विविधा
☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆
इतकं पण धावू नका…
आणि अकालीच वरती जाऊ नका !
अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की, आपल्याजवळ ‘आपल्यासाठीच’ वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की, धाव धाव धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी…. ऐश्वर्य.. जे जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो.
मित्रानो…. ही कहाणी आहे जामनगर (गुजरात) च्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा !
आजवर १६ हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉ. गौरव गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरु करून त्याद्वारे सर्वाना जागे करत होते.
इतक्या लहान वयात १६ हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे ते रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल्ल काम !
असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखाण्यात पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही, इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता.
दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एक तर ४१ हे काही जायचे वयच नाही, आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरचे, ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉ गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले ?
मला एकदम आपल्या डॉ. नितु मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ! ते तर म्हणायचे की, “मला आजारी पडायला देखील वेळ नाही, इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे”
मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले !
कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण, आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक !!
खूप वाईट वाटतं अशावेळी !
अर्थात एकेकाळी ऐन चाळीशीतच असताना मलाही अटॅक आलेला. पूना हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट ! मात्र डॉ. जगदीश हिरेमठ सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते मी आजवर पाळलं, त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गडकिल्ले चढून जातोय ! नाहीतर ”चार जिने सुद्धा यापुढं चढता येणार नाहीत’ असं त्यांनी सांगितलं होतं.
थोडक्यात सांगतो, ‘वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण’ हि त्रिसूत्री त्यांनी दिलेली. जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही, आणि झोपेचीही ! झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने किंवा व्यायाम, बास ! इतकंच पुरते !!
मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्तमौला होते. चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच ‘चार’ लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा.
डॉ. डी डी क्लास : मंडळी… स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका, की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. किंवा मग ‘राहणारच’ नाही. स्वतःच स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतः स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या ! तुम्ही फक्त तुमचे नाहीत तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल ?
बिझिनेसमध्ये अप डाऊन सुरु आहे ? असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !
नोकरीच्या जागी…. बॉसिंगचा त्रास आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !
घरात नातेवाईकांत वादविवाद, भांडण सुरु आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !
विचार करा मंडळी…. वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही. हे नक्की ! त्यासाठी शुभेच्छा !
© डाॅ. धनंजय देशपांडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈