मराठी साहित्य – विविधा ☆ भातुकलीचा खेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ भातुकलीचा खेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
दिवाळी झाली, आता गावातली गर्दी थोडी कमी झाली असेल म्हणून दिवाळीनंतर तुळशी बागेची फेरी मारायचे ठरवले. निमित्त होते नातीला भातुकलीचा खेळ आणून द्यायचे! तुळशीबागेसारखी पितळेची छोटी छोटी खेळण्यातली भांडी जगात कुठेच मिळत नसतील बहुतेक!
अगदी घंगाळ, हंडा, ताटाळे, कळशी, साधा कुकर आणि काय काय! तो खेळ बघितला की आपल्याला सुद्धा मनाने मोहरून जायला होते. मन आपल्या बालपणात शिरते!
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी असा पितळेचा खेळ तुळशी बागेत पाहिला, तेव्हा आवडला.. पण तो महाग होता. तेवढे पैसे नव्हते खिशात! त्यापेक्षा घरासाठी खरी खरी भांडी खरेदी करण्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे माझ्या मुलीला तो खेळ मी घेऊ शकले नाही हे खंत होतीच मनात! पुढे सावंतवाडीची लाकडी रंगीत खेळणी तिला खेळायला आणली आणि त्यात ती खुश होऊन गेली. अधून मधून प्लास्टिकचा खेळही आणला जात असे, पण त्यात काही फारशी मजा नव्हती. फक्त लाल, हिरवे, पिवळे रंग बघायला मिळत! आधुनिक जगाची सुरुवात जेव्हा प्लास्टिकने झाली, तेव्हा खरंतर संसाराचा सगळा घरंदाज पणा जायला लागला होता! काळाचा महिमा म्हणून आपण काळाबरोबर तडजोड करत गेलो!
मुलगी म्हटली की लहानपणापासूनच बाहुली आणि चुलबोळक्याची संगत असतेच तिला! आई जे काही आपल्याबरोबर वागते, करते, ते ते सगळं त्या खेळातल्या भावली बरोबर ती करत असते, नव्हे, अनुभवत असते आणि तो भातुकलीचा संसार सांभाळत असते.
तिच्या मैत्रिणी या तिच्या आईच्या मैत्रिणींसारख्या असत. त्यावरून आठवले, माझी मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणी त्यांची नावे आपापल्या आईची घेत असत आणि भातुकलीच्या खेळात त्याप्रमाणेच त्या बोलत, वागत!तो चूल बोळक्याचा संसार त्या आनंदाने सांभाळत. त्यात चुरमुऱ्याचा भात, शेंगदाणे आणि गुळाचे लाडू असतच! असा हा संसार मांडता मांडता मुलगी मोठी होते आणि खरंच संसारात पडते!
जीवनाच्या चक्राप्रमाणेच आधी मुलगी, मग गृहिणी, आई, आजी अशा भूमिका निभावत स्त्रीचे जीवन चक्र चालू असते!
तरी स्त्रीतील बदल जसे होतात तसेच निसर्गाचे बदल ही आपण समजून घेतले पाहिजेत. धरित्री किंवा सृष्टी ही आपली सृजनशील माता आहे. तिच्या पोटी येणारे जीवनाचे अंकुरांचे, हवा आणि पाणी यांनी पोषण केले जाते. रोप वाढते, झाड बनते आणि पुन्हा त्याला फुले, फळे येऊन त्यांच्या बिजातून नवीन रोप जन्माला येते. निसर्गाचे हे चक्र अव्याहत चालू असते.
‘आधी बीज एकले, एका बिजा पोटी, फळे कोटी कोटी, पोटी जन्म घेती, सुमने, फळे!’ या गीताप्रमाणे निसर्ग वाढ करीत असतो!
सृष्टीने मांडलेल्या या जीवन संसारात पंचमहाभूतांची गरज ही अगदी नि:संशय आहे. माणसाने निसर्गाचे खच्चीकरण करायला सुरुवात केली, त्यामुळे त्याचे परिणाम आता दृष्टीस दिसू लागले!
परमेश्वराने मांडलेला हा सृष्टीचा खेळ एखाद्या सुंदर, नेटक्या भातुकली सारखाच आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्यासह निसर्ग, प्राणी त्याची लेकरे आहेत. माणसाने निसर्गापेक्षा वरचढपणा दाखवायचा प्रयत्न केला की निसर्ग आपली वडीलकीची अस्त्रे हातात घेतो हे आपल्याला कोरोनामुळे बघायला मिळाले..
अशावेळी निसर्ग दाखवून देतो की माणसाचा हा भौतिक हव्यास सुखदायी वाटत असला तरी तो अंतिमतः दुःखाकडे नेणारा आहे, ही जाणीव मनुष्य विसरला आहे. ती करून देण्याकरता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निसर्ग प्रकट होत असतो… जसे मोठी वादळे, भूकंप, किंवा कोरोना…
कोरोनाच्या काळात काही गोष्टी मात्र चांगल्या घडल्या. त्या म्हणजे माणसाच्या खऱ्या गरजा खूप कमी असतात याची जाणीव झाली. दुसरे म्हणजे नातेसंबंध, परिचित आणि सभोवतालचे लोक या सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती वाढली. कुटुंबामध्ये एकत्र राहिल्यामुळे प्रेमाचा जबाबदारीचा बाॅंड अधिकच वाढला. सामाजिक जाणीव झाल्यामुळे वेगवेगळ्या संस्थांद्वारे सर्वांना मदत पोहोचवण्याकडे माणसाचा कल वाढला. स्वार्थीपणाने फक्त स्वतःचा संसार करण्यापेक्षा या भातुकलीचा विस्तार अधिक वाढला. माणसाला या गोष्टीची जाणीव आपोआपच झाली की सभोवतालचे जग हा आपलाच एक भाग आहे. कधीतरी हे नश्वर जग सोडून आपल्यालाही जायचे आहे. अचानकपणे संसारातून काहींची ‘एक्झिट’ होऊ शकते. भातुकली सारखा हा संसार करता करता तो कधी बोलावेल याची शाश्वती नाही, तेव्हा मात्र हा खेळ तसाच टाकून पटकन जाता आले पाहिजे, अशी मनाची तयारी करायची. मग मागे राहिलेली ही चूल बोळकी कोण वापरेल की टाकेल याची चिंता नाही करायची!
घरी येऊन नातीला भातुकलीचा खेळ मांडून देताना माझे मन पूर्णपणे संसाराची भातुकली फिरून आले. आणि सगळ्या जाणिवांसह मी पुन्हा उत्साहाने तिची भातुकली मांडून दिली…!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈