मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘कथास्त्री’ – संपादक : श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘कथास्त्री’ – संपादक : श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तक – कथास्त्री 

संपादक – श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे 

परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ

कथास्त्री हे पुस्तक म्हणजे कथाश्री या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या जेष्ठ लेखिकांच्या कथांचा संग्रह आहे. वसुंधरा पटवर्धन,गिरिजा कीर,विजया राज्याध्यक्ष,ज्योत्स्ना देवधर,शैलजा राजे, मंदाकिनी गोगटे, मंगला गोडबोले,अनुराधा वैद्य व प्रमोदिनी वडके-कवळे यांच्या कथा या पुस्तकात आहेत.या पुस्तकातील सर्व कथा स्त्री आणि तिचे भावविश्व याचे प्रभावी वर्णन करणाऱ्या आहेत. प्रवाही लेखन शैली आणि सर्वच कथा वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या आहे

वसुंधरा पटवर्धन यांच्या आसरा या कथेमधील गंगाबाई या वयस्क स्त्रीचे देवळात भेटलेल्या अनोळखी स्त्री बरोबराने हक्काने वागणे सुरुवातीला खटकते पण स्वतःचा मुलगा आणि सून असताना देखील त्या वयस्क स्त्रीला एका अनोळखी स्त्रीमध्ये भावनिक आसरा का शोधावा लागतो हे वाचून मन सून्न होते.या कथेमध्ये एका वयस्क सासूची हातबलता अधोरेखित केली आहे.

गिरीजा कीर त्यांची त्याची चाहूल ही कथा वेदवती या अनाथ मुलीची आहे.तिचे आई वडील कोण होते तिला हेही माहित नसल्याने अनाथपणाच्या ओझ्याखाली दबून गेलेली ती आपल्या आयुष्याचे बरे वाईट करून घेण्या आधीच तिला सत्य समजते आणि अघटित कसे टळते. आपले वडील युद्धात शहीद झालेले असून समाजाच्या विरुद्ध जाऊनही आपली जिद्दी आई आपल्याला जन्म देते हे समजल्यानंतर वेदवती मध्ये अक्षरशः उत्साह संचारतो.या कथेत त्याची चाहूल  म्हणजेच अचूक वेळी काही दैवी संकेत मिळणे व त्याचा अर्थ उलगडणे हे कसे घडते ते विस्तृत पणे मांडले आहे.

मंगला गोडबोले यांच्या ताजवा या कथेत विषम आर्थिक परिस्थितीतील मैत्रिणींची कथा खूप विचार करायला लावणारी अशी आहे.आपल्यापेक्षा आर्थिक स्थिती उत्तम असणाऱ्या मैत्रिणी च्या घरी गेल्यानंतर दुस-या मैत्रिणीला खूप अवघडलेपण येते व जेव्हा त्या मैत्रीणीची दुखरी बाजू  तिच्या मैत्रिणीला समजते तेव्हा तिचे ते अवघडलेपण कमी होऊन पुन्हा त्यांचे नाते पूर्वपदावर येते. अशा आशयाची ही कथा मनाला सुन्न करून जाते.

एखाद्याचं सर्वच बाबतीत चांगलं कसं असू शकतं याचं मानवाला पडणारं कोडं आणि त्या माणसाची दुखरी नस सापडल्या नंतर होणारे समाधान ही भावना या कथेत मांडली आहे.

खरे तर मंगला गोडबोले यांची कथा आहे म्हणजे विनोदी वाचायला मिळेल असे मला वाटले होते.पण मनाला चटका लावून जाणाऱ्या भावनेला लेखिकेने खूप सुंदरपणे गुंफले आहे

अनवाळ अनवाळ या शब्दाचा अर्थ उनाड असा आहे.ही कथा अगदी आजच्या काळातीलच वाटते. आई-वडील खूप प्रयत्न करून मुलाला शिकवतात पण मुलगा शिक्षणाला खूप महत्त्व न देता वायफळ वेळ दवडतो.जेव्हा त्याला आपल्या आई-वडिलांना  सोडून  शिक्षणासाठी परगावी जावे लागते तेव्हा त्याला आपली चूक व आई-वडिलांची किंमत कळून येते. ही कथा आई वडीलांची काळजी  व मुलांची बेफिकिरी यावर भाष्य करते.

भैरवी या कथेत  लेखिका मंदाकिनी गोगटे यांनी एका प्रख्यात गायिकेच्या मुलाची चुकीचे करिअर निवडल्याने  संपूर्ण कुटुंबाची कशी फरफट होते हे वर्णन केले आहे मालिनीताई,शमा, व्रजेश,अभंग ही पात्रे यांनी खूप उत्तम रीतीने रेखाटली आहेत.

माणकांचं तळं ही कथा देवयानी नावाच्या अत्यंत बुद्धिमान व कर्तबगार स्त्रीची आहे.खरे पाहता स्त्रियांना आपल्या सौंदर्यावर खूप अभिमान असतो पण स्वतः च्या सौंदर्यामुळे देवयानीच्या अंगभूत कलागुण जसे की कर्तबगारी, बुद्धिमत्ता, समंजसपणा,धैर्य अशा एक न अनेक गुणांना दुय्यम दर्जा मिळत असतो. असे झाल्याने स्वतःच्या सौंदर्याचाच राग येणारी देवयानी ची व्यक्तिरेखा लेखिका प्रमोदिनी वडके-कवळे यांनी खूप सुंदर पण रेखाटली आहे अशा या तिच्या सौंदर्याला लेखिकेने माणकाचं तळं असं संबोधलं आहे.इतरांना हेवा वाटणाऱ्या सौंदर्यामुळे देवयानी ची कुचंबणा क्लेशदायी  तर आहेच तसेच एक नवल निर्माण करणारी आहे.

या कथासंग्रहातील सर्वात कथा शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतात. अशा या सिद्धहस्त लेखिकांची स्त्रियांचे भावविश्व उलगडणारी लेखन शैली मनाला भावते तसेच विचार करायलाही उद्युक्त करते.

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गारंबीची राधा” – लेखक : श्री ना. पेंडसे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गारंबीची राधा” – लेखक : श्री ना. पेंडसे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी  ☆

पुस्तकाचे नाव… गारंबीची राधा

लेखक… श्री. ना. पेंडसे

मैत्रिणींनो यशोदा ह्या श्री. ना. च्या कादंबरीचं  अभिवाचन मी काही दिवसांपूर्वी केलं होत.. त्यामुळे श्री. ना आणि त्यांचं कोकण प्रेम त्यांच्या लिखाणाची शैली आपल्या सगळ्यांना परिचयाची झाली आहे.. खर तर गारंबीची राधा मी खूप वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तकं आहे.. आज माझ्याकडे तर ते पुस्तक ही नाहीय.. कोणीतरी वाचायला नेलेले दिलेच नाही.. असो.. पण राधा ने अशी काही भुरळ घातली आहे की बरेच प्रसंग अगदी काल वाचल्या सारखे लख्ख आठवतायत त्याच जोरावर मी अभिप्राय लिहिते आहे.. तुम्ही समजून घ्याल च.. खरं तर कोकण प्रदेश त्यातले अनेक लेखक कवी नेहमीच आपल्याला त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे भुरळ घालतात आणि आपण अधाश्या सारखे हे साहित्य वाचतो.. पण ह्या सगळ्या लेखकांमध्ये जास्त आवडतात किंवा लाडके लेखक म्हणू हवं तर ते म्हणजे श्री. ना. पेंडसे.. ह्यांच्या अनेक कादंबऱ्या, कथा संग्रह मी अगदी पारायण केल्या सारखे वाचले आहेत.. कॉलेज लाईफ मध्ये.. श्री. ना. च पहिलं पुस्तकं हातात पडलं ते म्हणजे गारंबीची राधा…ही कादंबरी वाचली आणि मी अक्षरशः श्री. ना. च्या लिखाणाच्या प्रेमातच पडले.. मग काय एका मागून एक त्यांची पुस्तकं वाचली.. गारंबीचा बापू, रथचक्र, लव्हाळी,  ऑक्टोपस, चक्रव्यूह, राजे मास्तर आणि सगळ्यात आवडलेली कादंबरी म्हणजे 1400 पानांची दोन खंडात आलेली कादंबरी तुंबाडचे खोत.. 

गारंबीची राधा  आणि गारंबीचा बापू ह्या अगदी एकाच कथेचे दोन मोठे भाग असावेत असं वाटतं.. कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात गारंबी त्या खेड्याच नाव.. तिथे सुरू झालेली ही कहाणी आपल्याला पुन्हा नव्याने कोकणच्या प्रेमात पाडते.. ह्या कादंबरीत अनेक व्यक्ती चित्रण बघायला मिळतात.. मुख्य पात्र तर आहेतच त्यांच्या सोबतच अनेक स्वभावाची वेगवेगळी कोकणी माणसं आपल्याला इथे भेटतात.. कोकणचा प्रदेश, तिथली सामाजिक, आर्थिक परिस्थिती, तिथल्या प्रथा परंपरा, राहणीमान, खानपान ह्याचं अगदी जवळून दर्शन ह्या कादंबरी मध्ये होत.. पुलावरच्या एका बकाल म्हणता येईल अशा वस्तीत.. रावजी च्या हॉटेल मधे काम करणारी राधा एक सामान्य मध्यम वयीन स्त्री.. पण लेखक तिचं तिच्या रुपाच वर्णन करताना म्हणतात राधा म्हणजे पारिजातकाचं टवटवीत फुल. राधा दिसायला सुंदर आहे पण रोज तेलाच्या घाण्यासमोर बसून भजी तळून रापलेली तिची गोरी पान कांती अजूनच तिच्या सौंदर्यात भर घालते.. त्या छोट्याशा टपरी वजा हॉटेलमध्ये रावजी सोबत राधा दिवसभर काम करते, तिथेच तिला गारंबीचा बापू भेटतो. गारंबीमध्ये बापूची ओळख म्हणजे सर्वपित्री अमावस्येला जन्मलेलं एक बिघडलेलं कार्ट अशी आहे.. अशा ह्या उनाड बापू आणि राधाची प्रेम कहाणी ही जगावेगळी आहे.. बापूचा विचित्र स्वभाव आणि राधाचा स्पष्टवक्तेपणा राधेचं खंबीर धीर गंभीर रूप ह्या कादंबरीत वारंवार दिसून येते.. बापू सारखा मन मानेल तसं जगणारा प्रियकर आणि कोणाचाही आधार नसलेली ही राधा यांची प्रेम कहाणी आपल्याला वेड लावते.. प्रत्येक पानावर उत्सुकता अजूनच वाढत जाते…

यासोबत कोकणातील अंधश्रद्धा श्रीमंती थाट जमीनदारांचा मुजोरपणा आणि ह्या सगळ्याशी लढणारा उनाड बापू आपल्याला अधिकच जवळचा वाटू लागतो याच सोबत बापूवर निस्सीम प्रेम करणारी, कुठल्याही बंधनात न अडकलेली ही राधा आपल्या मनात घर करून जाते,… त्या काळी लग्नाशिवाय बापू सोबत एकाच घरात राहून संसार करणारी ती राधा त्या काळची एक आधुनिक विचारांची स्वतंत्र स्त्री या कादंबरीत भेटते,.. गावात असणारे अण्णा खोत, दिनकर भाऊजी ,विठोबा, आणि राधेचा नवरा रावजी ही अशी कित्येक पात्र या कादंबरीत भेटतात,.. रावजी म्हणजे राधाचा नवरा हा एक क्रूर विचारांचा स्त्री स्त्रीला एक भोगवस्तू समजणारा नवरा राधेला याचा तिरस्कार आहे.. राधेच्या सौंदर्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये गिराईक वाढतील या उद्देशाने हा रावजी राधेला हॉटेलमध्ये बसवत असे,.. 

अशाच एका क्षणी राधेला बापू भेटतो.. आणि रावजीसारख्या माणसाला तो आपल्या ताकतीने हरवू शकतो हे ती काही प्रसंगातून समजून चुकते… एक प्रकारचे सुप्त आकर्षण बापूबद्दल तिला आधीच वाटत असते त्यातूनच ती त्याला अनेक पदार्थ करून पाठवत असे आणि तेही रावजीच्या हातून.. कित्येक दिवसांनी रावजी मरून जातो आणि राधा पुन्हा एकदा एकटी पडते… पण समाजात आधीच गल्ल्यावर बसणारी म्हणून राधेची नाहक बदनामी झालेलीच असते, त्यातच आता तिला एकटेपणा येतो.  या सगळ्यात बापूचा आधार तिला वाटतो,… आणि कोणतीही पर्वा न करता ती बापूसोबत राहायला लागते याचवरून गावात सगळीकडे राधेने बापूला ठेवला अशीच तिची बदनामी सुरू होते… पण बापूचा हळव्या निर्मळ प्रेमामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून राधा आणि बापूचा संसार सुरू होतो या सगळ्या परिस्थितीत राधेची मानसिक घालमेल सुरू असते… बापूचं कितीही प्रेम असलं तरी या प्रेमाला गावात मान्यता नाही… आपण फक्त एक रखेल म्हणूनच ओळखले जातो याची खंत राधेला नेहमी वाटत असते… 

अशातच एक दिवस आप्पा दामले याची एन्ट्री या कादंबरीत होते… आणि राधा आणि बापूचं आयुष्य बदलून जातं..आप्पा दामले हे राधा आणि बापू विषयी ऐकून असतात आणि राधेच्या मनातील खंत ही त्यांना कळते तेंव्हा ते ह्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला देतात.. अर्थात ह्या पुस्तकात दाखवलेला काळ म्हणजे केस ठेवलेला ब्राम्हण औषधाला ही सापडणार नाही इतका पूर्वीचा.. त्यात बापू सारखा उनाड कोकणी विक्षिप्त माणूस.. आधीच तो बदनाम मग हे लग्न कोण मान्य करणार असं बापू म्हणतो.. पण इथे हो राधाची हुशारी तिचं बुद्धी चातुर्य दिसुन येत.. गारंबी म्हणजे जग न्हवे.. म्हणत ती बापू सोबत लग्न करते…ह्या सगळ्या मध्ये बापू आणि राधेचा गांधर्व विवाह ही अगदी रोमँटिक आणि निखळ  प्रेमाचं प्रतिक वाटतं… बापू भल्या पहाटे राधेला बागेत घेऊन जातो आणि एक अनंताच फुलं देऊन तिच्याशी लग्न करतो.. तो क्षण तो परिसर ते लिखाण सगळचं कस मोहवून टाकत… तो पर्यंत बापू सुपारी चा मोठा व्यापारी बनतो आणि ज्या गावाने अक्करमाशा म्हणून हिणवलं तेच गावं बापुच कौतुक करताना थकत नाही.. ह्या सगळ्या प्रवासात बापूला मिळालेली राधेची साथ राधेच्या अजूनच प्रेमात पाडते.. मध्येच बापू एका महाराजांना भेटतो आणि बुवा बनतो तेंव्हा ह्या त्याच्या भोंदू पणाला राधेचा विरोध तिच्यातल वेगळेपण दाखवून देतो.. व्याघ्रेश्वर त्याच्यावर असणारी श्रद्धा जेंव्हा अंधश्रद्धेचे रूप घेते तेव्हा राधा त्याला कडाडून विरोध करते.,. बाळाच्या जन्मानंतर राधेची एक वेगळीच ओळख आपल्यासमोर येते.. बापूचं विक्षिप्त वागणं, घर सोडून बाहेर राहणं, अस असलं तरी राधेचं बापू वरील प्रेम जराही कमी होत नाही.. काही दिवसांनी बापूलाही आपला भोंदूपणा कळतो मग तो तेव्हा तो राधेकडे परत येतो आणि पुन्हा एक नवी कहाणी सुरू होते.. सगळ्यात अजून बऱ्याच घटना घडवून जातात…. काय आहेत किती उत्कंठा वर्धक आहेत.. हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकीने किमान एकदा तरी गारंबीची राधा आणि गारंबीचा बापू वाचलंच पाहिजे… 

जवळजवळ दहा ते बारा वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकावर मी आज अभिप्राय लिहिलाय त्यामुळे त्यात बऱ्याच चुकाही असतील,.. प्रसंग मागे पुढे झालेले असतील त्या तुम्ही सगळे पुस्तक वाचाल आणि दुरुस्त कराल याची खात्री आहे…

धन्यवाद..

लेखक : श्री ना. पेंडसे

परिचय : सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अमृतघट” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अमृतघट” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : “अमृतघट” – काव्यसंग्रह

कवयित्री : अरुणा मुल्हेरकर

प्रकाशक : शॉपीजन

प्रकाशन :१६ मे २०२४

किंमत:®२९१/—

सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा नुकताच प्रकाशित झालेला अमृतघट हा काव्यसंग्रह हाती पडताच प्रथम दर्शनी मी दोन गोष्टींमुळे अत्यंत प्रभावित झाले. पहिले म्हणजे काव्यसंग्रहाचे शीर्षक. अमृतघट  या शब्दातलं माधुर्य आणि शब्दात असलेला उपजतचा काव्यभाव, रसमयता आणि शुद्धता मनाला आकर्षित करून गेली. अमृतघट म्हणजे अमृताचा घट,  अमृताचा कलश.  अमृत म्हणजे संजीवन देणारं सत्त्व. तेव्हाच मनात आलं,” नक्की या काव्यसंग्रहातून मनाला संजीवन, चैतन्य, ऊर्जा लाभणार.” नावात काय असतं? असं म्हणतात पण माझ्या मते नावातही खूप काही असतं.

दुसरं म्हणजे या पुस्तकाचं अत्यंत आकर्षक असं मुखपृष्ठ जे सुप्रसिद्ध चित्रकार आणि ग्राफिक्सकार सौ. सोनाली सुहास जगताप यांनी केलेलं आहे. अतिशय मनोवेधक असं हे मुखपृष्ठ आहे. घटातून अमृतधारा ओसंडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर बासरीच्या सुरात तल्लीन झालेल्या सावळ्या, मोरपीसधारी, घनश्यामाची भावपूर्ण मुद्रा! संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर हे मुखपृष्ठ किती योग्य,अर्थपूर्ण आणि चपखल आहे याचीच जाणीव होते.

अमृतघट  उघडला आणि त्यातून बरसणाऱ्या अमृतधारांनी माझे मन अक्षरश: पावन झाले.

भक्तीरसमय  ५८ भक्तीगीतांनी हा कलश भरलेला आहे. यात अभंग आहेत, ओव्या आहेत, आरत्या आहेत,अंगाई,लावणी, वृत्तबद्ध भक्तीरचनाही आहेत.

जसजशा तुम्ही या भक्तीरचना वाचत जाता तसतसा तुम्हाला तादात्मतेचा, एकरूपतेचा, अद्वैताचा अनुभव येतो. अवघा रंग एक होऊन जातो.

या संग्रहात गणेशाची आराधना आहे, विठ्ठल भक्तीचा आनंद आहे आणि कृष्ण भक्तीची तल्लीनता आहे. या साऱ्याच भक्तीरचना रूप रस गंध नादमय आहेत यात शंकाच नाही.

जगामध्ये असा कोणी नसेल ज्याच्या मनात परमेश्वराविषयी भाव नाही.” मी परवेश्वराला मानत नाही” असे म्हणणाऱ्या माणसाच्या मनातही कुठेतरी ईश्वरी शक्ती विषयीची, त्याच्या अस्तित्वाची मान्यता असतेच आणि त्या शक्तीशी शरण जाण्याची कधी ना कधी त्याच्यावरही वेळ येतेच तेव्हा तो हतबल जरूर होत असेल पण  त्यावेळी तो फक्त शरणागत असतो. अरुणाताईंच्या या भक्तीरचना वाचताना वाचक खरोखरच शरणागत होऊन जातो.

तुज नमो या अभंगात त्या म्हणतात,

तूच एक आम्हा।  दावी मार्ग काही। तुजविण नाही। जगी कोणी।।

तुजविण शंभो मज कोण तारी” हा करुणाष्टकातला बापुडा भाव याही शब्दांतून जाणवतो.  कर्ताकरविता तूच आहे याची पुन्हा एकदा या शब्दांतून मात्रा मिळते.

सामान्य माणसाची भक्ती ही सगुण असते. त्याच्या श्रद्धास्थानाला एक काल्पनिक रूप असतं आणि ते मनातलं रूपदर्शन त्याला चैतन्य देत असतं.

सगुण भक्ती या काव्यरचनेत अरुणाताई किती सहजपणे म्हणतात,

लागलीसे आता। एक आस बाबा।

दावी तुझ्या रूपा ।जगन्नाथा।।

खरोखर भक्ताची व्याकुळता, आर्तता या संपूर्ण अभंगात  दृश्यमान  होते.

कृष्ण सखा, कान्हा, मुरलीधर, देवकीनंदन, गोवर्धनधारी अशी कितीतरी मधुर नावे प्राप्त झालेले भगवंताचे रूप आणि मानवी जीवन याचं अतूट नातं आहे.  कान्हाच्या भक्तीतला जिव्हाळा ज्याने अनुभवला नाही असा जिवात्माच नसेल.

सावळा हरी या रचनेत अरुणाताई याच लडिवाळ भावनेने लिहितात,

नंदाचा तो नंदन 

यशोदेचा कान्हा

करी नवनीताची चोरी 

फुटतो गोमातेला पान्हा.. 

फुटतो गोमातेला पान्हा या तीन शब्दांनी अंगावरचा  रोमरोम फुलतो. 

ही रचना वाचताना वाचक गोकुळात जातो. कृष्णाच्या बालक्रीडेत सहजपणे रमून जातो. 

धून मुरलीची ऐकूनी 

अवघ्या गोपी मुग्ध झाल्या

देहभान त्या विसरून

सुरावटीवर डोलू लागल्या…

वाचकही अशाच मुग्धावस्थेत काही काळ राहतो.

माऊली, गुण गाईन आवडी, विठ्ठल विठ्ठल गजरी, वारी निघाली, या भक्तीरचना वाचताना आपण वारकरीच बनून जातो आणि टाळ,मृदुंगाच्या  गजरात चाललेल्या वारीचा सहजपणे भाग बनून जातो.

रूप सावळे साजिरे।हरपले माझे मन।

डोळा भरुनिया।पाहू चित्ता वाटे। समाधान ।।

इतके भक्तीरसात आकंठ बुडालेले शब्द पंढरपुरी स्थित असलेल्या माऊलीच्या चरणांचे जणू दर्शन घडवितात.

जीव गुंतला, मृगजळ एक आशा,नावाडी,काय भरवसा उद्याचा,या रचना चिंतनात्मक आहेत.  जगण्याविषयी सांगणाऱ्या आहेत. प्रपंचाच्या रगाड्यात रुतलेल्या सामान्य माणसाच्या मनस्थितीचे वर्णन करणाऱ्या आहेत.

लोभ मोह क्रोध मत्सर

षड्रिपू  घेरती मला

ना सुटे माझेपण 

*प्रपंची जीव गुंतला …*यामध्ये एक प्रांजळपणा जाणवतो.  स्वतःच जगणं आणि अवतीभवती वावरणाऱ्या प्रियजनांचे अथवा इतरांच्या जीवनाचे निरीक्षण करताना जे जे टिपलं गेलं त्याची प्रतिबिंबं त्यांच्या या भक्तीरचनेत आढळतात आणि ते सारं वाचत असताना आपल्या जीवनाचे ही संदर्भ आपल्याला सापडतात.  हे अगदी सहजपणे घडतं. 

जरी या रचना अध्यात्मिक असल्या तरी त्यात अवघडपणा नाही.  यात संत संतवाङमयाचा अभ्यास आणि आभास दोन्ही आहे आणि माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठी त्या जगण्यासाठी आधारही देतात आणि म्हणूनच त्या वाचनीय ठरतात.

या भक्तिरचना वाचताना श्रीरामाचे दर्शन होतं, बलशाली हनुमान दिसतो, दत्तगुरूंचे दर्शन होते, संत ज्ञानेश्वरांची महती कळते, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा ही दर्शन देतात, शेगावला घेऊन जातात. या भक्तीरचनांमध्ये जशा आरत्या आहेत, ओव्या आहेत, अभंग आहेत तशाच वृत्तबद्ध भक्तीरसात्मक  कविताही आहेत.  शोभाक्षरी नावाचा एक नवीन गोड काव्यप्रकार या संग्रहात वाचायला मिळतो.

भावसुमने ही रचना शोभाक्षरी आहे.

या रचनेत चरणाच्या प्रत्येक ओळीत नऊ अक्षरे आहेत.त्यामुळे या रचनेला एक सुरेख लय,गेयता प्राप्त होते.

वाहू तुळस विठोबाला

भजू भक्तीने ईश्वराला

 

नको मजला व्यवहार

एका विठ्ठला नमस्कार…

हे अनंता..हे भुजंगप्रयात वृत्तातले  श्लोक अतिशय तात्विक आहेत.मनाला समजावत आधार देतात.

अनंता तुला रे किती मी स्मरावे

तुझे रूप चित्ती सदा साठवावे

 

दिवा स्वप्न हे पाहते मी मुकुंदा

पृथा स्वर्ग करण्यास तात्काळ यावे

 

 शिवरायावर केलेली ही ओवी पहा…

 

 खानापाशी सैन्य किती

 मावळे घाबरले 

गनिमी काव्याने त्याने

गडकिल्ले जिंकले …

काही पौराणिक विषयावरच्या ओव्याही यात वाचायला मिळतात.

आणखी एक.. ही लावणी पहा —कशी मजेदार आहे!

 

प्रतिष्ठापना राम मूर्तीची 

डोळा भरूनशान पाहूया 

राया चला अयोध्येला जाऊया…

ही आध्यात्मिक लावणी  मनाला आनंद देणारी आणि प्रसन्न करणारी आहे.

यात भारतीय सण,रितीपरंपरांवर आधारितही काव्यरचना आहेत.गुरुवंदना आहे.अनमोल विचारधनाचा एक खजिनाच या अमृतघटात साठवलेला आहे

विविध  प्रकारच्या तल्लीन करणाऱ्या, देहभान हरपवणाऱ्या, मुग्ध करणाऱ्या, मनावर मायेची पाखर घालणाऱ्या, दुःखावर फुंकर मारणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या दिशादर्शक, संदेशात्मक, तत्वचिंतनात्मक भक्तीरचनांनी भरलेला हा अमृतघट प्रत्येकानी देव्हार्‍यात जसे गंगाजल पात्र ठेवतो, तद्वतच संग्रहात ठेवावा इतका मौल्यवान आहे.  यातलं सगळं लेखन संस्कारक्षम आहे.

कवयित्रीने मनोगतात  म्हटल्याप्रमाणे वडिलांचा लेखन वारसा  त्यांनी जपलेला आहे हे नक्कीच. या रचनांमध्ये संस्कार आहेत, शास्त्रशुद्ध काव्यनियमांचे पालन आहे मात्र हे लेखन स्वयंसिद्ध आहे. यात प्रभाव आहे पण अनुकरण नाही, यात अनुभव आहे पण वाङमय चौर्य नाही. हे स्वरचित आणि स्वतः केलेल्या चिंतनातून, मंथनातून, घुसळणीतून वर आलेलं नवनीत आहे.

या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध सिद्धहस्त लेखिका, कवयित्री आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या नाशिकस्थित सौ. सुमतीताई पवार यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

पुन्हा एकदा सांगते या भावभक्तीच्या अमृतघटातलं अमृत चाखूनच  पहा….

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆“रामराज्य…” – लेखक : श्री संदीप सुंकले ☆ परिचय – श्री अविनाश सहस्त्रबुध्दे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रामराज्य…” – लेखक : श्री संदीप सुंकले ☆ परिचय – श्री अविनाश सहस्त्रबुध्दे ☆

पुस्तक – रामराज्य

लेखक- संदीप सुंकले,

सम्पर्क- 8380019676

प्रकाशक- संकल्प प्रकाशन, अलिबाग.

पृष्ठ –  ६४, 

मूल्य- ₹ १००

रामराज्याच्या दिशेने सम्यक पाऊल टाकण्यासाठी…

दैनंदिन जीवनात जगत असताना अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव आपल्याला येतो. एखादी वाईट घटना आपल्याला दिसली की घोर कलियुग असे म्हणत कलियुगाकडे बोट दाखवत आपण आपले नैराश्य अधिक वाढवतो. रामावर भरवसा असणारे आणि जे काही होते ते रामाच्या इच्छेने होते असे म्हणत त्या वाईट घटनेचा क्षण आपल्या मनःपटलावरुन हद्दपार करतात. पण चिंताक्रांत मंडळी रामराज्य कधी येणार, असा विचार करीत वर्तमानात जगण्याऐवजी रामराज्याची प्रतीक्षा करणेच पसंत करतात. पण रामराज्य म्हणजे काय, हे जाणून घेण्याचीदेखील आवश्यकता आहे.

श्री संदीप रामचंद्र सुंकले

आपल्या अंतरमनातील रामाला आपण कधीच स्मरत नाही, दुसऱ्या व्यक्तीतील ह्रदयस्थ रामालाही आपण धूडकावून लावतो. हे सगळे होऊ नये आणि रामराज्य नक्की काय होते, हे समजावे यासाठी एका रामभक्ताने रामराज्य या छोटेखानी पुस्तिकेचे लेखन केले आणि ते जनमानसात पोहचावे म्हणून त्या दासचैतन्याची धडपड सुरु आहे.

गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित असणारे दासचैतन्य म्हणजेच संदीप सुंकले यांची ओघवती, मृदु पण तेवढीच स्पष्ट असलेली भाषा रामराज्याची महती सांगते. लवकुशांनी सांगितलेल्या प्रभु रामचंद्रांच्या महतीबाबत आपण सर्वजण जाणतोच. त्या रामरायांचे रामराज्य कसे होते, हे श्री. सुंकले त्यांच्या सिद्धहस्त लेखणीद्वारे प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहचवतात.

शुद्ध आहार-विचार-आचार म्हणजे रामराज्य, शुद्ध आस-ध्यास-व्यास म्हणजे रामराज्य, शुद्ध जल-स्थल-बल म्हणजे रामराज्य, शुद्ध भावना-कल्पना-वासना म्हणजे रामराज्य, शुद्ध मन- तन-धन म्हणजे रामराज्य, शुद्ध वर्ण-कर्म-धर्म म्हणजे रामराज्य, शुद्ध जांबुवंत-हनुमंत- नलनील म्हणजे रामराज्य, शुद्ध राम-सीता-लक्ष्मण म्हणजे रामराज्य, शुद्ध कुटुंब-समाज-राष्ट्र म्हणजे रामराज्य असे नऊ लेख म्हणजे रघुकुळातील सात्विकतेची बीजे आहेत. केवळ दहाच लेख आणि प्रत्येक लेखातील ओजस्वी भाषा, ज्यातून रामराज्याची संकल्पना अधिक समृद्धतेने उलगडत जाते. शुद्धता, निर्मळपणा आणण्यासाठी जर काही आवश्यक असेल तर ते म्हणजे प्रयत्न. ज्या प्रयत्नांबद्दल समर्थ रामदासांनी दासबोधात अनेकदा सांगितले आहे. मूल्यधिष्ठित आचरण करणारे नागरिकांच्या सहाय्याने रामराज्य येऊ शकते. रामराज्य आणायचे असेल तर भौतिक सुखाच्या मागे धावणे सोडण्याची गरज आणि भोगांपुढे लोटांगण न घालणेच अधिक श्रेयस्कर असल्याचे लेखक सुचवतात.

बारामतीच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. रेवती राहुल संत यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रभु रामचंद्रानी  तुमच्याआमच्यातील अवगुणांवर केलेला शस्त्राघात आहे. सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीकडे पाहताना येणारे नैराश्य स्वाभाविकच आहे, पण ते नैराश्य, मरगळ झटकून  रामराज्य येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज लेखकाने अधोरेखीत केली आहे.

रामराज्यातील विचारांमधील सौम्यता आणि आधुनिक काळात परिस्थीतीत झालेला बदल यावर टोकदार भाष्य करताना श्री.सुंकले यांनी विज्ञानाची कास सोडलेली नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे. संस्कार, संस्कृती यांच्याबद्दलचा विचार करीत असतानाच विचार-भावना-वर्तन यावर मानसशास्त्रीय अंगाने केले जाणारे भाष्य करताना समर्थांच्या मनाच्या श्लोकाबद्दलही लेखक भाष्य करतात. रामराया म्हणले की समर्थांचे अनुषंगिकपणे तेथे येणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीतील प्रयत्नाबरोबरच, विवेक, वैराग्य, वृत्ती-बदल या बाबीही लेखक उद्धृत करतात. मनाचे श्लोक आणि मनापासून करण्याची सुधारणा त्यांनी वेळोवेळी या रामराज्य पुस्तकात मांडली आहे. 

प्रभु रामचंद्राबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल लिहित असताना लेखकाने त्यांच्या दासाचा म्हणजेच मारुतीरायांचा उल्लेख केला नसता तरच नवल. हनुमंताचा समर्पित भावदेखील या निमित्ताने त्यांनी मांडला आहे. हनुमंताप्रमाणेच लक्ष्मणाचे रामचंद्रांचे भाऊ म्हणून नाही, तर त्यांच्या दैदीप्यमान बंधूप्रेमाविषयी लिहिले नाही तर रामराज्य ही संकल्पना अर्धवटच राहिली असते, पण त्यांचा यथायोग्य उल्लेख यात आढळतो. रामतत्त्वांचे मूल्य जाणून घेतल्याने, त्यासाठी आवश्यक निश्चय आणि मार्गक्रमण केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही या विषयी लेखकाच्या मनात कोठेही किंतू जसा नाही, तसेच शुद्ध निश्चयाने मार्गक्रमण केल्यास लवकरच रामराज्य येऊ शकते. याबद्दल लेखकाला केवळ आशाच नाही, तर खात्री देखील आहे.

परिचय : श्री अविनाश सहस्त्रबुध्दे

इंदापूर , माणगाव .

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆“विटामिन जिंदगी…” – लेखक : श्री ललितकुमार ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

“विटामिन जिंदगी…” – लेखक : श्री ललितकुमार ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆ 

पुस्तक – विटामिन जिंदगी

लेखक – श्री ललितकुमार

परिचय : डॉ. मुग्धा सिधये तगारे

आयुष्याला खुराक पुरवणाऱ्या, निराशावादी माणसाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालणारं हे पुस्तक… 47 वर्षाच्या एका (पोलिओग्रस्त) दिव्यांगाच्या आयुष्याची ही कहाणी आहे. लेखकाने अगदी बालपणापासून आपल्या आयुष्याचा पट इथे उलगडून दाखवला आहे. दिल्लीमधे सुतारकाम, मूर्तीकाम करणाऱ्यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षापर्यंत इतरांसारखाच तो सामान्य धडधाकट मुलगा होता. त्यानंतर एक दिवस खूप ताप आला… बरेच दिवस राहिला आणि पोलिओच्या विषाणूचं शरीरावर आक्रमण झालं. लेखक म्हणतो,” पुढच्या दुःख व कष्टांसाठी नियतीनं “माझी” निवड केली आणि जणु आणखी कोणाला वाचवलं.”  संपूर्ण पुस्तकामधे लेखकाने आपली संघर्षयात्रा विस्तृतपणे उलगडून तर दाखवली आहे पण कुठेही रडगाण्याचा सूर नाही! शरीर विकलांग असलं तरी मनं अत्यंत सुदृढ आहे. लहानपणापासूनच खरं तर सगळ्याच बाबी त्यांच्या विरोधात होत्या. घरी शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नाही (वडिल ११ वी शिकलेले) आर्थिक स्तर निम्न मध्यमवर्गीय, घराजवळ, शाळेत फारसे कोणी मित्र नाहीत…. तरीही त्यांच्याकडे असणाऱ्या + ve गोष्टींच्या जोरावर ते आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत गेले.

सुरुवातीपासूनच एकत्र कुटुंबातील आजी-आजोबा, आई-वडिल काका-काकू, बहिण भाऊ हे सारे ललितच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. बालपणी ४ वर्षांचा असताना अचानक पाय लुळे पडून उभं राहता येते नाही हा धक्का त्यांच्यासाठी मोठा होता. काहीही करून त्याला उभं करायचं या जिद्दीने त्याच्या घरच्यांनी वैदू, वैदय, डॉक्टर, जो कोणी जे काही सांगेल ते सर्व उपाय केले. सतत मालिश, पहाटे उठून गरम पाण्यात पाय बुडवून बसणे, नाही नाही ती चूर्ण, गोळ्या सतत खाणे काढे पिणे ह्या गोष्टी ४-५ वर्षाच्या मुलाच्या वयाला अतीच होत्या. पण लेखकाने बालपण कोमेजून गेलं असं न म्हणता घरच्यांचे प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, कष्ट त्यांनी अधोरेखित केली. 

शाळा कॉलेजमथले त्यांचे अनुभव वाचून समाज म्हणून आपण किती अससंस्कृत आहोत याचा सज्जड पुरावाच मिळतो. शाळेमधली मुलं त्याच्या कुबड्या हिसकावून घ्यायचे, चेष्टा करायचे पण शिक्षकही त्याच्यासमोरच त्याची कीव करायचे. एवढच की ११-१२ च्या वर्गातले शिक्षक, प्रयोगशाळा मदतनीसही त्याला काहीही मदत करायचे नाहीत. केवळ एका मित्राच्या मदतीमुळे मी रसायनशास्त्राचे प्रयोग करू शकलो असं लेखक म्हणतो. टोकाचा स्वाभिमानी, असलेल्या ललितला दुसर्‍याकडून कीव, दया, उपेक्षा मिळाली की चीड यायची. वाईट वाटायचं. आपल्याला इतरांसारखेच समानतेने वागणूक मिळावी एवढीच त्यांची इच्छा असायची. ती इच्छा फक्त परदेशी शिक्षणाच्या वेळी ‘स्काॅटलंड’ इथे पूर्ण झाली. होती. पण त्याची पायाभरणी फार पूर्वी शाळेतच झाली होती.

इतर दिव्यांगांपेक्षा ललित एवढा वेगळा आहे की त्याने आयुष्यात असाधारण गोष्टी केल्या. प्रत्येक वेळी सुरक्षित कोषातून तो बाहेर पडला व पुढे गेला. याचं कारण म्हणजे जिद्द व आत्मसन्मान. १२ वी मधे वर्गात त्याला सर्वात जास्त मार्क मिळाले. सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी (best outgoing) म्हणून मंचावरून नाव घोषीत झाले तेव्हा खरं तर त्याला खूप आनंद  झाला होता. पण जेव्हा मागच्या ओळीत बसलेला मुलगा तो अपंग आहे ना.. असं म्हणाला तेव्हा क्षणार्थात तो आनंद झाकोळला गेला. तेव्हा मनाशी ठरवले की,  मी कधीही अपंग कोट्यातून कुठेही प्रवेश घेणार नाही. इथेच त्याचा ‘वेगळा’ ते ‘विशेष’ हा प्रवास सुरु झाला. पण त्याआधी शाळेच्या पायऱ्या चढण्यासाठी, कुबड्या घेऊन बसमधे चढण्यासाठी, 4-4 km. चालण्यासाठी त्याला अविरत शारीरीक कष्ट कसे घ्यावे लागले ते वाचून अंगावर काटा येतो. 

BSC करता करताच माहिती काढून (इ.स. २००० चा सुमार) नवीनच सुरु झालेले जीएनआयटीचे काँप्युटरचे कोर्सेस त्यांनी केले. तिथच उत्तम मार्क मिळवून आधीच्या वर्गातल्या मुलाना शिकवले. शिक्षणाला, ज्ञानाला कसा मान मिळतो याचा प्रथम अनुभव त्यांना तिथे आला. त्यानंतर त्यानी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिल्ली कार्यालयात काम करायला सुरुवात केली. बरचसं स्वयंसेवी प‌द्धतीचं हे काम होत. त्यातून पैसे कमी मिळाले तरी प्रचंड अनुभव गाठीशी आला. त्यातच पुढे त्या ऑफिसमधे कायम नोकरी मिळाली. तरी त्याचा राजीनामा देऊन त्यांनी परदेशात शिक्षणासाठी अर्ज केले. व संपूर्ण शिष्यवृत्तीसह स्कॉटलंडला बायोइनफोरमॅटिक्स मधे दीडवर्ष एकट्याने राहून डिग्री घेतली. पुढे भारतात परतल्यावर अपंगांसाठी online forum स्थापन, केला व भारतभरच्या दिव्यांगांशी ते जोडले गेले – computory ज्ञान वापरुन त्यांनी भारतीय काव्य एकत्र आणून विकीपिडियावर काव्यकोषाची निर्मिती केली. कॅनडामधे शिष्यवृत्ती मिळवून PHD साठीही ते गेले पण शरीर अजिबातच साथ देईना. त्यामुळे परत फिरावं लागलं तरी घरी राहून ते १०-१० तास, काम करतात. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष व्यक्तीचा रोल मॉडेल हा पुरस्कार मिळाला आहे.

आयुष्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल लेखक म्हणतो दुःख आणि असफलता हे जीवनाच्या इंजिनासाठी इंधन म्हणून उत्तम काम करतं. दुःखात जगणं व दुःखाबरोबर जगणं हया दोन्हीमधे खूप फरक आहे. खरंच किती समर्पक आहेत या ओळी ! म्हणूनच अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.

परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘प्रेम रंगे ऋतुसंगे’ – कवी : श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘प्रेम रंगे ऋतुसंगे’ – कवी : श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी  

पुस्तक– प्रेम रंगे ऋतुसंगे (काव्यसंग्रह)

कवी– श्री सुहास रघुनाथ पंडित, सांगली

प्रकाशक– अक्षरदीप प्रकाशन व वितरण, कोल्हापूर

मूल्य– 150/-

कवितासंग्रहावर परीक्षण लिहिण्याइतकी मी मोठी नाही, समीक्षक तर नाहीच… पण कवितेची अतीव आवड असणारी एक वाचक म्हणून मनापासूनअभिप्राय द्यावासा वाटला.

श्री सुहास रघुनाथ पंडित 

जेष्ठ कवी सुहास पंडित यांच्या ‘प्रेम रंगे, ऋतुसंगे’ या कविता संग्रहासाठी अभिप्राय !

‘प्रेम रंगे, ऋतुसंगे’ या काव्य संग्रहाच्या नावातूनच प्रेम आणि ऋतू म्हणजेच निसर्ग यांचं अद्वैत जाणवतं! 

कवी सुहास पंडित यांनी म्हटले आहे की, कवींच्या कविता… भावनांचा कल्लोळ ‘निसर्गदत्त’ असतो. निसर्गाचे मानवाने केलेले रूप पाहता, निसर्गाशी साहित्यातून जवळीक साधण्यासाठीची त्यांची धडपड त्यांच्या मनोगतातून दिसली.

एकीकडे माणसामाणसातला स्वार्थ, मत्सर वाढत असताना… दुसरीकडे कवी सुहास पंडीत  यांना वाटत की, जगणं समृद्ध होण्यासाठी माणसातील प्रेम, एकी, आपुलकी  नात्यातील जपणूक आणि निसर्गाचा अखंड सहवास, त्याच संवर्धन याचा  अतूट बंध निर्माण करणे खूप गरजेचे आहे.

जेष्ठ समीक्षक विष्णू वासमकर यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेतून साहित्य शास्त्रातील काव्याबद्दलचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यामुळे त्यांची ही नुसतीच प्रस्तावना वाटत नसून एक अभ्यास वाटला. प्राचीन काव्य आणि शास्त्रकारांची मते, त्याबाबतची माहिती अशा अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. काव्यशास्त्रीय विवेचन हे किती  महत्वाचे आहे हे लक्षात आले. काव्य म्हणजे काय इथपासून ते काव्य कसे करावे, ते कसे असावे त्याची शास्त्रीय तथ्य हे सर्व अतिशय विस्ताराने उलगडुन सांगितले आहे.

काव्य संग्रहातील ‘भेट अचानक’ ही पहिली कविता वाचून, कवीने प्रेयसीच्या भेटीचा आठव शब्दातून शृंगारला आहे त्या प्रीतीचे, रोमांचक भेटीचे चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहिलं.

 ‘अपुरी आपुली भेट’ या कवितेत रोजची प्रेयसीची भेट अधुरी, अपुरी वाटते… तृप्ततेतून, अतृप्तता जाणवते. भेटीचे समाधान पण विरह जाणवणारी ही कविता…

*शब्दांचे पक्षी होतील, ते गाणी गात ते तू समजून घे* असे कवी प्रेयसीला म्हणत आहेत. एक अतीव आर्तता ह्या कवितेतून जाणवली. हे वेगळेपण खूप भावले.

“पुढती पुढती काटे पळता, मन वैर असे का धरते, मनी का भलते सलते येते?”

कवींच्या कवितेतील वरील ओळीत, प्रेयसीच्या वेळेत न येण्याने त्याची जी व्याकुळ अवस्था होत आहे ती  सहज सुंदर शब्दात व्यक्त केली आहे. प्रत्येकाची अशी अवस्था कधीतरी होते, होत असते… तेव्हा कवींच्या  ह्या ओळी नक्कीच आठवतील!

कधीही न पाहिलेले असे काल रात्री पाहिले, असे ‘ध्यास’ ह्या कवितेत कवी सांगतात… तेव्हा ती उत्सुकता वाढत जाते. ओसंडून वाहणारं  यौवन…

‘संयमाला धार होती, तो रोख होता वेगळा’ ही ओळ बरेच काही सांगून जाते!

स्वप्न की सत्य, की भास हे न कळण्यासारखी अवस्था होती. एक  अत्युच्य उत्कटता प्रवाहीत होणारी ही कविता कवीचं हृदय कुठे गुंतले आहे याचे दर्शन घडवते.

प्रीतीची रीत कशी सर्वानाच खुणावते तशी कवीलाही प्रेमाची अनामिक ओढ वाटू लागते. ह्या प्रीतीला शब्दबद्ध करून या  कवितेसाठी ‘अमृतवेल’ हे शीर्षक दिले आहे. निसर्गाच अन प्रेमाच अद्वैत या शिर्षकातून उठून दिसते!

‘व्रत’ ही कविता खूप भावली, जगण्यातील उत्तर कवीने शोधले आहे.

हल्ली नात्यातील प्रेम संपत आले आहे, दुरावा निर्माण होत आहे त्यामुळे लोक म्हणतात कुणी कुणाच नसत. पण इथे कवीने हे म्हणणे खोडून काढत कुणी कुणाचं नसलं तरी मग आपण जगतो कुणासाठी? अस विचारलं आहे. नवीन नात्यासाठी, ते टिकण्यासाठी वागणं, बोलण कस असावं आणि तडजोड कशी करावी… हे तत्वज्ञान युक्त वर्णन अतिशय सुंदर केलं आहे! तुटत आलेली, लयास गेलेली नातीही कमलदलाप्रमाणे फुलतील अशी आशा कवी व्यक्त करतात.

मुलीच लग्न झालं! ती बाई अन आई ही झाली… तिला शहाणपण कस आलं! हे एक बाबा(कवी) ‘शहाणपण’ या कवितेतून हृदयस्पर्शी ओळीतून व्यक्त करतो!

‘सूर्यास्ताची वेळ असे’ ही कविता शब्दातीत वाटली! जीवन जगताना उतार वयात येणारी परिपक्वता ह्या ओळीतून जाणवते. शेवटी  जीवनाच्या सूर्यास्ताच्या वेळेस, काय सोडून द्यावं आणि काय शिल्लक आहे ते मनात ठेवावं हे उलगडून सांगताना कवी म्हणतात,

हिरवेपण जे उरले आहे… तेच जपू या समयाला     

सुर्यास्ताची वेळ असली तरी एक विलक्षण सकारात्मकता या कवितेतून जाणवली!

असतेस घरी तू जेव्हा

फिदा

खूप आवडल्या या कविता!

प्रत्येकाच्या घरी गुलमोहराचं झाड असत पण आपण कुठेतरी दूर शोधत असतो… हे खरं खुर सत्य कवींनी या कवितेत सांगितलं आहे. रोजच्या दैनंदिन आयुष्यातील प्रसंग तुम्हा आम्हा सर्वानाच वाटलेल्या अन दाटलेल्या भावना, इथे कल्पनेपेक्षा सत्य जास्त असल्याचे जाणवले. ते आपल्या वेगळ्या शैलीतून कवितेतून कवी सुहास पंडित यांनी मांडले आहे.

एक वधुपिता स्वतःला समजवतोय… आणि अशा अनेक वधुपित्यानाही, आपल्या ‘वधूपित्यास’ या कवितेतून. हे हृदयस्पर्शी शब्द, अन समजवणीचे सूर… कंठ दाटून आला.

कवी सुहास पंडित यांच्या अनेक कवितांमधून त्यांचा शब्दसंग्रह अतिशय उच्च दर्जाचा असल्याचं जाणवलं. कवितेतील शब्दालंकाराने कवितेला वेगळीच खासियत निर्माण होते. फक्त शब्दच नव्हे तर आशय गर्भता, प्रेम -निसर्ग हे साम्य असले तरीही विषयांची विविधता आणि त्यातून त्यांना दिसणार, जाणवणार त्यांचं अद्वैत हे अनेक कवितेतून प्रकर्षाने दिसून आलं. कवी निसर्गाशी समरस झाल्यामुळे माणसातील प्रेमाचे त्याच्याशी अनेकानेक प्रकारे साधर्म्य, एकरूपता आहे असे त्यांना वाटते. इतकंच नाही तर एक वेगळाच असा उच्च कोटीचा उत्कट समागम आहे असे त्यांना वाटत असावे.

कवींच्या कविता वाचताना त्यांच्या शब्दांमधून स्पर्श, गंध, तालाने खऱ्या अर्थाने पंचेद्रिये जागृत होतात.

कवितांची सुरुवात, मध्य आणि त्याचा शेवट इतका निट्स वाटतो कारण ते सगळं सहज घडून आलेलं शब्दबद्ध केलं आहे. त्यांच्या कवितांना लय आहे, एक ठेका आहे… त्याप्रमाणे वाचत गेलं की ती अर्थ, आशय, विषय यांनी एकरूप झालेली कवीता एक त्रिवेणी संगम वाटते.

   स्वप्नातले विश्व फुलवायचे

   गृहप्रवेश

   मैत्र 

   स्नेहबंध

प्रत्येक कविता आपल्या परीने वेगळी आहे. कोणतीही अढी न ठेवता..स्नेह ठेवण्याच्या ओळी कवी लिहितात… अस कवी म्हणतात तेव्हा त्यांचा स्वभाव एकमेकांना जोडण्याचा आहे असं जाणवतं, त्यांचे विचार आदर्श वाटतात…

कारण स्नेहबंध, नाती, मैत्री  दुरावत असताना आभासी झालेले असताना… कवीला हे वाटण आणि त्यांची अक्षरे कवितेतून झळकण हे विशेष आहे.

त्यांच्या पावसाच्या कविता असोत, प्रेमाच्या असोत, नदीच्या, बळीराजाच्या शेताच्या, श्रावणाच्या असोत प्रत्येकातून चैतन्य फुलते! 

कधी कोपणारा पाऊस, दुष्काळ, कृष्णामाईचा क्रोध, झाडांच्या कत्तलेचा जाब हे चित्र आपल्या कवितेतून श्री पंडित सर उभं करतात.

त्यांना जे हृदयातून वाटत  तस ते लिहितात, उतरवतात… म्हणूनच ते लगेचच रसिकांच्या, वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं ! अस परोपरीने जाणवलं.

श्री. सुमेध कुलकर्णी यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ या कवीता संग्रहातील कवितांना अनुसरून चपखल वाटलं. ‘माणसाचं अन निसर्गाच प्रेम’ हृदयाच प्रतीक म्हणून मानवी हातानी आणि त्यांच्याच कवितेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात असलेल्या गुलमोहराच्या  झाडाच्या फांदीने केलेले बदामाचे चिन्ह आणि एकरूप झालेला निसर्ग हे बरच काही सांगून गेलं.

कविता संग्रहातील कविता अभ्यासण्यासारख्या आहेत. काही कवितांतून तत्वज्ञान मिळत, काही कविता नात्यांची गुंफण शिकवतात, काही कवीता दुष्काळात डोळे पाणावतात, तर काही कवीता निसर्गाचे व्यवस्थापन शिकवतात. काही कवीता समाजाच्या प्रश्नांनी डोळे उघडतात.

हा फक्त कवीता संग्रह नसून प्रेम आणि ऋतू यांना अग्रस्थान मानून, जाणवणारे सत्य, साध्या पण तितक्याच खऱ्या अर्थाने शब्दबद्ध केलेला सर्वांगीण समृद्धीसाठी तळमळ असणारा असा संग्रह आहे. अस मला वाटत. प्रत्येक वाचक- रसिकांनी यातील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. त्यांची कवीता… आपण अनुभवतोय ही जाणीव आल्याशिवाय राहवणार नाही!

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆

सौ. अर्चना मुळे 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆ 

पुस्तक – लामणदिवे

लेखक – श्री सदानंद कदम

प्रकाशक – अक्षर दालन

पृष्ठ संख्या – १४४

मूल्य – रु. २००/-

जेव्हा जेव्हा समाजात अनीती, भ्रष्टाचार फोफावतो तेव्हा तेव्हा समाजाला दिशा देणारा, अंधारात प्रकाश देणारा, छोटीशी ज्योत सतत तेवत ठेवणारा  कुणीतरी जन्माला येतो असं म्हटलं जातं. कोणताही काळ मनश्चक्षू समोर आणला तर फक्त एकच सत्य गोष्ट जाणवते, ती म्हणजे सदासर्वकाळ ‘शिक्षक’, ‘गुरु’ हे लोक लहान मुलांवर खरे संस्कार करतात. ही संस्काराची देण दिव्यासम सतत तेवत ठेवतात. हे तेवणारे दिवे मात्र संख्येने नगण्य आहेत हेच खरे.

शाळांमधे मुलाना तोच अभ्यासक्रम  सर्जनशील, कृतीशील राहून शिकवणारे, व्यावहारीक ज्ञान देणारे कल्पक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवडले नाहीत तरच नवल! संपूर्ण महाराष्ट्रात असे कितीतरी शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची माहिती मात्र आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक पालक अशा शिक्षकांच्या शोधात असतो. पण ते अवलिया शिक्षक हर शाळेत थोडेच असतात. ते असतात लाखात एक! दूरवर! 

अशाच शिक्षकांबद्दल भरभरून सांगणारं, त्यांचं कौतुक करणारं आणि त्यांच्या संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणारं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ‘आयुष्यात अक्षरांची जादू असणार्‍या सर्व गुरुजनांना सादर… ‘ असं म्हणत लेखकाने सुरुवात केली आहे. लेखकही साधा माणूस. त्याचं साधं वागणं, रांगडी बोलणं, मोकळंढाकळं राहणं याचा लवलेश अधूनमधून पुस्तकात डोकावतो. तो ज्या वाचकाला सापडला त्याला पुस्तकातील सर्व शिक्षक पात्रं नीट समजली असं म्हणता येईल. कारण लेखकाचं भाषेवर कितीही प्रभुत्त्व असलं तरी उगीचंच शब्दांच्या अलंकृतपणाचा आव कुठेही आणला नाही. पुस्तकात शिक्षक – विद्यार्थी, शिक्षक – प्रशासकीय अधिकारी, दोन शिक्षक, शिक्षक – गावकरी यांच्यातील संवाद अगदी सहज, साध्या, सोप्या शब्दात मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.

हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील १९ अवलिया शिक्षकांची विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारी उत्तम प्रयोगशाळा. शिक्षकांचं फक्त कौतुक करायचं म्हणून नाही तर या शिक्षकांनी केलेले प्रयोग अनेक शाळांमधे केले जावेत. मुलांचं शिक्षण आनंददायी व्हावं. मुलांचा आनंद कशात आहे हे लेखकाला चांगलं माहीत आहे कारण तोही एक जिल्हा परिषदेचा या पात्रांसारखा आगळावेगळा शिक्षकच. म्हणून हे पुस्तक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण ठरेल यात शंकाच नाही.

प्रत्येक शिक्षकाला लेखकाने जवळून अनुभवलंय. शिक्षकांचं शिकवणं, त्यानी केलेले प्रयोग स्वत: डोळ्यानी बघितलेत. काही अनुभवी शिक्षक सहकार्‍यांना गुरु मानलंय. त्यानुसार वेगळी, मुलुखावेगळी, तिची कथाच वेगळी, अवलिया, ध्येयवेडा, अंतर्बाह्य शिक्षक, चौसष्ठ घरांचा राजा, स्वप्नं पाहणारं नक्षत्र, विवेकवादाचं झाड, जिद्दी, झपाटलेल्या, सेवाव्रती, कर्मयोगी, कणा असलेले गुरुजी, स्वप्नं पेरणारा माणूस, हाडाचा मास्तर, जंगलातले गुरुजी, मूर्तीमंत आचार्य, मार्तंड जे तापहीन अशा शीर्षकांमधून त्या त्या शिक्षकी सेवेमधील त्यांचं तप दिसतं.

मुलांना मराठी, इंग्लिश, गणित, विज्ञान या सर्व विषयांचं आकलन व्हावं, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुलांच्या सर्वोत्तम प्रगतीसाठी झटणार्‍या या शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाला हृदयापासून माझा सलाम!!

महाराष्ट्रातील हे सर्व शिक्षक म्हणजे लेखक सदानंद कदम यांच्या नव्या पुस्तकातील मुलखावेगळे लामणदिवे.

लामणदिवे मधील ही शिक्षक पात्रं कोण आहेत? त्यानी नेमके असे कोणते प्रयोग केले आहेत? ते मुलखावेगळे का ठरले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या शाळेत हे शिक्षक काम करत आहेत? हे पुस्तक वाचल्यावर यातील पात्राना भेटावसं वाचकाना नक्कीच वाटेल. म्हणून शिक्षकांचे छायाचित्रांसह भ्रमणध्वनी क्रमांक पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत.

हे पुस्तक म्हणजे पालक शिक्षकांच्या हातातील विद्यापीठ. अक्षरदालन, कोल्हापूर म्हणजे पीठाधिपती. प्रत्येक वाचक हा पुन:श्च असा विद्यार्थी ज्याला वाटेल की असे शिक्षक मला लहानपणी भेटले असते तर… मी वेगळा घडलो असतो.

पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याबरोबरच समाज विकासाची ज्योत तेवत ठेवण्याची इच्छा बाळगणार्‍या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं! 

असं हे अद्भुत ‘ ला म ण दि वे!! ‘

परिचय : सौ. अर्चना मुळे

समुपदेशक

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆ 

पुस्तक – जोहड

लेखिका – सुरेखा शहा

‘Waterman of India’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजेंद्र सिंह यांच्यावरचं हे चरित्रात्मक पुस्तक.फार वर्षापूर्वी लिहिलेलं. पुस्तकाची सुरुवात होते ती राजस्थानातील अलवर या जिल्ह्यातील एका दूरवरच्या खेड्यातून.हजार बाराशे वस्तीचं हे गाव पाण्याच्या दुर्भिक्षामुळे देशोधडीला लागलेलं असतं.शेतात फारसं पीक नाही,खायला अन्न नाही, सार्‍यांची पोटं खपाटीला गेलेली.म्हातारी व स्त्रिया मागे राहिलेल्या…पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन.. स्रियांना दूरवर पायपीट करायला लागते आहे.अशक्त, उपाशी मुलं, गरीबी,निरक्षरता, उपासमार अशा दुर्दैवाच्या भोवर्‍यात सापडलेली कुटुंब…

१९७५ सालातलं हे वर्णन आहे. सातपुडा पर्वत रांगांमधील सरिस्का जंगलाजवळचा हा जिल्हा. तिथे बेसुमार जंगलतोड सुरू आहे.सगळीकडे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्याचं’ आगमन होतं. तो एक ध्येयवादी तरुण राजेंद्र.समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेनं आलेला. नुसतंच लग्न, मुलं, संसार करत जगायचं आणि मरुन जायचं या आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणूनच तरूण वयात सरकारी नोकरी सोडून, समान ध्येय असलेल्या चार मित्राना घेऊन राजास्थानातील या ‘किशोरी’ गावात तो येतो. काय काम करायचं हे या मित्रांचं ठरलेलं नसतं. हे सर्वजण शहरी, सुशिक्षित तरूण. राजेंद्र तर बी ए एम एस डाॅक्टर. पण तिथली एकूण परिस्थिती पाहून ‘पाणी’ प्रश्नावर काम करायचं निश्चित होतं.आजुबाजूला पाहणी केल्यावर लक्षात येतं की, पूर्वी इथे ‘जोहड’ होते. जोहड म्हणजे पावसाचं पाणी अडवणारे छोटे बांध. ज्यामुळे तळं निर्माण होतं व पुढचा पाऊस येईपर्यंत त्याचं पाणी पुरत असे. मात्र हे जोहड अनेक वर्षांमधे दुर्लक्षित होते. त्यात माती, गाळ साचून निरुपयोगी झाले होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर राजेंद्रनी हे काम हाती घ्यायचं ठरवलं. सुरूवातीला गावातले लोक यासाठी पुढे येईनात. तेव्हा राजेंद्रने स्वत: हातात कुदळ घेऊन काम सुरू केलं.त्यांच्याबरोबर आलेले सुशिक्षित तरुणही हे श्रमाचं काम करायला कचरले. गावकर्‍याना किमत नाही तर आपण का घाम गाळा असे म्हणून ते निघून गेले. राजेंद्र मात्र हरला नाही. आठ दिवस एकटा घाम गाळत राहीला. नियती जणु त्याची कठोर परीक्षा घेत होती.अखेर गावातील एक स्त्री घुंघट घेऊन हातात घमेलं, फावडं घेऊन मदतीला आली. ते पाहून लाज वाटून आणखी काही लोक आले.हळूहळू चित्र पालटलं. पावसाळ्याआधी काम पूर्ण झालं. पावसाळ्यात त्यात पाणी साचून राहिलं.शेती चांगली झाली. अन् गावाचं चित्रच पालटलंच.हळूहळू राजेंद्रना ‘तरुण भारत संघ’ या संस्थेचे इतर कार्यकर्ते येऊन मिळाले. त्यानंतर गावागावात या ‘जोहड’ च्या कामाला गती आली. वीस वर्षांमधे ८६०० जोहड बांधून या मरूभूमीचा कायापालट झाला. हळूहळू शेती, शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, बेकायदा जंगलतोड थांबवणे अशा सर्वच क्षेत्रात काम सुरू झालं.

वर्षामागून वर्षे गेली आणि झालेला विकास पाहून या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलं. घर सोडून माहेरी निघून गेलेली राजेंद्रची पत्नी परत आली. समाजानेही या कार्याची दखल घेतली. २००१ साली राजेंद्रना मॅगसेसे पुरस्कार मिळाला.२००५ साली जमनालाल बजाज पुरस्कार, २०१५ साली Stockholm पुरस्कार – Noble Prize for Water मिळाला. यानंतर त्याना अनेक पुरस्कार मिळाले.पाणी प्रश्नावर काम करणार्‍या विविध सरकारी व बिगर सरकारी समितीवर राजेंद्र निवडले गेले.जंगलातील बेकायदा खाणकाम थांबवलं.खाणमजूराना एकत्र केलं म्हणून चिडून खाणमालकानी, भ्रष्ट अधिकार्‍यानी तीन वेळा त्याना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिन्ही वेळा त्यातून ते वाचले.

उत्तर प्रदेशच्या खेड्यातील एका जमिनदाराचा हा मुलगा.शाळेतील शिक्षकानी त्याच्यावर समाजकार्याचे संस्कार केले. गांधीवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला.गांधीजी म्हणाले,’खेड्याकडे चला’ म्हणून ते राजस्थानात खेड्यात गेले. जयप्रकाश नारायण यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.२५ – ३० च्या कोवळ्या तरुण वयात घरदार आणि पत्नीला सोडून घरातलं फर्निचर विकून दूर खेड्यात जावून काम करणारा, दृढ निश्चय, प्रखर ध्येयनिष्ठा असणारा हा अवलिया…

त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “जांभळमाया…” – श्री सुभाष कवडे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार☆

सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जांभळमाया…” – श्री सुभाष कवडे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

नाव : जांभळमाया

लेखक : श्री सुभाष कवडे

माझा अभिप्राय मी देणारच आहे पण त्या आधी लेखकाने त्यांच्या मनोगतात जे सांगितलंय ते त्यांच्याच शब्दात : .. ” प्रत्येकाला आपलं बालपण आणि शालेय जीवन खूपच महत्वाचं वाटतं असतं. आपली जडण घडण खऱ्या अर्थाने याच काळात होत असते. आपली जन्मभूमी सभोवतालचे वातावरण, निसर्ग, समाज व्यवस्था, या साऱ्यांचा  परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो. यातूनच या काळात असे काही प्रसंग, घटना घडतात की ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. बालपणीच्या काळातला सभोवातीचा निसर्ग, शिक्षणासाठी केलेली धडपड, या धडपडीतून मिळालेले बळ या साऱ्यांचा आपल्या मनावर विलक्षण प्रभाव पडतो. शालेय जीवनातल्या संघर्षमय घटना आपल्या आयुष्यात उर्जादायी ठरत असतात.”

त्यांचे बालपणीच्या जगाचे र्हृद्य दर्शन त्यांनी या पुस्तकात आपल्याला घडवले आहे. यात लेखांचे दोन भाग केले आहेत.  पहिल्या भागात ते त्यांच्या – माझा माणदेश – जीवनाचा पूर्वार्ध मांडतात. यात एकूण ३१ गोष्टीरूपी लेख आहेत. भाषा सोपी व ओघवती आहे. वाचक जणू काही आपणच ती वास्तवता जगतोय असा रंगून जातो. ” भाकरीचा प्रवास “, ” ” करंजछाया “, ” आयुष्यातले संगीत “, ” माझा अक्षरांचा प्रवास ” हे लेख तर खूपच हृदयस्पर्शी आहेत. खरं तर हे लेख असे वेगळे करताच येणार नाहीत. 

पुस्तकातील दुसरा भाग ललित लेखांचा आहे. यातील १५ ही लेख म्हणजे एकेक हिराच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती या लेखांमधून दिसून येते.

” ते एक मिनिट “, ” ओले मूळ भेदी, पाषाणाचे अंग “, हे लेख मनात घर करून राहतात.

” वाचन, ग्रंथ, माणूस आणि निसर्ग ” या सर्वांचे एकमेकाशी असलेले जवळीकतेचे नाते किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे ते, तो लेख वाचल्यावरच समजेल. या लेखाच्या शेवटी ते म्हणतात – ” पुस्तकं घरात वाचता येतात. ग्रंथालयात वाचता येतात. मात्र माणसं व निसर्ग वाचण्यासाठी भटकाव लागतं. मग कधी झळा सोसाव्या लागतात तर कधी छानसा शिडकावा अंगावर येतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जसे हार – प्रहार सोसावे लागतात तसेच पुस्तकं, माणसं आणि निसर्ग वाचण्यासाठी आपणाला या वाचनाचा लळा लागावा लागतो ” तसेच ” रुमाल” हा लेख खरोखरीच वाचनीय आहे. रुमाल हा शब्द आपण किती सहजतेने वापरतो. हा उर्दू शब्द आहे. पण आपल्या जीवनात ती किती चपखल बसतो हे या लेखात समजते. 

एकंदरीत हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलंच पाहिजे.

या पुस्तकाला डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दिलेली प्रस्तावनाही खूप सुंदर वाचनिय आहे. 

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : चंद्रनागरीचा शब्द (काव्यसंग्रह)

कवी : प्रा. अशोक दास

प्रकाशक : तेजश्री प्रकाशन

प्रथमावृत्ती: ११|१२|२०२३

मूल्य : रु. १५०

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द प्रा. अशोक दास यांच्या ‘ चंद्रनागरीचा शब्द ‘ या काव्यसंग्रहाची सुरूवातच ‘ वारीस जाऊ चला ‘ या भक्ती काव्याने होते. इथून पुढे शब्दांच्या सहवासात वाटचाल करताना या मार्गावरूनच आपल्याला जायचे आहे असेच जणू काही कवीला सुचवायचे आहे. कवीच्या घरातील धार्मिक वातावरण व त्यातून झालेली सांस्कृतिक जडणघडण यांच्या प्रभावामुळे कवीच्या अनेक रचना या सात्त्विकतेने ओथंबलेल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते. ‘संतांची अमृतवाणी’ आपले जीवन घडवण्यासाठी वाट दाखवत असते याची जाणीव कवीला आहे. तोच वारसा पुढे चालू रहावा म्हणून कवीही ज्ञानदेव माऊलींप्रमाणे खळजनांचे मन सुंदर व्हावे आणि पांडुरंगाने सर्वांना सुखी करावे एवढेच ‘ मागणे ‘ मागत आहे. वारक-यांच्या ‘दिंडी’ तून अभंग गात गात जाताना माय मराठी तर धन्य होतेच आहे पण वातावरणच असे भक्तीमय होऊन जाते की ‘ देव सर्वांच्याच मनात ‘ वास करू लागतो. अशा भक्तीप्रवाहात डुंबत असताना सुखदुःखे, अहंकार, काळाचे भान सारे काही विसरून जायला होते आणि नकळत मन ‘ अध्यात्मिक ‘ बनून जाते. विठ्ठलाचे ‘ दर्शन ‘ झाल्यावर नेत्र सुखावतात आणि जन्मोजन्मी हेच मुख दिसत राहो एवढी एकच आस मनाला लागून राहते. पण काही कारणाने वारी घडलीच नाही तर ? तरी काही हरकत नाही. कारण आतून भक्ती करणा-याचा देव पाठीराखा असतो.. चराचरी त्याचे दर्शन होते. आपली दृष्टी विशाल असेल तर ‘ सर्वांठायी पांडुरंग ‘ भेटतो. अशी दृष्टी लाभली की पांडुरंगाच्या ठायी दिसू लागतात  ‘रुपे श्रीरामाची’. त्याच्या विविध गुणांचे दर्शन होते. नकळतपणे सितापती ‘ रखुमापती ‘ बनतो आणि भक्तांच्या अंतःकरणात वास करतो. अशा भक्तांना सुखी करण्यासाठी ‘विठ्ठल आमुचा कैवारी’ आहे याची खात्री पटलेली असते. संतांच्या ‘ भक्तीचा मळा ‘ तर चंद्रभागेकाठी कायम फुललेला असतो. याच ‘ संतांचे स्मरण करावे ‘ आणि त्यांनी शिकवलेल्या धर्माचे पालन करावे. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून अवघे ज्ञान साठवावे

अशी अपेक्षा व्यक्त करणा-या अनेक कविता आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतात. कवीचा पिंड त्यातून दिसून येतो. डाॅ. वासमकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कवीचे व्यक्तीमत्व त्याच्या कवितेतून प्रतिबिंबित होत आहे यात शंकाच नाही.

या संग्रहातील भक्तीमय काव्य रचना जशा लक्ष वेधून घेतात तशाच निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दास सरही त्याला अपवाद नाहीत. पावसाच्या थेंबामुळेच बीज अंकुरत आहे आणि हिरवाई भराला येणार आहे. ‘समृद्धीचा सागर ‘ पावसाच्याच हाती आहे. अशा पावसाची फार वाट पाहणे शक्य नाही. जीवघेणी प्रतिक्षा सहन होत नसल्यामुळेच कवी बरसण्यासाठी ‘पावसास आवाहन’ करीत आहे. नंतर कोसळणा-या या पावसात आपल्याच तो-यात नाचताना कवी फुलांच्या गंधात न्हाऊन निघत आहे. पण नको तेव्हा पडणारा ‘ अवकाळी पाऊस’ शेतात राबणा-याला उद्ध्वस्त करतो तेव्हा मात्र कवीचे मन उद्विग्न होते. मग तो ‘ वरुणास आवाहन ‘ करतो आणि तांडव थांबवण्याची विनंती करतो.

याच पावसातून उगवलेल्या झाडांकडे जेव्हा कवीचे लक्ष जाते तेव्हा कवीच्या हे लक्षात येते की ‘ झाडे ‘ म्हणजे निसर्गातील संतच आहेत. निरपेक्षपणे देत राहणे, स्पर्धा न करता आपला ध्यास जपत राहणे, दुस-याच्या प्रगतीत आनंद मानणे असे सगळे सद्गुण कवीला झाडांच्या ठायी दिसतात. यातून कवीच्या दृष्टीचे वेगळेपण दिसून येते. जगाव कसं हे शिकवणा-या या झाडांतून मग कुठेतरी डवरलेला, बहरलेला पारिजात दिसतो. आभाळाचे दान लाभलेला हा पारिजात जेव्हा मातीस्तव फुलून येतो तेव्हा आपले मनही विरक्तपणे त्या सुगंधी सौंदर्याचा आस्वाद घेते. असा हा पारिजात श्रावणाशिवाय कसा डवरेल ? कवीला तर ‘ श्रावण म्हणजे अवघा उत्सव ‘ वाटतो. रंग गंधाच्या या मासाचे कवीने केलेले चित्रण त्यातील ध्वनीसह डोळ्यासमोर श्रावणमास उभे करते. ऊनपावसाच्या जरतारी सरी लेवून येणारा हा मांगल्याचा मास कवीचा ‘ लाडका श्रावण ‘ होऊन जातो. असा निसर्ग काव्यातून उभा करता करता कवीची शब्द फुलांची बागही फुलून येते आणि सा-या परिसरात शब्द गंध पसरुन राहतो.

असा निसर्ग डोळेभरून जो पाहतो आणि संतांची शिकवण मनात साठवून ठेवतो, त्या कवीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल ? ऋतूच्या रंगांनी निसर्ग बहरावा तसे कवीचे जीवनही सुखदुःखाच्या ‘ ‘ऋतरंगा’नी रंगून गेले आहे. आलेल्या सर्व ऋतूंना अंगावर झेलत कवी ‘ आयुष्य ‘ नावाच्या नव्या ऋतूलाही सामोरा जात आहे. ही ताकद कुठून येते. निसर्गच तर शिकवतो, फक्त शिकून घ्यायला पाहिजे. ‘श्रावण’सरीत न्हाऊन निघणारा प्राजक्त विरक्ती शिकवतो, मनाची निर्मळता शिकवतो. दुस-याच्या जीवनात सुगंध पेरायला शिकवतो. आपल्या दुःखाचा बाजार न मांडता दुःख खांद्यावर घेऊन चालण्याचा आणि इतरांना आधार देऊन त्यांच्यासाठी सावली बनण्याचा ‘ धडा ‘ आत्मसात ‘ केल्याशिवाय मनाची एवढी तयारी होऊ शकत नाही. ‘ कालचक्रा ‘ च्या फे-यामध्य गेलेल्याचा, सरलेल्याचा शोक न करता निसर्ग नियम समजून घेऊन कालक्रमण करत राहणे यातच खरा पुरुषार्थ आहे. फुलांच उमलणं आणि कोमेजणं समजून घेऊन त्यांच्याप्रमाणं आपल जीवन सार्थकी लावावं. सुख दुःखाच्या लहरी येतील आणि जातील, आपणच आपल्या आयुष्याच गणित सोडवायचं असतं.

भक्तीच्या मार्गाने आणि निसर्गाच्या सहवासात जीवनाचा अर्थ शोधत असताना कवीचे भवताली घडणा-या घटनांकडेही लक्ष आहे. सत्ता, संपत्ती, स्वार्थ यांत गुरफटलेल्या समाजात संयम आणि सत्य यांना मात्र फारसे स्थान नाही. एकीकडे युगपुरुषांचा

जयजयकार करत दुसरीकडे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारे नेते पाहिले की कवीचे मन विषण्ण होऊन जाते. गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतक-याला मदत करण्याचे नाटक करतानाही एकमेकांशी स्पर्धा करणारे पुढारी केवळ खुर्चीसाठी पळापळ करत असतात हे जनतेने आता ओळखले आहे. मतांचा जोगवा मागायला झुंडीने येणारे पुढारी हे लोकांचे तारणहार होऊच शकत नाहीत. सत्ता ही उपभोगासाठी नसते तर ते सेवेचे फक्त साधन असते हे यांना कधी समजणार ? तरीही कवी आशा सोडत नाही. कृतीशून्य सत्तांधाना फेकून देऊन नवी नीती घडवणारे नवे नेते, नवे राष्ट्रपुरुष जन्माला येतील अशी कवीला खात्री आहे. समाजातील आपपरभाव नष्ट करुया आणि एकमेकांचे मैत्र बनून राहुया हे कवीचे स्वप्न आहे. सर्वांची ताकद एकवटली तर मानवतेचे मंदिर उभारणे अशक्य नाही. या संग्रहातील गारपीट, झुंडी, सारे सारे आपुले, मानवतेची मंदिरे, ठेकेदार, नवे नेते नवी नीती या कवितांतून कविच्या सामाजिक जाणीवा स्पष्ट होतात.

या संग्रहात ‘ मैत्री ‘ चा चंद्रमा आहे. ‘ गुरुजनांच्या’ आठवणी आहेत. ‘ संस्कारशील घरा ‘ चे चित्र आहे. अनंत काळ सर्वांचे हित होत राहो अशी प्रार्थना आहे. प्रत्येकाचे मन आभाळाचे झाले तर विश्व सुखी व्हायला वेळ लागणार नाही हा आशावाद आहे. शहिदांचे मनोगत आहे अन् दीपाचेही मनोगत आहे. कवी बादासाहेबांच्या कार्याचा गौरवही करतो आणि आईच्या आठवणी मनात बाळगत तिच्या नसण्याच्या दुःखाने हळवाही होत आहे. तो कधी जगाच्या पसा-यापासून दूर जाऊन आत्ममग्न होतो तर कधी बालकांच्या समवेत गीतांमध्ये रमून जातो. हे सगळे कशामुळे शक्य होते ? केवळ शब्दांनी इमानाने साथ दिली म्हणून. एकप्रकारे ‘ शब्दांतूनच आयुष्य कहाणी ‘ सांगण्याची किमया कवीला साधली आहे. कवी खुल्या दिलाने मान्य करतो

 “शब्दांनीच जगण्याचे बळ दिले

 शब्दांनीच रस्ता ही दाखविला

 शब्दांनीच, आतल्या आत 

 रडताना

 आपसूक डोळे पुसण्याची क्रिया

 केली “

कवितासंग्रहातील अनेक कविता मुक्तछंदातील असल्या तरीही काही कवितांमधून उत्तम लय साधली आहे. संतांची अमृतवाणी, पारिजात मी, पाऊस, मैत्री, शोध या कवितांचा त्यादृष्टीने उल्लेख करावा लागेल. काही काव्यपंक्तीही उल्लेखनीय वाटतात. उदाहरणार्थ —- समृद्धीचा सागर पावसाच्या हाती, आयुष्य नावाचा ऋतुरंग, सत्ता सेवेचे केवळ साधन असते, इत्यादी. काही शब्द कदाचित सदोष छपाईमुळे अशुद्ध स्वरुपात छापलेले दिसतात. परंतू निरभ्र मुखपृष्ठावरील पूर्णचंद्र आणि अंतरंगातील शब्दांचे चांदणे मनाला शीतल करते यात शंकाच नाही. पूर्णचंद्राच्या प्रकाशात शब्दाचे हे चांदणे जास्त जास्त पसरत राहो एवढीच सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print