☆ मराठी साहित्यातील अजरामर पत्रे…☆ श्री विश्वास देशपांडे ☆
माझीा मुलगी पुण्यात शिक्षणासाठी राहायची, तेव्हा दर आठवड्याला तिचे मला एक पत्र यायचे.मुलगा शिकायला होता, तेव्हा तोही पत्र पाठवायचा. त्यांच्या पत्रांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू. त्यातील काही सुंदर पत्रे आजही आम्ही जपून ठेवली आहेत. पत्राच्या सुरुवातीला लिहिलेले ‘ प्रिय दादा, किंवा प्रिय आई ‘ हे शब्द अंगावर मोरपीस फिरल्यासारखे जादू करायचे. आणि शेवट ‘ तुमची लाडकी, तुमचा लाडका ‘ यासारख्या हृदयस्पर्शी शब्दांचा असायचा. दुसरे नवीन पत्र येईपर्यंत आधीचे पत्र दोनतीन वेळा तरी वाचून झालेले असायचे. आताशा पत्र लिहिणे हा भाग कालबाह्य होत चालला असला तरी एक काळ असा होता, की ज्यावेळी पत्रांच्या माध्यमातूनच एकमेकांशी संवाद साधला जायचा. दूर अंतरावर असणाऱ्या आपल्या प्रिय जनांशी संवाद साधण्याचे ते एक प्रभावी माध्यम होते.
आजही आपल्यापैकी काहींनी आपल्या वडिलांनी आपल्याला लिहिलेलं पत्र , भावाने लिहिलेलं पत्र वा अन्य कोणी लिहिलेलं पत्र आठवण म्हणून जपून ठेवलं असेल. ही पत्रं म्हणजे एक अनमोल ठेवा असतो. कधी त्या माणसांची आठवण आली, तर ती पत्रं पुन्हा वाचावी. त्यासारखा दुसरा आनंद नाही.
जी ए कुलकर्णी या प्रख्यात कथालेखकाने आपल्या प्रिय वाचकांना लिहिलेली पत्रे काही वाचकांनी तर प्राणापलीकडे जपून ठेवली. त्याही पुढे जाऊन काहींनी ती पत्रं चंदनाच्या पेटीत ठेवली. त्या पत्रांना जीएंच्या आठवणींचा मधुर सुगंध आहे.
जीएंची पत्रे प्रदीर्घ असत. जीएंनी त्या काळात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सुद्धा पत्रे लिहिली. जीएंनी श्री. पु. भागवत, सुनीता देशपांडे इ ना लिहिलेली पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. तो आपल्यासारख्या वाचकांसाठी एक अनमोल ठेवाच आहे. अशाच महान साहित्यिक, विचारवंतांच्या पत्रांचा संग्रह ह वि मोटे यांनी करून तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. व. पु. काळे यांची पत्रे सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी जपून ठेवली आहेत. वपुंची आगळीवेगळी भाषाशैली, आपले विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची पत्रे कधीही वाचली तर नुकतीच लिहिल्यासारखी ताजी वाटतात.
पत्रलेखनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मुलांना काही गोष्टी सांगितल्या, हितगुज केले. पं नेहरूंनी तुरुंगात असताना इंदिरा गांधींना पत्रे लिहून भवतालच्या जगाची माहिती दिली. सुधारणा, राजकारण, इतिहास, धर्म इ बद्दल माहिती दिली. साने गुरुजींनी सुद्धा आपल्या छोट्या पुतणीला म्हणजे सुधाला पत्रे लिहून खूप गोष्टी समजावल्या आहेत. ती पत्रे ‘ साने गुरुजींची सुंदर पत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.
तर लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्या समाजसुधारकाने पत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग समाजसुधारणेसाठी केला. ‘ प्रभाकर ‘ या साप्ताहिकातून त्यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, परंपरा, धर्म जातीभेद, स्त्रीजीवन इ विषयांवर त्यांनी तब्बल १०८ पत्रे लिहिलीत. ही पत्रे ‘ शतपत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.
आज ही सगळी माहिती एवढ्याकरिता सांगितली की या पत्रांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. ज्यांना अभिजात मराठी वाचायचे आहे, मराठीचा अभ्यास करायचा आहे, मराठीवर प्रभुत्व मिळवायचे आहे अशांनी जरूर ही पत्रे वाचावी. किमान ही पुस्तके चाळावी .
वर उल्लेखिलेली प्रसिद्ध पत्रे आहेत तसेच चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना लिहिलेले पत्रसुद्धा प्रसिद्ध आहे. पण ते वेगळ्या कारणासाठी. योगी चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कळल्यावर एकदा त्यांच्या मनात आले की आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे. पण सुरुवात कशी करावी हेच त्यांना उमजेना. ज्ञानेश्वरांना आशीर्वाद लिहावा, तर ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे. आणि नमस्कार लिहावा तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान. म्हणून काहीच न लिहिता त्यांनी ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठवले.
खरं तर चांगदेव मोठे योगी, ज्ञानी आणि चौदाशे वर्षे वय असलेले. पण अध्यात्ममार्गात अहंकार सर्वात मोठा शत्रू असतो. सिद्धीच्या मागे लागल्यामुळे चांगदेवांमध्ये अहंकार शिरला. आणि ब्रह्मज्ञानापासून ते वंचित राहिले. म्हणून छोटी मुक्ताई म्हणाली, ‘ चांगदेव अजून पत्रासारखे कोरेच राहिले.’ आपणही हे सगळे समजून घेणार नसू तर आपणही तसेच कोरे राहू. ‘ मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया. ‘ अशी आपली गत नको व्हायला.
अगदी लहानपणापासून आपल्याला काही गोष्टींच आकर्षण असतं. काही वस्तुंची, गोष्टींची संकल्पना आपल्या डोक्यात फीट बसलेली असते आपापल्या आवडीनुसार.
अगदी लहानपणी खेळतांना ति.सौ.आईची पर्स घेऊन मिरवायची खूप आवड.अगदी तेव्हा पर्स असं सुध्दा न म्हणता त्या वस्तू ला प्रस अस म्हंटल्या जायचं . त्या पर्समध्ये मला नेहमीच त्या पर्सच्या आकार, रंगापेक्षाही त्या पर्सला कप्पे म्हणजेच किती “खाणे”आहेत ह्याकडेच लक्ष असायचे.जितक्या जास्त कप्प्यांची पर्स तितकी ती जास्त आवडायची.
पुढे थोडे मोठे झाल्यावर घरोघरी गोदरेज ची कपाटं आलीतं.ही कपाटं तशी सर्रास नव्हती.अगदी घरटी एखादचं असायचं.ही लोखंडी कपाटं अगदी लोकल मेड असली तरीही त्या कपाटाला सगळे “गोदरेजचं कपाट” असचं म्हणायचे.माझ्या दृष्टीने ह्या कपाटातील कप्पे हेच आकर्षण केंद्र असायचं. ह्या कपाटात खालचे आणि वरचा एक असे मोकळेढाकळे , ऐसपैस,कप्पे होते. मधल्या भागात एक अगदी छोटसं लाँकर असायचं त्याचा वापर अगदी इटुकले पिटुकले किडुकमिडूक सोन्याचे बारीकसारीक डाग ठेवायला केल्या जायचा.
एक होतं तेव्हा माझं,तुझं असा काही शब्दचं नसायचा जे काही असायचं ते “आपलं”, सगळ्यांच सामायिक असायचं. त्यामुळे त्या एकाच कपाटात वेगवेगळ्या कप्प्यात अख्ख्या कुटूंबाचं जणू सर्वस्व एकवटलेलं असायचं.
काय नसायचं त्या कपाटात? त्या कपाटात सगळ्यांचे ठेवणीतले कपडे, महत्वाचे दस्तावेज, घरातील सगळ्या हिशोबाच्या डाय-या,पैसे, ठेवणीतील फक्त पाहुणे अआले की बाहेर काढायच्या चादरी, क्राँकरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्याच्याशी निगडित असलेल्या आठवणी.
ह्या कप्प्यांनी मात्र पुढील आयुष्यात खूप मोलाची गोष्ट शिकविली. ह्या कप्प्यांच महत्त्व च वेगवेगळे. ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं स्थान वेगवेगळं. आपण ठरविलेल्या कप्प्यांमध्ये ठराविक जागीच ठराविक वस्तूचं महत्व योग्य. त्याची जर का स्थान,जागा सोडून सरमिसळ झाली तर सगळचं बिघडणारं.
तसचं अगदी मनात पण मी अनेक कप्पे तयार करुन त्याच्यात सरमिसळ होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेण्याचं ठरविलं. प्रत्येक नात्याचा कप्पा वेगवेगळा, त्याच महत्व वेगवेगळं. त्यामुळे एखाद्या नात्यात बाधा निर्माण झाली तरी आपले बाकीचे नाते सावरायला असतात, किंवा आपणही एका नात्यासाठी बाकी नात्यांचं प्रेम काळजी ह्याने सक्षमपणे उभे राहू शकतो. मनाच्या ह्या कप्प्यांमध्ये रागाचा कप्पा मात्र अगदीच छोटासा आणि मागचा निवडला,फारसा न वापरल्या जाणारा,जास्त महत्व नसलेला.
प्रेमाचा,स्नेहाचा कप्पा मात्र मोठा आणि अगदी हाताला येईल असा ठेवला,वारंवार वापरात येणारा, कदाचित कुणावर चुकीने,गैरसमजाने आरोप केले असतील,आळ घेतले असतील तर दिलदारपणे खुल्यादिलाने माफी मागण्याचा कप्पा सदैव नजरेच्या टप्प्यात ठेवलायं,जेणेकरून कुणीही व्यक्ती विशेषतः निर्दोष व्यक्ती आपल्याकडून नकळत का होईना पण दुखावल्या जाणार नाही ह्या काळजीने.
अशा त-हेचे अनेक कप्पे मनात योग्य जागी तयार केलेत ज्यामुळं मनाला एक वेगळे समाधान लाभतं लाभतं हे नक्की.
☆ गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
(सत्य आणि गैरसमज)
भारतीय सौर 9 चैत्र 1946
गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक महत्त्व :-
येणाऱ्या वर्ष अमावस्येला कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२५ वर्ष पूर्ण होत आहेत.
“चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||”
महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे’, असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्गाता `वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. “द्वादशमासै: संवत्सर:” असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का ? याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक कारणे आहेत.
नैसर्गिक :-
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक :-
या दिवशी
अ. श्रीरामांनी वालीचा वध केला तो हाच दिवस.
आ. सत्ययुगाचा प्रारंभ झाला तो हाच दिवस.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला. या दिवसापासूनच `शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
ई. इंद्राने वृत्रासूरावर विजय मिळवला तोच हा दिवस.
उ. श्री विष्णूने मत्स्यावतार घेतला तोच हा दिवस ( स्मृती कौस्तुभ ग्रंथात याचा उल्लेख आहे.)
सृष्टीची निर्मिती :-
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल.
गुढी उभारण्याची पद्धत :-
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
आंब्याच्या पानांचे महत्त्व:-
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व:-
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्तीत ईश्वराकडून येणार्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
गुढी उभारण्यामागची वैज्ञानिक किरणे :
१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात?
तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते.
तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे! गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.
तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.
कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणार्या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्या शिव-शक्तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.
तांब्याचे तोंड जमिनीच्या दिशेला असूनही उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींची गती ही उसळणार्या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते.
गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.
श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो. याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात.
सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -‘ब्रह्मध्वजाय नम:|’ असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे.
☺️ गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील ‘मी कोणीतरी फार मोठा आहे,’ हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.
गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.
गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो. म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा ! यावरून लक्षात येते की, सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
गुडीपाडवा हा सण आधी पासून सुरु आहे याचा आणखी एक पुरावा म्हणजेच खालील चोखामेळांचा अभंग
“टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥”
विसर्जन:-
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करुन गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
अ. गुढीची पूजा करताना करावयाची प्रार्थना : “हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे”.
हीच आपल्याचरणी प्रार्थना !!
आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना :
“हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्या चरणी प्रार्थना!!
अशा रीतीने आपण येत्या वर्षात प्रत्येक सण समजून आणि उमजून साजरा करू म्हणजे देश विघातक आणि धर्म विघातक शक्तींचे मनसुबे पूर्णत्वास जाणार नाहीत.
जगातील सर्वात प्राचीन आणि विज्ञानाधिष्ठित धर्मात जन्म मिळाल्याबद्दल आपण त्या परमनियतीचे निरंतर ऋणी असायला हवे आणि याचा सार्थ अभिमान (दुराभिमान नव्हे!)
बाळगायला हवा. चला आपण सर्व सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करू.
फाल्गुनाचा उल्लास सरला की उन्हाची काहिली सुरू होते. आसमंत तापत जातं. सावली हवीहवीशी वाटायला लागते. सूर्याच्या झळा जीव नकोसा करून टाकतात. माठाचे पाणी प्यायलो तरी तहान भागत नाही. हाश्शहुश्शचे चित्कार उमटायला लागतात. घामाच्या धारा टिपल्या जातात, तरीही पुन्हापुन्हा येणाऱ्या. वाऱ्याची मंद झुळूक सुखावणारी वाटू लागणारी. वळवाचा पाऊस गारांसह आला तर तोही हवाहवासा.
चैत्र पालवी नुकतीच झाडांच्या फांद्यांवर फूटु पाहणारी. लाल पिवळे कोंब उलून येणारे. शिशिरात झडून गेलेला पालापाचोळा नवं रुप घेऊन अवतरण्याच्या तयारीत. नूतन वर्षाचा प्रारंभ बरंच काही नवीन नवीन घडवत होणारा. चैतन्याचा स्त्रोत खळाळणारा. उत्सवाचं गाणं गुणगुणण्याचे निसर्गाने ठरवलेलं. निसर्ग बेलगाम. स्वत:ची श्रीमंती मुक्तपणे उधळण्यास आतुर असलेला. शिशिराची कात टाकून नवीन कलेवर धारण करून नूतन संवत्सराचे आगमन साजरे करणारा. एक मनस्वी कलाकार.
निसर्गाचे यौवनात पदार्पण झाले की मनुष्यही त्यापासून वेगळा राहू शकत नाही. तोही वसंताच्या आगमनाचे स्वागतच करतो. चैत्री पाडव्याला गुढी उभारून नव्या युगाला कवेत घेण्यास उत्सुक होतो. निसर्गाने भरभरून दिलेले धान खळ्यावरून दारी आलेले. केलेली मेहनत फळाला आलेली. दोन पाच कवड्या हाताशी येणार याची चाहूल सुखावणारी. कोठारे उतू गेली की समाधानाची लकेर डोळ्यात चमकणारी. मुलीला उजवायचं असतं. घरच्या लक्ष्मीसाठी थोडंथोडकं का होईना हिरण्य घ्यायचं असतं. तिचा राबता हात सोन्याच्या कंकणांनी सुशोभित करायचा असतो. तिलाही समाधानाचे दोन क्षण गवसून द्यायचे असतात. मग बहावा फुलतो. सोनेरी स्वप्नांच्या राशी घेऊन.
तप्त उन्हाच्या झळा शमविण्यासाठीच जणू मोगरा उमलतो. शुभ्र व गंधित. आसमंत दरवळून सोडणारा. हातात घेतला तर त्याचा गंध हातांनाही आपलेसे करणारा. वेडावून टाकणारा. अल्प काळासाठी का होईना आपलं अस्तित्व जाणवून देणारा. तयाचा वेलू गेला गगनावरी असं ज्ञानरायांनाही भूरळ घालणारा मोगरा. कधी देवादिकांच्या शिरी स्थानापन्न होणारा वा रमणींच्या केशकलापात विसावणारा. पाकळ्या पाकळ्यांतून ताजेपणाचे विभ्रम सादर करणारा. वसंता बरोबर ग्रीष्मातही टिकून राहणारा मोगरा. एक शीतल व सुगंधित शिडकाव्याचे मूर्तिमंत स्वरूप. त्या निळ्या आभाळातील किमयागाराचे कसे मानू आभार!!
मोगरा तसा एकटा नसतो सोबत रातराणीला ही त्याने आणलेलं. चैत्र वैशाखाच्या वणव्यात पामर मानवाला हळुवारपणाचा दिलासा देण्यासाठीच ही योजना परमेश्वराने केली असावी. रात्रभर फुलून येणारी रातराणी लावीन वेड जीवा या स्वप्नातल्या कळ्यांसह सोबत देत राहते.
पळस फुलांचा केशरी बहर ओसरू लागला की गुलमोहोर आपले रक्तवर्णी रूप घेऊन उभा ठाकतो. फांदीफांदीवर आपल्या जखमा घेऊन आलेला. चिरंतन काळापासूनच्या वेदना उघड करणारा. आतापर्यंत जपून ठेवलेली ठसठस फांदीफांदीतून व्यक्त करणारा. कुठून कसा मोकळा होऊ या घालमेलीत एक अख्खं वेदनांचे झाडच उभे ठाकलेले. तप्त ग्रीष्मातच फुलून येण्याचं प्राक्तन. दुपारची उन्हे सरली की पायाशी सडा ओल्या जखमांचा. सगळंच दुखणं रितं करून टाकण्याचे जणू ठरवलेले त्याने आणि त्यासाठी निवड केली ग्रीष्माचीच. होरपळलेल्या क्षणांचा ही बहर होऊ द्यावा ही संकल्पना तडीस नेणारा गुलमोहोर. एक घायाळ रूतणारं, खुपणारं काव्य.
उन्हाचे दिवस तापू लागले की अवघं जग थंडाव्यासाठी आसुसलेलं. उन्हाच्या झळा वाहू लागल्या की कडूनिंबाची सावलीही गोड वाटू लागते. अंमळ विसाव्यासाठीचे हक्काचे ठिकाण. घटकाभर विश्रांति घेतली की तजेलपणा घेऊनच कडूनिंबाच्या सावलीतून बाहेर पडावं. चैत्र पालवीचे वैभव मिरवत पांथस्थांना गारवा देण्याचे पुण्यकर्म गाठी बांधणारा कडूनिंब आपला सखाच.
हेमंताच्या गारठ्यात आलेली आम्रमंजिरी आता फळाला आलेली. कच्या कैरीचं पन्हं तहान शांतवणारं. पुढे रसाळ आंब्याची चाहूल देणारं. ग्रीष्मातच येणारे करवंद, जांभळे, आंबटगोड असणारी गारसेल चिंच, पिवळे धम्मक रायण, रसरशीत ताडगोळे व पांढरे जांबू, निसर्ग काही कमी करत नाही. कमी पडू देत नाही. तो आपला देतच असतो. किती घेशील दो कराने ही आपली अवस्था. ऋतुचक्राचे हे तप्त पर्व आपणास सुखावह जावो. ऋतु चक्रातील प्रत्येक घटक महत्वाचा आणि म्हणूनच छोट्याशा अबोलीचा विसर पडू नये. छोटी नाजूक अबोली फुलास येते जेव्हा इतर फुलांचा बहर ओसरू लागतो. तेव्हा तिचीही दखल घ्यायलाच हवी. नाही का? आणि हो, दिवसभर उन्हाची काहिली सहन केल्यावर गारवा अनुभवून देणारी, कसा विसर पडेल तिचा? तिच चैत्र यामिनी…
वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम् कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.
कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है..अन् मन, सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… अशा एक ना दोन अनेक जादू घडत गेल्या आणि या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले… फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं ,रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये…, वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…
खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा, वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…
ऋतू वसंत तुम
अपनेही रंग सो
पी ढुंढन मै
निकसी घर सो
ऋतू बसंत तुम..
जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…
सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश,पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!
आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार,उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा..असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं..जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग,गंध,रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील..हीच तर वसंताची जादू आहे..वसंत म्हणजे सकारात्मकता.वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन..वसंत येतो, दवांत न्हातो… दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे मंथर गाणे गातो..कधी फुलात हसतो,वनी लगडतो, झऱ्यांत झुळझुळ वाहतो..तर कधी गंध कोवळा माखून घेऊन आभाळी पसरतो..कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो..एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो..मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला..तेव्हा आठवतं, ‘गगन सदन तेजोमय’ …तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..
एक एप्रिल ही तारीख आपण गमतीशीर रित्या घेतो.ह्या दिवशी “अशी ही बनवाबनवी”करायला अधिकृतपणे मान्यता असते अशी समजूत आहे.
माझ्या लेखी एक एप्रिल ही तारीख खूपसा-या वैविध्यपूर्ण महत्त्वाच्या घटनांमुळे विशेष आहे.एक एप्रिल हा दिवस रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार ह्यांचा जन्मदिवस, रिझर्व्ह बँकेची स्थापना,भारतीय लष्कराची स्थापना , डॉ.आंबेडकर ह्यांना भारतरत्न, गुगलने जीमेल ही ईपत्रलेखनासाठी काढलेली प्रणाली इ.महत्वपूर्ण घटनांसाठी प्रसिद्ध आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”म्हंटला की डोळ्यांसमोर चटकन येतं ते त्यांच शिस्तबद्ध वागणं आणि देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मदतीची गरज असतांना गाजावाजा न करता तत्परतेनं संघातील स्वयंसेवकांचं धावून जाणं आणि ती मदत सातत्याने गरज असेपर्यंत, संकटनिवारण होईपर्यंत उस्फुर्तपणे गरजूंपर्यंत पोहोचविणं.
खरचं कुठून आले असतील हे सद्गुण प्रत्येक स्वयंसेवकांमध्ये ?,अभ्यासपूर्ण बघितलं की लक्षात येत ज्याचं बीज सकसं असतं,मूळं कणखरं, खंबीर असतात तो वृक्ष हा बहरणारचं,निकोप राहणारचं.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार,भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक.डॉ. चा जन्म 1 एप्रिल 1889 चा.तिथीने चैत्रशुद्ध प्रतिपदेचा.
व्यक्ती जेव्हा इतक्या मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोहोचते तेव्हा ही वाटचाल करतांना तिच्यातील सदगुणांची पोटली हळूहळू उलगडू लागते
त्यांच्यातील सच्चे नेतृत्व, त्याग,सेवा, समर्पित भावना, दूरदर्शी विचार, शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ जीवनकार्य शैली ह्यांचा परिचय आपल्याला त्यांचे जीवन जाणून घेतांना होतो.
डॉ. हेडगेवार ह्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी अथक प्रयत्न,भगव्या ध्वजाप्रती निस्सीम प्रेम,गुरूं बद्दल आदर,गुरुदक्षिणेबद्दलची जरा वेगळी संकल्पना दैनंदिन शाखा आणि संस्थेतील पारंपरिक अध्यक्ष, संचालक मंडळ ह्या पदांना फाटा ही काही ठळक वैशिष्ट्ये.
कोणासाठी आपण जेव्हा मनापासून कामं करतो तेव्हा सतत त्या संस्थेच्या उत्कर्षाचाच मनात विचार,ध्यास आणि काळजी असते.डॉ. चे पण तसेच आपल्या पश्चात ह्या संघाची धुरा उत्तमप्रकारेच सांभाळली जावी हाच विचार मनात घोळत असल्याने त्यांनी आपल्या स्वतःसारखेच तालमीत तयार झालेले निःस्पृह,व्रतस्थ गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस,भैय्याजी दाणी यांच्यासारखे कुशल संघटक अनुयायी पुढील धुरा यशस्वीपणे सांभाळण्यासाठी मनोमन नियोजीत केले.
सतत हिंदुत्वाच्या उन्नतीसाठी च्मा ध्येयाने पछाडलेल्या डॉ. नी तब्बल पंधरा वीस वर्षे द़ौरे, बैठका ह्यामुळे फिरस्तीवर काढलेत.प्रकृती अस्वास्थ्यामुळे 21 जून 1940 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही कर्मयोगी आपल्या कर्तृत्वाने पुढील कित्येक पिढ्यांपुढे आपला आदर्श ठेवून जातात. अशा महान.विभूतींपुढे खरोखरीच.नतमस्तक. व्हायला होतं.
अश्याच प्रकारे आपल्या देशाला लाभलेले डॉ. आंबेडकर हे ही एक बुद्धिमान सुपुत्र.आजच्याच तारखेत ह्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
आजच्याच दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.थोडक्यात म्हणजे बँकाची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक .1 एप्रिल 1935 ला कलकत्ता येथे रिझर्व्ह बँकेची सुरवात झाली. देशपातळीवरील संस्थांना आर्थिक शिस्त लावण्याचे काम रिझर्व्ह बँक करते.भारतीय चलनीनोटांची गरजेनुसार छपाई, भारताची गंगाजळी म्हणजेच आर्थिक बाजू सांभाळणे
सगळ्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थावर देखरेख ठेवणे,अशी अनेक कामे रिझर्व्ह बँकेची आहेत.
आज आपण ज्यांच्या भरवशावर निर्धास्त राहू शकतो,सुरक्षितता, स्वतंत्रता उपभोगू शकतो अशा भारतीय लष्कराच्या स्थापनेचा दिवस.आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा गौरवाचा दिवस.
आधुनिक युगात प्रगतशील व्हायचे असेल तर परंपरेला जपून, सांभाळून आधुनिक तंत्रज्ञानाची कास ही धरावीच लागते.आज एक एप्रिल गुगलने आजच्या दिवशी जीमेल ही ईपत्रलेखनासाठी नवीन प्रणाली सुरू केली आणि आज तर आपले रोजच्या कामकाजात ह्याशिवाय पान देखील हालत नाही.
अशा सगळ्या थोर व्यक्ती, मोठ्या महान घटना आठवल्या आणि त्या आठवणींना ह्या पोस्ट द्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
(पूर्वसूत्र – अर्थात हे अनुभव जगावेगळे नाहीत. तुमच्यापैकी अनेकांना ते तसे आलेही असतील आणि त्यांना हे वाचायला आवडतीलही. जे नास्तिक असतील त्यांनी निदान हे लिहिण्यासाठी निमित्त झालेल्या माझ्या श्रद्धेमागची निखळ भावना समजून घ्यावी हीच माफक अपेक्षा!)
बालपणातल्या या ‘गोड’ आठवणींच्या दरम्यानच घडलेला एक प्रसंग इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात मी पुस्तकातल्या पिंपळपानासारखा अलगद जपून ठेवलाय!
नृसिंहवाडीला येऊन आम्हाला चार सहा महिने होऊन गेले होते. हे पोस्टिंग म्हणजे दत्तगुरूंवर अपार श्रद्धा असणाऱ्या माझ्या आई-बाबांसाठी न मागता मिळालेल्या वरदानासारखी एक पर्वणीच होती! सरकारी नियमानुसार इथला कमीतकमी तीन वर्षांचा कार्यकाळ अर्थातच त्या दोघांनीही गृहीतच धरला होता. नित्यनेमानं त्यांची दत्तसेवा निर्विघ्नपणे सुरू असताना एक दिवस अचानक सगळ्याच गृहितांना तडे जावेत तसं घडलं. त्यादिवशी बाबांची कोल्हापूरच्या हेडपोस्ट ऑफिसमधे बदली झाल्याची ऑर्डर आली. इथे येऊन सहा महिनेही पूर्ण झालेले नसताना अचानक बदली झाल्याचं बाबांना खूप आश्चर्य वाटलं.पण त्याहीपेक्षा जास्त यापुढे आपण नित्य दत्तदर्शनाला पारखे होणार या कल्पनेने ते कासावीस होऊन गेले.आईची मनोवस्था यापेक्षा वेगळी नव्हतीच. ती ट्रान्स्फर ऑर्डर आली आणि अतिशय समाधानाने आणि प्रसन्न चित्ताने सुरू असणाऱ्या त्या दोघांच्याही रोजच्या कामातला ताल आणि वेग कुठेतरी हरवूनच गेला. एक-दोन दिवस याच अस्वस्थतेत गेले. त्या रात्री ऑफिसमधलं काम संपवून बाबा आत आले आणि घोटभर चहा घेऊन रोजच्यासारखे पालखीला जाण्यासाठी घराबाहेर पडले. आई आमच्या सोबतीसाठी अर्थातच घरीच थांबली होती. खूप उशीर झाला तरी बाबा परत आले नव्हते. बाबांची वाट पहात कंदीलाच्या मंद प्रकाशात आई आम्हाला थोपटत बराच वेळ बसून होती.
खूप उशिरा बाबा परत आले. न बोलता पाय धुवून त्यांनी कोट काढून खुंटीला अडकवला.
“झोपली नाहीस अजून?”
“नाही. तुमचीच वाट पहात होते.दोघांची पानं घेते. या लगेच.”
दोघं जेवायला बसले तरी त्यांचं मन जेवणात नव्हतंच.
“किती उशीर केलात? पालखी संपली तरी तिथेच थांबून राहिला होतात ना?”
“तिथून उठावंसंच वाटेना. मनात खळबळ तर होतीच आणि समोर स्वच्छ वाटही दिसत नव्हती. अखेर शरणागती पत्करली. माझी पोस्टाची नोकरी. बदलीचं काय? कधीही,कुठेही झाली तरी जायला हवंच.पण ती अशी,इतक्या लौकर? अचानक?माझ्या दत्त सेवेत कांहीं कसूर तर झाली नसेल ना?आपला इथला अन्नाचा शेर संपला असं समजून निघून जावं म्हटलं तर पावलंच जड होऊन गेली अशी अवस्था! मग करायचं काय? महाराजांना साकडं घालण्यावाचून पर्यायच नव्हता.मग हात जोडून त्यांना प्रार्थना केली. म्हटलं, “महाराज,माझी नकळत कांही चूक झाली असली तर त्याची एवढी कठोर शिक्षा नका देऊ.माझी बदली झाल्याचं दुःख आहेच. पण आज नाहीतर उद्या कुठेतरी बदली होणारच हेही मला माहीत आहे.एकच कळकळीची विनंती आहे.कांही कारणानं आत्ताच बदली होणार असेल,तर ती कुठेही होऊ दे पण तुमचं नित्यदर्शन चुकणार नाही अशा ठिकाणी होऊ दे. कृपा करुन मला अंतर देऊ नका….’ असं विनवून आलोय.
”’हो पण…आता कोल्हापूरच्या बदलीची आॅर्डर तर आलीय ना? मग आता हे सगळं कसं शक्य आहे?”
“महाराजांनी मनात आणलं तर अशक्य काहीच नाही. त्यांची जी काही आज्ञा असेल ती आपण शिरसावंद्य मानायची. माझ्या हातात फक्त त्यांच्यापुढं गा-हाणं मांडणं एवढंच होतं. मी ते केलं. तुला खरं सांगू?मनोमन मी मघाशी त्यांच्याशी बोललो, मन मोकळं केलं आणि डोक्यावरचं सगळं ओझं उतरल्यासारखं हलकंच वाटलं एकदम “
ते हे बोलले खरे पण कुठल्याही क्षणी आता रिलीव्हर येईल की इथून लगेच चंबूगबाळं आवरून कोल्हापूरला चालू लागायचं या विचाराची बोच कांही केल्या मनातून जात नव्हती. पण आश्चर्य म्हणजे रिलीव्हर आलाच नाही. दोन दिवस उलटून गेल्यानंतर पत्र आलं ते बाबांची कोल्हापूरची बदली रद्द झाल्याचं!आणि त्यासोबत दुसरी ऑर्डर होती ती बाबांची कोल्हापूर ऐवजी कुरूंदवाडला बदली झाल्याची! एखाद्या भीतीदायक स्वप्नातून जाग यावी आणि ती भीतीच नाहीशी व्हावी तशी बाबांची अवस्था झाली.
दत्तमहाराजांचा ‘कृपालोभ’ म्हणजे नेमकं काय याची ती प्रचितीच होती जशीकांही. हे सगळं कसं घडलं याचं उत्तर म्हणजे या मूर्तीमंत चमत्काराच्या आड दडलेलं एक रहस्य होतं! कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणारे एक जी.एस् लिमये होते.माझे बाबाही जी.एस्.लिमयेच. नावातील या साधर्म्यामुळे त्यांची ऑर्डर चुकून बाबांसाठी काढली गेली होती! बाबांची बदली व्हायचा प्रश्नच नव्हता. पण ती करणं मात्र आता क्रमप्राप्त झालं होतं. कारण मूळ ट्रान्स्फर चेनमधला बाबांचा रिलीव्हर नृसिंहवाडीला जॉईन होण्यासाठी आधीच रिलीव्ह झालेला होता.म्हणून मग बाबांची कोल्हापूरची बदली रद्द झाल्याच्या आॅर्डरसोबतच दुसरी ऑर्डर आली ती बाबांची कुरुंदवाडच्या पोस्टात बदली झाल्याची! ती संपूर्ण घटनाच अतर्क्य आणि अनाकलनीय होती! निव्वळ योगायोग म्हणून या घटनेची संभावना होऊच शकत नव्हती. या प्रसंगातल्या प्रत्येक घटनेच्या घटीतामागे नेमका काही एक
कार्यकारणभाव होता आणि बाबांनी तो मनोमन ओळखला होता आणि स्वीकारलाही होता!
“मी महाराजांना शब्द दिलाय. ‘माझी बदली कुठेही होऊ दे पण नित्यदर्शन चुकणार नाही अशा ठिकाणी होऊ दे’ असं मी महाराजांना सांगितलं होतं. त्यांनी माझं गाऱ्हाण ऐकलंय. आता या स्वतःच्या शब्दाला मी बांधील आहे. हे बंधन नाहीय तर मनापासून स्वीकारलेली ही माझी स्वतःचीच बांधिलकी आहे!”
ही बांधिलकी सोबत घेऊनच बाबांनी आपला कुटुंबकबिला कुरूंदवाडला हलवला.तेथून नृसिंहवाडीपर्यंतचं अंतर म्हणाल तर फक्त एक मैलाचं. त्यामुळे रोज दत्तदर्शनाला वाडीला जाणं अशक्य किंवा अवघड तरी कां असावं? निदान तेव्हा बाबांना तरी ते तसं वाटलं नव्हतं.
पण ते वाटलं तेवढं सोपं नाहीय याचं प्रत्यंतर मात्र बाबांना रोज नव्याने येऊ लागलं. तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस हा त्यांची कसोटी पहाणाराच ठरू लागला.कुरुंदवाड पोस्टातल्या कामाची वेळ डबल शिफ्टमधे होती. त्यानुसार सकाळी ७ ते ११ आणि दुपारी २ ते ६ अशी त्यांची ड्युटी असे. कामं जास्त असतील तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय उठता यायचं नाही. त्यामुळे पहिल्या शिफ्टनंतर जेवणासाठी घरी परत यायची वेळ नक्की नसे. तरीही रोज जमेल तेव्हा जमेल तसे ते दत्तदर्शनासाठी वाडीला जात राहिले.तेही केवळ शब्द पाळायचा म्हणून नव्हे तर जाणं राहून गेलं तर त्यांनाच चैन पडणार नव्हती म्हणून! त्यांचा दृढनिश्चय वादातीत होताच आणि आईचीही त्यांना मनापासून साथ होती.तिथल्या साडेतीन वर्षातले पावसाळ्याचे एकूण सोळा महिने तर त्यांची अतिशय कठोर परीक्षाच असे.सकाळची आॅफीसवेळ ७ ते११असली तरी कामाचा ढीग उपसून पोस्टातून जेवायला घरी यायलाच त्यांना दुपारचा एक वाजून जायचा. कसंबसं जेवण उरकून आराम न करता दुपारी दोन वाजताची आॅफीसची वेळ गाठावीच लागे.त्यामुळे जेवण होताच ते घाईघाईने चपला पायात सरकवायचे. त्यामुळे दत्तदर्शन अर्थातच ऑफिस संपवून ते परत आल्यानंतरच. पूर्वी तोवर कोयना धरण नसल्याने पावसाळ्यात पूर ठरलेलाच. पुराचं पाणी घराच्या उंबऱ्याला लागलेलं असायचं. आम्हा मुलांची रात्रीची जेवणं आवरून आईने आम्हाला झोपवलं तरी बाबांचा पत्ता नसायचा.कंदील हातात घेऊन आई दाराजवळ अंधारातच त्यांची वाट पहात ताटकळत उभी रहायची. ते कधी आठ साडेआठला यायचे तर कधी त्याहीपेक्षा उशिरा.उशीर झाला तर ते घरात आत यायचेच नाहीत. बाहेरच्या बाहेरच आईच्या हातातला कंदील घेऊन , तो छत्रीच्या आड कसाबसा सावरत ते वाडीच्या दिशेने अंधारात अदृश्य व्हायचे आणि ते पाहून आईच्या काळजाचा ठोकाच चुकायचा. कारण त्याकाळी घरोघरी वीज आलेली नव्हती, तिथे रस्त्यात दिवे कुठून असायला?फक्त एक मैलाचंच अंतर पण ते पायी चालत जाताना दुतर्फा असणाऱ्या चिंचेच्या वृक्षांमुळे अधिकच काळोख्या भासणाऱ्या अंधारातून आणि रस्त्यावरच्या कमरेएवढ्या पुराच्या पाण्यातून ते अंतर कापावे लागे. असं मैलभर चालून गेल्यावर नदीकाठ यायचा. त्याकाळी आत्तासारखा मधे पूल नव्हता. त्यामुळे तिथून नावेनेच नदी पार करावी लागे. वाडीला जाणाऱ्या नावेच्या शेवटच्या फेरीची वेळ गाठता आली नाही तर वाडीला पोचणंच अशक्य.म्हणून ती वेळ चुकू नये यासाठी बाबा जीवाचा आटापिटा करायचे.
आईच्या हातातला कंदील घेऊन ते निघायचे तेव्हा “तू माझ्यासाठी ताटकळत थांबू नकोस.वेळेवर जेवून घे.आराम कर.” असं ते आईला बजावून जायचे.प्रत्येक वेळी आई ‘हो’ म्हणून होकारार्थी मान हलवायची, पण बाबा थकून परत येण्यापूर्वी तिने चूल पेटवून त्यांच्यासाठी हात पाय धुवायला पाणी तापवून ठेवलेलं असायचं. बाबा गरम पाण्याने हातपाय धुवून घ्यायचे तेव्हा तिने जेवणाची दोन पानं वाढून घेतलेली असायची. दिवसभराच्या कामामुळे खूप थकून गेलेली असूनसुद्धा ती रोज बाबांसाठी जेवणासाठी थांबायची. केवळ सोय म्हणून एकटी कधीच जेवायची नाही!
या श्रद्धेच्या वाटेवर दत्तसेवेबरोबरच बाबांची अशी सोबत तिने नि:शब्दपणे आणि प्रसन्नचित्ताने केलेली पहातच आम्ही भावंडे लहानाची मोठी होत होतो. खरंतर ‘तो’ आणि मी यांच्यामधल्या अतूट धाग्यानेच माझ्या मनातलं श्रध्देचं भरजरी वस्त्र या अशा वातावरणातच हळूहळू विणलं जात होतं पण मला त्या बालवयात त्याची कल्पना कुठून असायला?
मनात दत्तावरची श्रद्धा मूळ धरू लागल्यानंतरही त्यासोबत बाबांची कर्तव्यकठोरताही मनावर ठसत असायची.नित्यदर्शन विनासायास सहजसुलभ व्हावं,म्हणून पोस्टातल्या कामाच्या ओझ्यापासून सुटका करून घ्यायला त्यांनी कधी खोट्या सबबी सांगून ती कामं टाळली नाहीतच आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधे असणारी पुसटशी सीमारेषाही त्यांनी कधीच ओलांडली तर नाहीच आणि पुसलीही नाही!!
माझ्या मनात ‘तो’ दृढ झाला तो या साऱ्या पार्श्वभूमीवर! अर्थात ही फक्त सुरुवात होती. माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येत रहाणार आहेत याची मला तेव्हा कल्पना कुठून असायला? पण ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास त्याचेच बोट धरुन अगदी निश्चितपणे सुरू झाला होता एवढं खरं!!
☆ एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी
मनात उतरणारी हळवी अक्षरं! निसर्गाशी होणारा संवाद, अक्षरांशी आशयाची होणारी एकतानता, एकरूपता, सुंदर निरागस भावना, तेवढाच सुंदर आशय व त्यांच्या बद्दल मनात असणारी भक्ती, जीवनाचा आस्वाद घेण्याची आतुरता, समरसता, या सगळ्याचा परिपाक म्हणजे कागदावर अवतरलेली अक्षर शारदा! हो, अगदी अ – क्षर शारदा असते. संजीवनी मराठे यांची कविता ही स्वप्नांची निर्मिती असते. तरीही सत्य, संस्कृती, समाज यांच्याशी जोडलेल्या नाळेचं भान असणारी असते. त्यांच्या मते प्रेम हे कधीच, कशालाही अडकाठी बनत नसते, उलट जगण्याला, व्यक्तिमत्व विकासाला, स्वर्गीय चैतन्याचा वेध घेण्याला पोषक व पूरक असते. निसर्गात, चराचरात परमतत्व पाहण्याची दृष्टी त्यांना रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून मिळाली होती. त्यांच्या कवितात जशी सहजता आहे तशी प्रासादिकता पण आहे.
त्यांची आपल्या ओठावर रेंगाळणारी कांही गाणी, सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ कां, या गडे हासू या.
त्यांच्या पुरस्कार प्राप्त ‘बरं का गंआई ‘ ह्या कवितेची कल्पना फार सुंदर आहे. छोटी मुलगी आईला म्हणते, “तू आहेस बेबी, मी आहे आई, हे विसरायचं नाही, झोपताना मात्र तू आई व्हायचं, अंगाई म्हणत थोपटत राह्यचं, दुपारचं काही आठवायचं नाही, बरं का गं आई!”
आज 1एप्रिल, कवियित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतिदिन! त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. त्यांना संगीत हा त्यांच्या आवडीचा विषय घ्यायचा होता, त्यामुळे त्या मुलींच्या शाळेत गेल्या आणि नंतरही त्यांनी SNDT महिला विद्यापीठातून MA पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनात त्या कवियित्री म्हणून सगळ्यांना परिचित झाल्या. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचा ‘काव्य संजीवनी ‘ हा कविता संग्रह प्रसिद्ध केला होता.
पद्मा गोळे त्यांच्या वर्ग मैत्रीण होत्या. दोघींच्या वहीत निदान एकदिवसाआड एक नवीन कविता असायची. ही गोष्ट शिक्षकांनाही माहित असायची त्यामुळं ते ही वर्गात वाचून दाखवायला सांगायचे. कधी कधी गायला सांगायचे.लहानपणा पासून घरून व शाळा कॉलेजातील शिक्षकांकडून कविता लिहिण्याला प्रोत्साहन मिळत गेलं. त्यांच्या कवितांवर काही प्रमाणात भा. रा. तांबे व रविकिरण मंडळातील कवींचा प्रभाव होता. त्यांचे ७ – ८ काव्य संग्रह, बालसाहित्य, लेख संग्रह, गीतांजली हा काव्यानुवाद प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची मुलगी अंजूने परदेशातून त्यांना लिहीलेल्या पत्रांचे संकलन त्यांनी प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘बरं का गं आई’, ‘हसू बाई हसू’ या बालगीतांच्या पुस्तकांना पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने गौरविले आहे.
त्यांचा आवाज चांगला होता व त्यांनी सुरांचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे कविता करताना शब्द आणि सूर एकत्रच यायचे, नि लयीत कविता व्हायची. त्या कविता गाणाऱ्या म्हणूनच प्रसिद्ध होत्या. काव्य वाचनाच्या कार्यक्रमात स्वतःची कविता वाचायला त्यांना आवडायचं नाही. गद्य वाचायचं, पद्य कसं वाचायचं हा त्यांना प्रश्न पडायचा. त्यामुळे कायम त्या सुरात काव्य वाचन –नव्हे गायन करायच्या.
आपल्याला सांगली करांना अभिमान वाटावा अशी गोष्ट मला कळली, ती म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात त्या पतीबरोबर खानापूर – बेळगावी सोडून सांगलीला आल्या होत्या. राम मंदिराजवळ त्यांचा ‘ रामकृपा ‘ नावाचा बंगला होता. काही दिवस त्यांनी सांगलीला शिक्षिका म्हणूनही काम केले.
संजीवनी मराठे यांची आकाशवाणी वर मुलाखत घेतली होती, त्यातील प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरे आहेत. पण मी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडी अधिक माहिती मिळेल अशी त्यांच्या तोंडची वाक्ये देत आहे. त्या म्हणतात, “आयुष्याचं चिंतन केल्यावर त्यातून निघणारं नवनीत म्हणजे कविता! मला जेंव्हा कवितेतला आशय व सूर यांचं ऐक्य लक्षात यायला लागलं तेंव्हा कवितेचं गाणं होणं सोपं झालं. कविता लिहितांना सूर, भाव, शब्दरचना, व स्पष्ट आशय यांचं भान ठेवावं लागतं. जसं फूल आणि सुगंध यांना आपण वेगळे करू शकत नाही, तसंच आयुष्य व कविता तितकेच सत्य आहेत, एकरूप आहेत, त्यांना आपण वेगळे करू शकत नाही. आयुष्य पेलत असतांना त्यातला मतितार्थ सापडतो, तीच कविता असते. कवितेत भाव असतो त्यामुळे मला वृत्तांपेक्षा छंद व जाती आवडतात. स्वप्नांचा बुरखा घ्यायचा आणि त्यातून वास्तवाकडे पहायचं, तीच कविता! माझ्या कवितात प्रेम असतं कारण मला प्रेम आवडतं. प्रेमात देवघेव असते, प्रेम निरपेक्ष असतं. प्रेमात आपण एकमेकांचे असतो. मी लहान मुलांच्या कविता केल्या. कारण मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं लावण्य, निरागसता यात मी गुंतून, हरवून जाते. अलीकडच्या कविता देवाशी, त्या निराकाराशी बोलणाऱ्या आहेत.माझ्यावर संस्कार असे आहेत कि कर्मकांडात गुंतू नये, इतर मार्गांनी त्या देवत्वाशी नतमस्तक व्हावं. आता त्याच्या जवळ जाण्याचा एक ध्यास आहे. त्याच्या दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे. मी कवितेकडेच वळले कारण गद्य लेखनाला तपशीलात जावे लागते आणि मला अजिबात तपशील कळायचे नाहीत आणि कळले तरी जो सांगायचा विषय, आशय आहे तो इतका मोठ्ठा लिहीत बसण्यापेक्षा कवितेतून सांगणं सोपं वाटायचं.”
आत्ता कविता दिनाच्या निमित्ताने आपण त्यांची ‘ मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी ‘ ही कविता वाचली आहेच.
लाघवी, सहज फुलणाऱ्या कल्पना, प्रासादिक शब्द, उपमा, रुपके यांचा मुक्त वापर करून सुंदर कविता करण्याचं , हे त्यांचं कसब या कवितेतून लक्षात येते.अशीच त्यांची आणखी एक सुंदर पण थोडी भावुक कविता —
जायचे असेल जरी, न कळता निघून जा, न कळता निघून जा
फूल फूल हुंगता, चांदण्यात दंगता, देहभान हरपता, खुशाल मज पुढून जा
न कळता निघून जा
केशपाश सोडूनी, त्यात वदन झाकुनी, रुसूनी बैसते तदा, लपत छपत दूर जा
*माझी रेणू कामावली झाली झाली सावली ( माझी रेणुका माऊली… )
*केसरा केसरा जो भी हो
*कंपास आये यू (तू) मुस्कुराए (तुम पास आये…)
*आदिनाथ गुरू सकाळशी जाता (आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा….)
*एक लाजरा साजरा माकडा डुकरा वाणी…
*रात्र काळी घागर काळी याची तर मी पार वाट लावली होती. फार थोडे शब्द बरोबर म्हणत असे.
*आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये तो बाप बन जाये….
*संधिकाली या आशा
*झाली फुले कल्याणची
*स्वर गंगेच्या कथावर्ती
*देवास तुझे फुल वाहायचे
*आज हृदय मामा विशाल झाले
*चिंधी बांधिते द्रौपदी उजव्या बोटाला
*काळ्या मातीत मातीत
ती पण चालते मी पण चालते
आणि हो, सर्व परिचित ज्यांना आपण अगदी लहानपणापासून मुखोदगत म्हणजे तोंडपाठ म्हणतो आणि मोठमोठ्याने टाळ किंवा टाळ्या वाजवून म्हणतो त्या पारंपरिक आरत्या! त्यांच्या समजुतीची कमाल राहिलीच आहे.
अगदी आवडती बाप्पाची आरती…
*सुखकर्ता दुःखकर्ता….
त्यातीलच बरेच शब्द
*ओटी शेंदुराची
*फळीवर वंदना
*दसरा माझा वाट पाहे सदना
*संकष्टी पावावे….
*जय देवी महिषासुर मथिनी
*घालीन पटांगण वंदून शरण…
आणि शेवटची मंत्र पुष्पांजली म्हणजे तर सगळ्या चुकीच्या शब्दांचा उच्चांकच…
तर अशी माझ्या कानसेन असण्याची फजिती. यात कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या बरं का..
फक्त चुकीच्या समजुतीमुळे चुकीचे उच्चार होऊन मूळ अर्थ कसा बदलतो हे सांगायचे होते. आणि हो अशी अजून बरीच गाणी आहेत. यात पूर्वीची काही नाट्यगीते घेतलीच नाहीत. मला तर असे वाटायचे, यातील शब्द कळू नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे.
पण मंडळी वाचताना गंमत वाटली ना? आणि थोडे फार हसूही आले असेल. म्हणजे माझा उद्देश सफल झाला म्हणायचा. आणि हो, आता आपली पण विचारचक्रे चालू झाली असतील आणि असे शब्द धुंडाळायला सुरुवात झाली असेल. हो ना? असे शब्द सापडले की नक्की कळवा वाट बघत आहे.
सहा ऋतूंमधे वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात .दहा दिशांना बहरून टाकत येतो तो हा ऋतुंचा राजा. याच्या आगमनाच्या आधीच निसर्गाच्या सुगंधाच्या रूपाने याची चाहूल लागते .आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.
होळीपासून वाढत चाललेल्या गरमीमध्ये, रखरखाटात झाडे,वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव शोधत असतात.अश्या या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांवर अचानक एके दिवशी कोवळी कोवळी, हिरवीगार पोपटी पालवी फुलते नुसती पालवीच नाही तर पळस रंगाची उधळण करायला लागतो,गुलमोहर फुलतो ,बहावाचे घोस लटकायला लागतात, फुलेही बहरायला लागतात.
दयाळ, कोकीळ, भारद्वाज अश्या पक्षांना वसंत ऋतुत कंठ फुटेल आणि वसंताच्या आगमनाची वर्दी गोड आवाजात द्यायला सुरवात करतील.
या काळात दिवसाचा,उन्हाच्या काहिलीचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान झालेली असते. घामाने शरीराला थकवा, सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असतात, या काळात शारीरिक शक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे, फणस, काजू,कलिंगड, खरबूज करवंदे, जांभूळ,जाम अश्या सगळ्यातून भरभरून देत असते.
‘वसंत’या शब्दातच काही जादू असावी, कारण वसंत नांव असणाऱ्यांनी वसंतऋतुप्रमाणेच आपली आयुष्ये समृध्द केली आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
साहित्यातले वसंत
वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला.
रंगभूमीवरील वसंत
आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी,
संगीतातले वसंत
आपल्या जादुई सुरवटींनी मनामनातले वसंत फुलवले वसंत देसाई,वसंत प्रभू ,वसंत पवार वसंत निनावे,वसंत आजगावकर, वसंत कानेटकर,वसंतकुमार मोहिते आणि वसंत अवसरे असे टोपण नाव घेऊन गाणी लिहिणाऱ्या शान्ता शेळके यांनी.
अशा या ऋतुराज वसंता मुळे कविंना देखील स्फूर्ती येते आणि ते वसंताचा गौरव करताना वेगवेगळी गाणी लिहितात
वसंत ऋतू आला
आला वसंत देही, मज ठाउकेच नाही
उपवनी गात कोकिळा
हृदयी वसंत फुलताना
कुहू कुहू येई साद
साद कोकीळ घालतो कधी वसंत येईल
कोकीळ कुहू कुहू बोले
गा रे कोकिळा गा
मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ कोकिळे मला
ऋतुराज आज वनी आला ऋतुराज आज वनीं आला
बसंत की बहार आयी,
(नाट्क> मंदारमाला)
अजूनही खूप गाणी आहेत चला तर मंडळी आपणही वसंतऋतूचे स्वागत करूया त्याचा.आनंद साजरा करताना म्हणूया