मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २६- भाग ४ – पूर्व पश्चिमेचा सेतू – इस्तंबूल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

कॅपाडोकीयाजवळ  चार हजार वर्षांपूर्वीचं एक भुयारी शहर पाहिलं. शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी जमिनीखाली हे सात मजल्यांचं शहर बसवलं होतं.टर्कीमध्ये अशी आणखी काही शहरं प्रवाशांना दाखविण्यासाठी  स्वच्छ करून प्रकाशाची सोय  केलेली आहे. गाईडच्या मागून वाकून चालत, कधी ओणव्याने जाऊन ते भुयारी शहर पाहिलं. त्यात धान्य साठविण्याच्या जागा, दारू तयार करण्याची जागा, एकत्र स्वयंपाक करण्याची जागा, स्वयंपाकाचा धूर बाहेर दिसू नये म्हणून घेतलेली काळजी, मलमूत्र साठविण्याचे भले मोठं दगडी रांजण, मृत व्यक्तींना टाकण्याचेही वेगळे दगडी रांजण, प्रार्थनेसाठी  जागा असं सारं काही होतं. सकाळपासून रात्रीपर्यंतचे सारे कार्यक्रम त्या अंधाऱ्या, सरपट जायच्या बोळातून करायचे. हजारो माणसांनी त्यात दाटीवाटीने राहायचं! कल्पनेनेही अंगावर काटा आला. सहा- सहा महिने बाहेरील ऊन वारा न मिळाल्याने माणसं फिकट पांढुरकी, आजारी होऊन जात. ‘सबसे प्यारा जीव’ वाचविण्यासाठी माणूस काय काय करू शकतो याचं मूर्तीमंत दर्शन झालं.

अंकारा ही  टर्कीची राजधानी. तिथल्या ‘अनातोलिया सिव्हिलायझेशन म्युझियम’ मध्ये प्राचीन संस्कृतीचा वारसा नेटकेपणाने जपला आहे. उत्खननात सापडलेल्या दगडी मूर्ती, भलं मोठं दगडी रांजण, वेगवेगळ्या जातींच्या दगडांपासून बनविलेले दागिने, हत्यारे असं सारं आहे. त्यातील तीन- चार दगडी शिल्पे मात्र विलक्षण वाटली. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत आहेत हे शिल्प आपल्याकडे आपण नेहमी पाहतो. अगदी तशाच प्रकारची शिल्पं, पण चेहरे थोडे वेगळे. अशी चार-पाच दगडी शिल्पे तिथे होती. त्याचा संदर्भ मात्र मिळाला नाही.

अंकारामध्ये राष्ट्रपिता केमाल पाशा यांचं अतिभव्य स्मारक आहे. एक राष्ट्रप्रमुख द्रष्टा असेल तर राष्ट्राची किती आणि कशी प्रगती होऊ शकते याचं अतातुर्क (म्हणजे तुर्कांचा पिता) केमाल पाशा हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपल्या अत्याधुनिक विचार शैलीने व थोड्या लष्करी शिस्तीने टर्कीला युरोपियन राष्ट्रांच्या पंक्तीत देऊन बसविले आहे. स्त्री- पुरुष सर्वांना सक्तीचं शिक्षण केलं. बुरखा, बहुपत्नीत्व या पद्धती रद्द केल्या. मुल्ला मौलवींचा विरोध खंबीरपणे मोडून काढून स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. तंत्रज्ञानाची, आधुनिक विज्ञानाची विद्यापीठे उभारली. व्यापार उद्योग, स्वच्छता, पेहराव, प्राचीन संस्कृतीचं जतन अशा अनेक गोष्टी त्यांनी राष्ट्राला शिकविल्या.१९३८ मध्ये मृत्यू पावलेल्या या नेत्याचे उत्तुंग स्मारक बघताना हे सारं आठवत होतं. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्या वस्तू, फोटो, युद्धाचे देखावे असं त्या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे.

रात्री विमानाने इस्तंबूल विमानतळावरून उड्डाण केलं. खिडकीतून पाहिलं तर इस्तंबूलच्या असंख्य प्रकाश वाटा हात हलवून आम्हाला निरोप देत होत्या. आम्हीही या पूर्व- पश्चिमेच्या सेतूचा ‘अच्छा’ (आणि ‘अच्छा’ म्हणजे ‘छान’ असंही) म्हणून निरोप घेतला.

भाग ४ व इस्तंबूल समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २६- भाग ३ – पूर्व पश्चिमेचा सेतू – इस्तंबूल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

हैदरपाशा इथून रात्रीच्या रेल्वेने आम्ही सकाळी डेन्झीले स्टेशनवर उतरलो. इथून पामुक्कले इथे जायचे होते. फॉल सीझन सुरू झाला होता. रस्त्याकडेची झाडं सूर्यप्रकाशात सोनेरी किरमिजी रंगात झळाळून उठली होती तर काही झाडं चांदीच्या छोट्या, नाजूक घंटांचे घोस अंगभर लेवून उभी होती. दसऱ्याचं सीमोल्लंघन काल युरोप खंडातून आशिया खंडात झालं होतं. आज हे चांदी सोनं डोळ्यांनी लुटत चाललो होतो.

तुर्की  भाषेमध्ये पामुक्कले म्हणजे कापसाचा किल्ला! हजारो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तिथल्या डोंगरातून अजूनही गरम पाण्याचे झरे वाहतात. त्यातील कॅल्शियमचे थरांवर थर साठले. त्यामुळे हे डोंगर छोट्या- छोट्या अर्धगोल उतरत्या घड्यांचे, पांढरे शुभ्र कापसाच्या ढिगासारखे वाटतात. तिथल्या गरम पाण्याच्या झऱ्यात पाय बुडवून बसायला मजा वाटली.

जवळच एरोपोलीस नावाचे रोमन लोकांनी वसविलेले शहर आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या या शहरातील डोंगरउतारावरचे, दगडी, भक्कम पायऱ्यांचे, एका वेळी बारा हजार माणसं बसू शकतील असे अर्धगोलाकार ॲंफी थिएटर मात्र सुस्थितीत आहे.

इफेसुस या भूमध्य समुद्राकाठच्या प्राचीन शहरात,  संगमरवरी फरशांच्या राजरस्त्याच्या कडेला जुनी घरे, चर्च, कारंजी, पुतळे आहेत. निकी  देवीचा सुरेख पुतळा सुस्थितीत आहे.  दुमजली लायब्ररीच्या प्रवेशद्वाराचे संगमरवरी खांब भक्कम आहेत. खांबांमध्ये संगमरवरी पुतळे कोरले आहेत. त्याकाळी १२००० पुस्तके असलेल्या त्या भव्य लायब्ररीची आणि त्या काळच्या प्रगत, सुसंस्कृत समाजाची आपण कल्पना करू शकतो.

कॅपॅडोकिया इथे जाताना वाटेत कोन्या इथे थांबलो. कोन्या ही सूफी संतांची भूमी! ‘रूमी’ या कलंदर कवीच्या कवितांचा, गूढ तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव फारसी, उर्दू व तुर्की साहित्यावर झाला आहे. या रुमी कवीचा मृत्यू साधारण साडेसातशे वर्षांपूर्वी कोन्या इथे झाला. त्याची कबर व म्युझियम  पाहिले.या मेवलवी परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उपासक घोळदार पांढराशुभ्र वेश करून स्वतःभोवती गिरक्या घेत, नृत्य करीत सूफी संतांच्या कवनांचे गायन करतात. रात्री हा व्हर्लिंग दरवेशचा नृत्य प्रकार पाहिला. शब्द कळत नव्हते तरी त्या गायन वादनातील लय व आर्तता कळत होती.

आज बलून राईडसाठी जायचे होते.एजिअस आणि हसन या दोन मोठ्या डोंगरांमध्ये पसरलेल्या खडकाळ पठाराला ‘गोरेमी व्हॅली’ असे म्हणतात. तिथल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आडव्या लोळा- गोळा होऊन पडलेल्या बलूनमध्ये जनरेटर्सच्या सहाय्याने पंखे लावून हवा भरण्याचं काम चाललं होतं. हळूहळू बलूनमध्ये जीव आला. ते पूर्ण फुलल्यावर गॅसच्या गरम ज्वालांनी त्यातली हवा हलकी करण्यात आली. त्याला जोडलेली वेताची लांबट चौकोनी, मजबूत टोपली चार फूट उंचीची होती. कसरत करून चढत आम्ही वीस प्रवासी त्या टोपलीत जाऊन उभे राहीलो. टोपलीच्या मधल्या छोट्या चौकोनात गॅसचे चार सिलेंडर ठेवले होते. त्यामध्ये उभे राहून एक ऑपरेटर त्या गॅसच्या ज्वाला बलूनमध्ये सोडत होता. वॉकीटॉकीवरून त्याचा नियंत्रण केंद्राशी संपर्क चालू होता. बलूनमधली हवा हलकी झाली आणि आमच्यासकट त्या वेताच्या टोपलीने जमीन सोडली. अधून मधून गॅसच्या ज्वाला सोडून ऑपरेटर बलूनमधली हवा गरम व हलकी ठेवत होता. वाऱ्याच्या सहाय्याने बलून आकाशात तरंगत फिरू लागलं. आमच्या आजूबाजूला अशीच दहा-बारा बलून्स तरंगत होती. सूर्य नुकताच वर आला होता. खाली पाहिलं तर  पांढरे- गोरे डोंगर वेगवेगळे आकार धारण करून उभे होते. हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या थरांच्या या डोंगरांनी वर्षानुवर्ष ऊन पाऊस सहन केले. ते डोंगर वरून बघताना शुभ्र लाटांचे थबकलेले थर असावे असं विलोभनीय दृश्य दिसत होतं.  काही ठिकाणी डोंगरांच्या सपाटीवर फळझाडांची शेती दिसत होती. बगळ्यांची रांग, डोंगरात घरटी करून राहणाऱ्या कबुतरांचे भिरभिरणारे थवे  खाली वाकून पहावे लागत होते. बलून जवळ-जवळ५०० फूट उंचीवर तरंगत होते. हवेतला थंडावा वाढत होता. मध्येच बलून खाली येई तेंव्हा खालचं दृश्य जवळून बघायला मिळंत होतं. अगदी तासभर हा सदेह तरंगण्याचा अनुभव घेतला.  आता वाऱ्याची दिशा बघून आमचं आकाशयान उतरवलं जात होतं. जवळ एक ओपन कॅरिअर असलेली मोटार गाडी येऊन थांबली. तिथल्या मदतनीसांच्या सहाय्याने ती लांबट चौकोनी टोपली गाडीच्या मोकळ्या कॅरिअरवर टेकविण्यात आली. हवा काढलेले बलून लोळा गोळा झाल्यावर कडेला आडवे पाडण्यात आले. पुन्हा कसरत करून उतरण्याचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी धाव घेतली ती भोवतालच्या द्राक्षांच्या झुडूपांकडे! काळीभोर रसाळ थंडं द्राक्षं स्वतःच्या हातांनी तोडून अगदी ‘आपला हात जगन्नाथ’ पद्धतीने खाण्यातली मजा औरच होती. काही द्राक्षांच्या उन्हाने सुकून चविष्ट मनुका तयार झाल्या होत्या. त्या तर अप्रतिम होत्या.

इस्तंबूल भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २६- भाग २ – पूर्व पश्चिमेचा सेतू – इस्तंबूल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

इस्तंबूल येथील १४५५ मध्ये बांधलेला ‘ग्रँड बाजार’ म्हणजे  एक आश्चर्य आहे. ३००० हून अधिक दुकानं असलेला हा ग्रँड बाजार म्हणजे भूलभुलय्या आहे. कापड, क्रोकरी, चपला, पर्सेस, बॅगा, तयार कपड्यांपासून ते सोन्या हिऱ्यापर्यंतची सगळीच दुकानं प्रवाशांना आकर्षित करतात. बाजाराच्या आतल्या साऱ्या वाटा  चक्रावून टाकणाऱ्या आहेत.  ‘आपण इथे हरवणार तर नाही ना?’ असं सारखं वाटंत होतं. खरेदीही महाग होती. ‘स्पाइस मार्केट’ इथे गेलो. स्पाइस मार्केटमध्ये पोत्यावरी पिस्ते, अक्रोड, अंजीर, खजूर, हेजलनट्स ठेवले होते. ड्रायफ्रूट्सच्या विविध  मिठायांनी दुकानं भरली होती. इथली ड्रायफ्रूट्सनी भरलेली बकलावा नावाची मिठाई खूप  आवडली.

(गलाटा टॉवर, फनीक्युलर रेल्वे, क्रूज प्रवास)

संध्याकाळी आम्ही सर्वांनी तिथल्या ट्रामने शहराचा फेरफटका मारायचं ठरवलं.त्या ट्रामने एक स्टेशन जा नाहीतर दहा स्टेशनं! तिकीट एकाच रकमेचं होतं.  आम्हाला तिकीट म्हणून नाण्यांसारख्या धातूच्या गोल चकत्या दिल्या. प्रत्येकाने तिथल्या मशीनमध्ये ते नाणं टाकलं की तो फिरता दरवाजा उघडे. ट्राम साधारण रेल्वेच्या डब्यासारखी होती.  कार्यालये नुकतीच सुटल्यामुळे गर्दीने खचाखच भरलेली होती. धक्के खात, खिसा- पाकीट सांभाळत थोडा प्रवास झाल्यावर गर्दी कमी झाली. दुतर्फा सजलेल्या दुकानांसमोर, रुंद फुटपाथवर टेबल खुर्च्या मांडून निवांतपणे खाण्यापिण्याचा आस्वाद घेणे चालले होते. ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला म्हणजे कलाबाश इथे आम्ही उतरलो. तिथून आम्हाला फनीक्युलर रेल्वेने प्रवास करायचा होता. डोंगराच्या पोटातून खोदलेल्या रेल्वेमार्गाने डोंगर चढत जाणारी ही गाडी होती. इलेक्ट्रिक वायरने ही गाडी डोंगरमाथ्यावर खेचली जाते. दोन डब्यांची ती सुबक, सुंदर, छोटी गाडी आतून नीट न्याहाळेपर्यंत डोंगरमाथ्याला आलोसुद्धा! या भागाला ‘इस्तीकलाल’ म्हणतात. आपल्या फोर्ट  विभागासारखा हा भाग आहे. दुतर्फा दुकानं, बँका, निरनिराळ्या देशांचे दूतावास, कार्यालये  आहेत.. केकपासून कबाबपर्यंत असंख्य गोष्टींनी दुकानं भरलेली होती. तो शनिवार होता आणि रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी २९ ऑक्टोबरला  टर्कीच्या ‘रिपब्लिक डे’ ची सुट्टी होती. चंद्रकोर व चांदणी मिरवणारे लाल झेंडे जिकडेतिकडे फडकत होते. जनसागर मजेत खात-पीत, फिरत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधूनच  उतरत्या वाटा आणि त्यांच्या कडेने सुंदर, स्वच्छ इमारती आहेत. बास्पोरस खाडीच्या किनाऱ्यावर दीपगृहासारख्या दिसणाऱ्या टॉवरच्या अगदी उंचावर, एक गोल प्रेक्षक गॅलरी आहे. काही हौशी लोक किनाऱ्यावरून खाली खाडीमध्ये गळ टाकून माशांची प्रतीक्षा करीत होते.

बास्पोरस खाडीच्या मुखावर असलेलं ‘गोल्डन हॉर्न’ हे एक नैसर्गिक व सुरक्षित बंदर आहे. प्रवासासाठी, व्यापारासाठी या बंदराचा फार पूर्वीपासून उपयोग केला गेला. गोल्डन हॉर्नच्या साथीने आणि साक्षीने इस्तंबूल विकसित आणि समृद्ध होत गेलं. युरोप व आशिया खंडांना जोडणारा बास्पोरस खाडीवरील जुना पूल वाहतुकीला अपुरा पडू लागल्यावर आता आणखी एक नवा पूल तिथे बांधण्यात आला आहे. गोल्डन हॉर्नमधील लहान मोठ्या बोटींवरील दिवे चमचमत होते. खाडीच्या पाण्यात त्या दिव्यांची असंख्य प्रतिबिंबे हिंदकळत होती. क्रूझमधून जुन्या बास्पोरस ब्रिजपर्यंत जाऊन आलो. बास्पोरस खाडीतच पाय बुडवून उभ्या असलेल्या, गतवैभवाची साक्ष असणाऱ्या, राजेशाही, देखण्या इमारती, काठावरचा डोल्माबाची पॅलेस, त्यामागे डोकावणारं अया सोफिया म्युझियम, दूरवर दिसणारे ब्लू मॉस्कचे मिनार यांनी रात्र उजळून टाकली होती. युरोप- आशियाला जोडणारा बास्पोरस खाडीवरील सेतू, छोट्या- छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत होता.

हातांनी विणलेले लोकरीचे व रेशमी गालीचे ही टर्कीची प्राचीन, परंपरागत कला आहे. तिथल्या लालसर गोऱ्या स्त्री कारागीर, त्यांच्या लांबसडक बोटांनी गालीचे विणण्याचे काम कौशल्याने करीत होत्या. एका लेदर फॅक्टरीमध्ये आधुनिक फॅशनचा, पुरुषांच्या व स्त्रियांच्या लेदर कपड्यांचा फॅशन शो बघायला मिळाला. रात्री एका हॉटेलमध्ये गोऱ्यापान, कमनीय, निळ्या परीचा बेली डान्स पाहिला. प्रवाशांसाठी मदिराक्षी बरोबर मदिरेची  उपस्थिती हवीच! राकी नावाचं बडीशेपेपासून बनविलेलं मद्य ही टर्कीची खासियत आहे.

मारमारा समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणाऱ्या बास्पोरसच्या खाडीवरील पूल ओलांडून  आम्ही इस्तंबूलच्या आशिया खंडातील भागात असलेल्या हैदरपाशा रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आज नेमका दसरा होता आणि दसऱ्याचं सीमोल्लंघन आम्ही युरोपाखंडातून  आशिया खंडात आणि ते सुद्धा बसने केलं. रेल्वेगाडीत दोन प्रवाशांची सोय असलेल्या छोट्या केबिन्स सर्व सोयींनी सुसज्ज होत्या. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नेत्रसुखद रंगांच्या सुरेख, शोभिवंत इमारती, हिरव्या बागा, पलीकडे एजिअन समुद्र आणि थंड, स्वच्छ, कोरड्या हवेत रमत गमत चालणारे, युरोपियन पेहरावतले स्त्री-पुरुष, मुलं असं दृश्य काळोख होईपर्यंत दिसंत राहीलं.

इस्तंबूल भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २६- भाग १ – पूर्व पश्चिमेचा सेतू – इस्तंबूल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

‘अंकारा’ ही आधुनिक टर्कीची (Turkey) राजधानी आहे पण टर्कीची (टर्कीचे आता ‘टर्कीये’ (Turkiye )असे नामकरण झाले आहे.) ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यापारी राजधानी ‘इस्तंबूल’ आहे. इस्तंबूलचं पूर्वीच नाव कॉन्स्टॅन्टिनोपल. जुन्या सिल्क रूटवरील  (रेशीम मार्ग) या महत्त्वाच्या शहरात प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीचा सुंदर संगम झाला आहे. जुन्या वैभवाच्या खुणा अभिमानाने जपणाऱ्या इस्तंबूलचं भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांच्यामध्ये असलेलं टर्की हे  मुख्यतः आशिया खंडात येतं. पण इस्तंबूलचा वायव्यकडील थोडासा भाग युरोप खंडात येतो. इस्तंबूलच्या एका बाजूला मारमारा समुद्र तर दुसऱ्या बाजूला बॉस्पोरसची खाडी आहे. बॉस्पोरस खाडीवरील पुलाने  युरोप व आशिया हे दोन खंड जोडले जातात.

इस्तंबूलला लाभलेले स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, थंड कोरडी हवा यामुळे मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जगभरच्या प्रवाशांनी इस्तंबूल फुलून जाते. समुद्रस्नान, सूर्यस्नान करण्याची मजा, ताजी रसरशीत फळं, तरतऱ्हेच्या भाज्या, विपुल प्रमाणात असणारे अंजीर, बदाम, खजूर, अक्रोड, पिस्ते आणि समृद्ध सागरी मेजवानी यामुळे प्रवाशांचं, खवय्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. ऑलिव्ह फळांचा हा मोठा उत्पादक देश आहे. लज्जतदार जेवणामध्ये, तरतऱ्हेच्या सॅलड्समध्ये मुक्तहस्ताने ऑलिव्ह ऑइल  वापरले जाते.

रोमन, ग्रीक, ख्रिश्चन, ऑटोमन साम्राज्याचे सुलतान अशा वेगवेगळ्या संस्कृती इथे हजारो वर्षे नांदल्या. या कालावधीत निर्माण झालेली अनेक वास्तूशिल्पे म्हणजे कलेचा   प्राचीन  अनमोल वारसा आजही टर्कीने कसोशीने जपला आहे. कालौघात काही वास्तू भग्न झाल्या तर काही नष्ट झाल्या. तरीही असंख्य उर्वरित वास्तु प्रवाशांना आकर्षित करतात.

इस्तंबूलमधील ‘अया सोफिया म्युझियम’ हे एक चर्च होतं. चौदाशे वर्षांपूर्वी सम्राट जस्टिनियन याने ते बांधलं . एका भव्य घुमटाच्या चारही बाजूंना चार अर्ध घुमट आहेत.  त्या घुमटांना आतील बाजूनी सोनेरी आणि निळसर रंगाच्या लक्षावधी मोझॅक टाइल्स लावल्या आहेत. वास्तूच्या भिंती आणि खांब यांच्यासाठी गुलबट रंगाच्या संगमरवराचा वापर केला आहे. छताला ख्रिश्चन धर्मातील काही प्रसंग, मेरी व तिचा पुत्र अशा भव्य चित्रांची पॅनल्स आहेत. इस्लामच्या आगमनानंतर यातील काही पॅनेल्स प्लास्टर लावून झाकायचा प्रयत्न झाला.घुमटाच्या खालील भिंतींवर कुराणातील काही अरेबिक अक्षर कोरली आहेत. उंच छतापासून  लांब लोखंडी सळ्या लावून त्याला छोटे छोटे दिवे लावले जायचे.   पूर्वी या दिव्यांसाठी ऑलिव्ह ऑइल वापरत असंत. ऑलिव्ह ऑइल ठेवण्याचा एक भला मोठा संगमरवरी कोरीव रांजण तिथे एका बाजूला चौथ्यावर ठेवला आहे. आता हे दिवे इलेक्ट्रिकचे आहेत.घुमटांना आधार देणारे खांब भिंतीत लपविलेले आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आधाराशिवाय असलेले हे भव्य घुमट पाहून आश्चर्य वाटतं.

तिथून जवळच सुलतान अहमद याने सोळाव्या शतकात सहा मिनार असलेली भव्य मशीद उभारली आहे. ती आतून निळ्या इझनिक टाइल्सने सजविली आहे. म्हणून या वास्तूला  ‘ब्लू मॉस्क’ असं नाव पडलं आहे .उंचावरील रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या, असंख्य हंड्या- झुंबरं, त्यात लांब सळ्यांवरून सोडलेले छोटे छोटे दिवे त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशात सर्वत्र सोनेरी निळसर प्रकाश पाझरत होता.

मारमारा समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेला ‘टोपकापी पॅलेस’ म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानांच्या वैभवाची साक्ष  आहे. इसवीसन १४०० ते१८०० ही चारशे वर्षं इथून राज्यकारभार चालला. त्या भव्य महालात वेगवेगळे विभाग आहेत. भल्यामोठ्या स्वयंपाकघरातील महाकाय आकाराची भांडी, चुली, झारे, कालथे, चिनी व जपानी सिरॅमिक्सच्या सुंदर डिझाइन्सच्या लहान मोठ्या डिशेस, नक्षीदार भांडी बघण्यासारखी आहेत. काही विभागात राजेशाही पोशाख, दागिने मांडले होते. तीन मोठे पाचू बसविलेला रत्नजडित टोपकापी खंजीर आणि ८६ कॅरेट वजनाचा सोन्याच्या कोंदणात  बसविलेला  लखलखीत हिरा, रत्नजडित सिंहासन वगैरे पाहून डोळे दिपतात. सुलतानाच्या स्त्री वर्गाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे ‘हारेम’ राजेशाही आहे. बाहेरच्या एका मनोऱ्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीची जागा आहे.

बास्पोरसच्या किनाऱ्यावर ‘अल्बामाची’ हा सुलतानांनी बांधलेला युरोपियन धर्तीचा राजवाडा आहे. उंची फर्निचर, गालीचे, सोन्या चांदीने नटविलेले,मीना वर्कने  शोभिवंत केलेले चहाचे सेट्स, डिशेस, वेगवेगळ्या खेळांची साधने सारे चमचमत होते. ‘हारेम’ विभागात माणकांसारखी लाल, बखरा क्रिस्टलची दिव्यांची लाल कमळं, त्याचे लाल लाल लोलक,लाल बुट्टीदार गालीच्यांच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात भरत होते. फ्रेंच क्रिस्टल ग्लासचे कठडे असलेला, लाल कार्पेटने आच्छादित केलेला रुंद जीना उतरून आम्ही खालच्या भव्य हॉलमध्ये आलो. सगळीकडे सुंदर शिल्पे मांडलेली होती. भिंतीवरील भव्य छायाचित्रे नजर खिळवून ठेवत होती. हॉलमध्ये साडेसातशे दिव्यांचं, चार हजार किलो वजनाचं भव्य झुंबर आहे. हे झुंबर ज्या छताला बसवलं आहे ते छत इटालियन, ग्रीक, फ्रेंच अशा कारागिरांच्या कलाकृतींनी सजलेलं आहे. छत अशा पद्धतीने रंगविलं आहे की ते सरळ, सपाट असे न वाटता, इल्युजन पेंटिंगमुळे घुमटाकार  भासत होतं.

‘हिप्पोड्रोम’ हे रोमन काळामध्ये रथांच्या शर्यतीचं ठिकाण होतं. जवळच इजिप्तहून आणलेला ओबेलिक्स म्हणजे ग्रॅनाईटचा खांब उभा केला आहे. त्यावर इजिप्तशियन चित्रलिपी कोरलेली आहे. त्यापासून थोड्या अंतरावर डेल्फीहून म्हणजे ग्रीसमधून आणलेला सर्पस्तंभ आहे. त्याची सोन्याची  ३ मुंडकी लुटारुंनी फार पूर्वीच पळविली आहेत. जवळच एका जर्मन सम्राटाने सुलतानाला भेट म्हणून दिलेलं कारंजं आहे.

तिथून थोड्या अंतरावर सम्राट जस्टिनियन याने चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेला टोरेबातान सरा नावाचा जलमहाल आहे. जमिनीखाली असलेला हा जलमहाल अजूनही चांगल्या स्थितीत आहे. ग्रॅनाईटच्या लाद्यांवर जुन्या महालांचे सुस्थितीतील ३५० खांब उभे करून त्यावर गच्चीसारखं बांधकाम केलं आहे. लांबवर असलेल्या डोंगरातील पाणी पाईपने  इथे आणून त्याचा साठा करून ठेवंत असंत. युद्धकाळात या साठ्याचा उपयोग होत असे. या जलमहालाचा एक खांब म्हणजे ‘मेडूसा’ या शापित सौंदर्यवतीचा मुखवटा आहे. मेडूसाचा हा मुखवटा उलटा म्हणजे डोकं खाली टेकलेला असा आहे. तिच्याकडे सरळ, नजरेला नजर देऊन कोणी पाहिलं तर ती व्यक्ती नष्ट होत असे अशी दंतकथा आहे.

इस्तंबूल भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २५- भाग ३ -कारीबू केनिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

केनियातील मसाईमारा आणि टांझानियातील गोरोंगोरो,सेरेंगेटी  हा सारा सलग, एकत्रित, खूप विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. राजकीय सोयीसाठी त्याचे दोन विभाग कल्पिलेले आहेत. इथले एक आश्चर्य म्हणजे ‘ग्रेट मायग्रेशन’! दरवर्षी ठराविक वेळेला लाखो प्राणी झुंडीने स्थलांतर करतात ते बघायला जगभरचे प्रवासी आवर्जून येतात. साधारण जुलै पर्यंत टांझानियातील गोरोंगोरो, सेरेंगेटी  इथले हिरवे गवत संपते, वाळते. अशावेळी फक्त गवत हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले  लक्षावधी वाइल्ड बीस्ट, झेब्रे, हरणे ग्रुमिटी आणि मारा या नद्या ओलांडून, हजारभर मैलांचे अंतर कापून, केनियाच्या मसाईमारा विभागात येतात. कारण मार्च ते जूनपर्यंत केनियात पडणाऱ्या पावसामुळे तिथे भरपूर ओला चारा असतो.  मसाईमारा विभागात जेंव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये हिरवे गवत संपते, वाळते तेंव्हा हे प्राणी पुन्हा सेरेंगेटी, गोरोंगोरो इथे स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराच्या काळात सिंह, चित्ता, बिबळ्या तिथे बरोबर दबा धरून बसलेले असतात. आणि नदीतील मगरी तर त्यांची वाटच पहात असतात.आयते चालून आलेले भक्ष त्यांना मिळते तर काही वेळेला एका वेळी हजारो प्राणी नदी प्रवाह ओलांडून जात असताना त्यांच्या वजनाने सुसरी दबून जातात. नदीच्या आजूबाजूला कोल्हे, तरस, गिधाडे हीसुद्धा उरलेसुरले  मिळवायला टपून असतात. शेकडो वर्षांची ही निसर्गसाखळी घट्ट टिकून आहे. नाहीतरी नद्या, वारा, पक्षी, प्राणी यांना सरहद्दीची बंधने नसतातच. लाखो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे सयबेरियातील फ्लेमिंगो व इतर पक्षी ठराविक काळापुरते येतात व त्यांच्याकडील कडाक्याची थंडी संपल्यावर परत आपल्या ठिकाणी जातात. निसर्गाने पक्ष्यांना, प्राण्यांना बहाल केलेली ही जीवनशक्ती आहे.

आज लवकर नाश्ता करून, चार तासांचा प्रवास करून नैवाशा लेकला पोहोचलो. या विस्तीर्ण जलाशयातून एक तासाची सफर होती. त्या विस्तीर्ण तलावाच्या कडेने झाडे- झुडपे, पाणवनस्पती होत्या. खडकासारखे दिसणारे पाणघोडे डुंबत होते. इथले खंड्या पक्षी ( किंगफिशर ) काळ्या- पांढऱ्या रंगाचे होते. ते पाण्यावर धिरट्या घालून, लांब चोचीत अचूक मासा पकडून, झाडावर घेऊन जात. जलाशयाच्या कडेने पिवळ्या चोचींच्या बदकांचा थवा चालला होता. लांब लाल चोच आणि उंच लाल पाय असलेला पांढराशुभ्र बगळा बकध्यान लावून मासे टिपत होता. आमच्या नावाड्याने पाण्यात भिरकावलेला मासा, लांब झाडावर बसलेल्या गरुडाने भरारी घेऊन अचूक टिपला. एका बेटावरील झाडीत जिराफ, लांब माना आणखी उंच करून झाडपाला ओरबाडीत होते. बेटावर उतरून थोडे पायी फिरलो. गेझल्सचा (हरिणांचा) खूप मोठा कळप कमानदार उड्या मारीत पळाला. हरिणांसारखेच पण चांगले मोठे, काळपट तपकिरी रंगाचे, पाणीदार डोळ्यांचे, उंच शिंगे असलेले ॲ॑टीलोप नावाचे  प्राणीही होते.

आज ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’ या प्रदेशातून लेक नुकरू नॅशनल पार्क इथे जायचे होते. चहा व कॉफीचे मळे रस्त्याच्या कडेला होते. डोंगर उतारावर शेती होती. खालच्या उंच सखल पोपटी दरीमध्ये निळ्याशार पाण्याची छोटी- मोठी तळी, सूर्यप्रकाशात निळ्या रत्नासारखी चमकत होती. ही ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणजे मूळ मानवाचे जन्मस्थान मानले जाते. संध्याकाळी लेक नुकरू या मचुळ पाण्याच्या सरोवरापाशी गेलो. भोवतालच्या दलदलीत असंख्य काळे- पांढरे पक्षी चरत होते. हेरॉन, पेलिकन, शुभ्र मोठे बगळे होते. कातरलेले पंख असलेले स्पर विंगड् गूझ होते.

विषुववृत्ताची कल्पित रेषा केनियामधून जाते. दुसऱ्या दिवशी माउंट केनिया  रीजनला जाताना, वाटेत थॉमसन फॉल्स नावाचा धबधबा पाहिला. एका गावामध्ये ‘इक्वेटर’ अशी पाटी होती. तिथे थोडा वेळ थांबलो. तिथून माउंट केनियाकडे जाताना रस्त्यावर अनेक धावपटू स्त्री-पुरुष पळताना दिसले. इथल्या ‘केनिया स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये ऑलम्पिक पदक विजेते धावपटू घडविले जातात. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या गावात केनियातीलच नाही तर अन्य देशांचे खेळाडू प्रशिक्षणासाठी येतात.

१६०००.फूट उंच असलेल्या माउंट केनियाच्या उतरणीवर ‘सेरेना माउंट लॉज’ हे गर्द जंगलातील हॉटेल ५२०० फूट उंचीवर आहे. संपूर्ण हॉटेल महोगनी आणि सीडार वृक्षांचे लाकूड वापरून बांधलेले आहे. प्रत्येक रूममधील काचांच्या मोठ्या खिडक्यातून पुढ्यातला छोटा, नैसर्गिक मचुळ पाण्याचा तलाव दिसत होता. तलावाच्या आजूबाजूच्या जमिनीत खनिज द्रव्य आहेत. ही खनिज द्रव्य मिळविण्यासाठी, इथली माती चाटण्यासाठी जंगली प्राणी रात्री या पाण्यावर येतात. हॉटेलला मोठे फ्लड लाईट लावून ठेवले होते. वेगवेगळे प्राणी पाण्यावर आले की हॉटेलचा स्टाफ आपल्याला सूचना द्यायला येतो. तसेच एक घंटाही वाजवतात. रानटी म्हशी, हरिणे, रानडुक्कर, हैना असे अनेक प्राणी आम्हाला काचेतून दिसले.

माउंट केनिया हा थंड झालेला ज्वालामुखी पर्वत १६००० फूट उंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शिखरावरील बर्फ चमकताना दिसत होते. केनियाच्या आग्नेय दिशेला हिंदी महासागर आहे. युगांडा, टांझानिया, सुदान, सोमालिया हे देश सभोवती आहेत. १९६३ मध्ये केनियाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा जोमो केन्याटा  हे पहिले पंतप्रधान झाले. शेतीप्रधान असलेल्या या देशातून चहा व कॉफीची निर्यात होते. अलीकडे ताजी गुलाबाची व इतर फुले युरोपमध्ये निर्यात केली जातात. पर्यटन हेही उत्पन्नाचे मोठे साधन आहे.

देवाघरचे हे समृद्ध निसर्ग वैभव एक प्रवासी म्हणून आपल्याला आवडते परंतु तिथल्या सर्वसामान्य माणसाचे जीवन फार कष्टाचे, गरिबीचे आहे.

आक्रमक घुसखोर स्वभावाला अनुसरून  चिनी ड्रॅगनने आपला विळखा जवळजवळ सर्व आफ्रिकेला घातला आहे. एअरपोर्ट, बंदरे, रस्ते अशा सोयी उभारून देणे, त्यासाठी प्रचंड कर्ज देणे आणि कर्ज फेड न झाल्याने ते प्रोजेक्ट गिळंकृत करणे अशी ही कार्यशैली आहे.( याबाबतीत नेपाळ व श्रीलंकेचे उदाहरण आहेच). आफ्रिकेतील शेतजमिनी, खाणी यामध्ये चीनने प्रचंड गुंतवणूक केली आहे. केनियामध्येही चिनी गुंतवणुकीचा वाढता ओघ आहे.

नैसर्गिक व खनिज संपत्तीचे वरदान असलेल्या या देशांना ब्रिटनने आधीच लुटले आहे. आता देशातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी केनिया  आणि इतर आफ्रिकी देशांनी चिनी कर्जांच्या काटेरी सापळ्यात न अडकता पुढील वाटचाल केली तर ते हितावह होईल. पण…….

केनिया भाग ३ व केनिया समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २५- भाग २-कारीबू केनिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

मसाई लोकांचे छोटे घर बघायला गेलो. अगदी कोंदट, अंधारी जागा होती. त्यातच गवताचे पार्टिशन घातले होते. एका बाजूला मधोमध पेटती चूल व चुलीच्या दोन्ही बाजूंना झोपण्यासाठी मातीचे कट्टे होते. एका कट्ट्यावर छोटी मुलं व दुसऱ्या कट्ट्यावर आई-बाबा अशी झोपायची व्यवस्था होती. मागच्या भिंतीला छोटासा झरोका होता. जेवणासाठी लाकडी भांडी होती. जरा मोठी झालेली मुलं गवती पार्टिशनच्या पलीकडे अथवा आपल्या दुसऱ्या आयांकडे झोपतात. बाहेर आल्यावर तिथल्या पुरुषाने सिडार वृक्षाच्या लाकडावर सॅ॑डपेपर वूड घासून अग्नी तयार करून दाखविला.

बाजार बघायला गेलो. तिथे मण्यांच्या माळा, बांगड्या, लाकडी कंगवे, टोपल्या, मातीचे प्राणी, रंगविलेली बाउल, त्यांनी गुंडाळली होती तसली कापडं विकायला ठेवली होती. थोडी दूर असणारी नदी म्हणजे खळाळत वाहणारा गढूळ पाण्याचा ओढा होता. इथे अंघोळ, कपडे धुणे वगैरे चालते.

‘मसाई’ हाच मसाई लोकांचा धर्म आहे. प्राचीन परंपरांची जोखडं आपल्या खांद्यावरून उतरवायला ते तयार नाहीत. एका पुरुषाला कितीही लग्ने करण्याचा अधिकार आहे. मसाई स्त्रीचे आयुष्य अत्यंत कष्टप्रद आहे. स्त्री सतत बाळंतपणाच्या चक्रातून जात असते. त्यामुळे स्त्रिया कुपोषित, मुले कुपोषित व बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. जितकी अधिक मुले तितकी अधिक श्रीमंती अशी समजूत आहे.

पहाटे सुरू होणारा मसाई स्त्रीचा दिवस, मध्यरात्र झाली तरी संपत नाही. एकेका स्त्रीला पंधरा-पंधरा गाईंचे दूध काढावे लागते. दूध हे तिथले मुख्य अन्न आहे. कुटुंबातील सर्वांचे दूध घेऊन झाले की उरलेले दूध स्त्रीच्या वाट्याला येते.तिला लांबवर जाऊन डोक्यावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. जंगलात जाऊन चुलीसाठी लाकूडफाटा गोळा करणे हे तिचेच काम! त्यावेळी जंगलातील हत्ती, रानटी म्हशी, सिंह, साप यांची भीती असते. एका वेळी ३०-४० किलो सरपण तिला आणावे लागते कारण घर उबदार ठेवणे आणि घरातला अग्नी सतत पेटता ठेवणे ही तिचीच जबाबदारी! राख, चिखल, गवत वापरून घर बांधण्याचे, गळके घर दुरुस्त करण्याचे कामही स्त्रियाच करतात. स्वयंपाक करणे, घर सारवणे, कपडे धुणे, गाई धुणे, गाभण गाईंवर, आजारी गाईंवर लक्ष ठेवणे, परंपरागत झाडपाल्याची औषधे गोळा करणे, कधी लांबच्या बाजारात जाऊन गाय देऊन मका, बीन्स, बटाटे खरेदी करणे अशी तिची खडतर दैनंदिन असते. भरीला नवऱ्याची मारझोडही असतेच.

एवढ्या मालमत्तेची देखभाल केली तरी या मालमत्तेवर मसाई स्त्रीचा कोणताही हक्क नसतो. त्या समाजात घटस्फोट मान्य नाही. स्त्रीचे परत लग्न होत नाही. नवऱ्याच्या अनेक बायकातील एक आणि मुलांना जन्म देणारी असे तिचे स्थान आहे. जेवणात गाई, शेळ्या- मेंढ्या यांचे मांस वापरले जाते. मारलेल्या जनावरांचे मांस, हाडे, कातडी यांची नीट व्यवस्था तिला करावी लागते. या साऱ्यातून वेळ काढून ती हौसेने स्वतःसाठी, मुलांसाठी व नवऱ्यासाठीसुद्धा मण्यांच्या, खड्यांच्या माळा बनविते. ब्रेसलेट, बांगड्या, कानातले दागिने बनविणे हे उद्योगसुद्धा करते. एवढेच नाही तर दर दहा वर्षांनी स्थलांतर केले जाते त्याचीही जबाबदारी तिच्याकडेच असते.

आजही अनेक अघोरी प्रकार तिथे पाहायला मिळतात. आठवड्यातून एकदा एका गायीच्या मानेजवळील शीर कापून तिचे रक्त दुधात घालून सर्वांनी घेण्याची प्रथा आहे. त्या गाईच्या जखमेवर झाडपाल्याचे औषध लावून तिला नंतर रानात सोडून देतात. आणखी एक अघोरी प्रथा म्हणजे मुली ११ ते १३ वर्षांच्या असताना म्हणजेच त्या वयात येताना त्यांचा योनीविच्छेद(Female circumcision ) करण्यात येतो. म्हणजे स्त्रीच्या योनीतील लैंगिक अवयव थोडा अथवा पूर्णपणे काढून टाकण्यात येतो. हे काम इतर स्त्रिया धारदार शस्त्राने, कसलीही भूल वगैरे न देता करतात. त्यावेळी जी मुलगी ओरडेल ती भित्री समजली जाते. स्त्रीची कामेच्छा कमी व्हावी या हेतूने ही पूर्वपार चालत आलेली प्रथा आहे. यात जंतुसंसर्ग होऊन, अतिरक्तस्त्राव होऊन किती स्त्रियांचा बळी जात असेल ते त्या मसाईनाच माहित!

नैरोबीला एका हॉटेलच्या आवारात एक सरळसोट उंच, हिरवा, जाड बुंध्याचा वृक्ष आणि त्याला अगदी लगटून वाढलेले फड्या निवडुंगाचे उंच झाड वेगळे वाटले म्हणून कुतूहलाने बघत मी उभी होते. तेंव्हा तिथल्या वेटरने माहिती दिली की या मोठ्या झाडाने त्या फड्या निवडुंगालाच आपले खाद्य बनविले आहे. परत नीट बघितल्यावर लक्षात आले की त्या निवडुंगाच्या काट्यासकट दोन फांद्या अर्ध्या- अर्ध्या संपल्या आहेत. असं वाटलं की मसाई जमातीतील  अमानुष प्रथा, परंपरा, रुढी यांच्या राक्षसी झाडाने मसाई स्त्रीची काटेरी वाटसुद्धा गिळून टाकली आहे. तिचा जीवनरस शोषून घेतला आहे.

सरकारतर्फे मसाईंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. त्यांच्या वसाहतीला जवळ पडेल अशी शाळा बांधण्यात येते. मुलींना शाळेत न पाठविल्यास तुरुंगवासाची शिक्षा आहे. प्रत्यक्षात आम्ही पाहिले तेंव्हा मुली लहान भावंडांना सांभाळीत होत्या आणि शाळेतून नुकताच परत आलेला, समुहप्रमुखाचा युनिफॉर्ममधील  मुलगा छान, स्वच्छ, चुणचुणीत वागत- बोलत होता. त्यांच्यातील काही धडपड्या महिलांनी अनेक कष्ट, हाल- अपेष्टा, पुरुषांचा मार सोसून  शिक्षण घेतले आहे. आपल्या व्यथा, आपल्यातील वाईट प्रथा उघड्या केल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काही काम सुरू केले आहे. मसाई स्त्रियांना भाजीपाला, फळे लावायला शिकविणे, शिवण शिकविणे, लिहा- वाचायला शिकविणे, प्राथमिक आरोग्याचे शिक्षण देणे अशी त्यांची अनेक उद्दिष्टे आहेत. अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये रेडक्रॉसचे डॉक्टर कुटुंब नियोजनाच्या गोळ्या देतात. आपली बायको असे औषध वापरत आहे हे नवऱ्याच्या लक्षात आल्यास तिला अमानुष मार पडतो.

नुसत्या भाल्याने सिंहाची शिकार करणारे मसाई पुरुष अजून तरी बाह्य जगाच्या दबावाला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत. सरकारलाही थोडे त्यांच्या कलाने घ्यावे लागते. स्वतःचे आरामशीर, आळशी आयुष्य सोडायला मसाई पुरुष सहजासहजी तयार होणार नाहीतच. जर त्यांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाल्या तर कालांतराने मसाई स्त्रीचे जीवन सुसह्य होऊ शकेल.

केनियामधील दुसऱ्या एका लॉजच्या कंपाउंडला षटकोनी लांबट आकाराचा, निवडुंगाचा खूप मोठा जाड बुंधा असलेला वृक्ष बघायला मिळाला. त्याच्या शेंड्यावर पिवळट फुलांचे मोठे गुच्छ आले होते. गाईड म्हणाला की या झाडावर पंचवीस- तीस वर्षांनी अशी फुलं येतात. मसाई स्त्रीच्या काटेरी वाटेवर काही वर्षांनी तरी आनंदाची फुलं फुलतील का? मसाई स्त्रियांच्या वाट्याला आलेले दुर्दैवी जीवन बघून खिन्न मनाने त्यांचा निरोप घेतला.

केनिया  भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २५- भाग १-कारीबू केनिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

मुंबईहून विमानाने केनियाची राजधानी नैरोबी इथे उतरलो तेव्हा ‘कारीबू केनिया’  असे लिहिलेल्या, सुहास्यवदना ललनांच्या जाहिराती दिसल्या. गाईडने सांगितले की ‘कारीबू’ म्हणजे सुस्वागतम!

नैरोबीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून खूप लवकर निघालो.   पाचशे किलोमीटर्सचा प्रवास करून ‘मसाईमारा’ या जगप्रसिद्ध नॅशनल रिझर्वमध्ये पोहोचायचे होते.आमच्या ‘टोयोटो लॅ॑डक्रुझर’ या दणकट गाडीचा ‘चक्रधर’ डॅनियल हा सुशिक्षित पदवीधर आणि बोलका होता. शेवटचे शंभर किलोमीटर रस्ता असा नव्हताच. उंच- सखल खडबडीत जमीन, गवत, झुडपे, पाण्याचे ओहोळ असे असलेला, प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीने तयार झालेला, हाडं खिळखिळी करणारा तो जंगल मार्ग होता आणि डॅनियल म्हणत होता ‘हाकुना मटाटा, हाकुना मटाटा’. ‘नो प्रॉब्लेम, डोन्ट वरी. आणखी पुढे तुम्हाला खऱ्या जंगलाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे त्याची ही पूर्वतयारी आहे!’

घनदाट जंगलातल्या हॉटेलमध्ये जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि गेम ड्राईव्हसाठी म्हणजे प्राण्यांच्या भेटीसाठी निघालो.

लँडक्रुझरमधून बाहेर मैलोगणती सोनेरी हिरवा गवताळ प्रदेश दिसत होता. निसर्गाच्या त्या भव्य  कॅनव्हासवर  काळे- पांढरे पट्टे असलेले झेब्रे, खाली माना घालून अखंड चरणाऱ्या थोराड, काळपट रानटी म्हशी, मोठ्या कानाचे हत्ती कळपांनी दिसत होते.सिंहाचे सहकुटुंब  कळप होते. नाकावर दोन शिंगे असलेले गेंडे होते आणि सोनेरी तांबूस रंगाच्या हरिणांचे ( गेझल्स ) कळपच्या कळप दिसत होते. सिंह, हत्ती, रानटी म्हैस, बिबळ्या आणि गेंडा यांना इथे ग्रेट फाईव्ह म्हणतात त्यांचे मनसोक्त दर्शन झाले.

आफ्रिकन आणि आशियाई हत्तीखालोखाल, पांढरा गेंडा हा पृथ्वीवरील अवाढव्य प्राणी आहे. आपल्या कळपाची विशिष्ट हद्द ते स्वतःच्या एक प्रकारच्या उग्र गंधाने आखून घेतात. त्या हद्दीत इतर गेंडे आल्यास जीवघेणी मारामारी होते. लांबवर एक मोठा पक्षी गवतात काही टिपताना दिसला. दुर्बिणीतून पाहिल्यावर त्याची लांबलचक चोच नजरेत भरली. लाल ,काळी आणि पांढरी अशी तिरंगी चोच,   पांढरे पोट आणि काळी पाठ असलेल्या या पक्षाला ‘सॅडल बिल्ड स्टॉर्क’  म्हणतात असे गाईडने सांगितले.

संध्याकाळ झाली होती. जोरदार पाऊस सुरु झाला होता.  जंगल अनुभवून हॉटेलच्या दाराशी आलो तर इतर प्रवासी समोरच्या डोंगराकडे दुर्बिणी आणि कॅमेरे रोखून पहात होते. डोंगर माथ्यावर काळ्या ढगांचा गच्च पडदा होता. पावसात भिजत नीट निरखून पाहिले तर त्या डोंगराच्या खबदाडीत एक सिंहाचे कुटुंब शिकारीवर ताव मारीत होते. सिंहीणीने शिकार करून आपल्या कुटुंबासाठी इथे ओढून आणली होती आणि ती बाजूलाच पंजे चाटीत बसली होती. ‘जीवो जीवस्य जीवनम्’.

दुसऱ्या दिवशी मसाईंचे एक गाव बघायला गेलो. तीन- चार तासांचा जीपचा खडतर प्रवास होता. या प्रवासात वाटेत खूप ठिकाणी शेकडो गाई- गुरांचे अनेक कळप दिसत होते. त्यांच्याबरोबर होते उंचनिंच, काटक, कणखर मसाई पुरुष! त्यांनी कमरेला अर्ध्या लुंगीसारखे लाल, भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते.  मोठ्या डिझाईनची निळी, पिवळी चादर दोन्ही खांद्यांवरून गुंडाळून घेतली होती. हातात काठी, भाला आणि कमरेला धारदार सुरा होता. काही तरुणांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या मातीने रंगविले होते. नुकतीच ‘सुंथा’ झालेले तरुण असे चेहरे रंगवितात अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने दिली.

मसाई गावात पोचल्यावर तिथल्या एकाने इंग्लिशमधून बोलायला सुरुवात केली. तो व तिथल्या गावप्रमुखांनी जवळच्या मोठ्या गावात जाऊन शालेय शिक्षण घेतल्याचं कळलं. आधीच ठरविलेले डॉलर्स हातात पडल्यानंतर तिथल्या गावप्रमुखांनी डोक्यावर सिंहाच्या आयाळीची टोपी आणि हातात रानटी म्हशीचे लांब, वेडेवाकडे शिंग तोंडाजवळ आडवे धरून आमचे स्वागत केले. आम्ही दिलेले डॉलर्स मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येतात असेही त्याने सांगितले. साधारण तीनशे लोकवस्तीचे हे गाव. त्यांचा मूळ पुरुषही मध्येच डोकावून गेला. त्याला १७ बायका व ८७ मुले असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे हे छोटं गाव एका पुरुषाच्या भल्या मोठ्या कुटुंबाचा विस्तार होता.

गोलाकार मोठ्या कुंपणाच्या कडेने छोट्या चौकोनी झोपड्या होत्या. माती, शेण, गवत यांनी बांधलेल्या त्या झोपड्यांवर घट्ट विणलेल्या गवताचे उतरते छप्पर होते. गाई- गुरांचे शेण सर्वत्र पडलेले होते. माशा घोंगावत होत्या. छोट्या मुली कडेवर भावंड घेऊन आमच्याकडे टुकूटुकू बघत होत्या. काही छोटी मुलं खाली जमिनीवर झोपली होती. मुलांच्या सर्वांगावर माशा बसत होत्या. शेणाचा धूर करून या माशांना हाकलत का नाही असं विचारल्यावर,’ या माशा प्रेमाचे प्रतीक आहेत. जितक्या जास्त माशा अंगावर तितके त्यांचे नशीब चांगले’ असे निरुत्तर करणारे उत्तर मिळाले.

आमच्या स्वागतासाठी आठ-दहा मसाई स्त्रिया अर्धगोलाकार उभ्या राहून नाच करू लागल्या. त्यांचा नाच म्हणजे केवळ उंच उड्या व अधून मधून किंचाळल्यासारखे ओरडणे होते. मग आमच्यातील काहीजणींनी त्यांना फुगड्या घालून दाखविल्या. गरबा खेळून दाखविला. तेव्हा त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर फुगड्या घातल्या. सर्व स्त्रियांनी एका खांद्यावरून पदर घेऊन, अंगाभोवती वस्त्र गुंडाळले होते. आणि पाठीवरून एक वस्त्र घेऊन त्याची पुढे गाठ बांधली होती. लाल, पिवळ्या, भगव्या, निळ्या रंगांची ती मोठ्या डिझाईनची वस्त्रं होती. सर्वांच्या डोक्याचे गोटे केलेले होते. गळ्यात, हातात रंगीत मण्यांच्या  भरपूर माळा होत्या. कानामध्ये मण्यांचे इतके जड अलंकार होते की त्यांचे  कान फाटून मानेपर्यंत लोंबत होते.

केनिया  भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २४- भाग ४ -वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २४- भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️  वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ✈️

तेगस नदीच्या पात्रात १५२१ मध्ये बेलहेम टॉवर बांधला गेला. येणाऱ्या- जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर  लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले हे किल्ल्यासारखे मजबूत दगडी बांधकाम आहे. षटकोनी आकाराच्या या चार मजली टॉवरच्या प्रत्येक मजल्यावरून, त्याच्या नक्षीदार दगडी गवाक्षातून आपल्याला लांबवर पसरलेल्या नदीचे दर्शन होते. इथून जवळच ‘नॅशनल म्युझियम ऑफ आर्किऑलॉजी’ व नेव्हल म्युझियम आहेत.  नॅशनल म्युझियममध्ये इजिप्त, आफ्रिका इथल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, विविध डिझाइनच्या मोझॅक टाइल्स, त्या काळातील नाणी आहेत तर नेव्हल म्युझियममध्ये नव्या जगाच्या शोधासाठी वापरण्यात आलेली जहाजे, राजेशाही नौका, समुद्र सफरीची इतर साधने, दक्षिण अटलांटिक महासागर ओलांडणारे पहिले जहाज अशा जगाच्या इतिहासातील अमूल्य वस्तू आहेत.

(बेलेम टॉवर, लिस्बन, मॉन्युमेंट टू डिस्कव्हरीज, क्रिस्तो रे (येशू ख्रिस्त) पुतळा)

तिथून जवळच ‘मॉन्युमेंट टू द डिस्कव्हरीज्’ उभारले आहे. पोर्तुगालमधील ज्या धाडसी दर्यावर्दींनी साहसी सागरी सफरीमध्ये भाग घेतला, आपल्या जिवाची बाजी लावली त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक १९६० मध्ये उभारण्यात आले. समुद्रावर आरूढ झालेल्या शिडाच्या भव्य नौकेसारखे याचे डिझाईन आहे. यावर पंधराव्या व सोळाव्या शतकातील २१ दर्यावर्दी, ज्यांनी पोर्तुगालचे समुद्रावरील अधिपत्य अधोरेखित केले त्यांचे पुतळे आहेत. या साऱ्यांच्या नेतृत्वस्थानी प्रिन्स  एनरीक, जो स्वतः उत्तम दर्यावर्दी होता त्याचा पुतळा आहे. या स्मारकाच्या बाजूला

लांबरुंद फुटपाथवर सबंध पृथ्वीचा नकाशा, जलमार्ग, सर्व देशांची महत्त्वाची ठिकाणे व त्यांच्या राजधानीचे ठिकाण वेगवेगळ्या रंगाच्या ग्लेज टाइल्समध्ये अतिशय सुंदर रीतीने दाखविले आहे.

‘जेरोनिमस मॉनेस्ट्री’ हा सोळाव्या शतकातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मोनेस्ट्रीच्या अंतर्भागातील डिझाईनमध्ये वास्को-डि-गामाने आपल्या सागर सफरींमधून जे असंख्य प्रकारचे सोने, रत्ने, हिरे, मौल्यवान धातू पोर्तुगाल मध्ये आणले त्यांचा वापर केलेला आहे.युनेस्कोने १९८३ मध्ये या मोनेस्ट्रीचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अनेक प्रसंग इथे चितारलेले आहेत. प्रत्येक खांबावरील डिझाईन वेगवेगळे आहे. त्यावर धार्मिक चिन्हे, फुले, त्याकाळचे दागिने असे कोरलेले आहे.

या मोनेस्ट्रीमध्ये एका उंच चौथऱ्यावर वास्को-डि-गामाची टुम्ब ( थडगे ) आहे. त्यावर दोन्ही हात जोडून नमस्कार केल्याच्या स्थितीमध्ये आडवा झोपलेला असा वास्को-डि-गामाचा संगमरवरी पुतळा आहे. त्याच्या समोरच्या बाजूला पोर्तुगालचा प्रसिद्ध कवी व लेखक लुइस- डि- कामोस  याची तशाच प्रकारची टुम्ब आहे. या कवीने आपल्या महाकाव्यातून वास्को-डि-गामाच्या धाडसी सफरींचे गौरवपूर्ण वर्णन करून त्याला काव्यरूपाने अमर केले आहे. इसवीसन १५२४ मध्ये वास्को-डि-गामाचा मृत्यू कोचीन इथे झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याच्या मृतदेहाचे अवशेष पोर्तुगालला नेऊन ते या जेरोनिमस मोनेस्ट्रीमध्ये जतन करण्यात आले आहेत.

पोर्तुगाल म्हटलं की आपल्याला गोवा, दीव व दमण यांची आठवण होणं अपरिहार्य आहे. मसाल्याच्या व्यापारासाठी आलेल्या पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज लोकांनी भारतातील राजकीय अस्थिरतेचा, फुटीरतेचा फायदा घेऊन हिंदुस्तानात आपले साम्राज्य स्थापन केले हा अप्रिय पण सत्य इतिहास आहे. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात गोवा जिंकले. सत्तेबरोबर त्यांचा धर्मही रुजवायला सुरुवात केली. सत्ता, शस्त्रं, शक्तीच्या बळावर अत्याचार करून धर्मप्रसार केला. इंग्रजांचा इतिहासही काही वेगळे सांगत नाही.

भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यावरसुद्धा गोवा स्वतंत्र होण्यासाठी १९६१ साल उजाडले. त्यासाठी गोवा मुक्तिसंग्राम घडला. गोवा सत्याग्रहामध्ये अनेकांचा बळी गेला. त्यानंतरही लिस्बनमधील तुरुंगात असलेले श्री मोहन रानडे यांची सुटका माननीय श्री सुधीर फडके यांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. हा सारा कटू इतिहास आपण विसरू शकत नाही. आजही गोवा, दीव, दमण इथे पोर्तुगीजकालीन खुणा चर्च, घरे, रस्त्यांची, ठिकाणांची नावे अशा स्वरूपात आहेत. पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव तिथे जाणवतो.

इतिहास म्हणजे आपल्याला भविष्यकाळासाठी प्रेरणा देणारा काळाचा भव्य ग्रंथ आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी परकीय सत्ताधीशांच्या अनन्वित अत्याचाराला तोंड देत मृत्यूला जवळ केले आणि आपल्याला अनमोल स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी समृद्ध वर्तमान काळ उभा करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आपापल्या क्षेत्रातील प्रामाणिक योगदान ही स्वातंत्र्यवीरांसाठी कृतज्ञ श्रद्धांजली होईल. आपल्या भावी पिढ्यांसाठी ती अनमोल देणगी होईल.

भाग ३४ व पोर्तुगाल समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ -वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️  वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ✈️

कोइंब्राहून ‘फातिमा’ इथे जाताना वाटेत दोन्ही बाजूला काळ्या द्राक्षांचे मळे होते. मुख्यतः वाइन बनविण्यासाठी या द्राक्षांचा उपयोग केला जातो.’फातिमा’ हे युरोपमधील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.फातिमा हे ‘मदर मेरी’चे स्वरुप मानले जाते .१९२२ मध्ये इथे  उभारण्यात आलेल्या चर्चचे १९५३मध्ये ‘बॅसिलिका ऑफ रोझॅरिओ’ या नावाने पुनर्निर्माण  झाले. त्याच्या ६५ मीटर उंच टॉवरवर सोनेरी, नक्षीदार राजमुकुट आहे व त्यावर क्रॉस चिन्ह आहे. त्या चर्चच्या भव्य आवारात एका वेळी दहा लाख लोक प्रार्थनेसाठी एकत्र येऊ शकतात. आवारातील एका विशिष्ट रस्त्यावरून तरुण- वृद्ध, स्त्री- पुरुष हातात रोझरी (जपमाळ) घेऊन गुडघ्यांवर चालत चर्चपर्यंत जात होते. ते फातिमाला केलेला नवस फेडण्यासाठी आले होते. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसांच्या मनात असलेली श्रद्धा विविध स्वरूपात दिसते.माझ्या मनात आलं की,

पार्वती आणि अष्टभूजा

मेरी आणि फातिमा

रूपे सारी स्त्रीशक्तीची

देती बळ, आशिष आम्हाला

गाईडने सांगितले की आजही पोर्तुगालमध्ये मुलीचे नाव फातिमा ठेवले जाते व पोर्तुगीज भाषेत अनेक उर्दू शब्द आहेत.

पोर्तुगालमध्ये अनेक ठिकाणी रोमन  संस्कृतीच्या खुणा दिसून येतात. बाराव्या शतकापासून इथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला.आम्ही ‘इव्होरा’इथे गेलो होतो.इव्होराचा समावेश वर्ल्ड हेरिटेज मध्ये आहे. वैभवसंपन्न रोमन साम्राज्याच्या खुणा इथे जपण्यात आल्या आहेत. इथल्या उंच दगडी चौथऱ्यावरवरील नक्षीदार खांब हे रोमन देवता डायना हिच्या मंदिराचे आहेत. त्याच्यासमोर बाराव्या शतकात बांधलेले गॉथिक शैलीतील भव्य कॅथेड्रल आहे. सोळाव्या शतकात या कॅथेड्रलचे नूतनीकरण करण्यात आले. ओक वृक्षाचे लाकूड वापरून केलेले नक्षीदार खांब व पेंटिंग्स बघण्यासारखी आहेत.ओक वृक्षापासून बनविलेला सोळाव्या शतकातील ऑर्गन अजूनही वापरात आहे.

लिस्बन हे पोर्तुगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.तसेच ते पोर्तुगालची सांस्कृतीक, शैक्षणिक व व्यापारी राजधानी आहे.तेगस नदीच्या मुखावर वसलेले, सात टेकड्यांचे मिळून बनलेले लिस्बन हे सुंदर शहर आहे. अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या तेगस नदीचे पात्र इथे समुद्रासारखे रुंद आहे .पंधराव्या व सोळाव्या शतकातील राजांनी सागरी मोहिमांना पाठिंबा दिला. नव्या जगाचा शोध घेण्यासाठी अनेक धाडसी दर्यावर्दी जगप्रवासाला निघाले. प्रिन्स हेनरी हा स्वतः उत्तम साहसी दर्यावर्दी होता. या काळात सागरावर पोर्तुगीजांची सत्ता निर्माण झाली. लिस्बन हे व्यापारी केंद्र बनले. वास्को-डि-गामा याने दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला ( Cape of good hope ) वळसा घालून इसवीसन १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत येथे पाऊल ठेवले. सोळाव्या शतकात पोर्तुगीज दर्यावर्दी चीन, जपान एवढेच नव्हे तर दक्षिण अमेरिकेतील ब्राझील इथेसुद्धा पोचले होते. ब्राझीलमध्ये अनेक वर्षे पोर्तुगिजांच्या वसाहती होत्या. आज जगातील वीस कोटीहून अधिक लोक पोर्तुगीज भाषा बोलतात.

इसवीसन १७५५ मध्ये झालेल्या भयंकर भूकंपाने लिस्बन शहराची प्रचंड हानी झाली. त्यातून नवे शहर उभारण्यात आले. काटकोनात वळणारे रुंद रस्ते, सलग, सारख्या आकाराच्या इमारती, प्रवेशद्वाराजवळील भक्कम खांब, कमानी, बिल्डिंगवरील पुतळे, नक्षीकाम अशी शहर रचना नंतर सर्व युरोपभर पसरली. तेगस नदीवरील पुलाच्या दक्षिण टोकाला ८२ मीटर उंचीवर २८ मीटर उंचीचा ‘क्रिस्तो रे’ म्हणजे येशू ख्रिस्ताचा दोन्ही हात फैलावलेला भव्य पुतळा आहे. या पुतळ्याजवळील लिफ्टने वर जाऊन लिस्बनचे उत्तुंग दर्शन घेण्याची सोयही आहे.

तेगस नदीवरील या ब्रिजला ‘२५एप्रिल ब्रिज’ असेच नाव आहे. हा ब्रिज जगातील तेविसावा मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे. पोर्तुगालमध्ये दर वर्षी २५ एप्रिलला ‘नॅशनल हॉलिडे ऑफ फ्रीडम डे’ साजरा केला जातो. २५ एप्रिल १९७४ पूर्वी जवळजवळ ३५ वर्षे हुकूमशहा सालाझार याची एकतंत्री राजवट होती. नंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू झाले.

संध्याकाळी आम्ही तेगस नदीकिनारी फिरायला गेलो. नदीवरून संथपणे जाणाऱ्या केबल कारमधून अतिशय सुंदर चित्रासारखे विहंगम दृश्य दिसत होते. नदीचे रुंद पात्र, त्यावरील निळसर लाटा, नदीकडेचे निळ्या- पिवळ्या फुलांनी बहरलेले जॅकारंडा वृक्ष,पाम, ऑलिव्ह,संत्री, बदाम,मॅग्नेलिया  यांची झाडे, जॉगिंग ट्रॅक वरील स्त्री-पुरुष, हिरव्या बगीच्यात खेळणारी मुले, रेस्टॉरंटमध्ये निवांतपणे खाद्य- पेयांचा आस्वाद घेणारे स्त्री-पुरुष असे नयनरम्य  दृश्य दिसत होते.

केबल कारमधून उतरल्यावर तिथल्या भव्य वास्को-द-गामा मॉलमध्ये विंडो शॉपिंग केले. इथल्या रस्त्यावरच्या बऱ्याच इमारतींना जहाजासारखा, जहाजाच्या शिडासारखा आकार दिला आहे. इथल्या भव्य ओरिएंट स्टेशनवरून रेल्वे, बस आणि मेट्रो यांचे जाळे शहरभर पसरलेले आहे. या मोकळ्या, रूंद, उंचावरील  स्टेशनचे  कलापूर्ण छप्पर मेटलचे असून त्याला स्टीलचे खांब व काही ठिकाणी हिरवट काचा आहेत. या सार्‍याचा आकार निरनिराळ्या झाडांच्या फांद्यांसारखा,बुंध्यांसारखा केलेला आहे.

पोर्तुगाल भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २५ – भाग २ -वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल  ✈️

पोर्टोहून कोइंब्रा इथे आलो. मोंडेगा नदीच्या काठी असलेल्या या शहरामध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोइंब्रा’ ची स्थापना १५३७ साली झाली. विद्यार्थ्यांचे शहर अशीच या शहराची ओळख आहे. इटली, स्पेन, पॅरिस व इंग्लंडनंतर स्थापन झालेली ही युरोपमधील पाचवी  युनिव्हर्सिटी आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन यासाठी ही युनिव्हर्सिटी नावाजली जाते. युरोप व अन्य देशातील विद्यार्थ्यांना इथे वेगवेगळ्या शाखांमधून प्रवेश मिळविण्यासाठी अतिशय कठीण अशी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, इंजीनियरिंग, इतिहास, भाषाशास्त्र, कायदा, मानववंशशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये इथे अध्ययन  केले जाते. सर्व शिक्षणाची अधिकृत भाषा पोर्तुगीज आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीचा काळा, लांब गाऊन घालावा लागतो. युरोपमधील विद्वान प्रोफेसर्सची इथे नेमणूक केली जाते.

विद्यापीठाच्या खूप मोठ्या प्रांगणातील बेल टॉवरमधील घंटा चार टनाची आहे.  दोन लाखांहून अधिक पुस्तके असलेली इथली लायब्ररी बघण्यासारखी आहे. प्राचीन हस्तलिखिते, सोळाव्या शतकातील तत्वज्ञान, मेडिसिन यावरील अमूल्य ग्रंथसंपदा इथे आहे. षटकोनी आकारातील, खूप उंची असलेल्या या लायब्ररीचे कमानीसारखे प्रवेशद्वार लाकडी आहे पण ते मार्बलसारखे वाटते. पोर्तुगालमधील ओक वृक्षांचे व ब्राझीलमधील जॅकरन्डा वृक्षांचे लाकूड वापरून भिंतीपासून उंच छतापर्यंत कोरीव काम केलेले आहे. साऱ्या कोरीव कामाला खऱ्या सोन्याचा मुलामा दिलेला आहे. पुस्तके ठेवण्यासाठी उंच उघडी कपाटे लायब्ररीच्या सर्व भिंतींवर व त्यावरील माडीवर केलेली आहेत. उंचावरील पुस्तके काढण्यासाठी केलेल्या शिड्या, दोन कपाटांच्या मधल्या खाचेत बरोबर बसतील अशा केलेल्या आहेत. छताजवळील उंच कोपऱ्यात चारी दिशांना चार सुंदर देवतांचे उभे पुतळे चार खंडांचे प्रतीक म्हणून आहेत. ( तेंव्हा अमेरिकेचा शोध लागलेला नव्हता.) लायब्ररीच्या बाहेरच्या सर्व बाजूंनी खूप रुंद अशी भिंत पुस्तकांचे उन्हा- पावसापासून संरक्षण करण्यासाठी बांधली आहे. खूप उंचावर असलेली काचेची तावदाने उघडता-मिटता येतात. त्यातून आत प्रकाश झिरपतो. या पुस्तकांमधील कोणतेही पुस्तक वाचण्यासाठी बाहेर नेता येत नाही. विद्यार्थ्यांना लेखी परवानगी घेऊन, हवे असलेले पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासिकेत बसून वाचावे लागते.

गाईडने सांगितले की इथले संपूर्ण लाकूड न किडणाऱ्या  वृक्षांचे आहे. तरीसुद्धा रात्री पावसात इथे किडेमकोडे येतातच. त्यासाठी इथे वटवाघळे पाळली आहेत. त्यांना रात्री पिंजऱ्याबाहेर सोडले जाते. ते किडेमकोडे खातात व पुस्तके सुरक्षित राहतात. रोज रात्री लायब्ररीतील सर्व टेबलांवर विशिष्ट प्रकारचे कापड पसरले जाते. त्यावर पडलेली वटवाघळांची शी सकाळी साफ केली जाते. त्या काळातील उनाड, मस्तीखोर विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून जिथे ठेवत ती तळघरातील जागा गाईडने दाखविली.

युनिव्हर्सिटीतील मोनेस्ट्रीची लांबलचक भिंत लाकडी असून ती सुंदर पेंटिंग्जनी सजलेली आहे.मोनेस्ट्रीचे छत सपाट आहे पण विशिष्ट तऱ्हेने केलेल्या रंगकामामुळे ते अर्धगोलाकार वाटते. युनिव्हर्सिटीतून बाहेर पडल्यावर या मोनेस्ट्रीचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. ते खूप उंचावर व किल्ल्याच्या तटबंदीसारखे आहे.मोरोक्कोमधील मूरिश लोकांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अशी व्यवस्था  करण्यात आली होती.

यूनिव्हर्सिटीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून,काचेच्या बंद दरवाजातून, खालच्या भव्य हॉलमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या व्हायवा घेतल्या जातात ते दिसत होते. तिथल्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडल्यावर समोरच मोंडेंगो नदी व शहराचे दर्शन होते. पायर्‍या चढून गेल्यावर मिनर्व्हा या ज्ञानदेवतेचा भव्य पुतळा आहे.

पूर्वीच्या काळी या युनिव्हर्सिटीत फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. ज्ञानार्जनाच्या काळात या शहरातील तरुणींबरोबर त्यांची मैत्री होई. पण शिक्षण पूर्ण करून जाताना त्यांची मैत्रिणींबरोबर ताटातूट होई. अशा विद्यार्थ्यांनी रचलेली अनेक विरहगीते युनिव्हर्सिटीपासून थोड्या लांब अंतरावरील एका  दरीकाठच्या लांबट- उभ्या दगडांवर कोरून ठेवलेली गाईडने दाखविली. या गीतांना ‘फाडो’ असे म्हटले जाते. ‘फाडो’चा  अर्थ दैव (destiny ) असा आहे. आम्ही रात्री तिथल्या एका ‘फाडो शो’ला गेलो होतो. काळ्या कपड्यातील दोन गायक स्पॅनिश गिटार व व्हायोलाच्या साथीने खड्या आवाजात गाणी म्हणत होते पण पोर्तुगीज भाषा अजिबात न समजल्याने त्या विरहगीतांचा आस्वाद घेता आला नाही.

(कोइंब्रा लायब्ररी, पोर्टो नदी व त्यावरील पूल)

कोइंब्रा युनिव्हर्सिटीजवळ अठराव्या शतकातील एक खूप मोठी बोटॅनिकल गार्डन आहे. पोर्तुगीजांच्या जगभर जिथे जिथे वसाहती होत्या तिथून विविध प्रकारची झाडे आणून त्यांचे इथे संवर्धन केलेले आहे. त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो.

तिथून जवळ असलेल्या ‘कॉन्व्हेंट ऑफ संता क्लारा’ मधील चर्चमध्ये क्वीन इसाबेल या संत स्त्रीची कोरीव चांदीची टुम्ब ( थडगं ) आहे. इथे नंन्सना धार्मिक शिक्षण दिले जाते व त्यांच्यासाठी वसतिगृह आहे. कोइंब्रामध्ये भारतीय पद्धतीच्या उपहारगृहात रात्रीचे जेवण घेत असताना तिथे आलेले दोन भारतीय विद्यार्थी भेटले.ध्रूव पांडे हा कानपूरहून आलेला विद्यार्थी भाषाशास्त्रात डॉक्टरेट करण्यासाठी आला होता तर विजय शर्मा हा जोधपूरचा विद्यार्थी इथे कायद्यामधील डॉक्टरेट करण्यासाठी आला होता.

भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares