वसंत म्हणजे आनंद. वसंत म्हणजे सृजन, वसंत म्हणजेचैतन्य. फाल्गुनातच वसंतऋतूच्या पाऊल खुणा दिसू लागतात. वसंत ऋतू,साऱ्या ऋतूंचा राजा.तो येतो ते हातात जादूची छडी घेऊनच.
शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गा च्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने, तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार असते. कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते. वसंत राजाच्या स्वागतात दंगहोते.कोकिळ आलापां वरआलाप घेतअसतो.
लालचुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्याचा भाह होतो.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.
आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले, जाई, जुई चमेली, मोगरा, मदनबाण, नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.
* वसंतोत्सव *
सृष्टी लावण्यवती झाली
वसंतोत्सवात अशी रंगली
घालते जणू सुगंधाचे उखाणे.
या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीचीझुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी पांढऱ्या, जांभळ्याआणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्याछटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात.पळस पांगारा फुललेले असतात. बहावातर सोनपिवळी कळ्याफुले लेवून अंगो पांगी डोलतअसतो. वसंत ऋतूचेहक्का चे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी नहातो चैत्रात. कारणफुलांच्या,मोहोरा च्यागोड सुगंधा बरोबर फळातील मधुरसही असतो.म्हणूनच हाखऱ्या अर्थाने मधुमास. वसंतऋतू चैतन्याचा. कुणासाठी काहीतरी करण्याचा. नर पक्षी मादीला आकर्षित करण्याच्या खटपटीत. सुगरण पक्षी आपली कलाघरटी बांधून प्रदर्शित करतात आणि मादीला आकर्षित करतात. काही नर पक्षी गातात, काही नाचतात. इकडंझाडं, वेली फुलोऱ्यात रंगून ऋतूराजा चे स्वागत करण्यात मश्गु लअसतात.साऱ्या सृष्टी तच हालचाली, लगबग.
वसंत ऋतूचे हक्काचे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी न्हातो चैत्रात. कारण फुलांच्या, मोहोराच्या गोड सुगंधा बरोबर फळातील मधुरस ही असतो.म्हणूनच हा मधुमास. निसर्गाचा मधुर आविष्कार.म्हणून तर चैत्र मास “मधुमास” होतो.
त्यातच कालपर्यंत शुकशुकाट असलेल्या झाडांवरलहान, मोठी, सुबक, बेढब, लांबोडकी, गोल घरटी दिसू लागतात.नव्या सृजनाची तयारी. साधारण पणे वसंतोत्सव हा वसंत पंचमी पासून साजरा केला जातो.
… वसंतोत्सव हा सृजनाचा उत्सव. वसंतो त्सव अमर वादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे.
आपण निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. त्यातून ताणतणाव विसरून निर्भेळ सुखाची प्राप्ती होईल.निसर्ग निर्व्याज असतो.त्याला षड्रिपुंचा वारा लागलेला नसतो. तो आपल्याला नवचैतन्य देतो.
मधुकर तोरडमल यांचे ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ हे नाटक बहुतेकांनी पाहिले असेल. पाहिले नसले तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्या नाटकात प्रा बारटक्के यांच्या तोंडी घातलेली ‘ ह हा हि ही… ‘ ची बाराखडी बहुधा सर्वांच्या परिचयाची असेल. व्यवहारात अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांना बोलण्यासाठी पटकन शब्द सापडत नाहीत. अशी माणसे मग ‘ ह हा हि ही ‘ चा आधार घेतात. समोरच्या व्यक्तीला संदर्भाने त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. पण कधी कधी अशा बोलण्यातून भयंकर विनोद वा क्वचित गैरसमजही होऊ शकतो. पु ल देशपांडे, मधुकर तोरडमल, लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखी निरीक्षण चतुर मंडळी लोकांच्या अशा लकबी बरोबर हेरतात आणि खुबीने त्यांचा आपल्या लेखनात वापर करून घेतात. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात तर प्रत्येक पात्रागणिक त्यांनी अशा लकबींचा सुरेख वापर केला आहे. त्यातून त्या पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य तर दिसतेच पण त्यातून निर्माण होणारा विनोद श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतो.
माझ्या संपर्कात अशी काही माणसे आली आहेत की बोलताना त्यांच्या लकबी किंवा विशिष्ट शब्दांची त्यांनी केलेली पुनरावृत्ती माझी नेहमीच करमणूक करून जाते. अर्थात तुमच्याही संपर्कात अशी माणसं आली असतीलच.
माझे एक सहकारी कोणतीही गोष्ट बोलताना नेहमी ‘ नाही ‘ ने सुरुवात करीत असत. ‘ नाही, ते असं नाही. नाही, माझं ऐकून घ्या. नाही ते असं करायचं असतं… ‘ वगैरे. त्यांचीच भाऊबंद असलेली ( नात्याने नाही बरं का, तर बोलण्याच्या लकबीमुळे ) एक ताई आपल्या बोलण्याची सुरुवात ‘ नव्हे ‘ ने करीत असत. कधी कधी बिचाऱ्यांना आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘ नव्हे नव्हे ‘ चा दोन वेळा वापर करावा लागायचा. खरं म्हणजे दोन नकारांचा एक होकार होतो असं म्हणतात. म्हणजे ‘ ते खरं नाही असं नाही ‘ या वाक्यात दोन नकार आले आहेत. त्यांचा अर्थ होकारार्थी होतो. म्हणजे ‘ ते खरं आहे. ‘ पण आमचे हे ‘ नाही नाही ‘ किंवा ‘ नव्हे नव्हे ‘ म्हणणारी मंडळी त्यांच्या मतावर इतकी ठाम असतात की त्यांच्या दोन्ही नकारांचा अर्थ ‘ नाहीच ‘ असा होतो.
हे ‘नाही नाही’ किंवा ‘नव्हे नव्हे’ कसं येत असावं ? प्रत्येक गोष्टीची सुरुवात नकारार्थीच का व्हावी ? एकदा मी कुठेतरी वाचलं होतं की लहानपणी नुकत्याच जन्मलेल्या रडणाऱ्या बाळाला हॉस्पिटलमधली नर्स जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती त्याला हातात घेऊन ‘ नाही नाही ‘ असं म्हणते. मग पुढे आई आणि त्या बाळाला घेणाऱ्या आयाबाया तिचाच कित्ता गिरवतात. त्या रडणाऱ्या बाळाला हातात घेऊन ‘ नाही नाही, असं रडू नाही. ‘ वगैरे चा भडीमार त्या करतात. लहानपणापासून असं ‘ नाही नाही ‘ ऐकण्याची सवय झालेलं ते बाळ आपल्या पुढील आयुष्यात ‘ नन्ना ‘ चा पाढा लावील त्यात नवल ते काय ?
आमचे आणखी एक सहकारी होते. ते वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ होते. ते ‘ नाही नाही ‘ जरी म्हणत नसले तरी त्यांना दुसऱ्याचे बोलणे कसे चुकीचे आहे हे नेहमी सांगण्याची सवय होती. आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली की ‘ प्रश्न तो नाही रे बुवा… ‘ अशी त्यांची सुरुवात असायची. मग तेच म्हणणे ते जरा वेगळ्या शब्दात सांगायचे. चार लोक एकत्र बोलत असले की ते अचानक यायचे आणि एखाद्याला ‘ अरे इकडे ये, तुझ्याशी महत्वाचं काम आहे ‘ असं म्हणून बाजूला घेऊन जायचे. पण खरं तर महत्वाचं काम वगैरे काही नसायचं पण मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
आमच्या नात्यातले एक गृहस्थ चार दोन वाक्ये बोलून झाली की ‘ असं आहे ‘ असं म्हणतात. त्यांच्या बोलण्याचं सार इंग्रजीत सांगायचे झाले तर ‘ Thus far and no further. ‘ म्हणजे हे ‘ असं आहे. मी सांगतो ते फायनल. यापुढे अधिक काही नाही. ( आणि काही असले तरी ते सांगणार नाहीत. हा हा )
आमचे एक प्राध्यापक होते. ते वर्गात शिकवताना दोन चार वाक्ये बोलून झाली की ‘ असो ‘ असं म्हणायचे. मुलांना ते सवयीचे झाले होते. कधी कधी एक दोन वाक्यानंतर त्यांच्या तोडून ‘ असो ‘ बाहेर पडले नाही तर मागील बाकावरून एखादा खोडकर विद्यार्थी हळूच ‘ असो ‘ म्हणायचा. मग सगळा वर्ग हास्याच्या लाटेत बुडून जायचा. ते प्राध्यापकही हे गमतीने घ्यायचे आणि हसण्यात सामील व्हायचे. आणि पुन्हा ‘ असो ‘ म्हणून शिकवायला सुरुवात करायचे.
माझ्या परिचयातील एक गृहस्थ आपण काहीही सांगितलं की ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असे विचारायचे. मग त्यांना पुन्हा ‘ हो ‘ म्हणून सांगावे लागायचे. जसं वर ‘ नाही ‘ ने सुरुवात करण्याचा किस्सा सांगितला आणि त्यामागे नर्सपासून सगळे जबाबदार होते ( खरं तर अशा लोकांना पकडून जाब विचारायला हवा की तुम्ही ‘ नाही नाही ‘ असे का शिकवले ? कोण विचारणार त्यांना ? जाऊ द्या.
हे म्हणणं म्हणजे लग्नानंतर पती पत्नीत वादविवाद झाले तर मध्यस्थ कोण होता किंवा लग्न लावून देणारे गुरुजी कोण होते त्यांना बोलवा असं म्हणण्यासारखं आहे. ) तसंच ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असं विचारण्यामागे त्या व्यक्तीचा संशयी स्वभाव किंवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसणे या मानसिकतेतून आलं असावं. असे सारखे ‘ हो का ‘ विचारणाऱ्यांचे नाव आम्ही खाजगीत ‘ होकायंत्र ‘ ठेवले होते.
अशीच काही व्यक्तींना आपण काही सांगितले तर ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान ‘ अशी म्हणायची सवय असते. त्यांना जरी सांगितले की ‘ अहो, तो अमुक अमुक आजारी होता बरं का ‘ यावर ते आपल्या सवयीने पटकन बोलून जातील, ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान… ‘ आता काय म्हणावे अशा लोकांना ? कोल्हापूर, साताऱ्याकडची मंडळी प्रत्येक वाक्यानंतर समोरच्याला बहुधा ‘ होय ‘ अशी छान तोंडभरून प्रतिक्रिया देतात. सोलापूर, पंढरपूरकडील मंडळी त्याहीपुढे जाऊन ‘ होय की ‘ असं गोड प्रत्युत्तर देतात. हे ‘ होय की ‘ त्यांच्या तोंडून ऐकायलाच मजा वाटते.
काही मंडळींना चार दोन वाक्ये झाली की समोरच्याला, ‘ काय कळले का ? ‘ किंवा ‘ लक्षात आलं का ? ‘ असं विचारण्याची सवय असते. अशी मंडळी या जन्मात नसली तरी पूर्व जन्मात शिक्षक असावी असे माझे पक्के मत आहे. त्यांचेच काही भाऊबंद ‘ माझा मुद्दा लक्षात आला का ? ‘ असे विचारणारी आहेत. कधी कधी तर दोन मित्र फिरायला निघाले असतील तर एखाद्या मित्राला अशी सवय असते की तो आपली बडबड तर करत असतोच पण समोरच्याचे लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे की नाही यासाठी त्याचा हात किंवा खांदा दाबत असतो. माझ्या एका मित्राला अशीच खांदा दाबण्याची सवय आहे. आम्ही फिरायला निघालो की तो बोलत असतो. माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष असले तरी खात्री करून घेण्यासाठी तो माझा खांदा वारंवार दाबत असतो. मग एका बाजूचा खांदा पुरेसा दाबून झाला की मी चालताना बाजू बदलून घेतो मग आपोआपच माझा दुसरा खांदाही दाबला जातो.
काही माणसांना फोनवर बोलताना पाहणे किंवा ऐकणे हाही एक मोठा गमतीदार अनुभव कधी कधी असतो. हास्यसम्राट प्रा दीपक देशपांडे यांनी आपल्या एका कार्यक्रमात अशा बोलण्याचा एक नमुना सादर केला होता. एक व्यक्ती फोनवर बोलत असते. समोरच्या बाजूला कोणी तरी भगिनी असते. हा आपला प्रत्येक वाक्याला, ‘ हा ताई, हो ताई, हो ना ताई ‘ अशी ‘ ताईची ‘ मालिका सुरु ठेवत असतो. काही माणसे फोनवर बोलताना सारखं ‘ बरोबर, खरं आहे ‘ यासारखे शब्द वारंवार उच्चारताना दिसतात तर काही ‘ तेच ना ‘ याची पुनरावृत्ती करतात.
अजून काही मंडळी बोलताना जणू समोरच्या व्यक्तीची परीक्षा पाहतात. त्यांच्या सांगण्याची सुरुवातच अशी असते. ‘ काल काय झालं माहितीये का ? ‘ किंवा ‘ मी आज केलं असेल माहिती आहे का ? ‘ आता समोरच्या व्यक्तीला कसं माहिती असणार की काल काय झालं किंवा तुम्ही आज काय केलं ? मग पुढे अजून ‘ ऐका ना.. ‘ ची पुस्ती असते. आता आपण ऐकतच असतो ( दुसरा पर्याय असतो का ) तर कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला मी फार महत्वाचं सांगतो आहे किंवा सांगते आहे असा आव आणून ‘ हे पहा मी सांगतो. तुम्ही एक काम करा… ‘ अशी सुरुवात करतात. असो मंडळी. तर असे अनेक किस्से आहेत. ‘असो. ‘, ‘ असं आहे बुवा सगळं. ‘ आता तुम्ही एक काम करा. लेख संपत आलाय. तेव्हा वाचणं थांबवा किंवा दुसरं काही वाचा. आणि हसताय ना ? हसत राहा.
फेब्रुवारी महिना हा घरातील लग्नकार्यामुळे खुप जास्त गडबडीत गेला आणि आता मार्च महिना तर कायमच आम्हा बँकर लोकांसाठी धावपळीचाच. मात्र फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याची सुरवात ही भ्रमंती साठी एकदम बेस्ट. ह्या दिवसात गारठा तर कमी होतो पण उन्हाची काहीली सुध्दा सुरू झालेली नसते. त्यामुळे हा मोसम फिरण्यासाठी खासच.
तसही ह्या मोसमामध्ये जरा शहराबाहेर भटकंती करण्याची मजा काही ओरच.मस्त सगळीकडे पळस फुललेला असतो.पळस म्हणजे अफलातून सौंदर्याचे काँम्बीनेशन.त्याचा तो मखमली केशरी रंग, त्या केशरीरंगाला साजेसा शेवाळी हिरवा पर्णसांभार,आणि ह्या सगळ्यांनी बनलेला त्याचा लफ्फेदार तुरा,खरचं वेडं लावतो अक्षरशः. एखादा ह्या फुलांचा गुच्छ खूप सुंदर भासावा आणि लगेच दुस-या गुच्छाकडे नजर टाकावी तो दुसरा त्याहुनही सुंदर भासावा,अशी ही सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करणारा हा पळसाच्या फुलो-याचा आपला फेब्रुवारी, मार्च महिना हा खासच. अमरावती जवळ पोहो-याच्या जंगलात टिमटाळ्याला ह्या केशरी फुलांचे विस्तीर्ण पसरलेले जणू पठारच आहे असे म्हणतात. त्या सौंदर्य स्थळालाही एक दिवस निश्चितच भेट देईनच.पळसाचे नानाविध रंग असतात असे म्हणतात पण ज्याप्रमाणे नानारंगाच्या पैठण्या असल्या तरी पैठणी म्हंटली की डोळ्यासमोर ती जांभळट रंगाची टिपीकल पैठणीच उभी राहते त्याचप्रमाणे पळसाचे फुलं म्हंटले की ते मखमली केशरीच.
अजून जरा गावाबाहेर शेतांच्या बाजूला भटकंती वळवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या बाळकै-या झाडांना लटकून हवेच्या झोताबरोबर हिंदोळे देत आपल्याला खुणावत असतात.बाळकै-या बघितल्या की खूप द्विधा मनस्थिती होते.त्यांचं ते अजून पूर्ण विकसित न झालेलं,पिल्लासारखं, अवखळ रुप आपल्याला त्याला तोडण्यासाठी हात लावण्यापासून दूर खेचतं,तर त्याची किंचीत तुरट,आंबट चव ही जिभेवर रेंगाळायला मोहात टाकते डेरेदार लटपट लागलेल्या आंबट चिंचानी लदलदलेले झाड बघून अगदी दिवसभरलेली पहिलटकरीण वा लेकुरवाळी माहेरवाशीण घरी आल्याचा फील येतो.
खरचं कारमध्ये ड्रायव्हिंग सिटच्या बाजूला बसून, खिडकी उघडी करून अलवार मंद हवेच्या झुळुका अंगावर झेलतं,वा-यामुळे डोळ्यांवर येणाऱ्या अवखळ केसांच्या बटांना दूर सारतं फुललेल्या केशरी पळसाच्या सौंदर्याचे मनमुराद निरीक्षण करणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही हे त्याक्षणी तरी वाटतं.
ह्या सौंदर्याच्या बरोबरीनेच वसंत ऋतू हा प्रेमाचे प्रतीक. कोणाचा व्हँलेटाईन तर कोणाला भारुन टाकणारी वसंतपंचमी ह्याच महिन्यातील.फेब्रुवारी महिना हा आम्हां नोकरदारांसाठी पण जरा आवडता महिना.अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा हा महिना का कोण जाणे पण लौकर आला आणि लौकर गेला असा भासणारा हा मास. ह्या आवडत्या फेब्रुवारी मासाचा,पळसाच्या सौंदर्याचे आणि प्रेमाच्या वसंतपंचमी चे काहीतरी अनोखे नाते मात्र असते.ह्या निमित्ताने मी मागेच केलेली एक रचना खालीलप्रमाणे…
घरात भांडण असत का? होत का? हा वेगळा प्रश्न आहे. भांडण नकोच. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भांडण झालं, तर त्याच स्वरूप सुध्दा बदललं आहे. याला कारण असणारा आणि मिळणारा वेळ.
आजकाल क्रिकेटच्या खेळात जसं टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच असते. तसंच भांडणाचही झाल आहे.
क्रिकेट मॅच कशा वेगवेगळ्या कारणांनी असतात, अगदी एखाद्या स्थानिक नेत्याच्या वाढदिवसापासून वर्ल्ड कप पर्यंत. तसंच करावसं वाटलं, तर भांडणाला कोणतही कारण चालतं, पण वेळेचं बंधन मात्र असत. कारण दोघांनाही कामावर वेळेवर जायचं असतं.
देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे सामने असतात. तशीच भांडणाची कारणं सुध्दा घरगुती, आणि बाहेरची अशी असू शकतात.
आता कारण काय….. अगदी सकाळी दुध ऊतू गेल्यापासून रात्री बाथरुमचा लाईट तसाच राहिला या पर्यंत, किंवा जागा सोडून ठेवलेली टुथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, व आंघोळीनंतर हाॅलमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या टाॅवेल पासून, रात्री पसरवून ठेवलेला पेपर. किंवा जागा दिसेल तिथे ठेवलेला रिमोट. किंवा वागण्यावरून, आपलं वय किती? मुलं मोठी झाली आहेत. चार लोकांत कसं राहिलं पाहिजे? या सारखं कोणतही, छोटं मोठ कारण पण चालतं. कारण कोणतं, आणि आपल्याला वेळ किती, यावर भांडण करायचं का? आणि कसं करायचं? हे ठरतं.
आणि वेळेनुसार हे भांडण टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच सारखं स्वरूप धारण करतं.
सकाळचं भांडण हे टी २० सारखं असतं. थोडक्यात आटपायच. ती डबा करण्याच्या गडबडीत असेल तर माझ्या दृष्टीने तो पावर प्ले असतो. कारण पावर प्ले मध्ये जसं एका ठराविक कक्षेच्या आतच बरेच खेळाडू लागतात. तसंच या काळात ती स्वयंपाक घराच्या कक्षेतच असते. अगदी मनात आलं तरी ती वेळेअभावी स्वयंपाक घराच्या कक्षेबाहेर येत नाही. या काळात मी थोडी रिस्क घेऊन (तोंडाने) फटकेबाजी करुन घेतो. आणि तिची डब्याची तयारी झाली असेल, आणि मी दाढी करत असेल तर…… तर मात्र तिचा पावर प्ले असतो. कारण मी आरशासमोरच्या कक्षेत असतो. आणि ती मनसोक्त फटके मारण्याचा प्रयत्न करते, अगदी क्रिज सोडून बाहेर येत फटके मारतात, तस ती स्वयंपाक घर सोडून बाहेर येत फटकारते. आणि बऱ्याचदा यशस्वी पण होते.
संध्याकाळच असेल तर मात्र वन डे स्टाईल त्यातही डे नाईट असतं. म्हणजे वेळेनुसार संध्याकाळी सुरू झालेलं हे रात्री झोपण्याच्या वेळी पर्यंत चालतं. यात जेवणाच्या वेळी ब्रेक असतो. मग जेऊन ताजेतवाने होऊन परत आपला मोर्चा सांभाळतात.
पण विकेंड, किंवा त्याला जोडून सुट्टी आली तर मात्र ते टेस्ट मॅच सारखं लांबत जात. यात मग काही वेळा कोणीतरी वरचढ ठरल्यामुळे लिड सुध्दा घेतं, मग आपली पडती बाजू पाहून दुसऱ्याला सावध पवित्रा घेत मॅच निर्णायक होण्याऐवजी बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न होतो.
मॅचमध्ये जसे काही उत्साही प्रेक्षक वाजवण्याची साधनं आणतात आणि वाजवत बसतात. तसे प्रेक्षक प्रत्यक्ष भांडणाच्या वेळी नसले तरी आवाजाची भर मिळेल त्या साधनाने पूर्ण करतो. मग यात सोयीनुसार भांड्यांचा आवाज, कटाची दारं वाजवीपेक्षा जोरात लाऊन येणारा आवाज, पाॅलीशची डबी, किंवा ब्रश हे मुद्दाम पाडून केलेला आवाज, मी लावलेल्या रेडिओ चा आवाज यांनी ती थोडीफार भरून निघते.
मॅचमध्ये थर्ड अंपायर असतो. तो निरीक्षण करून कोणाच्या तरी एकाच्या बाजूने निर्णय देतो. पण या अशा आपल्या भांडणात मात्र असा अंपायर नसावा असं दोघांनाही वाटतं. (किती समजूतदार पणा…..)
चित्रपट हे बहुतांश लोकांना आवडत असले तरी त्यामध्ये आवडीनिवडी ह्या भिन्न असतात. काहींना भावनाप्रधान चित्रपट आवडतात तर काहींना वास्तविकता असलेले. काहींना शांत संथ चित्रपट आवडतात तर काहींना दे दणादण हाणामारीचे, काहीं कथेला जास्त महत्त्व देतात तर काहीं गाणे संगीत ह्यांना. तसचं काही लोक कलाकार बघून चित्रपट बघतात तर काही दिग्दर्शक बघून.
मात्र सगळ्यांना आवडतं असलेले चित्रपट कोणते तर एकमताने उत्तर येईल विनोदी चित्रपट. एकतर ह्या चित्रपटांनी मनावरचा ताण नाहीसा होतो,समजून घ्यायला फारशी बुद्धी वापरावी लागत नाही. अर्थातच विनोदी चित्रपटांमध्येही खूप विवीधता आढळते विनोद हा वेगवेगळ्या रसांनी दर्शविता येतो.
14 मार्च ही तारीख तर जणू नियतीने आपल्या कला साहित्य ह्या क्षेत्रावर चांगला घाला घालण्यासाठीच जणू राखीव ठेवली असावी. आजच्या तारखेला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर, मराठी गझलचे बादशहा सुरेश भट व वेगळ्या धर्तीच्या विनोदी चित्रपटाचे बादशहा दादा कोंडके ह्यांचा स्मृतीदिन.
दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. दादा म्हंटले की डोळ्यासमोर येते ती त्यांची लांब नाडा लोंबणारी हापपँन्ट,बंडीवजा ढगळा शर्ट, ती बावळट हसरी मुद्रा. आणि हाच अभिनय आणि वेषभूषा कठीण असूनही बाजी मात्र मारुन जायची. पांढरपेशा वर्गाला दादांच्या जरा अश्लीलते कडे झुकणा-या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण खास आवडीवाल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली.अर्थातच त्यांच्या खास प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काहीच देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला होता.
दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात – दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी सिनेमागृहात शिट्या वाजवत खास चवीने चित्रपट बघत ,त्यावर चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा ‘मायबाप’ होता.
८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.मिलमजुराच्या घरात जन्मलेले मूल ते दादांच चित्रपट क्षेत्रातील योगदान हा प्रवास थक्क करणारा होता.
कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या “खणखणपूरचा राजा” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाचा ‘ मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी द्विअर्थी शब्द वापरून मग जरासा पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.
…१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या “सोंगाड्या ” ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.
त्यांचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे ,एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोटं लावीन तेथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात व सासरचे धोतर. हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले.
…एखाद्याला आपलं मानलं की मग पूर्ण विश्वास त्याच्यावर कसा टाकावा हे दादांकडून शिकावे.त्यामुळेच कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली.त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर – पार्श्वगायनासाठी तर ‘बाळ मोहिते’ प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक ही माणसं वर्षोनुवर्षे जुळल्या गेली होती.
लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.
त्यांचे हिंदी चित्रपट पुढीलप्रमाणे, तेरे मेरे बीच में ; अंधेरी रात में दिया तेरे हात में , खोल दे मेरी जुबान , आगे की सोच .
सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पॉंईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा बोलबाला इतका झाला होता, की खुद्द राज कपूरने ऋषीकपूर ला लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.
१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. ‘पांडू हवालदार’मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते.
परत एकदा करंदीकर, सुरेश भट व दादा कोंडके ह्या कला,साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणा-या ह्या कोहिनूर हि-यांना विनम्र आदरांजली.
काल पेपर वाचत असताना एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. दै. पुण्यनगरीत आलेल्या या लेखाचे शीर्षक होते ‘ इस्रायल हृदयात; पण मराठी रक्तात .’ हा लेख चंद्रशेखर बर्वे यांचा आहे. या लेखात त्यांनी सुरुवातीला असे म्हटले आहे की मराठीला संजीवनी देणारे दोन निर्णय जागतिक पातळीवर घेण्यात आले आहेत. पहिला महत्वाचा निर्णय घेतला तो महाराष्ट्र सरकारने. दहावीपर्यंत मराठी सक्तीची करून. आणि दुसरा निर्णय घेतला गेला तो इस्रायलमध्ये. मराठी भाषा आपल्या व्यवहारात सदैव राहावी याची काळजी महाराष्ट्रापेक्षा जास्त बेने इस्रायल यांना वाटते.
खरं म्हणजे या बातमीवर माझा विश्वास बसला नाही. पेपरमध्ये काहीतरी चुकीचे छापले गेले असावे किंवा वाचताना आपलीच काहीतरी चूक होत असावी असे मला वाटले. पण मग मी काळजीपूर्वक तो लेख वाचत गेलो. आणि जसजसा तो लेख वाचत गेलो, तसतसा आपण भारतीय असल्याचा, त्यातही महाराष्ट्रीयन असल्याचा आणि आपली मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान वाटला . तो आनंद तुमच्यासोबत वाटून घ्यावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.
इस्रायल हे एक चिमुकले राष्ट्र. पण राष्ट्रभक्ती, शौर्य, जाज्वल्य देशाभिमान इथल्या लोकांच्या नसानसात भिनलेला. तसा या राष्ट्राला चार साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ मध्ये इस्रायल स्वतंत्र देश म्हणून खऱ्या अर्थाने आकारास आला. जगाच्या पाठीवरील हा एकमेव ज्यू लोकांचा देश. जेरुसलेम ही या देशाची राजधानी. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठी सुद्धा पवित्र असे हे ठिकाण. होली लँड . या देशातल्या लोकांनी वंशविच्छेदाच्या आणि नरसंहाराच्या भयानक कळा सोसल्या. वंशाने किंवा जन्माने ज्यू म्हणजेच यहुदी असणे हाच काय तो एकमेव या लोकांचा अपराध. इंग्लंड, जर्मनी आणि अरब राष्ट्रांनी या लोकांची ना घरका ना घाटका अशी स्थिती केली होती. डेव्हिड बेन गुरियन या बुद्धिमान, लढवय्या आणि दूरदृष्टी नेत्यामुळे हा भूभाग एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अभिमानाने उभा राहिला
यानंतर जगभरातून हजारो ज्यू आपल्या देशात म्हणजे इस्रायलमध्ये परतू लागले. भारतातून इस्रायलमध्ये परतणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. भारतातून कोचीन, कलकत्ता, गुजरात आदी ठिकाणांहून हे लोक परतले. त्यातही सर्वाधिक संख्या आहे ती महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. या लोकांना तिकडे जाऊन आता जवळपास सात दशके झाली. पण मराठी मातीशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. मराठी संस्कृती आणि भारतीय संस्कृती या लोकांनी टिकवून ठेवली आहे. महाराष्ट्रीयन आणि भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. महिला साडी नेसतात. जे महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत, त्यांच्या घरात मराठी बोलली जाते. ‘ मायबोली ‘ नावाचे मराठी मासिक तेथे गेल्या ३५ वर्षांपासून चालवले जात आहे. तेथील मुलांचे शिक्षण हिब्रू भाषेत होत असल्याने ते हिब्रू भाषा चांगल्या प्रकारे लिहू, वाचू आणि बोलू शकतात. मराठी बोलणे आणि वाचणे त्यांना कठीण जाते. म्हणून या मासिकात हिब्रू भाषेतील सुद्धा काही साहित्य अंतर्भूत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचा उद्देश हा की हिब्रू वाचता वाचता त्या मुलांचे लक्ष मराठीकडे जावे. मराठी साहित्याचे त्यांनी वाचन करावे, मराठीची गोडी त्यांच्यात निर्माण व्हावी.
५० च्या दशकात तेथे गेलेल्या काही ज्यूंनी तेथे चांगली वागणूक मिळत नसल्याने भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पं नेहरूंनी लगेच विमान पाठवून शेकडो ज्यूंना भारतात परत आणले. हे लोक आज भारतीय संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. त्यांची आडनांवेही अस्सल भारतीय आहेत. त्यांचं हे भारतावरचं प्रेम आणि भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ कदापिही तुटणे शक्य नाही. सिनेगॉग हे त्यांचे प्रार्थनास्थळ. दिल्लीतील सिनेगॉगचे धर्मगुरू इझिकल इसहाक मळेकर म्हणतात. ” इस्रायल आमच्या हृदयात आहे ; पण मराठी आमच्या रक्तात आहे. या जगाच्या पाठीवर भारतासारखा दुसरा देश नाही. सहनशीलता, वसुधैव कुटुंबकम , अतिथी देवो भव आणि विश्वची माझे घर असं मानणारा कोणता देश या पृथ्वीतलावर असेल तर तो फक्त भारत होय. ” ( संदर्भ दै पुण्यनगरी दि २/३/२०२० )
नुकताच 4 मार्च हा दिवस सुरक्षा दिन म्हणून साजरा केला गेला. ह्या दिवसापासून एक सप्ताह हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह असतो. ह्या निमित्ताने सुरक्षेचे नियम,ते पाळतांना आपण घ्यायची काळजी,ती काळजी घेतल्यामुळे आपल्याला मिळालेले फायदे ह्या बाबतचे वेगवेगळे फलक चौकाचौकात बघायला मिळतात.
खरतरं सुरक्षा पाळणे ही बाब सप्ताहाशी निगडीत नकोच.हा खरतरं वर्षभर राबविण्याचा उपक्रम. पण आपल्या कडील ही शोकांतिकाच आहे ज्या बाबी दररोज,चोवीस तास पाळल्या गेल्या पाहिजेत त्या महत्त्वाच्या गोष्टींचे सप्ताह किंवा दिवस पाळून औटघटकेचे महत्त्व आणून त्याची बोळवण केली जाते. असो.
मानवी जीवन अनमोल आहे तसेच ते क्षणभंगुर सुध्दा आहे.म्हणून आपणच आपल्या जिवीताची काळजी घेणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे.आपण स्वतः नियमांचे पालन करीत नसू,त्यांचा बेछूट पणे भंग करीत असू तर आपल्याला त्याच्या पायी आलेल्या नुकसानीस दुस-याला जबाबदार धरण्याचा काहीच हक्क नसावा आणि नुकसानभरपाई मागण्याचा पण.
वाहनाचा अनियंत्रित भन्नाट वेग, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणे हे आपण आणि आपणच टाळायला हवे. आपल्या कडील शोकांतिका म्हणजे चुका आधी आपण करायच्या, खापर दुसऱ्याच्या माथी मारायचे आणि मग सरकारला मदतीस वेठीस धरायचे. तेव्हां ह्या गोष्टीची खबरदारी आपणच सुजाण नागरिक म्हणून घ्यायलाच हवी.
जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा ही काही कालावधीसाठी न राहता ती कायमस्वरूपी पाळण्याची आपली प्रत्येकाची आपणहून मानसिकता बनेल तो दिवस खरा आपल्यासाठी आणि देशासाठी सुध्दा सुदिन ठरेल.
☆ सावधान ! शांतता कोर्टात गेली आहे. ..! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
‘पहाटेच्या रम्य आणि शांत वेळी…’ अशा प्रकारची वाक्ये आता बहुधा कथा कादंबऱ्यातूनच वाचायला मिळतील की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते. पहाट किंवा सकाळ ही शांत आणि रम्य राहिल्याचे चित्र आता अभावानेच आढळते. निरनिराळ्या आवाजांनी पहाटेची ही रम्य आणि शांत वेळ प्रदूषित केली आहे. सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांचे आवाज सुरु होतात. काही वाहने लवकर सुरु न झाल्याने त्यांचे मालक अक्सिलेटर वाढवून ती बराच वेळ सुरु ठेवतात. जवळपास असलेल्या काही मंदिर आणि मशिदीवरील भोंगे आरती, प्रार्थना आणि अजान आदी सुरु होतात. तुम्हाला ते ऐकण्याशिवाय काही चॉईस नसतो. पहाटेची शांत वेळ ध्यान करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी उत्तम असते असे म्हणतात. आता अशा या गोंगाटात ध्यान आणि अभ्यास कसा करणार ? सहा साडेसहा वाजेनंतर शाळेत जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा आणि बसचे कर्कश हॉर्न सुरु होतात. मुलांनी तयार राहावे म्हणून ते लांबूनच हॉर्न वाजवत येतात. बऱ्याच वेळा मुलं शाळेसाठी तयार होऊन उभीच असतात, पण यांची हॉर्न वाजवण्याची सवय जात नाही. त्यावर काही टॅक्स नाही आणि त्यांना बोलणारं कोणी नाही. कोणी बोललंच तर तो वाईट ठरतो. मुलं शाळेत गेल्यावर कुठं हुश्श करत बसावं तोवर भाजीवाले, फळवाले, भंगारवाले तयार होऊन येतात. त्यांचेही आवाज तुम्हाला ऐकावेच लागतात. आता तर त्यांनी आपल्या गाड्यांवर आवाज रेकॉर्ड केलेले स्पिकर्स लावले आहेत. त्यामुळे त्यांचा ओरडण्याचा ताण कमी झाला पण जनतेला मात्र ते स्पीकर्सचे आवाज सहन करण्यापलीकडे पर्याय नाही. त्यानंतर नगरपालिकेची घंटा/कचरा गाडी येते. तिच्यावर लावलेल्या स्पीकर्समधून विविध प्रकारच्या गाणीवजा सूचना तुम्हाला ऐकाव्याच लागतात. हे सगळे कमी की काय म्हणून कुणीतरी शेजारी जोरात टीव्ही किंवा रेडिओ लावलेला असतो. काही मंडळी मोबाईलवर गाणी वाजवीत जात असतात. त्याशिवाय रात्रीची झोप आणि पहाटेची शांतता भंग करणारे बेवारशी कुत्र्यांचे आवाज आहेतच. आपण म्हणतो सकाळची रम्य आणि शांत वेळ ! पूर्वी कधी तरी नक्कीच पहाट रम्य आणि शांत असावी त्याशिवाय आमच्या ऋषीमुनींना आणि साहित्यिकांना इतक्या सुंदर सुंदर साहित्यरचना कशा सुचल्या असत्या !
परवाच्या दिवशी एका स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. बरेचसे नातेवाईक त्या दिवशी एकमेकांना बऱ्याच दिवसांनी भेटत होते. खूप दिवसांनी भेटी होत असल्याने बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी त्याच वेळेला एक गाण्यांचा कार्यक्रमही ठेवला होता. एकाच हॉलमध्ये स्टेजवर वधुवर, त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि तिथेच गाणी. गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्याचा आयोजकांचा उद्देश चांगला असेलही, पण तिथे खूप दिवसांनी भेटलेल्या आप्तेष्टाना एकमेकांशी संवाद साधणे देखील कठीण होत होते एवढा गाण्यांचा आवाज मोठा होता. गाणी ऐकण्याच्या मनस्थितीत फारसं कोणी दिसत नव्हतंच. कोणाशी बोलायचं झाल्यास अगदी दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलावं लागत होतं. उपस्थितांनी तशाच वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. त्या कर्कश आवाजातील गाण्यांऐवजी जर मंजुळ आणि हळू आवाजातील सनईचे सूर असते, तर सगळ्यांनाच किती छान वाटलं असतं !
माझ्या घराशेजारीच एक लग्न होते. लग्नाच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. घरापुढेच मंडप टाकण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजेपासून कार्यक्रमस्थळी डीजेला सुरुवात झाली. हळदीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत डीजे सुरु होता. हळदीचा कार्यक्रम पार पडल्यावर डीजे थांबला. मला हायसे वाटले. पण माझा तो आनंद थोडाच वेळ टिकला. जेवणानंतर पुन्हा डीजे सुरु झाला. रात्री वाजेपर्यंत डीजेच्या आवाजात सगळ्यांचे नाचणे झाले. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप, डीजे. आजूबाजूच्या कोणाला त्रास होत असेल याचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी असे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आयोजित करता येणार नाहीत का ? पण आमचे सामाजिक भान सुटत चालले आहे. ‘ इतरांचा काय संबंध ? माझ्याकडे कार्यक्रम आहे ? कोणाला त्रास होत असेल तर मला काय त्याचे ? इतरांकडे कार्यक्रम असतो, तेव्हा ते करतात का असला विचार ? ‘ प्रत्येकजण असा सोयीस्कर स्वतःपुरता विचार करताना दिसतो.
पूर्वी फक्त दिवाळीतच फटाके फोडत असत. हल्ली प्रसंग कोणताही असो, फटाके फोडायचे हे ठरलेले असते. लग्न, मिरवणूक, वाढदिवस, पार्टी, क्रिकेटची मॅच, एखादा विजय किंवा यश साजरे करणे हे फटाके आणि डीजे लावल्याशिवाय होताना दिसत नाही. त्यातूनही बरेचसे बहाद्दर रात्री बारानंतर फटाके फोडून लोकांना त्रास देण्यात आनंद मानणारे आहेत. फक्त कोणी गेल्यानंतर अजून फटाके वाजवण्याची पद्धत सुरु झाली हे नशीब ! ( उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )
एक गमतीदार प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वी एका सुप्रसिद्ध अशा धार्मिक स्थळी गेलो होतो. तिथे दर्शनासाठी निरनिराळ्या राज्यातून लोक आले होते. मंदिरात दर्शनाला जाताना रस्त्यातून एक मिरवणूक जात होती. कोणीतरी एक जवान सैन्यातून निवृत्त झालेला होता. त्याच्या स्वागताचे आणि अभिनंदनाचे पोस्टर्सही सगळीकडे लावले होते. एका उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक सुरु होती. त्या गाडीच्या पुढे कर्कश आवाजात डीजे लावलेला होता. त्यापुढे त्या मिरवणुकीत सामील झालेले बरेचसे स्त्रीपुरुष बेभान होऊन नाचत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो जवान सैन्यातून निवृत्त झाला होता, तो आणि त्याची पत्नी त्या जीपवर त्या गाण्यांच्या तालावर वेडेवाकडे नाचत होते. कदाचित त्या सगळ्यांसाठी तो आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असेलही पण मंदिरासमोर असलेल्या छोटया रस्त्यावरून ही मिरवणूक जात असल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. कोण बोलणार ? देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल मला प्रचंड आदर आणि अभिमान आहे. देशात शांतता राहावी म्हणून सीमेवर हे सैनिक जीवाची बाजू लावून लढत असतात. पण हे दृश्य पाहून मला खरोखरच वाईट वाटले.
प्रश्न असा पडतो की आपल्याला खरोखरच शांतता नकोशी झालीय का ? आम्ही गोंगाटप्रिय झालो आहोत का ? इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे ‘ Speech is silver, silence is gold. ‘ या वाक्याचा अर्थ असा की व्यर्थ बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ आहे. शांततेचे मोल करता येणार नाही. मानवासहित सर्वच सजीवांच्या निकोप आणि आरोग्यदायी जीवनासाठी शांतता अतिशय महत्वाची आहे. आम्ही आज शाळांमध्ये पर्यावरण हा विषय शिकवतो. त्यामध्ये हवा, ध्वनी, जल इ. प्रकारच्या प्रदूषणांबद्दल शिकतो, बोलतो. पण प्रत्यक्ष आचरणात ते किती आणतो ? ती नुसतीच पोपटपंची राहते. रात्री उशिरापर्यंत डीजे, फटाके वाजवू नयेत असे कायदे आहेत. पण जोपर्यंत त्यांची कडक अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत त्यांचा काही उपयोग नाही. अर्थात नुसते कायदे करूनही उपयोग होत नाही. त्यासाठी समाजजागृती व्हावी लागते. आपल्या अशा वागण्याने इतरांना त्रास होऊ शकतो, ही भावना ज्या दिवशी आमच्या मनात निर्माण होईल, तो सुदीन म्हणायचा. विजय तेंडुलकरांचे ‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘ हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. कोर्टात हवी असणारी शांतता आम्हाला प्रत्यक्ष जीवनातही हवी आहे. ती जर मिळणार नसेल तर एक दिवस शांतता सुद्धा रुसून कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही.
हा प्रसंग महाभारताच्या युध्दासारखा होता असं नाही. पण आपल्याच माणसांविरुध्द युद्ध करायचं हे अर्जुनाला पटत नव्हतं. आणि माझंही तसंच झालं होतं. विजय मिळणार याची खात्री अर्जुनाला होती. तरीही तो खूष नव्हता. आणि आपल्याला विजय मिळवणार नाही याची खात्री मला होती. म्हणूनही कदाचित मी नाखूष असेन. कारण… कारण समोर लढायला बायकोच होती. आणि तिच मला तु जिंकशील फक्त लढायला तयार हो असा सल्ला देत होती. शत्रु दिलदार असावा, हे बायकोकडे बघितल्यावर समजतं. खरंच ती दिलदार (शत्रु) असते.
लढायचं होतं ते बायकोने घातलेल्या नियम आणि अटिंविरुध्द. आता मी अटी मान्य केल्याशिवाय ती नियम सांगणार नव्हती. आणि नियम सांगितलेच तर ते पाळायची अट होती. इकडे आड आणि तिकडे विहीर…… या पध्दतीने मी इकडे नियम आणि तिकडे अटी या मध्ये अडकलो होतो. अटीतटीची परिस्थिती होती.
मी युद्ध न करता हार मानली तरीही काही नियम व अटी मान्य करण्याचा तह मला करावा लागणार होता. आणि हा तह कदाचित तहहयात सुरू राहिला असता.
माझा आळस झटकण्यासाठी, व वाढलेले पोट आटोक्यात आणण्यासाठी आहेत असा मुलामा त्या नियम व अटींना लावण्यात आला होता.
नियम पहिला… रोज सकाळी न चुकता सहा वाजता उठायचच. अट अशी होती की मी उठल्यावर सुध्दा बायकोला मात्र उठवायचं नाही.
नियम दुसरा… सकाळी उठल्यावर जिना उतरून खाली जायचं आणि दुध आणायचं. (कशाला हौसेने आठव्या मजल्यावर फ्लॅट घेतला असं वाटलं) लिफ्ट ने जायचं नाही. येतांना लिफ्ट वापरली तर चालेल. (कदाचित माझ्या व्यवस्थित पणामुळे दुधाची पिशवी पडून फुटेल का? असा विचार असावा) अट आपलं दुध आपणच आणायचं. पाचव्या मजल्यापर्यंत जाऊन अरे येतांना माझंही घेऊन ये असं मित्राला सांगायचं नाही. त्यांच्याकडे सुध्दा असेच नियम व अटी आहेत, त्यामुळे ते भेटू शकतात.
नियम तिसरा… कोणीही पहिल्यांदा उठलं तरी (नियमानुसार मीच पहिल्यांदा उठणं अपेक्षित होतं) चहा मात्र मीच करायचा. अट अशी की बायको उठल्याशिवाय चहा करायचा नाही. कारण तिला ताजा, आणि गरम चहा लागतो. नंतर गरम केलेल्या चहाला ताज्या चहाची चव नसते. आणि तो प्यायल्याचं समाधान पण नसतं. असं तिचं म्हणणं.
आता चहा मी करणार याचंच काय ते तिला समाधान. बाकी पदरी पडलं पवित्र झालं हिच भावना. कारण चहाची चव. असो.
स्वयंपाक घरातली अगणित आणि न संपणारी कामं तिला असतात म्हणून चहा माझ्याकडे. (तो प्यायल्यावर काम करायला उत्साह वाटला पाहिजे हि अट (कळ) होतीच.)
जीना उतरायचं, चालत जाऊन भाजी आणायचं समजू शकतो. पण मी चहा करण्याचा आणि पोट कमी होण्याचा काय संबंध? माझा (हळू आवाजात) प्रश्न.
चहा साखरेच्या डब्यांची आणि भांड्यांची जागा बदलली आहे. खाली वाकल्याशिवाय डबे आणि टाचा व हात उंच केल्याशिवाय भांड हाताला लागणार नाही. कपबशांच्या जागेचा विचार सुरू आहे. थोडक्यात समर्पक उत्तर.
सगळा गनिमी कावा ठरल्यामुळे भांडणात काही अर्थ नव्हता.
नियम चौथा… आठवड्याची भाजी आणून ठेवायची नाही. रोज एक आणि ताजी भाजी कोपऱ्यापर्यंत चालत जाऊन आणायची. अट फक्त भाजी आणायची मधे सुटे पैसे घेण्याच्या कारणाने पानाच्या दुकानात थांबायची गरज नाही. भाजीवाले देखील सुटे पैसे ठेवतात.
नियम पाचवा… स्वयंपाक घरात विनाकारण लुडबुड करायची नाही. तुम्ही आणलेली भाजीच घरात होते. काय केलं आहेस हे विचारायच नाही हा नियम. आणि अट अशी की घरातली भाजी आनंदाने खायची.
चेहरा वाकडा करुन काही बदलत नसतं हे लक्षात ठेवा. माझा अनुभव आहे. नाहीतर कधीच आणि बरंच काही बदललं असतं. पण आता ते कधीच बदलणार नाही. (हे सत्य परिस्थितीवर केलेलं दमदार भाष्य ऐकून माझा चेहरा पाहण्यासारखा झाला असावा.) पुढे मी मुद्दाम वाकड्यात शिरलो नाही.
नियम सहावा… बाहेर जाण्यासाठी कपाटातून कारण नसतांना दोन चार ड्रेस बाहेर काढायचे नाहीत. आणि अट बाहेर काढलेल्या ड्रेस पैकीच एक बऱ्यापैकी असणारा (मॅचिंग पाहून. उगाच खाली पॅंट आणि वर शर्ट असं घातलं की झालं हि वृत्ती नको) घालावा. नाहीतर कपाटातून दोन चार ड्रेस काढायचे, पण घालायचा मात्र दारामागे लटकवलेला. हे चालणार नाही. नंतर आवराआवरी करायला तुम्ही येत नाही. आणि आता माझ्याकडून ही जास्तीची कामं होणार नाही.
नियम सातवा… भाजी, दुध आणतांना गुडघेदुखी ची तक्रार वारंवार बोलून दाखवायची नाही. अट जर तक्रार करायचीच असेल तर गुडघ्याबरोबरच आम्हाला डोकंपण दिलं आहे हे लक्षात ठेवा. ते दोन्ही दुखतात. तुमचा सुर कायम तुमच्या गुडघेदुखी बद्दल असतो. (यावेळी डोक्याचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळला होता.) त्यामुळे भान ठेऊन आमच्या पण तक्रारी तक्रार न करता ऐकाव्या लागतील. आम्हाला काही सोळावं लागलेलं नाही. (कितवं लागलं आहे आहे?…… हे विचारण्याच्या मोह मी आवरला…….)
लग्नात सप्तपदी वेळी काही वचनं असतात. त्यावेळी कदाचित विधीचा एक भाग म्हणून ती दिली असतील. पण आता या सप्तपदी सारख्याच सात नियम व अटी होत्या. आणि पावला पावलावर त्या वचनाप्रमाणे वदवून घेतल्या जात होत्या. यालाच विधिलिखित म्हणावं का……
अजूनही आहेत. पण नंतरचा नियम असा आहे, की बातम्यांसारखे नियम सांगत बसायचे नाहीत. ते गोपनीय आहेत. आणि गोपनीयतेची अट पाळायची आहे.
गुलजार! शब्दांचा बादशहा, कल्पनातीत कल्पनांचा जादूगार, हरएक रंगांचे गुलाब फुलवून त्यांची बागच शारदेच्या पायी वाहण्याची मनिषा बाळगणारा – गुलजार! त्यांनी किती समर्पक नांव निवडलंय स्वतःसाठी! त्यांचं खरं नांव संपूर्णसिंह कालरा. पंजाब मधील दीना या गावी १८ऑगस्ट १९३६ मध्ये त्यांचा जन्म झाला. हा भाग आता पाकिस्तान मध्ये आहे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसरला स्थायिक झाले. काम शोधण्यासाठी प्रथम त्यांचा मोठा भाऊ मुंबईला आला. नंतर त्याने गुलजार यांना बोलावून घेतले. ते लहान मोठी कामे करू लागले. कविता लिहिण्याची, वाचनाची आवड होतीच. एका गॅरेज मध्ये मेकॅनिक म्हणून काम करीत असताना सचिन देव बर्मन आपली गाडी घेऊन आले होते. त्यावेळी त्यांना हा मेकॅनिक शायर भेटला. त्याने आपल्या कविता बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी यांना वाचून दाखवल्या. आणि बिमल रॉय यांनी ‘ बंदिनी ‘ या चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले. ‘ मोरा गोरा अंग लै ले, मोहे शाम रंग दै दे ‘ हे त्यांचं पहिलं गाणं सगळ्यांना खूप आवडलं आणि ते बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले, मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. हा कल्पनांचा झरा गेली ६-७ दशके अव्याहत वाहतो आहे.
अध्यात्मापासून प्रणय गीतांपर्यंत सर्व विषयांना हात घालणारे रवींद्रनाथ टागोर, शायरी हा आत्मा असणारा गालिब, मीरेची पदे, गीतकार शैलेंद्र आणि पंचमदांचे हास्याचे फुलोरे या सर्वांनी गुलजार यांना भुरळ घातली आणि सारे त्यांचे गुरू बनले. हिंदी व उर्दू वर प्रभुत्व असणाऱ्या या कवीचे प्रेम मात्र बंगालीवर होते, त्याशिवाय खडी बोली, ब्रज भाषा, मारवाडी, हरियाणवी या भाषांतही त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे कित्येक कविता संग्रह, कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘रावीपार ‘ हा त्यांचा कथासंग्रह खूप गाजला. कुसुमाग्रज यांच्या मराठी कवितांचे व टागोरांच्या बंगाली कवितांचे हिंदीत भाषांतर त्यांनी केले. त्यांची मुलगी मेघना १३ वर्षांची होईपर्यंत दर वाढदिवसाला तिच्यासाठी गोष्टी, कविता लिहून त्याचे पुस्तक भेट देत होते.त्यांचे ‘चड्डी पेहेनके फूल खिला हैं ‘ गाणं माहीतच आहे. याशिवाय त्यांनी कित्येक चित्रपटांच्या पटकथा, संवाद लिहिले आहेत, जसे आनंद, गुड्डी, बावर्ची, कोशिश, आँधी, मासूम, रुदाली एकापेक्षा एक सरस!गाणी पण काय, तुझसे नाराज नाही, चिठ्ठी आयी है, इस मोडसे जाते हैं, मेरा कुछ सामान अशी कित्येक गाणी आहेत की त्यातल्या कल्पना भन्नाट आहेत. हळुवार व संवेदनशील कथा, अर्थपूर्ण व आशयघन गाणी हे त्यांचं वैशिष्ट्य ! ‘ मेरे अपने ‘ या चित्रपटापासून ‘ हू तू तू ‘ पर्यंत बऱ्याच चित्रपटांचं दिग्दर्शन, किताबें झांकती हैं बंद अलमारीके शीशोंसे, दिलमें ऐसें ठहर गये हैं गम, आदमी बुलबुला हैं पानीका अशी भावनाप्रधान शायरी! किती आणि काय काय!
कवितांतून ते कधी ईश्र्वराशी गुजगोष्टी करतात, कधी त्याला निरक्षर म्हणतात, कधी त्याचे अस्तित्व नाकारतात. विषय दाहक असो वा कोमल, अतिशय संयमित शब्दात आशय पोहचविण्याचे काम त्यांची कविता करते. आज नव्वदीत सुध्दा त्यांच्या कविता, शायरी तरुणांनाही भावते. कुणीतरी असं म्हटलंय की गुलजार शब्दांच्या चिमटीत काळाला धरून ठेवतात, त्यामुळे त्यांची कोणतीही कविता आजची, कालची व उद्याचीही असते. ते कवितेत प्राण फुंकतात.
नुकताच गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, आणि प्रत्येक भारतीयाला मनापासून आनंद झाला. त्यांच्याबद्दल काय आणि किती लिहायचं असं झालंय. थोडं लिहून कौतुक संपेल असं हे कामच नाही. पण प्रत्येकाला काही लिहावं असं वाटतंय.त्यांना मिळणारा हा सर्वोच्च पुरस्कार असला तरी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे.२००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार,२००४ मधे पद्मभूषण, २०१३ मधे दादासाहेब फाळके पुरस्कार, साधारण २० वेळा फिल्म फेअर, २००९ मधे स्लमडॉग मिलेनियम या चित्रपटातील ‘ जय हो ‘ या गीत लेखनासाठी सर्वश्रेष्ठ ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. इतके पुरस्कार मिळून सुध्दा पाय जमिनीवर असणारा हा अवलिया प्रसिध्दी व ग्लॅमर या पासून कायमच दूर राहिला. स्वतःच्या तत्वांवर जगला. कुणीतरी ऑस्कर घेण्यासाठी कां गेला नाहीत असे विचारल्यावर
मिस्किलपणे म्हणतात, त्यांचा ड्रेस कोड असणारा काळा कोट माझ्याकडे नाही आणि मला काळा कोट देईल असा कोणी माझा वकील मित्रही नाही. जन्माने शीख असणारे गुलजार, लग्न हिंदू स्त्री बरोबर करतात, मीनाकुमारी आजारी पडल्यावर तिचे रोजे करतात. सहज न समजणारा माणूस! कदाचित त्यांच्या तरुणपणी त्यांनी देशाची फाळणी अनुभवली, त्यानंतरचा नरसंहार, कुटुंबाची फरफट डोळ्यांनी पाहिली. नंतर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांचं जुनं घर, ती गल्ली पाहिली म्हणे. त्यांच्या कवितांमधूनही तो ‘ दर्द ‘ डोकावतो. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मनातले हे दुःख शब्दात आले असावे –