मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बॅरिस्टर नाथ पै : लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” – संकल्पना – संजय रेंदाळकर ☆ परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “बॅरिस्टर नाथ पै : लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” – संकल्पना – संजय रेंदाळकर ☆ परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
संकल्पना – संजय रेंदाळकर,
संकलन – सुनील कोकणी, संकेत जाधव.
सृजन प्रकाशन, इचलकरंजी.
प्रथमावृत्ती – 1 मे 2022.
इचलकरंजी येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते संजय रेंदाळकर यांच्या संकल्पनेतून सुनील कोकणी आणि संकेत जाधव यांनी खास मुलांसाठी बॅ. नाथ पै यांचे विचार आणि जीवनप्रवास उलगडणारे पुस्तक संकलित केले आहे.
बॅ. नाथ पै यांना ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हटलं जातं. विरोधकांनाही मंत्रमुग्ध करणारे अलौकिक वक्तृत्व नाथांनी अंगभूत गुणांना प्रयत्नांची जोड देऊन कमावले होते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषणातील प्रमुख विचार या पुस्तकात संग्रहीत केलेले आहेत. नाथांचे देशभक्ती विषयक विचार, स्वातंत्र्य आणि लोकशाही बाबतची मते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कोकणावरील निस्सीम प्रेम, सीमाप्रश्नाबाबतची धडपड, विद्यार्थी व नागरीक यांना केलेले मार्गदर्शन, कलावंतांची केलेली कदर याविषयी त्यांचे विचार या पुस्तकात वाचायला मिळतात.
“स्वातंत्र्य आणि लोकशाही ही आमची प्राणप्रिय मूल्ये आहेत. या मूल्यांचे जतन करायचे आहे. स्वातंत्र्याची पावन गंगा हिंदुस्तानच्या गावागावात जाईल; आणि मगच आमचे स्वातंत्र्य अजिंक्य होईल, अमर होईल. लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. ती राजशक्तीपेक्षा प्रभावी असते. मतदार हेच राष्ट्राचे खरे पालक आणि संरक्षक आहेत. गीतेप्रमाणेच राज्यघटना हाही माझा पवित्र ग्रंथ आहे,” असे ते म्हणत.
साहित्यिक, कलावंत यांच्याबद्दल त्यांना विशेष अभिमान होता. लेखक, कलावंत हे फार थोर असतात. त्यांचे विश्व हे अविनाशी आहे, असे ते मानत. कोकणातील दशावतार या कलेबद्दल त्यांचे प्रेम हे या ठिकाणी अधोरेखित केले आहे.
‘घटनादुरुस्ती विधेयक’ हा बॅरिस्टर नाथ पै यांच्या संसदीय कार्यकर्तृत्वाचा कळस म्हटला जातो. या विधेयकासाठी नाथांनी आपल्या बुद्धिचातुर्य, अभ्यास आणि तेजस्वी वाणीने जे योगदान दिले त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिली आहे. बॅ. नाथ पै यांना पदोपदी सहकार्य करणारे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वासू देशपांडे सर यांनी नाथ आपणांस सोडून गेल्यानंतर त्यांना उद्देशून लिहिलेले पत्रही या पुस्तकात दिले आहे. नाथांना आपल्या सहका-यांविषयी असणारा जिव्हाळा, स्वतःपेक्षा देशसेवेसाठी झिजण्याची वृत्ती, कोकणावरील प्रेम याविषयी या पत्रात वाचायला मिळते.
“असिधारा व्रताने सेवादलाचे कार्य करूया ” हा नाथांचा संदेशही या पुस्तकात अधोरेखित केला आहे. यांच्याविषयीचे भाई वैद्य, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, जयानंद मठकर, बबन डिसोजा, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक विभूतींचे कौतुकोद्गार येथे संग्रहित केलेले आहेत.
बॅ. नाथ पै यांच्या जीवनप्रवासातील महत्त्चाच्या घटना तारीखवार देण्यात आल्या आहेत. नाथांच्या जीवनातील दुर्मिळ क्षणचित्रांचाही या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर कविवर्य मंगेश पाडगावकर यांची “ ज्यांची हृदये झाडांची ” ही कविता वाचायला मिळते.
या पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी पुण्यतिथी दिवशी बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
पुस्तक परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण
पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606
संपर्क – 9420738375
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈