मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

परिव्राजक म्हणून स्वामी विवेकानंद या आधी भारतात हवे तसे फिरले होते. पण हा प्रवास तसा नव्हता, आजही ते परिव्राजक होते, पण ही भ्रमंती ठरल्याप्रमाणेच, ठरलेल्या दिशेने आणि एका शिस्तीनेच करायची होती. तेरा हजार किलोमीटर अंतरावर जायचे होते.भारत भ्रमणात दरवेळी फिरताना त्यांच्याकडे सामान नसे. आता मात्र समान होते आणि पैसेही होते गरज म्हणून. सोय म्हणून. विवेकानंदांना याची सवय नव्हती. जहाजाचा प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार पाळणे याला ते हळूहळू सरावले.

त्यांच्या या पी अँड ओ कपंनीच्या पेनिन्शूलर जहाजातून याच वेळी मुंबईचे शेठ छबिलदास जपानला आणि भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक मानले जाणारे सर जमशेटजी टाटा शिकागोसाठीच प्रवास करत होते. एक आठवड्याने पहिला पडाव झाला एक दिवसाचा, सिलोन म्हणजे श्रीलंकेतील कोलंबो इथं.विवेकानंद शहरातून फिरून आले, नंतर जहाज पेनांगला थोडा वेळ थांबून, हाँगकाँगला आले. सिंगापूर, मलाया सुमात्रा यांचे दर्शन जहाजावरूनच झाले होते. हाँगकाँगला त्यांना खलाशी, कामगार, तिथले लोक यांचा व्यवहार पाहून तिथल्या दारीद्र्याची कल्पना आली. स्त्रियांची स्थिति समजली .अनेक गोष्टींची निरीक्षणे त्यांनी केली. चीनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे पाहिली. कॅन्टनमध्ये चीनमधला पहिला बुद्धधर्मीय सम्राट आणि त्याचे पाचशे शिष्य यांच्या स्मरणार्थ उभे केलेले सर्वात मोठे बुद्धमंदिर पहिले. पण इथला बौद्ध मठ कसा असतो याची त्यांना उत्सुकता होती,

इथे एक मजेदार घटना घडली. गाईडने बुद्ध मठाजवळ विवेकानंदांना नेलं, पण कुणाला आत प्रवेश नव्हता. विवेकानंदांनी कसेबसे त्याला मनवून आत प्रवेश केला तेव्हाढ्यात आतून दंडुके घेऊन काही लोक आले. बरोबरचे प्रवासी बाहेर पाळले, पण विवेकानंद यांनी त्या माणसाचा हात धरून ठेवला आणि त्याला म्हटले, चीनी भाषेत ‘भारतीय योगी’ याला काय शब्द आहे? त्याने शब्द सांगितला. विवेकानंद जागचे हलले नाहीत. ठामपणे उभे राहिले आणि धावत येणार्‍या लोकांना त्या शब्दात आपण भारतीय योगी आहोत हे मोठयाने सांगितले. तसे चमत्कार झाला, सर्वांनी दंडुके खाली घेतले आणि सर्वजण नम्रपणे उभे राहिले.त्या मठवासी लोकांनी विवेकानंदांना हात जोडून विनंती केले की,भुते खेते आणि पिशाच्च यांची बाधा होऊ नये म्हणून तुम्ही ताईत द्यावेत . विवेकानंदांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. त्यांचे समाधान करणे भाग होते. विवेकानंदांनी जवळचा कागद काढला, दोन तुकडे केले, त्यावर आडव्या उभ्या रेघा मारल्या, मधोमध ओम अक्षर लिहिले. आणि त्यांना दिले. त्याबरोबर त्यांनी आदराने तो घेतला आणि कपाळाला लावला. हे त्यांचे अज्ञान बघून विवेकानंदांना खूप कीव आली. याच जोडीला त्यांचे दारिद्र्य, अस्वच्छता हेही दिसले. नंतर त्या लोकांनी मठाच्या आतील भागात नेले तिथे, जुन्या हस्तलिखित पोथ्या ठेवल्या होत्या.त्या संस्कृतमध्ये होत्या आणि लिपी बंगाली होती. याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. तिथे बुद्ध मंदिरात पाचशे अनुयायांपैकी काहींचे चेहरे विवेकानंदांना बंगाली वाटले होते. मग त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतातून जे भिक्षू गेले होते त्यापैकी अनेक बंगाल मधून गेले असले पाहिजेत. 

हाँगकाँग सोडल्यानंतर जहाज नागासकी बंदरात थांबले होते. जपान मध्ये शिरताच त्यांना चीन आणि जपान यातला प्रचंड फरक जाणवला होता. त्यांना जपान मध्ये दिसलं होतं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीतली सौंदर्य दृष्टी, आधुनिक विज्ञानाचा केलेला स्वीकार, याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.सरळ आणि रुंद रस्ते, शहराची नीटशी रचना, घराभोवती बगीचे, अशा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांना मनोमन वाटलं की जास्तीत जास्त भारतीय तरुणांनी जपानला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही त्यांना जपानी मंदिरांमध्ये भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत मंत्र लिहिलेले आढळले. चीन आणि जपान हे दोन्ही देश भारताशी नातं सांगणारे दिसले. भारताकडे आदराने पहाणारे दिसले. पण भारताची आजची स्थिति विवेकानंदांनी पाहिली होती. याची तुलना त्यांनी लगेच केली. त्यांनी इथूनच लगेच शिष्यांना एक पत्र लिहिलं आणि परखडपणे म्हटलं की,  “जरा इकडे या, हे लोक पहा आणि शरमेने आपली तोंडे झाकून घ्या. पण परंपरेने गुलाम असलेले तुम्ही इकडे कसे येणार?तुम्ही जरा बाहेर पडलात की लगेच आपली जात गमावून बसाल. गेली कित्येक शतके आपण काय करीत आलो आहोत?. ”               

आशियामधून अजून जहाज बाहेर पडायचे होते, नव्या जगात पोहोचायला साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. तोवरच विवेकानंदांनी मनातली ही व्यथा आपल्या शिष्यांना पत्रातून कळवली होती.

चौदा जुलैला योकोहामाला जहाज बदलून ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या जहाजात ते बसले. आशिया खंडाला मागे टाकून, पॅसिफिक महासागरातून नव्या दिशेकडे जहाज मार्गस्थ होत होते. भारतातून निघताना त्यांची तयारी अनुयायांनी छान करून दिली होती. पण त्यात गरम कपडे नव्हते. त्यामुळे हा थंडीतला प्रवास खूप त्रासदायक ठरला.

पंचवीस जुलै १८९३ला संध्याकाळी जहाज व्हंकुव्हरला पोहोचले. इथून रेल्वेने दुसर्‍या दिवशी शिकागोला जायचे होते. इथे पहिल्यांदा विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.

अमेरिकेचा भूप्रदेश, उंच उंच पर्वत, खोल दर्‍या, पांढर्‍या शुभ्र हिमनदया, घनदाट अरण्ये, अशी निसर्गाची अनेक रुपे बघून त्यांचे मन प्रसन्न झाले. शिकागोकडे जाणार्‍या, या गाडीत अनेक देशांचे प्रवासी बसले होते. त्यात केट सॅनबोर्न ही पन्नाशीची बुद्धिवंत लेखिका होती, तिच्याशी विवेकानंद यांचा संवाद झाला. त्यांचा पत्ता घेतला. ओळख झाली. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण पण दिलं. ते पुढच्या मुक्कामात कामी आले.

तीस जुलैला विवेकानंद शिकागोला उतरले. इथल्या बारा दिवसांच्या सुरुवातीच्या वास्तव्यात एकामागून एक त्यांना धक्के बसले. पहिलं म्हणजे प्रचंड महागाई, रोज पाच डॉलर खर्च, दुसर म्हणजे सर्वधर्म परिषद सुरू होण्यास अजून पाच आठवडे बाकी आहेत, तिसरं म्हणजे या परिषदेला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे असेल तर, कोणत्या तरी संस्थेचे अधिकार पत्र आवश्यक आहे, चौथं म्हणजे प्रतिनिधी म्हणून नाव नोंदविण्याची मुदतच संपली आहे. आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळणार नाही. आता पुढे काय? हे मोठे प्रश्न चिन्ह उभे होते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

तुलसी श्रीसखी शिवे । पापहारिणी पुण्यदे |

नमो नारायणप्रिये ! नमस्ते नारदनुते ! नमो नारायणप्रिये ||

प्रत्यक्ष श्रीकृष्णांची सखी असणाऱ्या, पवित्र, पापांचे हरण करणाऱ्या, पुण्य प्रदान करणाऱ्या, नारदाकडून स्तुती केल्या गेलेल्या, नारायणाला प्रिय असलेल्या तुळशीला प्रणाम असो—- सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा घालण्याचे वेळी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. तुळशीत असलेल्या अनेक गुणांमुळे तिच्या सानिध्यात राहण्याने मिळणाऱ्या फायद्यामध्येच या प्रथेचे मूळ असावे.

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते | तद् गृहं नोपसर्पंति कदाचित् यमकिंकरा: ||

—-स्कंद पुराणात असा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात नेहमी तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. तिच्या मंजिरी विष्णूला अर्पण केल्या तर मोक्ष मिळतो.

….. एका कीर्तनकाराने तिची कथा सांगितली होती ती अशी…… 

….. एका गावात तुळशी नावाची एक काळी सावळी मुलगी रहात होती. तिची आई लहानपणीच वारली. सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची. म्हणायची, ” तू इतकी काळी. तुझे लग्नच होणार नाही.” तुळशी मोठी झाली आणि तिने एक दिवस आईला उत्तर दिले ,” पंढरपूरचा विठुराया माझ्यापेक्षा काळा आहे. तो करेल माझ्याशी लग्न.” 

आई म्हणाली, ” जा मग त्याच्याकडेच. नाहीतरी तू भूमीला भार आणि खायला कहार आहेस.” तुळशी देखील रागारागाने घराच्या बाहेर पडली. पंढरपूरला आली. तिथल्या बायका तिला चिडवू लागल्या. ” अग, त्याचे रुक्मिणीशी लग्न झाले आहे, तो तुझ्याशी कसा लग्न करेल? नुसता भुईला भार आहेस.” तुळशी रात्रंदिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिली. तिने अन्न पाणी सोडले. विठुराया काही तिच्याकडे आला नाही. तिने भूमातेला वंदन केले व आर्त विनवणी केली. ” आता माझ्याने सहन होत नाही. तू मला तुझ्या उदरात घे.” आणि खरोखरच भूमाता दुभंगली. तुळशी विठ्ठल विठ्ठल करत गडप होऊ लागली. इकडे विठुरायाला ते समजले. तो धावत धावत त्या  ठिकाणी आला. पण उशीर झाला होता. तुळशी गडप व्हायला लागली होती. त्याने तिचे फक्त केस दिसले तेवढे घट्ट धरून ठेवले. पण  तुळशी गडप झाली. आणि विठोबाच्या हातात फक्त तिचे केस राहिले. त्याने मूठ उघडली आणि त्याच्या डोळ्यांतले अश्रू त्या केसांवर पडले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या. विठोबाने त्या आपल्या हृदयाशी धरल्या आणि तेथील जमिनीवर पेरल्या. तिथे एक झाड उगवले .त्याला सगळे तुळशी म्हणून लागले. रखुमाईला ते समजले. इकडे विठोबा सारखे तुळशी तुळशी म्हणून उदास होत होता. रखुमाईला राग आला. ती म्हणाली सारखं तुळशी तुळशी करताय. घ्या तिला गळ्यात बांधून. आणि विठोबाने देखील तुळशीचा हार तयार केला आणि आपल्या गळ्यात घातला. तेव्हापासून ती त्याच्या हृदयापाशी रहात आहे…

तुळस अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत. तिच्या बुंध्याभोवतीची काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यावर लावली तर उपयोग होतो. मधमाशीने दंश केल्यास त्या जागी तुळशीतील माती लावतात. आराम पडतो. किडा, मुंगी, डास चावल्यास पानांचा रस दंशाचे जागी लावतात. आग थांबते. तिचे खोड, मूळ, फुले आणि मंजिरी अँटिबायोटिक म्हणून वापरतात. ताप आला, घसा खवखवू लागला तर तिची पाने चघळावी. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप लावावा. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी आपोआप शुद्ध होते. फुफ्फुसे हृदय व रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानासोबत देतात. तुळशीचा रस मधाबरोबर दिला तर सर्दी पडसे नाहीसे होते. तिच्या पानांचा रस लहान मुलांना दिला तर त्यांचा खोकला बरा होतो व टॉनिकप्रमाणे उपयोग होतो. नायटा झाल्यास तिच्या पानांचा रस लावतात. तिचे बी पाण्यात पाच-सहा तास भिजवून, दूध साखर घालून खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते.

….. देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. पण देवाला वाहिलेल्या तुळशीचे निर्माल्य होत नाही. तिची पाने, फांद्या झाडापासून तोडल्या तरी तिच्यातील प्राणशक्ती जिवंत असते. तुळशीमध्ये वनस्पतीज सोने असते. धातू रूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने जास्त प्रभावी असते.

….. तुळशीला इंग्रजीत बासिल म्हणतात. हिंदीत विश्व पूजिता ,विश्व पावन, भारवी, पावनी, त्रिदशमंजिरी, पत्रपुष्पा, अमृता, श्रीमंजरी, बहुमंजरी, वृंदा ,वैष्णवी, अशी अनेक नावे आहेत. विठोबाच्या गळ्यातील तुळशीला वैजयंती म्हणतात.

….. तुळशीवरून काही वाक्प्रचार देखील आपण वापरत असतो.

१) तुळशी उचलणे म्हणजे शपथ घेणे.

२) तुळशी उपटून भांग लावणे म्हणजे चांगल्या माणसाला काढून वाईट माणसाची संगत धरणे

३) तुळशीच्या मुळात कांदा लावावा लागणे म्हणजे चांगले हेतू साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा  उपयोग करण्याविषयीची सबब सांगणे.

४) तुळशीत भांग उगवणे म्हणजे चांगल्या माणसांच्या समुदायात चुकून एखादा वाईट माणूस आढळणे.

५) तुळशीत भांग व भांगेत तुळस उगवणे म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असणे.

६) तुळशीपत्र कानात घालून बसणे म्हणजे ऐकले न ऐकलेसे करून स्वस्थ बसणे.

७) घरादारावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरादाराचा त्याग करणे.

—–तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे महत्त्व प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे. 

महाप्रसाद जननी

सर्व सौभाग्यवर्धिनी

आधिव्याधी हरा नित्यं

तुलसी त्वं नमोऽस्तुते ||

 

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…3 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…3 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

द्रौपदी

महाभारतातील एक महत्वपूर्ण पात्र म्हणजे द्रौपदी! वास्तविक संपूर्ण महाभारताचा विचार करता कथेची नायिका द्रौपदी व नायक श्रीकृष्ण आहे असे म्हणावे लागेल.

द्रौपदीच्या चरित्राचा अभ्यास करताना असे लक्षात येते की तिच्या स्वभावाचे अनेक चांगले- वाईट कंगोरे होते. स्वयंवराचा ‛पण’ अर्जुनाने जिंकला असला तरी कुंतीच्या सांगण्यावरून ती पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार करते. यातून तिच्यातील आज्ञाधारक सून जाणवते. पण ज्यावेळी पांडवांवर संकट येते आणि कोणताही निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरत त्यावेळी योग्य सल्ला द्यायचे काम तीच खंबीरपणे करत असे. प्रसंगी त्यांच्या चुका दाखवण्यातही ती मागेपुढे पाहत नसे. द्युतात हरल्यावर पांडवांना जेव्हा वनवासात जावे लागले तेव्हाही तिने त्यांच्या मनात प्रतिशोधाची ज्योत सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला. एका प्रसंगात ती युधिष्ठिराला म्हणते,“ पूर्वी सकाळी ज्या सुंदर भूपाळी आणि वाद्यवादनाने तुम्हाला जाग येत असे तेच तुम्ही सर्व राजे आता सकाळच्या कोल्हेकुईने जागे होता. जिथे तुम्ही पंचपक्वान्नांचा आस्वाद घेत होता तेच तुम्ही आता कंदमुळांवर गुजराण करत आहात. ज्या भीमाच्या गदेच्या प्रहाराची सर्वाना भीती वाटते तो भीम जंगलातील झाडांवर कुऱ्हाडीचा प्रहार करून लाकडे गोळा करत आहे….” अशाप्रकारे आपल्या कर्तव्याची आपल्या पतींना जाणीव करून देणारी ती कर्तव्यदक्ष आणि महत्वाकांक्षी स्त्री वाटते.

आजच्या काळातही अजूनही स्त्री- पुरुष यांच्या मैत्रीच्या निखळ नात्यावर फारसा विश्वास ठेवला जात नाही. पण त्या काळात द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांची मैत्री अनोखी होती. त्यांच्यात खऱ्या अर्थाने सखा, भाऊ आणि सवंगड्याचे नाते होते. म्हणूनच तिला ‛कृष्णा’ या नावानेही ओळखले जात असे. ज्यावेळी भर दरबारात तिला डावावर लावण्यात आले आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तिला केवळ कृष्णाचीच आठवण झाली. तिने स्वतःच्या रक्षणासाठी कृष्णाचा धावा करताना म्हटले,“ माझा कोणी पती नाही, माझा कोणी पुत्र नाही, माझा कोणी पिता नाही. हे मधुसूदन, तुझे माझे तर कोणतेच नाते नाही. पण तू माझा सच्चा मित्र- सखा आहेस. म्हणून तू माझे रक्षण करावेस.” असे म्हणून तिने केवळ त्यांच्यातील मैत्रभावनेलाच हात घातला नाही तर त्याला आपल्या कर्तव्याचीही जाणीव करून दिली. इतकेच नव्हे तर त्याचवेळी कुरुवंशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना दूषण देण्यासही ती कचरली नाही. वास्तविक द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र यांनी ही सर्व विपरीत घटना घडत असताना ते थांबवणे गरजेचे होते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपला अधिकार हक्काने मागणारी द्रौपदी निश्चितच सर्व स्त्रियांसाठी आदर्श ठरावी.

जोपर्यंत तिच्या या अपमानाचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत तिने आपले केस मोकळे सोडले होते. दुर्योधनाच्या रक्तानेच वेणी बांधण्याची तिने प्रतिज्ञा केली होती. आणि जोपर्यंत तिचे ते मोकळे केस दिसत होते तोपर्यंत तिच्या पतींना तिच्या अपमानाचा आणि त्याचा बदला घेण्याचा विसर पडू नये हीच तिची त्यामागची भावना असावी. यातून तिच्यामधील निश्चयी आणि तितकीच आपल्या मताशी ठाम असणारी स्त्री दिसून येते.

जितकी ती प्रसंगी कठोर होत असे तितकीच ती मनाने कोमल होती. जयद्रथ म्हणजे खरे तर तिच्या नणंदेचा पती! पण तो तिचे अपहरण करतो आणि नंतर त्याच्या या अपराधासाठी त्याला ठार मारण्याची युधिष्ठिराकडे मागणी होत असताना ती आपल्या नणंदेला वैधव्य प्राप्त होऊ नये म्हणून सर्वाना त्यापासून परावृत्त करते. मात्र जयद्रथाला आपल्या या दुष्कृत्याची सतत जाणीव राहावी म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्याची आज्ञा देते.

ती पाच पतींची पत्नी असली तरी वारंवार असे जाणवत राहते की ती भीमावर मनापासून प्रेम करत होती. कारण ज्या ज्या वेळी तिच्यावर संकट आले त्या त्या वेळी तो पती म्हणून तिच्या पाठीशी उभा राहिला. वस्त्रहरणाच्या वेळी पण त्याने एकट्यानेच त्याविरुद्ध आवाज उठवला होता. त्यामुळे जेव्हा द्रौपदीचा अंतिम काळ आला त्यावेळी ती भीमाला म्हणाली,“ जर पुन्हा जन्म मिळालाच तर तुझीच पत्नी व्हायला मला आवडेल.” द्रौपदीमधील ही प्रेमिका मनाला मोहवून जाते.

अशी ही महाभारताची नायिका असणारी द्रौपदी अनेक आयामातून संस्कृत साहित्यात भेटत जाते. काहीजणांच्या मते केवळ द्रौपदीच्या अहंकारी स्वभावाने आणि रागामुळे संपूर्ण महाभारत घडले. पण माझ्या मते या संपूर्ण कथेत द्रौपदीवर जितका अन्याय झालेला दिसतो तितका इतर कोणत्याही स्त्रीवर झालेला दिसत नाही. राजघराण्यातील असूनही संपूर्ण जीवन संघर्ष आणि दुःखात गेले. मुले असूनही मातृत्व नीट उपभोगता आले नाही. सौंदर्यवती असूनही नेहमीच पाच पतींमध्ये विभागली गेली. ज्याच्यावर तिचे खऱ्या अर्थाने प्रेम होते त्याला पूर्णपणे समर्पित होऊ शकत नव्हती. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही ती तितकीच खंबीर होती. पण तरीही शेवटी ती एक सामान्य स्त्री होती. म्हणूनच काही वेळा प्रेम, ईर्षा, राग या सहज भावना तिच्यात उफाळून येत असाव्यात. त्यामुळे हे सामान्यत्वच उराशी बाळगून तिने आपले असामान्यत्व सिद्ध केले होते असेच म्हणावे लागेल.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया…2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

सीता

रामायण हा आपल्या संस्कृतीतील एक आदर्श ग्रंथ मानला जातो. आदर्श माता- पती- पत्नी- पिता अशी अनेक नाती येथे आदर्श म्हणून बघितली जातात. आपल्यासमोर सीता म्हणजे केवळ एक आदर्श पत्नी, सून अशाच रुपात उभी केली गेली आहे. पण रामायण आणि संस्कृत साहित्याचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते की सीता तेवढीच कणखर आणि निश्चयी स्त्री होती.

रावणाचा पराभव करून जेव्हा राम सीतेला सोडवतो आणि तिच्यापुढे अग्निदिव्य करण्याचा प्रस्ताव मांडतो त्यावेळी सीता तो प्रस्ताव स्वीकारते पण रामाला सुनावते,“ प्रभू, माझ्यात जे स्त्रीत्व म्हणजे निर्बलत्व आहे त्यावर तुम्ही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे संशय घेत आहात. पण माझ्यातील सशक्त अशा पत्नीत्वावर तुमचा विश्वास नाही. माझा स्वभाव आणि हृदय नेहमीच  स्थिर आहे आणि तिथे फक्त तुम्हालाच स्थान आहे. भलेही रावणाने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी माझी तुमच्यावरची भक्ती आणि प्रेम यत्किंचितही कमी झाले नसते. त्यामुळे मनाने मी नेहमीच पवित्र आहे.”

आज समाजामध्ये विनयभंगाची अनेक उदाहरणे दिसत असताना केवळ शारीरिक पवित्र्यावर स्त्रीचे चारित्र्य ठरवले जाते. अशावेळी हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही स्त्री सहजपणे एक शाश्वत सत्य सांगून जाते.

अयोध्येत परत आल्यावर काही काळ सुखात घालवल्यावर केवळ एका सामान्य नागरिकाच्या बोलण्यामुळे राम सीतेचा त्याग करतो. आणि तेही अशावेळी जेव्हा तिच्या पोटात त्याचा अंश वाढत असतो. अरण्यात पोहोचेपर्यंत सीतेला याची कल्पनाही नसते. जेव्हा तिला ते समजते त्यावेळी अपमानाने क्रोधीत झालेली सीता तत्क्षणी लक्ष्मणाला विचारते,“ माझ्या अशा अवस्थेत माझा त्याग करणे योग्य आहे? हीच का तुमच्या इक्ष्वाकु वंशाची परंपरा?” त्यानंतर शांत झाल्यावर “हेच आपले प्राक्तन आहे. कदाचित गेल्या जन्मीचे पाप मी या जन्मी फेडत असेन ” असे स्वतःच्या मनाला समजावत ती आलेल्या परिस्थितीला खंबीर मनाने सामोरी जाते.

यातली अन्यायाला विरोध करणारी सीता पदोपदी प्रत्ययास येतेच. पण त्याचबरोबरच समोर आलेल्या संकटाला तितक्याच सक्षमतेने तोंड देणारी सीता तितकीच सामर्थ्यवान वाटते.

सर्वात शेवटी जेव्हा रामाची आणि लव-कुश- सीतेची गाठ पडते आणि राम तिला पुन्हा अयोध्येस नेण्यास उत्सुक असतो तेव्हा ती येण्यास नकार देते.  ज्या ठिकाणी ती राणी म्हणून मानाने वावरलेली असते. ज्या प्रजेवर तिने मनापासून प्रेम केलेले असते. तिच प्रजा तिच्यावर अन्याय होत असताना तिच्या बाजूने उभी रहात नाही. ज्या पतीसाठी, त्याच्यावरील प्रेमासाठी तिनेही चौदा वर्षे वनवासात घालवली त्यानेही तिची उपेक्षाच केली ही खंत कुठेतरी तिच्या मनात असतेच. जिथे  तिच्या आत्मसन्मानाला डावलले गेले तिथे ती पुन्हा पाऊल ठेवत नाही. त्यातून तिचा स्वाभिमान दिसून येतो.

अशाप्रकारे आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता असणारी सीता तितकीच निग्रही, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी सशक्त स्त्री होती.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जपूया संस्कृती… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ जपूया संस्कृती… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

आपण उत्सवप्रिय आहोत. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक या महिन्यात विविध व्रतवैकल्ये, धार्मिक सण, उत्सव यांची रेलचेल असते. या काळात संपूर्ण निसर्ग बहरलेला असतो. वर्षाऋतुनं अवघ्या अवनीवरती जलाभिषेक केलेला असतो. सृष्टी सौंदर्यानं नटलेली असते. प्राणी पक्षी आनंदी असतात. झाडं,वेली पानाफुलांनी नटलेली असतात. आपले सण उत्सव   आपल्या संस्कृतीची ओळख सांगतात. तसेच ते निसर्गाशी नातं सांगतात, निसर्गाशी जवळीक साधतात. निसर्गातल्या बदलांचं निरिक्षण करून त्यांचं आपल्या जीवनाशी असलेलं नातं शोधणं म्हणजे सण, उत्सव साजरे करणं , हो ना? सणांच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात, सुसंवाद घडतात. वैयक्तिक, सामाजिक ताणतणाव कमी होतात. याबरोबरच सण, नैसर्गिक बांधिलकीची जाणीव देखील करून देतात. सृष्टीतील प्रत्येक सजीवांप्रती प्रेम, आदर, व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून या सणांच्याकडं, बघायला हवं.

आपल्या चालीरीती, परंपरा आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. आपल्या परिसरातील झाडं, वेली, शेती, प्राणी, पक्षी या सर्वांना मानाचं स्थान देण्यासाठी सण निर्माण केले आहेत. असा विचार केला तर परंपरा जपल्या जातीलच, पण त्याशिवाय निसर्गाचं जतन करायला, संवर्धन करायला, परिसंस्था टिकवायला हातभार लागेल.

वटपौर्णिमा, नागपंचमी, ऋषीपंचमी साजरी करायची असेल तर घरातून बाहेर जावं लागतं. निसर्गाशी संवाद साधावा लागतो.गणेशाला लाल फुले, दुर्वा, आघाडा प्रिय. अर्जुन, रुई, पिंपळ, कण्हेर, शमी, डाळिंब,शंखपुष्पी अशी एकवीस प्रकारची पत्री पूजेसाठी लागते. बाप्पासाठी हे सर्व लागते म्हणून या वनस्पतींची लागवड केली जाते. त्यांची काळजी घेतली जाते, संवर्धन केले जाते. पर्यायानं आपण आपल्या सभोवती असलेल्या निसर्गाचं  संवर्धन करतो, जतन करतो. त्यामुळंच तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. शहरात पूजेसाठी लागणारी फुलं, फळं,पत्री विकत मिळते. परंतु खरेतर या वनस्पती आपल्या परिसरात आपण स्वतः लावणं अपेक्षित आहे. देवपूजेचं निमित्त करून, पूजेसाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठी आपण त्यांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केला पाहिजे. मोकळी हवा, भरपूर ऑक्सिजन मिळवण्यासाठी परिसरात फिरलं पाहिजे. सृजनातला आनंद मिळवला पाहिजे.सर्जनशीलता वाढली पाहिजे. या वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या,फळं यांचं सेवन केलं पाहिजे.

आपली संस्कृती रोजच दारात रांगोळी काढायला सांगते. यामुळे घरासमोरील अंगण, घराचा बाह्य भाग, यांची स्वच्छता होते. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. ताजा प्राणवायू उत्साह द्विगुणित करतो. थोडासा व्यायाम होतो. शेजाऱ्यांची खुशाली समजते. कलागुणांना वाव मिळतो. मन प्रसन्न होतं. अनेक आजार दाराबाहेर रोखले जातात.

सणासुदीच्या काळात म्हंटल्या जाणाऱ्या आरत्या, स्तोत्र पठण, यांनी सात्विक वातावरण निर्माण होतं. आरती गाताना आपण टाळ्या वाजवतो. यामुळं जशी गेयता येते, तालाचं, चालीचं भान राहतं तसंच रक्ताभिसरण सुधारतं. ओवी, श्लोक, ऋचा, आरत्या जिभेला वळण लावतात, स्मरणशक्ती वाढवतात. विचार करावा तेवढे फायदे आहेत. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून रितीरिवाज, परंपरा, सणसमारंभ यांची आखणी केली आहे. आधुनिक काळात पाश्चिमात्य देशांमधील विचार, पद्धती, खाद्यसंस्कृती, वेषभूषा आपण स्वीकारतो. ती वाईट नाही. पण आपल्या हवामानाला पूरक नाही हे मात्र नक्की. निसर्गाचा समतोल राखत, मानवी जीवन आरोग्यपूर्ण, आनंदी आणि समाधानी करण्यासाठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्न,वस्त्र, निवारा देणारी अवनी जपली पाहिजे.

‘सहनाववतु, सहनोभुनोक्तु सहवीर्यं करवावहै’ ची अनुभूती घेतली पाहिजे.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ आरसा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आरसा ज्याला दर्पण’असेही म्हणतात,तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे.’

सांग दर्पणा दिसे मी कशी?असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो.कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो.सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो .तो आरसा म्हणजे मनाचा आरसा.ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी, दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण ,रागीट,भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो.म्हणूनच म्हंटले जाते. चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं.

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो.पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो.म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच.याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. उभा, आडवा, चौकोनी, गोल, षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात.मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवावस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत.चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो.

चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात.

इकडे लगातार तीन दिवस तीन वेगवेगळ्या टोकाच्या हवामानाचा अनुभव सगळ्यांनी घेतला. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण,कुंद हवा, पाऊस तर दुसऱ्या दिवशी थंडी, बोचरे वारे,आणि तिस-या दिवशी अचानक सर्वत्र ऊन. ह्या अचानक बदलत्या हवामानाने सगळीकडे सर्दी, ताप,घसा खवखवणे आणि खोकला ह्यांच्या मा-याला आपल्याला तोंड द्यावं लागतयं.

खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.

त्यामुळे ह्या आजारपणाच्या काळात मात्र माणसाला माणसाची खरी किंमत कळायला लागते.सध्या ह्या आजारपणात घरात वा नोकरीच्या जागी तीन गट पडलेतं.पहिल्या गटात  संपूर्णपणे आजारी असलेल्या व्यक्ती, दुसऱ्या गटात थोडफार बरं वाटत नसलेल्या व्यक्ती आणि तिस-या गटात एकदम ठणठणीत व्यक्ती. ह्यापैकी तिसऱ्या गटातील व्यक्तींचे संख्याबळ अगदी कमी आहे.

काल परवापर्यंत ह्या आजारपणात मी दुसऱ्या गटात मोडत होते.नंतर मात्र अंगावर काढल्याने शेवटी तिसऱ्या फेज मध्ये प्रवेशकर्ती झालीय. आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

त्यामुळे आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेऊन झाल्यावर ह्या आजारपणात आलेल्या चांगल्या अनुभवांविषयीची पोस्ट काही दिवसात लिहीनच.

औषधांपेक्षाही सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागतं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ४२ – सर्वधर्म परिषदेची तयारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ४२ – सर्वधर्म परिषदेची तयारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

संपूर्ण भारत भ्रमण करताना स्वामी विवेकानंद यांनी सत्ताधीशांपासून अगदी गरीब माणसापर्यंतचा भारत उघड्या डोळ्यांनी पाहिला. कान उघडे ठेऊन, त्यासर्वांशी त्यांच्या पातळीवरून संवाद साधला. हे सर्व अनुभव यायला वराहनगर मठ सोडून तीन साडेतीन वर्षाचा काळ मध्ये गेला होता. उघड्या आकाशाखाली आणि भव्य समुद्राने घेरलेल्या शिला खंडावर तीन दिवस तीन रात्री राहून चौथ्या दिवशी सकाळी नावेतून काही लोकांबरोबर स्वामीजी किनार्‍यावर परत आले. त्यांच्या भोवती गोळा झालेल्या लोकांनी त्यांना विचारलं, “तीन दिवस आपण त्या खडकावर कशासाठी ध्यानस्थ बसला होता? स्वामीजींनी त्यांना, आपण श्रीरामकृष्ण यांचे शिष्य आहोत हे सांगून, “गेली दोन अडीच वर्षे देशभर फिरत होतो, माझं मनही अनेक विषयांचा विचार करीत होतं. ज्या प्रश्नाचा शोध या सार्‍या भ्रमंतीत मी घेत होतो, त्याचं उत्तर मला त्या खडकावर मिळालं”. हे सांगितलं. स्वामीजींच्या जीवनातली ही सर्वात मोठी घटना होती. आज कन्याकुमारीच्या समुद्रातल्या त्या शिलाखंडाहून चिंतन करून उठलेले स्वामीजी आणि कलकत्त्याहून बाहेर पडलेले स्वामीजी ही दोन रूपं वेगळी होती. हे आतापर्यंतच्या प्रसंगावरून आपल्याला जाणवतेच.

अध्यात्माबरोबरच त्यांच्यातल्या देशभक्तीचा विचार भ्रमण काळात पक्का होत गेला. खरं तर भारत देश पारतंत्र्यात होता, अन्याय अत्याचारांचा सामना करत होता. त्यासाठी अनेक चळवळी सुरू होत्या. पण स्वामीजींच्या मते ही अवस्था तात्पुरती असून आज ना उद्या संपेलच. पण, सर्वसामान्य जनतेची झालेली आजपर्यंतची उपेक्षा थांबवणं हे जास्त महत्वाचं वाटत होतं. त्यांच्या दृष्टीने इंग्रजी सत्ता हे याचं कारण नव्हतं. या उपेक्षेला त्यांच्या दृष्टीने समाजच जबाबदार होता.

बेळगावच्या भेटीपासून त्यांचा रामेश्वर इथं जायचा विचार होता तो त्यांनी वेळोवेळी सांगितला होता. कन्याकुमारीहून ते रामेश्वर इथं जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेऊन मनाशी केलेला संकल्प पूर्ण केला. तिथून ते पॉन्डिचरीला गेले. तिथे मन्मथनाथ भट्टाचार्य कामानिमित्त आलेले होते. त्यांच्याकडे स्वामीजी थांबले. त्यानंतर काम आटोपून दोघेही मद्रासला परतले, त्यांना घ्यायला मद्रास स्टेशनवर अलसिंगा पेरूमाल आणि त्यांचे मित्र आणि मन्मथनाथांच्या ओळखीचे  काही उच्चशिक्षित स्वागतासाठी हजर होते. दीड महिना स्वामीजी मद्रासला राहिले पण हे वास्तव्य त्यांना भविष्यातल्या कार्यारंभासाठी खूप महत्वाचे ठरले. त्यांना ह्या कामाला मदत करणारी माणसे प्रथम मद्रासलाच मिळाली. ती झोकून देऊन काम करणारी होती.

मद्रासला अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती, भेटी होत होत्या. श्रोत्यांवर त्याचा प्रभाव पडून तरुण वर्ग आकर्षित होत होता. प्रौढ आणि उच्च शिक्षित वर्ग ही आकृष्ट होत होता. तिथल्या एका साप्ताहिकात स्वामीजीन बद्दल लिहून आले. अशी प्रसिद्धी पहिल्यांदाच त्यांना मिळाली होती. एका ठिकाणी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यात तर त्यांना, वैदिक धर्माचे स्वरूप, हिंदुधर्मानुसार आदर्श मानवी जीवन, स्त्रीशिक्षण, श्राद्धासारखे धार्मिक विधी, यावरही प्रश्न विचारले लोकांनी. त्यांच्या कडून ऐकलेल्या विचारांच्या प्रकाशात पुढचे आयुष्य चालत राहण्याची जिद्द असणारे तरुण स्वामीजींना मद्रासला भेटले. त्यांना इथे अनुयायी मिळाले. केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीचे पहिले पाऊल मद्रासला पडले होते. त्याला निमित्त झाले होते मन्मथबाबू भट्टाचार्य आणि आलसिंगा पेरूमाल. मंडम चक्रवर्ती आळसिंगा पेरूमाल हे त्यांचं नाव .

म्हैसूरचे असलेले आलसिंगा पेरूमाल मद्रासला एका शाळेचे मुख्याध्यापक होते. वेदांताचे अनुयायी आणि कट्टर वैष्णवपंथी. गरीबी असली तरी ध्येयवादा मध्ये ती आली नाही. त्यांनी मुख्याध्यापक असूनसुद्धा स्वामीजींना अमेरिकेत जाता यावे म्हणून दारोदार फिरून पंचवीस पैशांपासून सामान्य लोकांकडून वर्गणी गोळा केली होती, आयुष्यात काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते, ते स्वामीजींची भेट झाल्यावर त्याला दिशा मिळाली होती. अलसिंगांनी घेतलेल्या कष्टामुळे स्वामीजी अमेरिकेत जाऊ शकले.

स्वामीजींचा मद्रासला असा मोठा जनसंपर्क झाला होता. ही ख्याती हैदराबादला जाऊन पोहोचली होती. आणि स्वामीजींनी हैदराबादला भेट द्यावी असे एक पत्र आल्याने स्वामीजींनी ते निमंत्रण स्वीकारलं. कमी वेळात इतकी सूत्र हलली, की हैदराबाद स्टेशन वर स्वामीजींना घ्यायला पाचशे माणसे आली होती. दुसर्‍या दिवशी सिकंद्राबादहून शंभर जण भेटायला आली आणि “आमच्या कॉलेज मध्ये एक प्रकट व्याख्यान द्यावे” असा आग्रह केला. विषय होता, ‘पाश्चात्य देशात जाण्यातील माझा उद्देश’. या व्याख्यानाला हजार श्रोते उपस्थित होते. स्वामीजींच्या विवेचनात उदात्तता होती, तात्विक चिंतन होते, देशप्रेम होते, आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान आणि वेदवेदांन्तातील उत्कृष्ट तत्वे पाश्चात्य जगासमोर ठेवावीत अशी एक भारतीय धर्मप्रवक्ता म्हणून अमेरिकेला जाण्याची आपली भूमिका आहे, असे या व्याख्यानात स्वामीजींनी सांगितले. इथे दहा बारा दिवस ते राहिले. नुकतीच ते वयाची तिशी पूर्ण करत होते. हैद्राबादला पण सार्वजनिक व्यासपीठावर ते पहिल्यांदाच बोलले होते. सर्वा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी त्यांना आदराची वागणूक दिली. त्यांच्या विचारांचे स्वागत केले. ते पुन्हा मद्रासला परतले.

अमेरिकेला जाण्याच्या संकल्पाला अजून श्री रामकृष्णांचा आदेश मिळत नव्हता, तोपर्यंत त्यांचे निश्चित होत नव्हते. त्यातच एक घटना घडली. त्यांना एकदा रात्री स्वप्न पडलं की आपल्या आईचं निधन झालं. त्यांना आईबद्दल खूप आदर आणि प्रेम होतं. पण घरदार सोडून आल्यामुळे आणि प्रपंचाच्या गोष्टीत अडकू नये म्हणून ते संपर्क ठेवत नसत. पत्रही पाठवत नसत. मन दोलायमान झाले, कलकत्त्याहून काहीतरी कळणे आवश्यक होते. हे त्यांनी मन्मथबाबूंना सांगितलं. मन्मथबाबूंनी मनाचे समाधान व्हावे म्हणून स्वामीजींना एका भविष्य सांगणार्‍या व्यक्तीकडे नेले. त्या सिद्ध माणसाने स्वामीजीची पूर्ण माहिती सांगीतली, धर्मोपदेशाच्या कामासाठी तुम्ही लवकरच कुठेतरी दूरदेशी जाल, तुमच्या बरोबर सतत तुमचे गुरु असतील आणि आई बद्दल विचारले आई कुशल आहे हे ही सांगीतले आणि स्वामीजींचा जीव भांड्यात पडला. मन हलक झालं. थोड्याच वेळात कलकत्त्याहून तार आली, भुवनेश्वरीदेवी कुशल आहेत. मनाचा वारू कसा धावत असतो. संवेदनशील मनात किती आणि कसे विचार येत असतात. त्याचा परिणाम कसा होतो हे स्वामीजींच्या या घटनेवरून दिसतो. हा एव्हढा उद्योग ते देशातील लोकांसाठी करत होते पण आई, जन्मदात्री माता, तिचं स्थान हृदयामध्ये कायम असतं. तिचा विसर जराही पडला नव्हता. हीच ती भारतीय मूल्यं. आज याची पण शिकवण गरजेची आहे.    

आता मन निश्चिंत झालं होतं. दूर जायचे तर गुरुमाता श्री सारदादेवींचा आशीर्वाद घेणं पण आवश्यक होतं. माताजींना पत्र लिहून आशीर्वाद मागितला. अमेरिकेला जाण्याचा संकल्प कळवला. त्यांनी आशीर्वादाचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाले आणि स्वामीजीचे मन हर्षभरीत झाले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. कोणाला कळू नये म्हणून स्वामीजी समुद्रावर एकटेच गेले आणि मन शांत झाल्यावर परत आले. तोवर सर्व भक्तगण जमा झाले होते. “माताजींनी आशीर्वाद दिला आहे, आता कोणतीही अडचण नाही. निर्णय ठरला. मी सर्वधर्म परिषदेला अमेरिकेस जाणार”हे जाहीर केले. अनुयायी तर खूप खुश झाले. निधि संकलन कामाला जोरात सुरुवात झाली. आता एकदम दिशाच बदलून गेली. उत्साहाचे वातावरण तयार झाले. पैसे गोळा करण्याचा प्रयत्न अलसिंगा यांच्या पुढाकाराने जोरदार सुरू झाला.

एक दिवस अचानक खेतडीचे महाराज राजा अजितसिंग आणि त्यांचे सचिव जगमोहनलाल स्वामीजींना भेटायला दत्त म्हणून हजर.अजितसिंग यांना मुलगा झाला होता आणि त्याप्रीत्यर्थ त्यांनी एक समारंभ ठेवला होता. त्यासाठी स्वामीजींना आमंत्रण द्यायला स्वत: आले होते.पण आपण ३१ मेला अमेरिकेला जाण्याच्या गडबडीत आहोत त्यामुळे शक्य नाही होणार असे स्वामीजींनी सांगीतले,  जगमोहनलाल यांनी आपण एक दिवस तरी यावे असा आग्रह केला आणि आपण पश्चिमेकडे जाणार आहात हे महाराजांना खूप आवडले आहे . जो काही पैसा लागेल तो महाराज व्यवस्था करतील, आपण फक्त चलावे असे म्हटले.

आतपर्यंत म्हैसूर बंगलोर, हैद्राबाद इथून काही पैसे गोळा झाले होते.म्हैसूरच्या राजांनी पण मोठी रक्कम दिली. स्वामीजींचा खेतडीला जाण्याचं बेत ठरला आता पैसे गोळा करण्याचे प्रयत्न कराची आवश्यकता नव्हती. अलसिंगा आनंदित झाले, स्वामीजींची आर्थिक सोय पूर्ण होणार होती. स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन जगमोहनलाल यांच्या बरोबर खेतडीला निघाले. मुंबईहून जहाजाने अमेरिकेला निघण्याचे आधीच ठरले होते. त्यासाठी मुंबईत काही तयारीसाठी स्वामीजी थांबले. तिथे ब्रम्हानंद, तुरीयानंद यांची भेट झाली.स्वामीजींच्या जाण्याची बातमी सगळीकडे पोहोचली.

स्वामीजी खेतडीला समारंभाला पोहोचले. समारंभ थाटामाटात पार पडला. स्वामीजींनी नव्या युवराजांना  आशीर्वाद दिले. या मुक्कामात आणि याआधीही स्वामीजींच्या महाराजांशी घरगुती गप्पा पण व्हायच्या. श्रीरामकृष्ण यांची समाधी घरदारचे पाश तोडून बाहेर पडणे हा इतिहास महाराजांना माहिती होतं. संन्यास घेतला तरी मनाच्या कोपर्‍यात भावंडांची काळजी, आईची मनाची चिंता आणि त्यांचे कसे चालले आहे याचं शल्य त्यांना बोचत होतं हे महाराजांना माहिती होतं. बोलता बोलता मद्रासला आताच पडलेल स्वप्न कदाचित महाराजांना स्वामीजींनी संगितले असेल, महाराज अजितसिंग यांचं मनही द्रवलं. स्वामीजींचे मन किती पोळत असेल या विचारांनी असं अजितसिंग यांच्याही मनात आलं. त्यांनी स्वामीजींना आश्वस्त केलं, “मी तुमच्या मातोश्रींना दरमहा शंभर रुपये पाठवत जाईन. आपण ही चिंता मनातून काढून टाका”. हे उत्स्फूर्त बोलणे ऐकून क्षणभर स्वामीजी आनंदित झाले. नरेंद्रने घर सोडल्यावर सात वर्षानी ही अडचण दूर होणार होती.तेही अजितसिंग यांच्या औदार्यामुळे. पुढे स्वामीजींनी त्यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, ‘मी जो काही आज या जगत आहे तो तुम्ही केलेल्या सहाय्यामुळे आहे. एका घोर चिंतेतून मुक्त होणं हे मला तुमच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे मी जगाला सामोरे जाऊ शकलो’. ही मदत अजितसिंग यांच्याकडून १९०१ पर्यन्त त्यांचे निधन होईपर्यंत शंभर रुपये दरमहा मिळत होते. त्यामुळे स्वामीजींची खेतडीची ही भेट महत्वाचीच ठरली होती. 

स्वामीजींची सर्व व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी जगमोहनलाला यांना त्यांच्या बरोबर मुंबईला पाठवले होते. अमेरिकेला जाताना, अंगावर गुढग्यापर्यन्त पोहोचणारा रेशमी झुळझुळीत भगव्या रंगाचा झगा, कमरेभोवती गुंडाळलेला तशाच रंगाच्या कापडाचा आडवा पट्टा, आणि मस्तकावर केशरी रंगाचा फेटा, हा विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारा वेष, ही राजा अजितसिंग यांनी दिलेली एक राजेशाही देणगी होती आणि विविदिशानंद चे स्वामी विवेकानंद हे नाव सुद्धा खेतडीच्या अजितसिंगानीच अमेरिकेला जाताना बदलायला लावले होतं.  

मुंबईला मद्रासहून अलसिंगा आले होते, मुंबईला जगमोहनलाल यांनी बाजारात नेऊन स्वामीजींना झगा आणि फेटा यासाठी उत्तम भारीपैकी रेशमी कापड घेतले ,तसेच तुम्ही महाराजांचे गुरु आहात महाराजांना शोभेल अशा राजेशाही थाटात तुमचा प्रवास झाला पाहिजे.म्हणून जहाजाचे आधीचे दुसर्‍या वर्गाचे तिकीट बदलून त्यांनी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. आपल्या गुरुच्या व्यवस्थेत काहीही कमी पडू दिले नाही महाराजांनी .

३१ मे या दिवशी विवेकानंद यांनी मुंबई सोडली.पी अँड ओ कंपनीच्या पेनिन्शूलर जहाजातून ते जाणार होते. थेट जहाजपर्यंत सोडायला अलसिंगा आणि जगमोहनलाल गेले होते. भोंगा वाजला, दोघांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. दोघांच्याही डोळ्यात आसवं तरळली. स्वामीजी अखेर अमेरिकेला निघाले हे पाहून अलसिंगांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान झाले. जहाजाने किनारा सोडला. विवेकानंदांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा मागे पडला होता आणि जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाद्यसंस्कृती ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ खाद्यसंस्कृती ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दिवाळी तशी आटोपून गेली तरी अजून फराळाचे डबे गच्च भरलेले आहेतच. आम्हां बायकांची एक गम्मतच असते एकीकडे वजन वाढतयं म्हणून काळजीत पडतो आणि एकीकडे खाद्यपदार्थांच्या डब्यांची शीग उतरु मुळी देत नाही. खरचं आपली खाद्यसंस्कृती आहे मोठी विलक्षण.

ह्या खाद्ययात्रेत दोन गट पडतात . एक गट तब्येतीनं खाणा-यांचा आणि एक गट भरभरून खाऊ घालणा-यांचा. आग्रहाने खाऊ घालणा-या तमाम लोकांना सलाम आणि त्यांच्या पदार्थांना न्याय देणा-या, अन्नदात्यांना “सुखी भव”असा आशिर्वाद देणा-यांनांपण सलाम.

एक नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस,पहिली तारीख. ही एक तारीख पुर्वी नोकरदारांसाठी फार महत्त्वाची असायची. आजचा हा दिवस “जागतिक शाकाहार दिन” म्हणून ओळखल्या जातो.

कुठल्याही व्यक्तीची आहाराविषयी आवडनिवड ही त्याच्या रहिवासाच्या भोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती, हवामान तसेच आजुबाजुचे वातावरण, लहानपणापासूनच्या सवयी,मनावर असलेला पगडा ह्यावर अवलंबून असते. खरं सांगायचं तर ज्या गावातून, घरातून, संस्कृतीतून,संस्कारांमधून आम्ही मोठे झालो, घडलो त्यात लहानपणी तर शाकाहाराशिवाय दुसरा कुठला आहार असतो हे आमच्या गावीही नव्हंतं.किंबहुना शाकाहाराशिवाय दुसरा कुठला सामिष आहार असतो ही गोष्ट लहानपणीच्या आकलनशक्ती पलीकडील बाब होती.

पुढे हळूहळू वयाची शाळकरी फेज पार करतांना विज्ञानाचा अभ्यास करतांना “जीवनसाखळी”ची संकल्पना वाचनात आली, आणि मग सामिष आहार हा आपण घेत नसलो तरी तो आहार निषीद्ध नसून उलटपक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक सुद्धा असतो ही नवी बाब कळली. जीवनसाखळी सुरळीत सुरू राहण्यासाठी मी जरी शाकाहारी असले तरी सामिष आहार घेणारे पण भरपूर लोक असतात हे मैत्रिणींच्या बरोबर गप्पांच्या ओघातून कळले.

आपली शाकाहारी खाद्यसंस्कृती होते पण एक अफाट खाद्यसंस्कृती आहे हे नक्की. खरतरं फक्त शाकाहारी आणि दोन्ही प्रकारचा आहार घेणाऱ्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नसतो मुळी.कारण मानवाला नुसते उदरभरण म्हणून अन्न सेवन करायचं नसतं तरं त्याचबरोबर “जिव्हा”याने की “रसना”तिलापण प्रसन्न, तृप्त ठेवायचं असतं.आणि प्रत्येक व्यक्तीचे जीभेचे चोचले हे वेगवेगळे असूच शकतात. फक्त खाणं असो वा बोलणं, आपली जिव्हा ही आपल्याच ताब्यात हवी हे मात्र नक्की.

मी स्वतः संपूर्णपणे शाकाहारी असले तरी वेगवेगळे सामिष, पौष्टिक पदार्थ खाणा-या दर्दी मंडळींचं मला प्रचंड कौतुक वाटतं.खरी दर्दी मत्स्यप्रेमी,मांसाहारी मंडळी डोळेमिटून कुठल्या प्राणीजातीचा आहार आपण घेतोय हे छातीठोक सांगू शकतात त्यांच्या खव्वैयेगिरीला आणि अभ्यासाला सलाम.

शाकाहारी मंडळींमध्ये एकच प्रकार असतो  परंतु मासांहारी मंडळींमध्ये वेगवेगळे प्रकार असतात,एक बेधडक सामिष आहार घेतो हे सांगणारे आणि दुसरे लपूनछपून खाणारे. असो

पु.ल.देशपांडे ह्यांची खाद्यसंस्कृती वाचली की शाकाहाराचा आवाका किती मोठा,प्रचंड आहे ह्याची कल्पना येते.मी तर पु.ल.चं खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर प्रत्येक वाचनानंतर मला काहीतरी दरवेळी वाचन हाती लागतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्वप्न म्हंटलं किं ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ आठवणं सहाजिकच आहे.पण ‘स्वप्न’ म्हणजे फक्त तेवढंच नव्हे.मुंगेरीलालसारखे दिवास्वप्ने पहाणारे जसे आहेत तसेच आयुष्यातलं नेमकं उद्दीष्ट ठरवून त्यादिशेने प्रदीर्घकाळ अथक, प्रयत्न न् कष्ट करीत ध्येय प्राप्तीनंतरचा स्वप्नपूर्तीचा कधीच न विरणारा आनंद मिळवणारे आणि जपणारेही आहेतच. दिवास्वप्नं पहात स्वप्नरंजनात मश्गूल रहाणाऱ्यांबाबतची किंव आणि स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्यांबद्दलचा कौतुकमिश्रित आदर यांना निमित्त होणाऱ्या स्वप्नांच्या या दोन रुपांमधे गूढ असं कांहीच नाहीय.पण प्रत्येकालाच सुप्तावस्थेत दिसणाऱ्या स्वप्नांमधे मात्र कधीच थांग न लागणारं गूढ ठासून भरलेलं आहं.ती स्वप्ने हेच एक गूढ विश्व आहे. जाणवतं, दिसतं.. पण ते जसंच्या तसं इतरांना त्याचवेळी दाखवता मात्र येत नाही. ते खास ज्याचं त्याचंच असतं. त्या क्षणांपुरतं त्याच्यासाठी अगदी खरं..तरीही तो एक भासच.भास-आभासाचा चकवा देत रहाणारा एक खेळ!

‘स्वप्न’ मला एखाद्या भरकटत गेलेल्या नाटक किंवा सिनेमासारखं वाटतं.बघताना त्यात गुंतत जात असलो तरी त्यातून बाहेर पडल्यावर न पटणारं, असंबद्ध, अविश्वसनीय सगळं कृत्रिम,तद्दन काल्पनिक, कशाचा कशाला मेळ नसणारं असं काहीसं वाटत रहाणारं..!

खरंतर स्वप्न एखाद्या नाटक किंवा सिनेमातल्या प्रसंगांच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखंच तर असतं.आपल्या मन:पटलाच्या रंगभूमीवर दिसणारं नाटक किंवा मन:पटलाच्या पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमासारखं..!स्वप्न आपण समोर बसून नाटक-सिनेमासारखं पहातही असतो आणि अकल्पितपणे त्याचाच एक भाग बनून स्वतः त्यात भूमिकाही करत असतो. तरीही आपला स्वतःचाच मन:पटलावरचा आपलाच वावर समोर बसून पहावा तसं पाहूही शकत असतो.सगळंच गूढ.. अतर्क्य..!

हे स्वप्न पडणं जसं तसंच त्यांचं विरणंही तितकंच गूढ!त्याचा थांगच लागू नये असं.मला स्वतःला आजपर्यंत पडलेल्या असंख्य स्वप्नांपैकी अगदी मोजकीच स्वप्ने आज आठवतात हे जसे , तसेच इतर न आठवणाऱ्या स्वप्नांचे विरुन जाणेही मला अनाकलनीय वाटतं आलंय हेही खरेच.स्वप्न पहात असताना त्यातले सगळेच घटना-प्रसंग एखाद्या वास्तव क्षणांसारखे अनुभवत असताना त्या क्षणी मनाला झालेल्या त्या स्वप्न-घटनादृश्यांच्या स्पर्शांची जाणिव, त्या स्पर्शांमधला त्या त्या वेळचा दिलासा,आनंद किंवा दुःख, वेदना,थरारही लख्ख जाणवत राहिलेला पुढे बराच वेळ. पण दचकून जाग येताच कुणालातरी ते स्वप्न, तो अनुभव सांगावं असं उत्कटतेने वाटत असतानाच जादूची कांडी फिरावी तसं सगळंच विरून गेलेलं..! हे विरुन जातंच कसं आणि कुठे हे प्रश्नही स्वप्ने कां आणि कशी पडतात या प्रश्नांसारखीच अनुत्तरीत, अनाकलनीयच! या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे अखंडपणे सुरु आहेही.पण ‘आपल्या मनातल्या सुप्त इच्छा,भावनांचा कल्लोळ, दडपणं,नैराश्य,अस्वस्थ करणारे त्रासदायक विचार..असं सगळ्याचं आपल्या सुप्तावस्थेत चित्रभाषेत प्रकट होणं म्हणजे स्वप्न’ यासारखे आजवरच्या संशोधनाचे निष्कर्ष मला तरी अनेक शक्यतांपैकी फक्त एक शक्यता आहे असेच वाटते. एखाद्या हिमनगाचे टोक दिसावे तसे न् तेवढेच.स्वप्नाच्या गूढ अर्थांच्या एका सूक्ष्म कणाएवढे!कारण स्वप्नांच्या इतर अतर्क्य, सूचक,प्रेरणादायी,दृष्टांतसदृश स्वप्न-प्रकारांचा थांग या निष्कर्षानंतरही अद्याप कुणालाच लागलेला नाहीय.अगदी तो अनुभव,त्यातली उत्कटता ज्याने स्वतः अनुभवलीय त्यालाही नाही.

या अतर्क्य अशा सूचक स्वप्नांचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे.अतिशय उत्कट आनंदानुभव दिलेले ते क्षण आणि त्यातील बारकाव्यांसकट ते मोजके स्वप्नानुभवही मी इतक्या वर्षांनंतरही विसरु शकत नाहीय..!आणि तरीही त्यामागील गूढ मात्र अथक प्रयत्नांनंतरही मला उकललेलं नाहीय.निदान ते उकलेपर्यंततरी ‘स्वप्न’ म्हणजे अतिशय गूढ असं बरंच कांही.. असंच म्हणावं लागेल.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares