विविधा
☆ शततंत्रवीणेचा सम्राट ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆
असे म्हणतात, कि संतूर हे वाद्य इराण आणि मेसोपोटेमिया या भूभागात विकसित झाले. परंतु जेंव्हा संतूर या शब्दाचा वेध घेतलाअसता, असे दिसून येते कि संतूर हा शब्द भारतीय लोकसंगीतात शततंत्रीवीणा या नावाने प्रचलित होता आणि अपभ्रंशाने त्याचे नाव संतूर म्हणून रूढ झाले.
अक्रोडाच्या झाडापासून तयार केलेले हे संगीत वाद्य सर्व साधारणपणे समलंब चौकोनी आकाराचे असते. या वाद्याची ओळख वैश्विक स्तरावर नेण्याचे श्रेय हे नि:संशय पंडित शिवकुमार शर्मा यांचेकडे जाते. पंडितजींची जन्मभूमी जम्मू काश्मीर आहे.. पण कर्मभूमी सारे विश्व आहे. आज त्यांची इहलोकाची यात्रा पुरी झाली. शिवकुमार शर्मा यांचे जसे संतूर वर प्रभुत्व आहे तसेच तबल्यावर देखील प्रभुत्व होते.
भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी त्यांचे पिताश्री यांचेकडून गिरवले आणि शिवकुमार यांनी त्यांचे, गॉड गिफ्ट असलेले चिरंजीव राहुल यांना, तो वारसा प्रदान केला. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत मी काही फार मोठा जाणकार नाही.. परंतु सिलसिला या चित्रपटातील गाणी आणि संगीत यांची भुरळ मला जी पडली, ती अमीट अशीच आहे. सिनेमातील सर्वच गाणी आगळी वेगळीच होती, त्यांना एक नवाच गंध होता. तेंव्हापासून सुरु झालेला हा सिलसिला रसिकांच्या मनात असाच आजन्म राहील हे निश्चित.
पंडित शिव ( कुमार शर्मा ) आणि हरी (प्रसाद चौरासिया ) या व्दयीला सिलसिला चित्रपटाने सिने संगीतकार म्हणून एक स्वतंत्र, विशेष असे स्थान, रसिकांच्या मनात मिळाले. तसे सिने संगीतकार म्हणून त्यांनी फार सिनेमांना संगीत दिले, अश्यातला भाग नाही. परंतु वरील सिनेमे वगळता व्ही शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” या चित्रपटात एका प्रसंगासाठी देखील त्यांनी पार्श्वसंगीत दिलेले होते.
शिवकुमार शर्मा , हरिप्रसादजी चौरासिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काबरा यांचे सह “कॉल ऑफ द व्हॅली” नामक अल्बम केला. त्याने शास्त्रीय संगीत विश्वात त्यांचे स्थान अढळ झाले. तत्पश्चात “व्हेन टाइम स्टुड स्टील”, “हिप्नॉटिक संतूर”, “ए सब्लाईम ट्रान्स”, “द ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्ज”, “द फ्लो ऑफ टाइम” “द इनर पाथ” इत्यादी रसिकाला शाश्वतअनुभूती प्रदान करणारे, शुद्ध हिंदुस्थानी अल्बम रसिकांच्या भेटीला आले आणि पसंतीला उतरले. भारत सरकारने, त्यांच्या ह्या प्रतिभेची नोंद घेत राष्ट्रीय नागरी पुरस्कारांच्या क्रमवारीतील द्वितीय अर्थात पद्मविभूषण आणि चतुर्थ अर्थात पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव देखील केला.
अश्या यशस्वी विश्वमान्य संगीतकाराची भेट घेणे हे अशक्यप्राय होते. त्यांच्या पुणे भेटीचा कार्यक्रम असल्याचे कळताच मी पद्मश्री विजय घाटे यांचेशी संपर्क साधून त्यांची भेट निश्चित केली. पद्मश्री विजय घाटे यांचे देखील मी रेखाचित्र काढून त्यांची स्वाक्षरी मिळवली होती, तेंव्हापासून त्यांचा वरदहस्त मला सतत लाभत आहे.
एक मोठ्ठा कार्यक्रम, पुण्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित केलेला होता. रसिकांच्या प्रचंड गर्दीत त्यांची भेट घेणे अशक्यच होते. मी आणि माझा मित्र सुनील दामले आम्ही दोघे कार्यक्रमाच्या स्थानी दाखल झालो. पोलिसांची एखाद दुसरी बाचाबाची वगळता आम्ही सुखरूप त्या अतिथी कक्षाच्या बाहेर पोहोचलो. पण तेथून सन्माननीय पद्मश्री विजय घाटे यांचेशी संपर्क होईना. थोड्या प्रतिक्षे पश्चात खुद्द पदमश्री विजय घाटेंचा निरोप आला तेंव्हा मात्र आमचा जीव जणू भांड्यातच पडला आणि आम्हाला कॅमेरा आणि रेखाचित्रासह आत जाण्याची अनुमती मिळाली. आम्ही अत्यंत विजयी चर्येने अतिथींच्या कक्षात पोहोचलो. मी दबकत दबकत, अंग चोरून एका कोपऱ्यात उभा होता. शिवकुमारजींनी मला त्यांचे शेजारी बसण्याची अनुमती खुणेने दिली… मी बिचकत बिचकत त्यांचे शेजारी बसलो. माननीय विजय घाटेंनी माझा परिचय एक आर्टिस्ट म्हणून करून दिला. एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पद्मश्रीने विभूषित असलेल्या कलाकाराने, माझा परिचय दुसऱ्या पदमश्री पदमविभूषण इत्यादी सन्मानाने विभूषित आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला करून दिला हे माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद होते. मला ह्या प्रथितयश कलाकारांच्या सोबतीला बसण्याचे सद्भाग्य लाभले, हे अभिमानास्पदच होते.
पंडितजींचे व्यक्तिमत्व अत्यन्त लोभस असे होते.. काश्मिरी सौंदर्य, चकचकीत त्वचा, मार्दव स्वर, सभ्य, सुसंस्कृत, संभाषण मला अतिशय भावले. पंडितजींच्या प्रस्तुतीकरणाला थोडा अवकाश होता आणि त्यामुळे मला अपेक्षेपेक्षा अधिक अवधी मिळणार होता.
मी पुनश्च माझा त्रोटक परिचय करून दिला.. छंदासंबंधी सांगताच,
” बहोत खूब.. ” असे म्हणून माझी पाठ थोपटली.
” कुछ परेशानी तो नही हुई ना ? “ त्यांनी विचारले..
त्यावर मी नकार दिला..
” फोटोग्राफर तो बहोत आते है, लेकिन ऐसा मौका वीरलाही मिलता है.. “ पंडितजी उत्तरले. मी काढलेले पोर्ट्रेट त्यांनी उंचावून बघितले. त्यांना ते पोर्ट्रेट आवडले.
” मेरे बाल बनानेमे कोई दिक्कत तो नही आई ना ? “ त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण केसांवरून हात फिरवीत विचारले.
त्यांनी माझ्या वर्मावर जणू बोट ठेवले. खरेच शिवकुमार शर्माजी, झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम इत्यादींचा चेहेरा चितारणे तुलनात्मक दृष्ट्या एकवेळ सोप्पे पण त्यांची गुंतागुंतीची केश रचना पेन्सिलने रेखाटणे एक दिव्य मला वाटते.
” सर दिक्कत तो आई .. “ मी प्रांजळपणे बिचकत बिचकत म्हणालो.
त्यावर ते हसत म्हणाले, ” फिर भी आपकी कोशिश अच्छी रही… है ना घाटेजी ? “ त्यांनी माननीय विजय घाटे यांना उद्देशून विचारले. त्यांनी रेखाचित्रवर स्वाक्षरी केली.
त्यावर मी म्हटले, “सर उनके बाल भी वैसे हि है.. “ यावर सगळे खो खो हसले. एवढी खेळीमेळीची भेट होईल हे मला कदापि वाटले नाही..
हि माणसे खरोखरच मोठी असतात, विनम्र असतात, पण बरेचदा चहापेक्षा किटली अधिक गरम असते असेही अनुभव येतात..
मी त्यांचे चरण स्पर्शिले.. आणि विजयी मुद्रेने बाहेर पडलो.
हा प्रसंग देखील माझ्या मनाच्या कप्प्यात कोरल्या गेला.. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करतांना हा प्रसंग आठवून डोळे पाणावतात..
© श्री मिलिंद रथकंठीवार
रेखाचित्रकार, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈