सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ निसर्ग आणि आम्ही… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
पावसाळा सुरू झाला की ओसाड झालेली वसूंधरा पुन्हा हिरव्या रूपात सुवासिन होऊन सजू लागते. पण सृष्टीचे सजलेले रूप पाहण्यास वेळ कुणाकडे आहे. आपण आधुनिकतेच्या पिंजऱ्यात अडकून वेळांचे साखळदंड पायात गुंतविले आहेत. आपण काळाच्या अधिन होत आपल्या जीवनाची सगळी सुत्रे मोबाईल, संगणक यांच्या हाती दिलेली आहेत. त्यामुळे ॠतंप्रमाणे बदलत जाणारे सृष्टीचे रूप पाहणे आणि तो वेगळा आनंद घेणे आपण विसरतोच. मोबाईल वरती येणारे निसर्गचित्रण पाहून आपण हा कृत्रिम आनंद घेतो पण निसर्गाच्या जवळ जावून त्याच्या विवीधतेतून सजलेले रूप पाहण्यास आपणास वेळच नाही.
वार्याच्या झोकात हिरवी वनराई आनंदाने डुलते. पावसाच्या सरी येऊन हिरव्या रानासोबत जणू झिम्मड घालून जातात. श्रावण आला की , कधी उन तर कधी पावसाचा खेळ रंगतो. कानावर पक्षांचा किलबिल आवाज येतो. एखांदा पक्षी झाडाच्या शेंड्यावर झुलताना दिसतो , तर एखांदा उंच आकाशात झेपावताना. कुठे दुरवर डोंगर-दरीतून एखांदा ढग उतरतो. आणि पुन्हा उन-पावसाचा लहरी खेळ चालू होतो. ओहळ, ओढ्यात येणारा पाण्याचा खळखळ आवाज मधूर वाद्याप्रमाणेच
कानास मंत्रमुग्ध करून जातो. उंचावरून कोसळणारा शुभ्र धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो. दुरवर पसरलेली हिरवी राने मनास आनंदी करतात. माळावर फुलणारी रंगबेरंगी फुले नाजूक स्पृर्शानी प्रसन्न करतात.
किती तो आनंद ! मनात मावेना इतका. हिरवा रंग ! नजर भरभरून ओसंडणारा. मधूर सुर ते ! पक्षांचे ,धो धो वाहत्या पाण्याचे ,वाऱ्याच्या सनईचे ,सळसळ करणार्या पानांचे खरच इतका भरभरून आनंद फक्त निसर्ग देऊ शकतो. आणि तोही फुकटात . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ,
“आनंदाचे डोही आनंद तरंग “
असाच हा डोळ्यांना भरभरून आनंद देणारा निसर्ग आपल्या भोवताली असतो .त्याच्यापासून परके होतो ते आपण , स्वतःहून जखडलेल्या कृत्रिम यांत्रिक बेड्यात.
मनास खंत आहे की निसर्गाने भरभरून दिलेला आनंद आपणास घेता येत नाही. म्हणतात ना ‘ देव आला द्यायला पदर नाही घ्यायला ‘ असेच आपले आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत की , बहरलेला ,विविधतेने नटलेलेला निसर्ग पाहण्यास आपणास वेळच नाही. मग निसर्गाचे रंग, रूप जाणून घेणे त्याचे संवर्धन या गोष्टी तर फारच दूर
खरोखर निसर्गाने आपणास दिलेल्या केलेल्या कित्येक गोष्टी आहेत. त्या आपणाला जगण्यातला खरा आनंद देतात. आपण सकाळी उठल्यावर पूर्वक्षितिजावर फुटणारे तांबट आणि रात्रीच्या भयान, निरव शांततेला भेदित करणारे घरट्यातून येणारे किलबिल आवाज अशी अतिशय रम्य पहाट आपल्या दैनंदिन स्वागतास रोजच येते. तिमीरातून तेजाकडे उजळत जाणारे दिवसाचे आगमन मनाला भरभरून उत्साह देते. मनास नव्या साहसाची ,नव्या आकांक्षांची जाणिव होते. येणाऱ्या नव्या दिवसाची सुरुवात आपण मन प्रफुल्लित आणि चित्त प्रसन्न ठेवून सुर्य नमस्कार घालून स्वतःस येणाऱ्या दिवसाच्या स्वाधीन केले तर ‘दुधात साखरेची भर पडेल. ‘ सायंकाळी पश्चिमेकडे क्षितिजावर उमलणारे तांबट पिवळे रंग मनाला मोहून टाकतात. दिवसभर थकल्या भागल्या मनाला प्रसन्न करतात. हळदउनात पिवळी झालेली सृष्टी नजर दिपवून टाकते.
येणारा प्रत्येक ॠतू हा आपल्यासाठी आनंदाची ओंजळ भरून आणतो. आपल्या जीवनाची नाळ ही प्रत्येक ॠतूशी जोडलेली असते. कवी मंगेश पाडगावकर आपल्या कवितेत म्हणतात
“सहा ऋतूंचे सहा सोहळे , येथे भान हरावे
या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे “
पानगळ करणारा शिशीर ॠतू सुध्दा जाता जाता आपणास संदेश देतो, ” जीवन संपले नाही उद्या येणारा वसंत ऋतू तुमच्यासाठी पुन्हा नविन कोवळा आनंद घेऊन येणार आहे. मी फक्त जुने आणि जिर्ण झालेले सोबत नेत आहे “
निसर्गाच्या कणाकणात आनंद भरलेला असतो. उत्साह भरभरून वहात असतो. हिरवी झाडे-वेली त्यावर उमलणारी रंगबेरंगी फुले ,डोंगर, दऱ्या,उसळणारा अथांग सागर, खळखळणारे झरे, शांत वाहणारी नदी ,प्राणी, पक्षी, या सगळ्याशी आपण एकरूप झालो तर कळेल, जीवनाचा खरा आनंद निसर्गातच आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा का होईना वेळ या दानशूर निसर्गाकरिता द्यावाच .निसर्गाचे संवर्धन ही सुध्दा आजच्या काळाची गरज आहे. पण आपण जेंव्हा त्याच्या कुशीत जगायला शिकू,तेंव्हाच त्याची काळजी सुध्दा नक्कीच घेऊ. ‘ सर्व काही विसरून निसर्गाच्या विविधतेत आयुष्य खुप छान जगता येते.’
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈