☆ टाटा सुमो… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
टाटा मोटर्सचे सर्व मोठे पदाधिकारी दररोज दुपारचं जेवण एकत्रच घेत असत, परंतु गेल्या काही दिवसांपासून सुमंत मुळगावकर हे नेमके लंचच्या सुमारास आपली कार घेऊन बाहेर जात आणि लंच संपल्यानंतर लगेच पुन्हा आपल्या कार्यालयात परत येत.
अशी चर्चा होती की टाटा मोटर्सचे काही डीलर्स त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लंचसाठी बोलावून घेतात.
एक दिवशी टाटा मोटर्सच्या काही पदाधिकाऱ्यांनी लंच ब्रेकच्या वेळी मुळगावकर यांच्या कारचा पाठलाग केला. मुळगावकरांनी आपली कार एका महामार्गावरील ढाब्यापाशी उभी केली, त्यातून ते खाली उतरले, ढाबेवाल्याला जेवणाची ऑर्डर दिली. टाटा मोटर्सची उत्पादनं वाहून नेणारे ट्रक ड्रायव्हर्स तिथेच जेवण करीत होते. त्यांच्यासोबत बसून त्यांनी आपलं दुपारचं जेवण घेतलं. टाटा ट्रक्समध्ये काय चांगलं आहे आणि काय बदलायला हवं याबद्दल त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्या चर्चेचं टिपण तयार केलं आणि मग ते तिथून आपल्या कार्यालयात परतले. हे पाहून हे सर्व पदाधिकारी थक्क झाले होते. मुळगावकर कोणत्या कारणासाठी लंचच्या वेळेस बाहेर जातात हे त्यांना कळलं होतं. या माहितीचा उपयोग करून टाटा ट्रक्स मध्ये कोणत्या सुधारणा करायला हव्यात याचा विचार करून ते टाटा ट्रक्सच्या गुणवत्तेत सुधारणा करीत.
कोणत्याही कंपनीच्या उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कंपनीतर्फे टाटा सुमोची भेट मिळणं हा त्याचा आजही सर्वोच्च सन्मान समजला जातो
‘सुमो’ या ब्रँड नेम मधील सुमो हे नांव अनुक्रमे सुमंत आणि मुळगावकर या नावांच्या आद्याक्षरांपासून तयार झालंय.
मुळगावकरांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना सन्मान देणाऱ्या टाटांचंही या निमित्तानं मनःपूर्वक अभिनंदन.
आजपर्यंत सुमो म्हणजे जपानी कुस्तीगीर एवढंच मला माहीत होतं…
लेखक : अनामिक
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रध्वज– लेखक –स्व. वि. दा. सावरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
“ब्रिटिशांचा युनियन जॅक हाच हिंदुस्थानचा ध्वज म्हणून आमच्या भर कॉंग्रेसमधेच मिरविला जाई, जयजयकारिला जाई. ह्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचा भावी ध्वज कसा असावा ह्याविषयी अभिनव भारतात होणाऱ्या चर्चेची जी एक कल्पना मॅडम कामाबाई आणि हेमचंद्र दास ह्यांना आलेली होती, तिचेच स्वरूप निश्चित करून पॅरिसला चित्रकलानिपुण हेमचंद्र दास ह्यांनी तत्काल एक सुंदर ध्वज चित्रवून दिला.
तो घेऊन कामाबाई त्या परिषदेला स्टुटगार्ड (जर्मनी) येथे गेल्या. त्यांची भाषणाची पाळी येताच ब्रिटिशांचे राज्य उलथून पाडून हिंदुस्थान स्वतंत्र करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या वतीने त्यांनी आपले उद्दीपक भाषण करताकरता मध्ये तो ध्वज काढून, आवेशाने पुढे मागे फडकवीत त्या उद्गारल्या, “behold!! This is the flag of independent India.” हा पहा आमचा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज !
त्यासरशी अकस्मात चकित होऊन तेथील सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी उठून त्या ध्वजास मानवंदना
दिली !! स्वतंत्र भारताचा जगातील प्रबळ राष्ट्रांच्या मेळाव्यात प्रकटपणे उभारला गेलेला हा पहिलाच राष्ट्रध्वज होय !!!
– स्व. वि. दा. सावरकर
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातलामुख्य फरक …☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
1) 15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात , तर … 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
🇮🇳
2) 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर… 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.
🇮🇳
3) 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर… 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.
🇮🇳
4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर * ध्वजारोहण * होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.
🇮🇳
आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
🇮🇳
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
( तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.) –इथून पुढे —
एखाद्या गावात जैवविविधता किती आहे, म्हणजे किती झाडे, पशु पक्षी, सजीव या परिसरात आढळतात याची नोंद करण्याचा एक मोठा प्रकल्प शासनानं हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे रमेश मुंगीकर मुद्दाम या गावात येवून लोकांशी संवाद साधताना मी पाहिले.
मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले की ‘ गेल्या ९ वर्षांपासून अशी नोंद ठेवणारे बारीपाडा हे महाराष्ट्रातले एकमेव गाव आहे. ’ म्हणजे इकडे शासकीय नोंदी ठेवायच्या म्हटलं की भल्याभल्यांची कोण धांदल उडते. शिवाय या नोंदी खोट्या असतात हे तर सांगायची गरजच नाही.
या गावानं तब्बल ११०० एकर जंगल राखलं आहे. सकाळी एका घरात मला चहा पिण्यासाठी बोलावलं. घरच्या माणसानं मला आत,अगदी आत स्वयंपाकघरात येण्यास सांगितलं. त्या छोट्या खोलीत मला वाटलं चहा चुलीवर उकळत असेल. तर तिथे गॅस चालू होता. या गावानं ११०० एकर जंगल राखलं म्हणून यांना विशेष योजनेखाली एलपीजी गॅस सिलेंडर मिळतात.
डॉ. हेडगेवार रूग्णालयातील डॉ आनंद फाटक यांनी या गावात काही वर्षांपूर्वी… अनेक वर्षे आरोग्य सेवा दिली व या बदलाचा ते भाग आहेत….ते आत्ता पण या गावात नियमित भेट देऊन तेथील लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय मार्गदर्शन करत असतात.
या गावाच्या या आगळ्यावेगळ्या कहाणीमागचे नायक चैतराम पवार शांतपणे फारसं काहीच न बोलता सर्वत्र फिरून कामं होतं आहेत की नाहीत हे पहात होते. त्यांना काही विचारलं की हसून अतिशय मोजकं बोलून ते पुढे कामाला निघून जायचे.
वनभाज्यांच्या पाककला स्पर्धेसाठी जवळपासच्या भागातून हजार एक नागरिक तिथे जमा झाले होते. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या गावाने ३० रूपये इतके अल्प शुल्क आकारले होते.
चैतराम पवारांच्या मागे रांगेत उभे राहून आम्हीही ही ३० रूपयांची कुपनं घेतली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे शुटिंग करायला आलेले ‘ एबीपी माझा ‘ चे मिलींद भागवत आणि त्यांच्या सगळ्या टिमनेही कुपनं घेतली.
नागलीची भाकरी, तुरीचे वरण, तेर नावाची वनभाजी व त्या भागातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदूळाचा सुवासिक भात असं जेवण सगळ्यांसाठी तिथल्या बायकांनी शिजवलं होतं.
कार्यक्रम आटोपला. स्पर्धा संपली. मांडव काढत असताना जवळच्या आंब्याखाली आम्ही बसून होतो. जवळच तिथले गावकरी स्त्री पुरुष बसून दिवसभराचा सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत होते.
एकूण ४०७ लोकांनी कुपनं घेतली आणि ताटं मात्र ५०० च्या पुढे गेली होती. कुपनं न घेता कोण जेवलं असं मी विचारता ते गावकरी लाजले आणि काही बोलेचनात. मला वाटले गावातीलच काही लोक, कार्यकर्ते असतील. पण मला कळले की गावातील एकही माणूस जेवायच्या ठिकाणी आला नव्हता. ते तर बिचारे आपल्या घरीच जेवले होते. कुणीच काही सांगेना.
मला दिवसभर साथ करणार्या तरूण मुलाला मी जरा बाजूला घेतले. हळू आवाजात विचारले, ‘ काय रे कुणीच काही सांगेना, कोण होते हे फुकटे जेवणारे ?’
त्या पोरानं जे उत्तर दिलं, त्यानं अन्नसुरक्षेच्या भिकेची खरी गरज कुणाला आहे हे अगदी स्पष्टपणे उघड झालं.
तो पोरगा म्हणाला, ‘अहो साहेब, हे जे शासनाचे लोक आले होते ना, वन विभागाचे, पोलिसांचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे, जे लाचखोरी करतात, तसेच महाविद्यालयातले प्राध्यापक ज्यांना सातवा वेतन आयोग मिळतो, ते सगळे फुकट जेवून गेले.’
ज्याला गरीब समजून त्याच्यासाठी कळवळा दाखवला जात आहे तो सामान्य गरीब आदिवासी अतिशय स्वाभिमानी आहे.
तो कधीही भीकमाग्या योजनांची मागणी करत नाही. पण या गरिबांचा कळवळा दाखवून ज्यांना आपली पोटं भरायची आहेत त्यांनीच या योजना आणल्या आहेत हे या गावानं काहीच न बोलता आपल्या कृतीनं दाखवून दिलं….
असं हे बारीपाडा गाव, ता. साक्री जि. धुळे
— समाप्त —
संग्राहिका : हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जे लोक दिवस भरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात त्यांनी ?
बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्री, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.
मागील महिन्यात शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.
एका म्हातार्या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….
मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘ काय देवून राहिले भाऊ त्यात? ’
मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘ १ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ ’ असं सांगितलं.
ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हिला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.
मी म्हणालो, ‘तांदूळ खाता ना तुम्ही?’
तिने मान डोलावली….. ‘ मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला ’….मी.
म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘ त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’
मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?
मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘ साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’
मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.
मग मी त्या तरूणाला विचारले… ‘ गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’
त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्याने माझे लक्ष वेधले. त्याने काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.
तिथे लिहीलं होतं…. ” दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य “.
या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्या खोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.
— म्हणजे तिकडे दिल्लीला ‘ सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे, ’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.
गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थित नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.
अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.
मी विचारले, ‘ याची काय गरज? ’
माझ्या सोबतचा तरुण पोरगा म्हणाला… ‘ कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’
म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात. कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.
क्रमशः…
संग्राहिका : हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नोकरी – मे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्करवाडी येथून मॅनेजर मेंटेनन्स म्हणून निवृत्त त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कांही वर्षे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.
आवड – प्रवास, वाचन, लेखन
प्रसिद्ध झालेले साहित्य –
कॅलिफोर्निया डायरी हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक
नासाची मंगळ मोहीम ही दहा लेखांची लेखमाला दै. केसरी मध्ये प्रसिद्ध
मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकांतून
जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण,
नासाची आर्टिमिस योजना,
लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन
हे लेख प्रसिद्ध
अक्षर विश्व् या दिवाळी अंकांत
माझी मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन आणि
भेदीले शून्य मंडळा ही विज्ञानकथा प्रसिद्ध
रेडिओ मराठी तरंग वर
विक्रम साराभाई स्पेस सेन्टरला भेट आणि
भेदीले शून्य मंडळा या विज्ञान कथेचे वाचन
सावरकर शाळेच्या रविवारच्या व्याख्यान मालेत जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण या विषयावर व्याख्यान
नृसिंहवाडी येथील पुजारी घराण्याची ई. स. 1435 पासून ते 2022 पर्यंतची वंशावळ संकलित करून श्री दत्त देवस्थानकडे सुपूर्द.
इंद्रधनुष्य
☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न ☆ श्री राजीव ग पुजारी☆
औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून औंधला गेलो. औंधच्या डोंगरावर यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. गाडीने थेट देवळापर्यंत जाता येते. गाडी पार्क केल्यावर एक लहान किल्लावजा बांधकाम आहे. त्याच्या आत देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात व जवळजवळ दोन मिटर उंच आहे. मूर्ती खूप देखणी आहे. मंदिर व परिसर अनेक पिढ्यांपासून पंत कुटुंबियांच्या अधिपत्याखाली आहे. त्या कुटुंबातील सध्या हयात असलेल्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सात किलो वजनाचे कळस मंदिरावर चढवले आहेत.
या देवीविषयी अशी हकीकत सांगण्यात येते की, श्रीराम वनवासात असतांना रावणाने सीताहरण केले, त्यामुळे श्रीराम अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागले. त्यावेळी देवी सीतामाईचे रूप घेऊन श्री रामासमोर आली. त्या शोकाकुल अवस्थेतही रामाने देवीस ओळखले व तो तिला ‘ये माई’ म्हणाला, म्हणून देवीचे नाव यमाई पडले.
देवीचे दर्शन घेऊन खाली उतरताना प्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय औंधचे राजे, पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये उभारले. सध्या ते महाराष्ट्र सरकारद्वारा संचलित केले जाते. संग्रहालयामध्ये दुर्मिळ चित्रकृती व शिल्पकृती यांचा उत्कृष्ट संग्रह आहे.
येथील कलाकृती एवढ्या अप्रतिम आहेत की आपण जणू स्वप्नांच्या दुनियेत आहोत असे वाटत राहते. चित्रकलेच्या दालनांमध्ये बहुतेक सर्व सर्व शैलींची चित्रे ठेवली आहेत. उदा. जयपूर शैली, मुघल शैली, कांग्रा, पंजाब, विजापूर, पहाडी, मराठा वगैरे. प्रसिद्ध भारतीय तसेच विदेशी चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. राजा रविवर्मा, एम्.व्ही.धुरंधर,माधव सातवळेकर, कोट्याळकर, रेब्रांट,लिओनार्डो द् विंची,बार्टोना मोरिला,जी.जी.मोरिस वगैरे नामवंत चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. स्वराज्याची शपथ, शिवराज्याभिषेक, दमयंती वनवास, पद्मपाणी बुद्ध, लास्ट सपर,मोनालीसा वगैरे प्रसिद्ध चित्रे येथे आपणास पाहायला मिळतात. किरीतार्जुन युध्दाचा नव्वद चित्रांचा संच बघण्यासारखा आहे.
येथील धातू व संगमरवरी पाषाणातील शिल्पांचा संग्रहही अप्रतिमआहे.वर्षा,ग्रीष्म,वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षातील सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना स्त्री रूपात कल्पून त्यांची नितांत सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला जणू बोलती करते. उदाहरणार्थ,
‘वसंत वाटे अतिगोड साचा,
शृंगार केला विविध फुलांचा,
वेणीत कानात करी कटीला,
गळ्यात दुर्डित उणे न त्याला’
या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंत ललनेचे मूर्तरूप एकमेकांना साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन, एका हातात फुलांची परडी,तर दुसऱ्या हातात कमलपुष्पे. शिवाय मनगटांवर फुलांच्या माळा, दंडांवर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत, गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज घालून सुहास्य वदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. या उलट, ग्रीष्म ऋतू वा ‘ग्रीष्मकन्या’. उन्हाच्या झळांनी व्याकुळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’ आणि त्याला साजेशी काव्य रचना,
‘घे विंझणा वातची उन्ह आला,
ये घाम वेणीभार मुक्त केला,
त्यागी तसे आभरणासी बाला,
हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला’.
हातांत आरतीचे तबक घेऊन, बंधू व पतीस भाळी कुंकूमतिलक लावून दसरा व दिवाळी निमित्ताने ओवाळण्यास सिद्ध झालेली गुर्जर वेषातील युवती म्हणजे आपली ‘शरद कन्या’. काव्य पंक्ती अगदी तिला साजेशा आहेत.
‘मोदे करी सुंदर वेगळा
बंधूसी तैसी युवती पतीला
कुर्वंडीते,कुंकुम लावी भाळी
शरद ऋतूचा दसरा दिवाळी
हेमंत सुंदरीचे वर्णन केले आहे ते असे,
‘हेमंत आला तशी थंडी आली
घेऊन उणीशी निवारलेली
शेकावया शेगडी पेटवीली
बाला सुखावे बहु शोभावीली’
‘शिशिर बाले’चे वर्णन केले आहे ते असे,
‘लोन्हा गव्हाच्या बहु मोददायी
हुर्डा तसा शाळूही शक्तिदायी
काढावया घेऊनिया विळ्यासी
बाळा तशी ये शिशिरी वनासी’
— मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतूकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतूराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत.
औंधच्या राजांच्या प्रोत्साहानामुळे अनेक शिल्पकार येथे तयार झाले. त्यातील प्रमुख म्हणजे पांडोबा पाथरवट. ते व त्यांची मुले राजाराम व महादेव यांनी साकारलेली हस्तीदंतातील शिल्पे निव्वळ अप्रतिम. एखादा माणूस दगडातून इतके नाजूक कोरीवकाम कसे करू शकतो याचे पदोपदी आश्चर्य वाटत राहते. ही शिल्पे दगडातून नव्हे तर लोण्यातून कोरल्यासारखी वाटतात.
हेन्री मूर या जगप्रसिध्द शिल्पकाराने बनवलेले ‘मदर अँड चाईल्ड’ हे शिल्प आपणास येथे बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे येथे पहायला मिळतात. एक घोड्यावर बसलेला व दुसरा उभा. उभ्या पुतळ्यात महाराज म्यानातून तलवार बाहेर काढतांना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील त्वेषपूर्ण भाव निव्वळ अप्रतिम.
संग्रहालयाच्या मध्यभागी एक अवाढव्य बुद्धीबळाचा पट आपले लक्ष वेधून घेतो. पटावर दिसतात ते शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी,परस्पर विरोधी राजे,वजिर,अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि ऊंट. असे म्हणतात की, यावर प्रत्यक्ष बुद्धीबळाचा खेळ खेळला जात असे व प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.
या संग्रहालयातील प्रत्येक दालन बघायला कमीत कमी एक दिवस लागेल. म्हणजे पूर्ण संग्रहालय बघायला १५ दिवस सुद्धा अपूरे पडतील. मी तर ठरवलंय 15 दिवस वेळ काढून निवांत आणखी एकदा हे अप्रतिम संग्रहालय बघायचेच.
ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स ही सर्व स्त्रियांनीशोधलेली साधने आहेत.
मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.
मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.
सर्व विषुववृत्तिय अस्वले डावरी असतात.
विमानात द्यावयाच्या सॅलडमधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन, अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.
फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.
हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.
मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्या हाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
वीज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते.
उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात.
इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.
सिगारेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का?” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
याची कारणे: वयाच्या तिसऱ्या टप्प्यातील मानसिक गोंधळ
जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:
वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?
काही सुचवतात: “डोक्यात ट्यूमर”. मी उत्तर देतो: नाही!
इतर सूचित करतात: “अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे”. मी पुन्हा उत्तर दिले.. ‘ नाही!’
त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.
जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:
– अनियंत्रित मधुमेह
– मूत्रमार्गात संसर्ग;
– निर्जलीकरण
हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही. 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात. निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा.
आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असते तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय 50 व्या वर्षी सुरू होते. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.
परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे. जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं अस वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.
निष्कर्ष:
50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांच्या कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.
तर येथे दोनसतर्कता घ्यायच्या आहेतः
१) द्रव्य पिण्याची सवय लावा. पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे; संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.
महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा !
२) कुटुंबातील सदस्यांना इशारा: पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा.
जर आपल्याला हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणे आहेत.
आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्यासह स्वत: साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे.
— (द्वारा: अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन) अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
साधारणपणे ८२- ८३ च्या सुमारास, भिंद्रानवाले पंजाबात आक्रमक होत असताना देशभरात खळबळ माजली होती. त्यावेळी पुण्यात श्रीमती मंजुश्री खाडिलकर या कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध होत्या. सुप्रसिद्ध गायक श्री त्यागराज यांच्या त्या मातोश्री. पंजाबात जाऊन भिंद्रानवालेला भेटून कीर्तनाच्या माध्यमातून त्याला देशद्रोहापासून परावृत्त करायचे असा एक कार्यक्रम पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीने करायचा ठरवला. त्याकरता मंजुश्रीताईंना विचारण्यात आले. साथीला ज्ञान प्रबोधिनीतीलच काही मुलींना तयार केले होते. मुळात असा विचार करणे, ह्या सर्व स्त्रियांनी तिथे जाणे, हे त्यावेळी अत्यंत धाडसाचे होते, म्हणूनच इतकी चर्चा.
आता पंजाबमध्ये जायचे म्हणजे किमान हिंदीतून कीर्तन करावे लागणार होते, त्यामुळे त्याची आधी तयारी करावी लागली. श्री गुरूवाणीमध्ये संत श्री नामदेव महाराज यांची अनेक भजने समाविष्ट आहेत त्यातील निवडक शब्द प्रॅक्टिससाठी घेऊन कीर्तने पुण्यात बसविली व तयार केली.
सगळ्या जणी पंजाबात गेल्या. भिंद्रानवालेला शोधण्यात व भेटण्यात खूप दिवस लागले.कारण सरकार त्याच्या मागावर असल्याने तो सतत मुक्काम बदलायचा. तरी नेटाने प्रयत्न करून त्याला गाठून निरोप दिला की आम्ही पुण्याहून आलोय. श्री नामदेवांचे शब्दकीर्तन तुमच्या समोर करायचे आहे.
तो पर्यंत पंजाबात जिथे शक्य होते तिथे त्यांनी आपले कीर्तन सादर केले.
अखेर भिंद्रनवालेने कीर्तन सादर करायची परवानगी दिली. कडेकोट बंदोबस्तात हत्यारधाऱ्यांच्या समक्ष हा कार्यक्रम सुरु झाला. आईच्याच शब्दात सांगायचे तर हाडे थिजवणारे वातावरण होते.
श्रीमती मंजुश्री खाडिलकर ह्यांनी कीर्तन सुरु केले व ज्या क्षणी नामदेवांचा अभंग म्हटला, त्याक्षणी त्याने त्याचे उच्चासन सोडले व श्रीमती खाडिलकरांच्या चरणी नतमस्तक झाला. अक्षरशः त्यांचे चरण पकडले त्याने !
त्या याच क्षणाची वाट पहात होत्या. त्यांनी भारतात शांती, एकत्व व सार्वभौमत्व राखण्याचे आणि सलोखा राखण्याचे आवाहन त्याला केले. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता. मान खाली घालून गुडघे टेकून जमिनीवर बसलेल्या त्याने परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असल्याचे हतबलतेने सांगितले.
पण काम फत्ते झाले ! कारण त्याचे देशद्रोहाचे अवसान त्याच्या अंतर्मनातून गळून पडले ते कायमचेच. नंतर चकमकी झाल्या पण त्याचे अंतर्मन साथ देत नसल्याने त्याचा शेवटी पराजयच झाला.
गायन कीर्तन कलेवर असामान्य प्रभुत्व असलेल्या, परप्रांतात जाऊन कलेचा प्रभाव पाडून भिंद्रानवालेचे अवसान घालवणाऱ्या , शूर, धडाडीच्या व देशाबद्दल जाज्वल्य अभिमान असणाऱ्या कीर्तनकार आदरणीय श्रीमती मंजुश्री खाडिलकर व हा कार्यक्रम आखणारा ज्ञानप्रबोधिनीचा स्टाफ व विद्यार्थिनी व इतर सर्व यांना शतश: प्रणाम…
(ज्या कोणी अज्ञात व्यक्तीने मुळात हा लेख लिहिला त्यांचेही आभार. )
(नटराज खाडीलकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)
– अज्ञात
संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काही माणसं जगावेगळी असतात. त्यांना भेटलं की मन एकदम उल्हसित होतं. कामाप्रती असलेला त्यांचा ध्यास थक्क करतो. ठाण्यातल्या ८० वर्षांच्या मालती मेहेंदळे अर्थात मेहेंदळेआजी हेही असंच एक व्यक्तिमत्व.
लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे त्यांचा चेहरा विद्रुप झाला. त्यामुळे सर्वसामान्य मुलीसारखं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलंच नाही. अपघाताच्या खुणांमुळे त्या आत्मविश्वास हरवून बसल्या आणि त्यातच त्यांचं बालपणही हरवलं. त्यांनी आपल्या आयुष्याच्या सीमा आखून घेतल्या. इतरांमध्ये मिसळणं त्या जणू विसरूनच गेल्या. कशीतरी शाळा पार पडली. अर्थात शाळेत असताना त्यांनी धावणे, गोळाफेक, दोरीच्या उड्या अशा ज्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यात पहिला नंबरच मिळवला. कॉलेजजीवनही त्यांना फारसं मानवलं नाही. त्यामुळे शिक्षणाची गाडी तिथेच थांबली.
एकदा भावाने त्यांच्यासाठी कागदी फुलं कशी बनवावीत हे दाखवणारं एक पुस्तक आणि काही कागद आणले. पुस्तक इंग्रजीत होतं आणि त्या भाषेशी त्यांची केवळ तोंडओळखच होती. माळ्यावरच्या एका रिकाम्या खोलीत त्यांनी कागदी फुलं बनवायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्य बहरून गेलं.
कालांतराने त्यांचं लग्न झालं आणि त्या रोह्यावरून मुंबईतल्या पार्ल्यात आल्या. दोन मुली झाल्या आणि काही वर्षांनी पती अचानक वारले. त्या पुन्हा माहेरी आल्या. नंतर त्यांचा पुनर्विवाह होऊन मेहेंदळे बनून त्या ठाण्यात आल्या. चांगले दिवस सुरू झाले. त्यांचे यजमान स्वभावाने खूप चांगले होते. मधल्या काळात त्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्या. ‘जीवनज्योती’ या पतपेढीच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. आजींनी या संस्थेसाठी बरीच वर्षं काम केलं.
मेहेंदळेकाका अचानक गेल्यावर आजी परत फुलं बनवू लागल्या. अचानक कोणीतरी त्यांना सांगितलं की या फुलांचं आपण प्रदर्शन भरवू या. प्रदर्शन भरवण्याइतपत आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे फुलं बनवायला येणाऱ्या मुलींनी त्यांना प्रोत्साहित केलं आणि प्रदर्शन पार पडलं. एवढी सुंदर आणि जिवंत फुलं पाहून ती कागदी आहेत यावर कोणाचा विश्वासच बसेना. प्रदर्शन अत्यंत यशस्वी झालं. आजी मनातून खूप आनंदी झाल्या. जवळ जवळ पन्नास वर्षं जोपासलेल्या छंदाचं सार्थक झालं. मग मात्र आजींनी मागे वळून बघितलं नाही. नंतर एल अॅण्ड टी या कंपनीसाठीही त्यांनी प्रदर्शन भरवलं. तुर्भेच्या टी.आय.एफ.आर. या प्रतिष्ठित संस्थेने आजींच्या फुलांचं प्रदर्शन आयोजित केलं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजींचं खूप कौतुक केलं. मधल्या काळात फुलं बनवायला शिकण्यासाठी मेहेंदळेआजींकडे तरुण मुलींचा ओघ सुरू झाला. त्यांचा क्लास खूप लोकप्रिय झाला.
आजी नंतर अमेरिकेला गेल्या , भारतभर फिरल्या. सगळीकडची फुलं बघितली आणि घरी येऊन त्यांनी ती साकारली. आजी फक्त क्रेप पेपरचीच फुलं बनवतात. वेगवेगळ्या रंगाचे, छटांचे क्रेप पेपर शोधत असतात. क्वचितप्रसंगी त्या रंग वापरतात. कृष्णकमळ आणि बकुळ ही दोन फुलं बनवणं आव्हानात्मक आहे, असं त्या सांगतात. आज आजींना त्यांच्या या छंदामुळे अजिबात वेळ नाही. त्या एकट्या राहत असल्या तरी त्या एकट्या कधीच नसतात. परिस्थिती टोकाची प्रतिकूल असतानाही सुंदर जगावं कसं हे मेहेंदळेआजींकडे बघून सहज कळतं.
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈