मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले” – लेखक : डॉ. एस. व्ही. भावे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆

सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले” – लेखक : डॉ. एस. व्ही. भावे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆ 

पुस्तक – रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले 

लेखक – डॉ. एस. व्ही. भावे

परिचय : सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

कवी कालिदासांनी रघुवंश या महाकाव्यात प्रभू रामचंद्रानी सीतेसह लंका ते आयोध्य केलेल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. त्यांच्या या प्रवास वर्णनाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याकरिता डॉ. भावे यांनी त्याच मार्गांवरून त्याच तिथीला मार्गक्रमणा केली व कालिदासांनी रघुवंशात शेकडो वर्षांपूर्वी केलेली वर्णन कशी तंतोतंत आहेत हे या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवले आहे.

विशेष म्हणजे भावे हे व्यवसायाने डॉक्टर तरीही ते संस्कृत भाषा शिकले, वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आणि छोटेखानी विमान विकत घेतले. रीतसर सर्व परवानगी मिळवली. नवरात्री मध्ये राम–रावण यांच्यात युद्ध झाले. विजयादशमीला राम विजयी झाले. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी रावणाचे पुष्पक विमान घेऊन रामाने सीतेसह घेऊन उड्डाण केले होते. त्याच दिवशी डॉ. भावेनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. कारण कालिदासांनी केलेल्या वर्णनाचा त्यांना अनुभव घ्यायचा होता. यामुळे पुस्तक वाचताना रामायणातील काही प्रसंग व रघुवंश यातील वर्णन आपल्याला वाचता येतात.

पुस्तकात संस्कृत श्लोक फार सोप्या पद्धतीने समजावले आहेत. आश्चर्य वाटते ते म्हणजे वाल्मिकीनी लिहलेलं रामायण आणि कालिदासाचे रघुवंश यामधील पशुपक्ष्यांचे निरीक्षण, स्त्रियांचे रूप आणि वागणूक, हवामानशास्त्र, दिशा-शास्त्र व त्यातील गणितं ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. भावेनी खगोलशास्त्रतील गणिताचा वापर करून रामसेतू शोधून काढला. सुरवातीला विमानातून पाहिला नंतर तिथं पर्यंत बोटीने प्रवास करून त्यावरती उतरून उभे राहिले आहेत. हा सेतू रामेश्वर, पांबन, आयलंड आणि लंका यांच्या मधील समुद्रात आहे.

कालिदासांच्या एका श्लोकात मातंगनक्र हा शब्द आला आहे. याच्या शोधासाठी त्यांनी अनेक ग्रंथ हाताळले, तेथील लोकल लोकांना विचारले पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्या मार्गांवरून त्यांनी दोन -तीनदा विमान प्रवास केल्यावर त्यांना त्रिवेंद्रमच्या दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत जाणारी पर्वत राशीचा आकार क्रोकोडॉईल सारखा दिसतो, तेंव्हा त्यांना मातंगनक्रचा अर्थ कळला. लोणार सरोवराचे वर्णन वाल्मिकी मध्ये चौकोनी असे आहे तर कालिदासांनी वर्तुळाकार आहे असे अचूक वर्णन केले आहे. त्यावेळी आकाशमार्ग उपलब्ध नसतानाही हे अचूक वर्णन कसे केले असेल हे आश्चर्य वाटते. अजून एक महत्वाचे म्हणजे राम सीतेला शोधण्यासाठी जात असताना त्या मर्गावर अनेकांनी मदत केल्याने परतीच्या प्रवासात पुन्हा राम त्या ठिकाणी थांबले पण सीता विमानातून न उतरल्यामुळे त्या भागात कुठेही सीतेचे मंदिर नाही. फक्त राम -लक्ष्मण यांची मंदिर आढळून येतात.

अतिशय सुंदर फोटोग्राफी या पुस्तकात बघायला मिळते. एक आगळे – वेगळे प्रवास वर्णन तेही वाल्मिकी, कालिदास, भावे यांच्या लेखणीतून साकारलेलं. वाचनीय असेच हे पुस्तक आहे.

परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माझे दगडाचे हात” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री सुधाकर इनामदार ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “माझे दगडाचे हात” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री सुधाकर इनामदार ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक           : माझे दगडाचे हात (काव्यसंग्रह) 

कवी             :  श्री सुधाकर इनामदार

संपर्क: 9421122017

मूल्य : रु. 200/_

प्रकाशक: तेजश्री प्रकाशन, कबनूर. 8275638396

परिचय : सुहास रघुनाथ पंडित 

☆ माझे दगडाचे हात : दगडाच्या हातातून पाझरलेली काव्यगंगा ☆

… सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी तालुका म्हणजे साहित्यिकांची खाणच ! याच तालुक्यातील गोमेवाडीचे कवी श्री. सुधाकर इनामदार यांचा ‘ माझे दगडाचे हात ‘ हा काव्य संग्रह काही महिन्यांपूर्वी सांगलीत प्रकाशित झाला. हा त्यांचा चौथा काव्य संग्रह. उत्तम गझलकार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच. पण या काव्यसंग्रहामुळे त्यांचे गझलेतर काव्य प्रकाशात आले आणि काव्य रसिकांना एक नवे लेणे प्राप्त झाले. त्या लेण्याचे यथाशक्ती दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न !

कविता काय असते, कवितेची ताकद काय असते हे सांगताना ते पहिल्याच कवितेत म्हणतात की कविता ही विश्वाला व्यापून उरणारी असते. ती मौनाला फुटलेला अक्षरपान्हा असते. करुणा, वेदना, भूक, तृप्ती अशी कवितेची अनेक रुप त्यांना दिसतात. एवढेच नव्हे तर आत्महत्येच्या अविचारापासून परावृत्त करण्याचे सामर्थ्यही कवितेत आहे असा विश्वास त्यांना कवितेबद्दल आहे. त्यामुळेच कुटुंबातील वातावरण काव्य निर्मितीला पोषक नसतानाही त्यांनी कवितेला दूर लोटलं नाही. कारण ज्या कवितेने विठूलाही बांधून ठेवलं आहे तीच कविता आपल्या रक्तातून वाहते आहे, ती दूर करता येणारच नाही याची जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच झाली आहे. मग हा प्रवास अव्याहतपणे चालू राहीला आणि कवितेच्या हव्यासाने लाभलेली फकिरी ही सुद्धा अमीरी वाटू लागली. कविता गझल, अभंग, ओवी होऊन ह्रृदयातून पाझरु लागली. कधी ती गवतासारखी मुलायम बनली तर कधी तलवारीची धार होऊन तळपू लागली. कवितेच्या सामर्थ्यामुळे कवी इतका सामर्थ्यवान बनला की तो आत्मविश्वासपूर्ण सांगू शकतो की 

“अंथरुनिया समुद्र अवघा

 घेऊन निजलो चंद्र उशाला

 पांघरुनी आकाश घेतले

 पायाशी बसवले तमाला “

कविचा कवितेविषयीचा हा दृष्टीकोन, विश्वास म्हणजे कवीच्या रक्तात कविता किती भिनली आहे याचे द्योतक आहे.

 झाड, पारध, चिमणे यांसारख्या काही रुपकात्मक कवितांतूनही कवीच्या भावना व्यक्त होतात.

सुखासुखी जीवन जगणं कुणाला नको असतं ? पण राजमार्ग सोडून संकटांना सामोरं जाणं ज्याला जमतं त्यालाच जगणं समजतं. वादळवा-याशी टक्कर देत उभं असलेलं झाड म्हणून तर कविला आकर्षित करत नसेल ना ? कविला झाड व्हायचय. ते इतक सोप नसतं हे त्याला माहित आहे. पण तरीही त्याला झाड व्हायचंय. बहरणं असणार तशी पानगळही असणार. पाऊस बरसणार. विजा झेलाव्या लागणार. सावली देऊनही कु-हाडीचे घाव सोसावे लागणार. पण हे सगळ्याला त्याची तयारी आहे. कारण स्वतः मातीखाली मुजून दुस-यासाठी वर फुलून येण्यातली सार्थकता कविला अनुभवायची आहे. कवीचं मातीशी असलेलं नातं कधीच तुटणार नाही हेच यातून स्पष्ट होतय.

‘पारध’ ही कवितेतून कवीने गावरान वातावरण निर्माण करत एक मोलाच इशाराही देऊन ठेवला आहे. रानाची राखण करता करता आपली पारध होणार नाही याची काळजी घ्यायचा सल्ला देताना काळाच्या बेरकेपणाची जाणीव करुन देऊन सर्वांनाच सावध केलं आहे. तरारलेल्या रानाची राखण करताना खडा पहारा तर हवाच पण त्याच रानाची भुरळ पडू देऊ नकोस, गाफील राहू नकोस ही रुपकात्मक भाषा ‘ ऊसाला लागलं कोल्हा ‘ ची आठवण करुन देते. ‘चिमणे ‘ या कवितेतून कवीने चिमणीशी साधलेला संवाद हा सावधानतेचा इशारा देऊन स्त्रीचे बळ वाढवणाराच आहे.

त्यांच्या अनेक कवितांमधून विठूमाऊलीचा उल्लेख आढळतोच. पण काही कविता या भक्तिरसात न्हाऊन निघाल्या आहेत. ’ धाव रे विठ्ठला, तुझा कैवल्याचा मळा ‘ यासारख्या कविता आपल्याला त्यांच्या सश्रद्ध मनाचे दर्शन घडवतात. तरी सुद्धा…..

 “ज्यांच्या तळहाती घट्टे

 आणि भाळावर घाम

 कसा आठवावा त्यांना

 सांज सकाळचा राम “

हा प्रश्न त्यांना पडतोच. या विठुरायाचे गुणगान गाताना ते दुस-या देवाला- देशालाही- विसरत नाहीत.

संतांची, शूरांची भूमी असलेल्या या भूमीचा जयजयकार करुन ते थांबत नाहीत तर वास्तवाचे भान ठेवून सांगतात ” सावध ठेवा सीमा अपुल्या करेल शत्रू मारा “. ही सावधानता डोळस भक्तीची द्योतक आहे.

‘जख्ख दुपारी ‘…. ही कविता म्हणजे एक उत्तम शब्दचित्रच आहे. भर दुपारच्या रखरखराटाचे केलेले वर्णन वाचून कवीच्या निरीक्षण शक्तीचा अंदाज येतो. पोरकी पेठ, सुनामुका माळ, कळसाची सावली, पडलेला वारा यासारखे संदर्भ दुपारच्या तीव्रतेचे नेमके चित्रण करतात. दुपार किती ‘ जख्ख ‘ आहे ते डोळ्यासमोर येते.

कवितेवर प्रेम करणारा असा कोणताच कवी नसेल की ज्याने प्रेमकवीता लिहीली नाही. कवी सुधाकर हेही याला अपवाद नाहीत. तिची उडणारी बट, फडफडणारी ओढणी, तिच्या पैंजणांचा नाद कवीला आकृष्ट करुन घेतातच. पण तिच्या मनाच्या समुद्रात वादळ उठतेय आणि इकडे त्याची ओली सळसळ त्याच्या इंद्रियात होतेय. या सळसळीतून नकळत मुरलीचे सूर झरे लागतात. कृष्ण कृष्ण रहात नाही. राधा राधा रहात नाही. कारण

“मी कृष्ण सावळा होतो

 तू शुभ्र पिठोरी राधा

 मज डसते शुभ्रता आणिक

 तूज डसते सावळबाधा “

अशा एकरुपतेनेच मग तिच्या परिस स्पर्शाने त्याचे लोखंडी ओठही सोन्याचे होऊन जातात. तर कधी तिच्या येण्यानेच डोळ्यांना भाषा सुचते आणि मौनाचे अक्षर होते. ही प्रेमाची किमया त्याची खात्री पटवून देते की तिचं चंद्रकोरी लेणं आपल्या मिठीत लाभलं की आपले दगडाचे हात सुद्धा मेणाचे बनून जातील.

कविता संग्रहातील अनेक कविता कवीच्या चिंतनशील मनाची साक्ष पटवतात. दुःखाकडे पाहण्याचा कविचा दृष्टिकोन काय आहे हे ‘दुःख ‘ या कवितेत व्यक्त झाले आहे. शेवटी कवी म्हणतो…

“पडझडत्या सुखांना 

 दुःख घालते लिंपण 

 दुःख म्हणजे सुखाच्या

 नाकामधली वेसण “

कवीच्या दुःखाविषयीच्या चिंतनातून आलेले हे नेमके शब्द आपल्यालाही विचार करायला लावतात. म. वाल्मिकींच्या महाकाव्यापासून वाहत आलेली ही दुःख सरिता आजच्या काव्यातही जीवंत आहे. पण कवी या दुःखाला कवटाळून न बसता मशाल होऊन दाही दिशा उजळण्याची जिद्द बाळगतो. कवी म्हणतो

“माझ्यातच माझी बीजे

 मी रोज पेरती करतो

 मी काळीज नांगरणारा 

 ह्रृदयाची शेती करतो “

मग असेच कधीतरी

“परसामध्ये स्मृती पेरल्या

 त्याचे होते झाड उगवले

 सुखदुःखाच्या फुलाफळांनी 

 अंगोपांगी पूर्ण लगडले. “

तर कधी कवी अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा त्याला स्वतःतील (खरे तर आपल्या सर्वांतील) दोष, दुर्गुण दिसू लागतात आणि कशासाठी जगतोय आपण असे वाटावे इतकी उद्वीग्नता मनात निर्माण होते. मला डोहात नेऊन बुडवा आणि तरंगलो तरी वाचवू नका असे बजावणारी ‘ मला बुडवा डोहात…. ‘ ही कविता सर्वांनी आवर्जून वाचावी अशी आहे. या चिंतनशिलतेमुळेच कवी पुढे एका कवितेत म्हणतो,

“ह्या मौनातील शब्दांच्या

 मी रोज ऐकतो हाका

 श्र्वासांच्या हिंदोळ्यावर 

 मी रोजच घेतो झोका “

आपण कोण आहोत, कसे आहोत याची जाणीव कविला असल्यामुळेच कवी म्हणतो

“मी फक्त धुलीकण आहे

 ह्या संतांच्या पायाचा “

याहून दुसरी थोरवी कविला नको आहे. त्याची इच्छा एवढीच आहे,

“त्या पावन मातीमध्ये

 माझाही शेवट व्हावा

 इतकेच वाटते माझा

 जळण्यातच जन्म सरावा “

दुस-यासाठी जळण्याचे हे बळ संतांच्या, संतसाहित्याच्या शिकवणुकीतूनच मिळाले आहे. त्यामुळे देहाचा आणि आत्म्याचा संवाद चालू आहे असे कवी म्हणू शकतो. माणूस म्हणजे भरवसा नसलेल्या देहाचा दास आहे, त्याचा श्वासही त्याच्या ताब्यात नाही हे संतांनी सांगितलेले तत्वज्ञान कवी सोपे करुन आपल्याला सांगू शकतो ते चिंतनशीलतेमुळेच !

‘पाऊलखुणा ‘ आणि ‘ह्याच अंगणात ‘ या कविता भूतकाळात घेऊन जाणा-या आहेत. धुळीची वाट, आमराई, पाखरे, गायी, गुरे कविला अजूनही खुणावत आहेत. गावाची, घरातल्या अंगणाची आठवण मनात घर करुन बसली आहे. या मातीनेच आपल्याला घडवले आहे याची जाणीव कवीला आहे. तो कृतज्ञतापूर्वक म्हणतो,

“आज सोहळा शब्दांचा जो माझ्या ओठी आला

अंगणातल्या ह्याच मातीने जन्माला घातला “

संग्रहात काही अभंग रचनाही आहेत. तुकोबाची शेती, दळण, लोकोद्धार, जन्माची चाहूल यासारख्या अभंगांतून तुकोबांचे कार्य, प्रपंचाचे चित्रण, वर्तमान स्थिती असे विविध विषय हाताळले आहेत. तर वैरीण होते नीज, विराणी या कवितांतून समाजातील उपेक्षित स्त्रीयांचे दुःख प्रभावीपणे मांडले आहे.

या संग्रहातील कविता वाचताना विषयांची विविधता आहे हे लक्षात येते. तरीही सभोवतालचे जग, परिसर, वर्तमान परिस्थिती या सर्वांकडे कवीचे लक्ष असल्यामुळे सामाजिक आशयाच्या कविता संख्येने जास्त आहेत. जवळ जवळ निम्म्या कविता या सामाजिक जाणिवेतून जन्माला आल्या आहेत. असे असले तरीही प्रत्येक कवितेची मांडणी भिन्न भिन्न असल्यामुळे सर्वच कविता वाचनीय आहेत.

अशा सर्व कवितांचा उल्लेख करण्यापेक्षा काही काव्य पंक्ती पाहिल्या तर कवीच्या मनातील अस्वस्थतेची कल्पना येईल.

… समस्यांचा डोंगर पार करत जगणं हे मुश्किल होऊन गेलं आहे. त्याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. कवी म्हणतो,

 “लाख समस्या लाख प्रश्न 

 त्याचं द्याल का उत्तर

 स्वप्नांवरती आश्वासनांच

 शिंपडू नका अत्तर “

तुटणारी नाती पाहून तो अस्वस्थ होतो….

” घरांस आले कुंपण आणिक

 बंद जाहली दारे

 चार भिंतीच्या विश्व आतले

 आम्हा वाटे प्यारे “

माणसाचे माणूसपण संपत चालले आहे हे पाहून कवी लिहीतो,

“मज नख्या सुळे फुटल्याने

 मी क्रूर भयानक झालो

 मी मनुष्य असलेल्याचे 

 नुसतेच कथानक झालो. “

चांगुलपणाची होणारी अवहेलना पाहून कवी लिहितो……

“इथला प्रत्येक चांगला माणूस

 मेल्यावरती संत झालाय “

 

”जितके झेंडे तितक्या जाती “

ही वस्तुस्थिती आहे.

 

 ” सत्तेमधुनी मिळतो पैसा

 सत्तेवरती टोळ्या जगती

 लाल फितीचे नाल ठोकले

 फक्त कागदी घोडे झुलती “

किंवा 

 “जन्माच्या सगळ्या वाटा

 मरणाने मिंध्या केल्या

 हे दलाल आले ज्यांनी

 मातीच्या चिंध्या केल्या “

हे शब्द दाहक सत्य प्रभावीपणे मांडत नाहीत काय ?

अशा अनेक काव्यपंक्ती उद्धृत करता येतील ज्यातून कवीने समाजाचे वास्तव चित्रण नेमकेपणाने केले आहे. असत्य, दांभिकपणा, नीतीहीनता, भ्रष्टाचार यांनी समाज पोखरून निघाला आहे. सत्ता आणि संपत्ती यांचे साटेलोटे असल्यामुळे मूल्यहीन जीवनपद्धती फोफावत चालली आहे. आपल्या कवितांमधून कवीने हे स्पष्टपणे मांडले आहे.

कोणतेही पुस्तक म्हटले की प्रस्तावना आलीच. पण या कवितासंग्रहात मात्र स्वतः कविनेच कवितेआधीचा संवाद साधला आहे. हा संवाद ‘ऐकल्याशिवाय ‘ म्हणजेच वाचल्याशिवाय पुढे जाणे योग्य ठरणार नाही. कारण कवितेकडे प्रथमपासूनच अत्यंत गंभीरपणे पाहिले असल्यामुळे कवीची कवितेविषयीची भूमिका काय आहे, कविता निर्मिती मागची प्रेरणा काय आहे या प्रश्नांची उत्तरे या संवादात मिळतात. त्यामुळे पुढे कवीच्या रचना वाचताना प्रत्येक कवितेमागची भावना समजून घेणे सोपे जाते. या संवादात कवीने स्वतःचे अंतरंग उघडे करताना अनेक ठिकाणी, नकळतपणे, काव्य निर्मितीविषयी प्रकट चिंतन केले आहे जे सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. स्वतःचा खरा चेहरा असणारी कविता कशी आकारत जाते हे समजू शकते किंवा कवितेच्या आकृतीबंधाचे त्यांनी केलेले विश्लेषण वाचनीय आहे. स्वतःच्या अनुभवातून लक्षात आलेल्या काव्य निर्मितीच्या प्रमुख जागा त्यांनी दाखवून दिल्या आहेत. काव्यगंगेच्या एवढे खोलीपर्यंत शिरुनही ते नम्रपणे म्हणतात मी काव्य-वारीचा एक साधा पाईक आहे. काव्याच्या पेशी रक्तात भिनलेल्या असल्यामुळेच ते म्हणतात

 ” ह्या नव्हेत नुसत्या कविता

 आत्माचे लेणे आहे “

फत्तरांनी गीत गावं त्याप्रमाणे दगडाच्या हातांनी कोरलेलं हे आत्म्याचं काव्यलेणं डोळे भरुन पहायला नव्हे वाचायलाच हवं. अशीच दुर्मिळ काव्यलेणी यापुढेही त्यांच्या हातून कोरली जावोत हीच सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)” – संकलक / संपादक : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल — मराठी भावानुवाद – सुश्री शिल्पा शशिकांत वाडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)” – संकलक / संपादक : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल — मराठी भावानुवाद – सुश्री शिल्पा शशिकांत वाडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ 

पुस्तक : भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)

संकलन / संपादन : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल 

मराठी अनुवाद : शिल्पा शशिकांत वाडेकर

पृष्ठे: १३६ (मोठा आकार)

मूल्य : ३००₹ 

परिचय : हर्षल भानुशाली 

आपल्यापैकी अनेक जण दररोज आंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करतो. देवाचे नामस्मरण करत असताना काहीजण श्लोक, स्तोत्र म्हणत असतील.

‘भारत एकात्मता स्तोत्र’ हे एक असे पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्या देशातील नदी, पर्वत, तीर्थक्षेत्र, वेद, पुराण, उपनिषद, धार्मिक ग्रंथ, विद्वान, पराक्रमी महिला, पुरुष, संत, कवी, लेखक, वैज्ञानिक, क्रांतिकारक, शूरवीर राजे, समाजसुधारक आदींवर स्तोत्र रचण्यात आले आहे.

या पुस्तकात एकूण ३३ स्तोत्र आहेत. प्रथम सर्व ३३ स्तोत्र एकत्रित दिले आहेत. त्यानंतर प्रत्येक पानावर एक-एक स्तोत्र देऊन त्या स्तोत्राचा मराठी अनुवाद ठळक अक्षरांत विस्ताराने चित्रांसह दिला आहे. त्यातील पहिल्या स्तोत्रात ईश्वराचे स्मरण केले आहे. तो स्तोत्र आहे 

ॐ ज्योतिर्मय स्वरूपाय विश्वमांड्ङ्गल्यमूर्तये ।।

ॐ सच्चिदानन्दरूपाय नमोऽस्तु परमात्मने।

अर्थ : ॐ ज्योतिर्मय स्वरूपसंपन्न अशा विश्वाचे कल्याण करणाऱ्या, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यास नमस्कार असो.

दुसऱ्या स्तोत्रात पंचमहाभूत, ग्रह, स्वर, दिशा, काल याची माहिती आहे, तिसऱ्या स्तोत्रात भारतमातेला वंदन केले आहे. चवथ्या स्तोत्रात देशातील प्रसिद्ध अशा पर्वतांची, पाचव्या स्तोत्रात प्रमुख नद्या, सहाव्या आणि सातव्या स्तोत्रात तीर्थक्षेत्रांची माहिती देताना थोडक्यात त्यांचा इतिहासही सांगितला आहे. आठव्या स्तोत्रात विश्वविख्यात अशा चार वेद, १८ पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत भगवद्‌गीतांचा आदींचा उल्लेख आहे. नवव्या स्तोत्रात जैन, बौद्ध, शीख या पंथांच्या ग्रंथांचा उल्लेख आहे.

दहाव्या आणि अकराव्या स्तोत्रात प्राचीन विद्वान, संत, शूर अशा महिलांचा समावेश केला आहे. त्यांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

बाराव्या आणि तेराव्या स्तोत्रात प्रभू श्रीराम ते भगवान परशुराम, १४व्या स्तोत्रात समाजामध्ये आदराचे स्थान मिळविणाऱ्या प्राचीन व्यक्ती, पंधराव्या स्तोत्रात विविध पंथातील वंदनीय व्यक्तींचे स्मरण केले आहे. १६व्या, १७व्या व १८व्या स्तोत्रात विविध राज्यांतील संतांची माहिती देण्यात आली आहे. १९व्या स्तोत्रात देशभक्त बिरसा मुंडा, सहजानंद आणि रामानंद स्वामी यांची माहिती दिली आहे. २०व्या आणि २१व्या स्तोत्रात साहित्य, कला क्षेत्रातील, २२व्या आणि २३व्या स्तोत्रात – ऋषी, पराक्रमी राजांची माहिती देण्यात आली आहे.

२४व्या आणि २५ व्या स्तोत्रात देशातील प्रमुख प्रशा महापराक्रमी महाराजांचा परिचय, २६व्या आणि २७व्या स्तोत्रात- भारतीय परंपरेतील प्राचीन व आधुनिक वैज्ञानिक ऋषी, गणितज्ञ यांची माहिती, २८व्या आणि २९व्या स्तोत्रात १९व्या शतकातील संत, समाजसुधारक, ३०व्या आणि ३१व्या स्तोत्रात भारतीय समाजावर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्तींचा परिचय देण्यात आला आहे.

३१व्या स्तोत्रात – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर (गुरुजी) यांचा परिचय देण्यात आला आहे. ३२व्या स्तोत्रात या भारतभूमीवर जन्म घेतलेल्या अनेक अज्ञात महापुरुषांचे स्मरण करण्यात आले आहे. तो स्तोत्र असा आहे-

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तहृदया

अनिर्दिष्टा वीरा अधिसमरमुद्ध्वस्तरिपवः ।

समाजोद्धर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणाः

नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ।। ३२ ।।

वरील सर्व श्लोकांत ज्यांचा उल्लेख झालेला नाही, असेही ईश्वर चरणांवर जीवन समर्पित अनेक भक्त या भूमीवर झाले आहेत. असे अनेक अज्ञात वीर येथे झाले; ज्यांनी युद्धभूमीवर शत्रूचा विनाश केला तसेच अनेक समाजोद्धारक आणि लोकहितकारी विज्ञानाचे आविष्कर्ता येथे झाले. या सर्व सत्पुरुषांना प्रतिदिन आमचा नमस्कार असो.

शेवटच्या ३३व्या स्तोत्रात दररोज सर्व स्तोत्रांचे पठण करण्यास सांगितले आहे. तो स्तोत्र आहे-

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् ।

स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत् ।।३३ ।।

या सर्व स्तोत्रांमध्ये आपल्या देशातील सर्व वंदनीय गोष्टींचा समावेश केला गेला आहे. हे पुस्तक प्रत्येक कुटुंबात असावे, एवढे महत्त्वपूर्ण आहे.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक स्तोत्र म्हटला गेल्यानंतर त्याचा मराठी अर्थही वाचावा. जेणेकरून त्या-त्या स्तोत्रामध्ये कोणाकोणाचा उल्लेख आहे, ते कळेल.

आर्टपेपरवरील अतिशय सुंदर छपाई, रंगीत चित्रे आणि ठळक अक्षरात असल्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “पेशवेकालीन समाज आणि प्रशासन ” – लेखक : गो. बं. देगलूरकर — परिचय – आनंद हर्डीकर☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆

श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पेशवेकालीन समाज आणि प्रशासन ” – लेखक : गो. बं. देगलूरकर — परिचय – आनंद हर्डीकर☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆ ☆ 

पुस्तक : पेशवेकालीन समाज आणि प्रशासन 

लेखक : गो. बं. देगलूरकर,

परिचय : आनंद हर्डीकर

पृष्ठ- ३१० +२० 

मूल्य- ५००₹ फ्री होम शिपिंग

पेशवाईतील समाजाचे वस्तुनिष्ठ दर्शन

महाराष्ट्रातील वैचारिक प्रबोधनाचा ज्यांनी पाया घातला, त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जशा विविध संस्था स्थापन केल्या, तसे अनेक उपक्रमही चिकाटीने राबविले. ‘राईज ऑफ द मराठा पॉवर’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण लयास गेलेल्या मराठेशाहीच्या उत्तरार्धाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असलेल्या पेशवे दफ्तरातील हजारो दस्तऐवजही प्रयत्नपूर्वक मिळवले. रावबहादूर जी. सी. वाड यांच्या सहकार्याने त्यांनी पार पाडलेली ही कामगिरी त्यांच्या इतर कार्याच्या मानाने तशी उपेक्षितच राहिली. न्यायमूर्तींनी पेशवे दफ्तरातले थोडेथोडके नव्हेत, तब्बल ५०, ००० कागद मिळवले होते आणि त्यातले निवडक ५००० कागद ‘डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ या स्वत:च पुढाकर घेऊन स्थापलेल्या संस्थेतर्फे प्रसिद्ध होतील, अशी तजवीजही केली. नऊ खंडांमध्ये प्रसिद्ध करावयाच्या त्या ऐतिहासिक साधनग्रंथाला साजेलशी सामायिक प्रस्तावनाही त्यांनी लिहिली. तथापि ‘पेशवे रोजनिशी’ चे ते खंड प्रकाशित होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. थोड्याशा विलंबाने, पण त्या संस्थेने ते सर्व खंड प्रसिद्ध केलेदेखील. (पुढे यथावकाश संस्थेचे ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असे नामांतर झाले. )

शंभर वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची आज नव्याने दखल घेण्याचे कारणही तसेच महत्त्वाचे आहे. गेली कित्येक वर्षे दुर्मीळ असलेल्या त्या पेशवे रोजनिशीच्या आधारे संस्थेचे विद्यामान अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेला ‘पेशवेकालीन समाज आणि प्रशासन’ हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने हा ग्रंथ लिहून न्यायमूर्तींच्या ‘त्या’ पायाभूत संकलन/ संपादनकार्याला यथोचित मानवंदना तर दिली आहेच, पण तसे करतानाच न्यायमूर्तींनी रोजनिशीच्या नऊ खंडांना लिहिलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केलेली खंत लक्षात घेतली आहे; आणि ती दूर करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ‘पेशवेकालीन इतिहासावर लिहिताना मुख्यत: राजकारण, लढाया यावरच अधिक भर दिला गेला, त्यावेळचे समाजजीवन आणि जनसामान्यांचे जीवन इकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, ’ ही न्या. रानडे यांनी व्यक्त केलेली खंत दूर करणारा हा ग्रंथ म्हणूनही दखलपात्र ठरतो. या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पेशवाईचे गुणगान करण्यासाठी जसा लिहिलेला नाही, तसाच तो मुद्दाम एखाद्या विविष्ट ज्ञातिसमूहावर आगपाखड करण्यासाठीही लिहिलेला नाही. तत्कालीन समाजाचे त्यांच्या गुणदोषासह पारदर्शक चित्र वाचकांसमोर उभे राहावे, याच दृष्टिकोनातून दोन भागांतील एकूण पंधरा प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. पेशवाईतील धार्मिक वातावरण, त्यात सांभाळली जाणारी परधर्मसहिष्णुता, जातिप्रथेचे किंवा गुलामगिरीचे अस्तित्व असतानाच अंगवळणी पडलेल्या माणुसकीच्या प्रथा, विद्वानांचा मान राखला जात असला, तरीही संस्थात्मक औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा जाणवण्याजोगा अभाव, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी कायमची उपचारकेंद्रे उपलब्ध नसली, तरीही गोरगरिबांना मोफत औषधे पुरविणारे वैद्या सर्वत्र उपलब्ध असतील अशी तरतूद, बारा बलुतेदारांच्या मर्यादित ग्रामकेंद्रित अर्थव्यवस्थेवरचा वतनदारीचा प्रभाव, सर्रास रुढ असणारी लाचखोरी, संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी आवश्यकतेनुसार ‘जासूद’ किंवा ‘कासिद’ नेमण्याची पद्धत, आर्थिक व्यवहारांमध्ये सावकारांना दिली जाणारी प्रतिष्ठा व हमी, करदाते समाधानी राहतील अशी महसूलवसुलीची पद्धत, पेठा-वाडे-बागा-मंदिरे या सर्वांची यथायोग्य व्यवस्था पाहणारी नगररचना, महिलांच्या सुरक्षिततेविषयी विशेष दक्षता घेणारी न्यायव्यवस्था, राज्यविस्तार झाल्यानंतरही सह्याद्रीतील गडांवरचा बंदोबस्त कडक राखण्याची दक्षता, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच सुरू झालेले पुण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन… या आणि अशाच इतरही अनेक मुद्द्यांबद्दलचे साधार, सोदाहरण विवेचन आपल्याला या ग्रंथात वाचावयास मिळते.

पुण्यातली सुप्रसिद्ध सदाशिव पेठ म्हणजे पूर्वीचे मौजे नायगाव उर्फ सांडस नावाचे खेडेगाव ही ‘पेशवे रोजनिशी’त सापडलेली नोंद असो किंवा इ. स. १७५२ आणि १८०४-०५ मधील दोन नोंदींच्या आधारे महाराष्ट्रातील एकूण ३०५ किल्ल्यांची दिलेली सूची असो, ‘पेशवे रोजनिशी’ मधील १२६८ कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे परिशिष्ट असो किंवा महाप्रतापी थोरले बाजीराव पेशवे उत्तम ग्रंथसंग्राहकही होते, हे प्रकाशझोतात आणणारे तपशील असोत… या ग्रंथात पानोपानी विखुरलेल्या असंख्य बाबी पेशवाईच्या काळातील समाज आणि प्रशासन याबद्दलचे वस्तुनिष्ठ चित्र उभे करण्यात यशस्वी ठरल्या आहेत, असे जाणवते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे आणि या अभ्यासप्रकल्पात त्यांना साहाय्य करणाऱ्या अविनाश श्री चाफेकर व आनंद नी. दामले या दोघांचेही त्याबद्दल इतिहासप्रेमी अभ्यासक नेहमीच ऋणी राहतील. आणि या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ पुरवल्याबद्दल आयसीएचआरचेही आभार मानायला हवेत.

परिचय : आनंद हर्डीकर 

प्रस्तुती : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “महाभारत युद्धकाळ” – लेखक : श्री नीलेश ओक — भावानुवाद – सुश्री अलका गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “महाभारत युद्धकाळ” – लेखक : श्री नीलेश ओक — भावानुवाद – सुश्री अलका गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली  

पुस्तक: महाभारत युद्ध काळ

लेखक : नीलेश ओक 

मराठी अनुवाद:अलका गोडबोले

पृष्ठ:२१६ मोठा आकार

मूल्य:४५०₹

रामायण आणि महाभारत यांची ऐतिहासिक सत्यता सिद्ध करणारे अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी लिहिलेला हा ग्रंथ!

‘ऐतिहासिक राम‘ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक निलेश ओक यांचे हा महाभारताची ऐतिहासिकता सिद्ध करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुख्यतः त्यांनी खगोलीय घटना यांना केंद्रीभूत धरून लिहिला असला तरीही महाभारताचा कल्पना विलास म्हणून उपहास करणाऱ्यांना सप्रमाण उत्तर आहे.

(महाभारताचे युद्ध दिनांक १६ ऑक्टोबर ५५६१ ते २ नोव्हेंबर ५५६१ दरम्यान झाले आहे…. पण हा कालखंड Before Common Era असा वाचावा !) 

आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करणाऱ्यांना हा ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे…. पण ज्या वाचकांना दृश्य खगोलशास्त्राचा परिचय नाही अशांसाठी प्रकरण तीन आणि चार मदत करतात आणि वाचकाला याबत साक्षर करतात.. विविध आकृत्या, तक्ते आणि कोष्टकांनी भरून गेलेला ग्रंथ!

महाभारत आणि रामायण यांचा जगावर प्रचंड प्रभाव आहे. या ग्रंथांनी भारतीय जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा पाया घातला आहे. हा आपला अभिमानास्पद इतिहास आहे….. पण भारतीयांची अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून रामायण महाभारत सारख्या इतिहासाला कल्पना विलास म्हणून हिणवलं गेलं. ही एक बाजू जरी खरी असली तरीही महाभारत वास्तवात होऊन गेलं आहे, असे म्हणणाऱ्यांनी देखील खगोलशास्त्रीय निरीक्षणं दुर्लक्षित केली आहेत. त्यात सर्वात महत्वाचं निरीक्षण म्हणजे “अरुंधती तारा !”

लेखक निलेश ओक म्हणतात, ” महाभारत युद्धाची तारीख निश्चित करण्यात जर अरुंधती हा सर्वात असंदिग्ध खगोलशास्त्रीय पुरावा म्हणून पात्र ठरत नसेल तर महाभारतातील खगोलशास्त्रीय पुराव्यांबद्दल बोलणेच थांबवले पाहिजे. “

पुस्तकातील उत्कंठावर्धक भागाची सुरुवात पाचव्या प्रकरणापासून होते. पण पहिली चार प्रकरणही तितकीच महत्त्वाची आहे. ही प्रकरणे खगोलशास्त्र समजून घेण्यासाठी फार मदत करतात. ज्यांना यात रस आहे, अशांना हा ग्रंथ फार मोठी मेजवानी!

प्रस्तुत ग्रंथ हा महाभारताची कथा सांगणारा नसून महाभारताचा कालावधी आणि तो कालावधी सिद्ध करणारा संशोधनात्मक अभ्यास आहे. ज्यांना कालगणना, अवकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र…. आदी गोष्टींची किमान तोंडओळख आहे, खगोलशास्त्र, ज्योतिष शास्त्र यांची तोंडओळख आहे, अशा वाचकांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक पर्वणी!

पहिल्या प्रकरणात लेखक मुख्य समस्या आणि विशिष्ट ध्येयांची यादी देतो. मुख्य समस्या म्हणजे “महाभारत युद्ध केव्हा झाले?”

दुसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाच्या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवरील गृहीतकांची यादी आहे. काही सिद्धांतांचा डळमळीतपणाही लेखकाने ठळकपणे मांडला आहे. याच प्रकरणात लेखकाचा सिद्धांत आणि तो सिद्धांत तपासून पाण्याची कार्यपद्धती दिली आहे.

तिसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाने खगोलशास्त्रीय निरीक्षणे आणि त्यांची स्पष्टीकरणे समजावीत या दृष्टीने खगोलशास्त्रातील मूलभूत गोष्टी दिल्या आहेत. जसे की पृथ्वीचे चलन संपातबिंदूची घटना, संपातबिंदूमुळे घडणारी उत्तर ध्रुवाची हालचाल, सूर्य आणि चंद्रग्रहणे, ग्रेगोरियन आणि ज्युलियन दिनदर्शिका… इत्यादी.

प्रकरण चार हे अद्वितीय अशी भारतीय आणि महाभारतातील खगोलशास्त्र आणि दिनदर्शिका यांच्या संकल्पना समजावून सांगते. या प्रकरणात भारतीय दिनदर्शिकेचे चांद्र सौरस्वरूप समजावले आहे. मास, पक्ष, तिथी आणि नक्षत्र समजून घेणे सोपे होते.

प्रकरण पाच मध्ये महाभारतातील अनेक निरीक्षणांपैकी एकाचा विचार केला आहे.

प्रकरण सहावे अरुंधतीच्या निरीक्षणाची समस्या आणि त्या समस्येवरील लेखकाचे उत्तर याची चर्चा करते.

सातव्या प्रकरणांमध्ये अरुंधती निरीक्षणाने परिभाषित केलेल्या कालखंडाचा शोध घेतला जातो. त्यासाठी महाभारतातील ग्रह आणि धूमकेतू यांच्या वर्णनाची मदत घेता येते.

आठव्या प्रकरणात महाभारतातील निरीक्षणे विशेषता महाभारत युद्धाच्या 18 दिवसातील चंद्राच्या कला आणि स्थिती यांचा उपयोग केला आहे.

नव्या प्रकरणात लेखकाच्या सिद्धांताच्या आणि त्यात केलेल्या अंदाजाच्या विरोधात असणाऱ्या महाभारतातील निरीक्षणांचा विचार केला आहे आणि पर्यायी स्पष्टीकरणे सुचवली आहेत.

दहाव्या प्रकरणांमध्ये स्वयंभूचे लेखक प. वि. वर्तक यांच्या सिद्धांताची रूपरेषा मांडली आहे.

अनुक्रम:

१. समस्या

२. सिद्धांत अनुमान आणि पार्श्वभूमीवरील ज्ञान

३. खगोलशास्त्राची तोंड ओळख

४. महाभारतातील खगोलशास्त्र

५. मत्सरी बहीण आणि अभिजीत चे पतन

६. अरुंधतीचे युग

७. ३६ गुण जुळले महाभारत युद्धाच्या वर्षाचा शोध

८. महाभारत युद्धाचा पहिला दिवस चंद्राच्या कला आणि स्थिती

९. परस्पर विरोधी निरीक्षणे

१०. प वि वर्तक यांचा सिद्धांत

११. अधिक चांगला योग्य सिद्धांत

१२. परिणाम भाकीते अंदाज आणि नवीन समस्या

१३. टिपणे, निवडक संदर्भ ग्रंथ, तक्ते आणि आकृत्या

लेखक परिचय : अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी रामायणासह महाभारताच्या कालनीश्चितीसंदर्भाने संशोधन केले असून सिद्धांत मांडला आहे. आपल्या सिद्धांतातून समोर आलेली माहिती या दोन ग्रंथात त्यांनी मांडली आहे. रामायणाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण १२, २०९ वर्षे आहे, तर ऋग्वेदाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण २४ हजार वर्षे असल्याचे त्यांनी खगोलशास्त्रीय पुराव्याच्या आधारे दाखवून देतात.

महाभारतासंबंधाने नीलेश ओक सांगतात “महाभारताची कालनीश्चिती करण्यासाठी मी जवळपास ३०० हून अधिक खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला. माझ्या संशोधनानंतर महाभारताचा काळ आजपासून ७५०० वर्षे आधीचा असल्याचे सिद्ध झाले. परंतु, आपल्यापैकी अनेकजण भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना ५ हजार वर्षे आधी असा करतात, जे चुकीचे आहे. कारण भारतीय संस्कृती त्याआधीपासून अस्तित्वात आहे. ”

यामध्ये अजून एक मुद्दा आहे आजवर आपल्या भारताचा इतिहास हा आधी इंग्रजांनी आणि त्यानंतर आलेल्या कम्युनिस्ट प्रणित इतिहास करते आणि आपला इतिहास हा हजार पंधराशेच्या वर्ष मागे नेला नाही आणि म्हणून आम्ही सगळे मागासलेले असं ठरवण्यात असा शिक्का मारण्यात ते पटाईत झाले आणि त्यांची ओढणारे इथले तथाकथित इतिहास तज्ञ त्यातच धन्यता मानू लागले. या सगळ्याला आता एक निश्चितच आळा बसून आपला इतिहास असंख्य हजार वर्ष जुना आहे आणि तो अतिशय समृद्ध असा आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. या दृष्टीने या पुस्तकाचे खूप अतिशय महत्त्वाचं महत्त्व आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र) => लेखक : मा. यशवंतराव चव्हाण ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र) => लेखक : मा. यशवंतराव चव्हाण ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

पुस्तक : “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र)

लेखक : मा. यशवंतराव चव्हाण.

रोहन प्रकाशन

पृष्ठे-३१७

मूल्य-३००₹

☆ ‘कृष्णाकाठ‘- एक आदर्श राजकीय जडणघडण –  सुश्री सुचित्रा पवार  ☆

महाराष्ट्र मातेला लाभलेला एक आदर्श व्यक्तिमत्व. खरे तर हे त्यांचे आत्मचरित्र नसून एका यशस्वी नेत्याचा खडतर प्रवास आहे. एखादे लाडके, आदर्श, महान व्यक्तिमत्त्व मोठ्या घरात किंवा श्रीमंत घरात जन्म घेतल्याने घडते असे नसून आपल्या अंगच्या चांगल्या गुणांचे उदात्तीकरण केल्याने व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरच घडते हे अधोरेखित करणारा यशवंतराव चव्हाणांचा हा थोडक्यात जीवनप्रवास. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म  ते प्रथम पार्लमेंटरी सेक्रेटरी पर्यंतचे त्यांच्या जीवनातील चढ उतार व स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग याचा तटस्थ मागोवा म्हणजे ‘कृष्णाकाठ’ होय.

या नेत्याबद्दल कुणाच्या मनात प्रेम, आपुलकी, आदर नसेल असा माणूस महाराष्ट्रात विरळाच. मलाही त्यांच्या जीवन चरित्राबद्दल आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाबद्दल कसे न कधी कुतूहल, आदर, आपुलकी न जिव्हाळा निर्माण झाला हे आठवत नाही पण त्यांच्याबद्दल अपार जिव्हाळा आणि कमालीचा आपलेपणा आणि आदर वाटतो हे मात्र खरे.

१२मार्च १९१३ रोजी अशा या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा जन्म विट्याजवळील(जि सांगली) ढवळेश्वर या अतिशय छोट्याशा खेडेगावातील अतिसामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची पण हृदयस्पर्शी कहाणी आहे. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या आई बेशुद्ध झाल्या. देवराष्ट्रे आजोळ, ग्रामीण भाग आणि त्याकाळी दवाखाने, उपचार, औषधे याबाबतीत आपण मागासच होतो. त्यांच्या आईची न बाळाची सुखरूप सुटका व्हावी यासाठी आजीने सागरोबाला साकडे घातले व यश दे म्हणून प्रार्थना केली. झालेच तर तुझी आठवण म्हणून मुलाचे नाव ‘यश’वंत ठेवेन अशीही प्रार्थना केली आणि बाळ बाळंतीण सुखरूप सुटले. त्यावेळच्या आर्थिक सामाजिक परिस्थिनुसारच त्यांचेही बालपण होते. वडील कराडला बेलीफ. दोन थोरली भावंडे व आई यांच्यासोबतच्या सुखदुःखाचा प्रवास, कुटुंबाने वेळोवेळी त्यांना दिलेली साथ, मदत आणि निरक्षर आईचे आपल्या लाडक्या लेकास स्वातंत्र्य चळवळीत झोकून देण्याची संमती याचे वस्तुनिष्ठ चित्रण म्हणजे कृष्णाकाठ.

प्लेगच्या साथीत वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळं लेखकास लहानपणी पित्याचे प्रेम मिळू शकले नाही. लहान लहान मुलांना घेऊन आईने माहेरची वाट धरली. देवराष्ट्रे(जि. सांगली) हे त्यांचे माहेर म्हणजेच यशवंतरावांचे आजोळ. त्यांचे बाल्य इथंच गेले. इथल्या मातीत इथल्या ओढ्याकाठी ते आपल्या सवंगड्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळत, पोहत.

लहान लहान मुले व तुटपुंजे उत्पन्न यामुळे चव्हाण कुटुंबियांचे हाल झाले पण आईने कष्टातून, जिद्दीने त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कारआणि जिवनाचा सुसंस्कार दिला. वडील बेलीफ अर्थात सरकारी नोकरीत असल्याने सांत्वनाला आलेल्या वडिलांच्या एका सहृदय मित्राने(शिंगटे) अनुकम्पा तत्वावर थोरल्या भावाच्या नोकरीसाठी खटपट केली आणि मोठ्या भावाला(ज्ञानदेव)नोकरी लागली व चव्हाण कुटुंब परत कराडला वडिलांच्या कर्मभूमीकडे गेले. तीच यशवंतरावांची देखील एका अर्थाने कर्मभूमीच होती. शिक्षण, व्यवसाय आणि स्वातंत्र्य चळवळीत घेतलेली उडी आणि सक्रिय सहभाग या सर्व बाबी कराड व कराडच्या आसपासच्या परिसरातच घडल्या.

कराडला स्थाईक झाल्यावर त्यांच्या आईने मुलांवर सर्वात महत्वाचा संस्कार दिला तो म्हणजे शिक्षण. कळत्या वयात यशवंतरावाना सुद्धा कळून चुकले की जीवनात व्यवस्थित रित्या तरून जायचेअसेल तर  शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. काही माणसे विशिष्ट कर्मासाठीच जन्माला येतात त्यातलेच एक यशवंतराव देखील. घरात कुठलीच राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी नसताना यशवंतरावांचे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणे आणि नंतर वेगवेगळी राजकीय पदे भूषवणे हे त्याचेच द्योतक आहे.

ते दिवस होते स्वातंत्र्य चळवळींनी भारलेले. करू वा मरू, चले जाव, असहकार, उपोषण अशा नाना चळवळी अगदी टिपेला होत्या. प्रत्येकाचे रक्त स्वातंत्र्य प्रेमाने उसळत होते. (अपवाद देशद्रोही)साहजिकच आसपासच्या वातावरणाचा परिणाम लेखकाच्या मनात खोलवर रुजला. पण तो अगदी मुळापासून होता, त्यांच्या रक्तातच जणू स्फुरण चढले. मनात एखादा विचार खोलवर रुजणे, त्याचा अंगीकार करणे आणि या विचारांशी कुठल्याही परिस्थितीत प्रतारणा न करणे हे कोण्या सोम्या-गोम्याचे काम नसते. पोलिसांची एक लाठी बसली किंवा एक तुरुंगवास भोगला की सामान्य माणूस रुजलेला विचार मुळासकट काढून फेकतो पण यशवंतराव अशा हलक्या मातीचे बनले नव्हते.

शाळकरी वयातच म्हणजे जेमतेम१३-१४ व्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. इंग्रज सरकार विरुद्ध केलेल्या भाषणासाठी त्यांना कैद करण्यात आले पण शाळकरी वय म्हणून एक दिवस तुरुंगात ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिले. यशवंतरावानी आपले विचार, आपण काय करणार?आपल्या जीवनातील सर्व घडामोडींची चर्चा प्रत्येक वेळी आपल्या मोठ्या भावांशी आणि आईशी केली. आसपासच्या भीतीदायक वातावरणाचे व धर पकडीचे भय व आपल्या मुलाची काळजी त्यांच्या आईला वाटणे साहजिकच आहे पण त्या माऊलीने आपल्या मुलाच्या कोणत्याच धाडसाला विरोध केला नाही. फक्त शाळा न सोडता, शैक्षणिक नुकसान न करता जे काही करता येईल ते करण्याचा सल्ला दिला आणि यशवंतरावांची चळवळीतील घोडदौड  सुरू झाली ती इप्सित धेय्याच्या अलीकडे थांबली.

१९३२ साली यशवंतरावाना पहिल्यांदाच अठरा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. इतकी मोठी सजा प्रथमच तेही अगदी पोरसवदा वयात. त्यांना येरवडा इथं नेले जात असता आई व त्यांचे शिक्षक भेटायला आले होते. आईला अर्थातच दुःख झाले. शिक्षकांनी सांगितले की तू माफी मागीतलीस तर तू सुटशील. पण आईने बाणेदार पणे सांगितले, माफी कशासाठी मागायची?जे होईल त्याला सामोरे जायचे. धन्य ती आई!अशा अनेक माऊलीनी आपले पोटचे गोळे काळजावर दगड ठेवून देशाला दिलेत म्हणून आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. येरवडा येथील तुरुंगात गांधीजी सुद्धा शिक्षा भोगत होते मात्र कैदी जास्त असल्याने जवळच सर्व कैद्यासाठी स्वतंत्र बराकींची व्यवस्था करण्यात आली होती. छोटे छोटे तंबू प्रत्येक कैद्यासाठी उभारले होते. शिक्षा ही शेवटी शिक्षाच असते पण तिथं सहवासात आलेल्या एस एम जोशी व इतर बड्या बड्या आणि महत्वपूर्ण नेत्यांशी, व्यक्तिमत्वाशी ओळख व मार्गदर्शन झाल्याने शिक्षाही जीवनाला दिशा देणारी ठरली आणि सुसह्य झाली. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन व त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चेतून जणू त्यांना भविष्यातील जीवनाचे नवनीत मिळाले. यतींद्रनाथांचा सुद्धा यशवंतरावांवर मोठा प्रभाव होता. त्यांच्या मृत्यूनंतर यशवंतराव खूप दुःखी झाले जणू घरातीलच एखादी व्यक्ती गेली आहे. साने गुरुजींशी झालेली त्यांची भेटसुद्धा उल्लेखनीय आहे.

अठरा महिन्यांची सजा भोगून आल्यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केले. शिक्षणाची आस, जिद्द, स्वातंत्र्य चळवळीतील धाडस व स्वभावातला गोडवा यामुळं शिक्षक प्रिय विद्यार्थी राहिले. पुढं व्यावसायिक शिक्षणासाठी पुणे इथं प्रवेश घेतला. विधी परीक्षा उत्तीर्ण होऊन कराड मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. दरम्यान वेणूताईंशी विवाह देखील झाला.

यशवंतराव भूमिगत असताना सरकारने धरपकड सुरू करून कुटुंबियांना त्रास देणे सुरू केले. मोठ्या भावाची सरकारी नोकरी असल्याने खूप बिकट स्थिती होती. वेणूताईंना आणि त्यांचे मधले बंधू गणपतरावना अटक झाली. यावेळचे दोन प्रसंग खूप हृदय हेलवणारे आहेत. वडीलबंधूंचा गणपतरावांवर जीव होता व 

गणपतरावांचा यशवंतरावांवर. गणपतरावांच्या सजेत  सूट मिळवण्यासाठी ऐकीव माहितीवर घाई घाईने त्यांनी स्वतःच्या आवाळूचे ऑपरेशन करून घेतले. जखम चिघळू नये म्हणून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला त्यांनी मानला नाही आणि जखम चिघळून त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. इकडं गणपतराव सुद्धा क्षयाने आजारी पडले. मिरजेत त्यांचे उपचार सुरू झाले. पण कुटुंबाच्या आर्थिक ओढाताणीसाठी ते आरोग्याकडे दुर्लक्ष करून काम करायला बघायचे व आजार बळावयाचा.

पुढं सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरणारे किंवा स्वतःसाठी पुढं पुढं करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. पण तरीही त्यांची निवड पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून झाली. द्विधा मनःस्थितीतच ते बंधू गणपतराव, पत्नी वेणूताई आणि आईला सल्ला विचारण्यासाठी गेले असता तिघांनीही एकमतांनी पुढं जाण्यास सुचवले आणि त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. लेखक म्हणतात की मुंबईला जाताना मनात असंख्य विचार, पाठीमागील सर्व आयुष्य नजरेसमोर  तरळून गेले. बोगद्यातून गाडी जात असताना ही भविष्यातील चढ उतारांची नांदी तर नसावी ना?असे वाटून गेले.

पुस्तक इथं संपलं. ‘कृष्णाकाठ’ खरे तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या व्यापक चळवळीचा एक अगदी छोटासा कोपरा आहे. पुस्तकातील प्रत्येक घटना प्रसंग त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवते. त्यावरून आपल्याला देशव्यापी चळवळ किती मोठी न व्यापक असेल याची कल्पना येते. लेखक स्वतः या चळवळीचा महत्वपूर्ण हिस्सा असले तरी त्याचे सर्व तपशील, घडामोडी आणि घटना या त्रयस्थपणे मांडल्या आहेत जे होतं तसच्या तसं. इतकेच काय त्यांनी आपल्या कौटुंबिक परिस्थितीचे वर्णन सुद्धा अतिरंजित पणे केलं नाही. नाहीतरी कित्येक लेखकांनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी अतिरंजित, तिखट मीठ लावून सांगून वाचकांकडून दया मिळवली आहे. पण स्वतः लेखकांनी कबूल केलेय की त्यावेळी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची जशी परिस्थिती होती तशीच आमची देखील होती. त्याला मी अतिरंजित करून सांगू इच्छित नाही. त्यांच्या जीवनातील कितीतरी प्रसंग आपल्या अंगावर काटा आणतात. बिळाशीत मैलोन मैलाचा प्रवास करून गुप्तपणे प्रवेश करणे, तिथं सभा घेणे आणि पोलिसांना न सापडता नदीतून पोहत कोल्हापूर गाठणे. मिळेल ती भाजीभाकरी खाऊन पुढचा कार्यक्रम करणे. कार्यकर्त्यांशी गुप्त चर्चा करणे, संघटना बांधणे. कोणत्याही प्रकारची संपर्क साधने नसताना त्यावेळची देशभक्तांची  गुप्तचर संघटना किती प्रभावी व अचूक होती हे पुस्तक वाचताना समजते न आपण मनोमन सर्वाना नमन करतो. शालेय जीवनात शिक्षकांनी “तू कोण होणार?”याचे साधे सोपे उत्तर “मी यशवंतराव होणार”असे दिल्यावर शिक्षकांनी त्यांना गर्विष्ठ, शिष्ट समजणे अशा कुठल्याच प्रसंगात त्यांना तिखट मीठ लावण्याचा मोह झाला नाही.

आपल्या मनमिळावू स्वभावाने माणसे जोडणे त्यांना समजून घेणे व बरोबर घेणे यामुळे ते सर्व मित्रात प्रिय राहिले. आपल्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या व चळवळीस सहकार्य करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सुहृदांचा त्यांनी उल्लेख केलाय आणि आठवणही ठेवली आहे. लहानपणापासून सर्व स्तरातील मुलांसोबत मैत्र केले आणि शेवट पर्यंत ते निभवले. आपले वाचन, चिंतन, मनन यामुळं सभा जिंकत राहिले. सर्वांशीच कृतज्ञता भाव ठेवला.

आपल्या कोमल हृदयामुळे ते सर्वाना आपले वाटले. आजपर्यंत आपण फक्त श्यामची आई वाचली पण यशवंतरावांच्या आईंवर सुद्धा एक स्वतंत्र पुस्तक होईल असे वाटते. पतीच्या पाठीमागे इवल्या लेकरांना खडतरपणे वाढवणारी, प्रत्येक प्रसंगात आपल्या मुलांचा आधार होणारी, कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारी मायाळू आई. जिने देशाला, मराठी मातेला एक थोर सुपुत्र दिला, आदरणीय व्यक्तिमत्व व आदर्श नेता दिला.

इतकी मोठी पदे भूषवून देखील आपली नाळ जन्मभूशी, मातीशी जोडून ठेवणारे विरळाच, यशवंतराव त्यातलेच एक.

या मातेला आणि यशवन्तरावाना माझे कोटी कोटी प्रणाम.

लेखक : मा. यशवंतराव चव्हाण.

समीक्षक – © सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पंदने मनाची” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री ऋचा पत्की  ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “स्पंदने मनाची” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री ऋचा पत्की  ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : स्पंदने मनाची (काव्यसंग्रह)

कवयित्री : सुश्री ऋचा पत्की 

प्रकाशक: मुक्तरंग प्रकाशन, लातूर.

प्रथम आवृत्ती: १० मे २०२३

मूल्य: १५० रुपये.

मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेला माननीय ऋचा पत्की यांचा स्पंदने मनाची हा पहिलाच कवितासंग्रह. मात्र यातल्या सर्व ७५ कविता वाचल्यानंतर असे वाटले की काव्यशास्त्र क्षेत्रातला त्यांचा हा संचार कित्येक वर्षांपूर्वीचा असावा इतकी त्यांची कविता परिपक्व आहे. संवेदनशील, भावुक तरीही वैचारिक. जीवनाची विविध अंगे अनुभवून मनात दाटलेली ही कागदावरची स्पंदने वाचकाच्या मनावर राज्य करतात.

मनोगतात ऋचाताई म्हणतात, “ पुस्तक हेच माझे खरे मित्र या त्यांच्या एका वाक्यातच त्यांची वैचारिक बैठक किती सखोल आणि परिपूर्ण असेल याची खात्री होते. ”

या ७५ कवितांमधून त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. यात निसर्ग आहे, भक्तीभाव आहे, जीवनात घेतलेले निरनिराळे अनुभव आहेत, सुख आहे, आनंद आहे आणि वेदनाही आहेत तशीच नवी स्वप्नेही आहेत. जीवनाबद्दलचा आशावादही आहे. आठवणीत रमणं आहे आणि भविष्याची प्रतीक्षाही आहे.

काव्यसंग्रहाच्या शीर्षकाप्रमाणे खरोखरच ही मनातली स्पंदने आहेत. मनातले हुंकार आहेत पण या हुंकारात फूत्कार नाहीत. यात भावनेचा हळुवार, मनाला सहज जाणवणारा एक संवेदनशील स्पर्श आहे. या कविता जेव्हा मी वाचल्या तेव्हा मला प्रथम जाणवला तो कवयित्रीच्या विचारातला स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा. जे वाटलं, जे डोळ्यांना दिसलं, जे अंतरंगात लहरलं ते तसंच्या तसं शब्दात उतरवण्याचा सुंदर आणि यशस्वी झालेला प्रयत्न आहे.

यातल्या कविता मुक्त आहेत. शब्दांचा, अलंकाराचा, व्याकरणाचा उगीच फापटपसारा नाही. खूप सहजता आहे यात. काही कविता अष्टाक्षरी नियमातल्या आहेत, काही अभंग आहेत, वृत्तबद्ध गझलाही आहेत. सारेच सुंदर ओघवते आणि प्रवाही आहे.

त्यांची बाबा ही कविता वाचताना मला सहजच, “ कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलात “

 या काव्याची आठवण झाली.

 तुमच्या नंतर तव कष्टांची 

आता होते आहे जाणीव

 तुमच्या एका प्रेमळ हाकेची 

फक्त आहे उणीव…

संपूर्ण कविता खूप सुंदर आहे पण या शेवटच्या चार ओळीत पित्याविषयीची ओढ आर्ततेने जाणवते.

चांदणशेला हा शब्दच किती सुंदर आहे !

चांदणशेला पांघरतो

मंदिर कळसावरती 

गाभारी लख्ख प्रकाश 

चमचमती सांजवाती ।।

मंदिरात जात असतानाच त्या भोवतीच्या वातावरणात भक्तीमय झालेल्या मनाला गाभाऱ्यातला देव कसा तेजोमय भासतो याचं सुंदर वर्णन कवयित्रीने या कवितेत केले आहे. ही कविता वाचताना वाचकही सहजपणे त्या अज्ञात शक्ती पुढे माथा टेकवतो.

‘तू‘ ही अल्पाक्षरी कविताही हळुवार पण तितकीच मनाला भिडणारी आहे. एक अद्वैताची ही स्थिती आहे. अद्वैत परमेश्वराशी वा प्रियकराशी पण त्यातला एकतानतेचा भाव महत्त्वाचा…..

देह मी अन

प्राण तू

प्रेम मी अन

विश्वास तू 

तुझ्यातही तू अन 

माझ्यातही तू

या एका कवितेसाठी माझे ऋचा ताईंना सहस्त्र सलाम !

भांडण या कवितेत कविता आणि लेख यांचा एक गमतीदार वाद आहे आणि शेवटी या वादातून उतरलेला समंजसपणा टिपलेला आहे.

 कविता आणि लेख बोलले

 तू मी नसू मोठे आणि छोटे 

आपण ज्यात गुंफले जातो

 ते शब्दच असतती मोठे।। 

शब्दांची महती वर्णन करणारी ही कविता खूप करमणूकही करते आणि बरंच काही सांगून जाते.

‘माणूस ‘ या कवितेत ऋचाताईंनी जगताना त्यांना माणूस जसा दिसला, जसा जाणवला, समजला त्याविषयी सांगितले आहे.

 मदार नसते श्वासावरती

 माझेपण कुरवाळतो माणूस..

एका वास्तवाचा त्यांनी सहजपणे उच्चार केलेला आहे.

 मी या कवितेत त्या सांगतात 

बसेन तेथे समाधीस्थ व्हावे 

तरीही दूरवर भरकटते मी..

या कवितेत घेतलेला आत्मशोध नक्कीच वाचनीय आणि प्रशंसनीय आहे.

‘सारे कबुल आहे ‘ ही एक सुंदर गझल आहे,

 माझ्याच जीवनी काटे पसरले जे 

ते दररोजचे टोचणे मजला कबुल आहे…

…जीवनाविषयीची स्वीकृती या गझलेत प्रकर्षाने जाणवते. आणि आयुष्याचा एक खोल अर्थ लागतो.

‘दिंडी‘ हा विठ्ठल वारीचा काव्यसाज ही मनात टाळ मृदुंगासारखा दुमदुमतो.

 सगुण निर्गुणाचा नाद

 तुळशी माता डोईवरी

 अन वाट सोपी होते

 चालताना घाट वारी ।।

ही कविता वाचताना खरोखरच प्रत्यक्ष आपण वारीत असल्याचा अनुभव मिळतो.

स्पंदने मनाची ‘ ही शीर्षक कविता वाचताना त्यातला नितळपणा जाणवतो. मन या विषयावर कविता करण्याचा मोह कुठल्याही काव्यरचनाकाराला टाळता आलेला नाही. बहिणाबाईंची तर मन खसखशीचा दाणा अशा शब्दवेल्हाळ काव्याचा पगडा मराठी रसिकांच्या मनावर अढळ आहेच.

ऋचाताईंनी या मनाविषयी तितकेच सुंदर भाष्य केलेले आहे.

 मन व्यासंग व्यासंग 

जशी पुस्तकाची खूण

 मन निसंग निसंग 

वाजे अंतरीची धून…

या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे भाषेचं, विचारांचं, कल्पनांचं भावभावनांचं धन आहे.

स्पंदने मनातली वाचकांच्या मनःप्रवाहातही नैसर्गिकपणे झिरपत जातात. या कवितांचे वाचन हा एक सुखानंद आहे, एक सुरेख अनुभव आहे. माझ्या मते जे लेखन वाचकाचं लिहिणाऱ्याशी नातं जुळवतं ते सकस लेखन. ऋचाताईंच्या कवितेत हा सकसपणा निश्चितच जाणवतो.

या कवितासंग्रहाला प्राध्यापक डॉक्टर गोपाल बाहेती यांची सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ” निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते, वेदनेचेही ज्याला गीत करता येते, त्यालाच जगण्याची रीत समजलेली असते. ” … हे अगदी सत्यात उतरल्याची साक्ष ऋचाताईंचा स्पंदने मनातली हा काव्यसंग्रह करून देतो.

अशी ही भावसमृद्ध शब्दांची लेणी ! प्रत्येकानी वाचावी, संग्रही ठेवावी आणि शब्दप्रवाहाच्या सुखद लाटांचा स्पर्श अनुभवावा असेच मी म्हणेन.

पुस्तकाचे मुखपृष्ठ ही अतिशय सुंदर आहे. *मुक्तरंग क्रिएशन*ने केलेले हे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. अरुणोदयाच्या वेळी त्या अस्फुट नारंगी प्रकाशात झोपाळ्यावर झोके घेत असलेली एक मुलगी, हाताच्या बोटावर बसलेल्या पक्ष्याशी जणू काही मनातल्या गुजगोष्टीच करत आहे. तिच्या मनातली स्पंदनं त्या विहगालाही जणू काही जाणवत आहेत…. फारच सुंदर असे हे मुखपृष्ठ !!

“ऋचाताई काव्य प्रवासातलं तुमचं हे पहिलं पाऊल अतिशय दमदारपणे पडलं आहे आणि या शब्दांच्या सागरात नाहताना ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव यामुळे मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद!! तसेच तुमच्या पुढील काव्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! “  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक – अष्टदीप 

लेखक – श्री. विश्वास देशपांडे,

प्रथम आवृत्ती – जुलै २०२२

एकूण पृष्ठ 300

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

या पुस्तकात आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध लेखकाने घेतला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री प्रथमेश नाझरकर यांनी केले आहे ते अत्यंत समर्पक व आकर्षक आहे. ते बघितल्यावर लहानपणीचे थोरांची ओळख व लहान पुस्तकांची चरित्रमाला आठवते. पण या पुस्तकात अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती समजते. लेखकाची भाषाशैली सोपी, सरळ, सुटसुटीत व ओघवती आणि आबालवृद्ध सर्वांना आकलनास अत्यंत सोपी आहे. ती वाचकांना आपलेसे करणारी आहे. वाचक त्यात रंगून जातात.

 

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आठ भारतरत्नांची नावे त्यांच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ठयांसह दिसतात.

त्या नंतर आपण लेखकाचे मनोगत वाचू शकतो. खरे तर बरेचदा मनोगत, प्रस्तावना वाचले जात नाही. परंतु मनोगताची सुरुवात ” आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे “. हे वाक्य पुढचे मनोगत वाचण्याची उत्सुकता वाढवते. हे मनोगत काही संस्कार देते व लेखकाच्या वाचन, लेखन याचा प्रेरणास्त्रोत सांगते.

अष्ट म्हणजे आठ. या आठ महान व्यक्तिंनी दिव्याप्रमाणे उजळून, वाती प्रमाणे जळून निस्वार्थीपणे भारताला उजळून प्रकाशमान करून टाकले. लेखकाच्या भाषेत सांगायचे तर, ‘या सर्वांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत. किंवा ते निराश झाले नाहीत’. हे वर्णन करताना पुढील समर्पक काव्यपंक्ती योजल्या आहेत. “आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर। त्यामुळे हे मनोगत वास्तव व रंजक झाले आहे.

हे पुस्तक म्हणजे फक्त जन्म, मृत्यू व त्रोटक कार्य सांगणारे साधारण चरित्र किंवा निबंध नाही. तर आठ भारतरत्नांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यात आपले विचार जोडून व्यक्तिंकडून वाचकांनी काय घ्यावे, त्यांचे आदर्श कसे रूजवावेत हे सगळे सहज सांगावे अशा ओघवत्या शैलीत सुचवले आहे. लेखकाची शब्द क्षमता, लेखणी सामर्थ बघून ते ‘सिद्धहस्त’ लेखक अहेत हे जाणवते. या आठ भारत रत्नांना जी अर्थपूर्ण विशेषणे वापरली आहेत त्यातून हे लक्षात येते.

मनोगता नंतर ‘प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तक’ हे पुस्तकाविषयी विशेष माहिती देणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख, लेखक व माजी संमेलनाध्यक्ष यांचे विचार वाचायला मिळतात. त्यांचे मनोगत अतिशय वाचनीय व पुस्तकाचे यथार्थ महत्व विशद करणारे आहे.

या नंतर आपल्या समोर अतिशय महत्वाची माहिती सांगणारा लेख येतो. तो म्हणजे ‘ भारतरत्न पुरस्काराविषयी थोडेसे. ‘ हे सगळे लेख मुख्य पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतात. व उत्सुकता वाढवतात. यात प्रत्येक व्यक्तिचे नाव त्यांच्या मुख्य वैशिष्ठयासह वाचायला मिळते. प्रथम आपल्या भेटीला येतात – निश्चयाचा महामेरु महर्षी धोंडो केशव कर्वे.

लेखाचे नाव वाचताच लक्षात येते, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अचल निश्चय असणारे व ठाम ध्येय ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी विधवांचे पुनरुत्थान करून व स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना जगात वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. या काळात समाजाचा झंझावातरूपी विरोध सहन करून हे कार्य करणे, या साठी ठाम निश्चयाचा अचल महामेरूच पाहिजे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुरु झालेली छोटी संस्था आज मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत होऊन अनेक महिलांना सक्षम बनवून त्यांना समाजात ठामपणे उभे करत आहे. त्यांचे हे कार्य लेखकाने इतके प्रभावीपणे मांडले आहे, की त्या काळातील परिस्थतीची वास्तवता लक्षात येते आणि आपण नतमस्तक होतो.

या नंतर बालपणीच देशाचा विचार करणारे, हित जपणारे द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया यांचे चरित्र समोर येते. यांना लहानपणी मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करावे लागले. पण हुशारीच्या आड कोणत्याही गोष्टी येत नाहीत. याच बालवयात धबधबा बघताना त्यांची प्रतिक्रिया इतर मुलांप्रमाणे नव्हती. तर या द्रष्ट्या बालकाच्या मनात असा विचार होता, “केवढा हा पाण्याचा व शक्तीचा अपव्यय, याचा काही उपयोग नाही का करता येणार? मोठा झाल्यावर मी नक्कीच काहीतरी करणार, ” आणि हाच विचार त्यांनी मोठेपणी अंमलात आणला. व आपल्या कार्य कर्तृत्वाने पाणी, बंधारे, कालवे यावर प्रयोग व संशोधन केले. जे आजही आपल्याला उपयोगी पडत आहेत. आणि त्यांना काही पर्याय नाहीत. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा विविध कार्य, त्यांच्या काही इमारती, वृंदावन गार्डन या विषयी अत्यंत आदरपूर्वक लिहीले आहे.

पुढे आपण भेटतो, ते भारत एकसंध करण्याच्या कामी अत्यंत मोलाची कामगिरी करणारे- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना. यांच्या कार्याचा व लोहपुरुष या विशेषणाचा अत्यंत सखोल अभ्यास करून कार्यपट समोर ठेवला आहे. ५६५ संस्थाने किती प्रयत्न पूर्वक आपल्या बुध्दिमत्तेने एका छताखाली आणली व त्या साठी काय काय करावे लागले, याचे अगदी बारकाईने वर्णन वाचायला मिळते. म्हणूनच ते भारताचे ‘लोहपुरूष’ या नावाने ओळखले जातात. भारताची एकता व अखंडता या साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. हे सगळे वाचताना या लोहपुरुषाचे प्रयत्न, विचार यांचे समग्र दर्शन घडते. व हे व्यक्तिमत्व नसते तर काय घडले असते या विचाराने आपला थरकाप उडतो. हे सगळे वाचताना आपण किचकट इतिहास वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही. यातच लेखकाच्या लेखणीचे व अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कसब लक्षात येते.

द्रष्टा उद्‌योगपती जे आर डी टाटा यांचे वर्णन करताना लेखक ‘ ओबड धोबड दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार, हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर ‘ असे शब्द वापरतात. भारतात साखरेप्रमाणे विरघळून जाणे इथपासून टाटांचे खरे देशप्रेम व कार्य याची माहिती मिळते. यांचे चरित्र म्हणजे रत्नांची खाणच! असे वर्णन लेखक करतात. द्रष्टा उद्योगपती आपल्याला सोदाहरण वाचायला मिळतो. त्याच बरोबर सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर, पारख असणारा, अनेक उद्‌योगांची टाटा समूहात भर घालणारा, माणसांचे गुण हेरुन त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा माणूस हळवा व कुटुंबवत्सल होता हे या लेखातून समजते.

यानंतर आपण भेटतो अशा व्यक्तिला, ज्यांची घोषणा लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘जय जवान जय किसान ‘ ते म्हणजे निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी रहाणी, उच्च विचार सरणी असलेला नेता) लाल बहादूर शास्त्री. यांचे जीवन समजणे व समजून घेणे आणि अंमलात आणणे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. परंतू लेखकाने अत्यंत सोप्या नेमक्या व नेटक्या शब्दात सांगीतले आहे. १९४२ ची चळवळ त्यांचा तुरुंगवास, घरची साधी रहाणी, चीनचा विश्वासघात, भारत नेपाळ संबंधात फूट, हजरतबल प्रकरण, रेल्वे अपघात असे अनेक कसोटीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले. पण या सर्वांना समर्थपणे तोंड कसे दिले. व त्यातून त्यांच्या निश्चयी स्वभावाची व उच्च कर्तृत्वाची ओळख अतिशय आदर व कौतुकाने करून दिली आहे.

अजातशत्रू नेता अटलबिहारी वाजपेयी अगदी उचित ‘विशेषण योजून या भारतरत्नाची ओळख करुन दिली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्याच कवितेच्या ओळींमधून सांगीतल्या आहेत. ‘यमुना तट, टीले रेतीले, माँ के मुँह में रामायण के दोहे – चौपाई रस घोले।’

त्यांचे ग्वाल्हेरचे शिक्षण या पासून ते त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांच्या घरी जाऊन दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारा पर्यंत लेखक आपल्याला प्रवास घडवतात. हे सगळे लेखकाच्या अनोख्या शैलीत पुस्तकात वाचणे अधिक योग्य ठरेल.

या नंतर आपल्या समोर येते गान कोकीळा, भारताची शान आनंदघन लता मंगेशकर सर्वच भारतीयांना जिचा अभिमान आहे. जिच्या सुरांनी सर्वावर मोहीनी घातली आहे. जगभरात हा सूर निनादतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी ऐकू येतो आणि जवळीक साधतो असा सूरी जणू या हारातील ‘तन्मणी! या स्वरलतेचे बालपणी पासूनचे टिपलेले सुंदर बारकावे व त्यातून घडलेले संस्कार खूपच वाचनीय आहेत. लता नामक महावटवृक्षाचा एकंदर जीवन प्रवास मांडणे म्हणजे ‘शिवधनुष्य पेलणे आहे. पण लेखकाने ते आपल्या लेखणीने समर्थपणे पेलले आहे. त्यांची सांगीतीक कारकिर्द अतिशय सुंदर व मनोवेधक पध्दतीने उलगडून दाखवली आहे. सर्व बारकावे वाचताना लेखक दर्दी व संगीतप्रेमी आहे, हे लक्षात येते. सदर पुस्तकातील जास्त पाने ‘लतागान’ गुणगुणत आहेत असे जाणवते. तिच्या गाण्याचे रसग्रहण करताना ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ…. ‘ या अभंगाचा आधार घेऊन लता नामक स्वरकमलाकडे रसिक श्रोते भ्रमराप्रमाणे कसे आकर्षित होतात ते सांगीतले आहे. या स्वरसाम्राज्ञीला शेवटी भा. रा. तांबे यांच्या शब्दात भावपूर्ण श्रध्दांजली वाहतात.

या पुस्तकात शेवटी आपण भेटतो ते उज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना. त्यांचे कष्टमय बालपण, निःस्वार्थीपणे केलेली देशसेवा, त्यांचे विद्यार्थी प्रेम, त्यांची रुद्रवीणा वाजवण्याची आवड. त्यांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके हे सर्व बारकावे वाचायला मिळतात. त्यांची अपार विज्ञाननिष्ठा सर्वपरिचित आहे. शिवाय ते दररोज कुराण व भगवतगीता यांचे पारायण करतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली मुळे ते राष्ट्रपती कसे बनले हे सर्व लेखकाच्या दृष्टीतून व सिद्धहस्त लेखणीले लिहीलेले वाचणे अधिक योग्य आहे. सदर ‘अष्टदीप’ पुस्तक आपल्या मनात हे आठ दीप उजळवून आपल्याला प्रकाशमान करून टाकतात.

 या पुस्तकाला नुकताच ‘तितिक्षा इंटरनॅशनलचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मी हे पुस्तक का वाचले?

एकदा रेडिओवर संगीत व माहिती यावर आधारित कार्यक्रम ‘आनंदघन लता मंगेशकर’ ऐकला. त्यातील निवेदक अतिशय शांत, धीरगंभीर आवाजात दिदींची माहिती सांगत होते. व त्यांनी हजारो गाण्यातून निवडलेली प्रसंगानुरूप गाणी लावत होते. चौकशीअंती समजले की या कार्यक्रमाचे लेखन, सादरीकरण करणारे लेखक श्री विश्वास देशपांडे आहेत आणि हे लेखन त्यांच्या ‘अष्टदीप पुस्तकातील आहे. त्यानंतर हे पुस्तक उत्सुकतेने वाचले, तर अतिशय सुंदर चरित्रे समोर आली. याच लेखकांची दहा पुस्तके प्रकाशित झाली अहित. व त्यातील ललित लेखाचे व रामायण महत्व आणि व्याक्तिविशेष याचे सादरीकरण रेडिओवर होत असते. त्यांची सगळीच पुस्तके अत्यंत सकारात्मक, अभ्यासपूर्ण, निरीक्षणात्मक असतात. भाषा अत्यंत सोपी, सहज असते. त्यामुळे ती आपल्याला आपलीच वाटतात.

अशीच अजून पुस्तके यावीत आणि आपण सर्वांनी ती आवर्जुन वाचावित. या सदिच्छेसह धन्यवाद!

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परीक्षणसुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)” – कवयित्री- सुश्री आसावरी काकडे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆

सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)” – कवयित्री- सुश्री आसावरी काकडे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

पुस्तक – स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)

कवयित्री- आसावरी काकडे 

प्रकाशनवर्ष – 2006 

पृष्ठ संख्या -87

 मूल्य -100/

मराठी व हिंदीत कथा, कविता, ललितलेख, पुस्तक परीक्षणे लिहिणाऱ्या सिद्धहस्त अनुवादिका, तत्त्वचिंतक, भाष्यकार, लेखिका कवयित्री आसावरी काकडे यांचा मोठा लेखनप्रपंच आहे. त्यामधील “स्त्री असण्याचा अर्थ ” हा एक छोटा काव्यसंग्रह.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रस्थापित चौकट मोडून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या (स्त्रीसदृश्य) प्रतिकृतींचे पेंटिंग दिले आहे. त्या पुसट असंख्य रेखांमध्ये साध्यासुध्या जगणाऱ्या असंख्य स्त्रिया घडल्या आहेत. मलपृष्ठावर “स्त्री असणं म्हणजे” ही कविता दिली आहे. शीर्षक “स्त्री असण्याचा अर्थ” त्यातून उलगडून दाखवला आहे.

त्या लिहितात,

स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही.

 स्त्री असणं म्हणजे 

अखंड तेवती ठेवणं जिजीविषा,

 टिकून राहणं तुफानी वादळातही,

 जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश- रेखांश

 सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं.. सहवेदना.. प्रेम.. तितीक्षा. “

या प्रस्तुत काव्यसंग्रहात 21 कविता आहेत. सुरुवातीला “देता यावी प्रतिष्ठा” या कवितेत त्या उद्देश बोलून दाखवतात. स्त्रीचे दुःख वर्णन करताना त्या लिहितात,

” दुःखावर दुःख, दुःखापुढे दुःख,

 दुःखापाठी दुःख, चमकते. “

तिच्या या दुःखास ” भूकंप, महापूर, दुष्काळ, ढगफुटी, उल्कापात, दंगली, उन्हाळे पावसाळे, वादळ वारे इत्यादी उपमा दिल्या आहेत.

सर्वात श्रेष्ठ नाते- आईचे वर्णन करताना, सर्व काही सोसून ती आपले अस्तित्व वटवृक्षासारखे ठेवते हे सांगताना त्या लिहितात,

” वरचा विस्तार सांभाळण्यासाठी,

 मूळ घट्ट रोवून धरलीस,

 जीवाच्या आकांताने. ” 

शिकलेल्या स्त्रीची घुसमट सांगताना त्या लिहितात,

” तरी अजूनही आई प्रश्न विचारला की मोडतात घर,

 ज्यांना आवरत नाही आतला आवेग, त्यांना पडावं लागतं घराबाहेर,

 त्यांची घरं मोडतात

 आणि त्यासाठी

 जबाबदार धरलं जातं त्यांनाच”.

या काव्यसंग्रहात अशा अनेक स्त्रिया भेटतात. स्वतःच्या स्वप्नांना बंदिस्त करून सर्वमान्य सुखाची कवाडे त्या उघडतात हे सांगताना त्या लिहितात,

” दर श्रावण मासात पूजेला एक व्रत जुन्या स्वप्नांच्या वरती रचायची एक वीट”.

एका क्षणी तिला पडलेली भूल नी त्यातून जन्मास आलेले मुल या वास्तवाचा स्वीकार करून जगणाऱ्या स्त्रीबद्दल त्या लिहितात,

” दिस उगवला नवा, स्वप्न नव्हते शेजारी,

 डोळे उघडले तेव्हा, पिस गळालेली सारी”.

नवऱ्याच्या अवगुणांमुळे त्याला सोडून स्वतःच्या मुलासहित संसार थाटणारी आणि मुलांमध्ये पुन्हा नवऱ्याचेच आलेले अवगुण सहन करणार्या स्त्रीची घुसमट सांगताना त्या लिहितात,

” आकांताने सारे करतीच आहे,

टक्क जागी आहे, आत आत”.

 परिस्थितीशी झगडणाऱ्या स्त्रीचे वर्णन करताना त्या लिहितात,

बुडत्याचा पाय खोलातच जाई

 कुठे काठ नाही आधाराला “.

 स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या स्त्रियांसाठी त्या लिहितात,

कर्तव्याचे माप पुरे भरलेले,

 बाकी उरलेले तिचे तिला”.

प्रेमात फसवणूक झालेली, माहेर तुटलेली स्त्री जिद्दीने ठामपणे उभी राहते. व तिच्याकडे पुन्हा सारी नाती नव्याने परत येतात हे सांगताना त्या लिहितात

” सोसण्याचे झाले लकाकते सुख वळाले विन्मुख, जुने दुःख. “

लहान भावंडासाठी आई बनून जिने स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही ती मुले मोठी होऊन गेल्यानंतर तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी दोन मुलांच्या बाबांशी संसार थाटण्यासाठी घेतलेला निर्णय चित्रीत करताना त्या लिहितात,

पंख फुटता भावंडे गेली सोडुन घरटे मागे उरले उन्हात उभे आयुष्य एकटे, पुन्हा प्रसूतीवाचून तिची झाली आई, त्याला सार्थक म्हणू.. की संभ्रमात आहे बाई”.

नवऱ्या बायकोचे नाते तसेच ठेवून मुक्तपणे वेगवेगळं आयुष्य जगणाऱ्या स्त्रीबद्दल त्या लिहितात,

” मने जुळलेली त्यांची, छत नाही एक तरी,

 लय साधलेली छान, तारा तुटल्या तरी” 

समलिंगी विवाहातील समान अधिकार हा त्यांना ‘शकुनाचा क्षण’ वाटतो त्या लिहितात,

” कुणी ना दुय्यम कुणी ना मालक, दोघींचा फलक, दारावर. “

 संसाराचे दोर कापून माणुसकीने सर्वांना मदत करणार्या स्त्रीबद्दल तिच्या स्त्रित्वाचा अर्थ उलगडून दाखवताना लिहितात,

ओलांडले तिने बाईपण छोटे,

 मनही धाकटे पार केले. “

 शेवटी शीर्षकगीत लिहिताना, स्त्रीत्वाचा अर्थ सांगताना त्या लिहितात,

कुणी भांडले भांडले तरी उभ्या ताठ घट्ट धरूनी ठेवती जगण्याचा काठ”.

प्रस्तुत पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगताना मला असं वाटते कि आसावरी काकडे यांच्या कविता अनुभवातून, चिंतनातून व अभ्यासातून आलेल्या आहेत. यामध्ये अनेक छंद, वृत्तांचा, अलंकारांचा वापर करण्यात आला आहे. सर्वत्र स्त्रियांच्या अस्तित्वाची नवीन वाट शोधण्याची भावना अधोरेखित आहे. त्या समाजाभिमुख आहेत. स्त्रियांच्या वास्तवाचे भान, त्यातील सूक्ष्मता, त्यांची व्याप्ती व घुसमट त्यांना कळते. एक संवेदनशील कवयित्री व समाजाभिमुख स्त्री म्हणून त्यांचा परिचय आपल्याला होतो. यामधील पात्रे प्रातिनिधिक आहेत.

प्रस्तावनेत विद्या बाळ यांनी म्हटल्याप्रमाणे, “स्त्रीच्या धडपडीला डोळ्यात साठवून ते सहज पाझरताना त्याची कविता झाली आहे “. चौकट मोडून नव्या वाटा चोखाळणाऱ्या या स्त्रिया आपल्यालाही अंतर्मुख करतात. स्त्रीचा देह आहे म्हणून स्त्री आहे हा समज गळून पडतो.

कवयित्रीने स्त्री असण्याचा लावलेला अर्थ खोलवर समजून घेण्यासाठी हा काव्यसंग्रह नक्की वाचायला हवा…

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

मो 9921524501

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

प्रो. भारती जोगी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

पुस्तक : काव्यसुधा (काव्यसंग्रह)

कवी : चिंतामणी ज. भिडे 

मुद्रक— आसावरी इंटरप्रायझेस, ठाणे.

मूल्य– ₹ १००/-

‘काव्य सुधा ‘ हा श्री. चिंतामणी ज. भिडे लिखित, काव्यसंग्रह माझ्या हाती आला तो आंतरजालाच्या माध्यमातून! एका समूहावर नेहमीच होणाऱ्या, एका खास बाजाच्या, वैशिष्ट्यपूर्ण लहेजातल्या, काव्य सुधा सिंचनाचा आनंद घेणारी मी! मला सतत तो सुधाघट काठोकाठ भरलेला बघण्याची इच्छा! आणि एक दिवस तो काव्यसुधा संग्रह, अचानक माझ्या हाती आला… तो ही हवेतून… स्पीड पोस्टाने (मारूत तूल्य वेगम् ) असाच! 

हा काव्यसंग्रह हाती आला. सवयीने आधी मुखपृष्ठावर नजर गेली. कारण मुखपृष्ठ आरसा असतं त्या-त्या साहित्य कृतीचा! माझ्या दृष्टीस पडलं ते एक सुंदर असं… पूर्ण विकसित, उन्मिलित झालेलं… कमल पुष्प! आणि शीर्षस्थानी ‘ काव्यसुधा ‘ हे शीर्षक, एकेरी अवतरण चिन्हांत, मोठ्या दिमाखात विराजमान झालेलं! 

वाटलं की… नक्कीच श्री. भिडे यांच्या मनातील विविध रंगी विचारांच्या पाकळ्या, त्यांच्या शब्दांतील, काव्य अमृताच्या सिंचनाने, अंग-प्रत्यंगाने उमलून आल्या असाव्यात. आणि मग त्याचाच हा अमृत कलश… काव्यसुधा!!

पुस्तकाच्या प्रस्तावनेला लाभलेला ; श्री. वामन देशपांडे यांचा शब्द स्पर्श अतिशय अभ्यास पूर्ण !! अर्वाचीन मराठी कवितेच्या आजवरच्या प्रवासाची वळणं थेट नव्या रूपापर्यंत आणून… चिंतामणी भिडे या कविच्या कविता लेखनाचं सुंदर रूप विशद करणारा!! तसेच… प्रा. डॉ. अनंत देशमुख यांचं… कवीच्या निवडक अशा, मनात ठसलेल्या, मनाला भिडलेल्या कवितांचं भाव भरलं असं अभिप्रायी मनोगत वाचायला मिळतं. तसेच प्रदीप गुजर यांचंही… भिडे यांच्या कवितेतले, मन तृप्त करणारे पैलू उलगडणारा अभिप्राय ही आस्वादायला मिळतो.

संग्रहाची… मलपृष्ठावरील पाठराखण केलीयं… श्री. प्रभाकर शंकर भिडे यांनी! ‘ अल्पाक्षर रमणीयता ‘ अगदी भिडेंच्या मैत्रीच्या रंगात रंगून, एकरंग झालीये जणू!! 

‘काव्यसुधा’ या काव्यसंग्रहात जवळपास ६५ कविता समाविष्ट आहेत. त्यात “फुल्ल कुसुमितं, द्रुमदल शोभिनिम्! ” हीच अनुभूती येते. कवीने रोजच्या जगण्यात, आसपासच्या जगतात, जे जे संवेदनशील मनाने आणि वृत्तीने बघितलं, अनुभवलं, जाणवलं, टिपलं… ते ते सगळं त्यांच्या कवितांमध्ये स्पष्ट, नितळ आणि पारदर्शीत्व घेऊन उमटलयं!

त्यांच्या कवितांमध्ये, राजकीय, सामाजिक, पौराणिक, राष्ट्रीय अशा विषयांवरील उपहासात्मक, उपरोधिक भाष्य, मातृभाषा प्रेम, यावरील तळमळीची व्यक्तता दिसून येते. त्या-त्या वेळी घडलेल्या, चर्चा रंगलेल्या, न्यूज चॅनेलचा टी. आर. पी. वाढविणा-या घटना, त्यावर कवीने केलेलं भाष्य अगदी… स्पष्ट, परखड! 

कवीच्या लेखन शैलीचं… अगदी खास, त्यांचंच म्हणावं लागेल, ज्यावर त्यांचीच नाममुद्रा ठसवावी… इतकं वैशिष्ट्यपूर्ण, वैशिष्ट्य… म्हणजे.. त्यांच्या कवितांची शीर्षके आणि श्लेषात्मक अनुभूती देणारे शब्द!! 

कवी ते-ते शब्द () कंसात विराजमान करून, त्यांचा योग्य तो अर्थ लावून, यथोचित सार्थकता प्रदान करण्याचं स्वातंत्र्य मात्र, सुजाण, समजदार वाचकांवर सोपवून टाकतात. ही सूचकता भिडेजींच्या कवितेत, ठायीं-ठायी आढळते.

ऑक्टोबर हीट ही पहिलीच कविता… मी टू च्या चर्चेनं तापलेल्या वातावरणाची धग थेट पोहोचवणारी. आणि… सहावं इंद्रिय जागृत असलेल्यांना विचारलेल्या प्रश्नातल्या उपरोधाने बोच ही अगदी जाणवणारी….

 “शोषण झालं हे कळायला,

 त्यांना इतकी वर्षे लागली?… ! “

मतदार ( राजा )? या रचनेतली एका संवेदनशील मनाची तळमळ बघा…

 ” सत्तेची आसुरी लालसा, पैशांचा सारा खेळ,.. शेतक-यांचे अश्रू पुसायला आहे कुणाला वेळ? “

बळी (राजा) ची हार या कवितेतही, शेतकरी बांधवांविषयीचा कळवळा जाणवलेल्या ओळी…

 “अनीती, अधर्म, कपटाने

 पुन्हा अभिमन्यु ला घेरला। 

 जिंकले गलिच्छ राजकारण

 गरीब शेतकरी मात्र हरला. “

कोविड काळातील सत्य घटनेवर आधारित रचना, ख-या समर्पणाची किंमत न ओळखणा-या पत्रकारितेवर उपरोध किती बेधडकपणे बघा…

 “रुग्णशय्या आपुली देती एका गरजू तरूणाला,

वयोवृद्ध ते नारायणराव, कवटाळिती मृत्यूला! 

समर्पणाच्या भावनेची मांडलिकांना काय महती? 

मिंधी झाली पत्रकारिता, अनीती हीच असे नीती! “

कवीने … उपेक्षित, सपूत… यांसारख्या रचनांतून, लालबहादूर शास्त्रीजींच्या कार्याचा गौरव करून, ते सपूत असूनही, एकाच तारखेला जन्मले असूनही, महात्मा गांधींच्या तुलनेत कसे दुर्लक्षित, उपेक्षित राहिले याची खंत ही व्यक्त केली आहे…

 जन्मले दोघे एकाच दिवशी,

 मृत्यू ही तितकाच अनपेक्षित। 

 आजही जयजयकार एकाचा

 दुसरे कायम उपेक्षित|

देवपण या कवितेत तर… एक काळा दगड आणि विठ्ठल यांत संवाद दाखवून…

 “एकदा एक दगड काळा, गेला विठ्ठलाच्या देवळात…

म्हणे,

” अरे विठ्ठला, दोघे आपण काळे कुठे आहे फरक? 

मला बी उभं रहायचयं इथे, जरा तू सरक! “

मग पुढे काय झाले, ते कवितेत वाचण्यातंच खरा आनंद! आणि मग मिळालेला बोध… “सोसल्याविना टाकीचे घाव, कधी मिळतं का देवपण! 

काही रचनांमध्ये कवीची गाव, गावपण, बारा बलुतेदार, यांविषयीची आस्था, कळकळ, हळूहळू ओस पडत गेलेली गावं, याचं ही अतिशय भावपूर्ण चित्रण बघायला मिळतं.

 ” गावाचं ‘गावपण’ गेलं,

 ‘हायवे’ वरून पुढे,

 पहिली, दुसरी पिढी

 आता मनातच कुढे. “

तसंच… बारा बलुतं या रचनेत.. कालौघात गडप होत चाललेल्या बारा बलुतेदारांतील, सुतार, लोहार, न्हावी, मोची, शिंपी… यांच्या भेटीची कल्पना करून, त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेत… आपल्या खास… शाब्दिक कोटी करण्याच्या शैलीचा साज चढवून, जो एक वेगळाच बाज आणलायं ना, तो खरंच वाचनीय!

बघा की… सुतार म्हणतोय…

 थोडीच आहेत कामं,

 पण करवतच नाही.

रेडिमेड मुळे संपत चाललेला शिंपी म्हणतोय…

 आभाळंच फाटले

 किती लावू ठिगळं?

असे शब्दच्छल आणि त्यातला मतितार्थ,… कवी जणू सांगतो… शोधा म्हणजे सापडेल.

 भिडेंच्या काही कविता मिश्किलीच्या रुपांत ही वावरत आहेत संग्रहात! 

 कवी आणि कविता या कवितेत…

कवीने मित्राशी संभाषण दाखवून… विनयशील आणि जमिनीवर असण्याचा छान पुरावा दिलायं..

म्हणतोयं… “आम्ही म्हणजे उगीच आपलं वासरात लंगडी गाय शहाणी”! 

कवीची वैशिष्ट्ये सांगतांना म्हंटलयं…

 ” खरे कवी ते, व्यासंग फार ज्यांचा, अन् नाचे जीभेवर सरस्वती। 

ओघळती शब्द त्यांचे, जसे तुटल्या सरातून मोती! “

असे त्यांचेच शब्द मोती झरतांना बघायला मिळतात त्यांच्या मैतर नावाच्या पंचाक्षरी कवितेत. असेही काही टपोरे, पाणीदार मोती ओवले आहेत त्यांनी! 

कवी सांगतोयं… मैत्रीचं नातं, ना त्यापेक्षा ही पुढं, सहज आणि…

नात्याहून ही मैतर खोल!! फक्त खोली ओळखता आली पाहिजे.

कवितेबद्दल च्या भावना आणखी एका कवितेत व्यक्त करून कवी म्हणतोयं,

” साहित्य देई मुक्त प्रांगण,

 शब्दांची करा अशी गुंफण

 कविता व्हावी मनी गोंदण

कवी भिडे यांनी निसर्गाचे भानही राखलयं! त्याच्या निसर्ग प्रेमाला फुटलेली पालवी, आलेला बहर, आणि झालेला वर्षाव चिंब भिजवतो आणि…

 ” विविध रंगांनी

 नटली अवनी

 फुटते पालवी

 वठलेल्या मनी|”

‘मातृभाषा *दीन…’ ही कविता, कवीला मातृभाषा दीन झाल्याचं दु:ख, वैषम्य, याची भावपूर्ण जाणीव करून देणारी! 

“करंटे आम्ही असे, केले मातृभाषेस दीन

तरीही दरवर्षी सजतो आमचा मराठी भाषा दिन! 

हे आणि असे विडंबन विविध रचनांमध्ये आढळते आणि आपण ही मग विचार करायला प्रवृत्त होतो. कवीच्या सहज, सोप्या पण परिणामकारक शब्दांमध्ये हे सामर्थ्य सतत जाणवंत रहातं.

 आम्ही कोण?, मुक्ताफळे, अहिंसेचा खिडकी, स्वातंत्र्याचे मोल… यांसारख्या विडंबनात्मक रचना, त्यातल्या उपहासाची बोच ; त्यामागचा उद्देश, नंतरही लक्षात रहाणारा! 

 निवृत्ती नंतर… या कवितेत, कवीच्या मिश्किलीला, वात्रटिकेची झालर जोडलीयं! निवृत्ती नंतर…

” लवकर उठावे, चहा करावा,

 आपलाच नव्हे तर सर्वांचा ठेवावा

 चहा घेऊन बाहेर पडावे

 मोबाईल ही जवळ ठेवावा

 धडपडल्यास उपयोग व्हावा

 सौंदर्य दर्शन जरी कां घडेल,

 वळून न पहावे, मान अवघडेल!”

किती सहज, हलक्या फुलक्या शब्दांत दिलेला हा इशारा, आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं जावं म्हणून सांगितलेले सूत्र! हे असे, वरून अगदी साधे वाटणारे, हसत-खेळत घेतलेले चिमटे, दिलेल्या कानपिचक्या… भिडेंच्या कवितेत अगदी… भीडेचीही, भीड न बाळगता, निर्भिडपणे घेतलेल्या आढळतात… आणि आपण ही मग, अगदी उगीचच भिडस्तपणा दाखवत, गालातल्या गालांत हसत…

“आपण नाही बुवा! “… असं म्हणंत पुढे जातो. इथेच तर कवीच्या काव्यलेखनाची जीत होते, उद्देश पूर्ण होतो. लिखाणाचं चिज होतं! 

कवीने, ” अध्यात्मास थोडे स्थान द्यावे ” म्हणत… काही रचनांना अध्यात्माचा स्पर्श देत…

“मना पहावे, ‘आपणांसी आपण’

न लागे तयाला कोणताही दर्पण

घेता रामनाम मनी वा वैखरी

आत्माराम शोधू मनाच्या गाभारी”

असं म्हणत… नाम महात्म्यही विशद केले आहे.

पुढे त्यांनी मुक्तीचा मार्ग ही शोधून काढला…

” भजतो तव सगुण रूपा,

 निर्गुण निराकारा!

तुझ्या विना कोण सोडवी,

जन्म-मृत्यू चा फेरा? “

शेवटी… “अव्याहत चालला तुझाच शोध,

द्यावी मुक्ती मज, व्हावा आत्मबोध! “

असाही एक सुंदर विचार रचनांमध्ये आढळतो.

 विविधतेतलं सौंदर्य, त्यातलं लावण्य मांडतांना कवी, कव्वालीचाही वाली झालाय ;हे विशेषच ना!! 

 आईचं ऋण ही व्यक्त केलयं आणि भावपूर्ण जाणीव करून दिली आहे…

 “नको तिला कौतुक सोहळे,

 नको तिला मातृदिन! 

 ऋणात निरंतर रहावे तिच्या,

 प्रेमाविना ती होईल दीन… “

शेवटी मनाचे यान आत्मबोधाकडे वळवत… “मन हारता होई हार, मन जिंकता जीत! “… हे सुवचन रूजवत, स्थिरावलयं!! 

असं हे काव्यसुधा सिंचन, त्यातल्या प्रत्येक थेंबातलं, नितळ, स्वच्छ, पारदर्शी असं साधेपणातलं, एक वेगळंच सौंदर्य लेऊन झालयं! त्या-त्या वेळी मनांत आलेल्या विचार किरणांच्या परावर्तनाने, त्या थेंबांना, जे… कविता, वात्रटिका, विडंबन, पंचाक्षरी, षडाक्षरी, उपहास, उपरोध, देशभक्ती, मातृभाषा प्रेम, अध्यात्म, निसर्ग भान, मैत्री भावाची जाण, राजकीय हालचालीं चा उहापोह, त्याबद्दलचा उद्वेग,…. हे आणि असे… इंद्रधनूचे रंग, त्याच्या विविध छटांचा आनंद घेण्यासाठी आणि, साध्याही विषयांत आढळलेला मोठा आशय, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी… यांतलं अर्थाचं मोठेपण आणि खोली, जाणून घेण्यासाठी तरी एकदा हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा.

श्री. चिंतामणी भिडे यांना या निवडलेल्या, वेगळ्या वाटचालीसाठी, पुढील अशाच, तैल विनोद बुद्धीच्या, सूक्ष्म निरीक्षणातून, शब्दच्छलाचा निर्भेळ आनंद देणा-या रचनांचे सृजन करण्यासाठी शुभेच्छा! 

परिचय – प्रा. भारती जोगी

पुणे

मो ९४२३९४१०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈