मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“शाळा” हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अनेकांकडून त्याची भरभरून स्तुती झाली. म्हणून मी आवर्जून तो बघितला. पण मला काही तो फारसा रुचला नाही. तोपर्यंत मी पुस्तक वाचले नव्हते. पण तेवढ्यातच माझ्या साहित्यिक मित्राने या चित्रपटावर व पुस्तकावरही खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि मी आधी जाऊन हे पुस्तक खरेदी केले.

पुस्तक वाचू लागले आणि मग मला चित्रपटातील संदर्भ उलगडत गेले. बऱ्याचदा असे घडते की एखादे पुस्तक आपण वाचलेले असते आणि आपल्या कल्पेनेतून त्या पात्रांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे त्यावर तयार केलेली कलाकृती आपल्याला भावतेच असे नाही. पण ‛शाळेच्या’ बाबतीत माझा उलटा प्रवास होता. तरीही मला पुस्तकच जास्त भावले , कारण त्यातील वातावरण, व्यक्तिरेखा लेखकाने ठळकपणे मांडल्या आहेत. वेळेचे किंवा शब्दांचे बंधन नव्हते . त्यामुळे मुकुंदाचे भावविश्व सहज उलगडले गेले आहे.

खरे तर हे पुस्तक म्हणजे मुकुंद आणि त्याच्या मित्रांचा पौगंडावस्थेतील भावभावनांचा प्रवास आहे. आत्ताच्या भाषेत आणि आत्ताच्या काळाला अनुसरून  म्हणायचे झाले तर “ first crush” ही रुढ झालेली आणि कौतुकाने मिरवली जाणारी  संकल्पनाच लेखकाने यात मुकुंद, सुऱ्या, चित्रे, फावड्या यांच्या माध्यमातून मांडली आहे. त्या अर्धवट वयातील त्यांचे अपरिपक्व विचार, संकल्पना, मस्ती याचे चित्रण यात आहे. सुऱ्याने केवड्याला प्रपोज करणे आणि त्यातून घडलेले रामायण! त्या प्रसंगात मुकुंदच्या वडिलांनी दाखवलेला संयम एक आदर्श पालक   आपल्यासमोर उभा करतो.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मांडली गेलेली ही कथा आहे. म्हणजेच साधारण ७० ते ८० च्या दशकातील! त्यामुळे त्या काळातील सामाजिक, राजकीय संदर्भ देत लेखकाने कथानकाला कुठेही धक्का न देता वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय यातील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील आहे. त्यामुळे त्यांना घरातून मिळणारे संस्कार पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणूनच मुकुंद जरा चलबीचल झाला तरी पुन्हा झटून अभ्यास करतो आणि परीक्षेत सुयश प्राप्त करतो.

वास्तविक  त्या वयात असणाऱ्या सर्व मुलामुलींच्या आयुष्यात घडणारे हे सर्व प्रसंग आहेत. फक्त स्थळ- काळात थोडा बदल असेल. कालानुरूप प्रसंग, संदर्भ थोडे बदलत असतील. पण सर्वांनीच अनुभवलेले हे भावविश्व या पुस्तकात मांडले गेले आहे. जणू काही आपलेच अनुभव वाचत असल्यासारखे वाटते. म्हणूनच सर्वांनी एकदा तरी वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. आपल्या आयुष्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तर काही व्यक्ती आपल्या नकळत आपल्याला प्रभावित करत असतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे वडील! त्यांचे दादा ; पण खऱ्या अर्थाने बापमाणूस!

‛आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाच्या तब्बल १६१ आवृत्त्या निघाल्या आणि देशी- विदेशी अशा एकूण १७ भाषांमध्ये ते अनुवादित झाले. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. नरेंद्र जाधवांनी या पुस्तकात आपले वडील, आज्जी ,आई यांच्याबद्दल एक एक प्रकरण लिहिले आहे. शिवाय वडिलांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र त्यात समाविष्ट केले आहे. ते  वाचताना त्या भाषेचा बाज आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. थोडासा मिश्किल, पण शिस्तप्रिय असणारा बाप मनाला मोहवून जातो. “तू तुझ्या बुद्धीला योग्य वाटल तेच होन्याचा प्रयत्न कर. माझं म्हनन एवढंच हाये का तू जे करशील तेच्यात टापला जायाला पायजे. तुला चोर व्हायाच? पण मग असा चोर व्हय, का दुनियाने सलाम केला पायजे.”  असे सांगणारा बाप ‘सर्च फॉर एक्सलंस’ हेच तत्वज्ञान सांगतो असे जाधवांना वाटते.

जाधव कुटुंबात एकूण ही सहा भावंडे, आई- वडील व आज्जी अशी एकत्र राहिली. वडील बिपीटी मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यामुळे  डॉ. जाधवांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले. अर्थातच तिथले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण उच्चभ्रू समाजापेक्षा वेगळे होते. पण जाधवांच्या बापाकडे असणाऱ्या डोळसपणामुळे ही भावंडे कायम वेगळ्या वाटेने गेली आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करून दाखवली.

हा सर्व विलक्षण प्रवास वाचण्यासारखाच आहे. ती एक कथा आहे एका कुटुंबाची ज्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत एक नवे क्षितीज गाठले आहे. हे एका सामान्य असणाऱ्या असामान्य माणसाने स्वतः च्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र आहे असेही म्हणता येईल. तर ही सर्वाना प्रेरणादायी ठरेल अशी सर्व भावांची यशोगाथा आहे जी त्यांनी आपल्याच शब्दात मांडली आहे.

पुस्तकाचा आकृतिबंध(form) हाही एक मराठी भाषेतील नवीन प्रयोग मानला जातो.

म्हणूनच सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. सर्व पुस्तकांचा “ बाप”!

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक

 श्रीमती अनुराधा फाटक

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

दत्तगुरू ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असून ती युगायुगात आहे.प्राचीन परंपरा असलेल्या या संप्रदायातील श्रेष्ठ विभूती म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ अक्कलकोट ! यांची ओळख वाचकांना व्हावी या हेतूने माझ्या अल्प बुध्दिप्रमाणे मी हे लेखन केले आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ हे संप्रदायातील एक महापुरुष ! दत्तात्रेयांचा इतिहासकालीन पहिला व नरसिंह सरस्वतींचा पूर्वावतार ! त्यांच्या लीलातून मिळालेला जीवनबोध या संप्रदायाने महत्त्वाचा मानला.

नरसिंह सरस्वती यांनी व्रते,वैकल्ये,कर्मकांड यांची पुर्नस्थापना करून सर्व सामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. पडत्या काळात विस्कळीत झालेली धर्माची वर्णाश्रम व्यवस्था टिकवून धरली.तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे नवे आदर्श स्वतःच्या आचरणाने सिद्ध केले.

श्री स्वामी समर्थांचे जीवन सदैव तृप्त असणाऱ्या महासागरासारखे होते. स्वामी सोवळे ओवळे मानणारे नव्हते. शुद्ध आचरण म्हणजे सोवळे आणि ओवळे म्हणजे अशुद्ध आचरण ही त्यांची भावना होती.

यांचे विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी केलेली ही शब्द साधना! वाचकांनी याचा अनुभव घ्यावा.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “तळातून वर येताना” – श्री हणमंतराव जगदाळे ☆ श्री किशन द़ उगले

पुस्तकाचे नांव : तळातून वर येताना

लेखिका : श्री हणमंतराव जगदाळे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “तळातून वर येताना” – श्री हणमंतराव जगदाळे ☆ 

संघर्षमय जीवनाची यशोगाथा– समिक्षक – श्री किशन द़ उगले 

ज्या ज्या कलाकृतीच्या मुळाशी मानवतावादी जाणिवांचा संघर्षाचा सामना निर्मळ अंत:प्रवाह झुळझुळतो आहे. जे साहित्य जननिष्ठ प्रतिभावंतांनी जनासाठी जनहितार्थ निर्माण केलेले आहे व ज्या साहित्याला जीवनाचे प्रेरणेचे आणि समस्यासंकटा निर्मूलनाचे अधिष्ठान आणि कलात्मक सौंदर्यांचे भान आहे ते सर्वच हितैशी सृजन म्हणजे अक्षर साहित्य व तेच निखळ जन साहित्य होय, प्रस्तूत ‘तळातून वर येताना’ या आत्मकथनात वास्तवतेने मांडलेले, केलेले कार्य याचा जन्मापासून ते स्वेच्छा सेवानिवृत्ती पर्यंतचा मागोवा घेतलेला दिसून येतो. शौर्यत्व गाजविणे व साहित्य लेखन ही सातारा इथल्या मातीची निर्मिती आहे. पोलीस या विषेशनातूनच या साहित्य कार्याचा समाजजिवनाशी असलेला दृढ संबंध स्पष्ट होतो. ग्रामीण व शहरी यांच्या जिवनातील प्रसंग व त्यांना तोंड देणे, सुख दुःखे त्यातील सुक्ष्मातीसुक्ष्म छटा अधोरेखित करणारे हे वास्तवदर्शी, त्यातून साकारणारी पोलीस संस्कृती, याचे चित्र आपल्या पुढे साकार करते. जनसंस्कृतीच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ जे साहित्य निर्माण होतं तेच खरं जनसाहित्य होय. शुभमुल्यांच्या कार्याच्या रक्षणार्थ अशुभाशी, अमंगलाशी संघर्ष करायला सिद्ध होणारे हणमंतराव जगदाळे वाचकांच्या मनात घर करून बसतात.

पालकांच्या कणखर, दणकट,  महत्त्वकांक्षी , बळकट बोटाच्या आधारे जिवनाचे सोने होणे, विविध अनुभव इतरांच्या मदतीवर मोठे होणे, ‘अस्वस्थ अधांतर’ मधून एका मागासवर्गीय मित्राकडून (दिनकर) पाच रू. मदत ही जिवनाचे सुवर्णकाळ बनविते. फौजदार होणे, एका डोळ्यात आसू तर दुसर्‍या डोळ्यात हसू असा संगम घडलेला दिसतो. लेखक पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ या तत्वाशी एकनिष्ठ असल्याने माणसे जोडणे, मदत करणे, आनंद वाटणे, बापुचा वारसा चालविणे या गोष्टी जाणिवपुर्वक मांडलेल्या आहेत. पाहिल्या केसचा आनंद, शरदला मदत करणे, पंढरपूर पोलीस स्टेशनमधील अनुभव, मंद्रुप पो. स्टेशनातील अनुभव , हिंदमाता खाणावळ, सोलापूर शहर चावडी पो. स्टेशनातील प्रसंग सावित्रीबाई बरोबर संसार सुख, तिकीटाचा काळाबाजार यासाठी करावी लागणारी कसरत उल्लेखनीय वाटते. स्त्रिविषयक आपुलकी, स्त्रियांचे उपदेश, मुलांचा जन्म, कराड पोलीस स्टेशनमधील घटना सी.आय.डी. मधील कार्य, कृष्णाकाठचे कुंडलला जाण्याचे वास्तव चित्रण,  भांडणे मिटवणे, तुटणारा संसार  जोडणे, या कार्यामुळे लोकप्रियता प्राप्त झालेली दिसून येते. लोक पुरस्काराचे मानकरी, ‘व्यवस्थापन पंढरीच्या वारीचे’ यामधे वारीचे सुख, पालखी सोहळ्याचा आनंद, चोख बंदोबस्त याचे यथार्थ वर्णन केलेले दृग्गोचर होते.  अहमदनगरमधील दारूमुक्ती ही अविस्मरणीय घटना वाटते. स्त्रियांच्या कल्याणासाठी केलेला एल्गार खऱ्या अर्थाने जगविण्याचा मानस होता. विश्वास नांगरे पाटील यांच्या सानिध्यातून कार्यप्रणालीची पताका फडकली. जालना येथील सहाय्यक आयुक्त असताना पाणीटंचाईचा प्रसंग मनाला खंत वाढवितो.

हणमंतराव जगदाळे सर हे नोकरीला देव मानणारे. प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत.

लोकांची सेवा हीच आशिर्वादाची शिदोरी मानून कार्य केले. नैसर्गिक जगणे, महाराष्ट्रातील अती संवेदनशील जुन्नर गावात एकोपा निर्माण करणे, ‘पोलीस मेगासीटी ‘ ला कायदेशीर स्वरूप देणे, गोळीबारात झालेल्या मयताची कबुली देणे, समाजात स्वार्थांधता वाढीस लागणे, राजकीय लोक भ्रष्टाचारी असतात यावर प्रचंड विश्वास,  पोलीस खात्याविषयी नाराजी व हे खाते नावापुरतेच राहील , जनतेचा भ्रमनिरास करतील ही भविष्यवाणी सत्यात उतरत आहे याबद्दल लेखक खंत व्यक्त करताना दिसतात. भविष्याचा वेध सांगताना, विचार मांडताना आपल्याच  अवतीभवती घडणारी/घडलेली वास्तवाधिष्ठित घटना प्रसंगाची कलात्मक गुंफण आहे. असा प्रत्यय आत्मकथन वाचकाला येतो.

या आत्मकथनकाराची आत्मनिष्ठा ग्रामजनाकडे वळलेली स्पष्ट दिसून येते. मानवी जिवनावर, त्यांच्या दुःखावर, त्यांच्या व्यथांकित जगण्यावर, अगतिक, असहाय्य परिस्थिती शरण न होता आत्मविश्वासपुर्वक धडपडण्यावर लेखकाची निष्ठा आहे. त्यामुळे माणुसपणावर त्यांची निष्ठा आहे. या कथनकातील घटकांचा मेळ मनात विलक्षण व्याकुळता व प्रेरणा उत्पन्न करतो. सार्वत्रिक आव्हान क्षमतेच्या कसोटीवर एक जिवनाभिमुख अनुभवाची कलाकृती म्हणून ‘तळातून वर येताना ‘ यशस्वी ठरली आहे. अत्यंत सुबोध, सरळ, अनलंकृत अशी भाषाशैली आत्मकथनातून अनुभवायला मिळते. जगदाळे सरांच्या लेखणीतील साधेपणाने या आत्मकथनाला विलक्षण सौंदर्य आणि सामर्थ्य प्रधान केले आहे. कृत्रिमतेचा अजिबात स्पर्श नसलेला निसर्गावर , कार्यावर निखळ स्वरूपातील शुद्ध कर्म संस्कृती वर लेखकाची निष्ठा आहे. समाजातील अपराधी , अन्यायी व्यक्तीच्या मानसिक क्रिया, प्रतिक्रियांचा अर्थपूर्ण शोध या आत्मकथनात आलेला दिसून येतो. त्यामुळे यास सच्चा आत्माविष्कार करते. हे एक उत्तम प्रेरणादायी, अर्थसंपन्न, बहुआयामी कलाकृती आहे. वैयक्तिक नेणिवेकडून सामुहिक नेणिवेकडे झालेला लेखकाचा संघर्ष व भाव प्रवास यामध्ये दिसतो! ‘संघर्ष संवाद’ हे या कलाकृतीचे प्राणतत्व होय. तसेच एक समर्थ आशयसंपन्न लेखन कृती असून मनोविश्लेषणाला प्राधान्य देणारी व पोलीस जिवनाचे दर्शन घडविणारी रेखीव आत्मकथन आहे. आशयाची व्यापकता ही केवळ पोलीस जाणीवेपुरतीच मर्यादित नसून आखिल मानवतेला सामावून घेणारी व वाचकांना विचारांची नवी दिशा देणारी आहे. वाचकाच्या मनात प्रचलित समाजव्यवस्था, राजकारण, सोसायट्या, अन्याय, छ्ळ, भ्रष्टाचार इत्यादी विषयी चीड निर्माण करणारी व त्याला परिवर्तन सन्मुख करू पाहणारी कलाकृती आहे. तसेच अशा या सर्व भ्रष्ट, स्वार्थांध, शोषक, किळसवाण्या वातावरणाला समर्थपणे शह देणे केवळ तरुण पिढीलाच शक्य आहे. तेव्हा या नव्या सर्जनोत्सुक पिढीमध्ये. क्षमता वादातीत आहे. जनकल्याणासाठी शुभमुल्याचा उद्घोष करणारी व मंगल, सुंदर, पवित्र विचारावर वाचकांना सुद्धा ठेवायला लावणारी ही जनसंस्कृतीची समृद्धी साधणारी असाधारण अशी कलाकृती आहे. म्हणूनच ती श्रेष्ठ जन आत्मकथन आहे असे गौरवाने म्हणावे लागते. येथील भावनार्थयुक्त प्रतिमा त्याच जिवनाशयातून प्रस्फुरित झालेल्या आहेत. उरबडवेपणा, नटवेपणा या प्राथमिकतेतील दोषांतून हे कथन खूप दूर आहे. जीवन दर्शनातली मुल्ये गर्भता परिवर्तनाच्या असोशीने सहजतेने विश्लेषीत होत जाते. पोलीस जीवनाशी एकरुपलेली विविध रुपे सरसोत्कट वाटतात. आशयानुकुल प्रतिमा रुपबंधातली सहजता, कथनातील प्रभावीपणा,  शैलीची जननिष्ठ वास्तवता, पोलीस मुल्यांच्या आत्मीयतापुर्ण, सहजाविष्कार व एकूणच कथेची व्याप्ती आणि परिणिती यांचे जननिष्ठेत झालेले विसर्जन कथेला वास्तवतेबरोबर आव्हान क्षमता बहाल करून जातात. त्यात शैलीचा साधेपणा, निरागस, सत्यकथन जिवन संघर्षाकडे पाहण्याची प्रगाढ जाणीव दिसून येते. साध्या भाषेने धारण केलेली अंर्तलय,  अनुभुतीचा अस्सलपणा, स्वजाणिवेच्या पलीकडे जाणारी व्यापक कार्य पोलीस निष्ठा धारण केलेली कर्तव्ये, संघर्ष जाणीव यामुळे जगदाळे सरांचे कार्य स्वत्वाच्या पलीकडे जाऊन सर्व थरातील वाचकांना आव्हान करते.

आस्वादकांच्या भुमिकेतून त्यांची महात्मता  जनप्रर्वतन क्षमता तपासताना प्रगाढता, व्यापकता, अर्थपुर्ण संदेश व जनसंस्कृतीस त्या कलाकृतीने दिलेले योगदान विचारात घेतले जाते. १९७६ ते २०१२ या काळात अत्यंत वेगाने, प्रामाणिकपणे, तडफदारपणे, नेकीने केलेले कार्य अतिशय संघर्ष आणि धडपडमय झाले आहे. नावलौकिक, सहकाऱ्याचे प्रेम, आदर, जिव्हाळा संपादून, घरदार विसरून केलेली पोलीस सेवा ही सर्वांनाच डोळ्यात अंजन  घालणारी आहे. जगदाळेसाहेबांनी सहज, सरळ जे घडले आहे ते सत्यात उतरविले आहे. पराक्रमाविषयी बढाई , शाबासकी घेणे, प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे  लागणे, स्तुती सुमनांचा वर्षाव करून घेणे यापासून खूप दूर राहिले आहेत. जिवाची पर्वा न करता कौटुंबिक सुखाचा त्याग करणे व कर्तव्य पुर्ण करणे या गोष्टी जगदाळे सरांनी निष्ठा ठेवून नोकरी हीच ईश्वर भक्ती, देशसेवा व्रत धारण केलेले दिसून येतात. सहनशिल सहिष्णुता, मन विचलित न होणे, तहान भूक विसरणे, विश्रांतीला दूर ठेवणे अशा अनेक मुल्यांची जोपासना उद्गित झालेली आहे. त्यामुळे वाचकाला अंतर्मुखी समाधान मिळून जगण्याचे बळ , सेवेची ऊर्जा, कर्तव्याला वंगन प्रेरणा मिळते.

भ्रष्टाचारास थारा न देणे, कष्टाबद्दल रडगाणे न गाणे, यशाची गर्वोवृत्ती नको, अशा अनेक नवनिर्मितीच्या खुणा तसेच कर्तव्यदक्षतेची सुगंधी दखल, कष्टाची निखळ पखरण अनुभवणे याचा परिपोष हिरवळी सारखा पसरतो व समाजाला आदर्श जीवन प्रणालीची दिशा मिळते. म्हणून पोलिस अधिकाऱ्यानेच नव्हे तर समाजातील सर्वानी वाचावे, अभ्यासावे असे हे आत्मकथन स्पृहणीय आहे. अभिनंदनिय संग्राह्य असावे म्हणूनच विद्यापिठाने अभ्यासासाठी नेमावे. तसेच या आत्मकथनात चैतन्यपुर्ण अशी स्वयंपुर्णता व इतर अनुभवापेक्षा व्युहात्मक वेगळेपण आलेले आहे. आस्वादकाला त्यामुळे अनुभव चैतन्य लाभून जीवन जगण्याची स्फुर्ती मिळते. अनुभुतीची अभिव्यक्ती सफल झाल्याने वाचकालाही ती समृद्ध अनुभुती प्राप्त होते. त्यामुळे अनुभव आत्मकथनाचे आस्तित्व फलद्रुप झालेले दिसून येते. प्रत्यक्षात अनुभव, संघर्ष, त्याग, मुल्य व भविष्याचा वेध मांडलेला आलेख म्हणजे ‘तळातून वर येताना’ हे आत्मकथन होय. अशीच साहित्यनिर्मिती फळास यावी अशी अपेक्षा यासाठी पुढील साहित्य लेखनास हार्दीक शुभेच्छा.

शेवटी.

॥ इवलेसे रोप लाविले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी ॥

समीक्षक

श्री किसन दत्तात्रय उगले, (महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई), ता. उदगीर . जि. लातूर – ४१३५१७

मो. 9850251540

लेखक

श्री हणमंतराव जगदाळे,  (निवृत्त पोलीस उपअधीक्षक )

प्रकाशक

दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

२५१ क, शनिवार पेठ , पुणे. पीन -४११०३०

फोन -०२० २४४७१७२३/२४४८३९९५ .

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ विनोदी कथा संग्रह – “फास्टफूड” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ विनोदी कथा संग्रह – “फास्टफूड” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

पुस्तकाचे नांव : फास्ट फुड

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : शिवसृष्टी प्रकाशन

पहिली आवृत्ती : मधुश्री प्रकाशन तर्फे १९९८ (रु.९०/—)

तिसरी आवृत्ती :  १८ अक्टूबर २०१८

किंमत : रु. २४०/—

श्रीमती उज्ज्वला केळकर

सौ. ऊज्वला केळकर यांचा “फास्ट फुड”हा विनोदी कथा संग्रह नुकताच वाचनात आला.आणि मनापासून त्यांवर लिहावसं वाटलं.

या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत.कथांचा आकार लहान असला तरी अनेक प्रसंगांच्या गुंतागुंतीतून सकस विनोदनिर्मीती होत,कथा आशयपूर्ण शेवटास हसत खेळत पोहचते.

वास्तविक विनोदी लेखन प्रक्रिया ही सोपी नसते.निरीक्षण आणि प्रतिभा यांची ऊत्कृष्ट देन असणार्‍यांनाच हे जमते.हे पुस्तक वाचताना ऊज्वला ताईंच्या बाबतीत हे नक्कीच जाणवते.कथेतील विनोद हा ओढून ताणून आणलेला वाटत नाही तसेच केवळ हास्यासाठी द्वयर्थी शब्द वापरून केलेला पाचकळ,हीणकस विनोद ह्या कथांतून आढळत नाही.

विसंगती ,वास्तव आणि सहजता यांचे अचुक मिश्रण झाल्यामुळे विनोदाला दर्जा प्राप्त होतो. आणि त्याचा अनुभव या कथा वाचताना येतो.

या अकराही कथांमधे, केंद्रस्थानी, वेगवेगळी मानसिकताही वेगवेगळ्या विषयातून जाणवते.त्या त्या वेळच्या सामाजिक संदर्भातून हलकी फुलकी कथा जन्माला येते.

फास्ट फुड ही शीर्षक कथा आजकालच्या ईन्सटंट, सगळं काही तत्काळ या परिस्थितीवर मजेदार भाष्य करते. या फास्ट फुड मनोवृत्तीमुळे होणारं,नैसर्गिक असंतुलन, आणि त्याला निसर्गानेच घातलेली खीळ ही मध्यवर्ती कल्पना. मग भूलोकी, निरीक्षण करायला पत्रकार आणि फोटोग्राफर बनून आलेले , नारद आणि विष्णुदेव, यांनी घेतलेली सौ. संशोधिनी ब्रह्मे यांची मुलाखत…आणि  परमेश्वरी योजनानांच छेद देणरे त्याचे संशोधन भगवंत कसे ऊधळून लावतात याची मस्त हास्यकथा म्हणजेच “फास्ट फुड” कथा.

निसर्गापुढे मानव श्रेष्ठ असूच शकत नाही ,याची प्रचीती देणारी ही कथा…

घोरवाडी गावाचा सरपंच ढोरवाडी गावात नुकत्याच घडुन गेलेल्या कार्यक्रमावर कुरघोडी करण्यासाठी शिक्षक दिन आयोजित करतो,आणि या शिक्षक दिनाचा कसा घोळ होतो  हे खुसखुशीत ग्रामीण भाषेत वाचायला खूप मजा येते. “शिक्षक दिनाची गोष्ट” ही कथा वाचताना मला शंकर पाटील, द. मां मिरासदार, यांचीच आठवण झाली…

साहित्यक्षेत्रातल्या नकलीपणाला, बनावटगिरीला वाचा फोडणारी कथा म्हणजे “इथे साहित्याचे साचे मिळतील” ही कथा…काहीशी ऊपहासात्मक. ऊपरोधीक पण हंसत हंसत मर्मावर बोट ठेवणारी..

“स्वर्गलोकात ईलेक्शन” ही कथा अतिशय मार्मीक.

रूपकातून निवडणुक या भ्रष्ट ,राजकीय हेवेदावे ,यावर प्रकाश टाकणारी मजेदार गोष्ट!!

सर्वसाधारणपणे माणसाच्या काही सुप्त इच्छा असतात.

आपली, वैशिष्टपूर्ण ओळख असावी, आपला सन्मान व्हावा, झालास तर धनलाभही व्हावा.. आणि त्यासाठी केलेल्या धडपडीतून नेमकं काय निष्पन्न होतंआणि सारंच कसं हास्यास्पद ठरतं…हे  “शारदारमण गिनीज बुकात” शारदारमणांची सेटी, “मी मंगलाष्टके करते”

तसेच”हातभर कवीसंमेलनाची वावभर कहाणी या कथांतून अनुभवायला मिळतं.

“माझा नवरा माझी पाहुणी”ही कथाही मनुष्य केवळ संशयामुळे,भयग्रस्त होऊन मजेला कसा मुकतो ,हे गंमतीदारपणे सांगते.असे अनुभव कळत नकळत आपल्यालाही आलेले असतात म्हणून या गंमतकथेशी आपण जोडलेच जातो.

वरसंशोधन हा तसा ज्वलंत प्रश्नच आहे.”वन्संसाठी वर संशोधन..” या कथेतून याचाच शोध घेतलाय्.विनोद,हा वास्तवता आणि विसंगतीतूनच निर्माण होतो.ही कथा वाचताना हे जाणवतं.

“असे पाहुणे येती….”ही शेवटची कथा वाचल्यावर,

पुस्तक वाचुन संपले अशी एक चुटपुट मनाला लागते.

या कथेतले मिलीटरी शिस्तीचे मामा,कणखर बाणा असलेली आत्या ,तिचा नातु आणि या भिन्न वृत्तीच्या पाहुण्यांची सरबराई करताना ऊडालेली यजमानांची धांदल वाचताना अगदी सहज हसु येते.आणि कथेच्या शेवटी मामा आणि आत्यांची यजमानांची केलेली स्तुती पत्रे वाचून मन थोडं डुबतंही..माणसं निराळी असतात,

आपलं स्वास्थ्य बिघडवतात पण म्हणून ती वाईटच असतात ,असं नसतं. हे मनाला स्पर्शून जातं…

जाता जाता इतकंच ..फास्टफुड एक वाचनीय,निखळ विनोदी पण विचार देणारा कथासंग्रह…विनोदाच्या नादांत कुठेही संयम न सोडणारे ,सभ्य भाषेतील ऊत्तम लेखन…

ऊज्वलाताई तुमचे अभिनंदन आणि वाचकाची आवड पूर्ण करणार्‍या  पुस्तक प्रकाशनाबद्दल मनापासून आभार…आणि पुस्तकाच्या या तिसर्‍या आवृत्तीनंतरही अनेक आवृत्त्या प्रकाशित  व्हाव्यात या हार्दिक शुभेच्छा…!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “मन मे है विश्वास” – श्री विश्वास नागरे पाटिल ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “मन मे है विश्वास” – श्री विश्वास नागरे पाटिल ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodr...

पुस्तक  – मन मे है विश्वास

लेखिका – श्री विश्वास नागरे पाटिल  

प्रकाशक – राजहंस प्रकाशन  

मूल्य –  300  रु

“माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन- सामुग्रीन आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेने कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्या’ ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक – प्रपंच केला आहे.”

सध्या सगळ्या तरुण मुलांचे आयडॉल बनलेले ‛विश्वास नांगरे पाटील ‘ यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या मलपृष्ठावरील त्यांचे मनोगत सर्वाना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थीदशेपासून आजचा प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास , शिवाय 26/ 11 च्या हल्ल्यातील त्यांचे शौर्य या आत्मकथनात वाचायला मिळते.

सांगली जिल्ह्यातील ‛कोकरूड’ या अतिशय छोट्या गावातून आलेल्या या तरुणाने मारलेली भरारी बघताना अचंबित व्हायला होते. पण आत्ता जे प्रत्यक्ष दिसते आहे त्या मागची मेहनत प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर लक्षात येते.

शहरात प्राप्त होणाऱ्या कोणत्याही सुविधा नाहीत, अभ्यासाची अपुरी साधने आणि आजूबाजूचा अर्धशिक्षित समाज या सगळ्या वातावरणातून एखाद्या मुलामध्ये ती अभ्यासू वृत्ती निर्माण होणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण अनेक जणांकडे अनेक कला उपजतच असतात. तशीच ही अक्षरांची जादू विश्वासच्या मनावर भुरळ पाडत होती. तो त्यात रमत गेला. त्याच्या नशिबाने त्याला शिक्षकही तितकेच चांगले मिळाले आणि तो यशाच्या पायऱ्या चढत गेला. दहावीला थोडक्यात बोर्डात नंबर हुकला तरी केंद्रात पहिला येऊन त्यांनी बाजी मारलीच होती.

पण प्रत्येक यशस्वी मुलाच्या आयुष्यात येणारी एक फेज त्यांच्याही आयुष्यात आली. सायन्स ला प्रवेश तर घेतला पण मन रमत नव्हते. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष! परिणामी बारावीला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्याइतका स्कोअर झाला नाही. खूप विचाराअंती प्रथमवर्ष कला शाखेत प्रवेश घेतला. सर्वांनी खुळ्यात काढले ; पण लेखक आपल्या मताशी ठाम होते. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर “पाहिले वर्ष अभ्यासाची दिशा ठरवण्यात आणि राजकारण व गुंडगिरीचे प्रशिक्षण घेण्यात कधी संपले ते समजलेच नाही.” पण दुसऱ्या वर्षी जगदाळे सर त्यांच्या आयुष्यात आले आणि स्पर्धा परीक्षेची दिशा त्यांना मिळाली.

पण तोही प्रवास तितका सोपा नव्हता. मात्र तो प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच वाचकाने समजून घ्यावा. आजकाल स्पर्धापरीक्षांचे फुटलेले पेव आणि त्याचा फायदा करून घेणाऱ्या क्लासेसच्या  जाहिरातींच्या पार्श्वभूमीवर विश्वास पाटलांचे कष्ट खरोखर आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहेत.

मुळातच अंगात असणारी हुशारी, नेतृत्वगुण आणि शारीरिक सामर्थ्य याच्या जोरावर विश्वास पाटलांनी यश मिळवले आणि तोच प्रवास प्रांजळपणे या पुस्तकात मांडला  आहे. आपल्या चुकाही तितक्याच परखडपणे नमूद केल्या आहेत. भाषेवर पहिल्यापासूनच प्रभुत्व असल्यामुळे ती ओघवती आहेच. म्हणूनच पुस्तक वाचताना कोठेही रटाळ वाटत नाही. सर्वांनी निश्चितच वाचण्यासारखे हे पुस्तक आहे. म्हणूनच 2016 पर्यंत त्याच्या चार आवृत्या निघाल्या.विशेषतः आजच्या तरुणाईने ते वाचवेच!

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “भूपातील निषाद” – सुश्री आसावरी केळकर वाईकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “भूपातील निषाद” – सुश्री आसावरी केळकर वाईकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

 

 

पुस्तक — कथा संग्रह – भूपातला निषाद

लेखिका — आसावरी केळकर—वाईकर

प्रकाशक – श्री नवदूर्गा प्रकाशन

प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २०२०

किंमत — रु.३८०

हे पुस्तक वाचताना प्रथमत:जाणवतं ते हे, की, आसावरी केळकर —वाईकर यांच्या लेखनाला एक भक्कम, वैचारिक बैठक आहे. भूपातला निषाद या कथासंग्रहात चार दीर्घकथा आहेत. चारही कथांतले विषय वेगळेआहेत. विषय चौकटी बाहेरचे नसले तरी ते हातळतानाचा दृष्टीकोन निराळा, पुढचं पाऊल ऊचलणारा, जाणीवपूर्वक काही संदेश देणारा आहे.

सुश्री आसावरी केळकर वाईकर

प्रत्येक कथेमध्ये, छोटी मोठी ऊपकथानके आहेत. पण ती एकमेकांमधे गुंफताना कथेचा मूळ गाभा,ऊद्देश अथवा दिशा बदलत नाही. कथा कुठेही भरकटत नाही. म्हणूनच ती बांधेसुद आणि सुसूत्र वाटते. कथेचा ओघ, प्रवाह खुंटत नाही. म्हणूनच ती वाचकाचं मन पकडून ठेवते.

भूपातला निषाद ही एक प्रेमकथाच आहे. दीर आणि वहिनीच्या मैत्रीपूर्ण प्रेमाची ही कथा आहे. कथेतलं सच्चेपण,पावित्र्य लेखिकेनं शब्दसामर्थ्यानं नेमकेपणाने जपलेलं आहे . ही कथा वाचत असतांना काही ठिकाणी नक्की वाटतं की, हे चौकटी बाहेरचं आहे, अवास्तव आहे, अयोग्य आहे, पण त्याचं पटवून देणारं ऊत्तर लेखिकेनं यात दिलंआहे.! भूप रागात तसे सा रे ग प ध सा असे पाचच सूर असतात. पण तीव्र मध्यम आणि निषादाचा प्रयोग होऊ शकतो. त्यामुळे रागाच्या आकृतीबंधाला धक्का न लागता, रागाचं सौंदर्य वाढतं. आणि मग भूपातला निषाद ही कथा मनाला पटून जाते.

अनुबंध  या कथेत, पीडीत स्रियांच्या पुनर्वसनासाठी ऊभारलेल्या संस्थेची प्रमुख संचालिका नीना ही जबरदस्त मनोबलाची व्यक्ती भेटते.. तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांतून, जसे की तिच्या विशेष बहिणीच्या आयुष्यात घडलेल्या दु:खदायी घटनेपासुन ते आई वडील, नवरा यांचे अकस्मात मृत्यु, संस्थेतील तिच्यावर माया करणारी माणसं,त्यांच्या कथा,सुंधाशु नावाच्या फसव्या माणसाची भेट आणि त्यामुळे तिला सतत आठवणारा तिचा नवरा माधवन,याचा चांगुलपणा .. आणि नंतरचे तिने घेतलेले निर्णय..इथपर्यंत कथा सुरसपणे घडत जाते. एक चांगला विचार देऊनच ही कथा संपते.. रुढी परंपरा सोवळं ओवळं यात अडकून माणूसकीलाच पारखी झालेली माणसेही यात भेटतात.

आणि भलेही नात्यांची पडझड झाली तरी त्यांना टक्कर देणारी भक्कम माणसेही असतात हेही या कथेत जाणवतं योजना  ही कथा विसंवाद वा संवाद तुटल्यामुळे एका अत्यंत संवेदनाशील आणि बुद्धीमान व्यक्तीच्या विस्कटलेल्या मानसिकतेची आहे.ईश्वराच्या अस्तित्वाचा, सत्याचा शोध घेण्यासाठी मनातली चीड, क्रोध,कडवटपणा घेऊन ,घर सोडलेल्या तरुणाची ही कथा वाचनीयच आहे. तो आणि त्याच्या निर्णयामुळे त्याच्यावर प्रेम करणारी दुखावलेली माणसं पुन्हा एकत्र येतील का? ही ऊत्सुकता टिकवतच ही कथा पुढे जाते…

ज्याचं त्याचं आभाळ या कथेतही तीन वेगवेगळी कथानकं आहेत.तिघीही वेगवेगळ्या स्तरातील असल्या तरी  स्वत:च्या दु:खावर मात करण्यासाठी, अन्यायाला ऊत्तर देउन निर्णय घेणार्‍या आहेत… इथेही पुन्हा समाज, चौकट ,परंपरा,त्यातून सहन करावी लागणारी टीकाटिप्पणी आहेच.पण लेखिकेनं याही कथेतून, कुणी कसं जगावं, ज्याचं त्याचं आभाळ.. त्यात इतरांची भूमिका नगण्यच… हा सुरेख विचार मांडलाय…

एकंदर भूपातला निषाद हा चार सुंदर कथांचा संग्रह आहे हे नक्कीच. कुठेतरी कथा वाचताना वाटतेही की, कथा पुढे सरकत नाही, थांबल्यासारखी वाटते.. रीपीटेशनही जाणवते, पण तरीही कथा दिशाहीन होत नाही. कथेवरची पकड सुटत नाही. हे महत्वाचे…

लेखिका आसावरी केळकर वाईकर यांचे मनापासून अभिनंदन…!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१६/१०/२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत

श्रीमती माया महाजन

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत ☆

(सुश्री नरेंद्र कौर छाबडा या हिंदीतील नामवंत लेखिका. त्यांच्या निवडक लघुतम कथांच्या अनुवादीत कथांचे पुस्तक ‘इंद्रधनुष्य’ नागपूर येथील चंद्रकांत प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.)

इंद्रधनुष्य  : भावनांचे  रंगीबेरंगी आविष्कार

जे मला आवडते ते इतरांनाही सांगावे अशी माझी तीव्र इच्छा असते. म्हणूनच उत्तम दर्जाचे लिखाण वाचले की जो आनंद मिळतो तो इतरांनाही मिळावा या हेतूने, या इच्छेनेच मला अनुवाद क्षेत्राविषयी जवळीक वाटते.

माझी मैत्रीण नरेंद्रकौर छाबड़ा हयांच्या लघु कथा माझ्या वाचनत आल्या आणि त्या उत्तम कथा तुम्हालाही सांगाव्याशा वाटल्या. छाबड़ाजीना ही कल्पना आवडली आणि मी अनुवाद केला . जसजशी मी एकेक काथेचा अनुवाद करीत गेले  तसतशी मी स्तिमित होत गेले. नरेन्द्रकौरजींची दृष्टी केवळ सामान्य गृहिणीची नाही. पाहिलेल्या – अनुभवलेल्या घटनेचे बरे-वाईट प्रतिसाद त्यांच्या मनात उमटतात आणि त्यांच्यातील लेखिका अस्वस्थ होते . मग ते प्रतिसाद शब्दरूप धारण करून अवतरतात आणि वाचकालाही त्यात सामील करून  घेतात . प्रत्येक घटनेचा  विचार मात्र त्या समाज-कल्याणाच्या दृष्टीतून करताना दिसतात . त्या श्रध्द्धाळू देखील आहेत हे त्यांच्या समर्पण पत्रिकेवरूनच जाणवते . परमेश्वराच्या कृपादृष्टीवर त्यांचा नितांत  विश्वास आहे. अशा श्रद्धाळू आणि समाजहितैषी मनाच्या व्यक्तिच्या लेखणीतून तितक्याच भावगंभीर कथा जन्म घेतात – हेच नरेंद्रजिंच्या बाबतीत म्हणता येईल.मुळात मनुष्यजात ही गोष्टीवेल्हाळ आहे . काय घडले हे जाणण्याची उत्सुकता माणसाला ऐकायला, सांगायला आणि वाचायला भाग पाडते. मग हे पद्धतशीर  लिहिणे सांगणे कथेचे रूप घेते.

कथा हा साहित्य-प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कथेचे स्वरूप दीर्घ, मोठे, सर्व-साधारण , लघु आणि अतिलघु असे आपोआपच होते. त्याचेच आपण कादंबरी, दीर्घकथा, कथा, लघुकथा  आणि अतिलघुकथा  (अलक) असे वर्गीकरण करतो. माझ्या मते लघुकथा आणि त्यात अलक लिहिणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. लेखनाची सर्व वैशिष्ट्ये-भाषा सौन्दर्य, घटनेची मांडणी, पात्रांचे मनोव्यापार, संवाद  आणि वाचकांना खिळवून ठेवण्याची कला – ह्या सर्वाचा वापर कादंबरी वगैरे प्रकारात सहजपणे केला जाऊ शकतो आणि लघुकथा लेखकाचा इथेच कस लागतो. उत्तम आणि प्रभावी लघुकथा तीच असते जिच्यात हे सर्व गुण आढलतात.  नरेन्द्रकौर जींची कथा या निकषावर यशस्वी ठरते – म्हणूनच ती  वाचनीय झाली आहे. लघुकथेतील आशय नेमकेपणाने पण थोडक्यात मांडला गेला तरच ती प्रभावी ठरते.

नरेद्रकौरजींच्या काही वेचक कथांचा परामर्श इथे उदाहरणदाखल घेणे इष्ट ठरेल.

समाजातील काही  अनिष्ट चालीरीतींना नरेंद्रकौरजीनी आपल्या कथेत असे काही मांडले आहे की वाचक अंतर्मुख होऊन त्या सोडून देण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचतो. या कथा आहेत – भोज, समाजरीत, अपशकुनी, फालतू, चपराक  वगैरे.

बाई, पान, तिचा आनंद, महिला दिवस , युक्ति  या कथा स्त्रीत्वाची घुसमट साकारतात.  लेखिकेच्या मते  केवळ शिकल्याने  महिला स्वतंत्र होत  नाही तर शिक्षनाने तिच्यात  चूक गोष्टीना ‘नाही‘ म्हणण्याची हिंमत आली पाहिजे. उदा. ‘दुहेरी मानसिकता’ मधे लेक व सून यांच्याशी वागताना बाई कशी फरक करते ते रंगविले आहे; तर ‘पान‘ मधे स्त्रीवर पतिचा प्रभाव किती पराकोटीचा असू शकतो हे दाखविले आहे.’चपराक’ मधे मात्र स्त्री स्वतःच कशी सामाजिक चालीरितींना बळी पड़ते याचे प्रभावी चित्रण आहे. ’महिला दिवस’ या दिवसाची महिलेलाच किती व कशी किमत मोजावी लागते हे एक ज्वलंत वास्तवाचे चित्रण केले आहे ‘महिला दिवस’ या कथेत .

माणूसकी हे सभ्यतेचे दूसरे रूप आहे. नरेन्द्रकौर  यांच्या कथा माणूसकीचे दर्शन घडवताना  थेट आपल्या विचारांचाच कब्जा घेतात. यामधे ‘माणूसकी’  आणि ‘शिक्षा’ या दोन कथा तर जबरदस्त  धक्का देणार्‍या आहेत.’ माणूसकी ‘मधील आतंकवादी  स्वत:च रक्षक होतो तर  ‘शिक्षा‘ मधे एका मुलीची किन्नर कशी सुटका करतात – हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

काही सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न काही कथामधे लेखिकेने केलेला दिसतो. उदा. परिणाम, युक्ति, महिला दिवस, आधुनिकता, फैसला, नात  वगैरे.

माणूस परिस्थितीने लाचार होतो याचे हृदयद्रावक चित्रण आहे ‘मजबूरी, भोज, तडजोड़’ वगैरे कथांमधे.

एकंदरित नरेंद्रकौरजींच्या कथेचे विषय  सर्वत्र संचार करणारे आहेत ;त्याबरोबरच त्यांचे भाषाप्रभुत्वदेखील तितकेच प्रभावी आणि सफाईदार आहे . आजच्या धावपळीच्या दुनियेत लोकाना चटपट मनोरंजन हवे असते – ही जनमानसाची नस त्यानी अलकमधून बरोबर पकडली  आहे. पण ते केवळ मनोरंजन नसून जनजागृतिचे , लोक कल्याण विचारात घेणारे, आणि समाजहितैषी विचार मांडणारे आहे. म्हणूनच मलाही त्यांच्या कथांचा अनुवाद करावासा वाटला. अपेक्षा करते की मी त्याना पूर्ण न्याय दिला आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटला, ते पुस्तक वाचून मला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत   – माया महाजन

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ तिसरं पुस्तक – सौ.गौरी गाडेकर ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ तिसरं पुस्तक – सौ.गौरी गाडेकर ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी☆ 

कथासंग्रह – तिसरं पुस्तक

लेखिका – सौ.गौरी गाडेकर

पृष्ठसंख्या – 188

सौ.गौरी गाडेकर यांच्या कथा नेहमी दिवाळी  अंकात असतात. मी अगदी  काॅलेजात असल्यापासून अनुराधा, माहेर, कथाश्री मधून वाचत आले आहे. त्यांच्या कथा नुसत्या अंकात  येतच नव्हत्या तर त्यांना पारितोषिके पण मिळालेली आहेत. त्यांचे कथा संग्रह 1)  नातं 2) आउटसायडर सहज आणि आता तिसरं नांवाप्रमाणेच तिसरं पुस्तक आहे.

 

त्यांची भाषा सोपी सहज कळणारी,प्रसंग ,माणसं नेहमी आपल्या आयुष्यात येणारी,मनोरंजक म्हणून मला भावते.

त्यांनी लिहिलेल्या ह्या कथासंग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील कथा आहेत.

‘लिव्ह इन’  ही कथा आजच्या काळात अतिशय समर्पक आहे. कित्येक जणांची मुलं परगांवी  किंवा आपापल्या नोकरी धंद्यात मग्न. आईवडिलांना द्यायला वेळ नाही. त्यातून त्यांचा किंवा तिचा लाईफ पार्टनर नसेल तर उतार वयात आलेला एकाकी पणा  ह्या वर डोळसपणे केलेला विचार ह्या  कथेत मांडला आहे.कथेचा शेवट कलाटणी देणारा आहे.

सुश्री गौरी गाडेकर 

ह्यांच्या  सगळ्याच कथेची भाषा सोपी.प्रसंग, व्यक्ती जिवंतपणे रेखाटण्याची हातोटी . हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.

केळ ‘ही महत्त्वाची कथा आहे.जी.ए.कुलकर्णी यांच्या कैरी व तुती या कथांची पश्चात कथा आहे.

ह्या कथेमध्ये त्या काळातील प्रेमळ, भाबडी माणसे, दुस-यासाठी पराकोटीचा त्याग करणारी निस्वार्थी माणसं, दुष्ट प्रवृत्तीचा मालक,आणि शेवटी सगळी सूत्रं  फिरवणारी नियती असं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलेलं आहे.

इंग्रजीचे सर ही कथा तर खूपच छान. शालेय जीवनातील या सरांनी केलेले संस्कार नायिकेच्या मनांत खोलवर होते की ती त्यांचा चेहेरामोहोरा विसरली .पण त्यांचे विचार वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते.त्या सरांच्या द्वारे लेखिका आपल्याला बरंच काही सांगून गेली. ही कथा वाचतांना मला माझेच प्रतिबिंब थोड्या फार   प्रमाणात दिसले.

‘मालाडचा म्हातारा’ ही कथा एकाआईच्या मुलीवरच्या निस्सीम प्रेमाची, तिच्यासाठी केलेल्या त्यागाची, तर एका स्वाभिमानी स्रीने आपल्या संसारासाठी केलेल्या कष्टांची, सर्व माणसांची मने समजून घेणारी काकी  अशा स्रीच्यावेगवेगळ्या व्यक्तीरेखा लेखिकेने रेखाटल्या आहेत.त्या सगळ्याजणी आपल्यातल्याच आहेत असा भास होतो

‘तसली’ ही कथा छान बाळबोध चि.सौ.कां.ची आणि तिचा झालेला गैरसमज त्यातून झालेला विनोद. खूपच गंमतीशीर  ‘शाप ‘ ही कथा त्यातील सुमी, मेनका,आई ह्या व्यक्ती आपल्या समोर उभ्या  रहातात. मनांतून जात नाही.खरचं एखाद्या घराण्याला असा शाप असू शकतो का? इतकं सुंदर वर्णन  लेखिकेने केले आहे.म्हातारे सासरे,मनोरुग्ण सासू,छोटा मुलगा सगळ्यांची जबाबदारी पेलताना प्रेयसीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृतघ्न पुरुष बाहेर कसा आकर्षित होतो ह्यांचे लेखिकेनेह्रदयस्पर्शी वर्णन  केलं आहे

अनुताप ही कथा ह्रदयस्पर्शीआहे.आपल्याला नेहमी  वाटते आपल्या आई वडिलांचे कधी कधी चुकले पण खरंतर त्यांना त्या त्या वेळी जसा प्रसंग आला त्याला तोंड देण्यासाठी तसे वागावे लागलं.  जेव्हा आपण तशा प्रसंगातून जातो आणि आपली मुलं किंवा नातेवाईक आपल्याला दोष देतात तेव्हा आपल्याला आईवडिलांना दोष दिल्याचा पश्चात्ताप होतो.

लेखिका कधीकधी आपल्याच घरांतले प्रसंग सांगते असे आपल्याला वाटते .

‘प्राक्तन ‘ ह्या कथेत एकच व्यक्ती चित्र रेखाटताना किती सकारात्मक भाव दाखवते तीच व्यक्ती कथेत सगळं अनुभव दाखवताना वेगळे भाव दाखवते.अशी तक्रार स्वतः कथा लेखकाकडे करते.ही नेहमीपेक्षा वेगळीच कल्पना आहे.

एकूण थोडक्यात सांगायचे तर भाषा  सरळ सोपी,व्यक्ती,प्रसंग आपल्या  आजूबाजूला नेहमी घडणारे ,वाचून अंतर्मुख करणारे असतात. रोजच्या जीवनात येणारे ताणतणाव, अनुभव,याचे वर्णन हुबेहुब असते .त्यामुळे वाचकांचे कथांशी बंध जुळून येतात.सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे.

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “धुक्यातील वाट” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ.दीपा पुजारी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “धुक्यातील वाट” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. दीपा पुजारी ☆ 

कथा संग्रह  – धुक्यातील वाट

लेखिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर

श्रीमती उज्ज्वला केळकर

धुक्यातील वाट हा  उज्ज्वला केळकर यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाच मनापासून स्वागत. या छोटेखानी पुस्तकातून लेखिकेने अनेक वेगवेगळ्या कथाविषयांना वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या या प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत.

सोळा कथांचा हा कथासंग्रह लेखिकेच्या अंगी असलेल्या अनेक पैलूंची ओळख करून देतो. भाषेवर प्रभुत्व असूनही सरळ,साधी,सोपी लेखनशैली, तरीही प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आहे. आशय समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली आहे. साधे लिखाणही मनावर कसे छापा उठवू शकते हे कळण्यासाठी हा कथासंग्रह जरूर वाचावा. ओघवते सहज लिखाण, साधी शब्दरचना, थोडक्यात आशय मांडणारं लेखनकौशल्य अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी हा कथासंग्रह  परिपूर्ण आहे.

दोन तीन पानांच्या लहानशा कथा थोडक्या वेळात वाचता येतात.म्हणूनच जास्त वाचनसमाधान देतात. यातील बहुतेक कथा संवेदनशीलते बरोबर सामाजिक बांधिलकीची लेखिकेला असलेली जाण लक्षात आणून देतात. यातील काही कथांचा आवर्जून ऊल्लेख करावासा वाटतो.

‘धुक्यातील वाट’ ही मुखपृष्ठ कथा खूप काही शब्दांच्या पलीकडचे सांगून जाते. सुरवातीला ही प्रेमकथा वाटते. पण कथानक जसजसे सरकत जाते तसतसे नायकाच्या मनातील विचारांचे पदर उलगडत जातात आणि ही कथा म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा केलेला आदर आहे, कलेला दिलेली नि:सीम दाद आहे हे लक्षात येते.सुरांच्या सम्राज्ञीला , तिच्या सुरावटींनी दिलेल्या आनंदघनाला तिच्याच चित्राच्या रुपात कुंचल्याचे अभिवादन आहे.या कथेतील धुक्याचं वर्णन करताना रोमरंध्रातून आत झिरपत चाललंय अशा शब्दात जेव्हा लेखिका करते, तेंव्हा आपणच धुक्यातून चालत असल्याचा भास   होतो.

‘पांघरूण’ ही  कथा दारिद्र्याच विदारक रुप दाखवते. परदेशातील धर्मादाय संस्था तेथील काही कुटुंबांच्या मदतीने शाळेतील काही मुलांना दत्तक घेते. तिथल्या पालकांनी पाठवलेल्या पत्रातून एक अनोख जग सर्जासमोर साकारत असतं.पण दारुड्या बापामुळं निरागस मन कोसळून जातं. झोपडीच वर्णन, ठिगळं जोडून आकाश शिवण्याची आईची धडपड, बेदरकार, बेफिकीर, चंगळवादी, स्वार्थी बाप यथार्थ ऊभे करण्यात शब्दप्रभुत्व लक्षात येतं.

‘अनिकेत’ या कथेत    समाजासाठी कळकळ , निसर्गसंवर्धनाची जाणीव, अशा विविध कार्यासाठी आपले आयुष्य वेचणारा अनिकेत , लोकांचा आवडता होऊनही कुठेच न गुंतता आपला प्रवास सुरु ठेवतो. समाजसेवेचे व्रत घेण्याची गरज स्वतःच्या वागण्यातून ठसवतो.

‘डायरी’ ही,  क्षणिक, फसव्या मोहाला बळी पडून तरुण आयुष्यातून कसं ऊठावं लागतं याची करुण कथा आहे. त्यांच्याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या पालकांची आधाराची काठी मोडते. भावस्वप्नं बघणारी मैत्रीणही कोलमडून जाते.मन सुन्न करणारी ही कथा नायकाच्या डायरीच्या रूपातून सामाजिक भान जागरुक  करते.

‘त्याची गडद सावली’ या  या कथेत नवीन जोडीदारा बरोबर सुसंवाद साधताना पहिल्या दिवंगत जोडीदाराच्या येणाऱ्या आठवणी, दोघांच्या स्वभावातील फरक यामुळे नायिकेची होणारी घुसमट स्पष्ट तरीही साधेपणाने मांडली आहे.

अशी घसमट पुरुषांची देखील होते हे ‘आंदोलन’ या कथेत दाखवले आहे. अनुरुपता नसेल तर संसारात अर्थ उरत  नाही. मोठ्या माणसांनी लहानपणीच अविचाराने मुलांचे लग्न केलं तर होणारा परिणाम ,त्यातून निर्माण झालेली हतबलता. वैवाहिक आयुष्य यशस्वी होण्यासाठी  कशाला महत्त्व दिले पाहिजे हे या दोन कथा सांगतात.

गरिबीनं ग्रासलेला,बापाविना पोरका, कुटुंबातील सगळ्यांना निदान घासभर अन्न मिळावं म्हणून नाईलाजाने वाईट मार्गाकडे वळलेला यशवंत साहेब एक विचारू असा प्रश्न विचारुन कोर्टाला तर निरुत्तर करतोच पण वाचकांना ही कुंठीत करतो.

आश्रमाबाहेरच्या जगाची प्रतिक्षा करणारा अनाथ रमेश असो वा लीडरचा नायक असो आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी  मनात घर करतात.

समोर धुसरं दिसत असतानाही, मनाला उभारी देणार्‍या , लढण्याचं बळ देणार्‍या , वास्तवतेची जाणीव आहे तरी दक्ष राहून पाऊलवाट चालायची आहे असा संदेश देणार्‍या  कथांच्या या संग्रहाला नावही साजेसं आणि योगेश प्रभुदेसाईंच मुखपृष्ठ ही तितकंच समर्पक!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares