मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक!”

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.”

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला… .. पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

“पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!”

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

“प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘ केसरी ‘चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून ! ‘केसरी ‘चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच् कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ब्रह्मर्षी अंगिरा ऋषी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

 कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ ब्रह्मर्षी अंगिरा ऋषी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

अग्नि वायु रविभ्यस्तु त्र्यं ब्रह्म सनातनम |

दुदोह यज्ञसिध्यर्थमृगयु:  समलक्षणम् ||

अर्थ:-  परम्यात्माने सृष्टीमध्ये मनुष्याला निर्माण करून चार ऋषींकडून चार वेद ब्रम्हाला प्राप्त करून दिले. त्या ब्रह्माने अग्नी, वायू, आदित्य आणि तू म्हणजेच अंगिरा ऋषींकडून चार वेदांचे ज्ञान प्राप्त केले. असे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे. म्हणजेच अग्नी, आदित्य, वायू आणि अंगिरा ऋषींकडून ब्रह्मा ने  वेदांचे ज्ञान प्राप्त केले.

ब्रह्मर्षी अंगिरा वैदिक ऋषी होते. त्यांना प्रजापती असेही म्हणतात. त्यांच्या वंशजांना अंगीरस असे म्हणतात. त्यांनी अनेक वैदिक स्तोत्रे आणि मंत्र यांची निर्मिती केली. 

अथर्ववेदाला अथर्व अंगीरस असेही नाव आहे.त्यांचे अध्यात्मज्ञान दिव्य होते. त्यांच्याकडे योग बल, तपसाधना व मंत्र शक्ती खूप होती.

अग्नीचं एक नाव अंगार असे आहे. एकदा अग्नीदेव पाण्यात राहून तपसाधना करत होते. जेव्हा त्यांनी अंगिरा ऋषींना पाहिले, त्यांचे तपोबल पाहिले तेव्हा ते म्हणाले, हे महर्षी, तुम्हीच प्रथम अग्नी आहात. तुमच्या तेजासमोर मी फिका आहे. तेव्हा अंगिरा ऋषींनी अग्नीला देवतांना हविष्य पोहोचवण्याचं मानाचं काम दिलं. तेव्हापासून यज्ञामध्ये अग्नीला आहुती देऊन देवतांना हविष्य प्राप्ती देण्याची प्रथा सुरू झाली. अंगीरा ऋषींनी आपल्या छोट्या आयुष्यात खूप मोठे ज्ञान संपादन केले असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे. ते लहान असतानाच मोठे मोठे लोक त्यांच्याकडे येऊन शिक्षण घेत असत. एकदा ते म्हणाले,

पुत्र का इति‌ होवाच ज्ञानेन परिगृह्य तान् |

ते ऐकून तेथे बसलेल्या अनेक वृद्धांना राग आला. त्यांनी देवांकडे तक्रार केली. तेव्हा देव म्हणाले, अंगिरा योग्य बोलले ,कारण …. 

न तेन वृद्धो भवती येनास्य पलीतं शिर: |

यो वै युवाप्यधीयानस्तं देव: स्थविरं विदु: ||

अर्थ:-डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले म्हणजे माणूस वृद्ध होत नाही. तरुण असूनही जो ज्ञानी असतो त्याला वृद्ध म्हणतात. तेव्हा  सर्व वृद्धांनी अंगिरा ऋषींचे शिष्यत्व पत्करले.महर्षी भृगु ,अत्री यांच्यासारख्या अनेक ऋषींनी अंगिराजींकडून ज्ञान प्राप्त केले. राजस्थान येथील अजमेर येथे महर्षी अंगिरा आश्रम आहे.महर्षी शौनक यांना त्यांनी परा आणि अपरा या दोन विद्या शिकवल्या.

त्यांना स्वरूपा, सैराट, आणि पथ्या अशा तीन पत्नी होत्या. स्वरूपा मरीची ऋषींची कन्या. तिच्यापासून बृहस्पतीचा जन्म झाला. बृहस्पती  देवांचे गुरु.त्यांना खूप मुले झाली. सैराट किंवा स्वराट् ही कर्दम ऋषींची कन्या.तिचे पुत्र महर्षी गौतम, प्रबंध, वामदेव उतथ्य आणि उशीर.  पथ्या ही मनु ऋषींची कन्या.तिचे पुत्र विष्णू, संवर्त, विचित, अयास्य  असीज. महर्षी संवर्त यांनी वेदातील ऋचा रचल्या. त्यांनी अंगीरास्मृती हा ग्रंथ रचला. अंगिरा ऋषींना अनेक मुले झाली. देवांचे शिल्पकार ऋषी विश्वकर्मा हे त्यांचे नातू.

त्यांच्याबद्दल म्हणतात …. 

तुम हो मानस पुत्र ब्रह्मा के,

तुम सभी गुणोंमें  समान ब्रम्हा के,

दक्ष सुता स्मृती है भार्या तुम्हारी,

अग्नि से भी अधिक तेज तुम्हारा,

विश्वकर्मा जननी 

योगसिद्ध है सुता तुम्हारी,

ऋग्वेदमें वर्णन तुम्हारा जितना,

नही और किसी ऋषी का इतना,

ऋषी पंचमी पर मनाते जयंती तुम्हारी,

मंत्र तंत्र के ज्ञाता, नाम ऋषी अंगिरा तुम्हारा

 

….. अशा ब्रह्मर्षी अंगिरा यांना कोटी कोटी प्रणाम

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुबेरकाठी — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कुबेरकाठी — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

महादेवराव शिर्के सरकार म्हणजे सातार जवळच्या एका गावातलं बडं प्रस्थ. स्वभावाने अगदी लाख मोलाचा माणूस. दहा गावाचं वतन असलं तरी बोलण्यात काडीचाही माज नाही की अहंकार नाही. तालेवारापासून गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाला आदराने वागवणार, म्हारामांगाच्या पोरींबाळींनाही ताई-माई असं आदरार्थी संबोधणार, आदराने अदबीने चौकशी करणार. 

त्यामुळे सरकारांबद्दलही गावच्या पंचक्रोशीत सगळ्यांना माया होती, जिव्हाळा होता. एकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण आलं सरकारांच्या मना तिथं देवाचं चालंना अशातली गत होती. 

मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील… छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं…. 

विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं…. विष्णुशास्त्री म्हणजे वेदपारंगत, प्रचंड बुध्दीमान आणि करारी ब्राह्मण होते. गावात कुठेही रुद्रावर्तन, महारुद्र, दूर्गापाठ असला की विष्णुशास्त्रींशिवाय चालत नसे. शास्त्रीबुवा आले सरकारांना भेटायला….

“बोला सरकार…” शास्त्रीबुवा म्हणाले. 

शिर्केसरकारांनी सदरेवरुन उठून शास्त्रीबुवांना साष्टांग नमस्कार केला…

“सरकार, तुमच्या परिक्रमेविषयी समजलं. मी येणारच होतो तुम्हाला भेटायला आणि वृत्तांत ऐकायला. अहो कठीण असते हो परिक्रमा… तुमचं कौतुक वाटतं सरकार. संपत्तीच्या रुपाने प्रत्यक्ष लक्ष्मीमाता तुमच्या घरी पाणी भरत असतानाही तुम्ही सरस्वती मातेशी सख्य जपून ठेवलं आहे. तुमचा आध्यात्माचा, धर्माचा व्यासंग उत्तम आहे. आणि त्यात तुम्ही परिक्रमेसारखी दिव्य गोष्टही तितक्याच सुरेखपणे करता हे विशेष आहे. असा ज्ञान, विद्वत्ता आणि धनाचा संगम क्वचितच बघायला मिळतो. बरं बोला…काय काम काढलंत मजकडे?” शास्त्रीबुवांनी विषयालाच हात घातला. 

“त्याचं असं शास्त्रीबुवा, मला परिक्रमेवरुन सुखरुप आल्यानं पारणं करायचंय, गंगापूजनही करायचं आहेच. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणभोजन घालायचं आहे. त्याची नियोजनाची जबाबदारी मी तुमचेवर सोपवतो…कितीही माणसं येऊ देत…”

“ठीक आहे…” इतकं बोलुन शास्त्रीबुवा निघाले. 

तिथून निघून घरी येत असताना महारवाड्यावरुनच वाट जात होती. त्याकाळी विष्णुशास्त्री हे जितके बुध्दीमान ब्राह्मण होते, ज्ञानी होते हे सत्य असलं तरी ते जातपात आणि शिवाशिव मानत नसत. ही बाब अनेकांना खटकायची, दोन वेळा तिथल्या ब्रह्मवृदांनी त्यांना सहा सहा महिने वाळीत टाकलंही होतं… पण ते नसले की अनेक धर्माकर्माची कामं अडून रहायची. आणि विष्णूशास्त्री काही सुधारण्यातले नव्हते त्यामुळे आता त्यांच्या या  मोकळ्याचाकळ्या वागणूकीकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्याची लोकांना सवय झाली होती. 

महारवाड्यात सुमसाम शांतता होती. पारावर गोपाळ, शनवाऱ्या, बापू असे चारपाच लोक बसलेले होते. शास्त्रीबुवांना बघून ते जागेवरुन उठले, नमस्कार केला… परिसरात या वर्षी दुष्काळ पडला होता. प्रत्येकाचे खायचे वांधे झाले होते, पोरं उपाशीच होती. कशीबशी पेज पिऊन दिवस कंठणं सुरु होतं… काय करावं ते समजत नव्हतं. शास्त्रीबुवांनी सगळं ऐकलं…

”बापू, एकूण किती डोकी आहेत रे महारवाड्यात तुमच्या… धाकली, कडेवरची, धावती आणि म्हातारी कोतारी पकडून सगळी सांग…” शास्त्रीबुवा विचारते झाले.

बापूने माणसं मोजायला सुरुवात केली. तो नावं घेत होता, शास्त्रीबुवा माणसं मोजत होते… तब्बल ९६ लोक झाले…घरी जाण्याऐवजी शास्त्रीबुवा पुन्हा वाड्याच्या दिशेने उलट फिरले…

***

“पण…पण शास्त्रीबुवा… हे कसं शक्य आहे” सरकार म्हणाले, “लक्षात घ्या, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. पण मला ब्राह्मणभोजन घालायचं आहे… गावजेवण मी देईन की सवडीने… त्यात काय मोठंसं…? पण…..”

“सरकार, तुम्ही बोललात की तुम्ही माझ्या शब्दाबाहेर नाहीत… बरोबर… बघा श्रीमद्भग्वद्गीतेत उल्लेख आहे प्रत्यक्ष भगवानच म्हणतात की _“अहं वैश्वानरो भुत्वा, प्राणिनां देहमाश्रिता:… म्हणजे समस्त जीवांच्या पोटी भुकेच्या रुपाने असणारा वैश्वानर नावाचा अग्नि म्हणजेच मी… सरकार, हे बघा तुम्ही ब्राह्मणभोजनाची जबाबदारी मजवर सोपवलीत म्हणजे मी काय करणार तर साताऱ्यापासून वडूजपर्यंत सगळ्या गावातली ब्राह्मणमंडळी गोळा करुन आणणार… चारशे ब्राह्मण होतील… जे ते घरी जेवणार ते इथे येऊन जेवतील. बरोबर आहे? तर जिथे खरी जिवंत भूक आहे त्या पोटांना चार चांगले घास द्यायला हवेत तर तुम्हाला शतपटीने पुण्य लाभेल महादेवराव…

“आणि अहो ब्राह्मण म्हणजे कोण हो? चार वेद येतात तो ब्राह्मण नाही… ब्रह्म जानाति इति ब्राह्मण:… जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण… आणि ही गावकुसाबाहेरची उपाशी जनता आहे ना, ती नुसतं ब्रह्म जाणत नाही तर पोटातली आग, तो वैश्वानर म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर ती आग जागी ठेवतो. या भयाण दुष्काळातही ती मंडळी पेजपाणी पिऊन दिवस ढकलतात पण चोरीमारी करत नाहीत… तेच खरं जिवंत ब्रह्म हो…!” 

सरकार निरुत्तर झाले, त्यांचे डोळे ओले झाले. विष्णुशास्त्रींना साष्टांग नमस्कार केला…

***

पुढच्या गुरुवारी पंगत बसली… सदरेवर चारशे ब्राह्मण आणि अंगणात शंभरेक महार असा सोहळा पार पडला…सगळ्यांना एकच वागणूक होती, तसेच सारखेच पदार्थ होते… जिथे ब्रह्मवृदांना केशरीभात होता तिथे महारांनाही केशरीभात, पुऱ्या, भात, आणि इतर पक्वान्नांचं साग्रसंगीत भोजन होतं. भोजनोत्तर प्रत्येकाला दक्षिणा दिली गेली. बायकांना साडीचोळी दिली गेली… ब्राह्मणांसोबत महारही तृप्त होऊन निघू लागले…

सरकार आणि विष्णुशास्त्री सदरेच्या जवळ अंगणात उभे राहून हा अन्नपूर्णेचा तृप्त सोहळा भरल्या डोळ्यांनी बघत होते. इतक्यात एक वृध्द महार जवळ आला, दोघांनाही त्याने खाली लवून नमस्कार केला…

”बोला आजोबा…काय म्हणताय? झालं का जेवण?” सरकारांनी विचारलं.

“व्हय…झालं जी… मन तृप्त झालं… लई दिसांनी आसं ग्वाड जेवान मिळाळं खायला… दक्षिणा बी मिळाली”

“मग… अजून काही हवंय का?” शास्त्रीबुवा विचारते झाले.

“न्हाई… पण या बदल्यात मला तुम्हाला काही द्यायचंय… ते स्विकार करा…”

सरकार आणि शास्त्रीबुवा एक क्षण स्तिमित झाले… डोकं जड झाल्यागत झालं दोघांचं…

त्या म्हातारबुवांनी खांद्यावरच्या झोळीतून हात घालून दोन फुटभर लांबीच्या काठ्या काढल्या… काळ्याकभिन्न, शिसवी आणि चकचकीत पॉलिश कराव्यात तशा… दोघांच्या हातात दिल्या… खरं म्हणजे आता शिवायचं नाही वगैरे दोघे क्षणभर विसरुन गेले… कसल्यातरी संमोहनाचा असर होता की काय देव जाणे?

“याला कुबेरकाठी म्हणतात… आत जंगलात गावते… ही अशीच ठेवायची… तिजोरीत, जपून ठेवायची… काही करायचं नाही. फक्त वर्षातून एकदा रामनवमीला बाहेर काढायची, पूजा अर्चा करायची. शक्य होईल तसं गावजेवण किंवा गरीबांना भोजन घालायचं आणि सूर्यास्ताला परत ठेऊन द्यायची आत, ती पुन्हा पुढच्या रामनवमीलाच काढायची… तुम्हा दोघांना काही कमी पडणार नाही… तुमच्या पुढच्या जितक्या पिढ्या हा नियम पाळतील तेवढे दिवस तेवढी वर्षे ही काठी तुमच्याकडे असेल… नावासारखीच आहे ही कुबेरकाठी… कुबेराची धनसंपत्ती देणारी…” इतकं बोलून तो म्हातारबा निघून गेला…

पुढच्याच क्षणी दोघे भानावर आले… काय झालं ते समजायला मार्गच नव्हता… आसपास धावाधाव करुन शोध घेतला तर समजलं असा कोणी म्हातारबा महारवाड्यात नाहीच आहे मुळात… तो काठी टेकत टेकत असा कितीसा दूर गेला असेल? पण आठी दिशांना माणसं पाठवून कोणी दिसलं नाही तेव्हा हा चमत्कार आहे  हे दोघांच्याही ध्यानात आलं…!

***

आज सत्तरऐंशी वर्षे झाली या घटनेला तरीही रामनवमी असली की शिर्के आणि अभ्यंकर घराण्याचे सध्याचे वंशज एकत्र येतात. दोन्ही कुबेरकाठ्या अत्यंत गुप्तपणे बाहेर काढल्या जातात… 

दोन्ही काठ्यांचे यथसांग पूजन होते, विष्णूसहस्त्रनामाचा अभिषेक होतो… 

ही पूजा अतिशय गुप्तपणे कोणालाही समजणार नाही अशाप्रकारे होते. आणि मग गावजेवण, भंडारा होतो… शेकडो माणसं आजही जेवून जातात…

दोन्ही घराण्याचे आजचे वंशज एकमेकांशी मैत्री टिकवून आहेत…

दोन्ही घराण्यात या कुबेरकाठीच्या निमित्ताने एक विशेष प्रेमाचे स्नेहबंध निर्माण झाले आहेत. 

एकत्र “कॉलेबरेशन” मध्ये काही प्रोजेक्ट्सही सुरु आहेत… दरवर्षी भंडारा झाला की सध्याचे वंशज दुपारी १ वाजता एकत्र येतात, प्रवेशद्वाराकडे नजर ठेवून असतात… 

तिथे एक ते सव्वाच्या दरम्यान एक वृध्द व्यक्ती दिसते… त्याचं दर्शन लांबूनच घ्यायचं असा संकेत आजही पाळला जातो… तो वयोवृध्द आजोबा जेवून निघालेला असतो… तो मागे वळतो या दोघांकडे कटाक्ष टाकतो, त्यांनी लांबूनच केलेल्या नमस्काराचा सस्मित चेहऱ्याने स्विकार करतो आणि काठी टेकत निघून जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत काठ्यांना घरातील मंडळी साष्टांग नमस्कार करतात… आणि दोन्ही कुबेरकाठ्या आपापल्या तिजोरीत बंदिस्त होतात… त्या पुढच्या रामनवमीला तिजोरीबाहेर येण्यासाठीच…!!!

(कथा सत्य आहे. तपशील, गावाची नावे, आडनावे यात बदल केले आहेत… अधिक सविस्तर डिटेल्स विचारु नयेत. कथेचा आनंद घ्यावा आणि कथा सत्य की असत्य? हे ठरविण्याचा अधिकार वाचकांनाच आहे )

लेखक/संकलक  : अनामिक

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हसणं :  शिकायची बाब ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ हसणं :  शिकायची बाब !… ☆ श्री संभाजी बबन गायके 

काही मानवसदृश प्राण्यांचे चेहरे हसरे वाटू शकतात..पण ते हसू शकतात हे अजून सिद्ध झालेले नाही! एका हिंस्र प्राण्याचा आवाज माणसाच्या हसण्याशी साधर्म्य दाखवणारा आहे,पण त्याच्या जवळ गेले की माणसाचे हसणे भूतकाळात जमा होऊन जाण्याची शक्यता अधिक! अस्वल माणसाला गुदगुल्या करून करून मारून टाकते,असे कशावरून सांगतात ते न कळे!

मग राहता राहिला माणूस. हा प्राणी मात्र हसू शकतो. याचे हसण्याचे प्रकार नानाविध असतात,हेही खरेच.

कुणी इतरांना हसतो. कुणी कसंनुसं हसतो. स्वतःवर हसणारी माणसं तशी विरळाच असतात. अतीव दुःखातही एक उदास हसू चर्येवर उमटू शकते..नशीब थट्टा मांडते तेंव्हा !

हसवणे तसे बरेच सोपे असते..कारण माणसं फारसा विचार न करता हसू शकतात. किंवा आधी हसून घेऊन मग दातांनी ओठ चावून,किंवा जीभ बाहेर काढून काही क्षण दातांखाली दाबून ठेवून पश्चात्ताप व्यक्त करतात!

शेजारचा हसतो म्हणून काही माणसं मिले सूर मेरा तुम्हारा चालीवर हसतात.. विशेषतः इंग्लिश सिनेमा बघताना असे व्हायचे पूर्वी. दूरदर्शन मालिका वाल्यांनी मग पूर्व ध्वनिमुद्रित हास्य ऐकवून श्रोत्यांना इथे तुम्ही हसणे अपेक्षित आहे,असा दम देण्याचा प्रघात सुरू केला. हसताय ना? असं विचारून हसायलाच पाहिजे अशी गळ ही घातली जाते! Bench वर या शब्दाची शिवी करूनही हसण्याच्या जत्रेत रेवड्या वसूल केल्या जातात! दोन अर्थ निघतील..नव्हे काढलेच जातील अशी खात्री असलेल्यांचे दिवस होऊन गेलेत! अंगविक्षेप आणि डोळ्यांसह मुखविक्षेप करून हास्य सम्राट सुद्धा झालीत माणसं. मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा अशुद्ध किंवा शुद्ध नसते..ती फक्त निराळी असू शकते! नव्हते जर शुद्ध तर व्हते अशुद्ध कसे? पण इतरांच्या निराळ्या शब्दोच्चारांचा विनोदाच्या अंगाने आपल्या बोलण्यात,लिहिण्यात उपयोग करून हशा वसूल करणारी उचली मंडळी सुद्धा आढळतात!

मनात शुद्ध हास्याचे कारंजे निर्माण करणाऱ्यांच्या नभोमंडलात सर्वाधिक तेजस्वी आणि तरीही नेत्रसुखद, कर्णसुखद माणूस म्हणजे.. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचे अवलिया !

यांनी हसायला शिकवले ! 

त्यांच्या स्मृतीने हसू न येता हात आपोआप जोडले जातात.. हे त्यांचे बलस्थान !

स्वर्गस्थ देवता आणि तत्सम अधिकारी आता ‘पुल’ नावाच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्याची चूक करणार नाहीत…त्यांनाही स्वर्गात हसवायला ‘पुल’ कायमचे पाहिजे आहेत..नाही का?

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(विविध व्यवसायाच्या संतांच्या दृष्टीतून)

विठ्ठलाचे रूप म्हणजे शेकडो वर्षाच्या मराठी संस्कृतीचे एक खूपच वेगळे स्वरूप आहे ! सगळ्या  भक्तांचा, जातीपातींचा, व्यावसायिकांचा, बलुतेदारांचा तो देव ! मातीसारखा, अत्यंत वात्सल्याने भरलेल्या धरतीसारखा !! जेवढे तुम्ही पेराल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला परत करतो. बरं त्याला तुमच्याकडून हवं तरी काय तर फक्त तुमची भक्ती, तुमचे शब्द, तुमचं प्रेम याचा तो भुकेला..

या विठ्ठलाने शेकडो वर्षे, महाराष्ट्राची अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, संगीत, कला अशी सगळीच क्षेत्रे समृद्ध केली. अठरापगड जातींच्या समाजाला भक्तीसमृद्ध केले. अध्यात्मातील चारीही मुक्तींचा सोपा मार्ग, समाजातील शेवटच्या पायरीवरील माणसांनाही कळला. पुरुषसूक्तात जरी ” ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् ” अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू ( अगदी ब्राह्मणसुद्धा ) हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही. परंतु  ” पद्भ्यां शूद्रो अजायत ” अशी उपमा  दिलेल्या  पायांनाच हात लावून, पायांवर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो.

संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवतगीता प्राकृतात आणली आणि मराठीत एक अध्यात्मिक क्रांतीच झाली. येथे त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रत्येक जाती व्यवसायात थोर संत होऊन गेले. अनेकांचा विविध कारणांनी छळ झाला तरी त्यांनी विठ्ठलाला सोडले नाही. खुद्द ज्ञानेश्वर माउलींनी, त्यांच्या कुटुंबीयांचा अपरिमित छळ होऊनही कुणालाही शिव्याशाप दिले नाहीत. उलट देवाकडे पूर्ण विश्वाच्या भल्याचे पसायदान मागितले.

नंतरच्या मांदियाळीतील  संतांच्या स्वभाव, व्यवसाय, कार्यानुभवांमुळे एकच विठ्ठल त्यांना कसा कसा दिसला, भावला हे पाहणे आपल्याला भावणारे आहे.

संत गोरा कुंभार आपल्या अभंगात ” देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ” आणि  ” न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ” असे म्हणतात. 

संत नरहरी सोनार तर थेट विठ्ठलाला आपल्या व्यवसायातील वर्णन सांगतात — देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।। त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।। जीव शिव करूनी फुंकी । रात्रन्‌दिवस ठोकाठाकी ।। विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।। मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।। ज्ञान ताजवा घेऊन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।। खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पेंल थंडी ।। नरहरी सोनार हरीचा दास । भजन करा रात्रं दिवस ॥

संत सावता माळी यांना आपल्या मळ्यातील भाजीमध्येच विठ्ठल दिसतो.ते म्हणतात, “आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी, लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि || “

संत तुकाराम महाराज समाजातील जातीभेदाबाबत उपरोधकपणे म्हणतात, बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों II

संत जनाबाई त्यांना पडणाऱ्या तत्कालीन हलक्या कामांबद्दल म्हणतात — तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥ ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥

संत कान्होपात्रा या महान संत कवयित्री, जन्माने गणिका कन्या. त्यांचे सांगणे कांही वेगळेच ! — 

दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।

संत चोखामेळा म्हणजे सर्वात साध्या भाषेत, सर्वात उच्च तत्वज्ञान  —— ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४ II

संत सोयराबाई या सहजपणे सर्वोच्च तत्वज्ञान सांगतात — अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५II 

प्रत्येकाला दिसलेला विठ्ठल हा आपापल्या दृष्टीने दिसलेला आहे. पं. भीमसेन जोशी हे विठ्ठल हा शब्द गातांना दोन टाळ एकावर एक वाजविल्यासारखे ठणठणीत वाटतात तर श्रीधर फडके यांचा विठ्ठल, जरा अधिकच मृदू असतो. ग.दि.माडगूळकरही  विठ्ठलाला विविध घट बनविणारा ” वेडा कुंभार ” असे म्हणतात. जगदीश खेबुडकर ” ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी ( ठिणगी रुपी फुले ) वाहू दे ” असे म्हणतात.

आता आषाढी एकादशी आली आहे. लाखो वैष्णवांचा मेळा माऊलीभेटीला निघाला आहे. सर्वांचा विठ्ठल एकच, पण त्याचे दर्शन मात्र व्यवसाय, समाज, अनुभूती यांच्या विविध खिडक्यांमधून घेतले जाते. वारीमध्ये चालणारा, धावणारा, टाळकरी, माळकरी आणि ज्याला भेटायचे आहे तो, असे सगळेच ”  माऊली “! चंद्रभागेच्या तीरी या माऊलींच्या  रूपातील अवघा भक्ती रंग एकच ” विठ्ठल रंग ” होतो. मग सर्वांचे फक्त एकच काम उरते — बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव II

लेखक :  श्री मकरंद करंदीकर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १ ते ११) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक…

अमी हि त्वां सुरसङ्‍घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति।

स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्‍घा: स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥२१॥

*

प्रवेशताती तुमच्यामध्ये समूह कितीक देवतांचे

काही होउन भयभीत करिती आर्त स्तवन तुमचे  

सिद्ध-महर्षींच्या कल्याणास्तव मधुर स्तोत्र गाती

प्रसन्न करण्या तुम्हा परमेशा अमाप  करती स्तुती ॥२१॥

*

रुद्रादित्या वसवो ये च साध्याविश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।

गंधर्वयक्षासुरसिद्धसङ्‍घावीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥२२॥

*

आदित्य रुद्र तथा वसू साध्य सवे

अश्विनीकुमार मरुद्गण पितर देवविश्वे

गंधर्व सिद्ध असूर आणि उपदेव यक्ष 

विस्मित घेत दर्शन विस्फारुनीया अक्ष ॥२२॥

*

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रंमहाबाहो बहुबाहूरूपादम्‌ ।

बहूदरं बहुदंष्ट्राकरालंदृष्टवा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्‌ ॥२३॥

*

नयन आनन भुजा जंघा तथा उदर पाद बहुत

विक्राळ बहुत दंत देखुनी व्याकुळ सकल होत ॥२३॥

*

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णंव्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्‌ ।

दृष्टवा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥२४॥

*

दर्शन होता तुमचे विष्णो विशाल व्योमव्याप्त  

बहुवर्णी बहूत आनन अष्टदिशांना आहे पहात

विशाल तव नयन देदिप्यमान मुखावरी अगणित

शांती ढळली धैय गळाले अंतर्यामी मी भयभीत ॥२४॥

*

दंष्ट्राकरालानि च ते मुखानिदृष्टैव कालानलसन्निभानि ।

दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥२५॥

*

प्रलयकाली अग्नी सम मुखात कराल दंत

हरपले दिशाभान सुखचैन ना मज प्राप्त

विराट कराल तव या दर्शने मी भयभीत

जगन्निवासा देवेशा प्रसन्न व्हा करण्या शांत ॥२५॥

*

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः ।

भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥२६॥

*

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।

केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्‍गै ॥२७॥

*

धृतराष्ट्रपुत्र तथा समस्त राजे तुझ्यात प्रवेशतात

भीष्म द्रोण प्रधान वीर अंगराज कर्ण समवेत 

तव कराल मुखात वेगे वेगे प्रवेर करत दौडत

कित्येक शीरे चूर्ण दिसतात तुझ्या भयाण मुखात ॥२६,२७॥

*

यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।

तथा तवामी नरलोकवीराविशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥२८॥

*

दुथडी सरिता वेगाने वाहते विलिन व्हावया दर्यात

नरवीर तद्वत  प्रवेशती विलिन व्हावया तव मुखात ॥२८॥

*

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाविशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।

तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥२९॥

*

पतंग झेपावे मोहवशे धगधगत्या अग्नीमध्ये

जळुन खाक व्हावया  अनलाच्या ज्योतीमध्ये

समस्त लोक विवेकशून्य स्वनाश करुन घ्यावया

मुखात तुमच्या वेगाने धावतआतुर प्रवेशावया ॥२९॥

*

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः ।

तेजोभिरापूर्य जगत्समग्रंभासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥

*

ग्रास करुनिया त्या सकलांचा माधवा चर्वण करिता

उग्र तेज आपुले तापुनी भाजुन काढी समस्त जगता ॥३०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर

– आणि त्याने सांगितलेले  “तीन टेकअवेज

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth College नं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.

आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत. 

१. Effortless is a myth 

एफर्टलेस – एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.

२. It’s only a point

आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It’s only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.

उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.

३.‘Life is bigger than the court’

आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.

टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..! 

लेखिका : नीलांबरी जोशी 

(फेडरर यांच्या संपूर्ण भाषणाची लिंक — https://www.youtube.com/watch?v=pqWUuYTcG-o&ab_channel=Dartmouth

प्रस्तुती : स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विठ्ठलाचे पायी… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ विठ्ठलाचे पायी… ☆ श्री संभाजी बबन गायके 

ज्यांचे काळजाचे तुकडे देशाच्या सीमांवर प्रत्यक्ष मृत्यूसमोर अहोरात्र उभे असतात, त्यांच्या डोळ्यांची आणि गाढ झोपेची ओळख खूपच पुसट झालेली असते. रात्रीचा दीड एक वाजला असेल. भाऊंना तशी नुकतीच झोप लागली होती. एखादा डुलका झाला की बाकी वेळ ते जागेच असायचे. त्यांचे चिरंजीव बजरंग आणि त्यांचे सर्वच कुटुंब,गाव त्यांना ‘ भाऊ ‘ म्हणून संबोधत असे. बजरंग फौजेत भरती होऊन तसे स्थिरावला होते. पत्नी,दोन मुलं असा संसारही मार्गी लागला होता. नोकरीची वर्षेही तशी सरत आलेली होती. लवकरच कायम सुट्टी येण्याचा, सेवानिवृत्ती पत्करण्याचा त्यांचा विचार होता.    बाकीच्या वेळी अजिबात आवश्यकता पडत नसतानाही केवळ धाकटे चिरंजीव बजरंगराव आणि बाहेरगावी नोकरीत असलेले थोरले चिरंजीव यांचेशी बोलता यावं, त्यांची  ख्यालीखुशाली कळत राहावी,म्हणून भाऊंनी घरी टेलिफोन बसवून घेतला होता.

टेलिफोन खणाणला तसे भाऊ ताडकन झोपेतून जागे झाले व उठले. वयोमानाने त्यांच्या पत्नीला ऐकायला कमी यायचे. त्यांच्या पत्नी म्हणजेच बजरंग यांच्या आईसाहेब या आवाजाने जाग्या झाल्या नाहीत. तिकडून बजरंग फोनवर होते. त्याकाळी मुळात सैनिकांसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था नव्हती. जी काही व्यवस्था होती ती पुरेशी नव्हती. सीमावर्ती भाग आधीच दुर्गम. त्यातच सीमेवर युद्धाचे काळे ढग जमा झाल्याचे दिवस. टेलिफोन करण्यासाठी काही तास लागायचे आणि अर्थातच प्रत्येकालाच घरच्यांशी बोलायचे असायचे! पत्रांतून फार काही लिहिता येत नसे. आणि लिहिलेली पत्रे घरांपर्यंत पोहोचायला उशीर तर लागायचाच! 

बजरंग यांचा फोन करण्याचा नंबर रात्री दीड वाजता लागला! एवढ्या उशीरा फोन करण्याचं कारणही तसंच होतं. बजरंग यांची पलटण अंतिम लढाईला निघायची होती. परत येण्याची शाश्वती कधीच नसते! चार शब्द बोलून घ्यावेत, निरोप द्यावा म्हणून बजरंगरावांनी घरी फोन लावला होता. त्यांची पत्नी त्यावेळी ग्वाल्हेरला असल्याने तिच्याशी बोलणे शक्य नव्हते. 

सैनिकाला घरी सर्व काही सांगता येत नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गुप्तता पाळावी लागते. बजरंगराव एरव्ही खूप कठीण काळजाचे…वागण्यात कडक! कर्तव्यात वैय्यक्तिक भावनांचा अडसर येऊ न देणारे शिपाई गडी! पण आज त्यांचा स्वर कातर होत होता..त्यांच्या मनाविरुद्ध! फोनवर फार वेळ बोलताही येणार नव्हते आणि काय बोलावे ते समजतही नव्हते! फोन ठेवताना शेवटी बजरंगरावांच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले… ” माझ्या पोरांना चांगलं शिकवा!”

भाऊ आता खडबडून जागे झाले होते! बजरंगराव आधी असे कधी काही बोलल्याचे त्यांना आठवेना. आजच असं काय झालं असावं, की त्यांनी ही निरवानिरवीची भाषा बोलावी? फोन बंद झाल्याने काही उलगडाही होईना! पत्नीला उठवून हे सांगावं असं त्यांना वाटेना. ती बिचारी आणखीनच काळजीत पडेल! 

भाऊंनीं डोळे मिटले…पांडुरंगाला स्मरत हात जोडले आणि स्वत:शीच काही पुटपुटले. आणि उठून ते देवघरातल्या पांडूरंगाच्या तसबिरीपाशी गेले. अबीर कपाळावर लावला आणि सकाळची वाट पहात डोळे मिटून पडून राहिले….पण डोळ्यांसमोरून बजरंग काही हलत नव्हते. तसा ते सुट्टी संपवून ड्यूटीवर जायला निघाले की, त्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. पण ते दाखवायचे नाहीत वरवर. कामाला निघालेल्या माणसाचे चित्त दु:खी करू नये, असा त्यांचा विचार असे. बाकी एकांतात किती आसवं ढाळत असतील ते विठ्ठलालाच ठाऊक! सैनिकांच्या आई-बापांची,पत्नी,मुलांची, बहिण-भावांची अशीच तर असते अवस्था! 

आषाढी वारीचे दिवस होते. एरव्ही शेतांमधल्या विठ्ठलाची सेवा करण्यात मग्न असलेल्या भाऊंनी यंदा वारीला जाण्याचे ठरवले. ते समजल्यावर गावातल्या माळकरी मंडळींनाही आनंद झाला. बघता बघता सात वर्षे गेली. इकडे फौजेत कर्तव्य बजावणारे बजरंगराव अनेक जीवघेण्या संकटांतून सहीसलामत बचावले….शत्रूने शेकडो गोळ्या डागल्या…पण कोणत्याही गोळीवर बजरंग हे नाव नव्हतं! उलट त्यांच्याच गोळ्यांवर दुष्मनांची नावे ठळक होती. घरी सुट्टीवर आले की ते दिवस कधी संपूच नयेत,असे वाटायचे सर्वांना…भाऊंना तर जास्तच! 

त्यांनी पंढरीची वारी सुरू केल्याला यंदा सात वर्षे पूर्ण होणार होती. खरे तर आधी ते आपल्या मोठ्या जिगरीने कमावलेल्या आणि राखलेल्या शेत-मळ्यातच विठ्ठल शोधायचे सावता महाराजांसारखे. गळ्यात तुळशीमाळा होतीच त्यांच्या जन्माच्या पाचवीला त्यांच्या वडिलांनी आवर्जून घातलेली. 

कालांतराने तब्येत ठीक नव्हती तरी भाऊंनीं हा नेम मोडला नव्हता. ‘कशाला पायपीट करता एवढी. खूपच वाटलं तर एस.टी.नं जात जावा की’ असं बजरंग म्हणायचे तेंव्हा भाऊ फक्त हसायचे आणि म्हणायचे…तो चालवत नेतोय तोवर चालायचं!      

यंदा भाऊंची सातवी वारी.एक तप पूर्ण करायचं होतं. चालवत नव्हतं तरी भाऊ नेटाने माऊलींसोबत निघाले. बजरंग या वर्षी फौजेतून कायमसाठी घरी यायचे होता. आणि येण्याचे दिवस जवळ आले होते. पण तरीही भाऊ वारीला निघून गेले…बजरंग आणि पांडुरंग त्यांच्यासाठी कुणी वेगळे नव्हते. 

आषाढी झाली…पालख्या माघारीच्या रस्त्याला लागल्या. गावातल्या दिंड्या मिळेल त्या वाहनांनी लगोलग माघारी निघाल्या. बजरंग त्या सकाळीच सुट्टीसाठी घरी पोहोचले होते. संध्याकाळच्या सुमारास दिंडीचा ट्रक गावात पोहोचला. भाऊ घराकडे निघाले…थोडे थकले होते, चेहरा काळवंडला होता उन्हातान्हानं, पण त्यावर समाधान झळकत होतं. एक देवाचा वारकरी आणि एक देशाचा धारकरी असे दोघे एकाच दिवशी घरी आले होते…हा योगायोग! 

बजरंगरावांनी वडिलांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवले…’देवा,विठ्ठला.. पांडुरंगा!शब्द राखला तुम्ही!’ भाऊ उद्गारले! 

रात्री भाऊंचे पाय चेपताना बजरंग म्हणाले,”भाऊ,आता तुमच्याच्यानं चालवत नाही. बास झाली आता वारी!” 

“आणखी आठ वर्षे वारी करणार काहीही झालं तरी! ‘ देह जावो अथवा राहो..पांडुरंगी दृढ भाव!’… पूर्ण होऊ दे नवस माझा! बजरंगरावांना काय किंवा घरातल्या इतर कुणाला काय, नवसाचं काही माहीत नव्हतं. “कसला नवस?” बजरंगरावांनी विचारले.  

“त्या दिवशी रात्री तुझा दीड वाजता फोन आला. नीट काही कळालं नाही. पण तू म्हणाला,”पोरांना नीट शिकवा..सांभाळा! ते तुझं बोलणं काळजाला घरं पाडून गेलं. मला माहित होतं, तुला काही उलगडून सांगता येणार नव्हतं. पण मी तर फौजीचा बाप की रे! मला सगळं समजून चुकलं! पोरं लढायला निघालीत….परत नजरेस पडतील की नाही,देव जाणे! म्हणून त्या देवालाच साकडं घातलं…आमच्या सैनिकांना सुरक्षित ठेव…लढाईत त्यांचंच निशाण उंच राहू दे…! पांडुरंगा..तुझ्या बारा वा-या करीन न चुकता! पण माझ्या लेकराच्या पाठीशी उभा रहा!” पांडुरंगाने माझं ऐकलं! आज तू माझ्यासमोर आहेस!” असं बोलताना भाऊंचे डोळे भरून आले होते…त्यांच्या डोळ्यांतून खाली ओघळणा-या अश्रूंच्या धारेत बजरंगराव न्हाऊन निघाले! 

दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली असतानाही भाऊंनी ‘ केला नेम चालवी माझा ! ‘ असं विठ्ठलाला विनवणी करीत करीत बारा वर्षांचा नवस फेडला!

(माजी सैनिक आणि पत्रकार श्री.बजरंगराव निंबाळकर साहेब यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्रातील एका प्रसंगाचे हे मी केलेले कथा रूपांतर ! मूळ पुस्तकात या आणि अशा अनेक घटना,गोष्टी आहेत. येत्या सव्वीस-सत्तावीस जुलै रोजी हे आत्मचरित्र प्रकाशित होईल.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

“…आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत !” गडबडू नका, बरोबर वाचलंत !

वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये हि वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ , तळमळ ! कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो हि भावना मानस साद घालत असते.

वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला. घटना होती इसवीसन १५०८ ते १५११ दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी (सध्याचे नाव हंपी) येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार ? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्रीसंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले देवा, ” अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास ? तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ति प्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत !” दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडआरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरु झाली. राजाने फर्मान सोडले कि, जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.

कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!

सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना, ” पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ” च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा ! पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले कि, ” तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील.”  त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वरा प्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले कि चार खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले कि सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळखांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध १४ या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजाअर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो.

संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्त्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणांस पंढरीत होत आहे. म्हणूनंच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता ‘हंपीची वारी’ करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती कि ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्याठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते कि ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.

हा इतिहास ८०% भाविकांना माहित नाहीये. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १२ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १२ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।

यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥१२॥

*

व्योम जरी व्यापुनिया ये तेजे सहस्र सूर्याच्या

तुल्य व्हायचे ना तेजा विश्वरूप परमात्म्याच्या ॥१२॥

*

तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।

अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥१३॥

*

अनेक देवांना विविध रूपे दिसली दृष्टीला

श्रीकृष्णा देही पाहुन स्थित धन्य पार्थ झाला ॥१३॥

*

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः ।

प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥१४॥

*

चकित होऊनिया तदनंतर रोमांचित झाला पार्थ 

हात जोडुनी नमन करूनी परमात्म्या झाला कथित ॥१४॥

अर्जुन उवाच

पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्‍घान्‌ ।

ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्‌ ॥१५॥

कथित अर्जुन 

दिसती मजला तव देहात भूत विशेष देव

महादेव कमलस्थ ब्रह्मा ऋषी सर्प दिव्य ॥१५॥

*

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रंपश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्‌ ।

नान्तं न मध्यं न पुनस्तवादिंपश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ॥१६॥

*

तुमच्या ठायी विश्वेश्वरा मजला दिसती

अनेक बाहू उदर नयन आनन ते किती

आदि मध्य ना अंत जयाला ऐसे हे रूप

आकलन ना दृष्टी होई अगाध विश्वरूप ॥१६॥

*

किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम्‌ ।

पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्‌ ॥१७॥

*

गदा चक्र मुकुट युक्त दिव्य तेजःपुंज रूप

दाहीदिशांनी प्रकाशमान तेजोमय रूप

ज्योती अनल भास्कर यांच्या तेजाचे रूप

प्रमाण नाही कसले ऐसे तुमचे दिव्य रूप ॥१७॥

*

त्वमक्षरं परमं वेदितव्यंत्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥१८॥

*

तुम्हीच परब्रह्म शाश्वत परमात्मा आश्रय विश्वाचा 

तुम्ही सनातन पुरुष अविनाशी रक्षक अनादि धर्माचा॥१८॥

*

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्‌ ।

पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रंस्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्‌ ॥१९॥

*

आदिमध्यअंत नाही चंद्रसूर्य नयन तुमचे

अनंत भुजा तुम्हाला सामर्थ्य अनंत तुमचे 

दर्शन मज तुमच्या हुताशनीपूर्ण आननाचे 

तम हटवुनी उजळितसे विश्वा तेज तयाचे ॥१९॥

*

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।

दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदंलोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्‌ ॥२०॥

*

आस्वर्ग वसुंधरा तुम्हीच व्यापिले अवकाश

अलौकिक तुमच्या या उग्र विराट रुपास

त्रैलोक्यवासी समस्त  अवलोकून चकित

अंतर्बाह्य जाहले विचलित होउनी भयभीत ॥२०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares