मराठी साहित्य – आलेख – प्रतिसाद – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
प्रतिसाद
(यह सत्य है कि ईश्वर ने मानव हृदय को साद-प्रतिसाद के भँवर में उलझा कर रखा है जबकि प्रकृति अपना कार्य करती रहती है। उसे प्रतिसाद से कोई लेना देना नहीं है। इस तथ्य पर प्रकाश डालती यह रचना सुश्री ज्योति हसबनीस जी के संवेदनशील हृदय को दर्शाती है।)
*पाऊस मनातला*….
मनातल्या पावसाची रूपं एक का असतात ? सहस्त्रधारांनी कोसळणारा पाऊस …आणि लक्षावधी रूपांनी त्याचं मनाचा ताबा घेणं , कधी आत आत झिरपत माझ्यातल्या ‘मी’शी मुक्त संवाद साधणं …कधी आठवणींचं बेट गदागदा हलवत हलकेच एखादा हळवा सूर आळवणं …तर कधी चिंब भंवतालाला डोळ्यात साठवतांना घरट्यातली ऊब अनुभवणं … त्याच्या बेताल वागण्यावर माझं चिडणं..त्याच्या लयबद्ध पदन्यासावर माझं ठेका धरणं ..त्याच्या फसव्या रूपाला बळी पडणं …तर लोभस रूपाला डोळे भरून पाहणं …त्याचं भरभरून देतांनाचा कृतकृत्य भाव आणि सारं काही देऊन झाल्यानंतरचं इंद्रधनुषी हास्य …सारं सारं मनात तस्संच जपणं आणि प्रत्येक भेटीच्या वेळी असाच आहेस ना रे तू असं त्याला आसूसून विचारणं …!
शैशव आणि अबोघ वयातल्या पावसाचं भेटणं , त्याच्याशी केलेली दंगामस्ती , त्याने केलेली तनामनाची पार घुसळण साऱ्याच्या गोड आठवणी पहिल्या पावसाच्या मृद्गंधासारख्या असतात , भरून येऊ दे आभाळ की मन भरून आलंच , आठवणींची कुपी उघडलीच , मृद्गंध दरवळलाच !
पाण्याच्या खळाळात सोडलेल्या होड्या , डौलात जाणारी त्यांची स्वारी , बुडणार तर नाही ना असं शंकाकुल मन …बिंधासपणे टू व्हिलरवर मुक्तपणे अंगावर घेतलेला पाऊस …रेनकोटचा जामानिमा करत मुलांची केलेली शाळेतली पाठवणी ..आणि आता परत तितक्याच उत्साहात चिमुरड्या नातींबरोबर खळाळात सोडलेल्या रंगीत होड्या …एक कटाक्ष त्यांच्यांतले उत्सुक सचिंत भाव हेरण्यात गुंतलेला तर दुसरा नितळ निळ्या आकाशाचा वेध घेण्यात गुंतलेला !
खरंय ..जीवनचक्र हे असेच असते सृष्टीचक्र हे असेच असते !!
पाऊस येऊ दे ना दरचवर्षी पण त्याला भेटायला आतुरलेल्या मनाचं हे अस्संच असतं …!
पहिला शिडकावा पावसाचा होऊ दे की आठवणीच्या किर्र रानातले असंख्य काजवे सारं रान उजळीत मुक्तछंद आळवू लागतात ….आणि होते थाटामाटात एका दैदिप्यमान उत्सवाची सुरूवात , गडगडाटात , कडकडाटात आणि लखलखाटात …!
त्या लखलखाटात वसुंधरेचे भंवतालात झिरपलेले तृप्तीचे हुंकार असतात , तिच्या डोळ्यातली हिरवाईच्या डोहाळ्याची चमचमती स्वप्न असतात , अंगाखांद्यावर झुलणारी पाचूची बेटं असतात , तृणपात्यांच्या गळ्यातले पाणीदार मोत्यांचे सर असतात , मनोहर रंगीबेरंगी फुलांचा मोहक कशिदा असतो आणि अशा अपूर्व हिरव्या शालू शेल्याच्या साजातलं तिचं रूप अगदी उत्सवी असतं ,मंत्रमुग्ध करणारं असतं !
*ज्योति हसबनीस*