विविधा
☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
नवीन आलेले फोन, आणि त्यातले संदेश, फोटो, आणि ध्वनीचित्रफीत पाठवण्याचे तंत्र याला सलाम. तत्परता म्हणजे काय? हे फोन आणि WhatsApp मुळे समजते.
या फोनमुळे व WhatsApp मुळे आम्ही आमचे तारतम्य काही प्रमाणात सोडले असा आरडाओरडा सगळ्या घरांमध्ये, सगळ्या स्तरावर, (मजल्यावर) सगळ्या खोल्यातून, सगळ्या वेळी होत असला तरी आम्ही यांचे वापरणे सोडलेले नाही.
घरात आणि बाहेर नम्रता (मान खाली ठेवणे) आज याच मुळे आहे. त्यामुळे आम्ही (बहुतेक वेळा) खालमानेनेच वावरतो. बऱ्याचदा आता मान वर करून बोलावे लागते, त्यासाठी पूर्वी (मान वर करून बोलण्याबद्दल) खूप वेळा काही ऐकावे लागत होते. आता अगोदर मान वर कर… असे सांगावे लागते.
अगदी म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात सुध्दा आमचे अंगठे सतत या फोनमुळे व्यस्त असतात. आजवर दाखवण्या व्यतिरीक्त इतर कामाला क्वचितच आलेला अंगठा आता बराच वेळ बिझी असतो. मी तर तो दाखवण्यापेक्षा जास्त वेळ बघितला असेल.
अहो तत्परता तत्परता तरी किती? म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात आम्ही जागा दिसेल तिथून व काढता येतील तसे फोटो आणि ध्वनीचित्रफीत काढून काही सेकंदाच्या अवधीत ते पाठवून आम्ही त्या कार्यक्रमात शरीराने हजर असल्याचे पुरावे देतो. (फक्त नेटवर्क का काय म्हणतात ते नीट वर्क करायला हवे.)
परवा एका कार्यक्रमात मी बसल्याजागी (उगाचच कार्यक्रम करणाऱ्यांना अडथळा नको) चोरुन काही फोटो काढले, आणि अवघ्या काही सेकंदाची ध्वनीचीत्रफीत करून बसल्या जागेवरुनच पाठवली. (खरे सांगायचे तर रंगमंचावरील लाईट आणि कलाकाराचा नीळा झब्बा इतकेच काय ते त्यात समजेल असे दिसत होते. चेहरा कोणाचा आहे हे सांगावे लागणार होते.) पण अवघ्या काही मिनिटांतच उत्तर म्हणून पाच सहा अंगठे, दोन चार टाळ्या वाजवणाऱ्या हाताची चित्र, पाच सहा वेगवेगळे चेहरे (यांना स्माईली म्हणतात), आणि एक दोन छान दिसतंय असा आशय दाखवणारी बोटं उत्तरात परत आली.
(छान दिसतंय असा आशय दाखवणाऱ्या बोटांच्या चित्राच आणि ते पाठवणाऱ्यांच मला विशेष कौतुक वाटते. कारण त्यांना छान म्हणायचे आहे का ध्यान म्हणायचे आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागते. महाभारतातील नरो वा कुंजरो वा या नंतर याच बोटांच्या खुणेचा अर्थ गहन असेल… छान की ध्यान…असो.) किती ही तत्परता… पण त्यांचा रंगमंचावर आणि आमचा फोनवर कार्यक्रम सुरू होता.
अमेरिकेवर फिरणारा तो फुगा चीनचा आहे हे समजून घेऊन त्या बद्दल अमेरिकेने चीनला विचारुन चीनने उत्तर देण्याआधीच दुरदर्शन वरुन आमच्या मोबाईल मध्ये त्यांचे फोटो आणि ध्वनीचित्रफीत पाठवून झालेली असते, आणि आम्ही आता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची वाट पहात असतो. (अमेरिका आणि चीन सोडून) आता तो फुगा फुटला, किंवा फोडला, पाडला. तर आम्ही फुटलेल्या फुग्याचे फोटो पाठवले.
लग्न समारंभात वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर (खरे तर त्यांनी हार पत्करल्यानंतर किंवा स्विकारल्यानंतर असे म्हणायचे होते.) ते सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी मंचावर येण्या अगोदर त्यांचेच फोटो त्यांच्या मोबाईलवर आलेले असतात. (फक्त त्यावेळी त्यांना तेवढा वेळ नसल्याने ते बघत नाहीत. पण इतरांनी ते तत्परतेने पाठवलेले असतात.)
जन्मलेल्या बाळाचे आणि अखेरीस दिलेल्या गंगाजळाचे, वाढदिवसाच्या औक्षणाचे, काही गोड क्षणांचे, काढलेल्या जावळाचे, आणि पडलेल्या टक्कलाचे, आलेल्या दातांचे, आणि लावलेल्या कवळीचे, पदार्थांनी भरगच्च वाढलेल्या पानाचे, समुद्रातील स्नानाचे, झाडांचे, फुलांचे, खेळण्यात गुंग असलेल्या मुलांचे, अशा कोणत्याही प्रसंगाचे फोटो, चित्रण तत्परतेने पाठवायचे साधन.
पण यामुळे चांगले देखील बघायला, वाचायला, ऐकायला मिळते हे पण खरं आहे.
फक्त ते बघायची आणि इच्छा असल्यास पाठवायची तत्परता तुम्ही दाखवली पाहिजे…… बाकी उरलेलं तो तत्परतेने करतो.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈