मराठी साहित्य – विविधा ☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नऊ फेब्रुवारी. ही  तारीख बाबा आमटे ह्यांचा स्मृतीदिन. बाबांचे आनंदवन उभे करण्याचे, कृष्ठरोग्यांचे काळजी घेऊन त्यांना समाजिक पत मिळवून कामास लावणे हे बाबांचे कार्य माहिती नसलेली व्यक्ती विरळीच. याच तारखेला माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकापैकी एका पुस्तकाच्या लेखनाची सुरवात त्या लेखकाने केली होती. ते पुस्तक म्हणजे “श्यामची आई” आणि ते लेखक म्हणजे आपल्या सगळ्यांना आदर्शवत असलेले साने गुरुजी. साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल.

हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. खूप सारं शिकवणारं, शहाणपणा म्हणजे काय, किंचित कठोर माया म्हणजे काय हे ह्या पुस्तकाने शिकवलयं. हे पुस्तक वाचतांना डोळ्यातील पाणी, मनातील भावना उचंबळून येतात.

व्यक्तीपरत्वे, वयापरत्वे आवडीनिवडी ह्या बदलत जातात वा निरनिराळ्या असतात. परंतु काही गोष्टी ह्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही वयात आवडतातच. त्यांच दर्शन झाल्याबरोबर मन वा जीभ त्याला नकार हा देतच नाही, दिसल्याबरोबर कुठल्याही वयात ह्या गोष्टी साठी कायम हात पुढेच येतो. ती गोष्ट म्हणजे चाँकलेट.

आज व्हँलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस, चाँकलेट डे. चाँकलेट म्हंटलं की मला आधी आठवते ती माधुरी, लाखो दिलोंकी धडकन, तीची ती हम आपके है कौन मधील चाँकलेट खाणारी “निशा”बघीतली की दिल खल्लास. माधुरी आणि चाँकलेट दोन्हीही माझे प्रचंड आवडते. चाँकलेट त्यातल्या त्यात डेअरी मिल्क कँटबरीज ची आवड ही माझ्यात आणि माधुरीत काँमन.

आज व्हँलेंटाईन उत्सवातील चाँकलेट डे. त्यावरून दरवर्षी प्रमाणे उद्या रस्त्यांवर चाँकलेट कँडबरीज चे रँपर्स अस्ताव्यस्त पडलेले दिसतील ह्या विचाराने खरचं विषण्ण वाटतं.  असे सार्वजनिक ठिकाणी चाँकलेट, कँडबरीज चे रँपर्स बेजबाबदारपणे फेकलेले बघून सुजाण नागरिकत्व नावाची काही चीज असते ह्या वरचा विश्वासच उडतो.

मुळात हा असा वेगळा म्हणून काही चाँकलेट डे असतो हे आता आता खर तर समजायला लागलं आहे. कारण बोलता यायला लागल्यापासून आमचा चाँकलेट डे म्हणजे आईने सगळ्यांना एकाचवेळी वरच्या फळीवरच्या डब्यातून सगळ्यांना समसमान मोजूनमापून हातावर टिकवलेलं चाँकलेट म्हणजे आमचा चाँकलेट डे. दुकानात जावून स्वतः सर्रास चाँकलेट्स मनाने, न विचारता विकत घेऊन येण्याची प्राज्ञाच नसायची तेव्हा. आमच्या लहानपणी तर चाँकलेट्स म्हणजे कँटबरीज ही संकल्पना ही कळली नव्हती.

आमचे तेव्हाचे चाँकलेट्स म्हणजे आँरेंज पेपरमींटच्या गोळ्या, रावळगाव चाँकलेट पारले चाँकलेट्स. काही काळाने ती संकल्पना राजमलाई ह्या चाँकलेट पर्यंत येऊन थांबली. माहेरच्या आडनावाचे राजमलाई अजूनही खूप प्रिय आहे. तेव्हा बाबा पगार झाल्यावर एकदा रानडेंच्या दुकानातून स्ट्रॉबेरी चे रंग रुप आकार असलेले, साखरेचे चाँकलेट घेऊन द्यायचे त्याच खूप अप्रुप वाटायचं, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे आणि आनंद मनात तसाच तेवतोयं. मला वाटतं तेव्हा मिळणारी अल्प प्रमाणातील गोष्ट कदाचित जास्त आनंद देऊन जायची. वाट पाहून नंतर मिळणारी गोष्ट वेळेची किंमत समजवायची.

चाँकलेट्स अनेक फायद्यापैकी एक प्रमुख फायदा मध्यंतरी वाचनात आला. कँडबरी बाईट्स ह्या डिप्रेशन म्हणजेच मानसिक तणाव ब-याच प्रमाणात कमी करतात म्हणे. म्हणून मी तणाव यायच्या आधीच कँटबरीज खाल्याने तो तणाव आसपासही फिरकतं नाही. अशी मी मनाची समजूत घालून मस्त कँडबरीज चा आस्वाद घेत असते.

चला परत एकदा ह्या निमीत्ताने कँडबरीज ला न्याय देणार. लहानपणी आपण पुढे काय करिअर काय करायचं तर मनात सर्वात आधी यायचं आपण नक्की कँडबरीची फँक्टरी टाकायची. लहानपणची स्वप्नं पण खूप अफलातून असतात, नाही का?

परत एकदा मनापासून चाँकलेट डे च्या शुभेच्छा देऊन मनापासून आपल्या दातांची आणि असल्यास शुगरची काळजी घेऊन कँडबरीचा आस्वाद घेऊन बघा कसं मस्त तणावरहीत वाटतं ते, मग घरच्या लहानग्यांनी आश्चर्याने बघितलं तरीही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रोझ डे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रोझ डे…🌹” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावरपाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे.आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी हल्लीची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अखेरचा हा तुला दंडवत…! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ अखेरचा हा तुला दंडवत…! ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग

अखेरचा हा तुला दंडवत…!

रविवार दि ६फेब्रुवारी २०२२ चा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी अघटित अशी बातमी कानावर पडली. गानसम्राज्ञी लतादीदी गेल्या.  अवघा देश शोकसागरात बुडाला. जे स्वर ऐकत सकाळ व्हायची त्या स्वरांची संध्याकाळ झाला होती. गानसूर्य अस्ताला गेला. जणू दिवसातले, नव्हे जगण्यातलेच चैतन्य कोणीतरी काढून घेतले होते. संपूर्ण दिवसच उदासवाणा झाला होता. दिनकर मावळला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाल्या. सूर निमाले.

कविवर्य भा रा तांबेंचं एक गीत लतादीदींनी गाऊन अजरामर केलं आहे. ‘ मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा…’ दीदींच्या रूपाने हा गानसूर्य मावळला होता. याच गाण्यात सुंदर ओळी आहेत

जो तो वंदन करी उगवत्या

जो तो पाठ फिरवी मावळत्या

रीत जगाची ही रे सवित्या

स्वार्थपरायणपरा.

उगवत्या सूर्याला वंदन करणे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणे ही जगाची रीतच आहे. पण हा गानसूर्य अस्ताला गेल्यावर जगाने आपली ही रीत बदलली. या मावळत्या दिनकराला डोळे भरून बघण्यासाठी माणसांनी दाटी केली. घराघरात टीव्हीसमोर बसून या मावळत्या दिनकराचे अनेकांनी दर्शन घेतले. मुंबईत लोकांची दाटी आणि घराघरातील लोकांच्या डोळ्यात अश्रूंची दाटी. प्रत्येकाला जणू आपल्याच घरातील कोणीतरी गेल्यासारखे वाटले. गानसम्राज्ञी, गानसरस्वती, गानकोकिळा यासारखी कितीही विशेषणे तुम्ही लावा, ‘ लता ‘ याच नावाने प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते. ही ‘ लता ‘ प्रत्येकाच्या मनात अशी रुजली होती की ‘ तिचा वेलू गेला गगनावरी…’ स्वर्गापर्यंत हा वेलू जाऊन पोहोचला. बहुधा स्वर्गलोकीच्या देवांनी, गंधर्वांनी तिला सांगितलं असावं की आता बस झालं पृथीवर लोकांना रिझवणं. खूप प्रतीक्षा करायला लावलीस आम्हाला. आता आम्हालाही तू हवी आहेस.

त्या सुरांची जादूच अशी अनोखी होती. सोन्याच्या तारेसारखा लवचिक, मुलायम आवाज ! खरं तर या आवाजाला उपमाच नाही. दीदी दिसायला तुमच्या आमच्यासारख्याच. पण जेव्हा त्या गायला लागत तेव्हा त्या गळ्यातून गंधार बाहेर पडे. सरस्वतीची वीणा झंकारत असे, श्रीकृष्णाची बासरी स्वरांचे रूप घेऊन प्रकट होई. सकाळी भूपाळी, भजन, भक्तिगीतं म्हणून हा आवाज उठवायचा, संकटात आधार होऊन धीर द्यायचा, ‘ ऐ मेरे वतन के लोगो…’ म्हणत राष्ट्रभक्ती जागवायचा. ‘ सागरा प्राण तळमळला… ‘ या शब्दांनी अंगावर रोमांच उभे करायचा. ‘ मोगरा फुलला ‘, ‘ आनंदवनभुवनी ‘ यासारख्या गीतांनी एका वेगळ्याच आनंदरसाची बरसात करायचा. श्रीरामचंद्र कृपालू, बाजे रे मुरलीया बाजे सारखी गाणी वेगळ्या विश्वात घेऊन जायची. रात्रीच्या वेळी हा आवाज अंगाई गाऊन निजवायचा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ‘ जेथे जातो तेथे तू माझा सांगाती…’ असलेला हा आवाज होता. ( उगवतीचे रंग )

एक मुलगी नऊ दहा वर्षांची असल्यापासून श्रोत्यांसमोर गायला सुरुवात करते. पितृछत्र हरपल्यावर हीच चौदा पंधरा वर्षांची कोवळी पोर मोठी होऊन आपल्या घराची, भावंडांची काळजी घेते. दैवी सूर तर तिच्या गळ्यात असतोच. पण आपल्या मेहनतीने ती त्या सुरांना सौंदर्य प्राप्त करून देते. मिळेल तिथून शिकत जाते. शाळेत फारसे न गेलेली ही मुलगी पुढे स्वतःच्या बळावर शिकत जाते. पुस्तके वाचते तशीच माणसे वाचते. त्या सगळ्यातून जीवनाचे धडे घेते. स्वतःची तत्वे, नैतिक अधिष्ठान या गोष्टींशी कधीही तडजोड करत नाही. मिळेल त्या संगीतकाराकडून शिकत जाते. पण आयुष्यात आलेल्या या सगळ्या संकटांनी ती करपून जात नाही. तिचं आयुष्य म्हणजे जणू आनंदयात्री ! संगीत, प्रवास, क्रिकेट, खाणं आणि खाऊ घालणं, नर्म विनोद, नकला या सगळ्या सगळ्या गोष्टींचा आनंद तिने लुटला. लोकांनाही भरभरून दिला. तिच्या सुरांचं झाड अखेरपर्यंत बहरतच राहिलं. साडेसात दशकं हे झाड गात होतं, बहरत होतं आणि ‘ आता विसाव्याचे क्षण…’ उपभोगत होतं !

संत कबीर म्हणतात

कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हं रोये

ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोये ।।

दीदी अशीच करणी करून गेल्या. अवघं जग हळहळलं. राष्ट्रध्वज अर्ध्यावर आले. एका भारतरत्नाला अखेरचं वंदन करण्यासाठी पंतप्रधान आणि अवघे मान्यवर अंत्यदर्शनाला आले. ‘ जीवन कृतार्थ होणं ‘ ते अजून वेगळं काय असतं ! जगावं तर असं जगावं आणि मरावं तर असं मरावं !

आता दीदी देहानं आपल्यात नाहीत. पण त्यांचे सूर चिरंतन आहेत. ते सदैव आपली साथ करत राहतील. ‘ नाम गम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान हैं , गर याद रहे. ‘ तेव्हा दीदी ‘ अखेरचा हा तुला दंडवत…! ‘

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆‘स्वरलता’ – बाँध प्रीती फूल डोर…. भूल जाना ना ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

(स्वरलता- (२८ सप्टेंबर १९२९- ६ फेब्रुवारी २०२२))

‘स्वरलता’ – बाँध प्रीती फूल डोर…. भूल जाना ना ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

प्रिय वाचकांनो,

नमस्कार! 

लता मंगेशकर, अशी व्यक्ती जिच्या नावाचा महिमाच पुरेसा होता, तिच्या सुरांच्या जादूने भारलेल्या आवाजाच्या दिवाण्यांसाठी! ६ फेब्रुवारी २०२४ ला तिला जाऊन २ वर्ष होतील. त्या गंधर्वगायनी कळांना या तारखेशी कांहीही देणे घेणे नाही. त्यांची मनमोहक सुरेल स्वरमधुरिमा आजही तशीच शाबूत आहे. जशी स्वर्गातील नंदनवनाच्या रंगीबेरंगी सुमनांची सुरभी कालातीत आहे, तसेच लताच्या स्वरांचे लाघवी लावण्य वर्षानुवर्षे सुगंधाचा शिडकावा करीत आले आहे आणि आमच्या दिलांच्या गुलशनला याच प्रकारे वर्षानुवर्षे असेच प्रफुल्लित ठेवीत राहील. तिने गायलेल्या एका गाण्यात हीच भावना अत्यंत सुरेख रित्या प्रकटली आहे, ‘रहें ना रहें हम महका करेंगे, बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में’ (चित्रपट ‘ममता’, सुंदर शब्द- मजरूह सुल्तानपुरी, लोभस संगीत-रोशन).

आमच्या कित्येक पिढ्या सिनेसंगीताच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत, त्यांनी बघितलंय   सिनेसंगीत कसे बदलत गेले ते! मात्र त्यात एक ‘चीज’ कधीच बदलली नाही, ती म्हणजे गायनाचा अमृतमहोत्सव पार करणाऱ्या लताच्या आवाजाचा गुंजारव! याच स्वरांनी आमचे कोडकौतुक करीत अंगाई गीत ऐकवले, यौवनाच्या मंदिरी प्रणयभावना प्रकट करण्यासाठी स्वर दिलेत, बहिणीच्या मायेने ओथंबलेल्या राखीचे बंधन बहाल केले. इतकेच नव्हे तर, मनोरंजन क्षेत्रातील ज्या ज्या प्रसंगातील ज्या ज्या स्त्रीचे रूप, स्वभाव अन मनाची कल्पना आपण करू शकतो, ते ते सर्व कांही या स्वरात समाहित होते. श्रृंगार रस, वात्सल्य रस, शांत रस, इत्यादी भावनांना जेव्हां लताच्या स्वरांची साथ लाभायची तेव्हां तेव्हां त्या बावनकशी सोन्यात जडलेल्या रत्नांसारख्या उजळून निघायच्या!

मैत्रांनो, आपल्याप्रमाणेच माझ्या जीवनांत देखील लताच्या स्वरांचे स्थान असे आहे की, जणू सात जन्मांचे कधीही न तुटणारे नाते! लताच्या जीवनचरित्राविषयी इतके भरभरून लिहिल्या आणि वाचल्या गेले आहे की, आता वाचक म्हणतील, “कांही नवीन आहे कां?” मी लताच्या करोडो चाहत्यांपैकी एक आहे. पौर्णिमेच्या चंद्राला बघून जशी सागराला भरती येते, तद्वतच लताच्या आठवणीने माझ्या मनात उचंबळून आलेल्या भावना इथे सामायिक करते (शेअर करते). मागील कांही दिवसांत लताच्या दोन गाण्यांनी मला भावविवश होऊन वारंवार ती ऐकण्यास भाग पाडले आणि मनाच्या अथांग गाभाऱ्यापर्यंत ठाव घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोनही चित्रपटांची गीते निव्वळ शुद्ध हिंदी शब्दांची पराकाष्ठा करण्याचा आग्रह धरणारे गीतकार पंडित नरेन्द्र शर्मा यांनी लिहिली आणि त्यांना अभिजात संगीतसाज चढवला महान संगीतकार ‘स्वरतीर्थ’ सुधीर फडके यांनी!

१९५२- कोलकत्ता येथील अनोखा मिश्र संगीत महोत्सव -जेव्हा लताला उस्तादजींच्या आधी गाणे गावे लागले!      

या चार रात्री चालणाऱ्या मिश्र संगीत महोत्सवात मिश्र अर्थात ध्रुपद-धमार, टप्पा-ठुमरीबरोबरच सिनेसंगीत देखील समाविष्ट करण्यात आले होते. एका रात्री लता आणि  शास्त्रीय संगीताचे महान गायक उस्ताद बड़े गुलाम अली खान साहेबांचे गायन होते. पण आयोजकांनी लताला उस्ताद साहेबांच्या अगोदर गाण्याचा क्रम दिला. हे संगीत समारोहाच्या नियमांच्या चौकटीतून पाहिल्यास उस्तादजींचा अनादर करणे होते. लताला हे चांगलेच माहीत होते, म्हणून तिने आयोजकांना असे करण्याची मनाई केली, पण जेव्हां त्यांनी हे ऐकले नाही, तेव्हां तिने सरळ उस्ताद साहेबांकडेच तक्रार केली आणि म्हणाली की मी हे करू शकणार नाही. हे ऐकताच खांसाहेब जोराने हसले आणि तिला म्हणाले, ‘जर तू मला मोठा मानत असशील तर, माझे म्हणणे ऐक आणि तूच आधी गा,’ अन मग काय, कोलकत्तातील ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.

लताने त्यांचे म्हणणे ऐकले तर खरे, पण तिने आपल्या हिट सिनेमांतील गाण्यांना वगळून निवड केली एका मधुरतम गीताची, जे बांधले होते जयजयवंती रागात. १९५१ साली आलेल्या ‘मालती माधव’ नांवाच्या सिनेमातील हे गाणे होते, ‘बाँध प्रीती फूल डोर, मन ले के चित-चोर, दूर जाना ना, दूर जाना ना…. ‘. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या भावपूर्ण शब्दांना मधाळ संगीताचा साज चढवला होता सुधीर फड़के यांनी! या गाण्याचा असा कांही प्रभाव पडला की, तिने प्रेक्षकांना या संध्याकालीन संगीतलहरींच्या जादूने बांधून ठेवले. प्रेक्षकच नव्हे तर उस्तादजी सुद्धा लताच्या गायकीने प्रभावित झाले. 

नंतर जेव्हां खां साहेब मंचावर आले तेव्हां त्यांनी लताला सन्मानाने मंचावर स्थान दिले आणि तिची खूप तारीफ केली. त्या वेळेपर्यंत जे गाणे प्रसिद्ध झाले नव्हते, ते त्या दिवशी हिट झाले! मित्रांनो, हा लेख लिहिस्तोवर मी या गाण्याविषयी फारसे ऐकले नव्हते. मात्र जेव्हांपासून ते लक्षपूर्वक ऐकले आहे, तेव्हापासून त्याच्या जादूने भारल्यासारखे झाले आहे. लताचे हे गाणे यू ट्यूब वर उपलब्ध आहे. (शिवाय सुधीरजींच्या आवाजात देखील!) आपण देखील लताच्या या अनमोल गाण्याचा आनंद घ्या आणि माझ्यासोबतच आपणही एका विचाराने त्रस्त व्हाल की, ‘मालती माधव’ या सिनेमाची एकमात्र स्मृती असलेले हे गाणे चालले कां नाही?   

लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’

दुसरे गाणे आहे, भक्ती आणि प्रेमभावाने रसरसलेले असे गाणे ज्याचे एक एक शब्द जणू अस्सल दैदिप्यमान मोतीच, अन त्यांची चमक वृद्धिंगत करणारे कर्णमधुर संगीत सुधीरजी (बाबूजी) यांचे! जर अशी जोडी सोबत असेल तर, लताच्या सुरबहारचा एक एक तार वाजणारच ना. ‘भाभी की चूड़ियाँ’ (१९६१) सिनेमाचे गाणे होते, ‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’ (राग–यमन). रुपेरी पडद्यावर एका सुवासिनीच्या रूपात चेहेऱ्यावर परम पवित्र भाव असलेली मीना कुमारी. मी कुठेतरी वाचले होते की, या गाण्यावर सुधीरजी आणि लताने खूप मेहनत घेतली आणि गाण्याच्या वारंवार रिहर्सल झाल्या. सुधीरजींना या गाण्यापासून खूप अपेक्षा होत्या. हे गाणे श्रोत्यांना खूप पसंत पडेल अशी त्यांना आशा होती. पण झाले याच्या अगदी विपरीतच, याच सिनेमाचे दुसरे गाणे, ज्याच्या प्रसिद्ध होण्याची साधारणच अपेक्षा होती, ते सर्वकालीन प्रसिद्ध गाणे म्हणून गाजले. ते होते, ‘ज्योति कलश छलके’! भूपाली रागावर आधारित या गाण्याला शास्त्रीय संगीतावर बेतलेल्या चित्रपट गीतात अति उच्च स्थान प्राप्त झाले. कदाचित त्याच्या छायेत ‘लौ लगाती’ ला रसिकांच्या ह्रदयात ते स्थान मिळू शकले नाही. मैत्रांनो, आपणास ही विनंती की, आपण हे सुमधुर गाणे अवश्य बघा-ऐका आणि त्यातील शांति-प्रेम-भक्तिरसाचा अक्षत आनंद घ्या!

लताच्या असंख्य आठवणी आठवत असतांना नेमकं काय वाटतंय, त्यासाठी तिच्याच अमर (१९५४) या चित्रपटातील एक गाणे आठवले. (गीत-शकील बदायुनी, संगीत नौशाद अली)    

“चाँदनी खिल न सकी, चाँद ने मुँह मोड़ लिया

जिसका अरमान था वो बात ना होने पाई

जाने वाले से मुलाक़ात ना होने पाई

दिल की दिल में ही रही बात ना होने पाई…”

प्रिय वाचकांनो, लताच्या गीतमंजूषेतील या दोन अमूल्य रत्नांच्या दिव्य प्रकाशात उजळलेल्या स्वरमंदिरात विराजित गानसरस्वतीच्या चरणी ही शब्दसुमने अर्पित करते!

धन्यवाद 🙏🌹

टीप : 

*लेखात दिलेली माहिती वरील लेखन साहित्य आणि लेखिकेचे आत्मानुभव तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.

**गाण्यांची माहिती सोबत जोडत आहे. यूट्यूबवर तुम्हाला गाण्यांच्या शब्दांवरून लिंक्स मिळतील.

  • ‘बांध प्रीती फूल डोर’- चित्रपट -‘मालती माधव’ (१९५१) – गायिका-लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार-सुधीर फडके       
  • ‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मै प्रीत बाती’- चित्रपट -भाभी की चूड़ियाँ (१९६१) – गायिका-लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार-सुधीर फडके

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – ६ फेब्रुवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपल्यातील क्षमता… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

आपल्यातील क्षमता… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हे आपल्याशी निगडित आहे. आपल्या मनाची ताकद खूप मोठी आहे हे आपण खूप वेळा ऐकतो. आता ती मिळवायची कशी? वाढवायची कशी?

हे बघू या.

एक असा सिद्धांत आहे, सृष्टीची निर्मिती झाली त्या वेळी ऊर्जा भरपूर होती. पण त्याला ठराविक आकार नव्हता. ज्यावेळी एकेक जीव निर्माण होऊ लागला त्यावेळी त्या ऊर्जेला आकार मिळाला.

ही ऊर्जाच प्रत्येकाला जिवंत ठेवते. आपण म्हणतो विज्ञान खूप प्रगत आहे. पण सगळ्याच गोष्टी त्यातून निर्माण होत नाहीत. जसे रक्त हे द्यावेच लागते. अशा काही गोष्टी शरीरच निर्माण करु शकते. एकच ऊर्जा प्रत्येकाला जिवंत ठेवते. हाच मोठा चमत्कार आहे. याला आपण विविध नावाने ओळखतो. देव, निसर्ग शक्ती, दैवी शक्ती, वैश्विक शक्ती या पैकी कोणतेही नाव देतो. या शक्ती मध्ये अफाट ताकद असते. याच ऊर्जेचा आपण एक अंश आहोत. जसे आपण घरात विविध उपकरणे वापरतो. फॅन,ट्यूब,मिक्सर पण या उपकरणांना एकच शक्ती चालवते ती म्हणजे वीज. याच प्रमाणे आपल्या सर्वांना एकच ऊर्जा चालवत असते.

ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी त्या ऊर्जेच्या जवळ असतो.

याचा अनुभव आपण लहान मुलांमध्ये घेतो. पण आपण जसे मोठे होतो तसे विविध अनुभव, विकार, अहंकार या मुळे या ऊर्जे पासून दूर जातो. आपल्याला सर्वांनी ओळखावे, आपण सगळ्यात उठून दिसावे असे वाटते. त्या साठी खूप धडपड करतो. या मुळे त्या ऊर्जे पासून अधिकच दूर जातो. कारण माझे अस्तित्व नष्ट होईल की काय अशी भीती असते. मग त्यातून केविलवाणी धडपड सुरु होते. कधीकधी ती हास्यास्पद होते. हे का होते तर आपण व ही ऊर्जा यात अंतर पडते व स्वतःला सिद्ध करण्यातून ते अंतर वाढतच जाते.

आणि मनाला त्रास होतो. हे अंतर कमी झाले तरच ती ऊर्जा वाढते व कार्यक्षम होते. या साठी स्वतःचे निरिक्षण, परीक्षण करणे व स्वतःची क्षमता वाढवणे आवश्यक असते. या साठी आपण स्वतः बरोबर राहणे आवश्यक असते. या साठी सर्वात उत्तम उपाय मौन आहे. मौनात सुरुवातीला अनेक विचारांचे जणू युद्धच होते. पण हळूहळू ते शांत होते. आणि या शांत मनात जे सकारात्मक ऊर्जेचे तरंग उठतात ते जग व्यापून टाकतात. म्हणजेच आतील व बाहेरील ऊर्जा यातील अंतर कमी होऊ लागते.

हे अंतर कमी होणे या साठी मन शांत होणे आवश्यक असते. त्या साठी पुढील गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.

१) दोन वेळा मेडिटेशन करणे

स्वतः बरोबर राहण्यासाठी विचारांना शांत करावे लागते त्या साठी मेडिटेशन आवश्यक आहे. सलग ४० दिवस रोज दोन वेळा मेडिटेशन केले तर मानसिक ताकद प्रचंड वाढते. आपल्या समस्या दूर होतात. आपल्याला सूचना ( इंट्युशन ) मिळतात. आपण निरोगी होतो.

२) निसर्गात जाऊन निसर्गाची प्रशंसा करणे. निसर्ग चमत्कार लक्षात घेणे.

आपण बऱ्याच गोष्टी जन्मापासून बघत असतो. जसे वारा, पाऊस, फुले, ऊन, सुगंध पण त्या कडे फार लक्ष देत नाही. हे सगळे जागरूकतेने बघावे. त्याचे कौतुक करावे. गवतावर चालावे, झाडाला मिठी मारावी, झऱ्यात नदीत वाहत असलेल्या पाण्यात पाय सोडावेत. ऊन अंगावर घ्यावे. वारा भरून घ्यावा. निसर्गाशी एकरूप व्हावे. यातून आपल्याला निसर्गशक्ती मिळते.

३) आज किमान  तास कोणा विषयी पूर्वग्रह ठेवणार नाही.

आपण आपले अनुभव, इतरांनी केलेली वर्तणूक, देवाण घेवाण अशा अनेक कारणांनी प्रत्येकाला एक किंवा अनेक लेबल्स लावून टाकतो. त्या मुळे कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा कोणीही समोर आले तरी प्रथम आपण लावलेले लेबल समोर येते. हेच आपल्याला दूर ठेवायचे आहे. सर्वांकडे नवीन दृष्टीने बघायचे. भूतकाळ, त्यातील घटना, भूतकाळात घडलेले विसरून जायचे. आणि पुढे काय होईल या विचारला दूर ठेवायचे. जितके जास्त विचार तितक्या जास्त अडचणी. म्हणून सगळ्यांकडे त्रयस्थपणे बघायचे व वागायचे.

वरील तीन गोष्टींचा अवलंब करुन आपण आपल्यातील क्षमता वाढवू शकतो.

तर मग आपल्यातील क्षमता वाढवू या.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी कल्हईवाला बनतो… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

मी कल्हईवाला बनतो ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग

मी कल्हईवाला बनतो…

खूप दिवसांपूर्वी कधी नव्हे तो कल्हईवाला माझ्या दारी आला होता. त्याच्याकडून मी मग  माझ्याकडे असलेल्या पितळेच्या भांडयांना कल्हई करून घेतली होती. त्याचं व्यक्तिमत्व, कल्हई करण्याची पद्धत, तो त्यासाठी वापरत असलेलं सामान, वापरत असलेले पदार्थ आदींचे निरीक्षण करून मी त्यावर एक लेख लिहिला होता. तो कल्हईवाला मला फार आवडला होता. त्याने माझ्या बालपणीच्या स्मृती जागृत केल्या होत्या. त्याने कल्हई केलेली भांडी पाहून मला खूप समाधान वाटले. त्याचे कल्हईचे काम मी जीवनाशी जोडले. माणसाच्या मनालाही कधी कधी असाच गंज चढतो. त्यालाही तो काढून कल्हई करण्याची गरज असते वगैरे अशा छान छान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला.

लेख लिहून झाल्यावर तो माझ्या वाचकांसाठी व्हाट्सअप तसेच फेसबुकच्या भिंतीवर टाकला. वाचकांकडून तो खूप आवडल्याचा प्रतिसाद यायला लागला. अनेकांनी आपल्या जुन्या स्मृती जागृत झाल्याचे सांगितले. कोणाला तो कल्हईचा विशिष्ट वास आठवला. कोणाला त्या लेखात दिलेले ‘ लावा भांड्याला कल्हई ‘ हे गाणं आवडलं वगैरे. हे सगळं पाहून आपले श्रम सार्थकी लागल्याचे मला वाटले.

दुसऱ्या दिवशी हा लेख मी ईमेलने एका वर्तमानपत्रासाठी पाठवून दिला. तीनचार दिवसातच मला त्या संपादकांचा उलट टपाली संदेश आला की आम्ही तुमचा लेख आमच्या पेपरसाठी घेत आहोत. तुमचा एक पासपोर्ट साईझ फोटो पाठवून द्यावा. मला मोठा आनंद झाला. मी त्वरेने माझा फोटो पाठवून दिला. पेपरमध्ये लेख कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. आणि धन्य तो मंगळवारचा दिवस उजाडला. एका नामांकित पेपरच्या पुरवणीत माझा लेख आला होता. सकाळी आठ पासून मला त्या संदर्भात फोन यायला सुरुवात झाली. त्यावरून मला कळले की आज अमुक अमुक पेपरमध्ये आपला लेख आला आहे. मी माझ्याकडे नेहमी पेपर टाकणाऱ्या मुलाला त्या पेपरबद्दल विचारणार तोपर्यंत तो दुसरा पेपर टाकून ( खरं म्हणजे फेकून ) पसार झाला.

त्यानंतर पहिला फोन आला तो औरंगाबादहून. आमचे झालेले संभाषण असे

हॅलो, मी औरंगाबादहून बोलतो. तुम्ही भांड्यांना कल्हई करता का ?

(मी उडालोच…!) कोण मी ? नाही बुवा.

अहो, असं काय करता ? पेपरमध्ये लेखाखाली तुमचा नंबर दिला आहे.

(आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला) मी म्हटले, ‘ अच्छा, असं होय. पण अहो’ मी तो लेख लिहिला आहे. मी कल्हईवाला नाही.

बरं, पण भेटला तर सांगा. नंबर द्या त्याचा किंवा भेटला तर पाठवून द्या. 

मी म्हटलं, ‘ हो, हो अगदी नक्की…’

परत दुसरा फोन अगदी तसाच. मला लोकांचं मोठं नवल वाटू लागलं. यांना एवढंही समजूही नये का की हा दिलेला नंबर लेखकाचा आहे म्हणून ! या सगळ्या धक्क्यातून सावरून मी बाहेर पडलो. आता प्रत्यक्ष पेपर पाहिल्याशिवाय काही लक्षात येणार नाही तेव्हा पेपर आणायचा म्हणून निघालो. घराच्या थोडेसेच पुढे गेलो. तो एका ए सी पी ऑफिसमधून फोन. मी अमुक अमुक पोलीस स्टेशनमधील हवालदार बोलतो आहे. पेपरमध्ये तुमचा लेख वाचला. त्याचे माझे झालेले संभाषण ( उगवतीचे रंग )

तुम्ही कल्हई करता का ?

नाही. मी तो लेख लिहिला आहे.

मग तो कल्हईवाला तुमच्या ओळखीचा आहे का ?

नाही.

त्याचा नंबर आहे का ?

नाही.

कुठे राहतो ?

माहिती नाही.

तुम्हाला कसा आणि कुठे भेटला ?

अहो, तो दारावर आला होता. त्याच्याकडून माझ्या भांड्यांना कल्हई करून घेतली.

ठीक आहे. तो भेटला तर त्याचा नंबर घ्या. आम्हाला या नंबरवर कळवा. आम्हाला महत्वाचे काम आहे.

असे म्हणून हवालदार साहेबांनी फोन ठेवला. मी मात्र हवालदिल झालो. या महाशयांचे काय काम असावे कल्हईवाल्याकडे ? पोलीस स्टेशनमध्ये कधी तांब्यापितळेची भांडी पाहिल्याचे मला आठवत नाही. म्हटलं जाऊ द्या. आपल्याला काय करायचे ! नाहीतरी अलीकडे सगळ्याच गोष्टींना कल्हई करायची गरज आहे !

अशा प्रामाणिक विचारात रस्ता पार केला. पेपरवाल्याकडे आलो. त्याला म्हटलं, ‘ बाबा, अमुक अमुक पेपर आहे का ?

आहे ना साहेब.

त्याला पुरवणी आहे का ? ( कधी कधी एखाद्या पेपरमध्ये त्यांचे पुरवणीचे पान टाकायचे राहून जाते )

आहे ना साहेब. त्याने पाहून खात्री केली.

मी पैसे दिले, पेपर घेऊन मार्गाला लागलो. रस्त्यात पेपर उलगडून पाहिला. त्यात कल्हईवाल्याच्या छायाचित्रासह माझा  लेख आला होता. संपादक महाशयांनी लेखाच्या वर माझे नाव, फोटो छापला होता. लेखाच्या मध्यभागी ‘ कल्हईवाला ‘ असे ठळक शीर्षक होते. आणि लेखाच्या खाली संपर्कासाठी क्रमांक म्हणून माझा फोन नंबर दिला होता. आता लोकांचा काय गोंधळ झाला असावा याचा उलगडा मला झाला. लेखाच्या खाली दिलेला नंबर कल्हईवाल्याचा समजून त्यांनी मला फोन केला होता.

त्या दिवशी मला असे मोजून सातआठ फोन आले. एकाने तर चक्क विचारले की माझ्याकडे तांब्यापितळेची जुनी भांडी आहेत. ती वितळवून तुम्ही त्याच्या देवांच्या मूर्ती घडवून द्याल का ? त्या दिवशी मला अशा खूप नवनवीन गोष्टी कळल्या. नवीन उलगडा झाला. आपल्या लेखातून मनाला थोडीफार कल्हई करण्याचा आपण प्रयत्न करतो पण ते  काही बरोबर नाही. आपल्याला आता प्रत्यक्ष कल्हईवाला होण्याची आवश्यकता आहे असेही वाटून गेले. ज्याची लोकांना गरज आहे असा एक नवीन व्यवसाय गवसला. आता कल्हई शिकून घेण्यासाठी तरी त्या कल्हईवाल्याला भेटणे आवश्यक झाले. तो पुन्हा कधी भेटतो बघू या. यावेळी मात्र मी त्याचा नंबर घ्यायला विसरणार नाही. त्या पोलीस स्टेशनला पण कळवावा लागेल ना !

माझ्या मनात ‘डफलीवाले डफली बजा’ च्या चालीवर उगाचच एक गाणे आकार घेऊ लागले.

कल्हईवाले, इधर तो आ

सारी दुनिया बुलाती हैं

तेरी कल्हईसे मेरे बर्तनपर क्या रंग आने लगा हैं

चांदी के जैसा बर्तन ये मेरा मुझको लगने लगा हैं

इधर भी आओ, उधर भी जाओ

बुला रहे हैं दुनियावाले…

कल्हईवाले, इधर तो आ..

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सकल उलट चालले….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “सकल उलट चालले…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

सुमारे पन्नासेक वर्षांपूर्वी एक व्यंगचित्र मालिका दिवाळी अंकात आली होती. त्यातील कल्पना होत्या  श्री पु ल देशपांडे यांच्या आणि ती चित्रे रेखाटली होती व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडुलकर यांनी आणि त्याचे शीर्षक होते,

‘सकल उलट चालले’

आज ते शीर्षकच आठवतंय. कारण आज समाजाच्या परिस्थितीत मला समाजाचा उलटा प्रवास दिसतो आहे.

आमच्या प्राथमिक शाळेत आम्हाला एक धडा होता त्याचं नाव होतं ‘गर्वाचे घर खाली’. त्याकाळी गर्व हा एक दुर्गुण समजला जात असे. त्या धड्यात मारुतीने भीमाचे गर्वहरण कसे केले याची कथा होती. थोडक्यात काय तर गर्व हा दुर्गुण समजला जात असे. आज मात्र सर्व प्रसार माध्यमे आणि सगळ्या ठिकाणी प्रत्येक जणच ‘मी अमुक-तमुक असल्याचा मला गर्व आहे’ असे बोलत असतो.  दुर्गुणाला सद्गुण ठरवण्याचा आजचा काळ. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते

‘सकल उलट चालले’

जरा मोठे झाल्यावर आमच्या हायस्कूलमध्ये काही गडबडगुंडा करणारी मुले, त्यांनी काही चुकीचे कृत्य केल्यास आमचे शिक्षक म्हणायचे “का रे,  माज चढला का तुला? दोन छड्या मारून तुझा सगळा माज उतरवून टाकेन”.  म्हणजे  माज हा शब्द दुर्गुण समजला जात असे.  विशेषत: हा शब्द जनावरांसाठी वापरला जात असल्याने, माणसाला पशूच्या जागी कल्पून हे दुर्गुणात्मक विशेषण लावले जात असे.  परंतु आज कित्येक जण स्वतःचा उल्लेख करताना सुद्धा “मला अमुक-तमुक असल्याचा गर्वच नाही तर माज आहे”  असा उल्लेख अभिमानाने करतात म्हणूनच असे म्हणावेसे वाटते

‘सकल उलट चालले’

भाषे मधले अनेक गलिच्छ शब्द पूर्वी असभ्य समजले जायचे. परंतु सर्व असभ्य समजले जाणारे अनेक शब्द आज सर्रास प्रसिद्धी माध्यमांवर मोठमोठ्या सुशिक्षित सुजाण म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडी दिसतात. त्याच प्रमाणे अनेक प्रकारच्या सोशल मीडियावर विविध मजकूर पाहणारे लोक त्यांना न आवडणाऱ्या मजकुरावर अत्यंत गलिच्छ आणि अश्लील समजल्या जाणाऱ्या भाषेमध्ये स्वतःच्या कॉमेंट करताना आढळतात.  याला ट्रोलिंग करणे असे म्हणतात, असे म्हणे ! काही का असेना परंतु आमच्या काळी चार चौघात उच्चारणे जे असभ्य समजले जायचे तसे आता समजले जात नाही.  ही समाजाची प्रगती ही पीछेहाट की दुर्दैव ?

आज आपण पाहतो आहोत आणि चर्चिलेही जाते की राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.  परंतु समाजातील विविध प्रकारचे नेते म्हणून समजले जाणारे, त्याच प्रमाणे उद्याचे नेते म्हणून उल्लेख केले जाणारे किंवा गल्लोगल्ली नेत्यांच्या पोस्टरवर त्यांचे कार्यकर्ते म्हणून ज्यांचे फोटो मिरवले जातात, अशांची व्यवहारातली भाषा पाहिल्यास, आमच्या वेळी असभ्य शिवराळ समजली जाणारी भाषा सध्या सर्रास अनेकांच्या तोंडी दिसून येते. त्यामुळे हा समाजाचा प्रवास सभ्यते कडून असभ्यतेकडे चालला आहे असे म्हणावेसे वाटते.

एकूणच संपूर्ण समाजाचेच गुन्हेगारीकरण चालू आहे काय ?  असे विचारावेसे वाटते.

किंबहुना भाषेचेही गुन्हेगारीकरण चालू आहे काय?  सर्वसामान्य माणसाच्या तोंडी गुन्हेगारांची भाषा ऐकू येते काय?  अशी शंका घ्यायला जागा आहे.

हे समाजाचे स्वरूप असेच बिघडत जाणार आहे काय ?

मग सुप्रसिद्ध कवी कै नामदेव ढसाळ यांच्या ‘माणसाचे गाणे गावे माणसाने’ या कवितेचा पूर्वार्ध सतत डोक्यामध्ये रुंजी घालायला लागतो. कै नामदेव ढसाळ यांच्या द्रष्टेपणाला सलाम करावा वाटतो.

अर्थात त्यानंतर त्यांच्या कवितेचा उत्तरार्धही खरा ठरावा असे मनापासून वाटते.  मग आम्ही म्हणतो की नंतर तरी  माणसे गुन्हेगारी सोडून माणसाचेच गाणे गातील काय ?

आमच्या जिवंतपणी तरी ही वेळ येईल असे दृष्टीपथात येत नाही.  परंतु आमची मुले-नातवंडे तरी माणुसकीने वागवली जातील काय हाच प्रश्न मनाला कुरतडत असतो.

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

Email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गांधीजी…एक स्मरणगाथा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “गांधीजी…एक स्मरणगाथा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आज 30 जानेवारी,. गांधीजींची पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी महात्मा गांधी ह्याचं नाव अग्रस्थानी घेता येईल.आपल्या आधीची पिढी जास्त भाग्यवान. त्यांनी अशा अनेक थोरपुरूषांची कामगिरी स्वतः बघितली, जवळून अनुभवली.आमच्या पिढीपासून बाकी सगळ्यांना त्यांची थोरवी वाचून त्यांची महती कळली.मात्र आमच्या पिढीपासून कोणाला पारतंत्र्याची झळ पोचली नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसा, सत्यवचन,द्रुढनिर्धार ह्या गुणांपैकी सगळ्यात जास्त मला भावलेला गुण म्हणजे त्यांचे सत्यवादी असणे.

कधी आपण आपल्या स्वतः च्या भुमीकेसाठी स्वतःच्या नजरेतून योग्य असतो,तेव्हा कदाचित दुसऱ्याच्या नजरेतून आपण चुकीचे असतो.पण आपले अंतर्मन आपल्याला सत्य सांगत असते फक्त ती स्विकारण्याची आपल्यात ताकद हवी.खूपदा आपण आपल्या चूका मनातल्या मनात  कबूल करीत असतो पण ती जगासमोर मांडण्याचे धारिष्ट्य आपल्यात नसतं.आणि इथेच आपल्या सारख्या सामान्य माणसापेक्षा ह्या सत्यवादी महापुरूषाचे वेगळेपणं उठून दिसतं.

अगदी कधीही वेळात वेळ काढून महात्मा गांधींचे आत्मव्रुत्त म्हणजेच “सत्याचे प्रयोग”हे पुस्तक वाचा.त्यात त्यांच्या हातून घडलेल्या चूका त्यांनी नुसत्या सांगितल्याच नव्हे तर पुस्तकात छापून जगजाहीर केल्या आहेत.सहसा केलेल्या चूका लपविणारी खूप माणसे बघितली पण आपल्या चूका कोणाला माहीत नसूनही पुढच्या कित्येक पिढ्यांसमोर जगजाहीर होतील हे समजून उमजून देखील पुस्तकांत छापणारा अवलिया आगळावेगळाच.

गांधीजींवरील पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेले पुस्तक पण खुप वाचनीय. वाचले नसेल तर जरूर वाचा एवढच म्हणेन.

खरोखरच अशा वेगवेगळ्या गुणांच्या छटा असलेले अनेक थोरपुरूष या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झटले,लढले म्हणून आजचा हा स्वातंत्र्यात असलेला  सोनियाचा दिन आम्हा लोकांना दिसतोय.अशा ह्या सगळ्या थोरपुरूषांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझ्या मनांतील राम” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? विविधा ?

“माझ्या मनांतील राम” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण विश्वात नोंदवला गेला. पाचशे वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिर अखेर पूर्ण होऊन त्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनमोहक, सुहास्यवदन, राजीव लोचन असलेली रामलल्ला बालमूर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या अशा एका ऐतिहासिक क्षणाने दाखवून दिले आहे की धर्म आणि श्रध्दा कधीही तसूभर कमी होत नाही.सत्य आणि न्याय यांचाच विजय होत असतो.

ज्याला शब्दरूपी चित्रित केलं महर्षी वाल्मिकींनी, ज्याला मोठ्या कौतुकाने, प्रेमानं गायलं तुलसीदासांनी, समर्थांनी ज्याला आळवलं असा प्रभू श्रीराम, ज्याने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, रावणाचा तसाच कित्येक राक्षसांचा वध केला असा प्रभू श्रीरामचंद्र, सृष्टीवरच्या अवघ्या जीव-जंतुना ज्याने कृतार्थ केले आणि करत राहतो असा प्रभू श्रीरामचंद्र. कित्येक जणांनी त्यावर लिहिलं, गायलं, चित्रित केलं, त्यावर लिहिण्याचा, त्याचा नाम गाण्याचा, त्याच रूप चितरण्याचा तसा कित्येक माध्यमातून अनेक प्रकारे अनुपम आनंद लुटला, तरी तो नेहमीपेक्षा फार फार वेगळा उरतो. त्याच्या नामाची ओढ खुणावत राहते, रूपाची माधुरी भुरळ घालत राहते. दरवेळी नव्याने…

ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अस सौंदर्य, पराक्रम, कृपा, असणारा प्रभू श्रीरामचंद्र तो मुळी दिसतोच रामासाररखा…

अनेक संत, महात्मे, भक्तांच्या मांदियाळीने ही रामकथा ओघवती प्रवाही नि जीवंत ठेवली. त्यात तुलसीराम, एकनाथ भागवत, समर्थ रामदास, गोंदवलेकर महाराज या सारखे अनेक रामभक्तांचं अपूर्व योगदान आहे.श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर तर अनेक ग्रंथ पूर्वीपासून उपलब्ध आहेत आणि आजही त्यात नव्याने भर पडत असतेच.आजच्या काळाशी, समाजमनाशी, त्यांच्या जीवनव्यवहाराशी सुसंगत जोडली जाते.ते अभ्यासक, लेखक, संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रभूर्ती आपआपले विचार जेव्हा मांडतात तेव्हा तुमच्या आमच्या जीवनाला एक निश्चित आयाम, दिशा मिळून जाते.इतकच नाही तर त्या प्रभावाने काही वेळा तर जीवनाची दिशा सुध्दा बदलते.आता माझीच बदललेली पहाना…

सर्वसामान्य माणसांप्रमाणेच मी देखील सर्व षड्ररिपुयुक्त, शीघ्रकोपी, संयमाचा अभाव…तरी बर्‍यापैकी वाचन, मनन, असून मन अशांत, अस्वस्थ राहिले होते. एक दिवस सद्गुरुंच्या दर्शनाचा योग आला, त्यांच्या सानिध्यात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या अनेक घटनां ते सांगताना म्हणाले,

“सात हजार वर्षानंतरही रामाचे स्मरण केले जात आहे, कारण त्यांनी हजारो पिढ्यांपासून लोकांना चांगुलपणा जोपासण्यासाठी, सत्याला धरून राहण्यासाठी आणि एकमेंकासोबत प्रेमाने राहण्यासाठी प्रेरित केले. रामाचे जीवन आपत्तींची एक शृंखलाच होती. तरी देखील तो अविचल राहिला. त्याने कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आत राग, संताप, किंवा द्वेष येऊ दिला नाही. राम जगात कृतीशील होता, लढाई देखील लढला, त्यात त्याने हेच दाखवून दिले. त्याच्या याच गुणापुढे आपण नतमस्तक आहोत.म्हणूनच त्याला एक अतिशय श्रेष्ठ मनुष्य, ‘मर्यादा पुरोषत्तम’ म्हणतो, देव म्हणत नाही.त्याचे गुण असे आहेत की तुम्हाला त्याचा आदर करावाच लागेल . तुम्ही सुध्दा तुमच्या जीवनात असे होऊ शकलात, तर तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. ही एक अशी संस्कृती आहे जिथे कोणीही स्वर्गातून उतरले नाही, जिथे मानव दैवी बनू शकतो. कुठेतरी एक देव आहे जो आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल.या ढोबळ विश्वास प्रणालीपासून मनुष्यानी स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. राम आणि रामायण भारतीय परंपरेचे अविभाज्य भाग आहेत. ही अशी एक संस्कृती आहे जिने मुक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे. याचा अर्थ जिवंत असताना सर्व गोष्टीपासून मुक्त होणे.तुम्ही रोजच्या जीवनातून माघार घेतली आहे असे नाही, तुम्ही सक्रिय आहात पण मुक्त आहात, तुम्ही संरक्षित कोषामध्ये नाही.’

कालपर्यंत रामायाणातील ढोबळ कथानक ऐकून नि वाचून माहीत असलेल्या माझ्या मनाला या सद्गुरूंच्या आश्वासक विचारांनी मोहिनी घातली नाही तरच नवल.माझ्यासारख्या कैक दिशा भरकटलेल्या युवकांना देशापुढे असलेली आव्हाने पेलण्याची शक्ति आणि बुध्दी श्रीराम देवो.राष्ट्रधर्म, कर्तव्य, नेतृत्व, संवेदनशीलता,

स्वपराक्रम, स्वाभिमान याबाबत तत्वाला मुरड घालून क्षणिक लाभासाठी स्वत्व पणाला लावण्याचा धोका पत्करत असेल, तर तेथे श्री.रामांच्या प्रामुख्याने वनवास काळातील जीवनाचा अभ्यास, युवा पिढीला योग्य मार्गावर आणू शकेल हा माझ्या मनातल्या रामाने दिलेला संदेशच आहे असच म्हणायला हवं.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सारे जहाँ से अच्छा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ सारे जहाँ से अच्छा… ☆ श्री विश्वास देशपांडे

आपल्या साऱ्यांचे हे भाग्य आहे की, या भारतभूमीत आपला जन्म झाला. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या जलाने पावन झालेला हा प्रदेश हिमालयाचा रुपेरी मुकुट या भारतमातेने परिधान केला आहे. सागर तिच्या पायाला स्पर्श करतो आहे. कन्याकुमारी येथे तिन्ही सागरांचं जल एकमेकांत मिसळलेले आपणास दिसतं. त्या समुद्रात जो खडक आहे. ज्यावर स्वामी विवेकानंद बसले होते, त्या खडकावर सागराच्या लाटा सतत येऊन अभिषेक करीत असतात. जणू सागराचीही देशभक्ती उचंबळून येते आणि लाटांच्या रूपात तो भारतमातेला जलाभिषेक करतो. तिथूनच स्वामी विवेकानंदांना प्रेरणा मिळाली. आपलं जीवनध्येय गवसलं. सागराची हाक आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद यांचा संगम झाला आणि नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांत झालं. भारतीय संस्कृती जगाला कळली, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने. याच विवेकानंदांनी ‘देश हाच आपला देव आहे. त्याचीच पूजा करा असा प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला.

इंग्लंडमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हृदय मातृभूमीच्या आठवणीनं उचंबळून आलं. सागराच्या सान्निध्यात बसले असताना त्यांच्या ओठी शब्द आले, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला… हे देशप्रेम! जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा देशासाठी तुरुंगात अपार कष्ट, यातना सहन केल्या. कोलू चालवला. चाफेकरांना जेव्हा इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली, तेव्हा सावरकर म्हणाले, “स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चाफेकर फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता-जाता चेतविलेली शत्रुजयवृत्ती, महाकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकावीत नेणं असेल, तर त्याचं दायित्व आपल्यावर आहे. देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन.” चाफेकरांनी जेव्हा देशासाठी बलिदान दिलं, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पोवाडा लिहिला. त्याने तरुणांना त्या काळात अतिशय स्फूर्ती दिली.

स्वजनछळाते ऐकुनी होती तप्त तरुण जे अरुण जणो देशासाठी प्राण देती धन्य धन्य त्या का न म्हणो

शतावधी ते जन्मा येती मरोनी जाती ना गणती देशासाठी मरती त्यासी देशपिते की बुध म्हणती.’

अशा अनेक क्रांतिवीरांचं, देशभक्तांचं देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात बलिदान पडलं. म्हणून तर सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर लिहून गेले, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम् अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम् म्हणत हसत-हसत फासावर चढले. कुसुमाग्रजांचं ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार हे गीत अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं. देशभक्तीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. हा सुगंध देता देता स्वातंत्र्ययज्ञरूपी कुंडात अनेकांच्या प्राणांची आहुती पडली, या आहुतीने यज्ञदेवता प्रसन्न झाली. या देवतेने प्रकट होऊन ‘स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला. दीर्घकाळाच्या परकीय सत्तेनंतर भारत स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आम्हाला सुखासुखी मिळालं नाही, याचं भान आम्ही ठेवणं आवश्यक आहे.

३ एप्रिल १९८४. भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा अवकाशात होता. त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. इंदिरा गांधी तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी राकेश शर्माला विचारलं, ‘आपको अंतराल से हमारा भारत देश कैसा दिखाई दे रहा है? राकेश शर्माने तत्काळ फार सुंदर उत्तर दिलं. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. किती सुंदर आणि मन भरून यावं असं हे उत्तर!

असा हा ‘सारे जहाँ से अच्छा असलेला आमचा देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे. स्वातंत्र्यासाठी सारे देशभक्त, क्रांतिकारक एक होऊन लढले. जातिधर्माची पर्वा न करता. ‘अवघा रंग एक झाला. पण आज त्याच देशाला जातिपातीने, धर्मभेदाने, भाषाभेदाने विभागलं गेलं आहे. संतांची, महापुरुषांची, नेत्यांची जातीपातींत वाटणी झाली आहे. क्षुल्लक कारणांवरून दंगली पेटत आहेत. लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. जाळपोळ, लुटालूट, अन्याय, अत्याचार होत आहेत. आपल्या सगळ्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी याचसाठी अट्टाहास केला होता का? ‘हेचि फळ काय मम तपाला’ असं तर त्यांचे आत्मे म्हणत नसतील? म्हणूनच देशभक्ती म्हणजे फक्त १५ ऑगस्टला किंवा २६ जानेवारीला ध्वजवंदन करणं नव्हे. वर्षभर असं वागलं पाहिजे की, आपण जी जी कृती करू, ती देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असली पाहिजे. कोणतीही कृती करताना, निर्णय घेताना ही कृती माझ्या देशाच्या दृष्टीने हिताची आहे ना, याचा विचार केला पाहिजे. या देशाचा धर्म एकच. तो म्हणजे राष्ट्रधर्म! आणि तोच आपल्या सगळ्यांचा धर्म असला पाहिजे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावर लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांचं गीत गायलं. ते गीत ऐकून पं नेहरूंच्या डोळ्यांतही अश्रू आले. आज त्याच गीताची आठवण करून लेखाचा शेवट करू या.

 ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भरलो पानी जो शहीद हुऐ है उनकी जरा याद करो कुर्बानी.’ जयहिंद.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print