डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ जय जय महाराष्ट्र माझा!… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!
एक मे, महाराष्ट्र दिन! माझ्या लाडक्या महाराष्ट्राचे पोवाडे मुक्तपणे गायचा दिवस! ज्या पवित्र भूमीत मी जन्म घेतला, त्या भूमीचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी कसे करावे? त्यापेक्षा या मंगलमय दिनी शब्दपुष्पांची सुंदर माळच तिच्या कंठात घालते!
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म घेतला ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच! या महान महाराष्ट्र देशाची महती अन श्रीमंती मी एका मुखाने काय आणि कशी वर्णावी? त्यासाठी प्रतिभावंत शब्दप्रभू गोविंदाग्रज यांनी रचलेले मनमोहक महाराष्ट्राचे महिमा-गीत “मंगल देशा” ऐकायला हवे. महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र, हा कोता विचार मनात आणणे, म्हणजे प्रत्यक्ष महाराजांचा अपमान करणे होय. त्यांच्या संघटन शक्तीचे उदाहरण जरी घेतले तरी त्यांची दूरदृष्टी आपल्याला स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. त्यांचे शौर्य, रणकौशल्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, इत्यादी इत्यादी विषयी मी पामराने काय लिहावे, केवळ नतमस्तक व्हावे अन “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप”! आपल्या मूठभर फौजेला हाताशी धरून “गनिमी कावा” अंमलात आणीत या “दक्खन के चूहे” ने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. त्याचे वर्चस्व झुगारून “स्वराज्याचे तोरण” बांधणारे आपले खरे हृदयसम्राट गो-ब्राम्हण प्रतिपालक असे शिवाजी महाराज!
आमची लाडकी दैवते म्हणजे, विठू माऊली, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा इत्यादी इत्यादी! माझा महाराष्ट्र देश हा संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला देश आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट” या हाकेनिशी संतांच्या मागे हजारोंनी दिंडीत सामील होत “राम कृष्ण हरी” चा टाळ मृदुंगासहित गजर करणारे वारकरी आजही त्याच भक्तीने वारी करीत हा अनमोल भक्तीचा नजराणा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि समाज प्रबोधनाची श्रीमंती काय वर्णावी? फक्त नाव जरी उच्चारले तरी आपोआपच “तेथे कर माझे जुळती”! आपण ज्या स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेतोय, ते मिळवून देण्यात येथील अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. किती म्हणून नावे घ्यावीत! आज त्यांच्या स्मृती-चरणी नतमस्तक होऊ या!
अभिजात भाषा आणखी किती समृद्ध असू शकते? सरकारदरबारी “मराठी” या माझ्या मायबोलीला हा दर्जा केव्हा मिळेल? या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! तिची थोरवी गातांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “माझ्या मराठीचे बोल कवतुके। परी अमृतातेंही पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें। मेळवीन॥“ ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात.
हे अभिजात साहित्य रचणारे हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, किती म्हणून नावे घ्यावीत! या साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! महाराष्ट्राची संगीत परंपरा अतिशय जुनी अन समृध्द आहे. संगीत नाटकांची परंपरा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत आणि मक्तेदारीच समजा ना! स्त्रीसौंदर्याचे नवथर निकष निर्माण करणारे बालगंधर्व, त्यांचे आम्हा रसिकांना कोण अप्रूप. ज्यांच्या स्त्रीसुलभ विभ्रमांचे इथल्या स्त्रियांनीच अनुकरण करावे असा रसिकांना वेड लावणारा हा एकमेवाद्वितीय कलाकार!
मुंबापुरी अन कोल्हापूर म्हणजे सिनेसृष्टीची खाणच! रजतपटाचा “प्रथम पटल” निर्माण करणारे दादासाहेब फाळकेच! इतर प्रांतातून मुंबईच्या मायानगरीत स्थायिक झालेले अन कर्माने मराठीची बिरुदे अभिमानाने मिरवणारे संगीतकार, गायक, गीतकार अन कलाकारांची तर यादी संपता संपत नाही. अश्या या महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री होते, यशवंतराव चव्हाण!
आता आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास जाणून घेऊ या. त्याला काळी चौकट आहे हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोराफाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो.
१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला, शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
मी जन्मले आणि वाढले या पुण्य-पावन मातीत, जिथे सुवर्णालंकार अन रत्ने तितकी नव्हती, मात्र होते सुवर्णकांचनासम झळाळणारे अस्सल संस्काराचे तेज! पुस्तके वाचता-वाचता, नाटके बघता-बघता अन वय वाढता- वाढता ओळख पटली इथल्या साहित्यिक वैभवाची! मन मोहोरून विचारायचे; आचार्य अत्रे लिखित ‘कऱ्हेचे पाणी’ चाखू, की, गडकऱ्यांच्या सुधाकर अन सिंधूच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या ‘एकच प्याल्याचे’ रंग रंगमंचावर बघू, की पु ल देशपांडेंच्या त्या अवखळ फुलराणीचे “तुला शिकवीन चांगलाच धडा!” हे प्रसिद्ध स्वगत आत्मसात करू, की ‘मृत्युंजयाच्या’ उत्तुंग विविधरंगी व्यक्तिमत्वाने स्तिमित होऊ! “घेता किती घेशील दो कराने” अशी तेव्हा माझी अवस्था व्हायची! नागपूरच्या नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलचे शिक्षण घेतले अन चाकरी केली तिथेच, भरून पावले अन आयुष्य सार्थकी लागले. इथल्या मातीचे ऋण चुकवण्याचा विचार पण मनात येत नाही, कसा येणार? इतके विशाल आहे ते! ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना करते की, वारंवार याच पवित्र मातीत जन्मावे अन तिच्याच कुशीत शेवटी विश्रांती घ्यावी, यापरीस सौभाग्य ते कोणते!
कुणीतरी म्हटले आहे की ठेच लागल्यावर “आई ग!” म्हणून कळवळतो तो खरा मराठी माणूस, पण आता इंग्रजाळलेले ओरिजिनल मराठी बॉय आणि गर्ल म्हणतात “ओह मम्मा!” ते बी मराठीच हायेत की! परप्रांतातून आलेले, येथील मातीशी नाते जोडून आता महाराष्ट्रीयन झालेल्यांचे काय? (याचे उत्तर जाणून घ्यायला अवधूत गुप्ते यांचे गाणे अवश्य ऐका अन पहा, ते देखील मनोभावे गाताहेत “जय जय महाराष्ट्र मेरा!”) शेवटी मने जुळली की मातीशी नाते जुळणारच की भावा! बंबैय्या मराठीची सवय झाली की, सारे सारे कसे सोपे होते!
मंडळी, हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी म्हणून उपभोगण्याचा नसून मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचा आणि ती जपण्याचा आहे. मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतांना धोतर, फेटे, नऊवार साडी, नथ इत्यादी पारंपरिक वेषभूषांपुरतेच आणि मराठी पाट्यांपुरतेच मराठीपण जपायचे की त्यापलीकडील आपला जाज्वल्य इतिहास देखील आठवायचा हे आपले आपणच ठरवणे योग्य!!!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈