मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दोन ज्योती” – – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन ज्योती  – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तकाचे नाव – दोन ज्योती  

लेखिका – श्रीमती अनुराधा फाटक

प्रकाशन -श्री नवदुर्गा प्रकाशन

 

दोन ज्योती (पुस्तक परिचय)

‘दोन ज्योती’ हा अनुराधा फाटक यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. त्यांचा हा 13 वा कथासंग्रह. राज्य पुरस्कारासकट ( भारतीय रेल्वेची कहाणी – भौगोलिक ) त्यांच्या विविध पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत. वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या दुहेरी विणीतून त्यांची कथा गतिमान होते. कल्पनारंजन असं की समाजात ज्या गोष्टी घडायला हव्यात, असं त्यांना वाटतं, त्या त्या गोष्टी त्यांच्या कथांमधून घडतात. ‘पालखीचे भोई’ मधील बाबा गावातील विविध धर्मियांची एकजूट करून माणुसकीची दिंडी काढतात. त्यांच्याकडे  भजनाला विविध जाती-धर्माचे लोक येतात. सकाळी तिरंग्याची पूजा करून व त्याला प्रणाम करून पालखी निघते. त्यात सर्व धर्माचे धर्मग्रंथ ठेवलेले असतात. आपआपल्या धर्माचा पोशाख केलेले वारकरी ‘पालखीचे भोई’ होतात.

श्रीमती अनुराधा फाटक

‘झेप’ मधील सायली हुशार पण घरची गरीबी म्हणून ती सायन्सला न जाता आर्टस्ला जाते. संस्कृत विषय घेते. दप्तरदार बंधूंकडे जुन्या औषधांची माहिती असलेली त्यांच्या आजोबांची दोन बाडं असतात. सायली त्यांचा मराठीत अनुवाद करून देते. पुस्तक छापलं जातं. कुलगुरूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. वेगळ्या दिशेने झेप घेतलेल्या सायलीचं कौतुक होतं. कथेचा शेवट असा- भारतीय ज्ञान, बुद्धी, यांना साता समुद्रापार नेणारी ही झेप’ नव्या पिढीचा आदर्श ठरणार होती.

‘बळी’ ही ‘यल्ली ’ या जोगतीणीची व्यथा मांडणारी कथा. ती म्हणते, नशिबानं मलाच यल्लम्मा बनीवली आणि दारोदर फिरीवली. तिचा विचार करणारा, तिला चिखलातून बाहेर काढू इच्छिणारा, तसं केलं नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं म्हणणारा एक स्वप्नाळू तरुण तिच्याशी लग्न करतो. एकदा रस्त्यावरील  एका गाडीच्या अपघातात तो मरतो. शिक्षण नसलेल्या यल्लीला जगण्यासाठी पुन्हा जोगतीणच व्हावं लागत पण आपण मूल जन्माला घालायचा नाही , असं पक्कं ठरवते. कथेचा शेवट असा- ‘यल्लूचे डोळे गळत होते. त्या अश्रूतून मातृत्वाची बांधून ठेवलेली ओल वहात होती. कुणाचा बळी न देण्याचा निर्धारही. ती म्हणते, माझ्या आयुष्याचं बुकच वेगळं हाय. त्यात फाकस्त बकर्‍यावाणी बळीची गोष्ट.’ सजलेली –धजलेली यल्लम्मा  जग डोक्यावर घेऊन  निघाली. तिचाही बळी घेतला होता, समाजातील दुष्ट रुढींनी. खरं तर त्या अश्रूतून बांधून ……. न देण्याचा निर्धारही … इथेच कथा संपायला हवी होती. पण लेखिकेला स्वतंत्रपणे भाष्य करण्याचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या अनेक कथांमधून दिसते.

दोन ज्योती, घर, कलंक,पुरस्कार या कथा वृद्धाश्रमाच्या पार्श्वभूमीवरच्या. ‘दोन ज्योती’मधल्या सुमतीबाई, ‘घर’मधल्या कुसुमताई, कलंक’ मधल्या मीनाताई सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी आश्रमात आलेल्या. त्या तिथे केवळ रूळल्याच नाहीत, तर रमल्याही.त्यांचा आत्मसन्मान तिथे त्यांना मिळालेला. कुसुमताई सुनेच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या. त्या म्हणतात, ‘नवरा गेल्यापासून आजपर्यंत घरात आश्रमासारखी राहिले, आता या आश्रमात घरासारखी रहाणार आहे.’ मीनाताईंच्या मुलाने हाती लागलेल्या बनावटी पत्रांच्या आधारे, त्याची शहानिशा न करता आईवर लावलेल्या बाहेरख्यालीपणाच्या आरोपाने व्यथित होऊन त्या आश्रमात आल्या आहेत. शेवटी मुलाला आपली चूक कळते. तो त्यांना घरी न्यायला येतो, पण त्या ‘तुझ्या पश्चात्तापाने माझा कलंक पुसला, तरी मनाची जखम ओली आहे.’असा म्हणत पुन्हा घरी जायला नकार देतात. आत्मकेंद्रित, अहंमन्य, पैशाच्या मागे लागलेले, बायकोला गुलामासारखं वागावणारे वसंतराव. त्यांच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या सुमतीबाई नवरा न्यायला येणार, म्हंटल्यावर धास्तावतात. त्यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापिका वसंतरावांनाच इथे ठेवून घेऊन हा पेच सोडवण्याचे ठरवतात. त्यावेळी पती-पत्नी यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलतात. भाषण दिल्यासारखं. वाटत रहातं, लेखिकाच त्यांच्या तोंडून बोलतेय. कथासंग्रहात असं वाटायला लावणार्‍या खूप जागा आहेत.  लेखिकेचा अध्यापणाचा पेशा असल्यामुळे कुठल्याही घटना-प्रसंगावर भाष्य करण्याचा लेखिकेला मोह होतो आणि अनेकदा संवाद भाषणात रूपांतरित होतात.

पुस्तकात पाहुणेर, गोफ, नवजीवन, मंगला, माणुसकी इ. आणखीही वाचनीय कथा आहेत. शब्दमर्यादेचा विचार करता, मासिका- साप्ताहिकातून चित्रपट परीक्षणे येतात, त्यात शेवटी म्हंटलेलं आसतं, ‘पुढे काय होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.’ तसंच म्हणावसं वाटत, ‘कथांचा प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच आनंद घ्या.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

निवेदन –

आपण अनेक पुस्तके वाचतो. त्यातील काही पुस्तकं आपल्याला आवडतात. त्यावर बोलावं, इतरांना सांगावं, असं आपल्याला वाटतं.  कित्येकदा आपल्या पुस्तकाबद्दल इतरांशी बोलावं, आपली त्यामागची भूमिका मांडावी, असंही काही वेळा  वाटत. या वाटण्याला शब्द देण्यासाठी एक नवीन सादर सुरू करत आहोत,पुस्तकांवर बोलू काही.’  आज त्यातील पहिला लेख  सुश्री संगीता कुलकर्णी यांचा.

संपादक मंडळ – ई – अभिव्यक्ती 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

अनुवादित पुस्तक – संवेदना

मूळ हिंदी लेखक – डाॅ. कमल चोपडा

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

समकालीन हिंदी प्रस्थापित लेखकांमध्ये  डॉ कमल चोपडा हे एक महत्वाचं नाव. त्यांच्या हिंदीतील निवडक लघुत्तम कथांचा अनुवाद  संवेदना या नावाने श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केला आहे..

आपल्या सभोवतालचं जीवन त्यातील सहजता, गंभीरता, तर कधी कधी भयावहताही ते सहजतेने पाहतात व अनुभवतात. तसेच आपल्या भोवती घडणारे घटना- प्रसंग, ते घडवणा-या विविध व्यक्ती, त्यांचे विचार, विकार, वर्तमानात जाणवणारी सुसंगती- विसंगती, स्वार्थ, त्याग, सांमजस्य ताठरता यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करतात.

श्रीमती उज्ज्वला केळकर

या त्यांच्या पुस्तकातील कथांत लक्षणीय विविधता आहे. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक व्यवहार, सांप्रदायिक दंगे, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक पैलू या कथांमध्ये आहेत. कौटुंबिक नात्यातील अनेक प्रकारचे भावबंध त्यांनी उलगडलेले आहेत. मुलं, त्यांचे आई-वडील भावंड, सासवा- सूना या नात्यातील आत्मियता, प्रेम, जिव्हाळा त्यांच्यातील ताण-तणाव त्यातून प्रगट झालेले भाव- भावनांचे कल्लोळ या सा-याला चिटकून राहिलेले दारिद्रयाचे अस्तर त्यातूनच झरणारी आत्मीयतेची माणुसकीची जाण हे सर्व या कथांमधून प्रगट होते.

सासू-सुनेचे संबंध तर जगजाहीर… पण इथे मुलगा आणि सून यांच्यातील बेबनाव दूर करणारी सासू आहे. “ओठांत उमटले हसू– मूळ कथा छिपा हुआ दर्द ” या कथेत तर गावाहून सासू-सास-यांना भेटायला आल्यावर घरात फक्त मक्याचचं पीठ शिल्लक आहे बाकी काही नाही हे कळल्यावर…आम्ही फक्त तुमच्याच हातच्या मक्याच्या रोट्या खायला आलो आहोत पण त्या सोबत दूध, लोणी, तूप, साखर असं काहीही घालू नका. डाॅक्टरांनी आम्हाला खाऊ नका म्हणून सांगितलयं…असं म्हणत सासूचा आत्मसन्मान जपणारी समंजस सून आहे.

पतीचा अन्याय सहन करणारी स्त्री हे चित्र तर आपल्याला जागोजागी दिसतं. ” पती परमेश्वर–मूळ कथा- पालतू ” या कथेत तर दुस-या बाईकडे जाण्यासाठी बायकोकडे पन्नास रुपये मागणा-या नव-याचे पाय सुपारी देऊन गुंडाकडून निकामी करणारी व नंतर त्याला औषधोपचार करून भाजीच्या गाडीवर बसवून त्याला कामाला लावणारी व माझा पती ” पती परमेश्वर ” असेही म्हणणारी विरळा बायको भेटते…. दारूडा नवरा मेल्यानंतर आठ दहा वर्षांचा मुलाला सोडून दुसरा घरोबा करणा-या आईचं दुःख समजून घेणारा..आपल्याला सोडून गेल्यावरही आपल्यात कटुता येऊ न देणारा ” असेल तिथे सुखी असो– मुळ कथा– जहाँ रहे सुखी रहे ” अशी इच्छा बाळगणारा मुलगाही येथे आपल्याला भेटतो..

सांप्रदायिक दंग्याच्या पार्श्वभूमीवरच्या अनेक कथांही यात आहेत. पण प्रत्येक कथेचा रंग वेगळा सांगण वेगळ…” विष-बिज ” मूळ कथा विष-बिज मधील म्हातारी म्हणते लूटमार, आगं लावणं यामुळे तुमच्या धर्माची प्रतिष्ठा कशी वाढेल? उलट अशा प्रत्येक घटनेतून तुमच्या शत्रूंची संख्याच वाढत जाईल आणि मग ही आग तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांबाळांपर्यंत पोचेल….

तर “तपास–मूळ कथा- शिनाख्त ” या कथेत पोलिसांची कुत्री त्या भागातला एक कुख्यात गुंड एक आमदार एक गुन्हेगार यांच्यापर्यंत पोचतात. इन्स्पेक्टर आझाद आपल्या अधिका-याला अहवाल सादर करतो. खरे गुन्हेगार कोण? हे कळल्यावर तो अधिकारी म्हणतो तुला ‘ तपास ‘ नाही ‘ तपासाच नाटक ‘ करायला सांगितलं होतं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो माझा तपास पूर्ण झालाच नव्हता. चौथ्या गुन्हेगारापर्यंत मी पोचलोच नव्हतो. चौथा गुन्हेगार पोलिस म्हणजे आपण..

आजारी मुलाच्या औषधपाण्यासाठी पैसे हवे असलेला एक सामान्य माणूस..पैशासाठी बस मध्ये बाँम्ब ठेवायला तयार होतो. उतरता उतरता त्याला एका लहान मुलाचं रडणं ऐकू येतं. त्याला ते आपल्याच मुलाचं वाटतं व तो बस मध्ये बाँम्ब आहे हे सगळ्यांना सांगून खाली उतरायला लावतो. लहान मुलाचे रडण्या- हसण्याचे आवाज आपल्याच मुलासारखे कसे वाटतात? मग ते कुठल्या का धर्माचे असेनात…कथा– ‘धर्म– मूळ कथा– धरम ‘

‘सफरचंद– मूळ कथा– फल’ व ” पैसा आणि परमेश्वर — मूळ कथा–पैसा और भगवान ” या कथांत तर मुलांचे मन, त्यांना पडणारे गमतीदार प्रश्न मांडले आहेत. ” पैसा व परमेश्वर ” या कथेत तर देवाला पैसे टाकताना पाहून ‘ देव भिकारी आहे का? ‘ त्याला पैसे टाकून त्याच्याकडे भिका-यासारखं काही का मागतात? त्याला जर पैसे हवे असतील तर तो आपल्या जादूने पैशाचा ढिग निर्माण करणार नाही का? असं विचारणारा व विचार करायला लावणारा निरागस पिंकू इथे आहे…

अशा अनेकविध कथांतून सांप्रदायिक कट्टरतेच्या दरम्यान सद्भभावना आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीचा आशय अतिशय सुंदररित्या मांडलाय..विविध पातळ्यांवर विविध अंगाने होणा-या शोषणाचे अनेक रूपरंग त्यांच्या या कथांतून प्रगट झाले आहेत..

डाॅ. कमल चोपडा यांच्या कथा जीवनातील, लोक व्यवहारातील, आचार-विचारातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवते व मोजक्याच शब्दांतून त्यांचं मार्मिक दर्शनही घडवतं..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

मो 9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 39 – वाचन संस्कृती विकसित करणारा नाविन्य पूर्ण कथासंग्रह – थॅक्यू बाप्पा  ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है  उनके द्वारा श्री अनिल पाटील जी के काव्य संग्रह   “थँक्यू बाप्पा ” का  निष्पक्ष पुस्तक परिक्षण (पुस्तक  समीक्षा )। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #39☆ 

☆ वाचन संस्कृती विकसित करणारा नाविन्य पूर्ण कथासंग्रह – थॅक्यू बाप्पा  ☆ 

पुस्तक परिक्षण 

पुस्तकाचे नाव – थँक्यू बाप्पा

लेखक – अनिल पाटील

प्रकाशक – चपराक प्रकाशन,पुणे

बुकगंगा ऑनलाइन लिंक >>>> ‘थँक्यू बाप्पा

 

मी काही फार मोठा समिक्षक वैगरे नाही. पण बर्‍याच ठिकाणी परीक्षण केल्याने  वाचनाचा  आस्वाद शोधक नजरेने घेण्याची सवय लागली. लेखक अनिल पाटील यांचा थॅक्यू बाप्पा हा कथासंग्रह माझ्या सारख्या चोखंदळ रसिकांच्या  अपेक्षा आणि जिज्ञासा पूर्ण करणारा आहे.

चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेला एकशेवीस पानांचा हा कथासंग्रह मुखपृष्ठासह अतिशय सुंदर सजला आहे.  विषयाचे वैविध्य,  नाविन्यता,  चतुरस्र,  परखड, रास्त  आणि कणखर  मते मनोगतात वाचायला मिळाली.  कौटुंबिक जीवनातील बारकावे हळुवारपणे टिपून घेत  अनेक वैशिष्ट्य जोपासत हा संग्रह सजवला आहे.  मनापासून भावलेले शब्द साध्या सोप्या भाषेत पण प्रभावी पणे या कथांनी व्यक्त केले आहेत

किल्लारी येथे झालेल्या भुकंपाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कथा संग्रहाचे मुख्य  आकर्षण ठरली आहे. सामाजिक भान जपणारी आणि प्रखर वास्तव टिपणारी ही कथा संवेदनशील लेखनशैलीने परीपूर्ण झाली आहे. *भूकंपाच्या काळ्या ढगाला लागलेली रूपेरी कड* , प्रांतिक भाषेतील विशिष्ट संवाद शैली,  वैयक्तिक दुःख विसरून नेमून दिलेल्या कामात  एकरूप झालेला रामसिंग, ढिगा-यातून बचावलेली मुलगी पाहून भावविवश झालेला पिता,  वाचकांना खिळवून ठेवणारे सशक्त कथानक यांनी पहिलीच कथा गणेशाचा आशिर्वाद मिळवून देते.  आणि  प्रत्येक कथा ताकदीने व्यक्त करण्याचा श्रीगणेशा करते. रसिकांची पसंती या पहिल्याच कथेने जोरदारपणे घेतली आहे. भूमिकन्या गेली हा शब्द काळजात घर करून राहिला. *सुख के क्षण प्रदान करने वाला सुखकर्ता हे शब्द प्रयोग चपखल ठरले आहेत*  एका मुलीला  आणि पालकांना मिळालेला निवारा रामसिंगच्या परीवाराचे दुःख हरण करणारा आहे. त्यामुळे या कथेचे शिर्षक साहित्यात  एका विशिष्ट  उंचीवर ही कथा घेऊन जाते.  अनेक जाणिवा, नेणिवा आणि भावना  यांचे उत्कट दर्शन या कथेच्या  शब्द चित्रणातून झाले आहे.

प्रसिद्ध साहित्यिक  प्रा. व .बा. बोधे यांची मार्गदर्शन करणारी विस्तृत प्रस्तावना संग्रहाची लोकप्रियता  अधिक वाढवते. योग्य समिक्षण आणि परीक्षण सरांनी केले आहेच. संग्रहाचे  अचूक विश्लेषण त्यांनी केले आहे.

मराठवाड्यातील खेड्यातला भुकंपग्रस्त राजू फलाट नंबर दहा ते कारगिल व्हाया इराॅस हे नाविन्य पूर्ण नाव कथेची  उत्सुकता वाढवते. कलाटणी देणा-या अनेक घटना  एकाच कथेचे गुंफण्याची कला नाविन्य पूर्ण वाटली. राजूचे बदलत जाणारे व्यक्ती मत्व ,  परीवर्तन  आणि त्याचा होणारा सत्कार हा सर्व प्रवास रमणीय ठरला आहे. या सर्व प्रसंग चित्रणात वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे.  अनेक छटा  असलेली ही कथा खूप वेगळी  आणि दमदार वाटली. लेखकाने केलेली नायकाची कानउघाडणी आणि त्यातून झालेले त्याचे परीवर्तन,  भावनिक  आंदोलने या  कथेत खूपच भारदस्त पणे व्यक्त झाली आहेत.  माणूस माणसाला बदलवू शकतो हा संदेश देणारी ही कथा खूप आवडली.

*सबाह अल खेर* ही कथा परदेशातील संस्कृतीचे दर्शन घडविणारी सक्षम प्रेमकथा.  इराक मधील मिस स्वाद  आणि स्टेशन मास्तर  अमित यांची प्रेमकथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. युद्धानंतरची इराकची परीस्थिती,  रान हिरवे डोळे,  लालचुटुक पातळ ओठ,  अरेबिक शब्दांची तोंड ओळख, भारतीय संस्कृतीचा गोडवा  आणि स्वतः विवाहित  असुनही रंगत जाणारी प्रेमकथा, खूपच नाविन्य पूर्ण पद्धतीने हाताळली आहे.

*रूपाताई तुस्सी ग्रेट हो* ही रूपा  आणि प्रकाश यांची कथा महापालिकेच्या भ्रष्ट कारभार  उघड करणारी आहे. ललवाणी संकुलातील ही कथा सामाजिक  आणि राजकीय हितसंबंधावर मार्मिक भाष्य करते.  एक  आघात करण्याची  क्षमता या कथेच्या  आशयात आहे.  आशयघनता  आणि समाज प्रबोधन करण्यात ही कथा यशस्वी ठरली आहे. संघर्ष  आणि लढा यांचे यथार्थ वर्णन या कथेत केले आहे.

पाऊलवाट चुकलेल्या मुलाची *पुंडलिक वरदे हारी विठ्ठल* ही कथा  असाच मनाला चटका लावून जाते. समीर आणि शबाना यांची प्रेमकथा  एका वेगळ्या पार्श्वभूमीवरून हाताळली आहे. दहशतवादाचा धोका, इसिस चे मायाजाल,  मुंबई मिशन ब्लास्ट चा गुन्हेगारी तडका देत  कल्पना  आणि वास्तवता यांच्या मिश्रणात ही कथा धार्मिक, कौटुंबिक, आणि सामाजिक बांधिलकी जपत  आपला स्वतःचा ठसा  उमटवून जाते.

झुकझुक झुकझुक  आगीनगाडी,कश्या साठी पोटासाठी? वचन पूर्ती, थॅक्यू बाप्पा या सर्व कथा नव नवीन पद्धतीने साकार झाल्या आहेत. रेल्वेतील कामकाज विभागाचे बारकावे,  रेल्वे विश्वातील प्रवास, या श्रेत्रातील सांकेतिक शब्द,  आणि वैशिष्ट्य पूर्ण विदेशी भाषा या संग्रहातून या विविध कथाद्वारे पुढे  आली आहे.

लेखकाची व्यक्ती गत  भावनिक ,कल्पनारम्य आणि वैचारिक  गुंतवणूक या लेखसंग्रहाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरली आहे.  गणपती बाप्पाला पत्र लिहिणारी छोटीशी  आरोही संपूर्ण कुटुंबाला पुर्ण पणे कसे सावरते हे  शब्द कौशल्य  अजमावण्या साठी हा कथासंग्रह पुन्हा पुन्हा वाचावा असा ठरला आहे.  कथेची शिर्षक नेहमीच्या पेक्षा वेगळी  असली तरी प्रत्येक कथेला  अनुरूप ठरली आहे. त्यामुळे हा संग्रह दर्जेदार आणि वैविध्य पूर्ण साहित्य निर्मिती करणारा ठरला आहे.  कथेच्या सर्व बारीक सारीक गोष्टी नाविन्यता जोपासत  अनिलजी आपण  आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. रसिकांना खिळवून ठेवणारी शब्द शैली  आणि विचारांची नवी दिशा देणारे कथाबीज  आपण या संग्रहात खूप सुंदर रूजवले आहे.  अनेक ठिकाणी केलेले निरिक्षण, वाचन व्यासंग,  आणि शब्द सामर्थ्य यांनी समृद्ध झालेला थॅक्यू बाप्पा हा लेखन संग्रह मनोरंजनातून विचारांची देवाणघेवाण करणारा  एक चिंतन शील कथा संग्रह आहे. वाचन संस्कृती विकसित करणारा नाविन्य पूर्ण कथासंग्रह म्हणून या संग्रहाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.  खूप खूप गोष्टी या कथेतून लेखक म्हणून  आपण रसिकांना दिल्या आहेत.  रसिकांच्या  उत्तम साहित्य वाचनाच्या  अपेक्षा या संग्रहाने समर्थ पणे पूर्ण केल्या आहेत. या सर्व प्रवासात घनश्याम पाटील  आणि चपराक परीवाराचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.

आपल्या पुढील यशस्वी वाट  चालीस हार्दिक शुभेच्छा. आणि  अतिशय वेगळा आणि दर्जेदार कथासंग्रह रसिकांना दिल्या बद्दल  एक साहित्य रसिक म्हणून मनापासून थॅक्यू

 

*सुजित कदम, पुणे*




मराठी साहित्य- पुस्तक समीक्षा – काव्य संग्रह ☆ विजय पर्व ☆ कविराज विजय यशवंत सातपुते – (समीक्षक –श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे)

काव्य संग्रह  – प्रकाश पर्व – कविराज विजय यशवंत सातपुते

सामाजिक जाणिवा जपणारे….विजयी प्रकाश पर्व 

कविता ही आभाळाऐवढी विस्तीर्ण असते आणि कवी मोठ्या लकबिने वेदना काळजाशी बाळगत आभाळा एवढ्या कवितेलाच आपल्या सहृदयी कवेत घेतो.

हे कविचं की कवितेचं मोठेपण…हे न उलगडणारं कोडं..!! मात्र  तरीही शेवटी या कवितेचा जन्मदाता हा कवीच् असल्याने तो थोरचं..!!

अनेक कवींच्या….नेक कविता बऱ्याच वेळेला सामान्य वाचकांच्या काळजाला हात घालतात..नव्हे नव्हे तर, समाजभान जागवून प्रबोधनाच्या क्रांतीची मशाल पेटवतात.आणि त्यातीलच एका जिंदादिल कवीची ही कविता …!!

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धात्मक आयुष्य जगताना पैसा आणि भौतिक सुख याचेच राज्य वाढत चालले आहे. या उपभोगिकरणाच्या मायाजालात आयुष्याचे सार मोजले जात असताना, कवितेत आपलं सर्वस्व ओतणारा आणि या कवितांनाच्, जीवनाचे सार मानून नव्या उमेदीने विचार भावनेतून विश्वात्मक होणारा एक जिंदादिलं कवी.. की ज्याच्या नावातच विजय आहे. या विजयाच्या हर्षात्मक विचार -स्पर्शाने मराठी साहित्याच्या दशदिशा आसमंत उजळवणारा लेखक..कवी…साहित्यिक,नव्हे..नव्हे तर याच्या पलीकडे जाऊन अनेकांच्या हृदयात..समाजात  मानवतेचा दीप प्रकाशमय ठेवणारा खराखुरा  प्रबोधनाचा प्रकाश आणि त्या प्रकाशाचं अखंड प्रकाशमय राहणार पर्व म्हणजे प्रकाशपर्व –  उर्फ – कविराज विजय यशवंत सातपुते…!!!

प्रकाशपर्व हा विजयजींचा तिसरा  काव्य संग्रह होय.अक्षरलेणी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.

समीक्षक – श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

त्याचा दोन  आवृत्ती प्रकाशित झाल्या.  अजुन देखील काव्य रसिकांच्या मनावर या दोन्ही  आवृत्ती  राज्य करत आहे.  कवितेशीच खऱ्या अर्थाने संसार करणाऱ्या या अवलियाने मराठी साहित्यातील कविता जिवंत ठेवण्यात योगदान दिले आहे, यात शंकाच नाही. प्रकाशपर्व दुसऱ्या काव्यसंग्रहात कविराज विजय सातपुते समाजातील वास्तव टिपणाऱ्या सच्च्या माणसांना म्हणजेच सर्व कवींना व या जगातून निरोप घेवून गेलेल्या आपल्या लहान बहिणीच्या आठवणीत गहीवरताना अंतरात अस्वस्थ करणारी वेदना आणि यातून काळजावर घाव घालणारी कविता म्हणजे फक्त स्वतःच्या आयुष्याचे सार नव्हे तर या कवीचं सर्वस्वच भावार्पण म्हणून अर्पण करतो. . . हे सगळं पाहत  असताना  कवीच्या विशाल हृदयात स्पंदणारी कविता किती दुःखं झेलत असेल …? किती  यातना पचवत असेल…?  हे सांगण अवघड आहे. फाटलेल्या आयुष्यात माणसांना जोडत जगणं सांधण्याची विजयजींची  भूमिका अचंबित करणारीच आहे. म्हणून प्रकाश पर्व या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता मनाला स्पर्शून जाते. कवितेतील व्यथा आपलीच असल्याची ठळकपणे जाणीव होते आणि मग वाचक कवितेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही….इतकं काही लपलय त्यांच्या कवितेत.

एक भावार्पण

अंतरीच्या अंधारात

घुसमटणाऱ्या

त्या प्रकाशपर्वा साठी..!

मनाच्या अंतरीच्या अंधारात बहिणीच्या आठवणीमुळे होणारी उलघाल या कविस किती जाळत असावी आणि त्या ममतेच्या वेदना पचविण्याची ही कवीची धडपड..त्यातूनच जन्मास येणार प्रकाशपर्व …सर्व काही अनाकलनीय..!!!

आज खऱ्या अर्थाने  समाजात मानवतेच्या आणि सर्जनशील विचारांची देवाण घेवाण करण्याची निर्माण झालेली गरज ओळखून आपल्या अतिशय खास अशा शैलीत कविराज कवितेतून सामाजिक वैचारिक प्रबोधन करत राहतात. याच माध्यमातून आपल्या सर्जनशील विचारांची देवाण घेवाण करताना कवी म्हणतो..

” लेक माझी सासुराला

आज आहे जायची

एक कविता द्यायची

एक कविता घ्यायची”

जाती,धर्म,विद्वेष,अंधश्रद्धा यांना सुरंग लावत कविराजांची लेखणी माणुसकीचा महिमा गाते. माणूस म्हणून जगताना, माणसांबरोबर राहताना ,सुखदुःखाची देवाण घेवाण करताना हा कवी स्वतःचं अस्तित्व शोधत राहिला आणि कवितेनेच यांच्या जगण्याचा यक्षप्रश्न सोडविला आहे. मात्र हे सर्व करत असताना गर्व, प्रसिद्धी, प्रतिभा ,पुरस्कार,सन्मान या मोहमायांचा छेद करत करत हा कवी आणि त्यांची कविता ही फक्त लोकाभिमुख करीत राहिला. साहित्य शारदेची  अखंड सेवा करण्यातच  ही लेखणी आत्ममग्न झालेली आहे. अस सर्व सदृश्य वास्तव.

ही आपली भावना सांगताना कवी म्हणतो –

 “नुरला तो गर्व…आणि उदयास आले प्रकाशपर्व”

“उजेडाच्या गावा जाऊ ..ज्योत क्रांतीची घेवू” या प्रकाशपर्व नावाच्या पहिल्याच कवितेतून व्यक्त होताना राजकीय..धार्मिक..जातीय पक्षांचे झेंडे गाडत समतेची गुढी उभारण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश दारोदार पोहोचवण्यासाठी कवीची लेखणी सतत तळपत राहते.अशावेळी हा कवी सामाजिक मर्मावर बोट ठेवत स्वतःला यासाठी सर्वप्रथम बदलण्याचं व विवेकी होण्यासाठी आवाहन करतो.अनिष्ट रूढी,प्रथा,कथा,अंधश्रद्धा, अघोरी कृत्ये यांना खोडत व सत्य असत्याची चिकित्सा करत न्यायाची पताका उरी बाळगून क्रांतीला सुरुवात करणारी कविता… हेच कविराज  विजय सातपुते यांच्या कवितेचे खास वैशिष्ट आहे.

साऊ,राजर्षी, शंभूराजा या व्यक्ती चारित्रांवरच्या त्यांच्या खऱ्या इतिहासाची .. योगदानाची… परिवर्तनाची साक्ष देणाऱ्या कवितांचा महिमा हा केवळ अगाधच आहे.  क्रांतिज्योतीची गौरव गाथा आपल्या  कवितेतून  गाताना कवी म्हणतो की,

“समाज नारी साक्षर करण्या

झटली माता साऊ रे..

क्रांतिज्योती ची गौरव गाथा

खुल्या दिलाने गाऊ रे..!”

बुद्धाचा मध्यम मार्ग ते भारतीय संविधान याद्वारे   समतेचा मार्ग सांगत असतानाच बाबासाहेबांना अभिवादन करताना कवी म्हणतो की –

“हे भिमराया गाऊ किती रे

तुझ्या यशाचे गान

जगण्यासाठी दिले आम्हाला

अभिनव संविधान..!!”

प्रकाशपर्व या कवी विजय यांच्या काव्यसंग्रहात विविध विषयांच्या चौफेर उधळणाऱ्या ,कधी विद्रोह करणाऱ्या ,प्रेमाच्या,नात्याच्या,मातेच्या, क्रांतीच्या, अभिवादनाच्या, स्वातंत्र्याच्या, भुकेच्या, परिवर्तनाच्या, बहुजनांच्या..सत्याच्या सर्वच कविता वाचकाला मंत्रमुग्ध करतात.एकाच शैलीत व्यक्त न होता, विविध प्रकारात कविता मांडण्याची शैली हे यांच्या कवितेचं वेगळेपण आहे.फक्त लिखाणातूनच नव्हे तर वास्तविक तशाच पद्धतीचं जीनं  हा माणूस चौफेर जगतो यामुळे  फक्त कवितेचीचं नाही तर कवीच्या जगण्याचीच उंची वाढली आहे.असा हा प्रतिभा संपन्न कवी…उत्तरोत्तर अष्टपैलू बनत जातो.

पुरस्कारांच्या पलीकडची मराठी साहित्य शारदेची सेवा कवीला अजुन खुणावत राहो.. त्यांच्याकडून साहित्याची आजन्म सेवा व्हावी आणि वसंत बापट यांनी कवी विजय यांना दिलेली ‘कविराज’ ही पदवी दिवसेंदिवस साहित्य सौंदर्याने झळकत राहो हीच सदिच्छा.

प्रतिभावंतांसाठी बहुत काय लिहणे..!!

 

समीक्षक – कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे

मु/पो-वेळू(पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511

मोबाइल-7743884307  ईमेल – [email protected]

 

(तळटीप – बुकगंगा. कॉम वर  कविराज विजय यशवंत सातपुते यांचा “प्रकाशपर्व” हा काव्यसंग्रह  सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा.  तसेच 7743884307 या नंबर वर संपर्क करून हा “प्रकाशपर्व” काव्यसंग्रह आपण घरपोच मिळवू शकता.)