युगानु युगे चाललेला वाद स्त्रीला दिलेली कमीपणाची वागणूक चाकोरीबद्ध राहण्याची शिक्षा तिच्या क्षमतेबद्दलची गृहीते तिच्यावरच लादलेली काही कार्ये यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव युगानू युगे होत आलेला आहे.
पण आता शिक्षित झालेली स्त्री तिने सिद्ध केलेली तिची क्षमता सगळ्या क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी यामुळे स्त्री आणि पुरुष यांची समानता सिद्ध झालेली आहे आणि सगळीकडे 50% स्त्रियांना आरक्षण दिलेले आहे.
पण म्हणून स्त्री पुरुष समानता आली आहे असे म्हणता येईल का? मुळात समानता म्हणजे काय अभिप्रेत आहे? स्त्रियांनी बिनधास्त पणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे;पुरुष जी जी कामे करतात ती ती कार्यें स्त्रियांनी करून दाखवणे म्हणजे स्त्री पुरुष समानता झाली का?
अहो एका शरीराचे असलेले अवयव देखील आपण डावे उजवे भेद करून समान मानत नाही मग दोन भिन्न प्रकृतीच्या जीवांची बरोबरी असली पाहिजे हा आग्रह का?
नाण्याच्या दोन भिन्न बाजू कधी समान होतील का? एक प्रवाह असलेले नदीचे दोन काठ कधी एकत्र येतील का? लोहचुंबकाचे दोन ध्रुव आहेत तेच एकत्र येतात का नाही? समान ध्रुव एकत्र येऊच शकत नाहीत. मग अशा वेळी समाजातील दोन घटक स्त्री पुरुष यामधे समानता आणण्याचा अट्टाहास का? कितीही प्रयत्न केले तरी तशी समानता येईल का?
सृजनासाठी समाजातील या दोन घटकांची बरोबरीची भागीदारी असली तरी स्त्री ही जास्त सामर्थ्यशाली जास्त सहनशील असल्यामुळे कितीतरी हाडे एकत्र फ्रॅक्चर झाल्यावर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या प्रसव वेदना हसत झेलण्याची ताकद स्त्रीमध्येच बहाल केलेली असल्याने अपत्यांना जन्माला घालण्याचे काम स्त्रियांकडे दिलेले आहे ते त्यांचेच राहणार.
स्त्रिया जशी पुरुषांची कामे करतात तशी पुरुषही स्त्रियांची कामे करू लागले आहेत म्हणून हॉटेलमध्ये जेवण करायला आचारी पुरुष असतात. आई वडील दोघेही कमावते असल्याने मुलांकडे लक्ष पुरुषही देतात. मुलगी माहेरचे सर्व बंध सोडून सासरी येते तसें जबाबदारी मुळे मुलेही आई वडील व घरचे बंध सोडून दूर दूर कामानिमित्ते जातात हे एक प्रकारे सासरी जाण्यासारखेच आहे.
याचाच अर्थ काही कामे स्त्रिया करू लागल्या आहेत तर काही पुरुष. नेहमीच्या रूढी परंपरा सोडून वावरण्यात रहाण्यात स्त्री पुरुष समानता आलेली आहे.
पण अनादी काळापासून स्त्रीला लाभलेला मातृत्वाचा अधिकार कोणीच हिसकावून घेऊ शकत नसल्यामुळे स्त्री पुरुष समानता असे म्हणणे चुकीचेच ठरणार आहे. या बाबत स्त्री ही अग्रगण्याच राहणार.
जसे एक नमस्कार करायला दोन हात लागतात ;एक चाल चालायला दोन पाय लागतात तसेच समाज रचनेसाठी स्त्री पुरुष दोन्ही घटक आवश्यक असतात त्यात कमी जास्त महत्वाचा असे भेद होऊच शकत नाहीत. त्यामुळे स्त्री ही जास्त श्रेष्ठ असली तरी ती स्वतः तसे समजतं नाही हा श्रेष्ठ गुण तिच्याकडून घेऊन दोन्ही घटकांनी एकत्र काम केले तर नक्कीच विधायक कार्यें पार पडतील यात शंकाच नाही.
☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – २ – लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
१९८६ साली माझी बदली पुणे येथे झाली. पुणे येथे असतांनाच लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या आंतरराष्ट्रीय , इंग्रजी माध्यमाच्या योग शिक्षक प्रशिक्षण केंद्रात मला प्रशिक्षण घेण्याचा योग आला. अनेक देशांतील डोळस प्रशिक्षणार्थी असतांनाही मी तेथे उत्तम प्राविण्य संपादन केले. पुणे येथे असतांनाच समाजशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत एम्. ए. उत्तीर्ण झालो. पुणे महानगर पालिकेने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला प्रदान केला.
१९९९ साली नाशिक येथील शासकीय अंध शाळेत माझी बदली झाली. येथील मुलांना संगीत शिकवले जात होते. माझ्या गीतांना संगीताची साथ मिळू लागली. त्यामुळे माझी नवनवीन देशभक्तीपर व सामाजिक गीते नावारूपाला आली. सौ. शारदा गायकवाड या स्वाध्यायी समाजसेविकेच्या पुढाकारामुळे ‘ज्योतीकलश’ हा माझा पहिला काव्यसंग्रह २००२ साली व ‘ चैतन्यचक्षू’ हा दुसरा काव्यसंग्रह २००४साली प्रकाशित झाला. नाशिक जिल्हा परिषदेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन माझा गौरव केला. समाजकल्याण खात्याच्या नाशिक विभागीय कार्यालयाने ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ मला दिला. राष्ट्रीय अंधजन मंडळाच्या महाराष्ट्र राज्य शाखेने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार मला प्रदान केला. याच काळात स्वाध्याय प्रणित तत्वज्ञान विद्यापीठाच्या चार परीक्षा मी उत्तीर्ण झालो. त्यातील ‘ विचक्षण’ परीक्षेत मला जागतिक मेरीट प्राप्त झाले.
माझ्या जीवनात अभूतपूर्व असा योग चालून आला. आजवर कुठल्याही शासकीय अंध शाळेतील अंध शिक्षकाला अधिक्षकाचे पद प्राप्त झालेले नव्हते. परंतु मला ते मिळाले. शासकीय अंध शाळा कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अधिक्षक पदावर मी रूजू झालो. त्या काळात कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषदेशी मी जोडला गेलो. या परिषदेतील वृंदा कांबळी यांनी माझ्या निवडक १८ कवितांच्या आधारे ‘सहा टिंबातून’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबतची संकल्पना अशी की जिल्ह्यातील निवडक प्राध्यापक, गायक, आकाशवाणी निवेदक अशा सहा व्यक्तींना प्रत्येकी तीन कविता गायन किंवा वाचन करण्यास दिल्या. त्यासाठी योग्य असा निवेदन पट तयार केला. अनेक तालुक्यातून हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
अधिक्षक पदाची कारकिर्द यशस्वी रित्या पार पाडून २०१४ साली मी सेवानिवृत्त झालो.
सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु मला तो पडला नाही. नाशिक ही कवी लेखक नाटककार यांची साहित्य पंढरी आहे. या साहित्यिक मेळ्यात मी स्वतःला झोकून दिले. खऱ्या अर्थाने माझ्या कवितांना जनाधार प्राप्त झाला.माझे अंधत्व गौण मानून माझ्या प्रतिभेचा आदर केला गेला. अनेक कविमंडळे नाशिकमध्ये आहेत. दर आठवड्याला कुठे ना कुठे कविसंमेलन होतेच. त्यात सहभाग घेऊ लागलो. २०१६ साली ‘दृष्टीपल्याड’ हा माझा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विशेष म्हणजे मी ज्या शासकीय विद्यानिकेतनात शिक्षण घेतले होते त्यातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
अनेकांच्या आग्रहाखातर ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे माझे आत्मचरित्र २०१७ साली भव्य समारंभात प्रकाशित झाले. हा भव्य समारंभ म्हणजे शासकीय विद्यानिकेतनाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन होता. संपुर्ण महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास हजर होते.
इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेने भगवत गीतेवर आधारित ‘गीताप्रज्ञा’ ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती.या परिक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या शुभहस्ते मला रू १५००० चा पुरस्कार एका भव्य समारंभात प्राप्त झाला.
सेवा निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुखाचा व अधिक कार्यमग्न होण्यासाठी बोलका कॉम्प्युटर व बोलका मोबाईल हाताळण्याची कला मी अवगत केली. अनेक साहित्यिक व्हाट्सऍप गृपवर माझ्या कविता प्रसारित होऊ लागल्या. १० व ११ जून २०१७ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मला मिळाला तसेच २०१७ साली लिमका बुक रेकॉर्ड्स साठी सलग २४ तास कविसंमेलन पुणे येथे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
राज्यभरात अनेकदा अंध अपंगांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद मी भूषविले.तसेच डोळस कवींच्या अनेक संमेलनात माझ्या कवितांना तसेच काव्यसंग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ऑनलाइन काव्यस्पर्धेत वारंवार पुरस्कार प्राप्त होत आहेत.गझल या काव्यप्रकारातही माझी यशस्वी वाटचाल चालू आहे.
माझ्या मराठी व अहिराणी कविता वृत्तबद्ध व छंदोबद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकजण त्या कवितांचे गायन करून ऑडिओ पाठवतात. काही यूट्यूब चानलवर त्या गायनाचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात.
डिसेंबर २०२१ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दूरदृष्टी या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे व काळोखातली प्रकाशवाट या आत्मचरित्राच्या विस्तारीत आवृत्तीचे प्रकाशन
झाले. जानेवारी २०२३ मध्ये प्रतिभेचे नंदनवन हा माझा पाचवा काव्यसंग्रह नाशिक येथे कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात प्रकाशित झाला.
अशाप्रकारे माझा यशस्वी जीवनप्रवास चालूच आहे.अंधत्वाबद्दल मी कधीही देवाला दोष दिला नाही कारण सर्वसामान्य माणसाप्रमाणेच मी आयुष्य जगलो. माझा मुलगा उत्तम प्राथमिक शिक्षक असून मुलीचे एलएलबी झाले असून तिचे पती भारतीय लष्करात ‘मेजर’ पदावर आहेत. चार नातवंडांसह आमचे परिवार सुखी आहेत. कथा संपावायच्या आधी मला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल की माझ्या जीवन प्रवासात माझी पत्नी सौ. रेखा हीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शेवटी जाता जाता एक स्वरचित कविता सादर करत आहे.
☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट 🌹
तीन डिसेंबर ! जागतिक अपंग दिनानिमित्य माझ्या एका अविस्मरणीय भेटीचा अनुभव आपल्या समोर मांडते.
स्थळ- पुण्यनगरी नाशिक,
सरळ भेटण्याचा आणि पत्र व्यवहाराचा पत्ता-श्री काशीनाथ देवराम महाजन, फ्लॅट नं १४, मधूसूदन अपार्टमेंट, त्रिवेणी पार्क, जेलरोड, नाशिक- पिनकोड – ४२२१०१, फोन नंबर – ८४५९३०००७६
माझी या स्थळी पोचण्याची सांजवेळ साधारण ५. मंडळी वरील नामनिर्देशित व्यक्ती प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी कैक जण त्यांना कविसंमेलनात भेटले असाल एक कवी, अध्यक्ष, निमंत्रित अन बरेच कांही. आमच्या भेटीचा योग्य मात्र अचानकच आला पण मी मात्र त्यांचे नाव आमचे मित्र महेंद्र महाजन (मुक्काम सटाणा) यांच्या स्वरातून ऐकले होते. पर्यावरण, सायकल, भाऊबीज अन अजून विषयांवर, स्वर महेंद्रचे अन कविता-गीत काशिनाथ महाजन. सटाणा येथे महेंद्रची भेट झाल्यावर मी त्यांना माझी नुकतीच प्रकाशित पुस्तके भेट दिली आणि तसेच काशिनाथ सरांना देखील एक संच द्यायची विनंती केली. मात्र माझे भाग्य जोरावर नक्कीच होते. महेंद्रने मला नाशिकला त्यांना प्रत्यक्ष भेटून पुस्तके द्यावीत असा सल्ला दिला.
त्यानुसार मी काशिनाथ सरांची भेटीकरता वेळ मागितली अन त्यांना भेटले. त्यांना अंध म्हणणे म्हणजे त्यांच्या दिव्यदृष्टीचा अपमानच होय असे जाणवले. त्यांच्या जीवनाच्या प्रखर जाणीवा त्यांच्या अनुभवातून आहेत की चैतन्यमय अनुभूतीतून आहेत हा मला पडलेला मूलभूत प्रश्न! त्यांनी मला भेटीची वेळ दिल्यावर त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख असलेला लेख मला अग्रेषित केला. तो माझ्या या या लेखासोबत अग्रेषित करीत आहे. त्यांनी अंधत्वामुळे आलेल्या अंधाराचे एक भव्य दिव्य प्रकाशज्योतीत रूपांतर कसे केले याचे मला नवल वाटते. लहानसहान अडचणींचा उदो उदो करणारे आपण वास्तविक परिस्थितील आशेच्या प्रकाशाच्या कवडश्याकडे कसे दुर्लक्ष करतो याचे प्रत्यंतर मला या भेटीत प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या सोबत घालवलेला अंदाजे दीड तास त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रकाशलेला होता. आपल्या दिव्य दृष्टीने माझ्याशी आनंदाने संपर्क साधत त्यांनी जणू संपूर्ण वातावरण भरून टाकले होते. ‘असा कुठलाच विषय नाही ज्यावर मी कविता रचली नाही’, हे मला तेव्हा अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटले, पण भेटीनंतरच्या त्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर मला सामील करून घेतल्यावर त्यांच्या कवितांचा जो ओघ सुरु आहे तो मला स्तिमित करून टाकणारा आहे. किंबहुना त्यांच्या संपूर्ण कविता वाचायचे म्हटले तरी आपले वाचन तसेच फास्ट हवे! या कवितांचे विषय विविध तर आहेतच, पण त्यांचे मन इतके संवेदनशील आहे की त्यातून उगम पावलेल्या आत्मानुभूतीच्या तीव्र आवेगातूनच त्यांच्या कविता उत्स्फूर्तपणे जन्मतात असे जाणवते. आपल्याला असलेल्या दृष्टी लाभामुळे आपले मन बऱ्याच ठिकाणी भरकटत असते, मात्र या दिव्यांग व्यक्तीचे मन भावानुभूतीत केंद्रित असते असे मला वाटते, म्हणूनच हा कवितांचा जलौघ सतत त्यांच्या दिव्यांग लेखणीतून प्रसवत असावा!
मंडळी त्यांच्या भेटीदरम्यान अनौपचारिक अन खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण अति लोभस होते. त्यांची काळजी घेणारा मुलगा, गोडगोजिरी नात, अन सर्वार्थाने त्यांची ‘पूर्णांगिनी’ शोभेल अशी सहचारिणी रेखा (त्यांची पूर्वाश्रमीची मामेबहीण) हिच्याविषयी मनात इतका आदर निर्माण झाला की, तो शब्दात मांडू शकत नाही. सौ रेखा ही काशिनाथ सरांची भाग्यरेखा म्हणून शोभत होती. रुचकर उपहारासोबत काशिनाथ सरांकडून त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीची माहिती देणे आणि जाणून घेणे सुरु होते. त्यांचा घरातील वावर आणि संवाद साधण्याचे कौशल्य बघून आणि ऐकून कुठेही भास होत नव्हता की त्यांना दिव्य चक्षूच मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच मी या महान कवीला नि:संकोचपणे एक कविता ऐकवण्याची विनंती केली. कसलेच आढेवेढे न घेता त्यांनी माझ्या विनंतीला लगेच मान्य करीत एक कविता ऐकवली. त्यासाठी ब्रेल लिपीच्या त्यांच्या संग्रहातून लगोलग स्वतः कविता शोधून, त्यांनी तालासुरात आणि भावपूर्ण स्वरात स्वतःची कविता ऐकवली. मंडळी त्यांच्या कविता अशाच गेय आहेत! महाराष्ट्रातील कैक व्यक्तींनी त्या कवितांना आवाज दिलाय. यू ट्यूब वर त्या उपलब्ध आहेत. सदर कविता होती ‘चैतन्य चक्षू’. अत्यंत प्रेरणादायी अशी ही कविता, तो अनुभव विडिओत रेकॉर्ड करून जपून ठेवलाय. या लेखासोबत सदर व्हिडिओची यू ट्यूब वरील लिंक शेअर करीत आहे. स्वतःचे जीवन समृद्ध असलेल्या या विलक्षण कवीचे कौटुंबिक जीवन देखील सुखमय आहे. मुले आयुष्यात स्थिरस्थावर झालेली, पत्नीची अखंड प्रेमपूर्ण साथ, हे सर्व मला या भेटीत अनुभवास येत होते या प्रेमळ कुटुंबासोबत फोटो काढणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती अन आठवणींचा खजिना देखील!
प्रसिद्ध लेखक विश्वास देशपांडे लिखित रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांचे मी हिंदी आणि इंग्रजीत केलेले अनुवाद त्यांना भेट दिले तेव्हा ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांनी मोठया अगत्याने मला भेट दिले. या भेटीतून मी किती अन कशी ऊर्जा घेतली याचा अनुभव शब्दातीत आहे. आयुष्यातील कैक वर्षे मागे गेल्याचा फील आला. जराजराश्या दुःखाने खचून जाणाऱ्या स्वतःच्या जीवनातील क्षण आठवून मनात अपराध बोध देखील जागृत झाला. या उलट दुःखाचे किंवा आपल्यातील न्यूनाचे भांडवल न करता सुखाने जगणाऱ्या या आनंदयात्री व्यक्तीला माझे या जागतिक अपंग दिनी कोटी कोटी प्रणाम! काशिनाथ सरांना अशीच अक्षय ऊर्जा मिळत राहो आणि त्यातून या सरस्वतीपुत्राच्या आधीच पाच कवितासंग्रहांनी समृद्ध असलेल्या साहित्यिक खजिन्यात दर दिवशी नवनवीन माणिक मोत्यांची भर पडो ही आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना!
बकुळ फुलांनो हळूच या,जुई माझी विसावलीय जरा!नका करू दंगा मस्ती,दुरूनच न्याहाळा तिच्या बंद पापण्यात विसावलेलं आकाश! खरंच तिला तुम्ही अलवार जोजवा हं !थोडया विसाव्यानंतर ती नक्कीच टवटवीत होईल तिच्या नाजूक बहराला घेऊन,मादक सुगंधासह विहारण्यास वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आणि मग अवघा आसमंत एक होईल!तिच्या मादक गंधात दरवळून निघण्यासाठी!गंधात आत्ताच न्हाऊन आलीय ती! तिच्या मोहिनीने वेडावून तिमीर सुद्धा बघा कसा दाट होऊ पाहतोय…हवं तर खात्री करून घ्या,तिच्या गर्द कुंतलामधील मारव्याला हुंगुन!पण हळूच!स्पर्श केलाच आहे तिला तुम्ही
तर थोडं हितगूजही करून जा तिच्या गूढ भावनांशी,पण जरा सुद्धा धक्का लावू नका तिच्या हिरवाईने नटलेल्या स्वाभिमानरुपी देठाला कारण तिनं तिचा उभा जन्म साकारलाय तिच्या स्वप्नांना ओंजळीत सामावून घेण्यासाठी .मृदेतील प्रत्येक कणाशी मृदा बनून दोस्ती केलीय तिनं स्वतः फूल म्हणून जन्मण्यासाठी आणि ती जाणून ही आहे सूर्योदया पूर्वी पर्यंतच तिच्या क्षणभंगूर जगण्याच रहस्य.आणि बकुळफुलांनो तो बघा तो पवन कसा सावरत आहे तिच्या कुंतलाना हळुवार शीळ घालून, गात आहे अंगाई गीत, तिच्या निश्चिन्त निजेसाठी!कारण त्याला जाणीव आहे तिच्या निस्वार्थ जीवनप्रवासाची स्वतःला सिद्ध करणाऱ्या तिच्या अविरत कष्टाची!भाकरीचा चंद्र शोधून पिलांच्या ओढीन घरट्याकडे परतणारी पाखरे पण तिच्या जवळ येऊन पंखांची हलचाल स्थिरावून एक गिरकी घेऊन जात आहेत अंदाज घेऊन तिच्या निजेचा!
जरा धीर धरा बकुळ फुलांनो,तिच्याशी गप्पा मारायला. कारण सांजेला तिनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ती थोड्याच वेळात जागी होईल,नवा सुगंधी जन्म लेवून आणि तिचा सगळा क्षिणवटा कुठल्या कुठे दूर पळून गेलेला असेल या छोट्या विसाव्याने!आणि गुंग होऊन जाईल ती मंद धुंद मारव्यासह गारव्याला साथीला घेऊन तुम्हा सख्यांशी हितगूज करण्यासाठी!
☆ वाचावी बहुतांची अंतरे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
केवळ दोन वर्षांचा असलेला प्रणाद त्याच्या आईवडिलांसोबत एका पुस्तक महोत्सवात गेला. तेथील एका स्टॉलवर असणारे आकर्षक छोटे पुस्तक पाहून हे पुस्तक मला पाहिजेच म्हणून त्याने हट्ट धरला आणि मग त्याच्या आईबाबांना ते पुस्तक घ्यावेच लागले. त्या लहानग्याला वाचता येत नव्हते पण पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रांनी त्याला आकर्षित केले. माझ्या मते हा पुस्तकाचा सगळ्यात छोटा ग्राहक असावा आणि हेच पुणे येथे भरलेल्या पुस्तक महोत्सवाचे वेगळेपण आहे असे मला वाटते. आपल्या मुलांना अनेक ठिकाणे दाखवण्यासाठी आपण घेऊन जातो पण पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या पुस्तक महोत्सवाला जरूर जावे असे मला वाटते आणि अनेक सुज्ञ पालक तसा लाभ आपल्या मुलांना मिळवून देत आहेत.
आजच्या मोबाईलची क्रेझ असलेल्या जमान्यात आपल्या मुलांवर जर वाचनसंस्कार करायचा असेल तर असे हे पुस्तक महोत्सव त्यांना दाखवायलाच हवे. ही आधुनिक पर्यटनाची ठिकाणे समजावीत. अनेक शाळा देखील या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना हा पुस्तक महोत्सव दाखवण्यासाठी घेऊन येताहेत. या पुस्तक महोत्सवात येणाऱ्या रसिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. आल्याबरोबर त्याचा मोबाईल क्रमांक आणि नाव लिहून घेतले जाते आणि त्याला दोन सुंदर पुस्तकांची भेट दिली जाते. पुस्तक महोत्सवातून हा रसिक वाचक भलेही पुस्तक खरेदी करेल किंवा नाही हे सांगता येणार नाही, पण बाहेर पडताना आपल्या सोबत तो दोन पुस्तके मात्र नक्की घेऊन पडतो आणि सोबतच हृदयात साठवलेले पुस्तक महोत्सवाचे दृश्यही.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात भरलेल्या या महोत्सवात आल्याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपले स्वागत करतात आणि आपल्या हातात एक पुस्तक देऊन एक परिच्छेद वाचायची विनंती करतात. यातूनच एक नवा आणि चौथा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. तो म्हणजे ‘ लार्जेस्ट ऑनलाईन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्युरेशन ऑफ थर्टी सेकंड्स ‘ या अभियानाअंतर्गत तब्बल अकरा हजार पेक्षा जास्त लोकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद वाचला आणि हा एक अनोखा विश्वविक्रम या ठिकाणी नोंदवला गेला. या वाचनात मला सह्भाग देता आला त्याचा आनंद नक्कीच आहे. त्यासोबतच आणखीही तीन विश्वविक्रमांची नोंद या महोत्सवाच्या निमित्ताने झाली. आपल्या पाल्याला गोष्ट सांगण्याच्या उपक्रमात तब्बल ३०६६ पालक सहभागी झाले होते. दुसरा विश्वविक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या १५० विद्यार्थ्यांनी ७५०० पुस्तकांचा वापर करून ‘ भारत ‘ हा शब्द साकारला. आणि तिसरा विश्वविक्रम म्हणजे तब्बल १८ हजार ७६० पुस्तकांच्या साहाय्याने ‘ जयतु भारत ‘ हे प्रेरणादायी शब्द साकारण्यात आले.
साहित्य संमेलनात असतात तसेच अनेक मुलाखतीचे किंवा चर्चासत्राचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत. अनेक मान्यवर लेखक, शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते या महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत, संबोधित करीत आहेत. हा महोत्सव साकारण्यासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत आणि नियोजन केल्याचे सहजच लक्षात येते. येथे येणाऱ्या रसिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आयोजकांनी घेतल्याचे लक्षात येते. अनेक नामवंत प्रकाशन संस्था यात सहभागी झाल्या आहेत. अनेक मान्यवर संस्थांनी या महोत्सवाच्या आयोजनात सढळ हाताने मदत केली आहे. सर्वांच्या सहभागाचे आणि सहकार्याचे हे एकत्रित फळ आहे. अशा या महोत्सवांकडे केवळ एक उपक्रम म्हणून पाहून चालणार नाही. हा आपला ज्ञान आणि संस्कृतीचा महोत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही.
या पुस्तक महोत्सवाच्या काळात माझे काही कारणाने पुण्यात येणे झाले आणि पुण्यातील दोन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. त्यातील पहिली ऐतिहासिक गोष्ट म्हणजे पुण्यात १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर आणि वर उल्लेख केलेला पुस्तक महोत्सव. दुसरी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे अयोध्येत होणाऱ्या राममंदिरातील प्रभू रामचंद्रांसाठी ‘ दोन धागे रामासाठी ‘ हा सौदामिनी हॅन्डलूम येथे अनघा घैसास यांच्या प्रेरणेतून सुरु आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभे राहते आहे. या मंदिरातील मूर्तीसाठी दोन धागे आपणही विणावे, आपलाही खारीचा वाटा त्यात असावा असे प्रत्येकाला वाटल्यास नवल नाही. याच भावनेतून लाखो पुणेकर आणि अन्य प्रांतातील लोकही येथे एकत्र येऊन जाती, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन रामरायासाठी वस्त्र विणत आहेत. हे एक आगळेवेगळे राष्ट्रभक्तीचे, रामभक्तीचे उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे २०२३ या वर्षाचा डिसेंबर महिना यानिमित्ताने निश्चितच माझ्याच काय परंतु समस्त पुणेकर आणि पुस्तकप्रेमी मंडळींच्या लक्षात राहील.
आपण विविध महोत्सव साजरे करतो पण हा एकाच छताखाली साजरा होणारा हा पुस्तक महोत्सव अनेक दृष्टींनी आगळावेगळा आहे. या महोत्सवात पुस्तकांचे जवळपास २५० स्टॉल्स आहेत आणि १५ भाषांतील प्रकाशित पुस्तके या ठिकाणी वाचकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. धार्मिक पुस्तकांपासून तर वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकांपर्यंत आणि बालवाचकांपासून महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी सुमारे दोन लाख पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या, बघा, खरेदी करा आणि वाचा असं आवाहन जणू ते करीत आहेत. अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन दिल्लीत दरवर्षी होणाऱ्या पुस्तक मेळ्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आबालवृद्ध या महोत्सवाला भेट देत आहेत.
या महोत्सवामुळे अनेक लेखक, कवींची पुस्तके पाहण्याची, वाचण्याची आणि खरेदी करण्याची संधी वाचकांना मिळते आहे. वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर येथे येऊन ‘ वाचावी बहुतांची अंतरे ‘ असेच म्हणावे लागेल.
☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
आजकाल खरोखरीच खूप जास्त अच्छे दिन आलेले आहेत . महागाईच्या नावाने ओरडत ओरडत प्रत्येक जण आपले सगळे सणसमारंभ, सोहळे धूमधडाक्यात पार पाडतोय. ऐच्छिक गोष्टी केव्हा आवश्यक सदरातून अत्यावश्यक सदरात शिफ्ट झाल्यात ते आपले आपल्यालाही कळलेच नाहीं.पूर्वीची कुठल्या गोष्टीसाठी किती पैसा द्यायचा असतो ही गणितच मुळी हौस ह्या सदराखाली संपूर्णपणे बदलल्या गेली आहेत. फक्त हे करतांना ह्या ऐच्छिक गोष्टी प्रघात बनून कुणाची गैरसोय बनू नये ही इच्छा.
मध्यंतरी एक बातमी वाचनात आली आणि मन खरचं खूप सुन्न झालं.एक शाळकरी मुलाने त्याच्या आईबाबांनी वाढदिवस आजच्या पध्दतीनुसार साजरा करु दिला नाही म्हणून आत्महत्या केली. सगळ्यां करीताच विचारात पाडणारी दुःखद घटना आणि त्या पालकांच्या सांत्वनासाठी शब्दही सुचेना.
हल्ली जग बरचसं आभासी झालयं. सोशल मिडीया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करताय ह्यावर ते फायदेशीर की नुकसानकारक हे ठरणार आहे. जे मोठमोठे इव्हेंट सहज साजरे होताना मोठया स्क्रीनवर बघितल्या जातात ते प्रत्यक्षात अमलात आणणं खूप कठिण असतं हे कुठेतरी सगळ्यांना कळायला हवे.
वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस ही खरोखरच कुटूंबातील आनंददायी घटना.या प्रसंगातून सगळेजण एकमेकांच्या मनाशी जोडल्या जातात.असे कुटुंबातील छोटेछोटे समारंभ आनंद देतात, एक प्रकारचे चैतन्य निर्माण करतात.
पण दुर्दैवाने ह्याचे स्वरुप, त्याचा अतिरेक हा समाजासाठी खरोखरच डोकेदुखी ठरला आहे.प्रेम म्हणजे मनाशी मनाचे जुळलेले नाते,त्याग ह्या संकल्पना सोडून वरपांगी दिखाऊ प्रदर्शनीय बाब होऊ घातलीय.
हे अवर्णनीय आनंद देणारे कौटुंबिक प्रसंग ज्यांना आम्ही मराठी मध्ये “समारंभ”किंवा “सोहळे” म्हणतो त्याचे रुपांतर आभासी,दिखाऊ अशा “इव्हेंट” मध्ये झालेय.आणि खरोखरच हे “इव्हेंटचे भूत” सर्वसामान्य माणसाच्या अक्षरशः बोकांडी बसलयं
फेसबुक किंवा व्हाट्सएपवर वाढदिवसाचे किंवा लग्नाच्या वाढदिवसाचे केक कापतांनाचे फोटो एकदा आपलोड केले की जणू आपल्या सुखी जीवनाचा पुरावा सादर केल्यासारखी भूमिका काही लोक सादर करतात. कुठल्याही इव्हेंट मध्ये जाणे,तिथे सेल्फी काढून ते भराभर अपलोड करणे, खरचं ही सुखाची परिभाषा आहे का हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.
वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस, प्रीवेडींग शूट हे ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी उत्तमचं . पण ह्या सगळ्या गोष्टींचा पायंडा पडतोय हे खूप घातक.ह्या आभासी सुखामुळे,ह्या पायंड्यामुळे कितीतरी मुलं नैराश्येच्या खाईत लोटल्या जातात आहे हे पालकांना समजूनच यायला मुळी खूप ऊशीर होतोय.
ह्याची सुरवात होतांनाच पालकांनी जागरूकतेने ह्याबद्दल मुलांना नीट समजावून दिले तर ती सगळ्यांसाठीच खूप फायद्याचे ठरेल पण त्यासाठी आधी पालकांनी आधी या “सो काँल्ड आधुनिकतेला” आळा घालणं गरजेचं आहे.
दोन दिवसापूर्वी एक वाक्य ऐकले आणि लगेच त्याचा प्रत्यय पण आला. ते वाक्य एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकले. ज्या वेळी प्रत्यक्ष कार्यक्रम म्हणजे लाईव्ह प्रोग्रॅम बघतो त्या वेळी असे अनुभव येतात. त्या कार्यक्रमात तबलजी इतका निष्णात होता. की त्याने लावणी पूर्वीची ढोलकी तबल्यावर वाजवली. ऐकायला फारच अप्रतिम! डोळे बंद केल्यावर तर हा तबला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड होते. त्यातील निवेदकाने आधीच एक वाक्य वापरले होते, ते म्हणजे वेळेवर शिट्टी येऊ द्या. आणि ते वाक्य ऐकून हसू आले. कारण माझीच कायम अशी फजिती होते. लावणीला शिट्टी मारायची तयारी केली तर ती पुढच्या भक्तिगीताला तरी वाजते किंवा एखाद्या दुःखी गाण्यात तरी वाजते. मग असे होऊ नये म्हणून मी तो नादच सोडला आहे.
अजून एक प्रसंग आठवला एका अंत्य यात्रेत कोणाचा तरी फोन वाजला आणि रिंगटोन वर गाणे वाजले अकेले अकेले कहा जा रहे हो सोबतच्या लोकांना मोठाच पेच पडला, हसावे की रागवावे?
काही प्रसंग तर असे घडतात की आपण विचारात पडतो. एका लग्नात बँडवर गाणे वाजत होते छोड गये बालम आणि दिल का खिलौना टूट गया किंवा परदेसियो से ना आंखिया मिलाना ही तर जणू लग्नात वाजवण्याची फेवरेट गाणी.
आणि पूर्वीच्या लग्नाच्या पंक्तीत कायम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे श्लोक ऐकू यायचा. पूर्वी लग्न लागल्या नंतर नवरी वरपक्षाच्या खोलीत जायची. तिथे सगळे कौतुकाने तिच्याकडे बघत असायचे. कोणी चेष्टा करायचे,तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. अशाच एका प्रसंगाची नेहेमी आठवण येते. अशाच एका लग्नात त्या वधूला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. आणि तीने गाणे म्हंटले न जाओ सैया हे ऐकून काय प्रतिक्रिया आली असेल, कल्पनाच करु शकत नाही.
अशा गमती जमती पावलो पावली अनुभवायला मिळतात. मुले तर फार मजेशीर असतात. मुलांच्या व शाळेत अनुभवलेल्या गमती जमती पुन्हा केव्हातरी.
अशी गंमत फजिती कायम अनुभवायला येते. आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नाही.
तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ‘ रामम रमेशम भजे ‘ असे शब्द यायचे. लहानपणी ‘ भजे ‘ म्हणजे भजणे किंवा आळवणे हा अर्थ माहितीच नव्हता. पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.
तसेच कधीतरी ‘ चरैवती चरैवती ‘ हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ‘ सारखा चरत असतोस ‘ त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ‘ चरैवती चरैवती ‘ शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता.
नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील ‘श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं
यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका) अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला.
पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते.
झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ‘ दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ‘ चरत जा ‘ ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ‘ बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ‘ डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ‘ यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,’ अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ‘
मग काय पुन्हा ‘ चरैवती चरैवती ‘ आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू.
लेखक – श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकाळी मेडिटेशन केल्याने त्याचे फायदे दिवसभर राहतात.परंतू इतर विचार,नकारात्मकता,अनुभव या मुळे एनर्जी हळूहळू कमी होते.या साठी आपण पुढील उपाय करु शकतो.
सकाळी जी सकारात्मक वाक्ये म्हणतो किंवा जे संकल्प करतो तिच वाक्ये रात्री झोपताना म्हणावीत.म्हणजे पुढील ६/७ तास तेच विचार मनात राहतात.व सकाळी त्याचा परिणाम दिसतो.
ती वाक्ये पुढील प्रमाणे असावीत.
मी वैश्विक शक्तीचा पवित्र अंश आहे.
निसर्ग शक्ती माझ्यात पुरेपूर आहे.
मी आमच्या घरातील माणसे सुखी व आनंदी आहेत.
सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.
जर काही प्रॉब्लेम किंवा शरीरिक व्याधी असतील तर ते प्रॉब्लेम सकारात्मक पद्धतीने सुटलेले आहेत असे म्हणावे.व काही व्याधी,दुखणी स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाला असतील तर त्याची नावे ( आजाराची व संबंधित व्यक्तींची ) घेऊन ते व्याधी मुक्त झालेले आहेत असे म्हणावे.
जसे वाहनांचा गोंधळ कमी करून सर्वांना आपल्या इच्छीत ठिकाणी वेळेवर पोहोचता यावे म्हणून ठिकठिकाणी सिग्नल्स असतात त्या प्रमाणे आपणही करु शकतो.मना साठी सिग्नलची व्यवस्था करु शकतो.
जर आपले मन स्वच्छ करायचे असेल किंवा गोंधळ कमी करायचे असतील तर एक तास एक मिनिट याचा अवलंब करावा.
दर एक तासाने एक मिनिट विश्रांती घ्यावी.तीन दीर्घ श्वास घ्यावेत.आणि डोळे बंद करुन वरील वाक्ये म्हणावीत.
या पद्धतीने भरकटणाऱ्या मनाला आवर घालू शकतो.व मनाला वारंवार त्या सूचना देऊ शकतो.मनाला त्या सूचना दिल्या की शरीर त्या प्रमाणे आपले कार्यक्रम ठरवते.