☆ दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
दासबोधातील समर्थ बोध
मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥
सरळ अर्थ :-
लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत, ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुसद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा.
विवेचन:-
समर्थांचे जीवन चरित्र या ओवीत सामावले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. समर्थांच्या चरित्राचा ढोबळमानाने अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की पहिली बारा वर्षे ते घरी होते, नंतरची बारा वर्षे टाकळी येथे त्यांनी साधना केली. त्यानंतर बारा वर्षे देशाटन करून त्यांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर पुढील ३६ वर्षे त्यांनी राष्ट्राचे पूनरूत्थान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
आज आपण जे सुरक्षितता (safety) या विषयाबद्दल बोलतो, लिहितो त्याबद्दल हा विलक्षण आगळावेगळा संत सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहून गेला आहे, असे आपल्या लक्षात येईल.
समर्थांनी आधी हरिकथा केली, अर्थात स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर मिळवलेली विद्या, ज्ञान देशभर भ्रमंती करून तपासून पाहिले आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला…!
समर्थांचे काही आवडते शब्द आहेत. त्यामध्ये विवेक, प्रयत्न आणि सावधान किंवा सावधानता यांचा क्रम खूप वरचा आहे.
मनुष्याने कोणतेही कार्य करताना आपले विहित कार्य ( अर्थात हरिकथा) सोडू नये असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. व्यवहारात असो परमार्थात मनुष्याने अत्यंत सावधान असले पाहिजे. अन्यथा त्याला कोणीही लुबाडेल.
मनुष्य प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक त्याने वरील ओवी कायम लक्षात ठेवावी आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आपल्याला सांगत असावेत.
जय जय रघुवीर समर्थ
(तळटीप : या निमित्ताने समर्थांचे चरित्र प्रत्येक वाचकाने वाचावे असे मी आपल्याला सुचवीत आहे.)
☆ तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है!☆ श्री संभाजी बबन गायके☆
तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है!
… (शार्लटची चारूलता होताना !)
स्वीडन या संपन्न देशातल्या एका राजघराण्यातली ही गोंडस,सुंदर,देखणी राजकन्या….शार्लट ! तिच्या नावाचं इंग्लिश भाषेतील स्पेलिंग Charlotte असं काहीसं तिरपागडं आणि आपल्याला चार्लेट असा उच्चार करायला उद्युक्त करणारं. युरोपातले पालक आपल्या मुलीचं नाव ठेवायचं झाल्यास याच नावाला पसंती देतात. .. या नावाचा एक अर्थ ‘नाजुक’ असाही होतो. आणि ती होतीही तशीच. सडपातळ आणि सिंहासारखी कटी असलेली….जणू एखादी नाजूक वेल,लता ! हीच शार्लट चारूलता कशी झाली याची ही हृदयंगम कहाणी.
शार्लट अठरा-एकोणीस वर्षांची असेल. मनानं कलावंत असलेली शार्लट सातत्याने कलेची उपासना करण्यात दंग असे. तिला माणसांत आणि माणसांच्या चित्रांमध्ये खूप रस होता. रेषा आणि रंगांनी कागदावर साक्षात माणूस चितारता येतो याची तिला खूप गंमत वाटे. लंडन येथील एका कला महाविद्यालयात ती चित्रकला शिकत होती. व्यक्तिचित्रं साकारू शकणाऱ्या सर्वोत्तम कलाकाराच्या शोधात ती होती…तिलाही हे तंत्र शिकून घ्यायचं होतं.
ही कला अंगी असणारा एक अवलिया माणूस तिच्या घरापासून ९७०० किलोमीटर्सवर आहे, हे तिला माहीत झाल्यापासून ती त्याला भेटायला उतावीळ झाली. आणि आपल्या व्हॅनमधून त्याच्याकडे निघाली सुद्धा. लंडनवरून तब्बल बावीस दिवसांनी ती दिल्लीत पोहोचली….तिला हवा असणारा कलाकार इथेच तर होता. प्रद्युम्नकुमार त्याचं नाव. महानंदिया हे कुलनाम. ओरिसातल्या अत्यंत दुर्गम भागात जन्मलेला हा तरूण पुस्तकी अभ्यासापेक्षा निसर्गामध्ये, रंगांमध्ये जास्त रमतो याची त्याच्या पोस्टमनची नोकरी करीत असलेल्या वडिलांना अतिचिंता होती. त्याचे ग्रह काय म्हणताहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रद्युम्नची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली….’ हा मोठा कलावंत तर होईलच पण याचं लग्न दूरवरच्या एखाद्या सुंदर,श्रीमंत मुलीशी होईल…तिची राशी वृषभ असेल ! आणि तीच याला शोधत येईल ! ‘
– आपले वडील आणि ते ज्योतिषी यांच्यातला हा संवाद छोटा प्रद्युम्न चोरून ऐकत होताच….त्या लहान मुलाला तोवर लग्न वगैरे विषय माहीत नव्हता…पण आपल्या पत्नीची राशी वृषभ असेल हे त्याने पक्के ध्यानात ठेवले !
प्रदयुम्न प्रचंड जातीयवाद,गरीबी,अवहेलना यांना तोंड देत देत शेवटी चित्रकलेच्या शिक्षणासाठी दिल्लीत पोहोचला. शिकताना उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याने लोकांची पोर्टेट्स काढून देऊन सोडवला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हुबहू पोर्टेट काढून प्रदयुम्न यांनी सर्वांची वाहवा मिळवली. एक दर्जेदार कलाकार म्हणून प्रदयुम्न आता दिल्लीत प्रसिद्धीस आले आणि याच जोरावर त्यांनी दिल्ली प्रशासनाकडून कनॉट प्लेसमधील प्रसिद्ध आणि पवित्र कारंज्याजवळ पोर्टेट काढून देण्यासाठी बसण्याची परवानगी मिळवली.
गोष्ट आहे १९७५ मधली. प्रद्युम्न असेच त्या कारंज्याजवळ बसून लोकांची पोर्टेट्स काढून देण्यात मग्न होते. शार्लट त्यांच्यासमोर उभी राहिली…’ माझं पोर्टेट काढून द्याल?’ तिच्या प्रश्नाने ते भानावर आले आणि आपल्यासमोर प्रत्यक्षात जणू एक चित्रच उभे असल्याचं त्यांनी पाहिलं…चार्लट ! ती त्यांच्यासमोर बसली. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिले….निळेशार डोळे! कुणीही हरवून जावे असे. इथपर्यंत प्रद्युम्नसाठी ती एक कलाकार विद्यार्थिनी, त्याची ग्राहक एवढंच होती. कितीतरी वेळ ती त्यांच्यासमोर स्तब्ध बसून होती. त्यांना वेगळं सुंदर व्यक्तिचित्र काढण्याची गरजच नव्हती….तिचं सौंदर्य कुंचला आणि रंग यांच्या माध्यमातून आपसूकपणे कागदावर चितारलं जात होतं. बघता बघता चित्र पूर्ण झालं आणि ते चित्र बघता बघता चार्लट मंत्रमुग्ध झाली. प्रद्युम्न यांनी तिला अचानकपणे विचारलं,” तु वृषभ राशीची आहेस का?” तिने हो म्हणताच प्रद्युम्न नकळत म्हणून गेले….”मग तु माझी पत्नी होशील!” हे ऐकताच सुरुवातीला चार्लट भांबावूनच गेली असावी….मग ते पुढे भेटत राहिले. आता प्रद्युम्न तिचं चित्र कागदावर नव्हे तर त्याच्या हृदयाच्या पटावर रेखाटू लागले….चार्लटचा राजकुमाराचा शोध संपला होता….ते दोघेही हिंदू रितीरिवाजानुसार रीतसर विवाहबद्ध झाले…चि.सौ.कां.चार्लट आता सौ.चारूलता प्रदयुम्न महानंदिया झाली होती.
“आपण आता स्वीडनला जाऊयात!” एके दिवशी चारूलता त्यांना म्हणाली. “नको, माझा अभ्यासक्रम पुरा होऊ देत. आणि मला तुझ्या खर्चाने तिकडे यायला नको आहे. मी माझ्या हिंमतीवर येईन. मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी बेहत्तर.” त्याचा हा विचार तिला सुखावून गेला…स्वाभिमानी आहे हा राजकुमार..तिनं मनात म्हटलं. आणि ती मायदेशी निघून गेली. त्याकाळी पत्र हे मोठं माध्यम होतं संवादाचं. इतक्या दूरवर पत्रं पोहोचायला उशीर लागायचा…पण संदेश या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वायूवेगानं पोहोचायचा. ‘ तस्वीर तेरी दिल में..जिस दिन से उतारी है…फिरू तुझे संग लेके, नये नये रंग लेके…सपनों की महफिल में…तुफान उठायेगी दुनिया मगर…रुक न सकेगा दिल का सफर !.’….असं झालं असेल!
मध्ये बरेच दिवस,महिने गेले. राजकुमार त्याच्या ऐटबाज घोड्यावर बसून आपल्याकडे येईल या वाटेकडे चार्लट…चारू डोळे लावून बसली होती. पण राजकुमार फक्त कलेच्या राज्यातील राजकुमार. खिशात दाम नव्हता. मग जवळच्या साऱ्या चीजवस्तू विकून टाकल्या…बाराशे रुपये आले. साठ रुपयांची एक जुनी वापरलेली सायकल विकत घेतली. ब्रश,रंग,कागद,कॅनव्हासची पिशवी पाठीला अडकवली आणि राजकुमार मोहिमेवर निघाले. रस्त्यात लोकांची चित्रं काढून दिली आणि अन्न,निवारा मिळवला. काही दिवस सलग दोन-तीन दिवस उपवाशी रहावे लागले. विरोध,संशय,मानहानी सहन करावी लागली. दिल्लीतून अमृतसर. तिथून अफगणिस्तान, इराण,तुर्की,बुल्गेरीया,युगोस्लोव्हाकीया,जर्मनी,ऑस्ट्रीया…डेन्मार्क ! किती दूरचा प्रवास…किती कष्ट. नशिबाने त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांवरील नियम काहीसे सोपे असावेत. कारण प्रद्युम्न यांना कुठल्या सीमेवर फार थांबावे लागले नाही. उलट या माणसाच्या सहनशक्तीपुढे,त्याच्या उद्देशामुळे तिथले अधिकारीही स्तंभित झाले. खरी अडचण आली ती डेन्मार्कच्या सीमेवर. पाच महिने आणि बावीस दिवसांनी प्रद्युम्न स्वीडनच्या सीमेवर पोहोचले…..
आपल्या देशातल्या राजघराण्यातली एक सुंदर कन्या भारतातल्या एका गरीब माणसाच्या प्रेमात पडूच कशी शकते,लग्न कशी करू शकते याचं त्यांना नवल वाटणं साहजिकच होतं. आणि हा माणूस चक्क सायकलवर एवढा प्रवास करून येथे पोहोचतो! प्रद्युम्न यांच्याजवळ त्यांच्या विवाहाची काही छायाचित्रे होती. अधिका-यांनी चार्लटशी संपर्क साधला….ती धावत निघाली…तिचा राजकुमार पोहोचला होता. प्रदयुम्न यांनी तिच्या शहरापर्यंतचा प्रवास मग रेल्वेतून केला…..वधू वराला घ्यायला सहकुटुंब आली होती….हे खरं रिसेप्शन ! प्रेम सिद्ध झाल्यावर जगाचा विरोध मावळत जातो. इतर रंगाच्या,वंशाच्या माणसांनी जवळपास राहूही नये अशी समाजव्यवस्था असणाऱ्या त्या ठिकाणच्या उमद्या मनाच्या लोकांनी हा भारतीय जावई मनापासून स्विकारला !
भावनेच्या भरात अनेक विवाह होतातही. पण ते प्रदीर्घ काळापर्यंत टिकणे महत्त्वाचे असते. चारूलता आणि प्रद्युम्न यांचा विवाह सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या आसपास पोहोचतो आहे. चारूलतेच्या संसार वेलीवर फुले उमलली आहेत. स्वीडनच्या कला विश्वात प्रद्युम्न यांना मानाचे स्थान मिळाले आहे. ओरिसातील एका विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
चार्लट आणि प्रद्युम्न कुमार महानंदिया (Mahanandia) आपल्या महान इंडियाचं परदेशात,जगात प्रतिनिधित्व करत आहेत,असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
या हृदयस्पर्शी प्रेमकथेवर चित्रपट निघणार नाही,असे होणार नाही. चित्रपटातून काय,कसे दाखवले जाईल, काय नाही..हे ठाऊक नाही. पण हे वाचून तुमच्याही मनाच्या कॅनव्हासवर एक व्यक्तिचित्र निश्चितच रेखाटले गेले असावे…फक्त या व्यक्तिचित्रात एक नव्हे तर दोन व्यक्ती आहेत…चार्लट-चारूलता आणि प्रद्युम्न !
☆ पायविहीर, दर्यापूर — लेखक – श्री एकनाथ वाघ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले, वास्तू आहेत. त्या पुरातन वास्तूंशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे. त्यापैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर आहे. ही विहीर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.
यादवकालीन आणि बहामणी कालीन असे दोन मतप्रवाह या विहिरीच्या इतिहासाबाबत आहेत. महिमापुर या गावाच्या मधात ही विहीर आहे. या विहिरीचे संपूर्ण बांधकाम मध्य प्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगाच्या दगडांचे आहे. चौकोनी आकाराची ही विहीर ऐंशी फूट खोल आहे. या विहिरीची रुंदी 40 मीटर इतकी आहे. जिल्ह्यात असणाऱ्या विविध पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांपैकी दर्यापूर तालुक्यात महिमापुर या गावातील विहीर ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तळघरात जणू किल्ला बांधला असावा असाच थाट या विहिरीचा पाहायला मिळतो. अनेक पर्यटक इतिहास तसेच स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही विहीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आली आहे.
विहिरीचे वैशिष्ट्य: —
तळघरात सात मजल्यांची असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की, काय असा अनुभव येतो. प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन फुलंही सर्वांचे लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे आहेत. या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीच्या तळाशी चारही बाजूंनी मोठ्या समान रचना करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातून तांबूस दगड : —-
तांबूस रंगाच्या दगडासह काही ठिकाणी या विहिरीच्या बांधकामात काळा दगड देखील वापरण्यात आला आहे. तांबूस दगड हा मध्य प्रदेशातून या ठिकाणी आणण्यात आला. ही संपूर्ण विहीर कातीव दगडात बांधलेली असून नैसर्गिक झऱ्यांसाठी विहिरीला जागोजागी छिद्र सोडण्यात आली आहेत. या विहिरीत अनेक कमानी छोट्या खोल्या सुरक्षित कोणाकडे मागच्या आणि वरच्या बाजूस राहता येईल अशी दालने आहेत. या दालनांमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पातशाहीत सैन्याच्या पडावाचे ठिकाण:—
मध्ययुगीन कालखंडामध्ये हसन गंगू उर्फ बहामणशहा याने बहामनी राज्याची स्थापना केली होती. हसन गंगूच्या नंतर विस्तारलेल्या बहामणी साम्राज्याची शकले पडली. 1446 ते 1590 या 144 वर्षाच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच शाह्या निर्माण झाल्या. यामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, अचलपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाचही शाह्या एकमेकांशी सतत भांडत असत.
विहीरीचा प्रमुख हेतू:—-
अचलपूरची निमाजशाही आणि हैदराबादच्या गोवळकोंडाची कुतुबशाही यांच्या मधल्या प्रवासाच्या दोन मार्गांपैकी एक मार्ग हा अमरावती जिल्ह्यातील सावळापूर कोल्हापूर महिमापूर येथून हैदराबादकडे जायचा. दुसरा मार्ग अचलपूर ह्या राजधानी तून पाथर्डी माहूर चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बैतूल पर्यंत जायचा. या मार्गाने सुलतान आणि त्याचे सैन्य जात असताना सैन्याचा पडाव असणाऱ्या ठिकाणी अनेक विहिरी बांधण्यात आल्या त्यापैकी एक विहीर ही महिमापूरची आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोडे यांनी दिली. सैन्याला सहजपणे पाणी उपलब्ध होणे हा प्रमुख हेतू या विहिरी मागे होता. त्या काळात सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक विहिरीत तैनात असायचे. यामुळेच या विहिरीत झोपण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे आढळते.
विहीर 900 वर्षे जुनी :—-
खरंतर महिमापुर येथील विहीर नेमकी यादवकालीन की, बहामणी कालीन असे इतिहास अभ्यासकांचे दोन मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. देवगिरीच्या यादवांच्या राजधानीचे ठिकाण हे दौलताबाद होते. त्यांच्या राज्याची सीमा सातपुडा पर्वतरांगेपासून तापी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरली होती. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर असल्याचे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर आहे.
विहिरीचे पाणी औषधीयुक्त:—-
या विहिरीचे बांधकाम केल्यामुळे कालांतराने विहिरीच्या परिसरात लोक वस्ती निर्माण झाली. आज जवळपास 100 घर महिमापूर या गावात आहेत. आता उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडली असली तरी, सात मजल्यांच्या या विहिरीत पूर्वी पाण्याची पातळी ही दुसऱ्या मजल्यापर्यंत होती. परिसरातील ग्रामस्थ याच विहिरीतून पाणी भरत असत. या विहिरीत बाबर नावाची वनस्पती होती, या वनस्पतीमुळे विहिरीचे पाणी औषधीयुक्त बनले होते. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिल्याने डायरिया, पोटाचे आजार यासारखे कोणतेही विकार होत नव्हते. मात्र कालांतराने या विहिरीतील पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्यामुळे, या विहिरीतील वनस्पती नष्ट झाल्या. या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. आज देखील ही भव्य विहीर आपली ओळख जपून आहे. यामुळेच या विहिरीला भेट देण्यासाठी वर्षभरात देशभरातून अनेक पर्यटक तसेच इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी भेट देतात.
लेखक : श्री एकनाथ वाघ
संग्राहक : अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीसमर्थ म्हणतात की, आता परमार्थाचे साधन सांगतो, ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्रास होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे.
विवेचन:-
श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्ये नमः ।। श्री गुरुवे नमः ।।
जन्माला आलेला जीव सर्वप्रथम श्रवण करायला शिकतो, म्हणून भक्तीच्या नऊ प्रकारांमध्ये श्रवण भक्तीस पहिले स्थान प्राप्त झाले असावे. मूल जन्माला आले की त्याच्या कानाशी टिचकी वाजवून त्याला ऐकायला येते कीं नाही याची खात्री पूर्वीच्या काळी सुईणी करीत असत. मनुष्य सर्वप्रथम ऐकायला शिकतो, अर्थात मनुष्य श्रवण प्रथम करतो आणि कालांतराने बोलू लागतो. काही मुलांची जीभ जड असते. काही मुलं मुकी असतात. पण शास्त्र असे सांगते की ज्याला ऐकायला येते तोच बोलू शकतो. त्यामुळे ज्याला ऐकायला येते, तो लगेच बोलू शकला नाही, तरी नंतर बोलू शकतो.
शब्द श्रवण करायचा असतो. विद्वानाला बहुश्रुत म्हणतात; कारण त्याने खूप श्रवण केलेले असते. ग्रंथांचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच असते. अर्थात शब्द वाचणे आणि कोणाच्या तोंडून ऐकणे यात फरक राहणारच. ज्याला परमार्थ साधन करावयाचे आहे, त्याने एखादा सर्वमान्य संत-ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून, सावकाश, अनेक वेळा वाचावा. अशा प्रकारे ग्रंथांचे वाचन-मनन केल्यास श्रवणभक्ती घडते. श्रवणाने अनेक संशय फिटतात, भाव स्थिरावले जातात आणि भगवंतांचे प्रेम मिळते.
ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील पहिली ओवी
“तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। (ज्ञा. 9.1)
श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका.
“ज्ञाना’चे ईश्वर म्हणता येईल अशी आपली ज्ञानेश्वर माऊली कळकळीने आपल्याला सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान द्या म्हणजे लक्ष देऊन ऐका. एकदा चित्रपट पाहिला की अनेकांची चित्रपटातील गाणी पाठ झालेली आपण पाहिली असतील. परंतु अभ्यासाची कविता असो किंवा मनाचे श्लोक असो. ते पटकन पाठ होत नाहीत किंवा प्रवचन कीर्तन ऐकताना अनेकांवर निद्रादेवी प्रसन्न होत असते. मनुष्य मनापासून, त्यात रस घेऊन, एकाग्रतेने ऐकत नाही, अर्थात अवधान देऊन ऐकत नाही हेच खरे!!
*मनुष्य लक्षपूर्वक ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या श्रवण भक्तीच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपण आजपासून ‘ऐकायला’ आणि ‘ऐकून घ्यायला’ सुरुवात करू.
जो मनुष्य पूर्ण एकाग्र होऊन संतांच्या ग्रंथाचे श्रवण करतो, त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊ शकते. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.
श्रवण करणे याचा आणखी एक अर्थ आहे कृती करणे. उदा. एखाद्या मनुष्याला दुसऱ्याने पाणी आणून दे असे सांगितले. त्याने ते नीट ऐकले. दोनचार मिनिटे अशीच गेली. दुसऱ्याने त्याला पुन्हा आठवण केली. तरी तो ढीम हलला नाही. शेवटी थोड्या त्राग्याने दुसऱ्याने पुन्हा विचारले की मी बोललो ते ऐकलस ना. तर तो हो म्हणाला. मग पाणी का देत नाहीस ? तेव्हा तो म्हणाला की तेवढंच करायचं राहिलं. लौकिक जीवनांत अथवा पारलौकिक जीवनात अनेक लोकं बरेंच काही ऐकतात, कधीकधी तर अगदी तल्लीन होऊन ऐकतात. परंतु त्यांच्या हातून योग्य ती कृती घडत नाही. अशा प्रकारचे लोकं लौकिक अथवा पारलौकिक जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. म्हणून ज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे ? कसे ऐकायचे ? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. ‘समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे.’
जय जय रघुवीर समर्थ!!
विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले☆
*१४-१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना..!!*
त्या दिवशी नेमका मी पुण्यात होती. दुपारच्या जेवणाची वेळ..!! मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार, इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो..!! बघतो तो काय..!! त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली ..!! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकाने पुढे विस्तव धरलेला, आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली ..!! ती जवळ-जवळ सर्वच माणसे परिचित चेहर्यांची ..!! पुण्याच्या नाट्य-क्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्य-क्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे, त्या प्रेत-यात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले..!!*
‘कोण ..??’*
न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले…. “अहो ..गंधर्व ..बालगंधर्व” ..!!*
साक्षात बालगंधर्वाची प्रेतयात्रा ..!! अणि ती देखील इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत ..??*
*-बालगंधर्व ..* .. *- सौभद्र ..*.. *- स्वयंवर ..*.. *- मृच्छकटिक ..* *-एकच प्याला ..*.. *”जोहार मायबाप जोहार .. अन्नदाते मायबाप हो ..!!”*…. हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली ..!!*
ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात, प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरा-पान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं सगळं ..!! चला आता ..’!!
घरी आलो. चार वाजून गेले होते ..!! बालगंधर्वांची प्रेतयात्रा ,अशा घाईगडबडीने आणि पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत, कसलाही गाजावाजा न करता, गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली ..?? त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे ..!!
गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतीस्थानात नारायणराव राजी-खुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले ..!! त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नट-मंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा .. पिसे गळालेला राजहंस ..!!
कुणीही केली नसती अशी सेवा, या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली ..!! त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता ..!! कारण एकच .. त्याच्या गळ्यावरील तिचे भक्ति-युक्त प्रेम ..!! …. *जे प्रेम राधेने कृष्णावर केले ..!!* …. *अहिल्येने प्रभू रामावर केले ..!!* ….. तसेच प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले ..!! त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्या-पांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी, अगोदर अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत, दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच विदीर्ण झालेला राजहंस ..!! त्यावेळी त्याच्या रसिक-जनांनी व भगत-गणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत, पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते ..!!
*असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व ..!!* ….मुसलमान झालेला ..!; आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना अव्हेरून, त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते .. आता धर्मांतरही झाले ..!! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत, गावो-गांवच्या जुन्या भगत-गणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले ..!!
एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. प्रसंग सोलापूरचा ..!! ह्याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली ..!! पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. ‘मेकॉनकी थिएटर’ म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेरच ..!! ‘तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो, असे वाटते’ असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी, जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले ..!! नाटके लावता येत नव्हती ..!! पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्या-भाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वांना थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पाय-पिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला ..!!*
गंधर्वाचे भाषण सुरू झाले …. “अन्नदाते ..!! मायबाप हो ..!! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच आता मला जगवा ..!! तुमच्या उष्ट्याचा मी महार” ..!!*
असे अनेक थैली-समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत ..!! चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे, उभी, आडवी, तिरपी कशीही बेरीज केली तरी, उत्तर येईल शून्य ..!! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य ..!! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला ..!! परंतु बिचारीचे नशीबच खोटे ..!! ती तरी त्याला काय करणार ..?? बाल-गंधर्वांभोवती, त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोत-पक्षी त्याच्याजवळून उडून गेले, आणि साऱ्या महाराष्ट्रात, ‘गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश’ केला अशी हाकाटी करीत राहिले ..!! वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कला-जीवनाचा मृच्छ-कटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे ..!!
ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्री-भूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात, मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गान-नृत्यही करून, एक आगळा साक्षात्कार घडविला होता ..!! तो काळ दृष्टीसमोर आणा, म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुति-माधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून ..!! हिराबाईंच्या गान-माधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत ..!! मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनय-कुशल आणि नृत्य-गान-कुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय. जाति-धर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य-समीक्षकांनी, आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते ..!! नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले ..!!
दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन, गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून, त्याचे कोड-कौतुक करणार्या मानवजाती प्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठीच आहेत, असा भ्रामक समज त्यांच्या अवती-भोवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोह-भस्म आणि सुवर्ण-भस्म जे दडलेले असते, त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात ..!!
सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी ..!! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानव-जातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व त्या राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली ..!! तिचे व बालगंधर्वांचे मीलन, हिंदू रसिकांना न रुचल्याने, त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदा-नालस्ती झाली त्यामुळे, ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे ..!! ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे, अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंच-पक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्व-भक्तांच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे ..!! ती काळी साळ आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे ..!! गोहरला ‘चेटकीण’ म्हणणारे हे महाभाग, कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील आणि नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे ..?? कारण, बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती तर विजापूरची कलावंतीणच होती ना ..!!
ते काहीही असो .. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे, गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीर-संबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता, तर तो गायनाची पताका दिगंत घेऊन जाणारा झाला असता ..!! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला ..??*
ह्या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे ..!! …. *’गंधर्व अत्यवस्थ’ ..!!* .. अशी सिंगल कॉलममधील ती बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ..!! ती वाचून, मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना ..!!
आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की, आजही अंगावर शहारे येतात ..!!
*आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार ह्या शिवाय दुसरे काही नाही केले, त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक उपस्थित नव्हता ..!! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता ..!!* होते ते एका हौशी नाट्य-संस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर ..!!
एखाद्या कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची, असा विधिलिखित संकेतच असतो की काय, कुणास ठाऊक ..!! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस ‘प्यासा’ रहावे लागते ..!! एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा, ह्यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली ..!!
गंधर्वांचे भाग्य थोर ..!! त्यांच्यावर आता पुस्तके लिहिली जात आहेत ..!!
…. *पण अप्सरेचा मानवी अवतार, तिच्या अखेरच्या श्वासाबरोबरच संपला ..!!*
लेखक : श्री वसंत शा. वैद्य.
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
हिमाचल प्रदेशातल्या बलजीत कौरने आज एक मोठा पराक्रम केला.एकाच मोसमात तिने चार शिखरांवर चढाई केली. ती सर्व शिखरे आठ हजारांवर उंचीवरची होती.यात एव्हरेस्ट आणि कांचन गंगा या शिखरांचाही समावेश आहे.
यावरून आठवली ती कांचन गंगा ची पहिली मोहीम.१९८७-८८ घ्या आसपास ही मोहीम आखली गेली.यापुर्वी असा प्रयत्न झाला होता..पण केवळ सरकारी किंवा लष्करी पातळीवर.
आठ हजारांवर उंचीवर असलेल्या शिखरावर चढाई करण्याची ही मोहीम नागरी होती.या मोहीमेच्या तयारीसाठीच दोन वर्षे लागली.
यासाठी खर्च होता साधारण पंचवीस लाख रुपये.आणि एवढी रक्कम गोळा करणं सोपं नव्हतं.या खर्चाची जुळवणी करण्यासाठी मग या टीमने समाजातील मान्यवरांना पत्रे पाठवली.त्यात एक पत्र पाठवले होते जेआरडी टाटांना.
जेआरडींनी त्यांना भेटायला बोलावले. मोहीमेचा नेता वसंत लिमये आणि दिलीप लागु भेटायला गेले.जेआरडी टाटा त्यांच्या हनीमून साठी दार्जिलिंगला गेले होते.. तेव्हा तिथून त्यांना कांचनगंगाचे शिखर दिसले होते.त्यावेळी त्यांना काय वाटलं यांचं त्यांनी रसभरीत वर्णन केलं.तासभर गप्पा झाल्यावर त्याचं फलित काय..तर मोहिमेला अर्धा खर्च टाटा समूहाच्या कंपन्यांकडून उचलला गेला.
या मोहिमेत चोवीस जण असणार होते.त्या सर्वांना सर्वोत्तम दर्जाचे गिर्यारोहण साहित्य लागणार होते..जे भारतात कुठेही उपलब्ध नव्हते.परदेशातुन मागवण्यासाठी आयात परवाना गरजेचा होता.
मग केंद्र सरकारशी संपर्क साधुन स्पेशल लायसन मिळवले, आणि दहा लाख रुपयांचं साहित्य मागवलं गेलं.
मोहीमेचा कालावधी होता साडेतीन महीन्यांचा.यामध्ये ‘8 man day’ असे शिध्याचे खोके बनवले गेले.म्हणजे..आठ माणसांना एका दिवसासाठी लागु शकणार्या शिधासामुग्रीचा एक खोका.त्यामुळे प्रत्यक्ष मोहीमेच्या काळात वाहतूक करणं खुप सोयीचं गेलं.या सामानाची बांधाबांध करण्यासाठीच दोन महिने लागले.
मोहीमेच्या आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व गिर्यारोहकांना आमंत्रित केले…आणि कांचनगंगा वर रोवण्यासाठी तिरंगा प्रदान केला.
मोहीम सुरु झाली.एक महीन्याच्या प्रयत्नानंतर सर्व जण बेसकॅंपवर पोहोचले.मजल दरमजल करत अजुन उंचीवर जाऊन लागले.उणे तापमान.. प्रचंड थंडी..हिमवादळे..यांना तोंड देत सर्वांची आगेकूच सुरू होती.
पण त्यांना यश मिळाले नाही.कांचनगंगा पासुन अवघ्या पाचशे फुटांपर्यंत उदय कोलवणकर पोहोचला होता.. पण हिमबाधेमुळे त्याला पुढचा प्रयत्न सोडावा लागला.चारुहास जोशी पण जवळपास पोहोचला होता..पण त्यालाही हिमदंशामुळे माघार घ्यावी लागली.
लौकिकार्थाने ही मोहीम जरी यशस्वी झाली नाही..तरी त्यातुन खुप गोष्टी साध्य झाल्या.याच अनुभवाच्या जोरावर नंतर १९९८ साली ह्रषिकेश जाधव आणि सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट वर पाऊल ठेवले.
☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
हाफ-पोलीस… — गुन्हेगारांचं परफेक्ट स्केच काढणारा आपला माणूस….!
आज आपण पोलीस खात्यातील एका अशा कर्तबगार माणसाला भेटणार आहोत जो पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतो.
CID मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल पण आज भेटूया एका खऱ्याखुऱ्या स्केच आर्टिस्टला.
हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव
हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत. त्यांनी आजवर काढलेल्या स्केचेसमधून तब्बल ४५० स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. आज जाणून घेऊया पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल.
कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे त्यांच्या मित्रपरिवारात हाफ-पोलीस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची लिस्ट जर बघितली तर त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही. गेल्या २५ वर्षांपासून ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत. या कामात त्यांचा हातांना विलक्षण देणगी लाभली आहे.
नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी. कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबालाही बसला होता. ७ वी इयत्तेत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती. पोटापाण्यासाठी ते नंबर प्लेट्स, बॅनर, इत्यादी रंगवण्याचं काम करायचे.
एकेदिवशी पोलीस स्टेशनमध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन मध्ये एक केस आली. GSK हॉटेल मध्ये हत्या झाली होती. हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता. नितीन यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, ‘’जर तुम्ही वेटरला बोलतं केलंत तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो.’’ पोलिसांनी मंजुरी दिली. नितीन यादव यांच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ ४८ तासात पकडला गेला. त्यावेळी ते १० वीत शिकत होते.
लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता. या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरु झाला. आजवर अनेक महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास कामात त्यांनी मदत केली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २०१३ चं शक्तीमील बलात्कार प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट अशा महत्वाच्या केसेसमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
त्यांचा कामातील हातखंडा दाखवणारा एक किस्सा पाहा. ज्यावेळी अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्यास बंदी होती. एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं. या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूम मधला हुबेहूब प्रसंग चितारला होता. हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं.
नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. ‘’काहीवेळा चित्र एवढं ‘परफेक्ट’ असतं की पीडीत मुलीला अश्रू अनावर होतात’’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते..
१० वर्षापूर्वी कॅन्सरसाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ते नुकतेच बरे होत होते तेव्हा एक बलात्काराची केस त्यांच्याकडे आली. या केसमध्ये मुलगी कर्णबधीर आणि मुकबधीर होती. तिच्याकडून माहिती काढणं हे जवळजवळ अशक्य होतं. यावर त्यांना एक मार्ग सुचला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शरीराच्या भागाचे जसे की चेहऱ्याचे, केसांचे, त्वचेच्या रंगाचे, जेवढे म्हणून चित्रांचे नमुने होते ते पिडीत मुलीच्या समोर ठेवले. मुलीने नमुन्यातील एकेक गोष्टींची निवड केली आणि गुन्हेगाराचा चेहरा तयार झाला. तो गुन्हेगार पुढील ७२ तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात होता.
त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून १६४ पुरस्कार मिळाले आहेत. पोलिसांना मदत करण्यासोबत ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. पोलीस खात्याशी निगडीत सगळ्यांनाच जीवे मारण्याची धमकी ही येतेच. याला नितीन यादवही अपवाद नाहीत. पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्या कामापासून लांब ठेवू शकला नाही.
२५ वर्षांपासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतलेला नाही पण मागील काही वर्षापासून पोलीस खाते स्वतःहून त्यांना पैसे देऊ करते.
बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते. एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सणकून कानाखाली देणार. त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे.
तर मंडळी अशा या पडद्यामागच्या हिरोचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच म्हणू शकतो की ‘तुमच्या कामाला प्रणाम !!’…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक आणि REBT… – भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
(म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे तटस्थपणे बघू शकू.) — इथून पुढे ..
सर्वसाधारणपणे मनुष्य आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आपापल्या नजरेने बघत असतो. त्यामध्ये तो आपले पूर्वसंस्कार, श्रद्धा आणि पूर्वानुभव मिसळून त्या घटनेकडे बघत असतो. त्यामुळे त्या घटनेपासून त्याला दुःख होण्याची शक्यता जास्त असते. Rebt मनुष्याला विवेक अर्थात विचार करायला सांगते. त्या विशिष्ट घटनेकडे बघताना आपण कोणताही पूर्वलक्षी प्रभाव न ठेवता त्या घटनेकडे वस्तूनिष्ठपणे पाहायला शिकविते. जेव्हा आपण कोऱ्या मनाने, शांत मनाने कोणत्याही घटनेकडे बघतो तेंव्हा मनुष्य अधिक सजगतेने त्या घटनेकडे बघू शकतो. आणि जेव्हा ‘मी’ विरहीत होऊन निर्णय घेतला जातो तेव्हा तो जास्तीत जास्त अचूक असतो.
Rebt आपल्याला आपल्या समजुती (beliefs) बदलायला सांगते. कोणतीही घटना आपल्याला कमीअधिक प्रमाणात भावनावश करते. भावना समजून घेतल्याचं पाहिजेत पण भावना बदलणे अवघड आहे म्हणून भावना बदलण्याच्या प्रयत्न न करता आपण आपले विचार बदलले तर घडणाऱ्या घटनेचे परिणाम बदलू शकतात. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय बरेच वेळा घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. विचारानुसार होणारी कृती ही अधिक लाभदायी ठरण्याची शक्यता जास्त असते.
आपले विचार सर्वस्वी हवामानावर अवलंबून नसतात. तसं असतं तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता घरात बसून राहिले असते. पण तसे तर होतं नाही. याचाच अर्थ आपले विचार हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतात. ते बहुतांशी स्वतंत्र असतात. खरंतर ते आपल्याच हातात असतात. बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा हे सुद्धा आपल्याच हातात असते. आपण ठरवलं तर आपले विचार आपण खात्रीपूर्वक बदलू शकतो. तसेच मोकाट विचारांना काबूत आणणे हे सुद्धा आपल्याला प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. भरकटणाऱ्या विचारांना थांबविणे म्हणजेच स्वतःला सावरणे होय. मनुष्य अस्वस्थ होतो तो त्याच्या विचारांमुळेचं आणि शांत होतो तो सुद्धा त्याचा विचारांमुळेचं. कोणते विचार निवडायचे याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते. प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारात होते आणि मग भौतिक रुपात. आजवर आपण जे पाहिले त्याची निर्मिती प्रथम विचारात झाली आहे नि मग प्रत्यक्षात झाली आहे. आपले अंतर्मन बघू शकत नाही पण आपण जी दृश्ये त्यास दाखवितो ती ते खरी मानते आणि तशी स्थिती ते आपल्या मनात निर्माण करीत असते. आपण जे विचार पेरीत असतो तेच अनंत पटीने वाढून परत येत असतात. एक फळात किती बिया आहेत हे आपण सांगू शकतो पण एका बीमध्ये किती फळ आहेत हे सांगणे कठीण असते. फक्त योग्य विचार निवडणे, ते प्रसारित करणे आणि त्यानुसार आचरण करणे जर मनुष्याला जमले तर आपण सर्व समस्यांवर मात करु शकतो. हे जग जसे आहे तसे आपल्याला दिसत नाही तर जसे आपले विचार असतात तसे ते आपल्या नजरेस दिसत असते.
समर्थ आपल्याला हेच ‘मानसशास्त्र’ थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. समर्थांची मांडणी त्या काळानुरूप म्हणजे थोडी अध्यात्मिक स्वरुपाची आहे. मनुष्य भक्तिमार्गात चालू लागला की त्याच्या अंतरंगात नकळत बदल होण्यास सुरुवात होते. विशुद्ध जाणिवेतून मनाच्या शोधाला रामनामातून आरंभ होतो. सद्गुरुकृपेमुळे मन अधिक सजग व्हायला सुरुवात होते. मनाला विवेकाचे अधिष्ठान लाभते. मनाला चांगल्या वाईटाची जाणीव होऊ लागते. ते स्वतःशी संवाद करु लागते. खरंतर त्याचे स्वतःशी द्वंद्व करु लागते. मनात चांगल्या वाईट विचारांची घुसळण सुरु होते. आणि मग विवेकाने मनुष्य चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला सुरुवात करु लागतो. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन मनुष्य नुसता विवेकी होत नाही तर मनुष्यत्व ते देवत्व असा प्रवास करण्यास उद्युक्त होतो. हा प्रवास बहुतांशी अंतर्गत असतो. कारण मूलभूत बदल मनातच होत असतात आणि तेच गरजेचं असतं. बरेच वेळेस अंतरंगातील बदल बाह्यरूपात प्रतिबिंबित होतातच असे नाही. मनाच्या श्लोकात उत्तम भक्त (अर्थात उत्तम पुरुषाची) लक्षणे सांगितली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकास, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी अनेक सूत्रे सुद्धा अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आढळतात. ‘
मनुष्याला नेहमी सुख मिळावे असे वाटत असते. पण त्याला सुख मिळतेच असे नाही किंवा खरे सुख म्हणजे काय हे त्याला कळतेच असे नाही. समर्थानी सांगितलेले ह्याचे एकमेव कारण म्हणजे देहबुद्धी. ही देहबुद्धी नष्ट करण्यासाठी ‘विवेका’ची कास धरण्याची समर्थ शिकवण देतात. ‘विवेक’ म्हणजे विचारांच्या प्रक्रियेला लाभलेली विचारांची खोली. विचाराला स्वच्छ जाणिवांची खोली लाभली की विवेक जन्मतो. विवेक जगण्याची धारणा देतो. विवेकाने क्रिया पालटते. ‘विवेक’ आणि ‘प्रयत्न’ हे समर्थांचे विशेष आवडते शब्द आहेत. मनाच्या श्लोकांत त्यांनी ‘विवेक’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. ‘विवेके सदा सस्वरूपी भरावे'( १०,१४५) ‘विवेके देहबुद्धी सोडून द्यावी'(१२), ‘विवेके कुडी कल्पना पालटीजे'(४०), ‘विवेके तजावा अनाचार हेवा'(६९), ‘विवेके क्रिया आपली पालटावी'(१०५), ‘विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा'(१०६), ‘विवेके अहंभाव याते जिणावें'(११०), ‘विवेके अहंभाव हा पालटावा'(११५), ‘विवेके तये वस्तूची भेटि घ्यावी'(१७०), ‘विवेके विचारे विवंचुनी पाहे'(१७३), इ. अशा प्रकारे विविध पद्धतीने समर्थ आपल्याला विचार करायला सांगतात.
(* कंसातील क्रमांक हे मनाच्या श्लोकांचे आहेत)
मनुष्याने कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत नितीमूल्यांची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्या प्रगतीस काही अर्थ नाही. मनाचे श्लोक मनुष्याला सामान्य मनुष्य ते देव, अर्थात रामाच्या पंथाकडे नेतात. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला नि त्याप्रमाणे आचरण केले तर मनुष्य देवत्वास नक्की पोहचू शकेल यात शंका नाही. समर्थ शेवटच्या श्लोकांत तसे अभिवचन देत आहेत.
मनाची शते ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी॥२०५।।
अर्थात, मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने मनुष्याची अंशतः का होईना उन्नतीच होते असे फलश्रुती वाचल्यावर आपल्या लक्षात येते.
आतापर्यंत आपण दोन्ही पद्धती स्थूलमानाने अभ्यासल्या आहेत. पण प्रत्येक मानसोपचार पद्धतीची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक जाणकार त्याची प्रतवारी वेगवेगळी करु शकेल. सामान्य मनुष्याने मनाच्या श्लोकांकडे पारंपरिक आणि धार्मिक भावनेने न बघता एक विचारपद्धती अर्थात software म्हणून बघितले तर ते अधिक उपयुक्त (user friendly) होईल असे वाटते. तसेच rebt पद्धती ही सुद्धा योग्य प्रकारे आचरणात आणली गेली तर ती सुद्धा उपयुक्त अशीच आहे. आज सारे जग त्याचे चांगले परिणाम अनुभवत आहे. REBT पद्धती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे.
इथे एक गोष्ट थोडी परखडपणे सांगावीशी वाटते की आपल्या संस्कृतीतील गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आदि ग्रंथ हे मनुष्याचा आत्मिक विकास साधण्यासाठी निर्माण झालेले प्रमाण ग्रंथ आहेत. संतांनी स्वतः ती उच्चस्थिती प्राप्त केली आणि अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे असा शुद्ध हेतू उरात ठेऊन ह्या सर्व ग्रंथाची निर्मिती केली आहे. त्या ‘पोथ्या’ नाहीत. आपण त्यांना वस्त्रात गुंडाळून कोनाड्यात ठेवले ही आपली घोडचूक आहे. ‘जीवन जगण्याची कला’ शिकविणारी पाश्चात्य लेखकांची अनेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्व तत्वज्ञान आपल्या गीतेमधील, ज्ञानेश्वरीमधील आणि दासबोधातीलच आहे. असे असूनही आजच्या तरुणपिढीला आपण मनाचे श्लोक, गीता, दासबोध वाचायला शिकवीत नाही आणि प्रवृत्तही करीत नाही. सध्या समाजात हे सर्व ग्रंथ साठीनंतर वाचायचे असतात असा गोड गैरसमज बेमालूमपणे पसरविला जात आहे. एकीकडे आपण अशा ग्रंथांची पारंपरिक पद्धतीने पारायणे करतो पण त्या ग्रंथातील ‘खरे ज्ञान’ अथवा ‘मर्म’ आत्मसात करुन पुढील पिढीस ते आचारण्यास उद्युक्त करीत नाही. ही खरी शोकांतिका आहे. कोणतेही तंत्र/ शास्त्र वापरात आले तर त्याचा खरा उपयोग आहे. ज्याप्रमाणे नदी म्हटली की वाहतीच असणार तसे आपले सर्व धार्मिक ग्रंथ हे लोकजीवन समृद्ध होण्यासाठी अमलात/ आचरणात आणण्याचे ग्रंथ आहे. ‘नराचा नारायण’ करण्याची क्षमता ह्या सर्व ग्रंथांमध्ये आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे. तेव्हा अधिक सजग होऊन हे ग्रंथ तरुणपिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्याला हाती घ्यावे लागेल.
वरील चिंतनातून साधकांनी / अभ्यासार्थीनी मनाचा अभ्यास अधिक तरलतेने करावा आणि अनंताच्या पंथाकडे सुरु झालेल्या जीवनप्रवासाचा ‘आनंद’ घ्यावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन माझ्या लेखनास विराम देत आहे.
(साधकाने समर्थांच्या विचारांच्या साहायाने आपल्या मनाचे संश्लेषण….अर्थात संधारणा कशी करावी? हे नित्यपाठाने होऊ शकेल की आधुनिक मानसशास्त्रात ‘विवेकनिष्ठ उपचार पद्धती… REBT उपचाराला पूरक म्हणून त्याचा उपयोग करावा? .. हा प्रश्न एकाने विचारला.. आणि त्या अनुषंगाने… मनाचे नुसते विश्लेषण नको तर संश्लेषणही करण्याचे तंत्र साधकाला समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
मन म्हणजे काय ? ‘मन’ कसे असते ? ते खरंच असते का ? ते असते तर नक्की कुठे असते ? मनाचे कार्य काय असते ? मनुष्याला मनाचा नक्की काय उपयोग होतो ? मन इंद्रिय आहे की नाही ? असे अनेक प्रश्न मन हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येऊ शकतात. सामान्य मनुष्यापासून संतांपर्यंत, अरसिकांपासून रसिकांपर्यंत, बद्धापासून सिद्धापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीने मनाचा अभ्यास करतो आहे. पण यातील प्रत्येकाला मनाचा थांगपत्ता लागला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक संत, कवी, लेखक, तत्त्ववेत्ते, अभ्यासू वक्ते आदींनी ‘मना’वरील आपले विचार विविध प्रकारे शब्दबद्ध केले आहेत. आपल्याला हत्ती आणि चार आंधळे यांची गोष्ट ज्ञात आहे. त्यातील प्रत्येक आंधळा त्याच्या मतीगतीनुसार हत्तीचे वर्णन करतो. त्याचप्रमाणे इथेही प्रत्येकाने आपापल्या परीने मनाचे वर्णन केले आहे. त्याच्या त्याच्या परीने ते योग्य असेलही पण म्हणून ते पूर्ण आहे असे आपण नाही मानू शकत. ज्याप्रमाणे भगवंताचे पूर्णपणे वर्णन करणे कोणालाही शक्य झालेले नाही तसेच मनाचे देखील असावे. कारण गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मीच ‘मन’ आहे.
सर्व प्राणिमात्रांत भगवंताने मनुष्याला ‘मन’ आणि ‘व्यक्त होण्याची कला’ विशेषत्वाने प्रदान केली आहे. एका अर्थाने मनुष्याचे मन हेच मनुष्याचे प्रेरणास्त्रोत आणि त्याचवेळी शक्तीस्रोत देखील आहे.
“मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:”
मनुष्याचे मनच त्याच्याकडून सर्व काही करवून घेत असते आणि त्याचे बरेवाईट परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात. सर्व संतांनी मनाचा अभ्यास केलेला आहे. पण श्री समर्थांनी मनाचा केलेला अभ्यास अधिक सुस्पष्ट, सखोल आणि सूत्रबद्ध आहे असेच म्हणावे लागते. याला एकमेव कारण म्हणजे समर्थांनी लिहीलेले मनाचे श्लोक !! मनाचे श्लोक लिहिण्याआधी देखील समर्थांनी करुणाष्टकात मनाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे.
‘अचपळ मन माझे नावरे आवरीता।’
‘चपळपण मनाचे मोडीता मोडवेना।’
मनाच्या श्लोकांइतके मनाचे सूत्रबद्ध आणि वस्तुनिष्ठ विवेचन खचितच कोणत्या अन्य ग्रंथात केले गेले असावे. म्हणून मनाचे श्लोक’ हा प्राचीन आणि आधुनिक मानसशास्त्राचा संदर्भग्रंथ ( handbook ) ठरावा. मानवाने प्रगती केली ती प्रामुख्याने भौतिकस्तरावरील आहे. मनुष्याच्या अंतरंगात बदल करणे तर दूर पण मनुष्याच्या अंतरंगाची वस्तूनिष्ठपणे मांडणी करणे किंवा त्याचा सर्वांगीण अभ्यास करणे हे सुद्धा मनुष्याला पुर्णपणे शक्य झालेले नाही. मनाच्या श्लोकांची निर्मितीकथा तशी रंजक आहे. ती आपल्याला ज्ञात देखील असेल. पण ते एक निम्मित झाले असावे असे वाटते. समर्थांसारखा विवेकी संतमहात्मा कोणतीही गोष्ट प्रतिक्रियात्मक करेल हे काही मनाला पटण्यासारखे नाही.
मनाचा विषय आहे तर ‘मन’ म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. जरी मन मनालाही उमजत नसले तरीही मन म्हणजे एक सुजाणीव आहे असे आपण म्हणू शकतो. ज्यातून मानवी व्यक्तित्व प्रतिबिंबित होईल अशी जाणीव. मन म्हणजे व्यक्तित्वाचा सुघटित आकार आचारणात आणणे. कांद्याचा पापुद्रा काढता काढता कांदा संपतो. त्याचे ‘कांदेपण’ डोळ्यांतील पाण्यातून जाणवते. तसेच मनाच्या पापद्र्यांतून सर्वात शेवटी जी विशुद्ध निराकार जाणीव उरते, त्याला मन असे म्हणता येईल. ह्या काही मोजक्या व्याख्या आहेत. प्रतिभावंत लेखक ‘मन’ आणखी विविध प्रकारे मांडू शकतात.
मन ह्या विषयावर किंवा त्याच्या अभ्यासावर काही तज्ञांचे मतभेद असतील किंवा नसतीलही पण एक गोष्ट मात्र सर्व संतमहंतांनी आणि आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी एकमुखाने मान्य केली आहे ती म्हणजे जर मनुष्याला खरे सुख प्राप्त करायचे असेल तर त्याचा मुख्य रस्ता हा त्याच्या मनातूनच जातो. अर्थात मन प्रसन्न केल्याशिवाय मनुष्य सुखी समाधानी होऊ शकत नाही. मग ज्येष्ठ कवी भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी सहज म्हणून जातात.
“रण जिंकून नाही जिंकता येत मन।
मन जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”
(*वरील अवतरण अनुवादित आहे)
मनुष्याला कोणतेही सुख प्राप्त करायचे असेल, जीवन आनंदात जगायचे असेल त्याने प्रथम मन राजी करणे, मनाला जिंकणे अपरिहार्य ठरते. मनाला सोडून कोणतीही गोष्ट करणे शक्य नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज देखील म्हणतात,
“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”.
‘मन’ हा शब्द संतांनी फक्त मनुष्यापुरता संकुचित ठेवलेला नाही. मानवीमन, समाजमन, राष्ट्रमन असे विविध आयाम त्यांनी या मनास जोडले. भारतीय संतांनी मनाची व्यक्तिशः जडणघडण करण्याचा प्रयत्न तर केलाच पण समाजमन कसे खंबीर होईल आणि पर्यायाने राष्ट्र बलवान कसे होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि त्याप्रमाणे समाजाकडून कृती देखील करवून घेतली. ज्यांच्या मनाची ‘माती’ झाली आहे अशा लोकांच्या मने चैतन्याने भारुन, त्यांच्यात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवून त्यांच्याकडून गौरवशाली कार्य करवून एका अर्थाने इतिहास घडविण्याचा चमत्कार अनेक संतांनी आणि राजेमहाराजांनी केल्याचे वर्णन इतिहासात आहे. शालिवाहनाने ‘माती’तून सैनिक उभे केल्याचे वर्णन आहे. छत्रपतींनी सामान्य मावळ्यांमधून कर्तव्यनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वराज्यसेवक निर्माण केले. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.
समर्थांनी विपुल साहित्य लिहून ठेवले आहे. पण समर्थांची ‘प्रस्थानत्रयी’ म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या तीन ग्रंथांमध्ये ‘मनाचे श्लोक’, ‘दासबोध’ आणि ‘आत्माराम’ यांचा समावेश आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे समर्थांच्या अध्यात्माच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम म्हणून ‘मनाचे श्लोकच’ असतील यात बिलकुल संदेह नसावा. श्री. सद्गुरु गोंदवलेकर महाराज, श्री सदगुरु श्रीधरस्वामी आणि अनेक समकालीन संतांनी मनाच्या श्लोकांचा यथोचित गौरव केला आहे. आदरणीय विनोबाजी तर मनाच्या श्लोकांना ‘सोन्याची तिजोरी’ असे म्हणतात. ह्यातील कौतुकाचा आणि श्रद्धेचा भाग सोडला आणि आचरण सूत्रे म्हणून जरी ह्या मनाच्या श्लोकांकडे पाहिले तरी मनुष्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात बदल करण्याचे सामर्थ्य यामध्ये निश्चित आहे.
एकूण मनाचे श्लोक २०५ आहेत. शेवटचा आणि पहिला मंगलाचरणाचा श्लोक सोडला तर उरलेल्या २०३ श्लोकांत समर्थांनी फक्त मनाला उपदेश केला आहे. तसं पाहिलं तर मनाचे श्लोकाचे मर्म पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते.
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा।
गमू पंथ आनंत या राघवाचा।।१।।
वरील श्लोकाच्या शेवटच्या ओळीतच सर्व पुढील श्लोकांचे सार आले आहे. अनंत राघवाच्या मार्गावर चालणे याचा अर्थ ‘मनुष्यत्वाकडून देवत्वा’कडे प्रवास सुरु करणे असाच आहे. पण मानवी मनाचे अनेक कंगोरे साधकांना समजावेत म्हणून समर्थांनी या श्लोकांचा विस्तार केलेला असावा असे म्हणायला जागा आहे. उपलब्ध संतसाहित्यातील वर्णनाप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवास ‘मनुष्यत्व ते पशुत्व’ (राक्षसत्व) किंवा ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा होत असतो. मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट हे जीवाला परमात्म्याची भेट घडवून देण्यातच आहे असे सर्व संत सांगतात. पण मनुष्य स्वभावतः स्खलनशील प्राणी आहे. म्हणून मनुष्याला जर देवत्वाकडे न्यायचे असेल तर विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे मानवी मनाला शिकवण देणे. एकदा का मन कह्यात आले की जगातील कोणतीही गोष्ट मनुष्याला असाध्य नाही.
ज्याप्रमाणे भारतीय संतांनी, तत्ववेत्त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला तसा पाश्चात्य चिंतकांनी देखील मानवी मनाच्या एकूणच पसाऱ्याचा अभ्यास केला. यामध्ये सिगमंड फ्रॉइड आणि अल्बर्ट एलिस या प्रमुख मानसशास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल. सध्या जगभर प्रचलित असलेली मान्यताप्राप्त मानसोपचार पद्धती म्हणून विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र पद्धती (Rational Emotive Behavioral Therapy ) प्रसिद्ध आहे. आयुष्य हे एक मर्यादित घटनांची मालिका असते. घटना घडत असतात आणि त्या घडतच राहणार. पण सामान्य मनुष्य घडणाऱ्या छोट्यामोठ्या घटनांना समस्येचं लेबल चिकटवून टाकतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक घटनेला समस्या मानणं हीच खरी आणि मूळ समस्या आहे. आपल्या आयुष्यात घटना घडू लागल्यावर आपल्याला वाटते की त्या घटनेतच समस्या आहे. परंतु समस्येचं वास्तव्य आपल्याच डोक्यात असते. या मूळ गोष्टीपासून मात्र सर्व अनभिज्ञ असतात. म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे तटस्थपणे बघू शकू.