मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ६१ ते ७०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ६१ ते ७०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । 

भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१ ॥ 

*

सकल चरांचा देह यंत्र आत्म्याचे 

सुकृतानुसार कर्म करुनी घ्यायाचे

ईश्वरमाया चालविते कायायंत्राला

हृदयी तो स्थित राही कर्म करायाला ॥६१॥

*

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । 

तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ ६२ ॥

*

सर्वभावाने शरणागत परमेशा होई

तया कृपेने परम शांती स्थान प्राप्त होई ॥६२॥ 

*

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‍गुह्यतरं मया । 

विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३ ॥ 

*

गुह्यात गुह्यतम श्रेष्ठ ज्ञान कथिले पार्था मी तुजला

विचार अन्ती कर्म करावे स्वीकार जे तव इच्छेला ॥६३॥

*

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । 

इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्‌ ॥ ६४ ॥ 

*

तू मजसि अतिप्रिय यास्तव हितवचन मी सांगेन तुला

गुह्यतम सकल ज्ञानामधील परम रहस्य कथितो तुजला ॥६४॥

*

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । 

मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५ ॥ 

*

माझ्याठायी गुंतवुनी मन भक्त अनन्य होई तू माझा

पूजन करी मम प्रणाम करी मज जन्म धन्य हो तुझा

करशील याने प्राप्त मजला सत्य आहे माझे वचन

अतिप्रिय मजला तू असशी जाणौन घेई हे अर्जुन ॥६५॥

*

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । 

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ ६६ ॥ 

*

धर्म सर्व त्यागूनीया तू केवळ मज येई शरण

शोकमुक्त हो पापमुक्त करुनी मोक्ष तुला मी देईन ॥६६॥

*

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । 

न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७ ॥ 

*

अभक्त असुनी तपरहित जो त्यास ज्ञान हे देउ नको

मनी ज्यास ना ऐकायाचे त्यास शास्त्र हे कथू नको

अनिष्ट दृष्टी माझ्या ठायी त्यास कदापि बोलू नको

अपात्र तयासी दिव्य ज्ञान हे पार्था कधिही देऊ नको ॥६७॥

*

य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति । 

भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८ ॥ 

*

परमभक्त माझा कथील गीतारहस्य मद्भक्तांसी

वचन माझे माझी प्राप्ती निःसंशये होईल तयासी ॥६८॥

*

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । 

भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९ ॥ 

*

कार्यमग्न मम प्रिय कार्ये तो श्रेष्ठ अखिल जगती

तयापरीस मज अधिक कोणी प्रिय ना या जगती ॥६९॥

*

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । 

ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७० ॥ 

*

धार्मिक गीताशास्त्र संवाद उभयांमधील आपुला

श्रद्धेने जो पठण करील पोहचेल कार्य मजला

यज्ञाद्वारे ज्ञानाच्या लाभेल तयाची अर्चना मला

घोषित करितो मी धनंजया होईन प्राप्त मी तयाला ॥७०॥ 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (उत्तरार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(उत्तरार्ध)

नमस्कार मैत्रांनो, 

कविराज भूषण यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने आणि शिवरायांविषयी असलेल्या अतीव आदराने रचलेल्या काव्याचे शिवराय आणि त्यांच्या समस्त दरबारी मंडळींना खूपच कौतुक होते. छत्रपतींनी या अभूतपूर्व काव्यरचना निव्वळ ऐकल्याच नाही तर या राजकवीचा वेळोवेळी उचित बिदागी सहित मानमरातब केला. बघू या त्यातीलच कांही निवडक काव्य रचना     

शिवरायांच्या युद्धांचे सजीव चित्रण: 

गनीमाशी शिवरायांच्या सेनेने केलेल्या घनघोर युद्धाचे सजीव वर्णन करतांना भूषण यांच्या लेखणीचे जणू टोकदार भाले होतात. शब्दांकन असे आहे जणू तोफेचे गोळे आग ओकताहेत. हे वीररसपूर्ण, जोमदार काव्य वाचतांना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. युद्धाच्या उत्साहाने मुसमुसलेल्या सैन्याचे कूच, रणांगणात रणभेरीचा शंखनाद, शस्त्रांची चकमक, शूरवीरांचे मर्दानी शौर्य आणि भ्याडांची भयावह अवस्था इत्यादी दृश्यांचे चित्रण कवीने अतिशय प्रभावीपणे केले आहे. खालील काव्यांशात शिवाजी राजांच्या चतुरंगिणी सेनेच्या प्रस्थानाचे अत्यंत मनोहर चित्रण आहे. कविराज म्हणतात:

साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीतन चलत है,

भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं|

ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत है,

तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिमि, थारा पर पारा पारावार यों हलत है॥ 

अर्थ: ‘सर्जा’ या उपाधीने सुशोभित झालेले अत्यंत श्रेष्ठ आणि वीरवर शिवाजी राजे आपली चतुरंगिणी सेना (हत्ती, रथ, घोडदळ आणि पायदळ हे सैन्याचे चार विभाग असलेली सेना) सज्ज करून आणि शरीराच्या प्रत्येक अंगात उत्साह निर्माण करून युद्ध जिंकण्याची ईर्षा बाळगून होते. त्यावेळी ढोल-ताशे आणि नगारे गर्जत होते. शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मदमस्त हत्ती होते आणि युद्धासाठी उत्तेजित झाल्यामुळे हत्तींच्या कर्णरंध्रातून अत्यधिक मद नदी-नाल्यांप्रमाणे वाहत होता.जगाच्या कानाकोपऱ्यात दहशत पसरली होती, कारण शिवाजीचे प्रचंड सैन्य सर्वत्र पसरले होते. हत्तींच्या धक्क्याने डोंगरही उन्मळून पडत होते. प्रचंड सैन्याच्या हालचालीमुळे बरीच धूळ उडत होती. अति धूळ उडल्यामुळे आकाशात चमकणारा सूर्य ताऱ्यासारखा दिसत होता आणि समुद्र ताटात ठेवलेल्या पाऱ्यासारखा थरथरत होता.

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अन भूषण यांची काव्यप्रतिभा:

आता वळू या कविराज भूषण यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध अशा काव्य रचनेकडे! दिनांक ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या एकमेवाद्वितीय राजसी सोहळ्याचे साद्यन्त आणि बारीक सारीक तपशिलांसह वर्णन अनेकानेक तऱ्हेने करण्यात आले आहे. या लेखाच्या विषयाला अनुषंगून आपण बघू या की कवी भूषण सिंहासनाधीश शिवरायांचे कसे ओजस्वी वर्णन करतात. हे हुबेहूब वर्णन वाचतांना कवीची सौंदर्यदृष्टी, उत्तुंग साहित्यिक आणि बौद्धिक भरारी बघून केवळ त्यांच्या काव्यप्रतिभेला त्रिवार मुजरा करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हां सिंहासनावर आरूढ झाले, त्या प्रसंगी त्यांची स्तुती करताना कविराज भूषण यांनी पुढील छंदकाव्य राजदरबारात सादर केले होते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वीररसाने भारलेले, उत्कट आणि मार्मिक वर्णन केवळ थोर कवी भूषण यांच्यासारखे त्यांचे मनस्वी प्रशंसकच करू शकत होते. एकापेक्षा वरचढ एक अशा सुंदर उपमालंकारांनी सजलेल्या आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित प्राचीन संदर्भ देत, कवी रसमय वर्णन करतात की छत्रपती म्लेंच्छांवर कसे भारी पडले!  

इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है |

पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर राम द्विजराज है |

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर जैसे मृगराज है |

तेज तम अंस पर कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर सेर सिवराज है ||

अर्थ: ज्याप्रमाणे जंभासुरावर इंद्र, समुद्रावर वडवानल, रावणाच्या अहंकारावर रघुकुल राजा (श्रीराम), मेघांवर पवन, रतीचा पती म्हणजे कामदेवावर शंभू, सहस्त्रबाहू (कार्तवीर्य) वर ब्राह्मण राम अर्थात परशुराम, वृक्षांच्या खोडांवर दावानल, हरिणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर मृगराज (सिंह), तिमिरावर प्रकाशकिरण आणि कंसावर कृष्ण भारी पडतात आणि त्यांच्यावर आरूढ होतात, तसेच म्लेच्छ वंशावर शिवाजी व्याघ्रासमान भारी पडतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करतात.    

छंदबद्ध आणि अलंकारिक काव्य

रसाळ परिपोषक असे अर्थपूर्ण छंदबद्ध काव्य रचतांना ते बहारदार तर होतेच, पण अतिरम्य गेय असे काव्य निर्माण झालेले दिसून येते. त्यांच्या काव्यात दोहा, कवित्त, सवैया, छप्पय इत्यादी तत्कालीन छंदांचा प्रामुख्याने उपयोग केल्या गेला आहे. रीतिकालीन कवींचे प्रमुख बलस्थान म्हणजे अलंकारिक भाषा! भूषण यांची काव्यसुंदरी एका पेक्षा एक आकर्षक अलंकारांनी सजलेली आहे. ते अपरिमित सौंदर्य बघतांना रसिक मुग्ध होतात. त्यांच्या काव्यात सर्वच अलंकारांची रेलचेल आहे. अर्थालंकारांपेक्षा शब्दालंकारांना प्राधान्य आहे. त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे यमक अलंकारांनी नटलेले हे एक उदाहरण बघा!

ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।

कंद मूल भोग करैं कंद मूल भोग करैं, तीन बेर खातीं, ते वै तीन बेर खाती हैं। 

भूषन सिथिल अंग भूषन सिथिल अंग, बिजन डुलातीं ते वै बिजन डुलाती हैं।

‘भूषन’ भनत सिवराज बीर तेरे त्रास, नगन जड़ातीं ते वै नगन जड़ाती हैं॥

महत्वाचे शब्दार्थ 

(१) ऊंचे घोर मंदर – उंच विशाल महाल/उंच विशाल पर्वत 

(२) कंद मूल – राजघराण्यात खाल्ले जाणारे चविष्ट कंद-मूळ / जंगलातील कंद मुळे 

(३) तीन बेर खातीं – तीन वेळा खात होत्या/ तीन बोरे खातात 

(४) बिजन – पंखे/ एकाकी 

(५) नगन – नग – हिरे मोती इत्यादी रत्ने/ नग्न

कवीराज भूषण म्हणतात: “ज्या शत्रूंच्या स्त्रिया ज्या पूर्वी उंच-उंच-विशाल राजमंदिरांत राहत होत्या त्या आता शिवरायांच्या भीतीमुळे आणि आपला जीव वाचवण्यासाठी भयंकर पर्वतांच्या गुहेत लपून राहतात. ज्या महालातील स्वादिष्ट पदार्थ खात होत्या, त्या आता जंगलात भटकत जंगली कंद, मुळे आणि फळे खाऊन जगतात. जडजवाहिराने जड झालेल्या दागिन्यांच्या वजनामुळे ज्यांचे अंगप्रत्यंग शिथिल असायचे, त्यांचेच अंगांग आता भुकेने कासावीस होत आलेल्या अशक्तपणामुळे शिथिल झाले आहे. ज्या राजस्त्रियांवर शीतल पंखे डुलत असत, त्या आता निर्जन जंगलात एकट्या फिरतात. भूषण म्हणतात, एकेकाळी ज्या मुघल स्त्रिया अभिमानाने हिरे मोती अन विविध रत्न यांनी जडवलेले दागिने घालून मिरवीत असत, त्या आता वस्त्रहीन अवस्थेत हिवाळ्याच्या भीषण शीतकालात थर थर कापत असतात.

स्वाभिमानी महाकवि भूषण

शिवरायांच्या दरबारी रुजू असलेले महाकवि भूषण अत्यंत स्वाभिमानी होते. त्याचेच एक उदाहरण! एकदा दुसऱ्या राज्याचा एक राजा शिवरायांच्या दरबारी आला. कवींचे शिवराय आख्यान ऐकून तो खूपच प्रभावित झाला. तो भूषणला आग्रह करीत म्हणाला, ‘तुम्ही माझ्या दरबारात येऊन माझ्यावर प्रशंसात्मक काव्य करा.” कांही दिवसांनी भूषण त्या राजाच्या दरबारी गेले आणि त्या राजाच्या प्रशंसात्मक काव्यग्रंथातील कांही अंश त्यांनी वाचून दाखवले. सर्वांनी त्यांची स्तुती केली. तेव्हां तो अहंकारी राजा म्हणाला,”या तीन लाख सुवर्ण मुद्रा घ्या, इतके अधिक मानधन देणारा राजा या देशात तुम्हाला कुठेही भेटणार नाही.” भूषण त्याच्या अहंकाराने व्यथित होऊन गप्पच होते. राजा त्यांना म्हणाला, “याहून अधिक सुवर्णमुद्रा हव्या असतील तर तसे सांगा, मी देईन.” कविराजांनी ती सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली राजाला परत केली आणि त्या गर्विष्ठ राजाला म्हणाले, “तुम्ही माझ्या काव्याची कदर केली नाही. तुम्हाला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे होते. तुम्ही माझा आणि माझ्या कवितेचा घोर अपमान केला आहे.” राजाला तेव्हां आपली चूक कळली व त्यांने कवींची क्षमा मागितली अन आपल्या दरबारी रुजू होण्याची विनंती केली. पण स्वाभिमानी कवी भूषण तडक त्या राजाच्या दरबारातून थेट शिवछत्रपतींच्या दरबारी परतले!   

भूषण यांच्या अद्वितीय कवितेमध्ये राष्ट्रीय चेतना ओसंडून वाहत असते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय भावनेने भारलेले कवी आहेत.महाकवी भूषण यांचे हिंदी साहित्यात अनोखे स्थान आहे. रत्नांचा खच पडलेला असतांनाही जसा कोहिनूर आपल्या लखलखणाऱ्या तेजाने उठून दिसतो, तद्वतच रीतिकालात शृंगार आणि हास्यरसाची प्रचुर साहित्य निर्मिती करणाऱ्या कवींच्या गराड्यात कविराज भूषण आपल्या आगळ्यावेगळ्या वीररसाने ओतप्रोत कवितेमुळे अजरामर झालेले आहेत. आपल्या जाज्वल्य लेखनातून त्यांनी तत्कालीन असहाय्य हिंदू समाजाला शौर्याचे धडे शिकवले आणि हिंदू संस्कृतीच्या ऐश्वर्याची नव्याने ओळख पटवून दिली. त्यांचे काव्य निःसंशयपणे राष्ट्राचा अमर वारसा आहे आणि तो जपून ठेवणे आपले परम कर्तव्य आहे. 

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ?

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीड मध्ये इंटरनेटचा वापर होतो. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले की तुम्ही त्याला ५-६ डिव्हाइस आरामत जोडू शकता. काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात. तुम्ही कसा प्लान घेताय त्यावर ते अवलंबून असतं.

मुख्य म्हणजे वायफाय वापराला जातो तो रात्री. कारण चित्रपटांपासून ते सीरिजपर्यंत सगळेजण टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला तोच निवांत वेळ असतो. त्यामुळे बहुतेक घरात रात्रंदिवस वायफाय राउटर सुरु असतो. त्यामुळे जवळपास सगळेच जण वायफाय सुरुच ठेवून झोपतात. पण हे अत्यंत चुकीचं असून, यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे.

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे?

१) जर घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटर मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतं.

२) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात रोग उद्भवू शकतात जे धोकादायक आहेत आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

४) वाय-फाय रेडिएशनच्या सततच्या संपर्कामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेट वापरतात त्यांच्यात वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत शुक्राणूंची गती कमी होतेय.

४) २०१५ च्या अभ्यासात वाय-फायच्या संपर्कात असलेल्या सशांमध्ये हृदयाच्या लय आणि रक्तदाबातील बदल आढळून आले आहेत. हृदय व रक्तवाहिन्यांवरही या रेडिएशनचा प्रभाव पडतो जो हानिकारक आहे.

५) रात्री वायफाय बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.

६) रात्री वायफाय बंद केल्याने विजेची बचत होते.

७) रात्री वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.

अशा पद्धतीने रात्रभर वायफाय सुरु ठेवून तुम्ही त्याच्या संपर्कात झोपत असाल तर नक्कीच गंभीर समस्यांना सामोर जाव लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणाऱ्या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल, तर वायफाय राउटर वापरल्यानंतर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. किंवा झोपताना तरी वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा.

माहिती संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण. 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (पूर्वार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(पूर्वार्ध)

महाकवी भूषण (१६१३ – १७१५) हे ‘रीतिकाल’ मधील प्रमुख हिंदी कवी गणले जातात. जेव्हा इतर कवी शृंगाररसपूर्ण काव्य रचत होते, तेव्हा भूषण यांनी वीररसाने ओतप्रोत रचना करून स्वतःला सर्वांपेक्षा वेगळे सिद्ध केले. कवी भूषण मोरंग, कुमाऊं, श्रीनगर, जयपूर, जोधपूर, रेवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल इत्यादींच्या आश्रयाखाली राहिले, परंतु त्याचे आवडते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा छत्रसाल हेच होते.

महाकवी भूषण मूळचे टिकवापूर या गावाचे रहिवासी होते असे मानल्या जाते. हे गाव आजच्या उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातल्या घाटमपूर तालुक्यात स्थित आहे. त्यांचे दोन भाऊ व्यापमणी आणि मतिराम हे देखील कवी होते. त्यांचे मूळ नाव ज्ञात नाही, मात्र ‘शिवराज भूषण’ या ग्रंथाच्या खाली दिलेल्या दोह्याचा संदर्भ जोडला तर, चित्रकूटचे राजे हृदय राम यांचा मुलगा रुद्र शाह याने त्यांना मानाने ‘भूषण’ ही उपाधी दिलेली होती. त्यांच्या उत्तुंग साहित्याला शोभेल अशीच ही पदवी आहे असे वाटते.  

कुल सुलंकि चित्रकूट-पति साहस सील-समुद्र।

कवि भूषण पदवी दई, हृदय राम सुत रुद्र॥ 

भूषण हे आपल्या भावांसोबत राहत असत. एकदा त्यांनी जेवतांना आपल्या भावजयीला मीठ मागितले. भावजयीने हे मीठ विकत घेण्यापुरते पैसे कमावून आणा, अशी त्यांची निर्भत्सना केली. ती जिव्हारी लागल्याने हा स्वाभिमानी कवी घर सोडून निघून गेला. (पुढे राजकवी झाल्यावर त्यांनी आपल्या भावजयीला १ लाख रुपयांचे मीठ पाठवून दिले असे म्हटल्या जाते.) कित्येक राजांच्या दरबारी राहिल्यानंतर ते पन्नानरेश राजा छत्रसाल यांच्याकडे राजकवी म्हणून रुजू झाले, तेथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयास गेले. कांही वर्षानंतर छत्रसाल महाराजांकडे ते परत गेले. परंतु त्यांचे मन तिथे लागेना अन ते शिवरायांच्या दरबारात परतले ते कायम त्यांच्याच सेवेशी एकनिष्ठ राहण्यासाठी! खरे तर इतक्या राजांच्या दरबारी चाकरी करूनही ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल या दोनच राजांचे खरे प्रशंसक होते. त्यांनी स्वतःच आपल्या काव्यात याची कबुली दिली आहे, ती अशी-

और राव राजा एक मन में न ल्याऊं अब।

साहू को सराहों कै सराहौं छत्रसाल को॥

इसवी १७१५ मध्ये कवी भूषण मृत्यू पावले.  

कवी भूषण यांची साहित्य संपदा: 

विद्वान मंडळी मानतात की शिवराजभूषण, शिवाबावनी, छत्रसालदशक, भूषण उल्लास, भूषण हजारा आणि दूषनोल्लासा असे सहा ग्रंथांचे लेखन कवी भूषण यांनी केले आहे. परंतु यांच्यापैकी फक्त शिवराज भूषण, छत्रसाल दशक आणि शिवाबावनी हेच काव्य ग्रंथ आज उपलब्ध आहेत. कविराज यांनी शिवराजभूषणमध्ये प्रचुर अलंकारिक काव्य, छत्रसाल दशकमध्ये छत्रसाल बुंदेलाचे पराक्रम, दानशीलता आणि शिवाबावनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले आहेत.

‘शिवराज भूषण’ हा एक विशाल काव्यग्रंथ असून त्यात ३८५ पद्य (काव्ये) आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे आणि पराक्रमाचे ओजस्वी वर्णन करणाऱ्या शिवाबावनीमध्ये ५२ कविता आहेत. बुंदेला शूर छत्रसालच्या शौर्याचे वर्णन ‘छत्रसाल दशक’ मधील दहा कवितांमध्ये केले आहे. त्यांचे संपूर्ण काव्य वीररसाने, चैतन्य तेजोमय गुणांनी आणि जोमाने भारलेले आणि रसरसलेले आहे. या काव्यांत महानायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि खलनायक आहे मुघल बादशहा औरंगजेब. औरंगजेबाप्रती त्यांचा हा तीव्र विरोध जातीच्या वैमनस्यावर आधारित नाही तर एका जुलमी आणि नृशंस शासकाच्या दुष्कृत्यांविरुद्ध आहे.

रीतिकाव्याची सर्वात महान उपलब्धी होती हिंदीच्या एका सुसंस्कृत आणि सहृदय समाजाची निर्मिती. या काळात सांस्कृतिक आणि कलात्मक वैभवाने चरम सीमा गाठली होती. कलात्मक काव्य या काळात प्रचुर मात्रेत रचल्या गेले.वाकपटू कवींच्या माध्यमातून मुळातच गोड अशी ब्रज भाषा आणखीच रमणीय झाली. लवचिक, भावपूर्ण आणि लालित्यपूर्ण शब्दार्थांच्या अभिव्यक्तीमुळे ही राजस भाषा त्या काळातल्या कवी मंडळींची लाडकी ‘काव्य भाषा’ बनली. त्या काळात शृंगार रसाने परिष्कृत काव्य हे सर्वाधिक परिचित आणि रसिकमान्य होते.

भूषण यांच्या काव्यातील वैशिष्ट्ये:

मात्र या शृंगारिक वातावरणात भूषण यांचे मन रमेना. मुघलांचे हिंदूंवर होत असलेले निर्घृण अत्याचार ते सतत बघत होते. आपला समाज लाचार, बलहीन आणि चैतन्यशून्य झाला होता. म्हणूनच देशभक्तीची ज्योत जगवणे हेच आपले इतिकर्तव्य समजून कवी भूषण यांनी रीतिकालाच्या मळलेल्या वाटेवर चालण्याचे नाकारले. प्रवाहाविरुद्ध पोहत त्यांनी वीररसाने परिपूर्ण अशा काव्य रचना केल्या आणि अखिल आयुष्याचे तेच उद्दिष्ट ठेवले. त्यांच्या प्रत्येक कवितेची मूळ भावना शौर्याचे गुणगान करते. हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आणि त्यांच्या नायकांच्या अद्वितीय शौर्याचे वर्णन हेच त्यांच्या कवितेचं गमक आहे. भूषण यांची काव्य शैली त्यांच्या विषयास अत्यंत अनुकूल आहे, तसेच ओजपूर्ण आणि वीररसपूर्ण आख्यान मांडायला सर्वथा उपयुक्त आहे. प्रभावोत्पादक, प्रसंगात्मक चित्रमयता आणि सरस शब्दालंकार योजना भूषण यांच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ठे आहेत. या महान देशभक्त कवीने मुघलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि निराश झालेल्या हिंदू समाजात आशा निर्माण करून त्यांना संघर्ष करण्यास प्रोत्साहित केले. हा विषय मांडतांना त्यांनी छत्रपती शिवाजी आणि राजा छत्रसाल हे काव्य नायक निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल लिहितांना भूषण यांच्या लेखणीला हजारो धुमारे फुटलेले बघायला मिळतात. ‘शिवभूषण’ या काव्यग्रंथातील एक काव्य स्फुल्लिंग बघा. 

सबन के ऊपर ही ठाढ़ो रहिबे के जोग, ताहि खरो कियो जाय जारन के नियरे,

जानि गैर मिसिल गुसीले गुसा धारि उर, कीन्हों न सलाम, न बचन बोलर सियरे।

भूषण भनत महाबीर बलकन लाग्यौ, सारी पात साही के उड़ाय गए जियरे,

तमक तें लाल मुख सिवा को निरखि भयो, स्याम मुख नौरंग, सिपाह मुख पियरे॥’

औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांना जेव्हां सहा हजारी मनसबदारांच्या ओळीत स्थान देण्यात आले, तेव्हां या अपमानाने ते पेटून उठले. भर दरबारात ते क्रोधावेशाने औरंगजेबास दरबारात तक्रार करू लागले, त्या दृश्याचे चित्रण या रौद्ररसाने भरलेल्या काव्यांशात केले गेले आहे. 

अर्थ: मुघल दरबारात सर्वोच्च स्थानी उभे राहण्यास सक्षम असलेल्या सर्जा शिवाजीचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांना ते आसन दिलेले होते. औरंगजेबाच्या या अपमानजनक वागणुकीमुळे शिवाजी संतप्त झाले, त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला सलाम केला नाही आणि दरबाराच्या शिष्ठतेनुसार विनम्र शब्द देखील उच्चारले नाहीत. महाबली शिवाजी रागाने गर्जना करू लागले आणि त्याचे हे क्रोधायमान वर्तन पाहून मुघल दरबारातील सर्वांच्या मनात चलबिचल होऊन ते घाबरून किंकर्तव्यमूढ झाले. रागाने लाल झालेला शिवरायांचा चेहरा पाहून औरंगजेबाचा चेहरा काळवंडला आणि सैनिकांची तोंडे कमालीच्या भीतीग्रस्ततेने पिवळी पडली.

धर्मरक्षक शिवाजी महाराजांचे कवी भूषण यांनी केलेले काव्य वर्णन:

हिंदू धर्माच्या अतिरेकी द्वेषाने पछाडलेला मुघल बादशहा औरंगजेब जेव्हां हिंदू समाजावर, त्यांच्या धर्मावर आणि संस्कृतीवर घाला घालत होता, तसेच मुस्लिम धर्माची पाळेमुळे हिंदुस्तानात रुजवण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हां गो ब्राम्हण प्रतिपालक, हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणून छत्रपती शिवराय अखंड प्रयत्नशील होते.  त्याच संदर्भातील हे वर्णन बघा!

देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी,

गौरागनपति आप औरन को देत ताप आप के मकान सब मारि गये दबकी।

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी,

कासिहू ते कला जाती मथुरा मसीद होती सिवाजी न होतो तौ सुनति होत सबकी॥

अर्थ: संपूर्ण हिंदुस्थानात हिरवी फडकी ज्यावर चंद तारे कोरले आहेत अशी फडकी फडकताना दिसत होती. मोठमोठाले राजे मात्तब्बर राजे मुसलमानांचे मांडलिक झाले होते. साधू संतांची सिद्धी फळाला येत नव्हती तसेच तपश्चर्या कामाला येत नव्हती. अशावेळी कविराज भूषण गणरायाला लटक्या रागाने विचारतात: अहो गणराय आणि श्री गौरी तुम्ही खरे असुर संहारक परंतु तुम्ही देखील तुमच्या देवळात दडी मारून बसलात. अहो छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्याचे काम हाती घेतले नसते तर काशीची कला लयाला गेली असती, मथुरेत मशीद वसली असती आणि आम्हा सर्व हिंदूंना सुंता करून घ्यावी लागली असती!

भारतीय संस्कृतीचे जाणकार कविराज भूषण:  

हिंदूंना त्यांची हरवलेल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी कविराजांनी संस्कृतीचा उचित वापर केला. त्यांनी अनेक देवी-देवतांच्या कार्यांचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची गणना त्या महान देवी देवतांच्या कार्यांच्या श्रेणीत केली. शिवाजी महाराजांना धर्म आणि संस्कृतीचे प्रणेते म्हणून त्यांनी आपल्या काव्यात चित्रित केले. खालील ओळी त्याच्याच परिचयक आहेत.  

बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे राम-नाम राख्यो अति रसना सुघर में। 

हिंदुन की चोटी रोटी राखि है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में। 

मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में। 

राजन की हद्द राखी तेग-बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में॥ 

अर्थ: भूषण म्हणतात की महाराज शिवाजींनी आपल्या अफाट सामर्थ्याच्या जोरावर हिंदू धर्माचे रक्षण केले. औरंगजेबाला परास्त करून त्याने वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांना नष्ट होण्यापासून वाचवले आणि दुसरीकडे वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाचा प्रसार केला. याशिवाय त्यांनी हिंदू धर्माचे सार असलेल्या पुराणांचे रक्षण केले आणि रामनामाचे महत्त्वही अबाधित ठेवले. त्यावेळी हिंदूंची धार्मिक प्रतीके मुस्लिमांकडून नष्ट केली जात होती. त्यांनी हिंदूंना डोक्यावरील केसांच्या शेंड्या (शिखासूत्र) कापण्यापासून वाचवले आणि त्यांना उदरनिर्वाह देऊ केला. त्यांनी हिंदूंना त्यांच्या गळ्यात पवित्र जानवे (यज्ञोपवीत) आणि तुळशीमाळ घालण्याचे संरक्षण दिले. त्यांनी दिल्लीच्या पातशहाचे कंबरडे मोडले आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला. राजांच्या हातात देवतुल्य वरदहस्ताची शक्ती होती, अर्थात जो कोणी त्यांच्या आश्रयास गेला, त्याला त्यांनी आपल्या पंखांखाली घेतले. या महान राजाने हिंदू राजांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण केले आणि आपल्या तळपत्या तलवारीच्या बळावर देवस्थानांचे रक्षण केले. इतकेच नव्हे तर शूरवीर शिवाजी राजाने प्रत्येक घराघरात स्वधर्म (हिंदू धर्म) अबाधित राखला. 

उत्तरार्धात कविराज भूषण यांच्या अशाच काही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अशा काव्य रचना बघू या.  

– क्रमशः भाग पहिला (पूर्वार्ध)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रामदासी झरे…”  – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “रामदासी झरे”  – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

सगळ्यांना दासबोध आणि मनाच्या श्लोकांपुरतेच माहीत आहेत समर्थ रामदास !

पण त्यांची स्वराज्यासाठीची कामगिरी फारशी कोणाला माहीत नाही.

संन्यासी, एक भगवी छाटी, कमंडलू, काखेतील कुबडी आणि समर्थ लंगोट, एव्हढीच त्यांची संपत्ती..

स्नानाचे काय? झोपायचे कुठे? समर्थांनी हा प्रश्न सोडवतानाच महाराजांसाठी सैन्य तयार केले.

समर्थांनी गावोगाव मारुती मंदिरांची स्थापना केली. यातील बहुतेक मंदिरांमध्ये तळघरे आणि भुयारे आहेत. नाथमाधवांच्या कादंबऱ्यात याचे वर्णन आढळते.

प्रत्येक मंदिराला लागूनच एक व्यायाम शाळा. हनुमानाची उपासना म्हणजेच बलदंड शरीर, हा मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला.

गावोगाव तरुण पोरे या आखाड्यात घुमू लागली. दंड बैठका, फरी गदगा, ढाल तलवार शिकू लागली. महाराजांचा मावळा बलदंड आणि शस्त्रनिपुण होत होता.

पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत धावत जायचे आणि नंतर रात्रभर लढत गड गाठायचा. पावन खिंड लढवायची. ही काटकता आणि ताकद याच आखाड्यात तयार झाली.

बजरंगबलीकी जय!

रामदासी झरे हा त्यांचा दुसरा अद्भुत खेळ.

आम्ही गोव्याला जात असताना प्रधानगुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. गाडी बंद करून सगळ्यांना बाजूच्या झाडीच्या बाजूला उभे केले, आणि विचारले, “काही ऐकू येतंय का?”

गाडीच्या आवाजानी आमचे कान बधीर झाले असावेत. काहीच ऐकू येईना. ते आम्हाला त्या झुडपांच्या मागे घेऊन गेले.

अहो आश्चर्यम्….

हायवेवरील त्या झुडुपांच्या मागे एक दोन फूट रुंदीचा खळाळून वाहणारा स्वच्छ पाण्याचा झरा होता.

हाच तो रामदासी झरा. सगळ्या महामार्गांवर दर बारा कोसांवर समर्थांनी असे झरे शोधले आहेत, तयार केले आहेत. संन्याशांना स्नानसंध्या करायला आणि राजांच्या फौजेला कूच करत असताना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारे, बारमाही खळाळून वाहणारे रामदासी झरे. आजही हे महाराष्ट्राचे वैभव खळाळून वहात आहे.

माहितगाराशिवाय कळणार नाहीत, असे रामदासी झरे. बहिर्जीच्या हेरखात्याला, हे माहीत असत. मारुती मंदिरातील तळघरे आणि भुयारे त्यांच्या कामाला यायची. रामदासी झरे सैन्याला पाणी पुरवायचे.

राजे स्वराज्य उभारणी करत होते आणि समर्थ सैन्य तयार करत होते. दास मारुतीची उपासना करणारे मावळेच, राजांसाठी जीव देणारे जिवलग असे तयार झाले.

समर्थांच्या कुबडीत गुप्ती असायची असे म्हणतात. तेव्हापासून लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार, योगी अरबिंदो घोष, सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र घोष आदि सगळे राजकीय नेते हे राजकारण, क्रांतीकार्य आणि योग, अध्यात्म यात सहज संचार करणारे होते. संन्याशाचा संसार म्हणजेच जगाचा संसार, ही उक्ती या सगळ्यांनी सार्थ केली.

महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ही पुढील साखळी. आपणही त्याच मालिकेतील लढवय्ये बनूयात..

भारतमाताकी जय.. !!

लेखक : श्री धनंजय केळकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्लूटो दिन…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्लूटो दिन”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

प्लूटो दिन दरवर्षी 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1930 साली क्लाइड टॉमबॉग या खगोलशास्त्रज्ञाने प्लूटो ग्रहाचा शोध लावला आणि तो सौरमालेतील नववा ग्रह म्हणून ओळखला गेला. मात्र, 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (IAU) प्लूटोला “बटू ग्रह” (Dwarf Planet) म्हणून पुनर्वर्गीकृत केले.

या दिवसाचे महत्त्व म्हणजे खगोलशास्त्रातील मोठी शोधयात्रा आणि प्लूटोच्या प्रवासाचा इतिहास. नासाने पाठवलेल्या “न्यू होरायझन्स” या अंतराळयानाने प्लूटोचे विस्तृत फोटो आणि माहिती पृथ्वीपर्यंत पोहोचवली.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थोडं अजून”… ते… “Unlimited” – लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “थोडं अजून”… ते… “Unlimited” – लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

Unlimited… ???…

Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे.. आणि तितकीच फसवी देखील…. जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच….

Upper Limit मात्र कमी जास्त होऊ शकतं…. म्हणजे कुठलं ना कुठलं Limit हे असतंच… उदाहरणार्थ जेव्हा आपण Limited थाळी खायला जातो तेव्हा हॉटेल मालकांनी ठरवलेलं Limit असतं आणि Unlimited थाळी खायला जातो तेव्हा आपलं म्हणजे खाणाऱ्यांचं Limit असतं…. जे व्यक्तीपरत्वे कमी जास्त असू शकतं…. एरवी घरी २ पोळ्या खाणारा तिथे ५ खाईल, ८ खाईल… किंवा ५-६ च्या ऐवजी एकदम २१ गुलाबजाम सुद्धा खाईल…. त्यामुळे थाळी Unlimited असली तरी शेवटी Limit हे असतंच… आजकाल मिळणाऱ्या Unlimited data plan चं ही तसंच… कोणी 5 GB वापरेल तर कोणी 500 GB… तरी देखील Unlimited च्या या चक्रात आपण अडकतोच…

या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली असेल असा विचार करायला लागल्यावर एकदम डोळ्यासमोर आली ती बर्फाच्या गोळ्याची गाडी आणि आणि तिथे उभं राहून गोळा खाणारा लहानपणीचा मी…… गोळा खाताना 

“ भैय्या.. थोडा शरबत डालो… आणि…. भैय्या… थोडा बरफ डालो… असं म्हणत, एका गोळ्याच्या किमतीत जवळ जवळ दिड गोळा खाण्याचा आनंद काही वेगळाच असायचा…

तेव्हा लक्षात आलं की आपल्याला आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा नेहमी “थोडं अजून “ हवं असतं… ते मिळवण्यात जास्त आनंद असतो…. मग अशा “थोडा है.. थोडे की जरुरत है” प्रकारचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर आले आणि ही गोष्ट सर्वव्यापी आहे हे पक्कं झालं…

दुधवाल्या काकांनी दुधात कितीही पाणी घातलं तरी ठरलेलं दूध दिल्यानंतर उगाच माप किटलीत घालून थोडसं extra दुध पातेल्यात ओतल्यावर चमकणारा गृहिणींचा चेहरा…

परीक्षा संपल्याची वेळ होऊन सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करेपर्यंत supervisor नी दिलेला बोनस वेळ मिळाल्यावर आनंदी होणारा विद्यार्थी…

भाजी घेतल्यावर भाजीवाल्यांनी उगाच बांधून दिलेली थोडीशी मिरची – कोथिंबीरिची पुडी घेताना खुश होणारे कुठलेसे आजोबा….

रात्रभर गाढ झोपूनही सकाळी अलार्म वाजल्यानंतर “ शेवटची ५ मिनिटं “ झोपण्यात खरं समाधान मिळतं हे कुणीही अमान्य करणार नाही..

शनिवार – रविवार सुट्टी मिळूनही जोडून सोमवारी एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर तिचं स्वागतच असतं…

Due Date साठी मुबलक वेळ मिळूनही deadline नंतर मिळणारा १-२ दिवसाचा Grace period महत्वाचा वाटतो…

४ तासांची संगीत मैफिल ऐकूनही शेवटी फर्माईश म्हणून २ मिनिटांचा गायला जाणारा एखादा अंतरा हवाहवासा वाटतो…

पोटभर पाणीपुरी, शेवपुरी, भेळ खाऊन सुद्धा शेवटच्या “मसाला पुरीचा” पूर्णविराम मिळाल्याशिवाय मन तृप्त होत नाही…. ही आणि अशी अनेक उदाहरणं…

तेव्हा मनुष्य प्राण्याची हीच “ थोडं अजून “ असलेली मानसिकता हळूहळू व्यापारी वर्गानी, विक्रेत्यांनी En-cash केली… आणि यातून पुढे त्याच किमतीत १० % जास्त टूथपेस्ट किंवा पावडर दिली जाऊ लागली… पुढे पुढे फ्री चा जमाना आला… साबणावर पेन फ्री… चहा बरोबर बरणी फ्री ते अगदी Buy 3 get 1 फ्री… वगैरे वगैरे… वेगवेगळ्या वस्तूंसाठी, वेगवेगळ्या ग्राहक वर्गासाठी विविध ऑफरचं खतपाणी घालून हे “ थोडं अजून “ मानसिकतेचं झाड व्यवस्थित रुजवलं आणि पद्धतशीर वाढवलं… एवढंच काय तर याच “ थोडं अजून “ चा फायदा घेत एका प्रथितयश शीतपेय कंपनीनी आपल्या जाहिरातीत “ ये दिल मांगे मोअर “ अशी tagline च दिली आणि त्यातूनही बक्कळ नफा कमावला… काळानुरूप payment modes बदलले आणि digital युगात या “ थोडं अजून “ ची जागा घेतली ती आजकाल मिळणाऱ्या Reward Points आणि cash back नी… एकंदरीत काय तर या मानसिकतेला वय, जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक स्तर असं कुठलाही बंधन नसतं….

ठराविक सेल च्या दिवशी mall मध्ये उसळणारी तुडुंब गर्दी, women’s day ला स्वस्तात मिळणारी पाणीपुरी खायला अलिशान कार मधून येऊन रांग लावणाऱ्या महिला.. happy hours साठी धडपडणारे पुरुष, Introductory Offer चा लाभ घेण्यासाठी Online उड्या मारणारी e तरुणाई.. हे सगळे यावर शिक्कामोर्तबच करतात..

अखेरीस या अशा सगळ्याचा परमोच्च बिंदू… ज्याच्या अजून पुढे जाणं केवळ अशक्य…. ते म्हणजे अर्थात हे Unlimited प्रकरण…….. आपण सगळे या Unlimited च्या जाळ्यात कळत नकळत इतके ओढले गेलोय की बरेचदा केवळ जास्त मिळतंय म्हणून आपण नको असताना देखील घेतो आणि आपला कसा फायदा झाला असं मानसिक समाधान मिळवतो… कोण्या एका IT तज्ञाचं एक छान वाक्य आहे… “If you want to sell your product But there is no need.. then first create the need” …. एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर आधी ती गरज निर्माण करा… म्हणजे मग गरज निर्माण झाल्यावर लोक ती गोष्ट आपणहून घेतील… पूर्वी ट्रंककॉल असताना किंवा मोबाईल च्या सुरुवातीच्या काळात फोनवर बोलणं महाग होतं… तेव्हा आपण अगदी मोजकं, कामापुरतं बोलायचो… मग हळूहळू ते बोलणं स्वस्त केलं आणि आपल्याला कामाशिवाय किंवा बरेचदा वायफळ बोलण्याची सवय लागली… भलीमोठी बिलं यायला लागली आणि ते स्वस्त करण्यासाठी आता आपण Unlimited calling plan घ्यायला लागलो…. home delivery करणं, AC, Car ते अगदी smart Phone… आधी या कधीच गरजा नव्हत्या पण आता सभोवतालची परिस्थिती अशी काही आहे की या गोष्टी आता चैन नाही तर गरज झालीय आणि म्हणून आपण त्यासाठी पैसे मोजतो…. अर्थात हे सगळं बदलत्या काळाप्रमाणे प्रगती पथाच्या दिशेने जाणारं असल्याने त्यात वावगं काही नाही…. तर… तशीच आता आपल्याया Unlimited ची सवय झालीय… इतकं की आता amusement park च्या तिकिटात सुद्धा आपल्याला Unlimited rides हव्या असतात…

एकीकडे आपण गरज नसतानाही बरेचदा उपलब्ध आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त घेतो तर काहीना गरजे पुरतं देखील मिळत नाही हे वास्तव आहे…. अशाच एका Food Outlet च्या बाहेर ठेवलेल्या कचरा पेटीतून काही भूकेली लहान मुलं, लोकांनी टाकलेल्या Dish मधून “उरलेलं अन्न” वेचून खात होती…. ज्यांच्याकडे शून्य आहे त्यांना शून्यापेक्षा “थोडं अजून“ मिळावं असं वाटणारच ना…. “मन हेलावून” टाकणाऱ्या त्या प्रसंगानी ही जाणीव मात्र करून दिली की आपल्याकडे Unlimited असूनही कधी कधी आपण असमाधानी असतो पण इतरांनी टाकलेलं Limited अन्न कोणासाठीतरी Unlimited थाळी सारखं असतं आणि तेवढ्याश्यानी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान… तेही Unlimited असतं…

आपला प्रवास मात्र “थोडं अजून“ पासून सुरु होऊन “व्हाया Unlimited ” पुन्हा “थोडं अजून“ वर येतो…

लेखक : श्री क्षितिज दाते

ठाणे 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं.. !!!

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात कि ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात !!!

१) रायगड १००० वेळा चढून जायचा संकल्प गायक श्री सुरेश वाडकरांनी केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादही देतात.

🌹

२) श्री जेधे नावाचा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.

🌹

३) डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की “रूळ ओलांडू नका, पुलावरून जा”. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर ! तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार… ? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते, इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील.

🌹

 ४) मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या सिंध्याला बोलतं केलं होतं. त्याने सांगितलं,

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो. ” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण, अब वक्त बदल गया… , आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

🌹

५) एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की, मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही.. !!!

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची ! आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका… !!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले होते ! प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल.

🌹

६) शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो – जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसिल, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या, असे उपाय सुचवतो.

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो.

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो ? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो.

🌹

७) असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी. पती-पत्नी दोघेही सायकियाट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.

ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.

आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात. त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की, ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे.

🌹

एक अभंग आहे…. ;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना”

नीट वाचलं की समजतं;

आम्ही “बी घडलो, “

तुम्ही “बी घडाना….

🌹

माहिती संग्राहक : अज्ञात  

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्हॅलेंटाईन डे…” – लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर ☆

श्री हेमन्त बावनकर 

? इंद्रधनुष्य ?

 “व्हॅलेंटाईन डे…– लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर

“ १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.“

काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे.  आपण का म्हणून साजरा करायचा ?

… आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि  व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? 

व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून  व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार ! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली. 

रोमच्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला. व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”. हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६. 

तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात. 

दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे  म्हणता येईल. 

आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दिवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही. 

सगळ्या  सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गाकरता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं. 

पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार ! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत.  भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा  करतो. 

असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give. 

… कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण —  

True love knows no reason 

आणि  

Love has no boundaries. 

सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे. 

पूर्वी सगळे नोकरदार  एक तारखेला खुश असायचे – 

“खुश है जमाना, आज पहिली तारीख है”.  

… आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला पण खुश असतात – 

“ खुश है जमाना, आज  व्हॅलेंटाईन डे है”. 

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : श्री सुधीर करंदीकर 

मोबा 9225631100 इमेल <[email protected]>

प्रस्तुती : श्री हेमन्त बावनकर 

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्रीकृष्णासाठी विष पिणाऱ्या मीराबाई सर्वांना माहीत आहे पण रामरायासाठी विष पिणाऱ्या संत वेण्णाबाई माहित आहे का?

मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेण्णाबाईंनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केशसंभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवेसाठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.

ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.

चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नामस्मरण करा असे सांगितले.

विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.

समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.

समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.

त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगा वेगळी शिष्या 🙏

जय जय रघुवीर समर्थ🙏

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares