मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गजरा का माळावा ? ☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ गजरा का माळावा ? ☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.

 स्त्री चे  आरोग्य सांभाळतो गजरा—

गजरा हा “old fashioned” आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?…

गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत.

‘गजरा – सौंदर्य’ या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिलं तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच केली गेली आहे हे लक्षात येतय का ? 

आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या ‘pituitary gland’ च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..

मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण “concentration”, “moto development” करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत ?- फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.

पण कसंय… घर की मुर्गी….

भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेऊ, पण भारतीय पद्धतीप्रमाणे गजरा माळून घेतल्यावर “old fashioned” म्हणवून  घेण्यात लाज का वाटून घ्यावी ? 🌹

संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रक्तातही प्लॅस्टिक…! – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

? इंद्रधनुष्य ?

☆ रक्तातही प्लॅस्टिक…!  – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानच्या एका भागामध्ये लोक लंगडत चालू लागले. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या; मात्र, लोकांच्या आजाराचे कारण सापडले नाही. त्यानंतर संशोधकांनी लोकांच्या आहाराचे पृथक्करण केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. ते लोक ज्या भागात राहात, त्या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा टाकण्यात येत असे. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर भाताच्या शेतात येत असे. ते भाताच्या पिकातून भातात आणि भातातून लोकांच्या पोटात जात असे. ते रक्तात उतरून लोकांचे सांधे दुखू लागत. सांधेदुखीमुळे ते लंगडत. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात पक्षाघाताचे रूग्ण वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरतेय- प्लॅस्टिक.

सर्वसामान्य निसर्गावर प्रेम करणाऱ्या नागरिकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वजण प्लॅस्टिकचा वापर थांबला पाहिजे, असे म्हणतात. प्लॅस्टिक बंदीचे कायदे होतात. कडक अंमलबजावणीकरिता मोहीम राबवतात. तरीही प्लॅस्टिकचा वापर थांबत नाही. थांबवणे सोपेही नाही. १८५५ साली अलेक्झांडर पार्क यांनी सर्वप्रथम प्लॅस्टिक शोधले. त्याचे नाव पार्कसाईन ठेवले. पुढे त्याला सेल्युलाईड नाव मिळाले. प्लॅस्टिक कुजत नसल्याने, निसर्गात तसेच राहते. त्याचे विघटन करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कार्यक्षम पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे निसर्गात तसेच पडलेले राहते. अलेक्झांडर पार्क आज हयात असते, तर त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूराचा त्यांना पश्चाताप झाला असता.   

पार्क यांच्या प्लॅस्टिकच्या शोधानंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक शोधले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे यांनी दुधापासून प्लॅस्टिक बनवले. बेकलंड या संशोधकाने रेझिन्स शोधले. १९५२ साली झिग्लरने पॉलिस्टर बनवले. पॉलिइथिलीन टेरेफइथलेत(PETE)चा वापर सर्रास आणि मोठ्या प्रमाणात होतो. उच्च घनता पॉलिइथिलीन(HDPE)चा वापर दूध, फिनाईल, शांपू, डिटर्जंटच्या पॅकिंगसाठी, पाईप बनवण्यासाठी होतो. पॉलिविनाईल क्लोराईड(PVC)चा वापर गाड्यांचे भाग, पाईप्, फळांसाठी क्रेट, स्टिकर्स इत्यादीसाठी होतो. निम्न घनता पॉलिथिलीन(LDPE)चा वापर दुकानात वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांसाठी होतो. पॉलिप्रोपिलीन(PP)चा वापर फर्निचर, खेळणी, दही इत्यादींसाठी होतो. पॉलिस्टिरीन(PS)चा  उपयोग खेळणी, कॉफीचे कप, मजबूत पॅकेजींगसाठी होतो. याखेरीजही अनेक प्रकार आहेत, ज्यांचा अक्रेलीक, नायलॉन, फायबर ग्लास, बॉटल्स बनवण्यासाठी वापर होतो. त्यातील काहींचा पुनर्वापर करता येतो. मात्र प्लॅस्टिकचा धोका आहे, तो मानवी निष्काळजीपणामुळे. स्वस्त मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर आणि पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता कोठेही टाकून देण्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. गाय, म्हैस आणि इतर जनावरांच्या पोटात जाऊ लागले. ते न पचल्याने जनावरांचे जीवन धोक्यात आले. सहल, सफारीवर जाणारे जंगलातही प्लॅस्टिकचा कचरा फेकू लागले. याचा परिणाम एकूण जीवसृष्टीवर होऊ लागला.

वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुवून पुनर्प्रक्रियेसाठी करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र असे होत नाही. स्वस्त उत्पादन होत असल्याने पुनर्प्रक्रियेपेक्षा नव्या निर्मितीमध्ये उद्योजक व्यस्त असतात. लोकांनीही वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुण्याचे कष्ट नको असतात. त्यामुळे अन्न पदार्थासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, साहित्य तसेच फेकून दिले जाते. जनावरांचे खाद्य पुरेसे उपलब्ध नसल्याने आणि प्लॅस्टिकला अन्नपदार्थांचा वास असल्याने जनावरे ते खातात. ते त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्याचा अंश जनावरांच्या पोटात उतरतो. 

मानव थेट प्लॅस्टिक खात नाही. मात्र प्लॅस्टिकचा वापर अनेक कारणांसाठी विशेषत: अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केला जात असल्याने प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जाऊ शकतो, याचे मानवाला भान राहिलेले नाही. कॉफी, चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. शुद्ध पाणी म्हणून बाटलीतील पाणी वापरले जाते. हे पाणी असते मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यात. बाटल्यांचे क्रेट्स अनेक दुकानांच्या दारात सूर्यप्रकाशात ठेवले जातात. त्यामुळे बाटल्यातील प्लॅस्टिकचा अंश पाण्यात उतरतो. ते पाणी आपण शुद्ध पाणी म्हणून पितो. 

नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांच्या लक्षात असे आले, की जगातील ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत. अन्न पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॉलिस्टिरीन एक तृतियांश लोकांच्या रक्तात आढळले. मायक्रोप्लॅस्टिक रक्तातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. शरीराच्या एका भागात साठू शकते. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. प्लॅस्टिकचे अंश हवेतही पसरतात. हवेतूनही मानवी शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या खोल तळापर्यंत मानवी कर्तृत्त्वाने पोहोचले आहे. आपण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने ते आपल्या अस्तित्त्वावर उठले आहे. रक्तात हे कण आढळण्याचे गांभीर्य आता तरी ओळखायला हवे. प्लॅस्टिकचा वापर थांबायला हवा! 

ले.: डॉ. व्ही.एन. शिंदे 

संग्राहिका :  सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनाचा संयम ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मनाचा संयम ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर  पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते. 

त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, ‘ही साडी केव्हढयाला द्याल ?’

विणकर उत्तरला – ‘अवघे दहा रुपये !’

त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला – ‘माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?’

अगदी शांत भावात विणकर बोलला – ‘फक्त पाच रुपये !’

त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, ‘आता याची किंमत किती ?’

प्रसन्न वदनी विणकर म्हणाला – ‘अडीच रुपये !’

तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला. 

तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला – ‘आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.’

यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला – ‘बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस…’

त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला. 

तो खिशात हात घालत म्हणाला – ‘महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?’

विणकर म्हणाला – ‘अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस… मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?’

आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला

मुलगा म्हणाला, ‘महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा… मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !’    

त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला –  “हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत, कपाशी मोठी होईपर्यंत, तिची काढणी होईपर्यंत, किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सूत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे, कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.’ मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !

त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏’हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.’

पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला 👋आणि म्हणाला, ‘हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं

 करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.’……

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खुळखुळतोय, आपल्या घरीही आपण पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या ‘ग’ ची बाधाही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको…

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे आपणास माहिती पाहिजे… ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वाचनाचे फायदे… ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

बिजू (बिजयानंद) पटनायक (१९१६- १९९७) हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तीन देशांच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले होते. भारत, रशिया आणि इंडोनेशिया.

बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्रीही होते.

बिजू पटनायक हे वैमानिक होते आणि दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियन अडचणीत असताना त्यांनी डकोटा हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बॉम्बफेक केली, ज्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. सर्वोच्च पुरस्कारही त्यांना देण्यात आला आणि त्यांना सोव्हिएत युनियनने मानद नागरिकत्व बहाल केले.

जेव्हा कावळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनायक यांनीच २७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली ते श्रीनगर दिवसातून अनेक दौरे केले आणि सैनिकांना श्रीनगरला नेले.

इंडोनेशिया ही एकेकाळी डचांची म्हणजे हॉलंडची वसाहत होती आणि डच लोकांनी इंडोनेशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. डच सैनिकांनी इंडोनेशिया भोवतीचा संपूर्ण समुद्र आपल्या ताब्यात ठेवला आणि त्यांनी एकाही इंडोनेशियन नागरिकाला बाहेर पडू दिले नाही.

१९४५ मध्ये इंडोनेशियाची डचांपासून मुक्तता झाली आणि पुन्हा जुलै १९४७ मध्ये पी.एम. सुतान जहरीर यांना डचांनी घरात अटक केली. त्यांनी भारताची मदत मागितली. त्यानंतर नेहरूंनी बिजू पटनायक यांना तत्कालीन इंडोनेशियन पंतप्रधान जहरीर यांना भारतात सोडवण्यास सांगितले. २२ जुलै १९४७ रोजी बिजू पटनाईक आणि त्यांच्या पत्नीने जीवाची पर्वा न करता डकोटा विमान घेतले, डचांच्या नियंत्रण क्षेत्रावरून उड्डाण करत ते त्यांच्या मातीत उतरले आणि मोठे शौर्य दाखवत इंडोनेशियन पंतप्रधानांना भारतात आणले. सिंगापूरमार्गे सुरक्षितपणे. या घटनेने त्यांच्यात एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांनी डच सैनिकांवर हल्ला केला आणि इंडोनेशिया पूर्णपणे स्वतंत्र देश झाला.

 नंतर, जेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला नवागताचे नाव देण्यासाठी बोलावले. त्यानंतर बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या मुलीचे नाव मेघावती असे ठेवले. 

इंडोनेशियाने १९५० मध्ये बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या देशाचा मानद नागरिकत्व पुरस्कार ‘भूमिपुत्र’ प्रदान केला होता. 

नंतर त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षी इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्माननीय पुरस्कार ‘बिनतांग जासा उत्मा’ प्रदान करण्यात आला.

बिजू पटनायक यांच्या निधनानंतर इंडोनेशियामध्ये सात दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि रशियामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि सर्व ध्वज खाली करण्यात आले. 

आपल्या देशाच्या इतिहासाच्या पुस्तकांनी कधीही न सांगितलेल्या अशा महान व्यक्तीबद्दल मला कळले तेव्हा मला अभिमान वाटला.

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वारली’चा वाली…सुरेश नावडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘वारली’चा वाली’… सुरेश नावडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

८० च्या दशकातील ही गोष्ट आहे. एका मध्यमवयीन दाढीवाल्याने, आदिवासी वस्तीमध्ये टाकून दिलेल्या धातूंच्या मूर्तींमधून, एक मूर्ती उचलून आपल्या पिशवीत टाकली. तो मूर्ती पिशवीत टाकत असताना एका आदिवासी स्त्रीने त्याला पाहिले व ती गोष्ट तिने आपल्या म्होरक्याला सांगितली. सर्व आदिवासींनी, चोरीची शिक्षा म्हणून त्या माणसाला पकडून बांधून ठेवले. त्यांच्या रिवाजानुसार त्याला रात्री बळी देण्याचे ठरले. रात्री आदिवासींचा नाच व पूजा सुरु झाली. सुदैवाने त्या दिवशी त्यांचा मुखिया हजर नसल्यामुळे बळी देण्याचे, दुसऱ्या दिवसावर ढकलले गेले. दुसरे दिवशी मुखिया आला. त्याला त्या माणसाची भाषा कळत होती. त्या माणसाने मुखियाला, आपण सरकारी माणूस असून आदिवासींमध्ये राहून, काम करतो हे पटवून दिले, तेव्हा कुठे त्याची त्या चोरीच्या शिक्षेतून सुटका झाली.. हा माणूस म्हणजेच, आदिवासींच्या ‘वारली कले’ची संपूर्ण जगाला ओळख करुन देणारा.. चित्रकार, भास्कर कुलकर्णी!!  

कलेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे अनेक कलाकार होऊन गेले. मात्र भास्कर कुलकर्णी या चित्रकाराने आपले आयुष्य आदिवासींच्या सहवासात काढून, त्यांच्या पारंपरिक ‘वारली कले’ला जगमान्यता मिळवून दिली. आजच्या पिढीला त्यांनी या कलेसाठी केलेले योगदान माहीत नाही… ही खरंच, या कलाकाराची शोकांतिका आहे..

भास्कर कुलकर्णी यांचा जन्म मुंबईत, मालाड येथे १४ सप्टेंबर १९३० साली झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी जे जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांचे सोबत चित्रकार बाबुराव सडवेलकर, तय्यब मेहता असे नामवंत कलाकार होते. जे जे नंतर त्यांनी, जे वाॅल्टर थाॅम्सन या जाहिरात संस्थेत, बोधचित्रकार म्हणून नोकरी केली.‌ त्यानंतर काही काळ, ‘ओ अॅण्ड एम’ या जाहिरात संस्थेत काम केले.‌ भास्कर कुलकर्णी यांची संशोधनात्मक वृत्ती, ग्रामीण कलेचा अभ्यास हे गुण हेरुन श्रीमती पुप्पुल जयकर यांनी, त्यांना ‘विव्हर सर्व्हिस सेंटर’ मध्ये कामाला घेतले. श्रीमती जयकर, ह्या लोककलेच्या गाढ्या अभ्यासक तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्नेही होत्या. आदिवासी कलेचा शोध घेऊन त्या कलेला वृद्धिंगत करण्याचे काम त्यांनी भास्कर कुलकर्णी यांचेवर सोपविले..

सहाजिकच ही नोकरी करताना भास्कर यांचा आदिवासींशी जवळून संपर्क आला. त्या भटक्या जमातीमध्ये मुक्तपणे वावरण्याचा योग आला. वारली कलेबरोबरच आदिवासींची रहाणी, जीवनमान यांचा त्यांनी अभ्यास केला. इथेच त्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन झाले..

आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला. पुप्पुल जयकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिणामी कुलकर्णी यांनाही त्रास होऊ लागला. त्यांनी आपला जमलेला भविष्य निर्वाह निधी घेऊन, संस्था सोडली. नोकरी सोडल्यानंतर ते डहाणू जवळील, गंजाड या वारली लोकांच्या पाड्यावर येऊन राहिले. तेथे एक लहानसे घर बांधले. गावात पाण्याची टंचाई होती. कुलकर्णी यांनी पाण्यासाठी विहीर खोदण्यास सुरुवात केली.. विहीर जसजशी खोल जाऊ लागली, तसे त्यांच्या फंडाचे पैसे संपू लागले. शेवटी विहीरीला पाणी काही लागलेच नाही. कुलकर्णी आता कफल्लक झाले. ते पूर्णपणे आदिवासी झाले. अविवाहित व फकिरी जीवन असल्याने त्यांच्या गरजाही फारशा नव्हत्या.. वारली लोकांकडून बांबू-कामठ्यांच्या आकर्षक वस्तू, चित्रे काढून घेणे व त्यांची मुंबईला विक्री करुन त्यांना पैसे मिळवून देणे, यातच त्यांचे दिवस जाऊ लागले. त्यांपैकी जिव्या सोम्या मशे याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मात्र त्या कार्यक्रमाचे, सरकारने साधे निमंत्रणही कुलकर्णींना दिले नाही..

हळूहळू या कलेचे व्यापारीकरण होऊ लागले. गावातील पुढाऱ्यांकडून कुलकर्णींना त्रास होऊ लागला. ज्याच्या जागेवर कुलकर्णी यांनी घर बांधले होते त्याला फितवून, त्यांना ते घर सोडायला लावले. ज्या लोकांसाठी कुलकर्णींनी आपले सर्वस्व पणाला लावले होते त्यांनीच, त्यांना निराधार व पोरके केले. शेवटी कुलकर्णी यांनी  ते गांव सोडले.. तरीदेखील त्यांच्या मनात वारली कलेविषयीचा आदर, हा तिळमात्रही कमी झालेला नव्हता..

मग कुलकर्णी सावंतवाडीला गेले. तिथे लाकडी खेळण्यांना वेगळे स्वरुप देण्याचे त्यांनी काम केले. नंतर ते गोव्याला गेले. एकटेपणा व वैफल्यग्रस्त जीवनामुळे त्यांना, दारुचे व्यसन लागले. काही काळानंतर ते तामीळनाडूमध्ये गेले. तेथील कुंभार वस्तीच्या खेड्यात राहून, ‘इंडिया फेस्टिव्हल’ या लंडनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासाठी कारागीरांना प्रशिक्षण दिले. 

त्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती. मात्र जीवनाच्या उत्तरार्धात समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेमुळे ते खचले होते. मद्यपान वाढत होते, प्रकृती ढासळत होती.. आपला मृत्यू बिहारमधील दरभंगा, येथेच व्हावा अशी त्यांची इच्छा होती. २४ एप्रिल १९८३ रोजी, वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी, दरभंगा येथील एका रुग्णालयात या भास्कराचा ‘अस्त’ झाला… 

भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली…

हा लेख वाचल्यानंतर जेव्हा कधी आपणास एखादं वारली चित्र दिसेल, त्याक्षणी चित्रकार भास्कर कुलकर्णी यांची नक्कीच आठवण होईल…

(श्री. नावडकर यांच्या पूर्व-परवानगीने प्रस्तुत)

© सुरेश नावडकर

१३-५-२२

मोबाईल ९७३००३४२८४  

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुणेरी ताट… ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ पुणेरी ताट… ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी “पुणेकरास” मेनू विषयी त्याचं मत मागितलं … त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर…

“मेनू साधारण असा असावा”

१. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू – त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण. 

२. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक…

३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.

६. “ओल्या नारळाची” कोथिंबीरीची चटणी, काकड़ी- शेंगदाणे कूट आणि दही घातलेली कोशिंबीर.

७. चवी पुरतं पंचामृत.

८. गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

९. मठ्ठा.

“आता काही सूचना…. लक्ष्य पूर्वक वाचा..”

  • आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
  • तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
  • श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये…
  •  आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही… श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही…
  • आळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये…
  • तसेच, खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
  • मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते ५ ते ६ मि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
  • वरणाची डाळ “एक-पात्रीच” हवी, नाहीतर चव बदलते.
  • पापड-कुरडई मरतुकडे नको…. त्याच्यातला “कुरकुरीतपणा” निघुन गेल्यास आमची “कुरकुर” सुरु होईल…
  • गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
  • ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी… तिखट नको… त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये…

 “आता पान वाढावयाच्या सूचना -“

१. पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..

२. पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे…

३. पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग “शून्य अंश” पकडून मीठ वाढावे आणि 

४. त्याच्या “उणे पाच अंशावर” लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे…

५. उणे ९० अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.

६. मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण “भसकन” वाढू नये… वरणाचा ओघळ नको… आणि त्यावर “साजूक तुपाची धार” हवीच… पण त्यासाठी जेवणार्यास वाट पहायला लावू नये… तुपाचा चमचा चांगला खोलगट असावा.. मागून चेपलेला अपेक्षित नाही.

७. मुदाचा आकार प्रमाणशीर असावा… “भसाडा नको…”

८. वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.

९. मसाले-भाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..

१०. आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.

११. उजव्या हाताला वरच्या बाजूला ४५ अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.

१२. आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.

वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास तुमच्या तुम्हीच दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये. आणि उपकार केल्यासारखा वाढप्याचा चेहरा असू नये.  

बस एवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या. 🙏

“काटेकोर” पुणेकर…

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुष्टिपती विनायक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

 ☆ पुष्टिपती विनायक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

(पुष्टिपती विनायक जयंती निमित्त) 

विघ्नहर्ता गजानन हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाखातील पौर्णिमेला पुष्टिपती विनायक म्हणून अवतार घेतला. 

नुकत्याच झालेल्या पुष्टिपती विनायक जयंती निमित्त गणरायाच्या या विशेष अवताराविषयी जाणून घेऊया.

सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे. गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा काही पुराणांमध्ये आढळतात. 

भगवान गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीच्या व्रतोपवासाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. जाणून घेऊ या पुष्टिपती विनायक जन्माची पूर्वपीठिका. 

गणरायाने भक्तांच्या रक्षणार्थ, कल्याणासाठी आणि राक्षसांचा पाडाव करण्यासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. त्यापैकी पुष्टिपती विनायक हा एक अवतार असून, याचा उल्लेख मुद्गल पुराणात आढळून येतो. यातील कथेनुसार, प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने तीनही लोकांत उच्छाद मांडला होता. या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मतीपुढे टिकाव न लागल्याने महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले.

दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर देवऋषि नारदमुनींनी शिवनाथ व पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सूचविले. दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी. तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी, असे व्रत शिव-पार्वतीला सांगितले. नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रुपात साक्षात शिव-पार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिव-पार्वती भयभीत झाले. त्यांनी गणेशाला बालरुपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली. त्यानुसार गणेश बालरुप धारण करून शिव-पार्वती समवेत राहू लागले.

एका बाजूला हे घडत असताना, दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला. यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टिपती विनायक असे झाले. पुष्टिपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे. एक दिवस पुष्टिपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली. तेव्हा पुष्टिपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले. यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठविले. परंतु, दुर्मतीने उलट पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले.

दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्विकार पुष्टिपती विनायकांनी केला. ते दोघेही युद्धाला एकमेकांसमोर उभे ठाकले. या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. दुर्मतीने पुष्टिपती विनायकाच्या दिशेने आपला परशू फेकला. तो परशू त्यांनी दाताने अडविला. या धुमश्चक्रीत पुष्टिपती विनायकाचा दात तुटला. तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला. दुर्मतीच्या वधाने सर्व देवगण भयमुक्त झाले.

कालांतराने द्वापारयुगात श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाला आवाहन केल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टिपती विनायकाचे पूजन केले. त्याठिकाणी एक मंदिर उभारण्यात आले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारव्हा या गावात हे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर स्वमंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनःप्राप्तीसाठी पुष्टिपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते. ते मंदिर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे आहे. तसेच पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. आणि अगस्त ऋषींनी समुद्र प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या ‘वातापी’ या राक्षसाचा नाश केला, अशीही एक उपकथा असल्याचे पुराणात आढळून येते. 

चित्र साभार : https://maharashtratimes.com ›

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त 155260 हा नंबर करा डायल… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ फक्त 155260 हा नंबर करा डायल… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(केवळ वाचकहितार्थ )

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’   हा नंबर करा डायल

काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती  http://cybercrime.gov.in/  या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप  संस्था जुळलेल्या आहेत.

(अग्रेषित : सायबर क्राईम पेट्रोल) 

(केवळ वाचकहितार्थ)   

प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्रियांची-एनर्जी! (Feminine energy) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्रियांची-एनर्जी ! (Feminine energy) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते.

ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे….. आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो?  तो फक्त असतो. त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ “असण्याची ऊर्जा” आहे.

ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह,ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते.  पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज- देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे

याचा अनुभव प्रत्येकाला आहे ,एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या  पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ,

तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली?

तर फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही….किंवा घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा.

दोन दिवस कदाचित बदल चांगला वाटेल, पण नंतर मात्र सगळी कामं करणारे, सेवा देणारे असूनही काहीतरी रिकामं वाटेल, रुक्ष वाटेल….  ती उणिव आहे केवळ स्त्री एनर्जीची.

लग्न झाल्यावर लेक घर सोडून जाते तेव्हा घर रितं रिकामं होतं—ही ऊर्जा जाते,  फक्त घरातली मुलगी नाही, ही ऊर्जा पण तिच्यासोबत जाते…

अगदी घरातलं लहान बाळ एखादी मुलगी असेल तर घरातलं वातावरण पहा आणि तिचं असणं म्हणजे काय ते पण फील करा. ती एनर्जी त्या नवजात मुलीतही आहे…ही एनर्जी निसर्गाची निर्मितीची- क्रिएशनची ऊर्जा आहे,

घरातली सगळी प्रगती, सगळयांचा विकास, सगळयांचं खूप पुढे जाणं, यश प्राप्ती होणं , यासाठी तीच एनर्जी वापरली जाते….

मुलांच्या अभ्यासातल्या यशासाठी हीच घराघरातली सरस्वती आहे—

नव-याच्या आर्थिक यशाचं कारण हीच लक्ष्मी आहे…

घरातली प्रत्येक स्त्री काय देते? काय करते?

तर ती असते ! तिचं असणंच देणं आहे, तिनं आणखी काही करायची गरजच नाही, (तरी ती इतकं करते.)

तिच्या असण्याचीच किंमत खूप आहे जी पैशात मोजता येत नाही

जिथं अनादर आणि अपमान होतो, तिच्या एनर्जीचं शोषण होतं ,तिथं ती नकारात्मक होते, आणि

सगळया घराला त्याचे परिणाम भोगावे लागतात,

म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी म्हणून पूजा करायला सांगितलंय.

पूजा प्रतिकात्मक आहे – पूजा म्हणजे आदर आणि कदर करणे…

आपल्या यशात आपल्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे…!

मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या या एनर्जीची खात्री पटली तर तिच्या मनातला अपराधीभाव आणि न्यूनगंड लगेचच जाईल.

वीजेसारखी ही ऊर्जा दिसत नाही, पण असते. एवढंच काय तर, स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घरपण टिकून असतं.

तिच्या कामांमधून ऊर्जा अभिव्यक्त होते , आणि त्यामुळे इतरांना पुढे जाता येतं…कोणत्याही स्त्रीनं स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही, पैसा कमवतो की नाही, या निकषावर करायची गरज नाही.

अनुकूल परिस्थिती नसेल आणि स्त्रीआयुष्यातल्या ऋतुप्रमाणे कधी थांबावं लागलं तरी स्वतःला आळशी, निरुपयोगी समजू नका,  कारण निसर्गाची प्रचंड ऊर्जा पेलून ती इतरांना सहज देत तुम्ही स्थिर उभ्या आहात ज्यासाठी तुम्ही ताकत लावलेली आहे…

हे घरात नुसतं बसणं नाही, हे घरात ‘असणं’ आहे, जे अमूल्य आहे.

सर्व स्त्री वर्गाला मनापासून धन्यवाद आणि खूप खूप सदिच्छा

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆

बऱ्याच वर्षांपासून बागेत एक आजी भेटतात. प्रत्येक वेळी माझा व्यवसाय बदलत राहतात. कधी मला विचारतात, ‘ काय गं कसा चालू आहे तुझा नकली दागिन्यांचा व्यवसाय?’

कधी विचारतात- आमच्या शेजारचा यश तुझ्याच पाळणाघरात येतो का गं?

त्यांच्या चौकशीनुसार मी आतापर्यंत भाजी, पनीर, कपडे असं बरंच काही विकलेलं आहे.

शिवाय सरकारी नोकरी, बँकेत नोकरी, प्रायव्हेट नोकरी अशा नोकऱ्यादेखील केलेल्या आहेत.

हे आणि असं बरंच काही.

पहिले एक दोन वेळा मी त्यांचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी वेगळं काम मला दिलेलं बघून मनात म्हटलं, कदाचित आजींना स्मृतिभ्रंश वगैरे असेल, आपण कशाला उगीच नकारघंटा लावून त्यांना त्रास द्यायचा.

काही महिन्यांपूर्वी भेटल्या तर मला म्हणाल्या, ‘ बरी आहे का गं तुझी तब्येत?’

मी काय म्हणणार, बरी आहे म्हटलं.

आज पुन्हा खाली भेटल्या.

बाकावर मैत्रिणीबरोबर बसलेल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘ शाळेला सुट्टी लागली का गं तुझ्या?’

मी म्हटलं, ‘ हो लागली.’

माझ्याबरोबर पण माझी मैत्रीण होती, तिने पुढे गेल्यावर विचारलं, ‘ काय गं, कसली शाळा?’

मी- अगं आजी काहीही विचारतात. बहुतेक स्मृतिभ्रंश आहे त्यांना, म्हणून मी पण हो ला हो करते.

तितक्यात मागून आजींचा त्यांच्या मैत्रिणीला बोलताना आवाज आला, ‘ बघ, मी तुला म्हटलं होतं ना, ती थोडी वेडी आहे अगं. प्रत्येकवेळी मी तिला वेगळंच काहीतरी विचारते आणि तीदेखील सगळ्याला हो म्हणते. थोडा परिणामच झालेला आहे तिच्या डोक्यावर. आजपण बघ कशी शाळेला सुट्टी लागली का विचारलं तर हो म्हणाली’

भलत्याच निघाल्या आजीबाई

🤭😂😝

संग्रहिका – सौ. स्वाती घैसास

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares