मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 4 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ गुंफण नात्यांची – भाग 4 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षा मागून दोन-तीन वर्ष ही सरली. हिचं आपलं ‘एकला चलो रे’ सुरुच होतं. एकटी रहात असली तरी आनंदात होती. अडल्यानडल्या ना मदत करीत होती. बिनधास्त राहत होती. पण कुणाच्यात अडकत नव्हती. कुणावर जीव लावत नव्हती. दर शनिवार रविवार येऊन आमची काळजी घेत होती. मी माझी काळजी यांना बोलून दाखवत होते. हे मनातल्या मनात कुढत होते. अन तशातच पुन्हा एकदा हिनं तो स्फोट घडवला. म्हणजे स्फोटासारखी बातमी दिली आणि त्यांना हृदय विकाराचा जोराचा झटका आला. काही केल्या त्यांना ती बातमी सहन झाली नाही आणि मला एकटीला टाकून माझी जबाबदारी हिच्यावर टाकून गेले.
..शनिवारची ती रात्र मला अजून आठवते. जेवण करून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तिच्या लग्नाचा, जोडीदाराचा विषय आम्ही आता काढत नव्हतो. तिनंच आणलेलं आईस्क्रीम खात आम्ही बोलत होतो अन तिनं ती बातमी सांगितली. “आई बाबा, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्ही दोघं आजी आजोबा होणार आहात. मी आई होणार आहे. अंहं, मी लग्न केलेलं नाही करणार सुद्धा नाही हं. पण मी आधुनिक तंत्रज्ञानानं गर्भधारणा करून घेतली आहे. तो आनंद, आई व्हायचा आनंद मला हवा आहे. तुम्ही आता माझ्याबरोबरच राहायचंऽ!
हीच सांगणं अजून पूर्ण होतंय एवढ्यात त्यांच्या छातीत जोरात कळ आली आणि घामाघूम झाले. ताबडतोब डॉक्टरांना बोलावले. अँब्युलन्स आली, अॅडमिट केलं.. पण रविवारची सकाळ काही माझ्यासाठी चांगली उगवली नाही. त्यानंतर मात्र मला एकटीला तिथे राहणं शक्य नव्हतं. मनात नव्हतं तरीही इकडे आले आणि या तन्वी बाळासाठी इथे राहिले. याच मुद्द्यावरून आम्हा मायलेकींचा अधून मधून वाद होत राहतो. पण पडती बाजू मलाच घ्यावी लागते. तन्वी कडे बघून गप्प बसते. “चला, आता ट्रीप तर ट्रिप. तिच्या तालावर नाचतोच आहोत. हाही त्यातलाच एक भाग. विचार करता करता कधीतरी डोळा लागला.”
” आजी आज ना मी आमच्या क्लासमधल्या नंदन च्या घरी गेले होते. त्याच्याकडे आपल्या घराच्या अगदी कॉन्ट्रास्ट कंडिशन आहे. म्हणजे त्याच्याकडे तो, त्याचे डॅड आणि ग्रॅन्डपा राहतात.”
” तन्वी कशाला गं कारण नसताना मुलांच्या घरी जायचं?”
” आजी, अगं उगीच गेले नव्हते मी. अगं मला ‘आताची कुटुंबव्यवस्था’ या विषयावर प्रोजेक्ट करायचाय. त्यासाठी कमीत कमी दहा घरांना भेटी द्यायच्या आहेत. ऑलरेडी मी चार मैत्रिणी आणि दोन मित्रांकडे जाऊन आली आहे. नंदन कडे जायचं राहिलं होतं. त्याचे डॅड सुद्धा भेटले. कालच रात्री ऑफिस टूर संपवून जपान वरून ते आले होते. नंदन म्हणतो, डॅड भेटणं म्हणजे त्याला क्वचितच; इतके ते जगभर फिरत असतात. पण आजी, घरी डॅडी असणं छान वाटतं गं. घर कसं भरल्यासारखं वाटतं. आजी, तुला माहित आहे का गं? माझे डॅडी कसे आहेत? कुठे असतात? सांग ना गं आजी.”
आता काय सांगू मी हिला? बाई ग त्यासाठीच तर तुझ्या आई बरोबर वाद चालतो माझा. सारखं सांगत होते मी तिला. कधी ना कधी हा प्रश्न तू विचारणारच..”
“हे बघ तन्वी, कशाला त्या गोष्टीचा विचार करायचा? माॅमला तुझा राग येतो माहित आहे ना तुला? याच विषयावर आमचे खटके उडतात. आपल्याला जे हवं असतं ते उत्तर तुझ्या माॅम कडून मिळत नाही. उगाच आपल्या घरातलं वातावरण मात्र बिघडतं. जाऊ दे. आता परीक्षा जवळ आली ना तुझी. मन लावून अभ्यास कर. ट्रीपला जायचंय ना?”
” हो ग आजी, पण.. तुला माहितीये? त्या समोरच्या नवीन फ्लॅटमध्ये आलेत ना! त्यांच्याकडे आई-बाबा आणि एक भाऊ बहीण असे सगळे एकत्र राहतात. तो मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि त्याची बहीण बी फार्म करते. किती छान ना? त्यांचे आई-बाबा दोघे त्यांच्या जवळ राहतात. मी ओळख करून घेतली आहे सगळ्यांशी. मला ना त्यांच्या घरात जाऊन रहावसं वाटतं.”
क्रमशः….
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर ८४८२९३९०११
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈