मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

वस्तू वस्तू जपून ठेव – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सकाळी सकाळी रेडिओ लावायची जुनी सवय बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या करते. आज गाणे ऐकले शब्द शब्द जपून ठेव एकीकडे काम चालू होते. आणि  इतके अर्थपूर्ण गाणे ऐकत असताना माझ्या मनातील कसे विचार येतात याचे हसू आले. आणि जपून ठेवलेल्या वस्तू आठवायला लागल्या. आणि कुठे कुठे जीव अडकतो याची गंमत वाटली.

परवा सहज कपाट आवरताना जरा पिवळसर पडलेली कॅरीबॅग सापडली. उघडून बघितले तर रेडिओचे लायसन सापडले. आता असे वाटेल हा काय प्रकार आहे? पण पूर्वी ( मी लहान असताना ) रेडिओ साठी परवाना आवश्यक होता. एका वर्षा साठी १/२ रुपये पोस्टात भरून त्या पुस्तकावर तिकीट लावून आणावे लागायचे. आणि घरात टेबल सारखे मोठे रेडिओ असायचे तो नीट ऐकण्यासाठी ३/४ फूट लांबीची व २/३ इंच रुंदीची तांब्याची जाळी असलेली पट्टी घरात लावावी लागायची. आणि छोटा रेडिओ ( ट्रांझिस्टर ) सायकलच्या हॅण्डलला लावून लोक ऐटीत फिरायचे. आणि ज्याच्याकडे लायसन नसेल तो लपवून ट्रांझिस्टर नेत असे.

हे सर्वच रेडिओ मात्र नवनवीन कपडे घालायचे.

त्यात गृहिणीची कलाकुसर व दृष्टी याची जणू परीक्षा व्हायची. काही जणी तर त्यावर स्वहस्ते भरतकाम करायच्या आणि कौतुक मिळवायच्या.

जी सायकल असणे भूषणावह असायचे त्या सायकलला पण लायसन ( परवाना ) लागायचा. त्या साठी वर्षाला १२ रुपये भरावे लागायचे.ते भरले की एक पितळी बिल्ला मिळायचा. तो सायकलच्या मागे किंवा सीटखाली लावला जायचा. आणि हो, तो बिल्ला चोरीला पण जात असे. पोलिस मामा सायकल स्वाराच्या सायकलचे हॅण्डल पकडुन बिल्ला दाखवायला लावायचे. त्या सायकलला मागच्या चाकाजवळ एक मेटल ची बाटली असायची आणि एक पातळ वायर सायकलच्या नळी वरून सरळ पुढे येऊन सायकलचा दिवा ( हेड लाईट ) प्रकाशमान करायची. काय तो थाट असायचा. त्या सायकलचे इतके लाड असायचे की जमेल तितके सजवले जायचे. रोज प्रेमाने अंघोळ घातली जायची. शोभिवंत सीट कव्हर असायचे. कधी कधी त्याला झुरमुळ्या लावल्या जायच्या. सायकलची मूठ पण सजवली जायची. अगदी एखादी मुलगी सजवावी असे वाटायचे. मधून मधून तिचा रंगही बदलला जायचा. आणि हॅण्डल वर एक सुंदर घंटा आगमन वार्ता देण्यासाठी असायची. तिची पण विविध रूपे बघितली आहेत व आवाज ऐकले आहेत. कोणाची सायकल व स्वारी आली आहे हे ती घंटा आपल्या किणकिणत्या, घणघणत्या किंवा ठणठणत्या स्वरात सांगायची.

मग हळूहळू अनेक कंपन्या आल्या आणि सायकलचे स्वरूप बदलत गेले.

सुरुवातीला ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट टि व्ही घेतले होते त्यांना पण लायसन असायचे. नंतर ते बंद झाले. मग टी व्ही सुद्धा नवीन नवीन रुपात आले.

या वस्तूंची प्रगती सांगायची म्हंटले तर प्रत्येकासाठी वेगळे लिहावे लागेल. तर आज या जुन्या वस्तू घरात सापडल्या आणि आपल्या माणसांना सांगावे वाटले.आता या वस्तू अशा आहेत की ठेवल्या तर अडचण आणि फेकल्या तर आठवण मी आपली मधून मधून बाहेर काढते. साफसूफ करते आणि नवीन कॅरीबॅग मध्ये ठेवते. कारण त्यात बालपणीच्या आठवणी आहेत. बाकीच्या आठवणी पुढच्या वेळी बघू..

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आनंद — रन आऊट होण्याचा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “आनंद — रन आऊट होण्याचा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

क्रिकेट समजणाऱ्यांना रन आऊट म्हणजे काय हे सांगायला नको. खरंतर खेळतांना आऊट होण्यात आनंद नसतोच.  या पध्दतीने आऊट होण्याचं दु:ख वेगळच असतं.

पण तरीसुद्धा काहीजण आपल्यापेक्षा समोरच्याला महत्व देत केवळ समोरच्याला चांगली संधी मिळावी, त्या संधीचा त्याने उपयोग करावा, मी पुढच्या वेळी प्रयत्न करेन, पण आज तु मिळालेली संधी सोडू नकोस हां आणि असाच विचार करत काहीवेळा स्वतः असं रन आऊट होण्याचा धोका पत्करतात.

असा स्वतः आऊट होण्याचा धोका परत्करणारे आपले असतात. आणि हे आपले आपल्या रोजच्या खेळात, सतत असतात. मग ते आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहिण, काका, मामा, मावशी, आत्या इ…… थोडक्यात सगळे नातेवाईक आणि मित्र असतात.

थोडक्यात आपलं मोठं होण्यासाठी, आनंदासाठी, भविष्यासाठी, चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे स्वत:हून रन आऊट होण्याचा धोका परत्करणारे जे कोणी असतात त्यांच्यामुळे आपण काही प्रमाणात आपला डाव सावरत आणि साकारत असतो. तो डाव चांगला झाल्यावर ……..

कोणीतरी रन आऊट होण्याचा धोका पत्करून आपला डाव सावरला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

असं आऊट होतांना त्यांनी त्यांचा वेळ, आनंद, आवडणाऱ्या गोष्टी, छंद, काही प्रमाणात सुख, आराम हे स्वत:हून सोडलेलं तर असतंच. पण हे सोडण्यात त्यांना आनंद आणि समाधान असतं. या गोष्टी सोडण्याच्या त्रासात सुध्दा ते एक वेगळा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि वेळोवळी तो आनंद व्यक्त करतात.

आणि याचा उल्लेख ते करत नाहीत. केला तर क्वचित करतात. आणि त्यातही यातून समोरच्याने मिळवलेल्या यशाचा, केलेल्या प्रगतीचा, दाखवलेल्या हिमतीचा, आणि प्रेमाचा आदर या ऊल्लेखात असतो.

अशा पध्दतीने रन आऊट होण्याची संधी जवळपास प्रत्येकाला मिळते. फक्त त्या वेळी आपण रन आऊट व्हायचं का करायचं हे ठरवाव लागतं.

ज्याला हे समजलं आणि उमजलं तो रन आऊट झाल्यानंतर सुध्दा जिंकत असतो………..

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

बदललेली नाती…नात्यांचं नवं स्वरूप

खरं तर मानवाची जसजशी प्रगती होत गेली तशी मनुष्य प्राणी समाजप्रिय प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला.. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नाती गोती हे मनुष्य जीवनाचे अविभाज्य घटक बनले.. रानावनात भटकणारा माणूस वस्ती करून राहू लागला.. वाड्या, वस्त्या, मग गावं, शहरं बनत गेली.. आई वडील, बहिण भाऊ, नवरा , बायको अशी कित्येक नाती जोडली गेली.. पण पूर्वी असलेली नाती प्रगती बरोबरच बदलत गेली.. पितृसत्ताक पद्धती मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत होत पण आज स्त्रियांनी स्वतःला अस सिद्ध केलंय की नात्यांच्या परिभाषा ही आपोआप बदलल्या..पूर्वी घरी वडिलधारी माणसं किंवा बाबा, काका ह्यांना घरात एक वेगळाच दर्जा होता.. त्यांचा धाक कुटुंबावर होता..घरात बाबांचे पाऊल पडताच अख्खं घर शांत होत होत.. अर्थात ती आदरयुक्त भिती होती अस म्हणू शकतो आपण.. हळुहळू कुटुंब व्यवस्था विभक्त होत गेली आणि हे चित्र बदललं..स्त्रिया ही बाहेर पडू लागल्या..मोकळा श्वास घेऊ लागल्या.. जीवनशैली बदलली..डोक्यावरचा पदर खांद्यावर आला,.. आणि पुन्हा एकदा नात्यांची परिभाषा बदलली.. नवऱ्याला हाक मारताना अहो.. जाऊन अरे आलं.. नावाने हाक मारण्याची पद्धत सुरू झाली..अहो बाबा चा अरे बाबा झाला.. नात्यांमधील भिती जाऊन ती जागा मोकळीक आणि स्वतंत्र विचारांनी घेतली.. जिथे तिथे मैत्री चा मुलामा लावून नवीन नाती बहरू लागली.. सासू सुनेचे नातं बदललं.. सुना लेकी झाल्या,.. नणंद भावजय मैत्रिणी.. दिर भाऊ.. जाऊ -बहिण.. अशी नाती जरी तीच असली तरी बघण्याचा दृष्टिकोन बदलला… अर्थात प्रत्येक नात्याचा आधार असतो तो म्हणजे विश्वास.. हा विश्वास डळमळीत झाला की नाती विद्रूप रूप घेतात.. विकृत बनतात..नात कसं असावं तर धरणी च आणि अवकाशाचे आहे तस.. मातीचं पावसाशी आहे तस.. निसर्ग आणि जीव सृष्टीच नात.. ज्यात फक्त देणं आहे.. त्याग आहे समर्पण आहे.. नात कसं असावं तर राधेचं कृष्णाचं होत तसं.. प्रेम, त्याग, समर्पण आणि दृढ विश्वास असलेलं.. नात मिरा माधव सारखं.. ज्यात फक्त त्याग आहे तरी ही प्रेमाने जोडलेलं बंध आहेत.. नातं राम लक्ष्मण सारखं असावं.. एकाने रडलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारं.. नात भरत आणि रामा सारखं असावं जिथे बंधुप्रेम तर आहेच पण त्याग आणि समर्पण जास्त आहे..कुंती पुत्र कर्णा सारखं असावं..ज्यात फक्त हाल अपेष्टा, उपेक्षा असूनही निस्सीम प्रेम आणि त्यागाच प्रतीक असणारं.. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, मायेचा ओलावा, एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती, त्याग, समर्पण, निस्वार्थ असेल तर अशी नाती अजरामर बनतात.. हल्ली मात्र हे चित्र बदलत चाललं आहे.. सोशल मीडियाचा अती वापर.. प्रगतीच्या नावाखाली चाललेले अनेक घोटाळे.. ह्या सगळ्यात बाजी लागते आहे ती नात्यांची.. एकमेकांमध्ये स्पर्धा येणं.. आदर कमी होणं आणि जे नात आहे त्यापेक्षा दुसऱ्याची अपेक्षा लोभ मनात ठेवणं ह्याने नात्यांचं स्वरूपच बदलत  चाललं आहे .. सोशल मीडिया, इंटरनेट ह्या गोष्टींचा अती वापर आणि नात्यांमध्ये येणारा दुरावा  काळजी करण्यासरखा झाला आहे.. काही नाती फक्त समाजासाठी असतात.. फोटो पुरते किंवा असं म्हणू की व्हॉटसअप स्टेटस पुरती मर्यादित राहिलेली असतात.. त्या नात्यांमधल प्रेम विश्वास ह्याला कधीच सुरुंग लागलेला असतो… आणि ही परिस्थिती खरच विचार करायला लावणारी आहे.. शेवटी एवढच म्हणावंस वाटतं की कुठलं ही नातं असुदे ते नात समोरच्या व्यक्तीवर लादलेलं नसावं.. त्याच ओझ नसावं..नात्यांमध्ये स्वतंत्र विचार.. एकमेकांबद्दल आदर.. मायेचा ओलावा.. प्रेम.. आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर सतत आनंद ठेवण्यासाठी चाललेली धडपड असेल तर कुठलेच नातं संपुष्टात येणार नाही.. कुठल्याच नात्याला तडा जाणार नाही… विश्वास हा नात्यांमधला मुख्य दुवा आहे.. आणि जिथे विश्वास, त्याग, समर्पणाची भावना आहे तिथे प्रत्येक नातं म्हणजे शरदाच चांदणं.. मोग-याचा बहर.. आणि मृद्गंधाचा सुगंधा सारखं निर्मळ आणि मोहक आहे ह्यात शंका नाही.. 

नात्यांचे रेशीम बंध असावेत..

बंधन, ओझ नसावं..

गुंतलीच कधी गाठ तर पटकन सैल होणारी असावी..

नात्यांचा बहर हा सिझनल नको..

तर बारमाही फुलणारा असावा…

नुसतच घेण्यात काय मिळवावं..

थोड कधी द्यायला ही शिकावं..

विश्वास आणि त्याग समर्पण

प्रत्येक नात्याच एक सुंदर दर्पण..

एकमेकांना दिलेला वेळ ही अमूल्य भेट आहे..

आदर आणि मायेने फुलणारं नात ग्रेट आहे..

नात्यात बसल्या जरी गाठी..

त्या सोडवण्याची कला ही असावी..

कधी नमत घेऊन तर कधी नमवण्याची ताकत ही असावी..

नातं जपणं एक फॉर्म्यालिटी नसावी..

हृदयातून हृदयापर्यंत पोचणारी मायेची हाक असावी..

नातं नको स्टेटस पुरतं जपलेलं..

नातं असुदे मनातून मनापर्यंत पोहचलेले…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ युगंधरा–स्त्री शक्ती… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ युगंधरा–स्त्री शक्ती ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

युगंधरा स्त्री शक्ती अनादी, अनंत !

किती युगे, किती वर्षे लोटली !  तरी मी आजतागायत आहे, तशीच आहे. कीती उन्हाळे, कीती पावसाळे, कीती ऋतु किती वर्षे, माझ्या पद स्पर्शाने तुडवली गेली, ते  मलाच माहीत ! पण मी आहे  तशीच आहे, तिथंच आहे !

परिवर्तने  बरीच झाली, किती तरी युगे, काळ रात्री शृंगारात  गप्प झाली, पण माझ मूळ रूप  हा स्थायी भाव झाला, आहे आणी तो तसाच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ !

मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच. तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की. माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही !

देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे. संख्याच्या प्रकृती सिद्धांता पासूनच ! त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढेच! मी त्यांचा बऱ्याच वेळा उद्धार केला. आज पण मी च सर्व मानवाचच नाहीतर, सर्व सृष्टीतील

सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु यांचं पण पोषण करतेय ! किंबहुना मीच सृष्टी आहे. जगातील  सर्व घटकावर माझीच नजर असते  !

मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया, तर कोणी आदिशक्ती, तर कोणी प्रकृती  ! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही, बदलणार नाही, हे त्रिवार सत्य.

मी च ती “त्रिगुणात्मक” सृजनशील शक्ती. मी सृष्टी ! मी धरा, मी मेदिनी मी च पृथा !  “मी माता, ”  मी अनेक प्रकारची “माती”  मी स्त्री !, मी प्रजनन करणारी !. पालन, पोषण संगोपन, करणारी ! मी जीवसृष्टीची  निर्माती, मी  

“माता ते मी माती”  पुर्णस्वरूप जगत्रय जननी ! विश्व दर्शन ! देणारी. तमोगुणी असलेतरी, दीप, पणती उजळणारी ज्ञानाची ज्योत !

हो पण माझ्या काही सवयी आहेत, त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते. मी च हट्ट पुरवून घेणार ना ?

कोण नाही हो मी ? ऋतुनुसार माझे रूप पालटले जातात. मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते. माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र, माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही !

मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही. मी च तर करणार ना  साज शृंगार तो माझा निसर्गदत्त अधिकार !  मी अवखळ  कन्या, तरुणी, कल्याणी, प्रेमिका, अभिसरीका, मी भार्या, मी च ती, सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे ! 

मी साज, मी दागिना, नटणे, लाजणे, मुरडणे, नखरा करणे. मनमुरादपणे हौस करून घेणारी.  स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका  उर्वशी हे माझेच पूर्वज ना ! माझेच रूप ना?

मी च “सांख्य तत्वाची” प्रकृती !   जड, अचेतन त्रिगुणात्मक, मोहमयी, गुढ, आगम्य, सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे ! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय !

मी कोण ! अस का वाटत तुम्हाला  ?   मी फुलात, पानात, फळात आहेच की. सुगंधच माझी ओळख.

विविध  रंगाच्या  आकाराची, फुले त्यांचं विविध गंध, वर्ण त्यांची झळाळी, हिरव्यागार झाडात वेलीत, त्यांचं मनमोहक रूप, तरीपण निष्क्रिय !   माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात, कोकिळेच्या कंठात, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, गायीच्या हंबरण्यात, मयुर केकात ! 

आजचे माझे अस्तित्व, काळानुसार  जरी सुधारले असले तरी, मी सगळीकडे आहेच की, माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल परिवर्तनाचाच भाग आहे.

मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे, तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे. अधिक जबाबदारी निसर्गाने घालून दिली.

म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे.

।।  दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी

 अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ।।

।। वारी वारी जन्म मरणा ते वारी

हरी पडलो आता संकट निवारी ।।

अशी आरती करून तुम्ही माझ्या स्त्रीत्वाचा सत्कार आक्ख जग अजुनी करतच की !

अनादी अनंत चार युगे उलटली !  महिला आहे, म्हणुनच जग आहे, हे खरं  !  जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली  ? पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का !  मग आजच नारीचा नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात, कुठला पुरुषार्थ  आला बुवा ?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही, पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती, तेवढी आता नाही ! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

“यात्र  नार्यस्तु पुज्यन्नते रमंते ”   ह्या विधानात सर्व काही आले, व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा. बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे  हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?

हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे, गरज शोधाची जननी ! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थितीच तशी चालुन आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोरा गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागच  चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच ! त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य !

पुर्वीच्या काळात ही परिस्थितीला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला ! आठवा त्या गोष्टी, पिठाची  गिरणी नव्हती हाताने दळणकांडणच काय घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीच धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत होत्या अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती कामात पण स्त्रिया मागे नव्हत्याच ! आता ही नाहीत.

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की, नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या !!!

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा, असो वा कुलदैवत दर्शन, असो  मंगळागौर असो किंवा डोहाळ  जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मानपानच होता. गौरवच  सत्कार  होता ना !  प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना !

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चांनाम्मा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?

काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली. युग नवं परीवर्तन घेऊन आलं. नवं कार्याचा भाग पण बदलला तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे !  पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित आहे का ?

कारण स्पष्टच, चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे, पूर्वीही संघटीत होत्या, नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे ! 

तिच्या अस्मितेची लढाई अजून चालू आहे. प्रत्येक क्षेत्रांत स्त्री आहे, घर कुटुंबा पासून ते सैन्य भरती पर्यंत ! मजल दरमजल करत ती पुढे पुढे जात आहे

अलिकडेच खेडे गावात राहणारी राहीबाई पोपोरे पासून ते कल्पना चावला पर्यंत  !  अशी कित्येक उदाहरणे देता येतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्याअस्मितेवर तिने आघाडी घेतली आहेच. कोणतंही क्षेत्र तिने सोडलं नाही ! तरीपण कैक पटीने ती तीच अस्तिव सिद्ध करत आहे. स्त्री जीन पॅन्ट घालो अगर नऊ वारी सहा वारी साडीत असो, मातृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलीच ना ? गरीब असो वा श्रीमंत, घरात असो वा कार्यालयात तिला मुलाप्रति जिव्हाळा हा तसूभरही कमी झाला आहे का ?

साक्षात भगवान शंकरांनीही पर्वतीकडे भिक्षा मागितलीच ना.

।। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर   प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां देही च पार्वती ।।

बघा हं गम्मत साक्षात भगवान शंकर, पार्वती कडे भिक्षा मागतात !

काय म्हणतात हो ?

अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्यासाठी भिक्षा घाल ! भुकेसाठी ? हो भूक ही नुसती पोटाची नसते बर का ! खर  ज्ञान मिळण्यासाठी ! भूक पण अनेक प्रकारची असतेच की! वैराग्य प्राप्तीसाठी पण !  वैराग्य केव्हा प्राप्त होत ?  तर विश्व दर्शन झाल्यावर. ही झाली देवादिकांची कथा त्यापुढे मानवाचे काय ? स्त्री शक्ती ही कालातीत आहे. असे असूनही तिच्यावरचे बलात्कार, स्त्रिभुण हत्या का थांबत नाहीत ?

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेड्यातील स्त्री जीवन… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

खेड्यातील स्त्री जीवन… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

कुटूंबाचा भक्कम आधार मानली जाणारी खेड्यातील स्त्री ही नोकरी करणार्‍या अथवा शहरी स्त्रीच्या दोन पावले पुढेच असते .आपला देश हा शेतीप्रधान देश मानला जातो. तसे पाहिले तर शेतीविषयक ग्रामीण स्त्रीचे योगदान खुपच अमुल्य आहे. खेड्यातील स्त्री ही जास्त करून आपल्या रानात रमलेली असते.तिच्या कष्टाळू आणि धैर्यवान वृत्तीतून ती आपले घर आणि शेत दोन्ही सावरत असते .खेड्यातून पाहिले तर जास्त करून कुटुंबाचे प्रतिनिधित्व हे त्या कुटुंबातील स्त्रीच करते. कुटुंबाचे पालनपोषण  , तसेच आर्थिक नियोजन या गोष्टी ग्रामीण स्त्री मोठ्या धैर्याने पार पाडते.

खेड्या-पाड्यातून पाहिले तर सरसकट स्त्रीया या शेतावर राबताना दिसतात. यातील बर्‍याचजणी तर दुसर्‍याच्या शेतावर मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. आपल्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना त्या मोठ्या धैर्याने करत असतात. पिकणाऱ्या शेतमालातून  किंवा मोलमजूरीतून, तसेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी मार्गातून पैसा उपलब्ध करून खेड्यातील स्त्री आथिर्क नियोजन करते.   आपल्या कुटुंबाची आर्थिक नियोजनाची घडी ती उत्तम बसवते.

ग्रामीण भागातून निरीक्षण केले तर काही अपवाद ओघळता ग्रामीण स्त्रीच आर्थिक व्यवहार संभाळताना निदर्शनास येते. त्यामुळेच तीआपल्या कुटुंबाचा भक्कम आधार असते. मोठ्या चतुराईने आणि नियोजनबद्ध नेतृत्व यातून ती आपले कुटूंब आर्थिकदृष्टय़ा सुरळीत चालविते. कुटूंबाची काही कारणाने विस्कटलेली घडी  ,सुरळीत करणे हे कौशल्य जणू ग्रामीण स्त्रीच्या अंगी रूळलेले असते. त्यानुसार ती स्वतःला आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व वाहून देते.

खेड्यातील स्त्री ही फक्त कष्टाळूच असते असे नाही. ती प्रेमळ, मनमिळाऊ सुध्दा असते. शेतावर एकत्र राबताना एक भाजी चारचौघीत वाटून खाण्याची तिला सवय झालेली असते. त्यामुळे ग्रामीण स्त्रीमध्ये मदतीचा हात पुढे करण्याची भावना शहरातील स्त्रीयांच्या तुलनेत जास्त असते.  एकमेकींच्या प्रसंगाना, गरजेला उभे रहाण्यास त्या क्षणाचाही विचार करत नाहीत. अनेक सण , उत्सव , सांस्कृतिक कार्यक्रम खेड्यातील स्त्रीया एकत्र येऊन साजरे करतात. यासर्वाचा आनंद देखील घेतात. या सर्वात त्यांचा  सहभाग आणि आनंदाचा वाटा जास्त असतो. हे सर्व त्यांना शेतीवाडीने दिलेले असते. शेतात टोकणी,भांगलण ,सुगी करत असताना  अनेकजणी एकत्र येतात. शेतात राबताना एकमेकींजवळ व्यक्त होतात.एक दुसरीच्या सुख-दुःखाच्या भागीदार होतात. हे सर्व शहरातील स्त्रियाच्या वाट्याला येत नसते. शहरातील स्त्रीचे जीवन एका विशिष्ट चाकोरीतून जाते.तिला घड्याळाकडे पाहून कामे करण्याची सवय झालेली असते. ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा परीघ विस्तृत असतो.  पहाटेला उठून ती आपल्या दैनंदिनीत मग्न होते सकाळपासून ते दिवस मावळेपर्यत तिचे हात रानासी बांधलेले असतात.  आलेल्या संकटाना तोंड देतादेता या तिच्या संघर्षमय जीवनवाटाच तिला खंबीर , साहसी कष्टाळू, चातुर्यवान बनवितात.

खेड्यातील स्त्री कोणत्याच परिस्थितीत आपल्या कुटुंबाची वाताहात होऊन देत नाही. कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या प्रबल ठेवण्यास तिची धडपड असते. ती काटकसर करून आर्थिक नियोजन ठेवते. येणारे सण, उत्सवात मोठेपणाची अवाढव्यता न दाखविता ती आपल्या ऐपतीनुसार सण साजरे करते. यामध्ये ती स्वतः आनंदात रहाते आणि आपल्या कुटुंबालासुध्दा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. आजची ग्रामीण स्त्री ही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा तत्पर झाली आहे. त्यामुळेच खेड्यातील मुले सुध्दा आज उच्चशिक्षित होत आहेत इतकेच नाहीआपल्या मुलीच्या शिक्षणाचा सुध्दा ती सकारात्मक विचार करत असते. अर्थात ग्रामीण स्त्रीदेखिल प्रगतशील वाटचाल करत आहे.  ती आपले कुटूंब एकसंध मायेच्या धाग्यात बांधून ठेवते.

आपले दुःख  ,वेदना  ,येणारी संकटे याचा ग्रामीण स्त्री कधी त्रागा करत नाही. यासगळ्याची घुटकी घेऊन ती जगत असते.  तिला तशा जगण्याची जणू सवय झालेली असते. त्यामुळे येणारी संकटे झेलण्याची क्षमता ग्रामीण स्त्रीमध्ये जास्त असते. तिचा बहुतांश वेळ शेतावर जातो. आपले कुटुंब  ,शेती  ,पाऊस या गोष्टीत ती रमलेली असते. फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी ती शेताच्या बांधावर बसून समाधानात खाते.

कुणास ठाऊक ‘ जागतिक महिला दिन ‘ त्या खेड्यातील,  रानात राबणाऱ्या बाईला  माहित आहे की नाही. तिच्यासाठी प्रत्येक दिवस कष्टाला सोबत घेऊन उगवतो आणि रानासोबत समाधानाने मावळतो. “येणारा प्रत्येक दिवस जी अनेक बुध्दीकौशल्यानी  आपलासा करते , तिच्या कार्यास सलाम असो आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला खुप खुप शुभेच्छा ”

“जागतिक महिला दिनाच्या ” सर्व महिलांना शुभेच्छा

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निरोप… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ निरोप… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

तुला काय आणि कसं सांगू ? मला ना गेले सात-आठ दिवस सारखी हुरहूर लागून राहिलीय. अरे तू आता जाणार ना रे आम्हाला सोडून? खरं तर तू खूप मोठं सत्कार्य करायला निघालायस. आपल्या देशाच्या बॉर्डरचं रक्षण करायला निघालायस. केवढं मोठं जबाबदारीच आणि धाडसाचं काम आहे ना रे! पण तू शूरवीर आहेसच. म्हणूनच तर तुझं नाव रणवीर ठेवलय ना! तू मोठं आणि अवघड काम करायला निघालायस. तरीपण आपली ताटातूट होणार, हा विचारही बेचैन करतोय. सारखं डोळ्यातून पाणी येतय रे. किती लळा लावलायस आम्हाला सगळ्यांना. रोज तुझ्या आवडीचे काही ना काही करते, आणि तू आवडीने खातोयस ना, बरं वाटतंय बघ मला. अरे, रणवीर परवा आपल्याकडे ते बॉस आले होते ना, ते तुला किती काम सांगत होते. आणि खरंच त्यांनी सांगितलेली कामं तू अगदी मनापासून करत होतास. त्यामुळे तुझ्यावर बेहद खुश झालेत ते. तेही  येतील तुझ्याबरोबर कदाचित. खरं तर तुला सांगायची गरज नाहीये. पण तरीही सांगावसं वाटतं ना!

हे बघ ,भारत मातेचे नाव घ्यायचं . ” भारत माता की जय” म्हणायचं .आणि जोरदार आक्रमण करून ,आतंकवाद्यांना चांगलं लोळवायचं .वीरचक्र ,शौर्य चक्र मिळवायचं. आणि तुझं ‘रणवीर ‘ हे नाव सार्थकी करायचं. तुझी शौर्याचे गाथा आम्ही ऐकली ना ,की ऊर भरून येईल आमचा. अभिमान वाटेल तुझा आम्हाला

आता तुला बरोबर काय काय द्यायच बरं? इकड ये जरा. मला ना तुझ्या चेहऱ्यावरून ,पाठीवरून हात फिरवायचाय .  आशीर्वाद देणार आहेत सगळेजण तुला. तू असा गप्प गप्प का रे? तुला पण आता आम्हाला सोडून जाणार, म्हणून कसं तरी वाटतंय का ? आता काही नाही . हसत हसत सगळ्यांशी बोल बघू.

उँ, उँ , उँ, हं ,हं,भुः, भुः, भुःभुः

आमचे स्नेही आचार्य यांनी आपले तीन महिन्यांचे लाब्राडोर जातीचे पिल्लू, देश कार्यासाठी आर्मीच्या डॉग स्कॉड कडे सुपूर्त केले . त्यांची पत्नी श्री रंजनी हिच्या मनातल्या निरोपाच्या प्रेमळ भावभावना.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आईपण पेलताना” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ “आईपण पेलताना…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

तसे पाहिले तर आमच्या पिढीनेही नोकरी, करिअर सांभाळत मुलांना वाढविले.

परंतु मी जेव्हा  माझ्या मध्यमवर्गीय परीघातील पुढची पिढी बघते तेव्हा जीवाची घालमेल होते.

आज स्रीला किती आव्हानांना सामोरे जावे लागते आहे.

केवळ संसाराला हातभार म्हणून अर्थाजन नाही.

तिची करीअर, तिने निवडलेल्या क्षेत्रात तिला ठोस प्रगती करायची आहे.स्वतःला सिद्ध करायचे आहे.त्यामुळे तिचे कामाचे तास वाढले आहेत.९ते५ इतकी मर्यादित कामाची चौकट राहिली नाही.

 

हे सर्व करताना तिचे आईपण ही पेलायचे आहे.

 

सकाळी मुलाला शाळेच्या बस मधे सोडून आले की भरभर आटपून ऑफीसची तयारी.

जेवणाचे डबे,मुलाच्या नाश्त्याचा डबा, संध्याकाळच्या जेवणाची तयारी,सेमिनारची तयारी, मुलांचा अभ्यास,वयस्क आईबाबांची काळजी, त्यांच्या डाॅक्टरच्या अपाॅयन्टमेंट्स आणि बरंच काही.

कधी कधी मनात अपराधीपणाची भावना येते.

‘मी मुलाला त्याच्या वाढत्या वयात पुरेसा वेळ देऊ शकत नाही.’असे शल्य मनाला बोचत होते.

 

मुलाचा अभ्यास इतका वाढलाय.

शिवाय त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पियानोचा क्लास,

क्रिकेट किंवा फुटबॉलचे कोचिंग,स्वीमिंगचा क्लास, वेदिक मॅथ्स आणि बरंच काही…

 

ऑफीसच्या डेड लाईन्स,कधी कामासाठी बाहेरगावी किंवा परदेशात टूरिंग तर कधी वर्क फ्राॅम होम.

कधी मनाला मरगळ येते, खूप गळून गेल्यासारखे वाटते पण उसंत घ्यायला वेळच नसतो.

ब-राच वेळा जोडीदाराचेही टूरिंग चालू असते. त्यामुळे सिंगल पेअरेंटिंग हाताळावे लागते.

माझ्या ओळखीतली बरीच कपल्स मला म्हणतात, काकी, मूल झाल्यावर आमचे आयूष्यच बदलून गेले.

मूल नव्हते तेव्हा आम्ही खूप कुल होतो.

म्हणजे आईपणाचा आनंदही नीट भोगता येत नाही.

 

हल्ली मुली उशीरा मूल होऊन देतात.

माझ्या ओळखीतल्या एका मुलीला वयाच्या ४०व्या वर्षी जुळ्या मुली झाल्या.

तिने त्यांना सांभाळण्यासाठी  जाॅब सोडला.

तिची आईही आता वयस्क, कशी सांभाळणार या वयात जुळ्या मुलींना?

इतक्या उशीरा मूल झाल्याचा आनंद तर झाला परंतु करिअर सुटल्यामुळे डिप्रेशन आले.आईपण लाभणे ही जशी प्रत्येक स्रीची मानसिक व शारीरिक गरज असते

तसेच हल्ली स्वतःची ओळख असणे ही स्रीची मानसिक गरज असते.आता तिच्या जुळ्या मुली 1वर्षाच्या झाल्यावर तिने जाॅब घेतला.होते थोडी तारांबळ, पण करते मॅनेज.

दोघेही तरूण नवरा बायको  हे नोकरीतल्या कामाचा ताण,स्पर्धा ,उच्च राहणीमान व   कर्जाचे हप्ते यामुळे चिडचिडे झालेले असतात.एकमेकांना वेळ देऊ न शकल्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतात.

अगदी प्रेमविवाह असला तरी कधी कधी दोघांचे पेटेनासे होते. अशावेळी आपल्या दोघांतील तणाव मुलाला समजू नये यासाठी स्रीची धडपड चालू असते.एकाच वेळी तिला किती अवधाने सांभाळावी लागतात.

स्री जेव्हा माता बनते तेव्हा तिच्यामुळे तिच्याही नकळत एक शक्तीचा स्रोत निर्माण होतो.

जननी हे शक्तीचे पहिले विकसीत रुप आहे.

आपल्या देशात स्रीचे पूजन हे तिच्यातील मातेचे पूजन असते.कारण मातेमधे एक ईश्वरी अंश आहे असे मानले जाते.

आपण माता यशोदा,जीजामाता अशा अनेक मातांना मानतो कारण त्यांनी आपल्या अपत्यांना घडविले.

त्या असामान्य माता असतील.

पण आमच्या आजच्या पिढीच्या सामान्य माता सुद्धा असामान्य आहेत. किती समर्थपणे त्या आपले आईपण पेलत आहेत.वेळेची कसरत करून,अव्याहत काम करून त्या स्वतःलाही घडवतात व आपल्या मुलांचेही भविष्य घडवत आहेत.शिवाय जिद्दीने परिस्थितीला टक्कर देत आहेत.

मला खरंच खूप कौतुक वाटते आजच्या पिढीतल्या या तरूण मातांचे.

या अशा दोन्ही आघाड्या सांभाळणा-रा स्त्रियांकडे बघण्याचा आपला द्रृष्टिकोन आपण कौतुकाचा असला पाहिजे.तिला पुरणपोळ्या किंवा मोदक बनवता नसतील येत. आलेल्या पाहुण्यांची सरबराई करायला वेळ नसेल.

तरीही ती तिच्या परीने स्वीगी, अमॅझाॅन च्या मदतीने वाढदिवस वगैरे साजरे करते.

तिने कितीही स्वतःला सुपर वुमन बनविण्याचा प्रयत्न केला तरी तिला लिमिटेशन्स येणारच.तेव्हा आपणच आई वडील या नात्याने, शेजारी य नात्याने,समाज म्हणून तिला मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बडबड बडबड – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

बडबड बडबड ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

परिचित शब्द आणि कृती आहे ना? अगदी लहान असल्या पासून म्हणजे शब्दही बोलता येत नसतो तेव्हा पासून सुरु होणारी कृती. भावना शब्दात व्यक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणजे बोलणे. जास्त बोलणे झाले, नकोसे वाटले की त्याची बडबड होते. मग मोठी माणसे म्हणतात कीती टकळी चालू आहे?   आणि बायका जमतात तिथे तर या बडबडीचा उच्चांक असतो. एक असेच हास्य चित्र बघण्यात आले होते. दोन महिलांच्या बोलण्यातून वीज निर्मिती करुन त्यावर रेल्वे चालली आहे असे चित्र होते. यातील अतिशयोक्ती सोडली तर महिला बडबड करतात हे सत्यच आहे. आणि त्याच मुळे त्या मानसिक ताणातून बाहेर पडतात. आणि सर्वात जास्त त्या कोणाशी बोलत असतील? असा विचार आला आणि जरा शोधशोध केली, मैत्रिणींशी चर्चा ( म्हणजे परत बडबडच )  केली. आणि आश्चर्य म्हणजे असे समोर आले, की महिला सर्वात जास्त स्वतःशी बोलतात. आणि  मग स्वतःच स्वतःचे निरीक्षण केले. आणि खूपच गंमत वाटली.

अगदी झोपेतून उठल्या पासून याची सुरुवात होते.

सकाळी उठताना

चला उठा, कामे खोळंबली आहेत. उशीर झाला तर सगळाच उशीर होणार. आयता चहा कोण देणार?  चला चहा करा आणि सगळ्यांना उठवा.

मॉर्निंग वॉकला गेल्यावर

जा बाई जोरात. स्लिम व्हायचे आहे ना. मला काही फरक पडत नाही. मी माझ्याच वेगाने चालणार.

कोणत्याही मीडियावर नवीन लेख दिसला

बरं हिला रोज सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसायला जमते. माझी तर कामेच संपत नाहीत. चला आवरायला हवे.

दुपारी विश्रांतीच्या वेळी

आता जरा पडते. फक्त कोणी यायला नको. आणि कंपनीचा फोनही यायला नको. त्यांना हिच वेळ सापडते. जरा पडले की ऑफरचा फोन करतात.

दुसऱ्याचे स्टेट्स बघून

बरा स्टेट्स बदलायला वेळ मिळतो. कुठे कुठे भटकतात कोण जाणे? आणि असले कपडे या वयात शोभतात का?

दुपारी उठल्यावर

चला आवरायला हवे. आता एकेक जण घरी यायला लागेल. मग त्यांचे चहा पाणी. मी घरीच असते ना, मला काय काम? (असे सगळे म्हणतात. एकदा घरातली कामे करुन बघा, म्हणजे कळेल. ) असे म्हणून सगळीच कामे करावी लागतात.

रात्री झोपताना

झालं एकदाचं आवरुन. कोणी मदत करत नाही. हातावर पाणी पडले की सगळे सोफ्यावर मस्त गप्पा मारत बसणार. आणि मी किचन आवरणार. कधी कधी वाटते तसेच पडू द्यावे. पण तो स्वभाव नाही ना.

मध्यरात्री जाग आल्यावर

अगं बाई आत्ता कुठे तीनच वाजले आहेत. झोपा अजून दोन तास. नाहीतर उठायच्या वेळी झोप लागायची.

अशी जास्तीत जास्त स्वतःशी बडबड चालू असते. इथे थोडीच बडबड दिली आहे. असे अनंत विचार चालू असतात. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, उघडपणे ज्या भावना बोलू शकत नाही त्या मनात बडबड करतो. यात सगळेच असे तक्रार सूर असतात असेही नाही. बरेचदा मी किती नशीबवान आहे. घरातील माणसे माझे कौतुक करतात. नातेवाईक चांगले वागतात, मान देतात. अशीही विधाने असतात. पण ही चांगली विधाने आपण व्यक्त करू शकतो. त्याने कोणाचे मन दुखावले जात नाही. पण तक्रारी, दुखणी, कामे ज्या गोष्टी उघड बोलून कोणी दुखावेल असे वाटते त्याच गोष्टी मनाशी बडबड करतो.

आता मी नाही का मनातली बडबड तुम्हाला सांगितली. कारण तुम्ही सगळी आपली माणसे आहात. माझी ही मनातली बडबड तुम्हाला म्हणून सांगितली. माझी अजून एक गंमत तुम्हाला सांगते. मी ज्यावेळी एकटी वॉकिंग साठी जाते, त्यावेळी अशीच स्वतःशी बडबड करते. आणि गंमत म्हणजे त्यातून एखादी कविता तयार होते. ती विसरु नये म्हणून रस्त्यावरच्या एखाद्या दुकानात जाते आणि तेथून रद्दी पेपर घेऊन त्यावर उतरवते. आणि घरी येऊन डायरीत लिहिते.

तर माझ्या मनातले आज तुम्हाला सांगितले. तुम्ही पण मनातच ठेवा हं!

तुम्हाला म्हणून सांगते. सकाळ पासून लिहायचे म्हणते, पण वेळ कुठे होतोय. शेवटी आज संध्याकाळी फिरायला न जाता लिहिले तेव्हा कुठे हे लिहिता आले.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आमचं…आणि यांच…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “आमचं…आणि यांच…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अर्थातच हे सगळ्या घरांच्या बाबतीत आहे. घरात माझं आणि तुझं असं  नसलं तरी आमचं आणि यांचं यातला फरक बऱ्याचदा बोलण्यात जाणवतो……

आमचं आणि यांचं सारखंच असलं तरी सुद्धा बोलतांना यांचं असतं ते विशेष, खास, त्यात विविधता, नाजूकपणा, कलाकुसर, रंग, डिझाईन, कलात्मक असं सगळं असतं. आणि आमचं मात्र असंच असतं…….. साधं……. सरळ…… सहज…

कपडे आणि दागिने या बाबतीत हे फार जाणवतं. म्हणजे आमचे ते कपडे. यातही शर्ट पॅन्ट, झब्बा लेंगा, फारफार तर सुट. पण यांच्या कपड्यांच्या बाबतीत बोलतांना सुध्दा कोणतीही सुट नसते……

यांची नुसती साडी नसते. तर त्यात शालू, पैठणी, कलकत्ता, सिल्क, महेश्वरी, कांजीवरम असं आणि बरंच काही असतं. परत यात सहावारी आणि नऊवारी असतंच. आणि ते तसंच म्हणावं लागतं. ऊतप्याला मसाला डोसा म्हटल्यावर, किंवा पुलाव ला खिचडी म्हटल्यावर जशा प्रतिक्रिया येतील, तशाच प्रतिक्रिया नऊवारी ला नुसती साडी म्हटल्यावर येऊ शकतात. घरात रोज नेसतो ती आणि तीच साडी. अर्थात रोज नेसली तर. आमचं मात्र घरात काय आणि बाहेर काय? शर्ट पॅन्ट च असतं.

मग आमच कापड अगदी रेमंड, विमल, सियाराम, किंवा कोणतही चांगल्या ब्रॅंडच असलं तरीही शर्ट आणि पँट….. किंवा झब्बा आणि लेंगा…….

यांच्या दागिन्यांचं तसंच…. आमची ती फक्त चेन. पण यांच कोल्हापूरी साज, मोहनमाळ, चपलाहार, नुसत्या मोत्यांची असली तरी ती माळ नाही. तर सर….. आणि परत याची सर काही औरच असते….

आम्ही आमच्या गळ्यातल्या चेन कडे चेन म्हणूनच पाहतो. पण यांच गळ्यातलं मंगळसूत्र पाहण्याचं सूत्र काही और असत. ते सुत्र काय? हे एक औरतच सांगू शकेल.

कानाला अडकवणारे आमच्यात कमीच असतात.  पण आमची ती फक्त भिकबाळी. कसं वाटतं नं हे. पण यांचे कानातले खड्यांचे, झुंबर, किंवा रिंग.

आम्ही पीटर इंग्लंड, काॅटनकिंग या सारखा चांगलं नांव असलेला शर्ट घातला तरी तो फक्त शर्टच. पण यांनी खड्यांच काही घातलं की ते मात्र अमेरिकन डायमंड. या दागिन्याला खड्यांचं असं म्हटलं तर काही वेळा खडे बोल ऐकावे लागतात.

आमच्या मनगटावर फक्त घड्याळ किंवा ब्रेसलेट. पण यांच्या मनगटावर काही चढवलं तर ते बांगड्या, पाटल्या, तोडे, कंगन असं वैशिष्ठ्य पूर्ण. परत हे मनगटावर चढवण्याचा यांचा क्रम सुध्दा यांनी ठरवलेला असाच……. यात मागे, मधे, पुढे असंच असतं. शाळेत कशी रांग आणि रांगेची शिस्त असते तसंच…….

आमच्या पोटावर पॅन्ट रहावी म्हणून आम्ही घालतो तो पट्टा. चामड्याचा किंवा कापडाचा. त्याकडे निरखून पाहिलं जाईलच असं नाही. बऱ्याचदा पुढे आलेल्या पोटामुळे तो झाकला जातो. पण यांच्या कमरेचा मात्र कंबरपट्टा तोही चांदी किंवा सोन्याचा. आमच्या पॅंटला अडकवलेलं कि चेन. पण यांचा मात्र छल्ला. मग त्यात किल्ली नसली तरी चालतं.

फुल, गजरा, आणि वेणी यात फरक असतो हे पण माझ्या लक्षात आलं आहे. आणि गजरा की वेणी यापैकी काय घ्यावं याचापण विचार होतो.

बरं हे फक्त कपडे आणि दागिने यांच्याच बाबतीत नाही. खास कार्यक्रमाआधी आमचे केस वाढले तर, कटिंग करा जरा. हेच वाक्य असत. वाक्य कितीवेळा म्हटलं यावर सुर वेगळा असू शकतो. पण यांचे केस नुसते व्यवस्थित करायचे तरी यांना पार्लर आणि त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. किंवा ती बाई घरी येणार. आम्ही मात्र कटिंगच्या दुकानाबाहेर टाकलेल्या लाकडी बाकावर हातात मिळेल तो पेपर वाचायचा.

असं आमचं आणि यांचं………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी!

शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी!

संतांनी वाढविला तो वाण मराठी! आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी!

अशी ही मराठी, आपली मायबोली! महाराष्ट्राची राजमान्य भाषा! गेल्या हजार वर्षात त्यात होणारी स्थित्यंतरं आपण पाहत आहोत. ज्ञानदेवांच्या काळात जी मराठी भाषा वापरली जाई, ती आज वाचताना बऱ्याच शब्दांपाशी आपल्याला अडखळायला होते. अशी ही आपली मराठी  देवनागरी भाषा बाराव्या तेराव्या शतकात समृद्ध होत होती.

एकनाथांनी एकनाथी भागवत, भारुडे लिहिली, त्यामध्ये मराठी भाषेचा उपयोग झाला होता. त्यापूर्वी 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठी भाषा राजमान्य झाली. 1947 नंतर स्वतंत्र भारतात मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली.

कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी प्रमाणित भाषा म्हणून पुस्तकात आपण वाचतो, वापरतो ती असते.. पण दर पाच मैलागणिक भाषा बदलते असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा देश, कोकण, खानदेश, वर्हाड या सर्व भागात बोलली जाणारी मराठी किती विविधता दाखवते ते आपण पाहतो.

महाराष्ट्रातील विविध भागात म्हणजे रत्नागिरी, सांगली, पुणे, धुळे, नागपूर या सर्व ठिकाणी थोडाफार काळ राहिले आहे, त्यामुळे तेथील मराठी भाषा अनुभवली आहे. मिरज- सांगलीच्या मराठी भाषेवर थोडा कर्नाटकातील कानडी भाषेचा टोन येतो. प्रत्येक वाक्यात ‘होय की’ ‘काय की’ या शब्दाचा उपयोग जास्त होतो.

तर कोकण पुणेरी भाषेत’ ‘होय ना, खरे ना’ असा “ना” या शब्दाचा उपयोग दिसतो. खानदेश जवळ असणाऱ्या गुजरात प्रदेशामुळे तेथील मराठी भाषेत गुजराती शब्दांचा उपयोग होतो तर नागपूरच्या वऱ्हाडी भाषेत मध्य प्रदेशातील हिंदी भाषा मिसळली जाते.. भाषेचा प्रवास हा असा चालतो. व्यवहारात बोली भाषेत मराठी जशी बोलतो तशीच लिहितो. भाषा हे माध्यम असते मानवी भावना व्यक्त करण्याचे!

ज्ञानेश्वराने भगवद्गीता संस्कृत मध्ये होती, ती सर्वसामान्यांना कळावी म्हणून त्याकाळी ती प्राकृत मराठीत लिहिली. पण आता जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करतो, तेव्हा पुष्कळ वेळा त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ कळत नाहीत .त्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात.

काळानुरूप देश, भाषा बदलत असते. भाषा आपल्याला ज्ञानामृत देते. लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच मुख्य माध्यम असल्याने, आई प्रथम जे शब्द उच्चारते  तोच त्याच्या भाषेचा मुख्य स्त्रोत असतो. त्यामुळे आपण मातृभाषेला महत्त्व देतो.

मोठे झाल्यावर आपण कितीही भाषा शिकलो, इंग्रजी शिकलो, परदेशातील भाषा शिकलो तरी आपली मातृभाषा आपल्यात इतकी आत पर्यंत रुजलेली असते की, कोणतीही तीव्र भावना प्रकट करताना ओठावर मातृभाषेचे शब्द येतात. सुदैवाने  आपली मराठी इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना कुठेच अडखळायला होत नाही. आपोआपच शब्द ओठावर येतात.

ओष्ठव्य, दंतव्य ,तालव्य,कंठस्थ अक्षरांचे उच्चार आहेत ते आपल्या शरीर मनाशी जणू एकरूप होऊनच येतात.. म्हणूनच मराठी मातेसमान आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या अलंकारांचे सुंदर वर्णन केलेले आहे. मराठी भाषा ही लवचिक आहे. तिचा उच्चार जसा करू तसा तिचा अर्थ बदलतो. वाक्य बोलताना त्यातील ज्या शब्दांवर आपण जोर देऊ त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो .मराठी भाषेचे अलंकार तिची शोभा वाढवतात.शार्दुलविक्रिडीत, अनुप्रास,यमक,रूपक यासारखी वृत्तं भाषेचे अलंकार आहेत. त्यांचा उपयोग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी होतो. अशी ही मराठी आपल्याला मातेसमान आहे, त्या मराठीला आपण जतन करू या, हीच आजच्या मराठी दिनासाठी शुभेच्छा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print