मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर 

आज सकाळीच सतीश ने टी टेबलवर एक मस्त एक्सायटिंग घोषणा केली. “आजचा कार्यक्रम आहे बाली हाय क्रुझ. आपण सनसेट डिनर क्रुझ बुक केली आहे.”

वाॅव! बाली आणि समुद्र सफारी शिवाय परतायचे हे केवळ अशक्य!

बाली बेनोवा बंदर (जिथून  आमची क्रुझ सुरू होणार होती) आमच्या वास्तव्यापासून एक-दीड तासाच्या अंतरावर होते. आम्हाला बाली हाय क्रुझतर्फे  पिक अप आणि ड्रॉप होता.  दुपारी साडेतीन वाजता आम्ही निर्गमन करणार होतो त्यामुळे सकाळी आम्ही बरोबर आणलेले थेपले, दशम्या, बेसन वड्या, चिवडा, घारगे असे विविध पदार्थ खाऊन लाईट (?) लंच घेतले. बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळलो, डॉब्लर्स नावाचा एक लहान मुलांचा पण अतिशय गमतीदार असा मानसिक तत्परता वाढविणारा  खेळही खेळलो. OLDAGE IS DOUBLE CHILDHOOD चाच जणू काही  अनुभव घेतला म्हणा ना!

बरोबर साडेतीन वाजता आमची सहा जणांची रंगीन टीम मस्त नटून थटून बेनोवा बंदरकडे जायला तयार झाली. आमची पिकअप कार आलेलीच होती. नेहमीप्रमाणेच गणवेशातला रुबाबदार हसतमुख पण नम्र ड्रायव्हर स्वागतास तयार होताच.

रस्त्यावरून जाताना प्रमोदच्या आणि ड्रायव्हरच्या नेहमीप्रमाणेच मस्त गप्पा चालू होत्या. भाषेचा अडसर कसाबसा पार करत गप्पा रंगल्या होत्या. तो सांगत होत, “इंडोनेशियामध्ये ८७% मुस्लिम आहेत पण बाली हे एकमेव असे बेट आहे की इथे ९०% हिंदू धर्मीय आहेत. हिंदू देवदेवतांची पूजा करणारे आहेत आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे आहेत. घरोघरी हिंदू रिती परंपरा येथे पाळल्या जातात.”

अशा रितीने गप्पागोष्टी करत, फळाफुलांनी नटलेली वनश्री पहात, चौका-चौकातली शिल्पे आणि वास्तुकलेचे भव्य दर्शन घेत आम्ही बेनोवा बंदर वर पोहोचलो.  तिथले वातावरणच पर्यटन पूरक होते. सागर किनाऱ्यावर अनेक लहान-मोठी जहाजे नांगर टाकून उभी होती. आमच्यासारखेच अनेक उत्सुक  पर्यटक देशोदेशाहून  तिथे आलेले होते.अर्थात सारेच अत्यंत उत्साही आणि आनंदी मूडमध्ये  होते. आमची सनसेट डिनर क्रुझ संध्याकाळी  साडेपाचला सुटणार होती. जवळजवळ साडेतीन तासाची समुद्रसफर होती आणि डिनरसह संगीत, नृत्य असा भरगच्च कार्यक्रम बोटीवर असणार होता. तत्पूर्वी आम्हाला तिथे एक मधुर, शीतल स्वागत पेय देण्यात आलं. काउंटर वर आम्ही आमची तिकिटे घेतली प्रत्येकी ११ लाख इंडोनेशियन रुपये! जवळजवळ प्रत्येकी साडेसहा हजार भारतीय रुपये.  सर्व कारभार अतिशय शिस्तपूर्ण आणि नीटनेटका होता. सगळ्यांना सांभाळून बोटीपर्यंत नेले जात होते.  रुबाबदार वातावरण, सुसज्ज रेस्टॉरंट,सागराचं आणि आकाशाचं खुलं  दर्शन देणारा मस्त सुरक्षित डेक आणि सोबतीला हलकेच बालीनीज पारंपारिक वाद्य संगीत. एका वेगळ्याच वातावरणात गेल्याचा अनुभव आम्हाला मिळत होता.

ठीक साडेपाच वाजता बोटीने किनारा सोडला आणि त्या हिंदी महासागरातली ती अविस्मरणीय सफर सुरू झाली. निळे व्योम आणि आप या निसर्गतत्त्वांचा किती अनाकलनीय परिणाम मनावर होतो हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. काही वर्षांपूर्वी आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या दर्शनाने जी समाधीस्थ अवस्था काही क्षणापुरती का होईना पण जाणवली होती अगदी तशीच या सागर दर्शनाने पुनश्च जाणवत होती.” सागरा प्राण तळमळला.. सागरा…” अगदी नेमके हेच वाटत होते. खरं सांगू ?निसर्ग इतका अथांग, अफाट असतो की आपलं अस्तित्व त्याच्यासमोर फक्त कणभराचंच असल्यासारखं वाटतं! निसर्गासमोर सारं “मी पण” अहंकार, गर्व स्वतःविषयीच्या कल्पना, (गैर) सारं सारं काही क्षणात गळून पडतं.  मनाच्या खोल गाभाऱ्यात “कोहम” नाद घुमत राहतो.

आता माथ्यावरील निळ्या आकाशातले रंग बदलू लागले होते. बोट समुद्राच्या मध्यभागी आलेली होती. किनाऱ्यावरची घरे आणि हळूहळू पेटत चाललेले दूरचे दिवे हे सुद्धा खूप आकर्षक भासत होते.पश्चिम दिशेला ढळणार्‍या सूर्याने आकाशात केशरी, जांभळे रंग, उधळले होते मावळणाऱ्या सूर्यकिरणांतून पाण्यावर हलकेच तरंगणारे ते सोनेरी रंग पाहतांना कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळी आठवल्या.

आवडतो मजला अफाट सागर

अथांग पाणी निळे

निळ्या जांभळ्या जळात केशर

सायंकाळी मिळे..

हवेतला  तो गुलाबी गारवा! स्तब्ध होत होतं सारं.. मन, डोळे जणूं अमृत प्राशन केल्यासारखे तृप्त होत होते. हलके हलके काळोखात बुडत चाललेला दिवस जणू काही उद्याचा नवा प्रकाश घेऊन येण्याचं आश्वासन देऊनच परतत होता. थोड्यावेळापूर्वीचा प्रकाशातला तो रोमँटिक निसर्ग कसा नि:शब्दपणे गूढ होत चालला होता.

ठीक साडेसात वाजता क्रुझ वर डिनर सुरू झाले. सोबत मस्त संगीत. आमच्याबरोबरचे युवक— युवतींचे मेळावे  अगदी धुंद, उत्तेजित झाले होते. आणि त्यांच्या समवेत त्यांना पाहताना नकळत आम्ही आमच्या गतकाळात जात होतो. कुठेतरी आजच्या आणि कालच्या काळाशी तुलनाही करत होतो. पण त्या क्षणी मात्र त्यांचं हे तारुण्य, जगणं, जीवन साजरं करणं पाहून निश्चितच हरखूनही गेलो होतो. त्यांचा प्रवास आमचा प्रवास निराळा होता. त्यांचं बाली पर्यटन आणि आमचं बाली पर्यटन यात खूप फरक होता. फरक ऊर्जेचा होता, मस्ती, भोगणं इतकच नव्हे तर खाण्यापिण्यातलाही होता. भरभरून जगणं आणि खूप काही जगून झाल्यानंतरच जगणं यातला फरक होता. समान फक्त एकच होतं. अनुभव. आनंदाचा, रिफ्रेश होण्याचा, रिक्रिएशनचा.

भरभरून खायला होतं. गरमागरम, आकर्षक आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल होती.शौकीनांसाठी जलपानही होते. एकंदरच इंडोनेशियन जेवणाचा थाट औरच होता. उत्सुकतेपोटी आम्ही निरनिराळे पदार्थ चाखून पाहिले. काही आवडले, काही बेचव  वाटले. पण एकंदर अन्नसेवनाचा यज्ञ कर्म मजेत पार पडला.

त्यानंतर खास क्रुझ वरील सर्व पाहुण्यांसाठी  मनोरंजनाचा कार्यक्रम होता. अर्थातच संगीत आणि नृत्य. मुळातच बालीयन हे कलासक्तच आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय हे त्यांच्या धमन्यातूनच वाहत असावं.

बालीनीज नृत्य पाहण्याची आम्हालाही फार उत्सुकता होती.

बालीनीज  नृत्य हे लोक परंपरेचं प्रतीक आहे. शास्त्रोक्त पद्धतीची ती एक अतिशय मनोरम अशी नृत्यकला आहे. बालीनीज नृत्याच्या माध्यमातून नाट्यमयरीत्या हिंदू परंपरा, तसेच रामायण— महाभारतातील कथांची अतिशय मनोहारी मांडणी केली जाते. अनेक वाईट गोष्टींचे, विकारी वृत्तींचे (एव्हिल स्पिरिट्स) दमन हा विषय या नृत्याच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सादर केला जातो. या संपूर्ण नृत्यात हस्त,पाद, मान, बोटे, डोळे यांच्या कलापूर्ण हालचालीतून प्रेक्षकांसमोर पौराणिक कथा उलगडत जाते.  चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर, सत्याचा असत्यावर,  देववृत्तीचा असुर वृत्ती वर विजय कसा होतो याचं अत्यंत आकर्षक देहबोली आणि मुद्राभिनयातून केलेलं प्रकटीकरण पाहताना प्रेक्षक थक्क होतात.

या बालीनीज नृत्या मागे अनेक वर्षांचा इतिहासही आहे. पंधराव्या शतकापासून बालीनीजची सांस्कृतिक परंपरा काहीशी बदलू लागली आणि हिंदू धर्मीय एक प्रकारच्या या नृत्य कलेतून एकत्र यायला लागले, अधिक जोडले जाऊ लागले.

तसे या शास्त्रोक्त पारंपारिक नृत्याचे अनेक प्रकार आहेत बारोंग, फ्रॉग, जॉग, जेगॉग,लेंगोंग काकॅक वगैरे. आणि प्रत्येक नृत्य प्रकारची वैशिष्ट्ये निराळी आहेत. विषय निराळे आहेत, पोशाख वेगळे आहेत. आमच्यासमोर बोटीवर जे नृत्य सादर होत होते ते बारोंग प्रकारातले होते.यात राधाकृष्णाची प्रेमलीला होती.

पुरुष आणि स्त्रियांचा नृत्य करताना परिधान केलेला पोशाख ही आकर्षक होता. या पोशाखाचे दोन भाग असतात. वरचा व खालचा कमरेपासून पायापर्यंतचा. वरच्या भागाला सॅश म्हणतात व खालच्या भागाला केन म्हणतात. संपूर्ण पोशाखाला साबुक असे म्हणतात. आणि प्रामुख्याने कपड्याचा रंग सोनेरी असतो. डोक्यावर टोपेग नावाचा लाकडी कला कुसरीचा मोठा गोल मुकुट असतो. बाकी गळ्यात, हातात केसात, फुलांच्या,खड्यांच्या  माळा घातलेल्या असतातच. नाचताना त्यांच्या हातात कधी पंखे, कधी फुलांच्या कुंड्याही असतात. एकंदर हा डान्स अतिशय नयनरम्य असतो. हे नृत्य बघत असताना मला केरळमधील कथकली, मोहिनीअट्टम किंवा ओडिसी नृत्याची प्रामुख्याने आठवण झाली.  देशोदेशीच्या कला कुठेतरी समानतेच्या धाग्याने जोडलेल्या असतात हे नक्कीच.

तर मित्रांनो!अशा रितीने  चौफेर आनंदाचा अनुभव घेत आम्ही रात्री अकरा वाजता घरी परत आलो.आमच्या बाली सफरीचा हा समारोपाचा टप्पा होता.  दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता आमची परतीची फ्लाईट होती.डेनसपार ते सिंगापूर ते मुंबई.

बाली बेटावरचा अविस्मरणीय आनंदाचा अनुभव घेऊन आता भारतात परतायचे होते. या आठ दिवसात इंडोनेशियातील बाली या निसर्गरम्य बेटाशी आमचं एक आनंददायी आणि भावनिक नातच जुळून आलं होतं.  इथला निसर्ग, हिंदी महासागराचे विहंगम नजारे, इथली संस्कृती,  परंपरा, कला आणि माणसं यांच्याशी एक रेशीम धागा नकळत जुळला गेला होता.

बाली हे जसं देवांचं बेट तसं बाली हे स्वप्नांचंही बेट आहे.  इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. शांतता आणि विश्रांतीच्या शोधात आलेल्या पर्यटकांसाठी समुद्राच्या लाटा पाहणे, सूर्योदय, सूर्यास्त पाहणे, पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणे हे सारं काही आहे. तरुणांसाठी इथे आनंददायी नाईट लाईफ आहे, आकर्षक मार्केट्स आहेत! हिरवीगार जंगले आहेत, कायाकिंग,सर्फरायडींग ,स्कुबा डायव्ह पॅरासेलिंग सारख्या साहसी सागरी क्रीडा आहेत. भौतिकता आणि आध्यात्मिकता यांची झालेली एक विलक्षण सरमिसळही इथे पाहायला मिळते.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरची आमची ही बाली सहल आमच्यासाठी नक्कीच आनंदाची ओंजळ ठरली. वयाची आठवण ठेवूनही आम्ही या बेटावरचा प्रत्येक क्षण बेभानपणे जगलो मात्र. आणि जगणं हे किती आनंददायी आहे हा मंत्र घेऊन आणि आता पुढची सहल कुठे असे ठरवतच  भारतात परतलो. आमच्या विमानाने बालीची भूमी सोडली आणि उंच आकाशात झेप घेतली. पुन्हा एकदा वरून दिसणाऱ्या अथांग महासागराचे आणि गगनचुंबी गरुड विष्णूच्या शिल्पाचे निरोपाचे दर्शन घेतले आणि भारताच्या दिशेने .,”चला आता आपल्या घरी, आपल्या देशी” या भावनिक ओढीने आणि इतक्या दिवसांच्या मित्र—मैत्रीणीच्या,सहवासाच्या  विरहाची हुरहुर बाळगत परतीच्या प्रवासासाठीही आनंदाने  तयार झालो.

इथेच बाली सहलीची सफल संपूर्ण कहाणी समाप्त!

— समाप्त — 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर 

— Fire Dance 

फायर डान्स —अग्नि नृत्य म्हणजे बाली बेटावरचे एक प्रमुख आकर्षण.

समुद्रकिनाऱ्यावर उतरत्या संध्याकाळी या नृत्याचे भव्य सादरीकरण असतं. बीचवर जाण्याच्या सुरुवात स्थानापर्यंत आम्हाला हॉटेलच्या शट्ल सर्विस ने सोडले.  उंच टेकडीवरून आम्हाला समुद्राचे भव्य दर्शन होत होते. ज्या किनाऱ्यावर हे अग्नी नृत्य होणार होते तिथपर्यंत पोहोचाण्याचा रस्ता बराच लांबचा, डोंगरावरून चढउताराचा, पायऱ्या पायऱ्यांचा होता.  सुरुवातीला कल्पना आली नाही पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसे जाणवले की हे फारच अवघड काम आहे.  त्यापेक्षा आपण खालून किनाऱ्यावरून चालत का नाही गेलो? तो रस्ता जवळचा असतानाही— असा प्रश्न पडला. अर्थात त्याचे उत्तर यथावकाश आम्हाला मिळालेच. ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेनच.  तूर्तास आम्ही धापा टाकत जिथे नृत्य होणार होते तिथे पोहोचलो.

बरोबर संध्याकाळी सहा वाजता हे अग्नी नृत्य सुरू झाले. चित्र विचित्र ,रंगी बेरंगी,चमचमणारी वस्त्रं ल्यायलेले, अर्धे अधिक उघडेच असलेले नर्तक आणि नर्तिकांनी हातात पेटते पलीते असलेली चक्रे फिरवून नृत्याला सुरुवात केली. समोर सादर होत असलेल्या त्या नृत्य क्रीडा, पदन्यास आणि ज्वालांशी लीलया चाललेले खेळ खरोखरच सुंदर तितकेच चित्तथरारक होते.  आपल्याकडच्या गोंधळ, जागर यासारखाच लोकनृत्याचा तो एक प्रकार होता. संगीताला ठेका होता. अनेक आदिवासी नृत्यंपैकी  हे एक नृत्य.साहस आणि कला यांचं अद्भुत मिश्रण होतं.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

झळाळती कोटी ज्योती या….

या जुन्या गाण्याचीही आठवण झाली. 

काळोखात चाललेलं आभाळ, लाटांची गाज, मऊ शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात चाललेलं ते अग्नी प्रकाशाचे नृत्य फारच प्रेक्षणीय होतं. उगाच  काहीसं भीषण आणि गूढही वाटत होतं.एक तास कसा उलटला ते कळलंही नाही.

परतताना मात्र आम्ही आल्यावाटेने गड चढत जाण्यापेक्षा सरळ वाळूतून चालत जायचे ठरवले. तिथल्या स्थानिक माणसाने आम्हाला एवढेच सांगितले,” अर्ध्या तासात समुद्राला भरती येईल. मात्र दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही शटल पॉईंट ला पोहोचालच.  जा पण सांभाळून..” 

मग असे आम्ही सहा वृद्ध वाळूतून चालत निघालो.  वाळूतून चालणारे फक्त आम्हीच असू.बाकी सारे मात्र ज्या वाटेने आले त्याच वाटेने जाऊ लागले.

हळूहळू लक्षात आले वाळूच्या अनंत थरातून चालणे  सोपे नव्हते.  पाय वाळूत रुतत होते.  रुतणारे पाय काढून पुढची  पावले टाकण्यात भरपूर शक्ती खर्च होत होती. अंधार वाढत होता.समुद्र पुढे पुढे सरकत होता. आमच्या सहा पैकी सारेच मागे पुढे झाले होते. समुद्राच्या भरतीची वेळ येऊन ठेपत होती.

विलासला फूट ड्रॉप असल्यामुळे तो अजिबात चालूच शकत नव्हता.  आम्ही दोघं खूपच मागे राहिलो.  मी विलासला हिम्मत देत होते. थोड्या वरच्या भागात येण्याचा प्रयत्न करत होतो पण विलास एकही पाऊल उचलूच शकत नव्हता आणि तो वाळूत चक्क कोसळला. त्या विस्तीर्ण समुद्राच्या वाळूत, दाटलेल्या अंधारात आम्ही फक्त दोघेजण! आसपास कुणीही नाही. दोघांनाही आता जलसमाधी घ्यावी लागणार हेच भविष्य दिसत होतं. मी हाका मारत होते…” साधना, सतीश प्रमोद हेल्प हेल्प”

मी वाळूत उभी आणि विलास त्या थंडगार वाळूत त्राण हरवल्यासारखा निपचीत पडून. एक भावना चाटून गेली.

We have failed” आपण उंट नव्हतो ना…

कुठून तरी  साधना धडपडत कशीबशी आमच्याजवळ आली मात्र. सतीश ने माझी हाक ऐकली होती. समोरच बीच हाऊस मधून त्यांनी काही माणसांना आमच्यापर्यंत जाण्यास विनंती  केली.. दहा-बारा माणसं धावत आमच्या जवळ आली.  सतीशच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. कारण त्याने त्याच क्षणी जाणले होते की हे एक दोघांचं काम नव्हे. मदत लागणार.मग त्या माणसांनी कसेबसे विलासला उभे केले आणि ओढत उंचावरच्या पायऱ्या पर्यंत आणले. तिथून एका स्विमिंग बेड असलेल्या खुर्चीवर विलासला झोपवून पालखीत घालून आणल्यासारखे शटल पॉईंट पर्यंत नेले. हुश्श!!आता मात्र आम्ही सुरक्षित होतो. चढत जाणाऱ्या समुद्राला वंदन केले. त्याने त्याचा प्रवाह धरुन ठेवला होता का? त्या क्षणी ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली.  आमच्या मदतीसाठी आलेली माणसं मला देवदूता सारखीच भासली. जगाच्या या अनोळखी टोकावर झालेल्या मानवता दर्शनाने आम्ही सारेच हरखून गेलो. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या संमिश्र भावनांच्या प्रवाहात मात्र वाहून गेलो. या प्रसंगाची जेव्हा आठवण येते तेव्हा एकच जाणवते, देअर इज नो शॉर्टकट इन  लाईफ

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू  नको..हेच खरे.

शरीराने आणि मनाने खूप थकलो होतो गादीत पडताक्षणीच झोप लागली.

दुसऱ्या दिवशीची सकाळ छान प्रसन्न होती. विलास जरा नाराज होता कारण कालच्या थरारक एपीसोडमध्ये त्याचा मोबाईल मात्र हरवला.पण आदल्या दिवशी ज्या दुर्धर प्रसंगातून आम्ही दैव कृपेने सही सलामत सुटलो होतो,  त्या आठवणीतच राहून निराश, भयभीत न होता दुसऱ्या दिवशी आमची टीम पुन्हा ताजीतवानी  झाली. सारेच पुढच्या कार्यक्रमाचे बेत  आखू लागले.

आज सकाळी कर्मा कंदारा— विला नंबर ६७ च्या खाजगी तरण तलावावर जलतरण करण्याचा आनंद मनसोक्त लुटायचा हेच ठरवले.

अवतीभवती हिरव्या गच्चपर्णभाराचे वृक्ष आणि मधून मधून डोकावणारी  पिवळ्या चाफ्याची गोजीरवाणी झाडे यांच्या समवेत तरण तलावात पोहतानाचा आनंद अपरंपारच होता.

अनेक वर्षांनी इथे, बालीच्या या नयनरम्य पार्श्वभूमीवर, सुरुवातीला काहीशा खोल पाण्यात झेप घेताना भयही वाटलं.  पण नंतर वयातली ३०/४० वर्षं जणू काही आपोआपच वजा झाली आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकलो. झाडं, पाणी आणि सोबतीला आठवणीतल्या कविता. 

थोडं हसतो थोडं रुसतो 

प्रत्येक आठवण 

पुन्हा जागून बघतो ।।

 

अशीच मनोवस्था झाली होती. 

सिंधुसम हृदयात ज्यांच्या

रस सगळे आवळले हो

आपत्काली अन् दीनांवर

घन होउनी जे वळले हो

जीवन त्यांना कळले हो..

बा.भ. बोरकरांच्या या कवितेतले ‘जीवन कळणारे’ ते म्हणजे जणू काही आम्हीच होतो हीच भावना उराशी घेऊन आम्ही तरण तलावातून बाहेर आलो.

असे हे  बालीच्या सहलीत वेचलेले संध्यापर्वातले खूप आनंदाचे क्षण!!

तसा आजचा दिवस कष्टमय, भटकण्याचा नव्हता. जरा मुक्त,सैल होता. 

इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा करण्यातली एक आगळी वेगळी मौज अनुभवली. 

ही गव्हाळ वर्णीय,, नकट्या नाकाची, गोबर्‍या गालांची, मध्यम उंचीची, गुगुटीत ईंडोनेशीयन  माणसं खूप सौजन्यशील, उबदार हसतमुख आणि आतिथ्यशीलही  आहेत.

भाषेचा प्रमुख अडसर होता.कुठलीही  भारतीय भाषा त्यांना अवगत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण इंग्रजीही त्यांना फारसं कळत नव्हतं. ते त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. पण गंमत सांगते,भाषेपेक्षाही मुद्राभिनयाने, हातवारे, ओठांच्या हालचालीवरूनही प्रभावी संवाद घडू शकतो याचा एक गमतीदार अनुभवच आम्ही घेतला.

सहज आठवलं ,पु.ल.  जेव्हा फ्रान्सला गेले होते तेव्हा दुधाच्या मागणीसाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कागदावर चक्क एका गाईचे चित्रच काढून दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार आम्ही येथे अनुभवला. 

बाली भाषेतले काही शब्द शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात राहिला तो एकच शब्द सुसु.

बाली भाषेत दुधाला सुसू म्हणतात. 

पण त्यांनीही आपले ,’नमस्कार, शुभ प्रभात, कसके पकडो वगैरे आत्मसात केलेले शब्द, वाक्यं, त्यांच्या पद्धतीच्या उच्चारात बोलून दाखवले. माणसाने माणसाशी जोडण्याचा खरोखरच तो एक भावनिक क्षण होता!

या भाषांच्या देवघेवीत आमचा वेळ अत्यंत मजेत मात्र गेला आणि त्यांच्या प्रयत्नपूर्वक मोडक्या तोडक्या  इंग्लिश भाषेद्वारे बाली विषयी काही अधिक माहितीही मिळाली.

राजा केसरीवर्माने या बेटाचे नाव बाली असे ठेवले.

बाली या शब्दाचा अर्थ त्याग.

बाली या शब्दाचे मूळ, संस्कृत भाषेत आहे आणि या शब्दाचा सामर्थ्य, शक्ती हाही एक अर्थ आहे.आणि तो अधिक बरोबर वाटतो.

आणखी एक गमतीदार अर्थ त्यांनी असा सांगितला की बाली म्हणजे बाळ.  बालकाच्या सहवासात जसा स्वर्गीय आनंद मिळतो तसेच स्वर्गसुख या बाली बेटावर लाभते.

बाली बेटावरच्या स्वर्ग सुखाची कल्पना मात्र अजिबात अवास्तव नव्हतीा हे मात्र खरं!!

संध्याकाळी कर्मा ग्रुप तर्फे झिंबरान बीच रिसॉर्टवर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी डिनर होते.जाण्या येण्यासाठी त्यांच्या गाड्या होत्या.

संगीत ,जलपान आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती.वातावरणात प्रचंड मुक्तता होती. खाणे पिणे आणि संगीत ,सोबत तालबद्ध संगीतावर जमेल तसे केवळ नाचणे.  थोडक्यात वातावरणात फक्त आनंद आणि आनंदच होता आणि या आनंदाचे डोही आम्हीही अगदी आनंदे डुंबत  होतो.LIVE AND LET LIVE.

बाॅबी मॅक फेरीनच्या गाण्यातली ओळ ओठी आली..

 DONT WORRY BE HAPPY

OOH OH OH

– क्रमश: भाग सहावा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर 

चांडी सार पासून सानुर एक दीड तासावरच आहे.(by road)  बॅगा पॅक करून, भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. दोन निळ्या रंगाच्या स्वच्छ आणि आरामदायी टॅक्सीज आमच्यासाठी हजरच होत्या ऐटदार गणवेशातले हसतमुख ड्रायव्हर्स  आमच्यासाठी स्वागताला उभे  होते. दीड दोन तासातच आम्ही आमच्या कर्मा रॉयल सानुर रिसॉर्टला पोहोचलो.  पुन्हा एक सुंदर अद्ययावत सुविधांचा बंगला.  सभोवताली आल्हाददायी रोपवाटिका आणि जलतरण तलाव. इथे एक आवर्जून सांगावसं वाटतं की प्रत्येक शयनगृहात शयनमंचावर चाफ्याची फुले पसरलेली होती आणि हिरव्या पानांच्या कलात्मक रचनेत वेलकम असे लिहिले होते. मन छान गुलाबी होउन गेले हो!

वातावरणात काहीशी उष्णता आणि दमटपणा असला तरी थकवा मात्र जाणवत नव्हता. मन ताजे प्रफुल्लित होते. एका वेगळ्याच सुगंधी, मधुर आणि थंड पेयाने आमचे शीतल स्वागतही झाले. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आम्ही ८० च्या उंबरठ्यावरचे सहा जण नकळतच वय विसरत होतो हे मात्र खरे.

इथे आम्ही फक्त एकच दिवस थांबणार होतो.

संध्याकाळी जवळच असलेल्या सिंधू बीचवर जायचे आम्ही ठरवले. इथल्या अनेक दुकानांची नावे, समुद्रकिनार्‍यांची नावे, अगदी माणसांची विशेषनामेही  संस्कृत भाषेतील आहेत.  पुराणातल्या व्यक्तींची नावे आहेत.  जरी बालीनीज लिपीतल्या पाट्या वाचता येत नसल्या तरी इंग्लिश भाषांतरातील भगवान, कृष्णा, महादेव सिंधू अशी नावे कळत होती.नावात काय आहे आपण म्हणतो पण परदेशी गेल्यावर आपल्या भाषेतलं नाव आपुलकीचं नातं लगेच जोडतं.

संध्याकाळी बीचवर फिरायचे व तिथेच रेस्टॉरंट मध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा आम्ही ठरवले. हा समुद्रकिनारा काहीसा चौपाटी सदृश होता. पर्यटकांची गर्दी होती. फारशी स्वच्छता ही नव्हती. फेरीवाले, किनाऱ्यावरची दुकाने ,हॉटेल्स यामुळे या परिसरात गजबज आणि काहीसा व्यापारी स्पर्श होता.  पण बाली बेट हे खास सहल प्रेमींसाठीच असल्यामुळे वातावरणात मात्र मौज मजा आनंद होता.  तिथे चालताना मला पालघरच्या केळवा बीचची आठवण झाली. रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणारी गरीब विक्रेती माणसं, यात अधिक तर स्त्रियाच होत्या.  इथे भाजलेली कणसे आणि शहाळी पिण्याचा काहीसा ग्रामीण आनंद आम्ही लुटला. पदार्थ ओळखीचे जरी असले तरी चावीमध्ये बदल का जाणवतो? इथले मीठ तिखट, आपले मीठ तिखट हे वेगळे असते का? की जमीन, पाणी, अक्षांश रेखांश या भौगोलिक घटकांचा परिणाम असतो? देशाटन करताना या अनुभवांची खरोखरच मजा येते.

इथल्या फेरीवाल्यांकडे आम्ही अगदी निराळीच कधी न पाहिलेली न खाल्लेली अशी स्थानिक फळे ही  चाखली. मॅंगो स्टीन नावाचे वरून लाल टरफल असलेले टणक फळ फारच रसाळ आणि मधुर होतं .फोडल्यावर आत मध्ये लसणाच्या पाकळ्यासारखे छोटे गर होते. काहीसं किचकट असलं तरी हे स्थानिक फळ आम्हाला खूपच आवडलं. 

बालीमध्ये भरपूर फळे मिळतात.  अननस, पपनस, पपया, फणस, आंबे पेरू या व्यतिरिक्त इथली दुरियन (काटेरी फणसासारखं पण लहान ), लाल रंगाचं केसाळ मधुर चवीचं राम्बुबुटन,टणक  टरफल फोडून आत काहीसा करकरीत सफरचंदासारखा गर असलेले सालक.. असा बालीचा  रानमेवा खाऊन आम्ही तृप्त झालो. 

 पाणी प्यावं बारा गावचं, चाखावा रानमेवा देशोदेशीचा—— असंच म्हणेन मी.

सी फुड साठी प्रसिद्ध असलेलं हे बाली बेट.  शाकाहारी लोकांसाठी भरपूर पर्याय असले तरी मासे प्रेमी लोकांसाठी मात्र येथे खासच मेजवानी असते असे म्हटले तर ते चुकीचे नाही.

समुद्रकिनाऱ्यावर आम्ही असे खात पीत भरपूर भटकलो. सहा म्हातारे तरुण तुर्क!  

आता आम्हाला  स्थानिक मासे खाण्याचा आनंद लुटायचा होता. मेरीनो नावाचे एक बालीयन रेस्टॉरंट आम्हाला आवडले.  किनाऱ्यावरचे सहा जणांचे टेबल आम्ही सुरक्षित केले. कसलीच घाई नव्हती. आरामशीर मासळी भोजनाचा आनंद लुटायचा हेच आमचे ध्येय होते. सारेच स्वप्नवत होते. समुद्राची गाज ,डोक्यावर ढगाळलेलं आकाश आणि टेबलावर मस्त तळलेले खमंग चमचमीत ग्रेव्हीतले मोठे झिंगे( प्राॅन्स) , टुना मासा आणि इथला प्रसिद्ध बारा मुंडी मासा. सोबतीला सुगंधी गरम आणि नरम वाफाळलेला भात आणि हो.. सोनेरी जलपानही. रसनेला आणखी काय हवे हो? गोड गोजीर्‍या बालीयन लेकी आम्हाला अगदी प्रेमाने वाढत होत्या! बाळपणीच्या, तरुणपणीच्या आठवणीत रमत आम्ही सारे तृप्तीचा ढेकर देत फस्त केले.  वृद्धत्वातही शैशवाला जपण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. नंतर पावसाच्या सरी बरसु लागल्या. भिजतच आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि टॅक्सी करून रिसॉर्टवर परतलो. जेवणाचे बिल अडीच लाख आयडिआर, आणि टॅक्सीचे बिल तीस हजार आयडिआर. धडाधड नोटा मोजताना आम्हाला खूपच मजा वाटायची.

आता आमच्या सहलीचे तीनच दिवस उरलेले होते आणि या पुढच्या तीन दिवसाचा आमचा मुक्काम कर्मा कंदारा येथे होता. कंदारा मधली  कर्मा ग्रुपची ही प्रॉपर्टी केवळ रमणीय होती. निसर्ग, भूभागाची नैसर्गिक उंच सखलता, चढ-उतार जसेच्या तसे जपून इथे जवळजवळ ७० बंगले बांधलेले आहेत. आमचा ६७ नंबरचा बंगला फारच सुंदर होता.आरामदायी, सुरेख डेकाॅर, सुविधायुक्त, खाजगी जलतरण तलाव, खुल्या आकाशाखाली ध्यानाची केलेली व्यवस्था वगैरे सगळं मनाला प्रफुल्लित करणार होतं. रिसेप्शन काउंटर पासून आमचा बंगला काहीसा दूर होता. पण इकडून तिकडे जायला बग्या होत्या.  एकंदरीत इथली सेवेतली तत्परता अनुभवताना समाधान वाटत होते. बारीक डोळ्यांची गोबर्‍या गालांची, चपट्या नाकांची, ठेंगणी गुटगुटीत बाली माणसं आणि त्यांची कार्यक्षमता प्रशंसनीय होती. त्यांच्या बोलण्या वागण्यात एक प्रकारचा उबदारपणा होता.  वास्तविक फारसे उद्योगधंदे नसलेला हा प्रदेश. शेती, मच्छीमारी या व्यतिरिक्त पर्यटन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय.  त्यांचे सारे जीवन हे देशोदेशाहून येणाऱ्या पर्यटकांवरच अवलंबून. त्यामुळे पर्यटकांना जास्तीत जास्त कसे खूश ठेवता येईल  यावरच त्यांचा भर असावा.

यानिमित्ताने दक्षिण पूर्व आशिया खंडातल्या इंडोनेशियाबद्दलही माहिती मिळत होती. इथल्या बाली  बेटावर आमचं सध्याचं वास्तव्य होतं. मात्र जकार्ता राजधानी असलेला  इंडोनेशिया म्हणजे जवळजवळ १७००० बेटांचा समूह हिंदी आणि पॅसिफिक महासागरात पसरलेला आहे. हिंदू आणि बुद्ध धर्माचे वर्चस्व असले तरी ८७ टक्के लोक मुस्लिम आहेत. जवळजवळ तीन शतके इथे डच्यांचे राज्य होते. १७ ऑगस्ट १९४५ साली नेदरलँड पासून ते स्वतंत्र झाले आणि प्रेसिडेन्शिअल युनिटरी स्टेट ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया म्हणून ओळखले जाऊ लागले जगातली तिसरी मोठी लोकशाही येथे आहे २००४  पासून जोकोविडो हे इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत. अनेक नैसर्गिक आपत्ती, भौगोलिक विषमता, जात, धर्म भाषेतील अनेकता सांभाळत इंडोनेशियाची इकॉनॉमी ही जगात सतराव्या नंबर वर आहे. 

इथल्या वास्तव्यातलं आमचं आजचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे बाली फायर डान्स . अग्नी नृत्य.  याविषयी आपण पुढच्या भागात वाचूया.

 – क्रमशः भाग पाचवा  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – १० ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – १० ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला लवून अखेरचा कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मंडळी, आपण मागील भागांत शिलॉन्गची सफर केली. पण सफर कुठलीही का असेना, शॉपिंग केल्याशिवाय ती पूर्णत्वाला येतच नाही. प्रत्येक ठिकाणी कांही ना कांही विशिष्ट वस्तू असतातच, त्यांचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा याचे उपजत ज्ञान महिलावर्गाला असतेच असते. तेव्हां पुरुषमंडळींनी लांबलचक पायपीट करणे आणि ब्यागा उचलणे या गोष्टींची मानसिक आणि शारीरिक तयारी करून सिद्ध व्हावे!

शॉपिंग

डॉन बॉस्को संग्रहालयात एक दुकान आहे, तिथे मेघालयची स्मरणिका म्हणून बऱ्याच गोष्टी घेता येतील. बांबू अन वेताच्या वस्तू, स्वेटर, शाली आणि बरंच कांही असलेल्या या दुकानांत तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता! आम्ही इथे बरीच खरेदी केली. मात्र इथली मुख्य स्वस्त आणि मस्त अशी बाजारपेठ म्हणजे पोलिसबाजार! शहराच्या मधोमध असलेली ही जागा सतत गजबजलेली असते! फुटपाथवर असलेली बहुतेक दुकाने स्वयंसिध्दा स्त्रियाच चालवतात. अत्यंत सक्षम, आत्मविश्वासाने समृद्ध पण मृदुभाषी अशा या विविध वयाच्या स्त्रिया बघून मला खूप अप्रूप वाटले. मित्रांनो परत एकदा आठवण करून देते, या स्त्री सक्षमतेची दोन मुख्य कारणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि साक्षरता! येथील मुलींना “चिंकी” म्हणून हिणवणाऱ्या लोकांनी इथे प्रत्यक्ष भेट द्यावी अन आत्मचिंतन करीत स्वतःलाच प्रश्न विचारावा की, प्रत्येक क्षेत्रात येथील स्त्रिया अव्वल का आहेत? इथे घासाघीस (बार्गेनिंग) करण्यास भरपूर वाव आहे, त्यामुळे महिलावर्गाला शॉपिंगचा मनमुराद आनंद उपभोगता येईल! शॉपिंग करून दमला असाल तर एक देखणे कॅफे आणि बेकरी आहे (Latte love cafe), तिथे  संगीत ऐकत निवांत बसा आणि क्षुधा शांत करा! आम्ही येथील पोलीस बाजारात बरीच खरेदी केली. कपडे, स्वेटर, शाली, वेताच्या वस्तू आणि बरेच काही!

आता मला आवडलेल्या मेघालय येथील दोन रेस्टॉरंटची माहिती देते. एक होते डॉकी ते सोहरा प्रवासात गावलेले. जेवण, नाश्ता इत्यादीकरता भरपूर चॉईस, शिवाय निसर्गरम्य अन स्वच्छ परिसर आणि अतिशय अदबीने वागणारा हॉटेल स्टाफ! रेस्टॉरंटचे नांव होते “Ka Bri War Resort”. दुसरे होते सोहरा (चेरापुंजी) येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट, “Orange Roots”. हे पर्यटकांचे आवडते रेस्टॉरंट, इथे गर्दी नेहमीचीच, बाहेरच प्रवेशद्वाराजवळ एका काळ्या फळ्यावर लिहिलेला मेन्यू वाचायचा, अन ऑर्डर देऊनच आत शिरायचे. आपण कुठे बसतोय याची माहिती दारातील रिसेप्शनिस्टला दिली की झाले! आत सर्वत्र स्त्रियांचेच साम्राज्य, तुमच्यासमोर काही वेळातच स्वादिष्ट जेवण किंवा नाश्ता येणार. शिवाय प्रवेशद्वाराच्या बाहेर एक छोटे दुकान देखील आहे, विविध चवींचा चहा (पावडर व पत्ती), मसाले (मुखतः कलमी)आणि इतर वस्तू इथे मिळतात.

शिलॉन्ग येथील निवासी हॉटेल्स

आम्ही D Blanche Inn या शिलॉन्ग येथील हॉटेल मध्ये २ दिवस वास्तव्य केले. या टुमदार हॉटेलचा परिसर निसर्गरम्य होता. भोवताली हिरवाई अन निळे डोंगर, तसेच हॉटेलच्या आवारात सुंदर वृक्षवल्ली अन फुलझाडे बहरलेली होती. हॉटेल स्वच्छ अन सुख सुविधांनी परिपूर्ण होते. जेवण आणि नाश्ता उपलब्ध होते. दुसरे होते La Chumiere गेस्ट हाऊस, जुन्या काळचा, कुणा श्रीमंत व्यक्तीचा प्रशस्त दुमजली बंगला आता गेस्ट हाऊस मध्ये परिवर्तित करण्यात आलाय! बंगल्यातील खोल्या मोठ्या अन सुखसोयीयुक्त आहेत. बंगल्याचे संपूर्ण आवार हिरवाई अन विविध प्रकारच्या सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित आहे. मी इथल्या बगीच्यात सकाळी रमतगमत चहा घेतला. बंगल्यातच ऑर्डर देऊन जेवण आणि नाश्ता उपलब्ध होता, दोन्ही अतिशय चविष्ट होते. आमच्या घरची मंडळी जेव्हा डेविड स्कॉट ट्रेल करता सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत बाहेर होती, तेव्हा मी या बंगल्यात निवांतपणे रिलॅक्स करीत होते.

खासी लोकांची खास खासी भाषा

मेघालयातील तीन जनजातींची खासी (Khasi), गारो (Garo), जैंतिया (Jaintia) अन इंग्रजी या सरकारमान्य भाषा आहेत. खासी भाषेविषयी आम्हाला सॅक्रेड फॉरेस्ट येथील गाईडने सांगितले की एका ख्रिश्चन धर्मगुरूने या भाषेकरिता इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून खासी भाषेकरता एक स्वतंत्र लिपी तयार केली (चित्र दिले आहे) यात २३ इंग्रजी मुळाक्षरे आहेत! आता खासी भाषेकरिता ही लिपी मेघालयात सर्वत्र (शाळा-कॉलेज मध्ये देखील) वापरली जाते. याशिवाय येथे इंग्रजीचा वापर प्रचलित आहे.

शिलॉन्ग विमानतळ

आमचे अंतिम डेस्टिनेशन शिलॉन्ग विमानतळ होते, अजयने आम्हाला विमानतळावर सोडले. तिथे एका कोपऱ्यात मेघालयची संस्कृती दर्शवणारी छोटीशी सुबक झोपडी बनवलेली होती तसेच बांबूच्या वस्तू ठेवल्या होत्या, खास फोटो काढण्यासाठी! आम्ही तिथे लगेच फोटो काढले. शिलॉंग ते कोलकोता अन तेथून मुंबई अशा २ विमानांचे आमचे आरक्षण होते. येथून इंडिगो एअरलाईन्सचे विमान दुपारी ४ वाजता सुटणार होते, मात्र ४.४५ वाजता कळले की दाट धुक्यामुळे हे विमान इथे येणार नाही, आम्ही विमनस्क आणि हताश होतो, तशातच इंडिगोच्या स्टाफने आम्हाला बोलावले व आम्ही तुमच्यासाठी गुवाहाटी ते दिल्ली किंवा कोलकोता अन पुढे मुंबई अशी २ विमानांत तुमच्या प्रवासाची सोय करू असे सांगितले. आम्ही तडक त्यांच्या सूचना पाळीत त्यांच्याच कॅबने गुवाहाटी विमानतळावर गेलो (सुमारे ३ तासात ११० किलोमीटर) अन अखेर गुवाहाटी ते दिल्ली अन दिल्ली ते मुंबई असे, रात्री १० ला पोचायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला घरी पोचलो. आमची गैरसोय नक्कीच झाली, मात्र मी इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफचे आभार मानते, त्यांनी अत्यंत तत्परतेने स्वतः होऊन आमचा हा सर्व प्रवास निःशुल्क उपलब्ध करून दिला. आम्ही गुवाहाटी ते मुंबई हा सरळ विमानप्रवास करावयास पाहिजे होता असे नंतर वाटले. मात्र शेवटी आमची ही देखील यात्रा सफल आणि संपूर्ण झाली अन ११ दिवसांनी होम स्वीट होम या रीतीने मी पुनश्च एकदा माझ्याच घराच्या प्रेमात (बेडवर) पडले!

आम्ही मेघालयचा थोडाच (बहुतांश उत्तरेकडील) भाग पाहिला, पण संपूर्ण समरस होऊन! याचे बहुतेक श्रेय माझा जावई उज्ज्वल (बॅनर्जी) आणि माझी नात अनुभूती यांच्या नियोजनाला तसेच माझी मुलगी आरती हिला देईन. यात होम स्टे व गेस्टहाऊस ने खूप मजा आणली, तसेच उपलब्ध वेळात चांगले स्पॉट्स बघितलेत. जातांना मी द्विधा मनस्थितीत होते की, मला हा प्रवास झेपेल किंवा नाही, पण या तिघांनी मला खूप सांभाळून घेतलं, मी तर म्हणेन अगदी पावला-पावलाला, अन म्हणूनच मेघालय मला इतके पावले अन भावले. अर्थात आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तींचे आभार कसे मानायचे म्हणून आपण बहुदा ते करत नाही, पण मी मात्र ते अगदी मनापासून मानते, किंबहुना ते मनाच्या आतल्या हळव्या कोपऱ्यातूनच आलेले आहेत!!!

मंडळी, मेघालयच्या ११ दिवसांच्या प्रवासाचे वर्णन इतके लांबेल आणि त्याचे १० भाग लिहीन असे मला कल्पनेत सुद्धा वाटले नव्हते, मात्र आता या प्रवासाला विराम देण्याची वेळ आली आहे!

पुढील प्रवासवर्णनाचा योग येईल तेव्हा येईल!

खासी, गारो और जैंतिया जनजातियों का फ्यूजन नृत्य

What A Wonder #Meghalaya | Meghalaya Tourism Official

तोपर्यंत सध्यातरी शेवटचे खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

प्रिय मैत्रांनो, माझ्या मेघालय प्रवासाच्या मालिकेचे सर्व भाग तुमच्यापर्यंत पोचवणाऱ्या ‘ई अभिव्यक्ती:मराठी’ चे प्रमुख संपादक श्री हेमंत बावनकर आणि त्यांच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद देते!

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

* या संपूर्ण सादरीकरणात समाविष्ट केलेली चित्रे व गाण्याची लिंक केवळ अभ्यासापुरतीच मर्यादित आहेत.

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर 

आमच्या रिसॉर्टला लागूनच समुद्रकिनारा असल्यामुळे आम्ही सकाळी समुद्रावरच फेरफटका मारला. ढगाळ वातावरणामुळे सूर्योदयाचा आनंद मात्र मनासारखा घेता आला नाही.  पण एकंदर सारे सुखद होते.

एक मच्छीमार त्याची छोटीशी नाव समुद्रात ढकलून काहीसा आत जाऊन मासेमारी करत होता. थोड्यावेळाने तो परतला आणि त्याच्या जाळ्यात अडकलेली मासळी तो सोडवू लागला.  किनाऱ्यावर बोट खेचली, तिला उलटी करून त्यातले पाणी रेती उपसले.  पसरलेल्या जाळ्यांची नीट घडी घालून सारे आवरले आणि पकडलेल्या मासळीची थैली घेऊन तो परतला.  संपूर्ण भिजला होता. कमरेला आपल्या कोळ्यांसारखेच घट्ट वस्त्र आणि डोक्यावर आडवी टोकदार टोपी.  एकटाच मन लावून काम करत होता.  कदाचित मिळालेल्या मासळीवरच त्याची आजच्या दिवसाची उपजीविका असेल.  पण तो त्रासलेला, थकलेला वाटला नाही.  कर्तव्यनिष्ठ, जीवनाला सामोरा जाणारा धीट दर्यावर्दीच भासला.  पुन्हा एकदा वाटलं, देश कोणताही असू दे, माणूस भले रंगा रूपाने वेगळा असू दे, पण माणूस हा माणूसच असतो. भाव भावनांचं, जगण्याचं एकच रसायन.  प्रवासामध्ये असे वैचारिक दृष्टिकोन आपोआपच विस्तृत होत जातात.वसुधैव कुटुंबकम*याचा अर्थ कळतो.  एक सांगायचं राहिलंच!  त्या मच्छीमाराच्या टोपलीतले ताजे मासे पाहून आम्हा सगळ्यांनाच त्याच्याकडून एक तरी फ्रेश कॅच घ्यावा आणि मस्त भारतीय पद्धतीने तेलावर परतून खावा असे वाटले.  आम्हाला पाकखाना  व्यवस्था होती.  मात्र तेल, मीठ, तिखट आणावे लागले असते आणि त्यासाठी पुन्हा काही हजार आयडिआर लागले असते! म्हणून ती खमंग, चमचमीत कल्पना नाईलाजाने आम्ही सोडूनच दिली.

बाली इंडोनेशियन बेटावर मुक्तपणे हिंडताना जाणवत होता तो इथला  नयनरम्य निसर्ग !रम्य समुद्रकिनारे. पारंपारिक संस्कृती, सर्जनशीलता, कला, हस्तकला आणि इथल्या स्थानिक लोकांचा अस्सल उबदारपणा. बाली बेटावर फिरत असताना वेगळेपणा जाणवत असला तरी आपण भारतापासून दूर आहोत असे मात्र वाटत नाही. आंबा, केळी, नारळाची झाडे आपल्याला कोकण केरळची आठवण करून देतात.  हिरवीगार भाताची पसरलेली शेतं,  त्यावर अलगद पडलेले सूर्यकिरण आणि वातावरणात दरवळलेला आंबेमोहोराचा सुगंध हा अनुभव केवळ वर्णनातीत. डिसेंबर महिन्यातही आंब्याच्या झुबक्यांनी लगडलेले आम्रवृक्ष पाहताना मन आनंदित होते, थक्क होते.  रस्त्यावर जिकडे तिकडे बहरलेले गुलमोहर भारतातल्या चैत्र वैशाखाची आठवण करून देतात. टवटवीत विविध रंगाच्या बोगन वेली, पांढऱ्या आणि पिवळ्या चाफ्यांनी पानोपानी  बहरलेली झाडं  कॅमेरातली मेमरी संपवतात.  इथली जास्वंदी, एक्झोरा, झेंडू जणू काही  आपल्याशी संवाद साधतात.

“तुम्ही आणि आम्ही एकच आहोत” अशी भावना निर्माण करतात.

रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, फळवाले, खाद्यपदार्थांच्या गाड्या पाहताना तर वाटते हे सारं अगदी आपल्या देशातल्या सारखंच आहे.

रस्ते आखीव आणि रुंद असले तरी वाहनांची वर्दळ जाणवते. मात्र एक जाणवतं ते या वर्दळीला असलेली शिस्त.  अजिबात घाई नाही. नियम मोडण्याची वृत्ती नाही, हॉर्नचा कलकलाट, नाही सिग्नलचे इशारे काटेकोरपणे पाळणारा हा ट्रॅफिक मात्र अमेरिकन वाटतो.  चुकारपणे मनात येते हे इंडोनेशियन लोक मुंबई पुण्यात गाडी चालवू शकतील का?

इथली टप्पे असलेली लाल कौलारू घरे लक्षवेधीच आहेत. या घरांची बांधणी काहीशी चिनी, नेपाळी, हिमाचल प्रदेशीय वाटते.  हिंदू मंदिरे जशी आहेत तसेच इथे बौद्धविहारही आहेत. भिंतीवरची रंगीबेरंगी तिबेटियन कलाकारी आणि वास्तुकला इथे पहायला मिळतेच पण वैविध्य व निराळेपण जाणवतं ते चौकाचौकातली  हिंदू पुराणातल्या व्यक्तींची भव्य शिल्पे पाहताना. संगीत आणि नृत्यकलेसाठी हे बेट प्रसिद्ध आहे हे  इथल्या नृत्यांगना, वाद्यं यांची शिल्पं अधोरेखित करतात.  ही रस्त्यावरची शिल्पं अतिशय काळजीपूर्वक सांभाळलेली आहेत. कुठेही धूळ नाही, रंग उडालेले नाहीत.  बालीत हिंडताना नेत्रांना दिसणारा हा नजारा फारच सुखद वाटतो.

शहरीकरण आणि परंपरा यांची सुरेख सरमिसळ इथे आहे. कोकोमार्ट, अल्फा मार्ट सारखी सुपर मार्केट्स, ब्रँडेड दुकाने एकीकडे तर पारंपारिक कला, संस्कृती हिंदू धर्माचे वर्चस्व दाखवणारी मंदिरे आणि विहार, तसेच सर्वत्र पसरलेला अथांग सागर आणि झाडीझुडपातला निसर्ग एकीकडे.  मानवनिर्मित आणि निसर्ग यांची झालेली दोस्ती एक सुंदर संदेश देते.. विकास करा निसर्ग जपा 

चांडीसार मधला आजचा आमचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सानुरला जाणार होतो.  तत्पूर्वी आमच्या रिसॉर्ट तर्फे समुद्रकिनारी असलेल्या रेस्टॉरंट मध्ये कर्मा सदस्यांना बार्बेक्यू आणि वाईन डिनर होतं. तरुण आणि ज्येष्ठ पर्यटकांसाठी ही एक मनोरंजक भेट(treat) होती. गंमत म्हणजे इथे रात्रीचे भोजनही संध्याकाळी पाच पासूनच सुरू होते आणि आठला संपते.  त्यामुळे आम्ही सकाळचे लंच घेतलेच नाही. या कॉम्प्लिमेंटरी डिनरचा आस्वादच पूर्णपणे घ्यायचा ठरवला आणि तो घेतलाही. समुद्राची गाज, सोबत बालीनियन लोक संगीत.. हेही काहीसे भारतीय संगीताच्या जवळपासचे आणि गरमागरम तंदुरी व्हेज नॉनव्हेज पदार्थ आणि सोबत रेड वाईनचा प्याला.  वाचकहो!  गैरसमज करून घेऊ नका पण अशा वातावरणात जीवन जगण्याचा हलका आणि चौफेर आनंद का घेऊ नये?”थोडासा झूम लो..”

आमच्याबरोबर आमच्यासारखेच सारे तरुण, म्हातारे पर्यटक मस्त रंगीन पणे या सहलीची मौज लुटत होते, वय विसरत होते  हे मात्र नक्की.

 – क्रमशः भाग चौथा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मंडळी, मागील वेळेस आपण शिलॉन्गची सफर करायला सुरुवात केली. आता शिलॉन्गमधील अजून कांही नयनरम्य स्थळांना भेट देऊ या. चला तर मग भरपूर चालायची तयारी करून! 

एलिफेंट धबधबा (Elephant falls)

शिलॉन्गच्या उत्तर भागातील एक अन्य सर्वांगसुंदर असे ठिकाण म्हणजे पर्यटकांनी बघितलेच पाहिजे असे एलिफेंट धबधबा (एलिफेंट फॉल्स)! या जलप्रपाताला खेटून हत्तीच्या आकारासारखा एक विस्तीर्ण खडक होता, म्हणून ब्रिटिशांनी याचे नांव एलिफेंट फॉल्स असे ठेवले. मात्र आता या निर्झराजवळील तो कुंजरासम भलामोठा खडक नाही, कारण तो १८९७ मधील भूकंपात नष्ट झाला. मात्र या निर्झराचे बारसे ज्या नांवाने झालय तेच नांव आजही प्रचलित आहे! शहराच्या मध्यापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेला हा त्रिस्तरीय धबधबा (हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडतो) बघायला वर्षाऋतूत जावे, फेसाळणाऱ्या शत शत दुग्ध धारांच्या लयबद्ध सप्तसुरांनी अवघा परिसर निनादून टाकणाऱ्या या निर्झराचे प्राकृतिक रमणीय दर्शन अतिशय मोहून टाकणारे. एकदा बघितल्यावर दृष्टी खिळवून टाकणारे. पावसाळ्यात जात असाल तर पायऱ्यांची उतरण काळजीपूर्वक सांभाळून एक स्तर बघा, डोळ्यात साठवा, खाली उतरा, दुसरा स्तर बघा, परत खाली पायऱ्यांची उतरंड अन सर्वात खोल असा तिसरा स्तर पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित होतांना बघा. सर्वात खाली या मनोहरी अन रमणीय नीलजलप्रपाताचे एकत्रित जल एका छोट्याशा तलावात साठते. तलावाभोवती हिरवी वनराई सतत सोबत असतेच! मित्रांनो, पुढचे कार्य त्रासदायक, कारण आता पायऱ्या चढायच्या आहेत! केवळ निर्झराचं दर्शन नव्हे तर त्याला अनायास कवेत घेणाऱ्या सदाहरित हिरवाईचे बाहुपाश आहेतच! खळाळणारा हा जलप्रपात अन त्याला लगटून सोबतीला हिरवेगार डोंगर! हे नेत्रदीपक अन ‘पिक्चर परफेक्ट’ दृश्य नेत्रात अन कॅमेऱ्यात कैद करून ठेवा! असे हे अभूतपूर्व दृश्य बघण्यासाठी शिलॉन्गमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात यात नवल ते काय!

डॉन बॉस्को संग्रहालय (Don Bosco Museum)

हे संग्रहालय शिलॉन्ग शहराच्या मध्यबिंदू पासून ५ किलोमीटर अंतरावर सेक्रेड हार्ट चर्चच्या आवारात आहे. कलासक्त, इतिहास प्रेमी, नाविन्याची वाट चोखाळणाऱ्या, मेघालयच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या आबालवृद्ध पर्यटकांचे या वास्तूत प्रेमाने स्वागत होते. आरंभीच एक पथदर्शक आपल्याला या संग्रहालयाच्या ७ मजल्यात स्थित विविध दालनांची थोडक्यात माहिती देतो. मात्र बाहेर उभे राहून या भव्य-दिव्य संग्रहालयाची पुसटशी कल्पना देखील येत नाही. या विशाल ७ मजली इमारतीत सतरा वेगवेगळ्या नयनरम्य गॅलरी आहेत! त्यांत काय नाही ते विचारा! कलाभवन (आर्ट गॅलरी), हस्तकला, कलावस्तू, पोशाख, दागिने आणि ईशान्य भारतातील विविध जमातींनी वापरलेली शस्त्रे यांचा विस्तृत संग्रह इथे खच्चून भरलेला आहे. संपूर्ण ईशान्य भारताच्या विहंगम दृश्यांची पर्वणी एकाच ठिकाणी साधून देणारे दर्शनीय असे हे संग्रहालय!

इथे इतके काही बघण्यासारखे असल्याने पर्यटकांचे संपूर्ण समाधान होणे जरा कठीणच! हे सर्व बघण्याकरता एक दिवस देखील कमी पडणार! किती म्हणून नजरेत साठवावे अन फोटो तरी किती काढावेत! “काही बघायचे राहून गेले”, अशी प्रत्येक मजल्यावर आपली अवस्था होते. म्हणूनच आपल्याकडे वेळ कमी असल्यास, पत्रकात बघून आपल्याला आवडतील ते मजले चोखंदळपणे निवडावेत अन ते समाधान होईपर्यंत शांतपणे बघावेत. मी माझ्या आवडीनुसार आर्ट गॅलरीत मनसोक्त रमले! या इमारतीचा सर्वात उत्कंठावर्धक बिंदू अर्थात सर्वात वरचा मजला, “स्काय वॉक”. आम्ही गेलो तेव्हा नुकताच पाऊस पडल्याने मार्ग जरा निसरडा होता, गोल घुमटाभोवती फिरत शिलॉन्गचे मनमोहक दर्शन घ्यायचे, इथे हा चरम मनोज्ञ अनुभव घ्यायलाच हवा, काय बघायचे ते त्या त्या पॉईंट वर लिहिले आहेच, शिवाय फोटो काढणे आलेच, पण सेल्फी काढतांना जपून बरं का मंडळी! चौथ्या मजल्यावर एक छानसे कॅफे आहे! याच्याच बाजूला ईशान्य भारताचं बहारदार दर्शन घडवणारी चित्रफीत एका छोट्या चित्रपट थिएटर मध्ये दाखवल्या जाते, ती आवर्जून बघावी अशीच आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, हे भव्य दिव्य संग्रहालय ईशान्य भारताची सांस्कृतिक संपन्नता सांगणारे रेखीव चित्र-दालनच समजा ना!              

कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चनस

शिलॉन्ग येथील हे चर्च कॅथोलिक आर्कडिओसीसचे कॅथेड्रल चर्च आणि शिलॉन्गच्या मेट्रोपॉलिटन आर्चबिशपचे आसन म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यबिंदू पासून केवळ २ किलोमीटर दूर असलेलं हे चर्च पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी हे बांधलेले कॅथेड्रल शिलॉन्ग आर्कडिओसेसच्या साडेतीन लाखांहून अधिक कॅथलिक लोकांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. त्यात पूर्व खासी हिल्स आणि री-भोई जिल्ह्यांचा समावेश आहे (एकंदर ३५ चर्च). हे चर्च Laitumkhrah या भागात आहे. या चर्चचे नांव येशूच्या Mary the mother यांच्यावरून दिलेले आहे, मदर मेरीच्या पुतळ्यासह ही पांढरी शुभ्र संगमरवरी इमारत अति भव्य आणि शोभिवंत दिसते. या चर्चची खासियत म्हणजे उंच कमानी आणि सुंदर रंगांनी सुशोभित काचेच्या खिडक्या! कॅथेड्रलच्या आत, क्रॉसची काही सुंदर टेराकोटा स्टेशन्स आहेत, जी येशूच्या जीवनातील घटना दर्शवतात. या भागात प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या यातना व मृत्यूविषयक चित्रांचे दर्शन होते, ही चित्रे जर्मनी येथील एका कला संस्थेने तयार केली आहेत. या सोबतच येथे पवित्र शास्त्र आणि संतांच्या जीवनातील दृश्ये चित्रित केली आहेत. फ्रान्स येथे १९४७ ला तयार केलेली अप्रतिम रंगीत तावदाने हे या चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य! मुख्य वेदीसमोर डावीकडे शिलॉन्गचे पहिले मुख्य बिशप ह्युबर्ट डी’रोसारियो, यांची कबर आहे. कबरीच्या पुढे अन मेरी आणि बाल येशूच्या पुतळ्यासमोर आणखी एक वेदी आहे. येथील पवित्र वातावरणात कांही वेळ शांतपणे बसावेसे वाटते! इथे दर महिन्याला नऊ दिवस विशेष भक्ती केली जाते. एका टेकडीवर उंचावर असलेल्या, त्याच टेकडीवर कोरलेल्या आणि कॅथेड्रलच्या अगदी खाली स्थित असलेल्या ग्रोटो चर्चला देखील आपण भेट देऊ शकतो.

वॉर्ड्’स लेक (Ward’s Lake)

हा सुंदर मानवनिर्मित तलाव शहराच्या मध्यभागी राजभवनजवळच स्थित आहे. “अवती भवती रम्य उपवने” असल्याने या तलावाचा परिसर सदैव लहान मोठ्या माणसांनी फुललेला असतो. इथले एक आकर्षण म्हणजे स्वचलित वल्हवणाऱ्या विविध आकाराच्या नौका. पायांनी आरामात नियंत्रित करणाऱ्या या बोटीतून तलावात विहार करावा, सोबतच हिरव्यागार वृक्षवेली अन पुष्पवाटिकांचे दर्शन घेत घेत नौकानयन करावे. तलावाच्यावर  पार्क आणि बोटॅनिकल गार्डन यांना जोडणारा पूल आहे, त्याखालून नौका पुढे घ्यावी. या तलावात बगळ्यांची माळफुले तरंगत असतात, नौका जवळ आली की ती विखुरतात. सांजवेळी नौकानयन बंद झाल्यावरच संपूर्ण तलावात त्यांचा स्वच्छंद विहार सुरु होतो! एकंदरीत, माणसांवर कुणीही प्राणी अथवा पक्षी विश्वास ठेवत नाहीत हेच खरे! नौकानयनाचा आनंद लुटल्यावर येथील तलावाभोवती असलेल्या उपवनातील पायवाटांवर मस्त फेरफटका मारा किंवा नुसतेच रिलॅक्स करायला देखील मजा येईल. निसर्गरम्य वातावरण आणि कमालीची स्वच्छता, याकरता हा पार्क आवर्जून बघावा असाच आहे!

थंगराज गार्डन

हे विशाल उपवन पण फार नयनरम्य आहे. विविध वृक्षराजींनी अन फुलांच्या ताटव्यांनी बहरलेले हे निसर्ग शोभेने सजलेले ठिकाण खरोखरी बघण्यासारखे आहे. आत शिरताच काय बघावे याचे मार्गदर्शन करणारा फलक दिसतो. गार्डनमध्ये फिरतांना त्या त्या ठिकाणच्या वृक्षवेलींची माहिती देणारे फलक जागोजागी दिसतात. उपवनाला वेढा घालणाऱ्या पायवाटा अन त्यांचे कुंपण, खाली नजर टाकली की शिलॉन्गचे विहंगम रूप दिसते. पायऱ्या चढल्या की विविध रंगांची वृक्षराजी दृष्टीस पडते. इथे फोटो काढण्याकरता बरीच सिनेमास्कोप ठिकाणे आहेत, आत काचेच्या घरात एक सुंदर नर्सरी (ग्रीनहाऊस) आहे!

Shillong city |Capital of Meghalaya | Informative Video

 

PYNNEH LA RITI || by kheinkor composed by apkyrmenskhem

प्रिय मैत्रांनो, आपण शिलॉन्गची अद्भुत सफर अगदी रमतगमत केली. अजून कांही सांगायचे शिल्लक राहिले आहेच. ते आपण पुढील अर्थात अंतिम भागात जाणून घेऊ! आत्तापुरता विराम देते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (कांही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर 

बाली म्हणजे वेगवेगळे समुद्रकिनारे.

प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य वेगळे. एकच हिंदी महासागर पण त्याची अनंत रूपे.  बाली मधल्या वास्तव्यात या उदात्त सागरदर्शनाने आम्ही खरोखरच प्रसन्न तर झालोच पण एका अज्ञात गूढ शक्तीने अंतर्मनात कुठेतरी पार शुद्धी मिळाल्यासारखे वाटले. निसर्गाशी तद्रूप होणे म्हणजे काय हे अंशत: अनुभवले.

दक्षिण कुटा येथील बारुंग मधला पांडव बीच हा असाच एक दूरस्थ समुद्रकिनारा.  दोन उंच टेकड्यांनी वेढलेला. यापैकी एका टेकडीवर वरपासून खालपर्यंत कुंती, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे पुतळे कोरलेले आहेत. खाली पसरलेल्या अथांग समुद्राचे  आणि संथ किनाऱ्यावर फेसाळत येणाऱ्या लाटांचे निसर्ग चित्र केवळ अप्रतिम! हे थोडे अवघड पर्यटन स्थळ होते. निदान आमच्या वयाचा विचार करता.  त्यामुळे आपण येथे तरुण असताना का आलो नाही हा प्रश्न घेऊनच आम्ही परतलो. 

बाली म्हणजे सागर तसेच बाली म्हणजे मंदिरे.  हिंदू देवदेवतांची अनेक मंदिरे येथे आहेत. बालीनीज तसे धार्मिक, श्रद्धाळु.

रस्त्यातून जाताना लाल कौलांची सुरेख बैठी घरं पाह्यला मिळायची.  प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन सदृश बांधकाम दिसायचं आणि खजुराच्या पानांच्या टोपलीत  ठेवलेल्या तृणपात्या, चाफ्याची, जास्वंदीची फुले, पाने वाहिलेली असत.  अगदी प्रत्येक टॅक्सी मध्ये सुद्धा डॅशबोर्डवर अशा प्रकारचं पूजन केलेलं असायचं. त्याला ते अर्पण म्हणजेच त्यांच्या भाषेत कनांगसाडी असे म्हणतात.  शिवाय अनेक ठिकाणी झाडांवर इतरत्र कृष्णधवल  चौकडे असलेले कापडही गुंडाळलेले दिसले. तोही एक  भक्तीचाच प्रकार आहे.  अशा प्रकारच्या पताका, रुमाल अथवा वस्त्रं  ईशान्य भारताच्या भागातही आढळतात. एकप्रकारे,”देवा! तुझ्या कृपेची उब मला सदैव मिळो“ अशी विनवणी त्याद्वारे केली जात असावी. एकंदरच  इंडोनेशियन आणि भारतीय संस्कृतीतले साम्य बऱ्याच बाबतीत दिसून येते.

एका मंदिराला भेट देण्याचे आम्ही ठरवले.  तसे ते उंच पर्वतावरच होते.  मात्र आमचा टॅक्सीवाला आणि तेथील काउंटर वरचे लोक म्हणाले,” फारसे कठीण नाही. थोड्या पायऱ्या आहेत आणि दहा-पंधरा मिनिटांची चाल आहे.” म्हणून आम्ही या स्थळाला भेट देण्याचे ठरवले. प्रत्येकी २५ हजार आयडीर भरून तिकीटेही काढली आणि मंदिराच्या दिशेने कूच केले.  बरेचसे चढ-उतार, पायऱ्या चढत, उतरत चालत राहिलो.  वाटलं तितकं सोपं नव्हतं पण आता इतके आलोच आहोत तर अजून थोडे पुढे जाऊया करत चालत राहिलो, चढत राहिलो.  सभोवताली गर्द झाडी आणि वरून दिसणारा  सागर मनभावन, लुभावणारा होता. पण झाडांवरच्या माकडांनी मात्र उच्छाद मांडला होता. कुणाचा चष्मा पळव, कुणाची पर्स, मोबाईल, चप्पल, टोपी. माकडचेष्टा या शब्दाचा खरा अर्थ अनुभवत होतो. आम्ही अगदी सावधानतेने आपापल्या वस्तू घट्ट सांभाळत चाललो होतो तरी सतीश ची कॅप आणि साधनाची चप्पल माकडांनी पळवलीच. 

मंदिरापर्यंत पोहोचलो. कमरेवर बाली पद्धतीप्रमाणे निळ्या, भगव्या सिल्कचे काही लुंगी टाईप वस्र गुंडाळावे लागले होते.  मात्र इतके चढून आल्यानंतर कळले की मंदिराचे द्वार बंद आहे. बाहेरून मंदिराच्या आतला भाग दिसत होता.  उंच खांबावर एक राजदंड होता आणि त्याचे बाहेरूनच दर्शन घ्यायचे होते.  ते प्रतिकात्मक हनुमान मंदिर होते आणि सभोवतालची माकडे मंदिराचं खोडकर प्रतिनिधित्व करत होते!

निसर्गाचा नजारा मात्र अवर्णनीय होता आणि देव आम्हाला त्या दूर क्षितिजावर, विस्तीर्ण जलाशयात हलकेच मावळणाऱ्या सूर्याच्या रूपातच भेटला हे मात्र अगदी खरं.आम्ही मनोभावे त्या मावळणार्‍या भास्कराला वंदन केले.

प्रचंड थकलो होतो. कसेबसे पाय ओढत उतरलो आणि टॅक्सीत बसून बंगल्यावर  परतलो.

दरम्यान एका वाईट प्रसंगाचे  साक्षी व्हावे  लागले होते. मंदिरावरून खाली सेंटरवर परतलेल्या एका माणसाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तो तिथेच  कोसळला. लोकांची धावपळ झाली. गर्दी जमली. मदतीचे अनेक हात पुढे आले. स्थानिक लोकांपैकी कुणी  ॲम्बुलन्स मागवली, डॉक्टर्सना फोन केले. घोळक्यात कुणी डाॅक्टर आहे म्हणून विचारले.त्या गृहस्थाच्या समवेत असलेल्यांची बावरलेली स्थिती केवीलवाणी होती. आम्ही मनातल्या मनात त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि परतलो. मानवतेचं झालेलं ते दर्शन हृदयस्पर्शी नक्कीच होतं. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असा माणूस हा माणसासाठी धावतोच  हे चित्र मात्र दिलासा देणार होतं. आम्ही मात्र ऐंशी च्या उंबरठ्यावर ही घटना पाहून एकच ठरवलं” इथून पुढे फारशी धाडसं करायची नाहीत.  झेपेल तेवढं आणि पचनी पडेल तेवढंच करायचं. “ बालीचा अनुभव घ्यायचा, फक्त निसर्गातच रमायचं.

टॅक्सी सुरु झाली.  मन बेचैन होतं.

साधना सुरेख आवाजात गात होती,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा….”

– क्रमश: भाग तिसरा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – ८ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ८ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

आपल्या प्रतिसादाने मला खरंच खूप काही दिलंय! मित्रांनो, आम्ही जे थोडके मेघालय बघितले त्याची महती मागील सात भागात गायली, मात्र आमचा प्रवास ११ दिवसांचा होता, त्यामुळे आम्ही परत मेघालय बघणार हे निश्चित आहेच! हा मेघालायच्या नयनरम्य आठवणी जपत लिहिलेला आठवा आणि पुढील भाग मी खास करून षोडश वर्षीय, नवयौवनेसम तारुण्याने सळसळत्या अशा शिलॉन्ग या मेघालयच्या राजधानी करता राखून ठेवले होते. आम्ही मुंबई ते आसामची राजधानी गुवाहाटी येथील प्रवास विमानाने केला. उज्ज्वलने (माझा जावई) मेघालयच्या संपूर्ण प्रवासासाठी कॅब बुक केली होती. विमानतळावर आसामचा एका ड्रायव्हर अजय आमच्या स्वागताला हजर होता. त्याच्या सोबत आम्ही नंतरचे १० दिवस अतिशय आनंदाने प्रवास केला. कधी धो धो पावसाचे आक्रमण, कधी धुक्याची रजई, कधी अरुंद गल्ल्या, कधी वेडीवाकडी घाटाची वळणे, तर कधी आमची दिरंगाई, हे सर्व अत्यंत धीराने सहन करत अजय अविरत गाडी चालवत होता, वाहतुकीचे सर्व नियम कडकपणे पाळीत! आमच्याशी प्रेमाने संवाद साधत कुठे काय बघण्यासाखे आहे, या बाबत तो सूचना आणि मार्गदर्शन देखील करीत होता. मला तर तो कुठलेही प्रेक्षणीय स्थळ आले की “नानी आप ये कर सकता है/ नहीं कर सकता” अशी प्रेमळ ताकीदच द्यायचा. संपूर्ण प्रवासात आम्ही नादमधुर अशी गाणी (बंगाली आणि आसामी) ऐकत गेलो. त्यातीलच एक गाणे होते भूपेन हजारिका यांचे अत्यंत गोड आणि श्रवणीय असे “ओ गंगा”! आम्हा सर्वांना आवडलेल्या या गाण्याची ध्वनिफीत शेवटी दिलेली आहे. आम्ही गुवाहाटी ते शिलॉन्गला जाता जाता भूपेन हजारिका यांचे सुंदर स्मारक बघितले. 

 शिलॉन्ग ही भारताच्या मेघालय राज्याची राजधानी आणि तेथील सर्वात मोठे शहर आहे. याशिवाय शिलॉन्ग पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १९६९ पर्यंत हे शहर संयुक्त आसाम प्रांताची राजधानी होते. १९७२ साली मेघालय हे स्वतंत्र राज्य म्हणून प्रस्थापित झाल्यावर हेच शहर मेघालयच्या राजधानीचे शहर बनले व आसामची राजधानी गुवाहाटीमधील एक उपनगर दिसपूर येथे हलवण्यात आली. आज शिलॉन्ग मेघालयची आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य राजधानी आहे. २०२४ मध्ये या शहराची लोकसंख्या आहे सुमारे ५०८०००. हीच लोकसंख्या २०११ साली सुमारे १४३००० इतकी होती. येथील सुमारे ४७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय तर ४२ टक्के लोक हिंदू आहेत. इंग्लिश ही येथील अधिकृत भाषा असून खासी, जैंतिया व गारो ह्या स्थानिक भाषांना राजकीय दर्जा देण्यात आला आहे. खासी व जैंतिया हिल्स हा भूभाग पारंपारिक काळापासून चेरापुंजी येथे राजधानी असलेल्या खासी जमातीच्या अखत्यारीखाली होता, परंतु सिल्हेट ते आसाम दरम्यान रस्ता बांधण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला येथील जमिनीची आवश्यकता भासू लागली. ह्यावरून झालेल्या युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली व १८३३ साली हा भूभाग ब्रिटिशांनी जिंकला. परंतु चेरापुंजी हे ठिकाण सोयीचे नसल्यामुळे ब्रिटिशांनी १८६० च्या दशकात शिलॉन्ग शहराची स्थापना केली. १८७४ मध्ये ब्रिटिश राजवटीने नवनिर्वाचित आसाम प्रांताची स्थापना केली व शिलॉन्ग आसामची राजधानीचे शहर बनले.

या भागाला निसर्गाचा बहुमोल वारसा लाभलेला आहे. येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे ब्रिटीशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलँडसारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटायचे. मात्र एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून देखील येथे रस्ते व रेल्वेमार्गांचा विकास होऊ शकला नाही, म्हणून शिलॉन्गची प्रगती संथ गतीने होत राहिली. १८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला व मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा सांगणारी घरांची रचना, हॉटेल व कॅफे मध्ये वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ठायी ठायी निसर्गाची लयलूट असलेला अत्यंत संपन्न असा हा प्रदूषणमुक्त प्रदेश आहे. शिलॉन्ग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. येथील शिलॉन्ग व्यू पॉइंट वरून आपण संपूर्ण शिलॉन्ग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलॉन्ग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते. (आम्ही हा पॉईंट बघू शकलो नाही कारण तेव्हां तो बंद करण्यात आला होता) 

शिलॉन्ग विमानतळ शहराच्या ३० किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. येथून दिल्ली, कोलकाता तसेच ईशान्येकडील दिमापूर, गुवाहाटी, सिलचर, इम्फाल, आगरताळा इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ शिलॉन्गला गुवाहाटी तसेच इतर महत्वाच्या शहरांसोबत जोडतो. दुर्दैवाने आजही शिलॉन्ग भारतीय रेल्वेच्या नकाशावर नाही. मात्र भविष्यात गुवाहाटी ते मेघालय रेल्वेमार्ग बांधला जाईल अशी आशा आहे. आजच्या घडीला गुवाहाटी रेल्वे स्टेशन शिलॉन्ग पासून १०५ किलोमीटर दूर आहे. 

मित्रांनो, आता आपण शिल्लोन्ग येथील (अर्थातच आम्ही बघितलेली) प्रेक्षणीय स्थळे बघू या!

उमियम सरोवर (Umiam lake)

आम्ही शिलॉन्गच्या वाटेवर असतांना एक अतीव लावण्यमय, जणू काही चित्रप्रतिमेप्रमाणे निगुतीने घडवलेले असे उमियम सरोवर बघितले. मानवनिर्मित असूनही त्याचे नैसर्गिक सरोवरासारखेच भासमान होणारे सौंदर्य अगदी विनासायास सिनेमास्कोपिक अन फोटोजेनिक असे! कुठंही कॅमेरा फिक्स करा अन क्लिक करा, त्या चित्राची मोहिनी मन मोहणारच! या वेड लावणाऱ्या सरोवराला वेढलंय हिरव्यागार वनश्री अन विशाल पूर्व खासी पर्वतशृंखलांनी! शिलॉन्गच्या मध्यबिंदू पासून हे स्थळ १६ किलोमीटर अंतरावर आहे. उमियम नदीला बांध घालून हे विशाल आणि विलक्षण मानवनिर्मित आरस्पानी सरोवर बघताच आम्ही त्यावर लुब्ध झालो. स्थानिक लोक याला “बडापानी” म्हणतात. सहलीसाठी गावाबाहेर जायचंय ना, मग त्यासाठी हे ठिकाण एकदम सही! म्हणूनच इथे पर्यटकांची धो धो गर्दी असते, खास करून सुट्टीच्या दिवशी! इथला सूर्यास्त नयनाभिराम नारिंगी, गुलाबी अन लाल रंगांची उधळण करीत रंगावली रेखितच रात्रीच्या कुशीत विराम पावतो! पावसानंतरचे विहंगम इंद्रधनुषी रंग बघावे ते इथेच, कारण हे सर्व रंग या सरोवरात स्वतःचे राजस रुपडे न्याहाळत असतात!

 

आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा बघितले की, हिरव्याकंच पाचूंच्या माळेत नीलम गुंफला जावा तसे हिरव्यागार वनश्रीत हे सरोवर चमकत होते. आकाशाचे बदलते रंग या जलाशयाच्या जलाचे रंग देखील बदलत होते. कधी धवल, कधी नीलकांती, तर कधी मेघवर्णम शुभांगम! हरखून गेले मी या परिसरात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असेच हरवून जाल इथे! इथले नौकानयन म्हणजे या जलाच्या निळाईचे सौंदर्य जवळून पाहण्याची सुवर्णसंधी, अर्थातच हे अपरिहार्य! नौकानयन करतांना आमची नौका(मोटरबोट) इवलाल्या शंकूच्या आकाराच्या पाचूंच्या बेटांना वेढा घालीत विहार करीत होती. आमचे नशीब जोरावर होते, कारण आम्हाला नेणाऱ्या नौकेचे इंधन मधेच संपले आणि ते येईपर्यंत बोनस मिळावा तसे आम्ही भोवतालचे सृष्टी सौंदर्य न्याहाळीत बसलो. ते येऊ नये असे वाटत असतांनाच आले! या सरोवरात वॉटर स्पोर्ट्सची सुविधा देखील आहे (kayaking, boating, water cycling, scooting, canoeing इत्यादी). अर्थात यासाठी आभाळ व सरोवर शांत अन सौम्य असणे आवश्यक! आपल्याला यापैकी काहीच करायचे नसेल तर मजेत फेरफटका मारत या रम्य परिसराचं नुसतंच आनंददायी निरीक्षण करीत राहा! आपणास शक्य असल्यास या सरोवराजवळील हॉटेलमध्येच मुक्काम करा, अन निसर्ग शोभेचा मनसोक्त अनुभव घ्या.

पुढील भागात शिलॉन्गमध्ये आणि त्याच्या आसपास फेरफटका मारू या!

तोवर जरा दम धरा मंडळी! आत्तापुरते आवरते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – *लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो व्यक्तिगत आहेत

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर 

२९/११/२३

तसं पाहिलं तर आम्ही सारेच ८० च्या उंबरठ्यावरचे. आयुष्यात या आधीही आम्ही अनेक प्रवास केले होते, अनेक पर्यटन स्थळांना धावून धावून, अत्यंत उत्सुकतेने, जग पाहण्याच्या दृष्टीने भेटी दिल्या होत्या.  पण कालचा सूर्यास्त पाहताना जाणवत होती ती आमच्या आयुष्यातील संध्याकाळ. 

या सहलीला येण्याचा एकच हेतू होता निवांतपणा  अनुभवावा. पृथ्वीवरच्या एका वेगळ्याच परिसराचा, तिथल्या निसर्गाचा, मानवी जीवनाचा, आनंददायी, निराळा अनुभव घ्यायचा होता आम्हाला.  मनातली हिरवळ जपत, वयाला न नाकारता निसर्ग आणि निराळ्या संस्कृतीत वावरण्याचा एक मजेदार अनुभव घेत स्वतःला रिफ्रेश्ड, तजेलदार करायचे होते. आज भी हम जवान है असे निदान एकमेकांना बजावायचं होतं.  आलेल्या अनेक पर्यटकांमध्ये ९०% माणसं तरुण वर्गातली असली तरी दहा टक्के आमच्यासारखेच तरुण तुर्क म्हातारे अर्क होतेच की! आणि ही सारी तरुण माणसं आमच्याबरोबर कौतुकाने सेल्फी काढत होते, म्हणत होते,” आमचंही म्हातारपण असच तुमच्यासारखं टवटवीत असावं”

तेव्हा या टवटवीत सहा जणांचा आजचा  पहिला स्थलदर्शनाचा दिवस.

सकाळीच मस्त complimentary नाश्ता घेतला. बालिअन पद्धतीचा नाश्ता होता.  वेगळ्या चवीची पुडिंग्ज, खीर, काही भाज्या, सॅलड्स, ब्रेड, भात, फळे,, फळांचा रस वगैरे भरपूर होते. नाश्ता छान आरोग्यदायी आणि चविष्ट होतात आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी दारातच टॅक्सी उभी होती.  जवळजवळ दिवसभराची आठ तासांची दूर होती.  खर्च रुपये तेरा लाख  इंडोनेशियन रुपीज.  प्रत्येक वेळी या लाखांची गोष्ट अनुभवत होतो आम्ही.  पण हे इंडियन नसून इंडोनेशियन रुपीज आहेत या विचाराने भानावरही येत होतो.

आमचा पहिला थांबा होता नुसा डुआ  बीच. अतिशय विस्तीर्ण असा रम्य सभोवताल.   तशी फारशी गर्दी जाणवत नव्हती.   आम्ही एका शटलने किनाऱ्यापर्यंत आलो.  लांबलचक पांढऱ्या वाळूचा किनारा, त्याला लागूनच नारळाची, तसेच नारळ जातीतल्या वृक्षांची रांग, काही पपनसाचे वृक्ष ही तिथे आम्ही पाहिले.  किनाऱ्याचे जणू काही ही वृक्षवल्ली संरक्षणाच करत होती.  समुद्राचे पाणी निळसर होते. पर्यटकांसाठी हे एक बाली इंडोनेशिया येथील अत्यंत आकर्षक स्थळ आहे. देशोदेशीचे पर्यटक येथे विखुरले होते आणि समोर पसरलेल्या महासागराच्या दर्शनाने थक्क होत होते.  माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की जगातला कुठलाही सागर हा त्या त्या वेळी अथवा प्रत्येक वेळी सौंदर्यातली विविधता घेऊनच आपल्यासमोर का येतो?  प्रत्येक किनारा आपण तितक्याच नवलाईने का पाहतो?  कदाचित याचं एकच उत्तर असेल हीच त्या किमयागाराची किमया!

इथे आसपास अनेक रेस्टॉरंट्सही  होती. अनेक साहसी सागरी क्रीडा होत्या. सांगितिक कार्यक्रमही होते. दरवर्षी मार्च महिन्यात येथे जाॅयलँड फेस्टिवल साजरा केला जातो. जी20 ची परिषद इथे भरली होती.  अनेक सांगितिक क्षेत्रातल्या कलाकारांसाठी नुसा डुवा हे एक उत्तम व्यासपीठ आहे. 

जितकं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवता येईल तितकं साठवण्याचा आम्ही अक्षरशः प्रयत्न करत होतो. त्या विस्तीर्ण परिसरात असलेली राम, सीता, लक्ष्मण यांची सुरेख शिल्पं आमच्या कॅमेराला आकर्षित करीत होती. उन्हाचा तडका जसा जाणवत होता तसाच समुद्रावरून वाहत येणारा वाराही मनाला सुखावत होता.

बाली येथे दरवर्षी जवळजवळ देशोदेशीचे पाच मिलियन पर्यटक भेट देतात.  इथल्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणजे गरुड विष्णू कल्चरल पार्क.(GWK).

या येथे गरुडावर बसलेल्या विष्णूचा ७५ मीटर उंच असा अत्यंत कलात्मक वास्तुकलेच्या आणि शिल्पकलेच्या दृष्टीने ही थक्क करणारा असा पुतळा आहे. तो एका सिमेंटच्या उंच पायावर बसवलेला आहे आणि हे सगळं बांधकाम पुन्हा एका तीन मजली इमारतीवर लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे या पुतळ्याची संपूर्ण उंची जवळजवळ 121 मीटर होते. जगातले हे तिसऱ्या क्रमांकाचे उंच असे शिल्प गणले जाते. बालीमध्ये फिरत असताना ते अनेक ठिकाणाहून दिसते. आमचं विमान डेन्सपार विमानतळावर उतरत असतानाही आम्हाला सर्वप्रथम मोकळ्या आकाशात या गरुड विष्णूचे दर्शन झाले आणि आम्ही मनोमन आनंदलो.

बालीमध्ये हिंदू धर्माचे अधिक वर्चस्व आहे. विष्णू ही संरक्षक देवता मानली जाते.  या पुतळ्यातील विष्णूच्या हातातही कमलपुष्प, शंख आणि राजदंड आहे. बाली येथील उंगासान  बारुंग येथे एका उंच डोंगरावर या संपूर्ण शिल्पाची उभारणी केलेली आहे. जणू काही गरुडावरचा हा विष्णू उंचावरून बाली या बेटावर आपली संरक्षक नजर ठेवून आहे.

न्याओमन नुआरर्ता या वास्तुशास्त्रज्ञाने याची रचना केलेली आहे आणि या वास्तूचे उद्घाटन सप्टेंबर २०१८साली झाले आहे.  म्हणजे बाली येथील हे पर्यटन स्थळ तसे नवीन, अलीकडचेच आहे. प्रवेशासाठी येथे प्रत्येकी ५० हजार इंडोनेशियन रुपीज ची दोन तिकिटे काढावी लागतात .म्हणजे आम्हाला सहा जणांसाठी सहा लाख IDR लागले. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी येथे विनामूल्य शटल सर्विस आहे. हे मात्र आमच्यासाठी दिलासा देणारे होते. परिसर खूपच भव्य आणि विस्तीर्ण आहे आणि जागोजागी रामायणातील, पुराणातील कथा सांगणारी विशेष व्यक्तींची अतिशय दिलखेचक आणि उंच मोठी शिल्पे उभारलेली आहेत.  त्यात अगदी रावण, शूर्पणखा पण आहेत. ऋषि कश्यप, विनिता यांचे पुतळे आहेत. गरुडाची आई विनिता म्हणूनच गरुडाला वैनतेय असेही म्हणतात.

गरुडावर आरुढ झालेल्या विष्णूची एक कथा येथे सांगतात.  गरुडाला त्याच्या आईला गुलामगिरीतून मुक्त करायचे होते आणि त्यासाठी त्याला समुद्रमंथनातून निर्माण झालेले अमृत हवे होते.

“मी तुला माझ्या पंखावर घेतो आणि तू मला ते अमृत दे” असा गरुड आणि विष्णु मध्ये करार होतो.  विष्णूचे वाहन गरुड असल्या मागची ही  एक दंतकथा आहे.

पक्षी श्रेष्ठ गरुडाचे पसरलेले पंख आणि त्यावरचा रुबाबदार सुंदर विष्णू पाहताना अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटते.  हे शिल्प कॉपर, ब्रास आणि सिमेंटच्या मिश्रणातूनच बनवलेले आहे. पण पाहताना मात्र ते दगडी असल्याचा भास होतो. १९९३ ला या बांधकामाची सुरुवात झाली आणि २०१८ साली त्याचे उद्घाटन झाले. २१७ फूट रुंद आणि चारशे फूट उंच असलेलं हे भव्य सौंदर्य पहायला बालीत आलेले देशोदेशीचे पर्यटक गर्दी करतात. थक्क होतात, तृप्त होतात.

शिवाय इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे की संगीत, नृत्य, बालीअन सादर करतात. लोक परंपरा जपण्याच्या भावनेतून  झालेले हे कार्यक्रम मनोरंजक वाटतात. असा आनंददायी  अनुभव घेत, तीस हजाराचं(IDR) आईस्क्रीम खाऊन आणि बालीनीज कन्ये बरोबर छायाचित्र खेचून आम्ही तेथून तृप्त मनाने परतलो.  घेता किती घेशील आणि सांगू किती सांगशील अशीच आमची अवस्था झाली होती.

क्रमश: भाग दुसरा  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -७ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -७ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डेव्हिड स्कॉट ट्रेल (David Scott Trail)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

एक शंका (मागची अन पुढची देखील )

हे असे मावफ्लांगचे घनदाट जंगल, तिथेच माझी शिकार होणार कां? (तिथल्या जनावरांनी कुठले वाचलेत हे नियम!) मित्रांनो, म्हणूनच आपली सोबत करणारा, इथल्या पावलापावलाचे ठसे ओळखणारा स्थानिक वाटाड्या हवा, त्याचे अनुसरण करत चला. सरळ (असो का नसो) पायवाट सोडायची नाही, घनघोर जंगलात घुसायची ज्यादा अवलक्षणी हिंमत करायची नाय!तुम्ही वाघाला शोधू नका, तो पण तुम्हाला मुद्दाम शोधत येणार नाही!!! प्रामाणिकपणे सांगते, ईश्वराच्या या अनाहत निर्मितीने आम्ही इतके भारावलो होतो की, या रमणीय जंगलात आमच्या मनात एकदाही असे भलते सलते विचार यायला धजावले देखील नाहीत. मित्रांनो हे जंगल अवश्य बघा, चार एक तासांची बेगमी असू द्या! गाईडच्या भरवश्यावर निश्चिन्त असा, त्याच्याजवळ बंदूक वगैरे नसते, मात्र असते ती अपार श्रद्धा! तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर ही वनराई नव्हे तर, साक्षात देवराई आपले विशाल हरित बाहू पसरून तुम्हाला कवेत घ्यायला सिद्ध आहे! 

डेव्हिड स्कॉट ट्रेल (David Scott Trail):

मंडळी, मागील भागात मी वायदा केला होता, त्याला अनुसरून आज या दुर्गम प्रदेशाच्या एका अत्यंत दुष्कर आणि दुष्प्राप्य ट्रेलची! ही वाट दूर जाते…….. संपण्याचे नाव नको, अशी ही ताज्यातवान्या विशेषज्ञ ट्रेकर्सला भारी पडणारी अन भूल पाडणारी ट्रेल (पायवाट), चला तर मग!     

मेघालयातील ही सर्वात जुनी पायवाट. डेविड स्कॉट या ब्रिटिश प्रशासकाने भारताच्या उत्तर पूर्व भागात जवळपास ३० वर्षे (१८०२-१८३२) कार्य केलं. त्याने संपूर्ण खासी पर्वतरांगा आपल्या पायाखालून घातल्या. या काळात आसाम ते सिल्हट(आत्ताचे बांगलादेश), हे अंतर जवळपास १०० किलोमीटर होते! या मार्गावर घोडागाड्या नेता येतील अशा योग्य वाटांचा शोध घेण्यात आला! मालवाहतुकीसाठी याचा उपयोग होणार होता! हाच तो पूर्व खासी पर्वत रांगांतून जाणारा ट्रेल, त्याला डेविड स्कॉट यांचंच नाव दिल्या गेलंय! मूळ १०० किलोमीटरचा अति दुर्गम आणि खडतर मार्ग, आता मात्र पर्यटकांच्या सोयीसाठी लहान लहान भागात विभागला गेलेला! समुद्रसपाटी पासून ४८९२ फुटांवरील या निसर्गरम्य पायवाटेवरून मार्गक्रमण करतांना दिसतील लहान लहान शांत खेडी, प्राचीन पवित्र वनराई, विविध औषधी वनस्पती, ऑर्किड, मॅग्नोलिया सारख्या फुलांचा बहर, रबराची झाडे, ब्लॅकबेरी तथा गूसबेरी सारखी ताजी फळे, विस्तीर्ण हिरवीगार कुरणे, लहान मोठे ओढे, जलप्रपात, लहान मोठे तलाव, एकाश्म, दगडी पूल इत्यादी इत्यादी. कृत्रिमतेचा जराही स्पर्श नाही हेच या मार्गाचं खरंखुरं प्राकृतिक लावण्य! याचे मुख्य कारण काय तर माणसांची तुरळक ये जा!

साहसी ट्रेकर्स हा संपूर्ण मार्ग (१०० किलोमीटर) ४-५ दिवसात (रात्री गावात मुक्काम करून) चालत जाऊन पुरा करतात. मात्र यापेक्षा जास्त व्यावहारिक आणि लोकप्रिय असा एक दिवसाचा (साधारण ४ ते ६ तासात पूर्ण करता येईल असा) १६ किलोमीटरचा मार्ग  उपलब्ध आहे. मावफ्लांग (Mawphlang) ते लाड मावफ्लांग (Lad Mawphlang) असा हा मार्ग आहे.

या ट्रेलची सुरवात करायला आधी शिलाँग पासून २५ किलोमीटर दूर मावफ्लांग गावात पोचावे लागते, मग या गावापासून प्रवास सुरु करीत मार्गक्रमण करीत राहा, लाड मावफ्लांग ला पोचेस्तोवर! या दीर्घ मार्गिकेत काय नाही ते विचारा! निसर्गाची मुक्त उधळण, हिरवेगार पर्वत, दऱ्या वगैरे आहेतच पण आपल्याला ज्याचे दर्शन देखील दुर्मिळ असलेले संपूर्ण तळ स्वच्छपणे दिसेल असे नितळ पाणी, सारे काही सिनेमास्कोपिक चलचित्रासमान! एक छोटी सरिता तरंगिणी आपल्या चंदेरी जलाच्या उसळत्या लहरींचा नादस्वर घेऊन सतत आपली सोबत करीत असते. या वाटेवर मधून मधून उमियम नदी आपल्याला दर्शन देते. मित्रांनो, उमियम म्हणजे “अश्रूंचा महापूर”. या नावाच्या उगमाची हृदयद्रावक कथा सांगते! दोन बहिणी स्वर्गातून पृथ्वीवर येत असता, वाटेत एक बहीण हरवली अन तिला शोधणाऱ्या दुसऱ्या बहिणीच्या अश्रूपाताने ही उमियम नदी तयार झाली!

माझी मुलगी आरती, जावई  उज्ज्वल अन नात अनुभूती यांनी हा ट्रेक पूर्ण केला. आरतीचा अनुभव तिच्याच शब्दात खाली दिलाय! 

मेघालय ट्रिपच्या शेवटच्या दिवशी आम्ही केलेला हा ट्रेक फार इंटरेस्टिंग होता. आमच्या गाईड (दालम) बरोबर आम्ही सकाळी ९ वाजता या १६ किलोमीटर लांब प्रवासाची सुरवात केली. नैसर्गिक वातावरणात रमण्याचा अनन्यसाधारण अनुभव घेण्यास आम्ही फार उत्सुक होतो.आमचा गाईड मध्ये मध्ये ताजी रसदार बेरी तोडून देत होता. तेथील ओहळांचे आणि सुंदर निर्झरांचे पाणी अतिशय स्वच्छ आणि शीतल होते. थेट ओढ्यांमधून आणि निर्झरांमधून हे पाणी पिणे हा आम्हा शहरवासियांसाठी एक अनोखाच अनुभव होता. चालण्याच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रत्येक निर्झरात तोंड आणि हात पाय धूत होतो, त्यामुळे श्रमपरिहार होतच होता, पण आमचे मन देखील प्रसन्न राहत होते. ट्रेकच्या सुरवातीलाच एक कुत्रा आमच्या सोबत आला आणि पहिल्या ८ किलोमीटरपर्यंत तो आमच्या सतत सहवासात होता!  त्याला आमच्यापेक्षा आमच्याजवळ असलेल्या चिप्स आणि तत्सम जंक फूड मध्ये जास्त रस असावा! चिप्सचे पॅकेट उघडण्याच्या निव्वळ आवाजानेच तो सजग व्हायचा अन आम्ही त्यातील थोडा भाग त्याला देईपर्यंत आमची सुटका नसायची! (आमच्या एका फोटोत तो बी हाये!) दालमने आम्हाला एक मनोरंजक कथा सांगितली. प्राचीन काळी मानव खूप मजबूत बांध्याचा होता. एकच माणूस एक मोठा (पाषाण) एकाश्म आरामात उचलत असे, मात्र त्याला उचलण्याधी तो या एकाश्मशी छान संवाद साधत असे  व त्याची परवानगी देखील घेत असे. पाषाण जरी याच्याशी बोलत नसला तरी याला मात्र पाषाणची स्पंदने ऐकू यायची म्हणे! माणसाकडून अशी प्रेमाची गुजगोष्ट ऐकली की तो पाषाण नरमाईने वागत असे! मित्रांनो, गोष्टीत का होईना, निसर्गाशी संवाद साधणारे हे वन्य जीव!  त्यांच्या भावनांचा आपण आदर करायलाच हवा, खरे पाहिले तर निसर्गाचे रक्षण करायला अशा या निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या माणसांचीच आता नितांत आवश्यकता आहे!  

आम्ही एका गावात दुपारचं जेवण मॅगी आणि लिंबू यावर आटोपले. काही शाळेत जाणाऱ्या मुलांना भेटल्यावर कळले की ते शाळेत पोचायला रोज याच कठीण मार्गावर ये  जा करतात, हवामान कितीही वाईट असो! काही स्थानिक स्त्रिया त्यांच्या छकुल्यांना पाठीशी घेऊन याच रस्त्याने जातांना भेटल्या! (या बहाद्दर  मुलांना आणि स्त्रियांना आमचा अर्थातच साष्टांग कुमनो!) इथे कुठलीही वाहने नाहीत, कुठलेही नेटवर्क नाही. एकदा का तुम्ही ट्रेक सुरु केली की ती संपवण्यावाचून अन्य पर्याय नसतो! आमचा हा निसर्गाच्या संगतीत केलेला सुंदर प्रवास संध्याकाळी ४ वाजता संपला. हा ट्रेक आमच्या आयुष्यभर लक्षात राहील! आमच्या गाईड दालमने (DalamLynti Dympep,  वय केवळ २२ वर्षे, मु. पो. मावफलांग,  फोन क्र ८८३७०४०९५८) आम्हाला अतिशय चांगले मार्गदर्शन केले आणि संपूर्ण प्रवासात आम्हाला सर्वतोपरी मदत केली. त्याचे  मनापासून खूप खूप आभार! आमचा सल्ला आहे की या प्रवासात सोबतीला गाईड घ्यायलाच हवा. दालमसारखा वाटाड्या असेल तर कितीही संकटे का येईनात, त्यांच्यावर मात करणे सुकर होईल यात कुठलीच शंका नाही! एका फोटोत तीन एकाश्म (मोनोलिथ्स) अन त्यांच्यासोबत दिसतोय तो दालम!

प्रिय वाचकहो हा प्रवास आता शिलाँगपर्यंत आलाय! पुढच्या मेघालय दर्शनच्या भागात तुम्हाला मी नेणार आहे शिलाँग या मेघालयाच्या राजधानीत आणि तिच्या जवळच्या एका अद्भुत प्रवासासाठी!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – 

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो व्यक्तिगत आहेत!

डेविड स्कॉट ट्रेलचे काही व्हिडिओ यू ट्यूब वर उपलब्ध आहेत.

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print