मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

शाळेत असताना हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ‘चांदणी’ नावाची एक गोष्ट होती. अलमोडा पहाडात राहणाऱ्या अबूमियांची चांदणी नावाची एक खूप लाडकी बकरी होती. कापसासारख्या शुभ्र, गुबगुबीत चांदणी बकरीच्या कपाळावर एकच काळा ठिपका होता. एकदा चरण्याच्या नादात चांदणी एकटीच पहाडात दूर दूर जाते. चुकलेल्या चांदणीला अबूमिया हाकारत राहतात आणि शेवटी नाइलाजाने इतर बकऱ्यांना घेऊन उदास मनाने घरी परततात. पहाडात सैरभैर फिरणाऱ्या चांदणीची गाठ एका कोल्ह्याशी पडते. चांदणी प्राणपणाने कोल्ह्याशी झुंज देते. पण…….! चांदण्याने निथळलेला गुढरम्य अलमोडा पहाड, तिथली घनदाट वृक्षराजी, चांदणीची आर्त साद आणि एकाकी झुंज दीर्घकाळ स्मरणात राहिली. त्यानंतर खूप वर्षांनी हिमालयातील अलमोडा पर्वतराजी पाहण्याचा योग आला तेव्हा चांदणीची आठवण झाली.

पूर्वीच्या उत्तर प्रदेशचे २००० साली विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. डेहराडून ही या राज्याची राजधानी. गढवाल आणि कुमाऊँ असे उत्तराखंडचे दोन भाग पडतात. गढवालचे टेहरी गढवाल आणि पौरी गढवाल असे दोन मोठे विभाग आहेत, तर कुमाऊँ टेकड्यांमध्ये नैनीताल, अलमोडा हा पूर्वेकडचा भाग येतो. उत्तराखंडाच्या उत्तरेकडे तिबेट, पूर्वेकडे नेपाळ आणि पश्चिम व दक्षिणेकडे उत्तर प्रदेश राज्य आहे.

आम्ही लखनौहून रात्रीच्या ट्रेनने काठगोदाम इथे सकाळी पोहोचलो. काठगोदामहून नैनीताल हा साधारण दोन तासांचा रस्ता अतिशय सुंदर आहे पण आमची बस अर्ध्यावाटेमध्ये बिघडल्याने मेकॅनिकची वाट पाहण्यात बराच वेळ गेला. शेवटी तिथेच उतरून पहाडाच्या माथ्यावरच बरोबर आणलेलं जेवण घेतलं. एका बाजूला खोल दरी होती. लांबवर कुमाऊँ पहाडांची रांग दिसत होती. सगळ्या दऱ्या डोंगरांवर साल, देवदार आणि पाईन वृक्ष ताठ मानेने उंच उभे होते. गाडी दुरुस्त होऊन थोडा प्रवास झाल्यावर डोंगर आडोशाच्या एका छोट्या टपरीत चहासाठी थांबलो. पण कसले काय? भन्नाट वाऱ्याने तिथे थोडा वेळसुद्धा थांबू दिले नाही. टपरीवाल्याचे टेबलांवरचे, छपरावरचे प्लास्टिक उडून गेले. टेबल- खुर्च्या थरथरायला लागल्या. पाऊसही सुरू झाला. धावत पळत कसेबसे गाडीत येऊन बसलो. नैनितालला पोहोचायला रात्र झाली.

आमचं हॉटेल नैनी लेकच्या समोरच होतं. लंबगोल प्रचंड मोठ्या नैनीतालच्या भोवती रमत- गमत एक फेरी मारली. तलावात बोटिंगची सोयही आहे. वातावरणात थंडी होती आणि डोक्यावर ऊन होते. मॉल रोडवर प्रवाशांना हाकारणारी शेकडो दुकाने आहेत. तिबेटी स्त्रियांच्या दुकानातील असंख्य स्वेटर्स, आकर्षक कपडे, परदेशी वस्तू, वस्तूंच्या भावावरून घासाघीस सारे हिल स्टेशनला साजेसे होते. नैना देवीचं दर्शन घेतलं. दुपारी भीम ताल, सात ताल  बघायला बाहेर पडलो. बसमधून घनदाट वृक्ष आणि कुमाऊँ रेंजची दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं न्याहाळत चाललो होतो. आमचा गाईड चांगला बोलका व माहीतगार होता. कालच्या  सोसाट्याच्या भन्नाट वाऱ्यात ठामपणे उभ्या असलेल्या वृक्षांबद्दल विचारलं. तर त्याने पाईनवृक्षाचे एक पडलेले फळ आणून दाखविले. त्या फळाच्या देठाशी जो चिकट द्रव होता तो म्हणजे राळ. या राळेपासून टर्पेंटाईन बनवलं जातं. इथल्या गावातून दिव्यात घालण्यासाठीसुद्धा राळ वापरली जाते. पाईनचे लाकूड पटकन पेट घेते म्हणून थंडीच्या दिवसात शेकोटीसाठी याचा वापर करतात. या लाकडापासून बनवलेली झाकणं स्वयंपाकाच्या भांड्यांवर ठेवतात. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत पदार्थ बराच वेळ गरम राहू शकतो अशी छान माहिती त्याने सांगितली. भीमतालवर जाण्यासाठी उतरलो पण तिथे पोहोचू शकलो नाही. मुसळधार पाऊस सुरू झाला. थंडीने हृदय काकडले. कसेबसे हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान बघायला निघालो. जाताना खोल दऱ्यांमधील अनेक छोटेमोठे जलाशय दिसत होते. त्यात स्वच्छ निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे ते नीलमण्यांसारखे भासत होते. पुढचा रामनगरपर्यंतचा रस्ता पहाडी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गव्हाची आणि मोहरीची मोठी शेती होती. भरपूर आम्रवृक्ष होते. आपल्याइथला हापूस आंब्याचा सिझन संपत आला की बाजारात येणारे दशहरी, केशर, नीलम, लंगडा आंबे हे उत्तराखंड, उत्तर प्रदेशचे असतात. थंडगार पहाडावरून सपाटीवर आलो होतो. भरपूर वृक्ष आणि हवेतला ओलसर दमटपणा यामुळे घामाघूम झालो होतो .एका धाब्यावर गरम चविष्ट पराठा खाऊन मोठा ग्लास भरून दाट मधुर लस्सी घेतली आणि पोटभरीचे जेवण झालं. अभयारण्यच्या आधी ‘जीम कॉर्बेट’ म्युझियम आहे. पुढे थोड्या अंतरावर छोटासा धबधबा आहे. रंगीबेरंगी पक्षी, सुगरणीची घरटी, हरणे, रान कोंबड्या यांचं दर्शन झालं. तीन-चार फूट उंच वारूळं रस्त्याच्या दोन्ही कडांना होती. ड्रायव्हरने जंगलवाटा धुंडाळल्या पण व्याघ्रदर्शन झाले नाही. दूरवर चरणारे जंगली हत्ती, मोर, गरुड दिसले. कडूलिंबाचे प्रचंड मोठे वृक्ष होते.

उत्तराखंड भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 38 – भाग 3 – काळं पाणी आणि हिरवं पाणी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 38 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ काळं पाणी आणि हिरवं पाणी  ✈️

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून बसने निघालो. जारवा आदिवासींच्या जंगलात जायचे होते. त्या संरक्षित जंगलात जाण्या- येण्याच्या वेळा ठराविक असतात. सर्व प्रवासी बसेसना एकदम एकत्र सोडण्यात येतं. त्या जंगल विभागाशी पोहोचेपर्यंत दुतर्फा आंबा, फणस, नारळ, सुपारी, केळी, एरंड, भेंडी अशी झाडं व विविध प्रकारचे पक्षी  दिसत होते. संरक्षित जंगल विभागात साधारण ३०० जारवा आदिवासी राहतात. बंद काचेच्या धावत्या बसमधून त्यातील काही आदिवासी दिसले. स्त्री व पुरुषांच्या फक्त कमरेला झाडाच्या सालींचे उभे उभे पट्टे रंगवून कमरेच्या दोरात अडकवलेले होते. पुरुषांच्या हातात तिरकमठा होता व स्त्रियांच्या कडेवर छोटी मुलं होती. लोखंड खूप तापवलं तर त्याचा जसा तांबूस काळा रंग दिसतो तसा त्यांचा तकतकीत रंग होता. काही छोटी मुलं बसमागे धावत होती. सरकारतर्फे त्यांना कपडे, धान्य देण्याचा प्रयत्न होतो. मानव वंशशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करीत असतात पण सारे त्यांचे रीतीरिवाज सांभाळून, त्यांचा विश्वास संपादन करून करावं लागतं.

जंगल ओलांडल्यावर थोड्यावेळाने आम्ही बसमध्ये बसूनच बार्जवर चढलो. पलिकडे उतरल्यावर स्पीड बोटीने, लाईफ जॅकेट घालून, ‘बाराटांगा’ वन विभागात पोहोचलो. दुतर्फा  मॅनग्रोव्हजचे घनदाट जंगल आहे. नीलांबर गुंफा बघायला जाताना स्पीड बोटीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या मॅनग्रोव्हज् व इतर झाडांची सुंदर दाट हिरवी कमान तयार झाली होती. हे गर्द हिरवे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे.  हजारो वर्षी पाणी या गुंफेमध्ये ठिबकल्याने त्यांचे नैसर्गिक आकार तयार झाले आहेत.

. एलिफंट बीच २. एलिफंट बीचला जाताना वाटेत दिसलेले एक बेट ३. समुद्री कोरल्स

हॅवलॉक आयलँडला जायला लवकर उठून सहाची बोट पकडली. तिथल्या हॉटेलवर आज मुक्काम होता. जेवून दुपारी राधानगर समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तीव्र उन्हामुळे समुद्राचे पाणी व वाळू चकाकत होती.  दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलजवळच्या बीचवर फिरायला गेलो . अंदमानच्या जवळजवळ सर्व बेटांवर सदाहरित जंगलं व किनाऱ्याजवळ खारफुटीची दाट वनं आहेत. किनारे प्रवाळाने समृद्ध आहेत.  विविध पक्षी आहेत. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरील शंख- शिंपले, कोरल्स बाहेर नेण्यास बंदी आहे. इथला निसर्ग लहरी आहे आणि बंगालचा उपसागर सदैव अस्वस्थ असतो.

हॅवलॉकवरून छोट्या होडीतून ( डिंगीतून ) एलिफंट बीचसाठी केलेला प्रवास थरारक होता. वाटेतल्या एका डोंगराचं टोक गरुड पक्षाच्या नाकासारखं पुढे आलं आहे. त्यावर दीपगृह आहे.  एलिफंट बीचवर नितळ समुद्रस्नानाचा आनंद घेतला. पूर्वी इथे लाकडाचे भले मोठे ओंडके  वाहण्यासाठी हत्तींचा उपयोग करीत म्हणून या किनाऱ्याला ‘एलिफंट बीच’ असं  नाव पडलं. आता तिथे हत्ती नाहीत. तिथून हॅवलॉक आयलँडला परत आलो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॅवलॉक बंदरात छान गोरीगोमटी कॅटामरान उभी होती. हलत्या बोटीच्या बंद काचेतून तसंच वरच्या डेकवरून सूर्यास्त टिपण्यासाठी सगळ्यांनी कॅमेरे सरसावले होते. एकाएकी सारं बदललं. आकाश गडद झालं. सूर्य गुडूप झाला. जांभळे ढग नंतर दाट काळे झाले.  कॅटामरान जोरजोरात उसळू लागली. टेबल टेनिसचा चेंडू उडवावा तसा समुद्र बोटीला उडवत होता. सारे जण जीव मुठीत धरून बसले. बऱ्याच परदेशी प्रवाशांना, लहान मुलांना उलट्यांनी हैराण केलं. ‘समुद्री तुफान आया है’ असं म्हणत बोटीचा स्टाफ धावपळ करीत साऱ्यांना धीर देत होता, ओकाऱ्यांसाठी पिशव्या पुरवीत होता. दीड तास प्रवासापैकी हा एक तास भयानक होता. निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे हे दाखविणारा होता.

पोर्ट ब्लेअरला तुफान पावसाने स्वागत केलं. आभाळ फाडून वीज कडाडली. जीव घाबरला, पण आता पाय जमिनीवर टेकले होते. किनाऱ्यावर सुखरूप उतरलो म्हणून त्या अज्ञात शक्तीचे आभार मानले. आकाशातून बरसणाऱ्या धारा आता आशीर्वादासारख्या वाटत होत्या.

 भाग ३ व अंदमान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 – काळं पाणी आणि हिरवं पाणी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ काळं पाणी आणि हिरवं पाणी  ✈️

अंदमान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि काळं पाणी या शब्दांचं नातं अतूट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पवित्र झालं आहे. लोकमान्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात नेताना एका दिवसासाठी येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. इसवी सन १९४२ साली सुभाषचंद्र बोस यांनीही या तुरुंगाला भेट दिली होती.

अंदमान व निकोबार हा दक्षिणोत्तर पसरलेला जवळजवळ ३५० बेटांचा समूह भारताच्या आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरात आहे. चेन्नई आणि कोलकता  अशा दोन्हीकडून साधारण १२०० किलोमीटर अंतरावर ही बेटं येतात. पूर्वी तिथे बोटीने पोहोचण्यासाठी चार-पाच दिवस लागत. आता चेन्नई किंवा कोलकताहून विमानाने दोन- तीन तासात पोहोचता येतं. आम्ही चेन्नईहून विमानाने अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमानतळावर उतरलो. जेवून लगेच सेल्युलर जेल बघायला निघालो.

ब्रिटिशांनी १९०६ साली या जेलचं बांधकाम पूर्ण केलं. चक्राच्या दांड्यांसारख्या सात दगडी, भक्कम तिमजली इमारती व त्या इमारतींना जोडणारे मधोमध असलेले वॉच टाॅवर अशी या तुरुंगाची रचना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ अंदमान जपानी लोकांच्या ताब्यात होते. इमारतींच्या सात रांगांपैकी तीन रांगा जपान्यांनी नष्ट करून टाकल्या. आता एका इमारतीत हॉस्पिटल आहे व एकात सरकारी कर्मचारी राहतात.हा सेल्युलर जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक ज्ञात व अज्ञात शूरवीरांनी भोगलेल्या हालअपेष्टांचं काळं पान. साम्राज्यवादी ब्रिटिशांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या वेडाने भारलेल्या अनेकांनी या यज्ञकुंडात उडी घेतली. अशा अनेकांना  अंदमानला सश्रम कारावासाच्या शिक्षेवर पाठविले जाई. ब्रिटिशांच्या क्रूर, कठोर, काळ्याकुट्ट शिक्षांमधून केवळ काळच त्यांची सुटका करू शकणार असे. अंदमानचा तुरुंग म्हणजे काळं पाणी. एकदा आत गेला तो संपल्यातच जमा!

दगडी, दणकट, अंधारलेले जिने चढून तिसऱ्या मजल्यावर आलो. तिथल्या शेवटच्या ४२ नंबरच्या खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य होते. आज त्याला पवित्र तीर्थस्थानाचं महत्त्व आहे. सावरकरांनी लिहिलेले ‘कमला’ काव्यही तेथील दगडी भिंतीवर आहे. स्वातंत्र्यवीरांचा फोटो व अशोकचक्राची प्रतिमा आहे. एकावेळी एकच माणूस जेमतेम वावरू, झोपू शकेल अशी ती अंधार कोठडी. भिंतीवर अगदी वरच्या बाजूला एक लहानशी खिडकी. जेलची रचनाच अशी की समोरासमोरच्या खोल्या एकमेकांना पाठमोऱ्या. खोल्यांच्या दगडी भिंती भक्कम आणि बाहेर लोखंडाचे मजबूत दार. बाहेरून कुलूप लावायची कडी सरळ भिंतीत घुसवलेली. स्वातंत्र्यासाठी हे लोक काय साहस करतील याचा नेम नाही म्हणून एवढा बंदोबस्त केलेला असावा. आम्ही तिथे ‘ने मजसी ने….’ जयोस्तुते श्री महन् मंगले….’ अशी गाणी म्हणून श्रद्धांजली वाहिली. अनेक ज्ञात- अज्ञात वीरांना मनोमन, मनःपूर्वक नमस्कार केला.

ध्वनीप्रकाश शोमध्ये  पूर्व इतिहासावर प्रकाश पाडला आहे. अपार कष्ट भोगणारे, कदान्न खाणारे, कोलू पिसणारे,  उघड्या पाठीवर फटके खाणारे, वंदे मातरम् म्हणत हसतमुखाने फासावर जाणारे ते कोवळे जीव हृदयात कालवाकालव निर्माण करतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय विज्ञाननिष्ठ होते. आधुनिक विचार व विज्ञान आपलंसं केलं तरच राष्ट्राची प्रगती होईल. राष्ट्र कणखर सुसज्ज व बलवान हवं अशीच या साऱ्या थोर नेत्यांची  शिकवण होती. गोरगरीब, कष्टकरी, दलित या साऱ्यांबरोबर माणुसकीने वागण्याची, शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अशी त्यांची शिकवण होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हे विचार आपण पूर्णतः आत्मसात करू शकलो नाही याची खंत वाटली.

देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आज अंदमान- निकोबार बेटांना अतिशय महत्त्व आहे. निकोबार ही संरक्षित बेटं आहेत. आपल्या हवाई दलाचा तळ इथे आहे. सर्वसामान्य प्रवाशांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या निकोबार बेटाचं दक्षिण टोक जे कन्याकुमारीपेक्षाही दक्षिणेला होतं त्याला इंदिरा पॉईंट असं नाव दिलं होतं. २००४ सालच्या त्सुनामीमध्ये हे स्थान सागराने गिळंकृत केलं. अंदमानला आपल्या नौदलाचा तळ आहे. तसंच तटरक्षक दलही आहे. त्यांची अति वेगवान व अत्याधुनिक जहाजं सतत समुद्रावर गस्त घालित असतात. किनाऱ्याजवळ फ्लोटिंग डॉक आहे. त्याचे १६ अवाढव्य टँकर्स पाण्याने भरले की ते डॉक समुद्राखाली जातं. मग डॉकच्या  वरच्या प्लॅटफॉर्मवर दुरुस्तीसाठी बोटी घेतल्या जातात. बोटीची दुरुस्ती, देखभाल होऊन ती बाहेर पडली की टँकर्समधलं पाणी काढून टाकलं जातं व डॉक पुन्हा समुद्रावर येतं

अंदमान – भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे  ✈️

टंगमर्गवरून आम्ही गुलमर्ग इथे गेलो. पायथ्याशीच थंडीचे कोट व बूट भाड्याने घेतले. गोंडेला राइड ( केबल कार राइड ) जिथून सुरू होते त्याच्या दीड किलोमीटर आधी आपल्या गाड्या थांबतात. तिथून बर्फावरील स्लेजने, स्थानिक सहाय्यकांच्या मदतीने गोंडेला स्टेशनवर पोहोचता येते किंवा बर्फ बाजूला केलेल्या चांगल्या रस्त्यावरून थोडासा चढ चढून चालत जाता येते. आम्ही रमतगमत चालण्याचे ठरवले. प्रवाशांचे जत्थे कुणी चालत तर कुणी स्लेजवरून गोंडेला स्टेशनला जात होते .प्रवाशांना ओढत नेणाऱ्या स्लेज गाड्यांची उजवीकडील बर्फातील रांग आणि डावीकडील अर्धी बर्फात बुडलेली घरे पाहत गोंडेला स्टेशनवर पोहोचलो. खूप मोठी रांग होती. चार- चार प्रवाशांना घेऊन गोंडेला (केबल कार्स ) जात होत्या. त्यात धावत्या गाडीत बसल्याप्रमाणे पटकन बसल्यावर दरवाजे बंद झाले. खालीवर, सभोवती पांढरे शुभ्र बर्फच बर्फ. काही धाडसी ट्रेकर्स ती वाट चढून जाताना दिसत होते. त्यांच्या गुडघ्यापर्यंत आत गेलेल्या बुटांच्या खुणा गोंडेलातून स्पष्ट दिसत होत्या. बर्फात बुडालेली मेंढपाळ गुराखी या गुजर जमातीची घरे रिकामी होती. हे लोक बर्फ वितळेपर्यंत गुरे, शेळ्यामेंढ्यांसह खाली सपाटीवर येऊन राहतात व नंतर परत आपल्या घरी येतात. पश्मिना या एका विशिष्ट जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीच्या पश्मिना शाली हलक्या, उबदार असतात. महाग असल्या तरी त्यांची नजाकत और असते.

गोंडेलाने पहिल्या टप्प्यापर्यंत म्हणजे कॉंगडोरीपर्यंत गेलो. त्यापुढचा अफरबटचा टप्पा इथून धुक्यात हरवल्यासारखा दिसत होता. पण हौशी, धाडसी प्रवासी तिथेही जात होते. पहिल्या टप्प्यावर उतरून तिथे बांधलेल्या लाकडी कठड्यांवर निस्तब्ध बसून राहिले. नगाधिराज हिमालयाचं दर्शन म्हणजे विराटाचा साक्षात्कार! ते भव्य- दिव्य, विशाल, थक्क करणारं अद्भुत दर्शन आज युगानुयुगे तिथे उभे आहे.  अभेद्य कवचकुंडलासारखे आपले संरक्षण करीत चिरंजीवित्वाने ताठ उभे आहे. अशावेळी वाटतं की, आपण असणं आणि नसणं ही फार फार क्षुल्लक गोष्ट आहे. हे सनातन, चिरंतन वैभव आहे म्हणून आपल्या अस्तित्वाला किंचित अर्थ आहे.

थोड्याच दिवसात तिथे स्कीईंग कॉम्पिटिशन सुरू होणार होत्या. त्यात भाग घेणारी तरुणाई तिथे उत्साहाने प्रॅक्टिस करीत होती. हौशी प्रवासी स्कीईंगची मजा घेण्यासाठी तिथल्या लोकांच्या सहाय्याने धडपडत होते. आम्ही स्लेजची राइड घेतली. छोट्याशा लाकडी चाकवाल्या फळकुटावरून, मागेपुढे मदतनीस घेऊन बर्फाच्या गालीच्यावरून थोडे चढून गेलो आणि त्यांच्याच मदतीने घसरत परतलो.  आल्यावर गरम- गरम छान कॉफी प्यायल्यावर थोडे उबदार वाटले. गरम चहा, कॉफी, भेळ, सँडविच सारा नाश्ता अगदी तयार होता.स्वित्झर्लंडला जुंगफ्रा येथे लिफ्टने वर जाऊन बर्फात जायच्या आधी गरम- गरम टोमॅटो सूप घेतले होते तेव्हा त्या व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. तेही आता उरले नाही. ‘हम भी कुछ कम नही’ हे सप्रमाण सिद्ध  झाले.

जम्मू ते श्रीनगर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची जोरदार उभारणी सुरू आहे. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे बरेचसे काम झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काश्मीर खोऱ्याच्या गरजा द्रुतगतीने पूर्ण होतील आणि पर्यटनातही चांगली वाढ होईल.

असे सतत जाणवत होते की सर्वसामान्य काश्मिरी माणसाला असे तणावपूर्ण आयुष्य नको आहे. गरिबी आणि अज्ञान यामुळे त्यांच्यापुढील  मार्ग बदलले आहेत. अजूनही तरुणांची दिशाभूल करून त्यांना  दहशतवादाच्या मार्गाला लावले जाते. राजकीय परिस्थितीमुळे या देवभूमीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागले त्यांचे दुःख फार मोठे आहे. या भूप्रदेशाची कथा आणि व्यथा खूप वेगळी आहे. त्यामुळे  सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय अशा अनेक समस्या इथे ठाण मांडून उभ्या आहेत. आपले ‘सख्खे शेजारी’ हर प्रयत्नांनी ही परिस्थिती अशीच ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मदत करणारे ‘विषारी ड्रॅगन’ त्यात भर घालतात.  दहशतवादाची काळी सावली आज साऱ्या जगावर पसरली आहे.

वैष्णोदेवी, कारगिल, लेह- लडाख, अमरनाथ, काश्मीरचे खोरे अशा अनंत हातांनी हिमालय आपल्याला साद घालीत असतो. आपल्या आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे या हाकेला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. शांततापूर्ण सौंदर्याची, समृद्धीची बहुरंगी ट्युलिप्स इथे बहरतील अशी आशा करुया.

भाग ४ आणि श्रीनगर समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पहलगाम इथे खूप मोठी छावणी उभारलेली आहे. यात्रेकरूंची वाहने इथपर्यंत येतात व मुक्काम करून छोट्या गाड्यांनी चंदनवाडीपर्यंत जातात. तिथून पुढे अतिशय खडतर, एकेरी वाटेने श्रावण पौर्णिमेच्या यात्रेसाठी लक्षावधी भाविक सश्रद्ध अंतकरणाने पदयात्रा करतात. हिमालयाच्या गूढरम्य पर्वतरांगांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या आदिशक्तींची अनेक श्रध्दास्थाने आपल्या प्रज्ञावंत पूर्वजांनी फार दूरदृष्टीने उभारलेली आहेत.(चार धाम यात्रा, अमरनाथ, हेमकुंड वगैरे ). हे अनाघ्रात सौंदर्य, ही निसर्गाची अद्भुत शक्ती सर्वसामान्य जनांनी पहावी आणि यातच लपलेले देवत्व अनुभवावे असा त्यांचा उद्देश असेल का? श्रद्धायुक्त पण निर्भय अंतःकरणाने, मिलिटरीच्या मदतीने, अनेक उदार दात्यांच्या भोजन- निवासाचा लाभ घेऊन वर्षानुवर्षे ही वाट भाविक चालत असतात.

सकाळी उठल्यावर पहलगामच्या हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून बर्फाच्छादित हिमशिखरांचे दर्शन झाले. नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणांनी ती शिखरे सोन्यासारखी चमचमत होती. पहलगाम येथील अरु व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी, बैसरन म्हणजे चिरंजीवी सौंदर्याचा निस्तब्ध, शांत, देखणा आविष्कार! बर्फाच्छादित पर्वतरांगांमधील सुरू, पाईन, देवदार, फर, चिनार असे सूचीपर्ण, प्रचंड घेरांचे वृक्ष गारठवणाऱ्या थंडीत, बर्फात आपला हिरवा पर्णपिसारा सांभाळून तपस्वी ऋषींप्रमाणे शेकडो वर्षे ताठ उभी आहेत. दाट जंगले,  कोसळणारे, थंडगार पांढरे शुभ्र धबधबे आणि उतारावर येऊन थबकलेले बर्फाचे प्रवाह. या देवभूमीतले  सौंदर्य हे केवळ मनाने अनुभवण्याचे आनंदनिधान आहे.

पहलगामला एका छोट्या बागेत ममलेश्वराचे (शंकराचे) छोटे देवालय आहे. परिसर बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला होता. शंकराची पिंडी नवीन केली असावी. त्यापुढील नंदी हा दोन तोंडे असलेला होता. आम्ही साधारण १९८० च्या सुमारास काश्मीरला प्रथम आलो होतो. त्या वेळेचे काश्मीर आणि आजचे काश्मीर यात जमीन- अस्मानाचा फरक जाणवला. सर्वत्र शांतता होती पण ही शांतता निवांत नव्हती. खूप काही हरवल्याचं, गमावल्याचं  दुःख अबोलपणे व्यक्त करणारी, अविश्वास दर्शविणारी ,  संगिनींच्या धाकातली, अबोलपणे काही सांगू बघणारी ही कोंदटलेली उदास  शांतता होती.

श्रीनगर भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

वेरीनाग इथल्या निर्झरातून झेलमचा उगम होतो. ‘श्री’ च्या आकारात वाहणाऱ्या झेलमच्या दोन्ही तीरांवर श्रीनगर वसले आहे. श्रीनगरमध्ये फिरताना सफरचंद आणि अक्रोड यांचे पर्णहीन वृक्ष दिसत होते.  बदाम, जरदाळू यांची एकही पान नसलेली सुंदर मऊ पांढऱ्या मोतीया आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेली झाडे दिसत होती. लांबवर पसरलेली मोहरीची शेतं हळदी रंगाच्या फुलांनी डोलत होती तर अजून फुलं न आलेली शेतं काळपट हिरव्या रंगाची होती. थंडी खूपच होती.पायघोळ झग्याआड पोटाशी शेगडी घेऊन जाणारे स्त्री- पुरुष दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत होती. रस्तोरस्ती लष्कराची वाहने आणि बंदूकधारी जवान मनातल्या अस्वस्थतेत भर घालीत होती. दुकानांमध्ये कलिंगडे, संत्री, केळी, कमलकाकडी, इतर भाज्या दिसत होत्या. कहावा किंवा कावा या काश्मिरी स्पेशल चहाची दुकाने जागोजागी होती. अस्सल काश्मिरी केशराच्या चार काड्या आणि दालचिनीच्या तुकडा असं उकळत ठेवायचं. त्यात साखर घालायची. एका कपाला एक सोललेला बदाम जाडसर कुटून घालायचा आणि त्यावर केशर दालचिनीचे उकळते मिश्रण ओतायचं. झाला कहावा तयार!

गाईडने दिलेल्या या माहितीमुळे ‘कावा’ पिण्याची इच्छा झाली पण बस मध्येच थांबविणे अशक्य होते.

जहांगीरच्या काळात साधारण चारशे वर्षांपूर्वी निशात बाग, शालीमार बाग, व चष्मेशाही अशा सुंदर बागा बांधण्यात आल्या. तळहाताएवढ्या सुगंधी गुलाबाच्या फुलांचा हंगाम अजून सुरू झाला नव्हता, पण वृक्षांसारखे झाड बुंधे असलेली गुलाबाची झाड लालसर पानांनी बहरून फुलण्याचा तयारीत होती. उंचावरून झऱ्यासारखे वाहणारे पाणी पायऱ्या- पायऱ्यांवरून घरंगळत होते. मध्येच कमळाच्या आकारातली दगडी कारंजी होती. सगळीकडे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू होती.

चष्मेशाहीमध्ये मागच्या पीर- पांजाल पर्वतश्रेणीतून आलेले झऱ्याचे शुद्ध पाणी आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले. डेरेदार काळपट- हिरव्या वृक्षांना चोचीच्या आकाराची पांढरी फुले लटकली होती. ती नासपतीची झाडे होती.  हिरवा पर्णसंभार असलेली मॅग्नेलियाची (एक प्रकारचा मोठा सुगंधी चाफा ) झाडे फुलण्याच्या तयारीत होती. निशात बागेजवळ ‘हजरत बाल श्राइन’ आहे. हजरत मोहमद साहेबांचा ‘पवित्र बाल’ इथे ठेवण्यात आला आहे. मशीद भव्य आणि इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आहे.मशिदीच्या आत स्त्रियांना प्रवेश नव्हता. मागील बाजूने थोडा पडदा किलकिला करून स्टेनगनधारी पहारेकर्‍याने ‘पवित्र बाल’ ठेवलेल्या ठिकाणाचे ‘दूरदर्शन’ घडविले. स्वच्छ आवारात चिनारची झाडं होती. दल सरोवराच्या पश्चिमेकडील काठावर असलेल्या या मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

श्रीनगरपासून तीन किलोमीटरवर पांडेथ्रान गाव आहे आणि साधारण १४ किलोमीटरवर परिहासपूर नावाचं गाव आहे. या दोन्ही ठिकाणी राजा ललितादित्याच्या कारकिर्दीत म्हणजे आठव्या शतकात उभारलेल्या बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत. अनंतनागपासून चार-पाच किलोमीटरवर मार्तंड देवालयांचा समूह आहे.  डावीकडचे कोणे एकेकाळी भव्य दिव्य असलेल्या सूर्यमंदिराचे भग्नावशेष  संगिनींच्या पहाऱ्यात सांभाळले आहेत.

पहेलगामच्या रस्त्यावर खळाळत अवखळ वाहणारी लिडार नदी आपली सतत सोबत करते. नदीपात्रातील खडक, गोल गुळगुळी दगड यावरून तिचा प्रवाह दौडत असतो. गाईड सांगत होता की मे महिन्यात पर्वत शिखरांवरील बर्फ वितळले की नदी तुडुंब पाण्याने उसळत वेगाने जाते. त्यावेळी तिच्यावरील राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी अनेक देशी-विदेशी प्रवासी येतात. तसेच नदीपलीकडील पर्वतराजीत ट्रेकिंगसाठी अनेक प्रवासी येतात. त्याशिवाय घोडदौड, ट्राउट माशांची मासेमारी अशी आकर्षणे आहेत. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पोपटी हिरवळीवर वर्ल्डक्लास गोल्फ कोर्टस आहेत. त्यासाठीही हौशी खेळाडू येतात.

पहलगाम रस्त्यावर प्राचीन काळापासून केशराच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं पांपूर( पूर्वीचं नाव पद्मपूर ) लागतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमिनीलगत उगवलेल्या जांभळ्या सहा पाकळ्यांच्या फुलांनी शेतेच्या शेते बहरतात. या फुलांमधील सहा केसरांपैकी केसरिया रंगाचे तीन केसर हे अस्सल केशर असतं. उरलेले तीन हळदी रंगाचे केसर वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.

श्रीनगर भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी – 23 – राइट हैंड ड्राइव/लेफ्ट हैंड ड्राइव ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं. श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं. तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है. आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है. आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”.)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी – 23 – राइट हैंड ड्राइव/लेफ्ट हैंड ड्राइव ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

लक्ष्य की ओर बढ़े चलना जीवंतता है । अमेरिका सहित अधिकांश पश्चिमी देशों में गाडियां सड़क के दायीं ओर चलती हैं और कार की स्टेयरिंग बायीं ओर होती है जबकि भारत में अंग्रेजी शासन के चलते इंग्लैंड के ही नियम लागू रहे, अर्थात भारत में गाड़ियों की स्टेयरिंग दायीं ओर होती है (Right hand driving in India) और गाड़ियाँ सड़क की बायीं ओर चलायीं जातीं हैं.

यूनाइटेड नेशंस आर्गनाइजेशन यूक्रेन युद्ध या कश्मीर समस्या जैसी बड़ी समस्याएं तो सुलझा नहीं पाता कम से कम सारी दुनियां में एक सी ड्राइविंग, एक से बिजली साकेट, एक सरीखी वोल्टेज पर बिजली प्रदाय, एक से मोबाइल चार्जर, वगैरह पर ही कोई सर्वमान्य योजना ले आए तो भी इस वैश्विक दुनियां में आम लोगों को कुछ राहत मिले और यूएनओ अपनी उपयोगिता सिद्ध कर सके। इंटरपोल के जमाने में यदि ग्लोबल ई-वीजा बनने लगें तो युवा पीढ़ी को विज्ञान, व्यापार के सिलसिले में दुनियां एक कर रही है उसे लाभ हो सकता है.

अस्तु, आज नहीं तो किसी दिन यह होगा, इस आशा में प्रसन्न रहना चाहिए.

1792 में सर्वप्रथम अमेरिका के पेन्सिल्वेनिया प्रान्त में सड़क पर दायीं ओर चलने के नियम को लागू किया गया और 18वीं शताब्दी के अंत तक यह नियम पूरे संयुक्त राज्य अमेरिका और कनाडा में अनुसरण किया जाने लगा.

आज दुनियां भर अधिकांश क्षेत्रों में यही दाहिने ओर से चलने का नियम है, इससे भारत, इंग्लैंड या अन्य बाईं ओर से चलने वाले देशों के लोगों को यहां ड्राइविंग में कठिनाई होती है. यद्यपि भारत सहित अन्य देशों के ड्राइविंग लाइसेंस के आधार पर यहां कार चलाने की वैधानिक अनुमति है. रेंटल कार सहजता से मिल जाती हैं. एक शहर से कार लेकर दूसरे शहर में ड्राप किए जाने की सुविधाएं भी आसान हैं. ज्यादातर गाडियां आटोमेटिक गेयर वाली हैं, मतलब बिना क्लच पैडल के केवल दाहिने पैर से ही एक्सेलटर   और ब्रेक के नियंत्रण से कार मजे में दौड़ती हैं. टोल पर कोई बैरियर नहीं है, यदि बिना ई पास के गाड़ी टोल पार करती हैं तो कैमरा नंबर प्लेट की फोटो लेकर ई बिल बना देता है. सड़के चिकनी चौड़ी हैं. लेन पर सभी नियम पूर्वक पर्याप्त दूरी बनाकर चलते हैं. रेलवे क्रासिंग पर भी बैरियर नहीं मिला, केवल लाइट सिग्नल ही हैं. भले ही कोई ट्रैफिक न हो पर कोई भी लाइट सिग्नल की अनदेखी नहीं करता. यहां ड्राईविंग आनंद देती है.

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

समोर नगाधिराज हिमालयाची झबरबन पर्वतराजी, मागे तीन बाजूच्या निळसर हिरवट पर्वतरांगांच्या कोंदणात  नीलपाचूसारखा चमकणारा दल सरोवराचा विस्तीर्ण जलाशय आणि यामध्ये पसरलेलं ट्युलिप्सच्या अनेकानेक रंगांचं लांबवर पसरलेलं स्वर्गीय  इंद्रधनुष्य! अवाक होऊन आम्ही ते अलौकिक दृश्य नजरेत साठवत होतो. रक्तवर्णी, हळदी, शुभ्र मोत्यासारखी, गुलाबी, जांभळी, सोनपिवळ्या रंगावर केशरकाडी लावल्यासारखी कमळकळ्यांसारखी ट्युलिप्सची असंख्य फुलंच फुलं! साक्षात विधात्याने विणलेला अस्सल काश्मिरी गालिचा पुढ्यात पसरला होता. त्यांच्या मंदमधूर मोहक सुगंधाने वातावरण भारून टाकलं होतं

कुणाच्या कल्पनेतून, प्रयत्नातून साकार झालं असेल हे अनुपम सौंदर्य? या प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी काश्मीर गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्ट फ्लोरिकल्चर ऑफिसर डॉक्टर जावेद अहमद शाह यांची मुद्दाम भेट घेतली. इथे ट्युलिप्स फुलविण्याच्या कल्पनेला सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळाला. दल सरोवरासमोरील हिमालयाच्या झबरबन टेकड्यांच्या उतरणीवर थोडं सपाटीकरण करून मोठ्या गादीसारखे वाफे तयार करण्यात आले. ॲमस्टरडॅमहून ट्युलिप्सचे फक्त कंद आयात करण्यात आले. बाकी सारी मेहनत, तंत्रज्ञान हे इथल्या फ्लोरिकल्चर डिपार्टमेंटचे योगदान आहे.

एकूण ७० एकर जागेवर ही फुलशेती करण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ट्युलिप्सच्या कंदांची लागवड करण्यात येते. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी संपेपर्यंत साऱ्या श्रीनगरवर बर्फाची चादर पसरलेली असते. लागवड केलेला हा संपूर्ण भूभाग बर्फाने अच्छादलेला असतो .जमिनीच्या पोटातले कंद लहान शाळकरी मुलांसारखे महिनाभर तो भला मोठा बर्फाचा गोळा चोखत बसलेले असतात. साधारण फेब्रुवारीत बर्फ  वितळतं आणि कंदांच्या बालमुठीला हिरवे लसलशीत कोंब फुटतात. त्यांची मशागत करावी लागते. शेळ्या- मेंढ्या, गाई, खेचरं यांचं शेणखत ठराविक प्रमाणात घालतात. तसंच जंतुनाशकं, रसायनिक खतं यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मार्च अखेर रोपांची वाढ पूर्ण होते.निरनिराळ्या प्रजातीप्रमाणे ही रोपं दीड ते अडीच फूट उंच वाढतात आणि मग बहरतात. या रंगपऱ्यांचं आयुष्य किती? तर तीन ते चार आठवडे! साधारण मार्चअखेर ते एप्रिलअखेर एक महिना हा सारा बहर असतो. अवेळी पाऊस पडला तर तीन आठवड्यातच त्यांच्या पाकळ्या गळून पडतात.

बहर संपल्यावर एक महिना ती झाडं तशीच ठेवतात. जून महिन्यात जमिनीतले कंद नेटकेपणे अलगद काढलेले जातात. ते जपून ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. साधारण १७ ते २३ सेंटीग्रेड उष्णतेत निर्जंतुक करून त्या कंदांना सांभाळण्यात येतं. जरुरीप्रमाणे काही नवीन जातीचे, रंगांचे कंद ॲमस्टरडॅमहून आणण्यात येतात. ऑक्टोबरपर्यंत सारं नीट सांभाळत, जमिनीची मशागत करून पुन्हा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. भारतीय व परदेशी प्रवासी आवर्जून हा अलौकिक नजारा पाहायला गर्दी करतात.

विस्तीर्ण दल सरोवरातून शिकारा सहल करताना शंकराचार्य टेकडीवरील मंदिर, हरी पर्वताची रांग दिसते. सरोवरामध्ये झाडांचं वाळकं गवत, वेली व माती यांचा एकमेकांवर थर बसून इथे अनेक छोटी बेटं तयार झाली आहेत. त्यावर तरंगती घरं, मीना बाजार आहे. पाणथळ जागेतील लहान- मोठ्या झाडांवरून गरुड, खंड्या, बुलबुल यांनी दर्शन दिलं. चार शाळकरी मुली होडीत दप्तरं ठेवून स्वतःच ती  छोटी होडी वल्हवत दल सरोवराकाठी असलेल्या त्यांच्या गावाकडे जात होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना रोज एक तास जायला आणि एक तास यायला  वल्हवावं लागतं तेव्हा त्या श्रीनगरच्या शाळेत पोहोचतात.

श्रीनगरहून पहेलगामला जाताना दुतर्फा चिनार आणि सफेदा यांचे प्रचंड घेरांचे वृक्ष दिसत होते.  चिनारच्या वठल्यासारख्या वाटणाऱ्या पोकळ, प्रचंड घेरांच्या बुंध्यातून चिनारची हाताच्या पंजासारखी पान असलेली कोवळी पालवी लवलवत होती. सफेदा वृक्षांच्या फांद्या घरांच्या उतरत्या छपरांसाठी वापरल्या जातात. विलो, देवदार, फर असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. विलोच्या झाडांपासून क्रिकेटच्या बॅट बनविल्या जातात.

आठव्या शतकातील ललितादित्य या राजाच्या कालखंडात इथे मंदिर वास्तुकला बहरली होती. त्यानंतरच्या अवंतीवर्मन आणि जयसिंह यांनी ही मंदिर वास्तुकला वैभवसंपन्न केली. राजा जयसिंह याच्या काळात राजकवी कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या दीर्घ काव्यग्रंथात काश्मीरमधील शिल्पवैभवाने नटलेल्या अनेक देवालय समूहांचं सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रिटिश संशोधक सर ऑरेट स्टेन यांनीही आपल्या संशोधनामध्ये या मंदिरशिल्पांवर प्रकाश टाकला आहे. श्रीनगर- सोनमर्ग रस्त्यावर कनकिनी नदीच्या तीरावरील नारंग येथे भव्य देवालयांचा शिल्पसमूह ग्रानाईटच्या लांबट- चौकोनी दगडांमध्ये इंटरलॉक पद्धतीने बांधलेला होता. त्याच्या अखंड काळ्या दगडातून कोरलेल्या घुमटाचं वर्णन ‘राजतरंगिणी’मध्ये केलेलं आहे. तिथल्या नैसर्गिक नितळ झर्‍यांचं, त्यातील माशांचं वर्णनही त्यात आहे. सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने २००० वर्षांपूर्वी बांधलेलं शिव-भूतेश देवालय याचा उल्लेखही ‘राजतरंगिणी’ मध्ये आहे. आज त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.

श्रीनगर भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

पुरीपासून ५० किलोमीटर अंतरावर ‘सातापाडा’ नावाचं ठिकाण आहे. तिथून चिल्का सरोवराला फेरफटका मारण्यासाठी जाता येतं. चिल्का सरोवराची लांबी ६५ किलोमीटर असून त्याचं क्षेत्रफळ ७८० चौरस किलोमीटर आहे. चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया व भार्गवी या नद्या येऊन मिळतात. हे खाऱ्या पाण्याचं विशाल सरोवर आहे.  समुद्राच पाणी ज्या ठिकाणाहून सरोवरात येतं ते समुद्रमुख बघण्यासाठी मोटार लाँचने दोन तासांचा प्रवास करावा लागतो. सरोवरातील डॉल्फिन दिसतात. हे सरोवर जैव विविधतेने समृद्ध आहे. इथे जवळजवळ २०० प्रजातींचे हजारो स्थलांतरित पक्षी येतात.

संबलपूरहून १६ किलोमीटर अंतरावर महानदीवरील हिराकूड धरण आहे. महानदीचं पूर नियंत्रण, वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी या उद्देशाने हे मोठं धरण बांधण्यात आलं आहे. पाणी अडविल्यामुळे इथे निर्माण झालेला प्रचंड मोठा तलाव हा आशियातील सर्वात मोठा तलाव समजला जातो.

संबलपुरी नृत्य व संबलपुरी साड्या प्रसिद्ध आहेत. राउरकेला इथला स्टील  प्लॅ॑ट हे ओडिशाचं आधुनिक वैभव आहे. नंदनकानन इथल्या प्राणी संग्रहालयात पांढरे वाघ बघायला मिळतात. इथे मगरींचे प्रजनन सेंटरही आहे.

ओडिशामध्ये मिळणारे ताज्या मासळीचे विविध प्रकार प्रवाशांना आवडतात. मैद्याच्या पारीमध्ये खोबरं व ड्रायफ्रूट्स घालून बनविलेल्या चौकोनी आकाराच्या, वर लवंग टोचलेल्या लवंग लतिका चविष्ट लागतात. दूध नासवून त्या घट्ट चौथ्यापासून जिलबी बनविली जाते. त्याला ‘छेना पोडा’ असं म्हणतात.

पुरीपासून जवळ भुवनेश्वर रस्त्यावर पिपली नावाचं गाव आहे. या गावात कापडाचे आणि आरशाचे तुकडे शिवून खूप सुंदर तोरणं, कंदील, पिशव्या, ड्रेसची कापडं बनविली जातात. त्याला ‘चंदोवा’ कला म्हणतात. अनेक  पर्यटकांची पावले खरेदीसाठी या गावाकडे वळतात. ही कला आता जगप्रसिद्ध झाली आहे.

पुरीहून साधारण दहा किलोमीटरवर रघुराजपूर आहे. या गावातली प्रत्येक व्यक्ती कलावंत आहे. इथल्या सर्व घरांच्या बाह्यभागावर सुबक नक्षी कोरलेली असते. उत्तम शिल्पकार, चित्रकार, लाकडावर नक्षी करणारे कारागीर, रंगकाम करणारे आणि ओडिशाचे वैशिष्ट्य असलेली ‘पट्टचित्र’ या खास कलेत पारंगत असलेले अनेक कलाकार इथे आहेत. साबुदाणा भिजवून त्याची खळ कापडाला लावून त्यावर रामायण, महाभारत आणि जगन्नाथ (श्रीकृष्ण ) यातील प्रसंगांवर चित्रं काढली जातात. त्यासाठी फक्त नैसर्गिक रंग वापरतात. हिंगुळ या नावाचा एक दगड असतो. त्याची पावडर करून लाल रंग मिळवितात. निळ्या रंगासाठी काही स्फटिक आणून ते दळून त्याची पावडर केली जाते. हळद, समुद्रफेस, खडूची भुकटी, काजळ, चिंचेचा डिंक अशांसारख्या वस्तू पट्टचित्र कलेमध्ये वापरल्या जातात. डॉ. जगन्नाथ महापात्रा यांनी ‘जात्रीपाटी’ ही शैली विकसित केली आहे. पट्टचित्राचं काम बरंचस या शैलीप्रमाणे केलं जातं. ओडिशा सरकारने या गावाला ‘ऐतिहासिक वारसा ग्राम’ असा विशेष दर्जा दिलेला आहे. बरेच परदेशी कलाकार ही कला शिकण्यासाठी इथे येतात.

ओडिसी शास्त्रीय नृत्यकलेला दोन हजारांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. इसवीसन पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात ओडिशी नृत्यकलेबद्दल लिहिलं आहे. ओरिया कविराज जयदेव यांचं ‘गीत गोविंद’ हे काव्य प्रसिद्ध आहे. कलिंग राजा खारवेल याने संगीत व नृत्यकलेला राजाश्रय दिला. आदिवासी लोकगीतं तसंच शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची परंपरा ओडिशामध्ये आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचं जन्मगाव रघुराजपूर आहे. संयुक्ता पाणिग्रही, सुजाता मोहपात्रा, रतिकांत मोहपात्रा यांनी गुरुवर्य केलुचरण यांची परंपरा पुढे चालविली आहे.

मनोज दास, मोनालिसा जेना, कुंतला कुमारी असे अनेक प्रसिद्ध साहित्यिक ओडिशाला लाभले.न्यूयॉर्कला राहणाऱ्या आणि खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या मीरा नायर या मूळच्या राउरकेलाच्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉक्टर प्रतिभा राय या साहित्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तरुण शास्त्रीय संगीत गायिका, स्निती मिश्रा ही मूळची ओडिशाची आहे.

महानदीच्या उदंड प्रवाहातील ओडिशाची अनेक अंगानी बहरलेली कलासंपन्न सांस्कृतिक परंपरा अखंडित आहे

भाग ४ व ओडिशा समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? यात्रा-संस्मरण ?

☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर

आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता.

आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले.

फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एकतासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास.

अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट.

रुक्ष, रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य ,निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.

ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला ,वळणा वळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन)चे उंच वृक्ष. आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय, भूगर्भीय आश्चर्यच.. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्‍या मातीमुळे तयार झालेली ही नैसर्गिक विवीध आकारांची लाल पांढरी कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली. आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले. आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू…

सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली. जवळ जवळ १४ एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला  अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे.

इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा (meditation) आणि प्रार्थने साठी येतात.नतमस्तक होतात.

अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे. ही मूर्ती इंडोनेशीयाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे. आणि जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.

त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्‍या चिंता,विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. इश्वर एक आहे,चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला.त्याच्या चरणी मी लीन झाले.एक अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली…

सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान.अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत.

हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर, उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे. हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ जवळ ३००, ३००यु एस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले.

उंच गाभार्‍यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.

भिंतींवर ,येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात, “हे! प्रभु! यांना क्षमा कर. कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..!”

मन अंतर्मुख होते.

समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते…

सारेच अलौकिक. कल्पनेच्या पलीकडचं. सूक्ष्मतेतून विशालतेकडे नेणारं.. द्वैतातून अद्वैताकडे जाणारं.. परमात्म्याची वाट दाखवणारं.

सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं,ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं  गाव. सुंदर पायवाटा, कारंजी,विवीध रंगांची फुलझाडे,कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विवीध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना.

अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले…

किती पाहशील तू.. किती घेशील तू अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता..अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..

आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची (observatory) भेट.

फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्ये ही लाॅवेल वेधशाळा स्थापीत झाली.

१९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास ,संशोधकांनी या वेधशाळेत केला.

 १९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.

सूर्यमाला,ग्रह तारे, आकाशगंगा,आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे  सातत्याने होत असते.

तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.

जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्‍यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात.आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांड पाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू?

रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात  साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले….

बघावं तितकं थोडं..लिहावं तितकं थोडं..

तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.

© सौ. राधिका भांडारकर

२८/०९/२०२२

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print