☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना” – लेखक : इंजि. राम पडगे☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
(आशिया खंडामधला पहिला प्रकल्प आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये “कोट्रोशी” या ठिकाणी.)
नमस्कार अभियंता मित्रांनो,
आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे.
“विज्ञान गड” गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक वेगळी संकल्पना, वेगळा विषय आणि विज्ञान आधारित ही थीम असलेले अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इंजिनिअरिंग मधला एक अद्भुत नमूना या ठिकाणी उभारला जात आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शासनाच्या सर्व परवानक्या प्राप्त होऊन हा प्रकल्प सर्वांसाठी खुला होईल. आशिया खंडा मधला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहनांसाठी रस्ता उपलब्ध नाही. डोंगराच्या पायथ्याला आपली वाहने लावून या ठिकाणी जवळपास १५० मी उंच असलेल्या डोंगरावर माथ्यावर, वायरच्या मदतीने खेचली जाणारे रेल्वे मधून जावे लागते. याला फिन्यूक्युलर असे म्हटले जाते. सर्वसाधारण ४० लोकांची क्षमता असलेले दोन डबे बॅलन्सिंग पद्धतीने एकावेळी वर खाली होत असतात. सर्वसाधारण सात मिनिट ते दहा मिनिटांचा कालावधी या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. डोंगराचा तिव्र उतार सर्वसाधारण ३५ डिग्री ते ४० डिग्री च्या आसपास आहे. आपली ही फिनिक्युलर वरती असलेल्या गोल इमारतीच्या आत मध्ये थांबते. प्रत्येक दरवाज्याच्या पुढे फ्लोरिंग येईल अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.
आणि इथून पुढे तुमचा सुरुवश होतो….. एक अद्भुत प्रवास!!! आपण नक्की काय पहावे व कोणते प्रथम पाहावे अशा प्रकारची आपली परिस्थिती होते. या इतक्या उंच ठिकाणी, इतका भव्य प्रकल्प असेल असे रस्त्यावरून वाटत नाही. समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण बाराशे पन्नास मीटर उंचीवर असलेला हा प्रकल्प महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या उंची पेक्षाही जास्त आहे. या इमारतीच्या माथ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी कोणताही अडथळा राहत नाही.
या ठिकाणाहून सह्याद्रीच्या अवाढव्य गगनाला भिडणारया रांगा, कोयना जलाशयाचा विस्तीर्ण नजरेत न सामावणारा पसारा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमार्ग ,कासचे नयनरम्य पठार, वासोटा किल्ला, उत्तेश्वराचं पुराणतन मंदिर, मकरंद गड, महाबळेश्वर, पाचगणी, लिंगमळा, भिलार हा सगळा परिसर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येतो आणि हे तुम्ही , आशिया खंडा मधला पहिल्या रोटेटिंग डोम मध्ये बसून पाहत असता.
या ठिकाणी अत्यंत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवून, या सर्व ठिकाणांचे दर्शन स्क्रीन वरती आपणाला पाहता येते. याशिवाय आपली वेळ संध्याकाळची असेल तर आकाशातले ग्रह तारे या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतात. या ठिकाणचे फिरणारे हॉटेल आणि या ठिकाणी बसून घेतलेल्या जेवणाचा आस्वाद आपणाला आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. तुम्ही ३६० डिग्री मध्ये फिरत, निसर्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे दर्शन घेत जेवणाचा आनंद घेत असता. या ठिकाणी आहे अर्थक्वेक मधले सर्व प्रकारचा अभ्यास, या ठिकाणी आहे अभ्यासण्यासाठी विंड एनर्जी प्रोजेक्ट,सोलर एनर्जी प्रोजेक्ट आणि हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा. पाण्यामध्ये होत असलेले बदल आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येतात. सुनामी प्रत्यक्ष होते तरी कशी? व तिचा इफेक्ट नक्की असतो कसा? हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल या ठिकाणी .लाटा मधलं सायन्स आहे तरी काय? हे अभ्यासायचे असेल तर या ठिकाणी भेटायलाच हवं. भारतीय सैन्य दलामध्ये अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. ती प्रत्यक्ष असतात कशी व ती वापरली कशी जातात ? याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच असते . या ठिकाणी शिकण्यासाठी , अभ्यासण्यासाठी आणि पाहण्यासाठी भरपूर काही आहे. अभियंता म्हणून या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी. मी या प्रकल्पाची अत्यंत थोडक्यात माहिती दिली प्रत्यक्षात बरेच काही आहे .
तुम्ही कदाचित याल त्यावेळी शिवाजी महाराजांचे अभियंते हिरोजी इंदुलकर यांचं अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी तयार झालेले असेल. या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या तीव्र बुद्धीमतेने अभियंता म्हणून आपले नाव इतिहासाच्या पानावर कायमचे कोरून ठेवलेले आहे. या अभियंत्याची स्मृती म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सह त्यांचाही पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे.
वयाच्या ६८ व्या वर्षी रात्रंदिवस काम करणारे, या प्रकल्पाचे मालक आणि अभियंते जोशी सर यांची भेट म्हणजे स्फूर्ती आणि संकल्पना याचा अनोखा मिलाफ. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने स्वतःचे स्थान निर्माण करणारे व अभियंता म्हणून नक्की कसे असावे याचे हे जिवंत उदाहरण आहे.
प्रकल्प मालक व अभियंता – इंजि. वसंत जोशी सर
प्रकल्प सल्लागार. – इंजि. राम पडगे
आर्किटेक्ट – आर्कि. विक्रांत पडगे
आर सी सी सल्लागार. – इंजि. अनिल कदम
अभियंत्यांनी एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी ज्याला पाहायचे आहे ते भरपूर काही पाहू शकतात ,ज्याला शिकायचं आहे तो भरपूर काही शिकू शकतो. एक अभियंता म्हणून निश्चितच चॅलेंजिंग असा हा प्रकल्प आहे, म्हणूनच आज अभियंता दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी हे थोडक्यात मांडत आहे.
आपला,
इंजि. राम पडगे
९६८९३५९४७८
प्रस्तुती : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘सूर जेथे वेल्हाळ होती… – लेखक : डॉ. विद्याधर ओक ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले☆
पं. गोविंदराव पटवर्धन.
भारतात असे काही असामान्य वाद्य-वादक जन्माला आले, की जणू, ते वाद्य ईश्वराने त्यांच्यासाठीच घडवले असावे. उदा. सनईत बिस्मिल्ला खान, तबल्यात अहमदजान तिरखवा, आणि बासरीत हरिप्रसाद चौरासिया! अगदी त्याप्रमाणेच, हार्मोनियमची निर्मिती परमेश्वराने ज्यांच्यासाठी केली असावी, ते होते कै. पं. गोविंदराव पटवर्धन. माझे गुरू, माझे परम दैवत. २१ सप्टेंबर, १९२५ रोजी गुहागरजवळच्या एका खेड्यात जन्म घेऊन ‘पटवर्धन’ घराण्याचे नाव त्यांनी जणू ‘पेटीवर्धन’ असे केले!
हार्मोनियम हे वाद्य तसे गायनाच्या साथीस, तंतुवाद्यांपेक्षा गैरसोयीचे. याचे पहिले कारण म्हणजे, त्यात स्वरांना जोडणारे ‘मधले’ नाद अस्तित्वातच नसतात. दुसरे म्हणजे, हार्मोनियमचे ट्युनिंग गणिती १२ स्वरांचे (युरोपियन) असल्यामुळे तिच्यात, नैसर्गिक (भारतीय) २२ स्वरांपैकी एकही नसतो. म्हणजे, हार्मोनियम हे वाद्य भारतीय संगीतासाठी मुळातच चुकीचेही असते. तिसरे म्हणजे पेटीचा वादकांसाठीचा एक मोठाच अवगुण, की या वाद्यात बोटांची तयारी ‘१२ पट्ट्यात वेगवेगळ्या प्रकारची’ करावी लागते. म्हणजे, तंतुवाद्यातील (व्हायोलिन, सरोद, सतार, वीणा इ. ) तारेवर खुंटी पिळून स्वर बदलता येत असल्यामुळे, बोटांची तयारी ‘एकाच प्रकारची’ असते. म्हणून, पेटी वाजविणे, हे मुळातच तंतुवाद्यापेक्षा बारापट कठीण; तरीही त्यावर गोविंदरावांना जन्मत:च कमालीचे प्रभुत्व लाभले होते.
गोविंदरावांनी स्वत:च्या मुंजीमधे, वयाच्या आठव्या वर्षी, पाऊण तास स्वतंत्र हार्मोनियम वादन केले. मग पुढच्याच वर्षी गिरगावात थेट दीनानाथ मंगेशकर यांना पेटीवर साथ केली (‘काळी पाच सूर होता’… इति गोविंदराव!). म्हणजे, या माणसाला कुणी गुरूच नव्हता, नव्हे; म्हणूनच आमचा गोविंदा उत्तम पेटी वाजवतो, असे पु. ल. देशपांडे कौतुकाने म्हणत! पुढे ७१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गोविंदरावांनी, हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांना सुमारे पाच हजार मैफली व तितक्याच नाट्यप्रयोगांना अविस्मरणीय आणि अविश्वसनीय अशी संगत करून स्वतःबरोबरच अमर केले.
गायक-वादकास उत्तम स्वरज्ञान लागतेच. तयारीच्या गायकांनी गायलेले ‘नोटेशन ध्यानात येणे’, हेच मुळात कठीण असते, ‘वाजविणे’ तर सोडाच. या सर्वसाधारण अनुभवाच्या अगदी विरुद्ध, गोविंदराव, कितीही मुश्किल जागा पेटीकडे न पाहता आणि क्षणार्धात वाजवत आणि रसिकांची, ‘वा गोविंदराव’ अशी दाद हमखास घेत. तुम्हाला ‘नोटेशन’ इतक्या लवकर समजते कसे, या माझ्या (५० वर्षांपूर्वी विचारलेल्या) बाळबोध प्रश्नाला, ‘अरे समजते कुठे, माझी बोटे वाजवून झाल्यानंतर मला कळते’, असे उत्तर त्यांनी दिले होते व ते खरेही होते. म्हणून, गोविंदराव स्वर ‘कानाने’ नाही, तर ‘बोटांनीच’ ऐकतात व वाजवतात, असे रसिक म्हणत.
पेटीतील सर्व १२ पट्ट्यात गोविंदराव ‘समान’ नैपुण्याने वाजवत, हे अगाधच. म्हणून त्यांना ‘स्केल-चेंज’ हार्मोनियमची गरज नसे. स्केल-चेंज ‘पेटीत’ नको, ‘हातात’ हवे, असे ते म्हणत. आणि, ‘ते आम्हाला कसे येईल’ या माझ्या प्रश्नाला, ‘एक एक पट्टी एक वर्षभर वाजव, म्हणजे १२ वर्षांत सर्व पट्ट्यांमधे हात फिरेल’ हे सरळसोट उत्तर मिळाले होते. ‘अशी’ बारा वर्षे कुणाच्या आयुष्यात येणार? एकदा मी माझी नवीन स्केल-चेंजर-हार्मोनियम त्यांना वाजविण्यासाठी मोठ्या उत्साहाने घेऊन गेलो होतो. ‘ही कशाला आणलीस’, असे स्वागत झाले. वाजवायचे स्केल सफेत चारवर ठेवले होते. पहिला राग झाल्यावर म्हणाले, ‘आता सफेत तीन कर’. मग पुन्हा काही वेळाने म्हणाले, ‘सफेत दोन कर’. म्हणजे, केवळ ‘गंमत’ म्हणून पट्ट्या बदलत बदलत वाजवणे, हा गोविंदरावांसाठी निव्वळ पोरखेळ होता! तसेच, कोणत्याही पट्टीत कोणताही राग वाजवितांना त्यांना स्वर अजिबात शोधावे कसे लागत नाहीत, या कुतुहलापोटी मी एकदा त्यांना विचारले, की तुम्हाला ‘सर्व’ पट्ट्यांत ‘कोणत्याही’ रागाचे काळ्या-पांढऱ्या पट्टयांचे ‘डिझाइन’ पेटीवर ‘दिसते’ का? चहाची बशी खाली ठेवून त्यांनी केवळ ‘हो’, एवढेच उत्तर दिले होते!
भारतातील यच्ययावत गायकांना गोविंदरावांनी साथ केली. साथीला बसले की ज्याची साथ करायची तो आपला गुरू, या भावनेने वाजवीत. महाराष्ट्रातील तमाम गायकांसाठी ‘अत्युच्च आदर्श’ असलेले आणि त्यांच्याहून ३७ वर्षांनी ज्येष्ठ कै. बालगंधर्व, यांना साथ करण्याचे गोविंदरावांचे योग आले होते. आणि प्रत्यक्ष बालगंधर्वांनी तेव्हाच्या छोट्या गोविंदाबद्दल, ‘तो मुलगा छान वाजवतो हो’ असे काढलेले उद्गार, आणि एकदा तर प्रत्यक्ष भेटीत ‘बाळा, आम्ही गात होतो तेव्हा कुठे होतास रे?’ हे उद्गार, गोविंदराव त्यांच्या आयुष्यातील ‘सर्वात मोठे पारितोषिक’ मानत
कै. पं. राम मराठे यांच्या नोमतोमने भरलेल्या; आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तिन्ही घराण्यांचे उत्कृष्ट गुंफण असलेल्या जोशपूर्ण लयदार गायकीची गोविंदरावांनी तितक्याच तयारीने केलेली अशक्य कोटीतील साथ, रसिक अजून विसरलेले नाहीत. या दोघांची शारीरिक आणि सांगीतिक क्षमता तर काय वर्णावी ? त्याची कल्पना त्यांनी एका दिवसात केलेल्या तीन तीन कार्यक्रमांवरूनच करता येईल. ‘माझा संगीतातील गुरू आणि संसारातील मोठा भाऊ’, अशा रामभाऊंचे गाणे, त्यांच्या एवढेच, गोविंदरावांना ठाऊक होते. बोटातून झेरॉक्स कॉपी काढावी तसे ते निघत असे. एखादी तान थांबली, तर बोटातून पुढची सुरू होई. इतरही सर्व वादन ‘गाण्याबरोबरच (!)’ सुरू असे. दोन चालकांची एकच सायकल असते, तसे पुढे रामभाऊ व मागे गोविंदराव! आयुष्यातही रामभाऊ त्यांच्या पुढेच निघून गेले.
वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या दैवी उपज आणि चतुरस्त्र गळा लाभलेल्या गायकाची साथ करणे म्हणजे, साथीदाराची एक परीक्षाच असे. कोणत्या क्षणाला त्यांच्या अतिजलद गळ्यातून काय व कसे निघेल, याची कोणतीही पूर्व-कल्पना साथीदाराला मिळत नसे. शिवाय, त्यांच्या गळ्यातील उत्तर हिंदुस्तानी बाज वाद्यावर उतरवणे सुद्धा गोविंदराव लीलया करीत. साहजिकच ‘तुम्हाला कुणाची साथ आवडते’, या माझ्या प्रश्नाला वसंतरावांनी सुद्धा, ‘तसे सगळेच चांगली करतात, पण ‘अचूक’ साथ फक्त गोविंद पटवर्धन करतो’, असे उत्तर दिले होते.
एकदा भीमसेन जोशी यांच्या साथीला गोविंदराव बसले होते. खासगी मैफल होती. पहिला राग ‘मल्हार’ सुरू झाला. गोविंदरावांनी सुरुवातीला नुसता सूर धरून ठेवला होता. थोड्या वेळानंतर, भीमसेनांनी त्यांना ‘वाजवा’, अशी खूण केली. भीमसेनांच्या ताना धो धो पडणाऱ्या पावसाप्रमाणे कोसळू लागल्या. मी लहानच होतो म्हणून, गोविंदराव या अतिमुश्किल ताना पेटीवर कशा वाजविणार, असे वाटून मलाच छातीत धडधडू लागले. मात्र, गोविंदरावांनी भीमसेनांची प्रत्येक तान व जागा, लख्ख आरशातल्या प्रतिबिंबासारखी उचलली. मधे एक क्षणही जात नव्हता आणि हा अद्भुत प्रकार, मैफलभर चालला होता.
छोटा गंधर्वांची लडिवाळ गायकी सुद्धा त्यांच्या हातात चपखल उतरत असे. छोटा गंधर्व तर नेहमीच आयत्या वेळी, तिथल्या तिथे सुचणाऱ्या नवनवीन जागा घेत. आयुष्यात कधीच न ऐकलेल्या अशा शेकडो जागा, गोविंदराव एका क्षणात ऑर्गनवर अलगद फुलासारख्या झेलीत आणि प्रेक्षकांची, ‘वा गोविंदराव’, अशी दाद मिळे. एकदा एका मैफिलीमधे हे एवढे झाले, की छोटा गंधर्व म्हणाले; ‘अरे, मला’ एकदा तरी वा म्हणा! ‘तुम्हाला कुणाला साथ करणे सर्वात अवघड जाते’ या माझ्या प्रश्नालाही, गोविंदरावांनी; ‘तसे कुणाचेच नाही’, पण दादा (छोटा गंधर्व) गात असले की ‘जरा’ लक्ष ठेवायला लागते’ असे उत्तर दिले होते.
अनेक मैफिलीत किंवा नाटकात, गायकांच्यापेक्षा, गोविंदराव काय व कसे वाजवतात याकडेच रसिकांचे लक्ष लागे आणि तरीही गोविंदराव कधीही अधीरपणा दाखवीत नसत. कुमार गंधर्वांनाही ते नुसताच षड्ज (म्हणजे सा) धरून बसत. याबाबत एकदा कुमारांनाच कुणीतरी विचारले की, नुसता स्वर धरायचा असेल, तर तुम्ही पेटीवर गोविंदरावांसारख्या मोठ्या वादकाला का घेता? यावर कुमारांनी, ‘त्याच्यासारखा सा सुद्धा कुणाला धरता येत नाही’ असे मासलेवाईक उत्तर दिले होते! या सर्वांवर कळस म्हणजे, महाराष्ट्र-गंधर्व सुरेश हळदणकर, गोविंदरावांच्या बद्दल माझ्यापाशी त्यांच्या साथ-संगतीचे कौतुक करतांना तर म्हणाले होते की, तुझ्या गुरूच्या उजव्या हातामध्ये ‘परमेश्वर’ आहे.
विविध घराण्यातील धुरिणांना साथी करता करता गोविंदरावांनी स्वतंत्र वादनातही कमालीचे कौशल्य मिळविले. स्वत:ला उत्तम तबला येत असल्यामुळे वेगवेगळ्या तालांचे वैविध्य व डौल सहज सांभाळला जात असे. तोडी, ललत, यमन, मारुबिहाग, चंद्रकौंस, चंपाकली, नटभैरव, मधुवंती असे अनेक राग ते सारख्याच तयारीने आणि साधारण २०-२५ मिनिटे मध्यलयीत वाजवीत. त्यानंतर; झाले युवतिमना, उगिच का, शरणागता, मधुकर, नरवर इ. नाट्यपदांची खैरात होत असे. पदातला प्रत्येक शब्द त्याच्या ऱ्हस्व-दीर्घ उच्चारानुसार आणि अगदी जोडाक्षरांच्या सकट हातातून वाजे. वेगवेगळ्या गायकांची पदे तर ते वाजवीतच, परंतु, एकाच नाट्यपदात अनेक गायक सुद्धा सहजच दाखवीत. शेवटी तीन भैरव्या ठरलेल्या असत. कै. मधुकर पेडणेकर आणि कै. गोविंदराव टेंबे यांना ते फार मानत. कुणी नन्हेबाबू आणि चौरीकर ही नावे सुद्धा घेत. आणि फारच कौतुक झाले तर, ‘अरे मी काहीच नाही, असा मधू वाजवायचा’, आणि; ‘ते (म्हणजे टेंबे) खरे गोविंद ‘राव’, मी नुसताच ‘गोविंदा’, असे विनयाने म्हणत. प्रत्यक्षात, त्यांचे स्वतंत्र वादनातील ‘लयदार तुकडे’, सतारीसारखे ‘झाले’ आणि ‘सफाई’ वर्णनातीत होती. गवतावर वाऱ्याची झुळूक जावी, अशी सपाट तान जाई. ‘गमकेच्या’ जागा, मनगटाच्या ताकदीने वाजवत. अंगठा तर एवढ्या बेमालूमपणे बोटांना ३ सप्तकात पुढे-मागे नेई, की हाताला १० बोटे आहेत की काय, असे वाटावे. त्यांचे स्वतंत्र पेटीवादन ऐकण्यास प्रत्यक्ष कुमार आणि वसंतराव सुद्धा बसत, यातच सर्व आले!
गोविंदरावांनी ऑर्गनवर केलेली संगीत नाटकांची साथ, हा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय होईल. याचे सर्व श्रेय ते त्यांचे ‘नाट्य-गुरू’ भालचंद्र पेंढारकर यांना देत. नाटकाच्या साथीदाराला गाण्यांसकट संपूर्ण गद्य पाठ असावे लागते कारण, गाणे सुरू होण्याआधीचे वाक्य संपले की त्या क्षणाला ऑर्गनचा स्वर द्यावा लागतो, थोडाही आधी किंवा नंतर नाही. शिवाय, ४-५ गायक व त्यांच्या वेगवेगळ्या ६-७ पट्ट्या लक्षात ठेवून, सर्व नाटक सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच! यासाठी मैफिलीतील साथीपेक्षा संपूर्ण वेगळे असे तंत्र कमवावे लागते. वयाच्या १४ व्या वर्षी ‘संगीत वेणुनाद’ या नाटकापासून सुरुवात करून गोविंदरावांनी पुढे ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘विद्याहरण’, इ. पारंपरिक नाटकांपासून ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, आणि ‘कट्यार काळजात घुसली’पर्यंत असंख्य नाटकांना ऑर्गन साथ केली. त्यांची १४ संगीत-नाटके गद्य-पद्यासकट तोंडपाठ होती. मी त्यांची ४०० नाट्यपदे ध्वनिमुद्रित करून ठेवली आहेत. दुर्दैवाने, संगीत नाटकेच बंद पडल्यामुळे हा खजिना तसाच दुर्लक्षित रहाणार.
हार्मोनियम आणि ऑर्गन वाजविणे हेच त्यांचे आयुष्य होते. शेवटी मला म्हणाले होते, ‘अरे रामभाऊ गेला, कुमार गेला, वसंतराव गेले, माझे आता इथे उरले आहे काय…’? असे महान कलाकार आपल्या जगात येतात, आणि स्वर्गीय आनंद देऊन जातात, हे रसिकांचे भाग्य! त्यांचे स्मरण ठेवणे, त्यांची कला आपणास जमेल तितकी जोपासणे, आणि ते पुनर्जन्म घेईपर्यंत त्यांची वाट बघणे, एवढेच आपल्या हाती असते. गोविंदरावही यावे आणि मला त्यांच्याकडे पुन्हा शिकायला मिळावे, एवढीच परमेश्वरापाशी प्रार्थना !
लेखक : डॉ. विद्याधर ओक
(लेखक औषधशास्त्र संशोधक असून हार्मोनियम आणि २२ श्रुति पेटी संशोधकही आहेत)
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ “संकटनाशन स्तोत्रातले बारा गणपती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आपण असंख्य वेळेला हे…”गणपती स्तोत्र” …. “संकटनाशन स्तोत्र” म्हणतो, परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाहीत…
नारदकृत ‘ संकटनाशन ‘ स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्य स्थाने….
प्रथमं वक्रतुण्डं च
एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं
गजवक्त्रं चतुर्थकम्
लम्बोदरं पंचमं च
षष्ठ विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं
धूम्रवर्णं तथाष्टकम्
नवमं भालचन्द्रं च
दशमं तु विनायकम्
एकादशम् तु गणपति
द्वादशं तु गजानन:
१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ
२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.
३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.
४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.
५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात.
(१) रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात,
(२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.
६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.
७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.
८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ.
२) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.
९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.
१०. विनायक :- काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.
११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.
१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात
।। जय श्री गणेश ।।
माहिती संकलक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘वंदे भारत ट्रेन’ चे निर्माते : श्री. सुधांशु मणी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
या देशात असे अनेक रियल हिरो आहेत जे आपल्याला माहिती नाहीत..
सुमारे ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, २०१६ची. सुधांशु मणी नावाचे रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्षे बाकी होती.
सहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्याने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory …. रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना….
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, ‘ काय करणार?’
ते इंजीनियर म्हणाले, ‘ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे…. ‘
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती. चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले…
“ Are You Sure, We Can Do It ? “
उत्तर होते….. ” Yes Sir !”
“ किती पैसे लागतील R&D साठी ?”
“ फक्त १०० कोटी रु सर !”
रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
त्या अधिकार्याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ‘ ट्रेन १८ ‘ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.
आपल्याला ठाऊक आहे का… या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती. ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच ‘सेल्फ प्रोपेल्ड’ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.
दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक “ वन्दे भारत ट्रेन “ या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मणी.
सुधांशु मणी यांच्यासारख्या देशाच्या प्रगतीसाठी ध्येयवेड्या विभूतीला त्रिवार सलाम !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मनाच्या पेटा-यात कुठली आठवण कोणत्या व्यक्तीला किंवा वस्तूला बिलगून बसलेली असते, ते सांगता येत नाही.. परवा फेसबुकवरच्या एका खाद्यसमूहावर एक फोटो अचानक पहाण्यात आला.. लांब दांड्याच्या लोखंडी काळ्याभोर पळीचा तो फोटो पाहून अंगावर सर्रकन् काटा आला.. नि ती पळी आठवणींचं बोट धरून थेट लहानपणात घेऊन गेली..
आमचं बालपण अगदी साधसुधं.. मोकळंढाकळं, अवखळ, खोडकर नि गरीबडं. आजच्यासारखा ना तेंव्हा टीव्ही होता, ना मोबाईल ना व्हिडिओ गेम्स.. शाळेतले काही तास नि घरातला जेवणा-अभ्यासाचा वेळ सोडला तर इतर वेळी नुसता धांगडधिंगा, खेळ नि हुंदडणं.. साहजिकच पडणं.. झडणं..
बोटाची ठेच, गुडघ्यावरचं खरचटणं, जखम.. कधीतरी डोक्याची खोकसुद्धा.. बटाटा सोलावा तसं सोलवटलेलं कातडं, त्यातून डोकावणारं लाल-गुलाबी मांस, भसकन् बाहेर पडलेल्या रक्ताच्या काळ्याभोर गुठळ्या… नि यांना बिलगून बसलेली अंगणातली नाहीतर मैदानातली माती.. रक्ता-मासाच्या ओढीनं घोंगावणा-या चार-दोन माशा नाहीतर चिलटांचा ढग.. नि थेट मस्तकापर्यंत पोहोचणारं ते चरचरणं.. !!
पण यातलं काहीही खेळापासून जरासुद्धा ढळू न देणारं.. पडल्यावर “टाईमप्लीज” म्हणत तळव्याच्या मागच्या बाजूच्या अगदी मध्यावर थुंकी लावणं, दोन-चार मिनिटं डोळे मिटून वेदनेचा अंदाज घेणं नि वीज चमकावी तसं झटक्यात उठून जखमेवर हातानं झटकणं नि पुन्हा खेळात सामील होऊन “घेतला वसा न सोडणं !”
घरात डझनावर असणारी पोरबाळं नि रोजच्या होणा-या जखमा.. कधी चप्पल चावून होणारे फोड, उन्हाळ्यात हावरटपणानं रिचवलेल्या आंब्यानं होणारी गळवं, हाता-पायांवर होणारी केस्तुटं.. आई -बाप कुणाकडं नि कशा कशाकडं पहाणार ? म्हणतात नां.. “रोज मरे त्याला कोण रडे ?”
“पोरं म्हटल्यावर पडायचीच.. जखमा व्हायच्याच.. “, “पडे झडे माल वाढे” असल्या रांगड्या विचारसरणीचे ते दिवस नि आमचे माय-बाप होते.. “जा ती जखम पाण्यानं धू” म्हणत पाठीत एक धपाटा पडायचा.. फार तर जखमेवर हळदीची पूड नाहीतर तत्क्षणी होळी साजरी करायला लावणारं “आयोडीन” नावाचं क्रूर नि जहाल जांभळं द्रावणं ओतलं जायचं.. !!
धूळ, रक्ताच्या गुठळ्या, माती, माशा, चिलटं… यातल्या कशालाही न जुमानता एके दिवशी ती जखम खपलीनामक काळ्या कवचाखाली दिसेनाशी व्हायची नि त्या जखमनामक विषयाची इतिश्री व्हायची…
“बाळा, खूप लागलय कारे ? हॅंडिप्लास्ट लावूया हं.. डॉक्टरकाकांकडं जाऊ या का ? आता स्ट्रिक्ट रेस्ट घ्यायची बरं का ! फार तर झोपून मोबाईलवर गेम खेळ.. ” अशी आजच्या मुलांसारखी कौतुकं वाट्याला येणं आमच्या कमनशिबात नव्हतंच !!
जखमेपासून खपलीपर्यंतचा प्रवास मुकेपणानं पार पडायचा.. बारकसं गळू थोडसं मोठं होऊन कधी फुटलं ते कळायचं नाही.. केस्तुटातला केस थोरला भाऊ निर्दयपणानं ओढायचा नि थोडासा पू बाहेर येऊन ते होत्याचं नव्हतं होऊन जायचं.. पण प्रत्येकवेळी हा प्रवास इतका सुलभ असायचाच असं नाही.. रोगजंतू जखमेत शिरकाव करायचे, त्यांच्याशी लढताना लक्षावधी पेशी धारातीर्थी पडायच्या नि त्या “पू” नामक पिवळसर द्रव्याच्या रूपातून जखमेत भरून रहायच्या.. रोगजंतूंनी रक्तात प्रवेश केलेला असायचा.. ठणकत्या जखमेबरोबर ताप भरायचा.. लाल बारकसं गळू कधी मोठं होत जायचं नि त्या पिवळ्याजर्द गळवाची वेदना सोसण्यापलीकडे जायची.. अवघड जागी झालं असेल तर हे गळू “दे माय धरणी ठाय” अशा स्थितीला न्यायचं..
कुठं दुर्लक्ष करायचं नि कुठली गोष्ट गंभीरपणे घ्यायची हे अचूक समजणा-या आमच्या माऊलीच्या कपाळावर ही वाढती जखम, पू नि तापणारं अंग पाहून चिंतेची आठी उमटायची.. पण लगेच हातपाय गाळून डॉक्टरांकडे आपल्या पोराला नेणा-या त्या काळच्या आया नव्हत्या.. स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानावर (तुटपुंज्या का असेना) विश्वास असणा-या नि म्हणूनच पोरांच्या आजाराशी स्वत: लढणा-या त्या झाशीच्या राण्या होत्या. (अर्थात डॉक्टरांकडे नेण्यासाठी लागणा-या छनछनीची बारा महिने असणारी कडकी.. हेही एक ठोस कारण होतच म्हणा !)
तिन्हीसांजेची वेळ.. दिवस सरेल तसा ठणका अजूनच वाढलेला.. पोराच्या रडण्यानं सारं घर कातरलेलं..
“या गादीवर आता झोपून रहायचं, आजिबात उठायचं, चालायचं, खेळायचं नाही. ” म्हणत ती माऊली लेकराला स्वत:च्या हातानं झोपवायची. गरमागरम कॉफी पाजायची. मऊ भाताचे चार घास भरवायची.. एव्हाना रात्रीनं बस्तान बसवलेलं असायचं..
“आई खूप दुखतय”….
” हो.. थोडं थांब हं… ”
आई घरातल्यांची जेवणखाणं उरकायची..
पेशंट पोराच्या भोवती भावंडं गोल करून बसलेली…
“मने, समोरच्या कोनाड्यात पानं ठेवलीय, *ती घेऊन ये आणि फडताळातलं माझं पांढरं जुनं पातळ आण”
आता त्या पोराला नि भावंडांनाही अंदाज आलेला असायचा.. ती एका खास प्रोसिजरची तयारी असायची..
पोटीसची…. !!
“आई नको.. आई पोटीस नको… ” ते पोर बेंबीच्या देठापासून ओरडायचं.. भोवतालच्या भावंडाना “सुपातले हसतात” हे एका बाजूला असलेलं फीलींग नि दुस-या बाजूला काळजात अजून चर्र करणारा स्वत:च्या वेळचा चटका… अशा संमिश्र भावनांनी व्यापलेलं असायचं !
मनीनं पिंपळाची, गुलबक्षीची अशी पानं भावासमोर ठेवलेली.. आईच्या पांढ-या सुती पातळातून लांबशी पट्टी काढून एका बाजूला मधोमध फाडून थोड्याशा भागाला विभागलेलं..
स्वयंपाकघरातून “चर्र” असा आवाज..
आईनं लांब दांड्याच्या तापलेल्या लोखंडी पळीत कणीक, हळद, थोडं पाणी नि थोडं तेल घातलेलं.. पिठल्यासारखा झालेला लगदा.. नि त्यामुळे गरमागरम पळीतून निघणा-या वाफा नि आसमंतात घुमणारा तो जोरदार “चर्र” आवाज.. पेशंट पोराला अजूनच घाबरवून सोडणारा… “बळीच्या बक-याच्या” चेह-यावरचे नि याच्या थोबाडावरचे भाव तंतोतत जुळणारे.. !
आईचं त्या पोटीसाच्या पळीसहित आगमन…
“मला नको.. मी नाही लावून घेणार.. पोटीस नको.. ” म्हणत भेदरलेल्या पोराचा पळण्याचा प्रयत्न… नि त्याला भावंडांनी घट्ट पकडून ठेवणं.. आईचं चमच्याने पानाच्या सपाट भागावर पोटीसाचं भयंकर गरम पीठ घालणं..
नि…
नि…
पाऊस पोराच्या पाठीवर बरसणारा.. भावंडांचीही तीच गत.. नि त्या माऊलीच्या कुशीत गाढ झोपी गेलेलं तिचं लेकरू !!
शेजारच्या खोलीतल्या दाराआडून हा सोहळा पाहणारे भेदरलेले त्याचे बाबा.. दगडाच्या त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं..
नि… घाबरट समजत असलेल्या बायकोच्या करारीपणाच्या साक्षात्कारानं दिपलेले त्यांचे डोळे…. !!
पुढचे दोन दिवस हा पोटीसाचा रणसंग्राम… तिस-या दिवशी सकाळी पोटीसाला घाबरून जखमेचं पलायन.. वेदना आणि तापाचाही रामराम…
नंतर शिल्लक राहणारा फक्त व्रण…. आईच्या कणखरपणाची, वात्सल्याची नि पोटीसाची जन्मभर आठवण करून देणारा…. !!
आजही म्हणूनच पळीचा फोटो पाहिला नि पोटीसाच्या आणि माझ्या माऊलीच्या आठवणीनं जीव चिंब चिंब झाला… !!
उष्णतेनं जखमेभोवतीचा रक्तप्रवाह वाढवणारं नि जखम बरी होण्यास मदत करणारं…. हळदीमुळे जखमेतल्या रोगजंतुंना मारणारं पोटीस…. आज वापरणं तर सोडाच पण कुणाला माहीतही नाही..
काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या अनेक मौल्यवान गोष्टींपैकी ते एक.. !. शास्त्राने अनेक औषधे आणली. प्रभावशाली अॅंटिबायोटिके जखमांना ताबडतोब आटोक्यात आणतातही.. गोळी घेतली की काम संपून जातं.. पोटीसासारखं झंझट नाही.. म्हणूनच पोटीस नामशेष झालं..
कबूल आहे..
पण सा-या कुटुंबाला एकत्र आणणा-या, माऊलीच्या वात्सल्याच्या वर्षावाला कारणीभूत ठरणा-या त्या पोटीसनामक सोहळ्याला मात्र आपण मुकलो !!
भारतरत्न लतादीदींनंतर जर भारतीय संगीतात कोणाचं नाव अगदी सहज ओठांवर येत असेल, ते म्हणजे आशाताई भोसले यांचं! दोघीही ‘संगीतसूर्य’ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्यका! तो सोनेरी झळकता सूर दोघींमध्ये तेजाळला नाही तरच नवल! आशाताईंना गळा आणि बुद्धीचंही वरदान मिळालंय. त्यांनी अनेक भाषांमध्ये विविध प्रकारची हजारो गाणी गाऊन विक्रमच केला आहे. संसारातील धावपळ, आणि मुलाबाळांचं करून, आशाताईंनी त्या कठीण काळात, इतकी गाणी कधी आणि कशी रेकॉर्ड केली असतील, याचं मला नेहमीच आश्चर्य आणि अप्रूप वाटतं!
त्याकाळी गाणी रेकॉर्ड करणं हे एक आव्हानच होतं. त्यांच्या समकालीन अनेक गायक गायिकांमध्ये वेगळं आणि उठून दिसण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले, रियाज केला, मेहनत केली. रेल्वेचा प्रवास करून, धुळीत – गर्मीत उभं राहून, प्रत्यक्ष सर्व वादकांबरोबर थेट लाइव्ह गाणं आणि तेही उत्कृष्टरित्या सलग एका टेकमध्ये साकार करणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मी गायला लागले, तेव्हा सुद्धा माझी ९० ते ९५ टक्के गाणी मी दिग्गज वादक समोर असताना, सलग एका टेकमध्ये Live रेकॉर्ड केली असल्याने, मी यातील आव्हान आणि याचं महत्त्व निश्चितपणे जाणते. ‘वेस्टर्न आऊटडोर’ हा आशिया खंडातील सर्वोत्तम रेकॉर्डिंग स्टुडिओज् पैकी एक समजला जातो. त्या स्टुडिओतील अत्यंत बुद्धिमान साऊंड इंजिनीअर श्री. अविनाश ओक यांनी लतादीदी, आशाताई, जगजित सिंह यांची अनेक गाणी इथे रेकॉर्ड केलीत. माझेही जवळपास सर्व आल्बम अविनाशजींनी इथेच रेकॉर्ड केले, हे मी माझं भाग्य समजते. त्यांच्या मते, ‘लाईव्हमधे काही मिनिटांसाठी वादकांसह गायकाच्या, म्हणजे सर्वांच्याच ऊर्जा एकवटलेल्या असतात. प्रत्येक जण आपलं काम जीव ओतून अचूक करतो. एक गूढ, दैवी शक्ती त्या गाण्यात प्राण फुंकते. म्हणून अशा गाण्यांचा आत्मा अमरच असतो. त्यामुळेच ही गाणी ‘कालातीत’ होतात.’
आजकाल, डिजिटल रेकॉर्डिंग ही व्यवस्था गायकांसाठी खूप सोपी आहे. परंतु भावपूर्णतेसाठी सर्व वादकांसोबत गाणं हीच पद्धत योग्य होती, असं मलाही वाटतं. आशाताईंची शेकडो गाणी मला आवडतात. पण त्यातलं पंडित हृदयनाथजींनी स्वरबद्ध केलेलं ‘धर्मकन्या’ चित्रपटातलं ‘नंदलाला रे’ हे गाणं म्हणजे ‘मुकुटमणी’ आहे!
‘नंदलाला.. ’ ही भैरवी. एकदा या गाण्याबद्दल बोलताना हृदयनाथजी मला म्हणाले की, उस्ताद सलामत – नजाकतजींच्या भैरवीनं त्यांना झपाटलं आणि ही स्वर्गीय रचना अवतरली. मला तर नेहमी वाटतं, कोणीही दुसऱ्याकडून कोणतीही रचना उचलताना त्यातून नेमकी काय दर्जेदार गोष्ट घेतो, हे त्या – त्या माणसाच्या बुद्धीच्या आकलनाच्या क्षमतेवर अवलंबून असतं. त्यात हृदयनाथजींनी एक से एक अशा कमाल जागा बांधल्या आहेत की, ही स्वरांची अभूतपूर्व सौंदर्यस्थळं आपल्याला आनंदाने स्तिमित करतात. आणि आशाताईंनी ती अशा काही भन्नाट ऊर्जेनं एकेका दीर्घ श्वासात गायली आहेत की एखादा शास्त्रीय संगीतातला गायकही ते ‘आ’ वासून पाहत राहील.
तसंच १९८३-८४ नंतर धर्मकन्या’मधली ‘पैठणी बिलगून म्हणते मला.. ’ सारखी अद्वितीय गाणी मला हृदयनाथजींसोबत भारतभर झालेल्या ‘भावसरगम’ कार्यक्रमात, त्यांच्या शेजारी स्टेजवर बसून सादर करण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा ही सगळी गाणी किती अफाट सुंदर आणि आव्हानात्मक आहेत, याचा प्रत्यय घेत मी ते आव्हान स्वीकारून आनंदाने गात असे. त्याच वेळी आशाताईंची महती अधिक जाणवत असे. या गाण्यातली ‘शिरी’ या शब्दांवरची सट्कन येणारी गोलाकार मींड गाताना तर मला, दिवाळीच्या फटाक्यातलं आकाशात झेपावणारं रॉकेटच दिसतं, ज्याचं नोटेशन काढणं खरंच कठीण आहे. ती जागा अपूर्व आहे.
‘पूर्व दिशेला अरूण रथावर’ हे गाणं ऐकताना समोर ‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर’ चित्ररूपाने डोळ्यांपुढे साकार होतो. या शब्दावरील भूप रागातून नट रागातील मध्यमावर हरकत घेऊन विसावतो, त्या हरकतीच्या जागेचे टायमिंग म्हणजे कळसच! अशा अनेकविध भाषांमधील त्यांचा ‘आशा टच’ हा काही विरळाच!
आशाताईंचं संगीत क्षेत्रात उच्चतम नाव असलं तरी आमच्या भेटीत, त्या किती साधेपणानं बोलतात, वागतात याची आठवण झाली तरी मला गंमतच वाटते.
एकदा पार्ल्याच्या दीनानाथ सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमात लतादीदी सोडून सगळी मंगेशकर भावंडं स्टेजवर हजर होती.. “तुमच्याकडे मंगेशकर भगिनी सोडून आणखीन कोण कोण गायलंय?” हा प्रश्न निवेदकाने पंडित हृदयनाथजींना विचारला. त्यावर माझे गुरू हृदयनाथजींनी माझं तोंडभरून कौतुक केलं आणि म्हणाले, “माझ्याकडे पद्मजा ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ व ‘लवलव करी पातं’ आणि इतर गाणीही फार सुंदर गायली आहे!”
आशाताई, उषाताई, मीनाताई, अशा बहिणींसमोर या दिग्गज कलाकार भावाने माझं कौतुक केल्यावर, नंतर त्या माझ्याशी कशा वागतील, काय बोलतील, अशी मला धाकधूक होती. परंतु मध्यंतरात आशाताईंसारख्या महान गायिकेने मला जवळ बोलावून, माझ्या गाण्याचं, तसंच साडीचं, दागिन्यांचं, (अशा स्त्रीसुलभ गोष्टींचंही) कौतुक केलं, हे पाहून मला अचंबाच वाटला. मीही त्यांच्या साडीचं कौतुक केल्यावर, “ही साडी मी तुम्हाला देऊ का?” असंही त्यांनी मला विचारलं. अर्थात, मी फार संकोचले आणि मनोमन आनंदलेही!
एकदा दादर येथील नुकतंच नूतनीकरण झालेल्या, ‘महात्मा गांधी जलतरण तलावा’चं उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने तिथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. योगायोगाने हाही दिवाळी पहाटचाच कार्यक्रम होता.
दुसर्या दिवशी इंदौरला ‘सानंद’तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम असल्याने मला या कार्यक्रमानंतर त्वरित निघून इंदौरचं विमान गाठणं आवश्यक होतं. परंतु आयोजक श्री. प्रसाद महाडकर मला म्हणाले, “पद्मजाताई, थोडं थांबाल का अजून? आशाताईंनी ‘मला पद्मजाला आज भेटायचंच आहे!’ असा निरोप पाठवला आहे. आशाताईंना भेटायची मलाही तीव्र इच्छा होतीच. परंतु विमान गाठायचं म्हणून वेळेअभावी निघावं लागेल, असा त्यांना फोनवर निरोप दिल्यावरही आशाताईंनी, ‘पद्मजाला थांबवूनच ठेवा’ असा परत निरोप दिला.
काही वेळ मनाची उत्सुकता, आणि घालमेल चालू असताना आशाताई सुहास्यवदने आल्या आणि त्यांनी माझ्या ओंजळीत सोनचाफ्याची काही घमघमीत फुलं आनंदाने दिली. माझ्या आयुष्यात अनेकदा असे अविश्वसनीय आणि आनंदाचे सोनेरी क्षण आले, त्यापैकी हा एक! त्या ओंजळभर सुगंधी फुलांचा घमघमाट मला आजवर आनंद देत आला आहे..
एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ओडिशात गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर ओडिशामध्ये काही ठरवलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी बाहेर पडलो. ओडिशातल्या बालेश्वर इथं एका पत्रकार मित्राकडं जेवणानंतर पायी आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघालो. आईस्क्रीम खात आम्ही एका बाकावर बोलत असताना एक व्यक्ती बाजूला क्लासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट हिंदीमधून त्या समोर बसलेल्या युवकांना सांगत होती.
त्या शिकवणाऱ्या माणसाला मला भेटायचं आहे, असं मी त्या पत्रकार मित्राला म्हणालो. तो पत्रकार मित्र आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन तो बाहेर आला आणि मला म्हणाला, ‘‘शिकवणारे आमच्या भागातलेच उपविभागीय अधिकारी आहेत. आपण क्लास सुटला की, त्यांना भेटू.’’
क्लास सुटला, आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी बोलताच क्षणी त्यांच्या लक्षात आले, मी महाराष्ट्राचा आहे असा. बोलण्यातून त्यांचा चांगला परिचय झाला. माझ्याशी बोलणारे ते अधिकारी अवघ्या २८ वर्षांचे होते. ते यूपीएससी पास होऊन ओडिशामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते.
प्रथमेश अरविंद राजेशिर्के असं या अधिकाऱ्याचं नाव. ते कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी या गावचे. आम्ही दोघेजण बोलत होतो. प्रथमेश यांचा सर्व प्रवास थक्क करणारा होता.
प्रथमेश व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. प्रथमेशही दवाखान्यामध्ये अभ्यास करत होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे घरी बसून परीक्षा देण्याशिवाय प्रथमेश यांना पर्याय नव्हता. या काळात एका मित्राच्या माध्यमातून ‘सारथी’ या पुण्यामधल्या शासकीय संस्थेची माहती मिळाली. शिक्षणासाठी मुलांचा खर्च पूर्णपणे उचलला जातो, असं प्रथमेश यांना कळालं.
प्रथमेश ‘सारथी’च्या परीक्षेला बसले. ती परीक्षा पास झाले. त्यांना ‘सारथी’मुळे तेरा हजार रुपये दर महिन्याला मिळत गेले. दिल्लीच्या क्लासची संपूर्ण फी ‘सारथी’ने भरली होती. प्रथमेश म्हणाले, ‘‘मी ‘सारथी’चे प्रमुख असलेले काकडे सर यांना भेटलो. त्यांनी दिलासा दिला. माझ्या आजारपणातही ते माझ्यासोबत होते.
माझ्या आयुष्यात ‘सारथी’चा दोन अर्थाने महत्त्वपूर्ण वाटा आहे. एक माझ्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक साह्य करून मला उभं केलं आणि दुसरं जबरदस्त असे मार्गदर्शन, मेंटॉरशिप दिली. जर त्या काळामध्ये ‘सारथी’ने मला हात दिला नसता तर मी आणि माझ्यासारखे कित्येक मित्र कदाचित घरीच राहिले असतो. ’’
मी प्रथमेशला म्हणालो, ‘‘तुम्ही ओडिशाच का निवडलं?’’
प्रथमेश म्हणाले, ‘‘मला आदिवासी बांधवांची सेवा करायची होती. इथल्या अनेक युवकांना मला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचं होतं. ते मी केलेही. मी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं, ही माझ्या वडिलांची फार इच्छा होती; पण जेव्हा माझा यूपीएससीचा निकाल लागला, तेव्हा ते सगळं बघायला वडील नव्हते. ’’ वडिलांच्या आठवणींमध्ये भावनिक झालेल्या प्रथमेश यांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला निघालो. ‘सारथी’ इतक्या मोठ्या प्रमाणात काम करते, हे मला माहिती नव्हतं.
ओडिशा इथून मला कामानिमित्त थेट पुण्याला जायचं होतं. शनिवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचलो. काही जणांना भेटण्यासाठी मी त्यांची वाट पाहत होतो. प्रवीणदादा गायकवाड, राहुल पापळ, विलास कदम, अशी सगळी मंडळी आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. बोलता बोलता मी प्रवीणदादा यांच्याकडे सारथीचा विषय काढला. प्रवीणदादाने मला सारथीच्या कामाविषयी भरभरून सांगितलं. मी वारंवार ज्या सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सरांविषयी उल्लेख करत होतो, त्या काकडे सरांविषयी प्रवीणदादा गायकवाड खूप चांगले सांगत होते. त्यांनी काकडे सरांना फोन लावून माझ्याकडे फोन दिला.
मी अत्यंत नम्रपूर्वक त्यांना माझी ओळख सांगत मला तुम्हाला भेटायचं आहे, अशी त्यांना विनंती केली. त्यांनी मला सकाळी भेटायला या असं सांगितलं.
फोन ठेवल्यावर प्रवीणदादा म्हणाले मराठा, कुणबी समाजाच्या मुलांच्या भविष्य, करिअर यासाठी सारथी सारखा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट काळाची गरज बनला होता. मराठा, कुणबी समाजामध्ये सारथीमुळे शिक्षणाचे प्रमाण खूप वाढलं. युपीएससी, एमपीएससी मध्ये सरकारी नोकरीमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली. सारथीने प्रमाणपत्र, आर्थिक मदत, मार्गदर्शन या स्वरुपात शाब्बासकी दिल्यामुळे नववी पासून मुलं अभ्यासाकडे वळली. त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. आई-वडील तिकडे वळले. मुलांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा लागली. जयंती, पुण्यतिथीच्या नावाखाली वर्गण्या मागणारे मुलं एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला जायचे असे म्हणू लागले. त्यासाठी सारथीने सर्व आर्थिक मदत केली. त्या सर्वांसोबातची आमची बैठक संपली.
मी बाणेरला गेस्ट हाऊसला गेलो. ‘सारथी’वर आलेले अनेकांचे लेख वाचून काढले. बातम्या, अनेकांनी केलेले संशोधन मी वाचलं. मराठा, कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात २०१८ मध्ये मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्यात मराठा समाजाच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी मागणी होती. या मागणीतून अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील, दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीस या अभ्यासू अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’ची सुरुवात केली. दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये दारिद्र्याच्या गाळामध्ये फसणाऱ्या मराठा, कुणबी समाजातील मुलांचे ‘सारथी’मुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागलं.
‘सारथी’चा चार तास अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, ‘सारथी’ने मागच्या चार वर्षांत चार लाखांपेक्षा अधिक तरुणाईचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं. मी या कामामुळं प्रचंड भारावून गेलो. तेवढ्या रात्री मी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, त्यांचे अभिनंदन केले. त्यांनीही मला प्रतिसाद दिला. देवेंद्र यांनी ‘सारथी’च्या माध्यमातून झालेले सामाजिक काम, भविष्यामध्ये ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाचा होणारा उद्धार त्याचे नियोजन अगदी नेमकंपणानं माझ्यासमोर ठेवलं.
सकाळी लवकर उठून ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची भेट घेण्याचं ठरवलं. काकडे सर (९८२२८०८६०८) यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बाहेर एक व्यक्ती झाडाला पाणी घालत होती. एकीकडे ते बगिचा साफ करत होते तर दुसरीकडे झाडांना पाणी घालत होते.
‘‘काकडे सरांचं घर इथंच आहे का?’’ असं मी त्यांना विचारलं, त्यांनी होकाराची मान हालवली. हातामध्ये असलेलं पाणी झाडांना घातलं. हात धुतले आणि डोक्याचा लावलेला रुमाल काढत त्यांनी हात पुसले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सकाळचे संदीप काळे का?’’ मी म्हणालो, ‘‘हो. ’’ ‘‘या आतमध्ये. मीच काकडे. ’’ मला काही क्षण आश्चर्य वाटलं. आम्ही आतमध्ये गेलो.
काकडे सर यांच्या पत्नी शरदिनी नाश्ता घेऊन आल्या. त्यांनीही मला खुशाली विचारली. मी ‘सारथी’विषयी ऐकलं होतं. जो ‘सारथी’विषयी अभ्यास केला होता, त्याच्या पलीकडे जाऊन मला काकडे सरांनी ‘सारथी’चे अनेक पैलू सांगितले. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं ‘सारथी’ सुरू झाली त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम इथं उभं राहिलंय.
काकडे सरांनी काही पत्रं माझ्यासमोर ठेवली आणि ती मला वाचायला सांगितली. ती पत्र खूप भावनिक होती. कोणाच्या आई, वडील, बहिणीचं, कुण्या यशस्वी झालेल्या युवक- युवतींची ती पत्रे होती. तुम्ही ‘सारथी’च्या माध्यमातून मदत केली नसती तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं? काम करून शिकणं एवढं सोपं नव्हतं? योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिलं. काकडे सर तुम्हीच आई-बाबा झालात, असं त्या पत्रातला मजकूर सांगत होता. ती पत्रं नव्हती, तर लाखो यशस्वी झालेल्या तरुण मनांचा हुंकार होता.
मराठा आणि कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने २०१८ ला सुरू झालेले सारथी प्रामुख्याने शेती करणाऱ्या मराठा, कुणबी समाजासाठी उपयोगाला आली. नांदेडला जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या आयएएस काकडे सर यांची मुद्दाम ‘सारथी’साठी निवड केली गेली.
एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या काकडे सर यांचे वडील वामनराव शिक्षक होते. आई सुभद्रा गृहिणी होत्या. शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी काकडे सर यांनी काहीतरी करावं, असं त्यांच्या आई-वडिलांना नेहमी वाटायचं. त्यांच्या अनेक ठिकाणच्या विशेष कामगिरीतून ते दिसलंही. पण सारथीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कित्येक मुलांना मिळालेला लाल दिवा पाहायला काकडे सर यांचे आई-वडील आज नव्हते याचे मलाही खूप वाईट वाटत होते.
मी आणि काकडे सर ‘सारथी’कडे निघालो. रस्त्याने जाताना पुन्हा काकडे सर ‘सारथी’च्या शाबासकीचा महिमा मला सांगत होते. मागच्या चार वर्षांत पाचशे एक्कावन तरुण एमपीएससी परीक्षेमध्ये अव्वल ठरले. तर या चार वर्षांमध्ये यूपीएससीमध्ये ८४ तरुणांनी जबरदस्त यश संपादन केलं. केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरवूनही मेरीटमध्ये नंबर न लागणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’ने हेरलं आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार केला. नववीपासून ते वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत ‘सारथी’ मध्ये कितीतरी प्रकारच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.
अनेक व्यक्ती, अनेक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते ‘सारथी’च्या कामांमध्ये वेळ देत आहेत. परवा लागलेल्या एमपीएससी, यूपीएससीच्या निकालामध्ये बारा मुलं आयएएस झाले, तर अठरा मुली आयपीएस झाल्यात. आता ‘सारथी’ अजून विस्तार करत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र यासाठी भर देत आहे.
काकडे सर यांच्याकडे इतक्या यशोगाथा होत्या, इतके अनुभव होते की, ते एका लेखांमध्ये मांडणे मला शक्य नव्हतं. रविवार असूनही आज ‘सारथी’ला काकडे सर यांना भेटण्यासाठी आलेली मुला-मुलींची संख्या कमी नव्हती. त्या मुला-मुलींमध्ये अनेक पालक असे होते की, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यातल्या अनेकांनी हातामध्ये काकडे सरांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हार आणले होते. काकडे सरांनी ‘सारथी’ मधून मला अनेक गरीब, शेतकरी, मजूर, वडिलांची मुलं असणाऱ्या आयपीएस, आएएस यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. त्यांचं म्हणणं एकच होतं, ‘सारथी’ने मदत केली नसती तर आमच्या आयुष्यामध्ये हा सोन्याचा क्षण आला नसता.
मी काकडे सरांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला निघालो. काकडे सरांनी निघताना मला छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र भेट म्हणून दिले. पुस्तकाच्या कव्हरवरचे शाहू महाराज पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले. त्या ‘सारथी’च्या प्रत्येक कामात मला शाहू महाराज दिसत होते.
शासनाचा एखादा उपक्रम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा कसा असू शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण माझ्यासमोर ‘सारथी’ होते. शासनाचे अनेक प्रकल्प आहेत, त्यात प्रचंड पैसा असून काय करता? केवळ उपक्रम आहे, असं म्हणून चालत नाही, तर ते राबवणारे डोके सक्षम पाहिजे. काकडे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून ती सक्षमता तिथे मला दिसत होती.
आपल्या अवतीभोवती पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारे असे अनेक उपक्रम असतील, त्या प्रकल्पाला तुम्ही-आम्ही सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे, बरोबर ना.. !
☆ “सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?”☆ श्री संभाजी बबन गायके☆
(मारता, मारता.. मरे तो झुंजणारा कमांडो ! )
03-00-01-10… Three Overs-No Maiden-One Run-Ten Wickets.
ज्यांना क्रिकेटची भाषा समजते त्यांना वरील आकडेवारीचा अर्थ निश्चित समजेल. इतरांसाठी सांगतो… तीन षटके गोलंदाजी केली, त्यातील एकही षटक निर्धाव गेले नाही.. एक धाव दिली आणि दहा बळी घेतले! एकाच डावात सर्वच्या सर्व गडी बाद करायचे म्हणजे दहा बळी घ्यायचे, असे क्रिकेट इतिहासात आजवर केवळ तीन वेळा घडले आहे. १९९९ मध्ये अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती आणि त्याची ही कामगिरी अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
– – – पण लढाईच्या मैदानावर खरोखरच्या कसोटीत दहा बळी घेणा-या आणि त्या प्रयत्नात स्वत:ही बळी गेलेल्या एका श्रेष्ठ सैनिकाची कहाणी लोकांच्या लक्षात नाही, कारण ती कुणाला ठाऊक नाही… म्हणून हा एक अल्प प्रयत्न!
वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकीत, आरंभी साधा शिपाई म्हणून सैन्यात भरती झालेला तो नौजवान स्वयंस्फूर्तीने PARA SF म्हणजे PARACHUTE SPECIAL FORCE च्या नवव्या रेजिमेंट मध्ये २००२ मध्ये दाखल झाला आणि बघता बघता लान्स नायक पदावर पोहोचला.
स्पेशल फोर्स खरेच नावाप्रमाणे विशेष असते. यांतील निवड प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. आधी निष्णात Parachute Diver (हवाई छत्रीच्या साहाय्याने विमानातून उडी मारणारे) व्हावे लागते, नंतरच्या अधिक कठीण प्रशिक्षणात इतर भयावह कामांसह काही तासांत शंभर किलोमीटर्सचे अंतर पायी पार करायचे, त्यात खांद्यावर दहा किलो वजन आणि सात किलो वजनाचे शास्त्र वाहून न्यायचे, अशी अनेक आव्हाने असतात. थोडक्यात सांगायचे तर, ह्या गटात सामील होऊन ‘Balidaan Badge’ मिळवायला वाघाची छाती, सिंहाची हिंमत, हत्तीचे बळ, घोड्याचे चापल्य आणि पाषाणाचे काळीज लागते. हा मान मिळवण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्केच सैनिक स्पेशल ठरतात! याचाच अर्थ उत्तमातून सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. आणि यातील एक सैनिक गमावला जाणे, म्हणजे देशाची केवढी मोठी हानी होते, हे लक्षात घेतले जावे!
भारताच्या इतर सीमांच्या तुलनेत पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू काश्मीर येथील सीमेवर गेली कित्येक वर्षे काही न काही घडत असते. याच भागातून पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसतात आणि स्थानिक युवकांना हाताशी धरून, भडकावून भारत देशविरोधी कारवाया करतात. या अतिरेक्यांना रोखून धरण्याचे काम राष्ट्रीय रायफल्स सारखे सैन्य विभाग करीत असतात. PARA Special Force चे commandos सुद्धा इथे तैनात असतात. गरज पडली तर अतिरेकी सीमेत घुसण्याच्या बेतात असताना त्यांच्या सीमेत घुसून त्यांना संपवण्याचे धाडसी कामही आपले जवान पार पाडतात. हे कमांडो छोट्या छोट्या गटांनी आपली कामगिरी बजावत असतात. आजवर सुमारे आठ हजार अतिरेकी भारतीय सैन्याने यमसदनी धाडले असून सहा हजार जणांना जिवंत पकडले आहे. आणि या प्रयत्नात शेकडो भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे…. यावरून काय ते समजावे! आजही, या क्षणीही हे छुपे युद्ध सुरु आहे. आजही आपली पोरं मारत आहेत आणि मारत आहेत! याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे.
आजचे आपले कथानायक मोहन नाथ गोस्वामी उत्तराखंड मधील नैनीताल मधील लालकुंआ जवळच्या इंदिरानगर गावात ५ मे, १९८४ रोजी जन्मले. त्यांचे वडील सैन्यातच कार्यरत होते. त्यांच्यापासून स्फूर्ती घेउन मोहन नाथ सैन्यात भरती झाले. अतिशय नीडर, शूर आणि पराक्रमी असलेल्या मोहन नाथ यांना काश्मीर मधील खरोखरची लढाई खुणावत होती. अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. २००५ मध्ये त्यांनी para sf स्पेशल फोर्सेस मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिला आणि अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करून ते 9, Parachute Battalion Commando बनले. भीती नावाचा शब्द शब्दकोशात नसलेले मोहन नाथ अगदी आरंभापासून सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर असत. दहा वर्षांत ते लान्स नायक पदावर पोहोचले. 13625566W हा त्यांचा सर्विस क्रमांक होता. खरं तर सेवाज्येष्ठ असल्याने आता त्यांना सतत प्रत्येक मोहिमेवर जाण्याची गरज नव्हती. इतर कनिष्ठ सहकाऱ्यांना ते पुढे पाठवू शकत होते. त्यांचे वरिष्ठही त्यांना तसे सुचवत… पण मोहन नाथ यांना कर्तृत्व गाजवून दाखवायचे होते.. देशासाठी शत्रूला नेस्तनाबूत करण्यात त्यांना जास्त रस होता.. ते कुटुंबियांना नेहमी सांगायचे… मरुंगा तो दस बारा दुष्मनोको मार कर!
“सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ते सिनिअर अधिकारी साहेबांस मोहिमेवर पाठवा असा हट्ट धरीत… आणि म्हणत… मी करून दाखवेन, साहेब!
आणि तसा एक नव्हे तर लागोपाठ तीन प्रसंग घडले. कुपवाडा परिसरात ६, राष्ट्रीय रायफल्स तैनात होती. 9, Para SFसुद्धा इथे सक्रीय होती. अतिरेकी शोध आणि विनाश मोहीम हाती घेतली गेली २२ ऑगस्ट, २०१५ रोजी रात्री. पाकिस्तानातून काही अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. मोहन नाथ गोस्वामी आपल्या तुकडीतील इतर कमांडो साथीदारांसह अतिरेक्यांना भिडले. या धुमाश्चक्रीत आपला एक सैनिक जायबंदी झाला. भीषण गोळीबाराची तमा न बाळगता मोहन नाथ यांनी त्या साथीदाराला खांद्यावर घेतले आणि सुरक्षित जागी पोहोचवले आणि पुन्हा मोर्चा सांभाळत ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. लगेचच २६ ऑगस्ट, २०१५च्या रात्री ते पुन्हा मोहिमेत सामील झाले आणि विजयी होऊन परतले. आणखी तीन बळी मिळवले होते! यावेळी मूळ पाकिस्तानी असलेला एक कुप्रसिद्ध अतिरेकी जिवंत पकडण्यात आपल्या सैन्याला यश मिळाले. या दोन मोहिमांमध्ये सहा अतिरेकी खलास केले गेले. २ सप्टेंबर, २०१५… तिसरी मोठी मोहीम निघाली… अर्थातच मोहन नाथ गोस्वामी सर्वांत पुढे होते…. कुपवारा जिल्ह्यातील हापरुदा येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांचा एक मोठा गट घुसल्याची माहिती मिळाली…. या लबाड श्वापदांना सापळा रचून जेरबंद करण्याची योजना होती. रात्रीचे आठ सव्वा आठ झाले असतील… अचानक चार अतिरेकी टप्प्यात आले… दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. मोहन नाथ यांचे दोन सहकारी जबर जखमी झाले.. अतिरेक्यांनी त्यांना पुरते घेरले होते आणि त्या दोघांच्या जीवाला मोठा धोका होता.. मोहन नाथ आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकारी कमांडोसह आडोसा सोडून बाहेर आले… गोळीबार सुरूच होता… चार पैकी एकाला त्यांनी अचूक ठोकले… उरलेले तीन अतिरेकी गोळीबार करीत पुढे येत असतानाच… मोहन नाथ साहेबांनी त्यांच्यावर झेप घेतली… साहेबांच्या मांडीमध्ये गोळ्या घुसल्या… पण त्याची काळजी न करता ते पुढे सरकले… त्यांनी आणखी एक बळी घेतला… त्याच्या थेट काळजात गोळी घातली… दुसऱ्याला गंभीर जखमी करून त्याला मरणपंथावर ढकलला… आता मोहन नाथ यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या… त्यांनी चौथ्या अतिरेक्याच्या अंगावर वाघासारखी झेप टाकली… त्याच्या छाताडावर गन टेकवून ट्रिगर ओढला… आणि आणखी एक अतिरेकी नरकात धाडला. पण तो पर्यंत मोहन नाथ साहेबांच्या जखमांतून प्रचंड रक्तस्राव झाला होता. या मोहिमेत त्यांनी चार अतिरेकी ठार मारण्यात मोलाची कामगिरी बजावली होती आणि शिवाय आपल्या तीन साथीदारांचे प्राणही वाचवले होते.. स्वत:चे प्राण देऊन! सलग ११ दिवसांत हाती घेतलेल्या अतिरेकीविरोधी ३ मोहिमांत commando लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी १० अतिरेकी ठार मारण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता… आणि एकाला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती! “दहा शत्रू तर नक्कीच मारीन” हे त्यांचे शब्द त्यांनी खरे करूनच प्राण सोडले…. सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है? या त्यांच्या प्रश्नाला एकच उत्तर होते.. लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी साहब… आप जैसा बहादूरही इस काम को अंजाम दे सकता है!
या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी, 9, PARA SF Commando यांना मरणोत्तर अशोकचक्र (शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान) प्रदान करून गौरवले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे.