पूर्वीच्या लोकांचे काही आडाखे असायचे पावसाबाबत. आणि ते ते बहुतांशी सत्यात उतरायचे.
आम्ही ज्या कंपाऊंडमध्ये राहतो त्याच्या पलीकडे जोशांचे कंपाऊंड, आणि त्या पलीकडे वेलणकरांचं कंपाउंड. वेलणकरांच्या कंपाउंडमध्ये एक भला मोठा चिंचेचा वृक्ष होता. तो कमीतकमी अडीचशे-तीनशे वर्षांचा असावा, असं वनखात्याच्या अधिकाऱ्यांचं गणित होतं. एप्रिलमध्ये त्याच्यावर लाखो फुलं फुलायची. मे महिन्यात ती वाऱ्यावर गरगरत खाली जोश्यांच्या कंपाउंडमध्ये पडायची. आमच्या घराच्या मागच्या पडवीत ती फुलं पडली की चोवीस तासात पाऊस हजर होणार, हे आमच्या आईचं निरीक्षण होतं. तसं तिचं भाकित ती सांगायची. आणि विशेष गोष्ट म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत माझ्या डोळ्यांसमोर ते भाकित कधीच चुकलेलं नाही !!
दोन वर्षांपूर्वी तो चिंचेचा भला मोठा वृक्ष कोसळला! आता पर्जन्यागमनाचं भाकित घरच्या घरी करण्याची सुविधा देणारा तो भविष्यवेत्ताच हरपला!
अशी अनेक विषयांच्या वरची भाकितं जुनी मंडळी करायची आणि ती सहसा चुकत नसत. कारण त्यामागे निसर्गाचं खोल निरीक्षण, अनुभव, तर्कबुद्धी आणि अभ्यास असायचा.
मृगाचे किडे कधी दिसतील, भारद्वाज पक्षाचं दर्शन साधारणपणे कधी होईल, याचं भाकित आठ-आठ दिवस आधी वर्तवलं जायचं. उत्तरायण आणि दक्षिणायनाचे परमोच्चबिंदू (turning points) साधारणपणे कोणत्या दिवशी येतील, हे घरात पंचांग येण्याआधीच सांगितलं जायचं.
☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी ☆
राजस्थान हे तेथील अनेक गोष्टी, विशेषत: तेथील वैभवशाली इतिहास, भव्य राजवाडे, राजे, महाराजे, महाराण्या यांच्या कथा, रंगेल संस्कृती आणि चविष्ट पाककृती यांमुळे प्रसिद्ध आहे.
पण कुणाला माहीत आहे का की, राजस्थानमधील थरच्या वाळवंटाखाली एक रहस्य दडले आहे? ते म्हणजे १६ फूट खाली एक भव्य दिव्य लायब्ररी आहे, जिथे १२ महिने २४ तास थंड वातावरण असते, अगदी उन्हाळ्यात सुध्दा..!
ही लायब्ररी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून गणली जाते, जिच्यात ९ लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत..!
राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यामधल्या पोकरण तालुक्यात असलेल्या भादरिया गावात एका मंदिराखाली ही लायब्ररी बांधलेली आहे, जिच्यात एका वेळी ४००० माणसे (वाचक) बसू शकतात.
त्या ठिकाणी, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, महाकाव्ये, इतिहास, शब्दकोश, नकाशांसंबंधी, अशी अनेक पुस्तके ५६२ काचेच्या कपाटांमध्ये मांडलेली आहेत…
संग्राहिका : सुलू साबणे – जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “संगीत”— जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆
जोतिष्यशास्त्रात ग्रहांच्या स्पंदनाला खूप महत्व आहे. Viabrations ज्याला आपण मराठीत कंप किंवा स्पंदन म्हणू . जेव्हा एका सेकंदात सोळापेक्षा जास्त पण आठ हजारपेक्षा कमी स्पंदने होतात तेव्हा त्यातून नाद निर्माण होतो आणि जेव्हा तो लयबद्ध होतो तेव्हा त्याला आपण संगीत म्हणतो. सामवेद हा सर्वस्वी संगीतासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जोतिष्य हे वेदांग आहे. या दोघांच्या संबंधाचा उपयोग करून आपण जोतिष्यशास्त्रात संगीताचा वापर एक उपाय म्हणून कसा वापरता येईल ते पाहू.
संगीत हे एक असे एकमेवाव्दितीय विज्ञान आहे की ज्याच्या प्रभावापासून कोणीही, अगदी पक्षी, प्राणी, मानव, आदिवासी, जात, धर्म, पंथ दूर नाहीत. संगीताला विज्ञानाचे विज्ञान असे म्हणतात कारण संगीत मग ते कोणत्याही देशाचे, भाषेचे असो त्याच्यामध्ये तुमच्या अंतरात्म्याला थेट स्पर्श करण्याची ताकद आहे. आणि ते समजण्यास कोणत्याही भाषेच्या भाषान्तराची गरज नसते.
संगीताचे विज्ञान “नाद” यावर अवलंबून आहे आणि नाद हा साऱ्या विश्वात व्यापून राहिला आहे. “सा रे ग म प ध नि” हे सात सूर महादेवाच्या नृत्य आविष्कारातून निर्माण झाले असे मानतात. स्वर व त्यांचे ग्रह खालील प्रमाणे-
१) सा –रवी
२) प … चंद्र
३) ध — मंगळ
४) रे —बुध
५) नी — गुरु
६) म –शुक्र
७) ग –शनी
तसेच राग आणि राशी
१) भैरवी कुंभ
२) भूप राग कन्या
३) राग बैरागी मीन रास
४) श्री राग वृषभ
५) राग वसंत सिंह रास
६) राग सारंग धनु
७) राग पंचम धनु
भैरवी रागावर शनीचे प्रभुत्व आहे असे मानतात. राग भैरवी हा एक गूढ, भव्य, दिव्य, धीर, गंभीर असा राग आहे त्यामुळे शनीचे सर्व गुण त्याला लागू पडतात. श्री राग हा हळुवार प्रेम, संध्याकाळची हुरहूर, कोमलता व्यक्त करताना वापरतात म्हणूच हा शुक्राचा राग असे मानतात.
वेगवेगळे राग आणि त्यांची गायन पद्धती इतकी प्रभावशाली आहे की ऐकणाऱ्याचा मनाचा नूर आणि मूड बदलून टाकण्याची क्षमता आहे. ज्या जातकांच्या पत्रिकेत चंद्र शनी, मंगळ राहू युती असते ते थोडयाशा चिथावणीने एकदम सटकून जातात किंवा निराशेच्या गर्तेत लोटले जातात. अश्यांना वीणेच्या एका झंकारानें आपोआप शांत करता येते. उष्णता, प्रकाश, आवाज, चुंबकीय व विद्युत क्षेत्रात सौम्य व उग्र अशी दोन टोके असतात. तसेच राग, लोभ, मद, मोह, मत्सर, शांति या स्थितीमध्ये दोन टोकाची स्थिती घातकच असते. सुवर्णमध्य संगीतानेच साधणे शक्य आहे.
जेव्हा चंद्राबरोबर शनी, मंगळ किंवा राहू असतात तेव्हा जातकात असलेली टोकाची नकारात्मक वृत्ती काही निवडक ट्यूनमुळे काढून टाकता येते. म्हणून तर आपल्या कडे विशिष्ठ मंत्र होम-जप असतात त्याच्या मध्ये संगीत आहेच. मंत्र होम जप या मधील नादानेच यजमानाच्या मनातील नकारात्मक वृत्तीवर परिणाम साधायचा असतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक व उत्तम विचारशक्ती वाढीस लागते. गुरु हा बुद्धीचा तर शुक्र हा भावनेचा कारक मानतात. ज्यांच्या चतुर्थात शुक्र ते संगीत उत्तम जाणतात, तर गुरु असता ते संगीताचे उत्तम ज्ञान असलेले असतात.
एके काळी भारतीयांना या संगीत आणि नाद यावर इतके प्रभुत्व होते की ते दीप राग आळवून दिवे तर मेघमल्हार गाऊन पाऊस पाडू शकत. तानसेन यांनी एकदा आपल्या संगीताने पिसाळलेला हत्ती शांत केला अशा कथा तुम्ही ऐकल्या असतीलच. पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकण्याची ही कला कालांतराने भारतीयांची दैवीशक्ती व अंतर्स्फूर्तीबद्दलची होत गेलेली उदासीनता कारणीभूत आहे. त्यागराज, तानसेन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, दिगंबर विष्णू पलुस्कर यांना त्यांच्या मनाच्या उत्कट भावावस्थेत रागाची रचना सुचली असावी. असो. पण आजही एक छानसे अंगाई गीत म्हणताच बाळ झोपी जाते की नाही.
सप्तमात बिघडलेला शुक्र असणाऱ्यांनी मादक विषयासक्त संगीत फार ऐकू नये. तसे करणे घातक ठरू शकते तसेच चतुर्थात बाधित शनी किंवा व्दितीयात शुक्र मंगळ अशा लोकांनी जरूर भक्तीसंगीत (डिव्होशनल) ऐकावे.
सध्याचे संगीत हे ऐकणाऱ्यांना हिंस्त्र, पाशवी, रागीट, वाईट वृत्ती वाढीस लागण्यास मदत करते. पण संगीत हे एक दैवी शास्त्र आहे. त्याचा आपण योग्य वापर समाज समृद्ध करण्यास केला पाहिजे.
(सदर लेख हा प्रसिद्ध जोतिषी बी. व्ही. रमण यांनी लिहिलेल्या Astrological मॅगझीनच्या (मार्च १९४४) संपादकीय लेखाचा सरळ अनुवाद आहे.)
गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.
स्त्री चे आरोग्य सांभाळतो गजरा—
गजरा हा “old fashioned” आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?…
गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत.
‘गजरा – सौंदर्य’ या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिलं तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच केली गेली आहे हे लक्षात येतय का ?
आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.
स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या ‘pituitary gland’ च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..
मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण “concentration”, “moto development” करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत ?- फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.
पण कसंय… घर की मुर्गी….
भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेऊ, पण भारतीय पद्धतीप्रमाणे गजरा माळून घेतल्यावर “old fashioned” म्हणवून घेण्यात लाज का वाटून घ्यावी ? 🌹
संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रक्तातही प्लॅस्टिक…! – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानच्या एका भागामध्ये लोक लंगडत चालू लागले. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या; मात्र, लोकांच्या आजाराचे कारण सापडले नाही. त्यानंतर संशोधकांनी लोकांच्या आहाराचे पृथक्करण केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. ते लोक ज्या भागात राहात, त्या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा टाकण्यात येत असे. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर भाताच्या शेतात येत असे. ते भाताच्या पिकातून भातात आणि भातातून लोकांच्या पोटात जात असे. ते रक्तात उतरून लोकांचे सांधे दुखू लागत. सांधेदुखीमुळे ते लंगडत. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात पक्षाघाताचे रूग्ण वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरतेय- प्लॅस्टिक.
सर्वसामान्य निसर्गावर प्रेम करणाऱ्या नागरिकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वजण प्लॅस्टिकचा वापर थांबला पाहिजे, असे म्हणतात. प्लॅस्टिक बंदीचे कायदे होतात. कडक अंमलबजावणीकरिता मोहीम राबवतात. तरीही प्लॅस्टिकचा वापर थांबत नाही. थांबवणे सोपेही नाही. १८५५ साली अलेक्झांडर पार्क यांनी सर्वप्रथम प्लॅस्टिक शोधले. त्याचे नाव पार्कसाईन ठेवले. पुढे त्याला सेल्युलाईड नाव मिळाले. प्लॅस्टिक कुजत नसल्याने, निसर्गात तसेच राहते. त्याचे विघटन करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कार्यक्षम पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे निसर्गात तसेच पडलेले राहते. अलेक्झांडर पार्क आज हयात असते, तर त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूराचा त्यांना पश्चाताप झाला असता.
पार्क यांच्या प्लॅस्टिकच्या शोधानंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक शोधले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे यांनी दुधापासून प्लॅस्टिक बनवले. बेकलंड या संशोधकाने रेझिन्स शोधले. १९५२ साली झिग्लरने पॉलिस्टर बनवले. पॉलिइथिलीन टेरेफइथलेत(PETE)चा वापर सर्रास आणि मोठ्या प्रमाणात होतो. उच्च घनता पॉलिइथिलीन(HDPE)चा वापर दूध, फिनाईल, शांपू, डिटर्जंटच्या पॅकिंगसाठी, पाईप बनवण्यासाठी होतो. पॉलिविनाईल क्लोराईड(PVC)चा वापर गाड्यांचे भाग, पाईप्, फळांसाठी क्रेट, स्टिकर्स इत्यादीसाठी होतो. निम्न घनता पॉलिथिलीन(LDPE)चा वापर दुकानात वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांसाठी होतो. पॉलिप्रोपिलीन(PP)चा वापर फर्निचर, खेळणी, दही इत्यादींसाठी होतो. पॉलिस्टिरीन(PS)चा उपयोग खेळणी, कॉफीचे कप, मजबूत पॅकेजींगसाठी होतो. याखेरीजही अनेक प्रकार आहेत, ज्यांचा अक्रेलीक, नायलॉन, फायबर ग्लास, बॉटल्स बनवण्यासाठी वापर होतो. त्यातील काहींचा पुनर्वापर करता येतो. मात्र प्लॅस्टिकचा धोका आहे, तो मानवी निष्काळजीपणामुळे. स्वस्त मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर आणि पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता कोठेही टाकून देण्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. गाय, म्हैस आणि इतर जनावरांच्या पोटात जाऊ लागले. ते न पचल्याने जनावरांचे जीवन धोक्यात आले. सहल, सफारीवर जाणारे जंगलातही प्लॅस्टिकचा कचरा फेकू लागले. याचा परिणाम एकूण जीवसृष्टीवर होऊ लागला.
वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुवून पुनर्प्रक्रियेसाठी करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र असे होत नाही. स्वस्त उत्पादन होत असल्याने पुनर्प्रक्रियेपेक्षा नव्या निर्मितीमध्ये उद्योजक व्यस्त असतात. लोकांनीही वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुण्याचे कष्ट नको असतात. त्यामुळे अन्न पदार्थासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, साहित्य तसेच फेकून दिले जाते. जनावरांचे खाद्य पुरेसे उपलब्ध नसल्याने आणि प्लॅस्टिकला अन्नपदार्थांचा वास असल्याने जनावरे ते खातात. ते त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्याचा अंश जनावरांच्या पोटात उतरतो.
मानव थेट प्लॅस्टिक खात नाही. मात्र प्लॅस्टिकचा वापर अनेक कारणांसाठी विशेषत: अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केला जात असल्याने प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जाऊ शकतो, याचे मानवाला भान राहिलेले नाही. कॉफी, चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. शुद्ध पाणी म्हणून बाटलीतील पाणी वापरले जाते. हे पाणी असते मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यात. बाटल्यांचे क्रेट्स अनेक दुकानांच्या दारात सूर्यप्रकाशात ठेवले जातात. त्यामुळे बाटल्यातील प्लॅस्टिकचा अंश पाण्यात उतरतो. ते पाणी आपण शुद्ध पाणी म्हणून पितो.
नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांच्या लक्षात असे आले, की जगातील ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत. अन्न पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॉलिस्टिरीन एक तृतियांश लोकांच्या रक्तात आढळले. मायक्रोप्लॅस्टिक रक्तातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. शरीराच्या एका भागात साठू शकते. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. प्लॅस्टिकचे अंश हवेतही पसरतात. हवेतूनही मानवी शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या खोल तळापर्यंत मानवी कर्तृत्त्वाने पोहोचले आहे. आपण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने ते आपल्या अस्तित्त्वावर उठले आहे. रक्तात हे कण आढळण्याचे गांभीर्य आता तरी ओळखायला हवे. प्लॅस्टिकचा वापर थांबायला हवा!
ले.: डॉ. व्ही.एन. शिंदे
संग्राहिका : सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, ‘ही साडी केव्हढयाला द्याल ?’
विणकर उत्तरला – ‘अवघे दहा रुपये !’
त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला – ‘माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?’
अगदी शांत भावात विणकर बोलला – ‘फक्त पाच रुपये !’
त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, ‘आता याची किंमत किती ?’
प्रसन्न वदनी विणकर म्हणाला – ‘अडीच रुपये !’
तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला.
तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला – ‘आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.’
यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला – ‘बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस…’
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला.
तो खिशात हात घालत म्हणाला – ‘महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?’
विणकर म्हणाला – ‘अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस… मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?’
आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला
मुलगा म्हणाला, ‘महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा… मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !’
त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला – “हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत, कपाशी मोठी होईपर्यंत, तिची काढणी होईपर्यंत, किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सूत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे, कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.’ मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !
त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏’हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.’
पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला 👋आणि म्हणाला, ‘हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं
करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.’……
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खुळखुळतोय, आपल्या घरीही आपण पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या ‘ग’ ची बाधाही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको…
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वाचनाचे फायदे… ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
बिजू (बिजयानंद) पटनायक (१९१६- १९९७) हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तीन देशांच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले होते. भारत, रशिया आणि इंडोनेशिया.
बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्रीही होते.
बिजू पटनायक हे वैमानिक होते आणि दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियन अडचणीत असताना त्यांनी डकोटा हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बॉम्बफेक केली, ज्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. सर्वोच्च पुरस्कारही त्यांना देण्यात आला आणि त्यांना सोव्हिएत युनियनने मानद नागरिकत्व बहाल केले.
जेव्हा कावळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनायक यांनीच २७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली ते श्रीनगर दिवसातून अनेक दौरे केले आणि सैनिकांना श्रीनगरला नेले.
इंडोनेशिया ही एकेकाळी डचांची म्हणजे हॉलंडची वसाहत होती आणि डच लोकांनी इंडोनेशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. डच सैनिकांनी इंडोनेशिया भोवतीचा संपूर्ण समुद्र आपल्या ताब्यात ठेवला आणि त्यांनी एकाही इंडोनेशियन नागरिकाला बाहेर पडू दिले नाही.
१९४५ मध्ये इंडोनेशियाची डचांपासून मुक्तता झाली आणि पुन्हा जुलै १९४७ मध्ये पी.एम. सुतान जहरीर यांना डचांनी घरात अटक केली. त्यांनी भारताची मदत मागितली. त्यानंतर नेहरूंनी बिजू पटनायक यांना तत्कालीन इंडोनेशियन पंतप्रधान जहरीर यांना भारतात सोडवण्यास सांगितले. २२ जुलै १९४७ रोजी बिजू पटनाईक आणि त्यांच्या पत्नीने जीवाची पर्वा न करता डकोटा विमान घेतले, डचांच्या नियंत्रण क्षेत्रावरून उड्डाण करत ते त्यांच्या मातीत उतरले आणि मोठे शौर्य दाखवत इंडोनेशियन पंतप्रधानांना भारतात आणले. सिंगापूरमार्गे सुरक्षितपणे. या घटनेने त्यांच्यात एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांनी डच सैनिकांवर हल्ला केला आणि इंडोनेशिया पूर्णपणे स्वतंत्र देश झाला.
नंतर, जेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला नवागताचे नाव देण्यासाठी बोलावले. त्यानंतर बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या मुलीचे नाव मेघावती असे ठेवले.
इंडोनेशियाने १९५० मध्ये बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या देशाचा मानद नागरिकत्व पुरस्कार ‘भूमिपुत्र’ प्रदान केला होता.
नंतर त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षी इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्माननीय पुरस्कार ‘बिनतांग जासा उत्मा’ प्रदान करण्यात आला.
बिजू पटनायक यांच्या निधनानंतर इंडोनेशियामध्ये सात दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि रशियामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि सर्व ध्वज खाली करण्यात आले.
आपल्या देशाच्या इतिहासाच्या पुस्तकांनी कधीही न सांगितलेल्या अशा महान व्यक्तीबद्दल मला कळले तेव्हा मला अभिमान वाटला.
८० च्या दशकातील ही गोष्ट आहे. एका मध्यमवयीन दाढीवाल्याने, आदिवासी वस्तीमध्ये टाकून दिलेल्या धातूंच्या मूर्तींमधून, एक मूर्ती उचलून आपल्या पिशवीत टाकली. तो मूर्ती पिशवीत टाकत असताना एका आदिवासी स्त्रीने त्याला पाहिले व ती गोष्ट तिने आपल्या म्होरक्याला सांगितली. सर्व आदिवासींनी, चोरीची शिक्षा म्हणून त्या माणसाला पकडून बांधून ठेवले. त्यांच्या रिवाजानुसार त्याला रात्री बळी देण्याचे ठरले. रात्री आदिवासींचा नाच व पूजा सुरु झाली. सुदैवाने त्या दिवशी त्यांचा मुखिया हजर नसल्यामुळे बळी देण्याचे, दुसऱ्या दिवसावर ढकलले गेले. दुसरे दिवशी मुखिया आला. त्याला त्या माणसाची भाषा कळत होती. त्या माणसाने मुखियाला, आपण सरकारी माणूस असून आदिवासींमध्ये राहून, काम करतो हे पटवून दिले, तेव्हा कुठे त्याची त्या चोरीच्या शिक्षेतून सुटका झाली.. हा माणूस म्हणजेच, आदिवासींच्या ‘वारली कले’ची संपूर्ण जगाला ओळख करुन देणारा.. चित्रकार, भास्कर कुलकर्णी!!
कलेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे अनेक कलाकार होऊन गेले. मात्र भास्कर कुलकर्णी या चित्रकाराने आपले आयुष्य आदिवासींच्या सहवासात काढून, त्यांच्या पारंपरिक ‘वारली कले’ला जगमान्यता मिळवून दिली. आजच्या पिढीला त्यांनी या कलेसाठी केलेले योगदान माहीत नाही… ही खरंच, या कलाकाराची शोकांतिका आहे..
भास्कर कुलकर्णी यांचा जन्म मुंबईत, मालाड येथे १४ सप्टेंबर १९३० साली झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी जे जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांचे सोबत चित्रकार बाबुराव सडवेलकर, तय्यब मेहता असे नामवंत कलाकार होते. जे जे नंतर त्यांनी, जे वाॅल्टर थाॅम्सन या जाहिरात संस्थेत, बोधचित्रकार म्हणून नोकरी केली. त्यानंतर काही काळ, ‘ओ अॅण्ड एम’ या जाहिरात संस्थेत काम केले. भास्कर कुलकर्णी यांची संशोधनात्मक वृत्ती, ग्रामीण कलेचा अभ्यास हे गुण हेरुन श्रीमती पुप्पुल जयकर यांनी, त्यांना ‘विव्हर सर्व्हिस सेंटर’ मध्ये कामाला घेतले. श्रीमती जयकर, ह्या लोककलेच्या गाढ्या अभ्यासक तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्नेही होत्या. आदिवासी कलेचा शोध घेऊन त्या कलेला वृद्धिंगत करण्याचे काम त्यांनी भास्कर कुलकर्णी यांचेवर सोपविले..
सहाजिकच ही नोकरी करताना भास्कर यांचा आदिवासींशी जवळून संपर्क आला. त्या भटक्या जमातीमध्ये मुक्तपणे वावरण्याचा योग आला. वारली कलेबरोबरच आदिवासींची रहाणी, जीवनमान यांचा त्यांनी अभ्यास केला. इथेच त्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन झाले..
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला. पुप्पुल जयकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिणामी कुलकर्णी यांनाही त्रास होऊ लागला. त्यांनी आपला जमलेला भविष्य निर्वाह निधी घेऊन, संस्था सोडली. नोकरी सोडल्यानंतर ते डहाणू जवळील, गंजाड या वारली लोकांच्या पाड्यावर येऊन राहिले. तेथे एक लहानसे घर बांधले. गावात पाण्याची टंचाई होती. कुलकर्णी यांनी पाण्यासाठी विहीर खोदण्यास सुरुवात केली.. विहीर जसजशी खोल जाऊ लागली, तसे त्यांच्या फंडाचे पैसे संपू लागले. शेवटी विहीरीला पाणी काही लागलेच नाही. कुलकर्णी आता कफल्लक झाले. ते पूर्णपणे आदिवासी झाले. अविवाहित व फकिरी जीवन असल्याने त्यांच्या गरजाही फारशा नव्हत्या.. वारली लोकांकडून बांबू-कामठ्यांच्या आकर्षक वस्तू, चित्रे काढून घेणे व त्यांची मुंबईला विक्री करुन त्यांना पैसे मिळवून देणे, यातच त्यांचे दिवस जाऊ लागले. त्यांपैकी जिव्या सोम्या मशे याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मात्र त्या कार्यक्रमाचे, सरकारने साधे निमंत्रणही कुलकर्णींना दिले नाही..
हळूहळू या कलेचे व्यापारीकरण होऊ लागले. गावातील पुढाऱ्यांकडून कुलकर्णींना त्रास होऊ लागला. ज्याच्या जागेवर कुलकर्णी यांनी घर बांधले होते त्याला फितवून, त्यांना ते घर सोडायला लावले. ज्या लोकांसाठी कुलकर्णींनी आपले सर्वस्व पणाला लावले होते त्यांनीच, त्यांना निराधार व पोरके केले. शेवटी कुलकर्णी यांनी ते गांव सोडले.. तरीदेखील त्यांच्या मनात वारली कलेविषयीचा आदर, हा तिळमात्रही कमी झालेला नव्हता..
मग कुलकर्णी सावंतवाडीला गेले. तिथे लाकडी खेळण्यांना वेगळे स्वरुप देण्याचे त्यांनी काम केले. नंतर ते गोव्याला गेले. एकटेपणा व वैफल्यग्रस्त जीवनामुळे त्यांना, दारुचे व्यसन लागले. काही काळानंतर ते तामीळनाडूमध्ये गेले. तेथील कुंभार वस्तीच्या खेड्यात राहून, ‘इंडिया फेस्टिव्हल’ या लंडनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासाठी कारागीरांना प्रशिक्षण दिले.
त्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती. मात्र जीवनाच्या उत्तरार्धात समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेमुळे ते खचले होते. मद्यपान वाढत होते, प्रकृती ढासळत होती.. आपला मृत्यू बिहारमधील दरभंगा, येथेच व्हावा अशी त्यांची इच्छा होती. २४ एप्रिल १९८३ रोजी, वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी, दरभंगा येथील एका रुग्णालयात या भास्कराचा ‘अस्त’ झाला…
भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊनराहिली…
हा लेख वाचल्यानंतर जेव्हा कधी आपणास एखादं वारली चित्र दिसेल, त्याक्षणी चित्रकार भास्कर कुलकर्णी यांची नक्कीच आठवण होईल…
तसेच, खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते ५ ते ६ मि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी… तिखट नको… त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये…
“आता पान वाढावयाच्या सूचना -“
१. पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..
२. पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे…
३. पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग “शून्य अंश” पकडून मीठ वाढावे आणि
४. त्याच्या “उणे पाच अंशावर” लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे…
५. उणे ९० अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.
६. मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण “भसकन” वाढू नये… वरणाचा ओघळ नको… आणि त्यावर “साजूक तुपाची धार” हवीच… पण त्यासाठी जेवणार्यास वाट पहायला लावू नये… तुपाचा चमचा चांगला खोलगट असावा.. मागून चेपलेला अपेक्षित नाही.
७. मुदाचा आकार प्रमाणशीर असावा… “भसाडा नको…”
८. वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.
९. मसाले-भाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
१०. आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
११. उजव्या हाताला वरच्या बाजूला ४५ अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
१२. आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास तुमच्या तुम्हीच दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये. आणि उपकार केल्यासारखा वाढप्याचा चेहरा असू नये.
बस एवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या. 🙏
“काटेकोर” पुणेकर…
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पुष्टिपती विनायक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
(पुष्टिपती विनायक जयंती निमित्त)
विघ्नहर्ता गजानन हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाखातील पौर्णिमेला पुष्टिपती विनायक म्हणून अवतार घेतला.
नुकत्याच झालेल्या पुष्टिपती विनायक जयंती निमित्त गणरायाच्या या विशेष अवताराविषयी जाणून घेऊया.
सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे. गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा काही पुराणांमध्ये आढळतात.
भगवान गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीच्या व्रतोपवासाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. जाणून घेऊ या पुष्टिपती विनायक जन्माची पूर्वपीठिका.
गणरायाने भक्तांच्या रक्षणार्थ, कल्याणासाठी आणि राक्षसांचा पाडाव करण्यासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. त्यापैकी पुष्टिपती विनायक हा एक अवतार असून, याचा उल्लेख मुद्गल पुराणात आढळून येतो. यातील कथेनुसार, प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने तीनही लोकांत उच्छाद मांडला होता. या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मतीपुढे टिकाव न लागल्याने महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले.
दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर देवऋषि नारदमुनींनी शिवनाथ व पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सूचविले. दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी. तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी, असे व्रत शिव-पार्वतीला सांगितले. नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रुपात साक्षात शिव-पार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिव-पार्वती भयभीत झाले. त्यांनी गणेशाला बालरुपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली. त्यानुसार गणेश बालरुप धारण करून शिव-पार्वती समवेत राहू लागले.
एका बाजूला हे घडत असताना, दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला. यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टिपती विनायक असे झाले. पुष्टिपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे. एक दिवस पुष्टिपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली. तेव्हा पुष्टिपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले. यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठविले. परंतु, दुर्मतीने उलट पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले.
दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्विकार पुष्टिपती विनायकांनी केला. ते दोघेही युद्धाला एकमेकांसमोर उभे ठाकले. या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. दुर्मतीने पुष्टिपती विनायकाच्या दिशेने आपला परशू फेकला. तो परशू त्यांनी दाताने अडविला. या धुमश्चक्रीत पुष्टिपती विनायकाचा दात तुटला. तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला. दुर्मतीच्या वधाने सर्व देवगण भयमुक्त झाले.
कालांतराने द्वापारयुगात श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाला आवाहन केल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टिपती विनायकाचे पूजन केले. त्याठिकाणी एक मंदिर उभारण्यात आले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारव्हा या गावात हे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर स्वमंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनःप्राप्तीसाठी पुष्टिपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते. ते मंदिर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे आहे. तसेच पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. आणि अगस्त ऋषींनी समुद्र प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या ‘वातापी’ या राक्षसाचा नाश केला, अशीही एक उपकथा असल्याचे पुराणात आढळून येते.
चित्र साभार : https://maharashtratimes.com ›
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈