मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “पैशाचे मानसशास्त्र” – लेखक – बॉब प्रॉक्टर – अनुवाद : श्री प्रसाद ढापरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पैशाचे मानसशास्त्र” – लेखक – बॉब प्रॉक्टर – अनुवाद : श्री प्रसाद ढापरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : पैशाचे मानसशास्त्र 

लेखक : बॉब प्रॉक्टर

अनुवाद : प्रसाद ढापरे

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस

पृष्ठ: २२७

मूल्य : २६०₹ 

जे लोक नफा आणि तोटा याच्या पलीकडे जाऊन स्वतःमधील प्रेरणा आणि कल ओळखून त्याप्रमाणे जीवन जगतात, ते स्वतः यशस्वी होतातच आणि इतरांनाही प्रेरणा देतात यावर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकात,

* जगभरातील अतिश्रीमंत आणि यशस्वी लोकांना समजलेली रहस्ये

* जीवनामध्ये समृद्धी आणण्याच्या, टिकवण्याच्या सोप्या आणि प्रभावी संकल्पना

* पैशाबद्दल चुकीच्या धारणा

* पैसा आकर्षित करण्याचे प्राचीन ज्ञान

* तुमच्या मानसिकतेचा समृद्धीवर होणारा परिणाम 

* सकारात्मक विचारसरणीच्या साहाय्याने समृद्धीच्या मार्गावर वाटचाल कशी करावी

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “अविनाशी बीज” – लेखक – डॉ. भास्कर कांबळे – अनुवाद : डॉ. श्रीराम चौथाईवाले / श्री आनंद विधाते ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अविनाशी बीज” – लेखक – डॉ. भास्कर कांबळे – अनुवाद : डॉ. श्रीराम चौथाईवाले / श्री आनंद विधाते ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  अविनाशी बीज 

… भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास 

मूळ इंग्रजी पुस्तक : The Imperishable Seed

लेखक : डॉ. भास्कर कांबळे

अनुवादक : डॉ. श्रीराम चौथाईवाले : श्री आनंद विधाते

पृष्ठ:२७८ 

मूल्य: ६००₹ 

प्राचीन काळापासून भारत हा उच्च मानवी मूल्यांचा देश आणि मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानपरंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ ही केवळ मानव जातीचाच विचार करीत नाही, तर ती चराचर सृष्टीचा, इतर प्राणीमात्र, सजीव, निर्जीवांचाही विचार करणारी आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार, व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्माचा विचार करणारी ही ज्ञानपरंपरा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांचा विचार मांडणारी सर्वांत प्राचीनतम ज्ञान परंपरा आहे. कोणत्याही परकीय संस्कृतीला हीन न लेखता, कोणत्याही संस्कृतीवर, प्रदेशावर आक्रमण न करता, कुणाच्याही श्रद्धेवर घाला न घालता, आस्तिक आणि नास्तिकाचाही (चार्वाक) विचार तितक्याच आदराने करणारी संस्कृती म्हणून, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहावे लागेल. ज्ञान-विज्ञान-आरोग्यशास्त्र, ललितकला, शिल्पकला, व्यवस्थापनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, तत्वज्ञान, अध्यात्म, अर्थशास्त्र, साहित्य अशा कितीतरी क्षेत्रांत स्वामित्वाच्या पलीकडे विचार करीत, विश्वकल्याणासाठी भारताने संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञानाची निर्मिती केली आहे.

या समृद्ध ज्ञान परंपरेतून प्रसवलेल्या प्रत्येक विषयाचा संशोधनात्मक अभ्यास होणे अतिशय महत्वाचे असून ते एक जगव्याल कामही आहे. प्रस्तुत पुस्तकात ‘गणित’ हा विषय केंद्रीभूत ठेवत त्याच्या विविध शाखांतून झालेली ज्ञान निर्मिती तसेच सिद्धता पद्धती, त्यांचा दैनंदिन जीवनात वापर अश्या अनेक अंगांचा तपशीलवार अभ्यास भारतीय ग्रंथ तसेच पाश्चात्य दस्तावेजीकृत संदर्भांसह विस्तृतपणे मांडला आहे. यातही प्रामुख्याने कॅल्क्युलस, खगोलशास्त्र या सारख्या आधुनिक ज्ञान शाखांची रुजुवात कशी झाली आणि तिचा भारतातून अरबदेश, युरोप असा झालेला विश्वसंचार कसा झाला याचा रंजक आणि सप्रमाण इतिहासही भूतकाळाचे अवास्तव स्तोम न माजवता ससंदर्भ मांडण्यात आला आहे.

इतका विश्वसंचार आणि वापर असूनही भारतीय गणित मुख्य प्रवाहातील इतिहासात मोठ्या प्रमाणात अनुल्लेखनीय राहिले आहे.

भारतीय गणिताविषयी हे सार्वत्रिक अज्ञान का असावे? 

तत्कालीन समृद्ध असलेली ही ज्ञानपरंपरा अचानक खंडित कशी झाली? 

अश्या अनेक प्रश्नाची धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अंगाने ससंदर्भ उत्तरे शोधताना हरवत गेलेल्या आत्मप्रेरणेचाही उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

हे ज्ञान कसे निर्माण झाले आणि उर्वरित जगात कसे प्रसारित झाले हे दाखवण्यासाठी भास्कर कांबळे यांनी ‘द इम्पेरिशेबल सीड’ मध्ये ठोस पुरावे गोळा केले आहेत.

गणिताचे विद्यार्थी हे ‘पास्कलचा त्रिकोण’, ‘फिबोनाची अनुक्रम’, ‘रोलचा प्रमेय’ आणि ‘टेलर मालिका’ शिकत असतात. परंतु त्यांना हे समजत नाही की या संकल्पना त्यांच्या युरोपमधील तथाकथित शोधांपेक्षा खूप आधी पिंगल, हेमचंद्र, भास्कर आणि माधव यांसारख्या भारतीय गणितज्ञांनी स्पष्ट केल्या होत्या. आजच्या गणिताची अनेक क्षेत्रे-संख्यांचे दशांश प्रतिनिधित्व आणि साध्या अंकगणितापासून ते बीजगणित, त्रिकोणमिती आणि अगदी गणितापर्यंत-हिंदू गणितज्ञांनी विकसित केली होती किंवा त्यांची उत्पत्ती त्यांच्या कार्यामुळे झाली होती. केवळ गणितातच नव्हे तर खगोलशास्त्र आणि भाषाशास्त्र यासारख्या क्षेत्रांमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या योगदानाची आणि हे योगदान आजही संगणक विज्ञानासारख्या क्षेत्रात कसे लागू होते यावर त्यांनी चर्चा केली आहे.

अखेरीस, भारतातील हिंदू गणिताची परंपरा का आणि कशी संपुष्टात आली आणि आज बहुतेक लोकांना तिच्या इतिहासाबद्दल का माहिती नाही याचा शोध ते घेतात.

‘गणित’ हा एक विषय समोर ठेवत त्याची उत्पत्ती, विस्तार आणि वापर, विश्वसंचार आणि खंड पडलेली संशोधन परंपरा असे दस्तावेजीकृत ससंदर्भ माहिती एकत्र संकलित स्वरुपात प्रथमच या पुस्तकाद्वारे उपलब्ध केली जात आहे.

गेल्या काही वर्षात जगाला भारत जाणून घेण्याची एक विशेष उत्सुकता आहे असे दिसून येत आहे. पण जगाला भारत समजून घ्यायचा असेल तर आधी तो भारतीयांना समजावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि तोही स्व-बुद्धीने जाणून घ्यायला हवा. या दृष्टीने पुस्तकाची आखणी केली असून सर्वसामान्यांसाठीही सुबोध स्वरूपात आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमासही हे पुस्तक पूरक-संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.

भारतीय ज्ञान-परंपरेतून प्रसवलेल्या अनेक जीवनोपयोगी विषयांपैकी गणित, त्याच्या विविध उपशाखा भारताच्या कानाकोपऱ्यातून विकसित होत गेल्या आणि वापरात आल्या.

– – अंकगणितातील दशमान पद्धत, शून्य आणि ऋण संख्यांचा शोध आणि वापर

– – बीजगणित आणि भूमितीतील अनेक संकल्पना आणि सूत्रे 

– – संयोजन शास्त्रातील शोध आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर 

– – साहित्य निर्मिती आणि प्रसारास लागणारी भाषाविज्ञान आणि छंदशास्त्रातील नियमावली 

– – खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना, प्रयोगातील उपकरणे, ग्रह-गती-विज्ञान आणि यातून हजारो वर्षे वापरात असलेली अचूक कालगणना 

– – प्राचीन गणिताचे स्वरूप अधिकच विस्तारत आधुनिक गणिताचा गाभा असलेल्या कॅल्क्युलस संकल्पनांची गुरुवायूर मंदिराशी निगडित असलेल्या माधव आणि त्यांच्या शिष्य परंपरेतून झालेली रुजुवात आणि विकास 

– – अनेक गणितीय शोधांचे आधुनिक गणिताशी तुलना

– – प्राचीन भारतीय विज्ञानातील शोध-सिद्धता पद्दती 

– – प्रसिद्ध गणितज्ञ् आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कर – I, II आणि माधव यांचे संशोधन 

– – ख्यातनाम पाश्चात्य गणिती इतिहासकारांच्या नजरेतून भारतीय आणि समकालीन पाश्चात्य गणिताचे गुण – दोष विवेचन 

… असे अनेक विषय ससंदर्भ तसेच एकत्र संकलित स्वरुपात मांडणी असलेला सर्वसामान्यांसाठीही सुबोध वाटावा असा ग्रंथ !

– – – –

प्रतिक्रिया – – – 

“डॉ. भास्कर कांबळे यांनी प्राचीन भारतीय गणिताची केवळ तथ्यपूर्ण माहिती एकत्र केली आहे असे नव्हे, तर भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतून ते नैसर्गिकरित्या कसे प्रसवले, याचेही विश्लेषण या पुस्तकातून केले आहे. असे परस्पर-संबंध समजून घेतल्याने आपल्याला भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा ठरविण्यास नक्कीच मदत होईल. ” 

पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक (निवृत्त), आय. आय. टी. कानपूर,

लेखक – ‘कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स’ 

“व्यापक, तरीही ह्या विषयातील तज्ञ नसणाऱ्यांसाठीही उपयुक्त.

श्री राजीव मल्होत्रा

लेखक आणि संस्थापक – इन्फिनिटी फाउंडेशन

“… नवीन दृष्टीकोन आणि अंतर्दृष्टी प्रदान करणारा भारतीय गणित साहित्यावरचा एक स्वागतार्ह ग्रंथ. “

एम. एस. श्रीराम माजी प्राध्यापक

(मद्रास विद्यापीठ),

भारतीय खगोलशास्त्र आणि गणितावरील पुस्तकांचे लेखक

“भारतीय परंपरेबद्दल सखोल समानुभूती आणि अभिमान बाळगून सु-संशोधन आणि सु-लिखित… पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी एक ग्रंथ”.

पद्मभूषण प्रा. व्ही. एस. राममूर्ती, अणुशास्त्रज्ञ 

आणि

प्रा. दिनेश कुमार श्रीवास्तव, प्राध्यापक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू

“भारतीय ज्ञानपरंपरेच्या शाखांमध्ये गणिताच्या मूलभूत तत्त्वांचे दस्तऐवजीकरण करून, गणिताच्या इतिहासाच्या निर्वसाहतीकरणाचे एक विद्वत्तापूर्ण कार्य. ” 

संक्रांत सानू

लेखक –  ‘द इंग्लिश मीडियम मिथ’

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “नेक्सस” – लेखक : युवाल नोआ हरारी — अनुवाद : श्री प्रणव सखदेव – परिचय : डॉ. सतीश श्रीवास्तव ☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆

श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नेक्सस” – लेखक : युवाल नोआ हरारी — अनुवाद : श्री प्रणव सखदेव – परिचय : डॉ. सतीश श्रीवास्तव ☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆ 

पुस्तक : नेक्सस

(‘नेक्सस: अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत… माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास ‘) 

लेखक : युवाल नोआ हरारी

अनुवाद: श्री प्रणव सखदेव 

पृष्ठे : ४६४

मूल्य : ५००₹ 

‘होमो सेपियन’ आणि ‘होमो डियस’ या जगप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आणि इतिहासकार युवाल नोआह हरारी यांचे ‘नेक्सस: ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क फ्रॉम द स्टोन एज टू एआय’ हे पुस्तक सध्या गाजते आहे. या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) मानव जातीसमोर उभ्या केलेल्या धोक्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. हा धोका कशा स्वरूपाचा आणि किती व्यापक आहे याची तपशीलवार चिकित्सा ‘नेक्सस’ मध्ये हरारी यांनी केली आहे. इतिहासातील आणि आधुनिक काळातील असंख्य उदाहरणे, संदर्भ आणि पुरावे देत मानवी अस्तित्वाचा भविष्यातील धोका ओळखणारे ‘नेक्सस’ हे पुस्तक आहे. ‘एआय’मुळे मानवी अस्तित्वाच्या खुणा पुसल्या जाऊ शकतात, हा केवळ कल्पनाविलास नव्हे. मानवी जीवनाला कशा प्रकारे धोका पोहोचू शकतो यासंबंधीची ही विज्ञानावर आधारित मीमांसा आहे. २०२३ मध्ये अमेरिका, ब्रिटन, चीनसह ३० देशांच्या सरकारांनी ब्लेकली घोषणापत्रात ‘एआय’ मुळे जाणता अजाणता महाभयंकर धोका उद्भवू शकतो हे मान्य केले आहे. हरारी यांच्या मते सोव्हिएत रशिया आणि त्याची अंकित राष्ट्रे व अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्रे यांच्यामध्ये शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे पोलादी पडदा (आयर्न कर्टन) होता त्याचप्रमाणे जगातील राष्ट्रांमध्ये नजीकच्या भविष्यकाळात सिलिकॉन पडदा (सिलिकॉन कर्टन) निर्माण होऊ शकतो. ‘एआय’च्या संशोधनातून अशी स्वयंचलित डिजिटल शस्त्रे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे जगाचा विध्वंस होऊ शकतो.

मानवी इतिहासात प्रथमच माणसाकडे असणारी सत्ता ‘एआय’ कडे हस्तांतरित झालेली आहे. कारण ‘एआय’आधारित स्वयंप्रज्ञा स्वत:च निर्णय घेऊ शकते. कॉम्प्युटर अल्गोरिदम जर माणसांसाठी निर्णय घेत असेल तर ती निश्चितच धोकादायक गोष्ट आहे असे हरारी म्हणतात. त्यातच, अनेक देशांमध्ये लोकानुरंजन करणाऱ्या नेत्यांचा उदय झालेला आहे. अशा नेत्यांच्या बाबतीत वस्तुनिष्ठ तथ्य किंवा सत्य असे काही नसते, तर ते जे सांगतील तेच सत्य असते. त्यांच्या दृष्टीने सत्ता हेच सत्य (पॉवर इज रिअॅलिटी) असते. लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याऐवजी लोकानुरंजनातून सर्वशक्तिमान होण्याच्या प्रयत्नात वाढ झालेली आहे असे हरारी नमूद करतात. सत्ता मिळविण्यासाठी जेव्हा माहितीचा उपयोग केला जातो तेव्हा सत्य किंवा तथ्य भ्रमित करणारे असते. ‘सत्य’ म्हणवला जाणारा मजकूर हे ‘नेमके कुणाच्या बाजूचे सत्य’ आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो हे स्पष्ट करून हरारी असा निष्कर्ष काढतात की दोन विचारधारांमधील संघर्ष हा प्रामुख्याने दोन माहितीजालांचा संघर्ष असतो. ‘होमो सेपियन’ याचा अर्थ ‘शहाणा माणूस’ असा होतो. परंतु या अभिधानास माणूस खरोखरच पात्र आहे काय असा सवाल हरारी विचारतात. गेल्या एक लाख वर्षाच्या इतिहासात माणसाने अनेक शोध लावले आणि इतर कुठल्याही प्रजातीपेक्षा श्रेष्ठ अशी ज्ञानात्मक सत्ता प्राप्त केली. स्पर्धा, युद्धे आंतरराष्ट्रीय तणाव, पर्यावरणाची हानी, सत्तालालसेतून निर्माण होणारी एकाधिकारशाही, मानवी अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण करणारे तंत्रज्ञान असे अनेक प्रश्न जर निर्माण होत असतील तर माणूस शहाणा आणि ज्ञानी कसा म्हणता येईल. ‘नाझीवाद’ आणि ‘स्टॅलिनवाद’ अशी अलीकडची मानवी मूर्खपणाची उदाहरणे हरारी नमूद करतात. ग्रीक व रोमन साम्राज्यापासून अलीकडच्या काळातील निरंकुश सत्तेची अनेक उदाहरणे व दाखले देत हरारी हे स्पष्ट करतात की सत्ताकांक्षा असणारे लोक तंत्रज्ञानाला गुलाम बनून सर्वंकष सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. स्वाभाविकच यात मानवी मूल्यांची (स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची) आहुती पडते. वस्तूचा ब्रँड ज्याप्रमाणे तयार केला जातो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचाही ब्रँड माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञांकडून तयार केला जातो. समाजमाध्यमातील त्या व्यक्तीचे किंवा ब्रँडचे अनुयायी त्या ब्रँडच्या इमेजशी स्वत:ला जोडतात. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो हे हरारी स्पष्ट करतात. एक म्हणजे माहितीचा उपयोग करून सत्य जाणून घेणे. उदाहरणार्थ आरोग्य, औषधे, हवामान, अणु, रेणू इत्यादींची माहिती मिळविण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी खोटी कथानके (फेक नॅरेटिव्ह) गोष्टी निर्माण करण्यासाठी!

‘नेक्सस’ च्या पाचव्या प्रकरणात लोकशाही आणि एकतंत्री राजवट याचे मूलगामी विवेचन करताना, दोन्ही राज्यपद्धतीमध्ये माहितीची वाहतूक कशी परस्परविरोधी असते याचा मागोवा हरारी घेतात. सत्ताधाऱ्यांकडची माहितीच निरंकुश आणि सर्वश्रेष्ठ अशी धारणा हुकूमशाहीत असल्याने, दुरुस्त करण्याची यंत्रणा हुकूमशाहीत नसते. याउलट लोकशाहीमध्ये माहितीचे वितरण करणारी आणि ती दुरुस्त करणारी यंत्रणा आपसूकच कार्यरत असते; कारण सरकारांशिवाय माहितीचे इतर अनेक स्राोत उपलब्ध असतात उदाहरणार्थ संसद किंवा सिनेटसारखी प्रतिनिधी गृहे, राजकीय पक्ष, न्यायालय, वृत्तपत्रे, सेवाभावी संस्था, दबावगट इत्यादी. त्यामुळे लोकशाहीत लोक स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. ही स्वायत्तता हे लोकशाहीचे मूल्य आहे. त्यात हस्तक्षेप केल्यास लोकशाहीचा आत्माच हरवतो आणि असे झाल्यास अनियंत्रित सत्ता अस्तित्वात येण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ‘माहितीचे नियंत्रण करणारी आणि आपसूक दुरुस्तीची यंत्रणा नसणारी राज्य पद्धती म्हणजे हुकूमशाही’ अशी हुकूमशाहीची हरारी व्याख्या करतात. निवडणुका हा लोकशाहीचा एकमेव निकष नव्हे. जगातील अनेक हुकूमशहा लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत येतात, याची आठवण देऊन तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचे एक वाक्य हरारी उद्धृत करतात- ‘‘लोकशाही ही एखाद्या ट्रामसारखी आहे. तुमचं इच्छित स्थळ आल्यावर त्यातून तुम्हाला उतरायचं असतं. ’’

अश्मयुगात मानवांच्या टोळ्यांमध्ये माहितीचे चलनवलन सहज शक्य होते. शंभर ते हजारपर्यंत या टोळीमध्ये लोक असत. पंधराव्या शतकात छपाई तंत्रज्ञान आले आणि सोळाव्या शतकात वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. युरोप व अमेरिकेत लोकांची मते, इच्छा, अपेक्षा, विरोध निर्माण करण्याचे माध्यम निर्माण झाले. अर्थात तुलनेने वृत्तपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण त्या काळात कमी होते. मध्ययुगीन कालखंडात राजांच्या हाती निरंकुश सत्ता असली तरी लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. राजाचे प्रशासन ही कालापव्यय करणारी बाब होती. तसेच लोकांच्या प्रतिक्रिया राजापर्यंत पोहोचण्यासही बराच कालावधी लागत असे. प्रशासन करणे हे कठीण काम होते, यामुळे कर आणि सैन्य यावर त्या काळात अधिक लक्ष केंद्रित केले जात असे.

माहिती तंत्रज्ञानाची प्रेरक शक्ती संगणक आहे. मात्र संगणकीय प्रगतीच्या ‘एआय’ टप्प्यावर, स्वत: निर्णय घेतो आणि नवीन संकल्पनांची निर्मिती करणे या दोन महत्त्वाच्या मानवी शक्ती माणसाकडून ‘एआय’कडे गेल्या आहेत. गैरसमज पसरविणारे अल्गोरिदम यातून निर्माण झाले. यासाठी ते म्यानमार मधील फेसबुकवरील खोट्या बातम्यांचा दाखला देतात. सर्वाधिक चर्चा असणारी आणि बघितली जाणारी बातमी अल्गोरिदममुळे वारंवार बघण्यासाठी सुचविली जाते. यूट्यूब आणि गूगलचा वापर करताना हे नेहमी अनुभवास येते. म्हणजे काय बघायचे हे लोक नव्हे तर अल्गोरिदम ठरवते. समाजमाध्यमाचा वापरकर्त्यांनी अधिकाधिक काळ वापर केल्यास त्यांच्याबाबत अधिक माहिती गोळा करता येणे शक्य होते. या दृष्टीने लोकांना अधिकाधिक गुंतवून ठेवणारे अल्गोरिदम तयार केले जातात..

सर्व वित्तीय व्यवहारांचे अलीकडच्या काळात संगणकीकरण झालेले आहे. सर्व वित्तीय साधने डिजिटल झालेली आहेत. करांचे रिटर्न्स भरणे, तपासणे, कर भरणा हे सर्व संगणकाद्वारे होत आहे. त्रुटी असल्यास संगणकच निर्णय घेतो, म्हणजेच माणसांकडून माणसांकडे माहितीचे प्रसारण न होता ते संगणक ते संगणक असे होत आहे. माणसांच्या साखळीत २४ तास काम करणारा संगणक आता जोडला गेल्याने, माणसाच्या प्रत्येक व्यवहारावर आणि हालचालीवर लक्ष ठेवून माहिती गोळा करणेही संगणकाला शक्य झालेले आहे. माणसांवर नियंत्रण ठेवण्याचे अमर्याद अधिकार माणसाच्या नकळत संगणकाकडे जात आहेत.

महत्त्वाच्या सर्व विषयांवर मुक्त सार्वजनिक संवाद आणि त्यातून सहमती ही लोकतांत्रिक व्यवस्था आहे. परंतु सार्वजनिक हिताच्या चर्चेत आता मानवी नसलेल्या संसाधनाचा प्रवेश झालेला आहे. समाजमाध्यमांत ‘चॅट जीपीटी’चा कोलाहल वाढला आहे. २०१६ च्या अमेरिकेतील निवडणुकीत वीस दशलक्ष ट्विटस चॅट बॉटने निर्माण केलेले होते. अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी अशी चर्चा होत असताना बहुसंख्य मते जर संगणकाद्वारे तयार होत असतील तर याचा परिणाम किती घातक होऊ शकतो याची कल्पना केलेली बरी. माणसा-माणसांच्या संवादाशिवाय आता ‘एआय’ संचलित यंत्राचाही सार्वजनिक क्षेत्रात आवाज असेल. ट्विटरवरील ‘बॉट’निर्मित रेडिमेड भाष्ये हे त्याचे उदाहरण आहे. यातून डिजिटल अराजक (डिजिटल अॅनार्की) निर्माण होऊ शकते. व्यक्तीची मते ‘एआय’बदलू शकतो. भरकटवणारी माहिती, खोट्या बातम्या यातून लोकशाही पद्धती धोकादायक वळणावर उभी आहे असे हरारींना वाटते. तर्क, विवेक, न्याय दूर सारून जर विद्वेष, खोटी माहिती पसरत असेल तर लोकशाहीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यातून हरारी असा निष्कर्ष काढतात की जर लोकशाहीचा पराभव झाल्यास त्यास तंत्रज्ञान नव्हे, तर तंत्रज्ञान वापरणारा माणूस जबाबदार असेल.

‘एआय’च्या अमर्याद शक्यतांमुळेच ‘एआय’-संशोधनात जागतिक स्पर्धा सुरू आहे. जगावर अधिराज्य गाजवण्याच्या या स्पर्धेत अनेक राष्ट्रे सामील झालेली आहेत. अल्गोरिदम म्हणजे संगणकाकडून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी वापरण्यात येणारे क्रमबद्ध सूचनाक्रम. यासाठी विदा प्रचंड प्रमाणात लागते. ज्याच्याजवळ सर्वाधिक विदासाठा ते राष्ट्र जगावर प्रभुत्व गाजविणारे राहील, हे बहुतेक सर्व राष्ट्रांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे विदा वसाहतवादाला (डेटा कलोनिअॅलिझम) सुरुवात होऊ शकते. ‘एआय’वर आधारित अॅप्स तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात विदा आवश्यक असते. यामुळे विदा ‘चोरणाऱ्या’ समाजमाध्यमांवर अनेक देशांत बंदी घालण्यात आली आहे.

माणसांशी संबंधित प्रचंड विदा कॉम्प्युटर गोळा करेल. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीचा कलही स्पष्ट करेल. परंतु तरीही कॉम्प्युटरला जग अचूकपणे कळेलच असे नाही. कारण माहिती म्हणजे सत्य नव्हे. (इन्फॉर्मेशन इज नॉट ट्रुथ) जी माहिती जमा होईल त्यातून एका नव्या जगाची निर्मिती होईल. आणि हे आभासी जगच माणसांवर लादण्याचा प्रयत्न होत राहील, ही हरारी यांची खरी चिंता आहे.

डिजिटलवर आधारित नोकरशाही (डिजिटल ब्यूरोक्रसी) ही आत्तापर्यंतची सर्वात शक्तिशाली आणि निर्दय नोकरशाही असेल, असे हरारी मानतात. माहिती तंत्रज्ञानातील प्रगती ही शहाणपणाकडे कमी आणि मूर्खपणाकडे अधिक जात असल्याची असंख्य उदाहरणे हरारी देतात. दोष माणसांचा नसून माहिती तंत्रज्ञानाचा आहे. दुष्काळ, साथीचे रोग, भूकंप यासारख्या आपत्तीच्या वेळी सत्तेचे केंद्रीकरण एक वेळ समजू शकते. परंतु माहितीच्या सत्तेचे केंद्रीकरण झाल्यास माणसाने स्वत: निर्माण केलेले हे मायाजाल माणसालाच भस्म करू शकते, याचा धोका जगाने आत्ताच ओळखला पाहिजे, असे हरारी कळकळीने सांगतात.

लोकप्रियता आणि चमत्कृतीजन्य कल्पनाविलास यांच्या पलीकडे जाऊन ‘एआय’चे नियंत्रण करण्याचे संघटित प्रयत्न जगातील सर्व देशांनी करणे आवश्यक आहे, हाच हे पुस्तक लिहिण्याचा प्रधान हेतू आहे असे प्रतिपादन हरारी करतात.

इतिहासात केवळ भूतकाळातील घटनांचा अभ्यास नसतो, तर या घटकांच्या बदलांचाही अभ्यास असतो. अश्मयुग ते आजचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असा हरारी यांच्या अभ्यासाचा व संशोधनाचा विस्तृत पैस आहे. विकासाच्या बदलांचे परिणाम मानवी समाजावर कसे झाले आणि त्यातून प्रगतीचे क्षेत्र मानवाने कसे पादाक्रांत केले याचा तपशीलवार आढावा संशोधनात्मक पद्धतीने हरारी यांनी घेतलेला आहे. ज्या कबुतराच्या संदेशामुळे पहिल्या महायुद्धात सैनिकांचे प्राण वाचले होते त्या शेर अॅमी या कबुतराचे प्रतीकात्मक चित्र पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. हरारी यांची भाषा अतिशय प्रभावी, ओघवती व पकड घेणारी आहे, हादेखील या पुस्तकाचा विशेष आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘न भूतो न भविष्यति’ असा धोका जेव्हा हरारी अधोरेखित करतात तेव्हा जगातील सबंध मानवी जातीच्या शहाणपणाची कसोटी पाहणारा हा काळ आहे असे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते.

परिचय : डॉ. सतीश श्रीवास्तव

प्रस्तुती : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “संसार – देवाच्या भूमीत प्रवेश” – लेखक – श्री सक्षम गर्ग – अनुवाद : डाॅ. अंबरीश खरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “संसार – देवाच्या भूमीत प्रवेश” – लेखक – श्री सक्षम गर्ग – अनुवाद : डाॅ. अंबरीश खरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : संसार – देवाच्या भूमीत प्रवेश

लेखक – श्री सक्षम गर्ग

अनुवाद – डाॅ. अंबरीश खरे

मूल्य – ३७५₹ 

तुम्हाला पुढे जे दिसतेय, ते दुसरे काही नसून पौराणिक कथांमधील वन्यास नावाच्या नगराचा शोध घ्यायला मदत करणारा नकाशा आहे. पण त्यााची मदत तुम्हाला या खोऱ्याच्या गुपिताचे रक्षण करणाऱ्या नंदन नावाच्या वृक्षाजवळ पोहोचेपर्यंतच होईल. तिथे पोहोचल्यावर मात्र पुढचा मार्ग तुमचा तुम्हालाच शोधायचा आहे.

कदाचित तुम्ही यापूर्वी वन्यासाविषयी ऐकले असेल. किंवा हे नेमके काय प्रकरण आहे, याची तुम्हाला उत्सुकता वाटत असेल. जर तुम्ही कधी हे नाव ऐकले असेलच तर ही नगरी काल्पनिक असावी, असेच तुम्हाला वाटले असणार. पण मी तुम्हाला खात्री करून देतो, की वन्यासनगरी आहे. प्रबुद्ध जीवांसाठीच खुली असणाऱ्या या नगरीत आजही अनेक जण पुष्कळ वर्षे किंवा अख्खे आयुष्य ध्यानधारणा करण्यात व्यतीत करीत आहेत.

विविध संस्कृतींमध्ये वन्यासाला वेगवेगळी नावे आहेत. ज्ञानगंज, शंभाला, स्वाकीपुर, किंवा शांग्रिला. हिमालय पर्वतरांगांमधील खोऱ्यात, पृथ्वीच्या जणू छपरावर असलेल्या एका खोऱ्यात ही नगरी आहे. तिथे जाणे पूर्णपणे अशक्यच. पण दर दहा वर्षांनी, स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीय उपखंडातील मैदानी प्रदेशांमध्ये राहणाऱ्या दहा जीवांसाठी ही नगरी आपली दारे उघडते. त्यांनी खोऱ्यात प्रवेश केल्यावर तिथल्या पद्धतीने सर्व शिक्षण घेणे, पवित्र ज्ञान मिळविणे आणि एका वर्षात स्वतःला शेवटच्या प्रवासासाठी, म्हणजे महायात्रेसाठी, सज्ज करणे अपेक्षित असते. खोऱ्यात राहणाऱ्या अमर लोकांसारखे बनून त्याच्यासह उर्वरित आयुष्य घालवायचे असेल, तर त्यांना ही महायात्रा यशस्वीरीतीने पूर्ण करावी लागते.

अमन हा एक असाच जीव आहे. त्यााला त्याच्या आयुष्यात फार थोडे निर्णय मनाप्रमाणे घेता आले. पण अखेरीस मात्र त्याने ज्यामुळे राष्ट्राचे भवितव्य ठरेल, असा मोठा निर्णय घेतला. ही त्याची कथा आहे.

हिमालयातल्या एका गुप्त प्रदेशात घडणारे हे कथानक. ही वन्यासा नगरी आहे तरी काय ? ही काल्पनिक आहे की वास्तविक? तिथे अनेक जीव आयुष्यभर ध्यान धारणा करत असतात. अलौकिक असा हा प्रदेश आहे. एका रोमांचक आणि अद्भुत प्रवासाचे साक्षीदार व्हा.

या पुस्तकावरचे काही जाणकारांचे अभिप्राय – – 

“पुढची अनेक वर्षे हे पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून अद्भुतरम्य भारतीय कथा कशा लिहाव्या, हे ठरविले जाईल. ” 

– अक्षत गुप्ता, लेखक

“संसार हे एक नवे आणि अप्रतिम पुस्तक असून त्यात भव्य घटना आणि अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहेत. शेवटी हे भारताने हॅरी पॉटरला दिलेले उत्तर आहे. “

– कृष्ण उदयशंकर, लेखक

“संसार तुम्हाला एका अप्रतिम सफरीवर नेते, हिंदू विचारांनी प्रेरित झालेली ही कथा जादू, दैवतशास्त्र आणि गूढवाद यांचे एक उत्तम मिश्रण आहे. त्यात उत्तम रीतीने कथन केलेले कथानक आणि मनाची पकड घेणारा वेग आहे. पदार्पण करणाऱ्या या नव्या दमाच्या लेखकाची प्रतिभा कादंबरीच्या प्रत्येक पानावर दिसून येते. “

– हरीश भट, लेखक,

मार्केटर, स्तंभलेखक आणि ब्रँड कस्टोडियन, टाटा सन्स

“अतिशय खिळवून ठेवणाऱ्या नव्या विश्वाची निर्मिती, कल्पनेची सर्वोत्तम भरारी, “

– आनंद नीलकंठन, लेखक

“संसार ही अद्वितीय आणि मनोरंजक कथा आपल्याला हिमालयातील गुप्त प्रदेशात नेते, जिथे पर्वत आणि दैवतशास्त्र एकमेकांना भेटतात. सक्षम गर्गकडे खिळवून ठेवणारी गोष्ट आहे आणि तो एक रोमांचक आणि विचारप्रवर्तक कथानक उभे करतो.

– स्टीफन ऑल्टर, लेखक

संसारामध्ये वाचकांना आधी न पाहिलेले दैवी विश्व बघायला मिळते. यातील प्रत्येक भागात शक्तिशाली दृश्यात्मकता आहे. “

केव्हिन मिसल, लेखक

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माणुसकी” – लेखिका : डॉ. शैलजा करोडे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “माणुसकी” – लेखिका : डॉ. शैलजा करोडे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक : माणुसकी  

लेखिका : डॉ. शैलजा करोडे 

प्रकाशक – अभिनंदन प्रकाशन 

पृष्ठे – १३२, मूल्य – २९०

‘माणुसकी’ हा शैलजा करोडे यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. साधी, सोपी भाषा, छोटी छोटी वाक्ये, त्यातून आलेली गतिमानता, हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या कथांच्या पोटात काय नाही? त्यात अनुभव कथन आहे. आपले आणि इतरांचेही अनुभव वर्णन यात आहे. यात प्रसंग वर्णन आहे. विचारमंथन आहे. व्यक्तिचित्रण आहे. प्रबोधनही आहे. यातल्या सार्‍याच कथा संस्कारक्षम आहेत.

डॉ. शैलजा करोडे

लेखिकेला वाटतं, की आजचं युग गतिमान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, इलेक्ट्रिकल उपकरणे, मोबाईल, कॉँप्युटर, फेस बुक, ट्विटर, इंस्टाग्रॅम यामुळे क्रांती झाली. जग हाकेच्या अंतरावर आलं, पण मनाने मैलोगणती दूर गेलं. भ्रमण ध्वनींचे मनोरे शेजारी, पण या हृदयीची रेंज त्या हृदयी मिळेना. फेसबुकवर हाजारो मित्र, फॉलोअर्स असतानाही माणूस एकटाच राहिला. पण नात्यातील, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कमी झाला, हा आशय त्यांच्या अनेक कथांमधून येतो.

लेखिका आपली मते, विचार व्यक्त करते, पण तिचे लेखन आग्रही नाही. तिची भूमिका तडजोडीची आहे. दुसर्‍या व्यक्तीला समजून घेण्याची आहे.

‘वारी’ ही यातली पहिलीच कथा. लेखिकेने यातून आजोबांचं व्यक्तिचित्र उभं केलय. त्यांची देवपूजा, त्यांचा नेमधर्म, त्यांचा स्वभाव, सुनेला मुलगीच मानणं, त्यांची विठ्ठल भक्ती या तपशीलाबरोबरच त्यांचं माळकरी असणं, दर एकादशीला पायी वारीला जाण्याचं नेम ही माहिती येते. यंदा त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे, त्यांनी वारीला जाऊ नये, असं घरच्यांना वाटतं, पण अजोबा आपला नेम मोडायला तयार नाहीत. म्हणून त्यांच्याबरोबर त्यांची शाळकरी नात मुक्ता आणि त्यांचा थोरला मुलगा सुधाकर जातात. आजोबा वारीत रमतात. आजारी पडतात. डॉक्टर त्यांना घरी परतायला सांगतात. ते ऐकत नाहीत. विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना धन्य धन्य वाटतं. पुढे काय होतं? त्यासाठी करायलाच हवी, ‘वारी’ची वारी.

‘खिडकी’ ही लेखिकेला नवनवीन भावविश्वात घेऊन जाणार्‍या मैत्रीणीसारखी वाटते. ‘खिडकी’तून समोर, डावी-उजवीकडे दिसणार्‍या दृश्याचं, रस्त्यावरील वर्दळीचं तपशीलवार, वास्तव वर्णन केलय. एकदा ती खिडकीत बसलेली असताना तिची नात तिथे येते. आजीबरोबर तीही खिडकीत बसते. त्यावेळी खालून एक वरात जात असते. ‘हे काय आहे?’ नात विचारते. ‘वरात’ आजी उत्तर देते. ‘म्हणजे काय? नातीचा प्रश्न. आणि पुढे आजीच्या प्रत्येक उत्तरावर नातीचा प्रश्न तयार असतो. शेवटी आजी निरुत्तर होते. अशीच प्रश्नोत्तरे खालून जाणार्‍या मोर्चाबद्दल होतात. आजीचे आणि नातीचे हे संवाद इतके बहारदार झाले आहेत, की प्रत्यक्ष वाचूनच त्यातली मजा अनुभवायला हवी. लॉक डाउननंतर मात्र समोरचा वर्दळीचा रस्ता शांत शांत होतो. पण या काळात रस्त्यावरून तुरळकपणे कामासाठी जाणार्‍या व्यक्तींच्या माणुसकीचेही दर्शन घडल्याचे लेखिका सांगते.

‘श्रीमंती’ ही सुनंदा आणि मानसी या दोन मैत्रिणींची कथा. एका कार्यक्रमासाठी मानसी, सुनंदाच्या गावात आलीय. कार्यक्रमानंतर सुनंदा, मानसीला आग्रहाने आपल्या घरी ठेवून घेते. तिची नातवंडे, ‘आजी… आजी.. ’ म्हणत मानसीच्या मागे लागतात. गोष्टी सांगण्याच आग्रह धरतात. त्यांचं लडिवाळ वागणं मानसीला आनंद देऊन सुखावून जातं. तिला वाटतं, सुनंदा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे, कारण मानसीचा मुलगा, नातवंडे परदेशात आहेत. पण एक दिवस असा उगावतो, की मानसीला जाणवतं, आपल्यालाही सुनंदाच्या श्रीमंतीच्या पंगतीत स्थान मिळालय, ते कसं ? यासाठी ‘श्रीमंती’ ही कथाच वाचायला हवी.

माणुसकी’ ही लेखिकेची गाजलेली कथा. कथानायकाचे वडील वारलेले होते. सोसायटीच्या अपार्टमेंटच्या समूहावर त्यांनी वडलांच्या निधनाचे वृत्त टाकले. त्यावर सगळ्यांचे व्हाट्स अप ग्रूपवरून शोकसंदेश आले. प्रत्यक्ष भेटायला, किंवा अंत्येष्टीसाठी मदत करायला कुणीच आले नाही. अनेकांच्या फ्लॅट्समधे जाऊन त्यांनी अंत्येष्टीसाठी मदत करायची विनंती केली, पण सगळ्यांनी वागवेगळी कारणे सांगत आपण यायला असमर्थ आहोत, असे संगितले. दुपारी बाराच्या सुमाराला वडील गेलेले. रात्रीचे नऊ वाजत आले बाहेर मुसळधार पाऊस, पण अद्याप, अंत्येष्टीची व्यवस्था झाली नव्हती. शेवटी मनाचा निग्रह करून ते समोर भाजी विकणार्‍या संतोषकडे गेले. त्यांचा कापरा, आर्त स्वर आणि अवरुद्ध शब्द ऐकून संतोषने विचारले, ‘काय झालं?’ त्यांनी वडील गेल्याचे व त्यांची अंत्येष्टी करायला कुणाचीच मदत मिळत नसल्याचे सांगितले. संतोषने त्यांना धीर दिला. मित्रांना फटाफट फोन केले. अंत्येष्टीचं साहित्य घेऊन यायला सांगितलं. त्यांच्या सहकार्याने वडलांची अंत्येष्टी झाली. ते पैसे देऊ लागले, पण संतोषने ते घेतले नाहीत. म्हणाला, ‘तुमचे बाबा, आमचे बी बाबाच की! शेवटी काय असतं दादानू, माणूस मरतो हो, माणुसकी नाही. ’ आणि त्यांना प्रत्यय आला, की या आभासी जगात कुठे तरी माणुसकी अजूनही शिल्लक आहे.

‘भावबंध’मध्ये एका गोसाव्याचं वर्णन आहे. भगवी वस्त्रे घातलेला, कपाळाला, दंडाला भस्म लावलेला, एका हातात कटोरा, दुसर्‍या हातात मोरपीसाचा झाडू, असा गोसावी आला, की मुले त्याच्या अवती- भवती जमा होत आणि तो मुलांच्या डोक्यावरून मोरपिसाचा झाडू फिरवे. मुलांना गंमत वाटे. असेच भावबंध, दही-ताक विकणार्‍या सावित्रीशी आणि चिवडा विकणार्‍या मदनलालशी आहेत. तो मुलांना दिवाळीत चिवडा आणि फटाके देतो, तर आई त्याला फराळाचे देते. ही संग्रहातील एक चांगली कथा आहे. ‘अनोखं वाण’ मधील नायिका कोणतं ’अनोखं वाण’ देते, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं. ‘जनरेशन गॅप’ मधे लेखिका म्हणते, ‘एकमेकांना समजून घेतलं, प्रत्येकाच्या मनाचा आदर केला, नव्या-जुन्याचा मेळ साधला, तर ‘जनरेशन गॅप’ रहाणारच नाही. आपल्या सासुबाईंनी दोन्ही पिढ्यातला सांधा कसा सांधला, याचं सुरेख वर्णन यात केलय. असंच दुसर्‍याला समजून घेण्याचा भाग ‘पार्सल’ या कथेतही दिसतो, मात्र इथला वाद दोन पिढ्यातला नाही, तर पती-पत्नीमधला आहे. परस्परांबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करताना वाद होतो, तशी तडजोडही दोन्ही बाजूंनी होते. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील तणाव नाहीसा होऊन, त्यांच्या चेहर्‍यावर हास्य कसे फुलते, हे या कथेत वाचायला मिळेल. ‘श्राद्ध’ कथा करोना काळातली. करोनामुळे सगळीकडे मंदी भाजी विक्रेत्यांसारखे छोटे छोटे व्यवसाय करणारांना जगणंही अवघड होतं. आशा स्थितीत कथानायिका आपल्या वडलांचं ‘श्राद्ध’ कसं वेगळ्या पद्धतीने करते, हे‘श्राद्ध’ कथेत वाचायला मिळतं.

पनिशमेंट, आजी हवीय मला, काकू आई, एक आकाश अवघडलेलं या आणखी काही चांगल्या कथा. खरं तर सगळ्याच कथा वाचनीय आहेत.

या संग्रहात एकूण २० कथा आहेत. कथा वाचताना वाटतं, आपल्या घरात किंवा सभोवती घडणारे प्रसंगच आपण शब्दातून वाचत आहोत. आपले किंवा आपल्या परिचितांचे अनुभव कथांमधून वाचतो आहोत. वाचकाला यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. कधी वाटतं, ‘अरे, आपल्यालाही असंच वाटत होतं की! पुस्तकाच्या सुरूवातीला लेखिकेचा परिचय दिलाय. तो पाहून वाटतं, एवढं सगळं लेखिकेने कधी केलं असेल? लेखिकेचे ९ कथासंग्रह, ४ कविता संग्रह, २ चारोळी संग्रह, ४ कादंबर्‍या, खानदेशची लोकसंस्कृती व लोकधारा हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहे. हा ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने, लोकसाहित्य एम. ए. भाग १ साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे. या शिवाय विविध वर्तमानपत्रातून सदर लेखन केले आहे. वेगवेगळ्या २२ साहित्य संमेलनातून त्यांना कविता वाचनासाठी निमंत्रित केले गेले आहे. ७-८ कविसंमेलने त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहेत. विविध आशा १३ संस्थांचे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत, तर ३६ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा नामवंत लेखिकेच्या ‘माणुसकी’ या कथासंग्रहाचे चांगले स्वागत होईल, अशी आशा व्यक्त करतानाच, त्यांच्या पुढील लेखनासाठीही शुभेच्छा.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बालमनाचा शोध घेणाऱ्या नाट्यछटा – लेखिका : सुश्री रेश्मा संतोष चव्हाण ☆ परिचय प्रा. भरत खैरकर ☆

प्रा. भरत खैरकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ बालमनाचा शोध घेणाऱ्या नाट्यछटा – लेखिका : सुश्री रेश्मा संतोष चव्हाण ☆ परिचय प्रा. भरत खैरकर 

पुस्तक : बालमनाचा शोध घेणाऱ्या नाट्यछटा

कवी : सुश्री रेश्मा संतोष चव्हाण 

 नुकतचं एक छोटेखानी पुस्तक वाचण्यात आलं.. “मलाही काही सांगायचयं… ” सौ. रेश्मा संतोष चव्हाण ह्या शिक्षिकेचं हे नाट्यछटेचं पुस्तक.. हाती घेतल्यावर वाचकाला त्याच्या बालपणात घेऊन जातं.. एका दमात वाचून काढल्याशिवाय राहवत नाही..

 दिवाकरांची “बोलावणं आल्याशिवाय नाही.. ” ही नाट्यछटा वाचून प्रोत्साहित.. प्रेरित.. झालेल्या लेखिकेने अशा अनेक छोट्या छोट्या नाट्यछटा लिहून वाचकाला अगदी खिळवून ठेवले आहे.. छोट्या वीस नाट्यछटा ह्या पुस्तकात आपण वाचू शकतो..

 ” फ्रेंडशिप डे” मधून लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखविलं आहे.. मित्रांबद्दलचे लहान मुलांचे विचार आणि मोठ्यांमधला फ्रेंडशिपडेचा उत्साह याची छान तुलना ह्या नाट्यछटेत आहे.. “घरातला भ्रष्टाचार” नावाची नाट्यछटा, छोट्या मोठ्या कामासाठी आपण कसे पॉकेट मनी मागतो किंवा हलक्याफुलक्या कामासाठी कशी घरातली मंडळी एकमेकांना वापरते.. लहानांना वापरतात.. हा एक भ्रष्टाचारच आहे. असं काहीसं मजेशीर वर्णन आपण ह्यात वाचू शकतो..

 पंढरपूर आळंदी सारख्या ठिकाणी गेल्यावर मंदिराच्या बाहेरील गंध लावणारी मुले आणि त्यांचे भाव विश्व “देवाचं गंध” ह्या नाट्यछटेत आपण वाचू शकतो..

ह्या मुलांचा प्रामाणिकपणा आणि अगतिकतेतून आलेली गंध लावायची वेळ आपणास हेलावून सोडते.

“कचरा उचलणारी मुलं” बघितल्यावर त्यांच्याहीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं सांगत त्यांचं बालमन कसं शाळेच्या गेटवर उरलेल्या छोट्या पेन्सिलचे तुकडे.. रबराचे तुकडे.. डब्यात ही मुलं जमा करतात व शाळेशी संबंध प्रस्थापित करतात असं काहीसं मन हेलावणार “मलाही खूप शिकायचं” ही नाट्यछटा सांगून जाते.

 “मी बोलतोय डोमकावळा” ही नाट्यछटा तर मनुष्याच्या जीवनात असलेलं कावळ्यांचं महत्व वाचकाला समजावून देते. वर्षश्राद्धांच्या दिवसांमध्ये पितृपक्षात कशी आमची मौज असते हे कावळ्यांच्या तोंडून ऐकण्याची मजा औरच आहे.. ” दाराचे कुलूप” ही नाट्यछटा आधुनिक कुटुंब व त्यात होणारी मुलांची घुसमट आपणांसमोर मांडते.. कॉम्प्युटर गेम आणि कॅंडी क्रश मध्ये अडकलेल्या मुलांना.. कुलूप बंद दाराआड पालक कसे गुंतवतात.. हे वाचून मन विषण्ण होते.

” मुलीसारखं जगू दे” या नाट्यछट्टेमध्ये एका मुलीनंतर आपल्याला मुलगा पाहिजे होता तरी मुलगीच झाली म्हणून अट्टाहासापोटी त्या मुलीला मुलाचा पेहराव आणि मुलांसारखं चालचालन शिकविणारी आई व ती मुलगी यांचा संघर्ष दाखविला आहे..

 ” समजूतदार” असण्याचे किती तोटे असतात हे सांगताना छोटी मुलगी आपला सगळेजण कसे वापर करतात तरीही ते आपणास किती छान वाटतं! हे तिचं बालमन वाचकांशी बोलतं. ” मोर नाचतो मनी” ही पौगंडावस्थेत असलेल्या.. आलेल्या.. मुला-मुलीचं भावविश्व सांगणारी सुंदर अशी नाट्यछटा आहे. ह्यामधून लेखिका विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जपणारी.. जाणणारी.. आहे हे लक्षात येतं.

 ” मधली सुट्टी” मध्ये बाईसोबत डबा खाण्याची कशी मज्जा असते.. शिवाय त्याक्षणी बाई.. वर्गातल्या बाई पेक्षा कशा वेगळ्या असतात! हे विद्यार्थी- शिक्षिकेचं नातं.. शब्दापलीकडचं आहे हे सांगून जातं. ” वृद्धाश्रम” ही अजून एक नाट्यछटा.. ज्या मुलांना अनाथाश्रमातून आणलं.. त्यांनीच आपल्या बापाला वृद्धाश्रमात ठेवावं हे दुर्दैव मांडणारी आहे..

 ” लग्नाला नको ग बाई” मधील मुलगी मोठ्यांच्या मध्ये फसल्यावर तिला तिच्या आवडीच्या.. बाजूच्या गोष्टी करता येत नाही.. ते दुःख याठिकाणी व्यक्त करते. ‘हे नको करु.. ते नको करू’ असे सांगणारे पालक तिच्या मनाचा विचार करत नाही हे मांडलेले आहे.

 ” येळ नाय मला” मधल्या एका कामवालीचा तोरा बघण्याजोगा आहे.. ती किती बिझी आहे हे फारच छान पद्धतीने लेखिकेने वर्णन केलेला आहे.. तिचा बाज आणि ठसका व्यवस्थित सांभाळण्यात आला आहे. ” सायंटिस्ट व्हायचं मला” ह्या नाट्यछटेत ‘काड्या करणाऱ्या मुलाचं’ वर्णन आहे.. कुकरच्या शिट्टीला फुगा लावून तो फुगवायचा.. अशी अफलातून सायंटिफिक आयडिया त्याच्या डोक्यात येते.. ती वाचून वाचक चकित होतात!

” माऊली” नावाची शेवटची सायकल रुपी नाट्यछटा मुलांना आपल्या वस्तूची देखभाल कशी करावी.. हे शिकून जाते..

 एकूणच ह्या पुस्तकांमध्ये आलेल्या सर्वच नाट्यछटांची भट्टी एकदम मस्त जमली आहे.. लेखिकेने पंधरा ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा विचार करून लिहिलेल्या ह्या नाट्यछटा खरंच वाचनीय आहे.. वाचकाला त्या आपल्या बालपणामध्ये फिरवून आणतात.. बालपणात घेऊन जातात.. हे पुस्तक सर्व प्राथमिक.. माध्यमिक शाळांमध्ये असावे इतके सुंदर आहे.. मुलांकडून जर ह्या नाट्यछटा करून घेतल्या तर.. बऱ्याच अंशी “संस्कार” व “शिकवण” देण्याची ताकद ह्यात असल्याचं लक्षात येईल.. लेखिकेला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..

परिचय –  प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मोरपीस… – लेखक : प्रा. रमेश कोटस्थाने ☆ परिचय – सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ मोरपीस… – लेखक : प्रा. रमेश कोटस्थाने ☆ परिचय – सुश्री शांभवी मंगेश जोशी

ज्येष्ठ लेखक, प्राचार्य रमेश कोटस्थाने यांचं ‘मोरपीस ‘हे पुस्तक हातात मिळालं. थोडसं चाळलं, वाचलं आणि मी गुंतत गेले. वाचतच राहिले. अलगद मनातून मोरपीस फिरावं असं काहीसं वाटत राहिलं. मुलायम तेवढीच मौलिक भाषा. सहज तेवढीच प्रभावी. भाषे मध्ये लालित्य तेवढाच मधाळ मिष्कील गोडवा. लिखाणात रंजकताही तेवढीच. ज्या ज्या लेखकांचे लिखाण वाचून, लिखाणाची प्रेरणा मिळाली, त्यांच्याबद्दल ऋणमोचन करण्यासाठी, हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा सद्हेतूच फार हृद्य आहे. लेखकांची सरांशी कधीच भेट झाली नाही. तरी त्यांच्या शब्दांमधून अक्षर नाती जुळली. ती नाती पुन्हा उलगडून वाचकांच्या मनात लेखक जागते ठेवले आहेत. हा ही पुस्तक लिखाणाचा तेवढाच महान उद्देश.

बहिणाबाई पासून बर्नार्ड शॉ, पर्यंत आणि वि. आ. बुवांपासून वुड हाऊस पर्यंत. मराठी आणि इंग्रजी मधील थोर साहित्यिकांबद्दल लेख, मोरपीस या पुस्तकामध्ये कोटस्थाने सरांनी लिहिले आहेत. सार्‍यांच्या समग्र साहित्याचा लेखाजोखा एकाच लेखात मांडण्याचा आवाका अफाट आहे. मोठेच आव्हान आहे.

 ते कुठेही बोजड, न वाटता, मोर पिसासारखे मुलायम, तेवढेच विविध रंगी चित्ताकर्षक झाले आहे. एकेक लेखा मागे केवढे अफाट वाचन आहे हे समजून आपण आवाक् होतो.

‘पुस्तक घेऊन भविष्यातल्या कित्येक तासांचा सुखाचा विमा उतरवायचा ‘ हे वाक्य वाचून मी सुखावले. यावरून लेखकाच्या दृष्टीने आयुष्यात पुस्तकांचं सुखाच्या दृष्टीने किती मोल आहे हे कळतं. बाल वयातलं झुंजार कथा वाचनाचे वेड अजूनही लेखकाच्या डोक्यात आहे. ते तेवढ्याच वेडेपणानं सहज लेखात उतरलेलं आहे. त्या वेडात शहाणपणा एवढा, की आजही बाबुरावांची परिस्थिती काय आहे, ते कुठे राहतात, त्यांच्या लिखाणातली पात्र कोण, हे सर्व तपशील अत्यंत नेमकेपणाने आलेले आहेत. बाबुरावांच्या लेखनात साधेपणा इतकच रंजनमूल्य किती आहे हे बाबूरावांचे वांङमय न वाचता सरांच्या लेखातून समजत.

सोरायन

या लेखकाचे नावही माहित नाही.. मला तरी. तसं ते सरांनाही माहीत नव्हतं. पण रस्त्यावर या लेखकाचे पुस्तक मिळालं. अवघ्या दोन रुपयात मिळाल्यामुळे आनंदाने ते घेतले. त्यावर लेखक म्हणतात इतक्या मोठ्या संपत्तीचा सौदा रस्त्यावर झाला याची खबर न विक्रेत्याला होती ना वाचकाला. त्यानंतर लेखकाने, लायब्ररीत जाऊन सोरायनच्या इतर पुस्तकांचा शोध घेतला. ती पुस्तकं वाचून सोरायनकडून सरांना अत्यंतिक समृद्धी आणि संपन्नता मिळाली. महत्त्वाचं असं की सोरायनमुळे सरांना आपण लेखक आहोत याचा अभिमान वाटला.

राम गणेश गडकरी

देवाघरची दौलत असं शीर्षक देऊन गडकरीं बद्दल प्रगाढ श्रद्धा आणि त्यांची उत्तुंग प्रतिमा सर निर्माण करतात. त्याच वेळेस त्यांचे अक्षर साहित्य दुर्लक्षित राहीले अशी खंत व्यक्त करतात. त्यामुळे नवी पिढी काहीतरी अमोलीक श्रेय हरवून बसली आहे यासाठी हळहळत राहतात. सर म्हणतात, गडकर्यांनी जे जे लिहिले ते,

 उलगडती पीळ हृदयाचे, सुटती बंध देहाचे की जीव देहभर नाचे अशा ऊन्मनी अवस्थेत लिहिले.

गडकर्‍यांच्या विनोदाच्या अनुकरणावर कित्येक लेखकांनी गुजराण केली. तरीही त्यांच्या विनोदाची खुमारी ओसरत नाही.

आर. के. नारायण.

आपल्या सगळ्यांना मालगुडी डेज ही मालिका आठवत असेल. आजी आजोबा नातवंड आणि आपण. सगळ्यांना एकत्र आनंद देणारी. मालगुडी गावातला निखळ, नितळ, स्वच्छ सुंदर अनुभव देणारी. ही आर के नारायण यांची लेखन कलाकृती. आर के नारायण दक्षिणेतले असल्यामुळे, लेखक म्हणतात, प्रादेशिकता जोवर प्राणशक्तीच्या अविष्करणाला कारक आणि साहाय्यकारक आहे तोवर ती कवचा सारखी संरक्षक असते. तिचा कोप झाला की आतल्या आत घुस्मटून टाकते. नारायण यांची प्रवृत्ती आणि प्रकृती पिंडी ते ब्रह्मांडी बघण्याची असल्याने त्यांच्या प्रादेशिकतेने वैश्विक आशयाला सहज सुंदर रित्या अंकित केले आहे, अलंकृत केले आहे. दक्षिणेच्या घाटात उत्तरेचे गंगाजल ठेवले, आणि त्यात चंद्रबिंब बघितले तर भारतीय मनाला काय दिसेल काय दिसावे? नारायण यांच्या नजरेला ते ‘ऐश्वर्य’ दिसते. मालगुडीचे दाक्षिण्य साऱ्यांनाच आवडणारे. लेखक म्हणतात आर के म्हणजे अंतर बाह्य अस्सल आणि मिश्किल आप्त. नारायण आणि लक्ष्मण (व्यंगचित्रकार) दोघेही भाऊ हसवतात. कळ उठवतात. लेखक त्यांच्या बद्दल लिहिताना भक्ती भावाने लिहितात. पण त्यांचे न पटणारे मत ही तेवढेच स्पष्टपणे मांडतात. उदा: इंग्रजी भाषा ही भारतीय आहे असे आर के चे मत मला अजिबात मान्य नाही.

 बहिणाबाई –

बहिणाबाई बद्दल लिहिताना लेखकांनी काळजाला हात घातलेला आहे. लेखक म्हणतात, बहिणाबाईंनी गाणी लिहिली नाहीत. त्यांना ती ऐकू आली, दिसली. देवानं आदिकालापासून लिहिलेली, गायलेली, चितारलेली. निसर्गात इथे तिथे विखुरलेली. कडे कपारीतून उसळत, घुसळत, फेसाळत जाणारा झरा, भुईतून वर येणारी पानं, रोजचे चंद्र सूर्य तारे, त्या सार्‍यात रहणारं, त्यातून वाहणारं जीवन गाणं त्यांना दिसलं. ऐकू आलं. त्यामुळे घट पटादी खटाटोप न करतात त्यांची गाणी जणु केवळ प्रतिध्वनीत झाली. इतकी सहजता, अभिजात सुंदरता त्यांच्या गाण्यात आहे. बहिणाबाईंच्या सुंदर काव्याचं, गाण्यांचं, असं लोभस नेमकं वर्णन क्वचितच कोणी केलं असेल. लेखक म्हणतात, बहिणाबाईंनी जे काय सोसलं, भोगलं, ते त्यांच्यासोबत काळात विलीन झालं. आपल्यासाठी मात्र ही हंड्या झुंबर लखलखलतच राहतील असं लेखक म्हणतात,

पु. लं.

म्हणजे अंतरीचा दिवा तेवत असणारे उजळ व्यक्तिमत्व. असे उजळ व्यक्तिमत्व मला तरी अख्ख्या भारतात दिसले नाही. लेखाला तीर्थरूप नाव देऊन वडिलांसारखेच ते मला वाटतात असं म्हणतात. पुलंच्या लेखणीतून एक आनंदाची धार स्त्रवत राहिली. आणि जिथे जिथे मराठी मनोवस्ती आहे तिथे तिथे ती वाहत गेली. मराठी इतिहासातली ही सर्वात मोठी पवित्र नदी, प्रत्येक गावाला आपली वाटते तिच्या दोन्ही काठावर, प्रायोजित उपयोजित कलांचे किती मळे भरले. पुणेरी धरणासह किती घाट बांधले गेले. तिच्या पाण्यावर किती पाणपोया चालतायेत, किती दक्ष, लक्ष भाविकांना हिच्या प्रवाहात डुंबत पारोसेपणातून मुक्त होण्याचा आनंद मिळाला याची गणतीच नाही. असं पु. लं बद्दल नेमके पणाने व्यक्त होतात अनेक थोर मराठी साहित्यिकांंबद्दल लिहिताना, तेवढ्याच थोर इंग्रजी लेखकांबद्दलही भरभरून लिहिलेलं आहे.

* * सोरायन, र्बर्ट्रान्ड रसेल, बर्नार्ड शाॅ पर्ल बक, पी. जी. वूड हाऊस हे ते इंग्रजी लेखक. पण जी. ए. कुलकर्णी, लेखकाची दुखरी नस. हळवी जागा. अंतरीचा दिवा. म्हणूनच त्यांच्याबद्दलच्या लेखाला, काळोखातील क्ष किरण असं समर्पक नाव दिलेलं आहे. जी. ए. न्चे साहित्य म्हणजे गूढ गहन ऐश्वर्याचे गारुड ! ऐश्वर्याचे आभाळच!

अर्थातच कोटस्थाने सरांनी हे आभाळ लीलया पेललेलं आहे. जी ए यांची कथा अथ पासून इती पर्यंत मंत्रावून गेलेली आहे. माणसाच्या जगण्याच्या विरुपिके चे असंख्य मासले दाखवून, ते या गारूडाचे विस्मय जनक भावदर्शन देतात. अंतिम ज्ञानाचा अंगठा दक्षिणा म्हणून गुरुने हिरावून घेतल्यावरही एकाग्र शरसंधान करणार्‍या एकलव्याचे अमोघ सामर्थ्य जी एं च्या लेखणीत आहे. मात्र हे शरसंधान विध्वंसक नाही. विकृत तर नाहीच नाही. मला जीए वाचता आले. माझे मन जी एन् च्या कथा वाचल्याच्या आनंदाने ओथंबून गेले आहे. आर्द्र झाले आहे.

 ते म्हणतात एकांताचे आत्म शोधाला जे साह्य, रेडियमच्या लकाकीला अंधाराचे जे साह्य, तेच नियतीच्या अथांगतेचे जी एन् च्या कथेतील सत्य शिव सुंदरतेच्या ध्यासाला साह्य.

जी एन् च्या कथा साहित्या एवढेच, आत्मीयतेने इतरही अनेक लेखकांबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. तेवढेच अभ्यासपूर्वक. काळजाच्या शाईने. त्यातील काही लेखांबद्दल मी उच्च हेप्रातिनिधिक स्वरूपात लिहिले आहे. ते वाचायला आपल्याला नक्कीच आवडेल. कोटस्थाने सरांच्या शब्दात सांगायचं तर, हे पुस्तक घेऊन आपण आयुष्यातील काही तासांचा आनंदाचा विमा उतरवू शकतो… हे निश्चित. मोरपिसाने या लेखकांचं लिखाण निश्चित औक्षवंत होईल.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची ” – लेखिका: सुश्री संगीता पी मेनन मल्हन  – अनुवाद : श्री प्रा. संजय विष्णू तांबट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची ” – लेखिका: सुश्री संगीता पी मेनन मल्हन  – अनुवाद : श्री प्रा. संजय विष्णू तांबट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची  

लेखिका: संगीता पी मेनन मल्हन 

अनुवाद: प्रा. संजय विष्णू तांबट

 पृष्ठे: ३१०

मूल्य: ३५०₹ 

एका सामान्य वृत्तपत्रापासून एका नामांकित वृत्तपत्रापर्यंतचा प्रवास. प्रत्येक उद्योजकाने नक्की वाचावे असे सुंदर पुस्तक. ब्रँड कसा बनतो? व्यवसाय म्हणजे नक्की काय? निर्णय कसे घ्यावेत? कल्पना, संकल्पना कशा राबवाव्यात? अशा नाना प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील. 

समीर जैन यांच्या नेतृत्वाखाली टाईम्स घेतलेली भरारी थक्क करते. आज टाईम्स ग्रुप देशातीलच नव्हे तर जगातील आघाडीच्या वृत्तपत्र समूहात गणला जातोय तो जैन यांच्या नेतृत्वकौशल्यामुळे, व्यवसायिक दृष्टिकोनामुळे… 

लेखिका संगीता पी. मेनन मल्हन यांनी अतिशय छान शब्दात टाईमस ची कहाणी चितारली आहे. पुस्तकातील एक एक टप्पे पार करताना टाईम्स बद्दल तुमच्या मनात आदर निर्माण होतोच. एका भव्य ब्रँड चा प्रवास प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे

भारतातील वृत्तपत्र व्यवसाय अनेक वर्षे अलिखित; पण काहीशा कठोर, साचेबद्ध नियमांनी बांधलेला होता. एकोणिसशे ऐंशीच्या दशकात हे चित्र बदलले. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स आणि इतर प्रकाशनांची मालकी असलेल्या बेनेट, कोलमन आणि कंपनीने (बीसीसीएल) या उद्योगाचे नियमच जणू नव्याने लिहिण्यास प्रारंभ केला. मग ते नियम वृत्तपत्राच्या किमतीसंबंधीचे असतील, किंवा जाहिरात आणि संपादकीय स्वातंत्र्याबद्दलचे ! त्यामुळे पुढच्या दोन दशकांत भारतातील वृत्तपत्र सृष्टीचा चेहरामोहराच बदलला.

टाइम्स ऑफ इंडिया च्या १९८५ मध्ये केवळ तीन आवृत्त्या होत्या आणि एकूण खप साधारण ५.६ लाख प्रती इतका होता. मात्र, मार्च २०१२ पर्यंत ते भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक खपाचे इंग्रजी दैनिक बनले. देशभरात १४ आवृत्त्या आणि ४५ लाखांवर खपाची मजल त्याने गाठली. या वृत्तपत्राने स्वतः वाढत असताना बातमीदारी, संपादकीय धोरण, विपणनाच्या नव्या पद्धती शोधल्या आणि माध्यम विश्वातील खेळाचे नियमच पालटले.

तरीही, भारतातील माध्यम व्यवसायाचे रंगरूप पालटणाऱ्या टाइम्स समूहाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. टाइम्स ऑफ इंडियात काही काळ पत्रकारिता केलेल्या संगीता मल्हन यांनी ही उणीव दूर केली आहे. या वृत्तपत्राचे स्वरूप बदलण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, अशा काही पत्रकार आणि कॉर्पोरेट नेत्यांच्या मुलाखतींनी या लेखनाची सुरुवात झाली. त्यात जाणवलेल्या व्यक्ती व्यक्तींमधल्या अहंभावाच्या लढाया, भूमिका-दृष्टिकोनांमधील फरक, बदलत गेलेला व्यवसायाचा चेहरा यांच्या मेळातून एक रंजक कथा पुढे आली. ही कहाणी माध्यम क्षेत्राशी संबंधितांनी तर वाचलीच पाहिजे; पण बातमी कशी घडते, कशी रिचवली जाते यात रस असलेल्या इतर सर्वांसाठीही ती नवे भान देणारी ठरू शकते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “शूरा मी वंदिले” – संकल्पना : सौ. माधवी नाटेकर – लेखक : सतीश अंभईकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “शूरा मी वंदिले” – संकल्पना : सौ. माधवी नाटेकर – लेखक : सतीश अंभईकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : शूरा मी वंदिले

संकल्पना : सौ.माधवी नाटेकर, 9403227288

लेखक : सतीश अंभईकर 

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन, सांगली

मूल्य : रु.२००/-

सौ.माधवी नाटेकर यांच्या संकल्पनेतून उतरलेले व श्री.सतीश अंभईकर लिखित ‘ शूरा मी वंदिले ‘ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.१९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या एका मराठी मावळ्याची ही शौर्यगाथा आहे.

या शौर्यगाथेची सर्वांनाच उत्सुकता असेल.पण सुमारे बासष्ट वर्षांपूर्वी घडलेल्या युद्धाची कथा आत्ता कशी काय प्रकाशात आली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.त्यामुळे या पुस्तकाच्या जन्माची कथा समजून घेणे आवश्यक आहे.

सेकंड लेफ्टनंट शहीद विष्णू आठल्ये हे अकोल्याचे रहिवासी.याच अकोल्यात काही वर्षे श्री.सतीश अंभईकर हे रहात होते.अकोल्यातील जठारपेठ या भागात श्री.अंभईकर यांना एका रस्त्याच्या सुरुवातीला काळ्या फरशीचा छोट्याश्या शिलालेखासारखा एक फलक दिसला.तो अत्यंत अस्वच्छ व उपेक्षित अवस्थेत होता.परंतू श्री.अंभईकर यांना चैन पडत नव्हते.अनेक प्रयत्नांनंतर एक दिवशी त्या फरशीवरील कोरलेली अक्षरे त्यांना वाचता आली. त्यावर लिहीले होते–

“शहीद लेफ्टनंट कर्नल विष्णू आठल्ये मार्ग..जन्म ४मार्च १९४१.मृत्यू १९६२.सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये. “

या अक्षरांनी श्री.अंभईकर यांच्या मनात वादळ निर्माण केले.अवघ्या एकवीस वर्षांचा वीर जवान शहीद कसा झाला हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना.आपण याचा शोध घ्यायचाच असे त्यांनी ठरवले.पण कसा ? हा प्रश्न सर्वात मोठा होता.६२ वर्षांपूर्वीची घटना.कोणताही संदर्भ नाही. काहीही माहिती नाही.कधी लेखन केलेले नाही.परंतू युद्ध, युद्धशास्त्र, संरक्षण विषयी लेखन करणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी त्यांनी संपर्क साधला.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली येथील सौ.माधवी श्रीनिवास नाटेकर या विष्णू आठल्ये यांच्या भगिनी. श्री.अंभईकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व विष्णू आठल्ये यांच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.त्यानंतर अनेक निवृत्त लष्करी अधिका-यांनी

सुद्धा माहिती पुरवली.या सर्वांनी दिलेल्या माहिती व पुराव्यांच्या आधारे या पुस्तकाची निर्मिती झाली.मुळात केवळ उत्सुकतेपोटी घेतलेला शोध आणि त्याचा अथक पाठपुरावा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हेच या पुस्तक निर्मितीचे रहस्य आहे.त्यामुळे पुस्तक वाचताना सौ. नाटेकर यांचे मनोगत व श्री.अंभईकर यांचे ‘आभार ऋणानुबंधाचे ‘ हे लेख जरुर वाचावेत.

सुरूवातीलाच ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा १९६२ च्या चिनी आक्रमणासंबंधी एक लेख आहे.यामध्ये त्यांनी युद्धाची पार्श्वभूमी, भारत चीन सीमावादाची कारणे व मुख्यतः चीन युद्धातील भारताकडून झालेल्या घोडचुका यांचा आढावा घेतला आहे.युद्धाचा हा विषय समजून घेण्यासाठी सामान्य वाचकाला यातून खूप चांगली माहिती मिळाली आहे.आपली कितपत तयारी होती व धोरणे कशी चुकली हे यातून समजून येते.

यापुढील प्रकरण आहे ‘ वलाॅन्गची लढाई आणि विष्णू आठल्ये यांचे युद्धातील शौर्य ‘ .विष्णू आठल्ये यांना आणि त्यांच्या तुकडीला कोणत्या परिस्थितीत लढावे लागले व त्यांनी या प्रसंगाला कसे तोंड दिले यांची सविस्तर माहिती या प्रकरणात दिली आहे.सुरुवातीला लेखकाने या रणभूमीची भौगोलिक स्थिती आपल्या समोर ठेवली आहे. ती वाचून आपल्याला प्रतिकुलतेची आणि सैन्यावर असलेल्या जबाबदारीची कल्पना येऊ शकते.सुमारे ९२७ चौ.मैल एवढ्या विस्तृत क्षेत्राचे रक्षण करण्याची जबाबदारी या तुकडीवर होती.प्रतिकूल नैसर्गिक वातावरण, अपुरी साधन सामुग्री आणि राजनैतिक पाठिंब्याचा पूर्ण अभाव अशा पेचामध्ये सापडूनही आपल्या सेनेने पराक्रमाची शर्थ केली.अत्यंत शिस्तबद्ध व संयमाने लढा देऊन या सेनेने आपल्या भूभागाचे रक्षण केले.त्संगधर या क्षेत्रातील लढाई आपल्या युद्धाच्या इतिहासातील सर्वात दुःखदायक लढायांमध्ये असली तरी भारतीय सैनिकांच्या अभूतपूर्व धैर्याची गाथा गणला गेली आहे असे लेखकाने म्हटले आहे.हे वाचताना पानिपतच्या युद्धाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.प्रत्यक्ष चढाईची इत्थंभूत माहिती वाचताना एकीकडे अंगावर काटा येतो, ऊर अभिमानाने भरुन येतो तर दुसरीकडे राजकीय नेतृत्वाची नादानी पाहून मन अस्वस्थ होते .असीम पराक्रम गाजवूनही सेनादलाकडून विष्णू आठल्ये यांना कोणताही शौर्य पुरस्कार मिळाला नाही याची खंत लेखकाने व्यक्त केली आहे.

वास्तविकता या प्रकरणानंतर, शौर्यगाथा सांगून झाली आहे म्हणून हे लेखन थांबवता आले असते.पण लेखकाने तसे केलेले नाही.यापुढील प्रकरणे ही विष्णू आठल्ये यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात.अनेक नकाशे, फोटो, यांचा समावेश केल्यामुळे पुस्तक म्हणजे महत्वाचा दस्तावेज झाले आहे.

पुस्तकाच्या पुढील भागामध्ये विष्णू आठल्ये बेपत्ता व नंतर मृत घोषित केल्याची जी अधिकृत पत्रे आहेत त्यांचा मजकूर देऊन मूळ पत्रांची फोटोप्रतही दिली आहे.आठल्ये यांच्या व्यक्तीगत वस्तूंची सूची, त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून लढलेल्या अमर अशा अकरा जवानांची छायाचित्रे, एन.डी.ए.मधील छायाचित्रे, युद्धात वापरलेल्या तोफा, विमाने यांची छायाचित्रे देण्यात आली आहेत.वलाॅन्ग वॉर मेमोरियल, राष्ट्रीय समर स्मारक, तेथील छायाचित्रे दिल्यामुळे युद्धप्रसंगाचे उचित स्मरण होते.पुढील काही प्रकरणांमध्ये आठल्ये यांच्या रेजिमेंटचा परिचय, विविध पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे.आठल्ये घराण्याशी संबंधित सेनादलातील व्यक्तींचा परिचय व कर्तृत्व सविस्तरपणे कथन करण्यात आले आहे.

आठल्ये यांच्या भगिनी सौ.माधवी नाटेकर यांनी १७ पॅरा फिल्ड रेजिमेंटला भेट दिल्यानंतर त्याविषयीचा लेखही छायाचित्रांसह समाविष्ट करण्यात आला आहे.विष्णू आठल्ये यांचा जीवनप्रवास व पत्रे यांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.या युद्धाव्यतिरिक्त त्यांनी गोवामुक्ती संग्रामात घेतलेला सहभाग व कामगिरी यांची माहितीही आपल्याला वाचायला मिळते.

पुस्तकाच्या दुस-या भागामध्ये विष्णू आठल्ये यांच्या निकटवर्तीयांनी लिहीलेल्या आठवणी देण्यात आल्या आहेत.त्यातून कौटुंबिक आठवणी, छायाचित्रे यांचे दर्शन होते. गीतेत सांगितलेला कर्मयोग व विष्णू आठल्ये यांचे कर्तृत्व यातील साम्य् दाखवणारा सौ.माधवी नाटेकर यांचा लेखही आपणास वाचायला मिळतो.या सर्व एकत्रित तपशिलामुळे वाचकाला सर्व इतिहास समजून घेणे सहज शक्य झाले आहे.शूर वीरांच्या बलिदानाचे महत्व लक्षात येते.

नकळतच हात जोडले जातात आणि शब्द उच्चारले जातात

” युद्धभूमी हिच ज्यांची तपोभूमी, अशा शूरा मी वंदिले.”

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पाय स्टोरीज (पुस्तक संच)” – लेखक : श्री अमर भूषण – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्पाय स्टोरीज (पुस्तक संच)” – लेखक : श्री अमर भूषण – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या स्पाय स्टोरीजचा चार पुस्तकांचा संच … 

१)एस्केप टू नोव्हेअर

२)मिशन नेपाळ 

३) टेरर इन इस्लामाबाद

४) द झीरो- कॉस्ट मिशन

संच मूल्य: १०४०₹ 

पुस्तक क्रमांक १

एस्केप टू नोव्हेअर

पृष्ठे: १८४ मूल्य: ३४०₹

भारताच्या ‘एक्सटर्नल इंटेलिजन्स सर्विहस’ अर्थात ‘एजन्सी’च्या सुरक्षा विभागाचा प्रमुख जीवनाथनकडे एकदा एक नवखा, पण हुशार अधिकारी आपला संशय व्यक्त करतो. त्याच्या मते, एजन्सीमधला एक वरिष्ठ अधिकारी परदेशी हेर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर तातडीने तपास, चौकशी याचं सत्र सुरू होतं आणि संशयित अर्थात, रवी मोहनच्याभोवती सव्हॅलन्सचा जागता पहारा ठेवला जातो… या तपासातून रवी संवेदनशील माहिती चोरत आहे, याला पुष्टी देणारे अनेक तगडे पुरावे समोर येतात. तपास आणि सव्हॅलन्स पुढे चालू राहतो… आणि मग घडते अनपेक्षित अशी घटना, जिचा विचार कुणी कधी केलेला नसतो !

२००४ साली एक वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी अचानक गायब झाला. तो काही दशकांपासून हेर म्हणून काम करतो, असा संशय होता. या सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी, देशाची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता, ऑपरेशन चालवताना येणाऱ्या मर्यादा यांसारख्या अपरिचित विषयांबद्दल सामान्य माणसाला अंतर्दृष्टी देते.

पुस्तक क्रमांक २

मिशन नेपाल

पृष्ठे: १५९ मूल्य: २५०₹

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !

भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या ईस्टर्न सर्व्हिस ब्युरोचे प्रमुख जीवनाथन यांच्यावर एजन्सी हेडक्वार्टर्सने हा ब्युरो बंद करण्याचं काम सोपवलंय. प्रामुख्याने नेपाळ, आणि भारताच्या पूर्वेच्या अन्य शेजारी देशांच्या संदर्भात इंटेलिजन्स गोळा करणं, ऑपरेशन्स चालवणं असं या ब्युरोचं काम, परंतु बराच काळ त्यांच्याकडून फारशी उपयुक्त माहिती हाती आली नसल्याने या ब्युरोवर अधिक खर्च करत राहणं हेडक्वार्टर्सला मान्य नव्हतं. या परिस्थितीकडे जीवनाथन ब्युरोचं पुनरुज्जीवन करण्याची एक संधी म्हणून पाहतो आणि एकापाठोपाठ एक बेधडक ऑपरेशन्स आखतो… ही ऑपरेशन्स त्याचा ब्युरो वाचवू शकेल? नेपाळ आणि भारत यांचे संबंध सुधारतील?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा…

मिशन नेपाळ आणि द वॉक इन !

पुस्तक क्रमांक ३

टेरर इन इस्लामाबाद

पृष्ठे: १३५ मूल्य: २००₹

पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो. वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं. तो ते फार सावधपणे पार पाडत असतो…

आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं, माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !

पुस्तक क्रमांक ४

द झीरो – कॉस्ट मिशन 

पृष्ठे: १६७ मूल्य: २५०₹

जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares