डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 21 –पाथेय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधी नंतर, त्यांच्या कडून मिळालेले परमपावन असे संचित नरेंद्र नाथांच्या जीवनाचे अक्षय असे पाथेयच होऊन गेले होते. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधी नंतर लवकरच काशीपूरचे उद्यानगृह सोडणे भाग होते. नाहीतर फाटाफूट होऊन हे बालसंन्यासी जर चहूकडे विखुरले तर, त्या देवमानवाच्या आदर्शांचा प्रचार करणे तेव्हाढ्यावरच थांबेल. त्यांच्या पैकी प्रत्येकाला गुरुदेवांकडून ज्या साधनेचा आणि आदर्शांचा लाभ झाला आहे, त्या सर्व साधना आणि आदर्श एकत्र केंद्रीभूत करायला हवेत.
सर्वजण संघबद्ध होण्याची गरज आहे . आता सेवेच्या निमित्त का असेना सर्वजण एकत्र राहिल्यामुळे एकमेकात स्नेह व प्रेम निर्माण झाले होते. हे सगळे वैराग्यशील तरुण संन्यासी निराश्रितांसारखे वणवण भटकत फिरतील ही कल्पना नरेंद्रनाथांना कशीशीच वाटली. इतर गृहस्थ भक्तांनाही ते पटले. त्यामुळे नरेन्द्रनाथ सर्वांना त्या दिशेने प्रोत्साहन देऊ लागले.
सुरेन्द्र्नाथ मित्रांनी वराहनगर भागात त्याना एक घर भाड्याने घेऊन दिले. गुरूंचा रक्षाकलश आम्हीच नेणार यावरून भक्तांमध्ये वाद सुरू झाला. “महापुरुषांच्या देहावशेषांवरून शिष्यांमधे वाद होणं नेहमीचच आहे, पण आपण संन्यासी आहोत. आपणही तसंच वागणं योग्य नाही. श्रीरामकृष्णांच्या जीवनातला आपल्या समोरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आपले जीवन घडविणे, हेच आपले पहिले कर्तव्य आहे. रक्षा कलशावर ताबा ठेवण्यापेक्षा त्यांची शिकवणूक आचरणात आणणं आणि त्यांचा संदेश दूरवर पोहोचवणं खर महत्वाचं आहे”. नरेन्द्रनाथांच्या या सांगण्यावरून हा वाद मि टला.
कृष्णजयंतीच्या दिवशी रक्षाकलश नेऊन त्याचे काकुडगाछी इथल्या रामचंद्रांच्या उद्यानात विधिवत स्थापना केली. रामचंद्र हे श्री श्रीरामकृष्णांच्या सहवासात सर्वात आधी आलेले. इथे पुढे समाधी व छोटे मंदिर उभे राहिले. रामकृष्ण संघाने १९४३ साली ते ताब्यात घेतले आणि तिथे आज रामकृष्णमठ उभा आहे.
हा प्रश्न सुटला. आता काशीपूरचे उद्यानगृह सोडावे लागणार होते. श्रीरामकृष्णांना उपचार चालू असताना कलकत्त्या जवळच एक शांत, एकांत आणि गर्दीपासून दूर अशा गोपालचंद्र घोष यांच्या हवेशीर उद्यानगृहात हलवले होते. महिना ऐंशी रुपये भाडे होते. ते सुरेन्द्रनाथ भरत होते. श्रीरामकृष्णांचे अखेरचे पर्व इथेच संपले होते. इथेच अनेक महत्वाच्या घटना घडामोडी घडल्या होत्या. काशीपूरचे हे उद्यानगृह खाली केल्यावर सर्व शिष्य इकडे तिकडे पांगले, शिष्यांच्या समोर आता बिकट परिस्थिति निर्माण झाली होती.
गुरूंच्या महासमाधी नंतर महिन्याभारतच सुरेन्द्रनाथांना गुरूंचा दृष्टान्त झाला की, रामकृष्ण म्हणतात, “ माझी मुलं तिकडं रस्त्यावर वणवण करताहेत आधी त्यांची काहीतरी व्यवस्था कर”. ते तत्काळ उठून नरेंद्र नाथांना भेटायला आले आणि हे त्यांना सांगितले. आणि त्यावरील उपाय म्हणून तुम्ही एक भाड्याची जागा बघा आणि तिथे सारे शिष्य एकत्र राहू शकाल. आम्ही गृहस्थाश्रमीशिष्य इथे अधूनमधून येत राहू. काशीपूरला मी काही रक्कम मदत म्हणून देत होतो ती इथे देईन. जेवणाचा प्रश्न नव्हता भिक्षा च मागणार होते सर्व.
वराहनगर मधली भुवन दत्त यांची एक जुनी पुराणी मोडकळीस आलेली वास्तु अकरा रुपये भाड्याने मिळाली. नरेंद्र नाथांबरोबर इतर शिष्य तिथे राहू लागले. तळमजला खचलेला, गवत वाढलेले, उंदीर, घुशी, साप आजूबाजूला. डासांचे साम्राज्य, भिंतीचे खपले निघालेल्या अवस्थेत, झोपण्यासाठी चटया आणि उश्या, भिंतीवर देवदेवतांची चित्रं, येशुचे ही चित्रं, एका भिंतीवर तानपुरा, झांजा आणि मृदंग अशी वाद्ये. त्याच खोलीत धर्म, तत्वज्ञान, व इतिहास यावरील शंभर ग्रंथ पलंगावर ठेवलेले,
अशी सर्व दुर्दशा असूनही नरेंद्रनाथांना त्यांच्या गुरुबंधुना ही जागा पसंत होती. कोणाचाही त्रास न होता आपली साधना निर्वेधपणे करता येईल याचाच त्यांना आनंद होता. पुढे पुढे मठातील संख्या वाढली तसे सुरेन्द्र नाथ ३० रुपये ते चाळीस, पन्नास, शंभर अशी वाढवून रक्कम देत होते, ते अगदी हयात असे पर्यन्त. त्यामुळे नरेंद्रनाथांना व्यवस्था करणे सोपे गेले. हाच तो वराहनगर मठ. नरेंद्र आणि गुरुबंधु यांनी कठीण प्रसंगातून जिद्दीने, कठोर तपश्चर्या केली आणि सुरेन्द्रनाथांनी रोजच्या गरजाही भागविल्या म्हणून हा मठ उभा राहिला. विवेकानंदांनी याची आठवण सांगतांना म्हटलंय, “परिस्थिति जितकी प्रतिकूल असेल तितकी तुमच्या आंतरिक शक्तींना अधिक जाग येत असते”.
वराहनगर मठात पुजागृहात श्रीरामकृष्ण यांची प्रतिमा ठेवली होती, रोज यथासांग पुजा होत होती. आरती,भजन, नामसंकीर्तन रोज होई. एक दिवस नरेंद्रच्या मनात आलं, ‘आपण सर्वांनी विधिपूर्वक संन्यास घ्यावा. तशी श्रीरामकृष्ण यांनी दीक्षा दिलीच होती. पण परंपरागत धार्मिक विधींची जोड दिली तर एक अधिष्ठान लाभेल असं त्यांना वाटत होतं. येथवरचं आयुष्य पुसलं जाईल आणि सर्वांच्या मनावर संन्यासव्रताचा संस्कार होईल’.
दिवस ठरवला. सर्व गुरुबंधू एक दिवस गंगेवर स्नान करून आले, श्रीरामकृष्णांच्या प्रतिमेची नेहमीप्रमाणे पुजा करून, आवारातील बेलाच्या झाडाखाली विधिपूर्वक विरजाहोम करण्यात आला. होमकुंडातील पवित्र अग्नीची आहुती संपली. विधी पूर्ण झाल्यावर, नरेन्द्रनाथांनी राखालला ब्रम्हानंद , बाबूरामला प्रेमानंद, शशिला रामकृष्णानंद, शरदला सारदानंद, निरंजनला निरंजनानंद, कालीला अभेदानंद, सारदाप्रसन्नला त्रिगुणतीतानंद, अशी नावे दिली. तारक आणि थोरला गोपाल यांना काही दिवसांनंतर शिवानंद आणि अद्वैतानंद अशी नावं दिली.
लाटू आणि योगेन्द्र यांना नंतर अद्भुतानंद, आणि योगानंद तर, हरी यांना तुरीयानंद अशी नावे देण्यात आली. हिमालयतून परत आल्यावर गंगाधरला अखंडांनंद हे नाव दिलं. सुबोध यांना सुबोधानंद ,हरिप्रसन्न यांना विज्ञानानंद शशीला रामकृष्णानंद आणि स्वताला विविदिशानंद हे नाव घेतले. पण अज्ञात संन्यासी म्हणून भ्रमण करत असताना नरेन्द्रने विवेकानंद आणि सच्चिदानंद अशी नावे घेतली होती त्यातले अमेरिकेला जाण्यासाठी भारताचा किनारा सोडताना त्यांनी १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले आणि हेच नाव पुढे विख्यात झालं. एखादी संस्था, संघटना किंवा संघ उभा करायचा, त्याचा प्रचार करायचा, तेही अनेकांना सोबत घेऊन. हे काम किती कठीण असतं ते या वरून लक्षात येईल.
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈