काय करायला हवं होतं?…. काय केलं नाही?…… कोणासाठी केलं?…… असे आणि यांसारखे कितीतरी प्रश्न कानावर आले असतील. नसतील तर या सारखी आनंदाची गोष्ट नाही.
वरच्या अनेक प्रश्नात कधी आपण असे प्रश्न विचारण्याऱ्यांमध्ये असतो. तर कधी ज्यांना प्रश्न विचारले जातात त्यांच्यामध्ये असतो. पण आपण असतोच.
अशा वेळी प्रश्न विचारणारा बऱ्याचदा रागातच असतो. किंवा राग आल्यावरच अशी प्रश्नावली सुरू होते. ज्याला असे प्रश्न विचारले जातात तो देखील रागात असेल तर तिथे सगळं संपतं. आणि सुरू होते ती एक मन अस्वस्थ करणारी शांतता…….. यात कोण चूक कोण बरोबर हा आणखीन एक प्रश्न नंतर असतोच.
पण त्याचवेळी सुरू होतो तो बेरीज वजाबाकीचा खेळ. या खेळात होते ती फक्त चुकांची बेरीज आणि चांगल्या कामाची, वागण्याची नकळत वजाबाकी.
यावेळी उजाळा मिळतो तो फक्त झालेल्या चुकीच्या गोष्टींना. आणि अगदी मागच्या ते अलिकडच्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचला जातो. आणि सगळ्या चुकांची फक्त बेरीज आणि बेरीजच मांडली जाते. हा चुकांच्या बेरजेचा आकडा थोडक्यात उत्तर वाढतच जातं.
आणि चांगल्या गोष्टींची वजाबाकी होते आहे किंवा आपण ती करतोय याची जाणीव रहात नाही. शेवटी चांगल्या कामाचे शून्य फक्त शिल्लक रहात. अगदी काल परवा पर्यंत केलेली चांगली कामं यात मातीमोल ठरतात, किंवा ठरवली जातात.
किंवा त्या चांगल्या कामाची आठवण करून दिली तर……… त्यात काय?…… सगळेच करतात…….. करायलाच पाहिजे…. कर्तव्य आहे ते…… जमत नसेल तरीही जमवाव लागेल…… या प्रकारचीच उत्तर येतात.
असे प्रश्न जिथे जिथे संबंध आहेत, मग ते नात्यातले, मित्रांचे, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्यांचे, शेजारी अशा सगळ्या ठिकाणी होतात. काही वेळा ते योग्य असतील. पण प्रत्येकवेळी ते रास्तच असतील अस नाही. पण त्याचा विचार होत नाही.
या बेरीज वजाबाकीत बऱ्याचदा चुकीच्या कामांच्या बेरीज मध्ये, किंवा चांगल्या कामांच्या वजाबाकीत संबंध दुरावतात. आणि परत एका नात्याची वजाबाकी होते.
अशा प्रसंगी शांतपणे विचार केल्यास खरच लक्षात येइल की आपण चांगल्या कामांची बेरीज आणि चूकांची वजाबाकी केली तर सगळेच नाही पण काही प्रश्न हे प्रश्न न करता सुटतील.
बेरीज आणि वजाबाकी करायचं चिन्ह आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की बेरजेच्या चिन्हासाठी + दोन रेषा लागतात. ज्या परस्परांना मध्यभागी मिळतात. पण वजाबाकीच्या चिन्हात – ती एकटीच असते. त्यामुळे आपण आपसात भेटाव असं वाटलं तर बेरीज करा. आणि एकटच रहायच असेल तर वजाबाकी आहेच.
ज्येष्ठ कवयित्रीबहिणाबाई चौधरी यांच्या या काव्य ओळी किती अर्थ पूर्ण आहेत. सुगरण पक्ष्यांच्या घरट्याचं वर्णन वरील काव्यपंक्तीत बहिणाबाई यांनी केलं आहे. या निसर्गात इवले इवले पक्षी काडी-काडी जोडून,वनस्पतींचेधागे, कापूस असं काही -बाही साहित्य वापरून ही घरटीबांधतात. ही घरटी तर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असंतात असं म्हणावं लागेल. पक्षां पासून प्राण्यांपर्यंत सर्व आपापल्या ताकदीनुसार निवारा निवडतात. माणूस तरी त्याला कसा अपवाद असेल.
माणसे कष्टातून,पै पै साठवून घर बांधतात. अर्थात आपल्या ऐपती प्रमाणे.ज्या घरात आपले मातापिता,भावंडे आजी आजोबा,नातेवाईक असतील ते घर आपले असते. अगदी हक्काचे. कारण या घरात प्रेम आपुलकी, माया,मिळते. घर झोपडी असो वा बंगला….. पण तिथं जर आपलेपणा असेल तरच ते हवंहवंसं वाटतं.
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम, जिव्हाळा
नकोत नुसती नाती
या काव्यपंक्ती किती अर्थपूर्णआहेत. नाती सुध्दा प्रेमानं, मायेनं फुलतात. अशा घरांत आपुलकी असते.
पण सध्या एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते,प्रत्येक जणआपापल्या विश्वात दंगअसतो.इंटरनेटच्या महाजालानं सारं जग आप ल्या मुठीत आलं आहे.पण मनात, नात्यांत दऱ्या निर्माण होत आहेत.
ही आभासी दुनियाच वास्तव आहे असं वाटू लागलंआहे. मुलंआपल्या घरातील आईबाबा आजी आजोबा यांच्यासह वेळ घालवताना दिसतच नाहीत. हातातल्या छोट्या स्क्रीन मध्ये प्रत्येक जण डोकं घालून बसलेला दिसतो.व्हाँटस्अप च्या मेसेज मधूनच हल्ली तिळगुळ, दसऱ्याला सोन्याची देवाणघेवाण होते. कुणाला कुणाशी बोला यला वेळच नाही. आपसा तील संवादच हरपत चालले आहेत. मोबाईल, लँपटाँप वापरणंही गरजे चं आहे ही गोष्ट खरी असली तरी दिवसातील थोडा वेळ जेवण,नाश्ता, सकाळचा चहा यावेळी तरी एकमेकांशी मोकळे पणानं बोललं पाहिजे.
तरच नात्यांची जपणूक होईल आणि भावबंध दृढ होतील. मग आपलं घर *रेशमीघरटं*नक्कीच बनेल.
बरेचदा असे होते आपण सकारात्मक इच्छा करतो. योग्य मेडीटेशन करतो पण पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत.मग आपला विश्वास कमी होत जातो. असे का होते याचा आज आपण विचार करु या.
योग्य परिणाम होण्यासाठी सगळे निसर्ग नियम एकत्रित वापरले पाहिजेत.
आपण जी इच्छा मागतो त्या पासून अलिप्त झाले पाहिजे. इच्छा पूर्तीची मागणी करायची आणि त्या पासून अलिप्त व्हायचे हे परस्पर विरोधी वाटू शकते. पण आपण ज्याच्या मागे लागतो ते पुढे पळते आणि ज्याचा फारसा विचार करत नाही ते अलगद मिळते याचा अनुभव बरेचदा आला असेल. हे कसे होते हे बघू या.
समजा आपण चांगले घर मिळाले आहे अशी इच्छा केली आहे. पण आपण निसर्ग शक्तीकडे इच्छा करुन सोडून देत नाही. नाना शंका डोक्यात येतात.
असे घर मला कसे मिळेल?
लोन मिळेल का?
मी ते फेडू शकेल का?
माझा कडे अजून पैसा येईल का?
अशा नाना शंका मनात घेऊन चिंता करत रहातो. म्हणजेच या इच्छापूर्ती विषयी अनिश्चितता वाटते. अनंत अडथळ्यांचा विचार आपण करतो. आणि हेच आपल्या इच्छापूर्ती मधील अडथळे असतात. हेच अडथळे दूर करायचे असतात.
इच्छापूर्ती होण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
▪️ Self commitment – स्वतःशी वचन बद्धता
मी इच्छा निर्माण करेन पण त्यातील अडथळ्यांचा विचार करणार नाही.अलिप्तता सिद्धांत अंमलात आणणार आहे. ज्या घटना घडणार आहेत त्याचा स्वीकार करणार आहे.कोणतेही लेबल लावणार नाही.
▪️ मी अनिश्चिततेच्या क्षेत्रावर विश्वास ठेवणार आहे.
अनिश्चिततेचे क्षेत्र म्हणजे आपल्या शंका. ही इच्छा पूर्ण होणार की नाही असे वाटणे ही अनिश्चितता आहे.
▪️ मी इच्छेशी निगडित उत्तरे कशी मिळतील याचा विचार करणार नाही.
▪️ मी फक्त इच्छा पूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवणार आहे.
▪️ इच्छापूर्तीचा आनंद घेणार आहे.
हे विचार स्वतःच्या मनाशी करायचे आहेत. आपल्याला सगळ्याची चिंता करायची व स्वतःवर जबाबदारी घेण्याची सवय लागलेली असते.तीच सवय आपल्याला बदलायची आहे. थोडा वेळ लागेल पण प्रयत्न करुन हे बदलू शकतो.
आज पासून आपल्या इच्छापूर्ती मधील अडथळे आपणच दूर करु या.
☆ ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(प्रथम पुरस्कार प्राप्त लेख)
योग शिबिर चालू होते. गुरुजींनी पहिलाच प्रश्न विचारला. आपण आनंदी समाधानी आहात का? दुसरा प्रश्न– पूर्वीचे लोक जास्त सुखी होते की, आताचे जास्त सुखी आहेत? विचार सुरू झाले. खरंच भौतिक प्रगती इतकी झाली. कष्ट कमी झाले. तरीही पूर्वीचा माणूस जास्त सुखी होता. अशी उत्तरे आली .का बरं असं असेल?
आज समाजाचं चित्र पाहिलं तर, अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येक जण ताण-तणावात जगतोय असं दिसतं. नुसत्याच बाह्य उपचारांनी आणि पाश्चात्य वैद्यक शास्त्राच्या उपायांनी सुद्धा खरं आरोग्य राखता येत नाही. त्यासाठी आपली जीवनदृष्टी आणि जीवनशैली बदलायला हवी. ही गोष्ट आता पाश्चात्यांनाही कळून चुकली आहे. त्यामुळे ते लोक आता भारतीय अध्यात्म योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत . मग ही योग साधना काय आहे बरं? उपनिषदांमध्ये तसेच भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात तर भगवंतांनी अर्जुनाला ‘ध्यान योग’ सांगितला आहे .पतंजलीनी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल शास्त्रीय दृष्ट्या योगदर्शन लिहिले आहे. मानवी मन आणि सत्याची त्यांना पुरेपूर माहिती होती त्यामुळेच त्यांनी योगशास्त्र लिहिले.
‘ योग ‘ म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध , अशी पतंजलीनी व्याख्या केली आहे. कसे जगावे? ती एक कला म्हणून कशी अंगी करावी? याबद्दल पतंजलीनी आपल्या ग्रंथात अत्यंत महत्त्वाचा असा अष्टांग योग सांगितला आहे . “ध्यान ” या अंगाचा विचार करत असताना, त्यापूर्वीची पाच अंगे, (बाह्यांगे )म्हणजे साधनपादाची थोडक्यात माहिती घ्यायला हवी. १) यम — (सत्य ,अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य ,अपरिग्रह ) २) नियम– ( शुद्धी , संतोष , तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणिधान ) ३) आसन– शरीर निश्चल राहून सुख वाटते ती स्थिती . ४) प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा प्राणाला दिशा देणे. मन एकाग्र होऊन शारीरिक शक्ती वाढते . ५) प्रत्याहार — इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच प्रत्याहार. त्यासाठी खूप निग्रह करावा लागतो. पुढील तीन महत्त्वाची आंतर अंगे म्हणजे विभूतीपाद. ६) धारणा — एखाद्या गोष्टीवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा. वरील सहा पायऱ्या चढून गेल्यानंतरची महत्त्वाची पायरी म्हणजे ” ध्यान”. ७) ध्यान — ध्यै — विचार करणे, हा धातू आहे .चिंतन किंवा विचार हे धारणे संबंधित असतील तरच त्याला ध्यान म्हणता येईल. नुसतेच अर्धा तास बसणे म्हणजे ध्यान नव्हे. चित्त धारणेच्या विषयावर स्थिरावल्यानंतर, त्यापासून जो प्रत्यय येत असतो, त्याच्याशी एकतानता साधणे या क्रियेलाच ध्यान म्हणतात. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळी नेत्र पटलावर प्रतिबिंब उमटते. त्या तेजाने नसा चेतविल्या जाऊन ,संवेदना मेंदूकडे जातात. मेंदू कडून त्याचा अर्थ लावला की त्याचे ज्ञान होते. म्हणजेच प्रत्यय आला, असे आपण म्हणतो. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की, निर्णय शक्ती चांगली प्राप्त होते. आणि एखादा प्रश्न चटकन सुटू शकतो. जप करणे हेही ध्यान होऊ शकते. कोणत्या ना कोणत्या मूर्त रूपाचा आधार घेऊन विचार करणे, हा आपला स्वभाव असतो. ईश्वराचे चिंतन करताना ,कोणते ना कोणते मूर्त रूप समोर येईल. कारण विचार आणि रूप अविच्छेद्य आहेत. पंचेंद्रिय आणि मन त्यावर गुंतून ठेवून ,स्थिर करून, ध्यानाच्या अभ्यासाने मनाची संपूर्ण एकाग्रता साध्य होते. जप नुसत्या जिभेवर न ठेवता मनातून केला पाहिजे . सुरुवातीला जप मोठ्याने करावा. म्हणजे तो ठसतो . जप करताना दुसरे विचार आले तरी ते विचार संपले की जप पुन्हा सुरू करावा. मन थकलेले असेल तर ध्यानामुळे बळकट होते .सोन्याची चीप असेल तर, ती धारणेचा विषय. आणि सोन्याची तार म्हणजे धारणा. ही तार कुठेही तुटता कामा नये, असे चिंतन म्हणजे ध्यान. झोपेत स्वतःचे अस्तित्व विसरतो .आवडी नावडी, गरीब श्रीमंती अशा भावनिक पातळ्या सोडल्या की शांत झोप लागते. ती निष्क्रियता हेच ध्यान. झोपेचे ज्ञान आपल्याला जागृती कडे किंवा सत्याकडे नेते.
ध्यान करताना काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. ध्यान करताना शांत जागा निवडावी. खूप भूक लागली असेल तर ध्यान लागणार नाही. तसेच पोट गच्च भरले असेल तर ध्यान न होता झोपच लागून जाईल. ध्यान करण्यापूर्वी घरातली कॉल बेल बंद करावी. तसेच घरातल्या प्राणिमात्रांना जवळ घेऊ नये. मनात सर्वात जास्त प्रलोभने डोळे निर्माण करतात, त्यामुळे ध्यान करताना डोळे बंद करून ,श्वासावर लक्ष केंद्रित करून ,नंतर दीर्घ श्वास घ्यावेत. त्यामुळे ताण कमी होतो. 90 दिवस सलग ध्यान केले तर, कुटुंबातील इतर व्यक्तींनाही सकारात्मक परिणाम दिसतो. अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर, योग साधनेसाठी सूर्योदयापूर्वीची सर्वोत्तम वेळ. त्याचप्रमाणे संध्यासमयी ४–३० ते पाच नंतर. कारण त्यावेळी आपली मर्यादा ओलांडण्याची क्षमता उत्तम असते. पृथ्वीच्या ऊर्जा संक्रमणातून जात असतात. आणि शरीर प्रणातील संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी झालेला असतो. शारीरिक प्रणाली पृथ्वीच्या जीवनप्रणालीशी संलग्न झाली की ,आपोआप जाग येते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणात योगाचा विकास झाल्याने सगळे योगाभ्यास सकाळी किंवा संध्याकाळी करावेत.
ध्यानाचे फायदे किती सांगावे तितके कमीच ! वीस मिनिटाच्या ध्यानाने चार ते पाच तासांच्या झोपे इतकी विश्रांती मिळते. ध्यान मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. विश्रांती, जागरूकता आणि एकाग्रता येते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ध्यानानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून येणारी ऊर्जा डोळ्याला स्पर्श करावी. व हळुवार डोळे उघडावे. जेव्हा शंभर लोक एकत्र ध्यान करतात, तेव्हा त्याच्या लहरी पाच कि.मी. पर्यंत पसरतात. आणि नकारात्मकता नष्ट करतात. हॉवर्ड येथील ‘ सारा लाझर ‘ हिच्या टीमला कळून आले की,, ” माईंड फुलनेस मेडिटेशन” खरोखरच मेंदूची रचना बदलू शकतो. आठ आठवडे माइंड फुलनेस आधारित “स्ट्रेस रिडक्शन हिप्पो कॅम्पस” मध्ये कॉर्टीकल जाडी वाढवते. जे शिकणे आणि स्मरणशक्ती नियंत्रित करते. .मेंदूच्या अभ्यासाने अहवाल दिला आहे की व्यक्तीनिष्ठ चिंता आणि नैराश्याच्या पातळीपासून मुक्त होण्यास एकूणच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. दर आठवड्यास नवीन अभ्यास समोर येत आहेत. काही प्राचीन फायदे जे आत्ताच एफ. एम .आर. आय .किंवा इ.ई.जी. सह पुष्टी होत आहे. खरोखरच ध्यान आपल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांमध्ये मोजता येण्याजोगे बदल घडवून आणते.ऐलिन लुडर्स यांनी आणखी एक संशोधन करून सांगितले की, ध्यानामुळे मेंदूतील करड्या द्रवामध्ये वाढ होते. जे विचारक्षमतेचे मुख्य स्रोत असते.एम्मा सेप्पाला या प्रसिद्ध वैज्ञानिक आणि कॅलिफोर्निया स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय येथील संशोधिका यांनी सांगितले की, ध्यानाने स्मरणशक्तीत वाढ होते व बौद्धिक पातळी उंचावते. सृजनशीलता वाढते. मनाची साफसफाई होते याची शक्ती आपल्या गुलामी आणि प्रकृती यांचा प्रतिकार करण्यास समर्थ होऊन आनंदात पोहोचवते. भावनिक स्थिरता वाढते तसेच वैचारिक आणि भावनिक केंद्रशांत राहतात ध्यानाने अमिग्डालाचा आकार कमी होतो जो ताणतणावाने वाढतो.
अंधशाळेतले मुलं स्वतःमध्ये स्थिर राहून भजन किंवा कविता म्हणतात .योग साधना कोण करू शकतो? तर युवा, वृद्धो वा अतिवृद्धो वा, व्याधीतो दुर्बलोपिवा / अभ्यासात सिद्धि- माप्नोती , सर्व योगेष्वतंद्रितः//
अष्टांग योगातील पाच बाह्यंगे आणि धारणा ,ध्यान ही अंतरंगे साध्य झाली की, शेवटची समाधी या पायरी पर्यंत जाता येते. समाधीत ज्ञानग्रहण होते. अनेकांना सिद्धीही प्राप्त होतात. समर्थ रामदास ,ज्ञानेश्वर माऊली, आणि अनेक संतांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर ,पुणे येथील डॉक्टर प. वि. वर्तकांनी समाधी स्थितीत ‘ मंगळ ‘ ग्रहावरील वर्णन पाहिले. आणि तेथे लाख वर्षांपूर्वी पाणी आणि शेवाळ होते असे 1975 साली सांगितले .त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे खरे असल्याच्या बातमी नुसार 1986 साली, त्यांचे विवेकज्ञान सत्य असल्याचे सायन्सच्या संशोधनानी सिद्ध झाले. नंतर त्यानी ‘ गुरु ‘ ग्रहाचेही वर्णन सांगितले. अमेरिकेतील डॉक्टर दीपक चोप्रा यांनी लिहिलेले “क्वांटम हीलिंग “
हे पुस्तक बेस्ट सेलर बुकच्या यादीत आलेले आहे. त्यात त्यांनी योगाचा अभ्यास वैद्यकीय उपचारांनाही कसा पूरक ठरतो,, तसेच ज्ञानाच्या माध्यमातून खोल मनापर्यंत पोचून, अडचणी समजून घेऊन ,मनातला गुंता सोडविता येतो . तसेच ध्यानाच्या माध्यमातून आजार बरे करण्यास कशी मदत होते, हे सविस्तर पुस्तकात सांगितले आहे.
श्री. श्री .रविशंकर यांच्या “आर्ट ऑफ लिविंग ” च्या ऍडव्हान्स मेडिटेशनच्या कोर्समध्ये आम्ही कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकलो. पंचकोष, ओरा, ओँकार, चंद्र, (पौर्णिमेचा), सूर्य ,शरीरातील षटचक्रांवरचे हरी ओम, असे कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकून खूप आनंद मिळवला. दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये लोक हे ज्ञान आत्मसात करत आहेत. रामदेव बाबांचीही शिबिरे चालू आहेत. योगाचे अनेक शिक्षकही तयार झाले आहेत. शालेय पातळीपासून अभ्यास व्हायला हवा. जागोजागी स्पर्धा, ताण-तणाव दिसत आहेत .अशा वेळी स्वच्छ , निर्मळ, आणि निरामय आरोग्यासाठी योग साधनेचीच गरज आहे .आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 21 जून हा ‘जागतिक योग दिवस,’ आणि 21 मे हा ‘जागतिक ध्यान दिवस ‘ असे म्हणून अधिष्ठान दिले आहे. त्याचा परिणाम ही जाणवू लागला आहे .सर्वजण मिळून सर्वांसाठी प्रार्थना करूया.
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४ मो ९९७५६००८८७
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
शाळेची योग्य वेळ –
1) आमचं बालपण 2) मुलांचं बालपण 3) शिक्षक म्हणून.
कोकणातलं ठार खेडं. चालतच शाळेत जायचं. आमची पूर्ण प्राथमिक मराठी शाळा. पंचक्रोशीत एकच. ती दुबार भरायची. सकाळी 7.30 ते 10.30 दुपारी 2.30 ते 5.30.
पाच मैलांवरून येणाऱ्या मुलांनी कसं यायचं?केव्हा उठायचं? त्यांच्या दुपारच्या वेळेचं काय? जेवणाचं काय?हा विचार कोणीही का केला नव्हता ? कारण शिक्षण सार्वत्रिक नव्हतं. ब्राह्मणांची मुलं सातवी पर्यंत कशीबशी शिकायची नि मास्तर व्हायची. बाकीची जरा जाणती झाली की “मुंबईक जावन रामाबालू नायतर गिरणीत चिकटुची.” शहरातल्या काही शाळा 11 ते 5 .तरी पहिली ते चौथी सकाळीच. का? माहित नाही.
2) आमची मुलं लहान असतानाही थोडीफार अशीच परिस्थिती होती. मोठ्यांच्या शाळा, कॉलेजीस, ऑफिसेस दुपारी, पण लहान मुलांना मात्र सकाळचीच शिस्त (?) किंवा शिक्षा. कारण?
3) मी शिक्षक असताना फारच दारूण अवस्था होती. आमची शाळा खेड्यातली. तरी टेक्निकल हायस्कूल. टेक्निकलचे वर्ग सकाळी. बाकीचे पाचवीते दहावी सर्व वर्ग 11त 5..गावातल्या पहिली ते चौथी प्राथमिक शाळा — जिल्हा परिषदेच्या. त्याही 11ते 5 होत्या. छान चाललेलं.
— मुलांची संख्या वाढली , तुकड्या वाढल्या. इमारत पुरेनाशी झाली. शाळा दुबार भरवणे हा पर्याय उरला. आणि लहान मुलांवर संकट आलं. पाचवी ते सातवी 7.30 ते 12. आठवी ते आता दहावी कं12.30 ते6. दोन्ही शिफ्टच्या मधल्या सुट्टया लहान झाल्या. आमची शेतकऱ्यांची, मजुरांची मुलं त्यांच्या आयाही कामाला जायच्या. त्यांनी मुलांचे डबे कधी करायचे?बरींच मुलं बिन आंघोळीची यायची. कारण पाणी सुटलं तरी ते भरून ठेवायला हवं आयांना. मुली तर आपापल्या वेण्या कशातरी गुंडाळून यायच्या. केस विंचरायला सवड नको? पहिल्या तासाला वर्गात घाण वास सुटलेला असायचा. पोट साफ करून तरी मुलं येतील ही शंकाच. मुलांना स्वच्छl रहाण्याचं शिक्षण कसं मिळायचं? शाळेची इमारत बांधणं ही काही साधी गोष्ट नव्हती. अशी सगळी आबदा. इमारत होईपर्यंत असंच सगळं.
आता काही उपाय.–
1) शाळेच्या इमारती डामडौल नसलेल्या पण, मोठ्या, सर्व वर्गाना पुरतील अशा बांधाव्यात म्हणजे कमी खर्चात ऐसपैस असाव्यात. दोन शिफ्ट करण्याची वेळच येऊ नये.
2) मुंबई, पुण्याच्या सर्व स्त्रिया नोकरी करतातच. त्यांच्या मुलांची सकाळची शाळा त्यांना सोयीची. मुलांना सगळ्या तयारीनिशी एकदा शाळेत पाठवलं की स्वतःची तयारी. पण त्यात मुलांच्या झोपेचं, शीशूच काय? त्यांच्या बालपणावर उगीचच ताण, त्यांच्या आजी,आबांना ठेऊन घ्याव. ते निवांतपणे, प्रेमाने नातवंडांचं करतील, एकदा मुलांच्या बाजूने विचार केला की उपाय खूप आहेत. शब्द मर्यादेमुळे बास.
☆ बाळा मला समजून घेशील ना ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
(नुकतेच अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. ते कितपत यशस्वी झाले याबद्दल वेगवेगळी मते/वाद ऐकायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर माझा पूर्वी लिहिलेला हा लेख)
रात्रीची शांत वेळ. शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठी येऊन बसतो. गोदामैया शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचे छान प्रतिबिंब पडलेले असते. आजबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गॊदामैयाचे हे रूप मला भावते. दिवसभर तिच्या काठाशीही वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात,श्रीमंत, गरीब, लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात. पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही. पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावसं वाटत नसलं तरी यावेळी ती आपलं मन मोकळं करते.
असाच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती. पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, ‘ आलास. ये. बैस जरा. तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्या आधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळ्या असलो तरी माझा आणि तिचा आत्मा एकच आहे. तू माझ्याकडे जसा हक्काने येतोस, तसाच तिच्याकडेही जा. तिची थोडी विचारपूस कर. मग पुन्हा तुझ्याशी बोलायला मी आहेच. ‘ मी म्हटलं, ‘ माई, तू काळजी नको करुस. मी जातो लगेच तिच्याकडे आणि तिला काय हवं नको ते पाहतो. ‘
मी गेलो. खरंच भरजरी वस्त्र लेऊन एक कुलीन, घरंदाज स्त्री उभी होती. कपाळावर कुंकवाचा टिळा होता. मुद्रेवर न लपणारं विलक्षण तेज होतं. मी तिला प्रणिपात केला. म्हटलं, ‘ मला गोदामैयाने पाठवलं तुमच्याकडे. कोण आपण .? मी आपल्याला काही मदत करू शकतो का ?
क्षणभर ती माऊली स्तब्ध होती. मग म्हणाली, ‘ असं परक्यासारखं नको बोलूस रे. मी तुझी आईच आहे. एका आईनं तुला जन्म दिला. मी तुला शब्द दिले, भाषा दिली. शेतामध्ये धान्य पेरतो. नंतर ते अनेक पटींनी परत मिळतं. तशी लहानपणापासून तुझ्या अंतरात मी शब्दांची पेरणी केली. ती भाषेच्या रूपाने तुझ्या लेखणीतून, वाणीतून प्रकट झाली. आता तरी लक्षात आलं ना की मी कोण आहे ते !
‘ होय माते, तू तर माझी माय. माय मराठी. मला लक्षातच आलं नाही आधी. मला क्षमा कर. ‘
‘ असू दे लेकरा. चालायचंच. तुझा काही दोष नाही त्यात. ‘
पण माते मला सांग, तू आता इथे कशी काय ?
अरे तुझ्या लक्षात नाही आलं का ? दोन तीन दिवस इथे साहित्य संमेलन होतं ना…! म्हणून आले होते खूप आशेने !
‘ पण माते मला सांग तुझी ही अशी अवस्था कशानं झालं ? तुझ्या अंगावरचा हा भरजरी शालू कशानं फाटला ? माये, तू तर श्रीमंत, धनवान. तुला कशाचीच कमी नव्हती. माझ्या ज्ञानोबा माउलींना तर तुझा केवढा अभिमान ! संस्कृतमधील गीता त्यांनी तुझ्यारूपाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ज्ञानोबा माऊली म्हणाली, ‘ माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ‘ खरंच माऊलींच्या शब्दाशब्दातून अमृताचे थेंब ठिबकत होते. म्हणूनच माऊलींनी तो वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरी नंतर ‘ अमृतानुभव ‘ लिहिला. माऊलींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका ‘ ज्ञानेश्वरी ‘ ऐकताना श्रोत्यांनी जे श्रवणसुख अनुभवलं त्याला तोड नाही. उपमा नाही. सर्वांगाचे जणू कान झाले. पुढे तुकोबांनी अभंग लिहिले. त्याची गाथा झाली. तुकोबांच्या मनाला भिडणाऱ्या तरल अभंगांनी इंद्रायणीसारखंच मराठी मनाला भिजवून चिंब केलं. समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला. मनाचे श्लोक सांगून मनाला बोध केला. शिवरायांना ‘ जाणता राजा, श्रीमंत योगी, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत….’ अशी विविध सार्थ विशेषणे लावून तुझ्या श्रीमंतीचा प्रत्यय आणून दिला.
संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी संतांनी तुझं वैभव वाढवलं. आमची निरक्षर असलेली बहिणाबाई इतकं सुंदर काव्य बोलली की भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान तर काय सांगावं…! त्यांच्या शब्दात सांगायचं तर तू म्हणजे स्वातंत्र्यदेवतेसारखीच आहेस.
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूचि…
या ओळी तुला सुद्धा लागू होतात.
ग दि माडगूळकर, मंगेश पाडगावकर, भा रा तांबे, बा भ बोरकर यासारखे कवी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या अनेक लेखकांनी तुझ्या अंगावर विविध रूपांचा साज चढवला. कविवर्य कुसुमाग्रज, वि स खांडेकर, विंदा करंदीकर यांनी तर मराठी साहित्यात जी भाषेची समृद्धी, श्रीमंती आणली, त्यामुळे साहित्य अकादमीला तुझी दखल घ्यावीच लागली. कुसुमाग्रज तर मराठी मातीबद्दल बोलताना म्हणाले…
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
काय बोलू, किती बोलू आणि कसं सांगू असं होतंय मला. आणि माते, तरीही तुझी आज अशी अवस्था ? ‘
‘बाळा, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे. पण या सगळ्या पूर्वसुरींच्या गाथा आपण किती दिवस गाणार ? आता आपण काय करतो ते अधिक महत्वाचं नाही का ? आणखी काही दिवस जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी अवस्था तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी होईल. अर्थात सुदैवाने मला माझ्या सुपुत्रांकडून आशा आहे. चांगले दिवस बघायला मिळतील याची खात्री आहे. पण त्यासाठी तुम्हाला हातपाय हलवावे लागतील रे….’
‘तू बघतोस ना की शाळांमधून दिवसेंदिवस मराठी भाषा हद्दपार होताना दिसते आहे. आवश्यक भाषा म्हणून काही शाळा नाईलाजाने शिकवतात ती ! मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. हिंदी, इंग्रजी या भाषांबद्दल माझ्या मनात आकस नाही रे. पण लहानपणी मुलांना वाढीसाठी आईचंच दूध चांगलं असतं नाही का ? लहानपणी मुलाला आईचं दूध मिळालं तर त्याचा शारीरिक, बौद्धिक विकास निकोप होतो….’
‘साहित्य संमेलनात माझ्या वाढीसाठी खूप काही प्रयत्न होतील अशी मनात आशा ठेवून मी आले होते. तशी माझी अगदीच निराशा झाली नाही. पण कसं होतं ना, घरात मुलाचं लग्न झालं, सून आली की आईची तशी उपेक्षाच होते. तिला आई आई म्हणून म्हटलं जातं . पण घरात होणाऱ्या निर्णयात तिचा फारसा विचार घेतला जात नाही. तसंच काहीसं झालं आहे… ‘
‘माझी एक खंत आहे, सांगू का ? ‘
‘हो, सांग ना…! मलाही जाणून घ्यायचं आहे. ‘
ही दरवर्षी जी साहित्य संमेलनं घेतली जातात ना, ती चांगलीच गोष्ट आहे. पण माझा जो वाचक आहे, साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक आहे त्याचा विचार कोणी करतं का ? मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय नेते जसं ठरवतील तसंच संमेलनाचं स्वरूप असतं. सामान्य माणसांचा विचार कुठे असतो त्यात ? मला राजकीय नेत्यांचं वावडं नाही. त्यांनी साहित्य संमेलनात जरूर यावं. पण केवळ एक रसिक म्हणून. व्यासपीठावर सारस्वतांचीच मांदियाळी असावी. संमेलनाची दशा, दिशा त्यांनीच ठरवावी. तुम्ही सगळ्या रसिक वाचकांनी ठरवलंत तर राजकीय नेत्यांची आर्थिक मदत घेण्याची गरज पडणार नाही. मला ते आवडतही नाही. कारण मग मूळ मुद्दे बाजूला राहतात. किरकोळ कारणांवरून हेवेदावे, धुसफूस होते. आरोप होतात. संमेलनाला गालबोट लागते. तुला म्हणून सांगते. जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम सुरु होते ना, तेव्हा मी व्यासपीठावर नव्हतेच ! तुमच्यामध्ये पण बसलेले नव्हते. मी उभी होते एका कोपऱ्यात. आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे कोणाचं लक्ष जातं ? उत्सव माझा, माझ्या नावानं सगळं पण उपेक्षित मीच ! तू जे मघाशी विचारलंस ना की हा भरजरी शालू कशानं फाटला, त्याचं कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल. नाही म्हणायला मला एका गोष्टीचा आनंद झाला. मराठी वाचकांचा टक्का वाढल्यासारखा मला दिसतो. कारण ग्रंथविक्री विक्रमी झाली…’
‘अनेक नवोदित कवी, लेखक नवनवीन साहित्य लिहून मोलाची भर घालताहेत. तरीही मला वाटतं की अजून उत्तमोत्तम, कसदार साहित्य निर्माण व्हावं. त्या साहित्याच्या वाचनाने नवीन पिढ्या समृद्ध व्हाव्यात. हे साहित्य संस्कार देणारं असावं, जगणं शिकवणारं असावं. सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडित गोष्टींची चर्चा साहित्यात व्हावी. त्याला त्यापासून मार्गदर्शन मिळावं. सामान्य रसिक वाचक केंद्रस्थानी ठेवून लेखक, कवींनी लिहितं व्हावं. मराठी मातीत जन्मलेले अनेक सुपुत्र अनेक उच्च पदांवर काम करत आहेत. कोणी शास्त्रज्ञ, कोणी प्राध्यापक इ. पण यातली बरीचशी मंडळी इंग्रजीत लेखन करण्यात धन्यता मानतात. त्यांनी आपले विचार सर्वसामान्यांसाठी मराठीत मांडावे… ‘
‘शासनाकडून मला फार अपेक्षा नाहीत. माझ्या अपेक्षा तुमच्यासारख्या माझ्या सुपुत्रांकडून आहेत. वाचक, लेखक, कवी यांनी मला समृद्ध करावे ही माझी अपेक्षा. साहित्य संमेलने व्हावीत ती तुम्हा सगळ्या रसिक वाचक, लेखकांच्या बळावर असे मला वाटते. त्यात उत्स्फूर्तता हवी, बळजबरीचा रामराम नको… ! बाळा, माझ्या मनातलं सांगितलं तुला. खूप काही बोलण्यासारखं आहे. पण सगळं सांगण्यातही अर्थ नसतो. समोरच्या व्यक्तीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे तरच सांगण्याला, बोलण्याला काही अर्थ उरतो. बाळा, घेशील ना मला समजून…? ‘
तिचे डोळे पाणावले होते. उरात हुंदका दाटून आला होता. मी तिच्या चरणांना वाकून स्पर्श केला. माझ्याजवळही आता शब्द नव्हते. मी फक्त एवढंच म्हटलं, ‘ आई, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण…’ तिचा मोरपिशी हात पाठीवरून फिरला. काय नव्हतं त्या स्पर्शात ! ज्ञानोबा, तुकोबा, सावरकर, कुसुमाग्रज आदी सर्व मराठी सारस्वतांचे आशीर्वाद त्यात सामावले होते. मी भारावून वर पाहिलं, तर माऊली अदृश्य झाली होती. गोदामाई शांततेत वाहत होती. माईला मनोमन नमस्कार केला. तिची मूक संमती घेऊन मार्गस्थ झालो. दिव्यांनी रस्ते उजळले होते आणि तारकांनी आकाश… !
ज्याचे रूप ऋग्वेदाची मंडले आहेत, शरीर यजुर्वेद आहे, सामवेद ही किरणे आहेत, जो जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांचे कारण आहे, जो ब्रह्मदेवाचा दिवस असून अचिंत्य व अलक्षी आहे त्या श्रेष्ठ सूर्य देवतेचे मी प्रातःस्मरण करतो.
रोजच सूर्याला नमस्कार करण्याची आपली पद्धत कारण सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे आयुष्य आहे हे आपण केंव्हाच जाणले आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा चांगल्या विचाराने, भावनेने साजरा केला जातो.तसाच हा माघ शुक्ल सप्तमीचा म्हणजेच रथसप्तमी चा सण, सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तो याच दिवशी साजरा करण्याची कारणे म्हणजे सूर्याचा हा जन्मदिन आहे अशी एक कल्पना, या दिवशी संवत्सर सुरू झाले. याच दिवशी सूर्याला त्याचे वाहन म्हणजे रथ मिळाला ही एक कल्पना!
वास्तव असे आहे की या दिवसापासून सूर्याचे तेज वाढत जाते, तो जास्त वेळ म्हणजे दिवसाचे जास्त तास प्रकाश देतो, आणि आपले आयुष्य आरोग्यदायी करतो.सूर्य आता उत्तरायणात असतो. वसंत ऋतू येतो म्हणजेच सृष्टीची सृजशीलता वाढते.म्हणून सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतू!त्याचे हे वाढलेले तेज सहन करणारे रथाचे घोडे व त्याचा सारथी अरुण यांच्याप्रती सुध्दा कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी रथासह सूर्याची पूजा करण्याची पद्धत आहे.
(सहज मिळाली म्हणून थोडी रथाबद्दल माहिती सांगते. रथ हे आपले फार प्राचीन वाहन आहे. रथाचे अनेक प्रकार आहेत.देवगणांचा तो देवरथ, राजेमहाराजे यांचा पुष्परथ, खेळांसाठीचा क्रीडारथ, स्त्रियांसाठी चा कणीरथ, रथ विद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ.रथ चक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह, उत्कर्षाचे प्रतीक आहे.)
सूर्याच्या रथाला संवत्सर नावाचे एकाच चाक आहे.त्याला बारा राशी म्हणजेच बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बारा आरे आहेत.गायत्री, वृहति, उष्णिक,जगती, त्रिष्टुप , अनुष्टुप, पंक्ती हे सात छंद अश्व रुपात सूर्याचा रथ ओढण्याचे काम करतात. रथाचा विस्तार नऊ हजार योजन तर त्याची धुरा एक करोड सत्तावन हजार योजन आहे.( चौथ्या – पाचव्या शतकात सूर्य सिद्धांतानुसार एक योजन म्हणजे ५ मैल -८ किलोमीटर, पण नंतर १४ व्या शतकात परमेश्वर नावाच्या गणितज्ञाने एक योजन म्हणजे ८ मैल – १३ किलोमीटर आहे असे सांगितले)
एका सूर्य किरणात सात प्रकारच्या ऊर्जा असतात.
प्रभा – तमनाशक, प्राण शक्तिदाता
आभा – धर्मशक्ती दाता
प्रफुल्ला – आत्मज्ञान दाता
रश्मी – सृजनशक्ती दाता
ज्योती – भक्तीरस निर्माती
तेजस्विनी – स्थिती म्हणजेच विष्णूला मदत करणारी
महातेजा – उत्पत्ती व लय म्हणजेच ब्रह्माला व शिवाला सहाय्य करणारी
या सात ऊर्जा रुपी किरणांना त्यांचे त्यांचे रंग असतात. या सात ऊर्जा एकत्रित येऊन सविता तयार होते, ही श्वेत असते.
सूर्याच्या जन्मा बद्दल सांगायचे तर तो आजन्मा आहे. कमळाच्या नाभितून ब्रह्माजी अवतरले. त्यांच्या मुखातून प्रथम ओम् शब्द निघाला, हा तेजरुपी सूर्याचे सूक्ष्म रूप होते. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले. जे ओम् च्या तेजात एकाकार झाले. हे वैदिक तेजच आदित्य आहे. हा वेद स्वरूप सूर्य पंचदेवांपैकी ( शिव, देवी, विष्णू, गणपती, सूर्य ) एक आहे.
वैवस्वत मन्वंतरात अदितीने सूर्याची कठोर आराधना केली, सूर्यदेव प्रसन्न झाले. तिने सुर्यासारखा पुत्र मागितला. कालांतराने अदिती गर्भवती झाली. तिचे कठोर व्रत सुरूच होते. रागावून कश्यप म्हणाले, अशी उपाशी राहिलीस तर गर्भ कसा वाढेल? तिने तो गर्भ शरीरातून काढला तेंव्हा तो सोन्यासारखा चमकणारा होता. कालांतराने त्यातून एक तेजस्वी, सूर्याचा अंश जन्माला आला, त्याचे नाव विवस्वान ठेवले. असे अदिती कश्यप यांना बारा पुत्र झाले, त्यांना द्वादश आदित्य म्हणतात. हे आदित्य अवकाशातील इतर आदित्यांना ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. (म्हणजे अवकाशात अनेक सूर्य निर्माण होतात अशी कल्पना त्याकाळी सुध्दा होती?)
सूर्याचा विवाह देवशिल्पी व विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा हिच्याबरोबर झाला. त्यांना वैवस्वत मनू, यमदेव ही दोन मुले व यमुना (नदी) ही मुलगी झाली. परंतु फार काळ संज्ञा सूर्याचे तेज सहन करू शकली नाही म्हणून तिने आपल्या जागी आपली छाया सोडली व आपण वनात निघून गेली. छायेला सावर्णी मनू, शनिदेव हे दोन मुलगे व तपती ही मुलगी झाली. कालांतराने सूर्याला संज्ञा सापडली, त्यावेळी सूर्य घोडीच्या रुपात होते, त्यांच्या मीलनातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. अश्व रुपात असताना जन्माला आली म्हणून त्यांचे नाव अश्विनीकुमार!
त्रेता युगातील सुग्रीव हा पण सुर्यपुत्र, त्याच्या जन्माची कथा वेगळीच आहे. ऋक्षराज नावाचे वानर होते, ते एका सरोवरात स्नान करण्यासाठी गेले, सरोवराला मिळालेल्या शापामुळे त्यात स्नान केल्यावर त्याला एका सुंदर स्त्री चे रुप प्राप्त झाले. प्रथम त्या स्त्री वर इंद्रदेव मोहित झाले त्यामुळे बाली चा जन्म झाला. नंतर सूर्यदेव ही मोहित झाले आणि सुग्रीवाचा जन्म झाला. दोन्ही मुले त्याने गौतम ऋषी व अहिल्या यांच्याकडे सोपविली. द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने कुंतीच्या पोटी जन्माला आलेला कर्ण हा पण सुर्यपुत्र!
सूर्यदेवा,
पहाट वारा जेंव्हा भूपाळी गात असतो तेंव्हा एखादा मोत्यांचा सर सुटावा तसे मोती धारेवर विखुरतात. कोठून आले हे मोती? हां! बरोबर आहे, तुझ्या कंठातला तो मोत्यांचा हार पश्चिमेकडे ठेऊन गेला असशील आणि तिने मोत्यांचा सडा टाकला! सूर्यदेवा, तू येण्याआधीच प्राचीवर गुलाल उधळून तुझ्या येण्याची बातमी अरुण देतो.
माथी किरीट, हाती कमळ,चक्रधारी, शंखधारी,आशीर्वाद मुद्रा, कानी मकर कुंडलांची प्रभा, गळ्यात हार,लाल रंगाच्या सात घोड्यांच्या रथावर, वामांगी पत्नीला घेऊन पद्मासनात आसनस्थ झालेलं, सुवर्ण कांती ल्यालेलं हे तुझं देखणं रुप!
तू तर तिन्ही लोकांचा पालनकर्ता अन्नदाता, त्रिगुणधारी,रोगांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी,अध्यात्माचा प्रेरक, आकाश रुपी लिंगाची आराधना करणारा, आकाशाचा स्वामी, ग्रह नक्षत्रांचा अधिपती, तमनाशक, असत्याकडून सत्याकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे नेणारा, धर्मपरायण, धर्माच्या व कर्तव्याच्या मार्गाने जाणारा म्हणून कधीही लोप न पावणारे तुझे तेज, चौदा भुवनांचा पालक, चराचर सृष्टीचा आत्मा, विश्वाचा साक्षीदेव, विराट पुरुषाचा नेत्र, अंतराळाचा अलंकार, अमूर्त अशा अग्नी देवतेचे मुख, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तूच, देव,पितर, यक्ष ज्याची सेवा करतात तो तूच, राक्षस, निशाचर, सिद्ध ज्याला वंदन करतात तो तूच, इतका महान असून तुझे किरण क्षुद्र जीव जंतू, मनुष्य, सर्वांचे चरण स्पर्श करून नम्रतेची शिकवण देतात.
कालस्वरूप, कालचक्राचा प्रणेता, निर्मळ, विकल्प रहित, सर्वज्ञानी आहेस. म्हणूनच मारुतीला आणि कर्णाला तू ज्ञान दिलेस. आणखी काय आणि किती लिहू ? सारं न संपणारे! माझा अवाका ही तेवढा नाही. मला माहित आहे, अनासक्त आहेस तू, त्यामुळेच तिन्हीसांजेला तुझा एवढा मोठा पसारा क्षणात आवरून घेतोस.
तुला एक वचन देते, मावळताना तू जी सूक्ष्म रूपातील तुझी शक्ती व तेज दिव्यात ठेऊन जातोस, त्याचा सन्मान आम्ही करू, आणि घरात रोज एक ज्योत तेवती ठेवू.
☆ ❤️ “व्हॅलेंटाईन डे” ❤️☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
आता पाश्चात्य लोकांचे पाहून आपणही मदर डे फादर डे साजरे करू लागलो आहोत.
आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज काय? त्या दिवसासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात, कार्यक्रम आखले जातात, प्रेम व्यक्त केले जाते, रोमान्स ताजा ठेवण्यासाठी आटापिटा केला जातो आणि सगळेजण करतात म्हणून आपणही करतो. सगळेजण लॉंग ड्राईव्ह जातात म्हणून आपणही जातो. कॅण्डल लाईट साजरा करतात त्याचेही अनुकरण करतो काहीतरी भेट द्यायची म्हणून खिशाला परवडत नाही तरी खरेदी केली जाते, उसनवारीने पैसे घेतले जातात आणि पैसे परत करावे लागणार म्हणून दुःखी होतात.
पाच रुपयाचे गुलाबाचे फुल 25 रुपये देऊन खरेदी करतो पण या सगळ्याची परत गरज आहे का? कशासाठी पाश्चात्य लोकांचे अनुकरण करायचे?
ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी पैसे खर्च करूनच केले पाहिजे असं कोणी सांगितलंय?
“प्यार करने के लिए पैसा नही लगता… और प्यार मे कोई सही या गलत भी नही होता| … प्यार सिर्फ प्यार होता है।” म्हणून त्याला किंवा तिला जे आवडते ते केले तर आनंद द्विगुणित होईल. एखादा मित्र अनेक दिवस भेटला नसेल तर त्याची घालून देता येईल, आवडीचा पदार्थ पोटभर खाऊ घालता येईल ,एखादे चांगले पुस्तक भेट देता येईल., आपल्या मनातील भावना कागदावर लिहून देतायेतील की ज्यामुळे त्याला किंवा तिला आनंद होईल. त्यासाठी व्हॅलेंटाईन ग्रीटिंग देण्याची गरज नाही. त्या ऐवजी भांडण झालेल्या मित्र-मैत्रिणींचा समेट घडवून आणता येईल. मागील चूकीची माफी मागता येईल, दिलगिरी व्यक्त करता येईल हीच खरी प्रेमाची कसोटी ठरेल.हेच गिफ्ट आयुष्यभर पुरेल असे मला वाटते.
आपण लहानपणी पासून ऐकतो, पेरावे तसे उगवते किंवा आपण जे किंवा जसे वागतो ते आपल्या कडे कोणत्याही रूपात परत येते. हे होऊ द्यायचे नसेल तर काय करावे बघू या. खरे तर हे सर्वांना माहिती आहे. पण काही गोष्टी परत उजळाव्या लागतात. तसेच हे आहे.
आपल्याला पावलोपावली काही निर्णय घ्यावे लागतात.
बऱ्याच गोष्टींवर आपण प्रतिक्रिया देत असतो. आणि त्या देताना जसे पूर्वग्रह मनात असतात. तसे आपण व्यक्त होतो. समजा एखाद्या व्यक्तीने पूर्वी आपला अपमान केला असेल तर तो राग मनात असतो.मग त्या व्यक्तीने साधा “कसे आहात?” असा प्रश्न विचारला तरी आपल्या कडून सरळ उत्तर दिले जात नाही. त्या वेळी अपमान,बदला,चिड,राग अशा भावना मनात येतात.
किंवा एखाद्या व्यक्ती विषयी चांगले मत असेल आणि ती व्यक्ती रागावली तरी आपण फारसे मनावर घेत नाही.
थोडक्यात आपले पूर्वग्रह जसे असतात तशी प्रतिक्रिया दिली जाते. प्रतिक्रिया किंवा प्रती उत्तर चांगले असेल तर आपण विसरुन जातो. पण कोणी आपला अपमान केला असेल तर विविध प्रतिक्रिया मनात येतात. त्यातील एकच प्रतिक्रिया योग्य असते. पण ती दुर्लक्षित केली जाते. आणि त्या पूर्वग्रह दूषित ठेवून दिलेल्या प्रतिक्रियेचा जास्त त्रास आपल्यालाच होतो. पण हे आपण टाळू शकतो. थोडक्यात चुकीच्या कर्मातून सुटका करुन घेऊ शकतो. या साठी काही छोटे उपाय प्रत्यक्ष करुन बघू.
▪️ १) लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही.
पूर्वी मोठी माणसे सांगायची राग आला की,पाणी प्या. मनात अंक मोजा. तसेच काहीसे करायचे. प्रतिक्रिया देण्याची वेळ आली की, लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण जी प्रतिक्रिया देणार आहोत ती फायद्याची, आनंदाची, हितकर आहे का? याचा विचार करायचा.
जी प्रतिक्रिया देणार आहोत त्याचा विचार मनात आल्यावर आपल्या हृदयात किंवा पोटात आनंद,समाधान जाणवले तर ती प्रतिक्रिया योग्य आहे असे समजायचे.आणि त्यामुळे जर भीती वाटली,धडधड जाणवली किंवा राग,ईर्षा,चिडचिड असे जाणवले तर ती प्रतिक्रिया अयोग्य समजावे.
काय जाणवते या कडे लक्ष द्यायचे. त्या नंतर प्रतिक्रिया द्यायची.
▪️ २) कोणत्या भावना निर्माण होतात या कडे लक्ष देणे.
कोणत्याही घटना,भाष्य या वर प्रतिक्रिया देताना कोणत्या भावना / लहरी मनात निर्माण होतात या कडे लक्ष द्यावे.चांगले /वाईट तरंग (vibration) आपल्याला जाणवतात.
ते जर चांगले असतील तरच मनात आलेली प्रतिक्रिया / प्रत्युत्तर द्यावे.
▪️ ३) कर्माचे कर्ज कसे फेडावे?
🔅१) परिणाम भोगणे –
निसर्ग नियमा नुसार ते भोगून फेडावे लागते.
🔅२) समुपदेशन करणे – आपण ज्या चुका केलेल्या आहेत,त्या इतरांच्या कडून होऊ नयेत या साठी त्यांचे समुपदेशन करायचे.कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत व त्या कशा टाळाव्यात या विषयी मार्गदर्शन करावे. ज्याला अपयश मिळाले आहे,किंवा शिक्षा मिळाली आहे तिच व्यक्ती कोणत्या गोष्टी करु नयेत या विषयी चांगले सांगू शकते.
🔅३) गॅप मध्ये जाणे – म्हणजे मेडिटेशन करणे.दिवसातून दोन वेळा मेडिटेशन करावे.त्या मुळे विविध विचारांच्या पासून आपण दूर जातो.
त्या मुळे आपण योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करु शकतो.
आपले कार्मिक दोष कमी करायचे असतील तर पुढील गोष्टी कराव्यात.
🔅 १) दान, समुपदेशन, मेडिटेशन करणे.
🔅 २) प्रत्येक प्रतिक्रिया देताना थांबणे – विचार करणे.
🔅 ३) प्रतिक्रिया देताना आपल्या हृदयाला योग्य आहे की अयोग्य आहे विचारणे.म्हणजेच ( Heart Vibration) तपासून मग प्रतिक्रिया देणे.
हे उपाय आपल्याला कर्म दोषातून मुक्ती देऊ शकतात.फक्त हे मनापासून करावे.
☆ भारतीय संस्कृती जपणारी* टिकली… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
भारतीय संस्कृती जपणारी* टिकली
टिकली
तिच्या कपाळावर ची
टिकली चमकलीपैठणी नेसून ती झोकात चालली
आज चंद्र ढगाआड का लपला
स्त्रीच्या जीवनात कुंकू किंवा टिकलीचे महत्त्व खूप आहे. सोळा शृंगारातही कुंकवाला महत्त्वाचे च स्थान आहे.
*चिरी कुंकवाची लखलख करिते
जीव जडला जडला जडला
खरं वाटंना वाटंना वाटंना*
या जुन्या मराठी चित्रपट गीतात कुंकवाची चिरी असा उल्लेख आहे. खरंचपूर्वी स्त्रिया कुंकवाची आडवी रेघ म्हणजेच चिरी कपाळा वर रेखत असत.माझी आई, मावशी यांच्या कडे फणीकरंड्याची लाकडी पेटी असायची. त्यात पिंजर कुंकू, मेणाची
डबी,फणी(कंगवा),काजळाची डबी आणि लहान साआरसा असायचा. त्या आधी कपाळावर मेण लावून मग गोलाकार कुंकू लावायच्या. मावशी सांगायची ते मेणही मधमाशीच्या पोळ्यातील असे.कुंकूही सात्विक (भेसळीविना)असे.
टिकली विषय इतका जिव्हाळ्याचा आहे कि त्यावर त्रिवेणी करण्याचा मोहच आवरत नाही.
त्रिवेणी
तिच्या कपाळावरची टिकली लक्ष वेधत होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठंतरी आडोशाला थांबावं म्हणतोय .
भारतीय संस्कृतीत कुंकवा चे महत्त्व अनन्य साधारण आहे.कुंकवाचा इतिहास पाहता फार पूर्वीच्या काळात डोकावावे लागेल.पूर्वी आर्य-अनार्य (द्रविड) टोळ्या होत्या. त्यांच्यात सतत युध्दे होत.त्यावेळी आर्य स्त्रियां ना द्रविड किंवा अनार्य पळवून नेत.मग आर्य पुन्हा
आपल्या स्त्रियांना युध्दात जिंकून परत आणत.मग या स्त्रियांना शुध्द करण्या साठी घोड्याच्या रक्ताने त्यांना स्नान घालत. पुढे पुढे त्याऐवजी घोड्याच्या रक्ताचा टिळा स्त्रीच्या कपाळी लावत व तिला शुध्द करून घेत. यातूनच मग कुंकवाची प्रथा उदयास आली. हा इतिहास रक्त रंजित जरी असला तरी कपोल कल्पित नाही.
शुध्द कुंकू हळद हिंगूळ आदि पदार्थ वापरून तयार केले जाते. कुंकू कोरडे असेल तर त्याला पिंजर म्हणतात. ओल्या कुंकवा लागंधम्हणत.शुद्ध कुंकवाचा सुगंध ठराविक अंतरापर्यंत दरवळत रहातो. शुद्ध कुंकवात आर्द्रता असूनही ते पूर्ण पणे कोरडे असते. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार असतो. शुद्ध कुंकू रक्त वर्णाचे असते. त्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते. हे कुंकू कपाळावर लावल्याने वाईट शक्ती भ्रूमध्यातून प्रवेश करू शकत नाहीत.
असं म्हणतात. पूर्वीच्या काळी (सत्य, त्रेता व द्वापार या युगांत) शुद्ध कुंकू मिळायचे; मात्र त्या युगांनुसार कुंकवाची सात्त्विकता कमी कमी होत गेली. हल्ली कली युगामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकच सात्त्विक कुंकू तयार करतात.’
१. `कुंकू लावतांना भ्रूमध्य व आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो व तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.
२. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो. कुंकवा मुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रा तून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो, असे समजतात.कुंकू हे पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे. कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटकांमध्ये देवतांच्या चैतन्यलहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. म्हणून पूजापाठ,धार्मिक विधीं वेळी पुरुषांच्या कपाळा वर सुध्दा कुंकूम तिलक रेखतात.
योगशास्त्रानुसार शरीरातील षट्चक्रांपैकी आज्ञाचक्राचे स्थान कपाळा वर ज्याठिकाणी कुंकू किंवा टिकली लावली जाते तेथे आहे. म्हणजे कुंकू लावणे हे एक प्रकारे आज्ञाचक्राचे पूजन आहे.
त्रिवेणी बघाः
टिकली
काल ती चांदणी आकाशात चमकत होती
आज ती तिच्या कपाळावरील टिकली म्हणून चमकत होती
हल्ली चांदण्या कुठंही लुकलुकत असतात कालानुरूप या कुंकवाची जागा टिकल्यां नी घेतली. कारण लावाय ला सोपी, बाळगायला सोपी, तसेच घाम,पाऊस
याने ओघळायची भीती नाही. टिकली लावली किंवा कुंकू तरी संस्कृती शी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यातून दिसतो. भले त्या त आकार, रंग,वेगवेगळे असतील. फँशनचा विचार असेल तरीही टिकलीचे महत्त्व ही कमी होत नाही.