मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ – लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
सौ.अश्विनी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ – लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
पुस्तक : सावळ्या विठ्ठलाच्या देशात
लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर
परिचय : सौ अश्विनी कुलकर्णी
साहित्य सारांश पुरस्काराच्या निमित्ताने वर्षाताईंची भेट झाली. त्या माझ्या शेजारीच बसल्या होत्या. दोन तीन तास आम्ही एकत्र होतो. बोलता बोलतांना त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समजल्या, विचारांची देवाण घेवाण झाली. खूप बरं वाटलं त्यांना भेटून! मी माझा कवितासंग्रह त्यांना दिला आणि त्यांनी त्यांचं पुस्तक मला दिलं. त्यांच्या पुस्तकाचं नाव ‘ सावळ्या विठ्ठलाच्या देशात ‘!
‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’! हे पुस्तकाचे नावच मला इतकं आवडलं की केव्हा एकदा ते मी वाचते असं मला झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वाचण्यासाठी घेतलं. विविध विषयांचे ज्ञान असलेल्या प्रख्यात व्याख्यात्या धनश्री लेले यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यानंतर वर्षाताईंची स्वतःच मनोगत यातून पुढील पुस्तकाचा म्हणजेच प्रवास वर्णनाचा ट्रेलर डोळ्यासमोर उभा राहिला म्हणायला हरकत नाही.
नवीन देश, नवीन वातावरण तिकडे जाण्याची उत्सुकता भीती त्यांच्या लिखाणातून प्रथम जाणवली. त्यांच्या केनियाला जाण्याच्या तयारीपासूनच लिखाण त्यांनी खूप मनापासून लिहिलं आहे. अगदी सुरुवातीपासून ज्या लसी त्यांनी घेतल्या, अर्थात त्या घ्याव्यात लागतात. इतर तयारी केली तिथपासून त्यांनी जी घोडदौड सुरू केली यांच्याही त्यांच्या नोंदी महत्वाच्या आहेत.
अलिबागच्या वर्षाताई, केनीयाला गेल्यावर अनेक अनुभवातून त्यांना काय काय वाटत गेलं हे त्यांच्या रोजच्या दैनंदिनीतून आपल्याला समजू शकत. साठीहून अधिक वय असणाऱ्या वर्षाताई! त्यांची जिज्ञासा वाचून खूप आश्चर्य वाटलं की त्यांना नवीन शहर फक्त जाणून घ्यायचे नव्हतं तर त्याच्यावर लिहावसं वाटलं. सुरुवातीपासूनच लिहावंसं वाटलं आणि त्यांनी त्या पद्धतीने तिथे गेलेल्या दिवसापासून लिहायला सुरुवात केली. एकटेपणा सांभाळणं अवघड असतं असं त्या म्हणाल्या पण ते सांभाळायचा एक विधायक धागा त्यांना नक्कीच मिळाला आहे, असं मी म्हणेन. हा धागा म्हणजे लिखाण! अशा पद्धतीने वेगळ्या आणि अगदीच अनोख्या देशांमध्ये इथल्या बारीकसारीक गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत सगळे लिहिणं साधी गोष्ट नाही.
तिथलं वातावरण, तिथला आहार, खाणं-पिण हे खूप वेगळं आहे. आपल्या पदार्थापेक्षा खूपच तफावत. सुरुवातीला तर हॉटेल मधील काही पदार्थ बघूनही ते त्यांना नको वाटले. त्याबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर जशी माहिती होत गेली तस तशी त्यांना दुकान आणि भारतीय पदार्थ कळले तेव्हा त्यांना कसं बरं वाटलं, भारतातील लोकं भेटली तेव्हा कसं वाटलं त्याबद्दल त्यांनी लिहिलंय.
तिथली गरिबी… इंग्रजांनी तिथल्या लोकांना कसं गुलाम केलं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा तिथे आलेली गरीबी याबद्दल त्यांनी सांगितलं. ही नवी माहिती आहे. तिथे संध्याकाळी सात नंतर घराच्या बाहेर पडलं तर लूटमार करतात, खून करतात. मध्यंतरी मी ही याबद्दल वाचलं होतं… पण त्यांच्या पुस्तकातून हे खरंच आहे हे ठळक झालं. तिथले लोक गरीब असले तरीसुद्धा प्रेमाने वागलं तर प्रेमळ आहेत हेही त्यांच्या लेखनातून लक्षात आल.
त्यांनी तिथले काही ठिकाणचे रस्ते, माती, अस्वछता पाण्याचा प्रॉब्लेम, दुकाने, उद्योग, वाहतूक, काही बेदरकार लोक, झोपडपट्ट्या आणि विकसित भागातील लोक याची तफावत या सर्वांचा जणू बारकाईने अभ्यास केला. विकसित भागाचाही त्यांनी दौरा केला.
एकंदरीतच त्यांनी साधसरल, सोपं सर्वाना समजेल अस, प्रवाही लिखाण केले आहे. त्यामुळे ते लगेच भावत!
त्यांचं लिखाण हे फक्त लिखाण राहणार नाही… यातून काय मिळेल? तर भारतीय नागरिकांना जेव्हा केनियाला जाण्याचे प्रसंग येतील त्या वेळेस वर्षाताईंनी पुस्तकाद्वारे केलेले अनुभव कथन/प्रवासवर्णन हे एक उत्तम गाईड ठरेल. त्या अनुभव भारतीयांना तिथे जाण्यासाठी आणि जगण्यासाठी सुसह्य होईल. अस मी ठामपणे सांगेन. या पद्धतीचे लेखन त्यांनी केलेलं आहे. कुठेही, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळताना दुसर्यांनाही सांभाळून घेणं. कोणतीही तक्रार न करता वेगळ्या देशात एकरूप होताना
‘परिस्थितीशी समायोजन करून, तिच्याशी मैत्री करणं’ हा त्यांचा स्वभाव दिसून आला. तिथल्या लोकांना जीव लावत त्यांचीही ‘मम्मा’ होत, त्यांनी हे दाखवून दिलं.
दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला गुंतवून घेण्यासाठी वाचनाइतकच, लेखनासारख दुसरं साधन नाही अस मला तरी वाटत. लिखाणाची आवड, जिज्ञासू वृत्ती आणि इच्छा शक्ती याचा त्रिवेणी संगम होऊन ह्या पुस्तकाचा जन्म झाला आहे असं मी म्हणेन.
‘स्त्री ही सृजनाचे सृजन आहे ‘! अस मला नेहमी वाटत. या पुस्तकाच्या रूपाने वर्षा ताईंनी हे सिद्ध केलंय.
इतकं सुंदर प्रवास वर्णन आपण रसिकांपर्यंत पोहोचवलत, त्याबद्दल धन्यवाद आणि ताईं पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा!
© परिचय : सौ अश्विनी कुलकर्णी
मानसतज्ञ, कवयित्री, लेखिका, सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491 Email – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈