विविधा
☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ‘ असं ग दि माडगूळकरांचं माणिक वर्मा यांनी गायिलेलं एक गीत आहे. साधारणपणे सावळा रंग म्हटला की प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो तो कान्हा, कृष्ण. मग लक्षात येतं की अरेच्या ! केवळ कान्हाच कुठे आहे सावळा ? राम, विष्णू, शंकर, विठ्ठल असे आपले सगळे महत्वाचे देव तर निळ्या किंवा सावळ्या रंगातच दाखवले जातात. निळा किंवा सावळा रंग. सावळा म्हणजे थोडासा काळा आणि थोडासा निळा देखील. या रंगांमध्ये खरं तर एक जादू, एक गूढ लपलं आहे बरं का ! जे जे अफाट आहे, अगणित आहे, आपल्या नजरेत न मावणारं आहे, ते ते सगळं आहे काळं किंवा निळं. नाही पटत का ? बघा, आपल्या डोक्यावर हे अनंत पसरलेलं आकाश निळ्या रंगाचं आहे. समुद्र ! अथांग पसरलेला. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. तोही निळा. हातात थोडंसं पाणी घ्या. त्याला कुठलाही रंग नाही. पण त्याच पाण्याच्या थेंबांनी बनलेला सागर मात्र निळाईची गूढ शाल ओढून आहे. रात्री मात्र हे पाणी गूढगर्भ काळं दिसतं. आणि निळं दिसणारं आकाश ? खरं तर तेही निळं नसतं. उंच अवकाशात गेलो की निळा रंग नाहीसा होऊन सर्वत्र काळ्या रंगाचं साम्राज्य आढळतं. आहे की नाही गंमत ! मग हाच निळा, सावळा आणि काळा रंग आम्हाला शतकानुशतके मोहित करत आला आहे. अगदी ऋषीमुनींपासून तो आजच्या अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनांना.
या सावळ्या रंगाची बाधा भल्या भल्या लोकांना झाली हो ! पण ज्याला ज्याला ती झाली, तो तो त्यात रंगून गेला. तो त्याच रंगाचा झाला. त्याला दुसरा रंगच उरला नाही. आणि दुसरा रंगच नको आहे. अगदी मीराबाईंचं उदाहरण घ्या ना ! त्या तर कृष्णभक्तीत आरपार रंगून गेलेल्या. एका कृष्णाशिवाय त्यांना काही दिसतच नाही. ‘ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया.. ‘ असं म्हणताना त्या म्हणतात, ‘ लाल ना रंगाऊ , हरी ना रंगाऊ ‘. दुसरा कोणता रंग त्यांना नकोच आहे. त्या म्हणतात, ‘ अपने ही रंग में रंग दे चुनरिया…’ बस, एकदा त्या हरीच्या सावळ्या रंगात रंगले की झाले. एकदा जो कोणी या सावळ्या रंगात रंगला,त्याला अवघे विश्वच सावळे दिसू लागते. ‘ झुलतो बाई रासझुला… ‘ या सुंदर गीतात त्या अभिसारिकेला सगळेच निळे दिसायला लागते. ती म्हणते, ‘ नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा…’
तर ‘ सांज ये गोकुळी ‘ या सुंदर गीतात संध्याकाळचे वर्णन करताना कवीला सर्वत्र सगळ्याच गोष्टी सावळ्या किंवा श्याम रंगात बुडालेल्या दिसतात.
सांज ये गोकुळी सावळी सावळी अशी सुरुवात करून कवी म्हणतो. ही सांज कशी आहे तर, ‘ सावळ्याची जणू सावली. ‘
धूळ उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या …. तर पुढे तो म्हणतो
पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्या चाहुली.
संध्यासमयी दिसणाऱ्या पर्वतरांगेला एखाद्या काजळाची रेघ म्हणून कवीने तिचे सौंदर्य आणखी वाढवले आहे. आणि कवितेचा शेवट तर काय वर्णावा ! कवी म्हणतो
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होई कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचं हे अप्रतिम गीत. आशा भोसलेंनी अजरामर केलंय. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो सांज म्हणजे संध्याकाळची वेळ जणू माऊली. सगळीकडे आता अंधाराचं साम्राज्य पसरू लागलंय. अशा या संध्यासमयी अवघे विश्व जणू कान्ह्याचे रूप घेते ! संध्यासमयीचा मंद, शीतल वारा वाहतो आहे. असा हा वायू आपल्या लहरींबरोबर जणू कान्ह्याच्या बासरीचे सूर दूरवर वाहून नेतो आहे. श्रीकृष्णाची ही बासरी इतकी गोड आहे की काय सांगावं ? कवी म्हणतो, ‘ या बासरीच्या स्वर लहरी नाहीतच तर जणू अमृताच्या ओंजळी आहेत ! ‘जेव्हा सावळ्या रंगात आपण रंगून जातो, तेव्हा आपल्याला कान्हा, बासरी, त्याचा श्यामल वर्ण सगळीकडे दिसतो.
अशीच एक अभिसारिका. रात्रीच्या वेळी यमुनेवर पाणी आणायला निघालेली. रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला आहे. ही सुंदर भक्तिरचना आहे विष्णुदास नामा यांची. विष्णुदास नामा हे संत एकनाथांचे समकालीन. बरेच लोक संत नामदेव आणि विष्णुदास नामा यांच्यात गल्लत करतात. पण हे दोघेही वेगळे. तर विष्णुदास नामा आपल्या सुंदर रचनेत म्हणतात
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळेही काळे वो माय
रात्र काळ्या रंगात रंगलेली आहे. पाण्याला निघालेल्या या अभिसारिकेची घागरही काळ्या रंगाची आहे आणि यमुनेचे पाणीही रात्रीच्या अंधारात काळेच दिसते आहे. पुढे कवी म्हणतो
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय
बुंथ म्हणजे अंगावर आच्छादण्याचे वस्त्र, ओढणी वगैरे. तेही काळ्या रंगाचेच आहे. तिच्या अंगावरचे सगळे दागिने एवढेच काय पण गळ्यात असणारी मोत्यांची माळ देखील काळीच आहे. ती पुढे म्हणते
मी काळी काचोळी काळी
कांस कासिली ती काळी वो माय
तिच्या अंगावरची सगळी वस्त्रे देखील काळ्या रंगाचीच आहेत. खरं तर ती गोरी आहे पण सावळ्याच्या रंगात एवढी रंगली आहे की स्वतःला ती काळीच म्हणवून घेते एवढी या काळ्या रंगाची जादू आहे. या अशा रात्रीच्या समयी अंधारात सगळीकडे जिथे काळ्या रंगाचेच साम्राज्य आहे, तेव्हा मी एकटी कशी जाऊ ? मग ती आपल्या सख्याना म्हणते
एकली पाण्याला नवजाय साजणी
सवे पाठवा मूर्ती सावळी.
अशा वेळी मला प्रिय असलेली सावळी मूर्ती म्हणजेच श्रीकृष्णाला माझ्याबरोबर पाठवा म्हणजे भय उरणार नाही. शेवटी कवी म्हणतो
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्णमूर्ती बहू काळी वो माय
विष्णुदासांचा ज्या मूर्तीने ताबा घेतला आहे ती मूर्तीही काळीच आहे. म्हणजेच ते म्हणतात माझा स्वामी सावळा असा श्रीकृष्ण आहे.
अशी ही सावळ्या रंगाची बाधा. गोपींपासून राधेपर्यंत सर्वांना झालेली. ऋषीमुनी, कवी देखील यातून सुटले नाही. एकदा जो या रंगात रंगला, त्याचे वेगळे अस्तित्व राहतेच कुठे? आणि वेगळे अस्तित्व हवे आहे कुणाला ? म्हणून तर मीराबाईच्या शब्दात त्याला , त्या श्याम पियाला अशी विनंती करू या की माझ्या जीवनाचे वस्त्र तुझ्या रंगात असं रंगवून टाक की
ऐसी रंग दे के रंग नाही नाही छुटे
धोबीया धोये चाहे सारी उमरिया…
बाबारे, तुझ्या रंगात मला असे रंगून जाऊ दे की संसारात येणारे व्याप, ताप या कशानेच तो रंग जाणार नाही.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
१६/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈