मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘Minimalism ते Downsizing —-…’ – लेखिका : सुश्री संध्या घोलप ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘Minimalism ते Downsizing —-’ – लेखिका : सुश्री संध्या घोलप ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

साधारण २००० च्या दशकात अमेरिका वारीदरम्यान minimalism आणि downsizing या दोन नवीन संकल्पना कानावर पडल्या. कॉलेजसाठी घरातून बाहेर पडल्यावर, लहान घरात राहणारी मुलं, त्यांचं कुटुंब वाढत जाईल त्याप्रमाणे, लहान घरातून मोठ्या मोठ्या घरात जात असतात. (जे सर्वसाधारणपणे बरेच अमेरिकावासी करतात) तर माझी एक मैत्रीण, मुलं मोठी होऊन घराबाहेर पडल्यामुळे मोठ्या घरातून छोट्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाली होती. तिच्या मोठ्या घरातलं सामान छोट्या घरात हलवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिला एकटीला लागेल तेवढं आवश्यक सामान ठेऊन बाकी सगळं तिने काढून टाकलं होतं आणि सुटसुटीत संसार मांडला होता. तेव्हा मला या दोन संकल्पना समजल्या. अर्थात downsizing ची सुरुवात उद्योग धंद्यांपासून झाली. कामगार कपात, जागा कपात, उत्पादन कपात होता होता, घर आधी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि मग मोठ्यापासून छोट्यापर्यंत असा प्रवास सुरू झाला.

दोन्ही गोष्टींबद्दल वाचन केलं, व्हिडिओज पाहिले आणि मग याचं महत्व मलाही जाणवायला लागलं. ही संकल्पना अजून आपल्याकडे का आली नाही? निदान उच्च मध्य वर्गीय घरातूनही हे दिसत नाही. मी काही मुकेश अंबानीला नाही म्हणू शकत की इन मीन दहा माणसांना Antilia ची गरज काय?? पण उतारवयात आपली इमारत redevelopment ला जाणार असेल तरी आपण म्हणतो, आम्हाला एक बेडरूम जास्तीची पाहिजे! 

आपल्याकडे संसार वाढतील, ऐपत वाढेल तशी घरं वाढतात, गाड्या वाढतात, मग second home, third home केलं जातं. पण अजूनतरी downsizing केलेलं दिसत नाही. मोठ्या, वाढलेल्या संसारातून माणसे कमी होत होत, कधी एकटे दुकटे ही, मोठमोठ्या घरातून राहताना दिसतात. वयोमानाप्रमाणे घर आवरणं, सामान आवरणं कठीण होऊन बसतं. वाढत्या संसारात घेतलेली भांडी नंतर वापरलीच जात नाहीत. पण “टाकवत नसल्यामुळे” तीन चार कुकर, चार पाच कढया, मोठमोठी पातेली निवांत धूळ पांघरून पडलेली असतात.

Minimalism बद्दल मी आधीही लिहिलं आहे आणि जमेल तिथे, जमेल तेव्हा आग्रहपूर्वक सगळ्यांना सांगत असते की अंगात जोर आहे तोपर्यंत सामान कमी करा.

आम्ही मैत्रिणी ( सगळ्या ‘साठी’ ओलांडलेल्या) एकदा जेवायला बाहेर गेलो होतो. तिथून बाहेर पडल्यावर एक मैत्रीण डायरेक्ट भांड्यांच्या दुकानात शिरली आणि तिने तीन छोटी छोटी पातेली घेतली. मग सुरू झाला एक संवाद – 

मी – आता ही कशाला नवीन?

मैत्रीण – आता छोटी छोटी भांडी लागतात गं !

मग आधीची मोठी काय केली?

“पडली आहेत तशीच”

ती काढून टाक ना! पसारा का वाढवतेस? 

“जागा आहे, पैसे आहेत. काय फरक पडतो?” 

म्हणून मुलासुनेचं काम का वाढवतेस? तुझ्या पश्चात त्याला एवढ्या लांब येऊन तुझी भांडी कुंडी आवरायला वेळ तरी मिळणार आहे का?

“त्याच्याशी मला काय करायचंय? मला आत्ता हौस आहे ना, मी भागवून घेते. तो बघेल काय करायचं ते!” 

अशी कित्येक घरं सध्या वर्षानुवर्ष बंद आहेत, अगदी खुंटीवर टांगलेल्या कपड्यांसकट. (आमच्या समोर बंगल्यात राहणाऱ्या एक आजी करोना काळात गेल्या. त्यांच्या दाराबाहेर लावलेल्या दिव्याच्या माळा, मुलगा कोविड संपल्यावर आला तोपर्यंत दिवसरात्र चालू होत्या) 

एक मोठ्या फ्लॅट मध्ये राहणारे advocate. नव्वदीच्या घरातले. एकटेच आहेत. घरभर Law ची पुस्तकं आणि त्यावर धूळ. माळ्यावर पुस्तकं, कपाटात पुस्तकं, टेबल – साईड टेबल दिसेल तिथे पुस्तकं.

तुम्ही अजून प्रॅक्टीस करता?

“छे छे ! कधीच सोडली. “

मग एवढी पुस्तकं? 

“टाकून देववत नाही गं! ” 

त्यांना तर मूल बाळ पण नाही. पण स्वतः लॉयर आहेत, काहीतरी सोय केलीच असेल असा विचार करून मी गप्प! 

मी माझ्या साठी नंतर, गरज नसलेल्या वस्तू काढून टाकायला सुरुवात केली. आता तर कमीतकमी वस्तूंमध्ये घर चालवायला शिकले आहे. (तरीही मुलगा म्हणतो, आई, अजून बरंच काढायचं राहिलंय!) 

कपडे कमी केले, मुख्य म्हणजे बायकांचा जीव ज्यात अडकतो, ते सोनं सगळ्यात आधी काढलं. मग बाकी गोष्टी काढायला त्रास होत नाही.

त्याच बरोबर downsizing पण आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर, पुण्याला अथश्री मध्ये शिफ्ट झाले. आवश्यक ते जुनंच सामान आणि अगदी गरजेपुरतं ठेवायचं हे आधीच ठरवलं होतं.

खूप मोठ्ठ्या घरातून ४५० चौ फुटाच्या घरात शिफ्ट होणं सोपं नव्हतं. (आता पाहुण्यांना राहायला जागा होणार नाही हे मात्र जाणवत होतं) आवश्यक तेवढीच भांडी कुंडी, कपडे, मोजून चार खुर्च्या, असा “भातुकलीचा खेळ” मांडला आहे. उद्देश हाच की आपल्या पश्चात मुलांना आवराआवरीचा त्रास नको. आता बेडरूम मधे माझी आई असल्याने, बाहेर हॉल म्हणजे माझी बेडरूम, फॅमिली रूम, डायनिंग, किचन सगळं एकाच ठिकाणी! 

हळूहळू सवय होते आहे. आणि छान वाटतंय. एखादे दिवशी बाई आली नाही तरी झाडू पोचा करायचं दडपण येत नाही. आधी मोठ्या घरात, “बापरे, आपल्याला झेपणार नाही एवढा झाडू पोचा” या विचारानेच केला जायचा नाही.

प्रत्येकाला downsizing जमेल असं नाही. आपल्याकडे घर विकणं आणि परत हवं तसं नवीन घर घेणं प्रत्येकाला शक्य असतं असं नाही. मोठ्या घराचा मेंटेनन्स, सिक्युरिटी/सेफ्टी याचा विचार केला तर छोटं घर, निदान एकेकटे राहणाऱ्यांना उतारवयात आवश्यक ठरतं. बरेच लोक मुंबईचं घर भाड्याने देऊन, इथे अथश्री मध्ये भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यात अर्थातच सेव्हिंग होतं.

अमेरिकेत तर हल्ली minimalism खूप लहान वयापासून करतात. अगदी bagpack मध्ये मावेल एवढाच संसार घेऊन नोकरी आणि पर्यटन करत असतात. पण ते एकटे जीव…

Downsizing चा विचार मात्र मोठ्या प्रमाणावर तिथे केला जातो. रिटायर्ड लाईफ छोट्या घरात, छोट्या गावात, शांत वातावरणात घालवण्यासाठी आधीच घरं, गावं हेरून ठेवली जातात. त्यात पहिला विचार मोठ्या घराचा मेंटेनन्स वाचवणं, असेल तर कर्ज फेडून टाकणं आणि savings मध्ये चांगलं आयुष्य जगणं हा असतो.

आपणही असा विचार करायला सुरुवात करायला हवी ना? निदान या विषयावर चर्चा व्हावी, आपल्या बरोबरच पुढच्या पिढीच्या त्रासाचा विचार केला जावा असं वाटतं. इथे मी मुख्यत्वे करून मुलं परदेशात आणि आईवडील इथे, अशा कुटुंबांचा विचार केला आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या लोकांना minimalism आणि downsizing दोन्हीचा विचार करता येणार नाही याची मला निश्चितच कल्पना आहे.

लेखिका : सुश्री संध्या घोलप 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपले ‘बायो-क्लॉक’ आपणच सेट करा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आपले ‘बायो-क्लॉक’ आपणच सेट करा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो. पण बऱ्याच वेळा, गजर न लावता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो.

यालाच बायो-क्लॉक (जैविक घडयाळ) असे म्हणतात.

बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते.

तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरू होतात असेही त्यांना ठामपणे वाटते.

ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वतःच आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात. म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात.

खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम करतो.

चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत !

चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात.

या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट झाले आहे.

म्हणूनच…!

तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या !

हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा ! – – – – 

  1. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा.

नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो.

  1. ४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा.

वृद्धत्व हे १२० वर्षांनंतरच सुरू होते, असे स्वतःला पटवा.

  1. केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा.

नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा.

कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा.

हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल.

कोणत्याही परिस्थितीत स्वतःला वृद्ध समजू नका.

  1. खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करू नका.

उदा. “हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे” असे विचार टाळा.

त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की –

“ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुद्ध होत आहे आणि माझ्यासाठी अमृतसमान आहे.

हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल. “

अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानीकारक ठरतात.

  1. सदैव सक्रिय राहा.

चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा.

  1. वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते यावर विश्वास ठेवा.

(हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)

  1. आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत.

जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही.

म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा!

रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मनमोकळं हसा!

  1. “मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे” असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही!

तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते.

बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा…!

दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल ! जगण्याचा आनंद घ्या…

लेखक : अज्ञात 

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कुंभमेळ्याकडे थोडेसे वेगळ्या दृष्टिकोनातून…” – लेखक : श्री मिलिंद साठे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “कुंभमेळ्याकडे थोडेसे वेगळ्या दृष्टिकोनातून…” – लेखक : श्री मिलिंद साठे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

प्रयाग राज कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील व्यवसाय भरभराटीला आले होते. अगदी टायर पंक्चर वाल्यापासून ते स्टार हॉटेल पर्यंत. प्रयाग राज मधल्या सर्वच व्यावसायिकांना दिवसाचे २४ तास सुध्दा कमी पडत होते. कुठलाही उद्दामपणा, मुजोरी न करताही व्यवसाय करता येतो. साधं कपाळावर गंध कुंकू लावणारा हजारात कमाई करत होता. अगदी भिकाऱ्याला सुध्दा कुणी निराश करत नव्हते. सरप्रायजींगली भिकारी खुपच कमी दिसले. आता थोडेसे सरकारी नोकरांबद्दल, तेच कर्मचारी, तेच पोलिस, तेच प्रशासन, पण फक्त जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या नेत्यामुळे काय चमत्कार घडू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा महाकुंभ. कोण म्हणतं सरकारी नोकर काम करत नाहीत ? एमबीए च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम वस्तुपाठच होता हा कुंभमेळा. फायनान्स, मार्केटिंग, एचआर, इव्हेंट, डीसास्टर, मॅनपाॅवर काय नव्हतं तिथे ? माझ्या असे वाचनात आले की आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यांसाठी यासाठी एक काॅंपिटीशन आयोजित केली होती. नवीन पिढीला सुध्दा कुंभ आयोजनात सहभागी करुन घेण्याचा हा प्रयत्न किती छान. प्रत्येक काॅर्नरवर २४ तास हजर असलेले पोलिस रात्रीच्या थंडीत शेकोटी पेटवून भाविकांची सहाय्यता करत होते. बिजली, पानी, सडक और सफाई सलग २ महिने २४×७ मेंटेन ठेवणे ही खायची गोष्ट नाही. किती महिने किंवा वर्षे आधीपासून तयारी सुरू केली असेल ? 

सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विशिष्ट मानसिकतेतून बाहेर काढून स्वतःच्या घरचे कार्य असल्याप्रमाणे कामाला जुंपणे कसं जमवलं असेल ? यूपी पोलिसांची हिंदी चित्रपटांनी उभी केलेली प्रतिमा आणि कुंभ मधले पोलिस याचा काही ताळमेळ लागत नव्हता. बहुतेक कुंभ संपल्यानंतर ते ही म्हणतील “सौजन्याची ऐशी तैशी”. सफाई कर्मचार्यांबद्दल तर बोलावे तेवढे कमीच आहे. जागोजागी ठेवलेल्या कचरा पेट्या भरून वाहण्यापुर्वीच उचलल्या जात होत्या. रस्ते झाडण्याचे काम अहोरात्र चालू होते. हजारो शौचालयांचे सेप्टिक टॅंक उपसणाऱ्या गाड्या सगळीकडे फिरत होत्या. रात्रंदिवस भाविक नदीमध्ये स्नान करत होते त्यामुळे शेकडो किलोमीटर लांबीचे गंगा यमुना चे काठ जलपोलिसांद्वारे नियंत्रित केले जात होते. हेलिकॉप्टर मधूनही परिस्थिती वर लक्ष ठेवले होते.

आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिकता याचा सुंदर संगम साधला होता. सर्व खोया पाया बुथ एकमेकांशी साॅफ्ट वेअर द्वारे जोडले होते. प्रत्येक दिव्याच्या खांबावर मोठ्या अक्षरात नंबर आणि क्यू आर कोड चे स्टिकर लावलेले होते. ज्या योगे तुम्हाला तुमचे लोकेशन इतरांना कळवणे सोपे जावे. गंगा यमुना दोन्ही नद्यांचा प्रवाह नियंत्रणात ठेवला होता. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह अतिशय बेभरवशी असतो हे विशेष करून लक्षात घेतले पाहिजे. ज्या पाण्यात शेकडो संत महंत, या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, परदेशी पाहुणे, मोठमोठे उद्योगपती स्नान करत होते त्या पाण्याची गुणवत्ता नक्कीच चांगली असली पाहिजे. पुण्यातून निघताना बरेच जण म्हणाले “त्या घाण पाण्यात आंघोळ करायची ?” पण ओली वस्त्रे अंगावरच वाळवून देखील आम्हाला काहीही त्रास झाला नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आखाड्यातल्या नळाला २४ तास येणारे पाणी पिण्यायोग्य होते. रस्त्यावर जागोजागी मोफत आर ओ फाऊंटन लावलेले होते. गर्दीच्या रस्त्यांवरुन स्थानिक तरुण दुचाकीवरून माफक दरात भाविकांना इच्छित स्थळी पोचवत होते. एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था काम करत होती. एखाद्या छोट्या राज्याच्या वार्षिक बजेट पेक्षा मोठी उलाढाल ह्या दोन महिन्यांत झाली असेल. हे सर्व लिहीत असतानाच माझ्या बहिणीने मला एक बातमी दाखवली “महा कुंभ मध्ये आजपर्यंत १२ बालकांनी सुखरूप जन्म घेतला” एका परीने हा सृजनाचाही कुंभ म्हणावा लागेल.

मी अजिबात असा दावा करत नाही की जे होते ते सर्वोत्तम होते. पण कुठल्याही गैरसोयी बद्दल कुणीही तक्रार करताना दिसत नव्हते.

ह्या देशातील सर्व सामान्य माणसाने अत्यंत श्रध्देने, संयमाने साजरा केलेला हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले ही आमच्या पुर्वजांची पुण्याई.

Never underestimate the power of common man.

लेखक : श्री मिलिंद साठे

 ९८२३०९९९५१ 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याची गोष्ट” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याची गोष्ट☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या बुच विल्मोर सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या होत्या. त्यांना घेऊन बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाद्वारे 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले होते. ही मोहीम फक्त आठ दिवसांची असावी, अशी योजना होती. तथापि, अंतराळयानातील हीलियम वायूची गळती आणि थ्रस्टरच्या बिघाडामुळे अंतराळयानाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले. मिशन सुरू होण्यापूर्वी नासा आणि बोईंग या दोन्ही कंपन्यातील अभियंत्यांना या बिघाडाची माहिती होती. असे असूनही, त्यांनी या गळतीला मिशनसाठी एक किरकोळ धोका मानल्यामुळे नासा आणि बोईंगच्या या निर्णयामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले आहेत. स्टारलाइनरच्या माध्यमातून प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात नेण्यात आले आहे. या मिशनसाठी बोईंगने नासासोबत 4.5 अब्ज डॉलरचा करार केला होता. या कराराशिवाय बोईंगने 1.5 अब्ज डॉलर्सही खर्च केले आहेत.

हीलियम गळतीमुळे इंधन प्रणालीवर परिणाम झाल्यामुळे यानाचे नियंत्रण आणि स्थिरता धोक्यात येते. तर थ्रस्टर बिघाडामुळे यानाच्या दिशा नियंत्रित करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सुरक्षित परतीच्या मार्गात धोका निर्माण होतो. नासा आणि बोईंगचे अभियंते या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सुरक्षित परतीसाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे, ज्यामध्ये स्पेसएक्सच्या क्रू-10 मिशनचा वापर करून अंतराळवीरांना परत आणण्याची शक्यता देखील समाविष्ट आहे. तथापि, या समस्यांचे संपूर्ण निराकरण होईपर्यंत आणि अंतराळयान परतीसाठी सुरक्षित घोषित होईपर्यंत, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ISS वरच राहावे लागेल असे दिसतेय. त्याला पर्याय नाही. 

खरे पहाता, या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले होते. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला आहे. तसे पाहिले तर 59 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी यापूर्वी दोनदा अंतराळ प्रवास केला आहे. याआधी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. नासाच्या म्हणण्यानुसार त्यांनी अंतराळात एकूण 322 दिवस घालवले आहेत. 2006 मध्ये सुनीताने 195 दिवस अंतराळात आणि 2012 मध्ये 127 दिवस अंतराळात घालवले होते. 2012 च्या मिशनची खास गोष्ट म्हणजे सुनीता यांनी तीनदा स्पेस वॉक केला होता. अंतराळवीर स्पेस वॉक दरम्यान स्पेस स्टेशनमधून बाहेर पडतात. पहिल्याच प्रवासात त्यांनी चार वेळा स्पेस वॉक केला. सुनीता विल्यम्स या अंतराळ प्रवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या. 

मग आता असा प्रश्न पडतो की, त्यांना फक्त आठवड्याभरासाठीच तिथे कार्यरत राहायचे होते आणि त्याप्रमाणे त्यांच्या अन्नाची आणि ऑक्सिजनची सोय केली असेल तर एवढा काळ  त्यांना अन्न आणि ऑक्सिजन कसे काय पुरवले गेले आणि कुठून पुरवले गेले? यामागचे इंगीत असे आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ज्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत, तिथे असा अडचणीचा काळ येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन दीर्घकाळ राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे स्टारलाइनर यानाच्या अडचणींमुळे त्यांना अन्न, पाणी किंवा ऑक्सिजनच्या तुटवड्याचा धोका नाही. ISS वर ऑक्सीजन जनरेशन सिस्टम (OGS) असल्यामुळे इलेक्ट्रोलिसिसद्वारे पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा करता येतो. त्यामुळे ताज्या ऑक्सिजनचा सतत पुरवठा केला जातो. आणीबाणीच्या परिस्थितीत, ऑक्सिजन कॅनिस्टर आणि सोयुझ किंवा ड्रॅगन यानातून आणलेला अतिरिक्त ऑक्सिजन वापरता येतो. त्याचप्रमाणे ISS वर मोठ्या प्रमाणात शून्याच्या खालील तापमानात सुके अन्न साठवून ठेवलेले असते. ते गरजेनुसार नेहमीप्रमाणे खाण्यायोग्य करून वापरले जाते. त्याचबरोबर वॉटर रिक्लेमेशन सिस्टम (WRS) च्या सहाय्याने मूत्र आणि आर्द्रता पुन्हा प्रक्रिया करून प्यायचे पाणी तयार केले जाते. जर समजा या सगळ्या पद्धती वापरूनही तुटवडा निर्माण झालाच तर नियमितपणे स्पेसएक्स ड्रॅगन किंवा अन्य मालवाहू यानांद्वारे अन्न व पाण्याचा पुरवठा केला जातो. ISS ला सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रगत प्रणालीद्वारे वीजपुरवठा होतो. तिथे वातावरण नियंत्रित करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड फिल्टरिंग सिस्टम कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका कमी आहे. अशाप्रकारे ISS हे स्थानक अनेक अंतराळवीरांना वर्षभर राहण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज केलेले असल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर ISS वर पूर्ण सुरक्षित आहेत.

एवढा दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या शरीरावर काही महत्वाचे परिणाम होऊ शकतात. यामध्ये हाडांची घनता कमी होणे, स्नायू कमकुवत होणे, दृष्टीवर परिणाम आणि इतर आरोग्यविषयक समस्या समाविष्ट आहेत. 8 दिवसाच्या मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना आता जवळपास 8 महिने झाले आहेत. तेव्हा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात या सर्व बाबींवर नासा लक्ष ठेवून आहे आणि अंतराळवीरांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. पण शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने मानवाच्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात आणि त्यांची घनता १% – २% दरमहा कमी होऊ शकते. त्यामुळे परत आल्यावर फ्रॅक्चर किंवा ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांचा धोका वाढतो. असे होऊ नये म्हणून अंतराळवीरांना दररोज व्यायाम करावाच लागतो, पण तरीही परत आल्यावर स्नायू पूर्ववत होण्यासाठी काही आठवडे जातात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हृदय थोडेसे लहान होते आणि रक्ताभिसरणात बदल होतो. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर चक्कर येणे आणि रक्तदाब नियंत्रणात समस्या येऊ शकते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यास काही अंतराळवीरांच्या डोळ्यांच्या मागील स्नायूंमध्ये द्रव जमा होऊन दृष्टी धूसर होण्याची समस्या उद्भवू शकते. वेगळेपणाची भावना, एकटेपणा आणि पृथ्वीपासून दूर राहण्याचा दीर्घकाळ  याचा परिणाम मानसिक तणाव वाढण्यावर होऊ शकतो. ISS वर असलेल्या सहकाऱ्यांसोबत संवाद आणि पृथ्वीवरील कुटुंबीयांसोबत नियमित संपर्क ठेवल्याने हा परिणाम काही प्रमाणात कमी करता येतो. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे सूर्याच्या आणि अंतराळातील किरणोत्साराचा जास्त धोका असतो. कारण त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या सगळ्या आरोग्यविषयक तक्रारी  नियंत्रित ठेवण्यासाठी ISS वर प्रत्येक दिवशी किमान दोन तास नियमित व्यायाम करण्याची सक्ती आहे, त्यामुळे हाडांची मजबुती टिकून राहण्यास मदत होते आणि स्थायूंची कमकुवतता टाळण्यासाठीसुद्धा. त्याचबरोबर हाडांची घनता टिकवण्यास मदत करणारा विशेष आहार आणि औषधोपचारही दिले जातात. परतीनंतर वैद्यकीय तपासण्या आणि पुनर्वसनासाठी ठराविक कालावधी लागतो. या कालावधीत हळूहळू शरीर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते. अंतराळात अनपेक्षितरित्या जास्त दिवस लागल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना काही शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे काय यावरही नासा आणि बोईंग यांची वैद्यकीय टीम त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. ISS वरील तंत्रज्ञान, व्यायाम आणि आहारामुळे हे परिणाम कमीत कमी होण्याची शक्यता आहे, आणि परत आल्यानंतर काही महिन्यांत त्यांची तब्येत पूर्ववत होईल. सध्या तरी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वर सुरक्षित आहेत, आणि त्यांच्या परतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

आता प्रश्न उरला तो त्यांच्या परतीच्या प्रवासाचा. बोईंग स्टारलाइनर वापरून सुनीता विल्यम्सच्या परतीच्या मोहिमेला पुढे न्यायचे, की स्पेसएक्स वापरून बचाव मोहीम सुरू करायची, यावर नासा विचार करत होती. . नासा स्पेसक्राफ्टचे माजी मिलिटरी स्पेस सिस्टम कमांडर रिडॉल्फी यांच्या सांगण्याप्रमाणे, स्टारलाइनरच्या सेवा मॉड्यूलने सुरक्षित परतीसाठी कॅप्सूल योग्य कोनात ठेवणे आवश्यक होते . यात थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. रिडॉल्फी यांनी असा इशारा दिला होता, जर कॅप्सूल योग्यरित्या विशिष्ट कोनात नसेल तर, ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना जळू शकते. किंवा दुसरा संभाव्य धोका असा की, जर कॅप्सूलने चुकीच्या कोनात पुन्हा प्रवेश केला तर ते वातावरणातून बाहेर पडू शकते आणि परत अवकाशात जाऊ शकते. बोईंग आणि नासा त्यांच्या परतीसाठी स्टारलाइनरच्या दुरुस्तीवर काम करत होते . जर स्टारलाइनर यान वापरणे शक्य नसेल, तर त्यांना स्पेसएक्स क्रू-10 किंवा अन्य यानाद्वारे पृथ्वीवर परत आणता आले असते . त्यामुळे काळजी करण्याचे कारण नव्हते .

– – आणि  ही सर्व योजना आता यशस्वीपणे पार पडली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) परतीची योजना निश्चित करण्यात आली. त्यासाठी स्पेसएक्स क्रू-10 मिशनचे प्रक्षेपण 12 मार्च 2025 रोजी झाले. यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परत आले . या परतीच्या प्रक्रियेत, क्रू-10 मिशनचे अंतराळवीर ISS वर पोहोचले आणि सुमारे एक आठवड्याच्या हस्तांतरण कालावधीनंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्सच्या क्रू-ड्रॅगन कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत आले. . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना या परतीच्या प्रक्रियेची गती वाढवण्याची विनंती केल्यामुळे ही योजना निश्चित करण्यात आली होती . म्हणूनच, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची परतीची तारीख निश्चित झाली, आणि आता ते पृथ्वीवर परत आले आहेत. .. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या तुकडीने अथक प्रयत्न करून शेवटी सुनीता विल्यम्सना 19 तारखेला सुखरूप पृथ्वीवर आणले.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परतीच्या प्रवासाचा थरार…”  – लेखक – श्री संजय वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “परतीच्या प्रवासाचा थरार…”  – लेखक – श्री संजय वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

सुनीता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परतले पृथ्वीवर; कसा होता परतीच्या प्रवासाचा थरार?

भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत.

हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते.

‘ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी दोन अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.

खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती.

तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते.

सरतेशेवटी, आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.

कसा झाला परतीचा प्रवास?

खरं तर कोणतीही अंतराळ मोहिम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं.

सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या.

फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. 6 वर्षं फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन – रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहीम अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश झाला. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं.

पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3. 0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं.

दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला सोसावं लागणारं सर्वोच्च तापमान 1926. 667 सेल्शियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतकं होतं.

फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.

वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.

ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता.

WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसत होती.

ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा भाग वेगळा झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.

भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.

क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम’

अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता.

“क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम” अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.

ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असं केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही.

रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या आली.

स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं.

यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा ‘साईड हॅच’ उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.

हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.

ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं.

क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे. रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.

ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर परतेल. आणि अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जाईल आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना – मित्रमंडळींना भेटतील.

लेखक : श्री संजय वैशंपायन 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? इंद्रधनुष्य ?

☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ?…. तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.

छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.

महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या. स्वराज्यनिष्ठेला तोड नाही. अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.

अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.

१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ? मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.

लेखक : श्री अभय देवरे

सातारा

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘केशवतीर्थ प्रयासराज…’’ – लेखिका : सुश्री वैशाली पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘केशवतीर्थ प्रयासराज…’’ – लेखिका : सुश्री वैशाली पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

हिवाळी, ठाणापाडा शाळा

केशवतीर्थ प्रयासराज !

होय. हे तीर्थस्थळ भारतात महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात “हिवाळी” नावाच्या गावात. ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.

ही जिल्हापरिषदेची बारा तास भरणारी बारमाही शाळा आहे. अगदी ३६५ दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात. रविवार नाही, दिवाळी नाही की कसलीही स्थानिक सुट्टी बिट्टी कुछ नही !

असं काय असतं या शाळेत ? 

यु ट्यूबवर या शाळेचा एक व्हीडीओ पाहण्यात आला. ३६५ दिवस बारा तास भरणारी शाळा या thumbnail ने मला थांबवलं. मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हीडीओ समोर आले, आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावरा उत्सुकता निर्माण झाली. याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली.

या शाळेचे कर्ता करविता आहेत, श्री केशव गावित गुरूजी. २००९ मध्ये DEd होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना येथे ‘टाकलं’ गेलं. बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं तसे गुरूजी स्वतः तर तिथे रूजलेच पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपे फुलवली आहेत; नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे.

या शाळेत बालवाडीपासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत. शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृति कार्यक्रम आहे. सकाळी साडेनऊ वाजता शाळा भरते ती रात्री साडेनऊला संपते. शाळेचं बांधकाम पर्यावरण पूरक आहे. या इमारतीत एकही खिडकी नाही पण दहा दिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो, भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात.

या शाळेत अॕम्फी थिएटर आहे. अद्ययावत वाचनालय आहे, संगणक कक्ष आहे. बोलक्या भिंती आहेत, गोशाळा आहे. परसबाग आहे. — – या सा-यांशी जीवप्राण जोडलेले केशव गुरुजी आहेत, गावकरी आहेत आणि पासष्ट विद्यार्थी आहेत. नेमलेला अभ्यासक्रम जून ते आॕक्टोबर पर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्यविकास !

– – डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचे – तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचे कौशल्य !

या शाळेतले विद्यार्थी दोन्ही हातांनी दोन वेगवेगळी कामं एकाच वेळी करतात.

.. दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात. म्हणजे डावा हात एक ते दहा लिहीत असेल तर त्याच वेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो.

.. डावा हात मराठी शब्द लिहीत असतो त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो.

.. डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा (mirror image) उजवा हात लिहितो.

.. डाव्या उजव्या हाताने कामं चाललेली असतांना तोंडाने संविधानाची कुठलीही कलमे अचूक सांगता येतात. ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते. विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात. (विचारून पाहा, तुमची स्वतःची पाठ असली तर संविधानातली कुठलीही कलमे नि पोटकलमे !

.. रंगांची सुसंगत रचना करणारे ठोकळे (क्यूब साॕल्व्हर) काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात.

.. मुलं प्रश्न विचारतात.

.. यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात, गाणी शिकतात, विविध भाषा शिकतात.

.. पाचवी सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात. त्यांची काळजी घेतात.

ही कौशल्ये माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरूजी मोकळेपणाने मुलांसमोरच कबूल करतात. कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग ते दाखवतात आणि वर्षे तीन ते दहा बाराची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात.

गो पालन ! यात गायीची काळजी घेणं, गोठा साफ करणं, शेणखत तयार करणं, गायीवर माया करणं याच शाळेतला अभ्यासक्रम आहे.

परसबाग फुलवणं, झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे. शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात. मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलाग गोमातेच्या मुखी घातला गेला.

केशव गुरूजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरुवातीचा प्रवास खडतरच होता.

या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे. अनेक दानशुरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे.

श्री रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे.

विशेष म्हणजे नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते.

शासनाने गुरूजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही.

या विद्यार्थ्यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदीजींनी दिले आहे.

या शाळेतले माजी विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहेत. इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ, शेतकरी, चित्रकार, भाषा अभ्यासक, शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत. त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरूजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे. आॕनलाईन आणि आॕफलाईन शिक्षण पद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे.

त्यांची एकुलती मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांबरोबरच शिकते आहे. तिनेही सगळी कौशल्ये आत्मसात करायला सुरूवात केली आहे.

गुरूजींनी आजवर नाटक सिनेमा यांची चैन केलेली नाही. घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरी पुरताच सहभाग घेतात. पत्नी सविता आणि आईवडील भावंडं यांचा पूर्ण पाठिंबा गुरूजींना आहे.

बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासा दोन तासांच्या भेटीत राजकारण, जातीधर्मकारण, या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणा-या, व्यावहारिक प्रलोभनांपासून आश्चर्यकारक रीतीने लांब राहाणा-या या ऋषितुल्य श्री. केशव गावित या गुरूजींची स्तोत्रे किती गावित ?

नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकाने जाऊन पाहायला हवेच असे !

(फोटो आणि चित्रीकरण सहाय्यक श्री. अजय सिंह.)

लेखिका : सुश्री वैशाली पंडित

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असाही एक आंतरराष्ट्रीय स्मरणदिन…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “असाही एक आंतरराष्ट्रीय स्मरणदिन…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन ::: 25 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय स्मरण दिन” म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस प्रथम 2008 साली साजरा करण्यात आला, 400 वर्षांहून अधिक काळ अमानुषपणे छळ झालेल्या जवळ-जवळ 15 दशलक्षाहून अधिक गुलामांना ज्यात पुरुष, महिला आणि मुले यांचेही बळी गेले होते त्यांना हा दिवस स्मरण आणि सन्मानित करतो.

“मानवाधिकारांचे इतिहासातील सर्वात वाईट उल्लंघन” गुलामांच्या व्यापारामुळे केले गेले असे आपल्याला इतिहासच सांगतो. गुलामांचा व्यापार हा जगातील सर्वात मोठा सक्तीचा क्रूर व्यापार होता. 400 वर्षांहून अधिक काळ, आफ्रिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर निर्गमन जगभरात अशा प्रकारे पसरले जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते किंवा मानवी इतिहासात नोंदवले गेले नव्हते.

सन 1501 आणि 1830 च्या दरम्यान अमेरिकन लोकसंख्येत युरोपियन लोकांपेक्षा आफ्रिकन लोकांची वाढ जास्त झाली.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग -२- लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – २ – लेखक :  अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर

(लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल.’) – इथून पुढे 

पीएच. डी. झाल्यावर जयंतरावांना भारतामध्ये लगेच येता आले नाही. पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळत होती. शिवाय फ्रेड हॉएल यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ थिअरॉटिकल ॲस्ट्रोनॉमी सुरू केली होती. तेथे किमान पहिली पाच वर्षे जयंतरावांनी काम करावे आणि संस्थेची घडी बसवून द्यावी अशी हॉएलची इच्छा होती. जयंतरावांनी गुरूचा शब्द पडू दिला नाही. पाच वर्षे त्यांनी या संस्थेला दिली. त्या संस्थेचे मंगल झाले… आणि याच काळात जयंतरावांचे पण मंगलम् झाले. मंगल राजवाडे या गणितज्ञ मुलीशी लग्न. ❤️ मंगला नारळीकर.. जयंत नारळीकर यांची बेटर हाफ.. अगदी अक्षरशः. त्यांची थोडी माहिती घेतल्याशिवाय पुढे जायला काहीच मजा नाही.

मंगला राजवाडे.. गणित विषय घेऊन एमए करताना मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक पटकावून पहिली आलेली. जयंत नारळीकर यांच्याशी लग्न झाले, आणि त्या केंब्रिजमध्ये गेल्या. तीन वर्ष तिथे शिकवले. नंतर कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अध्यापनकार्यास काहीसा विराम दिला. या गणिती जोडप्याला तीन मुली झाल्या. कुटुंब भारतात परतले आणि पुढे सहा वर्षे त्यांनी TIFR मध्ये शिकवले. १९८१ मध्ये.. म्हणजे लग्नानंतर १६ वर्षांनी पीएचडी पूर्ण केली. त्यांनी भरपूर लेखन केले आहे. ’नभात हसते तारे’ हे पुस्तक नारळीकर दांपत्याने मिळून लिहिले आहे. “पाहिलेले देश, भेटलेली माणसं”, दोस्ती गणिताशी, यासारखी अनेक पुस्तके मंगलाबाई यांनी लिहिली आहेत. करियर आणि कुटुंब याच्यात समतोल साधताना मंगलाबाईंना कुटुंबाला अधिक प्राधान्य द्यावे लागले.

नारळीकर कुटुंबाने जेव्हा ठरवले की आता भारतात परतावे, तेव्हा शास्त्री कालवश झाले होते. जयंतरावांनी इंदिरा गांधी यांना पत्र पाठवले, शास्त्री यांच्यासोबत झालेल्या बोलण्याचा संदर्भ दिला. इंदिरा गांधी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला. “तुम्ही कुठे काम करू इच्छिता” अशी विचारणा झाली. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये काम करण्याची इच्छा नारळीकर यांनी व्यक्त केली अन् ती पूर्ण झाली देखील. नारळीकर कुटुंब मुंबईला टाटा संस्थेत दाखल झाले. आता मुलींना शाळेत टाकायचे होते. सोबत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची मुले महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जात होती. मात्र नारळीकरांनी त्यांच्या तिन्ही मुलींसाठी केंद्रीय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला.

गणित, विज्ञान, वा भाषा यांचे मूलभूत आकलन होण्यासाठी, माणसाचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत वा तिच्या जवळच्या भाषेत झाले पाहिजे, ही त्यामागची भूमिका. मुलींना कुठला कोचिंग क्लास देखील लावला नाही. स्वतःच्या अभ्यासातून स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलींनी शोधली पाहिजेत. घरात अभ्यासाची सक्ती नाही. “घोड्यांच्या शर्यतीमध्ये जिंकल्यावर घोडा कधीच खूश होत नसतो. खूश फक्त जॉकी होत असतो. मुलांच्या बाबतीत देखील हेच लागू होते. ” असे नारळीकर दांपत्य मानायचे. मुलींना घरांमध्ये केवळ विनोद सांगायची सक्ती. रोज जेवायला बसले सगळे की सगळ्यांनी जोक सांगायचेच. भारी ना! ❤️ तिन्ही मुली मोठ्या होऊन संशोधन क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या आहेत. “गीता नारळीकर” या कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवरसायनशास्त्र आणि जीवभौतिकी याच्या प्राध्यापिका आहेत. “गिरिजा नारळीकर” या मेलोन युनिवर्सिटीमध्ये संशोधिका आहेत. “लीलावती नारळीकर” या पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.

१९८८ मध्ये जेव्हा पुण्यात आयुका स्थापन करायचे ठरले, तेव्हा प्रा. यशपाल यांनी जयंत नारळीकर यांना बोलावले. आयुका आज संशोधनक्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहे, यात जयंत नारळीकर यांच्या दूरदृष्टी आणि कुशल व्यवस्थापनाचा खूप मोठा हात आहे. नासाच्या हबल दुर्बिणीपेक्षा कमी क्षमतीची दुर्बीण आयुकाकडे असली तरी नासाच्या शास्त्रज्ञांना शक्य झाले नाही, अश्या अनेक बाबी आपले भारतीय शास्त्रज्ञ आयुकामध्ये करून दाखवत आहेत. आयुका केवळ संशोधन कार्य करत नाही, तर सामान्य जनतेत विज्ञान रुजविण्याचे काम देखील करते. जगभरातील दिग्गज शास्त्रज्ञांना ऐकण्याची संधी तिथे उपलब्ध करून दिली जाते. २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे आयुकामधील जत्राच. अनेक कार्यक्रमाचे, व्याख्यानांचे दिवसभराचे नियोजन असते.

पृथ्वीवर जीवन परग्रहावरून आलेल्या सूक्ष्म जीवांपासून सुरू झाले असेल, असे एक गृहितक शेकडो वर्षांपासून मांडण्यात येत आहे. होएल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी देखील या गृहितकाचे समर्थन केले. हे गृहितक पडताळून पाहण्याचा प्रयोग नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली आयुकाच्या टीमने हैदराबाद येथे जानेवारी २००१ मध्ये केला. पृथ्वीच्या वातावरणात ४० किलोमीटर (मराठीमध्ये २० ते ५० किमी पर्यंतच्या पट्ट्याला स्थितांबर म्हणतात) उंचीपर्यंत फुगे सोडण्यात आले. २००५ मध्ये देखील पुन्हा एकदा हा प्रयोग करण्यात आला. या स्थितांबरात पृथ्वीवर न आढळणारे सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. या फुग्यांवर विविध उपकरणे जोडली होती. त्या उपकरणांनी जी निरीक्षणे नोंदवली, त्यातून आलेले निष्कर्ष – गृहितकाची पुष्टी करत असले तरी नारळीकर यांच्या मते त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

जयंतराव लेखनाकडे कसे वळले, त्याचा एक गमतीशीर किस्सा आहे. मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. नारळीकरांनी गंमत म्हणून या स्पर्धेत भाग घेतला. मात्र एक जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण असा आपला लौकिक इथे स्पर्धकांच्या आड येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचं नाव बदलून ‘कृष्णविवर’ ही कथा पाठवली. ❤️ त्यांच्या नावाची आद्याक्षरे जविना यांचा क्रम उलट करून नाविज.. (नारायण विनायक जगताप) या नावाने ही कथा पाठवली. जेव्हा त्यांच्या कथेला पहिले बक्षीस मिळाले, त्या वेळेस हा सगळा खुलासा झाला. 😁

आईन्स्टाईन म्हणतो की, जी व्यक्ती विषयांमध्ये तज्ज्ञ असेल, तीच विषय सोपा करून मांडू शकते. नारळीकर यांच्या कथा, कादंबऱ्या किंवा भाषणे, मुलाखती वाचताना, ऐकताना सुद्धा त्यांचे विषयातील प्रभुत्व लक्षात येते. कारण अतिशय सोप्या भाषेत वाचकांपर्यंत विज्ञान पोचवले जाते. त्यांच्या विज्ञानकथा इज माय लव, ❤️कारण कथेमधील प्रश्न नेहमी भारतीय शास्त्रज्ञच सोडवत असतो. 😍मात्र नारळीकर यांच्या मते विज्ञान हे एका देशासाठी मर्यादित नसते, संपूर्ण जगाचे असते. विज्ञानाची प्रगती होण्यासाठी प्रयत्न जगभरातून व्हावा आणि त्याचा फायदा देखील अखिल जगासाठी व्हावा. 👍

“पोस्टकार्डवरील उत्तर” हा त्यांनी केलेला प्रयोग तर अगदीच अफलातून. कोणत्याही शाळकरी मुलाने त्यांना साधे पोस्टकार्ड पाठवून प्रश्न विचारावे आणि नारळीकर यांनी त्याला उत्तर द्यावे.. तेही अगदी स्वाक्षरीसह. ❤️ तुम्हाला देशभरात हजारो व्यक्ती सापडतील ज्यांनी नारळीकर यांच्याकडून आलेल्या उत्तराचे पोस्टकार्ड जपून ठेवले असेल. व्याख्यानांच्या वेळी समोर जसे श्रोते असतील, त्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे व्याख्यान होई. महाविद्यालयीन काळातील त्यांच्या एका शिक्षकाचे राहणीमान आणि उच्चार खूपच गावठी होते. सहाजिकच विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र त्याच्या ज्ञानाने नंतर मुले खूप प्रभावित झाली. कपड्यावर ज्ञान ठरत नाही, याचा धडा जयंतरावांना तेव्हाच मिळाला होता. त्यामुळे आयुकाच्या संचालकपदी असताना देखील त्यांचा पोषाख शक्यतो साधा असायचा. नवीन व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधताना हाच साधेपणा उपयोगी ठरायचा.

सामाजिक परिवर्तनासाठी आग्रही असणारे नारळीकर प्रसंग आला म्हणून बोटचेपेपणाची भूमिका घेताना कधी दिसत नाहीत. १९८६ साली मंगलाबाईंना कर्करोग झाल्याचे आढळून आले. मात्र या प्रसंगाने देखील त्यांची, मंगलाबाई यांची, अंगिकारलेल्या तत्त्वांवरची निष्ठा ढळली नाही. वि. वा. नारळीकर यांनीदेखील आजार आणि दैववाद यांना एकत्र येऊ दिले नाही. झालेल्या आजाराची व्यवस्थित कालमीमांसा केली, त्यावर उपचार केले आणि मंगलाबाई त्यातून पूर्णतः बऱ्या झाल्या. आज ही जोडी जराशी थकली असली तरी सामाजिक कार्यात पूर्वीप्रमाणेच क्रियाशील आहे.

शास्त्रज्ञ आस्तिक असो अथवा नास्तिक, मात्र त्याने चिकित्सक असले पाहिजे, विवेकी असले पाहिजे असा आग्रह नारळीकर धरतात. त्यांचा “पुराणातील विज्ञान विकासाची वांगी” हा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. त्यात ते म्हणतात की “क्वांटम फिजिक्स आणि अध्यात्म यांच्यात वरवर थोडे साम्य दिसत असले तरी क्वांटम फिजिक्समधील सर्व संकल्पना गणिताच्या भाषेत मांडल्या जातात आणि त्या प्रयोगाने पडताळता देखील येतात. पुराणकथांमध्ये अनेक वैज्ञानिक शोध असल्याचा दावा केला जातो. परंतु आजमितीला त्याचा पुरावा सापडत नाही, हेच सत्य आहे. “

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असो वा फलज्योतिषाचा भांडाफोड. आपल्या विनयी मात्र ठाम भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत. चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची चाचणी घेण्याचे आव्हान दिले होते. कुंडलीचा अभ्यास करून सदर व्यक्ती ती अभ्यासात हुशार आहे की नाही.. बस एवढेच सांगायचे होते. यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येणार होता. मात्र या चाचणीमध्ये कोणीही ज्योतिषी सफल झाला नाही. फलज्योतिष हे शास्त्र नाही, हे सिद्ध झाले. आजही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यामध्ये नारळीकर यांनी घेतलेल्या चाचणी-परीक्षा खूप बळ देणा-या ठरल्या आहेत. डॉ. लागू, निळूभाऊ फुले, पु. ल. देशपांडे, जयंत नारळीकर यांसारख्या वलयांकित व्यक्तींनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला वजन प्राप्त झाले आहे.

पु. ल. देशपांडे आणि नारळीकर यांची इंग्लंडमध्ये अचानक भेट झाली होती, बरं का. इंग्लंडमध्ये बागेत फिरताना मराठी शब्द कानावर पडले म्हणून नारळीकर ‘कोण आहे’, हे पहायला गेले, तर साक्षात पु. ल. आणि सुनीताबाई समोर. तेव्हा त्या दोघांना नारळीकरांनी मोठ्या आवडीने केंब्रिज विद्यापीठ दाखवले. पुढे आयुकाचे काम पाहिल्यावर, आवडल्यावर पु. ल. आणि सुनीताबाई यांनी आयुकाला भरघोस देणगी दिली. त्यातून लहान मुलांसाठी एक नवी इमारत निर्माण करण्यात आली आणि कल्पक नारळीकर यांनी त्या इमारतीचे नाव “पुलस्त्य” ठेवले. पुलस्त्य हा सप्तर्षीमधील एक तारा आहे. पु. ल. आणि पुलस्त्य अशी छान सांगड घालण्यात आली.

पु. लं. बाबत अजून एक गमतीशीर किस्सा घडला आहे. नारळीकर यांचे लग्न व्हायचे होते. वयाच्या पंचविशीत पद्मभूषण मिळालेले (माझ्या माहितीत सर्वात कमी वयाचे पद्मभूषण) नारळीकर प्रसिद्धीपासून दूर राहायचा प्रयत्न करायचे. एकदा त्यांच्या भावी सासऱ्याने पु. लं. च्या “वाऱ्यावरची वरात”ची तिकीटे आणली होती. ‘मी नाटक पाहायला आलो आहे’, असा उल्लेख पु. ल. यांनी करू नये अशी जयंतरावांची इच्छा. मात्र खोडकर पु. ल. यांनी त्यांचा उल्लेख केलाच. त्यातही अशी गुगली टाकली की आज आपल्याकडे नारळीकर उपस्थित आहेत असे म्हणून नारळीकर बसले होते त्याच्याविरुध्द बाजूला नजर टाकली. आसपासचे प्रेक्षक शोधत बसले नारळीकर कुठे आहेत. 😂

जीवनाचा भरभरून आनंद घेणारे जयंत नारळीकर अतिशय हजरजबाबी. त्यांना एकदा विचारले गेले.. “पुनर्जन्मावर तुमचा विश्वास नाही. पण जर खरंच पुढचा जन्म घेताना पर्याय असेल, तर तुम्हाला काय व्हायला आवडेल?” नारळीकर उत्तरले “मला पुन्हा जयंत नारळीकर व्हायला आवडेल.” ❤️ एकदा त्यांना विचारले, “आर्यभट, भास्कर, ब्रह्मगुप्त ही नावे तुम्ही नेहमी वापरता. तुमच्यावर परंपरेचा पगडा आहे का?” नारळीकर म्हणाले, “या सर्वांनी सैद्धांतिक मांडणी केली होती. मात्र आर्यभटने सुरू केलेली परंपरा भास्करपर्यंतच संपली. दुर्बिणीने स्वतः तपासून पाहणाऱ्या गॅलेलिओच्या परंपरेचा मी पाईक आहे. “

मी खूप लहान होतो, तेव्हा ‘यक्षाची देणगी’ कथासंग्रह (पहिली आवृत्ती १९७९ सालची) वडिलांनी घरी आणला होता. वडिलांना का विकत आणावा वाटला, माहीत नाही.. पण मी आजवर त्याची किमान ५० वेळा तरी पारायणे केली आहेत. विशेष म्हणजे कागद अतिशय जीर्ण झाला असला तरी दर वेळेस आतील कथा ताज्याच वाटतात. हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या गणितज्ञाला अगणित पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात २००४ साली मिळालेला पद्मविभूषण आणि २०११ साली मिळालेला महाराष्ट्रभूषण यांचा समावेश आहे.

नारळीकरांचे एक वाक्य नेहमी वापरले जाते, “आकाशातील ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो का? असे जेव्हा मला विचारले जाते तेव्हा मला सखेद आश्चर्य वाटते. आश्चर्य यासाठी की ही व्यक्ती एकविसाव्या शतकात हा प्रश्न विचारत आहे. आणि खेद यासाठी की प्रश्न विचारणारी व्यक्ती भारतीय आहे. 😔 आगामी काळात असे प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी आशा आपण बाळगूया.. विज्ञानाचा प्रसार करू या.”

 जय गणित, जय विज्ञान

#richyabhau

#नारळीकर_जयंत

आपला ब्लॉग : https://richyabhau. blogspot. com/ 

माहिती संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग -१- लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – १  – लेखक :  अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर

विज्ञानकथा मराठी भाषेमध्ये आणून लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही बाब विज्ञानाविषयी लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी सन्मानजनक आहे. जयंत नारळीकर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ.. त्यांनी संशोधनासोबत साहित्याची देखील सेवा अतिशय जिव्हाळ्याने केली आहे. मराठी वाचकांत विज्ञानाची आवड रुजवण्यामध्ये नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानकथा लिहिणं हा खूपच अवघड विषय… कारण एकाच वेळेस तुम्हाला विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालावी लागते. आजच्या विज्ञानकथांमधून भविष्यातील विज्ञान जन्म घेत असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जयंत नारळीकर यांचे संमेलनाध्यक्षपद म्हणजे साहित्याचा हा विज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास खूप दिलासा देणारा…

विज्ञान समजून घ्यायला त्या व्यक्तीची मातृभाषाच सर्वात उत्तम पर्याय असतो. इंग्रजीत जेव्हा एखादी माहिती मिळते तेव्हा मेंदू प्रथम त्याचे रूपांतर मायबोलीमध्ये करतो आणि समजून घेतो. वेळ आणि परिश्रम दोन्हींचा अपव्यय.. सदर ज्ञान मातृभाषेत उपलब्ध असल्यास जास्त सहजगत्या आत्मसात होते असे नारळीकर म्हणायचे.. मराठी भाषा ही नारळीकर यांच्यासाठी पावित्र्याची नाही तर जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कथेत इंग्रजी शब्दाऐवजी अट्टाहासी मराठी शब्द वापरायचा द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागला नाही. भाषेच्या सहजतेमुळे त्यांचे लिखाण वाचले गेले आणि विज्ञानकथा हा साहित्य प्रकार मराठीत लोकप्रिय झाला. मराठी साहित्याचे विश्व खऱ्या अर्थाने विस्तारणारी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली आहे याचा अगदी “दिलसे” आनंद झाला आहे. ❤️

‘चार नगरांतील माझे विश्व’ या जयंत नारळीकर यांच्या आत्मवृत्ताला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात त्यांची जडणघडण कशी झाली हे समजून घेता येते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरात झाला. विद्वत्ता ही जणु त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती. मोठा जयंत आणि छोटा अनंत असे आटोपशीर कुटुंब. आई सुमती संस्कृत भाषेमधील पंडिता. तसेच एसराज या वाद्यावर त्यांची हुकूमत. (एसराज म्हणजे काय पाहायचे असेल तर सत्येंद्रनाथ बोस यांची पोस्ट पहा. ) प्रसिद्ध सांख्यिकी विजय शंकर हुजुरबाजार हे जयंतरावांचे मामा.

जयंत आणि अनंत दोघे आईला ‘ताई’ म्हणायचे आणि वडिलांना ‘तात्या’. रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. रँग्लर ही पदवी लय मोठी. केंब्रिज विद्यापीठामध्ये दरवर्षी गणित विषयात पहिल्या वर्गात पास होणारे रँग्लर म्हणवले जातात. जयंतराव आणि त्यांचे वडील हे दोघे पण रँग्लर. ❤️वि. वा. नारळीकर खूपच हुशार. वि. वा. यांचे आईन्स्टाईनने मांडलेल्या सापेक्षतावाद सिद्धांतावर प्रभुत्व होते. त्यांना १९२८ साली BSc मध्ये ९६% मार्क पडले होते. त्यांना केंब्रिजमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. एन. टाटा स्कॉलरशिप मिळाली. त्यांची हुशारी पाहून कोल्हापूर संस्थानाने त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली, परत आल्यावर संस्थानात नोकरी करायची या अटीवर.

कोल्हापूरच्या जवळील “पाचगाव” हे नारळीकर यांचे मूळगाव. जयंतरावांचे आजोबा वासुदेवशास्त्री भिक्षुकी करून पोट भरत होते. मात्र वि. वा. यांनी घराण्याचे नाव रोशन केले. घराण्याच्या नावाची पण एक मजा आहे. त्यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला म्हणे नारळाएवढे आंबे लागत.. म्हणून यांचे नाव नारळीकर. अशी दंतकथा लहानपणापासून ऐकली असल्याचे जयंतराव सांगतात, मात्र त्यांनी कधी ते झाड पाहिलेले नाही. त्यांचा जन्म जरी कोल्हापूरच्या रांगड्या मातीत झाला असला, तरी त्यांचे कुटुंब वाराणसी येथे स्थलांतरित झाले होते. रँग्लर वि. वा. नारळीकर यांना बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुखपदी निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर संस्थानाने दिलेली रक्कम परत करून वि. वा. १९३२ मध्ये वाराणसी येथे स्थायिक झाले होते.

घरात मोठ्या माणसांचा राबता. विनोबा भावे ते गोळवलकर गुरुजी अशी दोन ध्रुवावरील माणसे त्यांच्या घरी यायची. (दाढी ही एकच सामाईक बाब असावी त्यांच्यात, जसे रविंद्रनाथ टागोर आणि आपल्या भाऊमध्ये आहे. भाऊचे नाव सांगायला नको ना) सी. डी. देशमुख यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ असो, वा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखा शिक्षणतज्ज्ञ.. दीनानाथ दलाल यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकार असो वा पु. ल. देशपांडे यांच्यासारखा हरफनमौला… तुकडोजीमहाराज असो वा रँग्लर परांजपे (पहिले भारतीय रँग्लर) कोणतीही महत्त्वाची मराठी व्यक्ती वाराणसीमध्ये आली तर नारळीकर कुटुंबाकडे त्यांचे जेवण ठरलेले असे. रँग्लर परांजपे यांची मुलगी शकुंतला, नात सई परांजपे (होय त्याच.. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका.. जयंतराव आणि त्या समवयस्क) यांचे देखील येणेजाणे होते. जयंत नारळीकर यांचा ८० वा वाढदिवस आयुकामध्ये साजरा झाला, तेव्हा सईने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्याच एका विज्ञानकथेवर एक नाटक बसवून सादर केले होते.

लहानपणी आई जयंत, अनंत यांना गणिताची कोडी घालत असे.. त्यामुळे त्यांना गणित आवडायला लागले. आई दोघांना रोज झोपण्यापूर्वी इंग्रजी, मराठी मधील नामांकित लेखकांच्या गोष्टी क्रमशः भागात सांगत असे. मात्र उत्सुकता ताणली गेली की पोरं थोडीच २४ तास वाट पाहणार.. सकाळी उठल्यावर पुस्तक हाती घेणे आणि गोष्टीचा फडशा पाडणे. यातूनच जयंतरावांना वाचनाची आवड लागली. (पोरांना पुस्तक वाच म्हणले की वाचत नाहीत.. त्यापेक्षा ही आयडिया भारी आहे राव, ट्राय केली पाहिजे आपण पण.. ) सुमतीबाई यांचा भाऊ मोरेश्वर हुजुरबाजार हा एमएससी करण्यासाठी वाराणसी येथे नारळीकर कुटुंबात तीन वर्षं राहिला होता. तेव्हा घरातील फळ्यावर रोज मोरुमामा जयंतसाठी एक गणितीय कोडे लिहून ठेवायचा.. जोवर ते सुटत नाही, तोवर जयंतला चैन पडायची नाही. त्यामुळे शाळेतील गणिताचा अभ्यास आधीच झालेला असायचा. ❤️

जयंत आणि अनंतचे शिक्षण वाराणसी येथे हिंदी माध्यमात सुरू झाले. हिंदी ही रोजची व्यवहार भाषा.. घरात मराठी भाषा बोलली जायची, मराठी पाहुण्यांची वर्दळ, वर्षा दोनवर्षाने सुटीमध्ये महाराष्ट्र भेट व्हायची.. त्यामुळे मराठी एकदम पक्की. इंग्रजी पुस्तकातील गोष्टी वाचूनवाचून या भाषेची पण तयारी, तर सकाळ-संध्याकाळ संस्कृत श्लोकांचे पाठांतर.. जयंतराव लहानपणीच बहुभाषिक झाले. एका रात्री सर्वपल्ली राधाकृष्णन जेवायला आले असताना या दोघा भावांनी शंकराचार्यांचे दशश्लोकी स्तोत्र सादर करायचा प्रयोग केला. एका खोलीत बसून पेटीच्या साथीवर हे दोघे गात आहेत.. आणि बाहेर लॉनमध्ये बसलेली मंडळी गप्पा मारणे थांबवून हे ऐकत आहेत.. त्यांना वाटले की गाणे आकाशवाणीवर सुरू आहे. स्तोत्र संपल्यावर त्यांना समजले की, अरे ही तर या दोघा भावांनी केलेली गुगली आहे. दोघांचे गाण्याचे, पठणाचे आणि उच्चारांचे खूप कौतुक झाले. प्रयोग प्रचंड यशस्वी.

रस्त्यावर डोंबा-याचा पायाला काठी बांधून चालण्याचा खेळ पाहिला. घरी तसेच करायचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे त्याला ताई तात्यांचे प्रोत्साहन आणि सहाय्य. दोन्ही पोरं पायांना काठी बांधून चालायला लवकरच शिकली देखील. अर्थात लहानपणी अनेक अयशस्वी प्रयोग देखील केले आहेत. गाद्यांवर उड्या मारताना एकदा अंदाज चुकला आणि उडी थेट पलीकडल्या काचेच्या कपाटावर.. तेव्हा घुसलेल्या काचेचा व्रण आजही जयंतरावांच्या पायावर आहे. त्यासोबत बालपणातील अजून एका घटनेची आठवण त्यांच्या हृदयावर कोरली आहे. नारायणराव व्यास हे नारळीकर कुटुंबाचे स्नेही. त्यांचे नेहमी येणेजाणे. दररोज लाड करणारे व्यासमामा एक दिवस वेगळ्या मूडमध्ये होते. जयंत आणि अनंत दोघांना बोलून सांगितले की तुम्ही दोघे खूप ऐदी आहात.. सगळे आयते पाहिजे तुम्हाला.. घरातले काहीच काम करत नाही. अभ्यास करताना देखील दिसत नाही.

कधीही बोलून न घेण्याची सवय असलेले जयंत, अनंत या गोष्टीने खूपच नाराज झाले. व्यासमामा तेवढ्याने थांबले नाहीत, तर त्यांनी वि. वा. आणि सुमतीबाई यांचीदेखील हजेरी घेतली. तुम्ही मुलांना धाक लावत नाही, अशी तक्रार केली. वि. वा. म्हणाले “हे दोघे शाळेमध्ये कायम वरचा नंबर काढतात. त्यामुळे कधी बोलायची गरज पडली नाही. ” व्यासमामा म्हणाले, “आता अभ्यास सोपा आहे म्हणून ठीक. पण कष्ट करायची सवय लागली पाहिजे. ” झाले… तात्यांचा खटका पडला आणि रोज पहाटे उठून चार तास अभ्यास करायचे फर्मान काढले गेले. दोघा भावांनी तेव्हा मामांचा किती उदोउदो केला असेल काय माहित.. पण हीच अभ्यासाची सवय जयंत, अनंत यांना जीवनात यशस्वी करून गेली. जयंतराव आज व्यासमामांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. ❤️

मॅट्रिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून जयंतराव उत्तीर्ण झाले, मात्र त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला. गणित, विज्ञानासोबत संस्कृतची आवड होती. सर्वच विषयात चांगले मार्क होते. पण मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत. एकतर आर्ट्स घ्या किंवा सायन्स. (आपल्याकडे लयच बंधन.. बाहेर देशात तसे नाही. जेनिफर डॉडनाने बायोकेमिस्ट्री विषय घेऊन आर्टसची पदवी मिळवली होती) नारळीकर म्हणतात, “अशी विभागणी चुकीची आहे. आजच्या स्थितीत कलाशाखेचा विज्ञानशाखेशी संवादच उरत नाही, म्हणून उपविषय निवडणे ऐच्छिक असावे. ”

बनारसमध्येच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. घरात वडील वैज्ञानिक असल्याने कोणत्याही संकल्पनेचा शेवटपर्यंत पिच्छा करायची सवय लागली. अनेक दिग्गज शास्त्रज्ञांची व्याख्याने विद्यापीठात आयोजित केली जात होती. बुद्धीला नवी क्षितिजे खुणावत होती. १९५७ साली बी. एसस्सी. च्या परीक्षेमध्ये अभूतपूर्व, उच्चांकी गुण प्राप्त करून जयंतराव विद्यापीठात पहिले आले. वडीलांप्रमाणे जयंतरावांना देखील टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी बोट पकडली.

केंब्रिज येथे त्यांनी बीए, एमए व पीएचडी या सर्व पदव्या मिळवल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. रँग्लरची परीक्षा लय भारी. परीक्षार्थी विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या स्टूलावर बसायचे (या ट्रायपॉडमुळे ही परीक्षा ‘ट्रायपॉस’ परीक्षा या नावाने देखील ओळखली जाते.) समोर प्रश्नांची फेरी झाडायला प्राध्यापकांची फौज. चहूबाजूंनी हल्ला करून बिचाऱ्या विद्यार्थ्याला जेरीस आणणारी.. विद्यार्थ्याच्या ज्ञानाची खरी कसोटी पाहिली जाते. या परीक्षेत जो टिकला, तोच जिंकला. १९५९ मध्ये बी ए (ट्रायपॉस) परीक्षेच्या वेळी जयंतराव अपघातग्रस्त होते. पायाला प्लास्टर.. मात्र त्यांनी सर्व प्राध्यापकांना अशी उत्तरे दिली की, त्या परीक्षेत जयंतराव सर्वात पहिले आले. म्हणजे सिनियर रँग्लर झाले. बापसे बेटा सवाई. ❤️

स्टीफन हॉकिंग आणि नारळीकर दोघे एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होते. जयंतरावांच्या एक दोन वर्षं मागे होता स्टीफन. त्यांची भेट स्टीफन केंब्रिजमध्ये यायच्या आधीच झाली. १९६१ मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विज्ञान परिषदेमध्ये जयंतराव व्याख्यान देत होते. तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून आलेल्या स्टीफनने सर्वात जास्त प्रश्न विचारले होते. याच विज्ञान परिषदेत दोघांनी टेबलटेनिसचा एक सामना देखील खेळला, ज्यात जयंतराव विजयी झाले होते. (तेव्हा स्टीफनचा आजार जास्त बळावला नव्हता) स्टीफनची आठवण सांगताना जयंतराव म्हणतात, “विद्यार्थीदशेत असलेला स्टीफन पाहता तो नंतर एवढे मोलाचे संशोधन करेल असे वाटले नव्हते. तेव्हा तो अगदी सामान्य विद्यार्थी होता. त्याने त्याच्यामधले ‘बेस्ट’ नंतर बाहेर काढले. ” १९६६ साली नारळीकर यांना ॲडम पारितोषिक मिळाले. स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोज यांच्यासोबत विभागून. खुद्द स्टीफन हॉकिंग यांनी फोन करून नारळीकर यांना ही बातमी दिली होती. गणितात मिळणारी टायसन, स्मिथ आणि ॲडम अशी तीनही बक्षिसे नारळीकरांनी पटकावली.

एम ए करत असताना जयंतरावांनी सन १९६० मध्ये खगोलशास्त्रसाठी असलेले टायसन पारितोषिक मिळवले. तर पीएचडी करताना सन १९६२ मध्ये स्मिथ पारितोषिक देखील पटकावले. १९६३ साली पीएचडी पूर्ण केली. पीएचडी करताना जयंत नारळीकर यांना सर फ्रेड हॉएल यांचे मार्गदर्शन लाभले. हॉएल हे संशोधनातील मोठे नाव. आइन्स्टाइनने मांडणी केलेला बिगबँग सिद्धांतातील त्रुटी काढून दाखवणारा हा शास्त्रज्ञ. अनेक वर्षं बिगबँग समर्थक आणि हॉएल यांच्यात वादाच्या फेरी होत होत्या.. कधी या गटाची तर कधी त्या गटाची सरशी होत होती. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल मात्र यांच्यासोबत “कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी” मांडली आणि या वादावर पडदा पडला.

आइन्स्टाइन म्हणतो की, विश्व विस्तारत आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने प्रसंगी सिद्धांताला स्थिरांकाचे ठिगळ देखील लावले आहे. तरीही ताऱ्यांच्या जन्माचे गणन करताना काही गणितीय त्रुटी राहून जातात. यावर हॉएलने आक्षेप घेतले. मात्र नारळीकर आणि हॉएल यांनी संशोधन केले असता असे लक्षात आले की विश्व वेळोवेळी प्रसरण देखील पावते आणि आकुंचन देखील. (पुढे हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रांवरून हे सिद्ध देखील झाले. ) हा शोध खूप महत्त्वाचा होता. एका भारतीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाइनवर मात केली, ही बाब “१६ वर्षे वयाच्या देशासाठी” खूप महत्त्वाची होती. (देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम १६ वर्षे झाली होती. ) भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ जाहीर केला. १९६५ साली जेव्हा ते काही महिन्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांना बघायला तोबा गर्दी.. जयंत नारळीकर हे खूप मोठे स्टार झाले होते.. लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल. ‘ 

– क्रमश: भाग पहिला 

जय गणित, जय विज्ञान

#richyabhau

#नारळीकर_जयंत

आपला ब्लॉग : https://richyabhau. blogspot. com/ 

माहिती संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares