मराठी साहित्य – विविधा ☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? विविधा ?

☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके☆ 

जीवना, खरंच, इतकं  भरभरुन दिलं आहेस मला.

छोट्या कुरबुरी, आता उगा करु कशाला?

अगणित आनंदाचे क्षण, मोजता भासती तोकडे.

अन् दुःखाच्या हळव्या क्षणांचा, तो बोलबाला केवढा?

जरतारी किनारीचे वस्र ल्याले मी, झगमगते.

तरी त्याची कलाबूत, कुठेतरी का टोचते?

सुंदर सकाळ, फुलांचा मोहवतो दरवळ.

तरी द्दृष्टीस माझ्या का खुपते ही पानगळ ?

बालकाचे निरागस हास्य, त्यावीण सुंदर असे काय?

जीवन सरतानाही, पेला पुन्हा भरुन जाय.

सर्वगुणसंपन्न जरी या जगी नसे कुणी.

जगमगता एक गुण, असतो,प्रत्येकाचे ठायी.

गुणविशेष हेरावा, अन् मारावी पाठीवर थाप.

भोक दिसता, बोटे घालून, वाढवण्यात मतलब काय?

शांत आणि प्रसन्नचित्त,रहावे सदासर्वदा.

जीवन फार छोटे आहे, आज आहोत,

उद्याचे काय ठाऊक असते कुणाला?

हसण्यातून उधळा फुले, गा आनंदगाणी छानशी.

आज घ्या आनंदे जगून, विसरून उद्याची काळजी.

© निलिमा ताटके

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 6 ☆ सौ. अमृता देशपांडे  

देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या 26 वर्षाच्या तरुण मुलाचे पार्थिव घेऊन जेव्हा त्याचेच सहकारी तिरंग्यात लपेटून त्याला घरी आणतात, तेव्हा आईवडील, बहीण भाऊ,  आप्तमित्र या सर्वांच्या डोळ्यातलं पाणी… इथेतर शब्दच मुके होतात.  संवेदना स्तब्ध होतात.आईच्या कुशीतून जन्म घेऊन मातृभूमी ची सेवा करताना भूमातेच्या मांडीवर विसावलेला तो वीर! प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी त्या मातापित्याच्या त्यागाला,  धारातीर्थी पडलेल्या शूराला अश्रू वंदना देत असतं. भारतमातेने आपला तिरंगी पदर आपल्या सुपुत्राला पांघरलेला असतो. मानवंदना देणारे ते अश्रू ही स्वतःला कृतार्थ मानत असतात.

शहीद जवानांची बातमी कानावर पडताच थेट काळजाला भिडते. दुःखाला अभिमानाची किनार असलेली ही भावना इतर सर्व भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. देशभक्ती चा कठोर वसा घेतलेल्या आणि ‘ तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ या ध्यासाने सीमेवर रक्षण करणारा जवान जेव्हां धारातिर्थी पडतो तेव्हा अश्रू रूपानी ‘ भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी,  सैनिक हो तुमच्या साठी’ हा संदेश सर्व सैनिकांना पोचवत असतो. तेच त्यांच्या लढण्याचं बळ असतं..

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ. नयना कासखेडीकर

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एक ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण नगररचना असलेल्या जयपूर शहरात स्वामीजी खूप कमी काळ राहिले. जयपूर मध्ये एक सभापंडित व्याकरणाचे जाणकार होते. त्यांनी पंडितांकडून पाणीनीच्या व्याकरणातील सूत्रे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पंडितजींनी अनेक प्रकारे समजावून सांगून ही तीन दिवसाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा स्वामीजी आकलन करू शकले नाहीत. पंडितजी त्यांना म्हणाले, “स्वामीजी माझ्याजवळ शिकल्याने आपला विशेष फायदा होईल असे वाटत नाही. तीन दिवस झाले, मी तुम्हाला एक सूत्रही समजावून देऊ शकलो  नाही. आपण हा प्रयत्न थांबवावा. या बोलण्याने स्वामीजी या सुत्राचा अर्थ समजण्यासाठी, निश्चय करून एकांतात तीन तास बैठक मारून बसले आणि सूत्राचा अर्थ लक्षात आल्यावर खोली बाहेर येऊन, तो पंडितजींना सुबोध शैलीत म्हणून दाखवला. एव्हढंच नाही तर सूत्रा मागून सूत्र आणि अध्याया मागून अध्याय त्याच पद्धतीने ते वाचत राहिले. पंडितजी आश्चर्यचकीत झाले. एकदा ही आठवण सांगताना स्वामीजींनी म्हटले आहे, “मनाचा पूर्ण निर्धार असेल तर, काहीही साध्य करणं शक्य असतं. एखादा पर्वत असावा आणि त्यातील मातीचा कण अन कण वेगळा करावा अशा प्रकारे मनुष्य कोणताही कठीण विषय आत्मसात करू शकतो”. अशा प्रकारे दोन आठवड्यात शक्य तेव्हढे त्यांनी पंडितजिंकडून शंका निरसन करून घेतले होते. या आधी पण वराहनगर मठात त्यांनी दोन वर्ष पाणिनी च्या व्याकरणाचा अभ्यास केला होता.

जयपूर संस्थानचे लश्कर प्रमुख सरदार हरिसिंग यांच्याकडे काही दिवस स्वामीजी राहिले होते. त्यांच्या प्रवसातला हा अनुभव अत्यंत वेगळा होता. हरिसिंग यांचा भारतीय तत्वज्ञानाचा खूप चांगला अभ्यास होता. ते वेदांती होते, परब्रम्ह मनात असत. मूर्तिपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. ते साकाराचे पक्के  विरोधक आणि निराकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या बरोबर तासन तास अनेक चर्चा होत होत्या. सगळे ज्ञान काही फक्त बुद्धीच्या जोरावरच मिळत नसते, काही वेळा ते भावनिक पातळीवर सुद्धा मिळते. कारण ते जाणिवेच्या पातळीवरचे असते. असाच अनुभव स्वामीजींनी हरिसिंग यांना दिला.

एका संध्याकाळी ते दोघ फिरायला बाहेर पडले होते. त्याच रस्त्यावर समोरून भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक चालली होती. यात भक्त आर्त स्वरात आणि भावभक्तीने भजने म्हणत होती. दोघेही ती मिरवणूक पाहत थांबले असताना, स्वामीजींनी हरिसिंगना स्पर्श केला आणि म्हटले, “तो पहा साक्षात भगवंत आहे”. हरिसिंग देहभान हरपून एकटक बघू लागले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या. क्षणात ते एका वेगळ्याच विश्वात गेले. हरिसिंग यांनी हा अनुभव घेतल्या नंतर स्वामीजींना म्हणाले स्वामीजी माला साक्षात्कारच झाला. तासण तास चर्चा करून मला जे उमगलं नव्हतं, ते सारं मला आपल्या या स्पर्शाने ध्यानात आणून दिलं. श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीत मला खरोखर जगच्चालक प्रभुंचं दर्शन घडलं”. असाच अनुभव स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरात कालिमातेचं दर्शन घेताना घेतला होता. साकारावर विश्वास न ठेवणार्‍या स्वामीजींना हा अनुभव आला होता.

आता स्वामीजी जयपूरहून अजमेरला गेले. राजस्थान मधलं एक महत्वाचं ठिकाण. संपूर्ण भारतात एकमेव असं ब्रम्हदेवाचं मंदिर इथे आहे. त्याचं दर्शन आणि मोईनूद्दीन चिस्ती या दर्ग्याचं दर्शन घेऊन तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानच्या वळवंटातल्या साडेपाच हजार फुट उंचीच्या अबुच्या पहाडावर आले. त्यावेळी हा परिसर अतिशय शांत, उन्हाळ्यात तर हवा थंड आणि आल्हाददायक आणि अनेक संस्थांनिकांची प्रासादतुल्य  निवासस्थाने होती. ब्रिटिश रेसिडेंटचा मुक्काम यावेळी इथे असे. त्यामुळे ते ऐश्वर्याचं लेणं भासत असे. पण याचा स्वामीजींना काही फरक नव्हता पडणार कारण त्यांना यात काहीच रस नव्हता. त्यांना हवी होती शांतता आणि एकांत स्थान. त्यांना आकर्षण होतं अशा ठिकाणी ध्यानधारणा करण्याचं. चम्पा ही गुहा त्यांना सापडली आणि त्यात ते राहू लागले.

रोज संध्याकाळच्या शांत प्रहरी स्वामीजी तलावाच्या काठाने चक्कर मारत. इतर संस्थांचे कोणी न कोणी तिथे येत जात असत. एकदा खेत्री संस्थानचे मुन्शी जगनमोहन लाल आले. ते उत्तम कार्यप्रशासक होते. त्यांना राजस्थानी, पर्शियन, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत होत्या. त्यांनी आपले खेत्रीचे राजा अजितसिंग यांना स्वामीजींनी भेटावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट ठरली.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊलं खुणा ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

? विविधा ?

🌼 पाऊलं खुणा 🌼 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

– आज घरं कसं रिकामं-रिकामं वाटतं. अगदी पाहुणे येऊन गेल्यावर वाटत तसंच!मनंही थोडं उदासच.

श्रावण कधी संपला कळलंच नाही.

अन् आतां किती पटकन् गौरी-गणपती आले अन् गेलेही. खरंच, रोजच्या दिवसाला कशी चक्र॔ लावलेली असतात नाही?तरी, त्याच्या पाऊलखुणा असतातच.

आमची एकुलती एक लेक सासरी गेली अन् घराबरोबर मनंही उदासलं.

तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आपणही श्रीमहालक्ष्मी म्हणजे ‘गौराई ‘आपल्या घरी आणायच्या. ‘श्रीगणेशा’बरोबर  ‘गौराई’म्हणजे, आनंदाची पर्वणीच!

आज किती वर्ष झाली, प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने, गौरी -गणपती घरी आणल्या. त्याच्या येण्यानं जणूं दूरदेशी गेलेला मुलगाच भेटायला येतो. लाडक्या लेकी ‘ गौराई ‘माहेरपणाला येतात., असंच वाटत. आमची लेक मदतीला येते., नातवंडही यायला लागली. मग सगळा उत्साहच!

वाजत गाजत गणराय मखरात बसतात. ‘गौर’ कशाच्या पावलांनी आली–समृध्दीच्या, . धनंधान्यांच्या..

विद्येच्या.. आरोग्याच्या.. पावलांनी आली, म्हणत घरभर, हळदी-कुंकवाच्या पावलांवरुन या गौराई फिरवून आणायच्या. छानशा आराशीत, मखरात बसवायच्या. नवीनसाड्या-दागिन्यांनी सजवायच्या. बाजूला अखंड तेवत राहील अशी समई ठेवायची. पुढे ओटीचे खणं, फळं, हळदी-कुंकवाचे करंडे,

कुंची घातलेलं त्यांच बाळ अन् धान्याच्या राशी, फराळाची तबकं, सुरेखशी रांगोळी, याने सगळं मंगलमय होत जात. मग, नुसती धांदल, गडबड…, श्रीगणेश अन् गौराईची पूजा, नैवेद्य, आरती, ..सवाष्ण, ब्राह्मण.. याचा आनंद आगळाच!शब्दात न सांगता येणारा..

रात्री सगळं आवरल्यावर निवांतपणे गौराईपुढे ‘ लक्ष्मी स्तोत्र, गणरायाच्या पुढे अथर्वशीर्ष म्हणतांना डोळे पाझरु लागतात. गणरायात कधी मला लाड करवून घेणा-या, व. प्रसन्न हंसणा-या मुलाचा भास होतो, तर कधी.. घरादारावर मायेची सावली धरणारं प्रेमळ, वडिलधारी कुणी वाटत. गौराईंपुढे बसून एकटक त्याच्या डोळ्यांकडे पाहतांना वाटत.. अरे, ही तर आपली आईच दोन रुपातली!तिचीच प्रेमळ, धीर देणारी..

कधी वाटत या तर माझ्या लेकीच.. ज्येष्ठा-कनिष्ठा.. आमच्या लेकीसारख्या मनाची जागा व्यापणा-या, आईशी संवादून, सुख-दु:खाचे क्षणं वाटून घेणा-या, कां प्रिय सख्या?माहेर-सासरच्या आठवणी जागवणा-या.. श्रीमहालक्ष्मीचीच ही दोन रुप.. गौराई.. ! म्हणजे ‘स्त्री’रुपचं.

मग तीआई-जगज्जननी असो कि, सखी, लाडाची लेक असो, तीन दिवस कोडकौतुक करवून घेणारी माहेरवाशीण. !

नकळत डोळे टिपले जातात. मनं आनंदाने बहरतेच. मनांतले ‘सल’अलगद रिते होतात तिच्यापुढे.

मग कोण काय म्हणतंय याची चिंता कशाला?त्या सगळं पाहताहेत.. त्याच्या डोळ्यांच्या कोप-यात पाण्याचं तळं साठत. ओठांच्या पाकळीत हसूं उमलून सांडत आहे. हे सारे क्षणं फक्तं नी फक्त माझे अन् त्यांचेच! तीन दिवसांनी त्या, श्रीगणेशा’बरोबर आपला निरोप घेणार हेही माहित असत. ‘ पुनरागमनायच ‘ म्हणून त्यांच्यावर अक्षतां टाकतांना नेहमीच गळा भरुन येतो. सगळं छान पार पडल्याच समाधानही असत.

एक एक आराशीच्या वस्तू, फराळाची तबकं, जाग्यावर जातात. त्याच्या साड्या, दागिने पेटीत जातात. हळदी कुंकवाची धामधूम थंडावते. एक सुनंपण येत. वाटत..

त्या वळून पाहताहेत, आमच्या लेकी सारख्याच. !अन् नकळतं मनांत शब्द उमलतात…

नका खंतावू मनांत, 

एकमेकां आम्ही इथं..

तुमच्या पाऊलंखुणा,

घरंभर जिथं-तिथं..

घरंभर जिथं-तीथं..

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर ☆

सुश्री ज्योत्स्ना डासाळकर

?  विविधा ?

गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर 

श्रावण अमावास्या झाली की कोल्हापूरच्या गल्ल्यातून आवाज घुमू लागतो भावल्या घ्या गनुबं…. हा आवाज ऐकला की घरच्या आयाबाया लगबगीने बाहेर येतात आणि आवाज देणाऱ्या कुंभार मावशीला थांबवून त्यांच्या डोक्यावरची जड बुट्टी उतरून खाली घेतात. वर झाकलेला मेणकापड, त्याखालचं सुती कापड बाजूला सरकवली की डोळे दिपून जातील अशा बाहुल्या म्हणजे हरतालिकांचे रंगीत जोड दिसतात. त्याच्याबरोबरच असते ती निव्वळ काळ्या मातीची  अनाकर्षक अशी पाच ते सहा इंचाची एक आकृती. लांबून बघितलं तर एखादा पंचकोन वाटावा अशी, पण उचलून घेतल्यावर लक्षात येते की, तळपायाला तळपाय जुळवून घातलेली इवलीशी  मांडी जमिनीला समांतर पसरलेले इवले हात, त्यातला उजवा हात रिकामा, डाव्या हातात मसुराएवढी गोळी ( तो म्हणजे लाडू म्हणे) आणि त्या मूर्तीचा चेहरा बघितला की एवढा वेळ अनोळखी वाटणाऱ्या आपल्या नजरेत अचानक ओळख दिसते. नुसती ओळख नाही तर वात्सल्याची भावना दाटून येते– कारण तो चेहरा असतो गजमुख, त्याचे छोटेसे सुपासारखे कान, डोक्यावर किरीट — ओळख पटते — गणोबा!

होय गणोबाच ! हा गणपती विघ्नहर्ता- मंगलमूर्ती- वरद विनायक- वगैरे सगळ्या विशेषणांच्या पलीकडचा. कारण हा गणोबा असतो तो गौरीचा बाळ. गणू हे त्याचं नाव, पण माहेरी येणाऱ्या लेकधनिणीचा पोरगा, त्याला नुसतं नावाने कसं बनवायचं म्हणून आदरार्थी लावलेला ज्योतिबा खंडोबा यांच्याप्रमाणे बा नावाचा प्रत्यय म्हणून तो ‘ गणोबा. ’ 

वास्तविक भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत. या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा, कारण पूर्णब्रम्ह ओमकार आपल्या उदरी पुत्ररूपाने यावा यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी रोज मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरीजात्मज अवतार झाला. याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला. आपले सगळे सणवार हे निसर्गाशी, पर्यावरणाशी मिळतेजुळते असे आहेत. नुसते मिळतेजुळते नव्हे तर एकरूप आहेत. जे सृष्टीत घडतं आहे त्याची संपूर्ण जाणीव आणि सृष्टीच्या बदलाबद्दलची कृतज्ञता यांचा समन्वय म्हणजे आपले सण.

गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात. हा गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून (अर्थात हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे, तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या उटीचा थर)– तर त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला. गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते. श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस. हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्मकथा उलगडते. पृथ्वी म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती. या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो. हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो. म्हणूनच की काय, कुंभार बांधव याच गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात.

खरंतर व्रत-विधीप्रमाणे यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे. पण मूर्ती शास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे, कारण त्याची सोंड- हात- पाय- लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही. बरेचदा सोंड गळून पडते आणि गणपतीचा मारुती होतो. म्हणूनच ‘ करायला गेलो गणपती झाला मारुती ‘ अशी म्हण प्रचलित झाली असावी. म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला.

 माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण. या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडत गेला. हाताच्या ओंजळीत मावणाऱ्या काळ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चितारलेला, मंदिरात मूर्तिकारांनी घडवलेला गणपती भक्ताच्या मनाला भुरळ पडू लागला आणि मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली. मग वेगवेगळे रंग आले आणि या रंगात देवाची वस्त्रं, अलंकार, शरीर रंगवलं जायला लागले. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आलं तसं मूर्तींचे आकार वाढत गेले. पुढे जशी नैसर्गिक माती कमी पडू लागली, किंवा मूर्तीच्या भंग पावण्याच्या भीतीमुळे टिकाऊ मूर्तीची मागणी वाढू लागली, तशा साच्यातून घडणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण व्हायला लागल्या. मूर्तिकारांचे, भक्तांचे काम सोपे झाले.

 पण नकळत मूळ व्रताचा उद्देश बाजूला पडत चालला. पण त्याची स्मृती म्हणून आजही कितीही मोठी मूर्ती आवडली तरी या मूर्तीच्या उजव्या हाताला या काळ्या गणोबाचं स्थान असतंच. त्याचं स्थान उजव्या हाताला असतं, हे तो या व्रताचा मूळ अधिकारी असल्याचं खरे लक्षण आहे. वास्तविक गणोबा गणपती दोन नाहीत. गणोबा ही व्रताची शास्त्रोक्त मूर्ती, तर मोठी मूर्ती आपल्या हौसेची. आजही गौरीपूजनादिवशी याच गणोबाला गौरीच्या पदरात ठेवला जातो. संचारी गौर अपत्यप्राप्तीचा अभिलाष असणाऱ्या स्त्रीच्या ओट्यात याच गणोबाला देते. तिच्या दृष्टीने जिला गणोबा खेळवता आला तिला आई होण्याचा सन्मान मिळाला, कारण गौरीचं हे अवखळ बाळ सांभाळणं किती अवघड आहे हे फक्त गौरीलाच माहिती आहे. — असा हा काळा सावळा पण  जिव्हाळ्याचा लाडका गणोबा !

“ श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः “

माझं माहेर खानदेशातलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादे !! लग्न करून कोल्हापूरला आल्यावर गणेशचतुर्थीच्या २-३ दिवस आधीच * गणूबा घ्या ओ गनुबा… भावल्या घ्या हो भावल्या * अशी तार स्वरात हाक कानी पडली.. मला आश्चर्य वाटलं- ‘ अगंबाई गणपती असे दारावर विकायला येतात?’ सहज कुतुहल म्हणून  त्या बाईला बोलावलं आणि  पहिल्यांदाच या गनुबाचं– नव्हे गणोबाच दर्शन घेऊन झालं. कारण मला वाटतं महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर- सांगली भागातच *गणोबा” ची मूर्ती पूजण्याची पद्धत असावी. खूप मोठमोठ्या मूर्तींबरोबर तर गणोबा फुकट मिळतो म्हणे !! आणि तो गणोबा पण मोठ्या गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान होतो.. उत्सवमूर्ती होऊन !

आणि मग हा गणोबा गौराई पुत्र.. गौरीजागरणाच्या गाण्यातून अधिक बाळरूपात भेटला- गन्या गन्या गनेशा !! गणानं घुंगरू हरवलं…. किंवा गण्या हटून का बसला? — अशासारखी ती गाणी — खास “ गणोबा “  साठी म्हटली जाणारी.

© सुश्री ज्योत्स्ना डासाळकर

एडवोकेट

मो. नं. ९५१८७७८८२४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल हरतालिकेचा सण होता. हे दिवसच मुळी उत्साहाने सणवार साजरे करण्याचे. हरतालिका असूनही बँकेला सुट्टी नसल्याने घरचं आवरुन,पुजा ,नमस्कार,नैवेद्य आटोपून बँकेला निघाले. परंतु मस्त सणाचा दिवस असूनही समोरचे दृश्य बघून मनं खट्टू झालं, वाईट वाटलं,खरचं शिक्षणाने,प्रगतीने माणसात सुधारणा होण्याऐवजी तो अधिकाधिक बिघडतच चालला आहे हे समोरचे दृश्य बघून लगेच लक्षात आलं.

आमच्या काँलनीमध्ये बरीच झाडं आहे. त्यामध्ये फुलझाडांचा सुद्धा समावेश आहे. मग हरतालिकेच्या पूजेचे निमित्त करून काही स्त्रिया आणि मुली अक्षरशः पत्री आणि फुलं ह्यासाठी अख्खी झाडच्या झाडं ओरबाडीत होत्या. बर चार शब्द समजावण्याचा प्रयत्न केलाही असता जर त्या स्त्रिया काँलनीतील वा पाहणीतील असत्या तर. खरचं जिवंत झाडांना रक्तबंबाळ करून स्वतःवर फुलं,पत्री वाहून घेणं देवाला तरी आवडेल का हो ?

मी तरी स्वतः नियम घालून घेतला आहे फक्त एक बिल्वपत्र  आणि एक फूल सगळ्या पूजांच्या वेळी वहायचं.मला खात्री आहे माझा महादेव हा एकशे आठ बिल्वपत्रांपेक्षाही माझ्या एका बिल्वपत्रातच संतोष पावेल.

काळ बदलला की सुधारणा ह्या होतात. पण सुधारणा ह्या फक्त हक्क मागणं,बरोबरी करणं, अरेतुरे संबोधणं, न बघणेबल वस्त्र परिधान करणं, व्यसनांमध्ये पुरुषांच्या वरचढ होऊ बघणं, स्वातंत्र्याचा गैरवापराने वरचढ स्थान मिळवणं ह्या नसून आपल्या मानसिकते मध्ये चांगला,सकारात्मक बदल करणं,काळ बदलला की थोडाबहुत चांगला बदल करणं, स्वतःची सामाजिक उन्नती, उत्कर्ष ह्याकडे लक्ष देणं ह्याला सुधारणा म्हणावं हे समजायला हवं.  पण कुठल्याही व्यक्तीने बदलेल्या काळाचा, झालेल्या बदलांचा, सोयीस्कर सुधारणा हे लेबल वापरण्याचा जर आपल्या सोयीचा अर्थ लावून आपल्या सवयी सुरू ठेवल्या तर समाजाचा -हास,अनर्थ हा अटळ.

काही मुली म्हणतात हे पूजेला पत्री,फुलं तोडणं जुन्या पिढीकडूनच आम्ही शिकल़ो तर ह्यावर उत्तर असं, जुना काळच वेगळा, झाडांच्या रुपात तेव्हा विपुल नैसर्गिक संपत्ती होती, शिक्षणाचा अभाव होता, वेळेची मुबलकता होती आणि मुख्य म्हणजे ह्या निमित्ताने त्या स्त्रियांना चार भिंतीबाहेर पडायला मिळायचे.

उपवासांचे ही तसेच. पुर्वी मनावर धार्मिक रुढींचा खूप पगडा होता. अंधश्रद्धेच जाळं खूप फोफावलं असायचं, स्त्रिया स्वतःच्या प्रकृती विषयी काळजी न घेता त्याबद्दल अनास्था बाळगतं. साधकबाधक आहार, प्रकृती ह्या विषयी अज्ञान होतं .पण आता काळ बदललायं. स्त्रियांना शिक्षणामुळे आहार, प्रकृती ह्याविषयी माहिती उपलब्ध होते.त्यामुळे आपल्या वयानुसार  प्रकृती ला, झेपतील त्या पद्धतीने उपवास करावेत.

ह्या सणांच्या निमित्ताने जपल्या जाणाऱ्या परंपरा व आधुनिक धार्मिकता ह्यामध्ये सांधून पण कुठलेही टोक न गाठता सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो ह्याचं भान आलं खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सकारात्मकता ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

अल्प परिचय:

संप्रति :असिस्टंट ब्रांच मँनेजर, अभिनंदन सहकारी बँक अमरावती
आवड : वाचन आणि थोडबहुत लिखाण.

? विविधा ?

☆ सकारात्मकता ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सकारात्मक असणं ही आपल्या जीवनात हवी असलेली अत्यावश्यक बाब. आपण स्वतः सुखी,समाधानी राहण्यासाठी आपणच त्या दृष्टीने पावलं उचलणं हे ही महत्वाचचं. ह्याची सुरवात जर आपल्याकडून योग्य रितीने झाली तर मग आपोआप आपल्याला मार्गदर्शन, मदत ही मिळतेच.

परंतु हे आपलं सध्याचं जीवनमान हे अतिशय धावपळीचं, दगदगीचं झालयं. पूर्वी कामांचा ताण हा घरगुती स्वरूपातील होता. स्त्रियांना बाहेरच्या क्षेत्रातील ताणतणावाचा फारसा सामना करावाच लागत नव्हता. आता काळात, परिस्थितीत खूप बदल झाल्याने स्त्रियांना खुल्या क्षेत्रात त्या करीत असलेल्या नोकरी वा व्यवसायात निरनिराळ्या अडचणींचा सामना करून त्यातून यशस्वीपणे मार्ग देखील काढावा लागतो.

जसाजसा काळ पुढेपुढे जातो तसतसे आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामं करण्याच्या पद्धतीत फरक पडत जातो. ह्या बदलत्या पद्धतीचे काम हे नवीन पिढी त्यामानाने जास्त लवकर आत्मसात करते. कामामुळे एक प्रकारच समाधान नक्की मिळतं. तसचं अडल्या नाडल्यांना, गरजूंना, सहका-यांना मदत केल्याने एक आगळवेगळं आत्मिक समाधान लाभतं.

सुख, शांती, समाधान ही लहानशी पण खूप महत्वाची गोष्ट मिळविण्याचा साधा, सोप्पा सरळ उपाय म्हणजे आपल्याकडून दुस-याला उत्स्फूर्तपणे केल्या गेलेली मदत.

सहकार क्षेत्रात, ह्या बँकींग क्षेत्रात ह्या गोष्टीचे महत्त्व तर जरा जास्तच कळले, लक्षात आले. मदत ही करायचीच आहे, उपयोगी हे पडायचं आहे तर आपण आईस्क्रीम सारखं न जगता मेणबत्तीसारखं जगावं. वितळून जातांना पण फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्या ला प्रकाश देऊनच जावं.

ही मदत करतांना दोन महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करावे हे माझं स्वतः चं वैयक्तिक मतं. पहिली गोष्ट म्हणजे  मदत करतांना ही एका हाताची दुसऱ्या हाताला पण कळायला नको. व दुसरी गोष्ट म्हणजे मदत ही करतांना ती खरोखरच गरजूंना मिळायला हवी.म्हणजेच काय तर कुठलीही मदत करतांना निस्वार्थ भावनेने गाजावाजा न करता केल्या गेली तर अश्याप्रकारे केल्या गेलेली मदत ही आपल्याला चिरंतर सुख,समाधान, संतोष देऊन मनाची अवस्था एका उंचीवर जाऊन बसेल हे नक्की.

काल अशीच एक मस्त शार्टफिल्म बघण्यात आली.”शाम होने को है” हे त्या फिल्मचे नाव. दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांना केलेल्या मदतीकडे आपण फक्त आणि वैषयीक आणि दुषीत नजरेनेच बघतो ही खरीच सत्यातील शोकांतिका आहे. परंतु ही आपल्या दुषीत नजर बदलण्याचे, मनातील कलुषित विचार झटकण्याचे काम ही फिल्म करते. ह्या फिल्मची स्टोरी सांगून मी त्यातील मजा, उत्सुकता अजिबातच घालवणार नाही. फक्त इतकच सांगते कुठलिही घटना वाईट नसते, त्या घटनेकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन व आपला स्वतःचा अप्रोच मात्र आपण बदलविला पाहिजे. ह्या फिल्ममधील मुलीची सकारात्मकता आणि तिचे विचार खरचं अनुकरणीय. साध्या गोष्टीतही खूपदा सहजसुंदर आनंद, सुख, समाधान दडलेलं असतं फक्त त्यासाठी हवी पारखी नजर आणि हे सगळं हुडकून काढण्याचा जिज्ञासा. शिवाय भिन्नलिंगी व्यक्तींमध्येही नुसती आणि नुसती वैषयीक भावना नसून त्यामध्ये जिव्हाळा व मदतीची पण भावना असूच शकते हा डोळ्यात अंजन घालणारा दृष्टिकोन.

तेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरुर बघण्या सारखी शार्टफिल्म “शाम होने को है “त्याची लिंक खालील प्रमाणे.

शार्टफिल्म यूट्यूब लिंक  Please click here >>👉   “शाम होने को है”

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

22/08/2022

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टी आणि दिशा…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दृष्टी आणि दिशा ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दृष्टी ! समोर दिसणारी दृष्ये नजरेद्वारे आपल्या डोळ्यांनी अवलोकन करण्याची निसर्गदत्त क्षमता म्हणजे दृष्टी ही दृष्टी या शब्दाची सरळ,सोपी व्याख्या.पण ती दृष्टी या शब्दाच्या  असंख्य कंगोऱ्यांना दृश्यमान करण्यास तशी अपुरीच पडणारी. कारण त्या विविध कंगोऱ्यांचा वेध अशा मोजक्या शब्दांद्वारे घेता येणं शक्य नाहीच.

दृश्य, दृग्गोचर, दृष्टीभ्रम, दृष्टीमर्यादा, दृष्टीक्षेप,दर्शक, दृष्टांत,दर्शनी,दर्शनीय,-हस्वदृष्टी दीर्घदृष्टी,तीक्ष्णदृष्टी,जीवनदृष्टी, दूरदृष्टी,काकदृष्टी,पापदृष्टी असे ‘दृष्टी’ या शब्दांच्या अर्थसावल्यांनी आकाराला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द. या प्रत्येक शब्दांची व्याप्तीही तितकीच व्यापक.

हे सगळे शब्द दृष्टी या शब्दाच्या अर्थाशी थेट नातं सांगणारे आहेत. या खेरीज एरवी ऐकताना त्यांचा दृष्टी या शब्दाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीय असं वाटावं असे दृष्टी या शब्दाचे इतरही अनेक अर्थ व्यक्त करणारे शब्दही आहेतच.लक्ष,अवधान, चित्त,दिशा,रोख,कल, मनोवृत्ती, कुवत,विचारबुद्धी,पारख असे दृष्टी या शब्दाचेच विविध अर्थरंग ल्यालेले अर्थपूर्ण शब्द दृष्टी या शब्दाची व्याप्ती समजून घेण्यास प्रवृत्त करणारे आहेत.

सुरुवातीस सांगितलेल्या दृष्टी या शब्दाच्या सरळसोप्या व्याख्येनुसार दृष्टी ही समोरची दृश्ये अवलोकन करण्याची निसर्गदत्त देणगी आहे हे खरे पण ही दृष्टी स्वायत्त नाहीय.ती जे अवलोकन करते म्हणजेच पहाते ते पहाण्याचे फक्त एक माध्यम या भूमिकेतून.सुंदर दृश्यांच्या अवलोकनातून मिळणाऱ्या सुखाला ‘नेत्रसुख’ असं म्हंटलं जात असलं तरी ते खऱ्या अर्थाने दृष्टीला होणारे सुख नाहीच.तो  दृष्टीद्वारे मनाला होणारा सुखाचा स्पर्श असतो.त्याला दृष्टीसुख म्हणतात ते या अर्थाने.दृष्टीला होणारे नाही तर दृष्टीमुळे मनाला होणारे सुख ! मनात उमटणारी ही सुखद भावना नंतर नजरेच्या रूपात आपल्या डोळ्यांत तरळत असते एवढेच.याउलट एखादं दृश्य जर अतिशय दुःखद, भयानक किंवा थरारक असलं तर दुःख,भिती थरार या भावना अशाच आधी मनातच उमटत असतात आणि  नंतर त्याच भावना नजरेतून व्यक्त होतात. म्हणूनच काय,किती,आणि कसं बघायचं हे दूरदृष्टीने ठरवायची सवय आपल्या मनाला आपणच लावायची असते.ती सवय चांगली असेल तर आपल्यासाठी सुखकारक, हितावह आणि ती वाईट किंवा अतिरेकी असेल तर मात्र दु:ख देणारी म्हणून हानिकारकच ठरते.

किती पहायचं याचं अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर मोबाईल,टीव्ही पहाण्याचं घेता येईल.ते पहाणं कामासाठी किंवा ठराविक वेळेकरता असेल तर हितकारकही ठरु शकेल आणि ते पहाण्याची सवय अतिरेकी असेल तर हानिकारक!

काय पहायचं हे आपल्याच स्वाधीन असतं.दैनंदिन वावरातही समोर येणारी प्रत्येक गोष्ट आपण पाहू शकतोच पण पहातोच असे नाही. घराबाहेर पडताना कुठे जायचं याचे नेमके भान आपल्या मनात पक्के असते आणि त्याचेच विचार मनात घोळत असल्याने नजरेसमोरून जाणारी सगळीच माणसे,दुतर्फाची दुकाने, आजूबाजूच्या हालचाली आपल्याला दिसू शकत असल्या तरी आपण त्या पहात नसतोच. आपलं लक्ष्य असतं आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणं हेच आणि त्यामुळे आपलं लक्ष असतं ते रस्त्यातले खाचखळगे, मागून पुढून येणारी वाहने, अशा आपल्यालाअडसर निर्माण करू शकणाऱ्या गोष्टींकडेच फक्त. त्यामुळे काय पहायचं हे आपणच आपल्याही नकळत ठरवलेले असते. आपलं लक्ष विचलित झालं तर मात्र अचानक अपघातही होऊ शकतो. अपघात झालाच तर त्याला तो ज्याच्यामुळे  झाला तोच नाही फक्त तर आपणही जबाबदार ठरतोच. दैनंदिन अनुभवातले हे ‘लक्ष्य’ आणि ‘लक्ष’ आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. नेमके ‘लक्ष्य’ ठरवून लक्षपूर्वक केलेली वाटचाल उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यकच असते.

चित्रपट,नाटक,टीव्ही ही माध्यमे दृष्टीद्वारे केलेल्या अवलोकनातून फक्त करमणूकच करीत नसतात तर विचारांना दिशाही देत असतात.त्यातील अभिरुचीपूर्ण कलाकृती आनंद न् समाधानाबरोबरच विचारांना योग्य दिशाही देतात.विचारांना मिळणारी ही दिशाच आपला दृष्टीकोन व्यापक बनवत असते.

त्या कलाकृती उथळ,बेगडी,सवंग करमणूक करणाऱ्या असतील तर त्यातून मिळणारं समाधान क्षणभंगूर तर असतंच आणि मनातल्या विचारांना वहावत नेणारंही.त्यामुळे निर्माण होणारा संकुचित दृष्टीकोन आयुष्यात आपल्याला भरकटत न्यायला निमित्त मात्र ठरतो.

आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक की नकारात्मक हे आपल्या विचारांची दिशाच ठरवत असते.म्हणूनच दृष्टी आणि दिशा यांचं आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखता येणं हे महत्त्वाचं !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते. तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो, ‘ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात, ‘ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’ त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते.

नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते.लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते. ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो. पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

🙏 गणपती बाप्पा मोरया! 💐

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पावसाचं ये जा चालूच आहे. आषाढात कोसळणारया पाऊस म्हणजे भरू लागलेली धरणे आणि मनात महापुराची भीति. पण हळुहळू हा जोर कमी होऊ लागतो. पुन्हा पाऊस आणि बघता बघता पाऊस गायब. हा लपंडाव म्हणजे श्रावण. म्हणजेच ऑगस्ट. श्रावण असो किंवा ऑगस्ट, दोन्ही  दृष्टींनी हा महिना महत्वाचा. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्वाच्या दोन घटना या महिन्यात घडल्या. एक म्हणजे नऊ ऑगस्ट!  1942 च्या या दिवशी स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळे वळण मिळाले. ‘चले जाव’ च्या घोषणेने अवघा देश दुमदुमून निघाला. दुसरा महत्वाचा  दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट. 1947 च्या या दिवशीच आपला देश स्वतंत्र झाला हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे हा ऑगस्ट महिना आपल्या सर्वांना खूप खूप महत्त्वाचा. या दोन महत्वाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्यही काही दिवस महत्वाचे आहेत. एक ऑगस्ट हा मुस्लिम स्त्रिया हक्क दिन आहे. 1905 मध्ये बंगालाच्या फाळणीच्या विरोधात जी स्वदेशी चळवळ कलकत्त्यात सुरू झाली त्याची आठवण म्हणून सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीचा दिवस वीस ऑगस्ट राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. तर हाॅकीतील किमयागार मेजर ध्यानचंद यांच्या गौरवार्थ एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.

या ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तरावरील अनेक दिवसांचेही महत्व आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे आहे. आदिवासींचे अस्तित्व व त्यांची संस्कृती याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन आहे. छायाचित्र कला व कलाकार यांच्या सन्मानार्थ एकोणीस ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी व एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.

सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्याच्या जखमांची आठवण करून देणारे दिवस म्हणजे अनुक्रमे हिरोशिमा दिन आणि नागासकी दिन. !

प्राण्यांचे रक्षण आणि वर्धन यांचे महत्त्व लक्षात आणून देणारे दिवस म्हणजे जागतिक सिंह दिन, हत्ती दिन आणि कुत्रा दीन. हे अनुक्रमे दहा, बारा आणि सव्वीस ऑगस्टला साजरे होतात.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, दत्तभक्त टेंबेस्वामी, हुतात्मा राजगुरु, गोस्वामी तुलसीदास, महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी या महान व्यक्तींच्या जन्माचा हा महिना. तर याच महिन्यात लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनप्रवासाची अखेर झाली. भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिनही याच महिन्यातील.

या ऑगस्ट इतकाच  महत्त्वाचा श्रावण महिना! एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण तर दुसरीकडे सण, व्रतवैकल्यांची गडबड. रंग गंधाचे लावण्य अंगावर मिरवणारा मास. राखीपौर्णीमा साजरी करून भावाबहिणींचे नाते दृढ करणारा मास. नारळ वाहून समुद्राला शांत होण्याची विनंती करणा-या दर्यावर्दींचा मास. नागपंचमी, बैलपोळा यासारख्या कृषी संस्कृतीशी निगडीत असणा-या सणांचा महिना. मोहरमचे ताबूत नाचवणा-या मुस्लिमधर्मीयांचा मास.  पारशी नूतन वर्ष, फरवर्दिन, याच महिन्यात सुरू होते.

आषाढात कोसळून कोसळून दमलेल्या पावसाला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटत असावे. म्हणून तर श्रावणातल्या हलक्याफुलक्या  सरी थांबून थांबून पडत असाव्यात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने, श्रावणात निळा घन बरसून जाता जाता घनश्यामाची आठवण करून देत असतो. निसर्गातील आणि संस्कृतीतील वैभवाचे दर्शन घडवणारे साहित्य, काव्य, गीते यामुळे तर मनाची प्रसन्नता आणखीनच वाढत जाते. या प्रसन्न मनाने आपण सगळेच उत्सुक असतो मोरयाचे स्वागत करण्यासाठी!सुखकर्ता दुःखहर्ता अशा त्या गणरायाचे वेध लागलेले असताना, हवा हवासा वाटणारा श्रावण केव्हा निघून जातो, समजतही नाही. कालचक्राचे एक पाऊल मात्र पुढे पडतच असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares