मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

जन्मच मुळी नोकरदार कुटुंबात झाल्याने नोकरी ह्या क्षेत्रातील विवीध खात्यांची ओळख ही लहानपणा पासूनच होती. आई मुख्याध्यापिका त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि बाबा सहकार खात्यात असल्याने ह्या दोन्हीं खात्यांना जवळून अभ्यासता आल. बरेचं वेळा आपल्याला कागदावरील अगदी छोटासा काळा ठिपका चटकन दिसतो पण अख्खा पांढरा कागद मात्र आपल मन, डोळे, बुध्दी विचारतच घेत नाहीत. तसच ह्या नोकरदार खात्यांमधील बारीक त्रुटी आपण उगाळत बसतो पण ह्या क्षेत्रांत होणाऱ्या मोलाच्या मदतीच्या गोष्टी आठवत नाहीत.शिक्षणं खात आणि सहकार खात हयाचबरोबर आईची पोष्टाची एजंसी असल्याने पोस्ट खात पण खुप जवळून अभ्यासता आल.   

पूर्वी नं घरोघरी विशिष्ट कामं करायला काही नेमलेली मंडळी असत, सहवासाने वा नित्यभेटीने ह्या मंडळींशी आपलं तसं बघितलं तर कुठलही नातं नसायचं पण ह्या मंडळींशी आपले भावनिक बंध जुळल्या जाऊन त्यांच्या बद्दल आत्मियता, घरोबा हा आपसूकच निर्माण व्हायचा. त्या मंडळींमध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे आपले पोस्टमनकाका असायचे. आज जागतिक टपाल दिन.टपाल खात्याप्रती आणि पोस्टमनकाकांप्रती असलेल्या आदरामुळे आजचा हा लेख त्यांना अर्पण.

पोस्टमनकाका म्हंटले की आठवते ती त्यांची कायम खाकीवर्दीतील हसरी,बोलकी आणि तडतडी मुर्ती. ऋतु कुठलाही असो ह्या पोस्टमनकाकांची आणि टपालखात्याची सेवा निरंतरच. अजूनही आठवतात पावसाळ्यात ओलेगच्च होऊन पण टपाल भिजू नये म्हणून प्लँस्टीकच्या पिशवीत जिवापलीकडे टपाल सांभाळणारे सायकलवर येणारे पोस्टमनकाका, अजूनही आठवतात कडकडीत रणरणत्या उन्हात आम्ही सगळे दुपारी पत्ते खेळत असतांना घामाघूम होऊन येणारे पोस्टमनकाका

गार पाणी सुद्धा बाहेर उभे राहून पिणारे कारण आत आलो तर पंख्याचं वारं बाधून ताप येईल म्हणणारे पोस्टमनकाका. खरचं ह्या खात्याच्या सेवेला मनापासून सँल्युट. कदाचित नवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीला ही सेवा,हे जुळलेले भावनिक बंध उमगणार पण नाहीत.

नवीन नोकरीचे नेमणूकपत्र आणणारे, कुणाच्या नात्यात बाळं जन्माला आलं की खबरबात घेउन येणारे काका घरच्यासारखे आपल्या आनंदात सहभागी व्हायचे आणि नात्यातील कुणी गेल्याची तार घेऊन येणारे पोस्टमनकाका घरचीच व्यक्ती असल्यागत धीर वा सांत्वन करायचे.

लहानपणी खरतरं पोस्ट खातं म्हणजे फक्त तार,मनीआँर्डर, पत्र पोहोचवणारं खातं एवढचं समजायचं.पण जसाजसा काळ गेला, समज आली तेव्हा ह्या खात्याचा प्रचंड मोठा आवाका,काम बघून ह्यांच्याप्रती आदर अजूनच दुणावला. पुढे माझ्या आईने पोस्टाची एजन्सी घेतली.आर.डी,एन.एस.सी,के.व्ही.पी,पी.पी. एफ ह्या योजना डोक्यात शिरल्या. ह्या खात्यानेच जणू आम्हा भावंडांना आई करीत असलेलं काम बघून भविष्यात करायची तरतूद, काटकसर,नियोजन आणि सगळ्यात महत्वाची थेंबे थेंबे तळे साठे ही म्हण समजवणारी बचत ह्या गोष्टींचं अपरंपार महत्त्व अगदी लहानपणीच समजावीलं आणि त्याचा फायदा अजूनही आम्हाला होतोय.

भारतात कारभाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पसरेलेल्या जाळ्यांमध्ये प्रामुख्याने रेल्वे सेवा,टपाल सेवा ह्याचा उल्लेख करावाच लागेल. भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागात सुद्धा ही टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला.

बचतीच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी कर्जाचे महत्त्व जाणून भविष्यातील काळाची पावलं ओळखून ह्या टपाल खात्याने “बँकींग सेवा”पण सुरू केलीयं.

ह्या खात्याचे मला स्वतः ला खूप चांगले अनुभव आलेत. यवतमाळ ला सुदधा ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यवहारीक बाजू समजावून सांगून खूप सहकार्य केलं. माझे सासरे पोस्ट खात्याचे कर्मचारी होते. त्यामुळे ति.आईंना पोस्ट खात्याची पेन्शन मिळते. आधी यवतमाळ चे पोस्ट आँफीस,ह्या खात्यातील आँडीट सेक्शन आणि आता बडनेरा पोस्ट खात्यातील कर्मचारी ह्यांची मोलाची मदत आणि तत्पर सेवा आम्हाला वेळोवेळी मिळाली आणि अजूनही मिळते आहेच.त्यामुळे ह्या खात्याच्या समस्त कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिना निमीत्ताने धन्यवाद देऊन ह्या खात्याची सेवा आपल्यासाठी खरोखरच गौरवास्पद आहे हे जाणून आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘तुमची सतत सोबत करणारा तुमचा खरा साथीदार कोण?’ असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर  आपण कांही क्षण गोंधळून जाऊ. प्रश्न ऐकताच मनात निर्माण झालेल्या संभाव्य उत्तरांपैकी आई, बाबा, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं, मित्र यापैकी कुणाचे नाव घ्यावे हा संभ्रम आपल्याला गोंधळात टाकेल.पण ‘खऱ्या अर्थाने आपला साथीदार म्हणावं असं यापैकी कुणीच असू शकत नाही’ हा विचार मात्र या वैचारिक गोंधळात  आपल्या मनातही येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने साथीदाराची भूमिका निभावणाऱ्यांचं योगदान आपल्या खिजगणतीतही नसतं!

आपल्या पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देणारं, आपली सोबत करणारं, एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असं कुणी असेल तर ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन !!

जन्मतः हातीपायी धड शरीर आणि आपलं जगणं सजग करणारं मन दोन्हीही सक्षम,निरोगी,स्वयंपूर्ण राखण्याची जबाबदारी अर्थातच आपलीच असते. मात्र ही जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडणारे अपवादात्मकच असतात एवढं खरं. पूर्णतः स्वावलंबी असण्यासाठी निरोगी शरीर आणि खंबीर मन या अत्यावश्यक गोष्टी,पण स्वावलंबी असण्यातलं सुख परावलंबित्व येतं तेव्हाच समजतं याचं काय करायचं?

खरंतर माणसाला विनामूल्य, अगदी सहज जे उपलब्ध होतं त्याची किंमतच नसते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपलं शरीर आणि मनच! या दोन्हींची सक्षमता जगणं आनंदी करण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे याची आपल्याला जाणीवच नसते आणि ती होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरमनाला संजीवनी देणारा एक परवलीचा जादुई शब्द आहे. त्याचा अर्थ न् आवाका आपण समजून घ्यायलाच हवा.

सहजासहजी न मिळणारं पण सातत्यपूर्ण प्रयत्नांती ‘ देता घेशील किती दोन कराने’ असा चमत्कार घडवू शकणारा संजीवक मंत्रच भासावा असा हा सामर्थ्यवान शब्द म्हणजे ‘ बल’!

हा शब्द ऐकताच तो मुख्यत: शरीराशी संबंधित असावा असंच वाटतं याचं कारण या शब्दाचे ‘शक्ती’ आणि ‘सामर्थ्य’ हे सर्रास रुढ असणारे अर्थ.तरीही या दोन्ही अर्थांनाही इतका मर्यादित संदर्भ मात्र अपेक्षित नाहीय.शक्ती आणि सामर्थ्य हे शब्द केवळ बळकट, सशक्त, भक्कम शरीराचेच नव्हेत फक्त तर धैर्यशील,खंबीर,कणखर मनाचेही निदर्शक आहेत.

प्रतिकारशक्ती, अंगबळ, बाहुबळ, वकूब, बलाढ्य,बलवान,बलवंत, बलशाली,बलदंड,या शरीरबलाशी संबंधित अर्थसावल्या जशा तशाच मनोबल, सहनशक्ती, मन:शक्ती, इच्छाशक्ती, विचारशक्ती या आहेत मनाशी संबंधित!

शरीर आणि मनाच्या सक्षमतेला बुद्धिबलाची जोड नक्कीच पूरक ठरते.

आध्यात्मिक उन्नतीव्दारे प्राप्त होणाऱ्या बलाची प्राणशक्ती,तपोबल, तपसामर्थ्य, आत्मशक्ती ही कांही शब्दरुपे.

खरंतर शरीरबल असो वा मनोबल ते संकटाशी दोन हात करायचं सामर्थ्य देतात.ती संकटाचं निवारण करायला समर्थही असतात.पण हेच सामर्थ्य समोरचा प्रतिस्पर्धी जर कमकुवत असेल तर त्याला मात्र अस्मानी संकटच वाटतात.बलातूनच निर्माण होणारा ‘बला’ हा शब्द अशा भयप्रद संकटासाठीच वापरला जातो.

स्त्रीचा उल्लेख अनेकदा बल नसलेली, कमकुवत याअर्थी अनेकदा ‘अबला’ असा केला जातो. तरीही स्त्री खऱ्या अर्थाने अबला नसून सबला असल्याची असंख्य उदाहरणे आहेत जी ‘नारीशक्ती’चीच द्योतक ठरतात!

सामर्थ्याचा नकारात्मक,विध्वंसक वापर अधोरेखित करणारे पाशवी शक्ती,बलात्कार यासारखे शब्द स्वतःच त्यातली नकारात्मकता,कुरुपता ठळक करणारे आहेत.

शारीरिक बळ आणि मनोबल ही खरंतर निसर्गदत्त वरदानंच‌.माणसाने ती ओळखणं,जपणं,वृध्दिंगत करणं आणि त्याचा सकारात्मक वापर करणं हेच निसर्गाला अपेक्षित आहे. मात्र याचा विसर पडल्याचे सर्रास वास्तव मात्र कणाकणाने  माणसालाच हळूहळू नि:शक्त करीत ‘हतबल’ करणारे ठरते आहे याचे भान हरवून चालणार नाही. पण..? उमज पडेल तर..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वागत… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

स्वागत…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर

एका उदास संध्याकाळी आकाशाला फार रितं रितं वाटत होतं. सारखं कुणीतरी यावं, कुणीतरी यावं असं वाटायला लागलं. म्हणून त्यानं स्वागताची भव्य तयारी केली सुरू केली. इंद्रधनूची सप्तरंगी कमान उभी केली, पायवाटेवर लाल मखमल अंथरली पण कुणी आलंच नाही. त्याला वाटलं आपण या सजावटीसाठी एवढे कष्ट केले, इतकी सुंदर रांगोळी  पण घातली तरी कोणी का आले नाही? तो सूर्य किंवा चंद्र कोणाला तरी जबरदस्तीने घेऊन यावं  का? पण जर जबरदस्तीनं आणलं तर हे उदास वातावरण तसंच राहील. त्याच्या लक्षात आलं कि कुणीतरी यावं असं वाटणं हे अर्थशून्य आहे. कुणाला तरी यावं असं वाटणं हेच जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या तयारीचा काही उपयोग नाही. अखेर सगळी स्वागताची तयारी त्यानं गुंडाळून ठेवली आणि खिन्नपणे बसून राहीला. थोडया वेळाने एक एक करत तारे आले. तारकां आल्या सारं आकाश त्यांच्या चमचमाटानं भरून भारून गेलं. वारा ही मग इकडून तिकडे, तिकडून इकडे पळापळा करू लागला. खिन्न असलेलं वातावरण क्षणात आल्हाददायक झालं. आकाशाला कळेना, अरे! कुणी कमान कां उभी केली नाही म्हणून विचारलं नाही, कुणी गालीचा कां अंथरला नाही म्हणून थांबलं नाही. कुणाला या ही म्हणावं लागलं नाही. म्हणजे कुणाला तरी यावं असं वाटणं महत्त्वाचं असतं. मग त्याच्या मागून उल्हास आपोआप येतो. स्वागत करणाऱ्यांकडे उल्हास  आला कि येणारे आनंद घेऊनच येतात. अशावेळी स्वागताची सजावट हा फक्त उपचार असतो.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(…अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत?)

लताने गायलेली माझी आवडती गाणी आठवण्याचा प्रयत्न केला असता, हातातून बहुमोल मोती घरंगळून जावेत असेच होत होते. त्यातील कांही पेश करायचा मोह अगदीच आवरत नाही. मला लताचा १९५० ते १९५५ चा अगदी कोवळा आवाज फारच प्रिय आहे. म्हणून गाणी तशीच… ‘उठाए जा उनके सितम’ – (चित्रपट – ‘अंदाज’, १९४९, मजरूह सुल्तानपुरी – नौशाद), ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’ – (चित्रपट – ‘तराना’, १९५१, प्रेमधवन – अनिल बिस्वास), ‘साँवरी सूरत मन भाई रे पिया तोरी’ – (चित्रपट – ‘अदा’, १९५१, प्रेमधवन – मदनमोहन), ‘ये शाम की तनहाइयाँ’ – (चित्रपट – ‘आह’, १९५३, शैलेन्द्र – शंकर जयकिशन), ‘जाने वाले से मुलाकात ना होने पायी’ -(चित्रपट – ‘अमर’ – १९५४, शकील बदायुनी – नौशाद). अर्थात प्रत्येकाच्या आवडीला कांही परिमाण नाही हेच खरे!

कानांत प्राण एकवटून ऐकत राहावे असे हे आनंदघन बरसतात अन मन चिंब होते, कितीही भिजले तरी परत ते मखमली अन नर्म मुलायम स्वरतुषार झेलावेसेच वाटतात. अमृतलता असेल तर जितके अमृतपान करा, तितकी अतृप्ती वृद्धिंगत होतच जाते. मित्रांनो! ही अतृप्ती शाश्वत आहे, कारण लताचा ॐकारस्वरूपी स्वरच मुळी चिरंतन आहे, त्याचे अनादी अनंत रूप अनुभवल्यावर स्वाभाविकपणे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ मला आचार्य अत्रेंचे लताविषयीचे एक वाक्य फार आवडते, ‘सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपूरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीचा नाद, हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे.’ 

आचार्य अत्रे यांनीच लताला २८ सप्टेंबर १९६४ साली (अर्थात तिच्या वाढदिवशी) ‘दैनिक मराठा’ या त्यांच्या वृत्तपत्रात अजरामर झालेले असे त्यांचे मानपत्र अर्पण केले होते! संपूर्ण लेखच वाचनीय आहे, पण त्याची झलक म्हणून लताच्या अद्भुत, अनमोल अन अनुपम स्वराविष्काराचे वर्णन करतांना अत्र्यांनी किती नाजूक आणि मखमली शब्दांची आरास उभारली आहे बघा, ‘स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताचे केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर, अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिचा चरणाखाली जाड्याभरडया गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतकं विशोभित आहे. लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्णकिरणं दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतं तूच्या लेखणीने आणि वायूलहरीच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंड्यातून तिला अर्पण करायला हवं!’

इतके मानसन्मान, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि चित्रपटसृष्टीतला झगमगाट हे सर्व असूनही तिचा रियाज चुकला नाही अन पाय जमीनीवर होते ते तिथंच राहिले. जागतिक कीर्तीच्या प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल मधील तिला आंतरराष्ट्रीय गायिका म्हणून प्रस्थापित करणाऱ्या कार्यक्रमाची तारीफ करावी की, सर्वश्रेष्ठ असे दादासाहेब फाळके अन भारतरत्न पुरस्कार मिळाले तरी लताची विनम्रता कमी कशी झाली नाही याचे नवल करायचे?

स्वरलता या विषयावर रकान्यांवर रकाने, ऑडिओ, विडिओ, पुस्तके, सर्व कांही भरभरून उपलब्ध आहेत. पण आपण सागराला त्याच्याच जलाने अर्ध्य देतो ना, तसेच माझे हे अर्ध्य आहे! या स्वरदेवतेने स्वरसुमने भरभरून दिलीत! ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झालीय, ओंजळ कवाच भरली फुलांनी, डोळे बी भरले पाण्यानी, अन हृदय भरलं ‘हृदया’ च्या (लताचे हे नाव मला अतिप्रिय) स्वरमौक्तिकांनी! आता ‘हेचि दान देगा देवा’ की, फक्त लताचा निर्मोही, निरंकारी अन निरामय स्वर असावा, तिच्या सप्तसुरांच्या चांदण्यांच्या पायऱ्या चढत जावे आणि पारलौकिक संगीतअवकाशातील ध्रुव ताऱ्यासमान चमकणारी आमची लाडकी स्वरलता अनुभवावी फक्त तिच्या स्वरलहरींतून, अगदी याचि देही अन याचि जन्मी!  प्रिय वाचकांनो, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशा लताच्या स्वराविष्काराला तूर्तास विराम देऊन या अजरामर स्वरशारदेच्या चरणी नतमस्तक होते!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

२८ सप्टेंबर १९२९ चा अत्यंत मंगलमय दिवस! या दिवशी घडलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना! गंधर्वगायनाच्या पल्याड असलेले ‘लता मंगेशकर’ नामक सात अक्षररुपी चिरंतन स्वरविश्वाचे मूर्तरूप जन्माला आले.  अक्षय परमानंदाची बरसात करणारी स्वरशारदा लता आज संगीताच्या अक्षय अवकाशात ध्रुव ताऱ्यासारखी अढळपदी विराजमान झाली आहे. तिचे सूर अवकाशात असे कांही विखुरलेले आहेत की, ती या नश्वर जगात नसल्याचे जाणवतच नाही. ‘शापित गंधर्व’ दीनानाथ मंगेशकरांचा वारसा घेऊन लता आयुष्याचा प्रत्येक क्षण काटेरी वाटचाल करीत संगीताला समर्पित करूनच जगली. एखादी मूर्ती घडत असतांना टाकीचे घाव सहन करते, तसेच तिच्या आयुष्याची सुवर्णसांगता होण्याआधी तिने अगणित घाव सहन केले.  तिच्या संगतीने काम करणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार, सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरे तसेच गो नी दांडेकरांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्वाला अन मखमली स्वरांना दैवी सुवर्णकांती प्राप्त झाली. लता आयुष्यभर एक अनोखी अन अनवट सप्तपदी चालली, सप्तसुरांबरोबर! 

मंगेशकर भावंडे म्हणजे आजच्या भाषेत मी म्हणेन, ‘मंगेशकर ब्रँड’ याला अन्य नसे उपमान! अन्य नसे पर्याय! दीनानाथ आणि माई (शेवंती) मंगेशकरांचे हे पंचप्राण होते, प्रत्येकाचा गुणविशेष निराळा.             लताच्या या साफल्याचे रहस्य होते लहानपणापासून आपल्या पित्याकडून, अर्थात मराठी संगीत नाटकांचे प्रसिद्ध गायक अभिनेता ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांच्याकडून वारसाहक्काने आणि शिक्षणातून आलेली संगीतविद्या, तिची स्वयंस्वरप्रज्ञा आणि कठोर स्वरसाधना! अजाणत्या वयापासूनच लताचे हे संगीतज्ञान तिच्या पिताला जाणवले होते. तेव्हांपासूनच त्यांनी तिच्या गायकीला समृद्ध केले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ती रंगमंचावर गायला लागली. १९४२ मध्ये त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हां लता केवळ १३ वर्षांची होती. या कोवळ्या वयापासूनच ती भावंडांचा आधारवड झाली! संघर्षांची मालिका समोर होती, पण त्यांतूनच तिने हे काटेरी मार्गक्रमण केले.

प्रथम प्रसिद्धी मिळाली ती ‘महल'(१९४९) चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याला! तेव्हा लता वीस वर्षांची होती आणि या चित्रपटाची नायिका मधुबाला होती सोळा वर्षांची. या चित्रपटामुळे या दोघींची कारकीर्द बरोबरच बहरली, एक स्वरसम्राज्ञी अन दुसरी सौंदर्यसम्राज्ञी! गंमत म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डप्लेअरवर गायिका म्हणून नाव होते ‘कामिनी’ (तेव्हा रजतपटावर गाणे साकार करणाऱ्या पात्राचे नाव लिहीत असत)! नंतर लतानेच संघर्ष करून रेकॉर्डप्लेअर वर नावच नव्हे तर रॉयल्टी, तसेच गायक गायिका यांना वेगवेगळे फिल्मफेअर पुरस्कार इत्यादी मिळवून त्यांना त्यांचे श्रेय मिळवून दिले! लता आणि सिनेसृष्टीची अमृतगाथा समांतर म्हणायला हरकत नाही. १९४० पासून ते अगदी २०२२ पर्यंत जवळपास ८० वर्षांची असलेली ही सांगीतिक सोबत. तिच्या सोबतचे गायक, गायिका, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ, वादक, दिग्दर्शक, निर्माते असे हजारोंच्यावर लोक तिच्या बरोबर मार्गक्रमण करते झाले, कोणी अर्ध्या वाटेवर सोडून गेलेत. आता तर तीही त्यांच्या सोबत गेली आहे. आता हा स्वरामृताचा वेलू गगनाला भिडलाय!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं गाणं इतकं ऐकलं तरी असं कां होतं? ‘अगंबाई, अरेच्चा, हे सुंदर गाणे आजवर ऐकले कसे नाही! आई शप्पथ, हे असं कसं मिस झालं!’ मंडळी, ही कथा प्रत्येक रसिकाचीच असावी, इतके हे स्वरभांडार विशाल आहे. आणिक एक वेगळीच गंमत आहे हिच्या जादुई स्वरांत! ऋतूबदलाप्रमाणे आपल्या बदलत्या मूडनुसार आपल्यासाठी लताच्या आवाजाचे पोत बदलल्याचा आपल्याला भास होतो. खरे पाहिले तर एकदा ऐकून हा स्वरानंद आपल्या हृदयात झिरपत नाही असे असावे! बघा ना, आज जर माझा मूड ऑफ आहे, तर या अमुक गाण्यात लताचा आवाज मला जास्तच शोकविव्हल लागलाय असा फील येतो. काय म्हणू या बहुरंगी, बहुढंगी, फुलपाखरी आवाजाच्या कळांना, या स्वरांबद्दल बोलायचे तर संत तुकारामांची रचना आठवली, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे’! तिला काय माहिती की, तिने आमचे आयुष्य किती अन कसे समृद्ध केले ते! तिच्या आवाजाने समृद्ध झालेल्या ३६ भाषांपैकी कुठली बी भाषा असू द्या, या एकाच आवाजात ती भाषाच धन्य होईल अशी गाणी, एकदम ओरिजिनल लहेजा आणि स्वराघात! लता तू वरून काय घेऊन आलीस अन इथे काय शिकलीस, याचा अचेतन हिशोब करणे म्हणजे तारे मोजण्यापेक्षा दुष्कर. त्यापेक्षा सच्च्या रसिकांनी एक ऍटिट्यूड (वर्तमान संदर्भात नव्हे) ठेवावा, ‘आम खाओ, पेड मत गिनो’. फक्त तिच्या गाण्यावर फिदा व्हायचे, की विषय तिथंच आटोपला!

तिने दयाबुद्धीने कांही प्रांत अगदी तिच्या आवाक्यात होते तरी सोडले, शास्त्रीय संगीत अन नाट्यसंगीत. (यू ट्यूब वर आहेत मोजके)! दत्ता डावजेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे जिच्या नांवातच लय आणि ताल आहे, जिच्या गाण्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात, जिने ‘आनंदघन’ या नावाने मोजक्याच (चार) चित्रपटांना संगीत देऊन तमाम संगीतकारांवर उपकार केलेत, जिने शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण घेऊन, त्यात प्राविण्य संपादून देखील व्यावसायिकरित्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी सजवल्या नाहीत (प्रस्थापित शास्त्रीय गायकांनी देखील तिचे याकरता जाहीररीत्या आभार मानलेले आहेत!), तिच्याबद्दल संगीतकार वनराज भाटिया म्हणतात, ’she is composer’s dream!’ कुठल्याही संगीतकाराची गाणी असोत, खेमचंद प्रकाश, नौशाद, अनिल बिस्वास, ग़ुलाम मोहम्मद, सज्जाद हुसैन, मदनमोहन, जमाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांची कठीण चालींची, सलिलदा किंवा सचिनदांच्या लोकसंगीतावर आधारित असलेली, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन अन शंकर जयकिशन यांच्या अभिजात संगीताने नटलेली, की आर डी, ए आर रहमान, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजीची आधुनिक गीते असोत, त्या गाण्याला लताचा परीसरुपी स्वरगंधार लाभला की, त्याची झळाळी नवनवीन सुवर्ण उन्मेष घेऊन रसिकांच्या कलेज्याचा ठाव घ्यायची. अतिशय कठीण अन घनगंभीर चाली रचून लताकडून असंख्य रिहर्सल करून घेणारा संगीतकार सज्जाद हुसैन तर म्हणायचा, ‘फक्त लताच माझी गाणी म्हणू शकते!’

ही स्वरवल्लरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा वरचढ! कुठलाही रोग असू देत, हिच्याजवळ गाण्याच्या रूपात औषध हाजिर है! बरे यात ‘औषध मजला नलगे’ चे बहाणे अजिबात चालायचे नाहीत. लहान मुलीचे ‘बच्चे मन के सच्चे’, १६ वर्षांच्या नवयौवनेचे ‘जा जा जा मेरे बचपन’, विवाहितेचे ‘तुम्ही मेरी मंजिल’, समर्पितेचे ‘छुपा लो यूं  दिल में प्यार मेरा’, तर एका रुपगर्वितेचे, ‘प्यार किया तो डरना क्या’, एका मातेचे ‘चंदा है तू’, एका क्लब डांसरचे (आहे मंडळी) ‘आ जाने ना’ एका भक्तिरसाने परिपूर्ण अशा भाविकेचे, ‘अल्ला तेरो नाम’, एका जाज्वल्य राष्ट्राभिमानी स्त्रीचे, ‘ऐ  मेरे वतन के लोगों’! अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत? 

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सहजच गप्पांचा, चर्चेचा फड रंगला की बायकांचे किंवा पुरुषांचे एक वाक्य ऐकायला येते, “एखादी मुलगी असावीच बघा. ” मलाही दोन मुलेच आहेत मग कुणीपण म्हणते, “मुलगी एक हवी होती बघा!”पण मी म्हणते का?मुलीला माया असते, अमुक तमुक… म्हातारपणी एखादे विसाव्याचे ठिकाण असावे.. वगैरे. पण खरेच असे असते का? मुली प्रेमळ असतात न मुले नसतात, हा शोध कुणी लावला?(माझी दोन्ही मुले प्रेमळ आहेत आणि आईच्या सेवेसाठी तत्पर असतात)असे कोणतेच विधान सरसकट करता येत नाही. मुली प्रेमळ, मुले कठोर, किंवा मुली सेवा करतात, मुले टाकून देतात.. खरे तर व्यक्ती परत्वे स्वभाव, संस्कार भिन्न असतात. अमुक एक जात, पंथ, धर्म चांगला/वाईट असे काहीच नसते, प्रत्येक जाती, धर्म पंथात वेगवेगळ्या आचार विचार आणि स्वभावाची माणसे असतातच.

तसेच आपल्या अपत्याबाबत देखील असते. मुळात आपल्या म्हातारपणी काठी व्हावीत, आपली सोय व्हावी म्हणून मुले जन्माला घालणे चूक आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा प्राणी किंवा जीव निर्माण करतो. समाज टिकवण्यासाठी एका जिवातून दुसरा जीव तयार होतो. मुलांचे पालन पोषण नीट करून सुसंस्कृत बनवून त्यांना सशक्त सुदृढ बनवणे व एक बलशाली राष्ट्र बनवणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच त्याला त्याच्या कलेने  योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही कर्तव्य आहे. हे करत असताना स्वतःही स्वतःसाठी जगत, स्वत:बरोबर कुटुंबाला वेळ देणे, मुलांना वेळ देणे आणि मुलं सज्ञान झाली की आपण आपण वानप्रस्थाश्रम याचा अर्थ स्वतःचे उर्वरित पूर्ण  आयुष्य समाधानात, आनंदात घालवणे ही आजच्या काळातील अतिशय महत्वाचे आहे. पण हे घडताना दिसते अतिशय दुर्मिळ. उलट ‘आम्ही तुला लहानाचे मोठे केले, ‘यावं त्यांव करून पालक सतत पाल्याभोवती भुण भुण लावतात, जेष्ठ झाल्यावर तर अजूनच जास्त.

याच्या विरुद्ध पालक कितीही चांगले वागले तर मुले त्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि अशा पालकांना पण उतारवयात दुःख होते. एकूण मुली आहेत म्हणून आनंदी आनंद आणि मुले म्हणजे दुःखच दुःख असे काहीच नाही. चांगले पालक मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट असते तशीच मुले चांगली, सद्गुणी निघणे हेही भाग्यावरच अवलंबून आहे असेच चित्र आता सगळीकडे दिसत आहे, कारण भारतीय समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आला आहे, यात ग्रामीण, शहरी फरक  राहिला नाही.

परवाच ऐकलेली दोन उदाहरणे सांगते. मुलींनी वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा म्हणून आईवडीलांवर केस घातली. वडिलांना मानसिक धक्का बसून अर्धांग झाला. एकुलता एक भाऊ बिचारा खाजगी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंब चालवत आहे.

दुसरे उदाहरण वडिलांचा वार्धक्याने मृत्यू झालाय. तिन्हीसांज झाली आहे. टिपटीप पाऊस आहे, अंत्ययात्रेला माणसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इतक्यात मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला जातो, तासभर शोधूनही तो मिळत नाही(दारू पिऊन कुठल्या कोपऱ्यात पडला होता कोण जाणे!)शेवटी वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. काय करायची असली मुले-मुली असून?ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

आजकाल किती मुली मोठ्या झाल्या की घरची सर्व कामे करून आईला विश्रांती देतात?मी तर म्हणेन हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच, उलट शिक्षण चालू आहे तोवर आईच सगळं करते, पुढं नोकरी लागते, लग्न होते मग वर्षभराच्या सर्व बेगमी(चटण्या, उन्हाळी पदार्थ)मुली आईकडूनच करून घेतात. काही मुली राहिलेलं शिक्षण परत माहेरीच राहून पूर्ण करतात आणि आईच सर्व मुलीचे पाहते, घरकाम पाहते. आई आपल्या अपत्यावरील प्रेमाखातर सर्व आनंदाने करते पण मुलीला आपल्या आईबद्दल कणव कधी वाटणार?अशी बरीच उदाहरणे आसपास दिसतात.

सज्ञान झाल्यावर चांगले-वाईट, नैतिक अनैतिक यातला फरक कळण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची व जबाबदारीने वागण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची असते. पालक ठराविक वयापर्यंतच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तिथून पुढं आपण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालणे अपेक्षित असते, पण असे होत नाही. आज ढवळलेले सामाजिक वातावरण, गढूळ झालेली माणुसकी, यातून निरक्षीर विवेक जागृत ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. यातून जे तरतात, त्यांची कुटुंबे संतुलित आणि आनंदी राहतात बाकी प्रवाहात गटांगळ्या खातात.

असो, पालकांनीच आता मुलांकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मुलांवर प्रेम आणि पालन पोषण केलं तर भविष्यात मुलं आपल्यासोबत प्रतिकूल वागली तर दुःख व पश्चाताप होणार नाही. अन्यथा शेक्सपिअर म्हणतोच, ‘माणसाच्या दु:खास तो स्वतः कारणीभूत असतो.’

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

 🌸 विविधा 🌸

☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

‘प्रज्ञा ‘हा शब्द आपल्या ऐकण्यात,  बोलण्यात, वाचण्यात नेहमी येतो. पण त्याच्या अर्थाविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. भारतीय मानसशास्त्रात ‘प्रज्ञा’ही संकल्पना अतिशय सुंदर रित्या स्पष्ट केलेली आहे. प्राचीन काळात ऋषिमुनींनी निर्माण केलेले साहित्य ही आपली अशी संपत्ती आहे की त्यामुळे आज भारताचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा वापर सुरू झाला आहे. अशा भारतीय मानसशास्त्रातील एक संकल्पना’प्रज्ञा’. याविषयीचे विचार येथे व्यक्त केले आहेत.

संस्कृत मध्ये ‘प्रज्ञा’असा मूळ शब्द वापरतात. याला पूरक असे ‘प्राज्ञ’व ‘प्राज्ञा’ असेही शब्द आहेत. व्यक्तीचे शुद्ध आणि उच्च विचार युक्त शहाणपण,  बुद्धिमत्ता आणि आकलन म्हणजे ‘प्रज्ञा ‘. ही शहाणपणाची अशी पातळी आहे की तर्काने आणि निष्कर्षाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा उच्च आहे.  प्रज्ञ= प्र +ज्ञ . प्र म्हणजे परिपूर्ण आणि ज्ञ म्हणजे माहीत असणे किंवा संकल्पनेचा अत्यंतिक जवळून अभ्यास करणे.  प्रज्ञा या संकल्पनेविषयी वेद , उपनिषद व योगशास्त्रात संदर्भ सापडतात.

ऐतरेय उपनिषदात प्रज्ञेविषयी खालील श्लोक सापडतो.

तत्प्रज्ञानेत्रम प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञानं ब्रम्ह (iii. i. 3).

जे अस्तित्वात आहे ते म्हणजे शारीरिक व आध्यात्मिक ज्ञान.  या ज्ञानाचे मूळ प्रज्ञा आहे म्हणजे स्वजाणीव किंवा सुषुप्ती.  कौशितकी उपनिषदामध्ये इंद्राने मृत्यूचे वर्णन करताना प्राण आणि प्रज्ञा शरीरात एकत्र राहतात व मृत्यूचे वेळी एकत्रित निघून जातात असे म्हटले आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत.  पंचेंद्रियांची कार्येही प्रज्ञेशिवाय होऊ शकत नाहीत. तसेच प्रज्ञेशिवाय विचार यशस्वी होऊ शकत नाही.

वेदांत सार मध्ये प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

अस्य प्राज्ञात्वम स्पष्टोपाधि तया नती प्रकाशत्वात॥४४॥.  

आत्मा हा निर्गुण असतो.  ईश्वर मात्र सर्व गुणांनी युक्त असतो व चराचरावर राज्य करत असतो पण प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याच्या अज्ञानाचा एक भाग म्हणजे सदोष बुद्धिमत्ता. सुषुप्ति अवस्थेतील आत्मा जेव्हा आनंदमय विज्ञानघन असतो तेव्हा त्याची बुद्धिमत्ता ही प्रज्ञा असते.

मांडुक्योपनिषदात प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

आनंदभुक चेतोमुखःप्राज्ञः॥

प्रज्ञा म्हणजे जागृती अवस्थेत साधन लाभलेल्या(असलेल्या)आशीर्वादाचा आनंद घेणारा उपभोक्ता.

उपनिषद रहस्य या पुस्तकात प्रज्ञाचे इत्यंभूत वर्णन केले आहे. प्रज्ञा ही जगाचे चक्षु असून जगाचा आधारही आहे. प्रज्ञा प्रत्यक्ष ब्रम्ह आहे.  सर्व स्थावर जंगम, वस्तू, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी व आकाशात उडणारे सर्व पक्षी, सर्व पंचमहाभूते व देवता हे सर्व प्रज्ञेतच अंतर्भूत होतात व प्रज्ञेमुळे जिवंत राहतात असे उपनिषद्काराचे मत आहे.

पतंजली योगसूत्रामध्ये प्रज्ञेचा उल्लेख खालील श्लोकात केलेला आढळतो.  

ॠतंभरा तत्र प्रज्ञा ॥

निर्विचार समाधी विषयी स्पष्टीकरण करताना असे म्हटले आहे की,  ज्ञान हे जेव्हा निष्कर्षाच्या आणि ग्रंथांच्या पलीकडे जाते तेव्हा ते फक्त सत्यानेच भरलेले असते. मन हे शुद्ध असते अशावेळी असलेल्या स्थितीत प्रज्ञा जागृत असते.  

संस्कृतीकोष मध्ये व काही वेबसाईटवर( संदर्भामध्ये दिलेल्या आहेत) प्रज्ञा या संकल्पनेविषयी लिहिताना असे म्हटले आहे की , प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञानाचे किंवा जगण्याचे इंद्रिय स्वरूप. प्रज्ञा हे प्राचीन संस्कृत नाम असून त्याचा सखोल अर्थ शहाणपण हाच आहे . प्रज्ञा हे देवी सरस्वतीचे नाम आहे . सरस्वती ही कलेची व वादविवादाची देवता आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे आकलन, ज्ञान व संकल्पनेशी  अत्यंत जवळीक असणे असेम्हटले आहे तर महाभारतानुसार,  प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे अध्ययन, संकल्पनेचा शोध असे म्हटले आहे . शतपथ ब्राह्मण व सांख्यायन श्रोत-सूत्र यांच्या नुसार शहाणपण,  ज्ञान,  बुद्धी,  तर्क , आराखडा मांडणे,  साधन वापर या गुणधर्मांसाठी प्रज्ञा हा शब्द वापरला आहे.

बुद्ध संप्रदायानुसार प्रज्ञा किंवा पन्ना( पाली )म्हणजे शहाणपण . याचा अर्थ वास्तवातील सत्याबद्दल असलेली मर्मदृष्टी .  प्र म्हणजे जागृती, ज्ञान किंवा आकलन आणि ज्ञ म्हणजे उत्स्फूर्त ज्ञानाची उच्च, व्यापक, जन्मजात बहरलेली अवस्था होय.

प्रज्ञेचे एकूण तीन प्रकार आहेत.

  1. श्रुतमय प्रज्ञा
  2. चिंतनमय प्रज्ञा
  3. भावनामय प्रज्ञा

श्रुतमय प्रज्ञा म्हणजे असे ज्ञान की जे फक्त ऐकलेले किंवा वाचलेले आहे.  हे ऐकिवज्ञान अनुभूतीच्या स्तरावर उतरलेलं असेलच असे नाही . श्रुतमय ज्ञान प्रेरणा घेण्यासाठी गरजेचं असतं. ज्ञान ऐकल्यानंतर पुढचा टप्पा असतो ज्यात चिंतनाची आवश्यकता असते. या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात आणि चिंतन झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती घेतली जाते.  अनुभूतीनंतर जे ज्ञान होते त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतात.  भावनामय प्रज्ञा सर्वात महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती श्रुतमय प्रज्ञेचा साक्षात्कार करेलही व चिंतन ही करेल पण त्याचा अनुभव घेईलच असे नाही म्हणून प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्वानुभवाच्या बळावर जे जे काही उतरते त्याला ‘प्रज्ञा ‘असे म्हणतात.

या संकल्पनेचा एवढा विचार करणे ही सध्याच्या काळातील प्राथमिक गरज आहे. मुलांना कसे वाढवावे याविषयी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना किती सखोल मार्गदर्शन करावे याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन मिळते. प्रत्येक मुलातील ‘प्रज्ञा’जागृत झाल्याशिवाय त्याचा विकास परिपूर्ण होणार नाही व मुले आयुष्यात समाधानी होणार नाहीत म्हणून भारतीय मानसशास्त्रातील संकल्पना सर्वांनी अभ्यासल्या पाहिजेत.

संदर्भ

  1. भारतीय संस्कृती कोश -पंडित महादेव शास्त्री जोशी
  2. उपनिषद रहस्य -गुरुदेव रानडे
  3. प्रवचन सारांश -विपश्यना शिबिर
  4. द प्रिन्सिपल उपनिषद- स्वामी निखिलानंद
  5. http://www. pitrau. com”Meaning of Pradnya”
  6. www. bachpan. com”Meanimg of Pradnya”
  7. Sanskrit Dictionary(revised 2008)-Lexicon (http://www. sanskritlexicon. unikoein. de)
  1. The Golden Book of Upanishads-Kulshreshtha Mahendra

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी फुले आणायला गेले आणि बघतच राहिले.त्या मावशींनी एक वृत्तपत्राचा कागद घेतला त्यात फुले,तुळस,बेल ठेवले आणि मोठ्या निगुतीने छान पुडी बांधली.आणि त्यावर छान दोरा गुंडाळला.त्यांची एकाग्रता बघून असे वाटले,जणू त्या खूप मौल्यवान वस्तू किंवा औषध त्यात बांधत आहेत.आणि तसे तर ते  होते.ज्या फुलांनी देवाची पूजा होणार आहे ती असामान्यच!

त्यांनी तो दोरा गुंडाळत असताना मनाने मला पण गुंडाळले ( फसवले नव्हे ).माझे भरकटत चाललेले मन जागेवर आणले.त्या फुलांच्या पुडीमुळे मी मात्र बालपणात पोहोचले.आणि आठवले कित्येक वर्षात आपण अशी कागदी पुडी पाहिलीच नाही.दुकानात जायचे आणि चकचकित प्लास्टिक मध्ये टाकून वस्तू आणायच्या.त्यातील बऱ्याच वस्तू मशीनमध्येच चकचकित कपडे घालून येतात.मग लक्षात आले,माझ्या लहानपणी सर्वच वस्तू कागदाच्या पुडी मधून यायच्या.ही आजची फूल पुडी बघून मन भूतकाळात शिरले.

मला चांगलेच आठवते प्रत्येक दुकानात वस्तू बांधून देण्याचे कागद वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले असायचे.त्या वरून दुकानदाराची पारख करता यायची.काही दुकानदार त्या कागदांची प्रतवारी करून ठेवायचे.म्हणजे प्रत्येक वस्तू साठी व वस्तूच्या वजना प्रमाणे ( वजना प्रमाणे आकारमान पण बदलायचे ) कागदाचे वेगवेगळ्या आकारात तुकडे करुन ठेवलेले असायचे.काही जण ते लहान मोठे तुकडे वेगवेगळ्या कप्प्यात ठेवायचे.अगदी इस्त्री केल्यासारखे!आणि वस्तूचे वजन करून झाल्यावर मोठ्या काळजीने कागद काढून घ्यायचे.व व्यवस्थित घडीवर घडी घालून पदार्थ त्यात ठेवायचे.त्यावेळी असे वाटायचे जणू हे त्या पदार्थला कपडेच घालत आहेत.  काही जण दुकानातच वेगवेगळ्या सुतळीत किंवा जाड दोऱ्यात सर्व कागदाच्या तुकड्यांचे कोपरे जुळवून ओवून ठेवायचे.त्यातही लहान मोठे अशी वर्गवारी असायची.आही जण मात्र वृत्तपत्राचे गठ्ठेच एका कोपऱ्यात ठेवायचे.व वस्तू मापून झाली की टरकन कागद फाडून त्यात वस्तू गुंडाळायचे.त्या वस्तू कागदात बांधताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असायच्या. 

आतील कागद बाहेरच्या कागदाला आधार देत असायचा.जणू लहानांचे महत्वच सांगत असायचा.त्या नंतर त्यावर दोरा बांधला जायचा.तो दोरा मात्र खूप ठिकाणी एकाच पद्धतीने दिसायचा.बहुतेक तराजूच्या अगदी बाजूला किंवा वरच्या बाजूला मोठे रिळ असायचे.व त्याचे एक टोक खाली लोंबत असायचे.आणि ते टोक ओढले गेल्यावर ते रिळ एकाच लयीत नाचत असायचे!दोरा संपत असेल तरी कोणाच्या तरी उपयोगी पडतो म्हणून त्यालाही आनंद होत असावा.

प्रत्येक दुकानाची पुड्या बांधायची खास शैली असायची.आणि ती बघूनच वस्तू कोणत्या दुकानातून आणली ते समजायचे.हे झाले दुकानदाराचे कौशल्य!

आमचे कौशल्य या पुड्या घरी आल्या नंतरचे!त्या कागदात काय आहे याची इतकी उत्सुकता असायची कारण कागद पारदर्शक नसल्याने आणि त्याला दोऱ्यात गुंडाळल्या मुळे आत काय आहे ते दिसायचेच नाही.ती पुडी दुसऱ्या कोणी आणली असेल तर ही उत्सुकता जरा जास्तच असायची.आणि स्वतः वस्तू आणलेली ( मोठ्यांच्या सांगण्यावरून ) असेल तर पोटात बारीक धडधड व छोटासा गोळा यायचा.कारण आणायला सांगितलेली वस्तू चांगली असेल तर कौतुक व शाबासकी,वस्तू ठीक असेल तर काही नाही पण जर वस्तू नीट नसेल तर जगबुडी झाल्या सारखी बोलणी आणि एक दोन धपाटे ठरलेले असायचे.नीट बघता आले नाही का ते काका कोणती वस्तू देतात? असा आमच्या अकलेचा उद्धार ठरलेला असायचा.आमचे कौशल्य या पुढचे.डब्यात गेलेल्या वस्तूने परिधान करुन आईच्या हाताने सोडलेला कागद घ्यायचा आणि त्यावर हात फिरवून छान सरळ करायचा.तो दोन्ही बाजूंनी वाचायचा.त्या वरची चित्रे बघायची व्यंग चित्रे असतील तर हसून घ्यायचे.सिनेमाच्या जाहिराती असतील तर मोठ्यांच्या चोरुन बघून घ्यायच्या.हो आमच्या लहानपणी तेवढेच करावे लागायचे.त्या नंतर तो कागद पलंगाच्या गादीच्या खाली राहिलेली इस्त्री करायला जायचे.त्यावेळी हे कागद फेकून दिले जात नसत.काही दिवसांनी तो कागद घरातील कोणती जागा मिळवणार आहे ते ठरायचे.म्हणजे काही कागद डब्यांच्या खाली जायचे.काही डब्यांच्या झाकणाच्या आत बसायचे.काहींच्या नशिबात चकलीचे चक्र असायचे तर काहींना तळलेली चकली मिळायची.आणि काही कागद तेलकट डबे,निरांजन पुसणे याच्या कामी यायचे.तिच व्यवस्था पुडी बरोबर आलेल्या दोऱ्याची.तो दोरा सोडल्यावर एखाद्या काडीला किंवा दोरा संपून राहिलेल्या रिकाम्या रिळाला गुंडाळून ठेवला जायचा.आणि योग्य ठिकाणी वापरला जायचा.त्या वेळी भराभर फेकून देणे हा प्रकार नव्हता.आणि हे सगळे करण्यात कोणाला कमीपणा पण वाटत नसे.तेव्हा कोणालाच प्लास्टिक चे वारे लागले नव्हते.आणि हायजीन च्या कल्पना वेगळ्या होत्या.समाजातील गरीब,श्रीमंत सगळेच एकाच दुकानातून व वृत्तपत्राच्याच कागदातून सामान आणायचे.कारण मॉल उदयाला आले नव्हते.विशेष म्हणजे रिड्यूस,रीयूज आणि रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणली जायची.

आयुष्यात किराणामाल या शिवाय अनेक पुड्या यायच्या.कित्येक घरी फूल पुडी यायची ती पानात बांधलेली असायची.भेळेच्या गाडी वरची भेळ पण खायला व बांधून कागदातच मिळायची.आणि भेळ खाण्यासाठी चमचा पण जाड कागदाचाच असायचा.या शिवाय भाजलेले शेंगदाणे,फुटाणे शंकूच्या आकारातील निमूळत्या पुडीत मिळायचे.ती पुडी फारच मोहक दिसायची आणि ती पुडी घरात कोणी आणली की बाळ गोपाळ आनंदून जायचे.देवळातील अंगाऱ्याची चपटी पुडी परीक्षेला जाताना खूप आधार देऊन जायची.त्या वेळी केळी सुद्धा कागदात बांधून यायची.यात अजून विशेष पुडे आहेतच.बघायला आलेल्या मुलीला पेढ्यांचा मोठा पुडा मिळायचा.शिवाय साखर पुड्यात पण त्या ताटांमध्ये साखरेचे पुडे इतर साध्या पुड्यांमध्ये रंगीत कागदात ऐटीत बसायचे.

आता हे वाचून जर कोणाला असे वाटले की मी पुड्या सोडत आहे.तर त्याला माझा इलाज नाही.ज्यांनी तो काळ अनुभवला आहे त्यांना यातील सत्यता नक्कीच पटेल.आणि लहानपणात तेही थोडा फेरफटका मारुन येतील.

तर माझं हे असं होतं.अशी कोणतीही वस्तू मला आठवणीत घेऊन जाते.आणि मी असे काही लिहिते.असो!तुम्ही वाचता म्हणून किती लिहायचे ना?

या पुडीच्या निमित्ताने सगळ्या पुड्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.आणि ही आठवणींची एक पुडी मी सोडून दिली आहे. आता ही पुडी तुम्हाला कोणकोणत्या पुड्यांची आठवण देते ते आठवा बरं!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

२९/९/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सुरवातीला अधिक महिना, मग श्रावण महिना,त्या नंतर गौरी गणपती हयामुळे दोन अडीच महिने नुसती भक्तगणांची धावपळ होती. पूजाअर्चा , देवदर्शन, व्रतवैकल्ये, ह्यामध्ये बहुतेक सगळे गुंतले होतें. श्रावण आणि अधिक महिन्यातील व्रतवैकल्ये आणि गणपती महालक्ष्मी उत्सव ह्यांमुळे हे सगळे दिवस प्रचंड उत्साहाचे, चैतन्याचे आणि धावपळीचे गेलेत.

ह्या सगळ्या धावपळी नंतर प्रत्येकाला आता थोडीशी विश्रांती, थोडीशी शांतता, अगदी मनापासुन हवीहवीशी वाटते, नव्हे आपलं शरीर आता आरामाची, जरा उसंतीची आतून मागणी करीत असत.आता जर पंधरा दिवस जरा शांत, स्थिर गेलेत तर पुढें नवरात्र, दिवाळी ह्यासाठी लागणारा उत्साह, शक्ती आपल्यात तयार होईल असं मनोमन वाटतं.

सहज मनात आल ज्या प्रमाणे आपलं त्याचं प्रमाणे देवाचं सुध्दा असेल. त्यांचे ही हे सगळे दिवस प्रचंड व्यस्ततेत गेले असतील. ती देवळांमध्ये होत असलेली प्रचंड गर्दी, भक्तांकडून होणारा तो दूध पाण्याचा अभिषेकाच्या निमित्याने होणारा मारा, ती कचाकचं तोडण्यात येऊन देवाला वाह्यलेली फुलं, पत्री, तो प्रसादाच्या पदार्थाचा कधी कधी अतिरेक आणि सगळ्यांत कळस म्हणजे ह्या नंतर भक्तांकडून मागण्यात येणाऱ्या गोष्टी, त्यासाठी नवसाची बोलणी, ह्या सगळ्यामुळे देऊळ वा देव्हाऱ्यातील देव सुध्धा जरा उबगलेच असतील नाही ?

अर्थातच मी संपूर्ण आस्तिक गटातीलच आहे, देवावर माझा प्रचंड विश्वास आहे, ह्या शक्तीपुढे कायम नतमस्तक रहावसच आपणहून वाटतं, फरक जर कुठे पडत असेल तर तो भक्तीत न पडता तो हे दर्शविण्याचा पद्धतीत पडतो. मला स्वतःला दिवसाची सुरवात आणि दिवसाचा शेवट हा देवाच्या दर्शनाने झाला तर मनापासुन आनंद मिळतो, सुख वाटतं. परंतु हे करतांना ती गर्दी असलेली देवळ, भरमसाठ तोडलेली फुलं, पत्री हे मनापासुन नको वाटतं वा कुणी केलेलं दिसलं ते मला अस्वस्थ करुन जात. असो

आता पंधरा दिवसाच्या ब्रेक नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी ह्यांचे वेध लागतील. तेव्हा सगळ्यांनी जरा विश्रांती घ्या आणि नव्या उत्साहाने परत सण, सोहळे ह्यांच्या स्वागताला सज्ज व्हा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज सोनमर्ग स्थलदर्शन होते. श्रीनगरहून सकाळी लवकरच निघालो. तिथून सोनमर्ग पर्यंतचे अंतर ८६ किलोमीटर होते. पण संपूर्ण रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि तुलनेने बराच लहान होता. त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सावकाश जावे लागत होते. या रस्त्यावर मिलिटरीच्या वाहनांची खूपच वर्दळ होती. त्यांची वाहने आली की इतरांना सरळ बाजूला थांबावे लागत होते. एकेका कॉनव्हाॅय म्हणजे ताफ्यात शेकडोनी वाहने असतात. पण अतिशय शिस्तबद्ध रीतीने जातात. एवढ्या प्रतिकूल वातावरणातले त्यांचे हे झोकून देऊन काम करणे पाहून त्यांचे खूपच कौतुक आणि अभिमान वाटला. आमच्या सॅल्युटला ते पण कडक  सॅल्युटने उत्तर देत होते.

सोनमर्गला जायला जवळजवळ चार-पाच तास लागले. पण प्रवासात वेळ कसा गेला कळलेच नाही. सर्वांच्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या सुरू होत्याच. पण बाजूचा निसर्ग कितीही पाहिला तरी समाधान होत नव्हते.

एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला दरी होती. दरीच्या पलीकडे बर्फाच्छादित उंच पर्वत, मध्येच हिरवीगार कुरणे, मधे मधे स्वच्छ सुंदर सरोवरेही दिसत होती. जिकडे बघावे तिथले दृश्य म्हणजे एक एक चितारलेला कॅनव्हासच वाटत होता. सोनमर्ग इथल्या निसर्ग संपदेसाठी प्रसिद्ध आहे. सोनमर्ग म्हणजे ‘सोन्याची कुरणे’. इथे हिरवळीची मैदानी कुरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. बर्फाच्या टोप्या घातलेली पर्वत शिखरे आणि हिरवीगार कुरणे ही सोनमर्गची वैशिष्ट्ये आहेत. सोनमर्गला ‘सरोवरांची नगरी’ पण म्हणतात. इथे लहान मोठी असंख्य सरोवरे आहेत. त्यातले ‘विशनसर’ सरोवर तर खूप प्रेक्षणीय आहे. नितळ निळेशार पाणी, सभोवती हिरवीगार कुरणे यामुळे अतिशय सुंदर दिसणारे हे मोठे सरोवर सर्वांना आकर्षित करते. वसंत ऋतूत तर इथे रंगीबेरंगी फुलांनी जागोजागी चादर पसरलेली असते.

असा आजूबाजूचा निसर्ग पहात, प्रवासाचा आनंद घेत आम्ही सोनमर्गला पोहोचलो. इथे ‘बबलू’ या मराठी रेस्टॉरंटमधे  आम्हाला चक्क पिठलं भाकरीचे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले.

इथून वेगवेगळ्या चार पाच पॉईंटना छोट्या वाहनाने जाता येते. आम्ही तिथल्याच मोठ्या पठारावरून थोड्या अंतरावरील शिखरावर चढून गेलो. तिथून थाजीवास ग्लेशियर दिसते. ते संपूर्ण दृश्य अप्रतिम दिसत होते. त्याच्या समोरच्या उंच शिखरावर बर्फाने घातलेली टोपी म्हणजे जणू हिऱ्याचा मुकुट शोभून दिसत होता. सूर्योदयाच्या वेळी पहिल्या सूर्यकिरणात हा बर्फ पिवळा दिसतो तेव्हा जणू सोन्याचा मुकुट वाटतो. पण तो नजारा आम्हाला त्यावेळी बघणे शक्य नव्हते.

शुभ्र हिमाच्या शिखरावरती

 सहस्त्ररश्मी तळपला

 सुवर्णवर्खी शाल ओढूनी

 सुवर्णहिम झळकला ||

बाजूच्या उतारावर मेंढ्या चरत होत्या. एखाद्या सुंदर चित्रावरच आपण उभे असल्याचा भास होत होता. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. हाच निसर्ग संध्याकाळी वेगळाच दिसत होता. तो अनुभवत आम्ही परत निघालो.

एकूणच सोनमर्ग इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच ते ट्रेकर्सचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. ट्रेकिंग साठी इथे असंख्य ठिकाणे आहेत. इथले ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींग प्रसिद्ध आहे. इथेच अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प पण आहे.

सोनमर्गच्या असंख्य नितळ पाण्याची सरोवरे, हिरवीगार कुरणे, रंगीत फुलांचे गालिचे, दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. त्याच्या मधूनच जाणाऱ्या नागमोडी घाटाने आम्ही परत आलो.

श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम, सोनमर्ग अशा काश्मिरच्या प्रसिद्ध ठिकाणांच्या दर्शनाने मन भरून आणि भारूनही गेले. खरोखरीच हे नंदनवन भारताचे भूषण आहे. आधुनिकीकरणासाठी इथल्या निसर्गाला कसलीही हानी पोहोचवलेली नाही. म्हणूनच हे अनाघ्रात सौंदर्य आहे तसेच  बावनकशी राहिलेले आहे. हे सर्व पाहून मन तृप्त समाधानाने भरले होते. आमची ही नंदनवनाची सफर आता खरोखरच आनंदाचा ठेवा बनवून राहील.

 – समाप्त –

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print