मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-३ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग – ३ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

४) आधुनिक कालखंड ~ इ.स. १८०० पासून

ख्याल गायनाचा भरपूर प्रसार व त्याचबरोबर वाद्यसंगीताची विलक्षण क्रान्ती या कालखंडांत दिसून येते.

संगीताचे स्वरलेखन, संगीत संस्थांच्या निरनिराळ्या परीक्षा, संगीतावरची पुस्तके आणि व्याख्याने यामुळे संगीत शास्त्राचा प्रचंड प्रसार झाला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, भातखंडेबुवा, विनायकराव पटवर्धन वगैरे संगीतज्ञांनी तर भारतीय संगीत प्रसाराचे व्रतच घेतले होते.

संगीताचा सतत अभ्यास व रियाज करून कलावंत वैयक्तिक विचाराने स्वतःची विशिष्ट गायनशैली तयार करतो.प्राचीन काळापासून ते अगदी आधुनिक काळांत एकोणीसाव्या शतकापर्यंत गुरूगृही राहून, गुरूची मनोभावे सेवा करीत संगीत साधना करण्याची प्रथा होती. गुरू त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. यालाच त्या गायन शैलीचे घराणे म्हटले जाऊ लागले. अशा रीतीने काही प्रतिभावंत कलाकारांनी त्यांची स्वतंत्र गायनशैली शिष्यांकरवी

जतन करण्याचा प्रयत्न केला. ह्यातूनच आज प्रचलित असलेली किराणा, जयपूर, मेवाती, ग्वाल्हेर, आग्रा वगैरे एकूण १६ घराणी तयार झाली.

अब्दूलकरीमखाॅं साहेब हे किराणा घराण्याचे पट्टीचे गायक.

आपल्या सर्वांचे लाडके कै.भीमसेन जोशी (अण्णा, सवाई गंधर्व यांचे शिष्य), आघाडीच्या गायिका प्रभा अत्रे हे किराणा घराण्याचे गायक. अल्लादिया खाॅं यांचे जयपूर घराणे स्व.किशोरीताई अमोणकर यांनी त्यांच्या गायन कौश्यल्याने लोकप्रिय केले व आज अश्विनी भिडे देशपांडे या ते पुढे नेत आहेत. स्व.विनायकबुवा पटवर्धन, शरद्चंद्र आरोलकर, गोविंदराव राजूरकर हे ग्वाल्हेर घराण्याचे आघाडीचे गायक.

आधुनिक काळांत काही कलावंतांची मात्र कोणा एका घराण्याला चिकटून न राहता अनेक घराण्यांची वैशिष्ठ्ये लक्षात घेऊन स्वतःची शैली तयार करण्याची धडपड चालू असते.याचे एक उत्तम उदाहरण म्हणून कै.पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांचा उल्लेख करणे  योग्य होईल. त्यांनी ग्वाल्हेर,आग्रा,अत्रौली अशा विविध घराण्यांची गायकी आत्मसात केली. आणि बुद्धीचातूर्याने स्वतःच्या गाण्याचा वेगळा ठसा उमटविला.जसे जयपूर घराण्यांतील एकारातील स्वरलगाव,आग्रा घराण्याची आकारयुक्त आलापी,किराणा घराण्याची मेरखंड पद्धतीने केलेली आलापी.उस्ताद बडे गुलाम अलीखाॅं यांच्या गायनांतील चपलता,मृदुता,भावुकता इत्यादी गुणविशेष त्यांनी उचलले तर ठुमरी पेश करताना पतियाळा घराण्याची पद्धत जवळ केली.

पं.उल्हास कशाळकरांचाही स्वतंत्र शैलीचे गायक म्हणून उल्लेख करावा लागेल.त्यांनी गजाननबुवा जोशी यांजकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली,त्याचबरोबर जयपूर गायकीचे निवृत्तीबुवा सरनाईक, डी.व्ही.पलुस्कर, मास्टर कृष्णराव, कुमार गंधर्व  इत्यादी नामवंतांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या गायकीवर आहे.

मध्ययुगीन काळांत राजाश्रय असलेले संगीत नाटके, चित्रपट, आकाशवाणी, मागील पन्नास वर्षांत लोकप्रिय झालेले दूरदर्शन या प्रसारमाध्यमांमुळे  घरोघरी पोहोचले. रसिकांची नाट्यसंगीत, भक्तीगीते, अभंग गायन, भावगीते तसेच गझल, ठुमरी दादरा अशा उपशास्त्रीय संगीतात अधिकाधिक रुची उत्पन्न झाली. त्यामुळे ख्यालगायकीची मैफल असली तरी एखाद दोन राग पेश झाल्यानंतर प्रेक्षकांची भजन, नाट्यपद किंवा ठुमरी कलावंताने सादर करावी अशी फरमाईश असतेच.

भीमसेन जोशींनी “चलो सखी सौतनके घर जईये” ही गुजरी तोडीतील दृत बंदीश किंवा “रंग रलिया करत सौतनके संग” ही मालकंसमधील दृतबंदीश संपविल्यानंतर अण्णांचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, इंद्रायणी काठी हे अभंग ऐकल्याशिवाय मैफल पूर्ण झाल्याचे समाधान होतच नव्हते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता जग जवळ आले आहे. संगीतांत अनेकविध नवेनवे प्रयोग होऊ लागले. फ्यूजन,रिमिक्स वगैरे. चित्रपट संगीताने तर संगीतविश्व पारच बदलून टाकले. भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा मेळ पहावयास मिळतो. काही ठिकाणी तो चांगलाही वाटतो पण कधी कधी संगीतातील माधूर्य हरपून त्याची जागा गजराने घेतली आहे असे वाटते.

गुरूकूल पद्धतीने संगीत साधना करणे आज लुप्त झाले आहे.केवळ संगीतावरच लक्ष्य केंद्रीत करणे आजच्या काळांत अवघडच आहे.ज्ञानार्जन किती झाले यापेक्षा प्रसिद्धि केव्हा मिळेल याकडे अधिक लक्ष आहे.त्याचबरोबर मात्र शास्त्रीय संगीताचा अभ्यास व साधना करणारी युवा मंडळीही भरपूर आहेत.त्यामुळे वेदकाळी रोपण केलेला शास्त्रीय संगीताचा हा डेरेदार वृक्ष नवोदीत कलाकारांच्या खत~पाण्याने सतत बहरतच राहील यांत संशय नाही.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

३) मध्ययुगीन काल~ इ.स. ८०० ते १८००.

या कालखंडांत रागसंगीताचा उगम व प्रसार झाला.साधारण १५०० ते २००० वर्षापूर्वीचा हा काळ.जयदेवाचे गीतगोविंद याच कालखंडांतील असून त्यांतील अष्टपदींवर मालवी, वराटी,वसंत,बिभास,   भैरव अशी रागांची नावे आढळतात.विलक्षण कल्पनाशक्तीचे व बुद्धीचातूर्याचे लक्षण असणारी ही रागपद्धती नेमकी केव्हा,कोणी,कशी आणली या संबंधीचा कोणताही पुरावा अस्तित्त्वांत नाही. परंतु परकीय स्वार्‍या, राज्यांची उलथापालथ ह्यामुळे समाजजीवन फार अस्थिर स्वरूपाचे होते.अशावेळी अनेक संगीत जाणकारांनी आपल्या बुद्धीचातूर्याने लोकसंगीतांतून रागपद्धतीस जन्म दिला आणि पुढे शेकडो वर्षांच्या कालखंडांत सतत नवनव्या रागांची भर पडत गेली.मुसलमान व इंग्रज यांनी दीर्घकाळ एकछत्री साम्राज्य चालविले,भारतीय मनावर परकीयांचे अनेक संस्कार झाले,मात्र भारतीय रागसंगीत हे पूर्णपणे भारतीयच राहीले.जातिगायन पूर्णपणे लुप्त झाले आणि धृपद गायकी अस्तित्वात आली.अकबराच्या दरबारांतील नवरत्नांपैकी मिया तानसेन(रामतनू)हा धृपदिया म्हणून प्रसिद्ध होता.मियाकी तोडी,मिया मल्हार वगैरे आजचे लोकप्रिय राग हे तानसेनाने निर्माण केले आहेत.ह्या संबंथी अशी कथा सांगतात की,तानसेनाने दीपक राग गावून दीप प्रज्वलन केले पण हा राग गात असताना त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा तानसेनाच्या बायकोने व मुलीने मल्हार गाऊन होणारा दाह शांत केला.

मुघल साम्राज्यांत त्यांनी आणलेल्या पर्शियन संगीताने भारतीय संगीतावर थोडा परिणाम केला.तेराव्या शतकांत अमीर खुश्रो या संगीतकाराने भारतीय संगीतावर पर्शियन संगीताची कलमे केली आणि त्यातून एक नवीन गायनशैली अस्तित्त्वांत येऊ लागली.हीच ती आजची लोकप्रिय ख्याल गायन पद्धति. ठुमरी,गझल,कव्वाली हे गायनप्रकारही यावनी कालखंडांतच प्रसार पावले.परिणामी धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकीने पूर्णपणे मैफीली व्यापून टाकल्या.आजही भारतीय संगीताची मैफल ख्याल गायकीनेच व्याप्त आहे.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

संगीत म्हणजे नेमके काय?

त्याचे उत्तर असे की निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना.राग,स्वर

आणि शब्द कोणत्या एका तालात बद्ध करून त्या तालाच्या खंडाप्रमाणे सम,इतर टाळ्या,काल किंवा खाली या आवर्तनात स्वररचना किंवा गीत रचना चपखलपणे बसविणे म्हणजे संगीत.

पाण्याची खळखळ,वार्‍याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकिळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एकप्रकारचा नाद,ताल,लय आहे,निबद्धता आहे.

भारतीय संगीताची परंपरा फार मोठी आणि प्राचीन आहे.नादयुक्त हुंकार ते सप्तस्वर असा संगीतातील स्वरांचाः विकासक्रम आहे.त्यामागे दीर्घ कालखंडाची परंपरा आहे जी  चार कालखंडातून दिसून येते.

१) वैदिक काल~इसवी सन पूर्व ५ ते ६ हजार पासून १हजार पर्यंत.

पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची स्तुती व प्रार्थना करणार्‍या  ऋचांचे गायन ऋषीमुनी करीत असत.ऋग्वेद,यजूर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांपैकी सामवेदाशी वेदकालीन संगीत संबंधीत आहे. सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे ऋचांचे स्वरबद्ध गेय स्वरूप.सामवेदात गायनाची एक निश्चित पद्धति तयार केली गेली आणि तीन स्वरांचे गायन सप्तसुरांपर्यंत विकसित झाले. यज्ञयागादि प्रसंगी जे गायन होत असे तेच तत्कालीन संगीत होते,ज्याला गंधर्वगान असे म्हटले जात होते.

२) प्राचीन काल~ ईसवी सन पूर्व १००० ते ई.स.८०० पर्यंत. ह्याला जातिगायनाचा कालखंड असेही समजतात.धृवा गायनही प्रचलीत होते.पुढे त्याचेच परिवर्तीत स्वरूप धृवपद किंवा धृपद गीत गायन अशी ओळख झाली.हा प्रकार भरतपूर्व काळापासून प्रचारात होता.जातिगायनाचे बदललेले स्वरूप हेच रागगायन होय.भरतमुनींच्या नाट्यशास्त्रांत ह्या जातिगायनाचा किंवा राग गायनाचा उल्लेख सांपडतो.

पुढील भागात आपण मध्ययुगीन कालखंडातील संगीत बघू.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

एखादं गर्भरेशमी वस्त्र ल्यायल्यानंतर त्याच्या तलम, मुलायम स्पर्शानं मन मोहवतं, सुखावतं, शांतावतं. नेमकी तशीच अनुभूती नावाप्रमाणे रसराज असणारे पं. जसराज ह्यांचा सूर आपल्याला देतो. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयात मी पं. जसराजांना ऐकलं. अगदी ऋषितुल्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ सूर ह्यांची ती एकत्रित अनुभूती एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्याऱ्या घटकांपैकी एक म्हणावी लागेल. एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तसंच अगदी लहागग्या वयातच त्यांच्या सुरानं माझ्या मनात घर केलं. अत्यंत तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली.

सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! मेवाती घराण्याच्या ह्या अध्वर्यूविषयी, त्यांच्या गायकीविषयी मी काही लिहिणं म्हणजे अगदीच मिणमिणत्या ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं आहे. परंतु आपापल्या परीनं प्रत्येकजण कलाकाराच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं शोधत असतो किंबहुना ती आपसूकच श्रोत्याच्या मनात उमटत जातात. त्यांच्या बाबतीत मला जे भावलं ते म्हणजे त्यांच्या सुरांतली मनाला स्पर्शणारी, मनात खोलवर झिरपत जाणारी भावगर्भता! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

नेमानं संगीताची साधना घडत असलेल्या घरात पं. जसराजजींचा जन्म झाला. त्यांचे पिता पं. मोतीराम जसराजजी अवघे चार वर्षांचे असताना निवर्तले मात्र त्यापूर्वी त्यांच्याकडून जसराजजींना संगीताची दीक्षा मिळाली होती. त्यानंतर त्यांचे सर्वात वडील बंधू पं. मणिराम ह्यांच्याकडून गायनाची व मधले बंधू पं. प्रताप नारायण ह्यांच्याकडून तबल्याची उत्तम तालीम त्यांना मिळाली. त्यानंतर मेवाती घराण्याचे दिग्गज महाराणा जयवंत सिंह वाघेला व आगऱ्याचे स्वामी वल्लभदास ह्यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. बाबा श्याम मनोहर गोस्वामी महाराजांच्या सानिध्यात हवेली संगीताचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी बऱ्याच नवीन बंदिशी बांधल्या. त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! मनोमन सदैव कृष्णभक्तीत रममाण असणाऱ्या जसराजजींनी अनेक भजनांतूनही आपल्या भक्तिरसानं रसिकांना चिंब न्हाऊ घातलं. ही सगळी किमया म्हणजे संगीतमार्तंड पं. जसराजांनी आपल्या दैवी देणगीला दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

आवाजाच्या नैसर्गिक धाटणीत असलेल्या फरकामुळं स्त्री व पुरुष गायक, दोघांनाही स्वत:च्या आवाजाच्या पोताशी तडजोड न करता, स्वरतंतूंवर ताण न देता एकत्र गाता येत नाही. सहगायन करायचं म्हटलं तर कुणा एकाला आपल्या आवाजाच्या नैसर्गीक पट्टीपेक्षा चढ्या किंवा खालच्या पट्टीत गाणं अपरिहार्य होऊन जातं. त्यामुळं गाणाऱ्याचं समाधानही होत नाही आणि गायनाचा म्हणावा तसा प्रभावही पडत नाही. बहुधा स्त्रीशिष्यांना स्वत:च्या पट्टीत तालीम देताना किंवा स्त्री व पुरुष शिष्यांना एकत्र तालीम देताना आवाजाच्या नैसर्गिक पट्टीतल्या फरकाच्या गोष्टीवर त्यांचं सातत्यानं चिंतन घडत राहिलं असावं आणि त्यातूनच त्यांनी एक अभिनव प्रयोग केला, जो प्रथम पुण्यात झाला आणि तिथल्या रसिकांना तो अत्यंत भावल्याने त्यांनी त्या प्रयोगाला जसराजजींच्या सन्मानार्थ प्रेमभावानं ‘जसरंगी जुगलबंदी’ हे नाव दिलं.

शास्रीय संगीतातील मूर्छना तत्वावर आधारित असलेला हा प्रयोग आहे. ह्या जुगलबंदीत एक स्त्री गायक तर एक पुरूष गायक असतो. दोघंही आपापल्याच पट्टीत गातात तरीही सोबत गाऊ शकतात. दोघांचे साथीदार वेगवेगळे असतात कारण त्यांच्या पट्ट्या वेगळ्या असतात. दोघांचे रागही भिन्न असतात, तरीही त्यातलं एकसंधपण टिकून राहातं कारण एका गायकाचा मध्यम दुसऱ्या गायकाचा षड्ज असतो आणि एकूण स्केलमधली स्वरांतरं बदलत नाहीत. फक्त षड्जाचं स्थान बदललं तर त्यानुसार रागाचं नाव बदलतं. ह्याच गोष्टीचा वापर करून हा प्रयोग केला गेला जो अतिशय लोकप्रिय झाला. अर्थातच ह्या प्रयोगाला काही मर्यादा नक्कीच आहेत ज्या अपरिहार्य आहेत. मात्र एक नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण गोष्ट म्हणून ही जुगलबंदी नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. 

आज विचार करता वाटतं, जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. फक्त संगीताशी निष्ठावंत असणाऱ्या ह्या कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व कायमच सोबत असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली अलौकिक रत्नप्रभा ही बऱ्याचदा जगण्याची ऊर्जा ठरते. ‘आत्मसुख देणारं ते हे संगीत’ अशी धारणा वर्षानुवर्षं मनात जपली गेली आहे ती केवळ त्यांच्या सच्च्या सुरानं दिलेल्या अद्भुत अनुभूतीमुळं! असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

इतकंच म्हणता येईल की, भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च ह्या कलाकारांना दिलेलं वरदान म्हणजे आपल्यासाठी निखळ आनंदाचा ठेवा, ऊर्जास्त्रोत व प्रेरणास्थान! ह्या स्वरसाधकांनी ‘साधलेल्या’ अलौकिक सुरांना सादर वंदन! ह्या चार सुरांना गुंफणारी शब्दमाला आज पूर्ण होतेय. अशा अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी झाल्याच्या आनंदात आपली रजा घेते. त्यापूर्वी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ??

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ भीमसेन जोशी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  भीमसेन जोशी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

कंठात दिशांचे हार

निळा अभिसार

वेळुच्या रानी

झाडीत दडे

देऊळ गडे, येतसे

जिथुन मुलतानी

— कविवर्य ग्रेस

ह्या गूढ शब्दचित्रांतून ऐकू येणारा पवित्र पण घनगंभीर सूर मला भीमसेनजींच्या सुरासारखा भासतो.

ज्या वयात मुलं सवंगड्यांशी खेळण्यात रममाण असतात त्या अवघ्या अकराव्या वर्षी सुराचा ध्यास घेऊन गुरूच्या शोधात पंडितजी कर्नाटकातील गदग येथून घर सोडून निघाले. केवळ तो ध्यास त्यांना ‘मैफिलीचा बादशहा’ होण्यापर्यंत घेऊन गेला आणि हा मैफिलीचा बादशहा भारतीयांच्या गळ्यातील ताईत तर झालाच, शिवाय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायनशैली जगभरात पोहोचवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. अर्थात, तिथवर पोहोचण्याचा मार्ग सुलभ नव्हता. मात्र नियतीनं त्यांना सुराचा जो ध्यास दिला होता तो सूर त्यांना सापडावा हीसुद्धा तिचीच योजना होती.

रिक्तहस्तानं अंगावरच्या कपड्यानिशी गुरूच्या शोधात बाहेर पडलेल्या ह्या लहानग्या भीमसेनला जशी बऱ्याचदा परिस्थितीची ठोकर खावी लागली तसेच काही आधाराचे हातही लाभले. त्यात दोन भजनं म्हणून दाखव मग तुला पोटाला दोन घास देत जाईन’ असं म्हणणारा समृद्ध विचारांचा अन्नापदार्थांचा गाडीवाला असो किंवा काही कालावधीनं थोड्याफार मार्गदर्शनाचा लाभ झाल्यावर भीमण्णांनी रियाज सुरू केला तेव्हां ‘रोज इतका रियाज करतोस तर ताकद टिकून राहाण्यासाठी हे घ्यायलाच पाहिजे’ असं म्हणून आपल्या गायीचं निरसं दूध त्यांना आग्रहानं प्यायला लावणारी गंगव्वा असो!

अगदी लहानपणी जानप्पा कुर्तकोटी, माधव संगीत विद्यालयातील कृष्णराव पंडित व राजाभैया पूछवाले ह्यांच्याकडून लाभलेल्या थोड्या ज्ञानासोबत बाहेर पडलेल्या पंडितजींना त्यांच्या भ्रमंतीत ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध सरोदवादक हाफिज अली खान, खडकपूरचे केशव लुखेजी, कलकत्त्यचे पहाडी सन्याल, दिल्लीतील चांदखान साहेब, जालंधरचे अंध धृपदिये मंगतराम अशा अनेक लोकांचं शिष्यत्व पत्करून जमेल तेवढा ज्ञानार्जनाचा प्रयत्न केला. शेवटी जालंधरच्या संगीतसंमेलनात भेटलेल्या पं. विनायकबुवा पटवर्धनांनी त्यांना सल्ला दिला की, ‘तुमच्या स्वत:च्या गावाजवळच कुंदगोळ येथे सवाई गंधर्व राहातात, त्यांच्याकडं तालीम घ्या.’ त्यांच्या सल्ला मानून पंडितजी घरी परतले आणि सवाई गंधर्वांकडं त्यांची तालीम सुरू झाली. सुरुवातीला भीमसेनजींना विशेष काही न शिकवता त्यांच्या निष्ठेची फक्त चाचपणी सुरू होती. मात्र त्यांची प्रामाणिक लगन लक्षात आली तसं सवाई गंधर्वांनी ह्या शिष्याला मनापासून घडवायला सुरुवात केली. सुरुवातीला एक वर्ष एकाच रागाची तालीम सुरू होती. नंतर आलापीप्रधान असलेल्या किराणा घराण्याच्या सर्व प्रमुख रागांची तालीम दिली गेली. पुढच्या कालावधीत एक वर्षभर रामपूरला उस्ताद मुश्ताक हुसेन खान साहेबांकडेही भीमसेनजींनी तालीम घेतली.     

एक असामान्य कलाकार अस्तित्वात येताना त्याची ज्ञानलालसा किती पराकोटीची असते ह्याचं नेमकं उदाहरण म्हणजे पंडित भीमसेन जोशी! आपल्याला देहभान विसरायला लावणारा दमदार सूर ‘कमावताना’ पंडितजींनी ज्ञानार्जनासाठी किती मार्ग चोखाळले, किती कष्ट सोसले आणि केवढी साधना केली हे फक्त त्यांचं तेच जाणोत! स्वत: हे सगळं सोसून रसिकांना अलगद वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणण्याऱ्या आपल्या लाडक्या पंडितजींचं न फेडता येण्यासारखं ऋण आपल्यावर आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ‘संतवाणी’चा प्रवाह स्वत:च्या संगीतात सामावून घेतल्यानं भारताच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक मनात त्यांनी घर केलं. त्यांच्या ‘संतवाणी’वर लोकांनी अलोट प्रेम केलं. याशिवाय ठुमरी, कन्नड भजनं, हिंदी भजनं, भावगीत इ जे जे प्रकार त्यांनी हाताळले ते सगळेच त्यांनी ‘कमावलेल्या’ दमदार, बुलंद आवाजानं झळाळून उठले.

स्वत:च्या गुरूंच्या नावानं त्यांनी सुरू केलेला आणि अखंड सुरू राहून आता सत्तरीच्या उंबरठ्याशी आलेला सवाई गंधर्व महोत्सव म्हणजे त्यांच्या गायकीच्या बरोबरीनं संगीतक्षेत्राला लाभलेलं त्यांचं आणखी एक योगदान आहे. हे व्यासपीठ निर्माण करून शास्त्रीय संगीतातील गुणी कलाकारांना रसिकांसमोर येण्याची केवढी मोठी संधी त्यांनी प्राप्त करून दिली. एका ध्येयानं प्रेरित होऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मनापासून वर्षानुवर्षं साधना करणारे निष्ठावंत कलाकार मैफिलीत गाण्याएवढे तयार झाले असं त्यांच्या गुरूंना वाटलं की ‘सवाई गंधर्व महोत्सवा’पासून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात व्हायची. `तिथं गाणार आहे म्हणजे चांगला अभ्यासू कलाकारच असणार’ हे गणितच ठरून गेलं होतं. भीमसेनजींच्या पुढच्या पिढीतील आजच्या सर्व नावाजलेल्या कलाकारांचं ‘नावारुपाला’ येणं त्यांच्या आशीर्वादानं ह्या व्यासपीठावरूनच सुरू झालं असावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वत: कलाकार असूनही सर्व कलाकारांना एकत्र आणणारा असा संगीतसोहळा सातत्यानं करत राहाणं हे त्यांच्या गायकीइतक्याच विशाल असलेल्या त्यांच्या मनोवृत्तीचं द्योतक आहे. अशा सर्वार्थानं संपन्न ‘भारतरत्ना’स सादर वंदन!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ कुमार गंधर्व ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  कुमार गंधर्व ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

कॅलिडोस्कोप डोळ्याला लावल्यावर जसजसं ते नळकांडं आपण गोल फिरवतो तसं असलेल्याच काचतुकड्यांतून वेगवेगळी  नक्षी तयार होत राहाते आणि प्रत्येकच वेळी त्या एकेका नक्षीच्या स्वत:च्या अशा सौंदर्यानं आपलं मन मोहून जातं. त्या विविध नक्षींपैकी कोणती नक्षी सर्वात जास्त सुंदर हे काही केल्या आपण ठरवू शकत नाही कारण प्रत्येकच नक्षी स्वत:च्या आकार-उकारात आणि रंग-रुपात तितकीच देखणी वाटते. ते इवलेइवलेसे चिमुकले म्हणावेत असे आकार  आपल्याला अक्षरश: अपरिमित आनंद देतात आणि आपण त्यात हरवून जातो. अगदी असंच कुमारजींचं गाणं! कुमारजी… कुमार गंधर्व ही उपाधी लाभलेले… शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली!

एका कन्नडभाषिक परिवारात ८ एप्रिल १९२४ रोजी जन्मलेल्या कुमारजींमधला सुरासक्त कलाकार अगदी बालवयातच आपली चुणूक दाखवू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संगीताच्या मैफिलीत आपल्या प्रभावशाली गायनानं कुमारजी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले होते. प्रोफेसर बी. आर. देवधर आणि अंजनीबाई मालपेकर हे त्यांचे संगीतातील गुरू! जन्मजात सुराची ‘जाण’, प्रतिभा, संगीतप्रेम, गुरूंचं नेमक्या मार्गदर्शनासहित एक ‘नजर’ प्रदान करणं आणि कुमारजींचंही गुरूंनी प्रदाण केलेलं नेमकेपणी पकडणं आणि पुढं ते विशालत्वाकडं नेणं ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला ‘गंधर्व’ अनुभवता आला.   

वयाच्या एका टप्प्यावर दुर्धर आजाराशी सामना करताना पुन्हा गाता यायला हवं असेल तर पाच वर्षं तानपुऱ्यासोबत गायचं नाही हा डॉक्टरांचा सल्ला कुमारजींनी व्रतासारखा आचरला. मात्र अंथरुणावर पडल्यापडल्या त्यांचं मन गातच राहिलं, सुरांतील बारकावे, सुराच्या अनंत छटा शोधत राहिलं. आयुष्यात सूर परतून यावा ह्या विलक्षण इच्छाशक्तीमुळंच आजाराशी  धैर्यानं सामना करून कुमारजींनी त्यावर मात केली. मात्र आजार जाताजाता आपल्या कायमच्या पाऊलखुणा कुमारजींच्या आयुष्यावर उमटवून गेलाच. एक फुप्फुस कायमचं निकामी झालं आणि उरलेल्या एका फुप्फुसावर सगळी जबाबदारी आली. ह्या मोठ्या कमतरतेचं कुमारजींनी ना रडगाणं गायलं ना सहानुभूती लाटण्यासाठी जगासमोर त्याचं भांडवल केलं. उलट गायनासारख्या दमछास हीच मुख्य बाब असणाऱ्या विषयात ‘तुटपुंजा श्वास’ चांगल्या अर्थानं भांडवल म्हणून वापरला.

एका फुप्फुसाचा आधार घेत, त्याला जपत पण रियाजाने ताकदवानही करत आपली गायनशैली इवल्याइवल्या स्वराकृतींनी सजवून अपार देखणी केली. त्याच त्यांच्या आणखी देखण्या झालेल्या गायनशैलीनं कुमारजींना असामान्यत्वाच्या रांगेत आणून उभं केलं. कुमारजींचं गायन नजाकतपूर्ण अशा  बारीकबारीक स्वराकृतींनी नटलेलं! एकाचा आनंद अजून घेतोय तोवर दुसरं देखणेपण पुढ्यात यावं इतक्या सहजी जणू सौंदर्यलडी त्यांच्या गायनातून उलगडत राहायच्या.

रागसंगीताची त्यांची नजाकतपूर्ण गायनशैली हा एक भाग झालाच मात्र त्याखेरीजही कुमारजींनी संगीतक्षेत्राला अपार संपत्ती प्रदान केली. आजारपणातून बाहेर येण्यासाठी त्यांना मानवेल अशा हवेत राहाण्याचा डॉक्टरांचा सल्ला मानून माळवा प्रांतात देवास इथे वास्तव्याला आलेल्या कुमारजींच्या कानांवर तिथलं संपन्न लोकसंगीत, लोकधुनी पडू लागल्या. त्या सुंदर स्वरसंगती कलासक्त, सुरासक्त, संगीतासक्त कुमारजींच्या मनात घोळू लागल्या. त्यातूनच पुढं कुमारजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली. त्या रागांची माहिती आणि कुमारजींनी रचलेल्या बंदिशी आपल्याला त्यांच्या ‘अनूपरागविलास’ ह्या पुस्तकाच्या एका खंडात एकत्रित स्वरूपात आढळतात.

‘कुमारजींनी गायलेली निर्गुणी भजनं’ ह्या गोष्टीची भक्ती करणारे, ती ऐकताऐकता ध्यान लागल्याची अनुभुती घेणारे लोक त्यांच्यापासून पुढच्याही प्रत्येक पिढीत आढळतात. आपल्या खास पद्धतीनं त्यांनी गायलेली कबीरभजनं मनाचा ठाव घेतात. त्यातील कबीराची शब्दसुमनं आणि त्यांतील अलौकिक अर्थाचा दरवळ कुमारजींच्या स्वरांतून रसिकांनी जसाच्या तसा अनुभवलाच, शिवाय, कुमारजींच्या वेगळ्या ढंगाच्या गायनशैलीनं त्यावर अनुपम सौंदर्याचा वेगळाच ठसा उमटला.

कुमारजींच्या एका मैफिलीत गायलेला तराणा ऐकून कविवर्य वसंत बापट त्यांना म्हणाले, ‘तुमचा तराणा ऐकत असताना मला मंदिरातल्या घंटानादाची आठवण झाली!’ त्यावर कुमारजी उत्तरले, ‘मूळ तराण्याच्या शब्दांना साहित्यिक दृष्ट्या काही अर्थ नसतो. पण गायक ते शब्द कसे गातो त्यानुसार त्याला अर्थप्राप्ती होते.’ निरर्थक शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्याची कलाकाराची कुवत आणि जबाबदारी ह्याबाबत केवढा महत्वाचा विचार आहे हा!

‘गीत वर्षा’ सारख्या संकल्पना घेऊन कुमारजींनी अभिनव प्रयोग केले ज्यात वर्षा ऋतूशी संबंधित असलेल्या लोकसंगीत व रागसंगीत दोन्ही प्रकारांतील रचनांचा समावेश होता. ‘मला उमजलेले बालगंधर्व’ ह्या कार्यक्रमातून कुमारजींनी बालगंधर्वांच्या गायकीच्या सूक्ष्म अभ्यासातून त्यांना उमजलेली त्यांच्या गायकीची मर्मस्थळं, सौंदर्यस्थळं उलगडून दाखवली. अंगभूत चिंतनशीलता आणि सातत्यानं ध्यास घेऊन संगीताच्या अभ्यासात रममाण होण्याच्या वृत्तीमुळं असे अनेक देखणे प्रयोग कुमारजींनी रसिकांना सादर केले. असे अनेक अभ्यासपूर्ण प्रयोगांची, त्यांच्या सवच रागांची, रागसंगीतातही कल्याणप्रकार, मल्हारप्रकार इ. वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची त्यांची रेकॉर्डिंग्ज म्हणजे संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल साहित्य आहे. 

कुठल्याही प्रकारचं संगीत निषिद्ध तर नाहीच, उलट प्रत्येक प्रकारच्या संगीतातलं सौंदर्य आपण शोषून घ्यायचं हे कुमारजींचं संगीताकडं पाहाण्याचं तत्व म्हणायला हरकत नाही. असा चतुरस्त्र विचारांचा, संगीताला जीवन समर्पित केलेला, सृजनशील, सौंदर्यासक्त कलाकार म्हणजे भारतभूचं भूषण! 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मुख्यत्वे माझ्या पिढीचा विचार करता ज्या चार ‘सुरांवर’ आमचं पोषण झालं, जगणं तेजोमय झालं त्यांविषयी चार दिवस जमेल तशा शब्दज्योती उजळवून दिवाळी साजरी करण्याचा हा माझा प्रयत्न! खरंतर, ह्या सुरांचं देणं कसं मुठीत पकडावं, कसं आकार-उकार-वेलांट्यांत सजवावं आणि कसं त्याला शब्दांच्या हवाली करावं !?… ती फक्त अनुभवायची गोष्ट! ती अनुभूतीच शब्दांत सजवायचा प्रयत्न करतेय.

टिपूर चांदणभरल्या आकाशाचं छत, चंदेरी अंधारात सजलेलं निबिडवन, तिथं मंदपणं खळाळता एक निर्झर, त्याच्या काठाशी वडवाईच्या पारावर भान हरपून बसलेलं असावं…. चढत्या निशेच्या साक्षीनं निर्झराचा खळाळ जेमतेम ऐकू येण्याइतपत मंद व्हावा…. ती गाज ऐकताऐकता अवचित उरात लाटा उसळून याव्या, मनाच्या तळातून अल्लद वरती येत काळजावर तरंगू लागलेल्या एकेक संवेदना जाणवाव्या… साचू लागलेल्या नेत्रतळ्यांना आपसूक पापण्यांचा बांध पडावा, बंद डबीत मोती डुगडुगावा तसे पापण्यांच्या आत जाणवणारे आसवमोती आणि एका क्षणी पापण्यांच्या काठावर देणेकरी होऊन आलेल्या अनावरपणाची रिती ओंजळ लयदारपणे झरणाऱ्या थेंबांनी भरून जावी….

विरत जावेत सभोवतीचे बंध, मन रितं होताहोता भरून येणारा श्वास जाणवावा आणि स्वत:ला त्या क्षणाच्या हवाली करत झाडाच्या बुंध्याशी अलगद मान टेकवावी…. उसळून येणाऱ्या भावतराण्यांसोबत अश्रूंचा सळसळता झंकार, निमिषांच्या अंतरांपाठोपाठ जाणिवांच्या थकलेपणासोबत शांतावत चाललेला लयहुंकार… क्षण लोपतालोपता जीव मालवतामालवता आपण निर्गुणाच्या कुशीत विसावावं आणि तो क्षण कमलपाकळीवरच्या दंवभरल्या मोत्यासारखा अथांगात ओघळून लुप्त होत जावा…!  हे…….. असं काहीसं………. नव्हे, अगदी असंच किशोरीताईंच्या सुरांचं देणं!

खऱ्या अर्थानं महान उत्तुंग व्यक्तिमत्वं ही परमेश्वरानं वेळ देऊन घडवूनच पृथ्वीतलावर पाठवलेली असतात. असंच एक स्वरशिल्प त्यानं एका स्वरसाधिकेच्या पोटी जन्माला घातलं आणि त्या स्वरशिल्पाची साधना उच्चतम पातळीवर सातत्यानं सुरू राहावी इतक्या विशाल त्याच्या ज्ञानकक्षा व्हायला हव्यात ह्याची जाण त्या मातृहृदयातही घातली. त्यामुळंच पंडिता मोगूबाई कुर्डीकर ह्यांनी स्वत: आचरत असलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम आपली लेक किशोरीताईंना दिल्यानंतर इतरही सर्व संगीत घराण्यांतील बारकावे त्यांना उमजावे आणि प्रत्येकातील उत्तम ते त्यांच्या गायनात उमटून त्यांची स्वत:ची एक संपन्न गानशैली निर्माण व्हावी ही जागरुकता दाखवली.

केवळ संगीतसमृद्धीची आस धरून स्वत:चा अहंभाव मधे येऊ न देता लेकीला इतर गुरूंकडंही शिकायला पाठवलं. मोगुबाईंचे स्वत:चे गुरू जयपूर-अत्रौली घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खॉं साहेब, आग्रा घराण्याचे उस्ताद अनवर हुसेन खॉं साहेब, पं. बाळकृष्णबुवा पर्वतकर, पं. मोहन पालेकर, शरदचंद्र आरोळकर, पंडिता अंजनीबाई मालपेकर अशा गुरुजनांकडून किशोईताईंना गायकीतली जाण व सौंदर्यदृष्टी लाभावी ह्या मोगुबाईंच्या विचाराचा परिपाक म्हणून आपल्याला गानसरस्वती किशोरीताई आमोणकर लाभल्या.

प्रत्येक राग हे एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, त्याला स्वत:चा असा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाला सूक्ष्म कंगोरेही असतात. ते समजून उमजून घेऊन आपण राग उभा केला पाहिजे अशा असामान्य विचारानं ताईंनी रागसंगीताची साधना केली. म्हणूनच त्यांचा प्रत्येक राग आपल्याला वेगळी अनुभूती देतो. शास्त्रीय संगीतासोबतच अनेक उपशास्त्रीय संगीतप्रकार, भावगीत, अभंग, भजन इ. कित्येक प्रकारांतूनही त्यांनी आपल्याला आनंद दिला आहे. मात्र कोणत्याही प्रकारात स्वत:शी तादात्म्य पावलेल्या त्यांच्या सुराचं आपल्या काळजाला हात घालणं चुकत नाही. ‘अवघा रंग एक झाला’ ह्या त्यांनी अजरामर केलेल्या रचनेतील शब्दांनुसारच अवघा रंग एक असल्याची अनुभूती त्यांचं कोणत्याही प्रकारचं गायन ऐकताना आपल्याला प्रत्येकच वेळी येत असते.

एकवेळ संतप्रभृतींच्या परमेश्वराविषयी असलेल्या भक्ती-प्रीतीभावावर लिहिता येईल, परमेश्वराला कधी भगवंत म्हणवत लेखणीतून भक्तिफुलांची ओंजळ वाहाता येईल तर कधी सखा म्हणवत त्याच्याभोवती लडिवाळ शृंगारपखरणही करता येईल. परंतू ताईंच्या भावस्वराचं काळीजभेदी, गगनचुंबी निर्गुण निराकारत्व कोणत्या शब्दांत पेलणार, असं त्यांचे अभंग, भजनं ऐकताना होऊन जातं. त्यांच्या सुराचं विश्व आभाळाच्याही पल्याड जाणारं! हाती येणं लांबच, ते डोळ्यांना तरी कसं दिसावं… आणि… कुठल्या आधारावर त्याला शब्दांत विणायला घ्यावं!?

सुराला परमेश्वर मानणारी जितकी अलौकिक दृष्टी त्यांच्याकडे होती तितकीच अलौकिक विचारधारा त्यांच्या स्वरार्थरमणी ह्या पुस्तकात दिसून येते.  आपलं मोठं भाग्य कि, जाणिवेतून नेणिवेकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे, अशाश्वताकडून शाश्वताकडे घेऊन जाणारा ताईंचा सूर आपल्याला अनुभवायला मिळाला!! ज्ञानेश्वर माऊलींच्या, `हृदया हृदय येक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।‘ ह्या शब्दरत्नांचा अर्थ ताईंचा सूर ऐकताना प्रकर्षाने उमगतो. प्रत्येकच रचनेतून आपल्या मनात गडदगहिरे भावतरंग उमटवणारा, ऐकणाऱ्याशी अद्वैत साधणारा असा किशोरीताईंचा सूर!! अपार साधना, अनंत शोधवाटा, अथक ध्यास,, अफाट मेहनत ह्यातून गवसलेलं असीम सृजन असं भावरंगांशी अद्वैत न साधतं तरच नवल! ताईंच्या अनंत सृजनावकाशाला वंदन करताना माझ्या दोन तोकड्या शब्दांचं समर्पण….    

मिल के बिछडे वह सूर नही ।  जगत को भूले परमेश कही!?

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत~ राग~ खमाज ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~ राग~ खमाज ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मागील दोन तीन आठवडे लोकसंगीत~लावणी/पोवाडा/जीवन व संगीत अशा विषयांचा उहापोह केल्यानंतर आज विवेचनासाठी पुन्हा एक नवीन राग खमाज घेऊया.

पंडीत व्यंकटमुखींच्या ७२ थाटांतून पं.भातखंडेजींनी जी १० थाटांची रचना केली त्यांतील खमाज थाटांतून खमाज नावानेच हा राग निर्माण झाला म्हणून हा जनकराग.

या रागाचे “कल्पद्रुमांकूर” या पुस्तकात असे वर्णन आढळते.

“खमाजो यत्र तीव्रा ऋषभगधनयो मो मृदुर्नमृर्दुःस्याद् ।

आरोहे र्रिनिषिद्धेः प्रभवति परिपूर्णोsवरोहे पवक्रः।।

वादी गांधार एव प्रविलसति संप्रवादो निषादो।

रात्र्याम् यामे द्वितीये प्रमुदयति मनः श्रोतुरपियेष रागः।।

अर्थात ~या खमाज रागात रिषभ(रे),गंधार(ग) व  धैवत(ध)हे तीव्र म्हणजे शुद्ध आहेत. आरोहात रे वर्ज्य तसेच अवरोह संपूर्ण सात स्वरांचा.जसे

सा ग म प (नी) सां

सां (नी)ध प म ग रे सा

पंचमाचा उपयोग वक्र पद्धतीने होतो.{(नी) ध म प म प म ग म}

वादी स्वर गंधार  आणि संवादी निषाद या रागाला खुलवितात.

रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी गायिल्याने/वाजविल्याने रसिकांच्या मनाला आनंदीत करतो.

ह्यांत भक्तीची भावना आहे म्हणून खमाज थाटाला ‘हरीका मेल” असे म्हटले असावे. कारण या रागात भक्तियुक्त पारंपारिक बंदीशी आढळतात.मग ती भक्ति ईश्वराप्रति असेल किंवा गुरूजनांप्रति आदर व्यक्त करणारी असेल.उदाहरणार्थ~

“नमन करू मै सद्गुरू चरणा।

सब दुखहरणा भवनिस्तरणा।।

शुद्धभाव धर अंतःकरणा ।

सूर नर किन्नर वंदित चरणा।।”

भक्तीबरोबरच खमाजच्या सुरावटीतून मुख्यत्वेकरून श्रृंगार रसाचा आविष्कार होतो.श्रृंगारिक भाव असलेली ठुमरी या रागाच्या सुरावटीत ऐकताना फार बहार येते.

शोभा गुर्टूंची ‘राधा नंदकुवर समझाये’ ही ठुमरी ऐकतांना अगतिक राधा डोळ्यासमोर उभी राहते.’बारी उमर लरकैया’,’कुसुमऋत आयी’ ह्या शोभाताईंच्या आणखी काही खमाज ठुमर्‍या आहेत.’जरा धीरेसे बोलो कोई सुन लेगा’ हा बेगम अख्तरबाईंचा खमाज दादरा प्रसिद्ध आहे.सुरेशबाबू माने’देखो जिया बेचैन’ आणि ‘नजरिया लागे प्यार’ या ठुमर्‍या रसील्या ढंगाने गात असत.केसरबाईंची ‘आये श्याम मोसे खेलत नाही, सिद्धेश्वरीदेवींची ‘तुमसे लागी प्रीत सांवरिया’ या खमाज ठुमर्‍यांचे रेकाॅर्डिंग ऐकतांना मन वेडावून जाते.शुभा मुद्गलांची ‘बाबूल जिया मोरा घबराये’ ही ठुमरीश्रोत्यांना मंत्रमुग्ध करते,

‘धीर धरी धीर धरी । जागृत गिरीधारी’,’नाही  मी बोलत नाथा,मधु मधुरा तव गिरा, ‘या नव नवल नयनोत्सवा’ ही नाट्यपदे,आज २००वर्षांनंतरही आपण ऐकतो.’या जन्मावर या जगण्यावर शतदां प्रेम करावे’ हे कै.अरूण दाते यांनी रसिकांच्या मनांत घर केलेले भावगीत, ही आणखी काही खमाजची उदाहरणे देतां येतील.

खमाज ऐकतांना आपल्या असे लक्षांत येते की ह्या रागाची वृत्ती आनंदी, खेळकर आहे. मनाला आनंद देणारे खमाजचे स्वर कधीतरी उदासही करतात मात्र.

संशयकल्लोळ नाटकाची नायिका रेवती जेव्हा एकटीच’संशय का मनी आला’ हे पद गात असते तेव्हा या उदासीनतेचा प्रत्यय येतो खरे तर हा जनक राग,परन्तु याचा पसारा फार मोठा नाही.त्यामुळे या रागांत ख्याल गायन ऐकावयास मिळत नाही.

मात्र उपशास्त्रीय संगीताच्या प्रांगणात हा राजाप्रमाणे दिमाखाने मिरविणारा राग आहे असे म्हणणे योग्यच ठरेल.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत~मानवी जीवन आणि संगीत.. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~ मानवी जीवन आणि संगीत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मानवी जीवन आणि संगीत यांचे अतूट नाते आहे.

टॅहॅं टॅहॅं असे एका लयीत गातच, (आपण त्याला रडणे म्हणतो) बालक  जन्माला येते.

रांगायला लागते तेही एका विशिष्ठ तालात. आई बाळाला निजण्यासाठी अंगाईगीत गाऊन मांडीवर थोपटते ते एका ठराविक लयीत.बाळ मोठे होत होत पहीली पावले टाकू लागते तेव्हा त्याच्या पायातील पैंजण रुणुझुणु नाद करतात आणि बाळ कसे ठुमकत ठुमकत चालत असते. अशावेळी स्मरते ते तुलसीदासांचे भजन”ठुमक चलत रामचंद्र।बाजत पैंजनिया”

ह्रदयाची धडधड,शरीरांतून रक्ताची एका विशिष्ट लयीत प्रवाहीत होण्याची क्रिया हे ईश्वरनिर्मीत संगीतच आहे. एखाद्या तरूणीच्या मादक कटाक्षाने मनाची झालेली थरथर

संगीतांतील एखाद्या भावविव्हळ तानेसारखीच असते. जीवन म्हणजे चैतन्य आणि जेथे चैतन्य तेथे संगीत हा निसर्ग नियमच आहे. पाण्याची खळखळ, वार्‍याची फडफड, समुद्राची गाज, पानांची सळसळ, पक्षांचा कलरव, कोकिळेचे कूजन, भ्रमराचे गूंजन हे जर शांतपणे ऐकले की असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एक नाद, ताल, लय आहे, निबद्धता आहे, संगीत आहे.

मानवाच्या जीवनांत संगीत म्हणजे कंठातून उत्पन्न होणारे सुरांचे प्रकटीकरणगायन, स्वरवाद्यांतून उत्पन्न होणारे सादरीकरणस्वरवादन आणि पदन्यास व हस्तमुद्रांद्वारे केलेला भावनाविष्कार~नर्तन.

जीवनाचे हे तारू भवसागरांतून पार करीत असतांना प्रत्येक मानवाचे गायन, वादन, नर्तन चालूच असते.

टाळ वाजवत, लेझीमांच्या तालावर तोंडाने हरिनामाचा गजर करत आषाढी कार्तिकीला पंढरीला निघाले वारकरी नाचत  असतो. देवळांतून चालत असलेली भजन कीर्तने, आरत्या टाळ्या वाजवत गात असतो. मशीदीतून आलेली बांग,चर्चमधून घंटानाद आपण ऐकत असतो.

लग्न,मुंज,वाढदिवस,साठीसमारंभ,धार्मिक कृत्ये साजरी करतांना सनईसारखी मंगलवाद्ये असावीच लागतात.

गणपतीची अथवा इतर कोणत्याही विजयाच्या मिरवणूकीत ढोल ताशा हवाच.

माणसाला गजराबरोबरच शांतीचीही तितकीच आवश्यकता आहे. भरकटलेल्या, अशांत मनाला शांति मिळते ती स्वरांनीच. लतादिदींच्या मधूर लकेरीत, जसराजजींच्या मोहमयी आलापीत, किशोरीताईंच्या चपल तानेत, अनूप जलोटांच्या भजनांत, शोभा गुर्टूंच्या श्रृंगारीक दादरा/ठुमरीत, जगजित सिंग/पंकज ऊधास यांच्या गझलेत किंवा रवीशंकराच्या जादुभर्‍या सतारीत, अमजदअलींच्या सरोद वादनात अथवा शिवकुमार शर्मांच्या छेडलेल्या संतुराच्या तारांत ज्या दिव्य आनंदाचा लाभ होतो, मनःशांति मिळते ती अनुभूति शब्दांत वर्णिताच येत नाही.

स्वरलहरींचा प्रभाव किती विलक्षण आहे हे शास्त्रानेही मान्य केले आहे. अनेक व्याधींवर विविध रागांतील स्वर औषधांसारखे गुणकारी आहेत हे शास्त्राद्वारे मान्य झाले आहे.

सुलभ प्रसूतीसाठी अडाण्याचे झंझावाती स्वर फार परिणामकारक आहेत हे सिद्ध झाले आहे. आॅपरेशन थिएटरमध्ये बरेच डाॅक्टर आॅपरेशन चालले असताना मंद वाद्यसंगीत लावतात. आॅफीसेसमध्येही कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पार्श्वसंगीताचा उपयोग करण्याची प्रथा हळूहळू रुजू लागली आहे.

माणूसच काय पण पशुपक्षी व फुलापानांवरही संगीताचा पोषक प्रभाव पडू शकतो हे शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध होत आहे.

संगीताविना जीवन नाही हेच खरे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार म्हणजे पोवाडा.

पोवाड्यांत तीन प्रकारची कवने आढळतात

  1. देवतांच्या अद्भूत लीलांचे वर्णन,तीर्थक्षेत्रांचे महात्म्य. – >> हे गायक गोंधळी म्हणून ओळखले जातात.
  2. राजे,सरदार,धनिक यांचे पराक्रम,वैभव,कर्तुत्व इत्यादीचा गौरव आणि त्यांची शौर्य गाथा! ->> ह्या प्रकारातील गायक मंडळीना भाट म्हटले जाते.
  3. लढाई,दंगा,दरोडा,दुष्काळ,पूर आदि घटनांचे रसभरीत निवेदन. ->> ह्या प्रकारातील गायक शाहीर या संज्ञेत मोडतात.

पोवाड्याचे कार्य काही अंशी आजच्या वर्तमानपत्रासारखे होते. घडलेल्या घटनांवर शाहीर लगेचच कवने रचीत आणि पोवाड्याच्या स्वरूपात सादर करीत असत.

पोवाड्याची रचना द्दृष्य वाक्यांची प्रवाही व स्वैर पद्यात्मक असते.बोली भाषेतील जिवंतपणा,ओघ आणि लय ह्यामुळे ती प्रभावी होते.

रचना करतांना लघु गुरू मात्रा मोजल्या जात नाहीत मात्र एकेक चरण चार किंवा आठ मात्रांच्या आवर्तनात गायले जातात.

वीरश्रीयुक्त असा हा गायनाचा प्रकार असल्यामुळे गायकाचा आवाज एकदम खडा,उमदा,टीपेचा असला तरच रसनिष्पत्ती होऊन श्रोतृवृंदात एकप्रकारचा आवेश निर्माण होतो.हा प्रकार गद्य आणि पद्यमिश्रित असल्यामुळे उच्चरवातील संवाद व दमदार गायन हे पोवाड्याचे वैशिष्ठ्य आहे.

शिवाजी, महाराष्ट्राचा जाणता राजा, सर्वांना आदरणीय, त्यामुळे शिवछत्रपतींचे अनेक पोवाडे सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत लिहीले गेले. १६८९ साली शाहीर अज्ञानदासाने जिजाऊंच्या आदेशावरून “अफझलखानाचा वध” हा पोवाडा रचला आणि २००९ साली मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटासाठी अफझलखानाचा वध हा पोवाडा लिहिला गेला.

पोवाड्याची भाषा कशी जळजळीत,तडफदार आणि रांगडी असते त्याचा हा नमूना.

“उठला अफझलखान

जिता जागता सैतान

शिवबाला टाकतो चिरडून?

महाराजांची कीर्ति बेफाम

भल्याभल्यांना फुटला घाम

अशा वाघिणीचा तो छावा

गनिमाला कसा ठेचावा”

तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सिंहगड, धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेले पोवाडे उपलब्ध आहेत.

राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी तानाजीच्या पोवाड्याप्रारंभी जे नमन गायले आहे ते पहा~~

“ओम् नमो श्रीजगदंबे

नमन तुज अंबे

करून प्रारंभे

डफावर थाप तुणतुण्या तान

शाहीर हा महाराष्ट्राचा प्रान

शिवरायाचे गातो गुनगान”

ह्यावरून शाहीराची भूमिका आपल्याला समजते.

डफ,ढोलकी,संबळ,झांजा ही तालवाद्ये तसेच तुणतुणे,पूंगी,घांगळी ही तंतूवाद्ये पोवाडा गाताना साथीला घेतली जातात.

पठ्ठे बापूराव,रामजोशी,कवी अनंतफंदी,होनाजी बाळा,प्रभाकर आणि अगदी आधुनिक काळात अमरशेख,शाहीर साबळे,विठ्ठल उमप इत्यादी शाहीरांची नावे आपल्याला परिचित आहेतच.

पठ्ठे बापूरावांनी मुंबईवर पोवाडा लिहिला होता आणि संगीत सौदागर छोटा गंधर्व यांनी तो गायला होता.

वाचकांसाठी काही पंक्ति देत आहे.

“मुंबई नगरी बडी बाका

जशी रावणाची दुसरी लंका

मुंबई नगरी सदा तरनी

व्यापार चाले मनभरनी”

शाहीर विठ्ठल उमप हे आंबेडकरवादी होते.त्यांनी त्यांच्या रचनांतून अनेक सामाजिक व मानवतावादी प्रश्न मांडले. ‘खंडोबाचं लगीन’,’गाढवाचं लग्न’,’जांभूळ आख्यान’ हे त्यांचे कार्यक्रम फार लोकप्रिय झाले आहेत.

महाराष्ट्राची ही लोककला म्हणजे नुसतेच लोकरंजन नसून समाजप्रबोधनही आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print