श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल,
प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.
जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्यातील एक पात्र आहोत, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्या बऱ्यावाईट अनुभवांवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतातच…., नाही का? जीवन हा एक ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.
एवढ्याशा आयुष्यात मनुष्याला खूप काही हवं असतं…
आणि नेमकं हवं असतं तेच मिळत नसतं…
हवं ते मिळून सुद्धा खूप काही मिळालेलं नसतं…
चांदण्यांनी भरुन सुध्दा आभाळ त्याचं रिकामं असतं…
जीवन आनंदाने जगण्यासाठी अत्यावश्यक काय आहे असे कोणालाही विचारले तर जवळजवळ सर्वजण एकच उत्तर देतील तो म्हणजे पैसा आणि तो मुबलक असावा. तुमच्या मनातलं बोललो न मी ? अहो, स्वाभाविक आहे, मी ही तुमच्यातीलच एक आहे….!
श्रीसद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे एक वचन आहे, की मनुष्याला मिळणारा पैसा हा कष्टाने मिळत नाही तर प्रारब्धाने मिळतो. त्यामुळे मला इतकाच पैसा का मिळाला हा प्रश्न उचित नाही आणि किती पैसा मिळाला की मनुष्याचे समाधान होईल याचेही उत्तर कोणी अचूकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर मनुष्य अधिक सुखी होईल असे वाटते.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्याचा काळ थोडा परीक्षा घेणारा आहे, हे नक्की. आपण कधीतरी विद्यार्थीदशेतून नक्कीच गेले असू. परीक्षेला घाबरणारा विद्यार्थी नापास न होईल तर नवल .. मनुष्य अनेकवेळा जितका वाईट घटना घडल्याने घाबरत नाही, तितका वाईट घटना घडेल या भीतीने घाबरतो. अनेकांना भीतीचीच भीती जास्त वाटत असते. यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे काळजी करायची नाही, काळजी घ्यायची. चिंता सोडायची.
मी जिंकणार आणि मी नक्कीच जिंकणार !! असे किमान एकदा सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपताना मनाला सांगायचे.
गंमत बघा, आपल्याला जे काही संत माहीत असतील, ज्या संतांची चरित्रे आपण वाचली असतील, काहींनी अभ्यासलीही असतील, त्यापैकी कितीजण गडगंज श्रीमंत होते, गडगंज सोडून देऊ, किती जण नुसते श्रीमंत होते..? उत्तर आपल्या ओठावर आहे, ते तसेच राहू द्या. मला एक सांगा, कोणत्या साधुसंतांचा टिंगल झाली नाही ? कोणत्या संताला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नाहीत..?, कोणत्या संताची लोकांनी निंदा केली नाही…? अहो अनेक संतांनी जे सोसलं त्यापैकी एक टक्काही आपण उण्यापुऱ्या आयुष्यात सोसलं नसेल…..? आठवून पहा. बरं इतके सहन करूनही ज्यांनी टीका केली, निंदा केली, ज्यांनी विषप्रयोग केला, त्यांच्याविरुद्ध एकाही संताने तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. उलट या सर्वांवर सर्व संतांनी कृपाच केल्याचे आपल्या लक्षात येईल. माउलींनी पसायदान मागितले, श्री सद्गुरु गोंदवलेकर त्यांच्यावर विषप्रयोग होणार हे माहीत असूनही विष प्रयोग करणाऱ्याचे मन मोडू नये म्हणून त्याच्या घरी जेवावयास गेले.
सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. आगगाडी किंवा विद्युतरथ जेव्हा रूळ बदलतो, तेव्हा जास्त खडखडाट होतो. आपण थोडे तटस्थ राहून विचार करायचा. शांतपणे विचार केला तर नक्कीच काहीतरी मार्ग मिळू शकेल.
खालील विचार आज आपल्याला उपयुक्त आहेत असे वाटते, म्हणून इथे देत आहे.
१. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते नक्कीच महत्वाचे असते पण त्यापेक्षा आपण त्यास कसे सामोरे जातो किंवा कसा ‘प्रतिसाद’ देतो हे अधिक महत्वाचे असते.
२. मी चांगला नाही, मी यशस्वी होऊ शकत नाही, माझ्या नशिबातच नाही ह्या आपल्या मनातील सर्वात घातक कल्पना आहेत, त्या समूळ नष्ट करुया.
३. मी चांगला आहे, मी ते करु शकतो आणि मी नक्की जिंकेन या शक्तीदायी कल्पना आपण मनात रुजवू.
४. सकारात्मक विचार करण्याची, सकारात्मक बोलण्याची, सकारात्मक कृती करण्याची सवय लावून घेऊया.
५. कोणतीही गोष्ट किमान दोनदा घडते. एकदा कल्पनेत आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. म्हणून आपल्याला हव्या असलेल्या सकारात्मक कल्पना करुया म्हणजे अगदी तशाच घटना प्रत्यक्षात घडतील.
६. आपण स्वतःला काय समजतो हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या क्षमता ओळखून प्रेम करा. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करुया. ज्याप्रमाणात आपण बदलू त्याप्रमाणात जग बदलतेच.
७. ‘दृष्टिकोन’ बदलू.
८. मनाचे व्यवस्थापन करायला शिकणे हे सुखी होण्याचे मूलभूत सूत्र आहे.
९. ‘मन’ हेच सर्व सुखदुःखाचे ‘मूळ’, ‘खोड’ ‘पान’, ‘फुल’ आणि ‘फळ’ आहे.
१०. ‘निरामय’ जीवनासाठी नुसता शारीरिक व्यायाम पूरेसा नाही तर मनाच्या व्यायामाचीही तितकीच गरज आहे.
११. इथून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत हे जर मनुष्याला नक्की करता आले तर मनुष्याचे अनेक व्याप आपसूक कमी होतील.
१२. मनामध्ये समुद्रासारखी ‘स्वीकार्यता’ आणि वागण्यात तशीच ‘मर्यादा’ असावी.
१३. प्रत्येक गोष्टीला अंत आहे, हेच अंतिम सत्य आहे. आपण ते स्वीकारले पाहिजे.
१४. ‘स्मरणात देखील ‘मरण’ आहे आणि हेच खरे ‘मरण’, बाकी सर्व मृत्यू.
१५. मनाची विशालता आकाशासारखी असावी.
१६. जे मनुष्याकडे असते, मनुष्य त्यातीलच थोडेफार इतरांना देऊ शकतो. उदा. ज्याच्याकडे आनंद तो आनंद देतो, ज्याच्याकडे सुख आहे तो सुख आणि ज्याच्याकडे दुःख ….
१७. ‘शेषशायी’ असूनही भगवंत स्मितहास्य करु शकतात कारण ते कायम ‘सम’ स्थितीत असतात.
१८.कायम ‘सम’ स्थितीत राहणे ही सुद्धा एक साधना आहे.
१९. मला ‘कोणी’तरी पहातो आहे हे कायम ध्यानात ठेवावे, म्हणजे आपल्या हातून कधीही वावगे होणार नाही.
२०. ‘परि’स्थिती कशीही असो, आपली ‘आत्म’स्थिती (आनंदाची स्थिती) कायम राहावी आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण!!!
२१. मैं’ नही । ‘तू’ ही।
श्री गोळवलकर गुरुजी.
२२. “पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।।”
समर्थ रामदास
२३. आपण आनंदाने आनंदाला बोलवूया, आनंद आनंदाने आपल्या घरी येईल, आनंद आनंदाने आपल्याकडे राहील, आनंद आनंदाने आपल्या घरी आल्यामुळे आपले घर आनंदाने भरून जाईल, मग सर्व ठिकाणी आनंदी आनंद असेल!!!*
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈