मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ घामाचे अश्रू… लेखक- श्री. दि. बा. पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
सौ. सुचित्रा पवार
पुस्तकावर बोलू काही
☆ घामाचे अश्रू… लेखक- श्री. दि. बा. पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
पुस्तक – घामाचे अश्रू .. एका बलिदानाची कथा.
लेखक- श्री. दि. बा. पाटील
एकूण पृष्ठे -२६२
प्रकाशक- य. ग. गिरी. करवीर प्रगती प्रकाशन, निंगुडगे आजरा कोल्हापूर
मूल्य- २५०₹
☆ मा. दि. बा. पाटील सरांची वाचकाला खिळवून ठेवणारी अतिशय हृदयस्पर्शी कादंबरी म्हणजे ‘घामाचे अश्रू.’ – सौ. सुचित्रा पवार ☆
ही कहाणी आहे पाचवीला पूजलेल्या सततच्या दुष्काळाने कर्जबाजारी झालेल्या एका ऊसतोड कामगाराच्या दुर्दैवाची. कधी जगण्यासाठी तर कधी सणासुदीला तर कधी आजारपण, लग्नसमारंभ तर कधी व्यसनाधीनता यासाठी सावकाराकडून घेतलेली कर्जे फेडण्यासाठी ऊसपट्ट्यात येऊन जितके पैसे मिळवता येतील तितके मिळवून कर्ज फेडावे या अगतिकतेत अशी कुटुंबे ढोर कष्ट करतात पण खरेच ते सावकारी कर्ज पाशातून मुक्त होतात?खरेच त्यांच्या वाट्याला सुखाचे दिवस येतात?कर्जावर कर्ज, व्याज, पुन्हा कष्ट न पुन्हा कर्ज या दुष्ट चक्रात बरेच ऊसतोड कामगार संपून जातात. माण, जत, कर्नाटक या भागातून हे मजूर ऊसपट्ट्यात आपल्या कुटुंब कबिल्यासह येतात आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत, अनंत अडचणींचा सामना करत भविष्याची सुंदर स्वप्नं पाहत जगतात. कधी ही स्वप्नं सत्यात उतरतात तर कधी ही स्वप्नं डोळ्यात ठेवून डोळे कायमचे मिटतात. त्यांच्या जीवनातील प्रश्नांना, दुःखाना अंत नाही आणि वालीही. बापाचे कर्ज मुलगा फेडत राहतो, त्यातच तो पुन्हा कर्जबाजारी होतो, आयुष्यात पूर्ण कर्जमुक्त होणे कदाचित त्यांच्या भाळी नसावे, उर्वरित कर्ज मुलाच्या डोक्यावर ठेवून त्याचे जीवन सम्पते, हे दुष्टचक्र पिढ्यानपिढ्या चालतच राहते.
ही कथा आहे अशाच एका कर्जात बुडलेल्या श्रीपती आणि त्याच्या चौकोनी कुटुंबाची. माणदेशातील पांढरवाडी गावातून आलेल्या उसतोडयांच्या बैलगाड्या गावाच्या वेशीतून ऊस मालकाच्या फडात येतात. त्या ताफ्यातील एक गाडी श्रीपतीची. श्रीपती, त्याची पत्नी यशोदा, मुलगा नाम्या व मुलगी सगुणा गावात प्रवेश करतात. पेंगुळलेल्या अवस्थेत छोटी निष्पाप मुलं आई-वडील नेतील तिकडं जात आहेत. ना भविष्याची चिंता न वर्तमानातील सुख अशा विचित्र अवस्थेत करपत चाललेलं बाल्य आपल्या आई वडिलांसोबतच फडात उतरते. नवी विटी नवे राज्य. विचित्र नजरा झेलत यशोदा कोयत्याला भिडते.
थोड्याच दिवसात सामाजिक कार्यकर्ते एकनाथअण्णा व शेवाळे गुरुजी उसाच्या फडात येऊन श्रीपतीस विनंती करून नाम्यास साखर शाळेत दाखल करतात. नाम्या, सगुणा त्यांच्या कुवतीनुसार आईवडिलांच्या प्रत्येक कामात हातभार लावतात. नाम्या हुशार आहे. सुट्टीत गावी जाऊन आई वडिलांच्या कामास हातभार लावणे आणि सुट्टी संपताच पुन्हा शाळेत हजर राहणे. अशा जीवनचक्रात रडत खडत आर्थिक अडचणींवर मात करत नाम्या दहावी पर्यंत शिक्षण घेतो. नामाला आई वडिलांच्या कष्टांची जाण आहे. आपण शिक्षण घेऊन नोकरी केल्याशिवाय आपला व कुटुंबाचा उद्धार होणार नाही, सावकारी कर्ज फीटणार नाही, याची पुरेपूर जाणीव नामाला आहे. त्यासाठी तो शेवाळे गुरुजींच्या मदतीने कर्मवीर अण्णाभाऊंच्या संस्थेत ‘कमवा व शिका’या योजनेखाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतो. इकडं सगुणाच्या लग्नासाठी, बाळंतपण आणि बारशासाठी शेवाळे गुरुजींच्या मध्यस्थीने श्रीपतीचे राहते घर गहाण पडते. शेतीचा एक तुकडा तर आधीच विकलेला असतो. विकताना काळीज तुटत असते, कर्ज घेताना काळजाचे पाणी झालेले असते पण नामा नावाचा अंधुकसा दिलासा श्रीपतीच्या काळोख्या आयुष्यात असतो. नामाला नोकरी लागली की सगळं कसं नीट होणार होतं.
नामाचे शिक्षण संपवून नामा पांढरवाडीला परततो. नोकरीसाठी पुन्हा पैसे भरावे लागणार असतात. नामापुढं पेच असतो. गावातली जमीन कवडीमोलाने घ्यायला सावकार टपलेलेच असतात. तरीही वाड वडिलांची सगळीच जमीन कशी विकायची?असा पेच आहेच. अशातच एकनाथ अण्णा पाणीप्रश्न घेऊन दुष्काळी भागात आंदोलन करत असतात. अण्णांचे व नामाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, अण्णांबद्दल त्याला कमालीचा आदर आहे. नामा नकळत सावकारी पाश, पाणीप्रश्न याविरुद्धच्या लढ्यात ओढला जातो.
कर्ता सवरता मुलगा असा पोटापाण्याच्या प्रश्नामागे न लागता फुकटचं राजकारण करत हिंडत आहे, याचा श्रीपतीला राग येतो. डोक्यावरील कर्जाच्या ओझ्याचा ताण आहेच. त्यामुळं श्रीपती व नामा यांच्यात शाब्दिक चकमकी होऊ लागतात. नामा तरुण आहे, अंगात रग आहे त्यामुळं आपले वडील चुकतात असे त्याला वाटू लागते. त्यातच नामाची बालमैत्रिण अनुशी नामाचा विवाह होतो, म्हणजेच खाणाऱ्या एका तोंडाची अजून भर पडते. नामाच्या विवाह संबंधाने सगुणाचे माहेर तुटते. भरीस भर, यशोदा आजारी पडते आणि तिच्या इलाजासाठी दावणीची खिलारी खोंडांची जोडी विकली जाते.
आतून तुटलेला श्रीपती नामाच्या वागण्याने पुरता खचून जातो अन नैराशेच्या गर्तेत अडकतो. नामाकडून अपेक्षाभंग झालेला श्रीपती मग एका भयंकर निर्णायक वळणावर येतो.
गावात दूध घालायला गेल्यावर सहजच त्याच्या कानावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची बातमी कानावर पडते आणि त्याचे डोळे लकाकतात.
संसाराच्या खाचखळग्यांना न डगमगलेला श्रीपती मुलाच्या नसत्या उद्योगाने मात्र डगमगतो. त्याची एकमेव जगण्याची उर्मी म्हणजे नामाची नोकरी असते. पण नामा आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही त्यामुळं श्रीपतीची जीवनेच्छा मरून जाते. ‘असं मरत मरत, कुढत जगण्यापेक्षा आत्महत्या केली तर आपण आणि कुटुंबीय कर्जाच्या दुष्टचक्रातून सुटू. आपल्या मृत्यू पश्चात मिळालेल्या पैशात नामा नोकरी साठी पैसे भरून नोकरी करेल आणि कुटुंब सुखात राहील. ‘हा विचार श्रीपतीच्या डोक्यात फिट्ट बसतो न श्रीपती मागचा पुढचा विचार न करता मृत्यूला कवटाळतो. श्रीपतीच्या जीवनाचा अध्याय असा दुःखद वळणावर संपतो. भविष्याच्या सुखी स्वप्नांना डोळ्यात ठेवून श्रीपती भरल्या संसारातून निघून जातो.
इथून पुढं नामाच्या जीवनाला मात्र अचानक कलाटणी मिळते. नामाला सरकारी मदत मिळते. नामा कळत नकळत राजकारणात ओढला जातो. महाविद्यालयीन मित्र अमर देशपांडे आपल्या पक्षात त्याला महत्त्वाचे पद देतो आणि त्याच्या जोरावर नामाचा नामदेवराव होतो. पद आल्यावर आपोआपच पैसा आणि प्रतिष्ठा येते, कर्ज फिटतात, घर परत मिळते, आधुनिक शेतीसाठी आधुनिक औजारे आणि फिरायला चार चाकी दारात येते. घराचा न गावाचा कायापालट होतो. अशा तऱ्हेने नाम्याचा नामदेवराव पर्यंतचा प्रवास सुरु होतो.
ही सगळी सुबत्ता श्रीपतीच्या बलीदानातूनच आलेली आहे, याची खंत मात्र नामदेवला वारंवार होत असते. त्यातूनच त्याला वाटते की राजकारण सरळ, साध्या माणसाचे क्षेत्र नाही. आपण यात खोल खोल बुडत जाण्यापेक्षा कुठंतरी थांबायला हवे, आणि तो राजकारणातून बाजूला होऊन घरच्या शेतीत लक्ष घालतो. आईच्या इच्छेसाठी पुन्हा खिलारी बैल दावणीला येतात. सुख, समृद्धी दारात येते, नामाच्या संसारवेलीवर एक कळी उमलू पाहते आणि श्रीपतीच्या कुटुंबाला सोन्याचे दिवस दिसून कादंबरीचा शेवट होतो. अशा प्रकारे श्रीपतीच्या बलिदान यशस्वी झाले याची रुखरुख मात्र वाचकाच्या काळजात खोलवर राहते.
खरेच श्रीपतीचे बलिदान आवश्यक होते?श्रीपतीने आपल्या मुलावर थोडासा विश्वास ठेवून संयम राखला असता तर?श्रीपतीने आत्महत्या केली नसती तर?तर खरेच नाम्याचा नामदेवराव झाला असता?त्याच्या कुटुंबाला सुखाचे दिवस दिसले असते?नामा स्वार्थी आहे का?या प्रश्नांची उत्तरे संदिग्ध आहेत. नामाला चांगले दिवस आले म्हणून हायसे वाटून घ्यावे की श्रीपतीच्या असाह्य मृत्यूवर चरफडावे?श्रीपतीचे दुर्भाग्य म्हणावे की नामाचा भाग्योदय?
सदरची कादंबरी वाचताना डॉ. सदानंद देशमुख सरांची ‘बारोमास’कादंबरी आठवते. शेतकऱ्यांच्या व्यथाना कुणी वाली नाहीच. काळ बदलतो, सरकारे बदलतात पण काही सामाजिक प्रश्न वर्षोनवर्षी तिथंच राहतात हेच खरं.
वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात सदरची कादंबरी यशस्वी ठरते. अतिशय सुटसुटीत कथा आणि सुटसुटीत पात्रा भोवती कादंबरी फिरत राहते. श्रीपती, शेवाळे गुरुजी, एकनाथ अण्णा, आबा मास्तर, संभा नाना, अमर देशपांडे आणि नामा इतकीच महत्वाची पात्रे कादंबरी सहज सोपी न वाचनीय करण्यात मोलाची भूमिका बजावतात. कुठेही अवास्तव पाल्हाळ नाही की शृंगारिक वर्णनाचा बटबटीतपणा नाही हे कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
कादंबरीत दोन नायक दिसतात, पूर्वार्धात श्रीपती अन उत्तरार्धात नामदेव. दोन्हीही नायक आपल्या भूमिका यशस्वी पणे पार पाडण्यात यशस्वी झालेत असे म्हणले तर वावगे नाही. कुटुंबप्रमुख कुणीही असो, सामान्य कुटुंबप्रमुखाला आपल्या कुटुंबासाठी छोटा मोठा त्याग करावाच लागतो. श्रीपतीचे बलिदान सुद्धा कुटुंबाच्या सुखासाठी आहे. आणि नामदेवची राजकारणातील यशस्वी माघार हीही कुटुंबाच्या भल्यासाठीच आहे. मला वाटते कादंबरीचे यश इथंच आहे. कादंबरीतील दोन्ही नायिका सुद्धा आपापल्या जागी अगदी रास्त आहेत. दोघीही निरक्षर आहेत मात्र ‘माणूस’ म्हणून श्रेष्ठ आहेत. पूर्वार्धातील नायिका यशोदा आपल्या संसारासाठी काबाड कष्ट करते, आपल्या नवऱ्याच्या कठीण पेचप्रसंगात ढाल होते. नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते तसेच आपल्या मुलाबाळांवर देखील. अनु भोळीभाबडी जरूर आहे मात्र व्यवहारी आणि कर्तव्यदक्ष सुद्धा आहे. बरेचदा नवऱ्याकडे पैसे आल्यावर बायका बिथरतात. सासरच्यांना तांदळातील खड्याप्रमाणे बाजूला टाकून माहेरचे भले करतात. नवऱ्याचे कान भरून कुटुंबापासून तोडतात, पण अनु तशी नाही. अनु सासर-माहेर मध्ये समन्वय राखते आणि आपले कुटुंब एकसंध ठेवते म्हणूनच या कादंबरीत काही आदर्श देखील आहेत. समाजातील विशीष्ट लोकांचे ती प्रतिनिधित्व देखील करते.
एकनाथ अण्णा सारखे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी नामदेवसारख्या तरुणांची डोकी भडकवून त्यांचा वापर सोयीच्या राजकारणासाठी करतात. जेव्हा नामदेव नोकरी मागायला अण्णाकडे जातो तेव्हा ते हात झटकतात मात्र तेच अण्णा नामदेवच्या पाणी प्रश्नातील लढ्यात मात्र प्रोत्साहन देतात;नामाची वास्तव गरज काय आहे हे माहिती असूनही!
शेवाळे मास्तर सुद्धा एक हाडाचे शिक्षक आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत म्हणूनच प्रत्येकवेळी नामाच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून जातात आणि नामदेवच्या भल्यासाठी तत्पर राहतात. आपल्या आसपास शेवाळे मास्तरांसारखी माणसे आपण क्वचितच अनुभवतो. अमर देशपांडे सारखा एखादा भला मित्र मैत्रीत कोणत्याच स्तराचा आडपडदा न ठेवता सच्च्या दिलाने मित्राचे भले करतो, आपल्या मैत्रीला जागतो म्हणूनच नामाला सुखाचे दिवस दिसतात. नाहीतर कोण कुठला महाविद्यालयीन रूम पार्टनर मोठा झाल्यावर, प्रतिष्ठा मिळाल्यावर गरीब मित्राला ओळख दाखवतो?अमर आणि नामा यांचे मित्रप्रेम दुर्मिळच म्हणावे लागेल.
सावकार आबा मास्तर, संभा नाना, पोलीस पाटील आणि सरपंच गावखेड्यातील गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. यांच्या अंगातली रग उतरवयातच जिरते. तोवर अनेक कुटुंबांचे, गावाचे वाटोळं झालेलं असतं.
एकंदरीतच वाचकाला खिळवून ठेवणारी, अंतर्मुख करणारी ओघवत्या शैलीतील ही कादंबरी वाचकाने आवर्जून वाचावी अशीच वाचनीय, मनाचा वेध घेणारी आहे यात शंका नाही.
लेखकाच्या पुढील साहित्य कृतीस खूप खूप शुभेच्छा 💐
समीक्षक – सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈