तिचा स्वभाव मुळातच थोडा अस्थिर. बहिणी ,भाऊ आणि आई यांच्या नजरेत आणि प्रेमात मोठं झालं हे शेवटचं अपत्य.
लग्न करुन दिलेला परिवार ही मोठाच. कोल्हापूर जवळचं खेडेगाव. ही घरची सर्वात मोठी सून. मिस्टरांचे नोकरी निमित्ताने मुंबईत वास्तव्य. त्यांचा स्वभाव ” संत माणूस “. आपलं काम, अणि योगी, ऋषी, संत, अध्यात्म यात सदैव मग्न.
लग्नानंतर ती पण मुंबईत गेली. आर्थिक परिस्थिती त्यावेळी 40 -43 वर्षापूर्वी सर्वांचीच जेमतेम. तिने मशीन वर शिलाई करुन, साड्या फॉल पिको करुन आर्थिक बाजू आपल्या परीने उचलून धरली. मुंबई सारख्या
मायापूरीत छोटेसे घर घेणे शक्य करुन दाखवले.पुढे तर एकावर एक 1 +2 इमले उभे केले.दोन मुले मोठी झाली.उच्च शिक्षित झाली.यथावकाश लग्ने झाली. दोघानाही 2-2 मुले झाली. तिचे मिस्टर 60 व्या वर्षी निवृत्त झाले. मुले, सुना, नोकरी करणा-या . नातवंडे आज्जीजवळ. आज्जी निगुतिनं सगळं करत होती. दोन्ही मुलांनी आपले संसार थाटले. हिचं स्वयंपाकघर मोठ्या सुनेनं ताब्यात घेतलं. धाकट्यानं जवळच घर घेतलं. आज्जिची विभागणी झाली. तिनं ही साठी ओलांडलीच की. शरीर आणि मन यांची सांगड घालताना तिची
घालमेल होऊ लागली आणि इथेच तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. आता तिचा कामा पुरताच उपयोग राहिला. काम होत नाही तर सहवास ही नकोसा झाला होता.
त्यातच गावाकडे तिचे सासरे निवर्तले. खेडेगाव च्या पद्धतीप्रमाणे सासुबाईचे लेणे काढण्यात आले.हिला त्यांचे भुंडे हात बघवले नाहीत. पठ्ठीन आपल्या हातातल्या पाटल्या ( ज्या तिच्या आईन तिला लग्नात घातल्या होत्या) सासूच्या हातात चढवल्या.
🤦🏻♀️ हे कळताच नवरा, मुले, सुना तिच्यावर इतक्या नाराज झाल्या की तिच्याशी बोलणेच बंद केले. मोबाइल चालू ठेवायला ही पैसे देत नाहीत.
आता ना तिच्या हातात पैसा, ना कुणाचा शब्द!
आयुष्यभर तिने पार पाडलेल्या जबाबदा-या, खस्ता, कष्ट, पतीला दिलेली साथ, प्रेमाने एकत्र बांधून ठेवलेला परिवार, सुनाना वेळोवेळी केलेली मदत, नातवंडांचं प्रेम हे सगळं इतक्या सहजतेनं संपतं?
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
वराहनगर मठात श्री रामकृष्ण संघाचं काम सर्व शिष्य नरेंद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. उत्तर भारतातले आखाड्यातले साधू बैरागी, वैष्णव पंथातले साधू समाजाला परिचित होते. पण शंकराचार्यांच्या परंपरेतल्या संन्याशांची फार माहिती नव्हती. त्यामुळे वराहनगर मठातल्या तरुण संन्याशांबद्दल समाजाची उपेक्षित वृत्ती होती. चांगले शिकले सवरलेले असून सुद्धा काही उद्योगधंदा न करता, संन्यास घेऊन हे तरुण लौकिक उन्नतीचा मार्ग दूर ठेवत आहेत, हे पाहून लोक खेद करत, उपेक्षा करत, कधी अपमान करत. तिरस्कार करत. कधी कधी कणव येई, तर कधी टिंगल होई.
पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही करायचे म्हणजे असेच सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते. समाजाने स्वीकारे पर्यन्त, बदल होण्याची वाट बघत हळूहळू पुढे जावे लागते. तसे सर्व शिष्यांमधे हा वाट पाहण्याचा संयम होता. दूरदर्शीपणा होता. कारण तसे ध्येय ठरवूनच त्यांनी घरादारचा त्याग केला होता आणि संन्यस्त वृत्ती स्वीकारली होती. हे तरुण यात्रिक अध्यात्म मार्गावरचे एकेक पाऊल पुढे टाकत चालले होते. भारताच्या आध्यात्मिक जीवनात संन्यस्त जीवनाचा सामूहिक प्रयोग नवा होता.
“आपल्याला सार्या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा,आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं.
शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास, संस्कृत ग्रंथ व धर्म आणि अध्यात्म संबंधित ग्रंथांचे वाचन होत असे. हिंदूधर्म याबरोबर ख्रिस्तधर्म आणि बुद्धधर्म यांचाही अभ्यास केला जात होता. या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व्हायचा. इथे धर्मभेदाला पहिल्यापासूनच थारा नव्हता असे दिसते. शंकराचार्य आणि कांट यांच्या तत्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास पण इथे होत होता. हे सर्व अनुभवास आल्यानंतर जाणकारांची उपेक्षा जरा कमी झाली आणि जिज्ञासा वाढली.
कधी ख्रिस्त धर्माचे प्रचारक मिशनरी येत त्यांच्या बरोबर चर्चेत हिंदू धर्माच्या तुलनेत ख्रिस्त धर्म कसा उणा आहे ते चातुर्याने आणि प्रभावी युक्तिवादाने नरेंद्र पटवून देत असत. ख्रिस्ताचे खरे मोठेपण कशात आहे तेही समजाऊन सांगत. हे विवेचन ऐकून धर्मोपदेशक सुद्धा थक्क होऊन जात.
हिंदू धर्मातील इतर पंथांचाही इथे अभ्यास चाले. तत्वज्ञानाच्या आधुनिक विचारवंतांनाही इथे स्थान होते. जडवादी आणि निरीश्वरवादी विचारसरणीचा परिचय करून घेतला जात होता. फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्व सुद्धा नरेंद्रनाथ समजाऊन सांगत असत. साधनेच्या जोडीला अभ्यास हे वराहनगरच्या मठाचं वैशिष्ठ्य होतं. श्री रामकृष्ण यांच्या गृहस्थाश्रमी शिष्यांना एकत्र यायला हा मठ एक स्थान झालं होत. हळूहळू लोकांच्या मनातील दुरावा कमी झाला होता.
तीर्थयात्रा ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि धार्मिक जीवनाचा एक भाग पण. शिवाय श्रीरामकृष्ण यांनीही एकदा संगितले होते, की, “संन्याशाने एका जागी स्थिर राहू नये. वाहते पाणी जसे स्वच्छ राहते, तसे फिरत राहणारा संन्यासी आध्यात्मिक दृष्ट्या स्थिर आणि निर्मळ राहतो”.
या मठातील गुरुबंधूंना तीर्थयात्रेची उर्मी येत असे. त्याप्रमाणे नरेंद्रनाथांना पण एका क्षणी वाटले की, आपणच नाही तर सर्व गुरुबंधूंनी पण परिभ्रमण करावे. अनुभव घ्यावेत, त्यातून शिकावे. त्यामुळे प्रत्येकाच्या आंतरिक शक्तींचा विकास होईल. वराहनगर मठ हा एक मध्यवर्ती केंद्र म्हणून असेल, कोणी कुठे ही गेलं तरी सर्वांनी या केंद्राशी संपर्कात राहावं. शशी यांनी हा मठ सांभाळण्याची जबाबदारी घेतली. दोन वर्षानी १८८८ मध्ये नरेंद्रने वराहनगर मठ अर्थात कलकत्ता सोडले आणि त्यांच्या परिव्राजक पर्वाचा प्रारंभ झाला.
सुरूवातीला ते वाराणशीला आले. प्रवासात ते आपली ओळख फक्त एक संन्यासी म्हणून देत. अंगावर भगवी वस्त्रे, हातात दंड व कमंडलू, खांद्यावरील झोळीत एकदोन वस्त्रे, एखादे पांघरुण एव्हढेच सामान घेऊन भ्रमण करत. शिवाय बरोबर ‘भगवद्गीता’ आणि ‘द इमिटेशन ऑफ ख्राईस्ट’ ही दोन पुस्तके असायची. रोख पैशांना स्पर्श करायचा नाही, कोणाकडे काही मागायचे नाही हे त्यांचे व्रत होते.
सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.
☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
काल्या म्हणजे आमच्या घरादाराचं रक्षण करणारा आमचा लाडका ईमानी कुत्रा..अगदी काळ्या कुट्ट रंगाचा…
म्हणून त्याला आम्ही सगळे काल्याच म्हणतो…काही वर्षापूर्वी गावात उंट घेऊन आलेल्या भटक्या कुटूंबासोबत काल्या आला होता.उंटवाले गेले पण काल्या मागे राहिला.घरातल्या भाकरी तुकड्यावर मोठा झाला आणि घरातला रक्षक सदस्यच बनून राहीला..
तशीच आमची मनी माऊ पंडी…घरभर फिरून पायात लुडबूड करणारी आमची मनी तिला आम्ही सगळेच पंडी म्हणतो. काल्या आणि पंडी दोघांची जाम मैत्री…दोघेही आपल्या आपल्या तोऱ्यात अंगणभर वावरत असतात.
आम्ही गावी गेलो की काल्याला खूप आनंद होतो. काल्या अंगावर झेप घेत कडकडून भेटायला हमखास अंगणात असतोच.त्याचं काळं नूळनूळीत शरीर आणि तशीच वळवणारी शेपटी सारखी हलत असते…आणि पंडी तर म्याऊ म्याऊ करत पायात घुटमळत येत असते.. रात्री आणि दिवसभर कोणीही अनोळखी दिसला तर काल्या गुरगुरला म्हणून समजाच…. रस्त्यावर,अंगणात, झाडाखाली आणि शेडमध्ये ऐटीत बसून जागरूक राहणारा काल्या..तर अंगणात आणि झाडावर फिरून भक्ष पकडून घरभर मिरवत मट्ट करणारी पंडी…!
सगळ्यांची जेवणावळ बसली की पंडी ताटाभोवती लुडबुडत राहते आणि काल्या दारात शेपटी हलवत जिभळ्या चाटत केविलवाण्या चेहर्याने बसलेला असतो.संध्याकाळी अंगणात जागरूक असलेला काल्या आणि शांत झोपलेलं घर असतं.पंडी मात्र पायात घरघरत मस्त झोप घेत राहते…. अंगणातल्या शेळ्या,गाई आणि कोंबड्यांच्या रखवालीची जबाबदारी काल्या घेतो.आणि पंडी घरातली जबाबदारी पार पाडते..कधी कधी चोरून दुध गट्ट्म करताना आईच्या हातचा फटका बसतो तिला.मग दूर जाऊन पाय आणि तोंड जिभेने साफ करत बसलेली असते पंडी….. मोकळ्या वेळात आरामात लोळण घेत पडलेली निरागस वाटते पंडी..पण तशी ती नसते.. पंडी आणि काल्या कधी कधी मजेत खेळत असतात… त्यांच्यातल्या अनोख्या मैत्रीने अंगण खेळकर बनून राहते.पहाटे आम्ही बच्चे कंपनी खडीवर भटकायला निघालो की काल्या आमच्या पुढे असतोच..त्याच्या शिवाय भटकंतीला मजा येत नाही. लहानपणी ‘पदी ‘नावाची कुत्री पण अशीच आठवण ठेवून गेलेली.
अशा मुक्या प्राण्यांनी आणि पक्षांनी गावचे घर अंगण असं सजून नेहमी किलबिलत असतं…सगळेजण घरादाराशी दिवस रात्र गप्पा मारत राहतात.मुक्या प्राण्यांची अशी बोलकी प्रीत काळजात जपून ठेवावी अशीच असते….अशी ही आमची मैत्री गावाकडे गेलो की हमखास एकमेंकांच्या स्वागतासाठी सज्ज असते…!
यामधे अगदी थोडीच मुले शिक्षणाकरिता हातभार म्हणून मजूरी करतात.पण बऱ्याचवेळेला शिक्षणाची आवड नसणारे, शाळेत न जाता चैनी करण्यासाठी मजूरी करुन पैसे मिळवतात.फँक्टरी मालक,हाँटेलमालक सुध्दा अशा मुलांना कामावर ठेऊन घेतात. कारण या मुलांना मजूरी कमी दिली तरी चालते.म्हणून कमी पैशात अशा बालकांकडून काम करुन घेण्याचा त्यांचा मनोदय असतो.एकदा का मजूरी करुन का होईना पैसे मिळतात म्हटल्यावर ही मुले शिक्षणाला रामराम ठोकतात आणि अशा तुटपुंज्या मजूरीवर राबत रहातात.
फैक्ट्री एक्ट १९६९ मधे अशा बालमजूरांना कामावर ठेऊन घेतल्यास फँक्टरी मालकावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे.यामधे मालकाला दंड व कारावासाची शिक्षा सुनावली जाते.भारतात १९८६ ला बालकामगार विरोधी कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६ रोजी या कायद्यात दुरुस्ती करुन १४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी घातली.मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून शाळेत माध्यान्ह भोजनाची तरतूद करण्यात आली.तरीसुध्दा म्हणावा तितका बालमजुरीचा प्रश्न संपुष्टात आलेला नाही.मात्र काही राज्यातून यासाठीच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.याबाबतीत एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ओरीसा राज्यातील मयुरभंज या गावात बालमजूरी पुर्णपणे बंद आहे. इथे मुलांकडून काम करुन घेतले जात नाही.आंध्रप्रदेश मधे पण अशी पावले उचलली जात आहेत.
पं. नेहरुंना लहान मुले खूप आवडायची. आपणही या मुलांच बालपण जपण्यासाठी प्रयत्नशील राहुया.तरचं बालमजूरी आणि बालकामगार याविषयीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.आणि त्यांच्यासाठी म्हणूया.
‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा ‘
समाप्त
(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)
‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटल जात,कारण या वयात कशाची चिंता,काळजी नसते.खाणे,पिणे,खेळणे आणि शाळेत जाणेएवढच काम लहान मुलांच असत.मोठ्यांना असणाऱ्या काळज्या,समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.पैसे मिळवण,घर चालवण हा त्रास मुलांना नसतो.त्यामुळेच की काय ‘ रम्य ते बालपण’ अस म्हटल जात.पण काही मुलांच्या बाबतीत हे बालपण रम्य नसते.ज्या वयात या मुलांच्या हाती वह्या,पुस्तके असायला हवीत त्या वयात या मुलांना मजूरीवर जाव लागत.
घरातील पैशाची कमी, उपासमार, गरजेच्या वस्तू न मिळण शाळेच्या फी, पुस्तकासाठी पैसे नसणे अशा परिस्थिती मुळे मुलांना मजूरी करावी लागते. आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांना पालकांची मदत मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच शाळेला पूर्णविराम देऊन ही मुल, हाँटेलमधे टेबल पुसणे, भांडी घासणे, बांधकामावरच्या विटा उचलणे अशी काम करत रहातात.यालाच बालमजुरी किंवा बालकामगार असे म्हणतात, वयाची ९ वर्षे ते १६ वर्षे वयातील मुलांना बालकामगार म्हणतात.
काही वेळा पालकांना कामानिमित्त स्थलांतर करावे लागते.तसेच पालक शिक्षीत नसतील तर मुलंही शिक्षणापासून वंचित रहातात. त्यामुळे ही मुले मजूरीकडे वळतात.
बालमजूरी किंवा बालकामगार ही जागतिक समस्या आहे. पण अजूनही हा प्रश्न म्हणावा तितका सुटला नाही. भारतासारख्या संख्येने जास्त असलेल्या गरीब लोकांमधे ही समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याच गावात विशेषतः खेड्यामध्ये लहान मुलांना कामावर जावे लागते. उसतोड कामगारांची मुलं, बांधकामावर कामाला जाणाऱ्यांची मुलं बालमजूर म्हणून आई वडिलांबरोबर कामाला जातात. बरीच मुलं हाँटेल, कार्यालय, बार, वीटभट्टी, फँक्टरी अशा ठिकाणी मजूरी करताना दिसतात. फटाक्यांच्या फँक्टरीत तर असंख्य मुले काम करतात. अशा फँक्टरीमधे दुर्दैवाने काही अपघात झाला तर या मुलांना कायमचं अपंगत्व येण्याचीही शक्यता असते.
आईवडिलांचे कमी उत्पन्न,दारु पिणारे वडील, अनाथ मुले,घरातील कौटुंबिक वादविवाद, हिंसाचार अशा कारणांमुळे ही मुलं बालमजूर म्हणून काम करताना दिसतात.काही मुलं टि.व्ही.,सिनेमाच्या वेडापायी घरातून पळून जातात आणि त्यांना कुठेच आधार नाही मिळाला तर ते आपोआपचं मजूरीकडे वळतात.
क्रमशः…
(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)
☆ ‘थोडी सोडायलाच हवी अशी जागा..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘माया’ या शब्दाचे शब्दकोशातले अनेक अर्थ आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगू शकतील फक्त. पण ‘माया’ या शब्दाची व्याप्ती त्या अर्थापुरती मर्यादित नाहीय याची ओझरती कां होईना जाणीव करून देईल ते फक्त संत-साहित्यच !
अनेक संत-महात्म्यांनी त्यांच्या विविध साहित्य रचनांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सामान्य माणसालाही समजेल, पटेल, रुचेल अशा सोप्या शब्दात सांगितलेले आहे. श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान रामदासस्वामींनी त्यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथात अतिशय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांनी अतिशय सोप्या,सुलभ पद्धतीने, क्लिष्ट न वाटता बोध घेता येईल असे त्याचे सविस्तर विवरण केलेले आहे. दासबोध हा अत्यंत सखोल अभ्यासाचा विषय आहे हे खरेच पण ‘माया’ या संकल्पनेची व्याप्ती सोप्यापद्धतीने जाणून घेण्यासाठी तो एक सहजपणे उपलब्ध असणारा मार्ग आहे हेही तितकेच खरे. रामदासस्वामींनी दासबोधात ‘माया’ या शब्दाचा वापर विवेचनाच्या ओघात अनेकदा आणि तोही मूळमाया, महामाया, अविद्यामाया अशा अनेक वेगवेगळ्या रुपात केलेला आहे.आजच्या लेखनसूत्रासाठी यातील ‘वैष्णवीमाया’ या संकल्पनेचे प्रातिनिधिक उदाहरण घेऊया.’वैष्णवीमाया’ म्हणजे विष्णूची म्हणजेच परमात्म्याची माया! ही माया मोहात पाडणारी आहे. विधात्याने निर्माण केलेली सृष्टी म्हणजेच हे विश्वाचे अवडंबर!मायेने निर्माण केलेले एक दृश्यरुप! या विश्वात जे जे चंचल,जड,अशाश्वत ते ते सर्व या मायेचाच पसारा! या मायेने संपूर्ण ब्रह्म आच्छादलेले आहे. या मायेला अलगद बाजूला सारून ‘ब्रम्ह’ जाणून घेणे म्हणजे ज्ञान! अर्थात ते प्राप्त करून घेणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय गूढ,अशक्यप्राय वाटावे असेच आणि म्हणूनच संतसाहित्य त्यांना ते अधिक सोपे,सुकर करुन समजावून सांगते.अतिशय सोप्या शब्दात हे संतसाहित्य माणसाला जगावे कां, कसे आणि कशासाठी हे शिकवते.
गंमत म्हणजे माणसाचे हे जगणे सहजसुंदर करण्यासाठी वेगळ्या अर्थाने त्याच्या मदतीला येते ती मायाच.माया चंचल, अशाश्वत जशी तशीच वात्सल्य, प्रेम आणि मार्दवही! मायेला जेव्हा माणुसकीचा स्पर्श होतो तेव्हा ममता,जिव्हाळा,आपुलकी, आत्मीयता,ओलावा,प्रेम,स्नेह अशा विविध रंगछटा मायेला अर्थपूर्ण बनवतात.या लोभस रंगांनी रंगलेली माया माणसाचं अशाश्वत जगातलं जगणं सुसह्य तर करतेच आणि सुंदरही.ही माया माणसाच्या जगण्याला अहम् पासून अलिप्त करीत दुसऱ्यांसाठी जगायला प्रवृत्त करते. दुसऱ्याला स्नेह,प्रेम,आनंद देणाऱ्यालाही ती आनंदी करते. या मायेला विसरून माणूस जेव्हा ‘अहं’शी लिप्त होऊन जातो तेव्हा तो मायेच्या पैसा-अडका, धनदौलत या मायाजालात गुरफटून भरकटत जाऊ लागतो. जगण्यातला आनंदच हरवून बसतो. मायेच्या ‘मायाळू’ आणि ‘मायावी’ अशा दोन्ही परस्परविरोधी रुपांमधला फरक संतसाहित्यच आपापल्या पध्दतीने सामान्य माणसालाही समजेल असे सांगत असते. आणि मग त्याला सारासार विचार, आणि नित्यविवेक अंगी बाणवून स्वार्थाचा लोप करीत सावली देणारा परमार्थ समजून घेणे सोपे जाते. यातील ‘सारासार विचार’ म्हणजे तरी नेमके काय?
पंचमहाभूतांनी बनलेला,जड, म्हणजेच अनित्य या अर्थाने ‘देह’ हा ‘असार’,अशाश्वत आणि नित्य ते शाश्वत या अर्थाने ‘आत्मा’ हा ‘सार’! हा ‘सारासार’ विचार हीच आपल्या ठायी वसणाऱ्या अंतरात्म्यातील परमात्म्याला जाणून घेण्याची पहिली पायरी!या पायरीवरच्या आपल्या पहिल्या पाऊलातच मायेला चिकटलेला स्वार्थ अलगद गळून पडलेला असेल.
‘माया’ या शब्दाच्या वर उल्लेखित अर्थांपेक्षा वरवर अतिशय वेगळा वाटणारा आणखी एक अर्थ आहे.या अर्थाचा वरील सर्व अर्थछटांशी दुरान्वयानेही कांही सबंध नाहीय असे वाटेल कदाचित,पण हा वेगळा भासणारा अर्थही माणसाच्याच जगण्याशी नकळत आपला धागा जोडू पहातोय असे मला वाटते.
शिवताना दोरा निसटू नये म्हणून वस्त्राचा थोडा भाग बाहेर सोडला जातो त्याला ‘माया’ असेच म्हणतात. लाकडावर एका सरळ रेषेत खिळे ठोकताना लाकडाच्या फळीवरचा मोकळा ठेवला जाणारा थोडा भाग त्यालाही ‘माया’ म्हणतात. कापड कापतानाही अशी थोडी माया सोडूनच कापले जाते.लेखन करताना कागदाच्या डाव्या बाजूला थोडी माया सोडूनच केले जाते.अशा अनेक ठिकाणी जाणिवपूर्वक सोडाव्या लागणाऱ्या जागांचा निर्देश करणारी माया! या मायेला जगताना माणसानेही ‘अहं’ पासून थोडी माया सोडून जगणंच अपेक्षित आहे याचे भान आपण कधीच विसरुन चालणार नाही !!
कवितेच घर हेच शब्दांचे माहेर. …किती भावस्पर्शी जाणिवा नेणिवेच्या या कवितालयात पहायला मिळतात …… कल्पना आणि वास्तवता यांच्या नाजूक संवेदनशील पण जागृत अनुभुतींनी साकारलेल्या या शब्द रचना जेव्हा मनाशी संवाद साधतात ना तेव्हा मनाचा एकटे पणा कुठल्या कुठे पळून जातो. डोळे आणि मन भरून येत. . . आठवणींची पासोडी खांद्यावर टाकून आपण या माहेरात विसावतो आणि . . .
……अनेक जीवनातील सुख दुःख पचवलेली, जीवनसंघर्ष करीत कवितेचा शब्दसुतेचा दर्जा देणारी संवेदनशील व्यक्ती मत्वे , मनात रेंगाळत रहातात. मनातील ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न ही शब्द पालवी करते आणि म्हणावस वाटत वसंत फुलला मनोमनी
खरंच . . . ही फुलं फुलतात कशासाठी? माणस माणसांना भेटतात कशासाठी? थोड तुझ थोड माझं परस्परांना समजण्यासाठी . . तसच या माहेरी घडत. या कवितेच्या घरात कवितेचे विविध प्रकार मांडवशोभेसारखे नटून थटून येतात. त्यांच नुसते दर्शन देखील मनाची मरगळ दूर करते. आजची कविता काय आहे, कशी आहे , तिच रूप, स्वरूप, तिचा प्रवास याच्या खोलात न जाता मी फक्त इतकेच म्हणेन आजची कविता प्रवाही आहे. सोशल नेटवर्किंग साईट वरून ती लोकाभिमुख होते आहे. प्रत्येक कविता आपला स्वतःचा वाचक वर्ग निर्माण करते आहे. हा साहित्य प्रवाह नसला तरी हा जीवनप्रवास आहे माणसातल्या सृजनशील मनोवृत्तींचा . ही निर्मिती माणसाला धरून ठेवते. माणसाशी संवाद साधते. त्याचं एकटेपण दूर करू पहाते. म्हणून कविता महत्वाची आहे.
कवितेने किती पुरस्कार मिळवले, * आपल्या लेकिच्या अंगावर किती दागिने आहेत* यापेक्षा आपली लेक किती लोकाभिमुख आहे हे पहाणं मनाला जास्त भावत. मनान मनाशी जोडलेले भावबंध हाच उत्तम कवितेचा पाया असतो. नाते जपताना शब्दांना उकळी आणून उसन्या गोडव्याने पाजलेला चहा भावाच्या मनात बहिणीची माया उत्पन्न करू शकत नाही त्याप्रमाणे कविता लोकांपर्यत किती पोचली तिचा समाजाभिमुख प्रवास कविला समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देतो.
माहेर. . . माहेर .. म्हणजे नेमक काय. ? मनातली दुःख, चिंता, काळजी, ताणतणाव, बाहेर जाताना रांगत्या पावलांनी किंवा अनुभवी वृद्ध व्यक्तीच्या आश्वासक खोकल्याने घरात कुणीतरी असल्याची दिलेली चाहूल, शब्दांना भावनांनी दिलेला आहेर म्हणजे माहेर. हे माहेर ममत्वाचा,मायेचा, माझ्या तला कलागुणांचा सर्वांगीण अविष्कार करत, माझ माझ म्हणून ज्याला जोजवावं त्या विचारप्रवाहांचा जे स्वीकार करत ते माहेर माणसाला माणूसपण कवितेला घरपण प्राप्त करून देत.
कविता श्लोकातून जाणवायला हवी. अभंगातून निनादत ओवीतून उदरभरण करणा-या , गहू, ज्वारी, बाजरीच्या पिठात एकजीव व्हायला हवी. कवितेने जुन्याची कास आणि नाविन्याची आस सोडू नये यासाठी हे माहेर प्रत्येक साहित्यिकासाठी फार महत्वाचे आहे. या माहेरात कुणाला एकटे सोडायचे अन कुणाला बांधून ठेवायचे हे काम आपले लेखन, आपला दैनंदिन लेखन कला व्यासंग बिनबोभाट करतो. तुलना नावाची मावशी किंवा मंथरा या माहेरात आपल्याला पदोपदी भेटते. ही तुलना मावशी कविच्या कवित्वाचा देखील घात करू शकते. या माहेरात आपल्या कार्यकरतृत्वाचं गुणांकन करायला दामाजी नाही तर आत्माराम कामी येतो हे ध्यानात ठेवा आणि जेव्हा जेव्हा स्वतःला एकट समजाल तेव्हा तेव्हा या माहेरी निःशंकपणे या. पायवाट आणि हमरस्ता दोन्ही ही आपलीच वाट पाहत असतात. सुख, समाधान, हाकेच्या अंतरावरच असत त्याचा शुभारंभ या माहेरी होऊ शकतो.
हा प्रवास ह्दयापासून ह्रदयापर्यतचा असतो. यात शब्द जितका महत्वाचा तितकाच एकेका शब्दासाठी आपल सारं जीवन वेचणारा माणूसही तितकाच महत्त्वाचा. या शब्दालयात , माहेरपणात कविता नांदायला हवी.कविनं कविता अन माणसान कटुता या माहेरी निवांत सोडून द्यावी. कविता तिचा प्रवास करीत रहाते आणि मनातली कटूता एकटी होती. . एकटी आहे. . एकटी राहिल . . असा विश्वास देत पुढच्या जीवनप्रवासाला लागते.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यापैकी ‘वक्ता’ हा एक झळाळणारा पैलू. तो त्यांनी कष्टपूर्वक साध्य केला होता.
त्यांचं पहिलं भाषण म्हणजे चौथीत असताना वर्गात सांगितलेली गोष्ट. पाठ केलेलं आठवेना. मग प्रत्येक वाक्यानंतर ‘झालं’-‘झालं’ करत पुढचं वाक्य
आठवायचे. मग ‘झालं’ म्हटलं, की वर्गात हशा पिकू लागला. अभावितपणे का होईना, त्यांच्या विनोदी भाषणाची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली.
पुढे इंग्रजी चौथीत गेल्यावर त्यांनी वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला. भाषण तोंडपाठ केलं. खणखणीत आवाजात त्यांनी केलेल्या या भाषणाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. ‘हशा आणि टाळ्या’मधल्या टाळ्यांची ही सुरुवात.
यामुळे त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला, की पुढची लागोपाठ तीन वर्षे ते वक्तृत्वस्पर्धेत पहिले येत राहिले.
काही विद्यार्थी सासवडला दरवर्षी नाटक करीत. तेव्हा पडद्याबाहेर येऊन, प्रेक्षकांना “आणखी एक अंक झाल्यावर नाटक संपेल,” हे प्रेक्षकांना सांगण्याचे काम अत्रे करत. त्यामुळे पूर्वतयारी न करता बोलायची सवय झाली व श्रोत्यांचे भय वाटेनासे झाले.
कॉलेजच्या चार वर्षांत त्यांनी मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने काळजीपूर्वक ऐकून त्यांचा अभ्यास केला.
लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, केशवराव छापखाने, श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर, दादासाहेब खापर्डे, अच्युतराव कोल्हटकर वगैरे वक्त्यांच्या वक्तृत्वशैलीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यापैकी खापर्डे व कोल्हटकरांच्या वक्तृत्वाचा अत्रेंच्या मनावर अतिशय परिणाम झाला.
दादासाहेब खापर्डे हे त्या काळातील एकुलते एक विनोदी वक्ते होते. घरगुती पद्धतीने गोष्टी सांगत ते श्रोत्यांना हसवत, तल्लीन करून टाकत.पण त्यांच्या व्याख्यानात विनोदाखेरीज इतर रसांचा परिपोष कमीच असे.
अच्युतराव कोल्हटकर मात्र कोणत्याही रसाचा परिपोष लीलया करत. प्रभावी व्यक्तिमत्त्व, ऐट,वजनदार आवाज, वाङ्मयीन संदर्भ देत केलेले मार्मिक, परिणामकारक बोलणे यांची श्रोत्यांवर छाप पडे. पहिल्या दोन-चार वाक्यांतच ते टाळ्या घेत किंवा हशा पिकवत. पुढे भाषणातील रस आणि गती ते अशी काय वाढवत नेत, की मुख्य मुद्दा आला की टाळ्यांचा प्रचंड गडगडाट होई. त्या काळात ते अग्रगण्य राजकीय वक्ते होते. अत्रे त्यांना गुरुस्थानी मानत.
पुढची काही वर्षे अत्रेंची भाषणे फारशी ‘जमली’ नाहीत.
बी.टी. चा पद्धतशीर व जीवन तोडून अभ्यास केल्यामुळे ते पहिल्या वर्गात पहिले आले. त्यांचा आत्मविश्वास वाढला.
‘गडकरी स्मृतिदिना’निमित्त दिलेल्या व्याख्यानात, कोणतीही तयारी न करता, गडकऱ्यांची व आपली पहिल्याने ओळख कशी झाली, ते घरगुती भाषेत सांगून (दादासाहेब खापर्डे शैलीत) श्रोत्यांचे ‘हशे’ मिळवले.उत्तरार्धात अच्युतराव कोल्हटकरांप्रमाणे नाटकी स्वर वाढवून कडकडून टाळ्या घेतल्या. या व्याख्यानापासून, त्यांच्या विशिष्ट शैलीची सुरुवात झाली.
पुढे इंग्लंडमध्ये सुप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. पी. बी. बॅलार्ड यांची व्याख्याने अत्रेंनी ऐकली व अभ्यासली. मानसशास्त्रासारखा अवघड विषय ते गोष्टी सांगून मनोरंजक करीत.
इंग्लंडहून परत आले, तेव्हा त्यांचे शरीर भारदस्त झाले होते.ही वक्त्यासाठी जमेची बाजू.
गडकरी स्मृतिदिनाचे अध्यक्ष म्हणून अत्रेंनी ठणठणीत आवाजात व स्पष्ट भाषेत बोलायला सुरुवात करून तिसऱ्याच वाक्यात कोटी केली, तेव्हा हास्याचा प्रचंड स्फोट झाला. नंतरही दोन-तीन वाक्यांनंतर ‘हशे’ घेत राहून श्रोत्यांना कह्यात घेतलं. मधेच काही कारणाने सभा बिनसते की काय, अशी भीती वाटल्यावर विनोद सोडून देऊन ‘अच्युतरावी’ पद्धतीचा अवलंब केला. एकूण, वक्ता म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.
गर्दीचे मानसशास्त्र अत्रेंना पक्कं ठाऊक होतं. ठणठणीत आवाजात पहिलं वाक्य बोललं, की वक्ता घाबरलेला नाही, याची खात्री पटून श्रोते शांत होतात. पहिल्या दोन-चार वाक्यांत त्यांना हसवलं, की पुढचा मार्ग मोकळा.
काही श्रोत्यांना मध्येच काहीतरी बोलण्याची सवय असते. त्याचा अगोदरच अंदाज बांधून त्यांची उत्तरे अत्रे आधीपासूनच ठरवून ठेवत. श्रोत्यांवर मात्र त्या प्रसंगावधानाचा प्रभाव पडे.
श्रोत्यांनुसार ते आपली वक्तृत्वशैली ठरवत असत. लहान मुलांसमोर सोपे, बुद्धिमान कॉलेजयुवकांसमोर विनोदी, तर गंभीर चेहऱ्याच्या प्रौढ व वृद्ध लब्धप्रतिष्ठितांसमोर प्रारंभीच ते वीररसाचा अवलंब करत असत.
सुरुवातीला अत्रे व्याख्यानाचे सर्व मुद्दे, संदर्भ, कोट्या यांची नोंद करून, टिपणे नीट तोंडपाठ करून, टिपणे हातात न घेताच ते तसंच्या तसं बोलत. नंतरनंतर मात्र व्याख्यानाला जाण्यापूर्वी पाच- दहा मिनिटे मनातल्या मनात मुद्द्यांची उजळणी करत.
राजकीय विषयांवर, पन्नास हजारांपासून एक लाखपर्यंत श्रोत्यांसमोर बोलताना विनोदी पद्धती, बेडर वृत्ती व ठणठणीत प्रकृती यांचा अत्रेंना खूपच फायदा झाला.
अत्रेंच्या मते व्याख्यान रंगणे हे वक्त्यापेक्षा जास्त श्रोत्यांवर अवलंबून असतं.
दहा हजार माणसांत एखादाच वक्ता सापडतो, या अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. पण अत्रेंच्याच शब्दांत सांगायचं, तर अत्रेंसारखा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही.
मराठीतील एक बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे श्री. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे. ते नामवंत लेखक, नाटककार, कवी, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्कृष्ट वक्ता होते.
त्यांनी तो मी नव्हेच, घराबाहेर, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार यासारखी अनेक गाजलेली नाटके लिहिली. कथासंग्रह, क-हेचे पाणी हे आत्मचरित्र, कादंबरी, इतर असंख्य पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकाच्या निमित्ताने विपुल लेखन केले. चित्रपटासाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले.त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले ‘सुवर्ण कमळ’ मिळाले.
त्यांनी ‘केशव कुमार’ या नावाने कविता लेखन केले. केशवकुमार म्हटले की आठवतात ती ‘झेंडूची फुले’, ‘गीतगंगा’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. झेंडूची फुले हा विडंबनात्मक कविता संग्रह जगद्विख्यात आहे. या काव्य लेखनाला त्यांनी स्वतंत्र स्थान मिळवून दिले. झेंडूची फुलेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा याबाबत मान्यवरांचे सविस्तर विचार या पुस्तकात दिलेले आहेत. कविवर्य केशवसुतांची “आम्ही कोण ?” ही प्रसिद्ध कविता. या कवितेचे आचार्य अत्र्यांनी केलेले विडंबनही लोकप्रिय झाले.
केशवसुत —
आम्ही आम्ही कोण म्हणूनी काय पुससी ? आम्ही असू लाडके |
देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळायला |
———-
आम्हाला वगळा – गतप्रभ जणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे|
आचार्य अत्रे —
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता?दाताड वेंगाडुनी ?
फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला ? ||
————
आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके ||
यावरून या पुस्तकाची झलक लक्षात येते.
अत्र्यांनी इतर काही चित्रपट गीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. ती आजही लोकप्रिय आहेत. १.छडी लागे छम छम, २.भरजरी ग पितांबर (दोन्ही चित्रपट श्यामची आई), यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया (चित्रपट ब्रह्मचारी), १.प्रेम हे वंचिता| मोह ना मज जीवनाचा ||२. प्रिती सुरी दुधारी ( दोन्ही नाटक पाणिग्रहण), किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार (नाटक प्रितिसंगम) त्यांच्या काही प्रसिद्ध कविता बालभारती या पुस्तकात समाविष्ट आहेत उदा.आजीचे घड्याळ, माझी शाळा. त्यांची ‘प्रेमाचा गुलकंद’ ही एक मस्त वेगळीच मजा प्रेमकविता आहे. दिवस रात्रीच्या वेळा, सूर्याची स्थिती, कोंबड्याचे आरवणे, रात्री वाजणारा चौघडा यावरून आजी वेळ अचूक सांगत असे. पण कुठेही न दिसणारे, न वाजणारे हे आजीचे घड्याळ म्हणूनच मुलांना कुतूहलाचे वाटते.
शाळेची प्रार्थना म्हणून म्हटली जाणारी त्यांची प्रसिद्ध कविता म्हणजे ‘माझी शाळा’.
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही, जसा माऊली बाळा ||
इथे हसत खेळत गोष्टी सांगत गुरुजन शिक्षण देतात. बंधुप्रेमाचे धडे मिळतात, देशकार्याची प्रेरणा मिळते, जी मुलांना देशासाठी तयार करते त्या शाळेचे नाव आपल्या कार्यातून उज्वल करा अशी शिकवण अतिशय सोप्या शब्दात ही कविता देते.
असेच त्यांचे खूप गाजलेले गीत म्हणजे ‘भरजरी गं पितांबर’. ‘श्यामची आई’ या चित्रपटातले हे गीत आजही लोकप्रिय आहे. बहीण भावाचे नाते, त्यातली प्रीती, श्रीमंतीचा बडेजाव, परमेश्वर स्वरूप भावासाठी सर्वस्व देण्याची समर्पण वृत्ती अशा वेगवेगळ्या मानवी स्वभाव छटांवर हे गीत अप्रतिम भाष्य करते. “चिंधीसाठी शालू किंवा पैठणी फाडून देऊ काय ?” असे विचारत सख्ख्या बहिणीने चिंधी दिली नाही. तर मानलेल्या बहिणीला वसने देऊन तिची लाज राखत पाठीराखा झालेल्या भावासाठी मानलेल्या बहिणीने त्रैलोक्य मोलाचे वसन भक्तीभावाने फाडून दिले. यासाठी अंत:करणापासून ओढ वाटली पाहिजे तरच लाभाविण प्रीती करता येते. नात्यांचे महत्त्व, त्यांची जपणूक अतिशय सोप्या, सुंदर शब्दात सांगितलेली आहे. आजच्या काळातील बदलत्या मानसिकतेला तर हे गीत छान मार्गदर्शन करते. अशा प्रकारे कविता, विडंबन काव्य, चित्रपट गीते, नाट्यगीते अशा विविध प्रकारात आपला ठसा उमटविणारी आचार्य अत्रे यांची अतिशय विलोभनीय, समृद्ध आणि लोकप्रिय काव्यसृष्टी आहे.
१३ जुन हा प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने…
वास्तविक आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या ही काही शब्दांत किंवा काही वाक्यात करणे अत्यंत अवघड आहे. अनेक विविधांगी क्षेत्रांमध्ये त्यांचा अफाट वावर होता. ते मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, लेखक, नाटककार ,संपादक ,पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकारणी आणि वक्ते होते. कुठलेही क्षेत्र त्यांच्यापासून सुटले नाही. आणि प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं स्थान हे नामांकित होतं.
काव्य लेखनापासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. १३ ऑगस्ट१८९८ साली पुरंदर तालुक्यात ,कोडीत खुर्द या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला.
बीए ,बीटी,टीडी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या चळवळीचे ते प्रमुख नेते होते . असं म्हणतात की त्यांच्या नेतृत्वामुळेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपूर्ण यशस्वी झाला.
महाराष्ट्राचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला. अध्यापन हे त्यांचं पहिलं मासिक. त्यानंतर रत्नाकर ,मनोरमा, नवे अध्यापन ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जय हिंद, मराठा अशी दैनिके ही त्यांनी सुरू केली. आणि या माध्यमातून त्यांच्या जबरदस्त लेखणीचे फटकारे लोकांनी अनुभवले.
कधी पत्रकार कधी शिक्षक कधी राजकारणी तर कधी एक साहित्यिक म्हणून त्यांनी आपली परखड आणि सुदृढ मते समाजापुढे मांडली.
साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा अशी त्यांची एकाहून एक अनेक नाटके रंगभूमीवर गाजली. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विसंगतीला सहज चिमटे काढले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक काव्य संग्रह अतिशय लोकप्रिय ठरला.
आचार्य अत्रे व कवी गिरीश या दोघांनी मिळून संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठी क्रमिक पुस्तके पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमात होती. यानंतर निघालेल्या पुस्तकांची या अरुण वाचनमालेशी तुलना होऊच शकत नाही, हे शिक्षण वर्तुळातील लोकांचे आणि पालकांचेही मत आहे.
श्यामची आई या सानेगुरुजी लिखित कादंबरीवरील चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. आणि त्यास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून पहिलं सुवर्णकमळ मिळालं.
अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघंकधीही विस्मरणात जाउ न शकणारे, महाराष्ट्रातील अफाट विनोदवीर. ज्यांनी खरोखरच लोकांना सहजपणे खळखळून हसवलं.
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ खूप मोठे होते. एकदा एका ग्रामीण भागात दौरा करत असताना एका शेतकऱ्याने त्यांना म्हटले,
” तुम्ही सरकारला विधानसभेत कोंडीत पकडता पण त्यांच्या
एवढ्या मोठ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे काय पुरणार?
तेव्हा अत्रे त्याला म्हणाले,
” तुझं शेत आहे ना?”
” हो साहेब”
” कोंबड्या पाळतोस ना?”
” व्हय तर!”
” किती कोंबड्या आहेत?”
त्याने छाती फुगवून म्हटले ,
” चांगल्या शंभरेक हायत की..”
” आणि कोंबडे किती?”
” कोंबडा फकस्त एकच हाय.”
“मग एकटा पडतो का तिथे?”
जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड हशा पिकला. अत्र्यांच्या या हजरजबाबीपणा मुळे अनेकांना त्यांनी जागीच गप्प केले होते.
अत्र्यांच्या साहित्यावर सावरकरांचा प्रभाव होता. त्यांची आणि सावरकर यांची पहिली भेट रत्नागिरी येथे झाली होती. त्याविषयी ते म्हणाले होते,
” सावरकरांचा सतेज गौरवर्ण, आणि विलक्षण प्रभावी डोळे यांचा माझ्या अंत:करणावर अविस्मरणीय प्रभाव झाला. माझा अंतरात्मा तृप्त झाल्यासारखा वाटला.”
सावरकर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर १४ लेख लिहिले होते. आणि ते अत्यंत प्रभावी आणि वाचनीय ठरले. सावरकराना प्रथम स्वातंत्र्यवीर म्हणणारे आचार्य अत्रेच होते.
” जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही. आणि तृप्ती कधी होत नाही.” असे आचार्य अत्रे म्हणत. इतकी त्यांची जीवनावर निष्ठा होती.
बाबासाहेब आंबेडकर आणि अत्रे यांची विशेष मैत्री होती. आणि त्या दोघांनी एकमेकांच्या मतांचा नेहमी आदर राखला.
अशा या बहुगुणी. समृद्ध व्यक्ती विषयी बोलताना,राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी, राईटर अंड फायटर ऑफ महाराष्ट्र! असा त्यांचा उल्लेख केला होता.
साहित्यिक वर्तुळात ते केशवकुमार म्हणून प्रसिद्ध होते. आजीचे घड्याळ ही आजही आठवणीत असलेली त्यांची कविता केशवकुमार या नावाने प्रसिद्ध झाली होती. आचार्य अत्रे हे खरोखरच एक अद्भुत रसायन होते! त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती. तशी त्यांच्या कटू जिव्हारी लागणाऱ्या वाक्बाणांनी दुखावली गेलेली माणसं ही खूप होती..
कर्हेचे पाणी ..हे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगणारे पाच खंडात असलेले २४९३ पानी आत्मनिवेदन. .”महाराष्ट्राच्या उद्धारासाठी नि संरक्षणासाठी तत्कारणि देह पडो ही असे स्पृहा….” असे म्हणून त्यांनी या पुस्तकाचा पाचवा खंड प्रकाशित केला. शेवटच्या परिच्छेदात ते म्हणतात, “हर्षाच्या आणि संतोषाच्या या मधुर धुंदीत, महाराष्ट्र मातेच्या चरणावर मस्तक ठेवून, अर्धोन्मिलीत नेत्रांनी काही काळ मला आता निश्चल पडू द्या…”
यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. तो दिवस होता १३ जून १९६९.
असं हे अत्रे तत्रे सर्वत्रे व्यक्तिमत्व अनंतात लोप पावले.