मराठी साहित्य – विविधा ☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆

सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले

? विविधा ?

☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले  

स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना ‘स्वयंशिस्त’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात स्वयंशिस्तीची अनेक उदाहरणे आपण बघतो. आपण स्वयंशिस्त किंवा अनुशासन असेही म्हणू शकतो. जवळचे उदाहरण मुंग्यांचे सांगता येईल. मुंग्या नेहमी एक रांगेत चालतात, एखादी मुंगी चुकून रांगेच्या बाहेर गेली तरी बाकीच्या मुंग्या कधीच रांग सोडत नाहीत आणि रांग चुकलेल्या मुंगीला परत रांगेत सामावून घेतात.

आपण घडून गेलेल्या काही घटना पाहू……

  • परवा मला सुट्टी होती, मामाच्या गावाला जायचे म्हणून मी अलिबागच्या एस टी आगारात गेले होते. सहज दोनतीन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. एक एस. टी. बस फलाटाला लागत होती. पण बरीच लोकं ती बस फलाटाला लागण्याआधीच, त्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. बसच्या दरवाजाचे आकारमान लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की एकाच वेळी एकच माणूस आत शिरू शकतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच बसच्या बाबतीत सारखीच होती.
  • आणिक एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिले आहे. अलिबागला नुकतीच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण संरचना कार्यान्वित झाली होती. पोलिस त्या रचनेची कार्यवाही सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्नशील होते आणि काही लोकं बिनदिक्कतपणे नियम मोडून वाहने चालवीत होते. माझ्यासमोर एक अपघात होता होता राहिला.
  • सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा बळी गेला.
  • अगदी अलीकडील घटना म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन कार्यक्रम काही लोकं रेल्वे रुळावर उभे राहून पहात होती. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि जवळजवळ पन्नास लोकांना जीव गमवावा लागला.

वरील सर्व घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, प्रत्येक घटना जरी वेगळी असली, प्रत्येक घटनेचा आर्थिक/ सामाजिक परिणाम जरी भिन्न असला तरी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे या सर्वाला एकच मूलभूत कारण आहे. आपली उत्सुकता न ताणता मी ते कारण सांगतो, ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.

बिरबलाची एक गोष्ट आहे. भाकरी का करपली? घोडा का अडला ? आणि पाने का नासली ? असे तीन प्रश्न आहेत. या सर्वांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे फिरवले नाही म्हणून. आज आपल्या देशात असलेल्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे किंवा असेल ते म्हणजे 

‘‘स्वयंशिस्तीचा अभाव’’

आपण स्वयंशिस्तीच्या दुष्परिणामांची काही उदाहरणे बघितली. त्यामुळे स्वयंशिस्त का पाळावी हे आपल्या लक्षात आले असेल. स्वयंशिस्त अंगिकारल्यामुळे मोठी झालेली अनेक राष्ट्रे आपल्याला सांगता येतील. यातील अग्रक्रमाने ज्यांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले ते ब्रिटिश आणि अणुस्फोटाचे विदारक दुष्परिणाम भोगून, चटके खाऊन स्वयंशिस्त पाळून, अथक मेहनत करून आणि प्रखर राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगातील प्रमुख झालेले एक राष्ट्र म्हणजे जपान. ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत असे मला वाटते.

आज आम्ही शालेय विद्यार्थी आहोत. बरीच मोठी माणसे असे म्हणतात की आम्ही उद्याचे नागरिक आहोत, पण मला उद्याचे नागरिक म्हटलेले आवडतही नाही पटतही नाही. आदर्श नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये आम्ही आजपासून च पार पाडायला सुरुवात केली तर ती आमच्या अंगवळणी पडतील, आमच्या अंगात मुरतील आणि आयुष्यभर आम्ही ती आचरणात आणू शकू. यात खासकरून स्वयंशिस्त अंगी बाणली गेली तर आमचे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल असे मला वाटते.

आता बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रास्ताविक पुरेसे झाले. स्वयंशिस्त म्हणजे काय ते आम्हाला कळले, स्वयंशिस्तीचे दुष्परिणाम कळले आणि फायदेही कळले. पण आम्ही नक्की काय करायचे हे कधी सांगणार.

आपण त्याची घरापासून सुरुवात करूया. आपण सकाळी झोपून उठलो की किमान आपल्या पांघरुणाची घडी आपली आपण घालूया. काल पर्यंत आपण काय करीत होतो ते सोडून देऊ, पण आजपासून मात्र आपण या गोष्टी पाळूया. हात धुतल्याशिवाय आपण कोणताही पदार्थ खाणार नाही. हात पुसायला आपल्याकडे रुमाल असेल. सकाळी उठण्याची आपली वेळ पक्की असेल, ती आपण काटेकोरपणे पाळू. शाळेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा आपले एक वेळापत्रक असेल. घरी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा असेल. शाळेतून घरी गेल्यावर आपण आपले दप्तर योग्य ठिकाणी ठेऊ, त्यातील डबा, पाण्याची बाटली धुऊन ठेऊ. संध्याकाळी शुभंकरोती, काही देवांची स्तोत्रे म्हणू, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवू. शाळेतून दिलेला गृहपाठ आपला नेहमी पूर्ण झालेला असेल. शाळेत आपण वेळेत पोहचू. शाळेतील सर्व सूचनांचे, नियमाचे आपण पूर्णपणे पालन करू. रस्त्याने चालताना, प्रवास करताना आपण वाहतुकीचे नियम समजून घेऊ नी त्यांचे पालन करू. अयोग्य ठिकाणी थुंकणार नाही. लोकांनी अयोग्य ठिकाणी थुंकायाचे पन्नास टक्के कमी केले तर आपले सामाजिक आरोग्य पन्नास टक्के तरी नक्कीच सुधारेल. आपल्याला रांगेचे महत्व जरी कळले तरी आपली प्रगती किमान १०% नी वाढेल असा विश्वास वाटतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण सर्व सूज्ञ श्रोते आहात, आपापल्या अभ्यासाने यात अनेक गोष्टींची भर घालू शकाल.

एका मोठ्या वक्त्याने आपल्या भाषणांत सांगितले होते की आपल्या देशातील सर्वांनी दिलेली वेळ पाळली तर आपला GDP किमान चार टक्क्यांनी वाढेल. आपण सर्वांनी यावर चिंतन आणि त्यानुरूप कृती करण्याची गरज आहे, आपण प्रयत्न करू. देशाने, आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, याची आपल्याला नित्य जाणीव असण्याची गरज आहे, आपण सर्व तसा प्रयत्न करीत असालच, पण समजा त्यात काही त्रुटी रहात असेल तर आजचे माझे मनोगत ऐकून आपण त्यात योग्य ती सुधारणा नक्कीच कराल या विश्वासाने माझे मनोगतास पूर्णविराम देते.

देश हमे देता है सबकुछ।

हम भी तो कुछ देना सीखे ।।

भारत माता की जय।

© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

थळ, अलिबाग.

मो 9028438769

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सुजाता असं काही करणं शक्यच नाही. मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन जाळत राहिला. ) 

“आता प्रॉब्लेम मिटलाय सर. पैसेही वसूल झालेत”

सुहास गर्देनी सांगितलं आणि मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत? कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लॉवर’ ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. त्यांनी लगेच पैसे पाठवले. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं मला समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसीव्हर ठेवून दिला. माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देनं बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलंय असंच वाटू लागलं. माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयीत नजरेनं माझ्याकडेच पहात आहेत असा मला भास झाला आणि मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो. माझ्या अस्वस्थ मनात अचानक अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार चमकून गेला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो. )

“सुजाता, त्यादिवशी निघताना मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ची कॅश तुला दिली तेव्हाच ‘ती मोजून घे’ असं सांगितलं होतं. हो ना?” तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. ” ते पैसे मी स्वतः मोजून घेतले होते. एखादी नोटही कमी असणं शक्यच नाही. खात्री आहे मला. ती तशी असती तरीही मी एकवेळ समजू शकलो असतो. पण पन्नास रुपयांच्या चक्क १७ नोटा? नाही.. हे शक्यच नाही. कांहीतरी गफलत आहे. “

भेदरलेल्या सुजाताचे डोळे भरून आले. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देंची बसल्या जागी चुळबूळ चालू झाल्याचं मला जाणवलं.

“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या केव्हा लक्षात आलं होतं?”

“टोटल कॅश रिसीट टॅली करताना सुजाताच्याच ते लक्षात आलं होतं सर. ” 

“पण म्हणून फरक ‘लिटिल् फ्लॉवर’च्या कॅशमधेच कसा ? इतर रिसीटस् मधे असणार नाही कशावरून?”

सुजातानं घाबरुन सुहासकडं पाहिलं.

“सर, तिच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती. त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश आणि स्लीपबुक दोन्ही सुजातानं न मोजता बाजूला सरकवून ठेवलं होतं. गर्दी कमी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तिनं ती कॅश मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या १७ नोटा कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. “

“आणि म्हणून तुम्ही लगेच मिस् डिसोझांना फोन केलात. “

“हो सर”

आता यापुढे त्यांच्यासमोर डोकं आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना मी तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केलेला असावा तसं मलाच अपराधी वाटत राहिलं. त्याना फोन करण्यापेक्षा समक्ष जाऊन भेटणंच योग्य होतं. तेही आत्ता, या क्षणीच. पण जाऊन सांगणार तरी काय? रिक्त हस्ताने जाणं पण योग्य वाटेना. त्यासाठीआठशे पन्नास रुपये अक्कलखाती खर्च टाकून स्वत:च ती झळ सोसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याकाळी ८५० रुपये ही कांही फार लहान रक्कम नव्हती. आपल्या खात्यांत तेवढा बॅलन्स तरी असेल का? मला प्रश्न पडला. मी आमचं स्टाफ लेजर खसकन् पुढं ओढलं. माझ्या सेविंग्ज खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५/- रुपये बॅलन्स होता!

त्याकाळी मिनिमम बॅलन्स पाच रुपये ठेवायला लागायचा. मागचा पुढचा विचार न करता मी विथड्राॅल स्लीप भरून ८५०/- रुपये काढले. पैसे घेतले आणि थेट बाहेरचा रस्ता धरला.

“मे आय कम इन मॅडम?”

मिस् डिसोझांनी मान वर करून पाहिलं. त्यांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी दिसली. चेहऱ्यावरचं नेहमीचं स्मितहास्य विरुन गेलं. एरवीची शांत नजर गढूळ झाली.

त्यांनी समोर बसण्याची खूण केली.

“येस.. ?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.

“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटे आलो. सकाळी ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय एॅम रिअली सॉरी फॉर दॅट”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

“सोs? व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट नाऊ फ्रॉम अस?”त्यांनी चिडून विचारलं.

मी कांही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.

“व्हाॅट इज धिस?”

“त्यांनी तुम्हाला फोन करून तुमच्याकडून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. आय नो. बट दे वेअर इनोसंट. प्लीज फरगीव्ह देम. त्यांची चूक रेक्टिफाय करण्यासाठीच मी आलोय. तुमच्याकडून पैसे मोजून मी माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच आपल्यातला व्यवहार पूर्ण झालेला होता. त्यामुळे पुढची जबाबदारी अर्थातच माझी होती. ती मीच स्वीकारला हवी. सोs.. प्लिज एक्सेप्ट इट‌. “

“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समबडी मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ. “

“नाॅट नेसिसरीली. ती एखादी साधीशी चूकही असू शकेल कदाचित. आय डोन्ट नो. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”

“दॅट मीन्स यू आर पेईंग धिस अमाऊंट आऊट ऑफ युवर ओन पॉकेट. इजण्ट इट?”

“येस. आय हॅव टू. “

त्या नि:शब्दपणे क्षणभर माझ्याकडे पहात राहिल्या. त्याच्या कपाळावरच्या आठ्या अलगद विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानानं उठलो. त्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी वळणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.

“सी मिस्टर लिमये. फॉर मी, हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् फ्रॉम अॅब्राॅड रेगुलरली. सो एट फिफ्टी रुपीज इज अ व्हेरी मिगर अकाऊंट फाॅर अस. पण प्रश्न प्रिन्सिपलचा होता. ते इंम्पाॅर्टंट होतं. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटीस्फॅक्शन त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या मागणीनुसार ८५० रुपये पाठवून दिले. कारण त्याक्षणी आय डिडन्ट वाॅन्ट टू मेक इट अॅन बिग इश्यू. इट्स नाईस यू केम हिअर परसनली टू मीट मी. सो नाऊ द मॅटर इज ओव्हर फाॅर मी. आय रिक्वेस्ट यू… प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह नका करू. तुम्ही ते मला ऑफर केलेत तेव्हाच ते माझ्यापर्यंत पोचले असं समजा आणि पैसे परत घ्या. यू डोन्ट वरी फॉर माय लॉस. आय ॲम शुअर माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर अदर”

त्या अगदी मनापासून बोलल्या. त्यात मला न पटण्यासारखं कांही नव्हतंच. पण पटलं तरी मला ते स्वीकारता मात्र येईना.

“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गाॅड ऑल्सो वील स्क्वेअर अप माय लाॅस इन हिज ओन वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्यभावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज. फाॅर माय सेक. “

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिवाळीचा सांगावा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दिवाळीचा सांगावा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा,

हाच या दिवाळीचा सांगावा.

 

हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला 

त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे.

त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे.

विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना – – – 

भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.

 

डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे.

शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.

राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत.

गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे.

 

अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे.

विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.

 

विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत,

पण त्यांना ध्येय गाठता आले नाही.

कारण अविवेक आजही प्रभावीच आहे.

 परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.

 

तुमचाही विवेक धडका देतोय 

… मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…

त्याला बघा एकदा मोकळे करून…

… विवेकाचा दीप पेटवून तर बघा, हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…

… मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते…!

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

ll वसुधैव कुटुंबकमं ll

… कुटुंब हा शब्दच एक व्यापक अर्थ घेऊन येतो. कोणत्याही देशाची प्रगती ही कुटुंबाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे. अनेक कुटुंबाची गल्ली, अनेक गल्यांचं गाव किंवा शहर. अनेक शहरांचे राज्य आणि अनेक राज्यांचा देश.

मुळात मी वैयक्तिक कुटुंबाचा विचार न करता, मला वसुधा म्हणेज सृष्टी कुटुंबाचा विचार करावा वाटतोय! 

श्री समर्थानी लहानपणी म्हटले होते, , , ” चिंता करतो विश्वाची !” आणि ते खरेही आहेच. भारतीय संस्कृतीत 

सर्व संतांनी विश्वाची गणना कुटुंब म्हणूनच केली ! 

वैयक्तिक कुटुंबाबद्दल न बोलणे हेच श्रेयस्कर वाटते. कुटुंब व्यवस्थेचा ढसाळता पाया बघून, काळजी दसपट वाढली आहे. ह्या व्यवस्थेला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले आहे. त्याचा उहापोह नकोच. जीवन हेच यांत्रिकी झालं आहे. इलेक्ट्रॉनिक युगात सोशल मीडियाने पूर्ण कुटुंब व्यवस्थेला ग्रहण लागले आहे. एकत्र कुटुंब पद्धती केव्हाच नामशेष झाली आहे.

माणूस हाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे ! गरज ही शोधाची जननी, असं जरी असलं तरी, कुटुंबाच व देशाचं पर्यावरण ढासळले आहे. माणसाचा वाढलेला, शहराकडील ओढा … त्यामुळे अनेक शहर नुसती फुगत चालली आहेत. जीवन हे आता संघर्षमय झाले आहे. जो तो स्वार्थी झाला आहे. आपुलकी, सहानभूती हे शब्द फक्त पुस्तकात दिसून येतात ! 

प्रत्येक देशात चढओढ लागली आहे. ग्रोथ रेट हे करन्सीमध्ये मोजलं जात आहे! कुटुंबाचा व त्याच्या आपुलकीचा प्रश्न मोडीत निघाला आहे. मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सिग्नल हे परवलीचे शब्द झालेत! माणूस पुढे गेला म्हणून त्याची प्रगती होते का ? त्याच्या भावभावनेच काय! 

हल्ली सगळीच नोकरीं करतात, त्यामुळे दुपारचं जेवण ऑफिस मध्ये. तर रात्रीच जेवण हे टी व्ही किंवा मोबाईलसह! लहान मुलांना पाळणाघर तर वृद्धाना वृद्धाश्रमात! मुलांच्यावर संस्कार करणारे वाड वडील आजी आजोबा घरात नसतील तर, त्यांच्यावर संस्कार कसे होणार! रविवारी घरातील कामे. लहान मुलावर कसे संस्कार होणार. सतत अठरा तांस घराबाहेर, झोपायला भाड्याच्या घरात! 

गेली दोन वर्षे बघतोय युक्रेन व रशिया युद्ध कांही थांबेल असं वाटतं नाही. मध्य पूर्व एशियात हुती हिजबुल्ला हमास इराण एकीकडे आणि इस्त्राईल एकीकडे. जो तो आपल्या शस्त्र अस्त्र बाहेर काढून आपण किती श्रेष्ठ आहोत याची चढा ओढ पाहायला मिळते. तुमचं सगळं काही कबूल. पण अगणित कुटुंबाची वाताहत ही उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते त्याच काय!!

मानवताच नसेल तर, तो देश त्या देशातील कुटुंब संस्था प्रगतीचे बळी ठरत आहेत, असं नाही काय तुम्हाला वाटतं?? अगणित कुटुंब बेचिराख झाले. लांब नको आपल्या जवळच असलेल्या बांगलादेशच काय चाललंय हे आपण बघत आहोतच. आपले शेजारीच जर आजारी असतील तर आपले कुटुंब सुरक्षित राहील काय ? असं असंख्य प्रश्न, मंजूषेतून निघतात.

… सुसंस्कारच जर कुटुंबात नसेल तर तो देश टिकेल का? 

 सुखी कुटुंब सुखी देश, कुटुंबच हा जीवनातील व जगण्यातील खरा पाया आहे, असं नाही का तुम्हाला वाटतं. तसे अनेक मुद्दे उहापोह करण्यासारखे आहेत. पण विस्तार भयास्तव मी इथेच थांबतो व आपली रजा घेतो.

llसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ll 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लक्ष्मी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ लक्ष्मी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कळायला लागल्यापासून मनुष्याला ज्याची गोडी आपसूक लागते किंवा प्रयत्नपूर्वक लावली जाते ती गोष्ट आहे संपत्ती. ( खरं सांगायचं तर पैसा..!). लौकिक व्यवहार  पैशाविना होऊच शकत नाहीत. आज जरी विनारोकड (कॅशलेस) व्यवहार होत असले तरी विनापैसा नक्कीच होत नाहीत.

भगवान विष्णूचे एक सुप्रसिद्ध चित्र आहे. त्यात भगवंत शेषशायी आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चुरत आहेत. पंचमुखी शेष आणि त्याच्यावर मंद स्मित करीत पहुडलेले भगवंत आणि सेवेस साक्षात लक्ष्मी !!! लौकिक अर्थाने या चित्रात बराच विरोधाभास आहे. ज्याची दासी लक्ष्मी आहे तो महालात निजेल, रत्नजडित मंचकावर शयन करेल किंवा आणिक विलास उपभोगेल. दुसरे म्हणजे जी साक्षात लक्ष्मी तिला कोणाचे पाय चेपायची काय गरज आहे ? कोणाची दासी होण्याची काय गरज आहे ? ती अनेक दासींना तिथे नेमू शकते. पण तसे इथे दिसत नाही. लक्ष्मी माता शेषशायी विष्णूचे पाय चुरत असण्या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण पुढील प्रमाणे असू शकेलं. भगवान पंचमुखी शेषावर शयन करीत आहेत. ही पाच मुखे म्हणजे पंचेंद्रिये आहेत. ह्या सर्व इंद्रियांवर मालकी गाजविणाराच लक्ष्मीचा खरा धनी होऊ शकतो. सामान्य मनुष्याचे तसे होत नाही. इंद्रियांची मालकी सोडून देऊ, त्याला इंद्रियांचे साधे नियमन करणे सुद्धा जमत नाही. इंद्रियांवर मालकी गाजवायचे बाजूलाच राहाते, ही सर्व इंद्रियेच ह्याला आयुष्यभर गुलाम बनवितात आणि त्याच्या छाताडावर नाचत राहतात आणि पुढे यातच त्याचा अंत होतो. लक्ष्मीने पाय चेपणे तर दूर, लक्ष्मी याच्या वाऱ्यालाही उभी राहात नाही. मनुष्य जे काही चार पैसे जमवितो त्यालाच हा लक्ष्मी मानू लागतो. पण ही काही संपत्ती नव्हे, लक्ष्मी तर बिलकुल नव्हे. हे पैसे म्हणजे  दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त नाममात्र चलन आहे. ह्या कागदाला किंवा नाण्यांना फक्त त्यावरील सहीने मूल्य प्राप्त झालेले असते. वेळ आली तर एका क्षणात त्या चलनी नोटांचे ‘कागद ‘  होतात हे नोटाबंदीच्या वेळी सिद्ध झाले आहे.

लक्ष्मीची बरीच रूपे आहेत. श्रीलक्ष्मीमहात्म्यात याचे यथार्थ वर्णन आले आहे. मनुष्याने ती संपत्ती (लक्ष्मी ) प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वी भारतात लोकं व्यापार सुद्धा पैशात करीत नव्हते. अपवाद सोडला तर लोकं सेवा देऊन सेवा घेत असत. आपल्याकडे असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याकडील वस्तू आपण घेत असत. आजच्या भाषेत आपण त्यास commodity tranjaction म्हणू शकतो. 

लक्ष्मी चंचल असते किंवा आहे हे अर्धसत्य आहे. आपल्याला जिथे रहायला आवडते तिथेच आपण रहातो. जिथे आपले मन रमत नाही तिथे आपण पळभर देखील रहात नाही. नाईलाजाने थांबावे लागले तर आपली अस्वस्थता आपल्या चेहऱ्यावर सहज दिसते. ‘पिंडी ते ब्रम्हांडी ‘ हा नियम सर्वांना लागू आहे. त्यामुळे तो लक्ष्मी मातेलाही लागू आहे.

आपण नेहमीच पाहतो की मनुष्याला थोडी सुस्थिती लाभली की त्याची भाषा, राहणीमान लगेच बदलते. मनुष्याची नम्रता अभिमानात परावर्तित होते आणि जसा पैसा वाढत जाईल तसतसा ह्याचा अभिमान चक्रवाढ पद्धतीने वाढत जातो. याने पैशाला राबवून घ्यावे असे अपेक्षित असताना पैसाच ह्याला राबवून घेऊ लागतो. पारंपरिक नीतिनियम ह्याच्या दृष्टीने गौण ठरतात आणि तथाकथित स्टेटस सांभाळणारे नीतिनियम त्याला आवडू लागतात. आणि मग एखाद्या उधळलेल्या घोडयासारखा हा धावू लागतो आणि आपला लगाम तो पैशाच्या हातात देतो.

लक्ष्मी चंचल असते हे अर्धसत्य आहे ते यासाठीच. नीतीने, पुढील दाराने घरात येते ती लक्ष्मी आणि अनितीने येते ती अलक्ष्मी. ती मागील दाराने घरात येते. या दोघी जेव्हा घरात येतात तेव्हा सहकुटुंब सहपरिवार येतात. जिथे अलक्ष्मी आहे तिथे लक्ष्मी राहू शकत नाही. लक्ष्मी स्वतः चंचल नाहीए मात्र मनुष्य स्वतःच्या हव्यासापोटी चंचल, अभिलाषी होतो आणि लक्ष्मी चंचल आहे असे जगाला सांगत सुटतो. 

नीती, न्याय, शांती, भक्ती, विवेक, उदारता, मनाची विशालता, परोपकार ज्या ठिकाणी आढळतात तिथे लक्ष्मी पाणी भरते. सर्व संतमंडळी, तसेच मला ज्ञात असलेली श्री गोंदवलेकर महाराज संस्थान गोंदवले, श्री गजानन महाराज संस्थान शेगांव अशी काही मोजकी उदाहरणे सांगता येतील. 

सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व गुण आत्मसात करुन, वृद्धिंगत करता आले तर माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहील आणि  ती स्वतःच सिद्ध करुन दाखविल की ती चंचल नाही, फक्त त्यासाठी काही मूलभूत पथ्ये पाळली पाहिजेत असे वाटते. शेषशायी होण्याची पाळी आली तरी आपल्या चेहऱ्यावरील स्मित स्वाभाविकपणे टिकले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपले समाधान भंगू नये, नीतिनियम कसोशीने पाळले जावेत. भगवान विष्णू अखिल ब्रम्हांडाचे पालन तटस्थपणे करीत आहेत. असे निःस्वार्थपणे कार्य जो करतो त्याच्यामागे लक्ष्मी स्वतःहून उभी राहते. आज समाजात निःस्वार्थपणे काम करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. जो मनुष्य भगवान विष्णूप्रमाणे आपले आयुष्य स्थितप्रज्ञ वृत्तीने जगेल त्याला लक्ष्मी मातेचा अखंडीत सहवास खात्रीने लाभेल यात बिलकुल संदेह नसावा.

आज लक्ष्मीपूजन आहे. आज सर्वजण माता लक्ष्मीचे पूजन करतील. लक्ष्मीपूजन करताना सर्वप्रथम विष्णूचे स्मरण अवश्य करावे. पतीला मान दिला, पतीचे कौतुक केलं की पत्नीला स्वाभाविकपणे आनंद होत असतो….

श्री योगेश्वर भगवान विष्णूच्या चरणी वंदन करतो. श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी वंदन करतो. तसेच. आपल्यावर भगवंत आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम रहावा यासाठी प्रार्थना करतो.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! दिवाळी–नव्या जाणिवांची !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! दिवाळी–नव्या जाणिवांची !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

दिवाळी आली. चैतन्याची आनंदाची उधळण झाली. सर्वांनी मनापासून दीपोत्सव साजरा केला. आनंद घेतला. आनंद वाटला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे. त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची. निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची. विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो. काही गोष्टी परंपरा म्हणून, रूढी म्हणून करतो. पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे. याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे. म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते. पुन्हा जुन्यांना नवा उजाळा देता येतो. पुन्हा नाती बहरतात.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात. शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही. त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही. स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. वायू, ध्वनी, जलप्रदूषण करायचे नाही. उत्साहाच्या भरात मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत याचे भान ठेवायचे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे. पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा, वेगवेगळे दिवे आपण लावतो. तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे. दिवा हा चैतन्याची, मांगल्याची उधळण करतो. तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा एक दिवा असंख्य दिवे पेटवू शकतो. लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जगताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते. या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा.  ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ‘ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘ दृष्टीदाना ‘चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल चांगली रुजायला लागलेली आहे. आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत. त्यांची जाणीवजागृती करायची.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे, नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते. 

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांचे चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडूनही मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे. तेव्हा चांगले विचार, कृती, उपक्रम राबवू या. सर्वांना त्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जिथे राबती हात तेथे हरी” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

जिथे राबती हात तेथे हरी” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

” काय मग राजाभाऊ, यंदा किती केल्यात पणत्या?” 

” फार नाही केल्या. पावसाचा अंदाज येईना, म्हणून कमीच केल्या.” 

” पण तरीही किती?” 

” दोन लाख असतील.” 

” आं? दोन लाख?” 

” होय. सत्तर हजार रंगवलेल्या अन् बाकीच्या बिन रंगवलेल्या.” 

” खर्च सुटणार का?” 

” सुटणार तर ओ.. रंगवलेली पणती होलसेल भावात पाच रुपयाला एक अन् बिन रंगवलेली तीन रुपयाला एक.” 

” पण घेतात का लोकं?” 

” अहो दादा, आता आमच्या पणत्या वर्षभर जातात बघा. त्यामुळं विकलं जाण्याचं टेन्शन फार घ्यायचं नाही. वस्तू एकदम चांगली टॉप क्लास असली ना, मग लोकं कुठून कुठून शोधत येतात अन् घेऊन जातात.” 

” वर्षभर म्हणजे?” 

” अहो, आता समाज बदललाय. सगळ्या सणाच्या दिवशी लोकं आता दीपोत्सव करतात. शिवजयंती ला करतात, राम नवमी ला करतात, दसऱ्याला करतात, पंधरा ऑगस्ट – सहवीस जानेवारी ला करतात. आता दसऱ्याला चार पाच गणपती मंडळवाले हजार-हजार पणत्या घेऊन गेले. कोजागिरी पौर्णिमेला प्रतापगडावर दीपोत्सव होतो, तसा आता बाकीच्या गडांवर पण तिथल्या मंदिरासमोर करतात लोकं. तशा आमच्या वर्षभरात लाखभर पणत्या जातातच.” 

– – – एक साधी मातीची पणती. आपल्याला तिची आठवण साधारण दिवाळीतच येते. पण तिच्या व्यवसायात किती दम आहे, हे राजाभाऊ मला सांगत होते. 

” आमच्याकडून घेऊन रस्त्यावर विकणारे पण डझनामागं वीस-तीस रुपये कमावतात. मातीची पणती म्हणजे एकदम मोठं मार्केट आहे.” 

राजाभाऊंनी चहा मागवला. तेवढ्यात तिथं एक बाई आल्या आणि नुसत्याच उभ्या राहिल्या. राजाभाऊंनी त्यांच्यासाठी चहा मागवला. अन् मुलाला हाक मारुन बोलावलं. मुलगा वही घेऊन आला. त्या बाईंनी त्याला पैसै दिले, वहीत नोंद केली. मुलानं त्यांना चार बॉक्स दिले. त्या गेल्या….

” आता ह्या वैनी.. बरीच वर्षं आपल्याकडं येतात. दिवाळी सिझन ला रोज हजार पणत्या विकायला नेतात. दुसऱ्या दिवशी हिशोब देतात आणि पुन्हा एक हजार पणत्या घेऊन जातात. आतापर्यंत किती विकल्या रे?” त्यांनी मुलाला हाक मारुन विचारलं. 

” कालपर्यंत आठशे डझन विकल्या.” मुलानं सांगितलं. 

” आता आठशे डझनाला पंधरा रुपयांनी नफा काढून बघा.” 

.. .. मी गणित घालून पाहिलं. बारा हजार रुपये..

” आता मागच्या दहा दिवसांत बारा हजार रुपये नफा मिळविला. अजून दिवाळीला दहा दिवस आहेत. म्हणजे ते साधारण बारा हजार रुपये धरा.” 

” चोवीस हजार ” मी आपसूक उत्तरलो. 

” आता वीस पंचवीस दिवसांत बिन भांडवली चोवीस हजार रुपये कमावले की नई?” राजाभाऊ हसत म्हणाले. आता चकित होण्याची पाळी माझी होती..!

” तुमचा विश्वास बसणार नाही, पण गेल्या दहा वर्षांपासून तेलाच्या पणत्या लावणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. लोक आता मेणाच्या पणत्या फारशा लावत नाहीत.” 

” कारण? ” 

” कारण एकच – युट्यूब व्हिडिओ.” 

” म्हणजे? ” 

” मेणाच्या पणत्या आपल्या तब्येतीला चांगल्या नाहीत, असं बऱ्याच युट्यूब व्हिडिओवर सांगतात. पण तेलाच्या पणतीनं आरोग्याला त्रास होत नाही. उलट, ही आपली पणती तर कंप्लीट स्वदेशी आहे. तेल पण स्वदेशी अन् वात पण स्वदेशी.” राजाभाऊ लॉजिक सांगत होते.

” अहो,पण तेलाची पणती फार खर्चिक.” 

” कशी काय खर्चिक? एका तेल पिशवीत तुम्ही आठ दिवस डझन भर पणत्या लावू शकाल. सरकीचं तेल वापरा, साधं कुठलं पण तेल वापरा, ती पणती जास्त वेळ जळणार बघा.” .. ते खात्रीनं सांगत होते, मलाही पटत होतं. 

” नवरात्रीतल्या घटासाठीची काळी माती विकून लोकं पंचवीस हजार रुपये कमावतात हो. आपल्याला ते सहसा लक्षात येत नाही. शेवटी तो पण बिझनेसच आहे ना. फक्त फरक एवढाच आहे की, तो एसी ऑफिसमध्ये बसून करता येत नाही.” .. राजाभाऊंचा मुलगा म्हणाला. 

” खरंय. पण वर्षभर तुमचं पक्कं खात्रीचं उत्पन्न हवं ना. सिझनल गोष्टींवर अवलंबून कसं राहणार? ” मी विचारलं. 

” इथंच तर तुमचं चुकतंय दादा. आम्हीं सिझनल गोष्टी विकतच नाही. दिवाळी दरवर्षी येतीच. गणपती दरवर्षी येतातच. राखी पौर्णिमा दरवर्षी असतीच. संक्रांत असतीच. ते कायम राहणारच आहे. पण एखादी कंपनी कायम राहणारच आहे, याची खात्री काय? कसंय दादा, ती आपली हजारों वर्षांची संस्कृती आहे. ती सिझनल कशी होईल? ” पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेला त्यांचा मुलगा मला सांगत होता.

– – खरोखरच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. वर्षभरात आपल्याला आपल्या संस्कृतीनुसार आवर्जून खरेदी करावी लागते अशा जवळपास पंचवीस गोष्टी त्यांच्या मुलानं मला कॅलेंडर घेऊन दाखवून दिल्या. एकदम बिनतोड..!

” फक्त गणपती अन् नवरात्रातच आमची सात आठ लाखाची उलाढाल होती. नंतर पणत्या, दिवे, किल्ले आणि किल्ल्यांवर मांडायची चित्रं, लक्ष्मीच्या मूर्ती यांचा सिझन असतो. ते होईस्तोवर झाडांच्या कुंड्या, संक्रांतीची सुगडं यांचा सिझन येतो. ते संपेपर्यंत पाण्याच्या माठांचा सिझन येतो. जानेवारीत तर गणपतीचं काम सुरु होतं. वर्षभर भरपूर काम असतं. कुठलं सिझनल? आमचा तर वर्षभराचा पक्का ठरलेला व्यवसाय आहे. हाताखाली आठ दहा माणसं कामाला ठेवावी लागतात. वर्षभरात आम्हीं पंधरा लाखांच्या वर उलाढाल करतो. व्यवस्थित नफा मिळवतो. आपण या गोष्टींना सिझनल म्हणणं म्हणजे आपल्या संस्कृतीलाच सिझनल म्हणण्यासारखं नाही का? ” 

.. तो जे मांडत होता, ते योग्यच होतं. त्यात काहीच चुकीचं नव्हतं. 

“दादा,उलट आमचं काम जास्त अवघड आहे. प्रत्येक पीस स्वतः लक्ष घालून तयार करावा लागतो, नीट पेंट करावा लागतो. जरासुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही. मालाची क्वालिटी जराही बदलून चालत नाही. स्कीम लावून आम्हाला आमचा माल विकता येत नाही. सेल लावता येत नाही. ऑफर देणं परवडत नाही. मार्केटचा अंदाज घेऊनच भांडवल गुंतवणूक करावी लागती. नाहीतर माल अंगावर पडतो. मग सांगा,आम्ही किती मोठी रिस्क घेतो ? ” त्यानं सत्य सांगितलं. 

आपण सहसा असा विचारच करत नाही. कारण असा विचार करायला आपल्याला कुणी शिकवलेलंच नसतं. आपली बुध्दिमत्ता, आपली प्रतिभा, आपली कष्ट करण्याची क्षमता, आपली व्यावहारिक दृष्टी, आपण नवनव्या संधी कशा शोधतो, आपण चौकटीबाहेरचा विचार कसा करतो, आपण जोखमीचा आणि नुकसानाचा अंदाज कसा घेतो, या सगळ्या गोष्टी आयुष्यात चांगलं करिअर करण्यासाठी किती गरजेच्या असतात, हे मला त्या बावीस वर्षं वयाच्या मुलानं पटवून दिलं. 

तुमचा दृष्टिकोन, तुमच्या उपजत क्षमता, तुम्ही अवगत केलेली कौशल्यं यांची सांगड योग्य त्या मार्गदर्शनानुसार घातली की, तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गावर धावायला लागता. यशस्वी होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकालाच टाकीचे घाव सोसावेच लागतात. कष्ट तर करावेच लागतात. पण निवांत बसून, कष्ट न करता, कसलीच रिस्क न घेता यश मिळवणं जवळपास अशक्य असतं.

हाताची सगळीच बोटं सारखी नसतात, तशी सगळ्याच व्यवसायांची रूपं एकसारखी नसतात. रद्दी मोजण्याचा तराजू, भाजी मोजण्याचा तराजू, माणसांची वजनं करण्याचा वजनकाटा आणि सोनं मोजण्याचा काटा यांच्यात फरक असतोच. त्यांच्यात सगळ्यात मोठं उच्चासन सोनं मोजण्याच्या तराजू ला मिळत असलं, तरी त्याच्यावरची जोखीमसुद्धा इतर तराजूंपेक्षा सगळ्यात जास्त असते. त्याचा परफॉर्मन्स अचूकच असावा लागतो. हे आपण स्वतःही समजून घ्यायला हवं आणि आपल्या मुलांनाही समजावून सांगायला हवं. 

करिअरमधल्या यशाला गुंतवणूक हवीच. पण कशाची? तर ती हवी — तुमच्या वेळेची, बुद्धीची, कष्टांची, प्रामाणिकपणाची आणि उत्कृष्टतेची. मातीच्या पणत्या करुन विकणारा सुद्धा दिवाळीत काहीं लाखांची उलाढाल करु शकतो तर, त्याला आपल्या प्रेरणास्थानी ठेवायला हवं. ” मिळावं खाटल्यावरी ” ही वृत्ती समूळ उपटून काढल्याशिवाय खरं यश मिळणारच नाही. 

जरा डोळे उघडून आपल्या आजूबाजूला बघा…..  डोंगरभर कष्ट उपसून, तावून सुलाखून बाहेर पडलेली आणि खऱ्या अर्थानं सुख समृद्धीचा आनंद घेणारी शेकडो माणसं तुम्हालाही दिसायला लागतील. श्रीमंती न दाखवणारी,पण खरोखरच श्रीमंत असणारी माणसं शोधा, त्यांना भेटा, त्यांची आपल्या मुलामुलींना ओळख करुन द्या. ती आपल्या मुलांच्या देखण्या भवितव्यासाठीची ” ग्रेट भेट ” असेल..! 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रेंगाळलेली उन्हं… थांबलेल्या छाया… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ रेंगाळलेली उन्हं… थांबलेल्या छाया… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

तप्त झळांच्या दुपारीपासून, हुरहूर लावणाऱ्या तिन्हीसांजेपासून आमच्यावर सुखाची सावली धरणाऱ्या मे महिन्याचे दिवस कधी पसार झाले ते कळलंच नाही. मातीच्या भिंतींमधला सुखद थंडावा, रसाच्या आंब्यांचा अस्सल देशी गंध यामुळं हवाहवासा वाटणारा पुण्याच्या विपुल पाण्याचा मे महिना हरवलाच. व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं घरातून, वाड्यांमधून चालत. कुटुंबातली, समाजातली माणसं स्वयंस्फूर्तीनं मुलांशी संवाद करीत, हसत- खेळत काही शिकवित राहत. मे महिन्यात पहिल्यांदा पोळी करायला, मण्यांची पर्स करायला, गच्चीवर कुरडया घालायला किंवा बुद्धिबळाचा डाव मांडायला कधी शिकलो ते आता आठवावं लागेल. पुण्याजवळच्या परिसरातल्या छोट्या छोट्या सहली, अंगतपंगत, उसाचा रस, आइस्क्रीम घरी करण्याचा कार्यक्रम अशा घटनांनी मे महिन्याचे दिवस गजबजलेले असत. 

रस्त्यांवरून मोकाट फिरण्यासाठी काही जण उत्सुक, तर बैठ्या खेळांच्या प्रदीर्घ डावांसाठी काही उतावीळ असत. बदाम सातच्या डावाचे जल्लोष चालत,  कॅरमच्या क्वीन घेण्याच्या स्पर्धा चालत असत. या अविस्मरणीय महिन्यात जरा लवकरच उगवणारी पहाट, आळसावलेली दुपार यापेक्षा मला रेंगाळलेली संध्याकाळ फार आवडत असे. सैलावलेल्या दिवसाच्या मोकळ्या संध्याकाळी तर जणू आपल्यासाठी उन्हं थोडी रेंगाळत असत. सावल्या थोड्या थांबलेल्या असत असं वाटे. वर्षभरातल्या संध्याकाळी किती लवकर संपत. किती कुंद, उदासवाण्या वाटत; पण एप्रिल -मेच्या सोनेरी संध्याकाळी आमच्या प्रियसख्यांशी गप्पा होई तोवर जणू थांबत. दुपारी अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर यांच्या रसदार कथांमधून वाचलेलं पुनःपुन्हा आठवायला, मैत्रिणींशी ते बोलायला या संध्याकाळी फार मधुर वाटत असत. पुढे हे सारं संपलं. फार लवकरच संपलं. आणि मुग्ध संध्याकाळी अकाली प्रौढ झाल्या… 

त्यांनी बरोबर आणलेल्या कातरपणानं, उदासवाणेपणानं घेरून टाकलं , हेदेखील कळलं नाही. गाण्यातून, कवितेतून भेटणाऱ्या संध्याकाळी अर्थपूर्ण व्हायला लागल्या. ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी’, ‘हुई शाम उनका खायला आ गया’, ‘शाम ए गम की कसम …’ – – मनःस्थितीशी एकरूप होणाऱ्या या ओळींसाठी जीव आसुसलेला होई. ‘दिल शाम से डुबा जाता है, जब रात आई तो क्या होगा’ , ‘शाम के दीपक जले, मन का दिया बुझने लगा…’ ही गीतं माझ्या मनातली हुरहूर अधिक गडद करून जात. पुढे दुःखरंजनाचं हे पर्वदेखील संपलं. जीवनाशी सामना करायला उभं राहावं लागलं… 

आयुष्यातल्या निखळ सत्यानं, प्रत्यक्ष अनुभवानं संध्याकाळ एक वेगळा चेहरा घेऊन आली… 

एप्रिल महिन्यातल्या एका संध्याकाळी लतादीदींकडून त्यांच्या वडिलांच्या आठवणी ऐकल्या. मोजक्या शब्दांत अर्थपूर्ण मुलाखत देणाऱ्या लतादीदींचं घर सोडलं तरी त्यांचे शब्द निनादत राहिले. अर्थ झेपावत राहिला. परतीच्या वाटेवर हाजी अलीच्या दर्ग्यापाशी सूर्यास्त होताना दिसला तेव्हा तो पाहताना दीदींची मुलाखत एकेक शब्दासह मनात उतरली. ‘जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे…’ आरती प्रभूंच्या ओळींसरशी पाहता पाहता भोवतीचे समुद्रमहाल झगमगू लागले… मला ते शब्द फक्त कागदावर उतरवायचे होते… 

आज देखील ही संध्याकाळ माझ्या दारात उभी राहते. खूपशी बेचैनी, तणाव- आणि खूपसा उल्हास यांचं रसायन घेऊन येते आणि त्याचा आनंद मला लाख दुःखं झेलायला पुरून उरतो… 

लतादीदींच्या स्मृतीतले रात्रीच्या वेळी हरिविजय, रामविजय असे ग्रंथ वाचताना गहिवरणारे त्यांचे वडील, पहाटेची गाण्याची शिकवणी, ‘ही माझी मुलगी सर्वांना सांभाळेल’ हे त्यांनी पत्नीशी बोलताना काढलेले उद्गार, ‘खजांची’च्या गाण्याच्या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणून ‘मी लता दीनानाथ मंगेशकर’ अशी ओळख करून देताच टाळ्यांनी निनादलेले सभागृह… हे सारं माझं होतं. खुद्द लतादीदींनी सांगितलेल्या आठवणी माझ्या होतात… 

मे महिन्यातल्या अकरा तारखेला आपटे रोडवरच्या ‘स्वरवंदना’ मध्ये ज्योत्स्ना भोळे यांच्या वाढदिवसाच्या संध्याकाळी खास मैफल रंगत असे. सुहास, वंदना, अनिल तसेच नंदा, मीना या त्यांच्या मुलांसुनांसह मीदेखील सहभागी होत असे. दिल्लीहून आशाताई व भगवानराव जोशी येत. कलकत्त्याहून विश्वजित बॅनर्जी क्वचित येत आणि मग वार्धक्य- व्याधींना झुगारून देऊन ज्योत्स्नाबाई काव्यशास्त्रविनोदाची मैफल रंगवीत असत. गोव्यात माडाच्या झाडावर सरसर चढणारे, कोंकणी पोर्तुगीज भाषेत उत्स्फूर्त कविता गात. ज्योत्स्नाबाईंना त्या आठवत. राधामाई नाटकातले संवाद ‘तू माझा अन तुझीच मी ही खातर ना जोवरी…’, ‘खेळेल का देव माझिया अंगणी’ , ‘अमृत बोला…’ टागोरांची बंगाली कविता… .. अशी संध्याकाळ थोडी लांबत असे. देखणी होऊन जात असे. 

रोज मुंबईहून पुण्याला परतताना उन्हाळ्यात घाटात संध्याकाळ भेटत असे. संधीप्रकाशानं गुलाबी, सोनेरी, केशरी रंगाची उधळण केलेली असे. एरवी वाकुल्या दाखवणारे, भीती घालणारे अंधारातले वृक्ष कसे उजेडात न्हाऊन निघत. माझ्या संध्याकाळच्या आठवणी घाटातल्या संधिप्रकाशासारख्या उजळतात. गोव्यातल्या समुद्रात बुडणाऱ्या सूर्यापाठोपाठ क्षणभर दिसणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्ररेखेसारख्या झिलमिलतात. सांजदिवा लावून मलादेखील खूप आठवायचं असतं… रेंगाळलेल्या उन्हांनी ..  थांबलेल्या सावल्यांनी मला दिलेलं सांभाळायचं असतं… 

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! भाऊबीज !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! भाऊबीज !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शुभ दीपावली ! दिवाळीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणांच्या संमेलनात विविध भावनांचा उत्सव आपण साजरा केला. निसर्गाची पूजा केली. प्राणीमात्रांचे कौतुक केले. लक्ष्मीदेवी, श्रीविष्णू, श्रीकृष्ण यांचे पूजनअर्चन झाले. आरोग्यरक्षक धन्वंतरीचे पूजन झाले. शिवशक्तीचा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान केला. तसाच आता शेवटच्या दिवशी बहीण भावंडांच्या प्रेमाचा उत्सव साजरा होतो आहे. हीच आपली भाऊबीज. दिवाळी उत्सवातल्या शेवटचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’.

बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुनेकडे गेले. तिने अतिशय आनंदाने आपल्या घरी त्यांची पूजा केली, त्यांना ओवाळले. गोडधोड करून प्रेमाने जेऊ घातले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ” दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस. ” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून तेव्हापासून दरवर्षी भाऊबीज साजरी होते.

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते. सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची, तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला नेहमी बहिणीची आठवण येते. म्हणूनच या दिवशी भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाने जेऊ घालायचे. त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायू लाभावे म्हणून यमराजाची पूजा, प्रार्थना करायची.

या पवित्र, मधुर नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे, मावस भावंडं यानिमित्ताने जवळ येऊ लागली आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी भावंडं कोणतीही असोत हे नाते असतेच मायेचे, प्रेमाचे. म्हणूनच ते मनापासून जपायला हवे हेच हा दिवस आपल्याला सांगतो. मानलेले बहीण भाऊ पण अगदी असोशीने हे नाते जपतात. बहिणीने औक्षण करून आणि भावाने स्नेहाची ओवाळणी घालत एकमेकांच्या सुखाची, स्वास्थ्याची, आनंदाची कामना करायची. यासाठी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाऊबीज… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ भाऊबीज ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

लहानपणी भाऊबीजेचे खूप अप्रूप असे! भावाकडून काय भाऊबीज मिळवायची याचे प्लॅनिंग आधीपासूनच चालू असे. पैसे खूप नव्हते, पण उत्साह खूप होता. दिवाळीला एकच ड्रेस घेतलेला असे. तोच भाऊबिजेला पुढे केला जाई. एक वर्षी माझ्या भावाने गंमत म्हणून नाणी गोळा करून त्याचे छान पॅकिंग करून दिले होते. तेव्हा १९६२ सालच्या एक पैशाच्या नाण्यात सोनं आहे अशी बातमी होती! त्यामुळे ती नाणी पॅक करून मला भाऊबिजेला दिली !त्यात काय आहे ह्या उत्सुकतेने ते गडबडीने उघडले, तो आनंद आगळाच होता. पुढे मोठे झाल्यावर दोन्ही भाऊ नोकरीला लागले. . दोन दोन साड्या मिळू लागल्या!

लग्न होऊन सासरी गेल्यावर भाऊबिजेला भावाचे येणे अपुर्वाईचे असे. कधीतरी त्या निमित्ताने माझेही माहेरी जाणे होई ! मग मुले बाळे झाल्यावर आपल्या पेक्षा मुलांची भाऊबीज महत्वाची होऊ लागली! एक मुलगा, एक मुलगी असा भाऊबिजेचा कोटा पूर्ण झाला! दरवर्षी त्यांत काही ना काही नाविन्य असे. पाहुणे मंडळी येत, मग हसत खेळत दिवाळी साजरी होई. आमच्याकडे माझ्या पुतण्या उत्साहाने मोठा कार्यक्रम

आखत असत. जवळपास ३५/४० जण एकत्र येऊन भाऊबीज साजरी करत ! वरची पिढी, मधली पिढी आणि छोटी मुले. . . सर्वांची ओवाळण्याची गडबड, मिळालेल्या भाऊबिजेच्या वस्तू गोळा करणे, आणि शेवटी खाण्यापिण्याचा कार्यक्रम ! गेली दोन वर्षे हे सगळं बंद होतं ! पण यंदा भाऊबीज साजरी झाली!

भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक ! आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट सणाच्या निमित्ताने गुंफली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. अशा सणांमुळे नाती दृढ होण्यास मदत होते. बहिण-भावातील बंध रेशमाचे भाऊबीजेसारख्या सणामुळे अधिक मुलायम बनतात हे नक्कीच ! कधी चुकून झालेले समज गैरसमज अशा सणांच्या निमित्ताने दूर केले जातात. आपले सण ही आपली समाज मन एकत्र जोडतात !

…  दिवाळीचा हा शेवटचा दिवस असा गोड आनंदात साजरा होतो !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print