सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️
वेरीनाग इथल्या निर्झरातून झेलमचा उगम होतो. ‘श्री’ च्या आकारात वाहणाऱ्या झेलमच्या दोन्ही तीरांवर श्रीनगर वसले आहे. श्रीनगरमध्ये फिरताना सफरचंद आणि अक्रोड यांचे पर्णहीन वृक्ष दिसत होते. बदाम, जरदाळू यांची एकही पान नसलेली सुंदर मऊ पांढऱ्या मोतीया आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेली झाडे दिसत होती. लांबवर पसरलेली मोहरीची शेतं हळदी रंगाच्या फुलांनी डोलत होती तर अजून फुलं न आलेली शेतं काळपट हिरव्या रंगाची होती. थंडी खूपच होती.पायघोळ झग्याआड पोटाशी शेगडी घेऊन जाणारे स्त्री- पुरुष दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत होती. रस्तोरस्ती लष्कराची वाहने आणि बंदूकधारी जवान मनातल्या अस्वस्थतेत भर घालीत होती. दुकानांमध्ये कलिंगडे, संत्री, केळी, कमलकाकडी, इतर भाज्या दिसत होत्या. कहावा किंवा कावा या काश्मिरी स्पेशल चहाची दुकाने जागोजागी होती. अस्सल काश्मिरी केशराच्या चार काड्या आणि दालचिनीच्या तुकडा असं उकळत ठेवायचं. त्यात साखर घालायची. एका कपाला एक सोललेला बदाम जाडसर कुटून घालायचा आणि त्यावर केशर दालचिनीचे उकळते मिश्रण ओतायचं. झाला कहावा तयार!
गाईडने दिलेल्या या माहितीमुळे ‘कावा’ पिण्याची इच्छा झाली पण बस मध्येच थांबविणे अशक्य होते.
जहांगीरच्या काळात साधारण चारशे वर्षांपूर्वी निशात बाग, शालीमार बाग, व चष्मेशाही अशा सुंदर बागा बांधण्यात आल्या. तळहाताएवढ्या सुगंधी गुलाबाच्या फुलांचा हंगाम अजून सुरू झाला नव्हता, पण वृक्षांसारखे झाड बुंधे असलेली गुलाबाची झाड लालसर पानांनी बहरून फुलण्याचा तयारीत होती. उंचावरून झऱ्यासारखे वाहणारे पाणी पायऱ्या- पायऱ्यांवरून घरंगळत होते. मध्येच कमळाच्या आकारातली दगडी कारंजी होती. सगळीकडे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू होती.
चष्मेशाहीमध्ये मागच्या पीर- पांजाल पर्वतश्रेणीतून आलेले झऱ्याचे शुद्ध पाणी आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले. डेरेदार काळपट- हिरव्या वृक्षांना चोचीच्या आकाराची पांढरी फुले लटकली होती. ती नासपतीची झाडे होती. हिरवा पर्णसंभार असलेली मॅग्नेलियाची (एक प्रकारचा मोठा सुगंधी चाफा ) झाडे फुलण्याच्या तयारीत होती. निशात बागेजवळ ‘हजरत बाल श्राइन’ आहे. हजरत मोहमद साहेबांचा ‘पवित्र बाल’ इथे ठेवण्यात आला आहे. मशीद भव्य आणि इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आहे.मशिदीच्या आत स्त्रियांना प्रवेश नव्हता. मागील बाजूने थोडा पडदा किलकिला करून स्टेनगनधारी पहारेकर्याने ‘पवित्र बाल’ ठेवलेल्या ठिकाणाचे ‘दूरदर्शन’ घडविले. स्वच्छ आवारात चिनारची झाडं होती. दल सरोवराच्या पश्चिमेकडील काठावर असलेल्या या मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
श्रीनगरपासून तीन किलोमीटरवर पांडेथ्रान गाव आहे आणि साधारण १४ किलोमीटरवर परिहासपूर नावाचं गाव आहे. या दोन्ही ठिकाणी राजा ललितादित्याच्या कारकिर्दीत म्हणजे आठव्या शतकात उभारलेल्या बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत. अनंतनागपासून चार-पाच किलोमीटरवर मार्तंड देवालयांचा समूह आहे. डावीकडचे कोणे एकेकाळी भव्य दिव्य असलेल्या सूर्यमंदिराचे भग्नावशेष संगिनींच्या पहाऱ्यात सांभाळले आहेत.
पहेलगामच्या रस्त्यावर खळाळत अवखळ वाहणारी लिडार नदी आपली सतत सोबत करते. नदीपात्रातील खडक, गोल गुळगुळी दगड यावरून तिचा प्रवाह दौडत असतो. गाईड सांगत होता की मे महिन्यात पर्वत शिखरांवरील बर्फ वितळले की नदी तुडुंब पाण्याने उसळत वेगाने जाते. त्यावेळी तिच्यावरील राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी अनेक देशी-विदेशी प्रवासी येतात. तसेच नदीपलीकडील पर्वतराजीत ट्रेकिंगसाठी अनेक प्रवासी येतात. त्याशिवाय घोडदौड, ट्राउट माशांची मासेमारी अशी आकर्षणे आहेत. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पोपटी हिरवळीवर वर्ल्डक्लास गोल्फ कोर्टस आहेत. त्यासाठीही हौशी खेळाडू येतात.
पहलगाम रस्त्यावर प्राचीन काळापासून केशराच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं पांपूर( पूर्वीचं नाव पद्मपूर ) लागतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमिनीलगत उगवलेल्या जांभळ्या सहा पाकळ्यांच्या फुलांनी शेतेच्या शेते बहरतात. या फुलांमधील सहा केसरांपैकी केसरिया रंगाचे तीन केसर हे अस्सल केशर असतं. उरलेले तीन हळदी रंगाचे केसर वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.
श्रीनगर भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈