मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” (बालकविता संग्रह) ☆ प्रा. सौ. सुमती पवार
प्रा. सौ. सुमती पवार
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” (बालकविता संग्रह) ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
पुस्तक – चांदणं (बालकविता संग्रह)
लेखक – प्रा. सौ. सुमती पवार
बालमित्रांनो, नमस्कार..
हो, मी सुमती पवार बोलते आहे. यापूर्वी दहा बालगीतं संग्रहातून आपण भेटलो आहोत. आता तुमच्यासाठी कवितेचं चमचमतं ‘चांदणं’ मी घेऊन आले आहे.
अहो, चांदणं कुणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडते. चांदणं आवडत नाही असा माणूस दुर्मिळच, हो ना? चांदणं, चंद्र आपल्याला खूप आनंद देतात, प्रसन्नता देतात. या चांदण्यावर मराठी कवितेत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. असा चांदण्यांचा म्हणजे आनंद देणार्या बालगीतांचा खजिना मी तुम्हाला अर्पण करते आहे. चांदण्यांचा आपण वेगवेगळ्या अंगांनी आनंद घेतो तसाच हा संग्रह तुम्हाला जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा परिचय करून देणार आहे. या ‘चांदणं’ संग्रहात अनेक विषयांच्या सुंदर सुंदर कविता देण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात देवबाप्पापासून निसर्गापर्यंत अनेक विषय आहेत. आपल्या मायमराठीचे महात्म्य आहे. भारतमातेचा अभिमान आहे.
“तव मातीमध्ये मम राख मिळो
पावन होईल जीवन आमुचे
अश्रू न कधी डोळ्यात तुझ्या
तुज दिवस दाखवू भाग्याचे”
अशी भूमिका आपली असली पाहिजे. असे मला वाटते. मित्रांनो, निसर्ग मला फार आवडतो. निसर्ग कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतो. निसर्गातील झाडं, पानं,फुले, फळे, पक्षी, तारे, वारे हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थ नाही. म्हणूनच निसर्गातील विविध विषयांवर तुम्हाला कविता दिसतील, आवडतील. तुम्हालाही निसर्गात रमायला, सहलीला जायला आवडते, हे मला माहीत आहे. मला तर झाडे म्हणजे ‘यक्ष’च वाटतात. आदर्श गाव कसं असावं, तेही मी तुम्हाला सांगितले आहे. झाडांनी नटलेला हिरवागार, प्राण्या-पक्ष्यांनी नटलेला गाव कुणाला आवडणार नाही? पक्षी झाडांवर सुंदर घरटी बांधतात. सुगरण झुलता बंगला बांधते, हो ना? पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार पाचूचे रान असते. त्या हिरव्यागार गवतावरून चालताना मला स्वर्गात चालल्याचा भास होतो. भोवताली सारा निसर्ग, पाने, फुले हात जोडून, झाडे तुमचे स्वागत करत असतात, स्वर्ग याहून काय वेगळा असतो? पाणी, दातृत्व, आई ,तुम्हाला पडलेले अनेक प्रश्न मी यात मांडलेले आहेत . तुमच्या सोबत मी ही लहान होते नि मला माझे बालपण स्मरते.
मग मी थेट भूतकाळात, बालपणात तुम्हालाही घेऊन जाते.या पुस्तकात पपई आहे तसेच पुस्तकही आहे. फळं खाल्ली पाहिलेत प्रकृतीसाठी आणि पुस्तकं वाचली पाहिजेत ज्ञानासाठी! निसर्गात नेहमी आनंद सोहळा चालू असतो. तो अनुभवायला, डोळसपणे बघायला आपण शिकलं पाहिजे. संध्याकाळी, सकाळी क्षितिजावर रोज रंग सोहळा असतो तो आपण बघितला पाहिजे, ते” कोण’ या कवितेतून मी सांगितले आहे. ‘जरा एकदा’ घाटातून फेरफटका मारायला तुम्ही जावे, असे ही मला वाटते.
इथे फुलपाखरे आहेत, नजारे आहेत. मोट आहे, आजीचं विद्यापीठही आहे. दिवाळीपासून होळीपर्यंत सर्व आनंद देणारे विषय, या पुस्तकात तुम्हाला मिळतील व खूप खूप आनंद देतील, असे मला वाटते.
तर मित्रांनो, अशा विविध विषयांनी नटलेल्या ‘चांदणं’ या संग्रहाचं तुम्ही खूप खूप स्वागत कराल, अशी मला अपेक्षा आहे.
© प्रा. सौ. सुमती पवार ,नाशिक
दि: १६/१२/२०२०
मो ९७६३६०५६४२
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈