मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द पॉवर ऑफ यूअर सबकॉन्शस माईंड” – लेखक : डॉ. जोसेफ मर्फी – अनुवाद :  सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆

सौ.अंजोर चाफेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “द पॉवर ऑफ यूअर सबकॉन्शस माईंड” – लेखक : डॉ. जोसेफ मर्फी – अनुवाद :  सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆ 

पुस्तक : द पॉवर ऑफ यूअर सबकॉन्शस माईंड.

लेखक :  डॉ. जोसेफ मर्फी 

अनुवाद : सौ. मंजुषा मुळे 

प्रकाशक :  रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर. 

पृष्ठे : २८८

मूल्य : रु.३५०/_

मला या विषयाची आवड आहे हे माझ्या बोलण्यातून लक्षात आल्यावर मला मंजुषाताईंनी अतिशय आपुलकीने व जिव्हाळ्याने हे पुस्तक पाठवले. हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडले तेव्हा मला 2 ताप होता. व माझा ताप हटत नव्हता. माझी कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह आली. मी एकटीच रूममधे. अशक्तपणामुळे झोपून होते. त्या एकांतात हे पुस्तक माझे सोबती होते. मी भराभर पानामागून पाने वाचत सुटले. रात्री झोपताना मनाला बजावले, मी बरी होणार. माझा ताप उतरणार. मी डोलो 650 सुद्धा घेतली नाही… 

सकाळी ताप पूर्ण उतरला होता. आणि मी उठून उभी राहिले. या पुस्तकाने मला इतकी शक्ती दिली.

हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे.

हे पुस्तक प्रत्येक घरात असायलाच हवे.

.. .. कारण या पुस्तकात आपल्या सुप्त मनाच्या अगाध, अगम्य शक्तीचा वापर कसा करायचा 

व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य कशा करायच्या याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलेले आहे.

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डाॅ.जोसेफ मर्फी यांच्या अभ्यासाचे व संशोधनाचे सार या पुस्तकात आहे. मूळ इंग्रजीत लिहीलेले हे पुस्तक वाचावयास क्लिष्ट वाटेल. परंतु मंजुषाताईंनी केलेला अनुवाद मात्र पटकन ध्यानात येतो. त्यांची साधी सरळ ओघवती भाषा मनाची पकड घेते.व पुस्तक हातातून सोडावेसे वाटत नाही.

इतका गहन व कठीण विषय असून सुद्धा मंजुषाताईंनी तो अगदी सोप्या भाषेत समजावला आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने प्रश्न विचारला आहे.

एक मनुष्य दुःखी तर दुसरा आनंदी असे का?

एक मनुष्य  गरीब तर दुसरा संपन्न  असे का?

एक जण घाबरट तर दुसरा धाडसी असे का?

या पुस्तकात या प्रश्नांची उत्तरे सापडतील.

आपल्या सुप्त मनाचे सर्जनशील सामर्थ्य कसे वापरायचे, आपल्या हृदयस्थ प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद कसा मिळवायचा याचे उदाहरणासकट विवरण या पुस्तकात केले आहे.

या पुस्तकात २० प्रकरणे आहेत. यातील प्रत्येक प्रकरण हे एकमेकांशी जोडलेले आहे.आणि तरीही प्रत्येक प्रकरण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.आपण कुठलेही प्रकरण वाचायला सुरुवात करू शकतो.

सुप्त मनाला आदेश देऊन मानसिक आरोग्य कसे राखायचे, शरीराचे रोग कसे बरे करायचे, वैवाहिक समस्या कशा सोडवायच्या, भीती कशी दूर करायची, श्रीमंत कसे व्हायचे, तरुण कसे रहायचे,सुखी कसे व्हायचे, … इत्यादी अनेक गोष्टींची उकल यात केलेली आहे.

आपले सुप्त  मन कसे काम करते?

मन सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार दोन्ही ग्रहण करते.

चांगला विचार केला तर चांगले घडते… वाईट विचार केला तर वाईट घडते.

सुप्त मन ही आयुष्याची नोंदवही आहे. आयुष्यातील प्रत्येक घटनेचे ठसे मनावर उमटतात.

सुप्त मन शरीरात चालणाऱ्या सर्व कामांचे नियंत्रण करते.

सुप्त मन शरीराची अवस्था ठरवते. शरीर निरोगी ठेवू शकते. शरीराला आजारातून बाहेरही काढू शकते.

या सुप्त मनाच्या शक्तीने कॅन्सरसारखा रोगही बरा होऊ शकतो.

सुप्त मनाकडून मार्गदर्शन हे नेहमी भावनेच्या स्वरूपात, अंतर्गत जाणिवेच्या स्वरुपात, प्रभावी अंतःप्रेरणेच्या स्वरुपात मिळते.

उपनिषदात सुद्धा म्हटले आहे ….. 

मनोजातं जगत् सर्वं मन एव जगत्पतीः 

मन एव परब्रह्म  मन एव रमापतीः l

……. मन हे परब्रह्म आहे ,मन हे ईश्वर आहे ,मग या मनाची शक्ती किती अफाट असणार !

डाॅ. जोसेफ मर्फी म्हणतात, 

The reason there is so much chaos and misery is because people do not understand the interaction of conscious mind and Subconscious mind.

म्हणून या मनाला कसे चालवायचे, याचे तंत्र जर आपल्याला समजले तर आपल्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण करता येईल.

या पुस्तकात सुप्त मनाला आदेश देऊन त्याच्याकडून आपल्याला जे हवे ते साध्य करून कसे घ्यायचे याची सोपी तत्वे आणि पद्धती वर्णन केल्या आहेत .त्यामुळे आपले आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक दर्जेदार, समृद्ध व उदात्त  बनू शकेल.

लेखक म्हणतात … हे सुप्त मन पॅराशूट सारखे असते. ते उघडल्याशिवाय त्याचा काही उपयोग नसतो.

मनाला उघडून त्याला कार्यरत करण्याच्या सोप्या पद्धती पाहूया…. 

… आपल्याला जे व्हावे असे वाटते, ते झाले आहे असे समजून त्याचे मनात चलत् चित्र उभे करणे.

मनाची कल्पनाशक्ती ही सामर्थ्यवान निसर्गदत्त शक्ती आहे. निकोला टेस्ला हे बुद्धिमान विद्युतशास्त्रज्ञ होते. ते नवीन संशोधन करताना कल्पनेत त्या गोष्टींची बांधणी करत. त्या गोष्टीला लागणारे सुटे पार्ट सुद्धा त्यांच्या सुप्त मनामधे प्रकट होत.

… झोपण्यापूर्वी सुप्त मनाला विनंती करणे.

एका तरुणाने झोपताना मनाशी बोलून त्याच्यावर काम सोपवले आणि त्याला वडीलांचे मृत्युपत्र कुठे ठेवले आहे ते सापडले. डाॅ ऱ्हाईन यांनी असे बरेच पुरावे गोळा केलेत की जगभरातील अनेक लोकांना स्वप्नात प्रत्यक्ष प्रसंग घडण्याआधीच ते दिसतात व इशारा देतात.

प्रसिद्ध लेखक राॅबर्ट स्टीवन्सन यांनी सुप्तावस्थेत तुकड्या तुकड्यांनी कथा रचल्या. हे कार्य त्यांच्या सुप्त मनानेच केले.

विश्वासाच्या पाठबळाने मनात रंगवलेले चित्र प्रत्यक्ष अनुभवात आणण्याचे कार्य आपले सुप्त मन करते.

प्रार्थना करताना मनात ठाम विश्वास असेल तर चमत्कार नक्की घडतात. शांती,समाधान, सुसंवाद,उत्तम आरोग्य, आनंद यासाठी आपण प्रार्थना करतो. ते विचार सुप्त मनात शिरतात व मन कार्य करते.

अब्सेंट ट्रीटमेंटमधे रुग्ण सानिध्यात नसताना त्याच्यासाठी दुरून प्रार्थना करू शकतो.

प्रत्येकाच्या सुप्त मनात दडलेला ईश्वर हे काम करतो.

परंतु मत्सर,भीती, चिंता, अस्वस्थता यांनी भरलेले विचार शरीरातील मज्जातंतू व ग्रंथींना इजा पोहचवतात व

शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण देतात. म्हणून नेहमी चांगले,सकारात्मक व निर्धारपूर्वक बोलावे.

कृतज्ञता मनात सतत बाळगावी. कृतज्ञ मन हे नेहमी संपूर्ण विश्वाच्या संपत्तीच्या,सृष्टीच्या जवळचे असते. देवाचे प्रेम व त्याचे आपल्यावरील उपकार याचे स्मरण ठेवल्यास आरोग्य व शांती यांच्या विद्युतलहरी मनात निर्माण होतात.

थोर मानसशास्त्रज्ञ डाॅ.जोसेफ मर्फी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनातून व अनुभवातून लिहीलेले हे पुस्तक आहे. आणि मंजुषाताई मुळे यांनी हे विचार आपल्यापर्यंत पोहचावेत या हेतूने फार सुंदर अनुवाद केला आहे. हे पुस्तक वाचून अनुभवायचे व आपले जीवन उदात्त बनवायचे.

परीक्षण  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ पावसानंतरचं ऊन… – लेखिका : सुश्री अरुणा ढेरे ☆ प्रस्तुती – सुश्री अर्चना माने ☆

सुश्री अर्चना माने 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ पावसानंतरचं ऊन… – लेखिका : सुश्री अरुणा ढेरे ☆ प्रस्तुती – सुश्री अर्चना माने ☆

पुस्तक – पावसानंतरचं ऊन

लेखिका- अरुणा ढेरे

 प्रकाशक- सुरेश एजन्सी.

पृष्ठ संख्या- 112. किंमत -180.

पुस्तक अगदी छोटसं आहे. एकूण नऊ कथा आहेत. त्याआधी लेखिका अरुणा ढेरे यांच्या विषयी थोडक्यात- कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य, सामाजिक, इतिहास पर, कुमारांसाठी, किशोरांसाठी इतका व्यासंग लाभलेल्या कवियीत्री अरुणा ढेरे. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध साहित्य डॉ. राची ढेरे यांचीही सुकन्या .यांना बाळकडूच मिळाले साहित्यरसाच .मराठी साहित्यातील दांडग्या  अभ्यासक म्हणून नावारूपाला आल्या. त्यांचे अतिशय गाजलेलं पुस्तक कृष्ण किनार आहे तर ते आपल्या अगदी हृदयाजवळ आहे. 

पावसानंतरच ऊन हे पुस्तक देखील तितकच सुंदर आणि छोट्या स्वरूपात आहे प्रत्येक कथा मनाला भावणारी आणि विचार करायला लावणारी  आहे .काही कथा नव्या विचारांच्या आहेत तर काही कथा या जुन्यातूनच नवं जगणं कसं शोधावे हे शिकवणारया आहेत. पावसानंतरच ऊन म्हणजे मनाला मिळालेला गारवा जसं की रात्री बराच पाऊस पडून गेलेला गॅलरीतील कुंड्यांवर छान शिडकाव झालेला सकाळचा ताज होऊन मनाबरोबर शरीरालाही निवांत करत आणि चहाचा मंद सुवास आणि अचानक कोणीतरी हातात तो आणून द्यावा बस आता आयुष्यात काही नको अशीच काहीशी जीवन कहाणी आहे या कथा नकांची *एखादा पावसाचा शिडका व्हावा आणि आणि कोवळं ऊन सुखावून जावं अगदी तसं

पहिली कथा-  ओळख- स्वतःची ओळख शोधणारी, नात्यांच्या पलीकडे जाऊन स्वीकारणं, समजून घेणं, सोसण, सावरणं, कसलं दुःख  आपल्या वाट्याला आलं आहे? उमग नाही ,अंत नाही, आकार नाही, रंग नाही वास नाही,चव नाही. एक अवाढव्य काळ ओझं, चिनूस टाकणार, घुसमटून टाकणार, त्याबरोबर एक सत्य आणि आपण स्वतः त्यातून निर्माण झालेली ओळख आणि तिची ती कथा.

दुसरी कथा- नवरात्र कथा एक सून, नव अंकुर बीज पोटी फुलतोय जणू ही घटस्थापनेच्या स्वरूपात सांगितले आहे. एक स्त्री तशीच ही पृथ्वी तिची गर्भधारणा म्हणजे नऊ दिवसाचे व्रत तिच्या कुशीतून जन्म घेणारे धान्य बीज पेरायचं ते वाढतं नऊ महिन्याचं ते प्रतीक म्हणून नऊ दिवस आपण ते वाढवायचं व्रतासारखं ते सांभाळायचं मग शेवटी पूर्णत्वाला गेले की आनंद उत्सव साजरा करायचा.  दसऱ्यासारखा सुनेच्या पोटीही ते बीज अंकुरते. आणि ती ते अनुभवते.

तिसरी कथा- नवीन. कथेत नव्या दमाची तरुणाई आणि जुन्या विचारांची पिढी. त्यांनी ह्या पिढींशी एकरूप व्हावं आणि इतर जाती पंथांच्या सुना-मुलींची जुळवून घ्यावे ही सांगणारी नवी पिढी. आता काळ आला आहे की दोन्ही पिढ्या आपले हात एकमेकांच्या हातात गुंफून आनंदाने राहावे. 

अशा प्रकारे प्रत्येक कथा वेगळी आहे. आशावाद आणि जगणं यामधील दुवा कसा शोधावा आणि स्वतःला शोधून आपलं जग कसं निर्माण करावं हे समजतं.

पावसानंतरच पडणार कोळवून कसं हवं असं वाटतं अगदी तसंच जीवनात येणाऱ्या चढ उतारा नंतर येणारा आनंदी क्षण देखील लोभस वाटतो गजबजलेल्या ढगांमधून एखादी उन्हाची तिरप चेहऱ्यावर घेताना रोमांचिक होतं अगदी तसंच असतं हे पावसानंतर ऊन म्हणून प्रत्येकानं एकदा तरी वाचावं असं आहे

परिचय : सुश्री अर्चना माने

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निशाशृंगार” (कविता संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “निशाशृंगार” (कविता संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक – निशाशृंगार 

लेखिका – सौ.राधिका भांडारकर

कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री

प्रकाशक – शॉपीझेन प्रकाशन  

किंमत -₹१६५/-

निशाशृंगार या एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा परिचय वाचकांसमोर सादर करताना मला फार आनंद वाटत आहे. साहित्याचे विविध प्रकार आजपर्यंत वाचनात आले, परंतु एकाच पुस्तकात कविता आणि त्याचे रसग्रहण अशा स्वरूपाचे पुस्तक माझ्या वाचनात प्रथमच आले.  या पुस्तकात सिद्ध हस्त लेखिका सौ. राधिका भांडारकर यांनी डॉ. निशिकांत श्रोत्री या गुणवंत कवीच्या निशिगंध या काव्यसंग्रहातून १६ निवडक कविता घेऊन प्रत्येक कवितेवर अत्यंत समर्पक आणि बहारदार असे भाष्य केले आहे.  या सर्व सोळा कविता भावगीत या काव्य प्रकारात मोडणाऱ्या असल्यामुळे त्या गेय आहेत. त्यातील भाव वाचकांपर्यंत पोहोचतात आणि त्या गीतातील रसास्वाद राधिकाताईंच्या रसग्रहणामुळे अधिक गोडीने घेता येतो.

भावगीत म्हटले की पटकन मनात येणारा भाव प्रीतीचाच ! मग ते प्रेम पती-पत्नीचे असेल, प्रियकर प्रेयसीचे असेल किंवा निसर्गातील चराचर सृष्टीचे असेल. त्यात भेटीची आतुरता, मिलनातील तृप्तता, प्रतीक्षेत झरणारे डोळे, हृदयाची स्पंदने हे सर्व भाव येणारच. तसेच नवरसांचा राजा म्हणून ज्या शृंगार रसाचा गौरव करावा त्या रसाचा परिपोष करणारी ही सर्व भावगीते.

निशाशृंगार ही डॉक्टरांची रसग्रहणासाठी घेतलेली पहिलीच कविता. चंद्र आणि निशा, रजनी यांच्या प्रेमातील धुंदी दर्शविणारी ही भावकविता.

 रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

 धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा

या ओळी वाचून वाचकांच्याही प्रणय स्मृती जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत. त्या धुंद करणाऱ्या प्रणयाच्या गोड आठवणींनी मनावर हळुवार तरंग उठल्यासारखे वाटतात. राधिका ताईंनी या भावगीता विषयी, ” हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं.” असं जे लिहिलं आहे ते शंभर टक्के पटणारे आहे. राधिका ताई म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच कविता वाचताना खजुराहोची तरल प्रणय क्रीडेची शिल्प पाहत आहोत असा भास होतो.

थकलेली पहाट या दुसऱ्या कवितेत दोन प्रेमी जीवांचे  अत्युच्च, उत्कट मिलन नजरेसमोर आले. शृंगारात चिंब भिजलेली अशी ही कविता, परंतु कुठेही उत्तानता नाही. एका नैसर्गिक क्षणाचे हे नितळ असे चित्र आहे असे मला जाणवले. नुसती एकदा वाचून कविता वाचकाला किती समजू शकते हे नाही सांगता येणार,परंतु राधिका ताईंचे या कवितेचे रसग्रहण वाचले की एकेका शब्दातील भाव स्पष्ट उमगतात.  कवितेविषयीच्या प्रस्तावनेत त्या वाचकांना सांगतात, “मला या काव्यरचनेतून झिरपणारं काम- क्रीडेचं चित्र म्हणजे एक नैसर्गिक कलाच भासली. संपूर्ण कविता म्हणजे समागमाच्या वेळच्या भावभावनांचं,देहबोलीचं एक वास्तविक आणि उत्कृष्ट वर्णन आहे.  मानसिक आणि कायिक अशी एक स्थिती आहे.”

 ज्योत निमाली झुळूक विसावी श्वास होऊनी दरवळली

 आर्त व्हावया व्याकुळ होऊन भावनेतूनी विसावली

 पुरी रात्र जागली मात्र ही पहाट तरी का थकलेली

या ओळींचा अगदी स्पष्ट अर्थ राधिकाताईंच्या रसग्रहणामुळेच वाचकांना सहज लावता येतो.

छेड तू काढू नको- बाहेरगावी कामानिमित्त गेलेला पती बऱ्याच दिवसांनी भेटलेला आहे,आणि या गीतातील नायिका कामातूर झालेली आहे.या क्षणी तिला तिच्या पती व्यतिरिक्त कोणाचेही अस्तित्व नको आहे,म्हणूनच खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राला ती विनवते,

 *रजनी नाथा तू नभातून

 वाकुल्या दाऊ नको*

 *नाथ माझा साथ आहे

 छेड तू काढू नको.*

अतिशय सुरेख आणि तरल भावनाविष्कार दर्शविणारी ही कविता असे मी म्हणेन.या कवितेवरील रसग्रहणकार राधिका ताईंचे भाष्य अगदी वाचनीय आहे.

त्या लिहितात,” रसमयता हा उल्लेखनीय गुण या गीतात जाणवतो. ती आतुरता, उत्कटता, आर्तता, मोहरलेपण, भावविभोरता कवीच्या शब्दप्रवाहातून कशी वाहत असते आणि याचा जाणीवपूर्वक स्पर्श वाचकांच्याही संवेदना चाळ वतात”. अगदी खरे आहे. कवितेतील नायिकेच्या भावना, संवेदना या घडीभर स्वतःच्याच आहेत की काय असे वाटते.

तुमी व्हटाचं डाळिम कुस्करलं.  तरल भावगीतातून मधेच डोकावणारी ही शृंगारिक लावणी.

 लाख तुम्ही पुसा पर कसं मी सांगू

 ज्वानी माझी सांगा कशी मी दाबू

 ताब्यात न्हाई मन उडालं पाखरू

 लई ग्वाड तरी पन हुळहुळलं 

 तुमी व्हटाचं डाळिम कुस्करलं

मराठी रांगडी भाषा आणि त्यातून दिसणाऱ्या जवान स्त्रीचं हे ठसठशीत रूप लावणी वाचताना नजरेसमोर साक्षात उभे असल्याचा भास होतो. व्हटाचं डाळिम कुस्करलं या शब्दरचनेत तक्रारीचा सूर असला तरी अंतर्यामी ही क्रिया तिला हवीहवीशी वाटणारी आहे हे स्पष्ट दिसते. राधिकाताईंना ही घटना अतिप्रसंगाची नसून खट्याळ प्रेम भावनेची वाटते.कृष्णाने गोपींची वस्त्रे पळवली तोच भाव त्यांना या कवितेत जाणवतो असे त्या लिहितात.हे रसग्रहण वाचून लावणीची रंगत अधिक वाढते.

आसुसलेली- प्रणय भावनेने धुंद झालेल्या एका प्रेयसीची ही गझल आहे. पुरुषाच्या पुलकित करणाऱ्या स्पर्शासाठी ही गझल नायिका आसुसलेली आहे,प्रेमाची गुंगी तिला आलेली आहे.ती म्हणते,

धुंदीत राहण्याला वाऱ्यास बांधिले मी

गंधित जाहले परि ना मुग्ध राहिले मी

किती सुंदर ख्याल आहे हा.संपूर्ण गझलच वातावरणात एक प्रकारची धुंदी आणणारी आहे. या शेराच्या खयालतीविषयी राधिका ताईंनी सर्वसाधारण वाचकाला जाणवणाऱ्या अर्थाव्यतिरिक्त आणखी एका अभिप्रेत अर्थाची शक्यता निदर्शनास आणून दिली आहे. त्या लिहितात, ” माझ्या मनात उसळलेले प्रेमभाव वाऱ्यासवे पसरत जाऊ नयेत.   ते गुपित आहे आणि इतरांना कळू नये.  माझं गंधावलेपण,ही प्रेम धुंदी, माझं वयात येणं इतरांच्या नजरेत येऊ नये.

सर्वसाधारणपणे कविता वाचून त्यातील सहज दिसणारा अर्थ, एकूण शब्दांकन,कवितेतील लयबद्धता याकडे वाचकांचे लक्ष असते. प्रत्येकच वाचक कवीच्या मनातील अभिप्रेत अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोच असे नाही.या रसग्रहणांमुळे वाचकांची दृष्टी रुंदावण्यासाठी नक्कीच मदत होते यात शंका नाही.निष्णात गायक श्रोत्यांपुढे एखादा राग सादर करत असताना त्यातील बंदिशीच्या एकेक जागा हेरून त्या रागाचे सौंदर्य जसे खुलवत असतो त्याप्रमाणेच डॉ.निशिकांत श्रोत्री यांच्या कवितांतील सौंदर्य स्थळे हेरून  राधिकाताईंनी या कविता खुलविल्या आहेत.प्रत्येकच कवितेचे रसग्रहण करताना त्यांनी कवितेच्या अंगोपांगांचा बारकाईने विचार केला आहे.कवितेत येणारा प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, त्यातील त्या शब्दांचा चपखलपणा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून,योग्य ती उदाहरणे देऊन कविता कशी वाचावी, कवितेच्या गर्भात कसे शिरावे याचे उत्तम मार्गदर्शन वाचकांना केले आहे.

सौंदर्य आगळे ही डॉक्टर श्रोत्रींची अशीच एक शृंगारिक कविता! एका रूपवतीचे सौंदर्य पाहून कवितेतील नायक अगदी घायाळ झाला आहे. तो म्हणतो,” पाहुनी या सौंदर्य आगळे विद्ध जाहलो मनोमनी ” आणि या

विद्धावस्थेत तो त्या युवतीच्या रूपाचे वर्णन करतो, असे हे गीत. राधिकाताईंचे यावरील भाष्य वाचताना त्यांचा अभ्यास,वाचनाच्या कक्षा अमर्याद आहेत याचा साक्षात्कार होतो.त्या लिहितात, ” या ललनेचं सौंदर्य वर्णन वाचून मला कालिदासाच्या मेघदूत काव्याची आठवण झाली. प्रेयसी पर्यंत पोहोचण्याच्या मार्गादरम्यान यक्ष त्या मेघाला वाटेत भेटणाऱ्या संभाव्य स्त्रियांच्या सौंदर्याविषयीचे वर्णन करतो, काहीसे त्याच प्रकारचे हेही सौंदर्य  आहे असे मला जाणवले.

अशा प्रकारची रसग्रहणे वाचून सामान्य वाचकांना वाचण्याची योग्य दिशा मिळते याची मला जाणीव झाली.

रसग्रहण हा भाषेच्या व्याकरणाचा एक भाग आहे.एखादे काव्य वाचले की त्याचा फक्त अर्थ जाणून घेणे म्हणजे रसग्रहण नव्हे.  त्या काव्यातून होणारी रसनिष्पत्ती, त्यातील अनुप्रास,यमके, रूपके, दृष्टांत, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे शब्दालंकार व अर्थालंकार काव्यावर कसे चढविले आहेत,काव्यरूपी शारदेचे सौंदर्य  कसे खुलविले आहे या सर्वांचा सापेक्ष विचार म्हणजे रसग्रहण! या दृष्टीने राधिकाताईंची ही सर्व सोळा रसग्रहणे परिपूर्ण आहेत असे मी म्हणेन.

प्रेम आणि रजनी यांचा घनिष्ठ संबंध आहे.दिवसभर थकले भागलेले शरीर जेव्हा रात्री प्रियकर/ प्रेयसीच्या कुशीत विसावते तेव्हा श्रमपरिहार होऊन गात्रे पुन्हा प्रफुल्लीत होतात,टवटवीत होतात,  प्रीतीचा तो एक क्षण दिव्यानंद प्राप्त करून देतो या दृष्टीने निशाशृंगार हे पुस्तकाचे शीर्षक समर्पकच आहे.

मुखपृष्ठ पाहूनच हे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांचे मन नक्कीच आकृष्ट होणार याची मला खात्री आहे.पुस्तकाच्या *निशाशृंगार*या शीर्षकाला साजेसे असेच मुखपृष्ठ शाॅपीझेनच्या चित्रकाराने तयार केले आहे.पौर्णिमेचा चंद्र आणि एका शिळेवर बसून बासरी वाजविणारा श्रीहरि,बासरीच्या सुरात तल्लीन झालेली राधा असे हे प्रेमाचे प्रतीकात्मक असणारे मुखपृष्ठ फारच लक्षवेधी आहे.चंद्राच्या अवती भवती दाटून आलेले ढग राधेच्या मनोवस्थेचे प्रतिनिधित्व करतात.

या पुस्तकाची प्रस्तावना दस्तूरखुद्द डाॅ.निशिकांत श्रोत्री यांनीच दिली आहे.ते प्रस्तावनेत म्हणतात,”शृंगारिक काव्याचे रसग्रहण करणे ही दुधारी शस्त्र हाताळण्याइतकी कठीण कला आहे,आणि या शृंगारिक कवितांची रसग्रहणे विलक्षण संयमाने आणि तरीही सखोलपणे करून तिने(राधिका)माझ्या कवितांना पुरेपूर न्याय दिला आहे.”कवितेतील आशयावर जराही अन्याय न होऊ देता,अश्लीलतेचा मागमूसही दिसू द्यायचा नाही,म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड आहे,परंतु राधिकाताईंनी लीलया ते पेलले आहे याला डाॅ.श्रोत्रींनी मान्यता दिली आहे.

शाॅपीझेन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशन करून चोखंदळ वाचकांसमोर हा अमोलिक नजराणाच ठेवला आहे असे मी म्हणेन. त्यासाठी शाॅपीझेनचे आभार.

त्याचप्रमाणे डाॅक्टर, अशीच छान छान भावगीते लिहीत रहा आणि राधिकाताई, आपण रसग्रहणे करून

त्याचा रसास्वाद आम्हा वाचकांना देत रहा ही विनंती.

आपल्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ लक्षावधी बीजं (अनुवादित लघुकथा संग्रह)… – हिन्दी लेखक : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर‘ ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ लक्षावधी बीजं (अनुवादित लघुकथा संग्रह)… – हिन्दी लेखक : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर‘ ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

पुस्तक : लक्षावधी बीजं (अनुवादित लघुकथा संग्रह) 

मूळ कथाकार : भगवान वैद्य” प्रखर”

अनुवाद – सौ. उज्वला केळकर आणि  सौ. मंजुषा मुळे

प्रकाशक : अथर्व प्रकाशन, कोल्हापूर  

पृष्ठसंख्या : २४४ 

आज अचानक एक सुंदर सुबक पुस्तक हातात आले . त्याचे मुखपृष्ठ पाहूनच पुस्तक वाचण्याचा मोह झाला .मुखपृष्ठावर विशाल आभाळ अन् पाचूसारखे हिरवेकंच पीक आलेली विस्तीर्ण जमीन दिसते. डोळे तृप्त करणारे असे हे मुखपृष्ठ पाहून पुस्तकाचे “ लक्षावधी बीजं “ हे नाव यथार्थ आहे असे जाणवते. अशीच विचारांची लक्षावधी बीजे या कथांमध्ये नक्कीच आहेत.. हे पुस्तक म्हणजे हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक भगवान वैद्य” प्रखर” यांच्या हिंदी लघुकथांचा अनुवाद . हा अनुवाद केला आहे, सौ .उज्वला केळकर आणि सौ मंजुषा मुळे या दोघींनी . दोघींचे नाव वाचून क्षणात माझ्या मनामध्ये शंकर – जयकिशन, कल्याणजी – आनंदजी, अजय – अतुल अशा संगीतकार जोडीची नावे तरळली अन् वाटले – हा अनुवादही अशा रसिक, साहित्यिक जेष्ठ भगिनीनी – मैत्रिणींनी केलेला आहे . 

इथे एक गोष्ट आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते. मराठीत आपण ज्याला लघुकथा म्हणतो त्याला हिंदीत ‘ कहानी  ‘ असे म्हटले जाते. आणि हिन्दी साहित्यात कहानी आणि  लघुकथा हे दोन स्वतंत्र साहित्य-प्रकार आहेत. आणि अशा लघुकथा सर्वत्र प्रकाशित होतात. अगदी अलीकडे मराठीत अशासारख्या कथा लिहायला सुरुवात झाली आहे.. हिंदीत २५० ते साधारण ४००-५०० शब्दांपर्यन्त लिहिलेल्या कथेला ‘लघुकथा ‘ म्हणतात. आणि अशा कथा म्हणजे मोठ्या कथेचे संक्षिप्त रूप किंवा सारांश अजिबातच नसतो. यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मोठा आशय मार्मिकतेने मांडलेला असतो, ज्याला एक नक्की सामाजिक परिमाण असते. ती कथा आकाराने लहान असली तरी ती “अर्थपूर्ण” असते, तिला आशयघनता असते . भगवान वैद्य “प्रखर” हे उत्तम लघुकथा लिहिण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. लक्षावधी बीजं या पुस्तकामध्ये, वाचकाला त्यांच्या अशाच कथा वाचायला मिळतात. अनुवादामुळे एका भाषेतील उत्तम साहित्य दुसऱ्या भाषेमध्ये वाचकाला तितक्याच उत्तम स्वरूपात वाचायला मिळते ही गोष्ट या अनुवादित पुस्तकामुळे पुन्हा एकदा नक्कीच अधोरेखित झालेली आहे.  या दोघींनी निवडक कथांचा अनुवाद करून आपल्याला ” लक्षावधी बीजं ” या पुस्तकाच्या  रुपानं वाचनभेट दिली आहे . यातील १२० कथांपैकी १ ते ६५ या कथांचे अनुवाद केले आहेत मंजुषा मुळे यांनी तर ६६ ते १२० या कथांना अनुवादित केलंय उज्वला केळकर यांनी .

 या लघुकथा वाचताना मूळ लेखकाची प्रगल्भता, निरीक्षण क्षमता आणि अचूक आणि अल्प शब्दात मनातलं लिहिण्याची  हातोटी पाहून आपण अचंबित होतो. वाचकाच्या कधी लक्षातही येणार नाहीत अशा विषयांवर चपखल शब्दात लघुकथा लिहिण्यात लेखक भगवान वैद्य” प्रखर” कमालीचे यशस्वी झालेत . म्हणूनच हिंदी साहित्य क्षेत्रात लघुकथा लिहिणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. उज्वलाताई आणि मंजुषाताईंनी या सर्व लघुकथांना मराठीमध्येही त्याच हातोटीने उत्तमपणे गुंफून वाचकाला वाचनाचा आनंद दिला आहे आणि पुढील गोष्टींची उत्सुकता वाढवली आहे .सूक्ष्म निरीक्षण, विषयातील गांभीर्य, अल्प शब्दात परिणामकारकपणे  त्या विषयावरचे लेखन, या सगळ्याची उत्तम गुंफण् करण्याच्या कामात हिंदी लेखक आणि दोन्ही मराठी अनुवादिका पूर्णपणे यशस्वी झाले आहेत . छोट्या छोट्या कथा असल्यामुळे पटापट वाचून होतात आणि एक आगळा वेगळा आनंद वाचकाला मिळतो .

 “प्रत्येक वेळी” ही पहिलीच एक पानी कथा आपल्या हृदयाचा ठोका चुकवून जाते आणि समाजातील _ डोंबाऱ्यांमध्येसुद्धा असलेले मुलींच्या आयुष्याचे दुय्यम स्थान समजते . बिन्नी आपल्या आईला विचारते,” आई, दर वेळी मलाच का दोरावर चढायला लावता? भय्याला का नाही ?” या लहानशा प्रश्नावरून आपण विचार करायला प्रवृत्त होतो.

 “मूल्यांकन” ही इवलीशी कथा . शेवटचे वाक्य कापसाचे भाव सांगणाऱ्या परीक्षकाच्या शून्य बुद्धीची जाणीव करून देते . या परिक्षकाला’ कापूस शेतात पिकविण्यासाठी शेतकरी अविरत श्रम करतो, त्याला किती जागरूक राहून काम करावे लागते याची काहीच कल्पना नसते .. त्याला वाटते साखर किंवा थर्मोकोल प्रमाणे कापसाचेही कारखाने असतात . परीक्षकाच्या बुद्धीची किती कीव करावी हेच समजत नाही . अडाणीपेक्षा निर्बुद्ध हाच शब्द योग्य वाटतो. लेखकाचे थोडक्या शब्दात हा खूप मोठा अर्थ सांगण्याचे जे कसब आहे, ते आपल्याला थक्क करते .

आयडिया या गोष्टीमध्ये, रेल्वे  प्रवासामध्ये एक आंटी तरुण मुलाना त्यांच्याकडून झालेला कचरा व्यवस्थित गोळा करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये, जशी आंटीने बरोबर आणली आहे, तशा पिशवीत टाकायची आयडिया सुचवतात. काही वेळानंतर थोड़ी झोप झाल्यावर, आंटी पहातात तर  मुलांनी सगळा कचरा साफ केलेला दिसतो . पण – – पण आंटीच्याच पिशवीमध्ये गोळा करून भरून ठेवून मुले आपल्या स्टेशनवर उतरून निघून गेलेली असतात.  .

ऑफीसमध्ये काम करणाऱ्यांना वेळेवर पगार न मिळणे हे नित्याचेच . मग तो पोस्टमन असो, एसटी डायव्हर असो की कुटुंब प्रमुख अन ऑफिसर . पोस्टमन एका घरी गृहिणीकडे आपला ३ महिने पगारच न झाल्याचे सांगत पैशाची मागणी करतो . ही गोष्ट जेव्हा ती गृहिणी आपल्या नवर्‍याला सांगते, तेव्हा तो म्हणतो, सांगायचं नाही का त्याला साहेबांचाही पगार ३ महिने झाला नाही . त्यावेळी ती थक्क होऊन विचारते, तुम्ही बोलला नाहीत ते? तेव्हा तो म्हणतो, कसा बोलणार ? कुटुंबाचा प्रमुख आहे ना?

छोटा संवाद पण खूप काही सांगून जातो ” कुटुंब प्रमुख” या कथेमध्ये ….. अशा साध्या साध्या प्रसंगातून घराघरातील परिस्थिती, मानसिकता, कुटुंब प्रमुखाची होणारी कुचंबणा, त्याचे धैर्य आणि अगतिकता अल्प शब्दात लिहिण्याचे लेखकाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे .

अलीकडे लहान मुलांना मनसोक्त खेळायला, बागडायला जागाच नाही . त्यांची किलबिल, दंगा, आरडा ओरडा, हसण्या खिदळण्याचे आवाज येत नाहीत . मोठ्याना पण सुने सुने वाटते आहे . ही भावना ” दुर्लभ” या कथेतून वाचताना आपल्यालाही ही बोच मनोमन पटल्याशिवाय रहात नाही ..

हल्ली मुलांना शिक्षणातला ओ की ठो येत असो वा नसो पास करायचेच, नापास करायचेच नाही हा फंडा आहे . पालकांना माहिती आहे की आपला मुलगा वाचू शकत नाही, पाढे पाठ नाहीत तरी ४थीत गेला कसा? म्हणून शाळेत चवकशी करायला जातात तर त्याच वेळी शाळेचा निकाल – प्रत्येक वर्गाचा निकाल १००% लागल्या बद्दल शाळेचा, मुख्याध्यापक, सगळा स्टाफ यांचा सत्कार होणार असतो . टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम पुढे सरकत असतो . ते पालकही, आपला पाल्य बोट सोडून पळून गेलाय याकडे दुर्लक्ष्य करून टाळ्या वाजवायला लागतात . शिक्षण क्षेत्रातला विरोधाभास, दुष्ट पण कटू सत्य आणि पालकांची अगतिकता लेखकानी थोड्या शब्दान टाळी या लघुकथेत वर्णन केली आहे .

लक्ष्यावधी बीजं हे पुस्तक वाचताना खूप वैशिष्ट्यपूर्ण कथा आपल्याला वाचायला मिळतात, त्यामध्ये ज्याचं त्याचं दुःख, मनोकामना, कर्ज, कठपुतळी , कर्जदार या सांगता येतील . आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या कथा वाचताना आपण अनुवादित कथा वाचतो आहोत हे जाणवतसुद्धा नाही . मराठीत इतका सुंदर अनुवाद झाला आहे की जणू काही या कथा मूळ मराठीतच लिहिलेल्या आहेत असे वाटते,  आणि ते या दोन अनुवादिकांचे यश आहे . फक्त आपल्याला कधी जाणवतं … तर  त्यामधील पात्रांची जी नावे आहेत ती मराठीतली नाहीत … दादाजी, अनुलोम, दीनबंधू इ .आहेत एवढेच. यासाठी या दोन्ही मराठी लेखिकांना सलाम !

म्हणूनच समस्त वाचक वर्गाला विनंती की हे पुस्तक विकत घेऊन मुद्दाम वाचावे .सर्वाना आवडणारे, वेगळाच आनंद देणारे, समाजातील बोलकी चित्रे विरोधाभासासह रेखाटणारे हे पुस्तक पुरस्कारास यथायोग्य असेच आहे .

उज्वलाताई आणि मंजुषाताई दोघींनाही  पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

परिचय : सौ अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ पाने आणि पानगळ… श्री वसंत वसंत लिमये ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

सौ. माधुरी समाधान पोरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ पाने आणि पानगळ… श्री वसंत वसंत लिमये ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – पाने आणि पानगळ

लेखक – श्री वसंत वसंत लिमये

पृष्ठसंख्या – 192

लेखकांना  कोकणकडा, गिर्यारोहण याची आवड आहे. ते गडकोट मोहिमांचे नेतृत्व करतात. 1989 मध्ये भारतात प्रथम निसर्ग आणि साहस अशी प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नावावर अनेक लेखसंग्रह प्रकाशीत आहेत. त्यांना 2013 सालचा ‘सहकारमहर्षी’  साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे. 

माणसाचं आयुष्य समृद्ध असतं म्हणजे नक्की काय, तर त्याने आयुष्याच्या वाटेवर जमवलेली अगणित माणसे. लेखकांनी आजवरच्या भटकंतीतून 

जी माणसं जमवली, त्यांची व्यक्तिमत्व म्हणजे ‘पाने आणि पानगळ’ हे पुस्तक. वसंत लिमये यांनी या प्रत्येक व्यक्तीच वर्णन या पुस्तकात ‘एकोणतीस’ लेखांद्वारे केले आहे. त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलची आपुलकी, प्रेम नेमकेपणाने मांडले आहे. ही पानं रूजवत ते स्वतःच एक समृद्ध झाड होऊन गेले आहेत.  

‘अस्वस्थ संध्याछाया’ या लेखात लेखकाने त्यांच्या आईबद्दल लिहिले आहे. आईचा सगळा जीवनप्रवास, त्यांची कष्टाळू वृत्ती, खंबीरपणा त्यांनी शब्दबद्ध केला आहे. त्यांची  वडीलांना भक्कम साथ होती. पण वयोमानानुसार होणारे बदल, स्वावलंबन उतारवयात सोडवत नाही. लेखकाला वाटतं आयुष्य एखाद्या वर्तुळासारखं आहे. मोठ्ठा फेरा मारून ते बालपणाच्या जवळ येतं.

‘मरीन कमांडो प्रवीण, त्रिवार वंदन’! .. खरंतर ही कहाणी अंगावर शहारा आणणारी आहे. कमांडो प्रवीण यांचा जाट कुटुंबातील जन्म.  नेव्हीमधे होते. खडतर प्रशिक्षण, एकविसाव्या वर्षी ते कमांडो झाले. 26/11 च्या काळरात्री दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी त्यांना ताजमहाल हाॅटेलमधे जाण्याचे आदेश आले. अतिरेकी एका दालनात दबा धरून बसले होते. कमांडो प्रवीण मेन असल्यामुळे आत गेले, त्यांना गोळया लागल्या अशा अवस्थेत एका अतिरेक्याला जायबंदी केले. त्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचला. नंतर कमांडो प्रवीण यांच्यावर उपचार करण्यात आले.त्यातून ते सुखरूप बाहेर पडले.  त्यांना खूप पथ्ये सांगितली. पण ते स्वस्थ बसले नाहीत,  हळूहळू लांब चालणं, सोबत योगा, पळणं, पोहणं, अशी सुरुवात केली. साउथ अफ्रिकेत  ‘Iron Man’ हा किताब मिळवला. राखेतून उठून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखी ही कहाणी आहे. 

‘अटळ, अपूर्ण तरीही परिपूर्ण’  यामधे लेखकांनी त्यांच्या बाबांच्या आठवणी सांगितल्या आहेत. साठ वर्ष त्यांना सहवास लाभला. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांच्या वडीलांचे योगदान होते. त्यांनी आपली मते इतरांवर कधीच लादली नाहीत.  मुलांवर चांगले संस्कार देऊन समृद्ध केले. यश, अपयश, त्यांनी पचवले. परिपूर्ण आयुष्य ते जगले. 

‘किनारा मला पामराला’  यामधे लेखकांनी स्वतःच्या आयुष्यातील चढउतार मांडले आहेत.  मागे वळून पाहताना त्यांना वळणावळणाचा रस्ता दिसतो. आठवीत असताना त्यांचा नंबर घसरून एकतीसवर  आला. प्रगतिपुस्तकावर सही करताना बाबा त्यांना म्हणाले, बाळकोबा यातले तीन काढता आलेतर नक्की काढा…….हा प्रसंग मनावर त्यांनी कायम कोरला. त्यांनी आयुष्यभर सर्वोत्तम हाच धडा गिरवला. अवघड शिड्या लिलया पार केल्या. डोंगरवाटा, कोकणकडा, गिर्यारोहण,  यांनी त्यांना वेड लावले. यासाठी अथक प्रयत्न केले. पत्नीची मोलाची साथ लाभली. त्यांचा मनुष्य संग्रह अफाट आहे. ते स्वतःला भाग्यवान समजतात.  लेखन हा त्यांचा शोधप्रवास आहे. जे जमतं ते करण्यात वेगळीच मजा आहे. 

The summit is what drive us, but the climb itself is what matters……

शिखरं असंख्य आहेत आणि प्रवास सुरूच राहणार आहे.

खरंच ‘पाने आणि पानगळ’ वाचताना लेखकांच्या आयुष्यातील ही सारे पाने खूप काही शिकवून जातात.  प्रत्येक नवीन पान काय असेल याची उत्सुकता लागून राहते. वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाची पैलूंची  ओळख झाली. यातील डोंगरवाटा, कोकणकडे, गिर्यारोहणाचे अनुभव वाचताना अंगावर शहारे येतात.  चित्ररूपाने हा प्रवास डोळ्यांसमोरून सरकत होता.  तुम्हीही वाचा ही पाने…….

संवादिनी – सौ. माधुरी समाधान पोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “पाखरमाया” – लेखक : श्री मारुती चितमपल्ली ☆ परिचय – डॉ.माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर) ☆

डॉ. माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर)

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पाखरमाया” – लेखक : श्री मारुती चितमपल्ली ☆ परिचय – डॉ.माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर)

पुस्तक – पाखरमाया

लेखक – मारुती चितमपल्ली 

प्रकाशक – साहित्य प्रसार केंद्र, नागपुर 

तृतीय आवृत्ती 

पृष्ठे – १४०

मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांनी पुस्तकाला दिलेली नावे. केशराचा पाऊस असो, रानवाटा असो, पाखरमाया असो वा सुवर्णगरुड असो नाव वाचता क्षणीच मनात विचारांचं काहूर माजतं. त्याला भर म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर पुस्तकाच्या नावाला साजेसे असे किंवा त्याहूनही सुंदर चित्र असते. आणि आपण त्याच्याकडे आपसूकच ओढले जातो. सहज चाळायला म्हणून जरी पुस्तक हातात धरलं असलं तरीही त्यांच्या लिखाणात आपण स्वतःला विसरून जातो, आणि पुस्तकाशी एकरूप होतो.

‘पाखरमाया’ या नावावरून जरी पुस्तकांत पक्षी जगताबद्दल सर्व असेल अस वाटलं तरीही आत मात्र अनेक विषयांवर लेख आहेत. पक्षी, कीटक, लहान प्राणी, झाडं एकूण निसर्गाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकांत पक्षी आपली घरटी कशी बांधतात याबद्दल अधिक विस्तृत महिती सांगितली आहे. तसेच वाळवी, चेलपतंग, काजवे, बेडूक, खेकडे यांची माहिती आहे. वानर आणि वांब माश्यावर देखील सुंदर लेख आहेत. आकाश आणि पृथ्वी ग्रहतारे यांच्या गमकाची वर्णने आहेत. तर झाडांमध्ये पिंपळ, चिंच, सुरु, कुसुमगुंजा, बाभूळ, महारुख, रायमुनिया आणि शेवग्याची बारीक माहीती दिली आहे. निसर्गातील सर्व गोष्टी सांगून त्यांचा आणि योग याचा संबंध शेवटच्या लेखामध्ये त्यांनी सुंदर प्रकारे मांडला आहे.

चितमपल्ली यांची पुस्तकं निसर्गाची नवीन ओळख करून देतातच परंतु त्यातील भाषा आणि चित्रमय गोष्टींमुळे आपल्याला निसर्गाविषयी आपसूकच आपुलकी निर्माण होते. त्यांचे साहित्य वाचून प्रसिद्ध लेखक “जी. ए. कुलकर्णी” यांनी त्यांना सुंदर पत्र लिहिलं आहे त्यावरूनच आपल्याला त्यांच्या लिखाणाची शैली समजून येते. ते पत्र असे आहे:

“प्रिय चितमपल्ली,

निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख वाचले आहेत. त्यांतील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे यांचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे.”

असा सुंदर अभिप्राय वाचल्यानंतर हे पुस्तक मला आणखीनच वाचावं असं वाटले. 

पुस्तकाच्या नावावरून असं वाटलं होतं की फक्त पक्ष्यांची माहिती असेल. वाचायला सुरू केल्यावर लक्षात आलं; पक्षीच नव्हे तर जलचर, उभयचर, प्राणी, कीटक, आकाश, पर्जन्य, वृक्षसंपदा, अशा कितीतरी गोष्टी आणि त्यासोबत त्यांचे विणलेले अनुभव, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप म्हणजे ‘पाखरमाया’ आहे.

मला कॉलेज मध्ये असताना Botony आणि zoology चा अभ्यास करताना nursery आणि poultry च डोळ्यांसमोर यायची, आणि त्यात ते लॅटिन biological नावं लक्षात ठेवायची म्हणजे…

चितमपल्ली यांचे हे दुसरं पुस्तक वाचतेय मी, त्यांचे अनुभव वाचताना त्यापालिकडच्या जिवंत निसर्गाची ओढ लागते. महत्वाचं म्हणजे प्राणी पक्षी, वृक्षांची त्यांनी दिलेली मराठी किंवा आदिवासी बोली भाषेतील नावं इतकी साजेशी वाटतात, म्हणजे उगाचच आपण इंग्लिश नावं शोधत असतो असं वाटतं.

आपल्या पूर्वजांना असलेलं विस्तृत, सखोल आणि अचूक ज्ञान आणि त्याचा चितमपल्ली यांनी केलेला अभ्यास श्लोकासाहित दिलेला अर्थ वाचताना अचंबित व्हायला होतं.

चितमपल्ली हे साक्षात वनऋषीच. म्हणतात ना एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात तासभर रहा, सतत नवीन शिकायला मिळतं. तशी अवस्था ही पुस्तकं वाचताना होते, एवढी त्यांनी आयुष्यभराची तपस्या आपल्या समोर पुस्तकरूपाने उघडून ठेवली आहे, आपण रसग्रहण करत राहावे. बरं एका वनाधिकार्याचे अनुभव म्हणजे सरळसोट गोष्टी असतील असं पण नव्हे. साहित्य, अभंग, दोहे, उपनिषद यांच्याशी अनुभवांशी घातलेली सांगड पाहून अचंबित व्हायला होतं. किती तो गाढा अभ्यास..

त्यांचे निसर्गातले अनुभव वाचतच राहावे असे आहेत..

**बहिरी ससाणा, सर्पगरूड उंच झाडाच्या शेंड्यावर घरटं बांधतात. बऱ्याच वेळा कावळे दुसऱ्याच्य घरट्यातल्या काड्या चोरून स्वतःचं घरटं बांधतात

**पक्षी अंड्यावर बसून तापमानाचा समतोल ठेवतात. कमी – जास्त तापमानाने आतला जीव गुदमरून मरू शकतो. पक्षी ठराविक दिवसाच्या अंतराने अंडी घालतात, मादी एकत्र सगळी अंडी घालू शकत नाही. सगळी अंडी घालून झाली की एकत्र उबवायला मादी सुरूवात करते.

**वानरांच्या शेकोटीची कथा तर facebook वर बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी वाचली असेल, ती कथा चितमपल्ली यांनी याच पस्तकात दिली आहे वानर म्हणे रामफळ-सीताफळाला हात लावत नाहीत. आता पुढच्या वेळी वनारांची टोळी आली की निरीक्षण करायला हवं.

**पावसाळ्या नंतर बेडूक जमिनीखाली महानिद्रेत जातात; विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट झाडाजवळ, विशिष्ट दिशेला खोदले तर त्यांना अचूक ठिकाणी शोधता येतं.

**लोयांग नावाचा एक जपानी गृहस्थ एका खंदकात पडला. तिथल्या खंदकातील भेगांत बेडकांनी आश्रय घेतला होता. सूर्य उगवताच सूर्यकिरण खावे तशी बेडकांनी जिभेची हालचाल सुरू केली, आणि लोयांग यांनी त्यांचे अनुकरण केले. असे केल्याने त्यांची भूक नाहीशी झाली, अगदी त्या खंदकातून सुटका झाल्यावर सुद्धा.

**खेकडे बिळात असताना आपल्या नांग्या आत ओढून घेतात. परंतु धोका वाटला तर नांग्या सज्ज करून बिळाच्या टोकाशी येतात. एकदा त्यांनी पकडलं की मग सहज सुटका नाही. अंदमान वरील खेकडे माडावरील नारळ पाडून, त्यांना छिद्र पाडून आतली माऊ मलई फस्त करतात. साधुबुवा खेकडा इतर जीवांनी सोडलेल्या शंखात राहतो.

**साप कात टाकतो त्याप्रमाणे खेकडाही कवच बदलतो.

**खेकड्याच्या डोळ्यांखालच्या कडांना राठ केस असतात. त्या केसांचा उपयोग ते कुंचल्यांसारखा डोळे साफ करण्यासाठी करतात, तेव्हा फुत्कारण्याचा आवाज येतो. खेकडे पाण्याखाली श्वासोच्छवास करताना बुडबुडे सोडतात, त्यांचाही आवाज येतो.

**कोल्हा आपली शेपटी खेकड्याच्या बिळात घालतो. खेकडा शेपटी पकडून बाहेर आला की खेकड्याला खाऊन टाकतो. खेकडे पावसाच्या आवाजाने हर्षभरित होतात. ठाकर/कातकरी लोकं दगडांचा पावसासारखा आवाज काढून खेकड्यांना बिळाबाहेर काढून शिकार करतात.

**गुंजांची पानं लाजळूच्या पानासारखी मिटून आपणाला भूकंप, ज्वालामुखी आणि हवामानातील प्रचंड उत्पाताची पूर्वसूचना देत असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.

**खाटीक पक्षी शिकार केलेले कीटक आणि सरडे बाभळीच्या काट्याना अडकवून देतो, मग सवडीने कुरतडून खातो.

–लँटाना या मूळ ऑस्ट्रेलियन झुडुपाला मराठीत घाणेरी / टणटणी आणि मेळघाटातील कोरकू लोक रान मुनिया म्हणतात. चंदनाच्या झाडाला सावली आणि अन्न देण्याकरता लावलेली ही झुडूपं अतिक्रमण वाटावं एवढी अतिवेगाने वाढली आहेत. त्यामुळे इथल्या वनश्रीची अंतिम अवस्था (climax stage) आली असल्याचं वन तज्ज्ञांचे मत आहे. मूळ ज्या ठिकाणी वनस्पती उगवते, त्या ठिकाणी त्यावर नियंत्रण ठेवणारे जीवही निसर्ग जन्माला घालत असतो. अशी वनस्पती दुसरीकडे नेली की अनियंत्रित वाढून स्थानिक निसर्गसंपदेचा घास घेते, याच मेळघाट हे ज्वलंत उदाहरण.

–शेवग्याच्या बहुविध उपयोगाविषयी चितमपल्ली आवर्जून सांगतात. पाखरांना बोलवायचं असेल तर अंगणात शेवग्याची झाडं लावण्याचा सल्ला पक्षीमित्रांना देतात.

–वन्य प्राणी हे सिद्ध जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नांनी सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून ९०% योगासनांची नावे पशुपक्ष्यांच्या नावावरून आहेत.

–सिंहमुद्रेत जीभ लवचिक बनते, घसा आंबण्याची व आवाज फाटण्याची प्रवृत्ती कमी होते. मयूरासनाचा स्वामी झालेला योगी जहाल विष पचवू शकेल एवढी जठराची शक्ती प्राप्त होते. सापाचा श्वास निःश्वास या क्रिया प्राणायामाप्रमाणे दीर्घ असतात. योगशास्त्र च्या नियमानुसार दीर्घ जीवन प्राप्त होण्यासाठी प्राणायाम हे एक साधन आहे.

–संमोहन विद्या माणसाला योगसाधनेने साध्य होते, परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे.

या गोष्टी फक्त teaser आहेत पुस्तक वाचताना शेवटचं पान कधी आलं तेच कळत नाही

चितमपल्ली यांचे अनुभव आणि निसर्गातील प्रगाढ ज्ञान वाचतच बसावं असं वाटतं

आवर्जून वाचावं, आणि निसर्गप्रेमींनि संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे – पाखरमाया.

© मधुकिशोर (डॉ.माधवी किशोर ठाणेकर)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “उमलत्या कळ्या” – (कविता संग्रह) – कवयित्री : सुश्री सुरेखा कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

“उमलत्या कळ्या” – (कविता संग्रह) – कवयित्री : सुश्री सुरेखा कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

पुस्तक           : उमलत्या कळ्या (काव्यसंग्रह) 

कवयित्री        : सुरेखा सुरेश कुलकर्णी.

प्रकाशक        : लीना कुलकर्णी., सातारा

मूल्य              : रु.१५०|-

संस्कारांच्या पाकळ्यांनी बहरलेल्या उमलत्या कळ्या….

श्रीमती सुरेखा सुरेश कुलकर्णी यांचा  उमलत्या कळ्या हा दुसरा काव्यसंग्रह.हा कवितासंग्रह  वाचून झाला आणि मग त्यांनी आपल्या मनोगतात सुरूवातीला जे लिहिले आहे ते प्रकर्षाने जाणवले.त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच  या संग्रहात  बाल आणि युवावर्ग  केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कविता आहेत.कविता होत असताना त्यांचा तसा उद्देश  नसेलही.परंतु अशा अनेक कविता त्यांच्याकडून  रचल्या गेल्यामुळे त्यांना संग्रह करणे शक्य  झाले आहे.पण याबरोबरच  आपली संस्कृती ,परंपरा, निसर्ग  आणि पर्यावरण, त्याचे जतन आणि संवर्धन  अशा विविध  विषयांवर त्यांनी आपल्या भावना दृढपणे व्यक्त  केलेल्या आहेत. त्यामुळे या उमलत्या कळ्या सर्वच वयोगटातील वाचकांना गंध देत आहेत.

बालकवितांचा विचार करताना एक गोष्ट  जाणवते .ती म्हणजे बालकांना समजेल अशा सोप्या भाषेत  त्यांनी रचना केल्या आहेत.काही वेळेला तर घरातील जबाबदार  व्यक्तीशी आपण बोलत आहोत असे बालकांना वाटेल. गणपती, वाढदिवस, बालपण, घरातील मनीमाऊ, चिऊताई, प्राण्यांच्या कडून करण्यात आलेल्या तक्रारी, घराचे हरवलेले अंगण, नातवंडांशी असणारं नातं अशा अनेक विषयावर त्यांनी कविता केल्या आहेत.त्या त्या प्रसंगाला योग्य अशी भाषा,शब्द  वापरले आहेत.

लहान मुले आणि किशोर तसेच युवा गटातील मुलांना त्यांनी अनेक कवितांमधून  मार्गदर्शन केले आहे. धोक्याच्या सुचनाही केल्या आहेत.

आजकाल विसरत चाललेली संध्याकाळच्या  प्रार्थनेची त्या आठवण करून  देतात.आयुष्यात  यशस्वी व्हायचे असेल  तर कोणत्या आदर्शांची मालिका बालकांसमोर , युवकांसमोर असली पाहिजे याची जाणीव  त्यांनी एका कवितेतून  करून दिली आहे.पुस्तके हीच आयुष्याची अमूल्य ठेव आहे.त्यांच्या जगात रमावे कारण वाचलात तरच वाचाल असा संदेशही त्या देतात.तरुणांच्या व्यसनाधिनतेने त्या व्यथित होतात.युवकांनी विवेकाने वागावे व मानवतारुपी संपत्ती जतन करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.तारुण्याचा वसंत फुलत असतानाही बेभान न होता मोहाचे श्रण टाळावेत.म्हणूनच एका कवितेतून  त्यांनी सेल्फीप्रेमींना इशाराही दिला आहे.यंत्रयुगात मानवाने कितीही प्रगती केली असली तरी आपण निसर्गापेक्षा मोठे नाही हे ही त्या बजावून सांगतात.एकंदरीत युवा पिढीचे हित डोळ्यासमोर  ठेवून त्यांनी लिहीलेल्या कवितांची संख्याही बरीच मोठी आहे.

याबरोबरच  तिरंगा गीत,वीर जवानांसाठी केलेली कविता,ऑलिंपिक   विजय, स्वातंत्र्य दिन,महाराष्ट्राचे गुणगान अशा देशप्रेमाचे दर्शन घडवणा-या कविताही त्यांच्याकडून   लिहील्या गेल्या आहेत.

निसर्ग, पर्यावरण  ,त्याचे महत्व  व जतन याविषयी भाष्य करताना त्यांनी अचूकपणे काव्य  केले आहे.वृक्ष लागवडीशिवाय  सुख समृद्धी नाही.डोंगर जपले गेले तर आपलं आयुष्य  उघडे बोडके होणार नाही.उदार निसर्गाचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.त्याच्यासारखा दाता नाही.वनस्पती औषधींचे महत्त्वही त्यांच्या कवितेतून स्पष्ट  झाले आहे. मानव आणि निसर्ग  यांचे असणारे नाते त्यांनी साध्या शब्दांतून विषद केले आहे. 

अनेक निसर्ग कवितांतून निसर्गाचे सुंदर वर्णन वाचावयास मिळते. उदाहरणार्थ: ‘ ऋतुरंग ‘ या कवितेत त्यांनी सहा ऋतुंची साखळी गुंफताना प्रत्येक  ऋतुचे वैशिष्ट्य  अगदी थोडक्यात  पण नेमकेपणाने टिपले आहे.पाऊस,गुलमोहोर, रानफुले,औषधी वनस्पती या सर्वांचे वर्णन  करताना त्यांच्या लेखणीला बहर येतो.मानव आणि निसर्ग  यांचे अतूट नाते आहे याची आठवण करून देत पर्यावरण  रक्षणासाठीही त्या जागरुक आहेत.

त्यांच्या काही कवितांत  गेयता अधिक दिसून येते. सुप्रभात,निसर्ग, नमन स्वातंत्र्यवीरा , वीरजवान या कवितांतील गेयता उल्लेखनीय आहे.याशिवाय षडाक्षरी, शेलकाव्य असे वेगळे काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत.

एखाद्या उद्यानात विविध  प्रकारची फुले एकाच ठिकाणी पहावयास मिळावीत त्याप्रमाणे  ‘उमलत्या  कळ्या’ या काव्यसंग्रहात विविध  विषयांवरील कविता वाचावयास मिळतात.पण  कवितांची मांडणी करताना संमिश्र झाली आहे.त्याऐवजी विषयवार कविता एकत्र दिल्या असत्या तर मांडणी सुबक वाटली असती असे वाटते. बालकविता,संस्कार कविता,निसर्ग  इ. असा काही क्रम ठरवून घेता आला असता.

तरीही काव्य लिहिण्यामागची  तळमळ त्यामुळे कमी होत नाही.संस्कारीत समाज घडावा व देश बलसागर व्हावा हा मनातील भाव त्यांच्या लेखणीने अनेक ठिकाणी व्यक्त  केला आहे.आजच्या काळाचा विचार करता हे खूप महत्वाचे वाटते.त्यासाठी सुरेखाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील  वाटचालीसाठी शुभेच्छा.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “राखेतून उगवतीकडे” – मूळ लेखक : विंग कमांडर अशोक लिमये – अनुवाद : सुश्री सोनाली नवांगुळ ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆

सौ. अर्चना मुळे 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “राखेतून उगवतीकडे” – मूळ लेखक : विंग कमांडर अशोक लिमये – अनुवाद : सुश्री सोनाली नवांगुळ ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे  ☆ 

पुस्तक : राखेतून उगवतीकडे

(नकारात्मकता नाकारणाऱ्या लढवय्या वैमानिकाची गोष्ट) 

लेखक : विंग कमांडर अशोक लिमये. 

अनुवाद : सोनाली नवांगुळ. 

पृष्ठे : २३३

किंमत : ३२५ ₹

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

आयुष्यात आता सगळं संपलं असं वाटत असतानाही नव्या उमेदीनं केवळ जिद्द, साहस, चिकाटी, निष्ठा, आत्मविश्वास, स्वीकार आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा एक अशी झेप घेणं म्हणजे जणू फिनिक्स भरारीच. असं यश त्यांच्याच वाट्याला येतं, ज्यांच्या शब्दांत, विचारांत, मनात, कृतीत नकारात्मकतेला जराही थारा नसतो. त्यांचा सकारात्मकतेचा झरा ‘राखेतून उगवतीकडे’ या पुस्तकात पानापानांवर झुळझुळत राहतो. पुस्तकातील नायक विंग कमांडर अशोक लिमये हे भारतीय हवाई दलात कार्यरत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी ‘द फिनिक्स रायजेस’ या पुस्तकात मांडले. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केलेला त्याचा अनुवाद ‘राखेतून उगवतीकडे’.

रोज एक पाऊल पुढं टाकत यश मिळवायचं असेल तर हे पुस्तक तो विश्वास देतं. ‘तू पुढे हो यश तुझ्या मागं आपोआप येईल’ असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करतं. पुस्तक वाचत जसंजसं आपण पुढं सरकत राहतो तसतसं हवाईदलात जाण्याची इच्छा बाळगणारे,  आकर्षणापोटी हवाईदल जाणून घेणारे, आपल्या मुलांना सैन्यात पाठवणारे, न पाठवणारे, सामान्य – असामान्य अशा प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर हवाईदल उभं राहतं. हा लेखनप्रपंच करण्याचा लेखकाचा उद्देशही तोच होता. 

पुस्तकाचे दोन भाग. पहिल्या भागात ‘नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एन.डी.ए.)’तील प्रशिक्षणापासून ‘फायटर स्वाड्रनच्या जबाबदारी’ पर्यंतचे टप्पे आहेत.  प्रत्येक टप्प्यावर अभ्यास, नियम, कडक शिस्त, यश – अपयश, सततचं रिपोर्टिंग, कुठल्याही आकर्षणाला बळी पडायलाही वेळ नसणं, कधी मजा, कधी सजा, कधी कडवटपणा, कधी मायेनं ओतप्रोत भरलेला आधार अशा पद्धतीनं देशाच्या संरक्षण खात्याची धुरा प्राणपणानं सांभाळण्याची शारीरिक – मानसिक तयारी करावी लागली. ती करत असताना प्रचंड अनुभव मिळत गेले. इथपर्यंतचा लेखकाचा प्रवास थरारपूर्ण अनुभव देतो. 

ते अनुभव मांडताना सैन्यातील विशिष्ट शब्द, वाक्यं जशीच्या तशी दिली आहेत. उदा: स्वाॅड्रन, बटालियन, रिग, हँगर, ब्ल्यू बुक किंवा सुखोई ७, पासिंग आऊट परेड,राईट हँड सीट चेक इ. हे शब्द वाचताना वाचकांना कळावेत यासाठी पुस्तकात शेवटी परिशिष्टामधे त्याचे अर्थही दिले आहेत.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतोच. पण त्यातील एक कोणतातरी दुसर्‍यापेक्षा कमी अधिक प्रमाणात आव्हानात्मक असतो. अशोक लिमयेंच्या बाबतीत दोन्ही भागांत त्यांना तितक्याच आव्हानांचा सामना करावा लागला. सैन्यदलात जायचं तर काही शारीरिक – मानसिक निकष पार पाडावेच लागतात. ते सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर ‘विंग कमांडर’ झाल्याचा आनंद होताच,  पण आणखीही काहीतरी वेगळं घडायचं होतं… घडणार होतं. 

नेहमीप्रमाणंच त्यांनी फायटर विमानाचं उड्डाण केलं आणि त्यांचा अपघात झाला. त्यानंतरचं अनुभवकथन पुस्तकाच्या दुसर्‍या भागात येतं. अपघात होऊनही व्हीलचेअरवर बसून त्यांनी भारतीय हवाईदलाला आपली सेवा दिली. अपघातानंतर पुन्हा घेतलेली झेप वाचताना अनेकदा वेदनांचं मोहोळ उठतं. विंग कमांडरांच्या दुसर्‍या जन्माचा पहिला दिवस वाचताना डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही. त्या दिवशी फिनिक्स राखेतून उठला होता. त्यानं उडायलाही सुरुवात केली होती…पुन्हा एकदा! 

कथेचा नायक आणि अनुवादक दोघंही पॅराप्लेजिक असण्याच्या एका समान धाग्यामुळं हे पुस्तक मराठीत आलं. अगदी तसंच एक वाचक म्हणून हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे माझा जोडीदार असलेला भारतीय नौदलातील एक सैनिक. विवाहापूर्वीच्या त्यांच्या कष्टांची जाणीव या पुस्तकामुळं माझ्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. एक सैनिक दिसणारा कडक शिस्तीचा कणखर पुरूष अगदीच मवाळ नसला तरी प्रेमळ, सहृदयी, मदतीसाठी तत्पर आणि प्रचंड जिद्द अशा गुणांनी संपन्न असतो हा माझा रोजचा अनुभव. या पुस्तकात असे बरेच समान धागे मला सापडत गेले. त्यामुळे दोन बैठकीत पुस्तक वाचून संपलं.

पहिला भाग पूर्णपणे प्रशिक्षणावर आधारीत आहे. त्यात वाचकांच्या अनुभवातले शब्द नसल्यामुळं काही शब्द वाचताना अडखळायला होतं. पणक्षदोन प्रकरणानंतर  सरावानं ते जमतंही. दुसऱ्या भागात अर्थातच ‘फिनिक्स भरारी’. दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे लोक नाराज होतात आणि निराशामय वातावरणात राहतात, अशांसाठी हे पुस्तक महत्त्वाचं. आशेचा किरण दाखवणारे. ज्यांना स्वत:चं छोटं दु:ख खूप मोठं वाटतं असतं ते ‘वेदनेची शिकार’ होतच राहणार. पण अशा वेदनांपासून सुटका हवी असेल तर ‘राखेतून उगवतीकडे’ वाचायला हवं.

ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही. तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहानं झेपावतो त्याची आहे. 

परिचय : सौ. अर्चना मुळे

समुपदेशक

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆“तुरुंगातील सावल्या…” – मूळ लेखक : रूझबेह भरूचा – अनुवाद : सुश्री लीना सोहोनी ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये – तगारे ☆

डॉ. मुग्धा सिधये – तगारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “तुरुंगातील सावल्या…” – मूळ लेखक : रूझबेह भरूचा – अनुवाद : सुश्री लीना सोहोनी ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये – तगारे ☆ 

पुस्तक – तुरुंगातील सावल्या

लेखक – श्री रूझबेह भरूचा

अनुवाद – सुश्री लीना सोहोनी 

परिचय : डॉ. मुग्धा सिधये – तगारे

भारतीय तुरुंगामध्ये  शिक्षा भोगत असलेल्या वा खटल्याच्या सुनावणीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्त्रिया व त्यांची लहान मुले या विषयावर रूझबेह भरूच्चा यांचं हे पुस्तक. पुणे, दिल्ली, भुवनेश्वर,श्रीनगर इत्यादी ठिकाणच्या तुरुंगाना भेटी देऊन तिथल्या स्त्री कैदयांच्या व मुलांच्या मुलाखती देऊन लिहिलेलं हे अनुभवस्पर्शी व आगळं वेगळं पुस्तक…!

मुळातच कैदी किंवा गुन्हेगार हा शब्द आला की आपली दृष्टी पूर्वग्रहदूषित असते. त्यांनी काही तरी वाईट काम केलं आहे म्हणून त्या शिक्षा भोगत आहेत.  गृहितालाच काही वेळा धक्का बसतो हे पुस्तक वाचताना ! त्यांची ५ वर्षाखालील वयाची मुलं त्याच्याबरोबर  तुरुंगात रहात असतात, वाढत असतात त्यांचा काहीही गुन्हा नसताना ! तुरुंगात बहुतांश वेळा त्यांच्यासाठी वेगळ्या काहीही सोयी नसतात. आणि त्यामुळे त्यांचं बालपण होरपळून जातं. ह्या बाबतीत संवेदनशीलपणे विचार व कृती केली.  डॉ. किरण बेदी यांनी तिहार जेलची IG झाल्यावर  त्यांनी इंडिया फाउंडेशन सारख्या NGO च्या  मदतीने तुरुंगामधे मुलांसाठी  पाळणाघर.गरोदर स्रियांसाठी बाळंतपणाची  सोय. चांगला आहार इत्यादी अनेक अमूलाग्र बदल केले.माणूसकी व  अनुकंपा,नेतृत्वगुण,सचोटी, वेगळा नाविन्यपूर्ण विचार, कल्पकता इत्यादी गुणांमुळे डॉ. किरण बेदींनी  तुरुंगामध्ये इतिहास घडवला.ज्याची जगाने मॅगसेसे पुरस्कार देऊन दखल घेतली. दुदैवाने त्यांच्या बदलीनंतर सार काही तसंच राहिलं नाही.

हया कैंदीच्या स्त्रियांच्या व त्यांच्या मुलांच्या भाव‌विश्वाची दखल लेखकाने खूपच संवेदनशीलतेने घेतली आहे. 5व्या वर्षानंतर त्या बिचाऱ्या मुलाला किंवा मुलीला दूरवर कुठे तरी अनाथआश्रमात पाठवण्यात  येते. आई असूनही ममतेला आईच्या वात्सल्याला स्पर्शाला ती पारखी होतात, झुरत राहतात.

एकूणच लेखकाबरोबर जेव्हा आपला हा तुरुंगातल्या भेटीचा प्रवास मनाने होतो. तेव्हा, तुरुंगातल  दाहक वास्तव पाहून धक्का बसतो. भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस यंत्रणा ,तुरुंगाधिकारी, कैद्याविषयींचे कायदा या सार्यामधल्या त्रुटी समन्वयाचा अभाव, दुरावस्था  पाहून यामध्ये  अमूलाग्र सुधारणा व त्याच्या अंमलबणीची गरज जाणवते. 

कित्येक निरपराध स्त्रिया नाहक (व्यवस्थेच्या बळी ठरून) जेलमधे वर्षानुवर्षे सडत राहतात. केवळ जामिन भरायला काही हजार रुपये नाहीत म्हणून・・・・ तर कधी व्यवस्थेशी पंगा घेतल्याबाबत सुशिक्षित सुसंस्कृत माणसांना हयात ढकलं जातं. हे वाचून मन विदीर्ण होते.

हया पुस्तकात शेकडो स्त्रियांच्या कहाण्या आपण वाचतो प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी ” आईपणाचं दुःख तेच आहे. एक समाज म्हणून किती बदल घडायला पाहिजेत आणि हयाची सुरुवात व्यक्ति म्हणून आपल्यापासून हवी. आणि तसं झालं तर गुन्हायांचे प्रमाण कमी होऊन हे तुरूंग भरलेच जाणार नाहीत.जे आज क्षमतेपेक्षा दुप्पटीने भरून वाहत आहेत. लेखकानेही यासाठी काही ठोस उपाय पुस्तकात सुचवले आहेत. विषय कितीही गंभीर असला तरी केस स्टडीच्या अंगाने जाणाऱ्या हया पुस्तकात लेखकाने अधूनमधून विनोदाचा शिडकावा करून ताण हलका करायचा प्रयत्न केला आहे. सत्य , वास्तवदर्शी असं हे पुस्तक आहे. अनुवादिकेनेही सुंदर अनुवाद  करून  पुस्तकाची लय व मराठी भाषेचा लहेजा हे दोन्ही सांभाळले आहेत.

परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे

बालरोगतज्ज्ञ. सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘कथास्त्री’ – संपादक : श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘कथास्त्री’ – संपादक : श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तक – कथास्त्री 

संपादक – श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे 

परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ

कथास्त्री हे पुस्तक म्हणजे कथाश्री या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या जेष्ठ लेखिकांच्या कथांचा संग्रह आहे. वसुंधरा पटवर्धन,गिरिजा कीर,विजया राज्याध्यक्ष,ज्योत्स्ना देवधर,शैलजा राजे, मंदाकिनी गोगटे, मंगला गोडबोले,अनुराधा वैद्य व प्रमोदिनी वडके-कवळे यांच्या कथा या पुस्तकात आहेत.या पुस्तकातील सर्व कथा स्त्री आणि तिचे भावविश्व याचे प्रभावी वर्णन करणाऱ्या आहेत. प्रवाही लेखन शैली आणि सर्वच कथा वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या आहे

वसुंधरा पटवर्धन यांच्या आसरा या कथेमधील गंगाबाई या वयस्क स्त्रीचे देवळात भेटलेल्या अनोळखी स्त्री बरोबराने हक्काने वागणे सुरुवातीला खटकते पण स्वतःचा मुलगा आणि सून असताना देखील त्या वयस्क स्त्रीला एका अनोळखी स्त्रीमध्ये भावनिक आसरा का शोधावा लागतो हे वाचून मन सून्न होते.या कथेमध्ये एका वयस्क सासूची हातबलता अधोरेखित केली आहे.

गिरीजा कीर त्यांची त्याची चाहूल ही कथा वेदवती या अनाथ मुलीची आहे.तिचे आई वडील कोण होते तिला हेही माहित नसल्याने अनाथपणाच्या ओझ्याखाली दबून गेलेली ती आपल्या आयुष्याचे बरे वाईट करून घेण्या आधीच तिला सत्य समजते आणि अघटित कसे टळते. आपले वडील युद्धात शहीद झालेले असून समाजाच्या विरुद्ध जाऊनही आपली जिद्दी आई आपल्याला जन्म देते हे समजल्यानंतर वेदवती मध्ये अक्षरशः उत्साह संचारतो.या कथेत त्याची चाहूल  म्हणजेच अचूक वेळी काही दैवी संकेत मिळणे व त्याचा अर्थ उलगडणे हे कसे घडते ते विस्तृत पणे मांडले आहे.

मंगला गोडबोले यांच्या ताजवा या कथेत विषम आर्थिक परिस्थितीतील मैत्रिणींची कथा खूप विचार करायला लावणारी अशी आहे.आपल्यापेक्षा आर्थिक स्थिती उत्तम असणाऱ्या मैत्रिणी च्या घरी गेल्यानंतर दुस-या मैत्रिणीला खूप अवघडलेपण येते व जेव्हा त्या मैत्रीणीची दुखरी बाजू  तिच्या मैत्रिणीला समजते तेव्हा तिचे ते अवघडलेपण कमी होऊन पुन्हा त्यांचे नाते पूर्वपदावर येते. अशा आशयाची ही कथा मनाला सुन्न करून जाते.

एखाद्याचं सर्वच बाबतीत चांगलं कसं असू शकतं याचं मानवाला पडणारं कोडं आणि त्या माणसाची दुखरी नस सापडल्या नंतर होणारे समाधान ही भावना या कथेत मांडली आहे.

खरे तर मंगला गोडबोले यांची कथा आहे म्हणजे विनोदी वाचायला मिळेल असे मला वाटले होते.पण मनाला चटका लावून जाणाऱ्या भावनेला लेखिकेने खूप सुंदरपणे गुंफले आहे

अनवाळ अनवाळ या शब्दाचा अर्थ उनाड असा आहे.ही कथा अगदी आजच्या काळातीलच वाटते. आई-वडील खूप प्रयत्न करून मुलाला शिकवतात पण मुलगा शिक्षणाला खूप महत्त्व न देता वायफळ वेळ दवडतो.जेव्हा त्याला आपल्या आई-वडिलांना  सोडून  शिक्षणासाठी परगावी जावे लागते तेव्हा त्याला आपली चूक व आई-वडिलांची किंमत कळून येते. ही कथा आई वडीलांची काळजी  व मुलांची बेफिकिरी यावर भाष्य करते.

भैरवी या कथेत  लेखिका मंदाकिनी गोगटे यांनी एका प्रख्यात गायिकेच्या मुलाची चुकीचे करिअर निवडल्याने  संपूर्ण कुटुंबाची कशी फरफट होते हे वर्णन केले आहे मालिनीताई,शमा, व्रजेश,अभंग ही पात्रे यांनी खूप उत्तम रीतीने रेखाटली आहेत.

माणकांचं तळं ही कथा देवयानी नावाच्या अत्यंत बुद्धिमान व कर्तबगार स्त्रीची आहे.खरे पाहता स्त्रियांना आपल्या सौंदर्यावर खूप अभिमान असतो पण स्वतः च्या सौंदर्यामुळे देवयानीच्या अंगभूत कलागुण जसे की कर्तबगारी, बुद्धिमत्ता, समंजसपणा,धैर्य अशा एक न अनेक गुणांना दुय्यम दर्जा मिळत असतो. असे झाल्याने स्वतःच्या सौंदर्याचाच राग येणारी देवयानी ची व्यक्तिरेखा लेखिका प्रमोदिनी वडके-कवळे यांनी खूप सुंदर पण रेखाटली आहे अशा या तिच्या सौंदर्याला लेखिकेने माणकाचं तळं असं संबोधलं आहे.इतरांना हेवा वाटणाऱ्या सौंदर्यामुळे देवयानी ची कुचंबणा क्लेशदायी  तर आहेच तसेच एक नवल निर्माण करणारी आहे.

या कथासंग्रहातील सर्वात कथा शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतात. अशा या सिद्धहस्त लेखिकांची स्त्रियांचे भावविश्व उलगडणारी लेखन शैली मनाला भावते तसेच विचार करायलाही उद्युक्त करते.

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print