणे या वेळी करायचे असते.)ते असो. पूर्वी आपल्याकडे चहा सुद्धा पित नसत. आमच्या लहानपणी आम्ही चहा मागितला की चहाची सवय लागू नये म्हणून ,आज्ज्या, मावश्या, काकू आम्हाला भीती दाखवायच्या. की, लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो ,कोणी म्हणायचे चहा प्यायला की काळे होतो. आज चहाचे आवडते ब्रॅंड आहेत. आता मात्र याला मोठेच सांस्कृतिक महत्व आलेले दिसते. सुर्रर्र….के पियो … अशा चहाच्या उत्पादनाच्या अनेक जाहिरातीतून चहा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला आहे हे कळते. म्हणून तर चहा प्रेमींसाठी ‘२१ मे’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे जाहीर केला आहे.

चहा म्हणजे चा या चीनी भाषेतून रूढ झालेला शब्द. तोच मग चीनी भाषेतून भारत, जपान, इराण, रशिया या देशातून सुद्धा थोड्या फार प्रकाराने रूढ झाला. डच लोकांनी हा शब्द जावा मार्गे युरोपात नेला असे म्हणतात.चहा चे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस. चहा ची ही वनस्पति झुडुपे या प्रकारात मोडते. याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्तेजक पेय तयार होते तोच चहा.चीनी दंतकथेत चहा हे उत्तेजक पेय म्हणून उल्लेखलेले असले तरी Erhya या चीनी शब्दकोशानुसार चहा ही औषधी वनस्पति म्हणून लोकांना परिचित होती.  केवळ चहाच्या पानांच्या उत्पादनांसाठी याची लागवड केली जाते. हाच चहा आता जगातील निम्मे लोक पितात आणि हे पेय लोकप्रिय आहे. म्हणूनच चाय पे चर्चेला आणि दैनंदिन आहारामध्ये व आदरातिथ्यात ‘चहाला’ महत्व आहे. सातव्या आणि आठव्या शतकात म्हणे चीन मध्ये चहा इतका लोकप्रिय झाला होता की चहावर चीनी सरकराने कर बसवला होता . चीन मध्ये चहा वर ग्रंथ सुद्धा आहे. त्याचे नाव आहे ‘चा चिंग’,आठव्या शतकातील हा ग्रंथ, चहाचा इतिहास व चीन मधील ही मूळ वनस्पति याची माहिती देतो. असे म्हणतात की बौद्ध भिक्कुंमार्फत चहा पिण्याची ही सवय चीन मधून युरोपात पोहोचली. मग पुढे याचा प्रसार झाला. सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान जपान मध्ये प्रथम चहा गेला. आता तर चहापान विधी तिथे घराघरात महत्वाचा समजाला जातो. सर्व आशियाई देशात पण हा प्रसार झाला.

जपान मध्ये चहा समारंभ –

जपानी चहा समारंभ ‘चाडो’. द वे ऑफ टी, म्हणून ओळखला जाणारा हा समारंभ एक सांस्कृतिक परंपरा समजली जाते. १५०० च्या काळात सेन नो रिक्यु यांनी जपानी चहा संस्कृतीत क्रांति घडवून आणली आणि त्याला एक कला प्रकार म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. चीनी चहाचे पूर्णपणे जपानीकरण केले. तेंव्हा पासून चहाचे घर, चहाची बाग, चहाची भांडी, चहा समारंभाचे नियम असे लागू करून सौंदर्य पूर्ण चहा समारंभ होऊ लागले. सेन नो रिक्यु ने या समारंभाचे योगी नियोजन होण्यासाठी सात नियम घालून दिलेले आहेत. चहा समारंभासाठी म्हणजे चानोयू साठी हे जपानी परंपरेतले एक घर / वास्तू ‘चशीत्सू’ हे चहाघर म्हणून वापरले जाते. आपल्याकडे जशी अमृततुल्य चहा ची दुकाने अथवा चहा टपर्‍या ठिकठिकाणी आढळतात तशीच.यात चहा शिकविणारे असतात चाय मास्टर म्हणजे तज्ञ त्यांना ‘तेशू’ म्हणतात.

चहा घर – चशीत्सु

सेन नो रिक्यु यांच्या पतवंडांनी म्हणजे पुढच्या पिढिंनीही या संकल्पनेचा विकास करत आणला. या पद्धती शाळेच्या पाठ्यक्रमात लावल्या गेल्या आहेत. त्यांनी तर ओमोटेसेन्के , उरासेन्के आणि मुशाकोजिसेन्के या चहा शाळांची स्थापना केली.या तीन प्रमुख शैली आहेत. यातील शाळा आजही सुरू आहेत. पुढे चहा संमेलनाचे औपचारिक आणि अनौपचारिक वर्ग पडून वर्गीकरण झाले.  तिथे शाळा  महाविद्यालये आणि विद्यापीठात चहाचे क्लब आहेत.

उरासेंके शाळेचे पंधरावे ग्रँड मास्टर सेन गेंशीत्सू यांनी केलेल चहा समारंभ

जसे आपल्याकडे पाककृतींचे वर्ग घेतले जातात तसे तिथे वेगवेगळ्या लोकांसाठी चहाच्या सशुल्क शाळा चालतात. हे विद्यार्थी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असे असतात.म्हणजे थोडक्यात क्लासेस.त्यात काय शिकायचे  असा प्रश्न आपल्याला पडेल पण खरच हा एक समारंभ असा असतो की त्या शाळेत प्रवेश करण्यापासून चे नियम , शिस्त, प्रथा, मॅनर्स अगदी दार कसे उघडायचे,आत आल्यावर तातामी मॅट वर कसे चालायचे , इथपासून भांडी कोणती वापरायची, कशी वापरायची, कशी धुवायची, कशी मांडायची, आलेल्यांचे स्वागत कसे करायचे , कोणाला आधी नमन करायचे, यजमानाने चहा समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांशी कसे वागायचे आणि पाहुण्यांनी पण वागताना कोणते नियम पाळायचे असे एव्हढे संस्कार/पद्धती या शाळेत शिकविले जातात. पाहुण्यांनी चहा समारंभाला आल्यानंतर आत जाण्याआधी चपला बूट बाहेर काढून, हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच जायचे असते.तेही यजमानांनी आदरपूर्वक बोलवल्यानंतरच . तो पर्यन्त वेटिंग रूम मधेच थांबायचे असते. एक राऊंड झाल्यानंतर मध्यंतर असते, त्यात चहा च्या खोलीची स्वच्छता होते पुन्हा पाहुण्यांना आदराने आत बोलावले जाते. एका वेळी पाहुण्यांची संख्या साधारण ५ असते. असा हा समारंभ किमान अर्धा तास ते जास्तीत जास्त चार तास चालू असतो. हा, वेळ पाहुण्यांची संख्या ,चहा सादरीकरणाची पद्धती, जेवण व चहाचे प्रकार यावर अवलंबून असतो. अशी ही मोठी प्रक्रियाच असते.

चहाच्या या औपचारिक कार्यक्रमावेळी ताजे जेवण दिले जाते त्याला कैसेकी किंवा ‘चा- कैसेकी’ म्हणतात. या समारंभासाठी यजमान विशेष कपडे ‘किमोनो’ घालतात. किमोनो हा जपानचा राष्ट्रीय पोशाख आहे. शाळा, प्रसंग, त्या वेळचा ऋतु, उपकरणे अशा अनेक घटकांवर ही चाडो म्हणजे (the way of tea)पद्धत आधारित असते. म्हणजे चहा समारंभ केवळ चहा पुरताच मर्यादित नसतो तर या वेळी छोटेसे भोजन पण असते. याचे महत्व म्हणजे आस्वाद घेणे आणि आनंद देणे असते. 

अशा शाळांतून चहा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळते. हे ऐकलं की आपल्याकडे सुद्धा संगीत, शिवण, कला याबरोबर पाककौशल्य किंवा चहा, कॉफी, सरबते शिकवण्यासाठी एखादा तास असायला हरकत नाही ,नाही का ? पण एक मात्र आहे , आपल्या मुलामुलींना चहा नक्कीच करता येतो.नव्हे यायलाच हवा त्यासाठी कशाला शाळा हव्यात ? हं चहा करून झाल्यावर तो सर्व्ह करतांना ,किंवा कपात चहा ओतताना हातावर कंट्रोल हवा ,तो ट्रे मध्ये, खाली जमिनीवर  सांडू नये , कपातला चहा बशीत सुद्धा सांडू नये देताना, असे शिक्षण द्यायला हवे पालकांनी. हेच ते मॅनर्स, शिस्त जपानी चहा समारंभात शिकवले जातात.

पाहिलंत, हा जपानी चहा समारंभ म्हणजे नुसता एक सोहळा च नसतो तर तो सद्भाव, सन्मान, पवित्रता आणि शांतीचे प्रतीक असलेली, एक आध्यात्मिक अभ्यासाची पद्धत मानली जाते. त्यात इतिहास आहे, संस्कृती आहे, सौंदर्य शास्त्र आहे , सामाजिक एकोपा वाढवण्याचे साधन आहे. शिवाय त्यात कला आहे, स्वच्छता आहे , नीटनेटकेपणा आहे, आतिथ्य आहे. नम्रता आहे, शिष्टाचार आहे. विविध शैली आहेत.

मग काय कधीही जपान टूरवर जाल तेंव्हा नक्की या समारंभाला जाणीवपूर्वक हजर रहा. तिथला अमृततुल्य पिऊन या. आपल्या इथल्या आसाम – दार्जिलिंग सारखे चहाचे मळे पण बघून या. संस्कृतीतला फरक बघाल तेंव्हाच महत्व अनुभवाल, तर अशी ही जपानी चहा संस्कृती ! वाचली म्हणून सांगितली.

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो किनारा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ तो किनारा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची उधळण  होतेच असं नाही आणि ” तो किनारा प्रत्येकाला मिळतोच असंही नाही…

आयुष्याच्या कोणत्या किनाऱ्यावरून आपण आयुष्याकडे बघत आहोत यावरून आयुष्याची रंगत ठरत असावी असे मला वाटते.. काहींना अशा किनाऱ्यावरून आपलं आयुष्य खूप रंगीबेरंगी दिसतं असावं तर काहींना धवल काहींना काळं तर काहींना राखाडी… ज्यांना आयुष्य  छान रंगीबेरंगी दिसतं ना अशी माणसं भाग्यवान… !!  आयुष्याला रंग देणारे, त्यात रंग भरणारे व रंग जपून ठेवणारे  विरळचं…!!

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला अनेक किनारे असतात. आपला किनारा कोणता? हे आपल्याला शोधावं लागतं तर काही किनारे मागे सोडून आपल्याला पुढे चालावचं लागतं. … ” त्या”

किनाऱ्यापाशी आपल्याला कितीही थांबावसं वाटलं तरी नाही जमतं तर काही किनारे  आपल्याला सोडून ही  जातात. मग उरतो आपण एकटेचं.. तसं जर पाहिलंत तर आपण सगळेचं आपापल्या परीने एकटे असतो पण आयुष्याच्या या वादळात आपल्याला असा एखादा किनारा गवसतो की जो आपला असतो

आपल्यासाठीचं असतो.. .आपल्या आयुष्यात येणा-या वादळात तो आपल्याला घट्ट धरून ठेवतो. येणाऱ्या लाटांच्या प्रवाहात तो आपल्याला वाहून जाऊ देत नाही… घट्ट धरून ठेवतो…असे किनारे मिळायला भाग्य लागतं…मग आपण आपला एकटेपणा विसरतो हळूहळू.. … मग  आपण ” त्या ” किनाऱ्यावर जाऊन आपण त्याचेच होऊन जातो. त्याच्या कुशीत विसावतो हासतो रडतो मनं मोकळ करतो आणि आपण विसरून ही जातो की आपल्या “त्या” किनाऱ्याला मर्यादा ही आहेत. त्याची ही सहनशक्ती आहे. मग मनाला प्रश्न पडतो की…आपली किती वादळे त्याने पचवावी? आपल्याला त्याने किती काळ वाचवावं ?

आपला असणारा हा “जीवलगसखा एकटेपणा ” किती वेळ लांब राहणार आपल्या पासून नाही का ?….

किनारा थकतो आणि हळूहळू सुटून जातो आपल्या हातून…आपल्याही नकळत…. मग पुन्हा आपण एकटेचं उरतो.. आपलेच आपल्यासाठी आणि आपला एकटेपणा आपल्यासाठीच..

किनारा सुटण्याचं दु:ख तर असतचं पण त्याने आयुष्य तर थांबत नाही ना आपलं ? आपण जगतचं राहतो किंबहुना जगावचं लागतं म्हणा ना .. लांब असतो ” तो”  किनारा … मात्रं तो साक्षीला असतो.. येतो कधीतरी आपल्याला सावरायला… आणि कधीतरी आपण ही विसावतो त्याच्याजवळ… मन शांत होईपर्यंत..

“तो “असतो तोपर्यंत  सत्याला उराशी घेऊन एकटेपणाला सोबत घेऊन आणि” त्या”  किनाऱ्याकडे नजर ठेवून आपण जगत राहतो..जगतचं राहतो…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.)….

आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.

१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते

२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.

३.’पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.

४. मी आजपासून दृढनिश्चय  केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.

५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल.  प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.

समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि  शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.

१. अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.

आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.

एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.” हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी ‘अमक्याची आई’ अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे, म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे.’ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’

संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे. महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो.  याची  सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.

“ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”

— संत तुकाराम महाराज

हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,

“बरे जाले देवा निघाले दिवाळे , बरी या दुष्काळे पीडा केली ॥

अनुतापे तुझे राहिले चिंतन , जाला हा वमन संसार ॥

बरे जाले जगी पावलो अपमान , बरे गेले धन ढोरे गुरे ॥

बरे जाले नाही धरिली लोकलाज , बरा जालो तुज शरण देवा ॥

बरे जाले तुझे केले देवाईल , लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरें व्रत एकादशी , केले उपवासी जागरण ॥”

*

त्याच्याही पुढे  जाऊन ते म्हणतात,

*

“बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे  माया सोडविली ॥

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

पोर मेले बरे  जाले । देवे  मायाविरहित केले।

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।।

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”

इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,

संत मीराबाई , अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!

आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.

बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला गर्भात असल्यापासून शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.

अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.

‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.

म्हणोन आळस सोडावा ।

येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा ।

थारा बळें ।।

दा. १२.९.८।।

समर्थ रामदास

आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.

“नजरे बदली तो नजारे बदले।

नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”

एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे , विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे  बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे.  कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.

आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.

अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत , त्या खालीलप्रमाणे असू शकतील.

१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म.

२. ‘हवेनको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.

३. कुटुंबाची, समाजाची,  देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.

४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.

५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.

६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.

७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.

जीवन जगण्याची कला- अध्यात्म‘ साठी ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.

*

आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।

*

घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।

बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।

मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध ।।१।।

*

दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।

दोस्त होऊनी हातचं माझा आपुल्या हाती घेते।

जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।

*

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।

साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।

सर्वत्रच तो बघत धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।

*

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार।

हात होतसे वाद्य सुरांचे  पाझरती झंकार।

प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा चंद ।।४।।

*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!!  चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.

अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक  छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.

आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो.

दिवसभरातील प्रेम, माया , मोह,  जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!

कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविक त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे  मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.

देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं ? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु  आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ  करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही ? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का  नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.

हा जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा.  मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !!  आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.

यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखे सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत.  जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.

समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”

किंवा

“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।

‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!

म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध  करुन दिले आहेत.  मुळात मन प्रसन्न का करायचे ? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार.? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा,भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि

“पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.

आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.

क्रमशः…

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल,

प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्यातील एक पात्र आहोत, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या बऱ्यावाईट अनुभवांवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतातच…., नाही का? जीवन हा एक ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते.  जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.

एवढ्याशा आयुष्यात मनुष्याला खूप काही हवं असतं…

आणि नेमकं हवं असतं तेच मिळत नसतं…

हवं ते मिळून सुद्धा खूप काही मिळालेलं नसतं…

चांदण्यांनी भरुन सुध्दा आभाळ त्याचं रिकामं असतं…

जीवन आनंदाने जगण्यासाठी अत्यावश्यक काय आहे असे कोणालाही विचारले तर जवळजवळ सर्वजण एकच उत्तर देतील तो म्हणजे पैसा आणि तो मुबलक असावा. तुमच्या मनातलं बोललो न मी ? अहो, स्वाभाविक आहे, मी ही तुमच्यातीलच एक आहे….!

श्रीसद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे एक वचन आहे, की मनुष्याला मिळणारा पैसा हा कष्टाने मिळत नाही तर प्रारब्धाने मिळतो. त्यामुळे मला इतकाच पैसा का मिळाला हा प्रश्न उचित नाही आणि किती पैसा मिळाला की मनुष्याचे समाधान होईल याचेही उत्तर कोणी अचूकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर मनुष्य अधिक सुखी होईल असे वाटते.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्याचा काळ थोडा परीक्षा घेणारा आहे, हे नक्की. आपण कधीतरी विद्यार्थीदशेतून नक्कीच गेले असू. परीक्षेला घाबरणारा विद्यार्थी नापास न होईल तर नवल .. मनुष्य अनेकवेळा जितका वाईट घटना घडल्याने घाबरत नाही, तितका वाईट घटना घडेल या भीतीने घाबरतो. अनेकांना भीतीचीच भीती जास्त वाटत असते. यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे काळजी करायची नाही, काळजी  घ्यायची. चिंता सोडायची.

मी जिंकणार आणि मी नक्कीच जिंकणार !! असे किमान एकदा सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपताना मनाला सांगायचे.

गंमत बघा, आपल्याला जे काही संत माहीत असतील, ज्या संतांची चरित्रे आपण वाचली असतील, काहींनी अभ्यासलीही असतील, त्यापैकी कितीजण गडगंज श्रीमंत होते, गडगंज सोडून देऊ, किती जण नुसते श्रीमंत होते..? उत्तर आपल्या ओठावर आहे, ते तसेच राहू द्या. मला एक सांगा, कोणत्या साधुसंतांचा टिंगल झाली नाही ? कोणत्या संताला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नाहीत..?, कोणत्या संताची लोकांनी निंदा केली नाही…? अहो अनेक संतांनी जे सोसलं त्यापैकी एक टक्काही आपण उण्यापुऱ्या आयुष्यात सोसलं नसेल…..? आठवून पहा. बरं इतके सहन करूनही ज्यांनी टीका केली, निंदा केली, ज्यांनी विषप्रयोग केला, त्यांच्याविरुद्ध एकाही संताने तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. उलट या सर्वांवर सर्व संतांनी कृपाच केल्याचे आपल्या लक्षात येईल. माउलींनी पसायदान मागितले, श्री सद्गुरु गोंदवलेकर त्यांच्यावर विषप्रयोग होणार हे माहीत असूनही विष प्रयोग करणाऱ्याचे मन मोडू नये म्हणून त्याच्या घरी जेवावयास गेले.

सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. आगगाडी किंवा  विद्युतरथ जेव्हा रूळ बदलतो, तेव्हा जास्त खडखडाट होतो. आपण थोडे तटस्थ राहून विचार करायचा. शांतपणे विचार केला तर नक्कीच काहीतरी मार्ग मिळू शकेल.

खालील विचार आज आपल्याला उपयुक्त आहेत असे वाटते, म्हणून इथे देत आहे.

१. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते नक्कीच महत्वाचे असते पण त्यापेक्षा आपण त्यास कसे सामोरे जातो किंवा कसा ‘प्रतिसाद’ देतो हे अधिक महत्वाचे असते.

२. मी चांगला नाही, मी यशस्वी होऊ शकत नाही, माझ्या नशिबातच नाही ह्या आपल्या मनातील सर्वात घातक कल्पना आहेत, त्या समूळ नष्ट करुया.

३. मी चांगला आहे, मी ते करु शकतो आणि मी नक्की जिंकेन या शक्तीदायी कल्पना आपण मनात रुजवू.

४. सकारात्मक विचार करण्याची,  सकारात्मक बोलण्याची, सकारात्मक कृती करण्याची सवय लावून घेऊया.

५. कोणतीही गोष्ट किमान दोनदा घडते. एकदा कल्पनेत आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. म्हणून आपल्याला हव्या असलेल्या सकारात्मक कल्पना करुया म्हणजे अगदी तशाच घटना प्रत्यक्षात घडतील.

६. आपण स्वतःला काय समजतो हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या क्षमता ओळखून प्रेम करा. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करुया. ज्याप्रमाणात आपण बदलू त्याप्रमाणात जग बदलतेच.

७. ‘दृष्टिकोन’ बदलू.

८. मनाचे व्यवस्थापन करायला शिकणे हे सुखी होण्याचे मूलभूत सूत्र आहे.

९. ‘मन’ हेच सर्व सुखदुःखाचे ‘मूळ’, ‘खोड’ ‘पान’, ‘फुल’ आणि ‘फळ’ आहे.

१०. ‘निरामय’ जीवनासाठी नुसता शारीरिक व्यायाम पूरेसा नाही तर मनाच्या व्यायामाचीही तितकीच गरज आहे.

११.  इथून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत हे जर मनुष्याला नक्की करता आले तर मनुष्याचे अनेक व्याप आपसूक कमी होतील.

१२. मनामध्ये समुद्रासारखी ‘स्वीकार्यता’ आणि वागण्यात तशीच ‘मर्यादा’ असावी.

१३. प्रत्येक गोष्टीला अंत आहे, हेच अंतिम सत्य आहे. आपण ते स्वीकारले पाहिजे.

१४. ‘स्मरणात देखील ‘मरण’ आहे आणि हेच खरे ‘मरण’, बाकी सर्व मृत्यू.

१५. मनाची विशालता आकाशासारखी असावी.

१६. जे मनुष्याकडे असते, मनुष्य त्यातीलच थोडेफार इतरांना देऊ शकतो. उदा. ज्याच्याकडे आनंद तो आनंद देतो, ज्याच्याकडे सुख आहे तो सुख आणि  ज्याच्याकडे दुःख ….

१७. ‘शेषशायी’ असूनही भगवंत स्मितहास्य करु शकतात कारण ते कायम ‘सम’ स्थितीत असतात.

१८.कायम ‘सम’ स्थितीत राहणे ही सुद्धा एक साधना आहे.

१९. मला ‘कोणी’तरी पहातो आहे हे कायम ध्यानात ठेवावे, म्हणजे आपल्या हातून कधीही वावगे होणार नाही.

२०. ‘परि’स्थिती कशीही असो, आपली ‘आत्म’स्थिती (आनंदाची स्थिती) कायम राहावी आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण!!!

२१. मैं’ नही । ‘तू’ ही।

                           श्री गोळवलकर गुरुजी.

२२. “पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।।”

                                 समर्थ रामदास

२३. आपण आनंदाने आनंदाला बोलवूया, आनंद आनंदाने आपल्या घरी येईल, आनंद आनंदाने आपल्याकडे राहील, आनंद आनंदाने आपल्या घरी आल्यामुळे आपले घर आनंदाने भरून जाईल, मग सर्व ठिकाणी आनंदी आनंद असेल!!!*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print